एक होते घर… ते होते माझे घर!
“हे विश्वचि माझे घर” असे ज्ञानदेव म्हणून गेले. ज्ञानेश्वर एक जीवनमुक्त संत व ज्ञानी पुरुष होते. त्यांच्यासाठी संपूर्ण विश्व हेच त्यांचे घर. माझ्यासाठी व माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांसाठी ‘विश्व’ हे माझे घर कसे असू शकेल? आमच्यासाठी? “माझे घर हातभर”! ..
“ॐ सह नाववतु” वसुधैव कुटुम्बकम”या वेदातील प्रार्थना आम्हाला माहित आहेत. “आम्ही सारी एका परमेश्वराची लेकरे आहोत” ही शिकवण आम्हाला शाळेतील प्रार्थनांतून आणि संस्कारातून मिळतात. तरी आमच्यासाठी, ‘आपलं स्वतःचं घर’ ही आयुष्यातील समाधानाची, सौख्याची आणि आत्मसन्मानाची एक खूण आहे, हे निश्चित!
आमची भारतीय संस्कृती कांही मूल्यांवर आधारलेली आहे. भारतीय संतांनी आपल्या प्रार्थनेतून शिकवणीतून स्वतःसाठी काहीही न मागता, ” भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे” असे विश्वबंधुत्वाचे वरदान मागितले. पण संसारी माणसाला “माझे कुटुंब आणि माझ्या कुटुंबाला निवारा देणारे ‘माझं घर’ ही जीवन-प्रवासाची वाटचाल सुकर होण्यासाठी मिळणारी एक आत्मिक ऊर्जा आहे” असे वाटते !!
विश्व -विकासाच्या कल्पनेची सुरुवात ही व्यक्ती पासूनच होते हे लक्षात घ्यायला हवे. व्यक्ती विकसित झाली तरच विश्व विकसित होईल. आणि व्यक्ती विकासात ज्या वास्तुत व्यक्तीचे निवासस्थान, त्या वास्तूचे महत्त्व कोण कमी लेखील ? म्हणतात ना… घर म्हणजे केवळ चार भिंतीचा निवारा नाही तर ..
“घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती,
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती…”
असं घर ज्यांना सुदैवाने मिळते, त्यांच्या आनंदाला काय तोटा?
किंबहुना मला वाटते “माझे घर” या संकल्पनेशिवाय सर्वसामान्य माणसाचे अस्तित्वच संभवत नाही. माझे घर म्हणजे माझे अस्तित्व, माझे घर म्हणजे माझ्या सुंदर आठवणींचा मोठा खजिना, अशा घराला जेव्हा निरोप देण्याची वेळ येते , “अखेरचा हा तुला दंडवत”, म्हणत त्याचा कायमचा वियोग सहन करावा लागतो त्यावेळी मनाची स्थिती काय होत असेल?
अशाच माझ्या लाडक्या, आवडत्या घराला निरोप देण्याची दिवस परवा उगवला आणि सैरभैर झालेल्या माझ्या मनाला आवरण्यासाठी मनात घोंगावणाऱ्या विचारांना कागदावर उतरविण्याचा प्रयत्न केला… केवीलवाणा प्रयत्न !
“माझं घर”, “आमचं घर”,अशी आठवण झाल्यावर डोळ्यासमोर प्रथम येते ती ‘ओम सर्वोदय सोसायटी, विलेपार्ले( पू) मधील ती नं 1 ची सदनिका!! या घरात आम्ही उभयतांनी सुमारे पन्नास वर्षे सुखाने संसार केला, त्यांतील काही काल, आमच्या मुलां-नातवंडांनी या घराला घरपण दिले ,शोभा आणली. एक दिवस इथून हे घरटे सोडून त्या पाखरांनीही आकाशी झेप घेतली! कितीक सगे सोयरे मित्र वेळप्रसंगी येथे येऊन गेले त्यांची गणतीच करता येणार नाही. आयुष्याचा खेळ” इथेच आणि या बांधावर किती रंगला” त्या आठवणींना सीमाच नाही. परवा 28 एप्रिल रोजी हे ‘आमचे घर’ संपूर्णपणे रिकामी करून घराला कायमचे टाळे लावून, ते पुनर्विकासासाठी विकासकांच्या हवाली केले. (Re Development)… जीवननाट्याचा एक प्रवेश त्यादिवशी संपला. म्हणूनच विचारांचे काहूर उठले .. आठवणींची वादळे घोंगावत आहेत ..आणि त्या विचारांना शब्दरूप देऊन कुठेतरी मन शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे!
काही वर्षांनी याच परिसरात, दुसऱ्या नव्या प्रशस्त सदनिकेत आम्ही येऊ. भवताल तोच असेल. मात्र या ठिकाणी ही नंबर एकची सदनिका नसेल.. गेली अनेक वर्षे माझ्या नावाची पट्टीका (Name Plate) लेऊन सर्वांचे प्रेमाने स्वागत करीत उभा असलेला हा राखणदार- प्रवेश दरवाजा, नामशेष झालेला असेल.. आंत प्रवेश केल्यावर दिसणारी सुंदर ड्रॉइंग रूम, समोरचा विशाल टीव्ही, माझी डुलती आराम खुर्ची , तो सोफा, ते छोटे देवघर , कधीकाळी विविध पाककृतींच्या सुवासांची दरवळ करणारे किचन, खिडकीमधून दिसणारा पिवळ्या गुलमोहराच्या फुलांचा गालिचा ,आमचे साधेच पण प्रसन्न बेडरूम, त्याच्या विशाल खिडक्या मधून रोज रात्री दिसणारा आकाशाचा तारांकित देखावा, सदैव ऐकू येणारी कुहू कुहू साद.. ..तळमजल्यावरच असल्यामुळे श्वान आणि मार्जार मित्रांचे नैसर्गिक प्रेम, त्यांच्याशी झालेली जिवाभावाची मैत्री… हे सारे सारे आता संपले… हीच जाणीव मनाला बेचैन करते आहे…!!
यशस्वी ,समाधानी माणसाच्या आयुष्यात त्याच्या ‘घराचे पाठबळा’चा किती मोठा वाटा असतो , हे मी या घरातील वास्तव्यातून आलेल्या अनुभवानेच सांगू शकेन! एक समाधानी घर, कुटुंबाचे एक साम्राज्य निर्माण करते, एक विसंवादी घर ते साम्राज्य धुळीस मिळविते! .. किती जबरा प्रभाव असतो आपल्या घराचा आपल्या जीवनावर!!
. या घरातचच मायेने जोडलेल्या एका छोट्या कुटुंबात,मला प्रत्येकाची साथ आणि सोबत मिळाली… परमेश्वराचे भरभरून आशीर्वाद ही मिळाले .. माझे आई-वडील, सासू-सासरे,,मित्रमंडळी , मुले जावई ,स्नुषा,नातवंडे कधीतरी येऊन सहजीवनातून मिळणार्या प्रेमाचा शिडकावा करून गेली … ज्यांच्यासाठी हा प्रपंच सुरू केला , त्या पिल्लांनी या घरातूनच दूरदेशी प्रस्थान ठेवून जगाच्या पाठीवर, एक “आपलं घर” स्वतःसाठी निर्माण केलं !
” या घरट्यातुन पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती.”..
या ओळी आमच्यासाठी याच घराने सार्थ करून दाखविल्या…, त्या आमच्या या लाडक्या घराचा निरोप घेताना यातना होणारच ना?
गेल्या अर्ध्या शतकात या वास्तुने आठवणींचा खजिनाच उपलब्ध करून दिला! आज पावेतो इतकी वर्षे याची जाणीवच झाली नाही . कारण या प्रिय वास्तुला आम्ही Taken for granted घेतले होते ! आज निरोप घेताना मात्र आठवणींचे मोहोळ ऊठले आहे!
या आठवणीच्या कल्लोळात ही एक नियतीचा न्याय जाणवत आहे. कधीकाळी ‘बेघर’म्हणून राहिलेल्या आम्हा कुटुंबियाना, आज देशा-परदेशात अनेक घरे उपलब्ध करून देऊन ,कधीकाळी केलेल्या अन्यायाचे निराकरण होत आहे!! सलाम त्या परमेश्वरी न्यायाला!!
आयुष्याच्या वाटचालीमध्ये अल्प-दीर्घ निवासासाठी खूप घरे मिळाली. सध्या घोलवड-ता-डहाणू),येथील घरात आम्हा सर्वांचे वास्तव्य असते . त्यामुळे त्या घराच्या आठवणी खूप असल्या तरी त्या कधी तरी नंतर ! या पार्ल्याच्या घराच्या आठवणी काढताना,कोवळे बालपण ज्या घरांत गेले त्या उमरोळीच्या(ता-पालघर) कै. लक्ष्मण पाटलांचे घर,शालेय जीवन जगलो ती बोर्डीतील होळीवरील ‘चंद्रमौळी कुटी,महाविद्यालयीन जीवन कालांतील चिंचणीचे जगन दादांचे प्रशस्त कौलारू घर .. ही आमची घरे ही आठवतात,म्हणून त्यांच्याही थोड्या आठवणी सांगेन .. मन हलके होईल!
हे मानवी मन किती विचित्र आहे पहा.. ज्या आमच्या पार्ल्याच्या घरा साठी मी खेद करीत आहे आहे, ते घर पाडून तेथेच नवीन, मोठे घर मिळावे म्हणून आम्हीच सर्व सभासदांनी गेली दहा वर्षे आकांताने प्रयत्न केले होते ना? कित्येक विकासकाची मनधरणी करून,” “ही जुनी इमारत पाडा आणि येथेच आम्हाला नवीन इमारत निर्माण करून द्या ..”अशी विनंती तर आम्हीच करत होतो, मग आता कोण्या विकासकांनी ही विनंती मान्य करून आम्हास नवीन सदनिका देण्यासाठी ही जुनी वास्तु जमीनदोस्त करण्याचे ठरविले तर मला दुःख का होत आहे? याच साठी कित्येक वर्ष, ‘केला होता अट्टाहास..’ मग आता तो ‘सुखाचा क्षण’आला आहेतर मी खुशीत असावयास हवे, हे दुःख कशासाठी ?मानवी जीवनाची शोकांतिका हीच आहे का?हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे व दुसऱ्याच्या ताटातील लाडू आपल्या ताटातील लाडवा पेक्षा मोठा वाटणे..याचा अनुभव मी येतो आहे काय..”काहीतरी नवीन पाहिजे तर जुने सोडायला ही शिक …” हे मला माहीत नाही काय?.
विकास करार(DA), रजिस्ट्रार साहेबांच्या ऑफिसात फेब्रुवारी 2023 मध्ये सर्व सदस्यांनी जातीने उपस्थित राहून केला.त्यानंतर चक्रे अधिकच वेगाने फिरू लागली.या वर्षाचे पावसाळ्याचे सुरुवातीस म्हणजे मे,2023 अखेर सर्व सभासदांनी आपली सदनिका रिकामी करून विकासकांचे हवाली करावी अशा सूचना निघाल्या. हे सर्व होत असताना एक वेगळाच वेगळ्याच धुंदीत आम्ही सर्व सदस्य होतो. आता गंगेत घोडे नहात आहे, नवीन सदनिका मिळविण्याचे सोपस्कार पूर्ण झाले आहेत, पुढील दोन तीन वर्षात आम्ही टॉवरमध्ये राहणार अशी ती धुंदी होती! एका स्वप्नाची ती मोहिनी होती.. तात्पुरता पर्यायी निवास शोधण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी मिळणारे भत्ते कधी जमा होतात ,याकडे डोळे लागले. तात्पुरत्या घराचा पर्याय शोधला…जुन्या सदनातील सर्व बाड-विस्तरा, सामान नवीन घरात हलवावयाचे होते त्या कामाची क्लीष्टता व कष्ट लक्षात घेऊन दीप्ती स्वाती खास अमेरिकेतून मुंबईत आल्या …सामान दोन दिवसात हलविले .आमचे जुने घर अगदी रिकामे केविलवाणे झाले.. आता 28 एप्रिल 2023 ची शेवटची रात्र आली. उद्या सकाळी या घराला कायमचे कुलूप लावून किल्ली विकासकांचे हाती सुपूर्द करावयाची होती पुन्हा येथे कधीच प्रवेश न करण्यासाठी.. आणि खाडकन डोळे उघडले.. आता पुन्हा या घरी येणे नाही.. राहणे तर कधीच नाही.. येथील ऋणानुबंध संपला, कायमचा. आणि.. गतस्मृतींच्या आठवणींनी थैमान घातले. झंझावात मनात घोंगावू लागला ..अरे आज येथे घेतलेले सकाळचे भोजन हे या टेबलावरील शेवटचे भोजन आज येथे घालविलेली रात्र म्हणजे या खोलीतील घालवलेली शेवटची रात्र.. आज संध्याकाळी केलेली प्रार्थना ही येथील शेवटची प्रार्थना.. त्या दिवशी होणारी ‘प्रत्येक कृती ही आता येथील अखेरचीच करणार’,ही कल्पना मनाला वेदना देत होती.खरे तर त्याआधी, आज घडणाऱ्या गोष्टी कित्येक वर्ष घडतच होत्या, पण त्याची जाणीवच झाली नाही. आजवर आम्ही या वास्तुला गृहीत धरून चाललो होतो, त्यामुळे या वास्तुने आजवर दिलेल्या प्रेमाची जाणीव झाली नव्हती .आता या वियोगाच्या क्षणी ती जाणीव तीव्रतेने होत आहे.आयुष्यात आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या माणसांबद्दलही असेच असते .त्यांना आपण गृहीत धरलेले असते. जणू त्यांचे कडून प्रेम घेणे आपला हक्क झालेला असतो. मात्र दुर्दैवाने कधी त्यांचा वियोग झाला, नंतर त्यांचे महत्त्व जाणवू लागते!व्यक्ती काय किंवा वास्तू काय दोघांनाही ,प्रेमाचा एकच नियम लागू आहे. एक विषण्णता दाटली आहे.. ..मन सद्गदित होत आहे. निघताना या वास्तुपुरुषाला, प्रत्येक खोलीत फरशीवर ,साष्टांग दंडवत घालीत मी तिच्या अनंत उपकारांची अंशतः फेड करीत आहे..
आपलं घर हातभर’ असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं तर आहेच पण खूप सुंदरही आहे. हे शब्द तनामनाला विसावा देतात, हातभर शब्दापासून आभाळभर अर्थ व्यक्त करतात. हे शब्द म्हणजे प्रत्येकाच्या मनातील ‘आपल्या घरात आपण राजे’ हा भाव व्यक्त करणारी एक भाववृत्ती आहे.. हीच भावभक्ती मी व आम्ही कुटुंबीयांनी येथे वास्तव्यास असताना जोपासली .
…या वास्तुत ज्या दिवशी प्रथम प्रवेश केला त्या दिवशी “ओम वास्तु देवताभ्यो नमः”म्हणत अभिवादन केले होते, आशीर्वाद मागितले होते. आजही ही वास्तु सोडताना दंडवत घालून मी तेच आशीर्वाद मागितले …” काही वर्षांनी पुन्हा येथील नव्या वास्तुत येऊ, तेव्हाही तुझी साथ अशीच असूदे, आशीर्वाद असू दे “.. अशीच मनोभावे प्रार्थना केली .
गेली अनेक वर्षाचा काल कसा पटकन निघून गेला ? या घरातील वास्तव्य कालपरवाच सुरू झाले असे वाटते आहे, …
ही सुंदर,शुभंकर वास्तु मला मिळाली ती सुद्धा एका विस्मित करणाऱ्या कर्म धर्म संयोगाने.सन1965-70 च्या त्या कालखंडात मी पू.कै. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व्यवस्थापक व पू. कै. तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतीगृह रेक्टर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत होतो. याच वसतिगृहात चार वर्षे विद्यार्थी म्हणून अभ्यास केल्यानंतर, यु डी सी टी मधून द्वि-पदवीधारक होऊन,गोदरेज केमिकल्स या प्रसिद्ध कंपनीत नोकरी मिळाली होती. सो क्ष समाजाच्या व्यवस्थापनाने ह्या दोन जबाबदार्या सांभाळत नोकरी करण्याची सवलत मला मोठ्या मनाने दिली होती. लग्न जमले होते . लग्नानंतर येथे राहणे शक्य नसल्याने स्वतःचे निवासस्थान शोधण्याचे प्रयत्न चालू होते. जागेचे ठिकाण व आर्थिक उपलब्धता यांचा वेळ जमत नव्हता. कै. अनंतराव वर्तक(भाऊ) त्यावेळी आमच्या समाजाच्या शिरगणतीच्या निमित्ताने दादर येथील कार्यालयात नेहमी येत असत.त्यांची चांगली ओळख झाली होती. शिक्षकी पिशात असल्याने आप्पांची व त्यांचीही पूर्वीपासून ओळख होतीच .त्यांनी मला एक दिवशी सहज विचारले होते,” दिगंबर तू आता लग्न करशील, मग मुंबईत राहण्याची तुझी सोय काय?” मला भाऊंच्या बोलण्याचा रोख नक्की समजला नाही मात्र त्यांचे कडे लग्नाचे एखादे प्रपोजल असेल अशी माझी भावना झाली. कारण त्या काळात अशा विचारणा होत होत्या.
मलाही घराचा प्रश्न पडला होताच. उत्तर सापडत नव्हते. लग्नही जमले होते. भाऊंना मी तसे सांगितले .मी मोघम पणे त्यांना एवढेच म्हटले, “भाऊ, मी घर शोधतो आहे मात्र मनासारखे व बजेटमध्ये बसणारे घर मिळत नाही!” भाऊ तेव्हा एवढेच म्हणाले,” ठीक आहे, मीही बघतो काही जमते का!!” भाऊ त्या दिवसात मुंबईत नवीनच अंकुरत असलेल्या “सहकारी गृहनिर्माण संस्थां”,स्थापन करून त्यांचे मार्फत सदनिका बांधण्याचा व्यवसायात सक्रिय होते. आमच्या ग्रामीण भागातील गरजू व मध्यमवर्गीयांना विशेषतः शिक्षकी पेशात असलेल्या तरुणांना मुंबईत राहण्याचा निवारा मिळवून देत होते,याची मला कल्पना होती. भाऊंचे चिरंजीव प्रमोद व प्रकाश हे देखील माझ्याबरोबर तात्यासाहेब चुरी वस्तीगृहात माझे सहनिवासी होते. दादरलामध्ये, वर्तक स्मारक मंदिराशेजारी असलेल्या’ रावजी सोजपाळ बिल्डिंग’मध्ये हे कुटुंब राहत असे.मी कधीकधी प्रमोद बरोबर त्यांच्या घरी जात असे.
कै.अनंतराव वा वर्तक उर्फ भाऊ यांचा फोटो ज्यांनी मला घर मिळवून दिले.
आणि अहो आश्चर्यम … एके दिवशी भाऊंनी मला झटकाच दिला. एक किल्ली हातात दिली ,म्हणाले ” ही घराची किल्ली घे.विलेपार्ल्यातील या सदनिकेचा हा पत्ता घे.तेथे माझे जावई खंडेराव वर्तक भेटतील . ते एक सदनिका दाखवीतील. पसंत पडल्यास मला तसे सांग.”
त्यावेळी मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडुप,घाटकोपर येथील सदनिका ही माझ्या आर्थिक गणितात बसत नव्हत्या. त्यामुळे पश्चिम उपनगरातील विलेपार्ले सारख्या ठिकाणी उपलब्ध असलेली हे घर मला आर्थिक दृष्टया कसे परवडेल याची चिंता वाटली? माझा गंभीर झालेला चेहरा पाहून भाऊच पुढे म्हणाले,
” तू घर बघून ये ,मग पैशाचे आपण पुढेबघू!”
हा मला दुसरा शॉक होता.
मी व बंधू श्रीकांत(अण्णा), श्री खंडेराव वर्तक यांना भेटून ही सदनीका पाहिली. घर रिकामीच होते. दारावर,” श्री. प्रभाकर राव” अशी पाटी लटकत होती.
त्याच दिवशी शेजारील श्री मयेकर, श्री वसंतराव घरत यांचीही ओळख झाली. त्यांनीही स्वागत केले. “जमत असल्यास जरूर येथे राहावयास या, सर्व काही ठीक आहे”, अशी ग्वाही दिली. मी भाऊंना माझी पसंती सांगितली .आता पुढील आर्थिक व्यवहाराचे काय हे विचारले. भाऊनी तिसरा व जबरा शॉक दिला, म्हणाले,
“श्री. राव या गृहस्थांची ही सदनिका आहे.फक्त एक वर्ष ते येथे राहिले. त्यांना बंगलोर येथे स्थायिक व्हावयाचे असल्याने ते ही सदनिका विकून आपल्या गावी जात आहेत. एकूण किंमत पंसुमारे तीस हजार रुपये असून त्यातील पंधरा हजार रुपये महाराष्ट्र हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे कर्ज आहे. ते मासिक हप्त्याने फेडावे लागेल .पंधरा हजार रुपये श्री राव यांना भरणा करावयाचे आहेत. तेथेही काळजी करू नकोस. श्री राव यांना हे पैसे दोन-तीन हप्त्यात घ्या अशी विनंती करीन. तीन हजाराचा चेक त्यांना प्रथम द्यावा लागेल.तू ही किल्ली घे. उद्यापासून हा फ्लॅट तुझ्या मालकीचा असे समज!”
तीन हजार रुपयांचा चेक श्री प्रभाकर यांना,श्री खंडेराव यांचे मार्फत देऊन मी ही सदनिका ताब्यात घेतली . “श्री प्रभाकर राव” ऐवजी “श्री दिगंबर राऊत” ही नाम-पट्टीका त्या दिवशी(फेब्र..1970) तेथे झळकली.. ती दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यत तेथे होती.
पन्नास वर्षांपूर्वी, मुंबईतील विलेपार्ले उपनगरातील 550चौ.फूट (कारपेट) क्षेत्रफळाची ही सदनिका केवळ तीन हजार रुपयात ,एका दिवसात ,स्वतःच्या नावे करून येणारा मी एक भाग्यवंत माणूस आहे.. हे केवळ स्वप्नवत आहे .. त्याचमुळे या घरावर माझे खूप प्रेम आहे. सद्गुरूंची कृपा माझ्या,वाडवडिलांची पुण्याई आणि ‘अनंत हस्ते’ देणाऱ्या भाऊंची मेहरबानी अशा पवित्र त्रिवेणी संगमातून या वास्तूचा लाभ मला झालेला आहे. मला कधीच या वास्तूने काहीही उणे पडू दिले नाही.
” देता अनंत हस्ते करुणाकरांनी, घेऊ किती या दो करांनी?”.. आयुष्यात असे अनेक प्रसंग आलेले आहेत.. तीच शुभवास्तू मी आज विकासकांना हस्तांतरीत करतो आहे…. नवीन वास्तुत पुन्हा केव्हा तरी येईन,, या आशेने!!
विशेष म्हणजे ज्या जगप्रसिद्ध सरकारी आस्थापनात, मी डे. जनरल मॅनेजर म्हणून काम केले ,त्यांनी मुंबईच्या पेडर रोड या उच्चभ्रू वस्तीमध्ये, “सिल्वर ओक” या आलिशान वास्तूमध्ये (जेथे आज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध माजी मुख्यमंत्री राहतात ) एक सुसज्ज,विशाल सदनिका मला देऊ केली होती.. ती नाकारण्याचे धार्ष्ट्य आम्ही दाखवू शकलो. तो इंद्राचा ऐरावत मला नको होता .. माझी ‘ शामभटाची तट्टाणी’, त्यावेळीही मला प्रिय होती आणि आजही आहे. ते सरकारी,आलीशान निवासस्थान न स्वीकारल्याची थोडीही खंत मला नाही .कारण या वास्तुने जे आम्हाला दिले ते जगांतील कोणतीही वास्तू आम्हाला देऊ शकली नसती,अशी मला शाश्वती होती. आमच्या सर्व ईच्छा येथे फलद्रुप झाल्या.. म्हणून तर या गोड आठवणी!!
हे घर सोडले आणि दुसरे तात्पुरते घर घेण्याआधी मुंबईत एक रात्र आम्ही बेघर झालो होतो. आम्ही दोघे व दीप्तीने एक रात्र हॉटेलमध्ये काढली .ती वियोगाची रात्र, या घरातील अनेक आठवणी घेऊन आली होती .. रात्रभर माझ्या त्या आवडत्या घरातील गतस्मृतींचा चित्रपट डोळ्यासमोर उलगडत होता.. मला धीरही देत होता..
“सर्वम् यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः..”
माणसाच्या सुखाच्या स्मृती, काळ दरवळून सोडतो,तोच काळ दुःखावर हळूच फुंकर ही घालतो .म्हणून त्या काल पुरुषाला माझे वंदन ! अशी माझी मीच समजूत घातली.
या घरातील पहिली रात्र अगदी काल घालविल्यासारखी स्पष्ट आठवते .आप्पा ,छोट्या बापस(राजेंन्द्र), बरोबर मुंबईत आले .मी आणि अण्णा दादरच्या वस्तीगृहातून येथे आलो. अप्पांनी त्यांचे बरोबर, रोजच्या पूजेतील श्री दत्तगुरूंची प्रतिमा आणली होती. मनोभावे तिची पूजा करून आरती म्हटली. श्रीफळ वाढवून प्रसाद सर्वांना दिला.तेवढीच या वास्तूची गृहशांती. रात्री एका सतरंजीची शय्या, हाताची उशी करून झोपी गेलो . त्या रात्रीत एक अतीव समाधान होते.. व स्वप्नपूर्तीचा आनंद होता ..तशी झोप पुन्हा मिळाली नाही म्हणून ती रात्र आजही आठवते! आप्पांनी प्रस्थापित केलेली ती दत्तगुरूंची प्रतिमा सदैव पूजेत आहे.
स्वतःच असं सुंदर घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते जेव्हा प्रत्यक्षात साकार होतं, तो क्षण म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातील सुवर्णाक्षराने कोरलेला क्षण असतो..संसार फुलतो, वेलीवर सुंदर फुले येतात,ती वाढतात,मोठी होतात….तेंव्हा प्रत्येक क्षणाचा साक्षीदार हे “घर”असते..कधी कधी संसारिक विवंचना निर्माण होतात ,पण घरातील माणसांमुळे,त्यातील नात्यांच्या ओलाव्याने त्या नाहीशा होतात.मन ,परत तरारून आनंदी होते..त्या क्षणांना वास्तू म्हणते,…”पुढे चालत रहा..मी तुझ्या पाठीशी आहे..” माझ्या घराने मला तेच सांगितले…
1971 मार्च महिन्यात आमचा विवाह झाला. मंदा नववधू म्हणून प्रथम आपल्या घरात आली ती येथेच!.श्रीदत्त आणि दीप्ती ही आमच्या संसारवेलीवरील दोन सुंदर सुमने येथेच उमलली, फुलली .. दोघांची लडखडणारी पावले प्रथम उमटली ती याच घरातील फरशीवर. अण्णा-अरुणा विवाह होऊन संसारी झाले तेही येथेच.. दादा-दीपी बरोबर स्वातीचे (अण्णांची) ही बाल्य सुरू झाले ते येथूनच.… श्रीदत्त-दिप्ती -स्वाती यांचे बोबडे बोल आणि तिघांनी कोरस मध्ये गायलेली बडबड गीते याच आसमंतात कधीतरी घुमली.. आम्ही बंधूंची वैवाहिक जीवनातील आरंभीचा सुंदर काल घालविला तो येथेच .. चिंचणीचे विद्यालयीन शिक्षण आटोपून महाविद्यालयीन शिक्षणाचा श्रीगणेशा प्रदीपने एथूनच केला..अधून मधून दोन भगिनी(अरुणा व निलम) आपल्या लेकरांना ‘मामाचे घर’ दाखवत ते हेच! आप्पा देखील वैद्यकीय उपचारासाठी अधून मधून येत ते येथेच! येथे संपूर्ण कुटुंबाच्या सहजीवनाचा आनंदोउत्सव या घराने पाहिलेला आहे. केवढे छान दिवस असतील ते! नीलम, आप्पा आपले ‘शेवटचे घरटे’ याच घराच्या अंगणात बांधून गेले.. टाटा इस्पितळात भरती होण्यापूर्वी निघताना आप्पांनी दत्तगुरूची केलेली प्रार्थना याच घरात घुमली . माझ्या सुदैवाने त्यावेळी एक टेप रेकाॅर्डर हाताशी होता म्हणून आप्पांची ती अखेरची प्रार्थना टेप मध्ये बंदिस्त झाली. त्यानंतर आप्पांचे स्वरयंत्र व्याधीमुळे काढून टाकावे लागले. आप्पा त्या नंतर कधीच बोलू शकले नाहीत. आप्पांची ती अखेरची प्रार्थना आणि जपून ठेवलेला एकमेव आवाज …किती मोठा अनमोल खजिना या घरातील त्या देवघराने मला दिला ! आज ती प्रार्थना आमच्यासाठी “वेदमंत्राहूनी आम्हा वंद्य ” आहे..प्रत्येक शुभकार्यासाठी, गणेश पूजना बरोबरच आप्पांचे आशीर्वाद घेतो… शिक्षणासाठी म्हणून क्षिती( भाची) बरोबर काही वर्षे होती …अगदी विवाह होऊन सासरी जाईपर्यंत ती या घरी राहिली ..
आमची नातवंडे क्रिशा , इशा ,अजय, आर्यन या सर्वांची ‘बारशी’ पाहिली ती याच वास्तूने. त्यांच्या आई-पप्पांनी कामाच्या व्यापामुळे कधीतरी प्रसंगोपात् त्यांना आमच्याकडे ‘सोडल्या’वर आजोबा-आजी म्हणून त्यांचे बरोबर येथे व्यतीत केलेले ते आनंदाचे क्षण आम्ही कधीतरी विसरू शकू का? क्वचित प्रसंगी ही सर्व बच्चे कंपनी येथे एकत्रित राहिल्याचेही क्षण आठवतात. इशू आणि अजय दीर्घकाल आमच्या सोबत राहिले. त्यांची मम्मा त्या कालात M.D.चा अभ्यास करत होती म्हणून! दोघांनी आम्हास खूप खूप आनंद व समाधान दिलेले आहे. क्रिशाने दहावीच्या अभ्यासासाठी, पूर्ण वर्षभर येथे राहून दैदिप्यमान यश मिळविले व शाळेतून (Bombay Cambridge Div.) दुसरी आली. आमचा उर अभिमानाने भरून आला .ते सहजीवन आम्ही कसे विसरू शकणार? इशा व क्रिशा आज अमेरिकेच्या नामांकित विद्यापीठात शिकत, छान अभ्यास करीत आहेत. क्रिशाचे ते अभ्यासाचे टेबल आज लेखन-टेबल म्हणून मी वापरत असतो.. अगदी तिने त्यावेळी चिकटवलेल्या त्या कार्टून चित्रांसहीत..!!
श्वशूर वासूभाऊ मुंबईत कामानिमित्त आपली गाडी घेऊन आले की कधीतरी सायंकाळी येत व मुक्कामास असत ! ‘आ’ने देखील आपल्या पदस्पर्शाची पावनता या घराला कधीतरी दिली मात्र तिच्या वास्तव्याचे प्रसंग दुर्मिळ !! सणसमारंभ-शुभकार्यासाठी अनेक कौटुंबिक स्नेही मंडळी या घराला शोभा देऊन गेली. त्यांच्या किती आठवणी सांगाव्यात? दादाच्या शुभविवाहासाठी आलेली बोर्डी घोलवडकर गावकरी, आप्तेष्ट मंडळी या घरातच एक रात्रभर सामावली. याच वास्तूच्या प्रांगणात आम्ही एक छोटा मंडप टाकून तेथेच सहभोजन व धार्मिक विधी केले होते. नववधू सौ.स्वाती (सून) याच वास्तूमध्ये ” नववधु-प्रिया मी बावरते..”म्हणत प्रवेशित झाली होती. क्रिशा आणि आर्यनचे जन्माआधी दीप्तीने प्रसूती-पूर्व विश्रांतीकाल घालविला तो याच घरामध्ये..ही दोन्ही बाळे इस्पितळातून सरळ घरी आली ती येथेच .आणि हो आर्यनचा तो अचानक उद्भवलेला पायाचा आजार ..दीप्ती रात्री बारा वाजता त्याला इस्पितळात दाखल करण्यासाठी कडेवर घेऊन निघाली होती ती याच घरातून या वास्तूचे शुभाशिर्वाद घेऊन.. आमचा लाडका आर्यन एकदम बरा होऊन आला तो येथेच….नको..नकोच ती आठवण !!
माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक,सामाजिक जीवनातील किती आठवणी या घराने जपल्या आहेत. अगदी साधा ऑफिसर म्हणून काम करीत असताना कराव्या लागलेल्या 24, 24 तासाच्या ड्युट्या ,रात्रपाळ्या मी येथून आनंदात केल्या. रात्री एक दीड वाजता बामणवाड्याच्या गल्लीतून येणे भीतीदायक होते पण या घरातील माझ्या प्रेमळ माणसांची आठवण मला हे सर्व करण्यासाठी धीर देत असे. “सिगरेट फॅक्टरी”चा सुरक्षा रक्षक गुरखा मला त्यावेळी, रात्री निर्मनुष्य भयाण असलेल्या बामणवाडा गल्लीतून आमच्या सोसायटीपर्यंत आणून सोडी. कोणतीच अपेक्षा न ठेवता! पॅरिसचा पहिला परदेश प्रवास व त्यानंतरचे अनेक देशांचे प्रवास या घराच्या उंबरठ्यापासून सुरू झाले. 1989 झाली पॅरिसला जाताना निरोप देण्यासाठी मित्रांची जमलेली ती गर्दी याच घराने पाहिली. माझे कौतुक पहिले. माझ्या सामाजिक जीवनात समाजसेवेचे थोडे उपद्व्याप केले .त्यासाठी अनेक चर्चा, बैठका, विचार विनिमय या वास्तुतच झाल्याआहेत. आज या जगात नसलेली ,रमेश चौधरी,प्रमोद चुरी, हरिहर ठाकूर, रवींद्रनाथ ठाकूर,डाॅ.गजानन वर्तक, श्री दिनकर राव वर्तक ही मित्रमंडळी कधीतरी येथे येऊन गेली चर्चासत्रे रंगवून गेली आहेत. अनेक मित्रांच्या सुखद स्मृती या घरातील भिंतीत साठवल्या गेल्या आहेत…माझे गुरुवर्य कै. एस. आर. सावे सर ,कै.आर. एम. आरेकर सर यांची पाय धूळ येथे लागली आहे.. .. आमचे स्वामीजींनी दोनदा येथे पाय धुळ झाडून आम्हाला आशीर्वाद दिले.. येथील सहनिवासा मुळे प्रसिद्ध कवी वा. रा. कांत, गणपति मूर्तिकार श्री दादा घरत, इतिहास संशोधक श्री अशोक सावे, प्रसिद्ध ई एन टी, शल्यचिकित्सक डाॅ.कृष्णा जोशी, डॉ. देशपांडे, व्ही जे टी आयचे प्रा. कुलकर्णी, विल्सनचे प्रा.सारंग, एम. आय. डी. सी. चे तत्कालीन मुख्य अभियंता श्री. लेले, एस.एस.सी. टॉपर व सुप्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनियर कै. अशोक दिवाडकर आणि हो लास्ट बट नाना लिस्ट, गतकालांतील प्रसिद्ध सिनेतारका ममता कुलकर्णी.. अशा अनेक दिग्गजांना जवळून पाहता आले. सर्वोदय सोसायटीतले आमचे अनेक सेक्रेटरी /अध्यक्ष यांनी आमच्यासाठी विना वेतन योगदान दिले ते सर्वश्री, कौल, आठवले, प्रभाकर राव, मुंज, एकनाथजी घरत , बंधू घरत, नवाथे सर, दादा घरात.. काही नांवे आठवतात ! मात्र या सर्वात, सेक्रेटरी म्हणून ज्यांनी आजही आठवण सर्वजण करतात ते श्री. वसंतराव राऊत यांचे नाव आमच्या सोसायटीचे इतिहासात कायमचे कोरले गेले आहे. या सोसायटीच्या पुनर्निर्माणाचे कामात आमच्या ज्या सभासद मित्रांनी बहुमोल योगदान दिले आहे त्या आत्ताच्या कार्यकारणीचे सदस्य ,अध्यक्षा श्रीमती सुधा मॅडम, सेक्रेटरी श्री. जोसेफ एग्नेलो, श्री. गुरुदत्त पत्की, श्री संदीप नवरे, श्री ऋषिकेश नाडकर्णी त्याचप्रमाणे श्री. सोईतकर, श्री. नंदन वर्तक, श्री. रघु राव व श्रीनिवास घरत व श्री. नरेंद्र राऊत या सर्वांचे योगदान विसरता येणार नाही. काही काळ मी स्वतः देखील सोसायटीचे कार्यकारी मंडळ व पुनर्निर्माण कार्यात योगदान दिले. आमच्या सोसायटीच्या सर्व सभासदांनी दिलेले सहकार्य हे अत्यंत मोलाचे. यावाचून हा प्रकल्प मार्गी लागू शकला नसता.
आमच्या पहिल्या अम्बॅसिडर गाडीचे आगमन (1981), त्यावेळी नवलाई असलेला व सोसायटीमध्ये केवळ मोजक्या सभासदांकडे असलेल्या टेलिव्हिजनचा आमच्या घरातील प्रवेश(1973-74), त्यामुळे दररोज संध्याकाळी या छोट्या घरात जमणारी गर्दी, बाळ गोपाळांच्या तोंडावरील समाधान… किती कौतुके पाहिली या घराने. कोण आनंद आणि अभिमान व्हायचा आम्हाला त्यावेळी!! आमच्या कॉलनीतील सार्वजनिक गणपतीचे दिवसात ” चला आरतीला..” ही हाळी ऐकू आली की दादा-दीप्तीला होणारा आनंद आणि गणेशोत्सव स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी त्यांचा चाललेला आटापिटा आणि बक्षीस मिळाल्यावर चेहऱ्यावरील समाधान..अ हा हा .. काय त्या दिवसांचे वर्णन करावे.. किती किती आठवणी सांगाव्यात ?? या घराची आठवण निघाली आणि आमच्या मनी-टायगरची आठवण होणार नाही असे कसे होईल ? या येथेच तिने आम्हाला खूप प्रेम दिले, आनंद दिला आणि इथल्या मातीतच ती चिरविश्रांति घेते आहे. टायगर म्हणजे एक अद्भुत मार्जार कुलोउत्पन्न सजीव! आणि हो आमच्या दनु आणि पिदु या मित्रांनी येथे इतिहास रचलाआहे! याच घरात अधून मधून निवास करणारे हे दोघे भाग्यवान बोके आज अमेरिका-निवासी(NRI), झाले आहेत !ती मोठी रोमहर्षक कथा,दीप्ती कडूनच ऐकावी!
आणि हो दनु पिदुचा सिनियर डीग्रु आजही आमच्या त्या बेघर सहनिवासाचे रक्षण करतो आहे. आम्ही आमची सदनिका रिकामी करून, सामान टेम्पो मध्ये भरताना
डीग्रुला झालेले दुःख त्याच्या डोळ्यातून व्यक्त होत होते. टेम्पोमध्ये भरले जाणारे सामान दाखविता, सतत म्याव म्याव करून,” हे काय चालले आहे ” असा त्याचा आक्रोश सुरू होता. आम्ही त्याला शांत केले. पण तो काय ते समजून चुकला होता.. घर सोडण्या एवढेच डिग्रुला तसे सोडून जाणे,जीवावर आले होते. पण नाईलाज होता. अजून तो तेथेच कोठेतरी आहे. ….All the best Dear Diggar!
घर ही दोन अक्षरे, पण आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. आपलं हसणं, खेळणं, बागडणं, रुसवे, फुगवे, एकमेकांना माफ करणं, काळजी घेणं लाडक्या घरातच होतं. घर एकमेकांना धरून ठेवतं. त्यामुळे नोकरीसाठी किंवा इतर कामांसाठी परदेशी जाताना घराची हुरहुर लागते.. व हेच घर परत येण्यासाठी खुणावत असतं…माझ्या सर्वच परदेश प्रवासात, परमुलखात फिरण्याचे कुतूहल होते तरी घरी परत जाण्याची एक अनामिक ओढ सतत होती. फाईव्ह स्टार हॉटेल, विश्रांतीगृह, हॉलीडे होम, वसतिगृह यांना घराची सर कधीच येत नाही.
“कुठेहि जावे हृदयी असते
ओढ लावते, वाट पाहते,
प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर!
ज्योत दिव्याची मंद तेवते
शुभं करोति संथ चालते
श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ,,”
या कवीच्या ओळी किती सार्थ वाटतात!!
आपल्या घरा विषयी एवढी ओढ, का वाटत असावी..?
आपल्या घरी आल्यावर ‘परीघ नसलेल्या’ वर्तुळात आल्यासारखं वाटतं. वागण्या-बोलण्याच्या वर्तुळाचा परिघ विस्तारत जातो. तिथे आपली सत्ता असते. आपलं घर राजमहाल नसलं तरी आपण मात्र आपल्या घरात ‘राजे’ असतो. महालाला ‘महाल’ म्हटलं जातं, ‘घर’ नाही. ‘घर’, किती सुरेख शब्द! दोन अक्षरी. ना काना, ना मात्रा, ना उकार, ना वेलांटी, म्हणजेच द्वेष, मत्सर, अपमान, कमीपणा काहीच नाही. ‘घर’ या दोन अक्षरांच्या वर, खाली, आजू-बाजूला अनेक भावभावनांचे सुंदर गोफ विणलेले असतात. युगायुगाची हवीशी वाटणारी बंधनं, प्रेम, आपलेपण, स्नेह, माया, लळा, जिव्हाळा यांचे गोफ या शब्दाभोवती विणलेले असतात. परस्परांच्या सुखदु:खात एकरूप होण्याची एक दिव्य शक्ती ‘घर’ या संकल्पनेने मनात रुजते आणि फुलते. घरी वाट पाहणारं कुणीतरी असतं म्हणून घराची वाट धरण्याची ओढ असते..लळा असतो..
आपलं घर सर्वानाच सुरक्षित वाटतं. आपल्या घरात येऊन आपल्यालाच कुणी बोलू शकत नाही, रागवू शकत नाही. घरात आई असते.लहान मुलांसाठी जसा आईचा पदर असतो, तसाच घराचा पदर घरातल्या सर्वासाठी असतो. नोकरीनिमित्ताने बालपणंच घर सोडून शहरात गेलेल्यांनाही बालपणंच घर कायम खुणावत असतं. खरंच, असं असतं ‘घर’ जे आपल्या मनात कायमचं ‘घर’ करून बसलेलं असतं, अगदी कायमच..!
आमच्या पार्ल्याच्या घराच्या आठवणी मला माझ्या बालपणीच्या ऊमरोळी च्या घरी घेऊन गेल्या. उमरोळी हे पालघर- बोईसर रस्त्यावरील एक छोटे गाव. आजही ते तसेच आहे जसे 70 वर्षांपूर्वी होते. आप्पांच्या शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुमारे बारा वर्षे या गावात गेली. विवाह झाल्यानंतर आईने आपला पहिला संसार मांडला तो उमरोळी गावातील ,कै.लक्ष्मण राव पाटील या गावातील मोठ्या असामींच्या घरात. लक्ष्मण रावांचा कुटुंब कबीला खूप मोठा होता . पाच मुलगे, तीन मुली सुना नातवंडे असा मोठा कारभार होता. त्यांचा गवताचा मोठा व्यापार व शेती होती. मात्र सर्व कारभार त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री वासुनाना पाहत असत. त्यांच्याच कृपेमुळे शेजारील एक सुंदर सुबक एक-मजली घर आम्हाला भाड्याने मिळाले होते. त्या काळात शिक्षकांना मिळणारा मान सन्मान एवढा होता की,’मास्तर आपल्या घरात राहणार’, याचेच अप्रूप मालकांना जास्त असे. भाडे घेण्याचा प्रश्नच येत नसे. माझ्या बालपणीची पहिली पाच वर्षे व अण्णाची तीन वर्षे याच घरामध्ये गेली. त्या बालवयातील निरागस मैत्रीचे दिवस मला आजही आठवतात.. मित्रांचे चेहरे डोळ्यासमोर येतात ..सर्वांची नावे काही आठवत नाहीत.
वासुनानांचे चिरंजीव.सुधा,हरू व छोटा फणींद्र ही आमची बालमित्र मंडळी होती.. शेजारील किस्न्या, ठकू ही देखील गावाबाहेरील नदीत डुंबण्यासाठी व फळकुटी चा घोडा करून घोडा-गाडी खेळात सामील होत. त्यांच्या वाड्यासमोरच आमचे छोटे,सुबक घर होते. मराठी पहिल्या इयत्तेत बोर्डी शाळेत दाखल होईपर्यंत मी तेथे राहिलो. अरुणा ,नीलम व पपी यांचा या घराशी संबंध आला नाही. अगदी वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून च्या आठवणी आहेत. आई बेटेगावच्या बाजारात घेऊन जाई. चालत जावे लागे. रेल्वे लाईन ओलांडून पलीकडे बेटेगाव होते. तेथे,मामा गोपीनाथ दादा व दादी यांचे वास्तव्य असे. बेटेगाव बाजार व दादादादीच्या वात्सल्य प्रेमाच्या अनेक आठवणी आहेत. आप्पांचा दशरथ टांगेवाला ही चांगला आठवतो. बोर्डीला जावयाचे असले की आप्पा दशरथ ला बोलावित.तोच आम्हास पालघर स्टेशनवर सोडीत असे.बोर्डी हुन येताना दशरथचाच टांगा ऊमरोळीत घेऊन येई. त्याचा मुलगा आप्पांचा विद्यार्थी. वर्गातूनच निरोप जाई .तेव्हा कुठे फोन, मोबाईल होते? दशरथ अगदी वेळेवर हजर होई. येथेही मास्तर आपल्या टांग्यातून येतात याचाच दशरथला अभिमान,.टांगे भाड्याचा प्रश्नच नव्हता. सोमा, बिस्तीर हे भाऊ आप्पांचे विद्यार्थीही होते व मदतगार ही!त्यांचे कडून मे महिन्यात ताडगोळे मिळत तर भैय्या डॉक्टरचे आंबे न चुकता त्या दिवसात येत. गंगाधर काका, दत्ता वेढीकर आठवतात..अनेक विद्यार्थी घरी येत.आम्हाला ही त्यांचे घरी घेऊन जात. लाड करीत. सर्वांची नावे मात्र आठवत नाहीत. आजही काही जणांचा संपर्क आहे.
सोमा काका, गंगाधर शेवटपर्यंत घरी येत राहिले .नाईक गुरुजी, म्हात्रे गुरुजी, शृंगारपुरे अशी काही शिक्षक मंडळी त्यावेळी आमचे घरी येत व मला कडेवर उचलून कौतुक करीत. ऊमरोळीच्या त्या घराची आठवण काढताना नाना काकांना विसरून चालणार नाही.ते देखील गावातील त्या काळातील एक मोठे प्रस्थ होते. गावचे पाटील होते. त्यांचे नरसू-परसू पुत्र विद्यार्थी असल्याने नाना आमच्या कुटुंबाची विशेष बडदास्त ठेवीत. नरसिंह थोडा अकाली गेला, मात्र परशुराम 1986 मध्ये “औदुंबराची छाया” प्रकाशनावेळी बोर्डीस खास आला होता. पुढे ऊमरोळी सोडल्यानंतर चिंचणीत वास्तव्य असताना आप्पा मला हे बालपणीचे घर दाखवण्यासाठी व त्यावेळी हयात मित्रमंडळींना भेटवण्यासाठी, तेथे घेऊन गेले होते. काळ बदलला होता पण प्रेम तसेच होते. त्यावेळी वासुदेव नाना सेवानिवृत्तीचे जीवन घालवीत होते. त्यांचा दरारा तसाच होता. खूप आदरातिथ्य केले. राहण्याचा आग्रह केला. मात्र आम्ही संध्याकाळी परत आलो. मास्तर अनेक वर्षानंतर गावांत आले, त्या वेळेचा छोटा’ दिगू ‘मोठा ऑफिसर’ झाला आहे, याचे त्यांना कोण कौतुक वाटले?अशी ती साधी भोळी माणसे होती, त्यांनी त्याकाळी ही व त्यानंतरही अवीट,अमाप प्रेम दिले, आप्पांची ऊमरोळीस ती शेवटची भेट.
सन 2017 साली आम्ही आमच्या “वामनाई ट्रस्ट” तर्फे ऊमरोळी शाळेतील विद्यार्थ्यांना आप्पांचे स्मरणार्थ पारितोषिके व बक्षीसे वाटली. तेव्हा सर्वच कुटुंबीय आप्पांच्या जुन्या शाळेत गेलो होतो.फार छान कार्यक्रम झाला,आप्पांशी निगडीत खूपच थोडी मंडळी ऊरली होती . नानांचे चिरंजीव फणींद्र, व हरुभाऊ आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिले.घरी घेऊन गेले. आणि जुन्या आठवणी निघाल्या. सोमा काका होते पण थकले होते. त्यांना घरी जाऊन भेटून आलो .फणींद्र आजही संपर्कात असून त्यांचेशी संपर्क असतो . फणींद्र च्या सौजन्यामुळे या लेखातील जुन्या घराचे फोटो, चि.गौरवला मिळाले.
आमची भगिनी सौ आशा मधुकर पाटील ही पंचाळी गावातच वास्तव्यास असून ऊमरोळी शाळेत तिने अनेक वर्षे सेवा दिली आहे. तिचेही नाव आज या परिसरात मोठे आहे. आम्हाला उमरळीत एक हक्काचे स्थान आहे. ऊमरोळी म्हटले की आम्हा सर्व कुटुंबीयांचे मनांत या गावासाठी एक खास कोपरा राखून ठेवला आहे…कारण एकेकाळी तेथेही,’आमचे घर’ होते… ..
ऊमरोळी हून आप्पांची बदली बोर्डीस झाली आणि आम्ही आमच्या ‘स्वतः’च्या घरी आलो. भले ती कुडाची झोपडी का असेना पण ते आमचे घर होते, पण ते खरेच आमच्या मालकीचे घर होते काय ..?
ती देखील एक कथाच आहे!
कधीकाळी आमचे आजोबा विठ्ठल बाबा आजी जमनी बाई ,बोर्डी पासून चार-पाच मैला वरील देहेरी (आज हे गाव गुजरात मध्ये आहे). आपल्या स्वतःच्या भव्य वाड्यात, राहून आपली शेतीवाडी जमीन-जुमला सांभाळत होते .ते गावातले एक जमीनदार होते.पण काळ बदलला.. आजी आजोबांना या गावात राहणे धोक्याचे वाटू लागले ,आणि सर्व जमीन जुमला वाडा स्वस्त्तात विकून आपल्या तीन पिल्लांना(परशु,वामन व कन्या आंगू), घेऊन ही मंडळी बोर्डीत आली. आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकाचे सल्ल्यानुरूप हा व्यवहार झाला होता . त्याच्याच आश्रयास आजी आली .आजीचा आपल्या नातलगावर विश्वास होता. तो सुशिक्षित होता. त्याला कोर्ट कचेरीची कामे अवगत होती. विकलेल्या मालमत्तेचे पैसे( त्यावेळी,1900साल,सुमारे पाचशेरुपये), तिने आपल्या त्या नातेवाईकाचे हवाली केले .
“मी तुझे पैसे सुरक्षित ठेवतो. तुझी मुले मोठी झाल्यावर त्यांच्या शिक्षणासाठी कामाला येतील .सध्या तू माझ्या घरा शेजारीच झोपडीत राहा. मग पुढे काय ते बघू!”
एवढ्या तोंडी आश्वासनावर जमनी बाईने आपली सर्व कमाई जणू दुर्दैवाचे हवाली केली.. आणि दैवाची चक्रे उलटी फिरली. नातेवाईक दौलतीच्या माये पोटी जवळच्या नात्याची माया विसरला.. तो अकालीचे गेला ..त्याच्या मृत्यु नंतर पुढची पिढी कशाला दाद देईल? जमनी बाई लंकेची पार्वती झाली. एकेकाळी हाताखाली चार पाच गडी माणसे सांभाळणाऱ्या जमनीला मुलांचेही उदरभरण करता येईना! आजोबा विठ्ठल यांना संसारात गोडी नव्हतीच. व्यवहाराला खूप कच्चे होते.मात्र दान धर्म,देव दैवते, यातच त्यांचा जास्त वेळ जाई. मोठ्या परशुने शिक्षण सोडून सुतारकी सुरू केली. धाकट्या वामनने कसेबसे फायनल होऊन मास्तर की सुरू केली… धाकटी अंगू लवकरच लग्न होऊन सासरी रवाना झाली.
कुटुंबाचा हा गाडा कसाबसा सुरू होता, वामनचे लग्न होई पर्यंत दोघे भाऊ एकत्रच होते.
आम्ही ऊमरोळीहून बोर्डीत आलो तेव्हा त्या झोपडीच्या अर्ध्या भागात परशुकाकांचे कुटुंब तर अर्ध्या भागात आम्ही व बरोबर आजी ‘आपाबा’ होती.
या बोर्डीच्या घरातच आम्हा भावंडांचे बालपण शालेय जीवन गेले.मी एथूनच हायस्कूल पर्यंत शिक्षण घेतले.”बालपणीचा काळ मजेचा..” गेला तो याच घरात..!!
आम्हा सर्व सख्या, चुलत भावंडांना लहानपणी मागील सर्व इतिहास माहीत असण्याचे व त्याबद्दल खेद करण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र कधीमधी, आजी ज्या प्रकारे आपल्या त्या नातेवाईकाला दूषणे देई, सात्विक संताप करी, आपल्या दोन मुलांना धीर देऊन म्हणे,
” पोरांनो तुम्ही देवावर विश्वास ठेवा. तो तुमच्या लुबाडलेल्या पैशापेक्षा खूप काही जास्त देईल.खोटा पैसा कोणाला ही कधीच लाभत नाही..” तिच्रा डोळ्यात पाणी असे. आम्हा मुलांना, “आपल्या आजीला कोणीतरी फसवले आहे, म्हणूनच आपल्या नशीबी अशी परिस्थिती आली”,, एवढेच कळत होते. .. आज त्या सर्व घटनांचा संदर्भ कळतो आहे.
ज्या दैवगतीने माझ्या आजीला,राणीची भिकारीण करून अनेक यातना दिल्या. तिच्या मुलांना दोन वेळा जेवणाची मुश्किली केली, त्याच बिकट स्थितीने, कालपुरुषाने, तिच्या वाणीला एक वेगळे तेज दिले. तिने दिलेले आशीर्वाद तिच्या मुलांना नातवंडा,पतवंडांना फळले. आज आपाबाची कोणीच मुले हयात नाहीत. मात्र त्यांची पुढची पिढी आज सुखा समाधानात, देशा परदेशात, आयुष्य जगत आहेत. ज्यांनी तिला यातना दिल्या, परमेश्वरा त्यांना सुखी ठेव !
” सत्यमेव जयते” हे ब्रीदवाक्य कधीच खोटे होत नाही.
चंद्रमौळी झोपडी हेच आम्हा सर्व भावंडांचे सर्वांचे हक्काचे निवासस्थान.. अर्ध्या भागात परशु काकांच्या कुटुंबाचे वास्तव्य होते.. त्यांच्या घरात काका , गंगा काकी ,वसंत भाऊ ,कमाताई, शालिनी, उषा ,आशा व लहान बापस !आमचा परिवार म्हणजे अप्पा आई आम्ही पाच भावंडे व आजी आपाबा ,आप्पांची आई. या घरी मामा पपी यांचे वास्तव्य थोडे दिवस होते. ती दोघे अगदी शाळकरी असतानाच आप्पांची बदली चिंचणी ला झाली.
आम्हा भावंडाशिवाय शेजारच्या मनी मावशी कडील बुली, बेबी,बनू बाबू, धनु काकू कडील सुरेश, श्याम ,समोरच्या गांडिया काकाचे नारण, नकू, टांगेवाल्या बत्तू काकाच्या फत्तु, मेहरू आणि प्रसंगोत्पात कधी भिडू कमी पडले तर आयत्या वेळेचे कमळ्या,मध्या सारखे अनेक कलाकार हजर असत .मज्जाच मज्जा होती. मनसोक्त हसणं, खेळणं, बागडणं, रुसणं-फुगणं, लगेच माफ करणं, काळजी घेणं, आपलेपणा. खूपच आनंदाचं जगणं होतं ते. समोरच्या वेणूबाईच्या वाड्यातल्या चिंचेवरून खाली पडणाऱ्या चिंचेचा भाजलेला चिंचोका सुद्धा वाटून खाण्यातला आनंद अवर्णनीय होता!, मदन अण्णांच्या वाडीतील सफेद जांबु चोरून कसे खाता येतील, लक्ष्मी मामीच्या खोलीतील गोड पेरू कसे लंपास करता येतील ,गांडिया काकाकडे तळल्या जाणाऱ्या भज्यांच्या हात गाडीवरून दोन भजी कशी पळवता येतील याचा विचार अभ्यासापेक्षा जास्त होत असे. आणि त्यासाठी ज्या काही क्लुप्त्या आमच्या सुपीक डोक्यातून निघत, आज त्या आठवल्या म्हणजे आमच्या मेंदूची वाहवा करावी वाटते.
या युक्त्या कधी अंगलटीशी येत. ‘लेपाळ्याच्या बिया शेंगदाण्यापेक्षा छान लागतात,मी बिया फोडून दाणे काढते , खाऊन बघूया ..” ही बनुची युक्ती आमच्या चांगलीच अंगलट आली. आणि माजलेल्या(Toxicated) अवस्थेत घरी येऊन,ओकाऱ्या काढताना सर्वांसमोर झालेली संध्याकाळची फजिती आणि दुसऱ्या दिवशी वडीलधाऱ्यांची बोलणी, मित्रमंडळीत नाचक्की… आजही या आठवणी ताज्या आहेत !!.कमाताई बरोबर कपडे धुण्यास मदत करतो म्हणून जाताना,बंधाऱ्याचे खाडीवर जाऊन केलेल्या पाण्यातील अनेक उचापती .आणि गमती.. ताजे आणि स्वस्त मासे खाण्यासाठी झाईच्या खाडीजवळ समुद्रातून उभे राहून, जहाजावरील(होडकी), मासे आणण्यातील कर्तबगारी करताना ‘कादवी’त( समुद्रातील चिखल ) पाय अडकून मरता मरता वाचलो तो प्रसंग… गोकुळाष्टमीला आप्पाजींच्या वसंता बरोबर ,”गोविंदा आला रे आला ..” गर्जना करत, नेमक्या एका घराजवळ,”काकाचे आवळे गोड लागतात..” करीत हक्काने केलेली आवळ्यांची लूट… आणि हो समोरच्या सुकली काकू ने शिकविलेल्या अगदी अस्सल गावठी शिव्या, सर्वच आठवणी आणि अनुभव आयुष्यात कामाला आले आहेत..!
याच घरात ,बांबूच्या काड्या पासून स्वतः बनविलेला आकाशकंदील दिवाळीच्या पहिल्या दिवशी, उंच काठीवर बांधून वर प्रकाशमान होत असे. शेजारच्या अवाडी वाडीतून,टोपली टोपली वाहून आणलेल्या मातीने बनविलेल्या छोट्याशा ‘ओटी’ वरील, बहिणींनी काढलेल्या रंगीत रांगोळ्या पाहिल्यानंतर अभिमानाने फुलून येणारी छाती.. लख्या मामाकडील गणपतीच्या त्या पाच दिवसात आरतीची गडबड आणि पत्त्यांचे डाव .. गंगाजी-महालक्ष्मी यात्रांच्या दिवसात कधीतरी कोणाच्यातरी बैलगाडीतून यात्रेचे पुण्य मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न …आणि हो पावसाळ्याचे दिवसात कागदी होड्या सोडण्यासाठी कुठे नदीवर अथवा तलावात जायची गरजच आम्हाला भासत नसे,घरासमोरून वाहत जाणाऱ्या ‘गाव-गंगेत’ आमचे अंगणात बसूनच आम्ही या कागदी नावा सोडत असू. एरवी देखील गटाराचे पाणी सतत आमचे घरासमोरून वाहत असे. गावच्या पाटलांची तक्रार कोणाकडे करणार? आप्पांना त्यामुळे त्रास होई.. म्हणून काही दिवस कै. म्हात्रे गुरुजींनी (श्री. सतीश म्हात्रे यांचे वडीला उर्फ भाऊ )नवीनच बांधलेल्या ‘विजय विहार’या आपल्या वास्तुत पहिल्या मजल्यावर थोडे दिवसासाठी जागा दिली होती. छान हवेशीर जागा होती ती.काही दिवस मुक्काम केला.व पुढे डाॅ. चुरी (भाऊ) यांच्या जुन्या घराची माडी आमचे निवासस्थान होते. आम्ही अभ्यासासाठी व रात्री झोपण्यासाठी तेथे जात असू. बाकी सर्व व्यवहार आमच्या या छोट्या घरातच होत असत.आम्हाला आमच्या घरीच जास्त आवडे, कारण सर्व मित्र मंडळी येथेच भेटत.’बालपणीचा काल सुखाचा’, का म्हणतात याची जाणीव करून घेणारे ते दिवस.. दोन वेळ साधे जेवण निश्चित मिळे, दसऱ्याचे दिवशी काका,कोंबड्याचा बळी देऊन घरातील तलवारीची पूजा करीत, त्यादिवशी सामीश खास जेवण असे, रोजच्या कालवण भात, वरणभात भोजनात मायेचा ओलावा आणि भावंडांच्या मैत्रीचा जिव्हाळा मिसळलेला असल्याने, त्या भोजनाला अमृताचीच उपमा!! त्या दिवसात आप्पांचा एक कटाक्ष जरूर होता. कोणत्याही परिस्थितीत कोंबडीचे कच्चे अंडे आम्हाला रोज खावयास मिळे. यासाठी ते प्रत्येकी एक काळा देऊन आणा किंमत देऊन अंडी संग्रह करून ठेवित.
बोर्डीच्या त्या घराची आठवण झाली की आठवते तेथे मिळालेल्या पुरेपुर समाधानाचं माप.. येथे साध्या भाजी-भाकरीत अमृताची गोडी होती. कांदा, मुळा, भाजी ‘विठाई’ होऊन येत होती. शेणसडा घातलेल्या अंगणातली रांगोळी तुळशीबरोबर गुजगोष्ष्टी करीत असे. दिवाळीतील आकाशकंदील वार्यासवे हलून ‘हुंकारा’ देत असे.घरातली कमीच पण ‘लखलख’ भांडी, घराचं स्वच्छ चित्र दाखिवत असत.. अंगणात नातवांसह -आजींची मैफील जमलेली असे.सासुरवाशीण आत्या अधून मधून आपल्या आईला, भावांना, भावजयांना भेटण्यासाठी येऊन सासरची’ हालहवाल’ सांगत असे. अंगणातल्या सदाफुली, जास्वंदीशी गप्पा मारीत असे. बालपणीच्या ग्रामीण भागात हे चित्र सर्वत्र दिसत होत!!.
ते दिवस गेले, आमचे ते घरही भूतकाळात नष्ट झाले. आज तेथे सिमेंटच्या भिंती उभ्या आहेत. मात्र त्या दिवसांच्या बालपणीच्या आठवणी चा सुगंध अजूनही तेथे गेल्यावर सुगंधीत करतो नवे चैतन्य देतो. त्या दिवसातले आमचे बहुतेक खेळगडी आज अस्तंगत झालेले आहेत. थोडे आहेत ते आता दूरदेशी आपापल्या संसारात असतील .क्वचीत कोणीतरी भेटतो..बालपणीच्या त्या भावविश्वात जाताना आणि त्या बालमित्र मैत्रिणींच्या संगतीत घालविले ते निष्पाप प्रेमाचे क्षण आठववितांना, आजही मन सैरभैर होते.अगदी अलगदपणे मनाचे पाखरू त्या काळात जाऊन भिरभिरते. त्या काळात सर्वांचीच घरे छोटी छोटी होती. आकाशाला भिडणाऱ्या बहुमजली इमारती आमच्या गावात नव्हत्या. लहान गावांतील लहान घरे भरलेली होती. मिळकत कमी होती, गरजा कमी होत्या; पण माणसं मनाने श्रीमंत होती .. एकमेकांच्या सहवासात रमत होती. सणासुदीला, सर्वजण एकत्र येऊन आनंदोत्सव होत असे. . आता केवळ त्यांच्या आठवणी आहेत!!
बोर्डीचे ते घर घर म्हणताच डोळ्यांपुढे येते ती आजीची प्रेमळ मूर्ती, तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारी मायेची ऊब, काका,आप्पांची करारी मुद्रा, त्यांचा प्रेमळ धाक, आई,काकीचे, “दुधावरच्या सायीसारखे प्रेम”, बहीण भावंडातील लटके रुसवेफुगवे, तरीही एकमेकांवरचे आत्यंतिक प्रेम, आणखीही खूप काही. . कुठलाही प्रसंग आला, तरी सर्वांनी मिळून त्याला सामोरे जाण्याची वृत्ती!!.
या बोर्डीच्या घराने खूप सुखद आठवणी आम्हाला दिल्याआहेत .मात्र एक आठवण आली की त्या सर्व आनंदावर विरजण पडल्यासारखे वाटते.ज्यांनी आम्हास हे घर ज्यांनी राहावयास दिले होते, त्यांच्या नंतरची पिढी सर्व इतिहास सोयीस्करपणे विसरली होती.त्या घरातून आम्हाला हुसकावून लावण्यासाठी हर तर्हेचे प्रयत्न त्यांच्या वर्षांनी केले,मनस्ताप दिला.आमच्या घरासमोर येऊन ,”तुम्ही आमच्या घरातून कधी निघता, नाही तर सर्व सामान बाहेर फेकून देतो ?”अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. आमच्या बालमनावर त्यावेळी उमटलेले ओरखडे आजही मिटलेले नाहीत. आमचा काय गुन्हा होता? आमच्या बालपणीचे वैभव हिरावून घेऊन वर आम्हालाच गुन्हेगार ठरविले जात होते? त्यावेळचा आमचा निखळ आनंद कोणीतरी, हिरावून घेतला .. आप्पानी अखेरपर्यंत त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांचे भले ईच्छिले. त्यांचे तोंडून कधी अपशब्द ऐकला नाही .असो तेही दिवस गेले.. माझ्या बोर्डी घराच्या आठवणी मी ’ मनाच्या चंदनी पेटीत साठवून ठेवल्या आहेत. त्याचाच थोडा सुगंध आज घेतो आहे…
एस एस सी पास झालो आणि महाविद्यालयीन शिक्षणानिमित्त बोर्डी सोडले. त्यानंतर त्या बोर्डीच्या घरात क्वचितच राहण्याचा प्रसंग आला. आप्पांची बदली चिंचणी मराठी शाळेत झाली . जगन दादांनी चिंचणीतील बलावडीआळीतले स्वतःचे घर आम्हाला भाड्याने दिले . मात्र बारा वर्षाचे तेथील वास्तव्यात आमचे कडून भाड्याचा एक रुपया कधी घेतला नाही. उलट भाजीपाला आणि इतर रसद पुरवून बाय,दादा व कुटुंबानेच आम्हाला उपकृत केले. मोठ्या मनाची माणसे!. बोर्डीच्या घरापेक्षा ते कौलारू घर खूपच विस्तृत होते. ओटा, माजघर,स्वयंपाक घर , दोन बेडरूम होत्या. वर विस्तृत माळा होता. सामान ठेवण्यासाठीच त्याचा उपयोग होत असे . पुढे सुंदर अंगण मागे विहीर व छोटी बाग. बोर्डीच्या घरातून येथे आल्यावर आम्हाला अगदी राजमहालात आल्यासारखे वाटले. प्रदीप आणि ममा हे तर यांचे प्रा. शिक्षण चिंचणीतूनच सुरू झाले. मी व अण्णा कॉलेजच्या सुट्टीत गावाला म्हणजे चिंचणी ला येत असू. याच आळीतील दिलीप, जय,अजित, जगदीश ,अनिल, रम्या अशा मित्रांची नावे आठवतात.. सुट्टीचे दिवसात हीच मित्रमंडळी होती. मात्र या मैत्रीला बालपणीचा तो दरवळ नव्हता कारण आता आम्ही कॉलेज कुमार झालो होतो ना?
आप्पा याच गावात, याच घरातून सेवानिवृत्त झाले . आमच्या कुटुंबाच्या वाटचालीत या चिंचणीतील घराचे महत्त्व खूप मोठे आहे. बहीण अरूणा व माझा विवाह सोहळा याच घरात संपन्न झाला.नववधू म्हणून सौ. मंदाने ,”उंबरठ्यावरचे माप ओलांडले”, ते याच घराचे! बाळ श्रीदत्ताने पोटावरून रांगत, घरभर संचार केला, त्याचे साठी आप्पांनी गायलेली अंगाई गीते ऐकली ती याच घराने!
एक तपाच्या येथील दीर्घ वास्तव्यात खूप शेजारी बदलले. वसईचे के.के वर्तक काका काकी, ज्योती, बाळा( श्रीनंद) यांचा सहवास तसा दीर्घकाळ लाभला. काका एक अत्यंत अभ्यासू व रोखठोक असे व्यक्तिमत्व होते आदर्श शिक्षक होते. काकांचे वाचन खूपच विस्तृत होते अनेक विषयांवर त्यांचे चिंतन असे त्यामुळे त्यांच्याशी गप्पा करताना मला खूप शिकावयास मिळे. एका सुट्टीचे दिवशी खेळताना छोटी ज्योती मागीलदारी असलेल्या विहिरीत पडली. काकांनी त्वरित, कोणताही विचार न करता अंगावरील कपड्यासगट,विहिरीत उडी घेतली. ज्योतीला बाहेर काढले. घाबरलेली, भिजलेली, थरथरत उभी असलेली ज्योती व तिची समजूत काढणारे काका-काकी तो प्रसंग आजही डोळ्यासमोर येतो. मोठा जीवावरचा बाका प्रसंग होता पण परमेश्वरी कृपेने ज्योती वाचली. ज्योती-श्रीनंद आजही आमच्या संपर्कात असतात.
त्यानंतर शेजारी आले ते एस एम जोशी सर.ते बहुतेक वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामात व्यतीत करीत व फावल्या वेळात आपली के डी हायस्कूल मधील संस्कृत शिक्षकाची नोकरी करीत. गृहस्थ ब्रह्मचारी,सडा-फटिंग, शिस्तप्रिय आपल्याच तंद्रीत असत.आप्पांच्या शब्दाला मान देत, त्यांच्या सेवेस सदैव तत्पर असत. आमचे साठी ‘खाऊचा डबा’वेळप्रसंगी चिंचणी हून दादरला अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरात पोहोचवित. ते विलेपार्लेत राहत असत . जोशी सर म्हणजे एक वल्ली होती. आम्ही पार्ल्यात वास्तव्यात आलो तरी त्यांची कधीही भेट झाली नाही. ..
चिंचणी चे वास्तव्यात लक्षात राहिलेली दुसरे एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे छोटूभाई.. छोटालाल पुरोहित.हे त्यावेळी साठी पार झालेले गृहस्थ आपली सून व नातीसह तेथे राहत असत. त्यांचा मुलगा विष्णु कलकत्त्यास कामानिमित्त असल्याने कधीतरी पत्र पाठवीत असे.आम्ही त्याला चिंचणीस एकदाच पाहिले, आणि ते म्हणजे त्यांनी आपले कुटुंब तेथून हलविले तेव्हाच! बाप लेकाचा तेवढा सुसंवाद नसावा. विष्णूभाईला कलकत्त्यात विशेष ऊत्पन्न देणारी नोकरी नसावी.त्यामुळे तो स्वतः तिथे पेंईंग गेस्ट म्हणून राहत असे. पत्नी कपिला व लेक शीला यांना चिंचणीस छोटाभाई बरोबर राहावे लागत होते . छोटाभाई आमच्याशी मनसोक्त गप्पा करीत, जुन्या आठवणी सांगत. कधीतरी मूड आल्यावर स्वतः बनविलेले भजी बटाटेवडे आम्हास खाऊ घालीत, त्या बदल्यात आम्हाला रोजचा गुजराती पेपर वाचून दाखवावा लागे. कधीतरी विष्णूला पत्र लिहिण्याचे काम मला करावे लागे. त्यावेळी कलकत्त्याच्या ‘लीलूवा’या उपनगरात तो राहतो,एवढे समजले होते. अनेक पत्रे पाठवून हे नाव माझ्या पक्के लक्षात राहिले होते. पुढे अनेक वर्षांनी, एके दिवशी, अचानक ते नाव मला का आठवले तेही सांगेन !
एक दिवशी विष्णु कलकत्त्याहून चिंचणीत आला सर्व बाडबिस्तरा गुंडाळून आपल्या वडिलांना,बायकोला छोट्या शीलाला घेऊन कलकत्त्यात निघून गेला. त्या दुपारी घराला दंडवत घालून,आसू भरल्या डोळ्यांनी ,आपल्या इतके वर्षांच्या, प्रिय निवास स्थानाचा शेवटचा निरोप घेणारी छोटा लाल यांची मूर्ती आजही तशीच स्मरते. ते त्यांचे भाड्याचे घर होते. कित्येक वर्षे त्याच घरात त्यांनी संसार धंदा केला होता.प्रिय पत्नीचा वियोग ही त्याच घराने पाहिला होता . आता त्या वास्तूत पुन्हा येणे नाही, याची पक्की खात्री त्यांना होती. त्या त्यावेळी छोटा भाईंना काय वाटले असेल ते आज मला चांगले समजू शकते.त्यांची आठवण म्हणून एक सुंदर पितळेचे भांडे आम्हाला देऊन गेले. काही दिवसांनी छोटा लाल या जगातून निवर्तल्याची बातमी चिंचणी ला त्यांच्या नातेवाईकांकडे आली. तोच त्यांचा आमचा अखेरचा संबंध … चिंचणीचे जगन्नाथ दादांचे घर आठवले की छोटाभाई, कपिला भाभी आणि छोटी शीला ,विष्णू आणि ते लिलूवा गाव आठवणारच!!
पुढे अनेक वर्षानंतर माझ्या व्यवसायिक कामानिमित्त मी कलकत्त्यास गेलो असता दक्षिणेश्वरच्या दर्शनानंतर गंगा किनारी असलेल्या बेलूर मठात कारने निघालो होतो. हा रस्ता कलकत्ता मेट्रो रेल्वेला समांतर जात होता. अचानक एके ठिकाणी मला लिलूवा या नावाचा बोर्ड दिसला आणि मी ड्रायव्हरला गाडी उभी करण्यात सांगितले ..हेच ते लिलूवा, येथेच छोटालालचा विष्णू राहात असे व माझ्यामार्फत त्याला येथे पत्रे पाठवीत असे.. लिलूवा गाव आता शहर बनले होते. खूप बदलून गेले होते. गावात जाऊन ही मला विष्णु पुरोहित यांचे घर सापडणे शक्य नव्हते. मी दोनएक मिनिटे तिथे थांबलो, खाली उतरून मनातल्या मनात गावाला नमस्कार केला. ड्रायव्हरला, मी गाडी थांबवली का व परत गाडीत येऊन बसलो का, काहीच समजत नव्हते .. माझ्या मनात त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या,.विचार तंद्रीत पुढे निघालो. ‘विष्णू,भाभी, शीला कुटुंबीय कोठे असतील? नव्वदीच्या पुढे गेलेला विष्णू, आज जगात असेल का? छोटी शीला भेटली तरी मला खरच ओळखेल ? चिंचणी च्या बलावडी आळीत पत्ररूपाने भेटलेले कलकत्त्यातील हे गाव आज मी प्रत्यक्ष पाहत होतो.. कर्म धर्म संयोग.. जाऊ द्या “कालाय तस्मै नमः” हेच खरे!
चिंचणीच्या या सुंदर घरात राहताना काका वर्तक, जोशी सर, यांचे नंतर शेजारी राहावयास आले ते कुटुंब म्हणजे श्री. पाटील गुरुजी व सौ.लीला बाई हे शिक्षक दांपत्य. त्यांचा छोटा मुलगा थोडा रडका होता. आप्पा त्याला कडेवर घेऊन फिरवित व तो शांत होई. मी फक्त अधून मधून तेथे येत असल्याने या कुटुंबाशी माझा जास्त संबंध आला नाही.
पाटील कुटुंबाने चिंचणी सोडले .आम्ही बोर्डीत 1972 साली आलो. 1981 मध्ये आप्पा या जगातून गेले. त्यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही मुलांनी ,नातवंडांनी “औदुंबराची छाया” ही स्मरणिका सन 2006 साली प्रसिद्ध केली. त्या प्रसंगी आलेल्या सन्माननीय व्यक्तिमध्ये डॉ. जयंतराव पाटील( भारतीय नियोजन मंडळाचे माजी सदस्य) डॉ. शुभा राऊळ मुंबईच्या माझी महापौर ) श्री. केसरी भाऊ पाटील( जगप्रसिद्ध केसरी टूर्स चेसंस्थापक, मालक, सहल सम्राट) यांचे बरोबरच शिक्षक नेते आमदार कपिल पाटील उपस्थित होतै. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना कपिलजी म्हणाले होते,
” माझी आई म्हणत असे लहानपणी मी जेव्हा कधी रडत असे, आप्पा मला कडेवर घेत व अंगणात फिरवीत. मी त्वरित शांत होई. आप्पांच्या या स्मरणिका-प्रसिद्धी समारंभास उपस्थित राहून आप्पांचे माझ्यावरील ऋण अंशतः फेडण्याचा प्रयत्न करतो आहे!” त्या काळातला ,चिंचणीस आमच्या शेजारी असलेल्या पाटील कुटुंबाचा तो छोटा मुलगा म्हणजे आजचे तडफदार,अभ्यासू शिक्षक नेते आमदार कपिल पाटील!!
मानवी जीवनातले योगायोग किती अनाकलनीत असतात ?
या घराच्या अजूनही खूप आठवण सांगता येतील. आमचा ज्येष्ठ बंधू वसंत भाऊ त्यावेळी चिंचणीच्या ठाणे जिल्हा सहकारी बँकेत नोकरीत होता. कधीमधी कार्यालयात उशीर झाल्यास ,तो आमच्या चिंचणीच्या घरातच मुक्काम करी. त्याचे बरोबर गप्पा मारीत रात्र घालविणे मोठा आनंद असे. ते दिवस, त्या छान संध्याकाळी आणि त्यावेळची ती मजा याचा ऊल्लेख मी वसंत भाऊवरील लेखात ( वसंत-बहार निमाला) केलेलाच आहे. या घरात झालेले वास्तव्य आम्हाला खूप काही देऊन गेले. आमचे परशु काका देखील डोळ्याच्या ऑपरेशनच्या निमित्ताने या वास्तूत काही दिवस निवास करून गेले. प्रेम, जिव्हाळा,सहकार्य तर मिळाले, त्याबरोबरच आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना घटनांचा साक्षीदार म्हणून हे घरच आम्हाला डोळ्यासमोर येते व पुढेही येत राहील!जगन दादांचे चिरंजीव गजाभाऊ, पांडूभाऊ व दादांची धर्मपत्नी बाय यांनी त्या काळात आम्हाला जे प्रेम दिले त्याला तोड नाही. त्याला फेड नाही. त्यांचे उतराई न होता, त्यांच्या ॠणांत राहणे हीच त्या उपकाराची फेड होय! दादा गेले बाय गेली गजाभाऊ, पांडूभाऊ, मित्र दामूही गेला, त्यांच्या कुटुंबाशी मात्र अजून आमचा आजही संपर्क असतो.
दादांचे हे घर मिळण्याआधी आप्पा काही दिवस आमचे हिरू मावशी व भास्कर मावशांजी यांचे घरात राहत असत. भास्कर मावश्यांची आईही त्यावेळी जिवंत होती. गौरवर्णाची सस्मित मुखाची आजी डोळ्यासमोर येते. .सर्वांनी आप्पांना खूप मदत केली, सांभाळून घेतले. जगन् दादांचे घर मिळाले व आम्ही सर्व कुटुंबीय बोर्डीहून तेथे स्थलांतरित झालो.तो इतिहास वर दिला आहे. भास्कर मावशा दुर्दैवाने थोडे अकाली गेले. त्यामुळे हिरु मावशीला खूप खडतर दिवसांतून जावे लागले . पुढे मिलिंद व त्याच्या भगिनींनी उत्तम प्रगती करून यशस्वी वाटचाल करून दाखविली. हिरूमावशी आज सुखात आयुष्य कंठीत आहे.
चिंचणीचे ते घर व ते दिवस आठवले म्हणजे कधीतरी एक उदासीही मनात दाटते..
मी व अण्णा ज्यावेळी सुट्टीत दादरहून चिंचणीस जात असू, त्यादिवशी संध्याकाळी आम्हास घेण्यासाठी नीलम व छोटा पपी एस टी स्टँडवर कंदील घेऊन आम्हाला घरापर्यंत सोबत करण्यासाठी येत असत. आनंदाने त्यांचा चेहरा फुललेला असे. मात्र दोन दिवसांनी पुन्हा चिंचणी सोडताना ही दोघेही एस टी स्टँडवर आम्हाला निरोप देण्यासाठी येत त्यावेळी त्यांना सोडून जाताना आम्हालाही जड जाई . दोघे त्यावेळी शालेय विद्यार्थी होते. लहान होते. बंधू अण्णा आले की त्यांना घरात कोण उत्साह वाटे. चिंचणी सोडताना, नाराजीने हात हालवत, स्टँडवर, निरोप देणारे , खिन्न मनाचे पपी, नीलम डोळ्यासमोर येतात. ते दिवस आठवतात. आज नीलम या जगात नाही हे जाणवते..आणि डोळ्याच्या कडा ओलावतात !!
आयुष्याच्या वाटचालीत किती संपत्ती मिळविली, नोकरी, धंदा व्यवसायात काय कर्तृत्व करून मोठेपणा मिळविला यापेक्षा अशी प्रेमाची माणसे किती जोडली यावरच आपल्या जीवनाच्या यशस्वीतेचे मूल्यमापन होत असते .ही जोडलेली ‘आपली माणसे’ आयुष्यात खरे समाधान देत असतात …अगदी निरपेक्ष बुद्धीने!! मला वाटते मी व माझे कुटुंबीय याबाबतीत खूपच नशीबवान .ज्या ज्या घरात वास्तव्य करावे लागले तेथील शेजाऱ्यांनी, भवतालच्या परिवाराने आम्हाला सदैव प्रेम दिले. ती आमची सर्वोच्च संपत्ती आहे. माझ्या या घरांमुळे मला हे शक्य झाले, म्हणूनच त्या घरांच्या आठवणी आज एवढ्या तीव्रतेने येत आहेत.
पूर्वी घर हे एक सुखद, सुरक्षित, प्रेममय, आधारयुक्त असे स्थान होते. एकत्र कुटुंबातील लोक एकमेकांवर खूप प्रेम करत. आज घरे विभक्त झाली आहेत. घरच्या लोकांचा कंटाळा व बाहेरच्या लोकांबरोबर विरंगुळा, अशा स्थितीत समाज आहे. . प्रेमाची धारा, सुसंवाद दिवसेंदिवस कमी होत चाललाय. मनुष्याने आत्मकेंद्रीपणा कमी करून थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त आणली, तर सर्व आवडीच्या गोष्टी व व्यक्तींशी आनंदाने सुसंवाद साधता येईल. हे तारतम्य सुटत आहे, एकमेकांकडे दुर्लक्ष होत आहे, जो तो आपल्याच नादात रहात आहे, असे जाणवते .यामुळे भरल्या घरात रितेपणा येऊन अशांतीचा शिरकाव होऊ घातला आहे. आपले घरच आपल्याला खायला उठते आहे! शेवटी प्रत्येकाने “आपणास काय हवे”, ते निवडायचे आहे. आपल्या आनंद-समाधानाचा निर्माता आपणच आहोत.
आपले शेजारी व परिसर हा तर आपल्याला खूप काही देतोच परंतु घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या आवडीनिवडी, क्षमता, स्वभाव विचारात घेऊन, एकमेकांच्या मर्यादा ओळखून, एकमेकांच्या आविष्काराच्या पद्धती जाणून, एकमेकांचे अस्तित्व व अस्मिता सांभाळली, तर घर सुखी होण्यास मदत होते. अशा घराचं अंगण सुंदर होत,. त्या भोवतालचं जगही त्याला प्रतिसाद देतं. एका विचारवंताने म्हटल्याप्रमाणे ” घराला स्वर्ग बनवायचे असेल तर जमेल तेवढे व तसे एकमेकांवर – निःस्वार्थीपणे प्रेमाची उधळण करा. त्यासाठी त्यागाची- समर्पणाची भावना ठेवा. मनाची शुद्धता, प्रेम, करुणा, मैत्रीचा घरातील लोकांवर वर्षाव करा.”
‘माझे घर’ संकल्पनेपासून हळूहळू आपण पुढे सरकत, “हे विश्वची माझे घर‘‘ या संकल्पने प्रत जाऊ शकतो निदान तसा आनंद तरी घेऊ शकतो!
आपला जीवन प्रवास किती घडीचा असतो.?
या दोन घडीच्या जीवन-प्रवासात निवारा ज्या घरात मिळतो त्या घराचे महत्त्व त्यासाठीच अधोरेखित केलं गेलं आहे. माझ्या प्रत्येक घरात मला गेली कित्येक वर्ष हे मिळत आले आहे. सर्व घरांनी आम्हाला उपकृत केले आहे. त्यातलेच हे आमचे हे पार्ल्याचे घर.. त्याला “सायोनारा ,सायोनारा..” म्हणत परवा आम्ही अखेरचा निरोप दिला. म्हणून या सर्व घरांच्या सर्व आठवणीतील काही थोड्या आठवणींना कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला…
मी माझ्या या घराला शेवटी एवढीच विनंती करीन…..
“जाता जाता त्याने, मन माझे जाणून घ्यावे,
त्याच्याच कुशीतून स्वप्न पुन्हा जागावे…
आभाळापरी मजला पांघरूण त्याने द्यावे…
हे असेच घर मज पुन्हा पुन्हा लाभावे….
.. जाता जाता त्याने मन माझे जाणून घ्यावे..!!..”
दिगंबर राऊत.
ज्या घरामध्ये तुम्ही 50 वर्षांहून अधिक काळ व्यतीत केला आहे, जिथे तुम्ही तुमच्या मुलांसोबत आणि नातवंडांसह अविस्मरणीय वेळ घालवला आहे, ते घराविषयी ओढ असने स्वभाविक आहे
आमच्या घरी आमचे पप्पा कॉलेजमध्ये शिकत असताना काही वर्षे तिथे राहिल्याच्या आठवणी सांगत असतात.
“सर्वोदय” घराबरोबरच तुम्ही राहिल्यात्या इतर सर्व ठिकाणांची आठवण करून दिली आहे, छान सुंदर लेख आहे.
सुंदर हव्याहव्याशा वाटणार्या ह्द्य आठवणींची मांडणी आवडली.. *वास्तुदेवता* ही नेहमीच तथास्तू असा आशीर्वाद देत असते. तुम्हीं सर्वजण लवकरच नवीन अत्याधुनिक सोयीने परिपूर्ण सदनिके मध्ये प्रवेश कराल.. ????
सुंदर हव्याहव्याशा वाटणार्या ह्द्य आठवणींची मांडणी आवडली.. *वास्तुदेवता* ही नेहमीच तथास्तू असा आशीर्वाद देत असते. तुम्हीं सर्वजण लवकरच नवीन अत्याधुनिक सोयीने परिपूर्ण सदनिके मध्ये प्रवेश कराल.. ????
सुंदर हव्याहव्याशा वाटणार्या ह्द्य आठवणींची मांडणी आवडली.. *वास्तुदेवता* ही नेहमीच तथास्तू असा आशीर्वाद देत असते. तुम्हीं सर्वजण लवकरच नवीन अत्याधुनिक सोयीने परिपूर्ण सदनिके मध्ये प्रवेश कराल.. ????
सहयोग सोसायटीत सेक्रेटरी वसंतराव राऊत यांच्या बाजूच्या flat मध्ये माझे मेहुणे रघुवीर पाटील रहात असत.मी Sr.BSc.ला असतांना त्यांच्याकडेच रहायला होतो.पुढे Citibank मध्ये नोकरीला लागलो त्या वेळी कळले की A building मध्ये राहणारे B.M.Mundkur तसेच B building मध्ये राहणारे Bhat आणि Tony D’Souza हे Citibankers त्याच सोसायटीत रहातात म्हणून कळले.
Really true.
We will never forget our olden days there. I was also moved after reading your article. we will never forget our days speng in Om Sarvodaya society… your article reminded me all those old memory
खूपच छान,
सर्व घरी आलोय फक्त उमरोळी, या लेखामुळे सर्व घरांची ओळख झाली खूप जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला. धन्यवाद
उमरोळी ला असताना माझा जन्म नव्हता..
आपण जुन्या घराचा ऋणानुबंध किती आत्मियतेने लिहिला आहे मनात कुठेतरी गत काळच्या आठवणी जपत जपत मनातील कढ रिचवत नवीन घराचे स्वागतासाठी ही तितक्याच आपुलकीने वाट पहाते हे आपण छान शब्दात सांगितले आहे . आमच्या घराची मी अशीच स्थिती हळूहळू पुढे सरकत आहे याचं संमिश्र भावना मलाही जाणवतात.असो पुढील नवीन वास्तुनिर्मितीसाठी शुभेच्छा .
नमस्कार घरासंबंधीचा लेख खूप छान झाला आहे वास्तुशी निगडित आठवणी प्रत्येकालाच अशा प्रसंगी शेअर कराव्याशा वाटतात. आपले लिखाण मी वाचत असते .आपल्या पुस्तकाची तयारी कितपत आली?
भाई, आपल्या यशस्वी जीवनाचा प्रवास किती खडतर होता हे या वाचनातून समजले. सलाम तुमच्या संयम आणि मेहनतीला.!! पायवाट –बैलगाडी —टांगा —एस टी –ट्रेन ते प्लेन असा आपण यशस्वी प्रवास केला.तो पण कोणत्याच प्रकारचा अपघात न करता. याला कारण आपण दत्तगुरुचे भक्त आहात किंवा असावे. म्हणूनच स्वामी आपल्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी याच्यातुनच काही साध्य झाले असावे. असो उर्वरित प्रवासाला माझ्या शुभेच्छा. ??
आपल्यासारख्या low income group मधून केवळ शिक्षण हेच आपल्याला तारू शकेल ह्या भावनेने आयुष्याशी झगडणाऱ्यांना घरासाठी किती झगडावे लागते ह्याचा मला अनुभव आहे. घर सोडताना होणारी मनाची घालमेल मी अनुभवली आहे. पण तुम्ही तुमचे अनुभव इतक्या बारकाव्यांसहित गुंफले आहेत की वाचताना तुमचे आयुष्य, संवेदनशील मानसिकता, सर्वांसाठी असलेले प्रेम, प्रापंचिक तसेच समाजासाठी असलेले दायित्व ह्या सर्वांचा अनुभव येतो. एकंदरीत तुमच्या प्रत्येक लेखातून तुमची साहित्यातली प्रगल्भता आणखी फुलत जात आहे. ह्या वयात असलेली स्मृती, प्रसंगांची जोडणी आणि व्यक्त करण्याचा उत्साह वंदनीय आहे. अभिनंदन.
बंधू तुमचा ‘एक होते घर ‘ हा अवर्णनीय (अजून समर्पक शब्द केवळ तुम्हीच सुचवू शकता.) असा विस्तृत लेख वाचून त्याचे कोणत्या शब्दात वर्णन करावे कळत नाही.
Heart touching simply
Flowing language.
बंधू मामा,खूप छान लेख आहे.
माझ्याही नोकरीचा श्रीगणेशा ही ह्याच घरातून झाला .
खूप छान आठवणी आहेत.
लेख वाचताना मी पण जुन्या आठवणींत ज्याला इंग्रजीत Nostalgic म्हणतात तसा रमून गेलो कारण माझ्या बालपणीचा काही काळ तुम्हा सर्वांच्या सोबतच गेला आहे.
पार्ल्याच्या घराच्या तुझ्या आठवणी वाचताना मला वरळी डेअरीच्या स्टाफ क्वार्टर मधील चौतीस वर्षांच्या माझ्या व्यतीत केलेल्या ऐन उमेदीच्या वास्तव्यातील सुख दुःखाच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या.
प्रिय भाईंस ??
भरपूर पाऊस पडतोय – बाहेर पडण शक्यच नाही, दिवस कसा सत्कारणी लावावा ह्या विचारांत होतो आणि तुमचा लेख मिळाला.
विविध शहरांतील हजारो रहिवाश्यांची – ज्यांच्या सोसायटीजचे
redevelopment चालू आहे, त्यांची गाथा तुमच्या लेखणीतून उतरली आहे.
दोन महिन्यापूर्वी बंधूला shifting साठी मदत करायला आठ -दहा दिवस त्याच्या सोबत होतो, त्यावेळेस क्षणोक्षणी अश्याच भावना त्याच्या डोळ्यात- शब्द्धांत येत होत्या.
जयाचे अमेरिकेला जाणे आणि वाहिनीचे अचानक आपल्यातून जाणे- निव्वळ *मातृस्मृती* ह्या वास्तू मुळे कधीच विस्मृतीत गेले नाही.
??????
सध्या बंधु आणि आम्ही सारख्याच स्थित्यंतरातून जात आहोत. आमच्या बिल्डिंग पुनर्निर्माणासाठी जाव्यात म्हणून धडपडणारे आम्हीच. पण जेव्हा ते घर सोडून जायची वेळ आली तेव्हा खूप भावूक झालो. आयुष्यातील फार मोठा काळ येथेच घालवला….लेखात वर्णन केलेल्या सर्व गोष्टींची मनात उजळणी झाली. परक्या जागी अनोळखी परिसराशी ओळख करुन घेताना तेथील आठवण येत असते. हे केव्हातरी करायचेच होते.
खूप आवडले!
काही घरे पाहिलेली, तर काही पहिली नसली तरी ओळखीची वाटणारी. मात्र या निमित्ताने अनेक घरांच्या आठवणी जागे झाल्या.
दिपिने पण तिच्या घरांचे वर्णन आणि फोटो शेअर केले तर तेही खूप रंजक ठरेल!
दिगंबर भाऊ,
सहजसुंदर लिखाण!!
तुमच्या लेखणीतून उतरलेले बोलके अनुभव, निरनिराळ्या घराच्या प्रवासातील आठवणी, ऋणानुबंध, भावनांचा कल्लोळ, घराचे घरपण, सवंगडी याद्वारे मानवी जीवनातील कंगोरे उलगडतात.”माझे होते घर”मधील विले पार्ले येथील घर निर्विवाद उजवे आहे.मनापासून अभिनंदन!!!
खूप सुंदर आठवणी .रम्य ते बालपण , रम्य ती वास्तू व घर. ज्या वास्तू मध्ये आपण अनेक वर्षे वास्तव्य करतो तेथे आपल्या भावना निगडित होतात.आपल्या जडणघडणीत त्या वास्तूचे मोठे योगदान असते .
त्याची वास्तुपूजा का करतात व त्याला स्थावर जंगम का म्हणतात ते यथायोग्य आहे ,कारण वृक्षा प्रमाणे ते सचेतन असते म्हणूनच अनेक वर्षे वास्तव्य केलेल्या वास्तूतून आपण जेव्हा त्याचा निरोप घेतो त्या वेळी असे म्हणतात ती वास्तू देखील रडते ..
पार्ल्याच्या घरात मी देखील माझे लग्न होईपर्यंत व झाल्यानंतर काही .वर्षे वास्तव्याला होतो .मला आठवते एक विक्षिप्त अविवाहित तरुण चौथ्या मजल्यावर राहात होता.आमच्याकडे त्याचे जाणेयेणे होते .कोणत्या तरी कारणावरून त्याच्याशी माझा खटका उडाला . त्या दिवसापासून त्याने आमच्याकडे येणेजाणे बंद केले व रात्रीअपरात्री दार ठोठावणे, दाराची बेलमारुन पळून जाणे असे उद्योग चालू केले. एके रात्री मी जागत राहून त्याला रेड हॅन्ड पकडले व चोप द्यायला हात उगारला तेवढ्यात आप्पा पुढे आले व त्याची कानउघाडणी केली, त्या नंतर हा प्रकार कायमचा थांबला.
चिंचणीच्या घराबद्दल दोन आठवणी आहेत. आमचा राजा दमणकर मधून मधून आप्पाना भेटायला चिंचणीच्या घरी येत असे. एकदा त्याने येताना आम्हा सर्वासाठी खायला जीवंत बदक आणले होते. पण पिशवीतून बाहेर काढतांना ते सुटून पळाले व शेजारच्या दामूभाऊंच्या वाडीत गेले, ते पुन्हा पकडण्यासाठी आम्ही सर्वजण त्याच्या मागे. आमची त्रेधातिरपीट उडाली होती. अखेर अटीतटीच्या प्रयत्नानंतर ते पकडण्यात यश आले.
आमच्या शेजारीच नायर दाम्पत्य राहत होते. तारापूर अणुकेंद्राचे काम चालू होते , तेथे ट्रक ड्राइवर होता. कामावरून येताना स्वारी पिऊनच यायची व बायकोशी भांडायचा. एके दिवशी खूपच पिऊन आला, बायकोशी जोरदार भांडला. तिला मारायला हातात कोयता घेऊन मागे लागला. ती पळत पळत आमच्या घरात आली व मास्तर मला वाचवा असे ओरडू लागली. आम्ही व आप्पा घरातच होतो. नायरचा तो कसायाचा अवतार ,उघडा बंब ,कमरेला लुंगी ,डोळे लालबुंद ,हातात कोयता उगारलेला, पण आमच्या घरात येण्याची हिम्मत नव्हती. अंगणातूनच बायकोला शिव्या देणे चालू होते. आजूबाजूचे सर्वजण तमाशा बघत उभे पण कोणी पुढे येईना. आम्ही आप्पाना न जाण्याबद्दल विरोध करू लागलो. आप्पा ‘गुरुदेव दत्त”म्हणत त्याच्या समोर गेले, नायर साहब ये आप क्या कर रहे है म्हणत त्याच्या हातातला कोयता काढून घेतला व त्याला त्याच्या घरात सोडून आले. तो आप्पांच्या पाया पडला व झाला प्रकार पुन्हा न करण्याची शपथ खाल्ली. पण थोडेच दिवसांनी ते दाम्पत्य दुसरी कडे राहावयास गेले.
प्रिय दिगुभाई,
लेख वाचला.पूनरप्रत्येयाचा अनुभव आला.१४ वर्षापूर्वी याच भावना माझी सदनिका खाली करताना माझ्या मनात आल्या होत्या.एखाद्या बोकडला बळी देताना त्याला काय वाटेल याचा आपण विचार करीत नाही.वास्तू ही काही केवळ वास्तूचं नसते.आपल्या जीवनाचा तीअभंग भाग असते.आपल्या जीवनातल्या अनेक सुख दुःखाची ती साक्षीदार असते.
त्या वेळी मीच सेक्रेटरी होतो.सगळ्या वाटाघाटी माझ्या घरातच झाल्या.
वास्तूवर हातोडा मारायचा कट शिजला.
सेक्रेटरी असल्यामुळे मी आणि ऑफिस bearers एवढीच मंडळी उरली.काळजावर दगड ठेवून सोसायटी बिल्डरच्या हवाली केली तिला परत न बघण्या साठी.
४५ वर्षाचा सहवास संपला.
काळाच्या ओघात आयुष्याच्या निगडित अनेक वास्तू नाहीश्या झाल्या.वसई मधील आमचे घर,माझी शाळा,बालमंदिर,जिथे माझा जन्म झाला ते हॉस्पिटल,सिनेमा थिएटर,एवढेच नव्हे,तर वसई स्टेशनची टुमदार बिल्डिंग ,सर्वच नाहीसे झाले.
आपण हताश होऊन बघत बसलो.
अनेक जिव्हाळ्याची माणसं गेली आणि वास्तुही गेल्या.
कालाय तस्मै नमः!
दिगूभाऊ, तू घरावषयी लिहिलेल्या आठवणी खूप छान आहेत. माझे घर हा विषयच तू छान निवडलास. मनाच्या कप्प्यातील सुख दुःखाच्या अनेक आठवणीना उजाळा मिळाला.
धन्यवाद.
फारच छान आठवणी.
बोर्डी माझं आजोळ.
माझी आई : मीना मंगेश चुरी.
ओम सर्वोदय मधील घराने
तुमचा सर्वोदय केला, पन्नास वर्षाच्या वास्तव्या नंतर ते घर कायमचे सोडताना मनाला वेदना होणारच, भले नंतर त्याच जागी नवीन घर मिळेल पण तोच अवकाश नसेल.
आता उबदार, आश्वासक आठवणी च साथीला.
डिग्रु चा उल्लेख अस्वस्थ करून गेला. तो तेथेच कुठे तरी सुखात असावा ही सदिच्छा.
माझे ही तिथे येणे जाणे, राहणे
झाले होते.
छान वातावरण होते, इमारतींच्या
मध्ये थोडी उंचावर मोकळीजागा, काही झाडं.
इतर घरांच्या व संबंधित व्यक्तींच्या आठवणी ही
गहिवरून टाकणार्या व
डोळ्यात पाणी आणणाऱ्या.
शेवटी कालाय तस्मै नमः….
?