स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, गुरुवर्य कै. ग. रा. अमृते उर्फ आप्पा
आमच्या बोर्डी घोलवड परिसरातील ही भूमी एखाद्या सुंदर फुलबागेसारखी आहे. बागेत वेगवेगळ्या आकाराची, रंगाची, गंधाची फुले असतात. त्या फुलझाडांचे बीज वेगवेगळे असते. पण ती एकाच मातीत रुजतात. त्या बीजाची गुणसूत्रे त्या फुलझाडात असतातच. पण त्या मातीचे गुणसुद्धा फुलझाडात उतरतात. फुलझाड बहरण्यात मातीचासुद्धा मोठा हातभार असतो. ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेच आहे की
कोंभाची लवलव। सांगे भूमीचे मार्दव॥
या बोर्डीच्या भूमीतही वेगवेगळे धर्म आणि पंथ रुजले आणि वाढले. त्यापैकी काहींचे बीज अस्सल बोर्डीचे होते तर काहींचे वाण बाहेरचे होते. पण त्या सर्वांची इथे सारखीच वाढ झाली. ज्या भूमीतील मार्दवाने त्यांचे वाढीस हातभार लावला ती ही आमची बहुप्रसवा बोर्डीची भूमी.
या भूमीत वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, प्रदेशातली माणसे रुजली, वाढली आणि सुगंधित झाली. तो दरवळ हा परिसर सोडून भारतभर पसरला. सर्वांची सारखीच वाढ झाली. त्याला कारण या बागेतील बागवान शंकर रामचंद्र भिसे अथवा आचार्य भिसे! आचार्य शिक्षण प्रसारासाठी बोर्डीत आले. त्यांच्याबरोबर चित्रे गुरूजी, पिंगळे गुरुजी द्वारकानाथ मोहिते, मळेकर बंधू सारखी अनेक ध्येयनिष्ठ मंडळी आचार्यांना साथ देण्यासाठी आली. त्यातीलच एक आचार्यांचे सहकारी म्हणजे गणेश रामचंद्र अमृते उर्फ आमचे आप्पा अमृते सर!
प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी सरांच्या सादेला प्रतिसाद देऊन ही सर्व मंडळी बोर्डीत जमा झाली. खरे तर शिक्षण प्रसार हे त्यांचे मुख्य जीवन ध्येय होते. मात्र सच्चा देशप्रेमी शिक्षक, त्या काळातील बंदीवान भारतमातेच्या हुंकाराला दाद न देईल तर तो कसला हाडाचा शिक्षक?
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले प्रसंगी हौतात्म्य पसरले अशा अनेक स्वातंत्र्यवीरांना जन्म देणारी ही माझ्या बोर्डीची भूमी आहे. या स्वातंत्र्यवीरांत माझ्या शाळेच्या अनेक शिक्षकांनीही आपले योगदान दिले आहे. एवढ्या छोट्या परिसरातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे शेकडो स्वातंत्र्यसैनिक निर्माण झाले. आचार्य भिसे, स्वामी आनंद, माधवराव राऊत यांचे नेतृत्व व साने गुरुजींची प्रेरणा येथे मिळाली. या भूमीत स्वातंत्र्यासाठी लढा देत असताना तुरुंगात बंदी होऊन ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेला न जुमानता आपल्या जीवनाचे सार्थक करून गेलेल्या या अनेक स्वातंत्र्य सैनिकापैकी एक म्हणजे घोलवडचे कै गणेश रा.अमृते उर्फ आमचे अमृतेसर … सर्वांचे लाडके आप्पा.
आप्पांच्या जीवनाविषयी व जीवन कार्याविषयी बोलताना एक उत्तम शिक्षक, स्वातंत्र्य सैनिक, हिंदी भाषेचा खंदे पुरस्कर्ता , तसेच आपल्या गावाच्या व परिसरातील आदिवासी गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी धडपडणारा एक सच्चा समाज कार्यकर्ता म्हणूनच बघावे लागेल!
लोकमान्य टिळक हे त्यावेळी राष्ट्रीय नेते होते त्यांच्या विचारसरणीचा बोर्डी गावावर मोठा प्रभाव होता. केसरी हे वृत्तपत्र गावांतील लोक सामुहिक वाचन करीत. अमृतसरला काँग्रेस सभेसाठी जाताना 1919 साली लोकमान्यांनी आमच्या डहाणू स्टेशनवर थांबून एक छोटे भाषण केले व त्यातूनच बोर्डीमध्ये व परिसरातील असंख्य तरुण तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याची स्फूर्ती मिळाली.
लोकमान्यांनंतर महात्मा गांधीजींचे नेतृत्व भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला लाभले. त्यांनी लोकशिक्षणासाठी ‘नवजीवन’ व ‘यंग इंडिया’ ही वृत्तपत्रे सुरू केली.गावात या दोन्ही वृत्तपत्रांचे सामुदायिक वाचन त्यावेळी होत असे. गावात राष्ट्रीयत्वाचे वातावरण निर्माण झाले होते. गांधीजींचे सहकारी स्वामी आनंद हे मुंबईहून गुजरातला येत जात असत. त्यांना घोलवड स्टेशन येण्याआधी समुद्राचे दर्शन होई. प्रसन्न होऊन एके दिवशी ते घोलवडला उतरले व कायमचे येथील रहिवासी झाले. गावांतील राष्ट्रीय वृत्तीचे वातावरण व निसर्ग सौंदर्य पाहून ते प्रभावीत झाले व त्यांनी येथेच राहण्याचे ठरविले. स्वामीआनंद यांच्या येथील वास्तव्यामुळे आचार्य काका कालेलकर, गांधीजींचे सुपुत्र श्री. रामदास गांधी व राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी यांनी देखील बोर्डीला भेट दिली. राष्ट्रमातेच्या पदस्पर्शाने ही बोर्डीची भूमी पवित्र झाली आहे!!
स्वामी आनंद यांनी 1931 साली बोर्डी येथे गांधी आश्रमाची स्थापना केली. हा आश्रम म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला आजन्म वाहून घेणारे ‘कार्यकर्ते निर्मितीची शाळा’ होती. या आश्रमाचे उद्घाटन तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. त्याप्रसंगी बाबू राजेंद्र प्रसाद हेही उपस्थित होते. दोघांची स्फूर्तीदायक भाषणे ऐकून परिसरातील कार्यकर्त्यांना, आजन्म देशसेवेसाठी वाहून घेण्याची प्रतिज्ञा करण्याची स्फूर्ती मिळाली. 1932 मध्ये देशात सविनय कायदेभंग सुरू झाला. त्यामुळे बोर्डीतील गांधी आश्रम जप्त करण्यात आला. याच कायदेभंग चळवळीत बोर्डी हायस्कूल मधील श्री. महादेव गोविंद पिंगळे यांच्या पत्नी श्रीमती मालतीबाई पिंगळे तसेच बोर्डी गावातील सर्वश्री पुरुषोत्तम शहा, भास्कर सावे, गोपीनाथ पाटील, गजानन कुशाबा चुरी यासारख्या अनेक कार्यकर्त्या बरोबर वामनराव अमृते (आप्पांचे जेष्ठ बंधू) यांनाही अटक करण्यात आली. सर्वांना ठाणे, नाशिक, विसापूर येथील कारावासात पाठविण्यात आले. ऑक्टोबर 1940 मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह पुकारण्याचा आदेश दिला. ठाणे जिल्ह्याचे नेते अण्णासाहेब वर्तक यांनी सत्याग्रह केला तर उंबरगाव येथे आचार्य भिसे यांनी सत्याग्रह केला. त्याबद्दल त्यांना अटक करून कारावासात पाठवण्यात आले.
ऑगस्ट 1942 मध्ये भारत छोडो हा ठराव करण्यात येऊन ब्रिटिशांना भारत सोडण्याचा शेवटचा इशारा देण्यात आला. दुसऱ्याच दिवशी गांधीजी व सर्व नेत्यांना अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले. देशभर असंतोष भडकला .बोर्डी गावही त्याला अपवाद कसे राहील? पूज्य साने गुरुजी त्याचवेळी बोर्डीस आपल्या बंधूंकडे, आप्पा साने यांच्याकडे आले होते. त्यांनीही भाषण करून बोर्डीच्या युवकांना क्रांतीची प्रेरणा दिली. परिसर पेटून उठला. 14 ऑगस्ट रोजी आचार्य भिसे यांना अटक झाली आणि त्यांना तुरुंगात पाठविण्यासाठी जेव्हा घोलवड रेल्वे स्टेशनवर नेण्यात आले तेव्हा सारा परिसर स्टेशनवर जमला. अहमदाबाद पॅसेंजर पुढे जाऊ नये म्हणून गावांतील युवक रेल्वेवर झोपले. आप्पाही त्यात होतेच. शेवटी आचार्यांनी युवकांना विनंती करून गाडी पुढे जाऊ देण्यात आली. या प्रकारामुळे बोर्डी गावात पोलिसांची मोठी कुमक आली. अटकेचे सत्र सुरू झाले. आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांना अटक करण्यात आली. अर्थातच आप्पांनाही अटक झाली व कारावासात पाठवण्यात आले. भारत छोडो आंदोलनात बोर्डी गाव व बोर्डी शाळा यांचे फार मोठे योगदान आहे.
आप्पांच्या घराण्यातच राष्ट्रीय वृत्ती भिनलेली होती. त्यांचे वडील श्री. रामचंद्र वामन अमृते, चुलते श्री. बाळकृष्ण वामन अमृते हे राष्ट्रीय वृत्तीचे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांचे जेष्ठ बंधू वामन रामचंद्र अमृते उर्फ बापूराव यांनीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन कारावास सोसला होता. त्यामुळे आपले वडील, चुलते व ज्येष्ठ बंधूंकडून त्यांना लहानपणीच स्वातंत्र्य प्रेमाचे बाळकडू प्राप्त झाले होते .भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याची मनीषा बालपणीच होती. अमृते कुटुंबीयांचे घर हे “काँग्रेस हाऊस” म्हणून त्याकाळी ओळखले जाई. घोलवड परिसरातील स्वातंत्र्यलढ्याचे कार्यक्रम तेथूनच आयोजित केले जात असत.
मॅट्रीकची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्यावर ते स्वराज्याच्या चळवळीत भाग घेऊ लागले. ठाण्याच्या जिल्हाधिकार्याकडून “घोलवड गाव सोडून बाहेर जाऊ नये” अशी नोटीसही त्यावेळी त्यांचेवर बजावण्यात आली होती. पुढे ते विणकामाच्या प्रशिक्षणासाठी चार वर्षे पुण्यात राहिले. त्या काळात थोर स्वातंत्र्य सेनानी श्री. बाळूकाका कानिटकर यांच्या सान्निध्यात आले. त्यांच्याकडूनही निरलस व निस्वार्थ सेवा कशी करावी याची प्रेरणा आप्पांना मिळाली. तेथेच त्यांना गांधीजी व विनोबाजी अगदी जवळून पाहण्याची संधीही प्राप्त झाली.
स्वामी आनंद यांनी ठाण्यातही 1937-38 साली गांधी आश्रम स्थापन केला. या आश्रमात आप्पा एक सेवक म्हणून दाखल झाले. तेथे श्री. दत्ता ताम्हाणे त्यांचे आश्रमांतील एक सहनिवासी होते. त्या दिवसाबद्दल बोलताना आप्पा म्हणत,” स्वामी आनंद यांच्याकडून मला वैचारिक बैठक मिळाली”
काका कालेलकरही तेथे अधून मधून येत असत. ते वर्धा येथील राष्ट्रभाषा समितीचे कार्याध्यक्ष होते. तेथेच आप्पानी हिंदी भाषेचे अध्ययन सुरू केले. परिक्षा दिल्या. त्या सर्व परिक्षा ते पहिल्या वर्गात पास झाले. पुढे हिंदी भाषेतच अध्यापन करून त्यावर अनेक पुस्तकेही लिहिली. महाराष्ट्रभर हिंदी भाषा प्रचाराचे कार्यही त्यांनी केले आहे. ते नेहमी म्हणत,
” गांधीजींच्या 14 विधायक कार्यांपैकी तुम्ही एक निवडा, त्यात प्रवीण व्हा. परंतु प्रसंगानुसार इतर कार्यातदेखील सहभाग असू द्या! हिंदीचे कार्य मुख्य असले तरी गरज निर्माण झाल्यास साफसफाईचे कामही करता आले पाहिजे. विधायक कार्यकर्त्याला सर्व कामांची माहिती असणे जरुरी आहे.”
आप्पांनी आपल्या संपूर्ण जीवनात या तत्त्वाचे पालन केले.
1941 साली बोर्डी येथील “ग्राम सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात” ‘गृहपती’ पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. ते तेथील प्रशिक्षणार्थींना सुतकताई व विणकामाचे शिक्षण देत असत. तेथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तेथेही त्यांचे देशसेवेचे काम सुरूच होते. एके दिवशी मुंबईतील काही भूमिगत कार्यकर्त्यांना पकडल्यानंतर त्यांच्या डायरीत, श्री. गणेश अमृते हे नाव आढळले. त्याबरोबर पोलीस वॉरंट घेऊन बोर्डी येथे आले. त्यावेळी सर प्रशिक्षण केंद्रात होते. पोलीस अंमलदार श्री. शेख यांनी सरांच्या खोलीची झडती घेतली तेव्हा त्यात काही बुलेटीनस् मिळाली. आप्पा म्हणतात “पोलिसांनी शेजारच्या खोलीची झडती घेतली नाही म्हणून बरे झाले कारण तिथे ऍसिड, स्फोटक द्रव्ये व तारा कापण्याची हत्यारे होती.”
त्या खोलीत श्री. गजाननराव नाईक राहत असत. तरीही आप्पांना अटक होऊन ठाणे येथील कारागृहांत पाठविण्यात आले. येथेही ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी बंगाली भाषेचे उत्तम ज्ञान तेथे मिळविले. त्याच तुरुंगात काही बंगाली भाषिक भूमिगतांना पकडून ठेवले होते. त्यांनी बंगाली भाषेत आप्पांना सांगितले ,”आम्हाला अचानक पकडले आहे व आमची गुप्त कागदपत्रे दिल्लीत राहिली आहेत”. त्यांनी आप्पांना दिल्लीतील आपल्या घराचा पत्ता तोंडी सांगितला. तो लक्षात ठेवून सुटल्याबरोबर तडक दिल्लीत श्री. मूलचंद शर्मा यांच्याकडे ते गेले. त्यांनी भूमिगतांच्या वडिलांना भेटून सांगितले की “आपल्या मुलाला मुंबईत अटक झाली असून त्याने ठेवलेले काही गुप्त कागद आपण त्वरित नष्ट करावे”
आप्पा म्हणत, “त्यावेळी ‘करेंगे या मरेंगे’ या महात्मा गांधींच्या मंत्राने आम्ही भारावून गेलो होतो!”
आप्पांना गांधीजींना भेटायचा योग सुद्धा आला होता. त्याचा किस्सा ते आपल्या नातवांना उत्साहाने वर्णन करून सांगत. वर्ध्याला सेवाग्राम आश्रमात एकदा गांधीजी सभेसाठी/भाषणासाठी आपल्या चपला बाहेर काढून सभागृहात गेले. आप्पा तेव्हा सेवेसाठी आश्रमात होते. कार्यक्रम संपून बाहेर पडतांना गांधीजी बघतात, ‘आपल्या चपला गायब झाल्या आहेत’. थोड्या वैतागलेल्या त्रासिक आवाजात गांधीजी आपल्या चपलांची चौकशी करू लागले. तेवढ्यात आप्पा धावत तेथे हजर होतात. गांधीजींच्या अश्या वस्तू खरंच मौल्यवान, त्यामुळे त्या चोरी व्हायचे प्रमाण देखील अधिक! ते लक्षात घेता आप्पानी त्यांच्या चपला आधीच सुरक्षित ठेवल्या होत्या व गांधीजी आल्यावर त्यांना त्या परत दिल्या. त्यांनी गुजराथीत जाब विचारला असता आप्पा उत्तरले कि, परवाच त्यांच्या चप्पल चोरी ची अशी बातमी पेपरात आली होती. तसे परत घडू नये याची दक्षता म्हणून त्यांनी त्या चपला हलवल्या. हे ऐकता गांधीजी स्मित हास्य करत ‘हम्म’ असे उद्गारले. त्यात त्यांना ‘शाब्बास’ म्हणायचे होते हे आलेच!
एकदा दैवत मानल्यावर, आपल्या दैवताच्या चपलांचेही रक्षण करणारा हा शिष्य केवळ अलौकिक!!
वरळीतील कारावासातून सुटका झाल्यावर आप्पांनी बोर्डी हायस्कूलमध्ये हिंदी शिक्षकाचे कार्य चालू ठेवले. अध्यापनाची जबाबदारी सांभाळून त्यांनी बी. ए. व बी. एड. या पदव्याही उत्तमरित्या संपादन केल्या. बोर्डीशाळेत एक उत्कृष्ट हिंदी व भूगोल प्राध्यापक म्हणून त्यांनी नाव कमावले. सुदैवाने त्याच कालखंडात सन 1956 ते 59 मध्ये त्यांच्याकडून हिंदी,भूगोल ज्ञानाची शिदोरी प्राप्त करण्याचे भाग्य मला मिळाले. त्यावेळी केवळ भाषेचे अध्यापन न करता राष्ट्रभाषा सेवा समितीचे एक प्रचारक व देशसेवा म्हणून त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रभाषेच्या हिंदी परीक्षा देण्यास प्रवृत्त केले. त्याकाळी बोर्डी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हिंदी भाषा परीक्षा देऊन त्या भाषेत पारंगत झाला होता. मी स्वतः हिंदी प्रबोध परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण झालो आहे. त्याचा लाभ मला माझ्या पुढील व्यावसायिक जीवनात झाला व आजही होतो आहे. अमृते सरांचे हे मजवरील उपकारच आहेत!
शाळेतून निवृत्त झाल्यानंतरही आप्पा शांत बसतील तर ते आप्पा कुठले? कोसबाड येथे श्रीमती अनुताई वाघ यांच्या ‘ग्राम बालकेंद्रांत’ ते दाखल झाले. तेथे अंगणवाडीच्या सेविकांना प्रशिक्षण देण्याची योजना सुरू केली होती. अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणे व ग्राम बाल शिक्षा केंद्राचे इतर कार्य पाहण्याची जबाबदारी त्यांनी सुमारे दहा वर्षापर्यंत विनामूल्य उत्तमरीत्या पार पाडली.
एवढा सर्व कामाचा व्याप सांभाळून आपल्या घोलवड गावच्या विकासासाठीदेखील त्यांनी आपले योगदान दिले आहे. घोलवड ग्रामपंचायतीचे सतत पाच वर्षे ते सरपंच होते. डहाणू तालुका पंचायत समितीचे सभासद आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे नियुक्त सदस्य होते. त्यांच्या कालखंडात घोलवड ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या अनेक योजना उत्तम रीतीने अमलांत आल्या आहेत. अशा रीतीने आप्पांनी ग्रामविकास क्षेत्रातही मोठे कार्य केले आहे. घोलवड, बोर्डी भागातील सर्व सामाजिक व शैक्षणिक कार्यात सरांचा मोठा वाटा होता. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात एक भूमिगत कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेले कार्य, आजही येथील तरुण पिढीला सतत प्रेरणा देत राहील.
बोर्डी शाळेतील चार वर्षाच्या वास्तव्यात मला श्री. अमृते सरांच्या अध्यापनाचा झालेला लाभ माझ्यासाठी एक देणगी होती . त्यांचे शिकवणे अगदी हसत खेळत व कोणत्याही प्रकारचा निरसपणा न येता होत असे. सरांचा तास कधी संपून जाई हे कळत नसे. राष्ट्रभाषा सभेतर्फे ज्या हिंदीच्या परीक्षा होत तेथे त्यांनी परीक्षेला उपयोगी अशीअनेक पाठ्यपुस्तके लिहिली आहेत. यांची यादी खाली दिली आहे पण आप्पांच्या या महत्त्वपूर्ण कामामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करते आले.
ती.आप्पांनी लिहिलेल्या पुस्तकांची/पाठ्यपुस्तकांची यादी.
१. राष्ट्रभाषाका पहिला फूल
२. राष्ट्रभाषा का दूसरा फूल.
३. सुगम भारती भाग १
४. सुगम भारती भाग २
५ सुगम भारती भाग ३
इयत्ता ५/६/७ वी करिता (देवरे-बाबर-अमृते.)
वर्गातील मुलांना त्यांच्या गुणावगुणावरून मोठी मजेशीर टोपण नावे देत असत. त्यात कोणालाही दुखावण्याचा, अवमान करण्याचा त्यांचा हेतू नसे. विद्यार्थ्याला आपल्यातील उणीवांची जाणीव व्हावी व त्याची सुधारणा व्हावी हीच इच्छा असे. आमच्या वर्गातील काही मुलांची त्यांनी ठेवलेली नावे मोठी गमतीशीर होती. चांगल्या खेळाडूला ‘खिलाडी’, हुशार मुलाला ‘दिमागी’, अक्षर खराब असणाऱ्या एकाला ‘खरड’ अशी उपनावे होती. वर्गात आल्या आल्या त्यांची चौकशी होई. आम्हालाही वर्गात शिरल्याबरोबर सर कोणाकोणाची प्रथम चौकशी करणार हे माहीत असे. त्यांनी विचारण्याआधीच आम्ही हिंदीतून ही माहिती त्यांना पुरवत असू. वर्ग सुरू होण्याआधीच एक सुंदर,आनंदी वातावरण वर्गात निर्माण होई. हिंदी भाषेचा धडा अथवा कविता शिकविताना, पाठ अथवा कवितेच्या अनुषंगाने, भाषेतील वाङ्मयाचे सर्व संदर्भ प्राप्त होत व मोठे ज्ञानभांडार उपलब्ध होई. .राष्ट्रभाषा सभेतर्फे ज्या हिंदीच्या परीक्षा होत तेथे त्यांनी परीक्षेला उपयोगी अशी पाठ्यपुस्तके लिहिली. राष्ट्रभाषा सभेमुळे म. म. दत्तो वामन पोद्दार, श्री. गो. प. नेने, डॉ. देवरे, प्राध्यापक वसंत देव अशा दिग्गजांशी त्यांचा संबंध आला.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्याच्या कौटुंबिक परिस्थिती व शैक्षणिक पार्श्वभूमीचेही ते आकलन करीत. त्यानुसार गरजू विद्यार्थ्यांना जी काही मदत करता येईल तीही आवर्जून करीत, मात्र त्याचा गाजावाजा कुठे होऊ देत नसत. सरांनी आपल्या जीवनात अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केलेली आहे. मात्र त्याचा गाजा वाजा कुठेही केला नाही.
सेवानिवृत्तीनंतर प्रसिद्ध शिक्षण तज्ञ प्राध्यापक रमेश पानसे यांच्याशी आप्पांचा संबंध आला.” ग्राम-मंगल” या प्रतिष्ठानचे संस्थापक व प्रणेते श्री.रमेश पानसे सर त्या दिवसांबद्दल आठवणी सांगताना म्हणतात,
” कोसबाड येथील ग्राम बाल-शिक्षा केंद्राच्या कामाशी माझा 1980 पासून घनिष्ठ संबंध आला,आणि ठाण्याहून माझ्या सततच्या फेऱ्या कोसबाडला होऊ लागल्या .मी तेथे सकाळी 11 च्या सुमारास पोहोचत असे आणि थेट अनुताईंच्या पडवीत जात असे. त्यावेळी लाकडी आरामखुर्चीत अनुताई बसलेल्या आणि शेजारी आप्पा अमृते स्वच्छ लेंगा खादीचा नेहरू शर्ट आणि गांधी टोपी या पोषाखात बसलेले असत. हे दृश्य माझ्या कायमच डोळ्यासमोर आहे. त्यावेळी वयाची सत्तरी ओलांडलेले आप्पा रोज घोलवड वरून संस्थेच्या कार्यात मदत करण्यासाठी येत असत आणि संध्याकाळी घरी परतत असत.”
“त्यांची आठवण पक्की आणि उत्साह दांडगा. त्यामुळे कुठेही जायचे म्हटले की आप्पा तत्परतेने तयार. आमच्याबरोबर त्यांनी आदिवासी पाड्या-पाड्यावर जाऊन शिरगणतीचे काम ही केले आहे. पुढे मुंबईत घेतल्या जाणाऱ्या ‘ग्राम-मंगल’ च्या प्रत्येक मेळाव्यास, अगदी माझ्या भाषणांनाही, आवर्जून उपस्थित राहिले. महाराष्ट्र बाल-शिक्षण परिषदेची स्थापना झाल्यापासून, सर्व सभांनाही आप्पा नेहमी हजर राहिले. शिक्षणातील सच्चा कार्यकर्ता कसा असावा याचा आदर्श म्हणजे आमचे जेष्ठ स्नेही श्री. ग. रा. उर्फ आप्पा अमृते! त्यांची आठवण सदैव सर्वांच्या मनामध्ये राहो ही सदिच्छा”.
आप्पांना तीन अपत्ये. विद्याधर, प्रकाश हे मुलगे व शैला ही मुलगी. विद्याधर हा माझा शालेय मित्र व पार्ल्यातच राहत असल्याने नेहमीच त्यांची भेट होत असे. भूगोल विषयात त्यांनी पारंगतता मिळविली असून आपल्या विषयातील एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून आज त्यांचे नाव अखिल भारतात आहे! आजही प्राध्यापक विद्याधर आपल्या विषयाशी संबंधित लिखाण, परिक्षण व आलेखन करीत असतात.
प्रा. विद्याधर यांचा मुलगा डाॅ.कौस्तुभ हा स्पाईन सर्जन असून आफ्रिकेत बोटस्वाना येथे आपली सेवा देत असतो. मुलगी डॉ. कविता हिने भौतिक शास्त्रात डॉक्टरेट केले आहे.
द्वितीय चिरंजीव प्रकाश हे पेशाने इंजिनीयर असून त्यांनी घोलवड गावातच प्रथम कारखान्यात नोकरी, मग भागीदारी, नंतर आपला स्वतंत्र इंजीनियरिंग व्यवसाय केला. सध्या आपल्या शेतीबरोबर घोलवड गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान असते. प्रकाशचे चिरंजीव प्रणव हे माझ्या सतत संपर्कात असतात. शिक्षणाने केमिकल इंजीनियरिंग पदवीधारक प्रणव एक कम्प्युटर तज्ञ असून त्यांचे या क्षेत्रातील ज्ञान मला सदैव उपयुक्त ठरते. प्रकाशच्या दोन कन्या मोनाली व नीलांबरी लग्न होऊन अनुक्रमे मुंबई व अमेरिकेत स्थित आहेत.
अप्पांची कन्या शैलजा बापट वैद्यकीय व्यावसायिक असून यजमान डाॅ. अशोक बापट यांचे बरोबर घोलवड मध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. उभयतंच्या सेवेचा लाभ आम्हाला जरुरीच्या वेळी मिळत असतो. बापट दांपत्याचे चिरंजीव डॉ. मिलिंद व डॉ. मकरंद हे दोन्ही पुत्र वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असून घोलवड डहाणूमध्येच आपली सेवा देत असतात. तर तृतीय पुत्र श्री. शशांक अमेरिकेत वास्तव्याला असून सॉफ्टवेअर क्षेत्रातील तज्ञ म्हणून व्यवसाय करीत असतात .
डॉ. मिलिंद बापट यांनी आपल्या आजोबा विषयी खूप हृद्य आठवणी सांगितल्या आहेत. थोडक्यात, त्यांच्या शब्दात मी त्या उधृत करीत आहे:
“डॉक्टर हिल नाईस सेल्फ असं म्हणत दिलखुलास हसत कोण आले? मी डोळे उघडले. फ्ल्युने बेजार झालेल्या अंगातील रसरस झटकून दाराकडे पाहिले, तर आमचे आप्पा, हातामध्ये एक रसरशीत नारिंगी पपई घेऊन आत येत होते! त्यांच्या उत्साहाचा संसर्ग आणि पपईचा मधुर वास माझी मनस्थिती बदलायला पुरेसा होता.”
“आप्पा म्हणजे माझे आजोबा. माझ्या आईचे वडील श्री. गणेश रामचंद्र अमृते. आप्पा स्वतः शारीरिक दृष्ट्या कणखर आणि काटक होते. तहान भूक यांची तमा न बाळगता कित्येक मैल चालण्याची त्यांची तयारी असे. बदलते जग स्वीकारण्याची ही त्यांची तयारी होती. गावातील पहिल्या रेडिओ सेट्स पैकी एक त्यांच्या घरी होता आणि बातमीपत्र ऐकायला रोज सारे गाव अंगणात जमत असे. हे ऐकून आम्हाला मौज वाटे.
संगीत हा त्यांचा प्राण होता. शास्त्रीय संगीताची विलक्षण आवड आणि समज होती.अधेमधे बासरी वाजवीत.घरातील संगीतमय वातावरणात माझे मामा बासरी व पेटी आणि माझी आई गायन कलेत पारंगत झाले. आता तो वारसा आप्पांची पतवंडे चालवत आहेत”.
“एकदा आप्पा आमच्या घरी राहायला आले होते. रात्री दोन वाजता कुणीतरी जोरात दरवाजा ठोठावला. बाबांनी दरवाजा उघडला. बाहेर चार माणसे तलवार परजत उभी होती. एका इसमावर त्यांनी तलवारीचे वार करून त्याला जबर जखमी केले होते.त्याला उपचारासाठी आणले होते. दारूच्या नशेमध्ये ते खूप हिंसक हालचाली करीत होते. आम्हा मुलांची भीतीने गाळण उडाली होती. आप्पा मात्र शांतपणे त्या माणसाकडे गेले. हात धरून त्यांना तलवारी खाली करायला सांगितले. बाबांनी उपचार चालू केले. संकटाचा सामना धिरोदात्तपणे कसा करावा, बिकट परिस्थितीतही समोरच्या व्यक्तीला आपली बाजू शांततेने कशी पटवून द्यावी, या गोष्टीचा धडा आप्पा आणि बाबांनी घालून दिला. तो प्रसंग माझ्या जन्मभर स्मरणांत राहील.”
“आप्पा जीवन समरसून जगले आणि मृत्यूलाही थेट नजर देऊन भिडले. दिवसेंदिवस जग अधिकाधिक व्यवहारवादी, स्वार्थी, असहिष्णु ,हिंसक आणि आत्मकेंद्री होत आहे. त्याच्या रेेट्याखाली कधीतरी आपल्याला आपल्या मूल्यांचा विसर पडतो. आपणही अजाणतेपणाने या प्रवाहाचा बळी होऊ पाहतो. त्यावेळी आठवण होते ती आजी,आप्पा आणि आई बाबांनी स्वतःच्या वर्तनातून घालून दिलेल्या धड्यांची आणि पाय आपसूकच जमिनीवर येतात! भीती हद्दपार होते! आणि राहतं एक सुंदर प्रवाही जीवन!! “डॉक्टर हिल दायसेल्फ”, म्हणत मार्गक्रमण करण्यासाठी ..”
आपल्या कर्तृत्ववान सात्विक आजोबा विषयी डॉ. मिलिंद यांनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी आप्पांच्या एकूणच जीवनपटाचा गाभा आपल्यापुढे उभा करतात!!
पंधरा वर्षांपूर्वी आप्पांचे निधन झाले. मात्र अखेर पर्यंत ते सतत कार्यरत होते .बोर्डी घोलवड परिसरातील कोणत्याही सभासमारंभास अगत्याने हजर रहात .मार्गदर्शन करीत. मला आठवते सन 2006 साली माझे वडील कै.वामन देवजी राऊत (त्यांनाही आम्ही आप्पाच म्हणत असू) यांच्या स्मरणार्थ प्रकाशित केलेल्या गौरव ग्रंथासाठी, सर आवर्जून हजर राहिले होते. या दोन्ही आप्पांचा एकमेकाशी चांगला स्नेहबंध होता. त्यामुळेच त्या कार्यक्रमाला, ऋणानुबंधाची जाण ठेवून, त्यावेळी वय वर्षे 90 च्या पुढे असलेले अमृते सर पहिल्या रांगेत बसलेले मला अजून आठवतात. वयोमानाप्रमाणे स्मृती थोडी कमी झाली होती, प्रकृती क्षीण झाली होती, हालचाली मंद होत्या, मात्र उत्साह जीवनेच्छा व ऊत्साह तोच होता. जाहीर कार्यक्रमांत आप्पांचे झालेले तेच मला शेवटचे दर्शन!
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सैनिकांपैकी अनेक व्यक्ती आज दिवंगत झाल्या आहेत. ती पिढीच अस्तंगत झाली आहे. मात्र त्या सर्वांचे कार्य अजरामर झाले आहे. आम्ही त्यांना विसरता कामा नये.
आप्पांना मानवंदना देताना त्यांच्या पिढीतील त्या सर्वच ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना मी अभिवादन करतो. त्या संग्राम-कालखंडात ही मंडळी युवा होती .आपले शिक्षण व्यवसाय सर्व बाजूला ठेवून केवळ आपल्या नेत्यांच्या हाकेला ओ देऊन, भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या इर्षेने ते सर्व भारावून गेले होते. प्रभात फेऱ्या, झेंडावंदन, स्वदेशी चळवळ, असहकार, बुलेटिन वाटणे, या कार्यक्रमावर बंदी असतानाही ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी अशा कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांचे काम व अपार स्वार्थ-त्याग आत्ताच्या व भविष्यातील पिढ्यांना आपल्या भारत मातेची सेवा करण्यास प्रेरणा देवो, अशी प्रार्थना करून, आप्पांच्या स्मृतीला नमन करून मी हा लेख संपवतो आहे .
शेवटी, लौकिक दृष्ट्या या जगातून निघून गेलेल्या पण कृतिशील आयुष्य जगून अजरामर झालेल्या आप्पा व त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांना खालील दोन ओळीत श्रद्धांजली वाहतो.
आलसेना गतम दीर्घ, जीवितम् नही जीवितम् |
क्षणमेकं सुयत्नेन, योजीवति स:जीवति।|
आलस्यात घालविलेले दीर्घ आयुष्य हे आयुष्यच नव्हे. मात्र एक क्षण का असेना, जो प्रयत्नपूर्वक दुसऱ्यासाठी जगला, तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगला, असे म्हणता येईल. कृतिशील आयुष्य हेच खरे आयुष्य, असेच कवीला सांगावयाचे आहे.
जयहिंद !!
दिगंबर वा राऊत.
Date – 18/06/2023 –
Very nice write up.
And hats off to Appa for his total great overall memorable career.
Really new generation should take good lessons from such commandable leader who has spent their life for others.
Finally thanks lot to you for sharing such information to us.
– From Narendra Haribhau Raut / Dahisar West Mumbai) Madhukarnagar Village
राऊत साहेब, तुमच्या बोर्डी गावात अनेक नररत्ने निर्माण झाली किंवा आली. अमृते सर त्यातीलच एक.
आताची परिस्थिती माहित नाही पण बोर्डी गावची ही उत्तुंग परंपरा, इतिहास प्रसिद्ध व्हायला हवा, लोकांपर्यंत पोचायला हवा. तुमच्या लेखातून बरीच माहिती मिळते, असेच लिहीत रहा. ह्या समर्पित महामानवांच्या जीवनातील काही किस्से, आठवणी, प्रसंग वाचायला मिळाले तर आवडेल!
धन्यवाद
कै ग रा अमृते हे मला १९६२ साली ११ वी SSC ला special भूगोल व हिंदी शिकवीत असत .एकदा शिकवायला सुरुवात केली की ते एवढे रमून जात विद्यार्थी चुळबुळ करताहेत की कोणी हळूच कसला तरी आवाज काढतोय ह्या कडे ते कधीच लक्ष देत नसत .खोड्या काढणारा स्वतः हूनच शांत होत असे
अतिशय शांत व हसरा चेहरा , गोरी पान देहयष्टी व प्रसन्न व्यक्तिमत्व ..
निवृत्ती नंतर देखील आपले समाज कार्य चालूच ठेवले ..
कै अप्पांच्या स्मृतींस आदरांजली ??
अतिशय सुंदर माहिती. आप्पांचे जीवन हे केवळ दुसऱ्यांसाठीच होते असे वाटते. इतक्या निस्पृहतेने सतत कार्यरत राहून समाजसेवा करत रहाणे हे सोपे नाही. देशाचा जाज्वल्य अभिमान आणि स्वातंत्र्यपूर्व काळात अडचणींना सामोरे जात आपली कार्यसिद्धी करत राहण्याची ही वृत्ती खरोखर स्पृहणीय आहे. एकंदरीतच त्यांची जीवनपद्धती तरुण पिढीला नक्कीच दिशा दाखवणारी ठरेल.
अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर लिहले आहे.हायस्कूलमधे असतांना हिंदीच्या पुस्तकात त्यांचा ‘गढी रूद्रमाल पर’ म्हणून धडा होता तो अजूनही आठवतो.त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी पण हिंदीच्या परीक्षा दिल्या.नववीत असताना महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा,पुणे मंडळाची प्रवीण ही परीक्षा पास करणारा बोर्डी केंद्रातला मी सगळ्यात लहान विद्यार्थी होतो.मौखिक परीक्षा घेणार्या परिक्षकांनी तर मला क्लास बाहेरच काढले होते पण जेव्हा मी त्यांना परीक्षेचा नंबर असलेली रिसीट दाखवली तेव्हा त्यांनाही आश्चर्यच वाटले कारण प्रवीण ही परीक्षा B.A.च्याequivalent होती.हे सर्व अमृतेसरांच्या प्रेरणेतुनच घडले.??
अप्रतिम लेख!! वैविध्यपूर्ण ज्ञानावर माहितीपूर्ण लिखाण.
अमृते सरांच्या आठवणी साकारताना त्यांच्या जीवनाचे वास्तव उभे राहिले.शालेय जीवनात त्यांना जवळून पाहता व अनुभवता आले होते.त्यांच्याबद्दल काही माहिती “बोर्डीचे स्वातंत्र्य सैनिक”या पुस्तकातून वाचली होती.उर्वरित माहिती तुमच्या लेखात मिळाली.विस्तृतपणे माहिती मिळाली . मनापासून अभिनंदन व धन्यवाद.??????
आप्पा अमृतेसरांचा उत्तम परिचय तर झालाच त्याच बरोबर ते उत्तम शिक्षक, देशभक्त, उत्तम प्रशासक, राजकारणी, समाजसेवक इत्यादी गुणांचा सुद्धा परिचय झाला.
आप्पा विषयी एक छोटा किस्सा वय वर्ष ऐशी कोसबाड येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.बैठक व्यवस्था कोसबाड येथील सरस्वती मंदिर हाॅल येथे केली होती.माईक होता पण वीज नव्हती तेव्हा आप्पांनी पायऱ्या न उतरता स्टेजवरून उडी मारली व आपले भाषण केले त्यावेळी सर्व अवाक झाले. मी हाडाचा शिक्षक आहे.असे वक्तव्य केले.आप्पांना शतशः नमन, धन्यवाद सर व्यक्त होण्याची संधी मिळाली.
नमस्कार काका आपले लेख खास माहिती पूर्ण असतात.बोर्डी व परिसरातील इतिहास छान उलगडून दाखवला जातो. जो आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. मी आपले बरेचसे लेखन नियमितपणे वाचतो
नाना मळेकर सरांन वरील लेखन मला जास्त आवडले
स्वरराज व राऊत
[18/06, 11:00 am] Apte Sunil. sir: Very nice!
Appa was our class teacher in 8th and 9th.
I married a Marwari, Maheshwari Girl Neelam. Neelam and my in-laws, even today, after 44 years of our marriage, wonder, how? unlike many other Maharashtriyans, I can speak and write good Hindi.
The credit goes to Aappa Amrute Sir.
??????Great……off course, you are one of the fine writers for me…keep going. saheb.
??????Great……off course, you are one of the fine writers for me…keep going. saheb.
ध्येयवादी, गांधी विचारसरणीचे, स्वातंत्र्यसैनिक कै .ग. रा.अमृते सरांच्या जीवनावरील आपला लेख नेमीप्रमाणेच उत्तम आहे या लेखाद्वारे सरांचे कार्य घराघरात पोहचेल ही अपेक्षा.
कै.श्री अमृते सरांचा लेख सुंदर आपण लिहला आहे. हिंदी हा विषय त्याचा आवडता होता. ??
नमस्कार,
खादीचा लेंगा ,खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी ,खांद्यावर खादीच्या कपड्यांची झोळी आणि पायात साध्या चप्पल असलेले अमृते सर ,आज आपल्या लेख वाचून डोळ्यासमोर उभे राहिले.
त्यांनी मला आठवीत असताना हिंदी शिकवल्याचे आठवते.
हिंदी वरचे प्रभुत्व तेव्हा समजत नव्हते पण आता पूर्ण आठवते. आपल्या लेखांमध्ये त्यांच्याविषयी माहीत नसलेल्या अनेक गोष्टी वाचनात आल्या .वाचून बरे वाटले.
.?
स्वाती चौधरी .
पूर्वाश्रमीची भारती सावे
(9920190876)
निश्चितच. गुरूना पित्याची उंची बहाल करून त्यांना मानवंदना देणारे तुमच्या सारखे विद्यार्थी आगळे वेगळे.
दिगंबर भाऊ प्रथम मी तुम्हालाच वंदन करतो, एक असामान्य व्यक्ती, असामान्य विद्यार्थी, असामान्य लेखक आणि असामान्य मुलगा म्हणून.???
खरच मला अभिमान वाटतो तुमचा आणि आपल्या मैत्रीचा.?????
बोर्डी गावात बरेच शिक्षक, समाजसेवक, स्वातंत्र्य सेंनिक असे अनेक युगपुरुष आहेत, काही आता आपल्यात नाहीत. सर्वांना आमचा पितृदिनी सलाम.
अशीच माहिती आमचापर्यत पोहचवा. आम्हीही ती पुढे पाठवू
धन्यवाद ?
प्रिय बंधू
व्यक्ति वर्णने आपण नेहमीच सुंदर रीत्या व आपलेपणाने
सादर करता, ज्यामध्धे आत्मीयता असते. समोरच्या व्यक्तीचा जरी काहीही परिचय नसेल तरीही त्यांचा परिचय उभे ऊभ सादर करता. खर म्हणजे माझा आप्पा चा परिचय नाही परंतु आपल्या लिखाणात त्याचं विस्तृत कार्य परिचय झाला, विशेषतः स्वातंत्र्य लढय़ात त्यांच्या सहभाग विशेष भावला.
आपण लिहित रहा व आपण सादर केलेली सर्व व्यक्तीवर्णने पुस्तक रुपाने प्रकाशित करा.
???
लेख फारच छान. उत्तुंग कमासमोर मान आपोआपच नतमस्तक झाली. छान.
राजीव वर्तक
अप्रतिम लेख झाला आहे. Bordi che नाव कानावर आले की मन प्रसन्न होते तसेच त्या दिवसांची आठवण येते व मन भरून येते.आपल्या लेखामुळे हा आनंदमिळतो आहे
लेख वाचला नसता तर सरांची आठवण कधी झाली नसती. शाळेनंतर बोर्डीशी फारसा संबंध आला नाही. पण वाचून बोर्डीच्या आमच्या शाळेतील अमृते सरांच्या वर्गाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. वर्ष आठवत नाही पण हायस्कूल मधील हिंदीचा क्लास, हे स्मरते. त्या वेळी कळले नाही पण चांगले हिंदी शिकल्याचा आयुष्यात खूप फायदा झाला. हाडाचे शिक्षक, अत्यंत सोपी पण प्रभावी शिकवण्याची पद्धती! सरांच्या आयुष्याबद्दल, देशभक्तीबद्दल लेखामधून कळले आणि तो आदर द्विगुणीत झाला. धन्यवाद!
आपण आप्पांवर फार छान लेख लिहिला आहे. आपले अगोदरचे लेख देखील मी व आमच्या घरातील सर्वांनी वाचले आहेत.
बोर्डी भागातील समाजकार्य आणि शिक्षणाला वाहून घेणाऱ्या या साऱ्या तपस्वीना कितीही गौरवले तरी कमीच आहे.
या पुढेही आपण असेच लेखन करावे ही सदिच्छा
आपण आपल्या गुरुजनांचे व त्यांच्या गुणांचे जे वर्णन करता तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्त्व किती श्रेष्ठ आहे हे कळते एकलव्य याने अंगठा देवून गुरुदक्षिणा दिली आपण आपल्या गुरुंचे वर्णन अजरामर लिखाण करून ऐक गुरुदक्षिणा दिली यात शंका नाही.असो उत्तम लिहीलेले आहे.माझा वहिनींना नमस्कार सांगा .ओ.के.
नमस्कार,
आजच्या लौकिक अर्थाने असलेल्या पितृदिनी आपण आपल्या पितृतुल्य गुरूवर्य कै.ग.रा.अमृते ऊर्फ आप्पा अमृते सरांची जीवनगाथा शब्दसुमनांत गुंफून मांडली , नव्हे मी तर म्हणेन की त्यांचा जीवनपटच उलगडून दाखवला, धन्य ते गुरू आणि धन्य तो विद्यार्थी !!
सर्वप्रथम तुमच्या प्रगल्भ लेखणीला त्रिवार वंदन!!
तुम्ही एवढे प्रदीर्घ लेखन केले आहे की यावरून तुमच्या मनांतील त्यांचे स्थान व अंत:करणातील आदरभाव याचा अंदाज येतोय..
ज्यांच्या थोर व्यक्तीमत्वाची महती ऐकिवात नव्हती, किंबहुना असे कुणी, स्वातंत्र्यसैनिक,हाडाचे शिक्षक, समाजसेवक, तुम्हाला ४वर्षे का होईना, लाभले होते हे मला ज्ञात नव्हते, ते तुम्ही आज तुमच्या लेखनातून व्यक्त केलेत.
इतकी इत्यंभूत माहिती, अगदी त्यांच्या कुटुंबीयांविषयीसुद्धा, आजमितीला कोण कुठे आहे, आणि त्यांच्या यशोगाथेचे प्रत्येक पान प्रेरणादायी व वाचनीय तर आहेच पण त्याचबरोबर अनुकरणीय सुद्धा आहे.
त्यांच्या आचरणावरून तर लक्ष लक्ष दिव्यांनी ओवाळावे, मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे, कठीण प्रसंगी धैर्याने सामोरे जावे, कोणत्या वेळी काय शिकावे, एका प्रसंगात कारावासात असताना बंगाली कैद्यांसोबत रहाताना बंगाली भाषा आत्मसात केली व बाहेर पडल्यावर त्यांचे महत्त्वाचे काम पार पाडले,असे एक ना अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात, खरंच तुम्ही खूपच भाग्यवान, तुम्हाला अशा व अनेकानेक बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा जवळून परिचय झाला, सखोलपणे अभ्यासता आले, त्यांच्या उत्तमोत्तम गुणांना आत्मसात करण्याचा प्रयास करता आला…
मामा,
पपीमामाने मला ज्ञात असलेली दोन पुस्तके लिहिली आहेत,
पण तुम्ही तर इतके लिहू शकता, तुमच्यापाशी शब्दसंपदेचा अथांग सागर आहे !!
मामा,
तुम्ही लिहीत रहा, तुमचा हा छंद लाखमोलाचा आहे, कितीतरी लोकांची मानसिकता बदलवण्याचे सामर्थ्य त्यात आहे,
YES,
YOU CAN DO WONDERS!!
GOD BLESS YOU ALWAYS !!
दिगूभाऊ, गुरुवर्य कै. श्री. अमृतसरांविषयीचा लेख खूप छान लिहिला आहे. ते उत्तम शिक्षक होते. त्यानी आम्हालाही हिंदी शिकवले आहे. अध्यापनाबरोबर त्यानी केलेल्या इतर सामाजिक कामाची माहितीही कळली. त्याच्यासारखा स्वातंत्र्यसैनिक आपल्याला शिक्षक म्हणून लाभले याचा j खरोखरच अभिमान वाटतो. त्यान्च्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन.??
भाई, हे सारे वाचायला उशीर झाला. आचार्य भिसे ते आप्पा सारखी महान मंडळी बोर्डी गावात लाभली. ज्यांनी बोर्डी गावात जन्म घेतला ते खऱ्या अर्थाने भाग्यवान. एकाच शब्दात सांगायचे झाले तर *बोर्डी हे विद्येचे महान मंदिर होते, आहे व पुढेही असू दे!!* आपले लिखाण मला नेहमीच आवडते ,आपण लिहीत राहा ही विनंती ??
आप्पा जिथे राहत होते (घोलवड) तिथेच मी त्यांच्या शेजारी राहत होते. मी त्यांच्या व त्यांच्या कुटंबियांच्या सहवासात लाहानाची मोठी झाली. त्यांना मी अगदी जवळून अनुभवले आहेत ते माझे भाग्य आहे ??