डॉ. जयंतराव पाटील जन्मशताब्दी

जन्मशताब्दी त्याच पुरुषांची साजरी होते ज्यांनी आयुष्यात काहीतरी सत्कर्मे करून पुढील पिढ्यांसाठी ज्ञानाचा सेवेचा व त्यागाचा असामान्य वारसा ठेवलेला असतो. तो केवळ कालगणनेचा टप्पा नसतो. तर त्या महापुरुषाच्या कर्माची उजळणी असते. डॉ. जयंतराव यांना आम्ही जयंतदादा म्हणतो. त्यांचे संपूर्ण जीवन कृषी विज्ञान, समाजसेवा ग्रामविकास आणि आदिवासी उन्नतीचा एक अखंड यज्ञ होता. 28 मार्च 1927 रोजी जन्मलेले दादा 7 एप्रिल 2015 रोजी निधन पावले. पण कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रात व या केंद्राच्या काळ्याभोर शिवारात त्यांनी रुजविलेला, आदिवासींना जीवनदायी ठरलेला बीजमंत्र आजही फुलतो आहे, बहरतो आहे!
स्वातंत्र्य पूर्वकालात आचार्य भिसे, चित्रे, सावे यांनी बोर्डीच्या शाळेत केवळ पुस्तकी शिक्षण न देता पुस्तकी शिक्षणाबरोबरच एक अजरामर मंत्रही आपल्या विद्यार्थ्यांना दिला.
“ सत्याचे आचरण,असत्याचे निर्गमन व ज्ञानाचे आचमन”
ही त्रिसूत्री म्हणजे तो मंत्र होता. ते केवळ घोष वाक्य नव्हते. जीवन जगण्याची रीत होती. त्या गुरुजनांच्या उज्वल शिष्य परंपरेतील एक महान नाव म्हणजे डॉ.जयंतराव शामराव पाटील … आमचे दादा!!
आचार्यांचे तत्त्व होते, ’पद, पैसा, प्रसिद्धीपासून दूर राहण्यात खरी प्रतिष्ठा आहे’ जे त्यांनी स्वतः ते पाळले. शिष्यांकडूनही अपेक्षिले. दादांनी आपल्या गुरुजनांची हीच शिकवण शेवटपर्यंत पाळली. आदिवासी, वनवासी ,गोरगरिबांना चांगले दिवस यावेत म्हणून आपले ज्ञान कौशल्य, कीर्ती त्यांनी वापरली. घोलवड कोसबाड हीच आपली कर्मभूमी मानून अखेरचा श्वास याच भूमीत घेतला. जन्मशताब्दी वर्षी त्यांच्याबद्दल काही लिहिण्याची संधी त्यांचे कर्तृत्ववान चिरंजीव दीपकभाई यांनी मला दिली.
दादांविषयी बरच काही लिहिलं गेलं आहे. त्यांनी स्वतःही विपुल लेखन केलं आहे. माझ्या ’तस्मै श्री गुरवे नमः’ या पुस्तकात मी त्यांचेवर एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. आजही जे काही लिहिणार आहे त्याचा हेतू दादांच्या प्रेमातून, उपकारांतून अंशतः तरी उतराई होण्याचा प्रयत्न!! दादांनी आमच्या कुटुंबावर खूपच उपकार केले, प्रेम जिव्हाळा दिला. उदाहरणासकट ते सांगणार आहे.
भगवद्गीतेत द्रोणाचार्यांची महती सांगताना पांडव म्हणतात “हा येणे माने महंतु, वरी आम्हालागी कृपावंतू…”
आमचे गुरु सर्वश्रेष्ठ आहेतच जगद्वंद्य आहेत. पण आम्ही त्यांचे ऋणी आहोत कारण आम्हा पांडवांवर त्यांनी मनापासून प्रेम केले. प्रेमाची श्रीमंती दिली …”
अनेक गुणांनी संपन्न असलेले दादा शेतीशास्त्रज्ञ समाजसेवक शिक्षणतज्ञ, पण आम्हा सामान्यांवर त्यांनी मनापासून प्रेम केले. त्यांचे प्रेम हेच आमचे मोठे भांडवल होते. त्यांनी आम्हाला त्यांच्या प्रेमाचे धनी केले, उपकृत केले म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आणि त्यांचे बद्दल आदर भावना आहे .”
मोठेपणा, कीर्ती प्राप्त झाली तरी सदैव नम्र राहण्याची वृत्ती अंगी का बाणली याविषयी सांगताना दादांनी त्याचे श्रेय देखील, आपल्या आयुष्यात, वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या महान सत्पुरुषांना दिले आहे.
बोर्डीत भिसे, चित्रे गुरुजी, मुंबईत कन्हैयालाल मुन्शी, सरोजिनी नायडू, पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेताना एसएम जोशी, नानासाहेब गोरे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, प्रा. उपेंद्र कानिटकर, महात्मा गांधी, ठक्कर बाप्पा अशा महान विभूतींचे सुविचार ऐकून मिळालेली प्रेरणा याला दिले आहे.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर दादांनी नोकरीची अनेक प्रलोभने असतानाही आपल्या गुरुजनांबद्दल आदर व आपल्या मातीचा अभिमान म्हणून कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रात रुजू होऊन सेवा दिली.
त्यादरम्यान
- 1962 साली अमेरिकन सरकारची फुल ब्राईट शिष्यवृत्ती मिळवून ते कॅन्सस मध्ये एम एस शिक्षण घेण्यासाठी गेले .
- 1967 मध्यै व्हेरमॉन्ट अमेरिका शांती सेनेला प्रशिक्षण
- 1971ऑस्ट्रेलिया भेट व येथील दुग्ध व्यवसाय व गवती कुरणे यांचा अभ्यास.
- 1976, आयसीएआर ,भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंड मधील स्टॅंनफर्ड व लंकेशायर परगण्यात शेती व दुग्ध व्यवसायाचा अभ्यास.
- हॉलंड ,इजरायल येथील शेतीचे प्रयोग पाहण्याची संधी .
- 1981 महाराष्ट्र सरकारचे फलोत्पादन सल्लागार.
- 1987 महाराष्ट्र सरकार खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष.
- 1991 भारत सरकार, सर्वोच्च नियोजन आयोगावर पाच वर्षे सदस्य.
- महाराष्ट्र सरकारने त्यांच्या या अफाट कामगिरीबद्दल 2000 साली “शेतीरत्न” हा सर्वोच्च पुरस्कार देऊन केलेला गौरव .
एवढे बहुमान व अधिकार पदे मिळवून देखील दादा नेहमी शांत राहिले. मोठेपणा कधीच दाखविला नाही. ते म्हणत “परमेश्वराने मला गरिबांच्या सेवेसाठी संधी दिली. मी ते काम केले “.
“सुखदुःखे समेकृत्वा..” हे आपल्या गीतेने सांगितलेले तत्त्वज्ञान दादांनी प्रत्यक्ष आचरणात आणून दाखविले.
आयुष्यात मानसन्मानाचे अनेक प्रसंग आले. दुःख मानहानीचे ही प्रसंग आले.शंभर नंबरी सोन्याला अग्निपरिक्षेतून जावे लागते. आपला कस सिद्ध करावा लागतो. वैयक्तिक जीवनात सामाजिक जीवनात तसेच सरकार दरबारी सेवा देताना दादांनाही अनेक भल्या बुऱ्या प्रसंगातून जावे लागले. मात्र प्रत्येक वेळी ते कसोटीस उतरले.
बोर्डी घोलवड परिसरासाठी दादांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून चिरकालीन स्वरूपाची अनेक कामे केली आहेत. आमचे बोर्डी रोड स्टेशन दादांच्या सरकार दरबारी मध्यस्थीमुळे तयार झाले.
बोर्डीच्या अस्वाली धरणाचा प्रकल्प 15 वर्षे रखडून पडला होता. दादांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत दाद मागून तो मार्गी लावला. पूर्ण केला. आज अस्वाली धरण हे आमच्या भूमिपुत्रांसाठी ‘जीवन वाहिनी’ ठरते आहे. दादांच्या कर्तृत्वाला आदरांजली म्हणून आमच्या परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी या धरणाचे, “जयंत सागर” हे नामाभिधान करण्याचे ठरविले आहे. दादांच्या स्मृतीला ती योग्य आदरांजली ठरेल.
दादांच्या सुविद्य पत्नी कै. सौ मीनाताई यादेखील एम ए, बी एड अशा उच्चशिक्षित व बुद्धिमान होत्या. कै. खंडेराव सावे या मान्यवर उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या त्या कन्या होत्या. मीनाताईंमुळे दादांच्या व्यक्तिमत्त्वाला, समाजसेवेला व संपूर्ण जीवनालाच एक वेगळा आयाम प्राप्त झाला यात शंका नाही. आदिवासींची मुले सुशिक्षित व्हावीत व त्यांच्या भावी पिढ्यांना अज्ञानी,अडाणी जीवन जगावे लागू नये, ही मीनाताईंची इच्छा होती.
माझ्या कोसबाड मधील फार्म हाऊस शेजारी श्री. भोनर हे आदिवासी शेतकरी राहतात. आज 90 वर्षाचे असूनही शेती करतात व आपल्या छोट्या टुमदार घरात राहतात. त्यांना जयंत दादांची आठवण आहे का, याबद्दल मला जाणून घ्यायचे होते. मी त्यांच्याशी बोललो. विशेष म्हणजे या माणसाने ‘जैंत दादांचे’ नाव घेताच भरभरून बोलावयास सुरुवात केली.
“आज मी व माझ्या कुटुंबाने शेतीत जी प्रगती केली आहे व आम्ही जे सुखा समाधानाचे जीवन जगत आहोत, त्याचे कारण जैंत दादांचे मार्गदर्शन व मदत…”
त्यांची नात एम एससी होऊन एका खाजगी कारखान्यात अधिकार पदावर काम करते. याचे कारण दादांनी व मीना ताईंनी तिच्या शिक्षणकालात दिलेलं उत्तेजन व मार्गदर्शन..” असे ते म्हणाले. हे एक उदाहरण आहे अशी अनेक उदाहरणे मला पहावयास मिळाली. दादांनी आदिवासी समाजासाठी दिलेल्या योगदानासाठी अजून कोणते शिफारसपत्र हवे?
मुंबई स्थित “सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड” या सहकारी आर्थिक संस्थेचा मी पहिला अध्यक्ष व एक संस्थापक सदस्य. आमच्या सोसायटीला नोंदणी, रजिस्ट्रेशन मिळण्यात खूप अडचणी येत होत्या. सरकारी यंत्रणा जराही साथ देत नव्हती. आम्ही दादांच्याकडे जाऊन आमची अडचण सांगितली. फक्त काही दिवसात दादांनी आम्हाला ही मान्यता मिळवून दिली. आज ही आर्थिक संस्था 100 कोटी रू चे वर वार्षिक उलाढाल करते व समाजातील गरजू विद्यार्थी, नोकरदार ,लहान उद्योजक यांना आर्थिक मदत करते आहे.
आमच्या कुटुंबाशी दादाचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होण्याचे कारण माझी आई व दादा एकाच पाटील कुटुंबातील व बालपणीचे खेळगडी होते. त्यामुळे दादा कधीही भेटले की प्रथम माझ्या आईची, ”सोमू ताई कशी आहे?” म्हणून चौकशी करत. आमची आई काही महिन्यापूर्वीच 105 व्या वर्षी निवर्तली. तिच्याकडूनही मला दादांच्या व तिच्या बालपणीच्या अनेक गोष्टी समजल्या. माझा लहान भाऊ प्रदीप बी एससी झाल्यावर त्याला नोकरी हवी होती. दादांनी कोसबाडच्या कृषी विज्ञान संस्थेत काम देऊन त्याला छान संधी उपलब्ध करून दिली. प्रदीप पुढे पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या विकासवाडी बाल शिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून निवृत्त झाला.
माझे वडील वामन गुरुजी 1981 साली निधन पावले. दादा त्यावेळी महाराष्ट्र सरकारचे सल्लागार म्हणून काम पाहत होते. नेहमी दौरे चालू असत. तरीसुद्धा सवड काढून एके दिवशी ते आमच्या घोलवड येथील घरी आले. आमचे सांत्वन केले. त्यांनी वडिलांच्या अंतिम दिवसाची माहिती करून घेतली. पुढील दोनच दिवसात वर्तमानपत्रात आमच्या वडिलांच्या विषयी एक श्रद्धांजलीपर लेख लिहून आम्हाला उपकृत केले. एवढ्या कामाच्या धांदलीत ही एका सामान्य प्राथमिक शिक्षकाविषयी श्रद्धांजलीपर लेख लिहिण्याचे काम केवळ दादाचं करू शकतात. मनाचा मोठेपणा दुसरे काय?

2007 साली आमच्या वडिलांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्यांच्या आठवणीचे “औदुंबराची छाया” हे पुस्तक प्रसिद्ध केले. दादांनी त्यावेळीही वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. मुंबईच्या तत्कालीन महापौर डाॅ.शोभा राऊळ, सहल सम्राट केसरी भाऊ पाटील, शिक्षक नेते कपिल पाटील अशी दिग्गज मंडळी त्यावेळी दादांच्यामुळे आमच्या कार्यक्रमाला लाभली. कार्यक्रम खूपच नेटका व हृदयस्पर्शी झाला. त्या कार्यक्रमाचा वृत्तांत व या थोर मंडळींचे एक दुर्मीळ छायाचित्र लेखात दिले आहे.
मला स्वतःला देखील दादांनी माझ्या नोकरी धंद्यात व समाजसेवेत आस्थापूर्वक मार्गदर्शन केले आहे. मुंबईला असले की दादा त्यांचे चिरंजीव दीपककडे राहत. माझे घरही विलेपारल्यात असत्याने माझी व दादांची अधून मधून भेट होई. माझ्या कामातील व देश परदेश प्रवासातील अनेक अनुभव, गमती जमती मी दादांशी शेअर करीत असे. स्वतः शेतीतज्ञ असले तरी जागतिक पेट्रोलियम व्यवसायाविषयी त्यांचे ज्ञान अफाट व अचूक होते.
माझे काही अनुभव ऐकून ते मला नेहमी सल्ला देत,
‘ हे अनुभव तू लिहून ठेव’
त्यावेळी मला ते लिहिणे जमले नाही. मात्र काही वर्षापूर्वी या माझ्या अनुभवांचे संकलन करून मी तीन पुस्तके प्रसिद्ध केली. माझ्या दुर्दैवाने त्याप्रसंगी दादा नव्हते, याची खंत आजही आहे.
एवढे महान असूनही सर्वसामान्यात सामान्य होण्याची दादांची गुणवत्ता याबद्दल एक छोटा किस्सा सांगून माझे लिखाण संपवतो.
त्यावेळी मी भायखळा येथील एका सरकारी आस्थापनाच्या कार्यालयात काम करत होतो. दादांचा एके दिवशी मला फोन आला.
“तुझ्या ऑफिसमध्ये दुपारी येत आहे. मला तुमचे कार्यालय पाहायला आवडेल “असे कळविले.
खरोखरच टॅक्सीने ते माझ्या कार्यालयात आले. त्यावेळी ते नियोजन मंडळाचे सदस्य होते. हा मंत्री पदाचा दर्जा होता. त्याप्रमाणे सर्व लवाजमा घेऊन येऊ शकले असते. दादा टॅक्सीने आले. माझ्या कार्यालयात बसून गप्पा केल्या. सर्व अधिकाऱ्याप्रमाणे रांगेत उभे राहून आमच्याच भोजनगृहात जेवण घेतले. माझ्या सहकाऱ्यांशी ओळख करून गप्पा करून निघून गेले.
माझे वरिष्ठ श्री. अरुण बाळकृष्ण साहेब निर्देशक, हे त्यावेळी आमच्या मुख्य कार्यालयात चर्चगेट येथे होते. त्यांना हे कळले व खटकले. सरकारी शिरस्त्यानुसार दादांना भेटणे, त्यांचा सत्कार करणे, खास खाना देणे त्यांना आवश्यक होते. त्यांनी माझ्याजवळ ही नाराजी व्यक्त केली. मी त्यांना “डॉ. जयंतराव पाटील हे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. आपण सरकारी प्रोटोकॉल न केल्याची खंत करू नका.” असे सांगितले . त्यांनी दादांशी व्यक्तिशः फोनवर बोलून दिलगिरी व्यक्त केली. मला म्हणाले,
“ राऊत तू म्हणतो ते खरे आहे. डॉ. पाटील हे खरेच वेगळे व्यक्तिमत्व आहे..”
पुढे श्री बाळकृष्णन् हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे चेअरमन झाले. एके दिवशी मला म्हणाले मला दोन दिवस आराम करण्यासाठी सहकुटुंब बोर्डीस जावयाचे आहे. बुकिंग करून दे. एके शनिवार रविवारी ते घोलवड मध्ये प्रभाकर भाईंच्या ‘तारपा‘ मध्ये सहकुटुंब आले. त्यांना खूप बरे वाटले. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळी आम्ही बसलो असता त्यांनी अचानक मला, जयंतराव पाटलांना सकाळी भेटता येईल का? ते बोर्डीतच आहेत का? असे प्रश्न विचारून माझी दांडी उडविली. अनेक वर्षानंतर हा प्रश्न अनपेक्षित होता. दादांना फोन केला. ते घरी होते, व त्यांनी आम्हाला भेटण्याची परवानगी दिली. अरुण बालकृष्ण सर त्यांच्या कुटुंबासह दादांच्या घरी आले. दादांशी मनसोक्त गोष्टी केल्या. दादांच्या भेटीची आठवण निघाली व अरुण साहेबांनी परत त्यांची क्षमा याचना केली.
दादांचा निरोप घेताना उभयतांनी दादांना चरण स्पर्श केला. आशीर्वाद घेतले. त्यावेळी अरूण सरांनी काढलेले उद्गार माझ्या आजही लक्षात आहेत. ते म्हणाले,
“ दादा, मी माझ्या आयुष्यात अनेक मोठे सरकारी अधिकारी, मंत्री यांना भेटलो. मात्र तुमच्यासारखे, एवढे उच्चपदस्थ असूनही साधे, निर्मळ व्यक्तीमत्व प्रथमतःच पाहिले. त्यासाठीच आम्ही दोघे आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत…”
भेटीस येण्याचा इरादा स्पष्ट होता. एवढ्या वर्षानंतरही ते दादांना विसरले नव्हते. एक मोठा उच्चपदस्थ, दादाशी कोणताही लागेबांधे नसलेला अधिकारी त्यांच्याबद्दल एवढी आत्मियता दाखवतो यात सर्व काही आले.
दादांच्या विषयी जास्त काय लिहू… दादा म्हणजे आमच्या मातीतून उत्पन्न झालेले एक अद्वितीय अनोखे शेतीशास्त्रज्ञ ! या मातीने निर्माण केलेला एक ख्यातकीर्त तरी साधा सरळ सज्जन माणूस!! आचार्य भिसे, चित्रे व पिता शामरावजी यांच्या मानव सेवा धर्माची परंपरा पुढे नेणारा सच्चा पुरुषोत्तम! दादा गेले असले तरी या समृद्धी रूपाने व त्यांच्या रसाळ, सरळ लेखनाने अजरामर झाले आहेत. त्यांच्या या विविधांगी कर्तृत्वातील आपल्याला जमेल तेवढा त्यांचा समाजसेवेचा वसा आपण घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली! दादांची पुढील पिढी दीपक लता व उदय यांनी मला ही संधी देऊन मनमोकळे करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. दादांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन!!



