मी मोठी आई बोलतेय.. भाग एक.

   आमची आई म्हणजे सर्वांची ‘मोठी-आई’, आज ‘104 नाबाद’, आहे! नोव्हेंबर 2021 मध्ये तिने आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करून 101 व्या वर्षात पदार्पण केले. आमच्या घोलवडच्या घरी तिची मुले नातवंडे पतवंडे व अगदी जवळचे आप्त यांनी अभिनंदन अभिष्टचिंतन करून आरोग्यमय भावी आयुष्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या. तिचे आशीर्वाद घेतले. आयुष्याकडे बघण्याचा सदैव सकारात्मक दृष्टिकोन, संतुलित नियमित आहार, भरपूर नियमित झोप, कायम जिज्ञासू वृत्ती, जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे रोजच्या वर्तमानपत्रातून आकलन करण्याची धडपड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मकेंद्रित वृत्ती व आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल जेवढ्यास तेवढी संवेदना. या व अशाच काही गुणवैशिष्ट्यामुळे हे दीर्घायुषी जीवन तिला प्राप्त झाले असावे असे वाटते . 

   खरोखर हे व्यक्तीमत्व म्हणजे एक खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे असे आमच्या डॉक्टरीण बाई म्हणतात ते खोटे नाही. आजही रक्तदाब साखर कोलेस्ट्रॉल अगदी एका तरुण  निरोगी माणसा एवढे! रोज चहाच्या कपात, आम्हा सर्वापेक्षा दोन चमचे साखर जास्त टाकून आणि आठवड्यातून कधीतरी बटाटेवडे भजी आणि दिल्यास आईस्क्रीम खाऊन सुद्धा!! डोळ्याचे अंधत्व सोडले व दुबळी झालेली  ‘कानपूर’ लाईन सोडली तर तेज तर्रार स्मरणशक्ती व तरुणपणीचा तोरा अगदी तसाच. खरोखर ही देवाची कृपा नव्हे तर काय…

     “भले माझी उन्हे मावळली असतील, माझी फुले कोमेजली असतील, वयाने शंभरी गाठली असेल, माझे सर्व काही होऊन गेले असेल, संसारिक कर्तव्य उरली नसतील, कोणी माझी चौकशी करा अथवा नका करू मी ही अशी आहे तशीच राहणार! ..” मनोवृत्ती म्हणजे आमची ही मोठी आई आहे.

     “आई” हा केवळ एक शब्द नव्हे तर आयुष्यातील असे एक व्यक्तिमत्व ज्यामध्ये धैर्य, विश्वास, श्रद्धा प्रेम वात्सल्य ममता आणि अशाच अमाप भावना एकवटलेल्या आहेत. जगातल्या कोणत्याही मुलाच्या मनात आपल्या आई बद्दल अशी अनमोल स्नेहभावना असते. 

   आई केवळ आपल्याला जन्मच देते असे नव्हे तर आपले  व्यक्तिमत्व ती घडवते. मुलासाठी आयुष्यभर झिजते. स्वतःला समर्पित करते.

    आज आमचे वडील, आप्पा, हयात नाहीत. वयाच्या केवळ 67 व्या वर्षी(1981) ते या जगातून निघून गेले. त्यापूर्वी त्यांनी  कुटुंबाप्रती द्यावयाचे आपले योगदान दिले होते. दुर्दैवाने ते थोडे लवकरच गेले. आज आम्ही भावंडे जे काही बरी-वाईट आहोत त्यात बहुतांशी आप्पांच्या संस्कारांचा वाटा जास्त. आप्पांचा देह जरी पुरुषाचा होता तरी  हृदय मात्र आईचे होते. त्यांनी प्रसंगी आमच्यासाठी वडील व आई अशी दुहेरी भूमिका बजावली.

आज आम्हा भावंडांत जे काही चांगले-वाईट आहे, व्यक्तिमत्वांतील गुणदोष आहेत ते निश्चितच आमच्या आई-वडिलांकडूनच आलेले आहेत. जास्त प्रभाव आप्पांचा? तरीही जे काही चांगले  ते त्यांचे, वाईट ते आमचे, असेच आम्ही समजतो!!

  आप्पांच्या आठवणींचा संग्रह आम्ही त्यांच्या 25 व्या स्मृतिदिना निमित्त सन 2006 मध्ये “औदुंबराची छाया”, या नावाने प्रसिद्ध केला. जगासाठी अक्षररूपाने ते त्या पुस्तकात असतील मात्र आम्हा सर्वांसाठी आमच्या हृदयाच्या एका कप्प्यात त्यांचे अस्तित्व सतत जाणवते.

 आज येथे आमच्या आई बद्दल काही लिहावयाचे आहे. आप्पांची सहधर्मचारीणी म्हणून तिने आयुष्यभर त्यांना साथ दिली. सध्या कानाने अत्यंत कमी ऐकू येत असल्याने तिच्याशी तेवढा संवाद होत नसला तरी काही वर्षां पूर्वी, झालेल्या संवादातून तिच्या बालपणातील, तारुण्यातील, वैवाहिक जीवनातील व आमच्या बालपणातील काही गोष्टी कळल्या त्या आठवणी रूपाने तिच्याच शब्दात येथे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तिचे व्यक्तिमत्व त्यातून नकळत उलगडते. तिला बोलते करण्यात अण्णीने म्हणजेच सौ. अरुणा श्रीकांत राऊत, हीने बरेच श्रम घेतले आहेत. त्यामुळेच मला हे शक्य झाले .

    आईचा जन्म बोर्डी गावातच झाला. बोर्डी हे आजच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक छोटे गाव. आईला तिच्या वडिलांचा सहवास अगदी अल्पकाळ मिळाला. अर्थातच पितृवात्सल्य म्हणजे काय याची तिला कल्पना नाही. ती एकूण सहा भावंडांचं सर्वात मोठी बहीण. तिच्या वयाच्या केवळ सहाव्या  वर्षीच, सर्वात लहान भाऊ केवळ काही महिन्यांचा असताना वडील देवाघरी गेले. आई इंदुमती(सोमू) वय वर्षे सहा,नंतरची बहीण सुनंदा(गोंडू) वय वर्षे चार, तिसरा अनंत वय वर्ष तीन, नंतरची बहीण कमळी वय वर्ष दीड, छोटी बहिणी हिरू वय वर्षे एक, व सर्वात लहान भाऊ खंडेराव(खंडूमामा.) वय केवळ दोन महिने. सर्वात मोठ्या बहिणीला आपले वडील कसे दिसत होते याची पुसटही कल्पना नाही तर लहान भावंडांची काय अवस्था असेल? नियतीने या भावंडावर खूप अन्याय केला आहे. ज्यांना आपल्या बाबांचा चेहरा आठवत नाही त्यांना बाबांचा प्रेमळ स्पर्श कसा कळणार? पित्याविना  बालपण काय असते हे,आई-वडिलांचे भरपूर प्रेम मिळालेली भावंडे समजू शकणार नाहीत.

  आईने जेमतेम शाळेत दोनेक वर्षे काढली. अक्षर ज्ञान झाले तेवढेच! या सर्व भावंडांनी आपल्या बालपणी उपभोगली ती गरिबी, उपासमार आणि अनुभविली ती, ‘पांढऱ्या पायाची’, म्हणून हेटाळणी. काही दयाळू नातेवाईकांनी मानवता धर्म म्हणून पहिल्या दोन मुलींना आपल्या घरी नेऊन त्यांचा सांभाळा केला लग्न लावून दिले.. संसार कुठे करून दिले ही खरीच त्यांची खूप मेहरबानी. आमची आजी आक्काला खूप आधार मिळाला! 

     लहानपणी केलेल्या त्या संघर्षामुळे आई अकाली प्रौढ झाली. आपल्या घरात ती सर्वात मोठी होती. लग्न झाल्यावर ती धाकटी सून झाली. आप्पा प्राथमिक शिक्षक होते, बदलीनुसार अनेक गावांत फिरावे लागले. कधी उमरोळी कधी बोर्डी  कधी चिंचणी तर कधी घोलवड. अशी तिची भ्रमंती झाली. नवीन घरे उभी केली, उभी केलेली मोडली. संसारातील जबाबदाऱ्या व समस्या तिने कधी शांतपणे तर कधी मोठा  त्रागा करीत पार पाडल्या. त्रागा करणे हा तिचा गुणधर्मच झाला. मात्र कोणत्याही परिस्थितीत मुलांचा सांभाळ करत राहिली. साधारणपणे जिकडे अभाव असतो तिकडे तणावही होतात. मात्र आप्पांनी तो होऊ दिला नाही. आप्पा नेहमी शांत होते, आप्पा संत होते! कदाचित लग्नानंतर त्यांच्या स्वभावात परिवर्तन झाले असेल?

आज कल्पना केली तर तिचे बालपण केवढे खडतर होते याची कल्पना येईल. बुद्धीने ती निश्चितच सरस होती. मात्र त्या गुणवत्तेला परिस्थितीमुळे शिक्षणाची जोड न मिळाल्याने, चीज होऊ शकले नाही. ती सामान्य  गृहिणी म्हणून जीवन जगली तरी असामान्यत्वाची काही लक्षणे आजही तिच्यात दिसतात. तिची स्मरणशक्ती केवळ अद्भुत आहे. किती तरीवर्षांपूर्वी घडलेल्या घटना, त्यांतील व्यक्तींची नावे, वाचलेल्या पुस्तकांतील काही ओळी, त्यांचे संदर्भ आजही बरोबर सांगते. समोरचा माणूसही आश्चर्यचकित होतो. 

      मी व अण्णाने, मोठी भावंडे म्हणून अभ्यास तर करावाच पण त्याबरोबर तिला घर कामात मदतही करावी अशी तिची अपेक्षा असे. आम्ही दोघे अनिच्छेने का असेना, घरातली पाणी भरून देणे, घराची झाडलोट करणे, कपडे वाळविणे, भाजी-किराणा आणून देणे अशी कामे नियमित करीत असू. अगदी गावातील रस्त्यात पडलेल्या गाई गुरांचे शेण गोळा करून,त्याच्या गोवऱ्या बनवून त्या इंधन म्हणून घरात वापरण्यासाठीचे कामही करीत असू. 

…पुढे दुसरा भाग.