मी मोठी आई बोलते, भाग १२

मोठीआई आता आमच्यात नाही. पण मोठीआईची १०४ वर्षाची कहाणी तिच्याच शब्दात लिहिली होती, अनेकांच्या विनंतीनुसार त्याचे लेखांक चालू ठेवीत आहे.

सद्गुरु श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज

आप्पांची बदली  बोर्डीला झाली मी त्यावेळी अरुणाच्या बाळंतपणा मुळे बोर्डीतच होते. ऊमरोळीकरांचा मनापासून निरोप घेता आला नाही, याचे शल्य मनात अजूनही आहे.

   ऊमरोळी जवळ टेंभोडे नावाचे छोटे गाव आहे. तेथे श्री पद्मनाभ स्वामींचे मंदिर आहे. दरवर्षी माघ महिन्यात शुद्ध सप्तमीला तेथे यात्रा भरते. पद्मनाभ स्वामींंकडून अनुग्रह घेणाऱ्या मंडळींना पद्मनाभपंथीय असे म्हणतात. 

  महाराष्ट्रात पद्मनाभ संप्रदाय किंवा श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज(टेंभोडेकर) यांचा वारसा हा एक विष्णू भक्ती आणि दत्त सांप्रदायाशी जोडलेला अध्यात्मिक पंथ आहे. श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांनी पालघर जवळील टेंभोडे गावी राहून समाजाला आत्मंगतीचा मार्ग दाखविला. त्यांनी अनेक स्तोत्रे आरत्या आणि भजने रचलेली आहेत. 

या पंथातील लोक कपाळाला लाल टिळा ,गळ्यात मण्यांची माळ व आहाराने पूर्ण शाकाहारी असतात. अनेकदा मी भागू- दुर्गा बरोबर या यात्रेस जात असे. आजही दरवर्षी माघ सप्तमीला मोठा उत्सव होत असतो..सर्व भाविकांना तीर्थप्रसाद म्हणून संध्याकाळी भोजनाचाही लाभ होतो. अतिशय शिस्तबद्ध व भक्तिमय असा सोहळा असे.. मी ऊमरोळीस  असताना या आनंद सोहळ्यात अनेकदा सहभागी झाले आहे.त्यामुळे त्या आठवणीत आजही अगदी ताज्या आहेत.

   श्री पद्मनाभस्वामी हे टेंभोड्यास येण्याआधी मुंबईतील परळ भागात एक साधे गिरणी कामगार म्हणून उपजीविका करीत होते. आपल्या बरोबर काम करणाऱ्या अनेक कामगारांची व्यसनाधीनता अज्ञान व गरिबी पाहून त्यांना समाजासाठी काहीतरी करावे वाटू लागले. त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारले. परिसरातील अनेकांना व्यसन व वाईट संगतीतून मुक्त करून त्यांचे जीवनात नवा प्रकाश निर्माण केला. त्यांचे कार्य मुंबई महाराष्ट्राबाहेर गोवा, कर्नाटक, गुजरात येथेही पसरले आहे. एकमेकाविषयी प्रेमभाव ठेवावा,आयुष्यात दुसऱ्यासाठी झटावे ,आपले आयुष्य सत्कारणी लावावे व शुद्ध सात्विक शाकाहार घ्यावा, असा त्यांचा साधा सरळ उपदेश होता. पुढे आपल्या काही शिष्यांच्या आग्रहाने ते पालघर जवळ टेंभोडे गावात आले. अखेरपर्यंत तेथेच राहिले.पालघर उमरोळी आगरवाडी परिसरात आजही त्यांचे अनेक शिष्य असून दरवर्षी  संजीवन समाधी उत्सव टेंभोडे येथे साजरा होतो.

  टेंभोडे, पालघर येथील पद्मनाभाचार्य स्वामींचे संजीवन समाधी मंदिर.

  1948 साली आप्पा उमरोळीहून बोर्डी शाळेत दाखल झाले. आमच्या संसारिक जीवनप्रवासातील एक आनंद पर्व संपले. उमरोळीतील गावकऱ्यांनी आप्पांना भावपूर्ण निरोप दिला. त्यांनी भेट दिलेला चांदीचा पेला व बशी आजही माझ्याकडे आहे. त्यांच्या निस्सीम प्रेमाची ती खूण आहे. ती कप-बशी पाहताना माझ्या जुन्या स्मृती जागृत होतात. त्या छोट्या कप आणि बशीच्या रूपात मला संपूर्ण उमरोळीकर दिसतात.गावकऱ्यांनी आप्पांना ,

  “आम्ही आपली बदली रद्द करवितो,तुम्हाला येथे घर ही बांधून देतो, ऊमरोळी सोडू नका ..” अशी कळकळीची विनंती केली होती. आप्पांनी त्यांना नम्रतापूर्वक नकार देऊन उमरोळीचा निरोप घेतला होता. 

   आम्ही ऊमरोळी सोडली. तरी ही मंडळी अधून मधून बोर्डीस येत राहिली. सोमा, नाना काका ,आत्माराम, नारायण व इतरही काही मंडळी व्हर्नाक्युलर फायनल परिक्षेच्या निमित्ताने (तत्कालीन मराठी सातवीची जिल्हा बोर्डाची परिक्षा) बोर्डीस येत राहिली. त्यावेळी सातवीची, फायनल परीक्षा , ठाणे जिल्ह्यात बोर्डी व ठाणे या दोन केंद्रातच होत असे. मंडळी आपल्या मुलांना, नातलगांना परिक्षेसाठी बोर्डीत घेऊन येत. आमचे घरीच मुक्काम करीत. पुढे पालघर केंद्र झाल्यावर परिक्षेसाठी येणे बंद झाले. बोर्डी शाळेत शिक्षण चांगले मिळते म्हणून काही उमरोळीकरांनी आपली मुले बोर्डी हायस्कूलमध्ये घातली होती. एक दोन मुले आमचे घरी वर्षभर राहिली.

       इतरही अनेक कारणांनी मंडळी आमच्याकडे येत राहिली. बोर्डीतील बिसू  मांत्रीकाकडे कुत्रे ,मांजर ,जनावर चावल्यास औषध मिळे. त्यामुळे बोर्डीस येणे होई. तसेच नाना मळेकर हे हाडवैद्य असल्याने त्यांचे कडेही उपचारासाठी गरजू लोक येत असत. काही वनस्पतींचे लेप लावून, मोडक्या हाडावर दाब देऊन नाना अस्थिव्यंग दूर करीत. सोमा काका रहाटाच्या ‘बांड्या’घेण्यासाठी बोर्डीच्या. कुंभार वाड्यात येई. विहिरीवरील राहटातून पाणी काढण्यासाठी, गोल फिरणाऱ्या चाकावर बांधलेल्या मातीच्या लहान मडक्यांना बांड्या म्हणत. सोमा काकाचा लहान भाऊ बिस्तीर  दर मे महिन्यात त्याच्या वाडीतील आंबे व ताडगोळे आम्हाला खायला घालण्यासाठी बोर्डीस येई. अशा काही ना काही कारणांनी मंडळी आमच्याशी जोडलेली  राहिली होती. उमरोळीकरांनी आमच्या कुटुंबावर निरागस निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव केला. ती पिढी असेपर्यंत आम्ही अक्षरशः त्यांच्या प्रेमात भिजून गेलो होतो. आज ती पिढी गेली आणि संपर्कही खूप कमी झाला आहे.

     आप्पांची बदली चिंचणी शाळेत झाल्यावर आप्पा व दिगू ,प्रभाकर भाई( कमळीमावशीचा)  बरोबर त्याच्या दूध पुरवठा गाडीतून उमरोळीस जाऊन आले. प्रभाकर आरे डेरीत अधिकारी म्हणून कामास होता. कधीकधी दुधाच्या गाडीबरोबर कामानिमित्त बोर्डी चिंचणी भागात येई.एकदा त्याच्या भेटीचा योग साधून आप्पा व दिगु त्याच्याबरोबर डेअरीच्या व्हॅन मध्ये बसून उमरोळीत  जाऊन आले.. ऊमरोळीकर मंडळींनी आप्पांचे खूप अगत्याने आदरातिथ्य  केले. दिगू कॉलेजला जाऊ लागला होता. त्याचेही कौतुक झाले. आप्पांची उमरोळीची ती शेवटची भेट.

     त्यानंतर आप्पांचे स्मरणार्थ आम्ही स्थापन केलेल्या “वामनाई धर्मादाय शैक्षणिक ट्रस्ट” मार्फत शिष्यवृत्ती व शालोपयोगी सामान वाटपाचा कार्यक्रम उमरोळी शाळेत झाला. त्यानिमित्ताने मुले गेली होती. आमचा श्रीदत्त देखील अमेरिकेहून या कार्यक्रमासाठी आला होता. त्यालाही उमरोळी व आमचे जुने घर पाहून खूप बरे वाटले. सर्वांनी जुन्या आठवणी जागवल्या. हरु, कमल आणि फणींद्र ही नानांची मुले व त्यांचे कुटुंबीय  कार्यक्रमास आवर्जून हजर होते. पपीने या मंडळीच्या सहाय्यानेच कार्यक्रमाची आखणी  केली होती. आणि घरीच चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. दुर्दैवाने  फणी  काही दिवसापूर्वी निधन पावला. त्याचा मुलगा प्रीतम आमच्या संपर्कात असून या लेखनासाठी काही संदर्भ व फोटो देऊन  मदत करित असतो. प्रीतम आज बांधकाम व्यवसायात चांगले नाव करीत आहे. त्या कार्यक्रमास मी जाऊ शकले नाही .पण कार्यक्रमाचा वृत्तांत मुलांनी मला सांगितला. खूप बरे वाटले.  उमरोळीकरांनी केलेल्या उपकारांची अंशतः तरी फेड झाली याचे समाधान वाटले.

   मी उमरोळीत असताना लहान दिगूला घेऊन एकदा बोर्डीस आले होते. आक्काची दिगुला पाहायची इच्छा होती. दिगू तंदुरुस्त होता. प्रकृतीही चांगली होती. बाय (वासु नानांची बायको)मला नेहमी त्याची अधून मधून दृष्ट काढण्याबद्दल सूचना करीत असे. पण आप्पांचा अशा गोष्टीवर विश्वास नसल्याने मी ते मनावर घेत नसे. काय झाले कोणजाणे,बोर्डीस आल्यावर दिगुला एकाएकी जुलाब सुरू झाले.  नंतर थोडा ताप येऊ लागला. दोन दिवस झाले तरी प्रकृतीस उतार पडेना..दीड वर्षाचा दिगू मलूल दिसू लागला.  डोळे मिटून पडून राहू लागला .खाणेही बंद झाले. पाणी मिश्रित दूध, ग्लुकोज-पाणी तोंडात भरविल्यास उलट्या करून टाकी. खूप अशक्त झाला. जुलाब थांबेनात .डोळेही उघडू शकत नव्हता.आम्ही काळजीत पडलो. आप्पांना ऊमरोळीहून बोर्डीत बोलाविले. डॉ. पाठकांचे औषध चालू होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टर देखील चिंतेत पडले. त्याकाळी लहान मुलांना शक्यतो इंजेक्शन देत नसत. पण डॉक्टर पाठकांनी शेवटचा उपाय म्हणून दिगुला एके संध्याकाळी  इंजेक्शन देण्याचे ठरविले. आम्हालाही परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव दिली. डॉक्टर स्वतः इंजेक्शन देऊन दिगाच्या उशाशी बसून राहिले. आम्हीही दत्तगुरूंचा धावा करीत होतो. अंधारी रात्र.. निपचित पडलेले माझे बाळ.. अंगात ताप.. आणि त्याच्या उशाशी बसलेले सचिंत डॉक्टर पाठक… आप्पांच्या दत्त गुरूंच्या प्रार्थना…आजही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जात नाही..

  जेव्हा रात्री एकच्या सुमारास त्याचा ताप थोडा उतरला, त्याला घाम आला, तेव्हाच डॉक्टर पाठक त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवून घरी गेले …आमचा जीव भांड्यात पडला. डॉक्टर पाठकांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. त्यांनी दिगूला पुनर्जन्मच दिला..!

उमरोळीत आल्यावर आप्पांनी माझी खरडपट्टी काढलीच. पण बायनेही दोन शब्द सुनावले.. “माझी सूचना का नाही पाळलीस”, अशी विचारणा केली? मी पुन्हा तसे धाडस माझ्या कोणत्याही मुलाचे बाबतीत केले नाही.

  पुढे  अरुणा वर्षभराची झाल्यावर उमरोळीकरांच्या आग्रहावरून मला ऊमरोळीस जाण्याचा योग आला. बाळूही चार एक वर्षाचा होता. 

 “उमरोळीचे घर म्हणजेच आपले घर, बोर्डीचे घर आपले नाही ..“

 अशी त्याची मनापासून समजूत होती. तो सतत आमच्या मागे ‘उमरोळीच्या आपल्या घरी चला ,तेथेच राहूया ..’अशी भुणभुण लावीत असे. त्यामुळे त्याचा हट्ट पुरविण्यासाठी अरुणा व बाळूला घेऊन मी दोन दिवस उमरोळीला जाऊन आले. सर्वांनीच आदरातिथ्य केले. लहान अरुणा व बाळूचे खूप लाड केले. कौतुक केले . दोन-चार दिवस राहण्याची विनंती केली. निघताना भागु दुर्गाच्या डोळ्यात पाणी आले.. कोण ही माणसे? ना नात्याची ना रक्ताची ..का आमच्या साठी एवढी आसुसलेली होती ?हे गतजन्मीचे ऋणानुबंध असतील काय? मला दुसऱ्या दिवशी परत यावे लागले.

   पूर्वी शेतीला पाणी देण्यासाठी अशा प्रकारचा रहाटांचा  वापर करीत. गोल चाकावरील मातीच्या बांड्यातून विहिरीतील पाणी उपसा होई.

  पुढे उमरोळीस  लग्न समारंभानिमित्त एक दोन फेऱ्या झाल्या असतील.आमची बोर्डीहून चिंचणीस बदली झाल्यावर मात्र माझा उमरोळी गावाशी संपर्क तुटला..

   बोर्डीच्या कुंभार वाड्यात मिळणाऱ्या  रहाटा च्या ‘बांड्या’

   आयुष्याच्या प्रवासात  अशी माणसे आणि त्यांचे असे निर्व्याज, नितळ प्रेम क्वचितच लाभते.

  अशी पाखरे येती ,स्मृती ठेवूनी जाती …

 आयुष्यात दोन दिवसाची रंगत-संगत करून प्रेमाच्या आठवणी ठेवून आपापल्या मार्गाने निघून जातात पुन्हा कधीच न भेटण्यासाठी..‌.

   आजही त्या दिवसांची, या मंडळींची  आठवण झाली की त्यांचे चेहरे डोळ्यासमोर येतात, त्यांनी केलेले उपकार आठवतात.. डोळ्यात अश्रू जमा होतात!! 

  आयुष्यात मला आई, बाबा, बहिणी, भाऊ यांचा विशेष सहवास मिळालाच नाही. मन मोकळे  करण्यासाठी  वाव नव्हता .या लोकांनी माझ्या आयुष्यातील ती मोठी उणीव  भरून काढली. मला भक्कम आधार दिला. मानसिक आणि व्यावहारिक! 

  त्यांच्या त्या निर्व्याज  प्रेमाचे वर्णन करताना  मला ज्ञानोबांची ही ओवी आठवते…

   “माये पुढे बालका, रिगतान पडेची आवाका,

   तैसे मन देता लोका, ना लोची जो!

   “आईजवळ जाताना बाळाला कोणताच विकल्प मनात नसतो. तसे फक्त काही लोकांकडेच आपले मन उघडे करताना, कोणताही संकोच होत नाही…उलट समाधान होते..”

   उंमरोळीकर मंडळींचे माझ्या आयुष्यातील स्थान तसे आहे! एकमेवाद्वितीय!!!