मी मोठी आई बोलते भाग २
बोर्डीच्या घरात रहात असताना त्या मातीने लिंपलेल्या कारवीच्या घरात, विशेषतः पावसाळ्यात किती अडचणी येत असत त्या काय सांगाव्यात? कुडाच्या भिंतीना भोके पडलेली असत. त्यातून लहान सरपटणारी जनावरे हळूच शिरून घरातील कोपऱ्यात लपून राहत. कधी तर विषारी सापांनीही वस्ती आमच्या घरात नकळत केलेली असे. माळा सुद्धा कारवीच्या काड्यांनी बनविलेला असे. त्यावर फक्त लाकडाची साठवण करीत असू. ही लाकडे पावसाळ्यात इंधन म्हणून वापरली जात. कधी कधी ही विषारी व बिनविषारी जनावरे सरपटत माळ्यावर जाऊन लाकडाच्या ढिगाऱ्यात लपून बसत. बाहेर पडताना त्यांच्या वजनामुळे कारवीच्या फटीतून धाडकन खाली आपटत. त्या काळातील एक प्रसंग आठवतो. आम्ही आमच्या आजीबरोबर शेगडीचा शेक घेत खाली बसलो होतो. सरसर असा आवाज झाला व आमच्या अगदी बाजूला कारवीच्या फटीतून एक लांबलचक साप खाली पडला. आम्ही त्याला घाबरलो व तोही आम्हाला घाबरला. चपळाईने वळवळ करीत अंगणात निघून गेला. तो प्रसंग आजही आठवला की अंगावर शहारे येतात. कोणाच्या अंगावर पडला असता तर काय झाले असते? पण परमेश्वरी कृपेने वाचलो. म्हातारी आजीही चकित झाली होती. देवाला हात जोडून तिने आमच्यासाठी प्रार्थना केली. तिची प्रार्थना असो वा पुण्याई असो, परमेश्वरी कृपेने त्या घरात एवढे बिकट प्रसंग येऊनही कधीच कोणाला कोणताही अपाय झाला नाही. त्या दिवसात बूट वगैरे तर सोडा साधी चप्पलही आमच्या पायात नसे. आम्ही शेतातून वाड्यांतून गवतातून उन्हाळ्यात पावसाळ्यात वाड्यात अनवाणी फिरत असू. आज आईबाप आपल्या मुलांना असे फिरू देतील काय ? आम्ही सारे सही सलामत राहिलो. एवढेच नव्हे तर अज्ञानामुळे का असेना भीती नावाची चीज नव्हती.
जून महिन्यात पावसाळा सुरू होण्याआधी घराचे कौलारू छप्पर ठीक करण्यासाठी आम्हालाच त्या मोडक्या छप्परावर चढून कौलांचे दुरुस्तीकरण करावे लागे. काही फुटकी तुटकी कौले बदलावी लागत. त्याकाळी साधी गावठी कौले उपयोगात होती. आजच्याप्रमाणे सपाट चौकोनी विलायची कौले देखील लोक वापरत. मात्र ती भारी किमतीमुळे सर्वांनाच परवडत नसत. ही साधी कौले थोड्या वजनाने ही मोडत. त्यामुळे पावसाळ्यात असे एखादे फुटके कौल छपरात राहिल्यास. पाऊस सुरू झाल्यावर वरून अभिषेक होई. खाली जमिनीवर बादली भांडी मांडून हे पाणी गोळा केले जाई. जमिनीवर ओल राहत असे. सबंध घरात एक कुबट वास भरून राही. आम्ही या सर्व किमयेचा आनंद घेत असू. कारण आमच्यासाठी तो एक मोठा खेळ असे. आप्पांना मात्र याचा खूप त्रास होई. त्यामुळेच ते झोपण्यासाठी त्या घरात राहत नसत. हे खाली पडणारे गळके पाणीच आम्हाला आंघोळीसाठी वा प्रसंगी पिण्यासाठी कामाला येई. आम्हा मुलांसाठी ही एक मोठी गंमत होती…
पावसाळा सुरू झालाकी आमच्या घरासमोरील अंगणात वाहत्या पाण्याचा प्रवाह निर्माण होई. अगदी ओटीवरही पाणी येत असे. त्यामुळे आमच्या कागदी होड्या सोडण्यासाठी आम्हाला बाहेर अंगणात जाण्याची गरज नव्हती. घरात बसल्याबसल्याच आमच्या होड्या प्रवाहावर स्वार होऊन डौलाने पुढे जात .हे दृश्य पाहतानाही खूप आनंद होई.
मातीच्या चुलीवर, बाहेर मिळणाऱ्या काट्याफाट्यांनी व आम्हीच बनवलेल्या गोव-यांचे इंधन वापरून आमचे जेवण तयार होई. स्वच्छता व टापटीत याबाबत आई-आप्पा नेहमी सजग असत. जेवताना अन्नाचा एकही कण वाया जाता कामा नये अशी अपेक्षा असे. सर्वांसाठी हा नियम लागू होता. आजही आई जेवल्यानंतर तिचे उष्टे ताट अगदी स्वच्छ असते. वेळच्या वेळी खाणे, शांतपणे, दात नसले तरी जमेल तेवढे चघळीत जेवणे, या तिच्या सवयी आजही कायम आहेत.
अजूनही नेमाने सोमवार, गुरुवार असे थोडे उपवास करते. व्रत वैकल्ये करण्याची ईच्छा आहे मात्र वार कोणता हे लक्षात राहत नाही. वयामुळे ही लघुस्मृति नाही. हे सर्वांचेच होते. आम्हीही आठवण करून देत नाही. आता तिला इच्छा असेल ते खाऊ दे. परमेश्वराचे स्मरण फक्त आंघोळीच्या वेळी ..“पार्वती शंकर, भोळा शंकर..” एवढेच आळवीते. कधी कधी पार्वती शंकर.. करता करता गंगाधरा ..शंकरा ..करता करता ..गंगाधर काका.. होऊन जाते. गंगाधर आप्पांचा उमरोळीतील विद्यार्थी. तिचाही आवडता. कारण कधीमधी आपल्या घरून तांदूळ किंवा काही भाजीपाला आणून देत असे.
आजही दिसत नसले तरी स्मृती शाबूत आहे. देवावर श्रद्धा आहे. मात्र अंधश्रद्धा नाही. सतत देव देव करणे नाही. आता सोडा पूर्वी ही कधी नित्य नियमाने देवळात गेली नाही. अनायासे देवदर्शन झाले तर देखल्या देवा दंडवत घालायचा. पूर्वी बैलगाड्यातून गंगादेवी महालक्ष्मी यात्रेला जात असू तेव्हा मंदिरात जाऊन देवीचे दर्शन होई.

गंगाजी यात्रेचा विषय निघालाच आहे तर त्या गोड आठवणीही थोडक्यात सांगायलाच पाहिजे. ही यात्रा साधारणपणे थंडीच्या दिवसात असते व बैलगाडीतून होत असे आमच्याकडे बैल ही नव्हते, गाडीही नव्हती. शेजारचे लख्या मामा कधीतरी आपली बैलगाडी यात्रेसाठी देत. आमचे काका इतर व्यवस्थापन करून जत्रेचा बेत करीत. आम्ही चिल्लीपिल्ली गाडीत बसून एकमेकाला चिकटून पांघरुणात गुरफटून घेत असू. मोठी पुरुष मंडळी गाडी मागून चालत येई. स्त्री वर्ग आमच्याबरोबरच गाडीत असे. हा मोठा आनंददायी प्रवास होता. आयुष्यामध्ये विमानातून फिरलो आहे, लिमोजीन गाड्यातून फिरलो आहे पण अशा बैलगाडीतून, शेतातल्या कच्च्या रस्त्यावरून सकाळच्या झुंजू मुंजूच्या प्रहरात केलेला त्या गंगाजी प्रवासाचीआठवण आजही खूप आनंद देऊन जाते. गंगाजीला पोहोचल्यावर एखाद्या विस्तृत झाडाखाली बायका मंडळी जागेची साफसफाई करीत. शेजारचे तीन दगड आणून चूल तयार होई. आणि इतरत्र पडलेला पालापाचोळा काट्या जमवून त्याचा इंधन म्हणून वापर होई. येताना वाटेत लागणाऱ्या ताडीच्या मांडवातून दोन-चार बाटल्या भरून घेतल्या जात. पुरुष मंडळीला तेवढा धीर नसेल तेव्हा ही मंडळी मांडवातच आपले पेय पान करून घेत. त्यांना ते चालत राहण्यासाठी टॉनिक असे. ताडी पिण्यासाठी शेजारच्या झुडपातील एखादे पसरट पान तोडून दोन्ही हातात पकडून पानाची कड तोंडात पकडून वरून पडणारी ताडी प्यावी लागे. यालाही खूप सवय असावी लागे. नाहीतर तोंडाऐवजी ताडी नाकात जाई. यातही आम्ही सरावाने तरबेज झालो होतो. दोन घोट ताडी मिळे. त्यामुळे भूक लागून जेवण कधी होते याचा वाट पहाट असू. यात्रेत देवदर्शनाआधीच बकऱ्याचे मटण विकत घेतले जाई. कारण ते शिजण्यास वेळ वेळ लागतो ना? त्यानंतर जेवणाआधी देवीदर्शन. पोटातल्या भुकेला रटरटणाऱ्या सुगंधित मटणाचा वास आला की काय आनंद होत असे? जेवण अगदी साधे भरपूर भात व मटणाचा रस्सा. या जेवणाची चव दिवसभर नाकात घुटमळे.
प्रत्येकाला दोन दोन आणे यात्रेतील खरेदीसाठी मिळत. आम्ही मुले या दोन आण्यातही भरपूर खरेदी करीत असू. बहुतेक खरेदी ही भवरा अथवा एखादे लहान खेळणे असेच काहीतरी असे. आमच्यातील काही हातचलाखी करणारे ‘जादूगार’, दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन एक-दोन लहान वस्तू सहज खिशात टाकीत. बहुदा जादू सफल होई. कधी विफल झालीच तर एक दोन चापट्या खाण्याचीही तयारी असे. संध्याकाळी जातानाही तशीच मजा असे. बैलांच्या गळ्यातील घुंगराचा तो सुंदर नाद, भोवताली पसरलेला गंधित निसर्ग, वर आकाशात चमचमणारे तारे, शेतातील खडखडणारा रस्ता वाहणारा मंद गार वारा आणि दोन्ही बाजूला झोपड्यातून लुकलुकणारे दिवे पणत्या ..आहाहा.. या निसर्गाच्या आर्केस्ट्रा मधून बरसणारे नैसर्गिक संगीत ऐकत ऐकत कधी झोप लागून जाईल ते कळत नसे. घर आल्यावरच उठून बसत असू…पुढील आठ दिवस त्या आठवणी मित्रांना सांगत मजा घेत असू.

म्हणूनच आजही त्या गंगाजी यात्रा आठवतात ..ते मित्रही आठवतात.. बाबू, सुधा, बबन, श्याम, अवि, अशोक.. अनेक नावे आहेत.. …आमच्या आईलाही या जत्रेत जाण्यासाठी खूप अप्रूप असे. फक्त गंगाजीची यात्रा बैलगाडीने होई. महालक्ष्मी साठी मात्र असे शक्य झाले नाही कारण ते अंतर खूपच आहे…
पुढे भाग 3.