आमची मोठी आई भाग ३

डोळे अधू झाले असले आणि कान काम करीत नसले तरी सर्व गावातील घडामोडी इत्यंभूत माहिती असतात. कुटुंबातील कोणा व्यक्तीच्या घरी नवीन अपत्याचा जन्म झाल्यास त्याचे नाव काय ठेवले अशी विचारणार ताबडतोब होते. एवढेच नव्हे तर रोजचा पेपर वाचून दाखवावा लागत असल्याने जगातील घडामोडी ची माहिती करून घेते. “काल मोदी रशियाला गेले होते तर तेथे काय केले?”
हा प्रश्न दुसऱ्या दिवशी असतोच. कुतुहल हा आमच्या मोठ्या आईचा एक विलक्षण गुणधर्म आहे. विशेषतः आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्या बातम्या ऐकते त्यातही अनेक शंका निर्माण होतात आमच्या मुंबईतील घरी पहिल्यांदा टीव्ही आला त्यावेळी आईची आई म्हणजे आक्काही मुंबईत होती. अक्काला,एवढी माणसे टीव्ही मध्ये कशी बसतात हा प्रश्न पडला होता?
तिची हुशार लेक म्हणजे आमची मोठी आई ,तिने अक्काची समजूत काढली..
“ अगं आजकाल माणसांना लहान करून टीव्हीत बसवता येते. काम झाले की पुन्हा टीव्ही बाहेर येऊन त्यांना मोठ करतात…आस्सा जमाना बदलला ..तुला न माला आता काय हमजते?”..
शेवटी वाडवळी भाषेत हा उपदेश. आक्काचेही समाधान. समाधान झाले…!!
पूर्वी डोळे चांगले असताना ती स्वतः पेपर वाचित असे. टीव्हीवरील बातम्या ऐकायची. अनेक पुस्तकांचे ही वाचन होई. पुढे कादंबऱ्यापेक्षा धार्मिक पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. आपल्या नातवंडांना तशी पुस्तके आणून देण्याच्या फार्मसी झाल्या. त्यामुळे अनेक धार्मिक आख्यायिकाही लक्षात आहेत. आता हळूहळू थोडा विसर पडतो आहे .मात्र तरीही जे लक्षात आहे ते अफाट आहे.
भारताने आकाशात उपग्रह सोडला. मग एवढ्या उंचीवरून काय दिसणार? उपग्रहाला खूप भली मोठी दुर्बीण लावली असेल, तेव्हाच एवढ्यावरून त्यांना खालचे सर्व दिसत असणार ?…स्वतःच्या शंकांचे स्वतःच समाधान करण्याची हुषारी पण आह?
दृष्टी नसल्याने टीव्ही बघता येत नाही ही खंत आहे.आम्ही तिला काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते ओरिसा असे सर्व भारतभर विमानाने फिरविले आहे.माझ्या नोकरीतील काही सवलतीमुळे तिला हे विमान प्रवास घडले. भारतभर भ्रमण करता आले. त्याचा तिला खूप अभिमान आहे.त्या सर्व भारत दर्शनाचा लेखाजोगा आजही स्मरणात आहे. योग्य वेळी त्या त्या संदर्भात आलेली माहिती भेटावयास आलेल्या आया बायांना व्यवस्थि सांगते. पाहुणे या विविध सफारींचे इत्यंभूत वर्णन ऐकून आश्चर्यचकित होतात. तिचा हेवा करतात. मुलांचे कौतुक करतात तर तिचे म्हणणे…
“ हे मुलांचे कर्तव्यच असते…त्यात मोठे काय केले?”
नातवांकडे परदेशी जाण्याची खूप इच्छा होती.आजही आहे. आता शरीर साथ देणार नाही याची खात्री पटल्याने अट्टहाहास नाही. मात्र कधीतरी ही इच्छा प्रबळ होते. आम्ही योग्य वेळी परदेशात न्यायला हवे होते ते नेले नाही हा आमचा दोष असतो!!

सर्व भारत दर्शनात माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे दर्शनाचे खूप अप्रूप आहे. ‘इंदिरा गांधी सारखी पंतप्रधान जगात झाली नाही पुढे होणार नाही’,हे तिचे मत आहे. विशेष म्हणजे एक स्त्री पंतप्रधान होते व एवढ्या मोठ्या पाकिस्तानला आस्मान दाखविते कारण बायकांना पुरुषापेक्षा जास्त समजते ही तिची पहिल्यापासून ठाम समजूत आहे!!
समाधी शेजारील थोडी माती पिशवीत भरून घेतली व घरी घेऊन आली.
जुन्या आठवणी निघाल्यास ज्यांनी कोणी उपकार केले अशा लोकांचा कृतार्थतेने उल्लेख होतो. ज्यांनी अन्याय करून दुःख दिले त्यांच्या आठवणी निघाल्यास आजही “एके फोर्टी सेवन” च्या फैरी सुरू होतात…त्यांचा व त्यांच्या सातकुळांचा उद्धार होतो…. आमचे त्या वेळेचे बोर्डी- मुंबईत राहणारे एक शेजारी आज जरी स्वर्गात असले तरी त्यांनाही या तोफांचे आवाज तेथेही नक्कीच ऐकू जात असतील ..कदाचित त्यांना पश्चातापही होत असेल ..बिच्चारे …!!
आमच्या लहानपणी आम्हाला व काकांना आमच्या या शेजाऱ्यांकडून विनाकारण त्रास दिला जाई. उद्देश एकच,आम्ही ते घर सोडून निघून जावे ,कारण ती जागा त्यांची होती असा त्यांचा दावा. खरे तर हे शेजारी मुंबईत राहत. आमचा त्यांना कोणताही त्रास नसे. मात्र ही मुंबईकर मंडळी बोर्डीत घरी आल्यावर हात पाय स्वच्छ करण्याआधीच अभद्र शब्द बोलून स्वतःची तोंडे विटाळून घेत. मुद्दामहून वाद उकरून काढीत. गुरांचा गोठा आमच्या कुडाला लागून बांधणे, तेथील मलमूत्र तसेच दिवसेंदिवस कुजत ठेवणे, शेणाचा ढीग शेजारीच करणे, विहिरीचे पाणी बंद करणे कित्येक प्रकारे त्रास दिला जाई. अशा या अमानवी शेजाऱ्यांना जाऊन भिडणारी आमची आई असे व तिला साथ आमच्या काकूची म्हणजे बायची असे.या दोघीनीच तो त्रास सहन करून मनस्ताप करून घेतला आहे. आम्ही तर लहान मुले होतो. आप्पा व दादा,(काका), जास्त बोलत नसत.कधीतरी दादांचा उद्रेक होई. ते संतापून बोलत.. आम्हाला हे काय, कशासाठी चालले आहे याचा उलगडा होत नसे? कोणीतरी आपल्या आई-वडिलांना टाकून बोलत आहे त्यांचा पदोपदी अपमान करीत आहे . आम्हा लहान मुला विषयी सुद्धा त्यांचे मनात प्रेम तर सोडा पण मनस्वी तिरस्कार आहे आहे.. एवढे जाणवत असे.वाईट वाटत असे. गरिबीची तीव्रतेने जाणीव होई.त्या दिवसांची आठवण आली की आजही खूप दुःख होते. लहान मुलांचा बालपणातील आनंद असा कुस्करून टाकणारी माणसे क्वचितच कोठे असतील? जाऊ दे ..ते दिवस गेले. ती माणसेही गेली. कटू आठवणी ठेवून गेली.. देव त्यांचे भले करो…. रम्य ते बालपण वगैरे कवी कल्पना आम्हाला कधीच कळल्या नाहीत. “मुले देवा घरची फुले ..”हे साने गुरुजींचे वाक्य वाचल्यावर डोळ्यात अश्रू तरारले होते…!!
पुढे मोठी आईच्या तोंडूनच तो इतिहास ऐकूया!!
हे सर्व असूनही आम्ही बालगोपाळ मंडळी त्या गरिबीचाही आनंद घेत होतो. अशा झोपडीतही लपाछपी आणि भेंड्या लावून खेळ खेळलो. आम्हीच नव्हे तर आप्पांकडे शिकवणीला येणारी मुलेही आमच्याबरोबर त्या अडगळीत अनेक खेळ खेळली.पावसात पाणी घरात शिरू नये म्हणून मातीचे ढिगारे घरासमोर उभे केले. ही मातीच्या ढिगार्याची “धरणे” बांधताना काय मज्जा वाटे!! शेवटपर्यंत कोणाचे धरण फुटत नाही, याची स्पर्धा लागे!वरून गळणाऱ्या पाण्याला बादलीत जमा करून कोणाच्या बादलीत जास्त पाणी जमते त्याला फुटक्या पेन्सिलीचा एक तुकडा बक्षीस मिळे!.. त्या टप टप आवाजात संगीताची मजा घेता घेता झोप लागून जाई..!.
या शतकोत्तर वयात आम्ही सर्व मुले तिची सेवा करतोच पण सुनाही काही कमी पडू देत नाहीत.. आम्हा मुलांची व सूनांची वये आज साठीसत्तरी पलीकडे गेली आहेत. त्याचा विचार न करता आई आम्ही अजून शाळेची मुलेच आहोत अशाच प्रकारे आम्हाला वागवत असते. सुना आमच्यापेक्षा जास्त सेवा करतात. पूर्वी काही वर्षापूर्वी आमच्या कोणाच्यातरी मुंबईच्या घरी येऊन ती राहत असे.आता ते शक्य होत नाही. आवडतही नाही.त्यामुळे आम्हीच आळीपाळीने आमच्या घोलवडच्या घरी जाऊन राहतो. तिला अजून जगण्याची आशा व हिंमत असली तरी आत्मविश्वास कमी झाला आहे .. घरात दोन-तीन सेवक असतात .तरी आम्ही आम्हा बंधुपेकी कोणीतरी एक जण सतत जवळ असावे लागते.अधू दृष्टीमुळे फिरण्यावर खूप मर्यादा आल्या आहेत. वयोमानाप्रमाणे शक्ती कमी झाली आहे. तरी स्मृती व कुतूहल तेवढेच आहे. सकारात्मक दृष्टिकोन .. ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’, म्हणजे काय याचे एक चालते बोलते उदाहरण आमची मोठी आई आहे …
आंबा खाल्ल्यानंतर,” फार छान जातीचा आहे.त्याचा बाठा(बी), टाकू नका. कुठेतरी वाडीत पेरून ठेवा, नक्कीच काही वर्षांनी छान आंबे खावयास मिळतील ..” एवढा जबरदस्त आशावाद 104 व्या वर्षात मोठी आईच दाखवू शकते .आजही बाथरूम, टॉयलेट ,जेवण अशी स्वतःची आवश्यक कामे स्वतः करते. हळूहळू चालत जाऊन सर्व विधी करते.. आंघोळ कोणाकडून करून घेणे आवडत नाही. . सकाळी साडेसात आठला उठून चहा घेऊन, आंघोळ करून स्वच्छ कपडे व वेणी फणी करून पावडर लावून झाल्यावर प्रथम गरम व गोड चहाचा कप . आपल्या चहाच्या कपात अधिक दोन चमचे साखर टाकण्याचा आग्रह.त्यानंतर दुधाचा अथवा दूध घालून केलेल्या कणेरीचा कप द्यावा लागतो. कधी अंडेही लागते. हा रोजचा सकाळ चा नाश्ता आहे. गुरुवार सोडून सर्व दिवस मासे चालतात. रविवारी शक्यतो चिकन अथवा मटन असल्यास आनंद द्विगुणित होतो.
तिच्याशी बोलताना किंवा कोणत्यातरी संदर्भात जुने लोक जुना काळ यांचा उल्लेख निघाल्यास, तत्कालीन लोक व एकंदर समाज व्यवस्था ही त्यावेळी किती सुंदर होती. सामाजिक मूल्ये किती उच्च होती ,आज ते सर्व कसे गुळगुळीत होत चालले आहे, याचाही ऊलेख अगत्याने होतो. त्या काळातील बहुतेक माणसे ही साधी सरळ होती. आचरण चांगले होते.प्रसंगी आपल्या ताटातील एखादी पोळी उपाशाच्या हाती देण्याची माणुसकी जागृत होती. आपल्या वाडीतील भाजीपाला न मागता दुसऱ्याच्या पिशवीत टाकण्याची पद्धत होती…अशी भलामण होत असते.
“आपल्याकडे भरपूर आहे तर ज्याला काहीच नाही त्याला थोडे दिल्यास आपले कमी होत नाही..” ही भावना होती. स्वाभिमान व फुकट खाण्याची वृत्ती कमी होती. प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करीत त्यावर मात करण्याची जिद्द लोकांमध्ये होती. गरिबीचे चटके होते मात्र त्याची पर्वा न करता , गरिबीला सतत दोष न देता, प्रामाणिकपणे लोक कष्ट करीत व दुसऱ्यालाही मदत करीत….सुख हे पैशावर अथवा श्रीमंतीवर अवलंबून नाही तर मनाच्या मोठेपणावर अवलंबून असते.. काही लोक स्वार्थी होते त्यांचा नावासकट उद्धारही होतो मात्र ज्यांनी कधीतरी मदत केली त्यांचा आदरपूर्वक आजही मान ठेवला जातो.
आम्हीही बालपणी अशी गरिबीत सुख मानणारी व कोणालाही मदत करण्यास सदैव तत्पर असणारी माणसे पाहिली आहेत. निश्चितच आजच्या काळात अशी माणसे कमी होत चालल्याचे पाहत आहोत.आमच्या बालमनावरही त्या गरीब परंतु प्रेमळ माणसांनी नकळत संस्कार केले आहेत.
वरील विचार माझे आहेत. मोठी आईच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकण्याआधी केलेली ही सुरुवात आहे. .या कुटुंबातील एक ज्येष्ठ मुलगा म्हणून माझ्या मनात, ते दिवस आठवले की आज येणारे हे विचार आहेत, असे समजा.
.. पुढच्या भागापासून प्रत्यक्ष मोठी आईच्या तोंडून निघालेले तिचे कथन..’ फ्रॉम हॉर्सेस माऊथ ..’….कथन ऐकणार आहात तेव्हा तयार रहा!!