आमची मोठी आई भाग ५

आमचे सर्वात मोठे लक्ष्मण काका ज्यांना आम्ही नाना म्हणत असू, ते दीर्घायुषी झाले. ते शिक्षक होते. एक उत्तम गणिततज्ञ होते. सबंध ठाणे जिल्ह्यात त्यांची एक आदर्श शिक्षक म्हणून ख्याती होती. पहिली पत्नी दिवंगत झाल्यानंतर त्यांनी द्वितीय पत्नीशी विवाह केला. तीच आमची नानी. भाई मामा हा त्यांचा एकुलता एक मुलगा. नाना शिक्षकी पेशामुळे सतत बोर्डी बाहेरच असत. त्यांच्यामुळेच भाईला उत्तम शिक्षण मिळाले. मलाही खूप शिकता आले नाही तरी व्यवहार ज्ञान प्राप्त झाले. शिक्षणासाठी मेहनत आवश्यक असते. मात्र मला घरकाम करून शिक्षणासाठी कष्ट घेणे जमले नाही हे खरे. आज मला त्याचा पश्चाताप होतो पण आता काय उपयोग! अक्षर ओळख झाली हेही नसे थोडके..

तिसरीपर्यंत माझे शिक्षण झाले. सुरुवातीला मला कुशामास्तर (मोठ्या घरातील कै. प्रमोद चुरी, यांचे आजोबा) शिकविण्यास होते. मुलांना ओरडायचे व प्रसंगी मारायचे. पुढे आप्पा, पा.मा.पाटील गुरुजी आमच्या वर्गावर आले. शाळेतच आम्हाला मेथी धणे यांचे वाफे करून त्यातून या भाज्या कशा वाढवाव्यात याचे शिक्षण मिळाले. जुड्या करून विकण्याचे कामही आम्ही शाळेत केले. माझ्याबरोबर शिणी आक्का(मोरु अण्णांची बहीण) सुकरी(नानूकाकूची मुलगी – पुढे अहमदाबादला लग्नानंतर गेली) चंपू (शेजारील चिंतु तात्यांची बायको), शिमी ताई( प्रभाकर-सुरेश ची आई) या माझ्या त्या वेळच्या मैत्रिणी. दुसऱ्याही खूप होत्या पण त्यांची नावे आता आठवत नाहीत. चेहरे डोळ्यासमोर येतात. आजच्या घडीला या माझ्या सर्व बाल मैत्रिणी एक एक करीत देवाघरी निघून गेल्या आहेत. माझ्यासाठी खूप खूप आठवणी ठेवून..!!
त्या दिवसात गावात रामलीला येई. धर्म शाळेत रात्रीपर्यंत प्रयोग चालत. सोनवाडीतील मंडळी बरोबर मीही रामलीला बघायला जात असे. मला राम कथा खूप आवडे, घरातील इतर कोणा मंडळींना त्यात रस नव्हता. आप्पांचीही मला परवानगी होती. रामायण नाही वाचले. पण मला रामलीला पाहून रामायणातील अनेक गोष्टी समजल्या, कळल्या. पुढे माझ्या मुलांना नातवंडांना सांगितल्या.

दिनू काका हे जात्याच हुशार होते. मेहनती होते. अभ्यासात चांगली गती होती. डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. माझ्या आजीने मोठ्या धैर्याने, कष्टाने, त्यांना सहकार्य दिले. मार्गदर्शन केले. आचार्य भिसे मास्तरांच्या सहाय्याने त्यांना उच्च शिक्षणासाठी पाठविले. मुंबईस त्यांना कै. गोविंदराव वर्तक व कै. तात्यासाहेब चुरी यांनीही मदत केली. ते डॉक्टर होऊ शकले. दिनू काका आपल्या आईचे खूप उपकार मानीत. वसंत, डॉ. रमेश, अरविंद व उज्वला ही त्यांची मुले. या भावंडांनी ही आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कष्ट करून उत्तम शिक्षण केले. आयुष्यात नाव कमावले. आज माझी ही सर्व चुलत भावंडे दिवंगत झाली आहेत. उज्वला आणि अरविंदची पत्नी प्रतिभा दोघी जणी कधी मध्ये येऊन मला भेटतात. काही दिवसापूर्वी उज्वलाचे पती श्री विवेकानंद चुरी यांचेही दुःखद निधन झाल्याचे मला कळले. वाईट तर वाटले पण मी काय करू शकते? उज्वलाशी कधीतरी बोलेन.
आमचे आप्पा, माझे वडील, खूप हरहुन्नरी होते. शिक्षण जास्त घेऊ शकले नाहीत. तरी त्यांना अनेक विषयात चांगली गती होती. शेती बागकाम सुतार काम एवढेच नव्हे तर विशेष म्हणजे त्यांना नाट्य संगीतातही खूप गती होती. एक चांगले नाट्यकलावंत होते. मोठे बंधू नाना आपल्या पेशामुळे फिरतीवर असत. धाकटा काशिनाथ लवकरच दिवंगत झालेला. दिनू लहान. त्यामुळे आपल्या आईला तिच्या जबाबदारीत मदत करण्याची त्यांना जरुरी होती. संसाराची जबाबदारी त्यांचेवर आली. नाना आर्थिक मदत करीत. तरी तेवढ्यावर भागत नसे. त्यामुळे आप्पांनाही मोलमजुरी करावी लागली. चौथी पाचवी पर्यंत शिक्षण झाले असेल तेवढेच. आप्पा मजुरी करू लागले.
अशा बिकट परिस्थितीत, दोन वेळ खायची भ्रांत असताना, आप्पांनी नाट्यकलेची आवड कशी जोपासली असेल, याचे मला आश्चर्य वाटते? गावात त्यांनी एक लहान हौशी नाटक मंडळी सुरू केली होती. सणप्रसंगाला ही मंडळी लहान लहान नाटके करीत. सारा गाव नाटक पाहण्यास येई. आम्हीही आप्पा बरोबर कौतुकाने नाटक पाहण्यात जात असू. आमचेही कौतुक होई.
गंधर्व-किर्लोस्कर यांच्या नाट्य कंपन्यामुळे तत्कालीन मराठी समाजात नाट्यसंगीत कलेची आवड निर्माण झाली होती व या कंपन्या कधीतरी आमच्या गावात येऊनही नाट्यप्रयोग करीत.
विशेषतः दत्तू मास्तर, हिराजी मामा यांनी बोर्डी गावात छोटी नाट्य संस्था स्थापन करून लहान लहान नाटके केली. गावात सिनेमागृह अजिबात नको अशी चित्रे, भिसे गुरुजींची शिकवण असल्याने लोक सिनेमा ऐवजी नाटके पाहू लागले. काही शौकीन लोक सिनेमा पाहण्यासाठी उंबरगाव ला जात असत. डहाणूला थिएटर नव्हते. मी एकदा जनुभाऊ व त्यांच्या कुटुंबाबरोबर बैलगाडीतून उंबरगावला “शेजारी” हा प्रभात कंपनीचा मराठी चित्रपट पाहिला होता. पुढे ऊमरोळीला गेल्यावर पालघरला जाऊन “संत जनाबाई” हा सिनेमा पाहिला. आप्पाना नाटक सिनेमाची आवड नव्हती. त्यामुळे मी उमरोळीत असताना माझ्या कोणा मैत्रिणीबरोबर पालघरला कधीकधी सिनेमा पहावया जात असे. सरपाड्याला तंत्या काका बैलगाडी घेऊन त्यांच्या कुटुंबासोबत मलाही पालघरला सिनेमा पहावयास कधी कधी नेई. खूप सुंदर अशा त्या आठवणी. प्रभात कंपनीचे मराठी सिनेमे पाहिले.
मला आठवते एकदा मुंबईतील एक मोठी नाटक कंपनी, किर्लोस्कर की गंधर्व मला नाव आठवत नाही, बोर्डीगावात नाट्य प्रयोग करण्यासाठी आली होती. आम्ही लहान होतो त्यामुळे आम्हाला नाटकाला नेले नसावे. आप्पांनीही त्या नाटकात त्या मोठ्या कलाकाराबरोबर छोटीशी भूमिका केली होती. ती खूप मोठी गोष्ट होती. आज आप्पांचा त्या क्षेत्रातील अधिकार मला कळतो. काही नाटके आम्ही आप्पां बरोबर पाहिली आहेत. त्या बाहेरच्या नाटक मंडळी समवेत आप्पांचा फोटो खंडूला माळावरील जुनेसामान शोधताना मिळाला होता. वडिलांची दुर्मिळ आठवण म्हणून तेवढाच एक फोटो आज आमच्याकडे आहे. दिगुने त्यातून आप्पांचा फोटो अलग करून त्याच्या काही प्रति तयार केल्या व सगळ्यांना दिल्या. वडिलांची तेवढीच आठवण आज आम्हा भावंडाकडे आहे .तोच फोटो मी मागील लेखात दिला आहे.. आमच्या पुढील पिढीसाठी, आमचे आप्पा कसे होते हे कळण्यासाठी तेवढीच आठवण!!
आप्पांना थोडे दीर्घायुष्य मिळाले असते तर… मी काय सांगू? कदाचित नाट्य क्षेत्रात ही आपले मोठे नाव करून आमच्या घराण्याला व आपल्या समाजालाही एक वेगळे वैभव त्यांनी प्राप्त करून दिले असते. ..पण.. ते होणे नव्हते. आप्पा अगदी अकाली निधन पावले. आश्चर्य या गोष्टीचे वाटते की त्यावेळी आमच्या अशिक्षित व गरीब समाजात नाट्यकलेची आवड का निर्माण झाली असेल? पुढे ती नष्ट का झाली? ती कला पुढे जोपासली गेली असती तर आमच्या समाजात काही उत्तम नाट्यकलाकार निश्चित निर्माण झाले असते. आपला वाडवळ समाज त्यावेळी जरी खूप सुशिक्षित नसला तरी नाट्यकला, चित्रकला, संगीत या बाबतीत निश्चितच पुढे होता. किर्लोस्कर नाटक मंडळी चे बोर्डीस येणे त्याचेच फलित होते. कलेची जोपासना ही शिक्षण किंवा पैशावर अवलंबून नाही तर आवडीवर व त्या समाजाच्या सांस्कृतिक जडण घडणीत वरअवलंबून असते. क्या काळातील आमचा वाढदिवस समाज भले अशिक्षित असेल गरीब असे मोलमजुरी करत असे पण तरी कलेची जोपासना करीत होता ही फार मोठी गोष्ट आहे. समाजाच्या वैचारिक व सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन त्यातून होते.

त्यामुळेच मला नाट्य सिनेमा पाहण्याची आवड निर्माण झाली असावी. मात्र लहानपणी सोडा लग्नानंतर ही मला ती हौस पुरी करता आली नाही.. चार पैसे कमाविण्याची मलाही जरुरी होती. मी उमरोळीत असताना मात्र थोड्या प्रमाणात ती हाऊस भागवून घेतली.. तो इतिहासही सांगेन.
“ आम्हा सर्व भावंडांचा जन्म दीड दोन वर्षाचे फरकाने झालेला आहे. मी गोंडू व कमळी आमचा जन्म बोर्डीच्या घरातच झाला होता. हे घर त्यावेळी आमच्या आजोबांनी बांधलेले. सध्या जेथे विहीर आहे त्या बाजूचा एक गाळा आमच्या वाट्याला आला होता. सुरुवातीला हे घर कारवीच्या कुडाचे, वर नारळाच्या झावळ्यांचे छप्पर असे बांधले गेले. पुढे त्याची दुरुस्ती होऊन ते विटांचे बांधले गेले.
माझे आप्पा आपल्या कामाच्या व्यापात व्यग्र असत. आम्ही छोटी छोटी भावंडे समवयस्क असल्याने ते संध्याकाळी घरात आले तर त्यांच्याभोवती गलका करीत असू. त्यांच्या अंगाखांद्यावर बागडत असू. ते असे क्वचितच आमच्या वाट्याला येत. त्यामुळे जेव्हा कधीतरी भेटत आम्ही त्यांना बिलगुन रहात असू. मी थोडी मोठी, त्यामुळे माझे लाड जास्तच होत. आप्पांना बिलगलेली आम्ही सर्व छोटी पिल्ले व सगळ्यांना प्रेमाने गोंजारणारे आमचे आप्पा हे चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर येते..त्यांच्या हाताचा स्पर्श आजही अंगाला जाणवतो ..त्या स्पर्शाला असलेली एक वेगळी संवेदना मला त्यावेळी वाटत होती आजही आठवते… आप्पांच्या मनाला होल कुठेतरी जाणवले असेल का…ही माझी छोटी पिल्ले मी थोड्याच दिवसात सोडून जाणार आहे अगदी कायमचा…त्यांचे काय ते लाड आताच करून घेतो.. माहित नाही?
माझ्या बालपणीची एक आठवण मला आठवते. मी आजही रोमांचित होते.त्याचे असे झाले होते की, माझ्या पाचव्या वर्षी मला खूप ताप आला होता. डॉक्टरकडे जाणे जरुरी होते. कसे नेणार, ना गाडी ना घोडा? आम्ही बोर्डीच्या घरी होतो.आप्पांनी मला एका दुलईत गुंडाळून, दोन हातानी माझे मुटकुळे उचलून, चालतच डॉ. झाईवाला यांच्या दवाखान्यात नेले. हा दवाखाना त्यावेळी मगनलालच्या पिठाच्या गिरणी मागे होता. माझा नंबर येईपर्यंत आप्पांनी मला आपल्या मांडीवर झोपवून, माझ्याकडे प्रेमाने पहात होते, मी घाबरू रडू नये म्हणून माझ्या केसावरून, गालावरून, हात फिरवीत “बेटा तू बरी होणार….” असे काहीतरी बोलत माझे लाड करीत धीर देत राहिले. मला नीट समजत नव्हते, बोलता येत नव्हते, मात्र आपले अप्पा खूप दिवसांनी मला एकटीला हातात घेऊन माझे एकटीचे लाड करीत आहेत.. मी त्यांच्या मांडीवर आहे ..ही भावना अगदी त्या कोवळ्या वयातही मला सुखावत होती. आजही त्या घटनेचा एवढ्या वर्षांनी विचार करते तेव्हा, पट्कन पाच वर्षाची पोर होऊन माझ्या आप्पांच्या कुशीत कधी शिरते ते कळतही नाही!! त्यानंतर माझ्या वाट्याला आप्पा कधीच आले नाहीत कारण ..आप्पा थोड्याच दिवसांनी या जगात राहिलेच नाहीत…”

“वयाच्या नऊव्या वर्षी, मला बोर्डीच्या शेतकी शाळेत परत पहिल्या ईयत्तेत घातले. आम्ही आप्पांच्या निधनामुळे वेवजी सोडले होते व बोर्डीत आलो होतो. त्या आधी मी गिरगाव, वेवजी (उंबरगाव जवळ) शाळेत होते. तो इतिहास पुढे येईल. त्या दिवसांत मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे काहीतरी जगावेगळे करणे अशीच समजूत होती. त्यामुळे माझे शाळेत जाणे हा कौतुकाचा विषय झाला होता. मी शाळेत जाऊ शकले याला कारण माझे काका (नाना)शिक्षक होते आणि आप्पांनाही शिक्षणाबद्दल आस्था होती. मला शाळेत जाण्यात आवड नव्हती. अभ्यास करावा वाटत नसे. खेळणे बागडणे व लहान भावंडांचे संगोपन करणे हेच मला जास्त प्रिय होते. त्याच सुमारास तुमचे आप्पा(तुमचे वडील) आमच्या शाळेत शिक्षक म्हणून आले. माझा आप्पांशी पहिला संबंध गुरूजी म्हणून आला. त्यावेळी वाटले नव्हते याच गृहस्थांशी पुढे माझे लग्न होणार आहे. पण …दैवयोग वेगळे असतात!!” या ऋणानुबंधाच्या गाठी असतात.. कशा ,कोण जुळवते कोण जाणे??
भाग सहावा पुढे……..




आपल्या आईच्या जवळच्या आणि आठवणीतील प्रत्येक व्यक्तीचे अचूक आणि मार्मिक वर्णन या लेखात आहे. एक विशेष आहे इतक्या वर्षापूर्वी सर्वां मधे शिक्षणाची आवड पदोपदी जाणवत राहत आहे. एका शिक्षित स्री मुळे संपूर्ण कुटुंब यशाच्या उच्च शिखरावर पोहोचू शकते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे तुमची ‘आई’ आहे… संपूर्ण कथन पुस्तक स्वरूपात लवकरात लवकर येवु दे…!!!
आत्तापर्यंत पाठवलेले सर्व भाग वाचले. शिक्षण जास्त नसताना देखील आणि संसारातील प्रापंचिक विवंचना असताना सर्व आप्तेष्टांची जबाबदारी जाणून मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्यांच्या भवितव्याचा पाया रचला. त्याची फळेही त्यांना आता मिळत आहे. मुले सुद्धा वयोवृद्ध असून आपल्या आईची व्यवस्थित काळजी घेत आहेत हे मोठ्या आईची मिळकत आहे. त्यांना असेच आणखी दीर्घायुष्य लाभो व तंदुरुस्त राहोत ही प्रार्थना.