आमची मोठी आई भाग ६

तुमचे आप्पा(तुमचे वडील) आमच्याच शाळेत गुरुजी म्हणून लागले आणि मला शिक्षक म्हणून शिकवू लागले. त्यावेळी हेच माझ्या जीवनाचे साथीदार होणार असे माहीत नव्हते. पण ते झाले.. कारण ऋणानुबंधाच्या गाठी!! ती हकीगत पुढे येईलच.
माझी धाकटी बहीण कमळीच्या जन्मा पासून आमच्या आप्पांना उंबरगाव जवळील वेवजी या छोट्या खेडेगावात एका पारशाच्या वाडीत मुकादम म्हणून नोकरी मिळाली होती. आजही ते वेवजी गाव पूर्वी जसे होते तसेच हिरव्यागार वनश्रीने व लहान लहान टेकड्यांनी वेढलेले सुंदर गाव आहे. माझी मुले व अनेक नातेवाईक त्या रस्त्यानेच उंबरगावला कधी कधी जातात. त्यांच्याकडून मला त्या गावाची आजही माहिती मिळते. मला आठवते फ्रामरोज हे आमच्या दयाळू पारशी मालकाचे नाव होते. सुमारे दहा ते बारा एकर शेतीत मुख्य पीक ऊस होते व बाकी इतरही फळ- फळावळ लागवड होती. वाडीत काही गाई,म्हशी ही पाळल्या होत्या. दूध दुभत्याचा धंदा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करीत असे. त्यामुळे उसापासून रस काढणे, रसापासून गूळ तयार करणे, त्याच्या ढेपी बांधून बाजारात पाठविणे, दुधापासून लोणी तूप काढून मुंबईच्या बाजारात विकणे आणि रोजचा शेतीतील माल, भाज्या फळे इत्यादी स्थानिक बाजारात विक्री करणे अशी कामे आप्पांना करावी लागत. रोजचा हिशोब व पैशाचा जमा खर्चही त्यांनाच लिहून ठेवावा लागे..कामाचा मोठा व्याप एकटे आप्पाच सांभाळीत. आप्पा आपले काम खूप प्रामाणिकपणे व मेहनतीने करीत. त्यामुळे पारशी मालकाची आप्पांवर खूप मर्जी होती. आम्हाला राहावयास एक छोटे टुमदार घर वाडीच्या मध्यभागी होते. त्या घरात त्यावेळी मी, गोंडू, कमळी, मुका व आप्पा-आक्का असे सहा जणांचे गोकुळ मोठ्या आनंदात नांदत होते. घरात दुध दुभते, भाजीपाला फळे भरपूर उपलब्ध असे. कधी कधी आप्पांं बरोबर जाऊन उसाचा ताजा रस प्यावयास मिळे. पारशी मालक आठवड्या पंधरा दिवसातून वाडीला भेट देई. आमच्यासाठी बिस्किटे चॉकलेट घेऊन येई. आमची चंगळ चालली होती.

मला आठवते आप्पांना(माझे वडील) त्यावेळी, 1930 साली, वीस रुपये महिना पगार होता. त्या काळच्या स्वस्ताईच्या मनाने चांगला पगार होता. त्या दिवसात एक आण्याला (रुपयाचा सोळावा भाग), दोन पायली (दोन किलो) तांदूळ मिळत असे. तेवढ्या पगारातही आमचे कुटुंब खाऊन पिऊन आनंदात राहत होतो अर्थात आमच्या गरजाही खूप मर्यादित होत्या. कधीही उंबरगाव गावात नाटक सिनेमा अथवा खरेदीसाठी गेल्याचे आठवत नाही. ऊसाच्या रसापासून गुळ करताना त्यावरील तवंग, म्हणजे काकवी पिणे, हंगामात चिकू, आंबे, जांबु यांचा रतीब, गाई म्हशी व्याल्यास खरवसाच्या मलईदार वड्या खाणे.. घरच्या कोंबड्यांची अंडी व गावठी कोंबड्याचे चवदार मटन खावयास मिळे. सर्वच आनंद होता… अन्न धान्याने, वस्तूंनी घर भरलेले होते… मात्र दिवा मालवण्याआधी जसा प्रकाशमान होतो ना, तसेच हे चित्र होते. हे आज कळते… काळपुरुषाच्या चाली तेव्हा कळल्या नाहीत.. भविष्यातील कठोर परीक्षेची जाणीव तेव्हा झाली नाही..!!

वेवजीच्या त्या दिवसात, गिरगाव(उंबरगाव-गिरगाव) या जवळच्याच गावातील शाळेत भिमाजी गुरुजी (कै. भिमाजी भास्कर चुरी गुरुजी) शिक्षक म्हणून आले होते. आप्पांशी ओळख असल्यामुळे आमच्या घरी अधूनमधून येत. त्यांच्याच सूचनेवरून आप्पांनी मला व गोंडूला गिरगावच्या शाळेत घातले. शाळेत दाखल होणे म्हणजे घरी धिंगाणा घालतात म्हणून सुटका करून घेणे असा प्रकार होता. कमळी लहान होती व पहिल्यापासूनच ती स्वभावाने शांतही होती. त्यामुळे तिचा उपद्रव नव्हता. शाळेत काही शिकण्यापेक्षा गुरुजींना रोज बाटली भरून उसाचा ताजा रस पोहोचविणे व त्यांची शाबासकी घेणे यातच आम्हाला जास्त आनंद मिळे! पुढे भिमाजी गुरुजींचीही तेथून बदली झाली. आम्हालाही पुढे बोर्डीच्या शाळेत रितसर दाखल केले, हे मी मागे सांगितले आहे. थोड्याच अवधीत बोर्डीचे गारू तात्या (दत्तू , सुरेश यांचे वडील दामोदर पाटील) आमच्या वाडीत दाखल झाले. त्यांच्याकडे डेअरी विभाग सोपविला गेला. आप्पांचा भार थोडा कमी झाला. त्यांना आमच्यासाठी थोडा अधिक वेळ मिळू लागला. कामाच्या अतिरेकामुळे निश्चितच आप्पांच्या प्रकृतीवर ताण पडत होता मात्र त्यांनी त्याची परवा केली नाही.
वेवजी वाडीतच हिरू व खंडू या माझ्या सर्वात लहान बहिण भावंडांचा जन्म झाला. सर्व काही मजेत चालले होते. सुंदर गाव,छान वाडी त्यात एक टुमदार घर, सहा भावंडे प्रेमळ आई बाबा आणि सबंध हिरवागार फुलाफळांनी भरलेला परिसर! सुखी जीवनाला आणि काय हवे? पण निर्घृण काळाला हे पसंत नव्हते …त्याला हा सुखी परिवार पहावला नाही. ..अचानक एके दिवशी काळाचा निर्घृण घाव आमच्या कुटुंबावर पडला.. नियतीची नियत बदलली!
संध्याकाळी वाडीतून आल्यावर आप्पांना थोडे अस्वस्थ वाटू लागले. तापही आला. खोकला सुरू झाला. गिरगावात त्याकाळी कोणी चांगले डॉक्टर नव्हते. दोन दिवस वाट बघून प्रकृतीस उतार पडेना म्हणून भिमाजी गुरुजींनी एका बैलगाडीतून त्यांना बोर्डीला आणले. डॉ. दारूवालांची औषध योजना सुरू झाली. पण येथेही औषधाला गुण येईना. त्यांच्या सूचनेवरून डहाणूच्या इस्पितळात आप्पांना नेले. हाय रे नशिबा…तेथेही डॉक्टरांना आमच्या आप्पांना वाचविण्यात यश आले नाही.. सात-आठ दिवसांतच आप्पांचा मृत्यू झाला..जीवनप्रवास थांबला..सर्व खेळ समाप्त झाला!! आमच्या सुखी कुटुंबावर वज्राघात झाला. मध्यांनीच सूर्यास्त झाला. आमच्या साठी सर्वत्र अंधार, निराशेचा काळोख पसरला… फक्त काही दिवसात होत्याचे सर्व नव्हते झाले.. अस्मानी सुलतानी झाली …!!..
आजारी आप्पा बरोबर आम्ही सर्वच बोर्डीच्या घरी आलो होतो. आता आप्पा तर गेले, परत वेवजी च्या वाडीत कशाला जायचे? छोटा खंडू काही महिन्याचा आणि हिरू दीड एक वर्षाची. आम्ही सर्व बोर्डीतील आमच्या झोपडीवजा घरात राहावयास आलो. नियतीचा खेळ किती अद्भुत आहे बघा.. कालपर्यंत आनंदाने भरलेले एक घर आठ दिवसात उजाड झाले…
ज्या दिवशी आप्पा गेले त्या दिवशी आपल्यावर काय प्रसंग कोसळला आहे हे समजण्याचे आम्हा भावंडांचे वय नव्हते. मी व गोंडू मैत्रिणीकडे खेळावयास गेलो होतो. समोरून एक प्रेतयात्रा जाताना दिसली. आम्ही गंमत म्हणून बालसुलभ कुतूहलाने की प्रेतयात्रा मैत्रिणीबरोबर पाहत होतो. आमच्या मैत्रिणीची आई म्हणाली, “पोरींनो, ही प्रेतयात्रा तुमच्या बाबांची आहे. नमस्कार करा.”
“आमच्या आप्पांच्या प्रेतयात्रेला आम्ही निर्विकार मनाने नमस्कार केला…”
आम्ही अगदी निर्विकारपणे सहज नमस्कार केला. आमच्या निरागस मनाला प्रेतयात्रा म्हणजे काय.. आमच्याच बाबांची प्रेतयात्रा कशासाठी काढली , नमस्कार कशासाठी करायचा काहीही कळत नव्हते.. खरे तर आमच्या बालपणीच्या सर्व सुख शांतीची व आनंदाचीच ती होळी होती..आमच्या कुटुंबाच्या सौख्याची ती अंतिम यात्रा होती…पण ते समजण्याचे आमचे वय कुठे होते? आज त्या दिवसाची आठवण झाली की मन सुन्न होते. आमच्या वडिलांचे अंतिम दर्शन तरी आम्हाला कोणी नीटपणे का करू दिले नाही, याचे मनस्वी दुःख होते. माझ्या दुसऱ्या लहान भावंडांना नाही, मात्र आम्हा दोघींना तरी आप्पांचे शेवटचे मुखावलोकन केल्याची आठवण आयुष्यात एक समाधान देऊन गेली असती.. जन्मदात्या पित्याचे अंतिम दर्शन ही न मिळण्याएवढी आमच्या दुर्दैवाची परिसीमा झाली होती. मी ते दुःख कधीच विसरू शकत नाही!!. घरात असूनही आपल्या पित्याचे अंतिम दर्शन मिळण्याचे भाग्य न लाभलेली जगात अशी खूप कमी दुर्दैवी बालके असतील. आम्ही त्यातील आहोत.. !
आक्का तर कोसळलीच होती. कुठे जाणार, कोण आश्रय देणार? देवालाच कुठेतरी तिची दया ही आली असावी. आक्काच्या भावाने म्हणजे आमच्या मामाने आम्हाला आश्रय दिला. त्यांची वाडी बोर्डी गावाबाहेर होती. मोठे घर व जमीन ही भरपूर होती. आम्ही सगळे तेथे राहावयास गेलो. मामा प्रेमळ होते. आम्हा सर्व भावंडावर प्रेम करीत. आपल्या बहिणीच्या निराधार लेकरांची त्यांना खूप आस्था होती. धाकट्या बहिणीच्या संसाराची झालेली ती दूर्दशा त्यांना बघवत नसे. आप्पांचे व आमच्या मामाचे खूप मैत्रीपूर्वक संबंध होते. एक चांगला मार्गदर्शक मित्र अचानक गेला याचे त्यांनाही खूप दुःख झाले होते. आमचे आजोबा-आजी (आक्काचे आई-वडील), मामांकडेच होते. वृद्ध होते. त्यांना आपल्या कर्तबगार जावयाचा अकाली मृत्यू मोठा धक्का सहन झाला नाही. आजोबांनी ही लवकरच जगाचा निरोप घेतला. आजी प्रेमळ होती. आम्हावर खूप माया करी. पण तिचे आपल्या सुने समोर म्हणजे आमच्या मामी समोर काही चालत नसे. मामी व्यवहारी होती. आपल्या संसारात ही लुडबुड तिला पटत नव्हती. आमच्यामुळे तिच्या मुलांवर अन्याय होतो असे तिला वाटे. ते सहाजिकही होते .कारण तिलाही पाच अपत्ये होती. ती आमच्याच वयाची असल्याने मामा चे स्वतःच्या मुलांकडे थोडे दुर्लक्ष होणे साहजिक होते. मामी आक्काला हाणून पाडून बोले. पदोपदी अपमान करी. आक्का खूप सहनशील होती. ती काहीच बोलत नसे. तिला आपल्या भावाच्या मदतीची अल्पकाळ तरी आवश्यकता होती. तिने ते सर्व अपमान मूकपणे सहन केले. कधीच उलट उत्तरे दिली नाहीत. खूप समजूतदारपणा दाखवला.आकाने त्यावेळी दाखवलेली सहनशीलताच आम्हाला मदतरूप ठरली आम्ही मामीचा जाच सहन करून मामाकडे राहू शकलो. तेथून बाहेर निघालो असतो तर रस्त्यावरच राहण्याची पाळी होती. आक्काचा संयम आणि तिची सहनशीलता याचा आम्हाला फायदाच झाला.आम्हाला आधार मिळाला होता !

त्या दिवसातील एक प्रसंग आठवतो जेवणाची वेळ झाली होती. आम्हा मुलांना ताटे वाढली होती. दोन रांगा होत्या. एका रांगेत भात भाजीने भरलेली पाने. तर दुसऱ्या रांगेत अर्धवट अधुरी पाने वाढली होती. भुकेने व्याकुळ असल्याने आम्ही धावत धावत जेवणासाठी आलो. भरलेली ताटे दिसली त्या रांगेत बसलो. नंतर आलेली मामाची मुले अर्थातच दुसऱ्या समोरील रांगेत, अपुऱ्या जेवणाच्या पानावर बसली. मामी उभी राहून हे पाहत होती. आमच्याकडे पाहत ओरडली “तिथून उठा. तुमची ताटे समोरची आहेत तेथे बसा”
आम्हाला प्रथम काही कळेना. तेवढ्यात आमची आक्काच तेथे आली. आम्हाला आमच्या पानावरून उठवून मामाच्या मुलांना तेथे बसविले. आम्ही समोर बसलो आमच्या पानातील घास तोंडाचा टाकत होतो मात्र नजर समोरच्या ताटावर होती, कशीबशी वाढलेले चार घास पोटात कोंबून उठलो. त्या दिवसापासून आम्ही मामीला विचारून पाटावर बसत असू. समोरच्या ताटांकडे पाहत नसू. जे ताटात असेल तेवढे गुपचूप खाऊन उठत असू. भूक अपुरी राही. पण कोणाला सांगणार? पोटाची भूक आणि मनाची तडफड. पण कोणाकडे तक्रार करीत नसू. गरिबी सर्व काही सहन करायला शिकवत होती!
त्या दिवशीचे आक्काच्या डोळ्यातील पाणी आणि मामीच्या आवाजातील जरब आम्हाला खूप काही सांगून गेले. दुसऱ्याच्या दारी फुकटचे जेवणारानी स्वाभिमान विसरायचा असतो. माझ्या आयुष्यात पुढेही खूप बिकट प्रसंग आले. मी उपाशी राहिले पण कोणाकडे हात पसरले नाहीत. कोणालाही भरल्या ताटावरून उठविले नाही. गरीबी असे मौल्यवान धडे देते!
पुढे भाग सातवा..



