आमची मोठी आई भाग ७

   सकाळी उठल्यावर प्रथम वेणीफणी झालीच पाहिजे.

     मोठीआईचे आत्मकथन पुढे सुरु …

दुर्दैवाचे फेरे अजून संपले नव्हते. त्याचं सुमारास आमची मावशी म्हणजे आक्काची लहान बहिण भिमी, हिच्या संसारात विघ्न आले. तिलाही तिच्या सासरच्या लोकांनी त्रास देणे सुरू केले. लग्न होऊन काही दिवस झाले नाहीत तोच ती सासर व नवरा सोडून मामाकडे आली. ती तरी कुठे जाणार? सासरच्या माणसांनी त्याग केल्यावर आपल्या आई-बाबांच्या व भावाच्या आश्रयालाच आली. आता मामीलाही ते असह्य होऊ लागले. कारण तिच्या स्वतःच्या संसारात हे फुकटचे लोढणे तिला नको होते. ते नैसर्गिक देखील आहे. कोणतीही स्त्री आपल्या संसारात इतर कोणाचा शिरकाव झाल्यास नाराज होणार यात विशेष काही नाही. मामा-मामीचे  खटके उडू लागले. आम्ही लहान होतो. प्रसंगाचे गांभीर्य समजण्याचे वय नव्हते. आजोबा तर गेले होते. आजीलाही “तोंड दाबून बुक्क्याचा मार”, अशी परिस्थिती होती. वेदना होत होत्या… दोन्ही मुलींचा संसार असा उद्ध्वस्त झालेला व तो ही एकाच वेळी… नियती तिच्यावरही उतार वयात विचित्र सूड उगवत होती…अजून आमच्या आजीला व अक्काला भविष्यात  काय पाहावे लागणार होते? देवचं जाणे! इतर मित्र मैत्रिणींची मजा पाहून, आमच्या नशिबी असे का, हा विचार कुठेतरी येई पण तेवढ्या पुरता! कसोटीच्या दिवसांची जाणीव आम्हाला निश्चित झाली होती.

    बहिणी बहिणी, आयुष्यभर सोबतीणी!

     भिमी मावशी मोठ्या धीराची व धैर्याची बाई होती. मामाकडील एकूण सर्व परिस्थिती व वातावरण पाहून तिलाही स्वतः तेथे राहणे व आम्हाला त्या परिस्थितीत ठेवणे  योग्य वाटले नाही. तिने निर्णय घेतला. मामा,आजी,(तिची आई) आक्का यांना विश्वासात घेऊन, कोणताही कडूपणा न घेता आम्हा सर्व पाहुण्यांचा गोतावळा एके दिवशी मामाचे घर सोडून बोर्डीच्या झोपडीत दाखल झाला. मावशी पुढेही काही दिवस मामाच्या घरी आपल्या आईबरोबर राहिली. आम्ही आक्का बरोबर बोर्डीस आलो.

   आजीच्या आग्रहावरून मावशी तेथे थांबली. आजीलाही समाधान झाले. मावशी मामाच्या संसारात हातभार लावीत होती. मामाच्या शेती बागायती उद्योगात स्वतः कष्टकरी. शेतीमाल भाजीपाला  विक्रीसाठी बाजारात घेऊन जाई. आलेला पैसा मामा मामीच्या हातात सुपूर्त करी. मात्र तेथेही तिच्यावर खोटे आळ घेणे सुरू झाले संपूर्ण पैसे देत नाही असा संशय घेतला गेला.

  “ती थोडे पैसे स्वतः जवळ ठेवते…संपूर्ण हिशोब देत नाही”, असा तिच्यावर आरोप होऊ लागला.. मामाही बायको समोर हतबल झाला होता. मावशी स्वाभिमानी होती. तिला काम करून स्वाभिमानाने राहावयाचे होते. मात्र ते शक्य होतं नव्हते. तिनेही एके दिवशी भावाचे घर सोडले. सासर संपलेच होते. आता माहेरही दुरावले… संकटे अशी सर्व बाजूंनी येतात! तिला आसरा आता आमच्या घराचा होता.

   भावाकडील वास्तव्यात एक फायदा झाला होता, मावशीने शेतीमालाच्या बाजाराची, खरेदी विक्रीची चांगली माहिती करून घेतली होती. हा अनुभव तिला पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडला. आपल्या आईचे आशीर्वाद व भावाच्या शुभेच्छा घेऊन तीही आमच्या बोर्डाच्या घरी दाखल झाली. तिच्या व आम्हा सर्वांच्याच जीवनात एक नवा कालखंड सुरू झाला. आम्हा सर्वांच्या आयुष्याला एक नवे वळण, सकारात्मक दिशा व आत्मविश्वासाचा मार्ग दिसू लागला..!

   आक्का व मावशी यांनी भाजीपाला फळफळावर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरविले. बोर्डी गावातील आमचे सधन बागायतदार नातेवाईक  व इतरही मोठ्या शेतकऱ्यांकडून  त्यांच्या बागेतील भाज्या फळे विकत घेऊन ती बाजारात विक्री करण्याचे त्यांनी ठरविले होते.मावशीने बोर्डीतील जैन होस्टेल, शारदाश्रम, पारशी हॉस्टेल, मुस्लिम हॉस्टेल अशा मोठ्या  गिर्‍हाईकांना त्यांची रोजची भाजी फळ फळावर इत्यादी पुरवठा करण्याचे काम सुरू केले. . आक्काला उंबरगावच्या बाजारात किरकोळीने भाजी विकण्याचे काम दिले. ही बागायतदार मंडळी आमच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अक्का मावशीला उधारीने माल देत व नंतर पैसे घेत. खूप कष्टाचे काम होते पण त्याच्याशिवाय इलाजही नव्हता. मात्र सन्मानाने जगण्यासाठी अक्का मावशीने हे काम पत्करले व अखेर पर्यंत ते सोडले नाही.

  डोंगर रांगा व सुरु बागेच्या सानिध्यात बोर्डी चा सुंदर दंतुर समुद्रकिनारा.. पहाटे अगदी निर्जन.

     आक्काची सत्वपरीक्षा सुरू झाली होती. बोर्डी तील भाज्या फळे विशेषतः चिकू खरेदी करून रात्री त्यांची वर्गवारी करून भरलेल्या टोपलीचा हारा रोज सकाळी समुद्र मार्गे बोर्डी ते उंबरगाव असे सुमारे पाच-सहा किलोमीटरचे अंतर चालावे लागे. तेवढेच अंतर पुन्हा दुपारी बाराचे सुमारास विक्री झाल्यानंतर उंबरगाव ते बोर्डी चालत यावे लागे.दुपारी घरी आल्यानंतरही तिला विश्रांती नसे. कारण आम्हा सर्वांसाठी जेवण बनविण्याचे काम तिचेच असे. मावशी त्यात सुमारास बोर्डी घोलवड मधील बाजार विक्री करून परत येई. तिला घरी आल्याबरोबर पाटावर बसून जेवणाचे ताट हवे असे. मी जमेल तेवढे काम करून ठेवी. आमच्याही समस्या असत त्या आम्ही आकासमोरच मांडीत असू . त्याचेही निराकरण आक्कालाच करावे लागे. आम्हा दोघींच्या शाळा,कोणाचे आजारपण व घरांतीलसर्व आर्थिक व्यवहार आकालाच बघावे लागत. आक्काने त्या काळात खूप कामे केली. तरीही नेहमी शांत व हसतमुख राहिली. आजही त्या दिवसांचा विचार केला की माझ्या या अशिक्षित, विधवा ,निराधार आईने  सर्व कामांचे संतुलन राखताना किती कष्ट केले असतील व संयम दाखविला असेल याची कल्पना करवत नाही. मला आक्काची ही धावपळ कुठेतरी जाणवे . आपल्या आईला आपण जमेल तेवढा दिलासा दिला पाहिजे असे मनापासून वाटे.  मी माझ्या वयाच्या मानाने अकाली प्रौढ होऊन आकाला जमेल तेवढे सहाय्य  शाळा सांभाळून करी. गोंडूही समजदारपणे मला मला मनापासून मदत करी. आठ दहा वर्षाच्या आम्ही दोघी बहिणी कितीशा मदत रूप होत असू माहित नाही ?पण एक समाधान मिळत होते.

   समुद्राला ओहोटी असे किनाऱ्यावरून चालणे सोपे होई.  भरती असताना गुडघाभर पाण्यातून चालत जावे लागे.  डोक्यावर भाजीचा हारा,मोठे अंतर ,अंधार व निर्मनुष्य समुद्र किनारा…कधी कोणी साथीला नसले तर अक्का एकटीच ऊंबरगाव पर्यंत चालत जाई…आज त्या प्रवासाची आठवण केली की आकाला एवढे धैर्य कुठून आले असावे याची कल्पनाही येत नाही?

   बोर्डीतील अनेक महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय पोटा-पाण्यासाठी त्यावेळी करीत असत. मात्र उंबरगावला काही ठराविकच बाया जात असत. ते खूप कष्टाचे काम होते 

   ज्या वेवजी गावामध्ये एकेकाळी ऐश्वर्य भोगले,, त्याच  गावातून हमालीचे हारे डोक्यावर वाहून नेण्याचे कामआकाच्या नशीबी आले. ..मोत्ये वेचली तेथे आता गारा वेचाव्या लागत होत्या !!ह्यालाच काल महिमा म्हणत असावेत!! 

     त्या दिवसात  भाजीपाला विकून मिळणारे रोजचे पंधरा-वीस रुपयाचे उत्पन्नही आमचा कुटुंब खर्च भागविण्यास पुरेसे होते. आमचा ऊदरनिर्वाह चालू होता.  शिक्षण चालू होते. मी गोंडू व कमळी जरी छोट्या होतो तरी आम्हाला परिस्थितीची जाणीव आली होती. घरात चिकू पेरू केळ्यांनी भरलेली टोपली असत. पोटात कावळे ओरडत असत. दोन फळे घेऊन खायची इच्छा होई. पण त्या बालवयात आम्ही आमच्या  इच्छा मनातच ठेवत असू.परिस्थितीने हे आम्हाला शिकविले होते. 

  “ही फळे विकण्यासाठी आहेत, खाण्यासाठी नाहीत.. विकली गेली नाहीत तर आम्हाला जेवणही मिळणार नाही..”, ही जाणीव  मनात असे. छोटा  मुका मात्र हट्टी होता. तो खाण्यासाठी हट्ट करी. आम्ही गुपचूप त्याला ते खाऊ देत असू. त्याच्या या शारीरिक व्यंगामुळे सर्वांनाच त्याचे बद्दल कणव असे. आम्ही सर्वजण त्याचे वाजवी व अवाजवी हट्टपूर्वीत असू ,त्याला व अक्काला दुःख होऊ नये म्हणून? पुस्तकी उपदेशापेक्षा गरिबीने शिकविलेले संस्कार किती खोल व चिरकाल टिकणारे असतात याची आज जाणीव होते. बालपणीचे ते ज्ञान आयुष्यभर कामी आले.  गरिबी हे वरदानही आहे!!

   मोठी विचित्र परिस्थिती होती ती !या छोट्यां भावंडांचा सांभाळ करणे व घरातील  कामकाजात आक्काला मदत  करणे, हे सुरुवातीला मी व गोंडू करीत असू. मग शाळेत जायला वेळ कुठून मिळणार..? शाळेची गोडी लागली नाही तर शाळेत जाण्याचा प्रश्न कुठे येतो?

  आम्ही तिघी बहिणी. (डावीकडून). हिरू ,मोठी आई, कमळी मावशी.

   आक्काने संसाराचा एक चाकी गाडा मोठ्या जिद्दीने पुढे चालविला होता. दोन एक वर्षे अशीच परिस्थिती राहिली. आम्हा सर्वांना कसेबसे दोन वेळ जेवण  मिळत होते.  आकाला मुक्या मामाचा,(अनंता) प्रश्न नेहमी सतावित असे.आमचे आप्पा असताना त्याला मूकबधिर शाळेत दाखल करावयाचे ठरले होते. त्यासाठी आप्पांनी आपल्या पारशी मालकाशी बोलणे करून मुंबईतील एक मूकबधिरांची शिक्षण संस्था ही हेरून ठेवली होती. मुक्याला पाच वर्षानंतर मुंबईत नेण्याचा पारशी  मालकाचा इरादा होता. पण त्याआधीच आप्पा गेले. आप्पांच्या जाण्याने मुक्याच्या आयुष्यातील  उत्तम संधी कायमची गेली. त्याच्या आयुष्याचे पोतेरे झाले. तो आयुष्यभर ‘मुक्याने’ जगला! शेवटी ‘मुक्याने’च मेला!!

   कै. गोंडू मावशी( सुनंदा नारायण राऊत) व मुका मामा(कै अनंता देवजी चुरी)

     आता कमळी आणि हिरु ही शाळेत जाऊ लागल्या होत्या. मी आणि गोंडू देखील पुन्हा बोर्डीच्या शेतकी  शाळेत जाऊ लागलो होतो. त्या दिवसांत शाळेच्या एकाच खोलीत सर्व वर्गांची मुले बसत. एकच शिक्षक सर्व मुलांना वेगवेगळा अभ्यास शिकवत. मोठे गमतीदार वर्ग असत ते! गंमत म्हणजे याच वेळी कधीतरी आप्पा आमच्या  बोर्डी शाळेत शिक्षक म्हणून आले.  पुढे काय झाले ते मागे सांगितले आहेच!!

  माझे शाळेत जाणे नियमित नव्हते. शाळेत जावेसे वाटत नव्हते, तर नियमितता कशी राहणार? पुढे तिसऱ्या इयत्तेतच मी शाळा सोडूनच दिली. आता पुढे काय?

  पुढे सुरू भाग आठवा.