“मोठी आई” ला श्रद्धांजली…

 “ देवघरातील ही मंद वात आता दोघांच्या आई वडिलांच्या स्मृतींची आठवण देत राहील…आशीर्वादांची पाखरंण करीत राहिल….”

मोठी आईच्या निधनाचे वृत्त देशा परदेशातील आमच्या अनेक नातेवाईक व मित्रांना कळले. त्यांनी पाठवलेल्या प्रतिक्रियापैकी काही प्रतिक्रिया थोडक्यात देत आहे.

  मोठी आईची लाडकी नात दीप्ती चौधरी (अमेरिका) हिची प्रतिक्रिया खूपच हृदयस्पर्शी व विस्तृत असून सारांश रूपात देत आहे..

दीप्ती चौधरी, नात,अमेरीका.

      …आशु दादा आणि प्रीती खूप सारे फोटो शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा दिवस मी खरंच खूप मिस करत होते. तुम्हा सर्वांना बघून खूप बरे वाटले. सर्व भावंडांचा फोटो आणि गजबजलेले घर बघून मला आपल्या बालपणीच्या आठवणी आल्या. आपल्या बालपणीच्या आठवणी म्हणजे सर्वात आनंददायी दिवसांची साठवण आहे. अजूनही डोळे मिटून ते दिवस आठवतात तेव्हा आतून खूप आनंदी वाटते. आणि मग मनापासून वाटते की…

एक दिवस असाही यावा की उबदार माळ्यावरती सकाळी डोळे उघडावे आजूबाजूला रांगेने झोपलेले तुम्ही सर्वजण असावे अंगणातून खराखरा खराट्याने झाडणार्‍या मोठ्यांआई चा आवाज यावा… अंघोळ्या नंतर करा आधी धुवायचे कपडे टाकीवर ठेवा!

एक दिवस असाही यावा आंघोळीसाठी नंबर लागावे, अंघोळीनंतर केळीच्या पानावर गरम गरम आई आणि अण्णी ने केलेला मसालेभात आणि चहा बरोबर काकाने बेकरीतून आणलेले बटर हाच नाष्टा असावा. त्यानंतर फक्त आगाथा क्रिस्थी चे पुस्तक वाचावे की दिवाळी अंक वाचावा इतकाच प्रश्न पडावा!

एक दिवस असाही यावा सकाळच्या कोवळ्या उन्हात रस्त्यावरती आपली माकड सेना असावी हर्षुताईने पुन्हा एकदा म्हणावे “चला, आता आपलं दुकान लावून झालं आपण आता जाहिरात करायला बाहेर पडू!”आणि आम्ही बेभान होऊन “लेलो भाई चिवडा लेलो, गरम मसालेदार चिवडा लेलो” असं गात रस्त्यावर नाचत सुटावं! लपून बसलेल्या दादा आणि आशुदादाने आम्हाला वेंगाडून मांगेलआळीत धूम ठोकावी! त्यांना पकडता न आल्यावर कंटाळून आम्ही सरळ आजीचा वाडा गाठावा आणि चिंचा खायला सुरुवात करावी!

एक दिवस असाही असावा तो दिवाळीचा असावा. मोठेआई ने करून ठेवलेल्या मोठ्या ओटल्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत रांगोळी काढत मी आणि स्वातीने रमून जावे! शेण शोधत गावभर फिरावे! 

एक दिवस असाही यावा ताडी घेण्यासाठी सगळ्यांनी मिळून जावे! दोन घोट ताडी पिल्यानंतर सुस्तावलेल्या अख्ख्या घराने हास्य विनोदात रमून जावे! संध्याकाळी काकीच्या खमंग बटाटे वड्यांचा बेत असावा. 

एक दिवस असाही यावा  जेवणासाठी पेले आणि पाटावरनं मारामारी व्हावी पण भरपूर कालवण भात खाऊन सगळ्यांच्या डोळ्यावरती झोप यावी. आमची लुडबुड पारशिणीच्या ओट्यावर जावी. अख्खा दुपार संध्याकाळच्या नाटकाची रंगीत तालीम व्हावी. आथरी घेऊन सरळ कस्टम गाठावे, आंब्याच्या झाडाच्या आडव्या फांदीवर विमानाचा खेळ खेळावा, वडाच्या पारंब्यांना टिंगून वरती चढण्याची शर्यत बाबांनी लावावी , थकून नंतर त्या मंद वाऱ्यात तिथेच झोपी जावे! 

एक दिवस असाही यावा संध्याकाळी समुद्रावर जायची लगबग सुरू होताच पेंगुळलेला टिप्या कान उंचावून सज्ज व्हावा. खाडीपर्यंत सैर करावी, वाळूमध्ये चिमण्यांची घरे बांधावी, रेल्वे गेस्ट हाउसचा दरवाजा चुकून उघडा असावा आणि झुल्यावरती खूप खूप उंच झोका घ्यावा. धक्क्यावरून खरचटेपर्यंत घसरगुंडी करावी. बदाम कवडी मिळवण्यासाठी धुंडोळा घ्यावा. नखशिखांत वाळूत माखून अंधारात परतीला निघावे, भरल्या गावात प्रत्येक घराच्या वईतून आत शिरून टिपूने त्यांच्या कुत्र्याला ठोकावे.

एक दिवस असाही यावा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सर्वांनी ओळीने बसून प्रार्थना म्हणावी. त्यात कधीतरी आप्पांचे आर्त, धीर गंभीर प्रार्थनेचे सूरही मिळावे. नंतर सर्व मोठ्यांच्या पाया पडण्याचा कार्यक्रम व्हावा. 

एक दिवस असाही यावा.. “हाssरे ..”करत राजा काका यावा. चला तुमची इंग्लिश ची परीक्षा घेतो असं म्हटल्यानंतर दादा आणि आशुदादाने पळ काढावा! चकचकीत नवी कोरी सायकल घेऊन मुका मामा यावा आणि त्याच्या सायकलची घंटी एकदा तरी वाजवता यावी म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करावा! नीलम आत्याला भेटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरच्या तिच्या प्राथमिक शाळेतील वर्गामध्ये  धाव घ्यावी.

एक दिवस असाही यावा रात्रीच्या वेळी अंगणात बसून ओटीवर ‘मालकाने सांगितले काय..?’ या “जगप्रसिद्ध” नाटकाचा प्रयोग रंगावा! नाटकातच नाटक व्हावं. पण तरी देखील प्रयोग फक्कड रंगावा! आशु दादा च्या आवाजात पुन्हा. “ चत गुड गुड गुड ..”सांगावे”, छोटीने पुन्हा ‘शांती गो रुपयाला बोंबील पंधरा’ गावे, क्षितीने तिचे आवडते ‘बदका बदका नाच रे’ म्हणावे, आणि शेवटी अदितीने  “आती क्या खंडाला ‘हे गाणे  मी म्हणणार आहे आणि हे मला माझ्या आईने शिकवले आहे”.. असे जाहीर करावे!

एक दिवस असाही यावा भातामध्ये रॉकेल पडून चिंच कढी च्या भांड्याने पण उताणे व्हावे! मोठे आईला घाबरलेल्या आत्या आणि तिच्या पुत्यांनी सिक्रेट मिशन चालवावे. सगळे कांड लक्षात येऊनही मोठेआईने त्यावर दुर्लक्ष करावे, कारण त्यात तिच्या  लाडक्या नातींचा सहभाग होता!

एक दिवस असाही यावा छोट्याशा बाळाला दुपट्यात गुंडाळून आम्ही सर्व बहिणींनी कोंडाळे करून बसावे. गडबड करणाऱ्या आम्हाला हर्षुताई ने त्या क्षणाचा महत्त्व समजावून सांगावं,

   “बघा ही छोटी मोठी होईल ना तेव्हा आपण तिला सांगू की असं आपण तिला ओटीवरती मांडीवर घेऊन बसलो होतो!”  

 आणि तिला ते सांगण्यासाठी ती कधी मोठी होते याची आम्ही सर्वांनी वाट बघावी! छोट्याशा क्षितीच्या शैक्षणिक आयुष्यातला पहिलं पाऊल म्हणजे तिला सगळ्या भावंडांनी मिळून रमाताई च्या बालवाडीत नेऊन सोडावं, आणि आम्ही पण तिथेच रमाव. अवधूत ची शाळा तर ओटीवरच रंगावी आणि भटो भटो म्हणण्यात आम्ही पण तल्लीन व्हावे.. 

एक दिवस असाही यावा सगळ्यांना झोप लागावी पण मला आणि प्रीतीला मात्र अजिबात झोपू नये असं वाटावं. सगळे झोपल्यावर अख्खी दुपार आम्ही दोघींनी उचापती करण्यात घालवावी. संध्याकाळी पत्त्यांचा डाव रंगावा, बदाम सत्ती कोणी अडवली त्यावरून भरपूर वादावादी व्हावी. चिकूच्या झाडावर दोरखंडाचा झोका बांधून प्रत्येकाने मोजून झोके घ्यावे. मोटर वरती लांब पाईप लावून पाण्याने वाडी शिंपायला काढावी. आणि त्या पाण्यामध्ये आम्ही यथेच्छ नाचावे चिंब भिजावे… टाकीत डुंबत स्वप्नरंजन करावे किंवा समुद्रात पोहायची परमिशन मिळाली की अत्यानंदाने समुद्रकिनाऱ्यावर धाव घ्यावी. समुद्रकिनाऱ्यावरच्या दिवाळी स्पर्धेत भाग घ्यावा. आणि “तल्यात की मल्ल्यात..” हे न कळल्याने संताप करावा. गौरी प्रतिष्ठापनेनंतर अण्णांनी सर्व माकड सेनेला गावातील गणपती बघण्यासाठी काढावे आणि घोलवड,पलाटापर्यंत सैर करून परत येताना अण्णांना आमची भांडणे सोडवता सोडवता घाम फुटावा!

एक दिवस असाही यावा टिपू आणि काळू ला गावातून सरळपणे घरी आणताना त्रेधातीरपीट उडावी ! घाटाळपाडा वाडीतल्या जिन्यावर रात्रभर सनीची पावले खडखड खडखड वाजावी.  भाडवा, हिरो ,नाचन, भुरी हे ही कुक्कुट मंडळी ऐटदार पावले टाकत अंगणात दाणे टिपायला यावी.

एक दिवस असाही यावा की रात्री झोपताना दिवसभर केलेल्या मौजमजे च्या आठवणीने आणि उद्या करायच्या भरगच्च मजेच्या विचाराने ओठांवर मोठे हसू असावे आणि त्या आनंदातच झोपी जावे…..

आम्हा सर्वांचा हा बालपणीचा काळ सुखाचा करण्यात आई बाबा, अण्णा, अण्णी, काका, काकी, आत्या, भाई आणि आत्याजींचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनी केलेले लाड आणि प्रेमाचा वर्षाव हाच या आठवणींच्या पाया आहे. पण त्यातही आई आणि अण्णी या दोघींचे कष्ट आहेत. आम्हा सर्व लहान मुलांना घेऊन इतक्या जणांचं खाऊ, कपडे, भांडी करत राहणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. आताही मोठेआई ची सेवा करण्यात या दोघींचा सिंहाचा वाटा आहे. तिच्या दीर्घायुष्याचे काही श्रेय या दोघींनाही जाते. 

या सर्व आठवणीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोठेआईचा वावर आहेच. 

   घोलवडच्या घराचा मोठे आई शिवाय विचार करणं अशक्यच. एक पर्व संपले. आपल्या सर्वांच्या आयुष्यातले  एक पान उलटले …. पुन्हा कधीही न वाचता येण्यासाठी…


  श्रीदत्त राऊत, नातू, शिकागो, अमेरिका.

मोठी आई ,तू आता खूप हलकी, सुंदर झाली आहेस आणि शांतपणे त्या चांदण्यांच्या रस्त्याने चालली आहेस.

१०५ वर्षं तू आमच्यासोबत हसलीस, रडलीस, प्रेम केलंस… आता वेळ आली आहे. 

तुझ्या नव्या प्रवासात सतत सुगंधी वारा वाहो, तुझ्या पायाखाली मऊ गवत आणि रंगीबेरंगी फुलांचे रस्ते असोत, कानात कोकिळेचं गाणं आणि डोळ्यांसमोर सोनेरी सूर्योदय-सूर्यास्त असोत. तिथे तुझ्या हरवलेल्या जुन्या मैत्रिणी, नातेवाईक आणि प्रेम करणारे सगळे तुझे हसत हसत स्वागत करतील. … आनंदाने जा,

शुभ प्रवास!


    प्रीती वझे. नात, बाहरीन.

मोठीआई , 

आज तू डोळ्यासमोर च्या काळोखातून मुक्त झालीस ग. .. समोरच्या प्रकाशात आता तुझा प्रवास चांगला होवो.

. .. आपला टिपू,  काळू,  सनी,  नाचण,  जाडी,  पिकपिक,  ढोल्या,  हिरो , .. आणि हो तुझे आप्पा आमचे आप्पा तुझी अक्का आमची आत्या सगळी सगळी मंडळी भेटतील तुला!


    आशुतोष सावे, नातू. दूरदर्शन वृत्त निवेदक, वार्ताहर.

    आमची मोठी आई म्हणजे एक चालता बोलता ज्ञानकोश होता. स्मरणशक्ती व बुद्धीची चमक अद्भुत होती. गेली. 105 वर्षे तिने मृत्यूला थोपवून धरले होते. जेव्हा तिला वाटले, मृत्यूला बोलावून घेतले, तिला परमेश्वर चिरशांती देवो अशी प्रार्थना करतो.


  श्री दिनेश महाले, आमचा माजी विद्यार्थी, प्राध्यापक केंद्रीय विद्यालय सिलवासा.

     आजीने आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर जे प्रेम केले त्याला तोड नाही. आई-वडिलांपासून दूर घोलवडच्या घरी राहत असताना तिने  घराची आठवण होऊ दिली नाही. तिच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांचे वर्णन करी व आम्हाला सतत धीर देई. मार्गदर्शन करी. आजीच्या आत्म्यास शांती मिळो.


    श्री नरेश भाई राऊत अध्यक्ष सो क्ष स संघ, दादर,बोर्डी

   बंधू आपल्या आईच्या दुःखद निधनाची वार्ता कळली. तिचे अंत्यदर्शन घेण्याचाही योग आला. बालपणी आपण शेजारी असल्याने तिच्या प्रेमाचा लाभ व वात्सल्य मिळाले आहे ते विसरू शकत नाही. त्या पिढीने आपल्यासाठी खूप कष्ट केले आहेत.

    तिच्या आत्म्याचा शांती लाभो अशी सर्वांतर्फे प्रार्थना करतो.


   सदानंद राऊत आणि कुटुंबीय. माजी अध्यक्ष, सो क्ष संघ. मुंबई.

 प्रिय मातोश्रीच्या दुःखद निधनाचे वृत मनास अतीव दुःख देवून गेले

त्यांची सर्वोतोपरी सेवा आपण सर्वांनी मोठ्या आत्मीयतेने केलीत किंबहुना ते भाग्य आपणास लाभले. आपण सर्वच जणांनी ती सेवा मनोभावे केलीत .त्याचे अप्रूप सर्वांना आहे

आपल्या जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.

पण शेवटी हीच जीवनाची शोकांतिका आहे.

माझे  सर्व कुटुंबीय आपल्या दुःखात सहभागी आहेत .

    (श्री सदानंद राऊत यांनी “पालघर मित्र”या नियतकालिकात मोठीआईला श्रद्धांजलीपर लेख लिहून आम्हाला उपकृत केले आहे.)


    डॉ. सदानंद कवळी. मा. मुख्य विश्वस्त, सो क्ष संघ फंड ट्रस्ट मुंबई

   आजच माझी भाची संध्या (जांबूवाडी) हिच्या कडून तुमच्या आईला देवाज्ञा झाल्याचे समजले.

आईने केलेले कष्ट, तुम्हा सर्वांच्या जडणघडणीत त्यांचा असलेला सहभाग,कुटुंबाप्रती असलेली त्यांची माया व तुम्हा भावंडांवर केलेले सुसंस्कार या सर्व आठवणी कायम स्मरणात राहतील. आई म्हणजे कुटुंबाला एकत्र ठेवणारा धागा, ती अंथरुणावर असली तरी तिच्या असण्याने घर भरलेले दिसते. एक मोठा आधार असतो. आता उरल्या त्या फक्त आठवणी.


    डॉ. दीपक एस. चौधरी, मुख्य विश्वस्त, सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ फंड ट्रस्ट.

आपल्या पूज्य मातोश्री श्रीमती इंदुमती वामन राऊत यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले.

त्यांनी समाधानकारक, कर्तृत्वपूर्ण आणि सामाजिक कार्याने परिपूर्ण असे आयुष्य जगले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या सर्व मुलांवर उत्तम संस्कार केले — हीच त्यांची खऱ्या अर्थाने अमूल्य देणगी आहे.

माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तसेच सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ व फंड ट्रस्टच्या सर्व सदस्यांकडून

भावपूर्ण श्रद्धांजली.


    श्रीमती प्रतिभा अरविंद चुरी मामी. मुंबई.

 कै.सोमु ताईंनी आयुष्यभर कष्ट केले. तरी समाधानी राहिली. काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांना भेटून गेलो व जुन्या आठवणी जागवल्या. त्यांच्या अफाट स्मरणशक्तीची कल्पना आली. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती मिळो. 


  सौ. चारुलता व वासुदेव गोपाळ सावे  बोडी, दहिसर.

    आपल्या  मोठ्या आईंच्या निधनाची दुःखद बातमी कळली.एका समर्पित जीवनाचा अस्त झाला आहे.आम्ही ऊभयता आपल्या दुःखात सहभागी आहोत.परमेश्वराने त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती आणि चिरशांती द्यावी हीच त्याच्याकडे विनम्र प्रार्थना!ओम शांती,ओम शांती.


   प्रतिमा, प्रणोती अखिला वैदेही सपना ..भाच्या.

  आताच समजले की सोमू आत्याचे, दुःखदनिधन झाले. वाईट वाटले. तिला अनेकदा भेटलो आहोत. मात्र अखेरच्या दिवसात भेटण्याची इच्छा होती. पण येता आले नाही. तू तिच्या बद्दल लिहायला पण घेतले आहेस. तुझ्या आणि तुम्हा भावंडांच्या दुख्खात आम्ही सर्व सहभागी आहोत.


   सौ नंदिनी पाटील वसई. (पूर्वी वर्तक विहार, विरार रहिवासी)

सोमु आत्याच्या दुःखद निधनाची बातमी कळली. मी आणि दाजी आम्ही दोघे तुमच्या दुःखात सहभागी आहोत .

आज मला मावशीची (माधुरीची आई),खूप आठवण आली. मावशीच्या सगळ्या बहिणी आम्हाला मावशी इतक्याच प्रिय आहेत.

आमचे एक कुटुंबच होते .

बंधू, तुम्ही सर्वांनी आईची खूप सेवा केली. वडील धाऱ्यांची गेल्यानंतर खूप उणीव जाणवते हे तितकच खरे..


   सौ पूनम चौधरी.के. माहिम,मुंबई

मोठी आई गेली असा दीप्ती चा मेसेज आला आणि वाचून खूप दुःख झाले…शाळेत असताना दीपीची मोठी आई आणि तिची आ ह्या दोन्ही आज्यांबद्दल खूप ऐकून होते…जणू काही त्या आपल्याच आज्जी आहेत असे मलाही वाटायचे…मोठी आई आणि दिपी मध्ये थोडे साम्य आहे असे ती कौतुकाने सांगायची…अगदी उतार वयात सुद्धा त्यांना असणारी वाचनाची आवड, मग डोळे अधू झाले म्हणून इतरांकडून पेपर वाचून घेणे, त्यांची स्मरणशक्ती ह्या सर्व गोष्टी फारच आदर्श ठेवण्यासारख्या आहेत. 


    चंद्रकांत यशवंत राऊत. चेअरमन-मॅनेजिंग डायरेक्टर मृदुल हियरिंग एड, मुंबई.

     आपल्या मातोश्री श्रीमती इंदुमती राऊत  स्वर्गवासी झाल्या हे ऐकून अतीव दुःख झाले. आयुष्याची शंभरी पार करणाऱ्या काही निवडक व्यक्तींमध्ये आपल्या मातोश्री होत्या. माया, ममतेचा झरा म्हणजे आई, मुलांवर पहिले संस्कार घडवणारी असते ती आईच. आज आपण समाजात जो नावलौकिक कमावला आहे त्यामध्ये आपल्याला मातोश्रींनी दिलेली शिकवण, नीतिमूल्ये यांचा मोठा वाटा आहे. आईचे जग सोडून जाणे म्हणजे मायेची हक्काची सावली गमावणे.

तुमच्या ह्या पहाडाएवढ्या दुःखात आम्ही सर्व सामील आहोत. ईश्वर आपल्या मातोश्रींच्या आत्म्यास चिरशांती लाभो.


  भारत चौधरी..ठाणे. निर्देशक सेतू सहकारी को-ऑपरेटिव्ह क्रे. सोसायटी. मुंबई.

     मोठया आईला प्रथमता भावपुर्ण श्रद्धांजली!

मोठया आईला जिवंतपणी भेटण्याचा योग काही आला नाही. पण मृत्यू झाल्यावर तरी तिच्या कलेवरा पाशी पाच मिनिट थांबावे, हया आंतरिक ओढीने मी त्या दिवशी ठाणे, घोलवड प्रवास करून अंत्यदर्शनाला आलो, आणि मनाला खूप समाधान वाटले.

 मोठया आईच्या जाण्याने एका संघर्ष कहाणीचा अंत झाला! इतका संघर्ष क्वचितच कुणाच्या वाट्याला आला असेल.

पण त्यातूनही ताठ मानेन जगणं त्यांनी सोडलं नाही.

मोठ्या आईच्या जाण्याने  एका काळाचा अंत झाला आहे.

मोठया आईची ही संघर्ष कहाणी अशीच पुढे नेत चला!

मला, कुठे तरी ती माझ्याही जवळची वाटते.


         अनघा महाम्ब्रे .मुंबई,अमेरिका.

   काका, दिप्तीकडून दुखद बातमी कळली. फार वाईट वाटले! तिच्या आजींचे किस्से ऐकून मला खूपच भारी वाटायचे, कर्तबगार, खमक्या आणि नव्या पिढीबरोबर त्यांच्या आवडी निवडी जाणून घेऊन चॉकलेट, आईस्क्रीम,McDonald’s चा खाऊ सुद्धा तितक्याच आवडीने खाणाऱ्या, छान पुस्तके वाचणाऱ्या आणि दररोज वर्तमान पत्रातल्या बातम्या ची खबर ठेवणाऱ्या मी ऐकलेल्या “The Great Aaji”! तुम्हांला आई ची सेवा करण्याचे भाग्य लाभले आणि तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे तिची छान काळजी एवढी वर्षे घेतली.


       सौ आशाताई व रवींद्र पाटील .के. माहीम मुंबई.

  प्रज्ञावंत माऊलीची तुम्ही सारी लेकरं , भाग्यवंत आहात! त्यांची  पुण्याई तुम्हा साऱ्यांना लाभली आहे .7 डिसेंबर संकष्टीच्या दिवशीच अनंतात विलीन होऊन, त्यांनी  स्वत:ला सिद्ध केले आहे . आपणासर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत .

 मातोश्रींचे चरित्र लिहून आपण त्यांना अजरामर केले आहे.


    डॉ.सौ.नीला व देवराव पाटील चिंचणी मुंबई.


     सुपेह हायस्कूल बोर्डी. मुख्याध्यापिका सौ बिनिता शहा. शिक्षक वर्ग व कर्मचारी.


      सु पे ह हायस्कूल माजी विद्यार्थी संघ बोर्डी..   


   डॉ.गोगारी. प्रिन्सिपल एन बी मेहता कॉलेज बोर्डी.

     आपल्या आईच्या निधनाचे दुःख खूपच क्लेशकारक आहे कारण अशी व्यक्तिमत्व खूप क्वचित आढळतात.तुम्हा सर्व भावंडांना तिने चांगले संस्कार दिले. आयुष्यात मोलाचे मार्गदर्शन केले आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.


      श्री. विलास बंधू चोरघे यांनी पाठवलेल्या शोकसंदेशातील महत्त्वाचा भाग..


 लवू गावकर . मा.सीनियर प्रबंधक.एच पी सी एल.

      साहेब, तुमची “मोठी आई ” गेल्याची ही अतिशय वाईट बातमी आहे. साहेब, तुमच्या मोठी आई ला भरपूर असा एकशे पाच वर्षांचा जीवन प्रवास पूर्ण करण्याचा योग, परमेश्वर कृपेने मिळालेला आहे. तुम्ही सर्व भावंडानी शेवट पर्यंत तुमच्या आईची केलेली सेवा आणि घेतलेली काळजी नक्कीच  कौतुकास्पद अशीच आहे. तुम्ही लिहित असलेल्या “मोठी आई”  पुस्तकाच्या रूपाने तुमची आई भविष्यातही तुमच्या सोबतच असणार आहे.


     श्री‌.रवी बुजड. सरपंच घोलवड ग्रामपंचायत.

            काका..आपल्या मातोश्रींचे निधन ही खूप दुःखद घटना आहे . आपण सर्व भावंडांनी  केलेली सेवा समाजासाठी आदर्श आहे.

  त्या माऊलीला शत शत नमन.

   मी त्यांचे जिवंतपणी व अंत्यदर्शन घेऊन धन्य झालो आहे.


श्री दिलीप बिले. माजी कार्यकर्ते अखिल भारतीय पेट्रोलियम कर्मचारी संघटना. मुंबई.

    नूकताच तुम्ही “आमची मोठी आई भाग ७ वा..”. लिहून पुर्ण केला होता. मी मोठी आई संबंधित आपले सर्व लेख उत्सुकतेने वाचत असतो. त्यावरून तिच्या संपूर्ण जीवन चरित्राची व एका सार्थकी जीवनाची कल्पना येते. तुम्हां सर्व भावंडाच्या यशामध्ये तुमच्या मातोश्रींचे योगदान अधोरेखित आणि इतराना कायमचे प्रेरणादायी राहील..


 श्री. प्रभाकर राऊत. विभागीय सचिव पालघर जिल्हा, गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक, बोर्डी.

     आपल्या आईचे निधनाचे दुखद कळले .अगदी बालपणापासून तिच्या प्रेमाचा सहवास मला मिळाला.  ज्यांना आईचा सहवास अगदीअल्पावधीसाठी मिळाला त्यांना आईचे प्रेम म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने कळेल. आपणास ते प्रेम दीर्घ काळ मिळाले. भाग्यवान आहात.मी आपल्या दुःखात सहभागी आहे.


   श्री प्रीतम म्हात्रे, उपाध्यक्ष. सो क्ष स संघ . मुंबई.

   आपल्या मातोश्रीच्या दुःखद निधनाची बातमी ०७ डिसेंबर २०२५ रोजी समजली होती. हा संपूर्ण आठवडा कामानिमित्त बाहेर असल्याकारणाने सांत्वनासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटावयास मला आपल्या घोलवड येथील निवासस्थानी भेट देण्यास जमले नाही. तिची महती मी मित्रांकडून ऐकली होती. अशी आई मिळणे भाग्य. तिच्या आत्म्यास शांती मिळो.


    श्री शशी इनामदार.चिटणीस एचपीसीएल, माजी अधिकारी संघटना.

    आज आपल्या मातोश्री श्रीमती इंदुमती राऊत यांच्या निधनाचे वृत्त कळले. तुमची आई सर्वांसाठी एक “रोल मॉडेल” होती. तिला पाहू शकलो नाही मात्र व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते.

  तिच्या आत्म्यास शांती मिळो. ही प्रार्थना.


     डॉ. योगिनी करमरकर. बोर्डी. मोठी आईला वैद्यकीय सेवा देणाऱ्या.

  आजींच्या निकोप मनासारखेच शरीर ही अगदी पारदर्शक निरोगी होते. शरीर स्वास्थ्य आश्चर्यकारक मिळाले होते. तिची सेवा करण्याचा लाभ डॉक्टर म्हणून मलाही मिळाला. तिच्या जीवनकर्तुत्वाचा परिचय झाला. तिच्या आत्म्यास चिरशांती मिळो ही प्रार्थना.


    सौ. संयोगिता नागपाल. कमिशनर, इन्कम टॅक्स मुंबई.

      काका,आपल्या आईच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच प्रार्थना मी व माझे कुटुंबीय करीत आहोत.


   श्री रंजन पाटील, अध्यक्ष, कै तात्यासाहेब चुरी वसतिगृह माजी विद्यार्थी संघ. मुंबई.

    आपल्या आदरणीय आईच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे. 

१०५ वर्षा चे आयुष्य हे खरोखरच प्रेम, संस्कार व आशिर्वाद याचा अनमोल ठेवा होता व जीवनयात्रा प्रेरणादायी! 

आपल्या परिवाराला या दु:खाच्या  प्रसंगी धैर्य आणि सांत्वन मिळो हीच प्रार्थना!!!


 कमलाकर चौधरी, माहीम, मुंबई. मा. एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर रिझर्व बँक ऑफ इंडिया.

       दिगंबर भाई ,आपली आई एक पवित्र आत्मा. तिला निरामय समाधानी असे दीर्घायुष्य मिळाले. दुर्दैवाने तिला कधी भेटू शकलो नाही. तिच्या पवित्र आत्म्यास चिरशांती मिळो ही प्रार्थना करत आहे.


सौ हेमलता राऊत .वसई. मा.चिटणीस. सो.क्ष संघ.

     मोठी आईच्या निधनाचे दुःखद वृत्त कळले आणि वाईट वाटले. आईला १०५ वर्षाचे आयुष्य लाभले म्हणजे आपण सर्वांनी केलेली अविरत सेवा . आई कितीही वृद्ध झाली तरीही आई आपल्याला आधाराची ‘ प्रेमाची सावली बनून हवीच असते कारण

आई ती आई,..तिची सर कोणालाही नाही!!


    सुरेश ल पाटील. बोर्डी,विरार.

आईच्या दुःखद निधनाची बातमी कळली. वाईट वाटते की मनात खूप इच्छा असूनसुद्धा मी भेटू शकलो नाही. आणि आत्ता शेवटचे दर्शन पण घेऊ शकत नाही. आम्ही सर्व तुमच्या दुःखात सहभागी आहोत. 


    श्री हंसराज मोरे ..बोर्डी ,मुंबई.

     आपल्या आईच्या निधनाचे वृत्त दुःखद. आपल्या आईच्या आठवणी म्हणजे सर्वांसाठी एक स्फूर्ती कथा आहे. श्री दत्तगुरु महाराज यांनी निश्चितच त्यांच्या चरणाशी मृतात्म्यास विलीन करून घेतले असणार.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

    स्व. आईंच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपणा सर्वांना  धन्यवाद.


  डॉ. शकुंतला रघुनंदन चुरी , प्रसिद्ध वैद्यक व सामाजिक कार्यकर्त्या. बदलापूर.

    आपल्या आई बद्दल मी यजमान रघुनंदन चुरी यांचे कडून बरीच माहिती मिळाली होती. स्व. आईंच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपणा सर्वांना  धन्यवाद.


  प्रो. एम एस सारंग.,मा. प्राध्यापक विल्सन कॉलेज. मुंबई. ओम सर्वोदय सोसायटी सदस्य.

   आपल्या आईच्या निधनाचे वृत्त ऐकून वाईट वाटले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जेव्हा त्या आपल्या विलेपार्ले सोसायटीत येत, दर्शन होई. एक वेगळे व्यक्तिमत्व होते.ओम शांती शांती.  त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही प्रार्थना करतो. 


     डॉ.मधुरा पर्वतकर, विलेपार्ले.

 पूज्य आई च्या निधनाची बातमी समजली. आपल्या आईची महती आपल्याकडून आम्ही ऐकून ह़ोतो. तिच्या आत्म्यास शांती मिळो ही आम्हा उभयता कडून प्रार्थना.


  अक्षय राऊत .चेअरमन वसई विकास सहकारी बँक वसई

 मातोश्रीच्या दुःखद निधनाची वार्ता  कळली. माझ्या आईने, ती बोर्डीची असल्यामुळे, तिच्याविषयी खूप माहिती दिली होती. तिच्या आत्म्यास शांती लाभो ही देवाकडे प्रार्थना.


    सौ.भारती वसंत चौधरी. माजी उपाध्यक्षा सो क्ष स संघ बोर्डी ,बोरीवली.

   आईच्या निधनाची वार्ता सकाळीच वाचली.

 तिघांनी मिळूनआईची सेवा केली ते एक  समाजातील पुढच्या पिढीला खूप मोठा आदर्श दाखवला.

 आईची सेवा करणं हे पण एक मोठा भाग्यच लागतं.

 तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात कारण मला माझ्या आई-वडिलांचं काहीच करायला मिळालं नाही ह्याच कायम मनात दुःख होत असतं.

 आईच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 भावपूर्ण श्रद्धांजली..


   पंढरीनाथ सावे. उद्योजक. तारापूर मुंबई. 

     आपल्या आई ,मोठ्या आई यांचं आज निधन झाल्याचं वृत्त समजलं‌. त्यांचं प्रत्यक्ष दर्शन मला झालं नसलं तरी आपल्या  लेखनकथनातून त्यांच्या समृद्ध जीवनप्रवासाचं दर्शन मला झालं आहे. फोटो मधून त्यांची मूर्तीही मनासमोर आहे.


  Mr.Prakash Vartak..Chairman, Setu Co Op.Credit Sty.

       Sorry to know about the sad demise of your beloved mother.

A few days before her start of the journey to heavenly abode we spoke about her health, wishing her recovery. It was not to be.

Bandhu ji, all of you have taken the best care of her, setting an example to the present generation as to how one should take care of old-age parents. 

May her eternal soul rest in peace, and may God give you and your family all the strength to bear this irreparable loss..


       Mr. Ashok Patil and Family. Industrialist.Bordi, Pune.

I just came to know about the sad demise of your beloved mother, you always looked after her and took great care of her.

Losing our mother is the biggest loss in our life, what we are today is because of our mother’s teaching and inspiration.

We pray to god May her soul rest in an eternal peace.


    Mr Prakash Patil.Mumbai..Tech Cosultant.Industrialist.

    Heard about sad demise of your beloved mother today. My deepest condolences and salute to a great lady who was truly incredible in weathering years of her life so long, hard to imagine ! 

You should feel proud having her company so long !


    Mr Rajendra Sah MD, Sah Petroleums Ltd.Mumbai.

       Very sorry to hear about the sad demise of you dear mother, may god give you and all the family members enough strength to bear this irreparable loss , may her noble soul rest in peace.


        Mr K Murali Ex CEO. Gulf PetroChem, Dubai.

Our Heartfelt Condolences!

I wanted to visit Gholwad personally ,but it was not to be!!

May her further journey be peaceful!    


    S. Venkat..ex.E.D. HPCL.Chennai.

Sad to note the demise of ur beloved Mother today.

No substitute for Mother.

She lived her life fully on her own terms and continued to stay at ur ancestral home at native Village till her last breath.That is great.

I am aware the way u took care of her by staying with her at ur village home periodically.

Surely She must have Blessed u nd ur family for discharging ur duty as her son, that too at most needed time  at her ripe old age.

I commend u for the same.

Surely ur Mother will be granted Sathgathi by God Almighty.

OM SHANTI.


  Mr Suresh Mehta Chairman HP Managment Staff Association.Mumbai. 

       I am very sorry to learn about the sad demise of your mother. She lived a long and peaceful life primarily due to the devotion with which you and other family members looked after news about your beloved Mother. 

Kindly accept our condolences.


    याशिवाय श्री महेश दामले,ED  एचपीसीएल, श्री हर्ष आनंद सीईओ गल्फ पेट्रोलियम, श्री यशवंत महाजन जनरल मॅनेजर सहा पेट्रोलियम, श्री आर वेंकट चीफ मॅनेजर एचपीसीएल, श्री सोईटकर ओम सर्वदाय सोसायटी मुंबई यांनीही आदरांजली चे संदेश पाठविले आहेत, अजूनही येत आहेत. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

   मोठी आईने दिलेले संस्कार व आमच्यासाठी केलेले काबाडकष्ट याची जाणीव ठेवून तिचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे हीच तिच्यासाठी आमच्याकडून श्रद्धांजली..

  🪷🪷🪷🙏🙏🌹🌹🌹🥀🥀🥀🍀🍀🍀🌻🌻🌻