‘रंग मातीचे’ महोत्सव!

रासायनिक आणि जैविक हवामानामुळे मातीतले मूळ घटक व प्राथमिक खनिजे तिला रंग देतात; हे रंग हळूहळू बदलतात—हे मातीचे रासायनिक गुणधर्म! आपल्या माय‑माऊली वसुंधरेच्या एखाद्या भूभागावर राहणाऱ्या जनसमुदायाच्या लोककला, लोकजीवन, लोकसंगीत, हस्तकला, चित्रकला, परंपरा यांतूनही त्या मातीचे विविध रंग संवेदनशील मनाला जाणवतात. या रंगसंगतीचे महत्त्व भारतीय संस्कृतीत विशेष आहे. सण‑उत्सवांत विशिष्ट रंगांचा अंतर्भाव दिसतो – लाल‑प्रेम‑ऊर्जा, पिवळा‑शांती‑समृद्धी, हिरवा‑प्रकृती‑वाढ, निळा‑शांती‑विश्वास‑दिव्यता, केशरी‑ऊर्जा‑शक्ती‑भक्ती. होळी‑दीपावलीसारख्या सणांत रंगांद्वारे आमची संस्कृती जपली जाते.
रंगांबरोबर मातीला गंधही आहे—मृदगंध. पहिल्या पावसाच्या सरीनंतर दरवळणारा हा सुगंध त्या भूभागातील लोकजीवन, आशा‑आकांक्षा, संघर्ष व प्रेमाचा ओलावा घेऊन येतो. मराठी साहित्यात हा गंध ग्रामीण जीवन, निसर्गाशी नाते व संस्कृती व्यक्त करतो. माती केवळ निर्जीव धूळ नसून मानवी भावना, लोकजीवनाचा आत्मा आणि “काळी आई” आहे. पद्मश्री ग. दि. माडगूळकरांनी हा सुगंध शब्दांत जपला; शेतकरी काळ्या आईची सेवा करून मानवजातीला जीवनशक्ती देतो.

महाराष्ट्राच्या ऊत्तरेकडील घोलवड-बोर्डी भाग हा बहुसंख्येने या मातीत राबणाऱ्या, बळीराजांचा प्रदेश. येथील मानवी जीवन या मातीच्या रंगापासून ,गंधापासून वेगळे होऊ शकणार नाही. येथील मानवी जीवनाचा तो एक अविभाज्य भागच आहे..
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे ‘मातीच्या रंगांचे संमेलन’ नुकतेच घोलवड या पालघर जिल्ह्यातील आमच्या खेड्यात 20 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडले. महाराष्ट्र पर्यटन विकास खात्यातर्फे ‘बांगला नाटक’ या सल्लागार कंपनीने त्याचे संपूर्ण आयोजन केले. महोत्सव यशस्वीपणे पार पडला. या महोत्सवाला “रंग मातीचे..”हे नामाभीधान करण्यात आयोजकांनी व सल्लागारांनी दाखविलेली रसिकता व समर्पकता अभिनंदनीय वाटते.

या महोत्सवात जागतिक ख्याती मिळविलेली वारली चित्रकला परंपरा पाहता आली .बांबू हस्तकलेचे प्रदर्शन करण्यात आले. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य ,संगीत आणि विविध प्रकारच्या हस्तकलांचे दर्शन झाले. विविध पाककलांचे नमुने चाखावयास मिळाले.नाचणी सारखी ऋतूनुसार येणारी पिके आणि ताज्या समुद्र मासळीची समृद्धी यामुळे येथील खाद्य संस्कृती जगावेगळी आहे. भूमी आणि समुद्र आणि डोंगरदऱ्या यांच्या सानिध्यात रुजलेली बोर्डी घोलवड डहाणूतील पर्यावरण कला आणि स्वाद यांचे रंग केवळ अनोखे आहेत.

प्रख्यात तारपा वादक पद्मश्री भिकल्या धिंडल्या यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा, संवाद साधण्याचा व त्यांच्या श्वासांतून सजीव झालेल्या तारपा वाद्याचे स्वर्गीय सूर ऐकायचा सुवर्णयोग या निमित्ताने आला.
आमचा पालघर जिल्हा व आमच्या बोर्डी-घोलवड परिसरा तील परंपरा व निसर्ग याबद्दल थोडे..
अरबी सागराच्या किनाऱ्यापासून सह्याद्रीच्या हिरव्या उतारापर्यंत पसरलेला आमचा पालघर जिल्हा हा केवळ एक भूभाग नाही तर निसर्ग आणि संस्कृती एकमेकांत मिसळल्याने तयार झालेली ती एक जिवंत संस्कृती आहे. येथे वर्षानुवर्षे जपलेल्या व दैनंदिन जगण्याचा श्वास असलेल्या अनेक परंपरा आहेत. वारली चित्रकला भौगोलिक निर्देशांक, GI ने मानांकित आहे. ती निसर्गचक्रांची दृश्य भाषा आहे. त्यातील लयबद्ध रेषांमधून शेती, जीवनचक्र, विश्वरचना याचे दर्शन होते.
बांबू, जो कधी निवारा आणि उपजीविकेचे साधन होता तो आज आमच्या परिसरातील महिला कारागिरांच्या हातात उपयुक्ततेपासून सौंदर्याकडे प्रवास करीत आहे .आधुनिक रुची अभिरुचीशी संवाद साधत आहे. ऋतू बदलतात तसे संगीत आणि नृत्यही बदलते. तारपा वाद्याच्या सुरांनी गाव एकवटते. गोलगोल फेऱ्यांत जीवनानंद जागविते. बोहोडा उत्सवातील सुंदर व पुराण कथेशी प्रेरणा असलेले मुखवटे गावाच्या रस्त्यांना जीवंत रंगमंच बनवतात. डहाणू बोर्डीच्या सुपीक किनारपट्टीवर गोड्या पाण्याचा आणि समुद्राचा संगम होतो. तेथे मासेमारीची व बागायतीची समृद्ध परंपरा फुलते. शतकापूर्वी येथे स्थायिक झालेल्या पारशी समाजाने वास्तु शास्त्र आणि खाद्य संस्कृतीमध्ये आपला ठसा उमटविला आहे. GI मानांकन प्राप्त चिकू आणि मध उत्पादनामुळे हा प्रदेश आता सर्वांचे लक्ष वेधित आहे.बोर्डी-घोलवड परिसर, परंपरा, कौशल्य आणि पर्यटनप्रिय प्रदेश म्हणून आता विकासित होत आहे.
नवरंग दाखवणारा, सतत बदलत राहणारा तरी आपल्या मुळांशी घट्ट जोडलेला एक सजीव रंगमंच म्हणजे आमचा हा बोर्डी घोलवड परिसर आहे! त्यामुळेच येथे साजरा होत असलेला .. ‘रंग मातीचे’ हा एक जीवंत रंगोत्सव आहे असे मला वाटते!!
आज जरी आमच्या घोलवड परिसराला पर्यटन स्थळ म्हणून शासकीय मान्यता मिळाली नसली तरी पर्यटन व्यवसाय हा गेली अनेक वर्षापासून येथे प्रस्थापित आहे. सुबकपणे उभारलेले विविध फार्मस्टे, होम स्टे, पर्यटकांना बागायती जीवन आणि सागरी ग्रामीण वातावरणाच्या रंगात सामावून घेतात..चिकूच्या बागांमध्ये, भाजीपाल्यांच्या शेतामध्ये आणि वृक्षराजींच्या सावलीत मिळणारे हे कृषी पर्यटन अनुभव, पर्यटकांना पुनर्जीवन देणारी निवासस्थाने ठरतात. येथे पाहुण्यांना स्थानिक शेती पद्धती ,खाद्य संस्कृती आणि ग्रामीण दैनंदिन जीवनाशी थेट संवाद साधता येतो. घाई गडबडीच्या पर्यटनाला पर्याय ठरणारा एक समृद्ध आणि अर्थपूर्ण असा हा अनुभव आहे.
घोलवडमधील महिला कारागीर पारंपारिक उपयुक्त वस्तू बनविण्याच्या चौकटीपलीकडे जाऊन आता बांबूला नवे अर्थ देत आहेत. आकाश दिवे आणि बांबू पासून हस्तनिर्मित सजावटी वस्तू आधुनिक जीवनशैलीला समकालीन रूप देत आहेत. या सर्जनशील अभिव्यक्तीमध्ये स्थानिक सौंदर्यदृष्टीची मुळे घट्ट रोवलेली असून गेल्या अनेक शतकांच्या वारशाने लाभलेले कौशल्य आणि नवे प्रयोग यांचा सुंदर संगम होत आहे.त्यांना आज भारतातील अत्युत्कृष्ट अशा बांबू हस्तकला तज्ञाकडून प्रशिक्षणही दिले जात आहे. या हस्तकारागिरांची निर्मिती आमच्या परंपरेची धार जपते आणि आजच्या काळाशी सुसंगत ठरते.
आमच्या पालघर जिल्ह्यातील बोर्डी घोलवड परिसरातील भूमी मध्ये अनेक ऋतूंचे वेगवेगळे प्रतिध्वनी ऐकू येतात. त्यातूनच येथील विविध जमातींच्या गीतांतून व नृत्यातील लयीतून जिवंत परंपरा निर्माण झाल्या, जपल्या गेल्या आणि आजही प्रदर्शित होत असतात. उत्साह आणि कृतज्ञतेची उंचावलेली अभिव्यक्ती घोरनृत्यात दिसेल. रंगीबेरंगी वेशभूषेतून साकारलेल्या आनंदोत्सवासाठी कांबडीनृत्य, लयबद्ध हालचालीतून केलेले पावसाचे आवाहन ,नवचैतन्य आणि पुनरुज्जीवनाची हाक म्हणजे गावरी नृत्य, देवी गौरी प्रति अध्यात्मिक अर्पण भक्ती आणि नाट्यात्मक कथन यांचा संगम म्हणजे सांबळ नृत्य, तर होडी नृत्यातील ,वल्हांच्या मोहक हालचालीतून जीवनप्रवासाचे प्रतिकात्मक चित्रण पहावयास मिळते.
धौलेरी लग्न गीते, ढोल वादनासह विणलेल्या पारंपारिक सुरावटी व आदिवासी विवाह सोहळ्यांचा आत्मा जपणारी गीते तसेच थाळी वादनाने दैनंदिन वापरातील भांडी वापरून त्यातून लय साकारण्याची आदिवासी गीतांची अनोखी परंपरा येथे पहावयास मिळते.

खाली डावीकडे: आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी.
उजवीकडे :पद्मश्री भिकल्या दादा उद्घाटनाचे भाषण करताना.
पालघरच्या मासेमारी करणाऱ्या कोळी समुदायाचे समुद्राशी अतूट नाते आहे. समुद्राची लय त्यांना आपल्या कुटुंबासारखी परिचित आहे. होडीला वल्ही मारताना किंवा जाळी टाकताना उमटणारी गीते ,श्रमांना सामूहिक अभिव्यक्तीत रूपांतरीत करतात .कोळी नृत्य सागरी जीवनाचे प्रतिबिंब आहे. समन्वयाने टाकलेली पावले ,उत्सव आणि सामुदायिक सोहळ्यांतून सादर होणारी ही कला सागराविषयी कृतज्ञता आणि पर्यावरणाची जाणीव याची भावना व्यक्त करते. संस्कृती आणि समुद्र हे या नृत्याचे अविभाज्य भाग आहेत.

पालघर जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये तारपा नृत्याशिवाय कोणताही उत्सव पूर्ण होत नाही. महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील कोकणी आदिवासी जमातीचे हे सांस्कृतिक प्रतीक आहे. लग्न, होळी इतर सणासमारंभात सादर होते. समुदाय भाव आणि सुसंवादाची ही सजीव अभिव्यक्ती आहे. भोपळा बांबू आणि ताडाची पाने यापासून तयार केलेल्या तारपा या वाद्याच्या सुरावटीवर हे नृत्य गोलाकार रचनेत साकारले जाते.सतत फुंकर घालून सूर निर्माण करावे लागतात. मध्यभागी उभा असलेला तारपा वादक आपल्या सहज जाणिवेने ताल आणि हालचालींचे मार्गदर्शन करतो. जणू एखाद्या नैसर्गिक सुरावटीचा संचालक तो असतो. ही केवळ सादरीकरणाची कला नाही तर ती सहभागातून घडणारी विधीपर परंपरा आहे. सामाजिक संवाद आणि वारली चित्रात वारंवार उमटणारे जिवंतपणाचे ते प्रतीक आहे. एकात्मता, समतोलपणा आणि उत्सव भाव यांचे साकार रूप तारप्यातून प्रकट होत असते.
येथील भूमी आणि जीवन हे निसर्गाशी सुसंवाद साधून आहे. आदिवासी येथील आदिम रहिवासी.त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी माती आणि ऋतुचक्र केंद्रस्थानी आहे.त्यामुळे त्यांचे आपल्या मातीशी आणि आपल्या निसर्गाशी एक अनोखे नाते आहे .वारली चित्रांमध्ये मासेमारी शेती शिकार आणि अन्नाचे उत्पादन यासारख्या दैनंदिन उपजीविकेच्या क्रिया यांना मुख्य स्थान आहे. ती एक कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. नांगर ओढणारे बैल, पेरणी करणारे शेतकरी ,पीक कापणाऱ्या आदिवासी स्त्रिया अशा दृश्यामधून जीवनाची लय व निसर्गाशी जवळीक साधलेली दिसते . विशेष म्हणजे आदिवासी निसर्गाला पालनकर्ता आणि रक्षक मानतात .
येथे मानव हा जिंकणारा नव्हे तर निसर्गाला जपणारा आणि निसर्गाशी सहजीवन करू इच्छिणारा दर्शविला जातो . हेच या संस्कृतीचे मोठे महात्म्य आहे व आजच्या काळाशी अतिशय सुसंगत आहे.

तारपा व तारपा नृत्याचा आठव आल्यावर श्री भिकल्या धिडल्या दादा यांचा विसर होणे अशक्य. त्यांच्या तारपा वादनातील असामान्य कौशल्यामुळे भारत सरकारने नुकताच त्यांना पद्मश्री किताब जाहीर केला.
पद्मश्री जीव्या दादा वारली पेंटिंगसाठी आणि नंतर पालघर जिल्ह्याला दुसरा पद्मश्री पुरस्कार मिळाला तो भिकल्या दादाना तारपावादनासाठी. भिकल्या दादा मान्यवर सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व आहे. आदिवासी संगीत संस्कृतीच्या संवर्धनासाठी दिलेल्या त्यांच्या विलक्षण योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गावातील विविध समारंभापासून ते राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत त्यांनी तारपाचा स्वर पोहोचविला. तसेच नव्या पिढीतील कलाकारांना मार्गदर्शन केले. या जिवंत कलेची परंपरा अखंड पुढे नेली.
घोलवडमधील आमच्या या वारसा वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन भिकल्या दादांनी केले. महोत्सवाच्या सतत तिन्ही दिवस त्यांनी उपस्थिती लावली. आपल्या स्वर्गीय स्वरांची जादू प्रस्तुत करून उपस्थितांना मुग्ध केले. वयाच्या 92 व्या वर्षी भिकल्यादादांची तारपा फुंकण्याची क्षमता व लयबद्धता केवळ प्रेक्षणीय आहे. परमेश्वर त्यांना दीर्घायु देवो. उद्घाटनाचे भाषणात भिकल्या दादांनी सांगितले,
“आमचे तारपा हे माणसाच्या श्वासाने जिवंत होते,स्वर निर्मिती करते म्हणून ते सजीव वाटते. इतर वाद्याहून वेगळे वाटते! शाळेतील शिक्षण घेऊ शकलो नाही तरी या तारप्याने मला आयुष्यात सर्व काही दिले. हीच माझी इष्ट देवता आहे!”
एवढा सन्मान मिळवूनही भिकल्या दादांचा साधेपणा, पाहून निरागसता उठून दिसते.

वारली कला पेंटिंग, मिथक आणि लोकविश्वासाच्या व लोक भावनेच्या धाग्यांनी चितारली गेली आहे. त्यात श्रद्धा आहे. जननाची अधिष्ठात्री देवता आणि समुद्राचे आशीर्वाद मागण्यासाठी आवाहन केले जाते .वाघोबा, वाघदेव ,वाघया हा रक्षक आणि संरक्षक आत्मा म्हणून त्याला लोकभावनेचे अधिष्ठान त्यांच्या संस्कृतीमध्ये आहे. त्यांच्या चित्र प्रतिमा मधून आदिवासी अशी जीवनदृष्टी व्यक्त करतात ज्यात मानव निसर्ग आणि दैवी शक्ती परस्पर सन्मान व जपणुकीच्या नात्याने एकमेकांना जोडले गेलेले आहेत. त्यांच्या कलेचा तो एक सुंदर अविष्कार आहे.

आदिवासी चित्रकाराचा पहिला कॅनव्हास म्हणजे त्याच्या घराची भिंत! चिकण माती व शेणाने लिंपलेली कारवीची भिंत म्हणजे त्यांचा विशाल कॅनवास . त्यात तांदळाच्या पेस्टमध्ये बुडवलेल्या बांबूच्या काडीने रेखाटलेली ही चित्रे केवळ कलाप्रकारच नव्हे तर त्यांचा देव ,नववधू आणि संपूर्ण वारली जमातीसाठी साकारली जातात. ही परंपरा जपणाऱ्या कुटुंबांच्या मार्गदर्शनाखाली कलाप्रेमी व जिज्ञासू नवकलाकार या कला शैलीचा प्रत्यक्ष अनुभव कार्यशाळा मधून घेतात व ही कला पुढे नेतात.
या संदर्भात आदिवासी कलाकार जिव्या सोमा मशे यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. वारलीचित्रकलेचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. ते एक महान कलाकार होते.आपल्या कलाविष्कारामुळे या कलेला जागतिक मान्यता मिळवून दिली. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड गावचे सुपुत्र पद्मश्री जीवा मशे यांची दूरदृष्टी अतिशय महत्त्वाची ठरली. त्यांनी वारली कलेला मातीच्या भिंतीपासून कागद आणि कॅनव्हास वर आणले. तिची वैश्विक दृश्यभाषा जगासमोर उलगडली .बदलत्या काळात वारली कला व वारली जमात टिकून राहावी यासाठी त्यांनी घातलेला पाया आणि या कलेच्या वृद्धीसाठी त्यांच्या अनमोल योगदानामुळे त्यांना २००११ सालीभारत सरकारने “पद्मश्री”पुरस्काराने सन्मानित केले.

जीव्या दादा सारख्या कलाकारांच्या प्रयत्नामुळे व कलेमुळे, परंपरेत रुजलेली व चाकोरीत अडकलेली वारली कला आता काळाच्या चौकटी ओलांडून पलीकडे गेली आहे. आधुनिक विषयांना देखील तिने हात लावला आहे. अवकाश प्रवास, नागरीकरण आणि पर्यावरणीय बदल यांची चित्रे आजच्या वास्तवाचे प्रतिबिंब दाखवतात. या नव्या कथनातून वारली चित्रकला प्राचीन आणि आधुनिक यांना जोडत राहते ,बदल स्वीकारते आणि आपली ओळख जपत पुढे जाते.
याच रंग महोत्सवात “सांस्कृतिक वारसा संग्रहालय” हे एक महत्त्वाचे दालन सुरू करण्यात आले आहे. हे म्युझियम घोलवड येथील सुमारे दीडशे वर्षे जुन्या मराठी शाळेतील एका दालनात स्थित आहे. सध्या जरी थोड्या वस्तू प्रदर्शित केल्या आहेत तरी,थोड्याच अवधीत येथे एक मोठा संग्रह निर्माण होईल याची खात्री आहे.
या म्युझियममध्ये वारली चित्रकला, बांबू हस्तकला, आणि अन्य स्थानिक कलाकृतींचे प्रदर्शन आहे. येथे पर्यटकांना स्थानिक कलाकाराबरोबर थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. हे म्युझियम पर्यटन वृद्धी बरोबरच स्थानिक समुदायातील हजारो सदस्यांना सहभागी करून त्यांच्या पारंपरिक कलांना प्रोत्साहन देण्याचे, भावी पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरण्याचे काम करील.
ज्या शाळेच्या एका दालनात हे वस्तुसंग्रहालय स्थित आहे ती शाळा ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. ब्रिटिशकालात सुरू झालेल्या,145 वर्षे जुन्या शाळेच्या वर्ग खोलीत ते भरविले आहे.महाराष्ट्र राज्यातील अशा प्रकारचे लोककला व लोक संस्कृती जतन करण्याचा हा पहिला उपक्रम असावा. आमच्या या परिसरात आदिवासी कोळी मच्छीमार बारी, वाडवळ, ब्राह्मण, मराठे, मारवाडी, गुजराती, पारशी असे अनेक समुदाय गेली अनेक शतके सामंजस्याने राहतात. या सर्व ज्ञातींना आपला इतिहास व संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे . तो येथे जतन करण्याचा प्रयत्न होणार आहे.

सध्या या वस्तुसंग्रहालयात आपणास मासेमारीसाठी लागणारी विविध प्रकारची जाळी, धान्य दळण्याचे जाते, उखळ वरवंटा, नांगर, बैलगाडीचे चाक, तारपा वाद्य, बांबू पळसाच्या पानापासून बनविलेले इरले घोंगडे ,बांबू कला कुसरीच्या वस्तू ,वारली विवाहातील लग्नाचा चौक दृश्य, मल्लखांब, जुन्या पारशी घरांतील वापरल्या गेलेल्या काही वस्तू ,असा संग्रह आहे. त्याचप्रमाणे माझे
“ Revered Teachers of Bordi, Legacies and Lessons”
या इंग्रजी पुस्तकाची प्रतही ठेवली आहे. त्यात गेल्या शंभर सव्वाशे वर्षाचा बोर्डी घोलवड परिसराचा व शैक्षणिक उत्थापनाचा इतिहास दिला आहे.

हे कसे झाले? ती हकीकत गमतीशीर. एके दिवशी मला कलकत्त्याच्या श्री मानसदा आचार्य यांचा फोन आला. त्यांना मला भेटावयाचे होते. त्यांनी माझे पुस्तक इंटरनेटवर वाचले व काही शंका मला विचारावयाच्या होत्या. श्री. मानसदा हे बंगालमधील प्रसिद्ध शांतीनिकेतन विद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि सध्या ‘बांगला नाटक’ या कला संस्कृतीचे जतन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचे एक संचालक. खूप प्रतिभावान व्यक्तिमत्व. त्यांच्या या कंपनीने UNICEF सारख्या जागतिक संस्थेसाठी सल्ले दिले आहेत. आमच्या घोलवड येथील घरी येऊन माझ्याशी चर्चा केली. संग्रहालयाबाबत माझी प्रतिक्रिया व विचार ऐकले. माझा अमेरिकास्थित मुलगा श्रीदत्त यांनेही संग्रहालयाबाबत अपेक्षा व त्याचे स्वरूप कसे असावे याबद्दल पाठविलेली माहिती त्यांनी घेतली. माझ्या इंग्रजीपुस्तकाची प्रत घेतली. सर्व माहिती त्यांना उपयुक्त वाटली असे ते म्हणाले. त्यांनी स्वतः काही पुस्तकाच्या प्रति विकत घेऊन एक प्रत कलादालनात ठेवली. इतर प्रति महाराष्ट्र पर्यटन विभागाला पाठविल्या आहेत. अशी माणसे जेव्हा एखाद्या प्रकल्पामध्ये असतात तो प्रकल्प यशस्वी होणारच! महोत्सवाआधी काही दिवस मानसदा व त्यांच्या सहका-यानी घोलवड परिसर तसेच चंडीगाव गंजाड या भागात जी पायपीट केली त्याला तोड नाही.!!

पुरातन वारसा संग्रहालय हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन विकसित करण्याच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे. घोलवडच्या या संग्रहालयात आपण सर्वांनी मिळून जपलेले आणि घडवलेले सामायिक अवकाश असणार आहे. येथील वारसा केवळ प्रदर्शित नाही तो आपल्या हातांनी आणि आवाजांनी आचरणात आणला जाणार आहे, आणि पुढील पिढीकडे सुपूर्द केला जाणार आहे. अशी ही समृद्ध अनुभूती आहे
बांगला नाटक या सल्लागार कंपनीचे एक संचालक श्री. मानसदा यांना मी त्यांची प्रतिक्रिया विचार व त्यांनीही मोठ्या आनंदाने दिली त्यांच्याच शब्दाचे मराठी भाषांतर..
..”श्री दिगंबर राऊत यांच्या लेखासाठी आमच्या “बांगला नाटक”सल्लागार समितीतर्फे प्रतिक्रिया देण्यास आनंद होत आहे. “बांगला नाटक” ही कोलकाता-आधारित सामाजिक संस्था आहे, जी गाव-पातळीवरील लोककला-हस्तकला जतन आणि कलाकार-उद्योजकता प्रकल्पामध्ये काम करते. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यामुळे घोलवड-मातीचे रंग महोत्सवात सल्लागार म्हणून गंजाड, बापूगाव, घोलवड या वारली-आदिवासी वस्त्यांमध्ये आम्ही खूप भ्रमंती केली हा प्रदेश अगदी जवळून पाहिला.
येथील बहुजन समाजात कलेची सजीवता आणि कलेचा अभिमान आहे. वारलीची भिंत-चित्रे, बांबू हस्तकलेतील स्थानिक तंत्रे आणि रोजच्या जीवनातील रंग-रूपे ही या विविध समाजाचा जिवंत वारसा आहे. त्यांची कला ही शोभेची वस्तू नसून त्यांचा श्वासोच्छ्वास आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यांत दिसणारा आत्मविश्वास आणि पिढ्यानुपिढ्या त्यांनी जपलेली ज्ञानपद्धती पाहून खूप समाधान झाले.
सल्लागार म्हणून गावकऱ्यांशी बातचीत करताना त्यांनी दिसलेली आपुलकी, सामूहिक तयारी (म्युझियम, कार्यशाळा, महोत्सवाची मांडणी) आणि कलाकार-युवा पिढीचा सहभाग खूपच छान होता.कामाला उत्साह देणारा होता.”
‘बांगला नाटक’ने बंगाल व भारतातील इतर प्रदेशात ग्रामीण कलाकारांना पर्यटन मार्गे एक उत्पन्नाचे स्थिर साधन मिळवून दिले आहे. घोलवड परिसरातील वारली महोत्सव, म्युझियम आणि येथील लोकसंगीत कला या एकमेव असून या माध्यमातून देखील येथील कलाकारांनाही चांगले उत्पन्न मिळू शकते. कलाकारांना थेट बाजारपेठ आणि सन्मान प्राप्त होऊ शकेल.
येथील तरुणांनी आधुनिक संपर्क साधने, जसे की छायाचित्रकला, व्हिडिओ शूटिंग, डिजिटल तंत्रज्ञान अवगत केल्यास आधुनिक जगताशी त्यांचा संपर्क राहू शकेल. त्या दृष्टीने येथील स्थानिक नेतृत्वाने प्राथमिक शाळेपासूनच मुलांना कलाशिक्षण व आधुनिक तंत्रज्ञान याचे धडे दिल्यास हे काम कठीण नाही.
या घोलवड बोर्डी परिसरात काम करताना आम्हाला खूप आनंद झाला. अनेक गोष्टी शिकता आल्या. जिवंत संस्कृती म्हणतात, ती अनुभवता आली. आपल्या कला महोत्सव व सांस्कृतिक वारसा केंद्राला शुभेच्छा देतो . आम्हाला एक चांगली संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकार व घोलवड ग्रामपंचायतीचे आभार मानतो. समस्त गावकरी व ज्यांनी विशेष सहकार्य दिले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. “
येथील फळफळावळ व बागायतीचा फायदा करून घेण्यासाठी व शेतकऱ्यांना एक पर्यायी व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी, ‘मधाचे गाव घोलवड’ हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. अशा प्रकारचे घोलवड हे महाराष्ट्रातील केवळ तिसरे गाव आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. आमचे एक ग्रामस्थ बंधू श्री. विश्वास नेरुरकर यांनी याबाबतीत खूप आघाडी घेतली असून त्यांचा, ”संकल्प” हा मधाचा ब्रँड आज महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून भारताच्या इतर राज्यातही विकला जातो, ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. या परिसराला त्यामुळे नक्कीच मोठी प्रसिद्धी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

या संग्रहालयाचे निर्माण केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या एमटीडीसी आणि घोलवड ग्रामपंचायत, श्री. रविभाऊ बुजड सरपंच, श्री. कुणाल शहा उपसरपंच व श्री. गुरुनाथ वारघडे ग्रामविकास अधिकारी ,या संकल्पनापूर्तीसाठी राबणारे ‘बांगला नाटक’ सल्लागार यांचे, विशेषतः श्री. मानसदाआचार्य यांनी दिलेल्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार.
‘तारपाचे’ श्री. अनिल वासुदेव सावे यांनी व ‘ग्रीन फार्म’ या शंभर वर्षापूर्वीच्या बंगल्याचे ईस्टेट मॅनेजर श्री. जमशेदजी डेगमवाला यांनी काही नाजूक व पुरातन दुर्मिळ वस्तू माझ्या विनंतीला मान देऊन दिल्या. त्यांचेही मनःपूर्वक आभार.



