आप्पांची पत्रे भाग-२ sample
आप्पांच्या पत्राचा हा दुसरा हप्ता आहे. या पत्रांमध्ये आप्पांनी सुरेंद्रचा उल्लेख केला आहे. सुरेंद्र म्हणजे गोंडू मावशी आणि नारायण अण्णा यांचा ज्येष्ठ चिरंजीव आणि आमचा खास मित्र. मुंबईला असताना आम्ही विरारला मावशीकडे सुट्टीच्या दिवशी हाॅस्टेल वरुन जात असू,आणि त्या दिवशी मावशी आमचा घरगुती जेवण देऊन व्यवस्थित समाचार करी.दुर्दैवाने सुरेंद्र अल्पायुषी ठरला आणि वयाच्या केवळ 15 व्या वर्षी त्याचा अकाली मृत्यू झाला .आप्पांनी ऊल्लेखीलेली दुसरी व्यक्ती म्हणजे श्रीकांत.. आमचा जिवलग मित्र त्याला आम्ही बाबू म्हणत असू तो त्यावेळी,बोरीवलीत राहत असे आणि बोरीवलीच्या कोरा केंद्रातून आप्पाना,त्यांनी स्वतः चरख्यावर काढलेल्या सुताचे कापड विणून देत असे. आणि ह्या विणलेल्या खादीचे कपडे आप्पांनी आयुष्यभर वापरलेले आहेत. तिसरा महत्त्वाचा उल्लेख म्हणजे बाबासाहेब यांचा आहे. ते गोरेगावच्या पांडुरंग आश्रमाचे मालक, आणि त्यांनीच पांडुरंग शिष्यवृत्ती पुरस्कृत केली होती. मला पहिली स्कॉलरशिप मिळाली होती आणि माझ्या कॉलेजच्या जीवनात वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी त्या शिष्यवृत्ती चा खूप उपयोग झाला .त्यांना अभिवादन करून त्यांचे आभार मानण्यासाठी आप्पांना त्यांची खास भेट घ्यायची होती आणि एरवी कुठेही सहसा बाहेर न जाणारे आप्पा खास त्यांच्या भेटीसाठी चिंचणीहून बोरिवली ला आले आणि तेथून मी त्यांना घेऊन गोरेगावला गेलो. त्यांच्या घरी यांची भेट झाली. बाबासाहेबांना सुद्धा आप्पांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी तसे बोलूनही दाखविले आणि पुन्हा केव्हातरी गोरेगावला या असे आमंत्रण दिले माझ्या आयुष्यातील त्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींची मी भेट घडवून आणली आणि त्या भेटीचा साक्षीदार झालो याचा मलाही आनंद झाला.