मी मोठी आई बोलते. ..भाग १०

अनेकांच्या विनंतीनुसार मोठीआईची १०४ वर्षाची कहाणी तिच्याच शब्दात लिहिली होती, त्याचे लेखांक चालू ठेवीत आहे.

   

   दुर्दैवाचे दशावतार संपले नव्हते. मावशीचा  विवाह देखील यशस्वी झाला नाही. लग्नानंतर केवळ तिसऱ्या दिवशी ती माहेरी परतली. माहेर तरी कुठे होते? आपल्या भावाकडेच, म्हणजे आमच्या मामाकडे आमच्याबरोबर राहावयास आली. मामाला आपल्या लहान बहिणीस आधार देणे भागच होते. पण आता मामीच्या सहनशक्तीचा अंत होता. आमचे कुटुंब सांभाळणे तिला जड जात होते. त्यात मावशीची भर पडल्यावर तिने मामाशी वैर पत्करले नसेल तरच नवल! आजी चाणाक्ष होती .एकंदर परिस्थिती पाहून तिने आक्काला व आम्हा पोरांना बोर्डीस आमच्या झोपडीतच स्वतंत्रपणे राहण्याचा प्रेमाचा सल्ला दिला असावा. त्या परिस्थितीत तिचा निर्णय बरोबर होता. आक्काला तो पटण्यासारखा होता.

    आम्ही थोडेच दिवसात बोर्डीच्या आमच्या घरी परत आलो. मावशी पुढे काही दिवस मामाकडे राहीली. परिस्थिती माणसाला शिकवते. मावशीने मामाच्या बागायती धंद्याचा व शेतीमालाच्या खरेदी विक्रीच्या उद्योगाचा अभ्यास केला. बारकावे जाणून बागायती व्यवहारात तिने जातीने लक्ष घातले. त्याचा फायदा मामाला झाला. मावशीला पण त्याचा लाभ पुढे झाला, एक नव्या उद्योगाचे तंत्र कळले. एक दिवस मामाचे घर सोडावयाचेच आहे हे तिला माहीतच होते. काही काळाने मावशीही  आमच्या बोर्डीच्या घरी आली. मावशीचे आक्का बरोबर राहणे आमच्या कुटुंबासाठी एक शुभशकुन ठरला.

   मावशीने भाजी खरेदी, विक्रीचा व्यवसाय आता आत्मविश्वासाने सुरू केला. मामाकडे राहून या शेतीमाल खरेदी विक्रीचा चांगलाच अनुभव तिने घेतला होता. बोर्डी घोलवड मधील बरीच वस्तीगृहे शारदाश्रम व काही कुटुंबांना रोज भाजीपाला पुरविण्याचे काम तिने सुरू केले. इतरही घरगुती गरजेच्या वस्तू ती पुरवू लागली. चार पैसे हातात मिळू लागल्यावर एक नवा व्यवसायही तिने सुरू केला. बोर्डीतील मोठे बागायतदार तसेच मत्स्य व्यवसाय करणारे कोळी बांधव तिच्याकडून लहान मोठी रक्कम उधारीवर व्याजाने घेऊ लागले. एक निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत सुरू झाला. आकाची उंबरगावची पायपीट कमी झाली. आम्हालाही, विशेषता खंडू हिरूला आकाचा  प्रेमळ सहवास मिळू लागला. तिलाही खूप समाधान मिळाले. 

   त्याकाळच्या रिवाजा नुसार, मी व गोंडू आता सोळा सतरा वर्षाच्या झाल्यामुळे, लग्नाच्या वयात आलो होतो. माझा शिक्षणाच्या बाबतीत आनंदी आनंद होता. मात्र गोंडू मेहनती, हुशार होती. तिने व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे ई.सातवी  परीक्षा चांगल्या प्रकारे पास केली होती. पुढेही शिकू शकली असती. मात्र कौटुंबिक परिस्थितीमुळे तिने नोकरी, शिक्षण याचा विचार न करता वडीलधाऱ्या मंडळींचा आदेश म्हणून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याचे ठरविले. तिला चांगली स्थळे येऊ लागली. नारू भाऊ, (नारायण जयराम राऊत बोरवली,)यांचे स्थळ सर्व दृष्टीने योग्य व अनुकूल होते. ते मॅट्रिकची परीक्षा पास होऊन मुंबईत चांगल्या कंपनीत नोकरीला होते .विरारला राहायची सोय होती. त्यामुळे गोंडू चे लग्न होऊन ती नारायण रावांच्या संसारात रममाण झाली. बोर्डी सोडून विरारला  राहू लागली. तिचा आनंदी संसार सुरू झाला.

     माझ्या बाबतीत परिस्थिती वेगळी होती. शिक्षण कमी होते. त्यामुळे मला येणारी स्थळे गरीबीची, कमी शिक्षित अशी होती. मात्र बीजवर(पहिली पत्नी दिवंगत झाली आहे असा विवाहोत्सुक  प्रौढ) स्थळे येत होती. धनीक होते.अक्का, मावशी व विशेषतः नानी चा मला बीजवरा कडे देण्यास सक्त विरोध होता. नानीच्या घरी मी राहत असल्याने अर्थातच तिच्या मताला महत्त्व होते. मावशीच्या बाबतीत विवाहभंगाचा दारुण अनुभव नुकताच आल्यामुळे ती  हळवी झाली होती.  त्याकाळी एखाद्या तरुण कोवळ्या मुलीशी लग्न करून काही दिवसात तिला घराबाहेर काढणे, थोड्याच दिवसात दुसऱ्या बाईशी विवाह करणे असा प्रकार अनेक बायकांचे बाबतीत होत होता. पुरुष मंडळींना व बायकांनाही त्यात विशेष वाटत नव्हते. मात्र त्यामुळे कैक तरुण विधवांची आयुष्ये उध्वस्त झालेली मी पाहिली आहेत. माझ्या सुदैवाने आप्पांचे स्थळ मला सांगून आले. आप्पांना मी शाळेत पाहिले होते. काही काळ ते माझे शिक्षकही होते. घरची परिस्थिती गरीबी असली तरी नोकरी असल्याने निश्चित उत्पन्नाचे साधन होते. आप्पांचे व्यक्तिमत्व मला सभ्य सुसंस्कृत असल्याचे जाणवले होते. त्यामुळे विरोध होण्याचा प्रश्न नव्हता. माझे लग्न आप्पा, वामन देवजी राऊत, बोर्डी ,या शिक्षकाशी नक्की ठरले. 

   आप्पांचे स्थळ गावातील असल्याने जास्त चौकशीची ही गरज नव्हती. आप्पांना एक भाऊ परशु दादा व एक बहीण आंगू अशी दोन भावंडे होती. आप्पांच्या वडिलांचचे ही दोन विवाह झाले होते. पहिली पत्नी निधन पावल्यामुळे दुसरी पत्नी जमिनी बाई बरोबर त्यांचा विवाह झाला होता. पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी लग्न होऊन सासरी गेली होती. तिच्याविषयी मला जास्त काहीच माहिती नाही. परशु दादाचे लग्न झाले होते. त्यांचा संसार बाय म्हणजे गंगाबाई बरोबर सुरू होता. अंगूचेही  लग्न झाले होते. ती पांडुरंग सावे या गावातील गृहस्थांबरोबर सासरी नांदत होती. आता घरात सासूबाई, दादा-बाय, छोटा वसंत व आप्पा एवढी मंडळी होती. 

   देहेरी, गुजरात मधील बा चे जुने घर, आज. 

  आप्पांच्या कुटुंबाचीही वाताहत झाली होती. माझे लग्न झाले तेव्हा सासरे देवजी हयात होते. ही मंडळी मूळ दुहेरी येथील. हे गाव सध्या गुजरात मध्ये महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आहे. तेथे त्यांची वडिलोपार्जित शेती, जमीन, बंगला व वडिलोपार्जित सुतारकीचा व्यवसाय होता. देवजी आजोबांना  बहीण भाऊ नव्हते. त्यामुळे ते स्वतःच शेती व्यवसाय सांभाळीत व फावल्या वेळात सुतारकाम करीत. त्यांचा ओढा देवधर्माकडे जास्त असल्याने आपल्या शेती बागायती कडे यांचे दुर्लक्ष होई. खरे तर त्यांनी शेती बागायतीत जास्त लक्ष घातले असते तर ते एक मालदार  सुखवस्तु कुटुंब झाले असते. पण देवजी बाबा ‘भगत’होते. भगत म्हणजे एखाद्या विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी इष्ट देवतेचा अंगात संचार होऊन ऊन्मनीअवस्थेत जाणारा देवाचा भक्त! देवजी बाबांच्या बाबतीत दर शुक्रवारी सायंकाळी काली मातेचा संचार त्यांचे अंगात होई. त्या ऊन्मनीअवस्थेत भाविकांना त्यांच्या समस्यांची उत्तरे बाबांकडून मिळत. ते बोलत ते भविष्यात खरे होई. पुढील काळाचे मार्गदर्शन भाविकांना मिळे. उद्योगधंदा, इडापिडा,लग्न व्यवहार, भूत खेत बाधा, इत्यादी तत्कालीन अनेक समस्यावर देवजी बाबा उपस्थितांना मार्गदर्शन करीत. देवाजी भगत एका वेगळ्या अवस्थेत जात. लोक प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करीत. त्याप्रमाणे पुढील व्यवहार करीत. आमच्या आक्काने तो प्रकार बोर्डीत पाहिला होता. ती आम्हाला त्या वेळच्या गोष्टी कथन करीत असे.

  खरे तर देवजी बाबा एका पायाने थोडे अधू होते. चालताना लंगडत. मात्र देवीचा संचार अंगात झाल्यावर ते त्या अधूपायावर गोल गिरक्या घेत. तरीही स्थिर असत. त्यांची वाणी त्यावेळी धारदार होत असे. भविष्यवाणी खरी ठरत असल्याने लोकांचाही त्यांच्यावर विश्वास होता. दर शुक्रवारी आमच्या घरासमोर मोठी गर्दी असे. देवीचा नैवेद्य म्हणून भाविक जे काही देवीसमोर अर्पण करीत, तीच त्यांची कमाई असे. ते कोणाकडे पैसे किंवा मोबदला मागत नसत. जे काही मिळेल त्यावरच उदरनिर्वाह होई. पावागडची कालीमाता त्यांच्या अंगात संचारते असा त्यांचा व लोकांचा विश्वास होता. कदाचित कालीच्या ह्या भक्ताचे काही व्रत असावे.

   एक सालस, देवभोळे, निस्वार्थी गृहस्थ असाच त्यांचा पंचक्रोशीत लौकिक होता. मात्र त्यांच्या या निष्कपट स्वभावाचा स्वार्थी लोक फायदा घेत. शेतीकडे व बागायतीकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या आजूबाजूच्या काही स्वार्थी मतलबी शेतकऱ्यांना त्यांची जमीन बळकावण्याचा मोह त्यामुळेच झाला असावा, आणि ही लबाड मंडळी त्यात यशस्वी देखील झाली.

     लोकांच्या संसाराला सासरे देवजी बाबांकडून हातभार लागत असला तरी आपला स्वतःचा संसार चालविणे दिवसेंदिवस सासू जमनी बाईला कठीण होऊ लागले. तीन मुलांचा सांभाळ करून शेतीवाडी करणे तिला जमत नव्हते. ती नाराज होती. मुले लहान व दुसरा कोणाचा आधार नाही. ती मेटाकुटीस आली. त्यामुळे शेवटी  तिने देहेरीची सर्व इस्टेट बागायत विकून आपल्या बोर्डीच्या भावाकडे जाण्याचा विचार केला. भावानेही संमती दिली. आणि एके दिवशी मागचा पुढचा विचार न करता, केवळ अल्प किमतीत (सुमारे ५००₹,असे म्हणतात) सर्व प्रॉपर्टी शेजाऱ्यांना विकून, आपल्या मुलांना खाकोटीस मारून देहेरीहून बोर्डीस येण्यास पायी चालत निघाली. जमनी बाईला मिळालेले ही रक्कम आजच्या मानाने खूप कमी असली तरी 1930 च्या दशकात ही रक्कम खूप मोठी होती. त्याकाळी दहा रुपये एकर जमीन मिळत होती. यावरून या पैशाचे मोल कळावे!

  सासरेबुवांनी(देवजी बाबा) बनविलेल्या वस्तू आजही देहेरीच्या त्या वाड्यात मौजूद आहेत..

   कालपर्यंत एका मोठ्या जमीनबागायतीची, बंगल्याची मालकीण असलेली जमनी आज लंकेची पार्वती होऊन माहेराची वाट तुडवीत निघाली होती. काय वाटले असेल तिला त्यावेळेस? तिच्या डोळ्यातून गळणाऱ्या अश्रुंनी कोणाला शाप दिले असतील? तिच्या बरोबर वाट चालणाऱ्या त्या तीन अश्राप बालकांना त्यावेळी नक्की काय वाटले असेल? ज्यांनी अनेक  कुटुंबांना संसाराची योग्य वाट दाखविली त्या देवजी बाबांना त्या दिवशी कफल्लक अवस्थेत देहेरी सोडताना आपल्या इष्ट देवतेचा राग आला असेल का?… काहीच माहित नाही!! पण कालपर्यंत वेगळ्या श्रीमंतीत असणारे एक कुटुंब एका दिवसात होत्याचे नव्हते झाल्याने विदारक भविष्याला सामोरे जाण्यासाठी बोर्डीची वाट तुडवीत निघाले होते एवढे खरे…!!

  “.. आपल्या नवऱ्याने अनेकांचे संसार सुखाचे करून दिले, माझ्या कपाळी असे दुर्भाग्य का ..?

   देवातील देवपण जन लोकांस ठरे फळदायी, माझ्याच का ललाटी हा वनवास आहे..?

  नशिबाचा ऊलटा खेळ पहात जमनी मनी नाराज होती. मात्र त्यावेळी देखील तिच्या मनाचा  एक कोपरा तिला दिलासा देत असेल..

  “मी, माझ्या नवऱ्याने कोणाचेच वाईट केले नाही. आजचा नसेल पण उद्याचा सूर्य माझा आहे! माझी ही चिमणी पिल्ले उद्या मोठी होतील. आकाशात भरारी घेतील. आणि माझे पांग फेडतील! काली माते, तुझ्या भक्ताची व त्यांच्या या चिमणपाखरांची पाठराखण तुलाच करावयाची आहे!”

   जमनीची मनीषा खोटी ठरली नाही…! ती आज नाही. मात्र तिच्या मुला नातवंडांनी पतवंडांनी जे नेत्रदीपक यश  मिळविले त्याची दखल ती स्वर्गातून ही घेत असेल. आणि त्यांना आशीर्वाद देत असेल, याची मला खात्री आहे.

 देहरीची मालमत्ता विकून आलेला पैसा त्याच वेळी जमनीला वापरता आला असता तर तिला कोणतेच कष्ट भोगावे लागले नसते, मुलाबाळासह सुखात राहिली असती…

   पण दैव जाणिले कुणी, हेच खरे. म्हणून तर कवीने म्हटले आहे ..

   “राजपुत्र जे नृपती उद्याचे.

   शिशूपण ज्यांचे दीनपणाचे ,

   रत्नकंदुका जागी, हाती मातीची खेळणी..!!”

    माझा हा पैसा मी कोणाकडे तरी विश्वासाने ठेवायला देईन. माझ्या मुलांना योग्य वेळी तो कामी येईल. त्यांनाही सुखाचे दिवस येतील. ही जमनीची इच्छा होती. पण तसे होणार नव्हते. जमनीला अनेक सत्वपरीक्षा द्यायच्या होत्या. तो पैसा तिला मिळणार नव्हता. त्यावर  दुसऱ्या कोणाची वाईट नजर होती..

   जमीन जुमला विकून आलेले पैसे तिने आपल्या जवळच्या नातेवाईकाकडे ठेवावयास दिले. त्याने “तुझी मुले मोठी झाल्यावर हे पैसे तुला देईन .. अगदी निश्चिंत रहा..”असे भले मोठे आश्वासन तिला दिले. या आश्वासनाबरोबर  उपकार म्हणून आपल्या शेजारीच पडक्या जागेत कारवीची झोपडी बांधून दिली. “माझ्या शेजारीच रहा. माझी ही नजर तुझ्या मुला बाळांवर राहील, आनंदात राहशील, …” अशी मेहरबानी दाखविली ..!  या निराधार कुटुंबाला ‘आधार’ दिला?

   काल परवा पर्यंत आपल्या हाताखाली चार-सहा नोकरांना जरबेत ठेवणारी जमनी आता दुसऱ्या कोणाच्या हातातील बाहुली झाली. दोन वेळ जेवणालाही मोताद झाली. 

  पुढे मी आप्पांना कधीतरी या सर्व व्यवहाराबाबत विचारले होते. हा व्यवहार करताना कोणा जबाबदार माणसाला तुम्ही का मध्यस्थी केले नाही, पैसे नातेवाईकांना देताना कोणी साक्षीदार तरी का ठेवला नाही, याबाबत विचारले होते. कारण घडलेले सर्व व्यवहार माझ्यातरी आकलना बाहेर होते. आप्पांनाही त्याची उत्तरे देता आली नाहीत. ही भावंडे अजाण होती. देवजी बाबा तर संसार, कुटुंबातून कधीच वानप्रस्थात गेले होते. सासुबाई एकाकी होत्या आणि ज्यांनी मदत करावयाची ते जवळचे नातेवाईकच स्वार्थी निघाले…एवढेच आज आपण सांगू शकतो.

  दादा, मोठे भाऊ होते तरी  वयाने लहानच होते. त्यामुळे त्यांना शिक्षणाचा विचारही न करता वडिलोपार्जित सुतारकी करावी लागली. त्यांच्या थोड्याफार कमाई मुळे हे कुटुंब  कशीतरी अर्धी भाकरी खाऊ लागले. पुढे आप्पांना शिक्षकाची नोकरी मिळाली. संसार गाड्यास हातभार लागला. दादांचा विवाह झाला. आणि माझी दिराणी, गंगाबाई, बाय त्यांच्या आयुष्यात आली. आमचे लग्न होऊन मी आले तेव्हा वसंतचा नुकताच जन्म झाला होता. त्यानंतर एक दोन वर्षातच देवजी बाबांचे निधन झाले.

    आमच्या लग्नाच्या काही आठवणी अजून मनात आहेत. आमचे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. कोणताच थाटमाट नव्हता. जेवणावळी नव्हत्या. मात्र त्या अपुऱ्या पगारात देखील आप्पांनी माझ्यासाठी बऱ्यापैकी दागिने केले होते. सोन्याच्या दोन बांगड्या, हार, मंगळसूत्र असे दागिने बनविले होते. नाना मळेकर हे आप्पांचे गुरु व सोनार ज्ञातीमधील. त्यांनी याबाबतीत आप्पांना मार्गदर्शन केले होते. विशेष म्हणजे त्या दिवसात एक श्रीमंतांची मिजास समजली जाणारी वस्तू, पैठणी शालू ,आप्पांनी माझ्यासाठी घेतला होता. अनेक वर्षे मी तो समारंभात हौसेने वापरला. पुढे आमच्या बदल्यांमुळे होणाऱ्या  घरांच्या स्थित्यंतरात तो गहाळ झाला. आजही माझ्या डोळ्यासमोर फिकट हिरव्या रंगाचा तो शालू नजरेसमोर येतो!

 आम्ही सोमवंशीय क्षत्रिय (पाच कळशी). त्यामुळे आप्पांची वरात ‘पाच कलश’ असलेल्या सिंहासनावर बसून काढण्यात आली होती. आमच्या क्षत्रिय पूर्वजांनी पूर्वी लढाईत चांगला पराक्रम केल्यामुळे  लग्न समारंभात वराची मिरवणूक पाचकलश असलेल्या सिंहासनावर बसवून काढण्यात येत असे. इतरांना  चार कलश असलेले सिंहासन होते. हा आमच्या ज्ञातीसाठी एक बहुमान होता. सुरुवातीलाच अशा सिंहासनाचा फोटो दिला आहे.

   माझे लग्न आक्काच्या जुन्या घरातच झाले. आक्का, मावशी, नानी यांनी खर्चाचा भार उचलला होता. आमच्या शेजारचे भिकू दादा(नारायण पाटील) यांनी त्यावेळी इलेक्ट्रिसिटी नसल्याने गॅस बत्त्या पुरविला होत्या.

 एकीकडे एका नव्या कालखंडात प्रवेश होतो आहे म्हणून मला आनंद होता. तर या लग्नात माझे बाबा ,आप्पा मला आशीर्वाद देण्यासाठी नाही हे दुःख होते. सासरी जाणाऱ्या लहान वयातील माझ्यासारख्या मुलीला आपल्या वडिलांचा विरह त्यादिवशी किती जाणवला असेल, ते काय सांगू? नवीन घरात माझे स्वागत होईल ना अशी भीती होती? नाना नानींचा प्रेमळ सहवास संपला ही सल होती. आक्काची माया व तिने बालपणी आमच्यासाठी केलेले कष्ट आठवत होते. शेवटी प्राप्त परिस्थितीला समोर जाणे आवश्यक होते. संसारिक जीवनाचा नवीन टप्पा सुरू होत होता. नव्या युगाला सुरुवात झाली होती… आता “अरे संसार संसार..”

  कै. भालचंद्र लक्ष्मण चुरी, भाई मामा व कै. मालती मामी.

    विशेषतः माझ्या लग्नानंतर सुरुवातीला मला माझा चुलत भाऊ भाई, याची खूप आठवण झाली. माझी व त्याची खूप छान मैत्री जमली होती. तोही मला खूप समजून घेई. त्याने मला सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम दिले. भाईचे व माझे हे बहीण भावाचे नाते भाईच्या अखेरच्या दिवसापर्यंत टिकले. भाई आज नसला तरी त्याच्या स्मृती मला अजूनही समाधान देतात. त्यालाही दुसरे भावंड नसल्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांची अनेक सुखदुःखे त्या काळात व नंतरही समजून घेतली आहेत. नानीकडे राहिल्याने चांगला स्वयंपाक करता येत होता. त्याचा फायदा झाला.त्याकाळी सासरी आलेल्या मुलीची पहिली परीक्षा म्हणजे तिने बनविलेला स्वयंपाक असे !मी त्या परीक्षेत पास झाले. 

   आप्पांबरोबर मी बोर्डीच्या त्यांच्या ‘घरात’ राहावयास आले. त्यावेळी हे घर म्हणजे कारवीने उभारलेल्या भिंती व नारळाच्या झापा पासून बनविलेले छप्पर, अशी चंद्रमौळी झोपडी होती. बांबूच्या चिपाडापासून बनविलेले दरवाजे होते. सुरुवातीला जरी आम्ही सर्व एकत्र असलो तरी पुढे दादांचा व आमचा संसार आम्ही वेगळा करून घेतला. सासूबाई आमच्या भागात आल्या. सासूबाईंचे जेवढे करता आले तेवढे मी शेवटपर्यंत केले. पण त्यांची मर्जी राखू शकले नाही. त्या माझ्यावर नेहमी डाफरत.त्यामुळे कधी कधी आमची बोलाचाली होई. त्यांचे माझे सूर नीट जमले असते तर खरोखर त्या गरीबीच्या संसारातही खूप आनंद मिळाला असता. पण ते होणे नव्हते. त्या स्वतः एक उत्तम सुईण होत्या. माझे एकही बाळंतपण त्यांनी  केले नाही. याचे मला नेहमी दुःख होई. मात्र आप्पा त्यांचे खूप लाडके अपत्य होते. ती त्यांना अखेर पर्यंत लाडाने “वामनु” म्हणे. आप्पांचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. तिने त्यांच्या बालपणी घेतलेल्या कष्टांची त्यांना जाणीव होती. सासूबाईंना मी प्रेम द्यावे अशी त्यांची अपेक्षा असे. मी तिला शक्यतो दुखवीत नसे. आम्हा दोघींचा स्वभाव थोडा तापट असल्याने चकमकी होत. सासूबाई कधी चांगल्या मूडमध्ये असल्यास त्यांच्या देहेरी घरासंबंधी, बागायती संबंधित सांगत. त्यावेळी ते घर पाहण्याचा योग आला नाही. पुढे काही वर्षांनी आम्ही घोलवडला आलो तेव्हा तो योग आला.  दिगू, बाळू त्यांच्या कुटुंबासह देहरीला भेट देऊन आले. मलाही त्यांनी त्या घराच्या सध्या परिस्थितीबद्दल सांगितले. त्यांनी फोटो पण काढले होते. मात्र मी ते पाहू शकले नाही..

   माझी सासू देहेरीच्या आठवणी निघाल्या की तिच्या पैशाबद्दल बोले. तिने ठेवावयास दिलेले पैशांपैकी रुपयाही तिला परत मिळाला नाही. ती पैसे लुबाडणाऱ्यांना रोज शिव्या शाप देई. “देव त्यांचे भले करो. पण मला फसविणाऱ्याचे कल्याण होणार नाही ..” असे म्हणे. आप्पांच्या, दादाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणे, “पोरांनो काळजी करू नका. तुमचा एक एक रुपया ज्यांनी घेतला त्या बदली परमेश्वर तुम्हाला शंभर शंभर रुपये देईल.. माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत..”

   तिचे आशीर्वाद खरे ठरले. एका दुर्भाग्यवश अंतरात्म्याचे ते बोल होते. आशीर्वाद होते.. गरिबांची हाय  घेणारे व त्यांना फसविणाऱ्यांना  कर्म कधी ना कधी अद्दल घडवितेच.

 “तुलसी हाय गरीब की कबहू न निष्फल जाई…”.

      लग्नानंतर थोडेच दिवसात आप्पांची बदली बोर्डीहून केळवे शाळेत झाली. तेथे संसार हलविणे कठीण होते. आप्पानाही मी सासूबाई जवळ राहावे हे वाटत होते. आप्पा एकटेच केळवे शाळेत रुजू झाले. मी बोर्डीस राहिले. शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी आप्पा बोर्डीस येत. मात्र अगदी थोड्याच अवधीत परत आप्पांची बदली उमरोळी येथे झाली. खऱ्या अर्थाने आमच्या संसाराला सुरुवात ऊमरोळीस झाली. 1941 चे ते वर्ष होते. आमच्या ‘संसारयुगा’चा तो सुवर्ण काल होता असेच म्हटले पाहिजे!! त्याबद्दल पुढे सांगेनच.

    बोर्डीत असेपर्यंत आमचा संसार जेमतेम चालू होता. कष्ट व काटकसर यातच दिवस जात होते. मला कोणतीच हौस मौज करता आली नाही. उलट काहीतरी करून संसाराला हातभार होण्यासाठी चार पैसे कमविण्यासाठी कष्टाची कामे करावी लागली. कधीतरी कोणाच्या वाडीत, शेतात लहान सहान कामे मला मिळत. ती मी करी. पावसाळ्यात आवणी लावणी अशी चिखलातील कामेही केली आहेत. दिवसाला पाच-सहा रुपये मिळत. पण तोही मोठा हातभार असे. आमच्या झोपडीसाठी लागणारे झाप हिराजी मामा देत असे. कधीतरी भाजीपाला ही पुरवी. हे त्याचे त्यावेळचे उपकारच आहेत .

   त्यामुळेच आप्पांची उमरोळीला झालेली बदली व तेथे मांडलेला नवीन संसार याबद्दल मला भरभरून सांगता येईल. देवाने माझ्या आयुष्यात जवळची, आवडती माणसे लवकर हिरावून नेली, आणि मला मोठे आयष्य दिले. उमरोळीला परमेश्वराने आई-वडिलांप्रमाणे प्रेम करणारी माणसे दिली. बहिणीप्रमाणे प्रेम करणाऱ्या मैत्रिणी दिल्या. आणि आमच्या संसार वेलीवर फुले येऊ लागली….तो भाग पुढे सांगते.

भाग ११ पुढे.