मी मोठी आई बोलते भाग ११
मोठीआई आता आमच्यात नाही. पण मोठीआईची १०४ वर्षाची कहाणी तिच्याच शब्दात लिहिली होती, अनेकांच्या विनंतीनुसार त्याचे लेखांक चालू ठेवीत आहे.

वर्ष १९४१, आम्ही उमरोळीत राहावयासआलो.
उमरोळी हे पालघर स्टेशन पासून तीन एक किलोमीटर अंतरावरील छोटे गाव आहे. आज ते रेल्वे स्टेशन आहे. त्याकाळी पालघर स्टेशनवर उतरून अथवा बैलगाडीने जावे लागे. आप्पांची बदली उमरोळी प्राथमिक शाळेत झाल्यावर आम्ही तेथे भाड्याने राहण्यासाठी घर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मनासारखे घर मिळेना. वर्षभरात दोन तीन घरे आम्ही बदलली. पहिल्यांदा श्री केशव पाटील यांच्या वाडी मधील एका छोट्या घरात आम्ही राहिलो. तो अगदीच आडवळणी भाग असल्याने काही महिन्यातच ते घर सोडावे लागले. पुढे गाव रस्त्यावर एका वाण्याच्या दुकाना शेजारी असलेल्या खोलीत जागा मिळाली. हे घर देखील छोटे होते, पण भर गावात होते. आप्पांच्या शाळेजवळ होते. म्हणून आम्ही ती खोली पसंत केली. तर लहान सहानअडचणी स्वीकारल्या. माझ्या दृष्टीने एक मुख्य अडचण होती. केवळ शाकाहारी भोजन बनवावे लागे. वाण्याला नॉनव्हेज वर्ज होते. मला तर मासे हवे असत. मासे खाण्याची आवड मला नानीकडे असल्यापासून होती. कारण नानीच्या हातचे कालवण म्हणजे पक्वान्न होते. ‘तवकट’ म्हणजे मातीच्या भांड्यात नानी मासे कालवण बनवीत असे. तिचा खास मसाला होता. आप्पांना मात्र शाकाहारी जेवण आवडे. शेजारी माझी मैत्रीण यमू हिला माझी अडचण कळली. मला मासे आवडतात परंतु घरात शिजविता येत नाही, यासाठी ती आपल्या घरी मासे शिजवून गुपचूप मला आणून देई. आप्पा शाळेत गेल्यावर हा व्यवहार होई. वाण्याला देखील याचा सुगावा लागत ‘नसे. कारण यमु माशांची भाजी एका बंद डब्यात घेऊन येई. सुरुवातीस आप्पांनाही याची कल्पना दिली नाही. कारण आप्पांना ते कळले असते तर त्यांनी माझी बिनपाण्याने केली असती व ताबडतोब हा आतबट्ट्याचा व्यवहार त्वरित बंद केला असता. एकदा यमुच्या कालवणाची चव घेतल्यावर आप्पांनीही आपली मूक संमती माझ्या या छुप्या कारवाईला दिली. माझी मासे खाण्याची हौस पूरली…वाणी बाबाला शेवटपर्यंत पत्ता लागला नाही!!
आज त्या दिवसांची आठवण झाली की गंमत वाटते. माझी कालवणाची हौस व यमुचे धाडस आठवून यमुच्या प्रेमाचे कौतुक वाटते. माझी ही प्रिय सखी आम्ही ऊमरोळी सोडेपर्यंत संपर्कात होती. आज कुठे असेल? माहीत नाही. कुठेही असो, सुखात असो!!
पुढे आमच्या नशिबाने श्री लक्ष्मण पाटील या उमरोळी मधील एका सधन सुसंस्कृत, आगरी गृहस्थांच्या बंगल्या शेजारील आवारात प्रशस्त घर आम्हाला मिळाले. तेथेच आम्ही खऱ्या अर्थाने स्थिरस्थावर झालो. या घराला तळ मजला व एक वरचा मजला असे भाग होते.दोन्ही मजले आमच्याच ताब्यात दिले होते . आम्हाला तळमजलाच पुरेसा होता. प्रशस्त स्वयंपाक घर, मोठा हॉल व बेडरूम अशी सोय होती. घरावर बाहेरून दर्शनी बाजूला पिसारा फुलविलेल्या मोराचे रंगीत चित्र होते. दिगू-बाळू आपले उमरोळीतील घर म्हणजे “मोराचे घर” असाच उल्लेख करीत. दोघांचाही जन्म बोर्डीत झाला असला तरी सर्व बालपण या ऊमरोळीच्या घरातच व्यक्तीत झाले. खऱ्या अर्थाने आम्ही येथे संसारीक जीवनाचा आनंद उपभोगला. सुंदर मोकळे घर, प्रेमळ शेजारी, आणि वडिलांप्रमाणे आधार देणारे आमचे घरमालक. त्यामुळे खूप समाधान होते. जीवन खूपच आनंददायी, फलदायी होते. दिगू बाळूच्या बाललीलांनी आम्हालाच नव्हे तर पाटील कुटुंबीयांनाही खूप आनंद मिळत होता. दोघांचेही बालपण ऊमरोळीच्या या घरात समृद्ध झाले आहे. आमच्या संपूर्ण संसारिक जीवनाचा तो परमोच्च आनंदी कालखंड होता. खडतर बालपण व विवाह नंतर सुरुवातीचे कष्टाचे दिवस यानंतर उमरोळी चा कालखंड म्हणजे अतिव समाधाचा होता.

आमच्या घराशेजारील दोन घरात आप्पांचे शाळेतील सहकारी पाद्ये गुरुजी, चित्रे गुरुजी राहत असत. पाध्ये एकटेच होते. त्यांचे लग्न व्हावयाचे होते. चित्रे गुरुजी आपली पत्नी, मुलगा अशोक व म्हाताऱ्या आईबरोबर राहत होते. त्यामुळे एकूणच माहोल खूप सौख्याचा असा होता.

लक्ष्मण पाटील हे एक घरंदाज गृहस्थ होते. मोठे शेतकरी होते. त्यावेळी ते सत्तरीत असतील. त्यांची पत्नी त्यावेळी निवर्तली होती. मोठे चिरंजीव नाना(वासुदेव) व त्यांची पत्नी ओबाय (गोदावरी), हेच सर्व कुटुंबाचा व्यवहार सांभाळीत. लक्ष्मण पाटील यांना नाना व्यतिरिक्त लग्न झालेले दोन मुलगे व दोन सुना होत्या. त्यांची नावे आत्माराम-भागू व नारायण-दुर्गा अशी होती. दोन मुली लग्न होऊन सासरी गेल्या होत्या. खूप समाधानी असे हे कुटुंब होते. लक्ष्मण आजोबांच्या दोन मुली अधून मधून माहेरी येत. त्यामुळे त्यांच्याशी आमचाही चांगला घरोबा झाला होता.

नानांची मुले म्हणजे दिनू, हरू, सुधाकर, फणींद्र व छोटा प्रकाश. नानांना तीन मुली होत्या. कमल मालती व सुमती. हा मोठा परिवार गुण्यागोविंदाने एकत्र राहत असे. नाना त्या वेळचे मॅट्रिक पास होते. भारतीय रेल्वे खात्यात पालघर स्टेशनवरच स्टेशन मास्तर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. अत्यंत सालस, दिलदार, देवभोळे असेच त्यांचेही व्यक्तिमत्व होते. आपल्या शिक्षणाचा, श्रीमंतीचा त्यांना कोणताच गर्व नव्हता. आम्हाला कोणतेही सहकार्य करण्यासाठी तत्पर असत.
नानांचे दोन लहान भाऊ शेतीवाडीत लक्ष घालीत. त्यांची मुले हरू, कृष्णा ,सुधा, फणींद्र हे दिगू बाळू चे सवंगडी, त्यांच्याशी खेळत. आम्ही तेथे असतानाच सुमती-मालतीची ही लग्ने झाली. आत्मारामची बायको भागू ही माझी समवयस्कर व जीवाभावाची मैत्रीण झाली होती. तिने मला त्या दिवसात प्रेम व विश्वास दिला. आपले मन माझ्याशी मोकळे करी. खूप सरळ साधी होती. बाळू खूप लहान होता. दिगु त्यांच्या वाड्यातच बहुत करून खेळत असे. त्यांच्या घरातच तो रांगत फिरत असे. भागू त्याचे कडे लक्ष देई. तिला मूलबाळ नव्हते. ती माझ्या दोन मुलावर जीवापाड प्रेम करी. दिगू, बाळूला भागूनने लहानपणी कडेवर घेऊन प्रेमाने फिरविले आहे. आम्ही उमरोळी सोडल्यानंतर थोड्याच वर्षात आत्माराम व भागू हे प्रेमळ जोडपे दुर्दैवाने अकाली गेले. दोघांच्या आठवणीने मला आजही गहिवर येतो. कोण कुठली माणसे, आयुष्यात कधी भेटली, प्रेम दिले ,जीव लावून गेली! आता पुन्हा कधीच न भेटण्यासाठी….?

ओबाय देखील खूप चांगल्या स्वभावाची व घरंदाज बाई होती. कधीही मदतीला तत्पर असे. आपल्या एकत्र कुटुंबाचा तिला गर्व होता. पती सुशिक्षित व चांगल्या नोकरीत असूनही स्वतः खूप कष्ट करी. सर्वांशी प्रेमाने, समजूतीने वागे. घरातील सर्व आर्थिक व्यवहार चोख ठेवी. दिगू, बाळू त्यांच्या घरातच जास्त वावरत असल्याने त्यांचेवरही खूप माया तिने केली आहे. कौतुकच केले.
दिगू लहान असताना थोडा स्थूल होता. पाटील कुटुंबीय त्याला ‘जाड्या’ या लाडक्या नावाने हाक मारीत. दिवसभर तो भागू, दुर्गा,ओबाय बरोबर असला तरी संध्याकाळी आप्पांची शाळेतून घरी येण्याची वाट पाहत असे. आप्पांना दारात पाहताच भागूच्याकडेवरून आप्पांकडे झेप घेई. दोन्ही हात हवेत उडवत पा..पा ..असे बोबडे बोल बोले. आप्पाही त्याला त्वरित कडेवर घेऊन घरात येत व दिगू बाळूला जवळ घेऊन त्यांच्याशी गप्पा मारिता. थोडा वेळ खेळवीत. आप्पांनाही शाळेतून आल्यावर, दोघांना पाहिल्याशिवाय चैन पडत नसे.

एके दिवशी या पाटील मंडळींना आप्पांची थोडी थट्टा करण्याची लहर आली. दिगूला खेळणी देऊन आमच्याच घराच्या माडीवर खेळत बसविले. आम्ही सर्व खाली आलो. आप्पा शाळेतून आले. त्यांना नेहमीप्रमाणे दिगू दिसेना. पाटील मंडळींनीही ..”आज दिगु आमच्याकडे आलाच नाही..” अशी बतावणी केली. मला हसू येत होते. पण मी गप्प होते. आप्पा कावरे बावरे होऊन, घराबाहेर जाऊन अंगणात व बाजूच्या बागेत शोध घेऊ लागले. दिगू दिसला नाही. बाळू शांतपणे घरात खेळत होता. त्यांचा धीर खचला. कासावीस झाले. तेव्हा जास्त वेळ न दवडता भागू आप्पांना माडीवर घेऊन गेली. दिगू तेथे खेळत बसलेला पाहून आप्पांचा जीव भांड्यात पडला.’ आप्पांची कशी थट्टा केली’, म्हणून सर्वजण हसू लागले. आप्पांनीही ते खेळकरपणे घेतले. बाळूच्या जन्मा आधी पाटील कुटुंबीयांनी दिगूचा खूप प्रेमाने सांभाळ केला. बाळूच्या जन्मानंतर दोघांचेही सर्वांकडून लाड होऊ लागले. खूप खेळीमेळीचे व कौटुंबिक प्रेमाचे ते दिवस होते.
दिगू, बाळू खूप समंजसपणे वागत. क्वचितच भांडत. एकदा आप्पांनी दोन लहान खेळण्यातल्या मोटारी दोघांना दिल्या. बाळूची गाडी हिरव्या रंगाची दिगूची निळ्या रंगाची. दिगुला हिरव्या रंगाची पाहिजे होती. बाळू ने पटकन आपली गाडी त्याला दिली. त्याची आपल्याकडे घेतली. बाळू जास्त समंजस होता.

चित्रे गुरुजी, पाध्ये गुरुजी, नाईक गुरुजी ही आप्पांची शाळेतील सहकारी शिक्षक मंडळी. तसेच गंगाधर,सोमा, दत्तू मिस्त्री, दत्तू वेडीकर ,नरसु ,परसु हे आप्पांचे विद्यार्थी देखील आमच्या घरी येऊन दिगु बाळूला खेळवीत. त्याचे लाड करीत. पाध्ये मास्तर, चित्रे मास्तर दोघांनाही आपल्या घरी घेऊन जात व त्यांच्याशी खेळत. मला माझ्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज भासत नसे.
विशेष म्हणजे उमरोळी सोडल्यानंतरही सर्व विद्यार्थी मंडळी आमचे बोर्डीचे घरी येत. चौकशी करीत. जुन्या आठवणी काढीत.
काही दिवसांनी माझ्या सासूबाई देखील उमरळीत राहावयास आल्या. आमचा भाचा, अंगूचा मुलगा बुधु ऊमरोळीचे घरी शिक्षणासाठी वर्षभर राहिला. त्याला शिकवावे ,अशी आप्पांची इच्छा होती. मात्र त्याचे मन उमरळीत रमले नाही. परत बोर्डीच्या शाळेत गेला.
उमरोळीची प्राथमिक शाळा मोठी होती. पहिली ते सातवी पर्यंतचे सर्व वर्ग तेथे होते. आठ नऊ शिक्षक असतील. विशेष म्हणजे आज देखील ही शाळा बोईसर पालघर मुख्य रस्त्यावर चांगल्या स्थितीत उभी आहे. जशी पूर्वी होती तशीआहे. आमची पुतणी सौ. आशा पाटील, बेन, हिचे सासर पंचाळी. ती देखील शिक्षिका असल्याने काही दिवस उमरोळीच्या शाळेत तिने काम केले आहे.आप्पांविषयी उमरोळीकरांच्या मनात आजही किती प्रेम व आपुलकी आहे याबद्दल ती आम्हाला नेहमी सांगत असे. बेन व तिचे यजमान दोघेही शिक्षकी पेशातून आज सेवानिवृत्त झाले असून पंचाळी गावातच छान बंगला बांधून समाधानाने राहतात. त्यांचा मुलगा गौरव आमच्या संपर्कात असतो. त्यामुळे ऊमरोळी गाव व गावकरी यांच्याशी आमचा संपर्क आहे.
उमरोळीच्या शाळेत राऊत नावाचे आणि दोन शिक्षक होते. एकाला काळ-राऊत तर दुसऱ्याला लांबा-राऊत असे संबोधित. आप्पांना वामन मास्तर म्हणत. त्याशिवाय सुतार, शृंगारपुरे, मापणकर, चित्रे ,पाध्ये , नाईक हे शिक्षक होते. मुख्याध्यापक खरे मास्तर होते. का कोण जाणे पणखरे मास्तर नावाने ‘खरे’ असले तरी कामाने ‘खोटे’ होते..आप्पांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करीत. कारण नसताना अपमानित करीत. आप्पा शिकवण्याच्या बाबतीत कुठेच कमी नव्हते, तरी कोणत्याही कारणावरून ते त्यांच्याशी वाद घालीत. मला वाटते आप्पांना विद्यार्थ्यांकडून मिळणारे प्रेम व सन्मान तसेच गावकऱ्यांनी दिलेली प्रतिष्ठा यामुळे खरे मास्तरांच्या मनात आप्पांविषयी असूया असावी. आप्पांचा स्पष्टवक्तेपणा व सत्याचरण हे देखील त्याला कारणीभूत असू शकेल. आपल्या अधिकाऱ्यांनाही स्पष्ट ते सांगण्यात आप्पांना कधीच भीती वाटत नसे. त्यामुळे प्रसंगी खरे गुरुजींनाही ते काही गोष्टी सुनावीत. आप्पांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत वरिष्ठांची हुजरेगिरी कधीच केली नाही. त्यामुळे त्यांना मनस्ताप झाला. मात्र आपला बाणा त्यांनी सोडला नाही. पण त्याचा फायदा आम्हाला व त्यांच्या मुलांना भविष्यात निश्चितच झाला आहे.
खरे मास्तर कधी कधी विक्षिप्त वागत. नेहमी संतापलेले रागावलेले असत. त्यांच्या चेहऱ्यावर क्वचित हास्य दिसे. मुलांवर ही ते सतत डाफरत असत. त्यामुळे मुलेही त्यांचे पासून दोन हात दूरच राहत. या उलट आप्पांभोवती मुलांचा घोळका असे. आमच्या घरी देखील ही मुले येत. दूरच्या गावाहून येणारी मुले पावसाळ्याच्या दिवसात घरी जाता न आल्यास आमच्याच घरी रात्री मुक्काम करीत. आम्हालाही त्यात आनंद मिळे.
खरे मास्तरांच्या स्वभावाचा गावकऱ्यांनाही त्रास होत असे. त्यामुळेच त्यांनाही खरे हेडमास्तर नकोसे झाले होते. काही पुढारी मंडळींनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करून हेडमास्तर खरे यांची उमरोळी शाळेतून बदली करविली. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांचे नंतर आलेले श्री घागरे गुरुजी हेडमास्तर हे खूप चांगल्या स्वभावाचे हुशार होते. आप्पांची गुणवत्ता व शिकविण्याचे कसब ओळखून त्यांनी आप्पांना नेहमीच आदराने वागविले. घागरे गुरुजींचा उमरोळी शाळेतील कालखंड देखील गुणवत्तेच्या व प्रगतीच्या दृष्टीने आदर्श गणला गेला आहे. उमरोळीकर घागरे गुरुजींचे नाव ही कौतुकाने व आदराने घेतात.
त्याच सुमारास मला वाटते १९४५ सालात महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचा देशव्यापी मोठा संप झाला. सर्व शिक्षकांना घरी बसावे लागले. पगारही बंद झाला. आम्ही मोठ्या अडचणीत सापडलो. परक्या गावात, दोन लहान मुले आणि उत्पन्नाचे साधन काहीच नाही. मोठा बिकट प्रसंग आला होता. पण सर्व उमरोळीकर ग्रामस्थांनी एकजुटीने आम्हा शिक्षकांना कोणतीही अडचण येणार नाही याची मनापासून काळजी घेतली. आम्हाला आधार दिला. कशाचीही तोशीस पडू दिली नाही. नाना काका हे गावाचे सरपंच होते. त्यांनी प्रत्येक शिक्षकाला दुध, तांदूळ किराणामाल, भाजीपाला, औषधे सर्व घरी आणून दिले. नाना काकांची(गावचे तत्कालीन सरपंच)मला खूप आठवण येते. ते मला मुली समान मानीत. “पोरी, कोणतीही अडचण आल्यास मला सांग, काळजी करू नकोस, ..” असे सांगत. किती प्रेमळ माणसे होती ती? खरोखरच तो दोन महिन्याचा खडतर काल आम्ही संपूर्णपणे गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे निभावून नेला. आज त्या दिवसाची आठवण आली की थरकाप होतो. बाळू तर केवळ दीड वर्षाचा होता. त्याला गाईचे दूध हवे असे. नाना काकांनी ते रोज पुरविले. गावकऱ्यांनी आम्हाला सहाय्य केले नसते तर? कल्पनाच करवत नाही…आमचे काय झाले असते..?
पुढे नाना काका बोर्डीसही आमच्या घरी येत. नंतर त्यांची दोन मुले परशु व नरसिंह आमच्या संपर्कात राहिले. कधी दिवस दोन दिवस राहून जात. काही वर्षांपूर्वी आम्ही ‘औदुंबरराची छाया’ हे आप्पांच्या आठवणीचे पुस्तक प्रसिद्ध केले. तेव्हा परशु ऊमरोळीहून खास बोर्डीस आला होता. पुस्तकांच्या काही प्रति नेऊन त्याने उमरोळीकरांना वाटल्या. आम्हालाही खूप बरे वाटते. आज त्यांचे हे दोघेही चिरंजीव हयात नाहीत.
असे दिवस आनंदात जात होते. संकटे आली पण ती निभाऊन नेली. जाऊ दे. गेले, ते दिवस गेले. ती माणसे गेली. मात्र कृतज्ञतेचे अमाप कर्ज आमच्यावर ठेवून गेली.. कधीही न फिटणारे कर्ज…त्यांच्या ऋणातच राहणे आम्ही पसंत करतो..…
आनंदाचा काळ भरभर जातो. कसा संपतो ते कळत नाही. उमरोळीचे दिवस तसेच गेले. आम्हाला पुन्हा बोर्डीस यावे लागले. ऊमरोळीकरांचा निरोप देखील घेता आला नाही. ती हकीकत पुढे….
पुढे भाग बारावा.




सुंदर वर्णन. सर्व चित्र डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे रहाते
दिनांक – १४/२/२०२६ –
विषय – मी मोठी आई बोलते. ..भाग ११
आप्पांनी उमरोळी येथे तीन वेळा घर बदलून केलेला प्रवास तसेच बोर्डी ते घोलवड संसाराची माहिती वाचून थक्क झालो.
उमरोळी येथील बंगला, यमूचे प्रेम, शाकाहारी ते मांसाहारी कालव्याच्या जेवण्याची आठवण आणि प्रशस्त स्वयंपाक घर, मोठा हॉल व बेडरूम अशी सोय असलेले “मोराचे घर” वर्णन ऐकून छान वाटले. तसेच बालपणीचे उमरोळी येथील लाभलेले सहकारी / शेजारी यामुळे दिवस चांगले गेले हे सुखद वाटले.त्यामुळे एकूणच माहोल खूप सौख्याचा असा होता असे आपण नमूद केले आहे हे वाचून आनंद झाला.
लक्ष्मण पाटील हे एक घरंदाज गृहस्थ. खूप समाधानी असे हे कुटुंब होते.
कै. आत्माराम लक्ष्मण पाटील, भागूचे यजमान. नानांचा अत्यंत सालस, दिलदार, देवभोळे असेच व्यक्तिमत्व होते. आपल्या शिक्षणाचा, श्रीमंतीचा त्यांना कोणताच गर्व नव्हता. ते कोणतेही सहकार्य करण्यासाठी तत्पर असत हे वाचून गर्व झाला.
नानांचे दोन लहान भाऊ आणि त्यांची मुले आणि इतर कुटुंबाला मिळालेले प्रेम व विश्वास व जीवापाड प्रेम हे कधीच न भेटण्यासाठी आणि विसरण्याजोगे होते.
आप्पांनाही शाळेतून आल्यावर मुलांवरील प्रेम आणि खूप खेळीमेळीचे व कौटुंबिक प्रेमाचे ते दिवस. छान मनाला भिडणारे वर्णन आहे यामध्ये काही शंका नाही.
विशेष म्हणजे उमरोळी सोडल्यानंतरही सर्व विद्यार्थी मंडळी आपल्या बोर्डीचे घरी येत. चौकशी करीत. जुन्या आठवणी काढीत. चांगली माहिती मिळाली त्याबाबत धन्यवाद.
उमरोळीची प्राथमिक शाळा मोठी होती आणि ती शाळा बोईसर पालघर मुख्य रस्त्यावर चांगल्या स्थितीत उभी आहे. जशी पूर्वी होती तशीआहे. आप्पांविषयी उमरोळीकरांच्या मनात आजही किती प्रेम व आपुलकी आहे याबद्दल माहिती सुंदर दिली आहे.
आप्पांविषयी असूया असावी. आप्पांचा स्पष्टवक्तेपणा व सत्याचरण हे देखील त्याला कारणीभूत असू शकते. आपल्या अधिकाऱ्यांनाही स्पष्ट ते सांगण्यात आप्पांना कधीच भीती वाटत नसे. त्यामुळे प्रसंगी खरे गुरुजींनाही ते काही गोष्टी सुनावीत. आप्पांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत वरिष्ठांची हुजरेगिरी कधीच केली नाही. त्यामुळे त्यांना मनस्ताप झाला. मात्र आपला बाणा त्यांनी सोडला नाही. पण त्याचा फायदा सर्वाना भविष्यात निश्चितच झाला आहे हे दिसून येते.
त्याच सुमारास सन १९४५ सालात महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचा देशव्यापी मोठा संप झाला. परंतू संपूर्णपणे गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे निभावून नेला.
आनंदाचा काळ भरभर जातो. कसा संपतो ते कळत नाही. उमरोळीचे दिवस तसेच गेले. नंतर आपणास पुन्हा बोर्डीस यावे लागले.
सरतेशेवटी सुंदर लेखन आणि दिलखुलास माहिती मनापासून भावली जे आम्ही कधीही विसरू शकणार नाही.
उमरोळी नजीक पंचाळी हे माझे मामाचे गाव आहे तेथे आणि उमरोळीलाही इतर नातेवाईकाकडे मी बालपणी म्हणजे अंदाजे सन १९५० ५१ पासून अनेक वर्षे नेहमी जात असल्यामुळे उमरोळी गावाविषयी मला बरीच माहिती आहे आणि एकंदरीत आपले सर्व लिखाण वाचून फार आनंद झाला.
आपल्या पुढच्या १२ व्या भागासाठी / प्रवासासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि असेच आपण नेहमी आनंदात राहा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो*
* पुन्हा धन्यवाद*
– *नरेंद्र हरीभाऊ राऊत, मधुकर नगर, दहिसर मुंबई*
———–