आमची मोठी आई भाग 4 

  सकाळी उठल्यावर मुख प्रक्षालन केल्यावर व चहा घेण्याआधी अशी वेणीफणी होते!

मोठीआईच्या शब्दात….

सर्वजण “बालपण देगा देवा..” म्हणतात, बालपणीच्या आठवणी खूप मजेच्या असतात असे म्हणतात, पण मला तसे वाटत नाही. केवळ दहाव्या वर्षी माझे वडील, ज्यांना आम्ही आप्पा म्हणत असू, गेले! त्यावेळी मी केवळ दहा वर्षाची व माझ्या मागील दुसरी पाच भावंडे वर्षा दीड वर्षाच्या अंतराने जन्माला आलेली.  सर्वात लहान भाऊ खंडू हा केवळ दहा महिन्याचा असेल.  

         आप्पांची मला काहीच ओळख नाही. त्यांचा चेहरा ही माझ्या डोळ्यासमोर येत नाही. मात्र पुढे लोकांनी आप्पांबद्दल जे सांगितले,त्यांचे एक दोन फोटो पाहिले त्यावरून ते कसे दिसत असतील याची कल्पना केली. लोकांनी सांगितलेल्या त्यांच्या  आठवणीवरून आमचे बाबा खूप कर्तृत्ववान होते. मात्र अल्पायुषी ठरले आणि त्यांचे कर्तृत्व फुकट गेले, एवढे कळले“

 “ शिक्षण जरी जास्त झाले नव्हते तरी शेतीचा त्यांचा खूप अभ्यास होता. प्रत्यक्ष अनुभव होता.  गावातील धनिकांच्या वाड्या ते विकसित करून देत. सन1900 च्या त्या काळात उंबरगाव जवळील वेवजी नावाच्या एका खेड्यात  पारशी धनिकाची बाग विकसित करून तेथे मुकादम म्हणून काम करण्याची नोकरी त्यांना मिळाली होती. करिता सहकुटुंब वेवजीला आले. त्यांनी बोर्डी गाव सोडला होता.  त्याकाळी असे परक्या मुलखात जाऊन अनोळखी माणसाची चाकरी करणे सोपे नव्हते.  गावातील इतर कोणीही गृहस्थ अशा प्रकारे बाहेर जाऊन शेतीचे काम करीत नव्हते. मला वाटते आमचे आप्पा समाजातील पहिले गृहस्थ जे बोलली सोडून असे दुसऱ्या गावात शेती व्यवस्थापनासाठी गेले. आप्पा धडाडीचे होते. त्यांनी तो निर्णय घेतला ,यावरूनच त्यांच्या स्वतःवरील विश्वासाची कल्पना येते.. त्या वाडीत ते मुकादम म्हणून काम करत होते. मुकादम म्हणजे त्या  सर्व प्रॉपर्टीची  शेतीवाडी, गुरेढोरे मालाची निर्मिती, पाठवणी व विक्री सांभाळून झालेल्या जमाखर्चाचे टिपण ठेवून, सर्व पोस्ट-बँकआर्थिक व्यवहार करून  मालकाला नफातोट्याचा हिशोब दाखवून मान्यता घेणे अशी कामे असतत. प्रॉपर्टीची पूर्ण देखभाल करणारा सर्वेसर्वा असा माणूस होता. आजच्या भाषेत ईस्टेट मॅनेजर म्हणता येईल  .पारशी मंडळी मुंबईत राहत.  सर्व व्यवहार मुकादमाचे हाती सोपवून त्यांच्यावर पूर्ण भरवसा ठेवून असत.  आप्पा याबाबत अतिशय चोख व प्रामाणिक असल्याने त्यांच्यावर मालकाचा पूर्ण भरवसा होता. आपल्या अल्प कारकीर्दीत आप्पांनी मालकाच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही.. आप्पा  गेले तेव्हा त्यांच्या पोस्टामधील खात्यात केवळ त्या महिन्याचा 25 रुपये पगार शिल्लक होता..   

   बोर्डी हून उंबरगाव ला जाताना वेवजी गावातील रस्ता. अजूनही हा भाग सुंदर वनराजीने नटलेला आहे. याच रस्त्याने मी घोलवडहून सिल्वासा येथील एचपीसीएल प्लांटमध्ये जात असे.

   आम्हालाही एक छोटे घर त्याच वाडीत दिले होते. आम्ही सर्व सहा भावंडे व आमची आई अक्का तेथे राहत असू. श्रीमंती नव्हती पण लक्ष्मीची कृपा होती.घर अन्नधान्याने भरलेले असे. गाईचे सुंदर सात्विक दूध प्यावल्यास मिळे. त्या दुधापासून बनविलेले लोणी वसत्वयुक्त  तूप मिळे. वाडी मधील फळफळावळ भरपूर असल्याने  खाण्या पिण्याची चंगळच होती. उसाचे पीक घेतले जाई.  उसाची गुऱ्हाळे  होती. त्यामुळे कधीही ताजा उसाचा रस भरपूर पीत असू. पारशी बाबा तसा दयाळू होता. आप्पांच्या प्रामाणिक कामामुळे दिवाळी सणाला आम्हाला काही गोडधोड मिठाई, कपडे देत असे. खूप आनंदात दिवस चालू होते. आणि …देवाला एवढे ही सुख पहावले नाही..

   …अचानक तो काळा दिवस उगवला. आप्पांना सर्दी पडशासारखा आजार झाला. त्यातून छातीत कफ झाला. अचानक त्यांना श्वास घेणे कठीण होऊ लागले..त्या छोट्या गावात त्यावेळी कोणती वैद्यकीय सेवाही नव्हती. शेजारच्या लोकांनी बैलगाडीत बसवून डहाणूच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. ॲम्बुलन्स नव्हती बैलगाडी हेच साधन. त्यामुळे वैद्यकीय उपचारास थोडा उशीरच झाला. केवळ आठवड्याभराच्या आजारात आप्पांनी या जगाचा निरोप घेतला..! आप्पा अचानक आम्हाला अनाथ करून निघून गेले!”

     “केवळ पस्तीशीची अक्का, दहा अकरा वर्षाची मी माझ्या नंतर पाच लहान भावंडे, वर्षाच्या आतीलछोटा खंडू, मधला पूर्णपणे मुका बहिरा भाऊ,..आकासाठी तर आकाश कोसळले …सर्वत्र अंधार पसरला… मात्र “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे….” हे खरेच आहे. वेवजी-ऊंबरगावची ती वाडी,घर  सोडावे लागले. बोर्डीला  यावे लागले. उजाड घर, दमडीचीही शिल्लक नाही. कुठला प्रॉव्हिडंट फंड _पेन्शन नाही. आम्हा सात जणांची पोटे कशी भरणार? ” दयाळू पारशी मालकाने थोडे पैसे अक्काला दिले पण ते किती दिवस पूरणार? ”

    “आमच्यासाठी कोण मदतीला येणार? आणि किती दिवस मदत करणार ?”  त्या दिवसांच्या परिस्थितीचा अंदाज आज घेणे खूप खूप कठीण. बालपणीच्या त्या दिवसांची आठवण झाली म्हणजे, आमच्या माऊलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत याची जाणीव होते. परमेश्वराने आमच्या आईला,आक्काला धडधाकट ठेवले ही त्याची आम्हा सर्व भावंडावर मोठीच कृपा. आक्का होती म्हणून आम्ही जगलो वाचलो. आमच्या आप्पांना नेऊन देवाने आमच्यावर मोठा अन्याय केला पण आमच्या अक्काला दीर्घायु देऊन त्याची अंशतः तरी भरपाई केली असे आज वाटते.देवाचे आभार मानते!

   “आमचे आप्पा गेले तेव्हा त्यांचे वय जेमतेम ३५; ३७वर्षाचे असावे. दुर्दैवी योगायोग म्हणजे आप्पांचे वडील.. आमचे आजोबा ही त्याच वयात, सात अपत्ये मागे ठेवून गेले होते. आप्पा व त्यांच्या भावंडांची बालपणी अशीच ससेहोलपट झाली होती. आमची आजी भागीरथी,(आप्पांची आई)खूप धीराची, कर्तृत्ववान बाई होती. आपल्या तिन्ही मुलींची लग्न करून देऊन, चार मुलांचे संसार तिने मार्गी  लावून दिले.  माझे आप्पा आणि काशिनाथ (गोपीनाथ दादांचे वडील) ही दोन मुले अकाली गेल्यावर त्यांच्याही संसाराची जबाबदारीही  तिने घेतली. गोपीनाथ दादा तर खरेच दुर्दैवी. आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर अवघ्याच काही दिवसात त्यांची मातोश्री ही देवाघरी गेली. प्लेगच्या साथीत ती दोघेही गेली.गोपिनाथ दादा अनाथ झाले.  या दुर्दैवी अजाण मुलाचा सांभाळ भागीरथीआजीनेच केला. अक्काचा संसारही तिलाच सांभाळावा लागला. स्वतःच्यातीन मुलींच्या संसाराकडे ही लक्ष द्यावयाचे होतेच. उरलेल्या दोन मुलांचे शिक्षण व त्यांनाही संसाराला मार्गी लावावयाचे होते. कसे केले असेल त्या माऊलीने हे सर्व? त्याकाळी प्लेग सारख्या साथीमध्ये घरातील करते पुरुष अचानक निघून जात व संसाराची सर्व जबाबदारी गृहिणीवर येऊन पडे. अशी अनेक उदाहरणे त्याकाळी आम्हाला पहावयास मिळाली. ज्यांच्या नशिबी  असे वैधव्य प्राप्त झाले त्या बायांनी मोठ्या धीराने कष्टाने व स्वाभिमानाने  परिस्थितीला तोंड देत मार्ग काढला. आपला व मुलांचा संसार नेटाने केला. माझी आजी व आमची अक्का अशाच कर्तृत्ववान गृहिणी होत्या .अशा सर्व बाजूंनी संकटात सापडलेल्या तरुण बायांना त्यावेळी खूप जपून राहावे लागे. आपले शील-चारित्र्य सांभाळीत कोणाकडेही हात न पसरता स्वाभिमानाने जगणे खूप कठीण असे. समाजातील कित्येक लोक त्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेण्यासाठी टपलेलेच असत.कित्येक बायका अशा प्रसंगात फसल्याआहेत. अक्का पुढे सासू भागीरथीचा  आधार व  आदर्श होता. तिने हार मानली नाही.. त्या दोघींचे कर्तुत्व आम्ही ज्यावेळी संसारात पडलो तेव्हा कळले, आजही कळते.,!”

  लहानपणी काही समजत नव्हते. मात्र आज  गत जीवनाचा विचार मनात येतो तेव्हा वाटते, नियतीने आमच्या पाटील कुटुंबीयावर एवढा अन्याय का केला? कळत नाही! आमचे आजोबा सर्व कुटुंब उघड्यावर टाकून 40 व्या वर्षी केले. आमचे वडील आम्हा सर्वांना निराधार करून 37 व्या वर्षी गेले. चुलत भावाचे आई-वडील तो केवळ काही महिन्याचा असताना गेले..  नशीबाने केलेली थट्टा नाही तर काय? पण हो त्याच देवाने आम्हाला भागीरथी सारखी आजी आई दिली आणि अक्का सारखी आई दिली..आम्ही संकटांच्या महासागरातून बाहेर आलो.. नियतीचे आभारच  मानते….

  “ आमचे सर्वात मोठे काका लक्ष्मण, (भाई मामाचे वडील) त्यानंतर काशिनाथ, (गोपीनाथ दादांचे वडीला), नंतर आमचे आप्पा व सर्वात लहान भाऊ म्हणजे दिनूकाका.. (डॉ. दीनानाथ चुरी). आमच्या तीन आत्या, सर्वात मोठी धाकू (चित्रकार हरीश राऊत यांची आई), मधली आवडी (चिंचणीच्या हरिश्चंद्र मामांची आई), व लहान मंगळी( कोंडयावरची मंगळी आतू).

आप्पा, काशिनाथ व आवडी तिन्ही अपत्ये अगदी अकाली  देवा घरी गेली. आमच्या आजीने ते सर्व प्रसंग मोठ्या धीराने घेतले. संसाराची वाटचाल करीत राहिली.“

 “ त्याकाळी प्लेगचा प्रादुर्भाव  खूप होता. काशिनाथ काका व  पत्नी हे दोघे प्लेगमुळेच गोपीनाथला पोरके करून अकाली गेले. आपली मुलगी धाकू व नातू अनाथ गोपीनाथ यांना एकाच वेळी या माऊलीने स्तनपान दिले आहे.

    स्वतःचा तीन मुलांचा संसार उध्वस्त झाला होता. कोणाकडून सहकार्याची सहानुभूतीची अपेक्षाच नव्हती. उलट आमच्या घरात प्लेगने दोन माणसे दगावल्यामुळे सर्व गावाने आमच्यावर बहिष्कार टाकला होता. ना कोणी आमच्या घरात येई, ना कोणी आम्हाला घरात घेई. अगदी किराणा मालाचे दुकानदार सुद्धा काही वस्तू विकत घेतल्यास पैसे दुरून फेकण्यास सांगत व वस्तू  अंगावर फेकत. दूर्दशेचे दशावतार  आणि काय पाहायचे राहिले? संकटे सत्वपरीक्षा पहात सतत येत राहिली .आम्ही सत्वपरीक्षा देत राहिलो पण शेवटी .. परमेश्वरी कृपेमुळे निभावून नेले. 

    वडील कै.देवाची बाळकृष्ण राऊत..आमचे आप्पा.

   प्लेगचा विषय निघाला आहे त्याबद्दल माझ्या काही स्मृती. बालपणी अनुभवलेल्या  त्या दिवसाबद्दल थोडे सांगते…

   साधारणपणे 19 सहाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील सांगली मिरज भागात अनेक साथी येऊन गेल्या .त्याची थोडी झलक आमच्या ठाणे जिल्ह्यालाही अनुभवयास मिळाली. विशेषतः  किनारपट्टीचा भाग त्यामुळे बाधित होत असे. आमच्या लहानपणी(१९३०-३५) अशीच प्लेग साथ आली होती. गावातील नातेसंबंधातील अनेक कर्ती सवर्ती माणसे त्या वेळी  मरण पावली. आमच्या कुटुंबातील गोपीनाथ दादाचे आई-वडील  दोघेही काही दिवसाच्या अंतराने मरण पावले .

     साथ नियंत्रणात आणण्यासाठी तत्कालीन संस्थानिक आणि ब्रिटिश सरकार आटोकाट प्रयत्न करीत. लोकांना सक्तीने गावाबाहेर काढून गावाबाहेरील छावण्यामध्ये रवानगी होई. त्यानंतर प्रत्येक घराचे निर्जंतुकीकरण केले जाई. मात्र आपल्या लोकांत असलेल्या अंधश्रद्धा, औषधोपचारास विरोध, यामुळे बळींची संख्या वाढत असे. मी लहानपणी अशा छावणीत राहिली आहे. आम्हा बाळगोपाळांना ती मोठी जत्राच वाटे. त्यातील गांभीर्य कळत नसे. प्लेगची साथ आली की उमरगांव देहेरीपासून दोन माणसे हातातील  थाळी वाजवत समुद्र किनार्याने.. “प्लेग आला घरे सोडा…” असे ओरडत बोर्डी घोलवड पर्यंत धावत धावत येत.पुढे बोर्डीची दोन माणसे तीच थाळी वाजवत पुकारा करीत चिंचणी पर्यंत जात. असाच प्रकार विरार आगाशी पर्यंत होई. त्यावेळी दुसरे कोणतेच संपर्काची साधने नसल्याने लोक एवढे कष्ट घेत. जागृती करून लोकांना गाव सोडवण्यास विनंती करीत . साथ पसरू नये म्हणून इशारा देत.

  त्याकाळी पुणे शहरात आलेल्या प्लेग च्या साथीत गावाबाहेरील अशी वसाहत. जीवन वास्तव्याची कल्पना येईल.

तरीही घरटी एक दोन माणसे दगावत. ज्या घरी प्लेगचा मृत्यू झाला त्या घरी कोणी जात नसे. त्यांना कोणाच्या घरी प्रवेश नसे. अगदी दुकानातील सामान देखील अंगावर फेकले जाई. आमच्या कुटुंबात दोन मृत्यू झाल्याने आम्हालाही गावाने बहिष्कृतच केले होते. खूप कठीण व धोकादायक दिवस होते. या आजारावर काहीच उपचार नव्हते. मृत्यूने केलेली सुटका हाच उपाय. गावाबाहेर तात्पुरता तंबू अथवा झोपडी उभारून राहावे लागे. साप विंचू सारख्या खतरनाक जनावरांचे भय असे. जे घरून आणले असेल तेवढेच खाण्यासाठी व्यवस्थित जातना केले जाई. जंगलात पालेभाज्या व काही कंदमुळेही जमा करीत असू. हा एक वेगळाच अनुभव. आम्हा लहान मुलांना त्यातील गांभीर्य कळत नव्हते मात्र सामूहिक जीवनाचा आनंद मिळत होता. गंमत वाटे, आमच्या वडीलधाऱ्या माणसांची दमछाक होत असे. आज आठवण झाली की शहारे येतात. आम्ही या सर्व दिव्यातून वाचलो ही देवाची कृपा. त्यावेळी सुरू झालेला हा प्लेग अधून मधून सुमारे 1940 पर्यंत  उद्भवत असे. नंतर त्याचे प्रमाण कमी झाले. आज सुदैवाने या रोगाचे पूर्ण उच्चाटण  जगातून झाले आहे असे कळले..

पुढील भाग लवकरच…