मोठी आई गेली. भाग ८

“मोठी आई गेली..” असे लिहावे लागते आहे. सात डिसेंबर २०२५ च्या पहाटेस संकष्टी चतुर्थीच्या ब्रह्ममुहूर्तावर मोठी आईने अगदी शांतपणे या नश्वर जगाचा निरोप घेऊन स्वर्गलोकीची वाट धरली. तिचं जगणं जेवढ नैसर्गिक होत तेवढच, भूलोकी दीर्घ प्रवास करून शेवटचा निरोप घेण ही तितकच सहज होत!!
जणू मृत्यूला तिने बजावले होते, “मी सांगितल्याशिवाय माझ्याजवळ फिरकू नकोस..”
यमराजही एवढा आज्ञाधारक की, गेली 104 वर्षे तो तिच्या आसपासही फिरकला नाही. तिने बोलावल्याबरोबर साथ डिसेंबरच्या पहाटेत्वरित हजर झाला.
कधीही हात जोडून न बोलणारी मोठी आई मृत्यूच्या आठवडाभर आधी, जेवतानाही ‘पुरे झाले’ सांगण्यासाठी हात जोडायची’ यातूनही तू बरी होशील..’ असे आम्ही म्हटल्यावर, हात जोडून, आता अधिक नको, सांगण्यासाठी हात जोडायची. तो काल पुरुषासाठी नमस्कार होता. त्याला आवतण होते. त्याने तिच्या विनंतीला मान दिला. सात डिसेंबर 25 रोजी पहाटे अलगदपणे तिला घेऊन तो स्वर्गलोकीच्या यात्रेस निघाला.…आमची मोठी आई गेली आता पुन्हा न येण्यासाठी!!
शनिवारच्या रात्री नेहमीप्रमाणे आपला चार चमचे पातळ पेजेचा आहार व दोन चमचे इलेक्ट्रॉल पाण्याबरोबर औषधाची गोळी घेऊन झोपली. झोपताना पुन्हा हात जोडून कसेबसे, “उद्या जरा उशिरा उठवा..”असे खुणावून झोपी गेली. ती झोप काळ झोप ठरली. उशिरा तर नाहीच पण कधीच उठली नाही …
पहाटे साडेचार पाच चे सुमारास तिच्या शैये शेजारी निजणाऱ्या सेविका सरस्वती ला शंका आली. आज आजी काहीच कशी हालचाल करत नाही? कोणता आवाज का करीत नाही? रात्रीत मला एकही हाक कशी आली नाही? म्हणून तिने उठून आजीला जोरात हाका मारल्या. हलवून पाहिले. अंग गार लागले. मला व मंदाला हाक मारली. आम्हीही धावतच त्या खोलीत येऊन मोठीआईला हाका मारल्या….शांत झोपलेल्या आजीला स्पर्श केला.. हलविले. काना जवळ, “मोठी आई मोठी आई ..” हाका मारल्या .. भांबवलेल्या स्थितीत शेजारी राहणाऱ्या परिचारिका गीताबाईंना हाक मारून बोलाविले. त्यांनीही काही वैद्यकीय चाचण्या घेऊन मोठी आई आता गेली ही निश्चिती केली. नेहमीप्रमाणे उजवा हात उजव्या कानशीला खाली घेऊन शांतपणे झोपलेल्या मोठ्या आईचा हात सोडवून तो निष्प्राण निपचित पडलेला देह सरळ करून वंदन केले. …
मोठी आईचे अशा जाण्याने कवियत्री बहिणाबाईच्या ओळींचा आठव झाला ,
“आला सास गेला सास ,जीवा तुझं रं तंतर,
जगन मरन एका सासाचं अंतर!!”
त्वरित आम्ही पुढचे सगळे विधी करण्यास लागलो. प्रथम आमचे भावजी बोर्डीचे अरुण भाई यांना फोन करून पाचारण केले. त्यांनीही मोठ्या आईच्या मृत्यूची खात्री करून घेतली. पुढील सर्व मार्गदर्शन केले.
जीवन किती क्षणभंगुर आहे आणि मृत्यू कसा अलगद येऊन जगण्याचे रूपांतर मरण्यात करतो, हे प्रत्यक्ष जवळून पाहिले!! जीवनाचा प्रत्येक क्षण किती अनमोल आहे, आपल्या प्रियजनांना कधीच का दुखवू नये, याचे महत्त्व कळते..
मोठी आईने आपला 105 वर्षाचा दीर्घ जीवनप्रवास अगदी झटकन आठ दिवसात आटोपता घेतला. एवढी वर्षे आपल्या स्वतःच्या पायावर उभी असलेली व आपली नित्य कर्मे स्वतः करणारी मोठी आहे केवळ आठ दिवस अंथरुणात राहिली. आमच्या हाताने जेवण भरवावे लागले, अंथरुणात निर्वावे लागले. मात्र यातून आपण उठण्याची आता शक्यता नाही, हे जाणवल्यावर तिने जगाचा निरोप घेणे ठरविले व रविवारी पहाटे जितक्या सहजपणे राहिली तितक्यात सहजपणे निरोप घेऊन निघून गेली.
असे मरणही सगळ्यांच्या वाटेला येत नाही कारण संतांनीच म्हटले आहे
जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर.
देह करी जे जे काही, आत्मा भोगीतो नंतर!
पिंजऱ्यातून पक्षी उडून जावा तेवढ्या सहजपणे मोठी आईने आपल्या देहातून आत्म्याला मुक्त केले. आयुष्यभरातील केलेल्या कष्टाचे, आपल्या संसारासाठी उपसलेल्या काबाडकष्टांचे व तिच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाचे फळ म्हणूनच तिला असे सहज मरण आले!!
तुकाराम महाराजांसारख्या जगद्वंद्य विभूतीलाही आपला “शेवटचा दिस” गोड होण्याची मागणी देवापाशी करावी लागली.विठ्ठलाने ती पूर्ण केली. मोठी आईने ही तिच्या श्री रामाला अशीच प्रार्थना केली असेल?
मोठी आई तर एक साधी सामान्य गृहिणी! आपल्या सततच्या संसार धावपळीत तिला अशी भक्ती करण्यास कुठून वेळ मिळणार? तिच्या तरुणपणी वटपौर्णिमेसारखे एखाद्या व्रत तिने अवश्य केले. आपल्या कर्मानेच भगवंताची पूजा केली. संसारगाडा ओढताना झालेले श्रम आणि जमेल तेवढा केलेला परोपकार हीच तिची जमेची बाजू. देवाने त्याची दखल घेतली. तिला अंतिम समयी कष्ट न देता अलगद उचलून घेऊन गेला..
या जगातील प्रत्येक आई आपल्या अपत्त्यासाठी स्वतःच्या सुखाची होळी करून मुलांना मोठे करण्याचा प्रयत्न करतेच. तोच आदर्श मातृ-पितृत्वाचा धर्म आहे! मला लिहिण्यास खरेच आनंद होतो की आमच्या आई-वडिलांनी तोच मानवधर्म आमच्या जडणघडणीत पाळला. आमच्या आयुष्याच्या वाटचालीत आई-वडिलांनी दाखविलेली वाट खूप महत्त्वाची व मोलाची होती .
जगाच्या बाजारात आम्हाला सक्षम पणे उभे करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीमुळे आमच्या आप्पांनी पायात साधी चप्पल ही कधी घातली नाही. सदैव स्वतः तयार केलेल्या खादीचे कपडे वापरले. आईने कधी दागिने वापरण्याचा वा छान छोकीने राहण्याचा विचार केला नाही. सदैव ती लंकेची पार्वतीच राहिली. प्रसंगी इतरांच्या शेतात भर पावसाळ्यात आवणी, रोपणी सारखी कष्टाची कामे केली. आता ही दोघेही परलोकवासी झाल्यानंतर उभयांच्या जीवनसाधनेची व त्या गट दिवसांची आठवण तीव्रतेने होते व मन दुखी होते. आप्पांनी तरी थोडे दिवस अधिक राहावयास हवे होते असे मनापासून वाटते!!
गुरुजींच्या शब्दात सांगावयाचे तर, आईबाबा आमचे गुरू आणि तेच आमचे कल्पतरू. केवळ मनुष्यावरच नव्हे, तर गाई-गुरांवर, फुलपाखरांवर, झाडा-माडांवर प्रेम करावयास त्यांनीच शिकविले. आमच्या कुटुंबातील कुत्री मांजरीच नव्हे तर अगदी कोंबड्यांना ही मजेदार नावे असतं. उभयतांनी आमच्या खडतर जीवनात सुगंध निर्मिती केली.आपली मुले चांगली निपजावीत म्हणून ते आम्हाला फार जपत. प्रसंगी कठोरही होत असत. गाई-गुरांवर, झाडामाडांवर त्यांनी खूप माया केली. शेजाऱ्यापाजाऱ्यांशी ते आस्थेने वागत. अगदी ठराविक नेमधर्म, व्रतवैकल्ये करीत.. केवळ कर्मकांडे करणारे कट्टर धर्मपंथी नव्हते.. आपल्या बोलण्यातून मुले जे शिकतात त्यापेक्षा जीवनातल्या वेगवेगळ्या अनुभवांतून ती अधिक शिकतात याची दोघांनाही जाणीव होती. आमचा जीवना प्रवाह स्वार्थ, अनिती, लोभ यांनी कधी गढूळ होणार नाही, तो सदैवनिर्मळ ठेवण्याचा त्यांनीआटोकाट प्रयत्न केला. आचार-विचारांचे सौंदर्य जीवनात किती असते ते स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले.
मी मराठी शाळेत असताना आमच्या बोर्डीतील घरा समोरील गांडीया काकाचे नकू, नारण गावात फिरून, रस्त्यावर पडलेले गाई गुरांचे शेण गोळा करीत. शेजारच्या बारशेतात शेणी बनवून विकीत. शेताचा मालक पावसाळ्याआधी राब करण्यासाठी शेण्यांचा ढीग विकत घेत. बदल्यात दहा-पंधरा रुपये देत. आप्पांनी मलाही त्यांचे बरोबर फिरून शेणी बनविण्याचे काम दिले. सुरुवातीला मला लाज वाटली. मी त्या कामास टाळाटाळ करू लागलो. आप्पांनी माझी चांगली कानउघाडणी केली.
“लाज वाईट कामासाठी वाटावी. कोणत्याही चांगल्या कामाला लाजू नकोस ..,”असा महामंत्र त्याच वेळी मिळाला. मी ते शेण गोळा करून शेणी थापण्याचे काम सुरू केले.. डोकीवर टोपले ठेवून, रस्त्यात पडलेले शेण उचलताना शेणा भरले हात घेऊन गावात फिरताना लाज निघून गेली. ती माझी पहिली कमाई आप्पांच्या हवाली करताना जो आनंद झाला तो पुढे एका बहुराष्ट्रीय कंपनीत मासिक लाखो रुपये पगार घेतानाही झाला नाही…
साताऱ्याच्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कॉलेजात “कमवा आणि शिका” योजनेखाली महाविद्यालयीन शिक्षणा घेत असताना वर्गातील मित्र-मैत्रिणींच्या समोर कॉलेजचे अंगण व बाग साफ करताना कधीच लाज वाटली नाही. आई-वडिलांचे संस्कार नाही तर आणि काय असतात??
मदत करताना जातीपातीचा विचार नको. नि:स्वार्थी सेवेचे अन् समाजसेवेचे धडे आई आप्पांनीच आम्हाला दिले. कोणाशीही गोड बोलावे.रडणाऱ्याचे अश्रू पुसावेत. मनुष्य अन्नावाचून जगेल, पण प्रेमावाचून जगणार नाही.’’ गरीबीत ही त्याग पूर्वक जगता येते हे त्यांनीच आम्हाला शिकविले आहे. आमच्या वामनाई धर्मदाय शिक्षण न्यासा तर्फे आम्ही परिसरातील सर्व जातींच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली.. कसलाच गाजावाजा जाहिरात केली नाही.
बोर्डीच्या घरानंतर घोलवडला मागे पुढे अंगण असलेले प्रशस्त घर आम्हाला लाभले. त्या घरा च्या मागील बाजूस दोन खोल्या बांधून गेली 25 वर्ष चार ते पाच विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीना रहाण्यासाठी विनामूल्य सोय केली आहे. प्रसंगी त्यांच्या पुस्तक ,परीक्षा खर्चासाठी आर्थिक मदत करतो. पुढे आमची कोसबाड वाडी घेतल्यानंतर तेथेही दोन खोल्या बांधून कोसबाड कॉलेजातील ४,५विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली आहे. आमच्या आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणी मुळेच हे करण्याची प्रेरणा मिळाली. “तुम्हाला जर शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागले तर आता चांगले दिवस आले आहेत तेव्हा कष्ट करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करा”, हे त्यांचे सांगणे असे.
मोठी आईला दीर्घ आयुष्य मिळाले हे सत्य, मात्र हे दीर्घायुष्य केवळ योगायोगाने अथवा दैवी कृपेने मिळालेले नाही. त्यासाठी तिनेही आयुष्यात काही मूल्यांचे आमरण पालन केले आहे, चांगल्या सवयी कधी सोडल्या नाहीत.
मोठी आईच्या दीर्घायुष्याचे पहिले रहस्य म्हणजे तिने केलेले अमाप कष्ट. अगदी बालपणी वडील गेल्यामुळे सर्व भावंडांचा सांभाळ करून पुढे काकांकडे, लग्न होईपर्यंत घर काम केले. काका काकूंनी खूप प्रेम दिले. तरीही शेवटी आई-बाबांचे लहानपणी मिळणारे प्रेम म्हणजे एक अमूल्य खजिना.. आठवणींचा आणि कौतुकाचा त्याला ही भावंडे अंतरली होती. ज्या वयात मौजमजा करायची लाड करून घ्यायचे तेव्हा यांना. काका काकूकडे पोट भरावे लागले. लग्नानंतरही संसार ओढग्रस्तीचाच होता. पाण्या पावसात लोकांच्या शेतात आवणी, रोपणी ही केली. आम्ही मुले शिकून नोकरीला लागलो तेव्हा कष्ट कमी झाले. या कष्टांमुळे शरीराला आरोग्य संपन्नता मिळाली त्याचा भावी आयुष्यात. खूप फायदा झाला.
दुसरे तिची आपल्या दैनंदिन आहारातील शिस्त. एखादी गोष्ट खूप आवडते म्हणून ताव मारा वा आवडती गोष्ट मिळाली नाही म्हणून संताप करीत बसा असे कधीच झाले नाही. कधीही अभक्ष भक्षण वा अपान पेये घेतली नाहीत. कधी आम्ही आणली तर गोड ताडीचा कप मात्र हौसेने घेई. चहाच्या कपात आमच्यापेक्षा तीन चमचे जास्त साखर व थंडीच्याही दिवसात कधीतरी वाडीलाल आईस्क्रीम हक्काने मागून घेई. प्रत्येक सीझनमध्ये मिळणाऱ्या रानभाज्या आणि रानमेवा मात्र आठवणीने आणावयास सांगे व आस्वाद घेई. आयुष्याच्या अखेर पर्यंत तिच्याआवडीच्या वस्तू आम्ही तिला देत राहिलो. साधेच पदार्थ, पण हा रसास्वाद तिची जीवनाची जगण्याची उमेद पकडून ठेवत असेल का? जेवण कोणतेही कसे असले तरी वेळच्या वेळी मिळावे ही अपेक्षा असे.
तिच्या आयुष्यातील दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे वेळेचे भान व सकाळी पहाटेचा निश्चित उठण्याच्या वेळेपासून ते रात्री दहा वाजता झोपेपर्यंत रात्री नऊला झोपेपर्यंत प्रत्येक कार्यक्रम वक्तशीरपणे होत असे. डोळे असेपर्यंत रोजचे वर्तमानपत्र वृत्तपत्रे पुस्तके वाचन तसेच टेलिव्हिजनच्या ठराविक मालिका पाहणे सुरू होते. दृष्टी गेल्या वर प्रतिभा रोज संध्याकाळी सहा ते सात पेपर वाचून दाखवी व गावच्या बातम्या पुरवी. त्यातही खूप आस्था होती.

रोज रात्री साडेआठ ते नऊ असा अर्धा तास मुंबई मुंबईस्थित लेक अरुणा फोनवरून संभाषण करी. जागतिक ते कौटुंबिक सर्व बातम्यांचा ऊहापोह होई. देश, समाज, कुटुंब यांच्याशी आणि यांच्याबद्दल वार्तालाप तिचा जीवनाबद्दलचा उत्साह वाढवत असेल का? ही बहिर्मुख वृत्ती तिचे साठी एक मोठा आनंदाचा ठेवा होता.
अगदी मृत्यूपूर्वी आठ दिवस पर्यंत सकाळी आठला सेविकेने ऊठेवल्यानंतर मुख मार्जन चहा झाल्यावर टॉयलेटची वारी असे. कढत पाण्याने स्वतः आंघोळ करी. वेणी फणी पावडर लेपन करून आवडती साडी नेसल्यावर न्याहारी व बरोबर एक कप दूध लागे. दहा ते एक पर्यंत थोडी विश्रांती झाल्यावर भोजन होई. त्यातही कोणत्या थाळीत किती तापमानाला पदार्थ द्यावेत याचाही लेखाजोगा होई. सकाळी व रात्रीच्या जेवणात एक केळे अथवा कोणते तरी फळ आवश्यक असे. पुन्हा दोन ते पाच वामकुक्षी व त्यानंतर कपभर चहा घेऊन पेपर ऐकणे, आलेल्या पाहुण्यांची अथवा सेविकांशी गप्पा. रात्रीचे भोजन नऊ वाजता व दहा वाजता झोपेसाठी प्रस्थान अशी अगदी काटेकोर दिनचर्या तिने शेवटपर्यंत पाळली.
कोणताही मानसिक त्रास अथवा टेन्शन तिने कधीच घेतले नाही. आयुष्यातील जीवाभावाच्या थोड्या व्यक्तींचे निधन पाहावे लागले. मात्र त्याचा अतीशोक न करता आपल्या मनाची शांती कधी हरवली नाही. कोणाशी कधी शाब्दिक चकमक झाल्यास दुसरी व्यक्ती आपली झोप घालवून बसे, मात्र मोठी आई रात्री नऊ वाजता अंथरुणात पडल्यावर सव्वा नऊला निद्राधीन होत असे. कोणाविषयीही सतत आकसाने मन कुरतडत ठेवणे, संघर्ष झाले असले तरी, कोणाविषयीही दीर्घकाळ कटुता न बाळगणे हेच तिच्या सुख-शांतीचे गमक होते. हीच का गीतेतील स्थित:प्रज्ञता?
तिचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जीवनाचा हव्यास व शेवटपर्यंत जपलेला आशावाद व सकारात्मक विचार. एखादे सुंदर फळ खाण्यात आल्यावर त्याच्या बिया अथवा कलम आमच्या बागेत लावण्यास सांगून त्याचीही फळे खाण्याची अभिलाषा १०४ व्या वर्षात होणारी केवळ मोठी आईच!! वृद्धपणी अंगावर घ्या सुरकुत्या दिसू लागल्यावर आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील नातवंडांकडे त्यावर औषध मागणारी वा केस गळती लागल्यावर ते थांबवण्यासाठी व लांब केसांसाठी स्पेशल तेलाचा शोध घेणारी केवळ आमची मोठी आईचं असू शकते..कारण एवढी प्रबळ जीवनेच्छाच माणसाला दीर्घायू देते.
एखाद्या व्यक्तीविषयी नाराजी असल्यास अगदी त्याच्यासमोरच फटकळपणे व्यक्त होणारी व त्याप्रसंगी अप्रियता घेणारी आमची मोठी आई, तिच्या तारुण्यात काय असेल याची कल्पना करावी. त्यामुळे किती अप्रिय झाली असेल याचाही अंदाज बांधावा!
दीर्घ आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी माणूस सदगुणांचा पुतळा असणे आवश्यक नाही सर्वसाधारण माणसाप्रमाणे गुणदोषांचा संगम असूनही माणसाला निरामय दीर्घायु मिळू शकते याचे उदाहरण म्हणजे आमची मोठी आई! तिच्या मनासारखे काही न घडल्यास आम्हा मुलावर अथवा सुनावर वापरणारी मोठी आई, नातवंडांच्या बाबतीत मात्र खूप हळवी होती. एखादे दुरस्थ नातवंड आजारी असल्याचे कळल्यास त्याच्यासाठी मनोभावे प्रार्थना करी. आणि ते जेव्हा भेटावयास तेव्हा त्याच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवीत ऊराशी घेऊन तिचे दृष्टीहीन नेत्र अश्रूमय झालेले कित्येकदा पाहिले आहे.

आपली तब्येत व आरोग्य याचा तिला सार्थ अभिमान होता, खात्रीही होती. डॉक्टर करमरकर बाई कधी “शक्तीसाठी इंजेक्शन देऊ का..?” असे विचारीत. ती त्यांना उलट पक्षी विचारी, “इंजेक्शन घेणे जरुरीचे आहे का? गोळ्या सीरप नाही का चालणार? डॉक्टरीण बाई इंजेक्शनची सुई परत आपल्या बॅगेत ठेवून देत.
तिचे दीर्घ आयुष्य व जीवनानुभव जेवढे अद्भुत तेवढेच तिच्या मृत्यू नंतर दिसलेले योगायोग थक्क करणारे..
केवळ शेवटच्या आठ दिवसात आपल्या प्रकृतीने दिलेला अंतिम इशारा लक्षात घेऊन, आता पुन्हा पायावर उभे राहणे शक्य नाही हे कळल्यावर तिने मृत्यूला आमंत्रण दिले. “मृत्यो, आता ये. मी तयार आहे”
केवळ आठवडाभरात त्याने विनंतिची दखल घेतली. अलगद झोपेत असतानाच तो तिला आपल्या सोबत घेऊन गेला. पहाटेचा मंगल ब्रह्म मुहूर्त, संकष्टी चतुर्थीचा शुभ दिवस, बरोबर त्याचवेळी योगायोगाने परदेशस्थ दोन नातवंडे गीता पठणा साठी बसली होती. प्राणहीन देहअग्नी अर्पण केल्यानंतर केवळ तासाभरात पंचतत्वात विलीन झाला. स्मशानभूमीवर हजर असलेल्या जाणकारांनी हे देखील एक आश्चर्य असल्याचे सांगितले. केवळ निकोप निरोगी देह एवढ्या लवकर भस्मीभूत होतो हे त्यांचे अनुमान. दुसऱ्या दिवशी पंचमी. सागराला महाउधाण असले तरी स्मशानभूमीच्या ओट्याला स्पर्श करून माघारी फिरणाऱ्या सागर लाटा त्या दिवशी उंच झेप घेऊन चक्क ओट्यावर पसरलेल्या बस भस्मीभूत देहाला आपल्यात सामावून घेऊन परत फिरल्या…. निसर्गानं सागर तीर्थात अस्थि विसर्जन केले.. जीवन मृत्युचे अंतिम चक्र पूर्ण झाले!!

मोठी आई अखेरच्या दिवसात तिच्या आईची, आक्काची सतत आठवण करीत होती. ‘माजी का’, ‘माझी आका’ असे काहीतरी बोलत राही. “माझ्या आक्काचे नाव चिमणी बाई होते तुम्हाला माहित नाही का?” असे आम्हाला विचारी. पूर्ण आयुष्यात आपल्या आई-वडिलांचे कधी स्मरण न करणारी मोठी आई त्या अंतिम पर्वात आपल्या मातेचे स्मरण का करीत होती तिची आई तिला शेवटच्या प्रवासात देण्यासाठी आली होती का? माहित नाही. तेही एक गूढ आहे. आक्का, मोठी आईची आई, हीचा फोटो हा एक जुना फोटो इथे दिला आहे.
तिच्या नेहमीच्या निजण्याच्या बिछान्या खाली सर्व नातवंडांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका मिळाल्या. त्या जमवून ठेवण्याचे काय कारण होते? सर्वांचे संसार सुखाचे आनंदाचे होऊ दे; ती सर्व माझ्या स्मरणात सदैव असू देत; असेच तिला वाटत होते का? माहित नाही.
मोठी आई गेली. अगदी सहज बोलता बोलता गेली. आरती प्रभूंनी म्हटल्याप्रमाणे तिचा शेवटचा प्रवास तिला हवा होता तसा झाला.
अखेरच्या त्या वळणावरती
मंद सुगंधी फुलोरा यावा.
थकले पाऊल हळूच उठावे..
आणि सरावा प्रवास सारा .. आणि सरावा प्रवास सारा ….
गरिबीतही आमच्या हृदयात जगाविषयी प्रेमाची भूक वडील आप्पा यांनी निर्माण केली. ती भूक शमविण्यासाठी लागणारा त्याग व दीर्घ सहवास आईने दिला!
शिक्षण तर कितीही कष्ट पडले तरी घ्यावेच लागेल. मोठे नाही झालात तरी गुणी व्हा, ही शिकवण आपल्या आचार विचारांनी दोघांनीही आम्हाला बालवयात दिली.
साताऱ्याच्या कर्मवीर भाऊराव यांच्या रयत शिक्षण संस्थेत रुजू व्हावे लागले. तेव्हा आप्पा, आई मला म्हणाले होते ‘‘तू घर सोडून जा. बाहेरच्या अफाट जगात जा. मेहनत कष्ट केल्याशिवाय काय मिळणार? स्वत:च्या पायावर उभा राहा. शिक्षण घेऊन घरी ये. आम्ही दोघे तुझ्याजवळ नेहमीच होतो व पुढेही राहू.”

त्यांच्या शब्दांनी प्रेरणा मिळाली. मागे फिरलो नाही.
‘देवाने असे थोर आई वडील आम्हांस दिले.. जगाच्या बाजारात असे मायबाप मोठय़ा भाग्याने मिळतात. आईच्या निधनाने आज दोघेही आम्हाला सोडून गेले आहेत. आम्ही त्यांची मुले या मोहमयी जगात कधी फसणार नाही, स्वार्थी लोभी विचारांनी चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत अशी पक्की शिकवण आम्हाला देऊन गेले. शिक्षणाचे सामर्थ्य काय असते याची जाणीव करून गेले.
आज दोघांचाही सहवास संपला आता आम्हा सर्वांसाठी दैवते ही माय, तात !!
या दैवतांची ती जिवंत असतानाही सेवा केली पुढेही त्यांची शिकवण अमलात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू .
मोठी आई व आप्पांच्या पुण्यस्मृतीला वंदन करून हे लिखाण संपवितो. ॐ शांती शांती शांती.
पुढील लेखात मोठी आईच्या निधनानंतर काही मित्रांनी नातलगांनी पाठविलेल्या प्रतिक्रिया देणार आहे .

इंदुमती राऊत कालवश




नमस्कार सर,
ओम शांती 🙏
इतकी वर्ष मातृछत्र लाभणे यासाठी नशीब लागतं. तुमच्या लेखनातून तुम्हाला याची जाणीव आहे हे लक्षात येतच.
असे प्रदीर्घ मातृछत्र लाभणं, मातृसुखाची जाणीव असणं, मातृऋण फेडण्याची इच्छा असणं आणि ओघवत्या शब्दात व्यक्त होऊन ते फेडण्याची कुवत असणं हे सर्व क्वचितच जुळून येतं.
आणि असा मिलाफ तुमच्या लेखणीतून वाचायला मिळणं हे आमचं परमभाग्य.
असेच लिहित रहा.
धन्यवाद 🙏
धन्यवाद शशांक. आपल्या समर्पक प्रतिक्रिये बद्दल आभार.
धन्यवाद शशांक. आपल्या समर्पक प्रतिक्रिये बद्दल आभार.
मोठी आई गेली… मन हेलावून टाकणारा लेख.. मोठ्या आईंचे शिस्तप्रिय दैनंदीन जीवन आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बाबत असणारे प्रेम सातत्याने लेखा मधून जाणवत राहते.. मृत्यू नंतर जीवन आहे की नाही ही संकल्पना वादातीत आहे परंतु मृत्यू नंतर ही आपली प्रिय व्यक्ती आपली काळजी घेते हे सत्य आहे…
MPlease accept our heartfelt condolences 🙏🏽May her soul attain Sadgati 🙏🏽
Aruna Borkar, Sakhalkar:
हा लेख ही खूप छान 🙏🏽💐
बंधू, खरच तुम्ही भाग्यवान भावंडे. तुम्हाला मातृ सहवास खूप वर्षे लाभला. आज आमचे आई-वडील जरी नसले, तरी त्यांची आठवण क्षणोक्षणी माझ्या हृदयात असते. त्यांना स्मरून प्रत्येक दिवशी मी मनापासून नमस्कार करीत असते. तुला देखील पुढे एकही दिवस असा आईवडीलांच्या आठवणी वाचून जाणार नाही. याची खात्री आहे. ते नसले तरी त्यांचा आशिर्वाद आपणास असतोच. त्यांच्या पुण्याई चा सर्वांना लाभ होतो. हे त्रिवार सत्य आहे. 🙏🌹🙏
काका, खरंच तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात. परमेश्वर आईच्या आत्म्यास शांती देवो.
ॐ शांती शांती शांती. 🙏
मी भाग 7 आणि 8 असे दोन्ही वाचले. तुमची आई तशी नशिबवान. एव्हड्या मोठ्या हुद्द्यावर काम करून सुद्धा प्रत्येक जण स्वतःचे वृद्धत्व विसरून मनोभावे आईची सेवा करत होता. असे भाग्य त्याच माऊलीला मिळते जिच्या कर्तृत्वाची जाणीव प्रत्येकाला असते. आईचा सहवास इतक्या वर्षे लाभणे हे जरा दुर्मिळ. त्यासाठी पूर्वजन्मीची कृती कामात आली असे म्हणावेसे वाटते. त्यांच्या आत्म्याला सदगती लाभलेली आहे. देवाला पण अशा लोकांची कदर असते.
मोठी आईचे आशीर्वाद आपल्याला तर मिळालेच. आम्हालाही मिळू दे ही देवाकडे प्रार्थना.