अमेरिकेत शिक्षण, फायदे धोके
व्यक्तीला शिक्षण का हवे? कारण त्यामुळे कौशल्य क्षमता व ज्ञान प्राप्ती होते. या गोष्टी उपलब्ध झाल्यास भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास व्यक्ती सक्षम होते.
गेली काही वर्षे मी माझ्या मुलांकडे अमेरिकेत येत असल्याने येथील प्राथमिक माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण पद्धती पाहता आली व काही ठळक वैशिष्ट्ये मला जाणवली. अनेक फायदे, मूल्ये आढळली. काही धोके कालानुरूप निर्माण होत असलेल्या समस्या ही जाणवल्या. आपल्या शिक्षण पद्धतीतून मी गेलो आहे आपणही बहुतेक जण गेला असाल. त्याची माहिती देण्याची गरज नाही. या छोट्या लेखात अमेरिकन शिक्षण पद्धतीचे मूल्यांकन करावयाचे नसून मला माझ्या अगदी तुटपुंज्या अनुभवावरून वाचनावरून आणि काही लोकांनी दिलेल्या माहितीवरून हे लिहितो आहे.
अमेरिकेतील हारवर्ड एमआयटी प्रिन्स्टन काॅर्नेल सारखी विद्यापीठे जगत् मान्य आहेत. तेथून अनेक विद्वान, विचारवंत शास्त्रज्ञ बाहेर पडले. आजही निर्माण होत आहेत. म्हणून येथील प्रत्येक विद्यापीठ त्या दर्जाचे नाही. या विद्यापीठातही अभ्यासाचा दर्जा चांगला असला तरी भारतातील काही विद्यापीठाप्रमाणेच रॅगिंग व शिस्त अभंगाचे अनेक प्रकार चालू आहेत. विद्यार्थी विद्यार्थिनी वसतिगृह कॅम्पसमध्ये मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ लागला आहे.
भारतातील हजारो विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याची धडपड करीत असतात. काहींना तेथे व्यवसायाच्या उत्तम संधी प्राप्त झाल्याने व तेथील नागरिकत्व व ग्रीन कार्ड मिळाल्याने तेथे राहण्याची संधी मिळते. त्यांची मुले अगदी प्राथमिक शिक्षणापासून येथेच शिक्षित होतात. ती देखील आपले भवितव्य येथे अजमावतात, मात्र अशा मुलांनाही सुरुवातीच्या कालखंडात अनेक तणाव यांना सामोरे जावे लागते कारण त्यांची मुळे भारतात असतात तर आता प्रत्यक्ष ते अमेरिकेत असतात .अशा मुलांना येथे एबीसीडी , म्हणतात….America Born Confused Desi! पालकांना खूप जबाबदारी घ्यावी लागते.
काही वर्षांपूर्वी भारतीय पालक आपल्या हुशार मुलांना कर्ज काढून अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवीत. त्यावेळी शिक्षणानंतर लगेच नोकरीच्याही संधी उपलब्ध असल्याने ही मुले भारतातील कर्ज वर्षभरात फेडून टाकीत. बऱ्यापैकी पैशाचा संचय करून शक्यतोवर अमेरिकेत अथवा पैसे जमवून भारतात परत येत. आपला व्यवसाय चालू करीत. आता परिस्थिती थोडी बदलते आहे.
अमेरिकेत शिक्षण घेऊनही नोकरीच्या संधी खूप कमी होत आहेत.अमेरिकेतही आता बेकारी जाणवू लागली आहे. लाखो रुपये खर्च करून जर येथे व्यवसाय, नोकरी नाही मिळाली तर भारतात परत जाणे सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडणारे नाही. नोकरीसाठी येथे लागणारा H2B visa देखील दुर्मिळ होत चालल्याने त्याचे शिवाय नोकरी शोधता येत नाही.सध्याचे अमेरिकन सरकार व राष्ट्राध्यक्ष यांची व्यापार विषयक धोरणे अनेक देशांना प्रतिकूल असून भारताचा ही त्यात नंबर आहे. त्यामुळे भारतीय व्यावसायिक व विद्यार्थी यांना अधिक अडचणी येण्याचा संभवत जाणवतो.
भारतापेक्षा येथील शिक्षण संस्था व शिक्षण अभ्यासक्रम नियंत्रण हे वेगळ्या प्रकारचे आहे. भूकंपट्टी पेक्षा विद्यार्थ्यांची चिकित्सक बुद्धी व स्वतंत्र बुद्धी अभ्यासासाठी त्यामुळे अभ्यासक्रमाचा ताण विद्यार्थ्यावर पडत नाही वर्षभर होणाऱ्या विविध चाचण्यातूनच अंतिम परीक्षेवर गुणांक दिले जातात.
अमेरिकेत शिक्षणाचे विकेंद्रीकरण झाले आहे. शिक्षण विषयक धोरण ठरविणे आणि त्याची अंमलबजावणी करणे याबाबत येथील राज्य सरकारे स्वायत्त आहेत. मात्र असे धोरण निश्चित करताना अमेरिकेच्या घटनेची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेणे राज्य सरकारला बंधनकारक आहे. सरकारने मंजूर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे काम अमेरिकेचे ‘स्टेट डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन’ हे करते.त्याप्रमाणे अभ्यासक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम राज्य सरकार करते.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या एकूण निधीपैकी 90% निधी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन तर दहा टक्के निधी अमेरिकन सरकार उपलब्ध करून देते .या देशात जवळजवळ 99 टक्के लोक साक्षर आहेत आणि शालेय शिक्षण हे सर्वांना मोफत आणि सक्तीचे आहे..
अमेरिकेत माध्यमिक शिक्षणात देण्यासाठी पब्लिक स्कूल ,खाजगी शाळा, आणि चार्टर स्कूल अशा प्रकारच्या विविध संस्था आहेत.
पब्लिक स्कूल म्हणजे शासन व स्थानिक प्रशासन यांनी चालविलेल्या शाळा तेथे शिक्षण फुकट असते. होणारा खर्च प्रशासन निधी व स्थानिक जनतेवर असलेल्या करातून केला जातो. जरी सरकारी शाळा असल्या तरी येथील शिक्षणाचा दर्जा ऊतम असतो. अधिकांश लोकांना या शाळेत आपल्या पाल्याला पाठविण्याची इच्छा असते. सुमारे 90% मुले ही पब्लिक स्कूल मधून शिक्षण घेतात.
खाजगी शाळा या सरकारी मदतीशिवाय चालतात.त्या आपला खर्च विद्यार्थ्या कडून आकारलेली फी व इतर देणग्या मधून जमा करतात. .त्यावर स्थानिक मंडळ देखरेख करते. बहुतेक शाळा या चर्च किंवा इतर धार्मिक संस्थेकडून चालविल्या जातात. त्यामुळे त्यांचे वर्चस्व शाळेच्या अभ्यासक्रम व नियंत्रणावर असते.
चार्टर स्कूल्स मध्ये शाळेचे चालक आणि शासन यांच्यात एक करार म्हणजे चार्टर झालेला असतो. त्याप्रमाणे या शाळांना काम करणे बंधनकारक असते .प्रवेश देताना विद्यार्थी निवडीचे काम शाळा करतात. अभ्यासक्रम ही शाळाच ठरविते. स्थानिक मंडळाचे नियंत्रण शाळेवर असते. शाळा अधिक उपक्रमशील अशा असतात.
साधारणतः 90% शाळा पब्लिक स्कूल असून बाकीच्या दहा टक्के प्रायव्हेट व चार्टर स्कूल असतात.
भारतात केंद्र सरकार,खाजगी संस्था, स्थानिक संस्था राज्य सरकार ,तर्फे अभ्यासक्रम शिकविले जातात. भारतात शिक्षणाचे कार्य हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या अधिपत्याखाली चालते. आपल्या घटनेनुसार शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. भारतातील विद्यापीठावर केंद्र किंवा राज्य सरकारचे नियंत्रण असते.आपल्याकडे खाजगी संस्थांचा वाटा 5% आहे..
एकंदरीत पालकांचा कल आपल्या मुलांना पब्लिक स्कूल मध्ये पाठवण्यास अनुकूल असतो. आणि त्याचे स्पष्ट कारण म्हणजे फुकट शिक्षण. शिक्षणाचा खर्च खूप आहे. हायस्कूल दर्जाच्या शिक्षणासाठी वर्षाला साधारणतः 10 ते 12000 डॉलर ,म्हणजे सुमारे आठ ते ते दहा लाख रुपये एवढा खर्च येतो. पब्लिक स्कूलमध्ये समाजाच्या सर्व आर्थिक व सामाजिक स्तरातील विद्यार्थी येत असल्याने एकूणच विद्यार्थ्यांची जाण व्यापक होते. विद्यार्थ्यांचा देशाप्रती व समाजाप्रती दृष्टिकोन व्यापक होतो.
या उलट खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी कमी असल्याने वर्ग लहान असतात. वैयक्तिक लक्ष मिळते. येथील अभ्यासक्रम शाळा व लोकल बोर्ड ठरविते. येथे मुख्यतः उच्च आर्थिक स्तरातील संपन्न वर्ग येत असल्याने विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन संकुचित राहायची शक्यता असते. आर्थिक निधीची उपलब्धता भरपूर असल्याने संसाधने व वैयक्तिक लक्ष अधिक मिळते.
याचा अर्थ प्रायव्हेट स्कूल ह्या उत्तमच असतात व पब्लिक स्कूल या दुय्यम असतात असा मुळीच नाही .कित्येक पब्लिक स्कूल अभ्यास व गुणवत्ता दृष्टीने प्रायव्हेट शाळांच्या पेक्षाही सरस ठरलेल्या आहेत. त्यामुळे विशिष्ट विभागातील पालकांना मुलाला शाळेत दाखल करण्याआधी येथील शाळा त्यांचे अभ्यासक्रम त्यांची गुणवत्ता व एकूणच गेल्या काही वर्षांतील शाळांचे निकाल इत्यादी सर्व गोष्टी तपासून मगच प्रवेश घ्यावा लागतो.
कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पब्लिक अथवा प्रायव्हेट स्कूल असे कोणाला प्राधान्य नाही. बारावी इयत्ता ही स्कूल लिविंग परीक्षा आहे त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश येतो.येथील महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रीया खूपच किचकट आहे. केवळ बारावी परीक्षा गुण धरत नसून विद्यार्थ्याचे शाळेतील परसेंटाइल (वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी विद्यार्थ्याच्या गुणांचे गुणोत्तर ),त्याच विभागातील इतर शाळातील परसेंटाइल, मागील दोन वर्षातील विद्यार्थ्यांचे गुण,ग्रेड्स, एक्स्ट्रा करीकुलर ऍक्टिव्हिटीज, सर्वाचा निकष लावला जातो. विद्यार्थ्याचे वाचन व भाषेवरील प्रभुत्व आजमावण्यासाठी तीन विषयावर इंग्रजी निबंध विद्यार्थ्याला लिहावे लागतात.त्याचाही अभ्यास केला जातो त्यानंतर प्रवेश निश्चित होतो..
बारावी परीक्षे नंतर विद्यार्थ्यांना शाळेतर्फे खास निरोप दिला जातो.त्यालाही ‘पदवीदान’ असेच म्हणतात.विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण संपते म्हणून ‘बारावी पदवीदान’, करीत असावेत. पदवी महाविद्यालयात चार वर्षानंतर होणारा पदवीधर व बारावीनंतरचा पदवीधर दोघांनाही तेवढ्याच दिमाखात पदव्या दिल्या जातात .
बारावीनंतरच्या प्रमाणपत्राला पदवी का म्हणावे, असा प्रश्न मला पडला होता. तेव्हा एका मित्राने गमतीदार स्पष्टीकरण दिले. म्हणाले, ”येथे सर्वसाधारण अमेरिकन विद्यार्थ्यांसाठी बारावी हेच शिक्षण असते त्यामुळे त्याला “पदवी” म्हणत असावेत!!
आम्ही नुकतेच आमच्या नातवाचे बारावी पदवीदान व नातीचा डिग्री-पदवीदान समारंभास हजर राहिलो होतो. प्रत्यक्ष अनुभव घेतला.

नातू प्राथमिक शिक्षण भारतात करून माध्यमिक शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. तेथेही दोन शहरात विविध हायस्कूलात त्याला शिकावे लागले. बारावीत आष्टीन मधील पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
त्याला ऑस्टीन विद्यापीठात कम्प्युटर-सायन्स विषयासाठी प्रवेश घ्यावयाचा होता. या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाचा निकष कमीत कमी सहा परसेंटाइल एवढी होती .मात्र भारतात अभ्यास केल्यामुळे व अमेरिकेतही दोन शाळांतून आल्यामुळे त्याचे पर्सेंटाइल तेवढे येत नव्हते. आम्हाला प्रवेशाची काळजी होती. पण त्याला पहिल्या यादीत प्रवेश मिळाला. हा चमत्कार कसा झाला ? त्यांने केलेल्या एक्स्ट्रा करीकुलर ऍक्टिव्हिटीज, लिहिलेले निबंध व त्यात मला कमी मार्क का पडले याचे दिलेले तारिक विवेचन, या सर्वांमुळे त्याला गुणात कमी असूनही प्रवेश मिळाला .हे ऑष्टीन विद्यापीठ कम्प्युटर सायन्स साठी जगातील नामवंत मानले जाते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्याची पद्धती येथे किती वेगळी आहे हे निश्चित.
प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रवेश व व्यवस्था यात कालानुरूप काही प्रश्न निर्माण होत आहेत.
मुख्य प्रश्न शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होते आहे. प्रवेश घेतल्यानंतरही मध्येच शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षाच्या तुलनेत वाढते आहे. येथील सरकार शिक्षण क्षेत्रात काळजीचा विषय आहे. .त्याबाबत योग्य उपाय योजना चालू आहेत.
विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य व सोशल मीडिया . खरे तर हा जागतिक प्रश्न आहे. आजच्या सोशल मीडियामुळे अनेक प्रकारचे योग्य-अयोग्य ज्ञान प्राथमिक वयातच विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. लहान वयातच मुले एका ताणतणावाखाली असतात.अमेरिकेत हा प्रश्न थोडा अधिकच गंभीर झाला आहे. कारण येथील कुटुंब व्यवस्था.
योग्य प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धी हा देखील मोठा प्रश्न आज पब्लिक व प्रायव्हेट शाळांना भेडसावतो आहे. आर्थिक क्षमता नसल्याने पब्लिक स्कूल्स शिक्षक भरती करू शकत नाहीत .प्रायव्हेट शाळांना मुले कमी असल्याने ते परवडत नाही. आजमितीस सुमारे चार लाख शिक्षकांच्या जागा संपूर्ण अमेरिकेत भरावयाच्या आहेत.
आजचे अमेरिकेतील शिक्षण हे जगात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानासाठी व त्यावर आधारीत उद्योगासाठी तोकडे पडते. बदल करावे लागतील. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारी शिक्षण व्यवस्था अजून निर्माण झालेली नाही.
देशाची आर्थिक सुबत्ता हा देखील हा शिक्षण क्रमात अडथळा आहे .त्यामुळे अनेक मुले लहानपणीच व्यसनाधीन गैरमार्गाला जाऊन शाळेकडे फिरकू पहात नाहीत.
येथील शिक्षण पद्धतीत, विद्यार्थी बारावी पास होऊन महाविद्यालयात शिक्षणासाठी गेल्यास शक्यतो घरून कॉलेजात जाण्यापेक्षा विद्यापीठाच्या कॅम्पस मध्येच(वसतिगृहात) राहणे पसंत करतो .कारण येथे फक्त क्लासरूम मध्ये दिवसा शिकविले जाते असेच नाही. 24 तास विविध प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम चालू असते. त्यामुळे घरी राहणारा विद्यार्थी कुठेतरी हरवल्या सारखा होतो. वेगळा पडतो. या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सहजीवनामुळे अनेक नको असलेल्या गोष्टींचा प्रवेश कॅम्पस मध्ये होतो आहे. मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर मुले व मुली करू लागली आहेत. आपल्या मैत्रिणीच्या वसतिगृहातील खोलीत रात्रभर मुक्काम करून तेथे धूम्रपान अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या वाढते आहे. मुलांचा व मुलींचा अथवा मिश्र असे गट विद्यापीठ प्रांगणात तयार होतात . ही मुले-मुली विद्यापीठात अथवा बाहेर मादक नशिल्या पदार्थाचे सेवन करून मजा करतात. नोकरी वा इतर व्यवसायासाठी आपापल्या गटातील मुला-मुलींनाच मदत करतात. विशेषतः श्रीमंत वर्गातील मुले येथे जास्त दिसतात .त्यामुळे अशा गटात सामील न होणारा विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी अलग पडून त्याला अथवा तिला मनस्ताप सोसावा लागतो. प्रसंगी शिक्षणालाही राम राम करावा लागतो. विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांची ही संस्कृती नसल्याने त्यांची खूपच कुचुंबणा होते. ती अडचणीत येतात. पाण्यात राहून माशाशी वैर न करता आपले साध्य मिळविणे खूप कठीण होते.
अमेरिकेतीलच एका सामाजिक संस्थेने येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे केलेले विवेचन..
“College students are one of the largest groups of substance abusers in the United States. Many turn to substances to deal with mental illness and academic stress, particularly using study drugs to help with their academics. Students are exposed to drugs because of party culture and Greek life, where substance abuse is much more common. Substance abuse impacts many of these students’ education, leading them to get lower grades and struggle academically. Long-term drug abuse often leads to long-term health problems as well. Universities and outside companies are beginning to educate students more about the dangers of substance abuse and addiction to help rectify the issue, and treatment centers are also working to help those with addictions recover. However, currently there are not many practices focusing specifically on the college student population.”
अमेरिकेत राहणाऱ्या काही भारतीय पालकांशी बोलल्यानंतर मला त्यांनी काही दाखले दिले. ही फक्त प्रासंगिक उदाहरणे आहेत. याचा अर्थ अमेरिकेत सर्व विद्यापीठात सर्वत्र अशी परिस्थिती आहे असे नव्हे.
एका पालकांनी आपले नाव न देण्याच्या अटीवर मला दिलेली ही माहिती खूप काही सांगून जाते.
एका भारतीय पालकांचा मुलगा ऑस्टीनविद्यापीठ वसतीगृहात राहून केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता.अतिशय हुशार असलेल्या या मुलाला त्याच्या चांगल्या ग्रेडमुळे संपूर्ण कॉलेज शिक्षण माफ झाले व इतरही काही सवलती मिळाल्या होत्या. कॉलेजात नंबर एक वर असणारा या विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षे नंतर उमेदवारी(Apprenticeship), करण्यासाठी वेगवेगळ्या उद्योगात अर्ज लिहिण्यास सुरुवात केली. जेमतेम एका केमिकल कंपनीने त्याला ही संधी दिली . त्याला ऑस्टीन बाहेर जावे लागले.. त्याने मोठ्या कष्टाने ते काम केले. त्त्याचे वर्गातील एक चिनी मुलगी जी अशा एका फ्रेंडशिप सर्कल मध्ये शामिल होती, तिला मात्र निरनिराळ्या कंपन्यांकडून अनैक ऑफर्स आल्या. वेतनही चांगले मिळाले. ही मुलगी दारू सिगरेट ड्रग्स या सर्व व्यसनांनी पूर्ण असून अभ्यासातही यथा तथाच होती. परंतु मित्रांवर केलेल्या प्रेमवर्षावामुळे त्याबदल्यात मित्रांनी अशाप्रकारे पांग फेडले. तुरळक का असेना पण हे प्रकार घडत आहेत.
दुसरे उदाहरणही तितकेच बोलके आहे.त्यांच्या परिचयातील एक भारतीय मुलगी दुसर्या विद्यापीठात कॅम्पस मध्ये राहून आपल्या डिग्री कोर्ससाठी पहिल्याच वर्षी आली होती. हुशार होती. वसतिगृहात तिच्या खोलीत तीन इतर मुली होत्या .सर्व इतर देशातून आल्या होत्या. एक अमेरिकन मुलगी त्यांची लीडर होती. रोज संध्याकाळी कॉलेजातून आल्यावर त्यांचा धिंगाणा सुरू होई. म्युझिक ,नाच,गाणे सुरू होईल त्याबरोबर धूम्रपान मादक द्रव्य सेवन व कधीतरी त्यांचे मित्रही त्यात सामील होत. या बिचाऱ्या भारतीय मुलीला तो त्रास सहन होत नव्हता. त्यांचे म्हणणे ,”तू आमच्यात शामिल हो”,. . तिला ते मान्य नव्हते .हा धिंगाणा वाढतच गेला. तिला तिथे राहणे असह्य झाले. वसतिगृह व्यवस्थापनही तेथे काही करू शकत नाही. शेवटी तिने दुसरी स्वतंत्र व्यवस्था केली. सुदैवाने तेथे तिला चांगले वातावरण मिळाले.मुलगी अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. जर वेळीच तिला दुसरे चांगले पर्यायी निवासस्थान मिळाले नसते तर या मुलीच्या अभ्यासाची व करिअरचे काय झाले असते? गंमत म्हणजे ही मुले अभ्यासातही कशीबशी पास होतात..नाही जमले तर सोडून देतात .त्यांना काहीच फरक पडत नाही.
शाळा कॉलेज वस्तीगृहा बाहेरही अनेक प्रश्न आहेत. अमेरिकेतही गरिबी असून बहुतांशी गरीब लोकांना शिक्षणाची आवश्यकता वाटत नाही. व्यसनाधीनता तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त दिसून येते .त्यामुळे येथेही विद्यार्थ्यांना मानसिक प्रश्न भेडसावत आहेत. विशेषतः पालक आपल्या मुलाच्या अभ्यासाचे बाबतीत उदासीन असतात. शिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांची जबाबदारी ठरते आहे. महाविद्यालयीन शिक्षण तर विद्यार्थ्याने आपल्या आर्थिक मदतीने करावे लागते.
निश्चितपणे आज अमेरिकन शिक्षण व्यवस्थेत काही आव्हाने निर्माण होत आहेत.
केंद्रीय सरकार व राज्यसरकारे यांना आता निश्चित शैक्षणिक धोरण ठरविण्याची गरज आहे .सर्व घटक राज्ये व केंद्रीय सरकार यात शैक्षणिक संवाद साधणे जरुरीचे होत आहे.
शाळांत प्रशिक्षित व त्याचप्रमाणे समर्पित (Dedicated),शिक्षकांची गरज आहे. येथील शिक्षण संस्थात अशा शिक्षकांची संख्या आज कमी होत आहे.
शिक्षणाची परिमाणे ठरवावे लागतील.त्याप्रमाणे पुढील धोरण आखावे लागेल. येणाऱ्या काळाची आव्हाने स्वीकारणारे शिक्षणक्रम निर्माण करावे लागतील.
पालक व एकूण समाज यांनाही मुलांच्या शिक्षणाप्रती आपलेही काही कर्तव्य आहे याची जाणीव करून द्यावी लागेल .
येथील केंद्रीय सरकार व राज्य सरकारे यावर आता प्राधान्याने विशेष लक्ष देत असून त्यात लवकरच अपेक्षित बदल घडून येतील ही अपेक्षा आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या व्यावसायिक क्षमता विकसित करणे हे देखील एक नवीन आव्हान आजच्या काळात येथे निर्माण झाले आहे.
शिक्षण घेण्यासाठी आर्थिक स्वालंबनासाठी विद्यार्थी झगडतो आहे. आणि दुसरीकडे काही विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षण घेण्याची ही गरज वाटत नाही.असे अगदी विरुद्ध टोकाचे चित्र आहे.अमेरिकेतील सामाजिक, सार्वजनिक शिक्षण व्यवस्था कुठेतरी दुभंगते आहे असे दिसते.
लाखो रुपयाचे कर्ज काढून आपल्या हुशार मुलांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवणाऱ्या पालकांनी आता विचार करण्याची वेळ येत आहे. अमेरिकेत चांगल्या विद्यापीठात पदवी घेऊनही नोकरीची शाश्वती राहिलेली नाही. त्याचप्रमाणे सध्याचे अमेरिकेचे प्रशासन भारतीय व्यापार उदीम व भारतीय विद्यार्थी यांना तेवढेसे अनुकूल दिसत नाही. याऊलट भारतामध्ये आज निश्चितच अनेक शैक्षणिक सुविधा,आय आय एम, आय आय टी, नवीन उद्योगक्षेत्रे वाढत आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतीय आर्थिक व्यवस्था ही सुमारे सात टक्क्यांनी वाढणारी आहे तर अमेरिकन अर्थव्यवस्था जेमतेम दीड टक्क्यांनी सुधारणार आहे .निश्चितच भारतात जास्त संधी उपलब्ध होतील यात शंका नाही. आपल्या मुलांनी भारतातील नव्या संधी शोधून तेथे आपले योगदान देणे सयुक्तिक होईल असे वाटते.
जगातील अनेक नामवंत म्हणतात ,’भविष्यातील औद्योगिक जगाची कल्पना भारताशिवाय संभवत नाही!’
बिल गेट्स तर म्हणतात,” आम्ही भारतीय इंजिनियर अमेरिकेत स्वीकारणे अमान्य केल्यास भारत स्वतःच पर्यायी मायक्रोसॉफ्ट कंपनी भारतात तयार करूशकतो!” त्यामुळे भारतीय पालक, विद्यार्थी व सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या देशात संधी प्राप्त करून दिल्यास ते सर्वांच्या फायद्याचे होईल.
धन्यवाद।
आपण केलेला अमेरिकेन शिक्षणाचा ऊहापोह भावला, सत्य परिस्थितीचे तुम्ही केलेले आकलन चांगलेच आहे ,पण हे आपल्या भारतीयाना पटेल का? कारण आजही परदेशाचे आकर्षण त्यातल्या त्यात आपल्या भारतीयाना अमेरीकेचे जास्तच आहे..
लेख खरच उदबोघक आहे, जय अमलात आणलं तरच!
आज हा अलैकिक लेख काका आपण शिक्षण क्षेत्रातील लेख लिहून पाठवून आपले मनापासून धन्यवाद मला वाचून मन प्रसन्न हि होते तर एवढा मोठा देशात ही शिक्षकाचे पद रिक्त आहेत..
आज आपला विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊ पाहतो आणि असा ञास सहन होत असेल तर.
आपला भारत देश सुखरूप सुरक्षित सु संस्कार शिक्षण क्षेत्रात आहे पण……धन्यवाद काका आपण या शिक्षण क्षेत्रात लिहून खूप सुंदर लेख वाचून मन प्रसन्न झाल आणि..बद्दल असलेल कल्चर
आपली माहिती संग्रह खूब चांगला आहे.