कै. वासुदेव काशिनाथ सावे, ती.भाऊ आठवणींचा विडिओ
ती. भाऊंबरोबर डिसेंबर २००२ साली अगदी घरगुती वातावरणात केलेले बोलणे. श्री रेकॉर्ड करत आहे आणि प्रभाकर सावे आणि दिगंबर राऊत बोलत आहेत. त्या नंतर दोनच महिन्यांनी भाऊंनी इहलोकीची यात्रा संपवली.
ती. भाऊंबरोबर डिसेंबर २००२ साली अगदी घरगुती वातावरणात केलेले बोलणे. श्री रेकॉर्ड करत आहे आणि प्रभाकर सावे आणि दिगंबर राऊत बोलत आहेत. त्या नंतर दोनच महिन्यांनी भाऊंनी इहलोकीची यात्रा संपवली.
भाऊंना पर्यटनाची खूप आवड होती, पण त्या वेळी पर्यटन ही प्रचलित संकल्पना नव्हती. तसेच, आई-भाऊंना त्यांच्या बीझी शेड्युल मधुन वेळ काढून फिरायला जाणे हे लक्झरी सदरात मोडायचे. दिगंबर भाईंची अंबेसीडर गाडी मिळाल्यावर आम्ही काही प्रमाणात फिरलो. सरोज, व आईच्या अजेंड्यावर वाटेवरील तिर्थक्षेत्र भेट असायची. भाऊंना मात्र तो कालापव्यय वाटायचा. कृषी विद्यापीठ भेटीमध्ये मात्र त्यांना आवडायच्या. पण तेथील लागवड बऱ्याच वेळा प्रायोगिक तत्त्वावर लहानशा क्षेत्रात केलेली असायची. त्या आधारे काढलेल्या निष्कर्षा बाबत मात्र त्यांना शंका असायची. विद्यापीठांमधील मोठे साहेब, दुय्यम साहेब, सुपरवायझर, त्याचा असिस्टंट या प्रकारची व्यवस्था त्यांच्या नजरेतून सुटायची नाही. आपसात बोलताना त्याची ते भरपूर थट्टा करायची. शेती करायची, संशोधन करायचे तर कसं, शेतीला थेट भिडायला पाहिजे! येथे साहेब काय, सुपरवायझर काय, नसती थेर!
भाऊ जरी विद्यापीठातील साहेबी संस्कृतीची थट्टा करायचे तरी त्यांच्या कामाचे काय आहे हे ते नेमके हेरायचे. वेगवेगळ्या विद्यापीठ भेटीमधूनच त्यांनी प्रेरणा घेऊन बटाटा, अननस, करटवली, परवर याची लागवड केली.
मला चांगले आठवते भाऊ पण न चुकता रोज सन्ध्याकाळी आ बरोबर गोठ्यात जाउन सर्व गाई ,बैल म्हशींची नीट चौकशी करायचे.आणि मला धारोश्न दूध प्यायला लावायचे.सकाळी tangyatun गावात जाताना जो पर्यन्त भाऊ बसत नाहित तो पर्यंत घोडे जागेवरून हलायचे नाहित.भाऊ बसले की मात्र घोडे लगेच निघत.आज जुन्या आठ्वणी ताज्या झाल्या.भाऊ आपल्या बरोबर आजही आहेत…आणि राहतील..????
तुम्ही सर्व व्यवसाय कामानिमित्त घराबाहेर पडले, शिरीष मामाचे लग्न झाले , आणि आई भाऊ सोबत मी राहू लागले. तेव्हा समज येण्याच्या वयात मी आले होतें.
भाऊंचे वाडीत वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग ऋतू प्रमाणे चालू होते. आपल्या जमिनीत आणि इथल्या हवामानात कोणीही ऊस आणि गहू चे उत्पादन करून पाहिले नोव्हते पण भाऊंनी ते करून दाखवले, नंतर नंतर सर्व कढधान्याचे प्रयोग केले चणे, भुईमूग, उडीद, मूग, वाल हे लावून पाहिले त्यात त्यांना यश आले, राई देखील लावायचे. बटाटा, गाजर, बिट हे उत्पादन देखील भाऊंनी आपल्या जमिनीमध्ये पहिल्यांदा काढून पाहिले. विशेष म्हणजे प्रत्येक लागवडीत त्यांना यश विकत गेलं.
भाऊंनी निवडलेली जमीन म्हणजे साक्षात जगतजननी होती. भाऊंनी काही पेराव आणि धरणी मातेने त्यांना आशीर्वाद द्यावे…
माझ्या जाणते पणात बोरिंग बसवले होते. विहिरीत पाणी भरपूर होते…बाबू, महादू शंकर, विष्णुमामा सारखी विश्वासाची माणसे हाताशी पकडून ठेवली होती. दिवस रात्र मेहनत, रात्रीच दुसऱ्या दिवशीच्या कामाचे डोक्यात नियोजन असे, थोवडीशी झोप झाल्यावर पहाटे लवकर उठून मोटार लावायची, दंडातून पाणी जायचे, कुठच्या खाचरात पाणी आवश्यक आहे याचे नियोजन रात्रीच करून स्वतः चिखलाचे बांध बांधायचे.
भाज्यांचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात काढत असत जसे वांगी, मिरच्या, कारली, पडवळ, शिराळे गळके, दूधी, टोमॅटो…याच्या राशीच्या राशी ओटीवर असायच्या…त्यावेळी 30 ,40 माणसे भाऊंकडे कामाला होती…सर्व भाज्यांचे वर्गीकरण होत असे…गोणी, पाट्या मध्ये माल भरला जायचा….प्रत्येक गोणी पट्याचे वजन, त्यावर ज्या व्यापाराला माल पाठवायचा आहे त्याचे नाव, टाकून, पावती वैगेरे बनवून, बैलगाडी मधून माल स्टॉप वर जायचा…मग तो माल यशवन्त भाऊंच्या ट्रॅक मधून मुंबईला रवाना होत असे..
ऋतु प्रमाणे भाज्यांचे उत्पादन भाऊ घेत असत थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर, पालक, मेथी, कोबी, फ्लॉवर, मुळे, अटकोल, रताळी हे देखील मोट्या प्रमाणात काढत असत,
मुळे काढल्यावर ते धुवावे लागत असत, पाण्याच्या बांधावर लाईनशिर बायका मुळे धुण्यासाठी बसत असत, हे दृश्य खूप मनोहर दिसायचे….
हळद बनविण्याचा पहिला प्रयोग आपल्या गावात भाऊंनी केला असावा. हळदीचे गाठे काढून, घुवून थोडे सुकल्यानंतर मे महिन्याच्या प्रखर उन्हामध्ये ती हळद कापून सुकवयाची (हळद कापण्यासाठी खास मोरल्या भाऊंनी बनवून घेतल्या होत्या) नंतर ती गिरणीत जाऊन दळायची, घरी आणल्यावर ती चाळून अर्ध्या, एक किलोच्या पिशव्यांमध्ये भरून मेणबत्तीच्या साहयाने चिकटवून नंतर विकायच्या.
कांद्याची आणि लसूण लागवडही मोठ्या प्रमाणात होत असे, जेव्हा कांदा सुकायचा तेव्हा त्यांच्या माळी बांधण्यासाठी मागेलदारी मोठा मांडव टाकला जायचा, कांद्याच्या मोठ्या मोठ्या राशी पडायच्या, मग ते साफ करून लहान मोठे कांदे वर्गीकरण करून माळी बांधल्या जायच्या, गोठ्याच्या बाजूला एक गोडाऊन बांधून घेतले होते, त्यात सरळ सरळ बांबू बांधून माळी टांगल्या जायच्या, खूप सुरेख दिसायचं..
पावसाळ्यात दोन तीन प्रकारचे भात लावायचे, भात लावण्या पूर्वी, राभ करायचा, हे देखील जोखमीचे काम असायचे, त्यावेळी नांगराने जमीन नागरावी लागे, बैल घरचेच होते..महादू, बाबूमामा नांगरणी करायचे..आवणीच्या वेळी जंगलातून माणसे आणली जायची…त्यावयात देखील भाऊ तासनतास बांधावर उभे राहून त्यांच्याकडून आवणी करून घ्यायचे…पाय पाण्यात उभे राहून पांढरे पडायचे, पायात काटे टोचायचे, पण कशाची पर्वा नसायची. रात्री गरम पाण्यात मीठ टाकून पाय शेकायचे, आणि पायातले काटे काढायचे..
सर्व जाती जमाती मधील माणसांना घरात बसवून त्यांचा मान राखत…शेती प्रमाणे बाहेरील समाजसेवा करणे हा देखील छंद होता, वाडीतील माल भरण्यासाठी टोपल्या, पाट्या, कणगा लागायचा (चटया, झाडू देखील) हे सर्व हरिजन वस्ती मधून यायचं, ते घरी घेऊन यायचे, त्यांचा योग्य मान राखला जायचा…त्यांना रोजगार मिळत असे…
सर्व कुटुंबाला पुरेल एवढे वर्षभराचे पोहे दरवर्षी भाऊ स्वतः (चिंचणीला पोहे गिरणी होती) गिरणीत जाऊन बनवून घ्यायचे… दोन मोट्या गोणी भरून भात पाण्याच्या टाकीत भिजवून ठेवायचे…आणि सकाळी लवकर गिरणीत जाऊन पोहे बनवून आणायचे.
From Tai Maushi by Prasad
भाऊ आपल्यात आहेत असेच वाटते. भाऊंनी आपल्यासाठी खूप केले आहे. मी तर नेहमी भाऊंच्या जवळ असायची.
मला आठवते भाऊ टांग्यातून गावातल्या बाजारात जायचे. बाजार लांब असल्याने मला बाजारात टांग्यातून नेऊन ठेवायचे. वांगी,मुळे, कांदे, टॉमेटो, कोबी, फ्लॉवर, फुले असा बाजार असायचा. बाजारात जाताना बरोबर यशवंत मामा असायचे. दोघे खूप गोष्टी करायचे आणि मध्येच बोलून जायचे की, मीनं माझ्या पोरींना आल्या वराला देणार आहे.
भाऊंनी शाळा, समाज मंदीर, सरकारी दवाखाना बांधण्यासाठी मदत केली. भाऊंना समाजकार्याची खूप आवड़ होती. भाऊंची वाडी पाहण्यासारखी होती. मांगेल्याच्या, महाराच्या, मुसलमानाच्या वाड्यात आणि आपल्या वाडीत जवळपास दहा एकर मध्ये वेगवेगळा भाजीपाला आणि ऊस लावायचे.
भाऊचे मित्र खूप होते, रोज कोणीतरी यायचे. भाऊ त्यांना वाडी दाखवायला न्यायचे. पिशवी भरुन भाजी द्यायचे. कोणाकडे कोणतेही कार्य असलं तरी भाऊंच्या वाडीत भाजी घ्यायला यायचे. दहा रुपयाचे विकत दिले तर तेवढेच फुकट द्यायचे.
भाऊंची वाडी अगदी राणीच्या बागेसारखी होती. ससे, मोर, हंस, बदक, टरकी, भेकर, पांढ-या, काळ्या, लाल कोसबाडी अश्या रंगीबेरंगी कोंबड्या असायच्या. शेजारी गावातील बरेचजण आपल्या लहान मुलांना दाखवायला घेऊन यायचे. लहान मुले पाहिली की, आई त्यांना पिकलेली केळी, चिकू, ऊस आणून द्यायची.
पूर्वीचे लोक म्हणायचे, ‘विहिर बांधून बघायची आणि एक लग्न करून बघायचे ‘, पण भाऊचे दोन भाऊ आणि सात मुले अशी नऊ जणांची थाटामाटात लग्न करून दिली. भाऊंना सर्व गोष्टींची घाई असायची, त्यांच्या मनात असेल तेच करायचे. मला विसावं वर्ष लागले आणि आई -भाऊ माझ्या लग्नाच्या गोष्टी करायचे. माझे लग्न अगदी तेवीस दिवसात केले.
प्रत्येक सणांला आई-भाऊ आम्हांला बोलवायचे. विभाचा जन्म झाला तेव्हा ‘मी आजोबा झाला’ म्हणून भाऊंना इतका आनंद झाला होता तसेच मला मुलगा झाल्याचे कळल्यावर पण खूप आनंद झाला. आई म्हणते, सकाळी लवकर उठले आणि आंघोळ करुन तयारी केली. आई म्हणाली कुठे चालले ? तर म्हणाले, माहीमला नातू बघायला चाललो. मग आईने घाईघाईत रस्सा करुन दिला आणि अकरा वाजेपर्यंत माहीमला आले. आम्हांला पाहिले आणि तिकडेच म्हणाले दवाखान्यातून आपल्या घरी यायचं, मी टांगा पाठवतो आणि मला सात दिवसांत तारापूरला नेले आणि जया आणि प्रसादचे बारसे केले.
आमची थोडीफार वाडी आणि शेत जमीन होती त्यावरच आमचे कसेतरी घर चालायचे. आमच्या भात शेतीसाठी भाऊंनी बैल जोडी आणि बैलगाडी दिली होती.
आमचे माहिमचे घर नाक्यावर असल्याने भाऊंना एके दिवशी विचार आला आणि भाईंना काय करुन दिले तर ते करतील? तुझे घर नाक्यावर आहे, दुकान काढून दिले तर चालवतील का? असे मला विचारले, मी ‘हो’ सांगितलं आणि लगेच भाऊंनी भाईंना बोलावून घेतलं, त्यांनी पण आपले मत सांगितले. लगेच भाऊंनी बंधुला सांगितले, मला शकुनला मदत करायची आहे. त्यावर बंधु लगेच म्हणाला, जे द्यायचे असेल ते शकूनला दया.
भाऊंची कार होती त्यातून लगेच माहीमला आले, जागा पाहिली आणि पाया खणायला सांगितला. पारशी वाड्यात जाऊन एकाचे घर मोडले होते त्याच्या विटांचे तुकडे टेम्पो भरुन पाठवले. चार पाच दिवसांनी त्याच घराच्या दारे, खिडक्या, पत्रे पाठवले. रेती – मातीने केबीन तयार केली, दोन चार फे-या केल्या आणि लगेचच दोन महिन्यात दुकान चालू केले. बाळमला सांगून तराजूकाटा,बरण्या द्यायला सांगितले. भाऊंनी किराणा सामान भरुन दिले, किराणा सामान टेम्पो सोबत शिरीष घेऊन यायचा आणि अश्या तऱ्हेने आम्ही दुकान चालू केले. भाऊंना खूप आनंद झाला. त्यांच्या मनात जे आले ते काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही.
काही वर्षांनी आमच्या जुन्या घरात सुधारणा करायचे ठरवले त्यावेळीही भाऊंनी जुने दरवाजे, खिडक्या आमच्या साठी नुसते पाठवले नाही तर ते बसविण्यासाठी तारापूरहून सुतारही पाठविले होते.
आई-भाऊ आणि सर्व भावंडानी आमच्यासाठी खूप केले आहे,ते मी कधीही विसरू शकणार नाही. भाऊ तुम्ही आता आमच्यात असायला हवे होते.
भाऊंच्या विनम्र स्मृतीस शतशः प्रणाम ?
खरेच , भाऊंकडे मी लहान असताना सर्व पाहिले होते त्यामुळे मला सुद्धा खुप सारे शिकायला मिळाले. माझ्या घरी कांदा चे बी , दुधीचे बी, वांगी चे, कारले चे बी बियाणे वाळवून काचेच्या बाटलीत भरने. माल्याच्या पट्टया बनवणे अशी अनेक कामे मला करावी लागतात.. ती आता मी सहज करू शकते .. आणि हे करत असताना नेहमीच मी भाऊंची आठवण काढत असते.. की ही कामे मी भाऊंकडे शिकली..