न्यू मेक्सिको, एक वेगळा अनुभव!

     यावर्षी देखील नातवंडांच्या पदवीदान समारंभ निमित्ताने अमेरिकेस जाण्याचा योग आला. सात मे रोजीऑष्टीन मुक्कामी पोहोचलो. 10 मे रोजी चि क्रिशा च्या पदवीदान समारंभास उपस्थित राहू शकलो. पुढे आठवड्याभरात चि. आर्यन चा बारावी ‘पदवि’दान समारंभही दिमाखात पार पडला. खूपच भव्य असा हा सोहळा असतो. पदवी देताना आपण समजू शकतो मात्र बारावी पास प्रमाणपत्र देतानाही तेवढाच सोहळा असतो.

  ज्या मुख्य कारणासाठी आम्ही आलो होतो ते साध्य झाले होते. बरे वाटले. आता गणपती बाप्पांचे दर्शन होईपर्यंत  आराम करावा म्हणून विसावलो होतो. तर प्रशांत-दीप्तीने न्यू मेक्सिको या शेजारच्या राज्याचे आठवडाभराचे पर्यटन करण्याचे प्लॅन तयार केले. अगदी थोड्या वेळेत त्यांनी निर्णय घेऊन तो अमलात आणला होता!

   आज पावेतो बरीच भ्रमंती झाली आहे. व्यवसायानिमित्त एकटा वा सहकुटुंब, भारतात व परदेशात भरपूर फिरणे झाले आहे. आपल्या या पृथ्वीच्या विशाल भूप्रदेशाची व्याप्तीच इतकी आहे की“… फिरशील किती दो पदांनी ?” अशी स्थिती होते

    फिराल तेवढे थोडेच. जोपर्यंत पर्यटनाचा आनंद घेता येतो तोपर्यंत फिरून घेऊ या असे वाटते! पर्यटनाच्या फायद्याबद्दल काय बोलावे? आपल्या महान संतांनीच त्याचे महत्त्व पूर्वीपासून सांगून ठेवले आहे.

         सृष्टीमध्ये बहुलोक, परिभ्रमणे कळे कौतुक!!

  पृथ्वीवर अनेकविध संस्कृती होत्या आहेत आणि  पुढेही होतील त्यांची ओळख आपण फिरल्याशिवाय कशी होणार? आणि ती नाही झाली तर आपण  मानवी जन्म घेऊन काहीतरी गमावले हे निश्चित !!

    परिभ्रमणाची आवड असावी हे तर खरे पण त्यासाठी खर्च करण्याची परमेश्वराने ऐपत ही द्यावी, आरोग्य मिळावे अशी प्रार्थना करीत राहावे!! 

    मला खूप ठिकाणी फिरायची संधी मिळाली. आणि त्या संधीचं मी पुरेपूर चीजही केलं. माझ्या ब्लॉगवर आठवणी लिहून ठेवता आल्या. अनेक मित्रांशी त्या शेअर करता आल्या. त्यांनाही आनंद देऊ शकलो .अनेक देश फिरल्यानंतर जाणवलं ते एकच, माणसं वरून जितकी वेगळी वाटतात, तितकीच ती आतून एक सारखीच असतात!

     वेगवेगळ्या भाषा संस्कृती धर्म पंथ असलेल्या या जगात फिरता आल्याने मनाची विशालता वाढते. संकुचितपणा नाहीसा होतो. मन सहिष्णू होते. विविध चवीचे पदार्थ चाखून रसना तृप्त होते हे सर्व खरेच आहे. शिवाय त्यामुळे निसर्ग सौंदर्याचा एक आगळा वेगळा साक्षात्कार होऊन निसर्गापुढे आपण मानव किती शुद्ध आहोत ही जाणीव ही तीव्रतेने होते. आपल्या देशाविषयी सार्थ अभिमान जागृत होतो.आपण मानव म्हणून व एक देशवासीय म्हणून आपले कर्तव्य काय हे स्पष्ट होते .

   दीप्ती- प्रशांत यांनी न्यू मेक्सिको राज्य का निवडले? हे आमच्या हद्दीलगत चे राज्य, व दुसरे म्हणजे न्यू मेक्सिको राज्याची इतर सर्व घटक राज्याहून वेगळी संस्कृती व ओळख! अतिविशाल असा प्रदेश.  बहुतेक दर्या-टेकड्या पर्वत आणि लहान लहान झुडपे व रानफुलांनी व्यापलेला !अमेरिकेचे खूप जुने असे घटक राज्य. येथील इतिहासही तसाच मजेशीर. जुना इतिहासही जपून ठेवलेला त्याचे जमेल तेवढे दर्शन घ्यावे व आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीशी त्याचे कुठे धागेदोरे जुळतात का, हे ही पहावे असाच त्यांचा होरा होता!

   यावेळी आमचे बरोबर श्रीदत्त-स्वाती कुटुंब नव्हते. त्यांची उणीव खूप भासली!

    चला तर मग आम्हाला दिसलेल्या न्यू मेक्सिको चे स्थळ-दर्शन करायला!! 

     दगड-धोंड्या बरोबरच अशी नाजूक सुंदर फुले ही या प्रदेशात सापडतात!

     मेक्सिको हा देश असताना राज्याला न्यू मेक्सिको हे नाव का? 16 व्या शतकात येथे राज्य करणाऱ्या स्पॅनिश लोकांनी असे नाव दिले. शेजारील मेक्सिको देश व हा प्रदेश यात बरेच साम्य आढळल्याने त्यांनी या भागाचे नाव ‘न्यू मेक्सिको’ असे केले.

   न्यू मेक्सिकोचा इतिहासही खूप जुना. काही लाख वर्षांपूर्वीचा आहे. मात्र ज्ञात इतिहास काही हजार वर्षांचा आहे. ‘अकोमा प्युबलो’ ही येथील मोठी व जुनी जमात. अपाचे ,नवाजो अशा इतरही अनेक जमाती होत्या. प्रत्येक वंशाचे काही उपवंशही होते.सोळाव्या शतकात येथे स्पॅनिश राज्यकर्ते आले आणि त्यांनी या प्रदेशावर सुमारे तीनशे वर्ष राज्य केले. पुढे 19 व्या शतकात मेक्सिको देशाने हा प्रदेश आपल्या राज्यात सामावून घेतला. 1848 साली अमेरिका मेक्सिको युद्धानंतर हा भाग अमेरिकेचा झाला. 1912 साली हे अमेरिकेचे 47 वे घटक राज्य झाले. या राज्याची संस्कृती म्हणजे अनेक संस्कृत्यांचे बेमालूम मिश्रण झाले आहे. भोजन, संगीत वास्तुकला यात ते प्रकर्षाने दिसते त्याची प्रत्यक्ष झलक पाहण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत!

 पहिला दिवस:

   पहिल्या दिवशी ऑष्टीन ते अल्बुकर्की हा सुमारे साडेनऊ-दहा तासांचा प्रवास करावा लागला. सकाळी आठचे सुमारास निघालो. नाश्ता, जेवण, ड्रायव्हर-अदलाबदल अशी विश्रांती घेत संध्याकाळी सहा चे सुमारास मुक्कामावर आलो. प्रशांत दीप्ती या दोघांनीच गाडीची कमांड घेतली होती.

   अल्बुकर्की हे न्यू मेक्सिको राज्याचे एक प्रसिद्ध शहर आहे.तेथे राहून आजूबाजूच्या प्रदेशाची भ्रमंती  करणे  सोपे होते. म्हणून येथे राहण्याचे ठरविले होते. आमचे  हे निवासस्थान  हॉटेल अथवा रिसॉर्ट नाही. आम्हाला सहा जणांसाठी हॉटेलच्या तीन खोल्या घेणे भाग होते. म्हणून अल्बुकर्की मधील  एक स्वतंत्र बंगला आठवड्या करीता घेतला होता. अमेरिकेतील ‘AIR BnB’,ही कंपनी ग्राहकांना अशा रीतीने कोठेही हवे असलेले तात्पुरते निवासस्थान उपलब्ध करून देते. ही घरे वैयक्तिक मालकीची असतात. मात्र मालक कंपनी बरोबर करार मदार करून काही काळासाठी आपले घर हस्तांतरित करतात. हीच घरे कंपनी ग्राहकांना देते. घरामधील व्यवस्था व जागतिक वाखाणण्याजोगी असते सर्व सोयींनी घर सुसज्ज असते. खूप सुंदर व्यवसाय कल्पना असून ग्राहकाला आपल्या मनाजोगत्या निवासस्थानात राहता येते. सर्वजण आपल्या घरातच असल्याचा आनंद घेतात. अगदी फाईव्ह स्टार हॉटेलातही असा आनंद मिळत नाही.

   गाद्या पलंगासह सोई ,जेवण बनवण्यासाठी गॅस व शेगडीसह सुंदर किचन,आवश्यक क्रोकरी, बसण्यासाठी सोफा सेट खुर्च्यासह प्रशस्त हॉल, वॉशिंग मशीन, बार्बेक्यू करण्यासाठी मागील पटांगणात मशीन व टेबल खुर्च्या त्यामुळे आपणास हवा तसा  ब्रेकफास्ट व जेवण बनविता येते. अर्थात प्रत्येक खोलीत टीव्ही व एअर कंडिशनिंग असतेच. 

    आमचे हे तात्पुरते घर थ्री बेडरूम, किचन, हॉल एवढे प्रशस्त होते.

  अल्बुकर्की शहरातील आमचे तात्पुरते निवासस्थान

    दीप्ती व क्रिशा दोघीनी दैनंदिन फिरतीचा कार्यक्रम ठरविला होताच त्यामुळे बरे झाले. अगदी ऑटोपशीर व भटकंती बरोबर विश्रांती देणार होता.

  दुसरा दिवस:

   पहाटे लवकर उठून ब्रेकफास्ट आटोपून आम्ही ‘सांता फे’, या शहराच्या दर्शनासाठी सकाळी आठ वाजता प्रस्थान ठेवले.

   सुमारे तीन एक तासाचा दीर्घ प्रवास होता परंतु येथील रस्ते व वाहतूक व्यवस्था सुंदर असल्याने प्रवास छान झाला 

      सांता फे हे शहर न्यू मेक्सिको राज्याची राजधानी आहे .या शहराला चारशे वर्ष जुना ईतिहास आहे. अमेरिकेत या शहराचा उल्लेख कौतुकाने ‘’सिटी विथ डिफरन्स’”- आगळे वेगळे शहर असा केला जातो. अमेरिकेतील मोठ्या शहरात याची गणना केली जाते . सिटी विथ डिफरन्स  होण्याचे कारण ही तसेच आहे चारशे वर्षांपूर्वी उदयास आलेल्या येथील अनेक नागर संस्कृती तसेच त्याचवेळी जगाच्या इतर भागात असलेल्या मानवी संस्कृती आणि आज येथील अमेरिकन संस्कृती अशा अनेक विभिन्न संस्कृतींचा संगम येथे झालेला आहे. हस्तव्यवसाय, शिल्पकला, पेंटिंग, म्युझिक माती काम फोटोग्राफी शिक्षण व्यवस्था अशा अनेक कलांचे वैभवी विश्व येथे पसरले आहे. थोडक्यात गतकाल व वर्तमानकाळ यांची सुंदर सांगड  झालेली पहावयास मिळते. त्यामुळे या शहराला एक वेगळेपण येते व भारदस्तपणा आहे. जुन्या संस्कृतीच्या पाऊल खुणा शहराने जपून ठेवल्या असून येणाऱ्या पर्यटकांसाठी त्या नेहमी उपलब्ध आहेत. या शहरात सुमारे अडीचशे विविध म्युझियम्स आहेत . खवय्या साठी जगातील विविध खाद्यपदार्थांचा स्वाद येथील रेस्टॉरंट मध्ये घेता येतो.  रसिकांसाठी संगीत नृत्याच्या मैफिली ही होतं असतात.

        नॅशनल म्युझियम मधील काही जुन्या वस्तू

   आम्ही प्रथम ‘प्युबलो नॅशनल म्युझियम’ पाहिला . या शहराची व येथील स्थानिक लोकांची गेल्या शेकडो वर्षातील संस्कती कशी ऊन्नत होत गेली हे  याचे दर्शन त्यातून घडते. रोजच्या वापरातील अनेक वस्तू,कपडे, हत्यारे, दागिने जपून ठेवले असून त्यात होत गेलेले बदल पाहताना गंमत वाटते. ही संस्कृती जगातील इतर तत्कालीन संस्कृत्यांच्या तुलनेत सरस वाटते.व्यवस्थित जतन झाले आहे.जे काही उपलब्ध आहे त्यातून त्यावेळीच्या संस्कृतीचे वैभव दिसून येते . आपली संस्कृती आपले पूर्वज व आपला इतिहास हाच भविष्य काळासाठी आपणाला  स्फूर्तिदायक असतो म्हणून तो जतन केला पाहिजे.

    सुमारे 400 वर्षापूर्वीचे चर्च व घर. अजूनही वापरात आहेत।

        याच परिसरात एक चारशे वर्षांपूर्वीचे सॅनम्युगल  चर्च पाहिले. अजूनही सुस्थितीत असून लोक तेथे प्रार्थना करतात. त्यावेळी येथे राज्य करणाऱ्या स्पॅनिश मिशनरी लोकांनी हे चर्च बांधले होते. तत्कालीन स्थानिक जमातींना त्याची गरज नव्हती. फक्त आलेले मिशनरी व कुटुंबीय चर्चमध्ये प्रार्थना करीत. आज शेकडो वर्षानंतर तेथे स्थानिक लोक राहिले नसून धर्मांतरामुळे परिसर ख्रिस्ती झाला आहे..या चर्चचा वापर आजही करतात…’कालाय तस्मै नमः !’

  ‘अमेरिकेतील सर्वात पुराणे घर’, अशी पाटी चर्चच्या  शेजारील एका घरावर होती. हे चारशे वर्षाचे जुने सुस्थितीतील घर पाहिले. येथे एक छोटे वस्तू संग्रहालय व विक्री केंद्र आहे. घराची जुनी रचना आपल्या आजच्या घरासारखीच होती. स्वतंत्र स्वयंपाक घर बेडरूम व हाॅल. लहान  का असेना पण स्वतंत्र होते. लहान दगडाच्या तुकड्यांनी घर बांधले होते. सिमेंट अथवा चुन्याचा कुठे वापर  नव्हता.घराची रचना पाहून माणूस कोणत्याही शतकातील असला तरी घराच्या रचनेची आवड तीच आहे हे खरे! .

     येताना येथील प्रसिद् प्रसिद्ध ‘ग्रँडो रिव्हो कॅनीयन’ पाहून आलो. या नदीने गेल्या हजारो वर्षात हळूहळू खडकांना कापीत एक खोल दरी निर्माण केली आहे. तीच ही रिव्हर कॅनियन. त्यावेळी या नदीच्या काठी एक संस्कृती जन्माला आली, व नांदली. आता  पाणी कमी झाल्याने भाग ओसाड आहे .या दरी वरून बांधलेला ग्रँडो रिव्हर ब्रिज, अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील एक सुंदर ब्रिज म्हणून ओळखला जातो. स्टील -लोखंडाने बांधलेला हा पूल काही मैल लांब आहे. यापूर्वी आम्ही अमेरिकेतील ग्रँड कॅनियन पाहिली असल्याने तेथील भव्यता येथे जाणवली नाही.

   सांता फे या अद्भुत शहरात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या, अनुभवण्यासारख्या व करण्यासारख्या आहेत. अनेक लोक येथे हायकींग बाईकिंग स्कीईंग राफ्टींग किंवा एअर बलून मधून थरारक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी येतात. आम्हाला तेवढा वेळ नव्हता म्हणून आम्ही परत निघालो.

 पुन्हा दोन अडीच तासाचा प्रवास होता. साडेसहाचे सुमारास मुक्कामावर पोहोचलो..

    तिसरा दिवस: 

  काल सबंध दिवस खूपच धावपळ झाल्याने आज सकाळी थोडी विश्रांती घेऊन दुपारी जेवणानंतर बाहेर पडण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे  भोजन करून दुपारी दोन वाजता बाहेर पडलो. खरे तर सकाळी बाहेर न पडण्याचे मुख्य कारण म्हणजे  येथील हवामान खात्याने दिलेला इशारा. तापमान 92 डिग्री फॅरेनाईट च्या आसपास असल्याने लोकांनी घरा बाहेर पडू नये अशी ताकीद होती. येथील तापमान जरी आपल्या येथील तापमान एवढे असले तरी त्यापासून अधिक ताप होतो. कारण हा भाग पृथ्वीच्या विषुववृत्तावर असल्याने सूर्याचे किरण लंबाकृती पडतात. त्यांची तीव्रता अधिक असते व अशा तापमानात अधिक वेळ राहिल्यास त्यापासून उष्माघाताचा त्रास होऊशकतो. त्यामुळेच येथे प्रवास करताना काही तथ्ये सांभाळावी लागतात. डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल हलके कपडे, पाण्याच्या बाटल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी सनस्क्रीम अत्यावश्यक असतात! व विशेष म्हणजे येथील जंगली गवताळ झुडपात रॅटल-स्नेक हे विषारी साप असतात त्यापासून जपून राहावे लागते.

    आज दुपारी आम्ही चेट्रोकेट (Chetroketl) नॅशनल पार्क मध्ये जुन्या चाकोवन ( Chacoan)वंशाच्या आदिवासींची वस्ती पाहण्यासाठी जाण्याचे ठरविले.

  हा पल्ला देखील दूरचा आहे.सुमारे तीन तासाचा गाडीचा प्रवास जाताना व तेवढाच प्रवास परतीचा! गाडी रस्ते व्यवस्थित असल्याने येथे असे मोठे प्रवास अगदी आरामात करता येतात.मात्र या प्रवासात अमेरिकेत कुठेही जा रस्ते छान गुळगुळीत असतात हा भ्रम दूर झाला. अंतीम पल्ल्यातील  18 किलोमीटर लांबीचा रस्ता कच्चा होता. गाडी अगदी हळू न्यावी लागली. येताना दुसरा चांगला रस्ता आहे असे कळले. त्यामुळे बरे वाटले. प्रत्यक्षात परत येतानाही तोच अनुभव आला. मध्ये पंधरा-वीस किलोमीटर रस्ताअर्धवट स्थितीत होता. गाडीला सारखे धके बसत होते. अमेरीकेत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रस्त्यावरून प्रवास करण्याचा योग आला. थोडे मानसिक समाधान मिळाले. कारण अमेरिकन लोकांनाही अशा वाईट रस्त्यावरून प्रवास करावाच लागतो हे कळले  !!

   चेट्रोकेट नॅशनल पार्क. जुन्या बांधकामांचे अवशेष.

     नॅशनल पार्क मध्ये तासभर फिरलो. घरे व सुविधा असलेला हा परिसर हा तत्कालीन जमातीनी सुमारे आठशे वर्षांपूर्वी निर्माण केलेला आहे. दोन भागात जुन्या संस्कृतीचे अवशेष पहावयास मिळतात. एका समूहात लोकांची राहण्याची निवासस्थाने, आवश्यकतेनुसार बनविलेली लहान मोठ्या आकाराची घरे आहेत. पूर्ण बांधकाम दगडी तुकड्यांनी केले आहे .डोंगरातील पत्थर व बाजूच्या जंगलातील लाकडे वापरून सोयी निर्माण केल्या आहेत. कोठेही चुना सिमेंट वगैरे वापर नाही. दोन मोठ्या दगडांना बारीक चीपांनी जोडले आहे. तरीही ते काम शाबूत आहे. अशा वास्तु नाहीशा होतात ते भूकंप व वादळी पावसाचा मारा यामुळे!

     दुसऱ्या भागात रहिवाशांनी त्यांच्या सामाजिक जीवनातील सार्वजनिक उपक्रमासाठी आवश्यक  सुविधा निर्माण केलेल्या आहेत. सांस्कृतिक कार्यासाठी सभामंडप मनोरंजनाची थिएटर्स विवाहादी शुभ कार्ये तसेच अंतिम विधीसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेल्या दिसतात. हे पाहिल्यावर त्या लोकांच्या कल्पकतेची व कारागिरीची कल्पना येते. सामाजिक एकात्मता व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती या तत्कालीन जमातीत होती, याचे कौतुक वाटते.आज सुधारलेला मानव अशा प्रकारच्या सामूहिक विधींचा स्वीकार करेल काय?

     या लोकांनी त्यावेळी अस्तित्वात असलेल्या नदीवर धरणे व कालवे काढले होते. तीन मजली इमारती बांधल्या  होत्या. मुख्य व्यासपीठ जमिनीच्या पातळी पासून वर बारा फूट उंचीवर बांधलेले होते. हे सर्व करण्यासाठी लागणारे इंजीनियरिंग शास्त्राचे ज्ञान त्यांना असले पाहिजे असे या अवशेषावरून दिसून येते. आम्हा आजच्या आधुनिक जगाच्या दृष्टीने ही ‘रानटी’ मंडळी निश्चितच अधिक बुद्धिमान व कर्तृत्ववान होती असे वाटू लागते. पुरातन  काळातील आज उपलब्ध असलेल्या काही वास्तूंचा जसे गीझाचा पिरॅमिड, वेरूळ लेणी ई. ,अभ्यास केल्यावर माझे म्हणणे आपणास पटेल. जगातील अनेक पर्यटक येथे दिसले. या अनपढ लोकांची ही कारागिरी पाहून ते स्तंभित होते.. 

      “ वाव वंडरफुल…”, असे उद्गार काढीत होते.

    एकच शल्य मनात आले. येथील प्रत्येक जुन्या वास्तू समोर जर थोडक्यात माहिती दिली असती तर मिळालेला आनंद द्विगुणित झाला असता. पुस्तकातील फोटो व तर्क यावरूनच अंदाजाने आम्ही समाधान मानून घेतले.गाईडची सुविधा उपलब्ध असल्याने प्रत्येक जुन्या वास्तू समोर थोडक्यात माहिती दिली तर बरे! पायवाटा मुख्य रस्त्यापासून खूप लांब आहेत. त्यामुळे वयस्कर नागरीकांना रणरणत्या ऊन्हात खूप चालावे  लागते! फिरणे कष्टदायक होते. त्रासही कमी करतात येईल?

    सर्व प्रदेश डोंगर दर्यांनी व्यापलेला असून तेथे पूर्वी असलेली नदी भूकंपात नष्ट झाली आहे. जरी डोंगराळ-रॉकी प्रदेश असला तरी नदीच्या आश्रयाने सर्व मंडळी सामुदायिक शेती व्यवसाय करीत असावेत असे वाटते. आज बाजूचा सर्व भाग खडकाळ व लहान लहान झुडुपांनी भरलेला असल्याने येथेही ‘रॅटल स्नेक’ नावाचे विषारी साप आढळतात. पर्यटकांनी म्हणूनच फक्त ट्रेल वरून चालावे अशी सक्त ताकीद दिलेली असते. दुसरी विशेष गोष्ट पहावयास मिळते ती म्हणजे या वनात कोणताही पाण्याचा थेंब आज उपलब्ध नसताना डोंगराच्या फटीत उगवलेली रंगीबेरंगी रानफुले व त्यांचे विविध आकार  पाहिले की परमेश्वराच्या लिलेची जाणीव होते! आपल्या सह्याद्री मधील व्हॅली ऑफ फ्लावर ची आठवण आली!

    जमिनीवर इंद्रधनु.. रानपुष्पांची शोभा.

 संध्याकाळचे साडेसहा झाले होते .आकाशात सुंदर  सफेद ढग व  मध्येच एक काळा ढग दिसत होता.  सूर्याच्या तीव्र किरणामुळे त्या विशाल शामल मेघावर रुपेरी कडा शोभून दिसत होती. इंग्रजीत  एक वाक् प्रचार नेहमी वापरतात 

  Silver lining on the dark cloud…दुःखातही थोडी सुखाची झालर, असली तर हा वाक्प्रचार वापरतात. भर दुपारी निळ्याशार आकाशात तो सुंदर ढग मला त्या म्हणीची आठवण करून गेला.या डोंगराळ भागात आकाशाचा घुमट देखील चारही बाजूनी दिसत असल्याने अधिकच भव्य वाटतो.

   संध्याकाळचे 6:30 वाजले होते.पुन्हा तीन तासांचा परतीचा प्रवास असल्याने निघणे जरूरी होते. बरोबर 9:30ला मुक्कामावर आलो. 

   चेट्रोकेट नॅशनल पार्क। ग्रॅन्डे केनियन

चौथा दिवस:

पिद्रास मरकाडा कॅनीयन, बॅन्डीलियर ट्रेल।

   पिट्रास केनियन ही  हजारो वर्षांपूर्वी येथे राहणाऱ्या जमातीमधील लोकांनी दगडावर काढलेल्या चित्रासाठी प्रसिद्ध आहे . काळ्या पत्थरावर  लहान टोकदार अवजाराच्या सहाय्याने हलक्या हाताने  विविध प्रकारची चित्रे काढली आहेत.हाताचा  पंजा  प्राणी अज्ञात लिपी अशाच निरंनिराळ्या खुणा कोरलेल्या आहेत. अजूनही या खुणा कशासाठी व का काढल्या असाव्यात त्याचा अर्थ काय ऊलगडलेला नाही. ताशीव दगडावर बारीक कोरीव काम केले आहे.चित्रातून  काहीतरी संदेश निश्चितच  असणार कारण अनेक प्रकारचे समजणारे व न समजणारे आकार येथे कोरले आहेत. 17 मैल लांबीचा हा ट्रेक असून सुमारे 20000 चित्रे त्यात आहेत दीड किलो मीटर चालण्याचा मार्ग तयार केला असून त्या वर चालत आपण निरीक्षण करू शकतो. ज्यावेळी या चित्रांचा अर्थ व त्यातून दिला गेलेला संदेश जगाला समजेल त्या दिवशी निश्चितच ही शिल्पे पाहताना अधिक आनंद होईल!! 

   बोका-नागरा शीलाखंडावरील हस्त शिल्पे।

दुपारी ब्रॅन्डीलियर नॅशनल पार्क व तेथील पुरातन संस्कृतीचे जतन केलेले  अवशेष पाहण्यासाठी निघालो. दोन एक तासांचा  गाडीचा प्रवास होता.

    बॅडीलियर हे राष्ट्रीय स्मारक असून येथे फिरण्यासाठी सुंदर ट्रेल केली आहे. कोठेही विशेष चढ नसल्याने आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांची पंचाईत होत नाही. ऊनही भरपूर असल्याने सतत पाणी प्यावे लागत होते. सुमारे 1000 वर्षा  पूर्वी ही वस्ती निर्माण झाली. प्युब्लो या जमातीच्या  सुमारे 17 पोटजाती येथे राहत.डोंगरांमध्ये लहान गुहा करून त्यात ही माणसे आश्रय घेत. हा पत्थर मऊ व फोढण्यास सोपा असल्याने अशी घरे सहज तयार होत. काही घरात आम्ही आत डोकावून पाहिले. घराच्या भिंतीवर  काळ्या रंगात चित्रे काढली होती. जुना मानव रानटी पशुना  खूप भीत असे. त्यापासून रात्री संरक्षण म्हणून  गुहेत राहण्याची व्यवस्था त्याने अवगत केली असावी. दिवसा शिकार व शेतीसाठी खाली येत असावेत. रात्री झोपण्यासाठी या गुहांत लपत असावेत असे वाटते .

  सुमारे चारशे वर्षे येथे मुक्काम झाल्यानंतर मोठा दुष्काळ पडला असावा. त्यामुळे काही जमातींनी येथून  स्थलांतर केले. ते ग्रॅड रिवो नदीच्या काठीत राहावयास गेले. ही मंडळी मका सोयाबीन अशी पिके तसेच हरणे ससे खारी मारून त्यांचे मांस भक्षण करीत. टर्की,  कोंबड्या पाळून त्यांचे मांस खाण्यासाठी व पिसे शोभेसाठी वापरली जात .

   ब्रॅडीलियर नॅशनल पार्क मधील गुहा व निवासस्थाने।

   आच  प्रगत मानवाने  शस्त्रे निर्माण केली. जंगली श्वापदे  जंगलात गुहेत राहू लागली. माणूस मुक्तपणे फिरू लागला.

संध्याकाळ होऊ लागली होती. परतीचा प्रवास सुरू झाला.

आज सकाळीच निघून अमेरिकेतील दोन तासावर असलेला एक नॅशनल पार्क  पाहून दुपारी परत यावयाचे ठरविले होते. मात्र आजही हवामान खात्याने दुपारी वादळ होणार (Tornado) तुफान होणार, लोकांनी घरा बाहेर पडू नका अशी ताकीद  दिली होती. ती शिरोधार्य मानून आम्ही घरीच बसून राहिलो. उद्या पुन्हा परतीचा दीर्घ प्रवास करावयाचा असल्यामुळे विश्रांती मिळाली व बरेही वाटले. संध्याकाळपर्यंत वारा पाऊस तर जाऊ द्या पावसाचे चार थेंबही पडले नाहीत. काळे ढग दाटून आले होते एवढे खरे, पण एका बाजूने स्वच्छ सूर्यप्रकाशही होता! दिवस फुकट केला म्हणून वाईटही वाटले व बरेही वाटले ! अमेरिकेतील हवामान खाते आता आपल्या हवामान खात्याशी स्पर्धा करू लागले आहे असे वाटले! खरेतर आपले हवामान खाते यापेक्षा कितीतरी अधिक चांगले अंदाज आजकाल करीत असते! 

  अलबुकर्की मधील प्युब्लो ईस्लेता जमातीची ही कॉलनी व चर्च

    प्युब्लो जमातीच्या ईस्लेता वंशाच्या एका वसाहतीत फिरून आलो. शहरातील काही भागात या जुन्या वंशाच्या लोकांसाठी राखीव जागा आहे. तेथे ही मंडळी राहते. थोड्या वसाहतीत सर्वांना प्रवेश मिळतो. इतर वसाहतीत सर्वसामान्यांना प्रवेश बंदी आहे. येथे निर्बंध नसल्याने आम्ही आलो होतो.

    गाडीतून उतरून लांबूनच पाहणी केली. काही फोटो घेतले. येथील चर्च देखील वेगळ्याच धाटणीचे आहे. लोक आता जमान्याप्रमाणे बदलले आहेत. सर्वसामान्यात वावरत आहेत. छोटी छोटी घरे व ती देखील मातीची जाड भिंतीची, आपल्याकडील धाब्याच्या घरासारखी वाटली. कोणी व्यक्ती दिसेल आता म्हणून पहात होतो. पण कोणी दिसले नाही. वसाहती चे प्रार्थना गृह-चर्च दिसले.तेही वेगळ्या धाटणीचे वाटले. ही माणसे जरी आदीम जमातीची असली तरी आता नेहमीच्या नागरिक जीवनात मिळून मिसळूनच राहतात. मात्र त्यांच्यासाठी काही खास कायदे सरकारने केलेले आहेत .

   तासाभरात परत घरी आलो.  चला दिवसभरात काहीतरी वेगळे पाहता आले एवढे समाधान मिळाले!

   पाचवा दिवस:

  वेधशाळेच्या कालच्या भविष्याप्रमाणे आजही पाऊस व पूर येणार असा अंदाज होता. प्रवास धोक्याचा होईल असे इशारे होते. याप्रमाणे सकाळी निघताना सर्व संकटांचा अंदाज घेऊन निघालो होतो. अतिवृष्टी झालीच तर कुठेतरी थांबून दुसऱ्या दिवशी जावयाचे असेही ठरविले होते. सर्व अंदाज पावसाने खोटे ठरविले. प्रवास सुरळीत झाला. आम्ही अगदी व्यवस्थित ऑष्टींनच्या घरी पोहोचलो !!

पुन्हा एकदा अमेरिकेच्या हवामान खात्याला धन्यवाद दिले!!

समाप्त.

14.07.2025.