“नेमेची येतो मग…”, वाढदिवस!

“ नेमेची येतो मग पावसाळा …”, या सृष्टी नियमाप्रमाणे पावसाळा नेमाने येवो वा न येवो,पण बरोबर एका वर्षाने वाढदिवस हा नक्की येणारच! वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक विशेष दिवस असतो, ज्यादिवशी आपण आपल्या प्रियजनांसोबत आनंद आणि सुख सामायिक करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची परंपरा अत्यंत समृद्ध आहे, ज्यामुळे भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येतात. वाढदिवस आपल्या प्रिय व्यक्तींवर प्रेम आणि काळजी व्यक्त करण्याची उत्तम संधी असते. 

   खरं पाहिलं तर आयुष्याचा प्रत्येक दिवस वाढदिवस असतो नाही का? प्रत्येक दिवशीच आपण वाढत असतो. पण 365 दिवसानंतरबरोबर  एक वर्षाने आपण वाढलेलो असतो आणि तो दिवस ‘वाढदिवस’ म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करीत असतो.

 बालपणीचे  काही वाढदिवस कौतुकाने साजरे होतात. पुढे तरुणपणी शिक्षण, नोकरी, व्यवसाय धंदा ,अशा कोणत्या तरी क्षेत्रात धडपड सुरू होते .त्या अवधीत काही मानसन्मान प्राप्त होतात. त्यावर्षी विशेष काहीतरी घडले म्हणून वाढदिवस ही थाटात केला जातो. पुढच्या संसारीक जीवनात आपले कौतुक बाजूला राहते.मुलांचे वाढदिवस कौतुकाने साजरे होऊ लागतात !हळूहळू आपल्या व्यवसायातून नोकरी धंद्यातून निवृत्ती घेतल्यावर मुले आई-बाबांचे वाढदिवस साजरे करू लागतात! शष्ठ्यब्धी पूर्ति, अमृत महोत्सवी, सहस्त्रचंद्रदर्शन आणि काय काय प्रकारचे वाढदिवस असतात..!! दीर्घायुष्याचे कौतुक होते. सेवानिवृत्त जीवनातील हे वाढदिवस म्हणजे कर्तृत्वा पेक्षा कौतुकाचेच अधिक! फक्त वर्षांची बेरीज, ‘व्हॅल्यू एडिशन’ शून्य !!

  सुदैवाने मला कोरोनातील सक्तीच्या विश्रांतीमुळे काहीतरी लिहिण्याची उर्मी आली. मी माझ्या गुरुजनांना श्रद्धांजली म्हणून,

   “तस्मै श्री गुरुवे नमः”

या माझ्या पहिल्या मराठी पुस्तकाची निर्मिती केली. पुढील वर्षी आमच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील विशेषतः आमच्या सोक्ष समाजातील धुरीण  व समाजसेवकांच्या  कार्यकर्तृत्वावर व आठवणीवर आधारित

 “पूजनीय आधारवड” या दुसऱ्या मराठी पुस्तकाची निर्मिती झाली.

    परवा24 एप्रिल 2025 रोजी,पहिल्या पुस्तकाची इंग्रजी भाषांतरित आवृत्ती 

  “REVERED BORDI TEACHERS.LEGACIES AND LESSONS.…”

   प्रसिद्ध करता आली.डॉ.अंजली कुलकर्णी मॅडम यांचे भरघोस सहकार्य मिळाल्याने ते शक्य झाले. 

  मला वाटते आयुष्यात प्रत्येक माणूस समाजातील कोणाचे ना कोणाचे काही ऋण घेतच असतो. त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे. मी अंशतः तरी त्यात यशस्वी झालो याचे समाधान वाटते.

  माझे  गेले काही वाढदिवस अमेरिकेत साजरे होत आहेत. एप्रिल जुलै  सुमारास येथील वातावरण आम्हाला मानवणारे असते. त्यामुळे मे-ऑगस्ट या महिन्या दरम्यान आम्ही भारतातून येथे येतो. साहजिकच 9 जून मधील माझा वाढदिवस शिकागो-अमेरीकेत साजरा होतो.

   येथे भरपूर मोकळा वेळ असतो. वाचन लेखन  चिंतन करण्यास खूप अनुकूलता असते.

शिकागो व स्वामी विवेकानंदांचे येथील सर्व धर्म परिषदेतील भाषण अजरामर आहेत.

    या गेल्या वाढदिवशी असेच काही पुढील बेत ठरवीत असताना एका मागोमाग एक अशा काही दुःखद अनाकलनीय घटना भारतात घडल्या. प्रत्येकाला खूपच दुःख झाले. मी स्वतःच मला काही  प्रश्न  विचारले?  स्वतःच्या मनाशीच उलगडा करू लागलो. माझ्या प्रश्नांना मीच उत्तरे द्यायचा प्रयत्न केला. तो गुंता कागदावर उतरवल्यास ठीक होईल असे वाटू लागले व त्यामुळेच या लेखाचा प्रपंच झाला!!

  प्रत्येक दिवशी मी सायंप्रार्थना झाल्यावर माझ्या मनाशीच परमेश्वराचे आभार मानत असतो. वाढदिवसाचे दिवशी देवाचे आभार मानताना अनेक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो. कारण त्याच्या कृपाप्रसादामुळेच भारताच्या एका आडवळणी गावातील अगदी सामान्य कुटुंबातून वाढलेल्या माझ्यासारख्या एका मुलाचा हा जीवन प्रवास अमेरिकेतील शिकागो-ऑस्टीन (अमेरिकेतील दोन मुख्य शहरे) पर्यंत आला!! हे नुसते पर्यटन नाही होत तर आमच्या मुलां-नातवंडांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक पाहण्याचाही तो सोहळा आहे!! त्यांचे कर्तुत्व व आपल्यापेक्षाही दोन पावले अधिक पुढे गेल्याचे पाहून आनंद घेण्याचे ते समाधान आहे .

   बालपणीचे कितीतरी मित्र अर्ध्यावरच वाट सोडून गेले. काही आहेत पण कुठे त्याचा पत्ता नाही.  पुन्हा भेटतील याची शक्यता नाही. जीवनाच्या या वाटचालीत बुरख्या मागील अनेक खरे चेहरे पाहिले. हलाखीच्या गरिबीतील मनाची श्रीमंती पाहिली आणि पैशाच्या श्रीमंतीतील मनाचे दारिद्र्य ही अनुभवविले.. प्रत्यक्ष परमेश्वर पाहिला नाही तरी माणसाच्या वेशातील त्याचे रूप अनुभवले आणि परमेश्वरी कृपा म्हणजे काय असते त्याचा प्रत्ययही घेतला! आपले पूर्वज, आई वडील व गुरूजन यांचे आशीर्वाद म्हणजे काय  ते कळो आले! आणि गेल्या काही दिवसात घडलेल्या त्या दारुण दुर्घटनांतून जीवनाची क्षणभंगुरताही दिसून आली. तरीही या मानवी जीवनाचे व्यवहार, विश्वातील मानव नावाच्या प्राण्याची चाललेली धडपड व त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक अनाकलनीय गोष्टींचा खुलासा अजून कोणालाही तसेच मलाही झालेला नाही व पुढे कधी होईल असेही वाटत नाही!! 

     रेल्वे अपघात(वर). व बेंगलोर चेंगराचेंगरी (खाली डावी कडे) पहेलगाम बळी (खाली उजवीकडे)

“चला वर्षभर खूप काम केले ,आता चार दिवस आराम करण्यासाठी पहेलगामला जाऊया” म्हणून गेलेल्या काही मित्रांना अचानक कुठून तरी प्रकट होऊन भ्याड दहशतवाद्यांनी त्यांची जात विचारीत, कुटुंबासमोरच गोळ्या घालून पाडलेले मुडदे.. ..आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आपला भाडोत्री संघ जिंकला म्हणून विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या तरुण क्रिकेट प्रेमींना अनावर गर्दीमुळे लोकांच्या पायाखाली तुडविले जाऊन आलेले मरण.. .  डोंबिवली कल्याणहून रोजच्या प्रमाणेच लोकलने कामासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बाजूने जाणाऱ्या लोकल मधील प्रवाशांच्या टक्करी मुळे रूळावर पडून आलेला मृत्यु.. आणि त्याहून अति भयंकर, परवा अहमदाबाद विमानतळावर  दोनशे बेचाळीस प्रवासी व बारा विमान कर्मचारी घेऊन लंडनला निघालेल्या  विमानाचा झालेला स्फोट व  सर्व निष्पाप जीवांची क्षणात झालेली राखरांगोळी! विमानाचे लोखंडी इंजिन वा धातूचे पत्रे भस्मीभूत झालेच पण त्याहीपेक्षा त्या सर्व प्रवाशांच्या स्वप्नांची व त्यांच्या आप्तस्वकीयांशी असलेल्या ऋणानुबंधांची झालेली कायमची समाप्ती !! फक्त पाच मिनिटात हे सर्व भयनाट्य झाले होते.  वाचणाऱ्याच्या अंगावर आजही काटा उभा राहतो तर ज्यांनी ते अनुभवले त्यांची काय स्थिती झाली असेल?

   याच दुर्घटनेचा पुढचा वेदनादायी प्रकार म्हणजे ज्या वसतिगृहाच्या इमारतीवर हे जळणारे विमान कोसळले त्या वसतिगृहात राहणाऱ्या 24 वैद्यकीय विद्यार्थ्यांना अचानक  आलेले मरण!आपल्या भावी जीवनाची रम्य स्वप्ने पहात अभ्यासाचे कष्ट उपसणाऱ्या त्या निर्व्याज निष्पाप विद्यार्थ्यांना असे अचानक मरण का यावे?

  “ हा हंत हंत नलिनी..,. हीच जीवनाची  क्षणभंगुरता, नश्वरता…  माणसाचे आयुष्य म्हणजे अळूच्या पाना वरील थेंब,पाण्यावरचा लहान बुडबुडा.“ आणि ..अशाच किती उपमा आता लोक देतील पण त्याचा उपयोग काय?…

   आजच्या या वाढदिवशी  माझ्या मनात या व अशाच  विचारांचे काहूर उमटले आहे. संध्याकाळी एका पार्कमध्ये फिरत होतो. तळ्याच्या काठी बाकावर बसलो होतो. समोरच्या पाण्यात एक हंसाची जोडी जलविहार करत होती. एकमेकाच्या चोचीत काहीतरी भरवत होती. त्यांच्या विश्वाशी  आमच्या या मानवी विश्वाशी  कोणताच संबंध नव्हता. ते त्यांच्या मस्तीत होते. असेच सदैव मस्तीत राहत असतील? ना त्यांचे साठी कधी विमान अपघात होणार होता, ना त्यांना व त्यांच्या पिल्लांना लोकलमधून पडण्याचा धोका होता ..ना त्यांना कधी कोणाचा विजयोत्सव करण्यासाठी गर्दीत जावयाचे होते..? त्यांच्या विश्वात असे दुःखद प्रसंग कधीच घडणार नाहीत? काही दु:ख आले तरी ते त्याची कधीच परवा करणार नाहीका?

   मग आम्हा माणसांच्या विश्वात असे स्वप्नभंग,मनोव्यथा, विरह, दुःख, चिंता, आतुरता, वियोग कशासाठी? चौर्याऐंशी लक्ष योनीतून बाहेर आल्यावर मानवी जन्म मिळतो, तो अशी दुःखे भोगण्यासाठीच का? …

     कधीतरी बालपणी एखाद्या सिनेमातले ऐकलेले गाणे आठवते….

      “क्या भरोसा जिंदगानी का..

    आदमी बुलबुला है  पानी का…”

सिनेमातले  गाणे, कधीतरी बाथरूम मध्ये गुणगुणत सोडून द्यायचे असते, एवढेच तेव्हा कळले होते!

 शाळेत पाठ्यपुस्तकातील धडे शिकताना एका संस्कृत सुभाषितांतून वाचलेले असते.. 

   “सर्वे क्षयान्ता निचया: पतनान्ता:समुच्छृया:।

संयोगा: विप्रयोगान्ता: मरणान्तहि जीवितम्॥”

या जगात जितका वस्तुसंग्रह आहे, त्या सर्वाचा एक दिवशी विनाश होणार आहे. अगदी सजीव प्राणीच नव्हे तर पर्वत डोंगर पत्थर यांचेही पतन होणारच. हे विश्वच एक दिवशी विनाश पावणार.. हे कळलेले असते पण परिक्षेचा पेपर लिहून आलो की ते विस्मरणात जाते!

  पुढे महाविद्यालयात करमणुकीसाठी गीतरामायण ऐकताना सुधीर फडके यांच्या वाणीतील महाराष्ट्र वाल्मिकी गदिमांची गीते ऐकताना त्यातील काव्य आणि बाबूजींच्या स्वरातील सौंदर्य कळले पण

      “जरा मरण यातून सुटला कोण प्राणीजात? 

        दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात?

        वर्धमान तेते चाले मार्ग रे क्षयाचा

        पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा “…

यातील अर्थ कधी समजून घेतला नाही!

परवा घडलेल्या या सर्व घटनांचा थोडा विचार करू लागलो .या सर्व गाण्यांचा सुभाषितांचा व काव्याचा जरा शांतपणे विचार करीत अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो..! थोडी स्पष्टता येऊ लागली!

       रोजच्या व्यवहारी जीवनात कष्ट करताना आम्ही आमच्या स्वार्थासाठी धावपळ करत असतो. तेव्हा परमार्थाचा विचार कुठून येणार? सर्व बाह्य विषयाचे आकर्षण असते. खऱ्या अर्थाने ते जगणे नसतेच.. जगण्यासाठी चाललेली ती केविलवाणी धडपड असते. कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे..

  “ते जीवन कसले? ती मरणांची माळा .

मासोळी झटते तोडायास गळाला!!”

  फटाक्यात दारू भरलेली असते मात्र वातीला काडी लावेपर्यंत त्याचा स्फोट होत नाही. गेल्या काही दिवसात घडलेल्या या दुःखद विनाशकारी घटनांनी माझ्या मनात  विचारांचे काहूर उठले.आणि सहज म्हणून वाचलेल्या वरील अभंग-गीतांच्या ओळींचा विचार करू लागता अर्थ हळूहळू ऊलगडू लागला… याच संदर्भात आमच्या संत वाङ्मयातील वाचलेली परीक्षेसाठी अभ्यासलेली काही वचने आठवू लागलो..

 “भले तरी देऊ कासेची लंगोटी”, अथवा

  जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।

 सहज साध्या वाक्यातून मोठे तत्वज्ञान सांगणारे तुकोबा आठवले. त्यांची वचने सहजपणे आपल्या मुखातून रोजच निघत असतात. भाषा सरळ साधी पण झेप आकाशाएवढी ..

  मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास।

असे ज्याचा त्यास नसे ठावा॥

तुका म्हणे काय अंधळिया हाती।

दिले जैसे मोती वाया जाय॥

  एक खूप मोठा विचार साध्या शब्दात तुकोबांनी येथे सांगितला. कस्तुरी खरे तर हरणाच्या बेंबीतच आहे, पण तो तिचा शोध घेत जगभर फिरतो. आंधळ्याच्या हाती दिलेले मोती त्याला गारगोटी समान आहेत कारण त्याला त्यांची परीक्षाच नसते.

   आपल्या आयुष्यात आपल्याला काय मिळवावयाचे आहे याची जाणीव ठेवून योग्य वेळ साधली गेली तरंच आपले कार्य होते. आपले इप्सित मिळवण्यासाठी आपल्यातील अंगभूत गुण व कौशल्य माहिती असावी लागतात, त्याचा योग्य वेळी उपयोग करावा लागतो तेव्हा आयुष्य सत्कारणी लागते. तुकोबा हेच अगदी साध्या सरळ शब्दात सांगतात,

 स्वामी विवेकानंदांची  काही वचने आठवली .

    “माणसाचं जीवन म्हणजे पटावरील प्यादी…कर्ता-करविता असतो तो ईश्वर! कोणत्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही.  तोच तारणारा तोच मारणाराही ! “ स्वामीजी  शेक्सपियरचे एक वाक्य सांगतात..

    “Behind every Crime there is a Misfortune, and behind every Misfortune there is a crime!!”

  प्रत्येक गुन्ह्यामागे एक दुर्दैव व प्रत्येक दुर्दैवामागे कोणाचा तरी गुन्हा …!

अहमदाबाद विमान अपघात व  वसतिगृहातील मुलांची शोकांतिका।

..”कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे..” खरंच किती अचंबित करणारे आहे हे सर्व ?

 चांगलं आणि वाईट सत्कर्म आणि कुकर्म एकाच रथाची चाके! गाडीतून खाली पडून परवा पाच जण मेले ..त्याच गाडीत त्यांना का जावेसे वाटले?  पंधरा मजली इमारती कोसळली. ढिगा-याखाली गाडलं गेलेल सहा महिन्याचं बाळ तीस तासानंतर ही छान हसत खेळत सापडलं…  त्याला त्या विटा मातीखाली कोणी कुशीत घेतलं होतं?

  मुंबईत लोकल गाडीत बॉम्बस्फोट झाले. माझा मित्र नेहमीच्या ट्रेनने न जाता घरीच राहिला. नेहमीच्या ट्रेनमध्ये  त्यादिवशी बॉम्बस्फोट झाला.. त्याला त्या दिवशी ऑफिसला जावं का वाटलं नाही?

हे सगळं असंच आहे .. ईश्वराने लिहून ठेवलेलं आपलं आयुष्य!! मोर नाचताना रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो ..यालाच म्हणतात जीवन!!

  स्वामीजी शेवटी म्हणतात “तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्यापेक्षाही जास्त शक्तिशाली आहे हे लक्षात ठेवा…”

     संत नामदेवांनी 

  “आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळा । माझिया सकळां हरिच्या दासां ।।”

   असा प्रसाद हरिभक्तासाठी का मागितला? त्यांनाही माहित होते सर्वसामान्य माणूस हा शेवटी या जीवनमरणाच्या चक्रात असाच फिरत राहणार? त्याला कधीतरी त्यातून मुक्ती मिळावी ही नामदेवांची प्रामाणिक इच्छा.त्यांनी ही प्रार्थना विठ्ठलाकडे केली!!

  शेवटी जे विधीलिखित आहे ते कोणालाही चुकणार नाही.मात्र ते भोग भोगताना त्याची तीव्रता तरी कमी व्हावी एवढीच या संत शिरोमणीची इच्छा आहे.

   समर्थ रामदासांनीही  श्रीरामाजवळ पसायदान मागीतले,

   “कल्याण करी देवराया।जनहित विवरी ।। 

   तळमळ तळमळ होत चि आहे,हे जन हाति धरी।”

    समर्थ म्हणतात,

हे रामराया सर्वांचे कल्याण करा .सगळ्यांचे हित करा .अशी माझी तुला तळमळीची विनंति.

     ज्ञानेश्वर माऊलींनीआपला ज्ञानदेवी ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर शेवटी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगमगीत कौस्तुभमणी आहे.

   “आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे ।

  तोषोनी मज द्यावे ,पसायदान हे….”

   खळांची व्यंकटी सांडेल,सत्कर्मी रती वाढेल ,सर्व प्राणिमात्रांची परस्परांशी मैत्री होईल.अज्ञानाचा ,पापाचा अंध:कार नाहिसा होईल,विश्वात स्वधर्मरुपी सूर्य उदयाला येईल,प्राणिमात्रांच्या मनातील सर्व इच्छा संपूर्ण होतील,ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या भूतलावर प्रकट होईल,सर्वांना आत्मकल्याणाचा मार्ग सुकर होईल.जे साक्षात् कल्पतरुंची वने आहेत,चेतना चिंतामणींची गावे आहेत,अमृताचे महासागर आहेत,येथील संत सज्जन सूर्यासारखे तेजस्वी असूनही दाहक नाहीत,चंद्रासारखे शीतल असूनही निष्कलंक आहेत. या सर्वांचा लाभ सर्वांना प्राप्त होऊ दे”,असा कृपाप्रसाद सद्गुरुंकडून मागितला आहे. 

    या सर्व सिद्ध-पुरुषांना आत्मज्ञान झाले होते. ब्रह्मज्ञान मिळाले होते स्वतःची ओळख पटली होती व  त्यामुळेच आपल्या अवतीभवतीच्या दुःखीकष्टी जीवानाही तसेच निर्मळ सुख मिळावे अशी त्यांची जगन्नियंत्याकडे प्रार्थना केली .

  किती महान माणसे ही? स्वतःचे सार्थक करून जगासाठी परममांगल्याची प्रार्थना करून गेले! ते साधूसंत झाले.

   शेकडो वर्षापूर्वी होऊन गेलेली ही मंडळी  आम्ही त्यांना कधीच पाहिले नाही. त्यांची रचना वाचली.

    आजच्या जगातील आधुनिक  संत मंडळींनी ही तशीच प्रार्थना आम्हा सर्वांसाठी केली आहे.

    संत विनोबा भावे यांनी गीताई मराठीत आणली. “जय जगत”, असा नारा दिला. विश्वकल्याण इच्छिले. त्यांनी म्हटले आहे,

   “ विज्ञान हे बाहेरच्या जगातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करून माणसाला सबल करण्याचा प्रयत्न करते.मात्र आत्मज्ञान हे माणसाच्या अंतरंगातील दडलेला तो अमृतबिंदू शोधण्याचा प्रयत्न करते. त्या बिंदूला स्वतःच्या उगमाचे विस्मरण झाले आहे . ज्या दिवशी त्या चेतनाबिंदूला आपल्यातील अमृतसागराचा शोध लागेल त्या दिवशी तो माणूस ऋषी होईल..”

    असेच दुसरे आधुनिक ऋषी श्री. के. वी. बेलसरे सर. त्यांची ही काही पुस्तके मी आधी वाचली होती. मात्र येथे अमेरिकेत आल्यावर त्यांचे ‘उपनिषदांचा अभ्यास’ हे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे. आणि माझ्या अल्प ज्ञानाची मला जाणीव होते आहे त्यांचेही काही विचार थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करूया.

   गुरूवर्य बेलसरे सरांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवन कालखंडात दशोपनिषदांचा अभ्यास केला. पुढे श्रीमद् भगवद्गीता अभ्यासली. ज्ञानेश्वर महाराजांची ‘ज्ञानेश्वरी’ त्यांना अतिशय आवडली. ज्ञानेश्वरीने त्यांचे अंतःकरण पूर्णपणे काबीज केले. बेलसरे सर म्हणतात,

   “याचे कारण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी प्रत्येक शब्दामध्ये त्यांची अनुभूती जिवंत केली आहे. म्हणून ती एवढी श्रेष्ठ झाली आहे. त्यानंतरच मी उपनिषदांचा अभ्यास हे पुस्तक लिहिले आहे”.

   ज्ञानेश्वरी माझा ही खूप आवडता ग्रंथ. खूप वर्षापासून मी देखील, ‘ एकतरी ओवी अनुभवावी’ या न्यायाने ज्ञानेश्वरी चे सदभावपूर्वक वाचन केले. व्यवहारिक जीवनात घडत असलेल्या काही प्रसंगांचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न केला आणि आनंद मिळविला! बेलसरे सरांच्या उपनिषदावरील पुस्तकाचे वाचन करताना ज्ञानेश्वरीतील संदर्भ चांगले स्पष्ट होत आहेत.

     डावीकडे- गुरुवर्य के व्ही बेलसरे. ऊजवीकडे-आचार्य विनोबा भावे

बेलसरे सर म्हणतात,

 या विश्वाचा कोणी कर्ता आहे काय? तो असेल तर तो कसा आहे? त्याने हे विश्व का कसे निर्माण केले? केव्हा निर्माण केले? या विश्वाला अंत आहे काय? विश्वाच्या रचनेत काही निश्चित योजना आहे काय? विश्वाचे मूलद्रव्य कोणते? या विश्वाला सतत गतिमान ठेवणारी शक्ती कोणती?.. हे त्याला माणसाला सतावणारे प्रश्न. त्यांची उत्तरे शास्त्रज्ञाना आजही मिळालेली नाहीत!!”

  “बाह्य विश्वाबरोबरच माणसाला आपल्या अंतरंगातील मनोमय-विश्वाचे गूढ उकलवयाचे होते. मानवीजीवनाचे अंतिम ध्येय कोणते? सर्वोत्तम आनंद कोणता? माणसाच्या अंतरंगात कोणते कोश आहेत? जीवाच्या अवस्था किती? मरणोत्तर अस्तित्व आहे काय? पाप कशास म्हणावे, त्याचे फळ मिळते का?पुण्य कशास म्हणावे?आपणास अमरत्व कसे मिळेल? असे प्रश्न त्याचे मन मागू लागले. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे जग आणि ईश्वर या दोहोंचे मूल स्वरूप आणि त्यांचा परस्पर संबंध समजून घेण्याचा गेली हजारो वर्ष मानव प्रयत्न करतो आहे. अजून त्याला समाधान नाही. त्या  सर्व प्रश्नांना उपनिषदे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. 

वेदांतून ही प्रश्न उत्तरे मिळाली नाहीत. म्हणून ऋषींनी चिंतन करून ही उपनिषदे लिहिली. त्यासाठीच उपनिषदांना “वेदांत” असेही म्हणतात.”

  हे  ब्रह्मजिज्ञासू ऋषी एकांतात राहत. विश्व विषयक गोष्टीच्या चिंतन करीत .विशेषता ध्यानामध्ये मग्न असताना त्यांची विचारशून्य अवस्था असे. आपल्या ध्यानातील उत्कटतेची एक सीमा गाठली की त्यांच्या अंगात एक नवीन चेतना निर्माण होई. त्या चेतनेचा प्रसाद म्हणून या महात्म्यांना विश्वाची रचना, ईश्वराचे स्वरूप, मानवी जीवनाशी त्यांचा परस्पर संबंध याविषयी काही नवीन तत्वे स्फुरली.आणि ती त्यांनी प्रामाणिकपणे शब्दांमध्ये व्यक्त केली. तीच ही उपनिषदे!! उपनिषदांची संख्या बरीच आहे. त्यांची भाषा संस्कृत आहे. भगवान कृष्णांनी आपल्या ब्रह्मविद्येच्या सामर्थ्याने उपनिषदातील ज्ञानाला भगवद्गीतेचा सुंदर रेशमी शेला चढविला. त्यातील रहस्ये सामान्य माणसाच्या प्रांगणात आणून सोडली.. तीच श्रीमद् भगवद्गीता!! संस्कृत मधील या श्रीमद्भगवद्गीतेला ज्ञानेश्वर महाराजांनी टीकेच्या स्वरूपात मराठीत आणले तीच आमची श्री ज्ञानेश्वरी!!

मी भगवद्गीता वाचली आहे. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा माझ्या कुवती प्रमाणे अभ्यास केला आहे.. आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी तो खूप मार्गदर्शक ग्रंथ आहे.

    प्राचीन ऋषीमुनी एवढे महान साधक व अभ्यासक. तरीही त्यांना हे प्रश्न पडले. सर्व प्रश्नांची उकल करता आली नाही. आपण तर अगदी सामान्य माणसे. आपल्याला सुद्धा असे प्रश्न पडणारच. मलाही पडले. आपल्यालाही पडले असतील? मात्र त्यासाठी थोडे चिंतन करणे आवश्यक आहे.

 आजच्या युगात विज्ञानाची आणि यंत्र विद्येची बेसुमार वाढ होऊन देखील  माणसाच्या मनातील कित्येक प्रश्न अनुत्तरित आहेत. कारण ती उत्तरे विज्ञानाच्या कक्षे बाहेरची आहेत,असे विज्ञान पंडितच सांगतात. आज आधुनिक मानवाला मिळालेल्या शारीरिक सुख सोयी आत्म्याची उपासमार करतात. त्यामुळे समाधान शांती आणि प्रेम हे आत्म्याचे गुणधर्म दुर्लक्षित राहतात.

 अध्यात्म विद्येचा आधार घेतल्यानेच हा आनंद परत मिळविणे शक्य होईल.उपनिषदे हीअध्यात्म विद्येची भांडारघरे आहेत. .

                       संत ज्ञानेश्वर संत तुकाराम।
                   अध्यात्म विद्येची दोन मराठी शिखरे।।

   उपनिषदांचे वांग्मय निर्माण करणाऱ्या ऋषींचे हे अनुभवसिद्ध विचार आहेत. मानवाने त्या अनंत परमात्मा स्वरूपाचे सतत स्मरण ठेवावे. हे त्यांच्या सांगण्याचे तात्पर्य आहे.

 कारण  ईश्वर सत्य आहे ज्ञानमय आहे आनंदमय आहे म्हणून. ईश्वराच्या सतत स्मरणाने अहंकार निघून जातो व अहंकाराचे विसर्जन झाले की माणसांमध्ये तो आनंदमय अनंत परमात्मा प्रकट होतो. त्या अवस्थेलाच ब्रह्मदर्शन असें म्हटले आहे.मानवी जीवनाचे ध्येय जीवाकडून शिवाकडे जाण्याचे म्हणजेच त्या ब्रह्मचैतन्य अवस्थेचा आस्वाद घेण्याचे असले पाहिजे. त्यासाठीच आपल्या स्वचिंतनातून त्या महान ऋषींनी वेद उपनिषदासारखे  मार्गदर्शक साहित्य आपणासारख्या सामान्य माणसासाठी निर्माण  करून ठेवले आहे.

    गेल्या काही दिवसात एकापाठोपाठ एक अशा ज्या दुःखद घटना घडल्या त्यामुळे मनात दाटून आलेल्या विचारांच्या गर्दीला वाट करून देण्याची संधी या वाढदिवशी मिळाली  . 

    आज जगभर हिंसेने  थैमान घातले आहे. आपलेच विचार खरे व इतरांचे तसे विचार नसतील तर त्यांची हत्या करणे, त्यांना संपविणे यासाठी जग शस्त्रसज्ज झाले आहे. विनाशाच्या उंबरठ्यावरील आजच्या जगाला वाचवावयाचे असेल तर आमच्या सनातन धर्माचे विचार, संस्कृती आणि त्याप्रमाणे आचार  याची नितांत गरज आहे असे प्रामाणिकपणे वाटते!

   अजून खूप काही वाचावयाचे  राहिले आहे. लिहावे असेही वाटते आहे .प्रयत्न करीत राहणे आपल्या हाती आहे. त्यासाठी परमेश्वर सर्वांना सदबुद्धी देवो शक्ती देवो आयुरारोग्य देवो अशी या दिवशी मी श्री गुरुदेव दत्तांकडे प्रार्थना करतो. 

     दिगंबर राऊत

    शिकागो.14.06 2025.