स्टेट्स युनायटेड पण फॅमिली डिव्हायडेड !!
मानव अस्तित्वात आला आणि ज्यावेळी समूहाने राहू लागला त्याच वेळी कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. प्रजनन ,मुलांचे संवर्धन आणि सर्वांचे संरक्षण हीच या ‘कुटुंब’ संकल्पने मागे मानवी संवेदना असावी.
विवाह आणि नातेसंबंधांमुळे कुटुंबाला एक विशिष्ट रचना मिळाली. विवाहानंतर, पती-पत्नी एकत्र राहू लागले आणि त्यांची स्वतःची मुले झाली, ज्यामुळे कुटुंबाचा विस्तार होऊ लागला.
औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे कुटुंबाच्या स्वरूपात बदल झाले.. एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली.विभक्त कुटुंब पद्धती वाढू लागली.
कालांतराने सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमुळे कुटुंबाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांमध्येही बदल झाले. स्त्रिया शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात सक्रिय झाल्यामुळे कुटुंबाच्या संरचनेत बदल झाला.
आजही सर्वसाधारणपणे भारतीय कुटुंबात एकत्र पद्धती टिकून आहे. आजी आजोबा काका काकी सखी भावंडे चुलत भावंडे अजूनही एकत्र राहताना दिसतात. कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसाला कुटुंबाचा कर्ता मानला जातो..त्याला सर्व आदर देतात. सर्व सदस्य परस्परावलंबी असतात.कुटुंबाचे हित हे प्राधान्य असते. कुटुंबाचे पूर्वापार चालत आलेले संस्कार परंपरा पाळल्या जातात. शिक्षणाला महत्त्व असते. विवाहा नंतर सदस्यांच्या भूमिका बदलल्या जातात. भारतीय कुटुंब व्यवस्थेत भावनिक नातेसंबंधाला खूप महत्त्व असते. साधे जीवन जगण्यावर भर दिला जातो.
हळूहळू भारतीय कुटुंब पद्धती कालमानानुसार बदलते आहे. आता एकत्र कुटुंब पद्धती ऐवजी विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येत असून एकत्र पद्धती कालवाह्य होण्याच्या स्थितीत आहे.
जगाच्या विविध देशातील समाजात कोणत्या कुटुंब पद्धती आहेत, समाज कशा रीतीने राहतो, कुटुंबे कशी तयार होतात याचा येथे अभ्यास करावयाचा नाही.आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीच्या तुलनेत अमेरिकन समाज व कुटुंब व्यवस्था याबद्दल थोडे सांगणार आहे. मला झालेले अमेरिकन समाजाचे, कुटुंब व्यवस्थेचे दर्शन आणि अनुभवलेले काही प्रसंग यावरून हे सांगतो आहे. ही केवळ माझी निरीक्षणे आहेत असे समजावे.
अमेरिकन समाज जीवनाचा निरीक्षण करताना येथेही काही एकत्र कुटुंबे दिसून येतात. विभक्त कुटुंब ,एकल कुटुंब, समलिंगी कुटुंब, अलिखित नातेसंबंध (Relationship), अशी विविध प्रकारची कुटुंब व्यवस्था अमेरिकन समाजात दिसून येते.
एकल कुटुंबात स्त्री अथवा पुरुष एकटा आपल्या अपत्यासह राहून त्यांचे संवर्धन करतात. स्त्री पुरुष मैत्री होऊन एकत्र येतात. अपत्यालाही जन्म देतात. पुढे दोघांचे पटत नाही अथवा एकाचा मृत्यू होतो अथवा अन्य काही कारणांनी ते विभक्त होतात. अपत्याची जबाबदारी एका पालकावर पडते. अमेरिकन कौटुंबिक व्यवस्थेत सुमारे 20 टक्के कुटुंबे एकल आहेत .गंभीर समस्या आहे. येथील शिक्षण संस्थात आज-काल यासंबंधी विशेष शिक्षणही दिले जात .
अमेरिकन कायद्यानुसार समलिंगी विवाह अनेक राज्यांमध्ये मान्यता पावला आहे. त्यामुळे दोन पुरुष अथवा दोन स्त्रिया कुटुंब करतात. दत्तक अपत्य स्वीकारतात. त्याचे पालन पोषण करतात.
अलिखित नातेसंबंधात कोणताही कायदेशीर विवाह न होता स्त्री पुरुष एकत्र राहतात प्रजनन करतात व एका कुटुंबाप्रमाणे राहतात. भारतातही हल्ली हा प्रकार रुजू होत आहे.
केवळ अडीचशे वर्षे पूर्वी जन्माला आलेल्या अमेरिका या देशाचे सर्वच विलक्षण आहे. हे एक संघराज्य आहे.अमेरिका आज जगाचे नेतृत्व करतो आहे .अमेरिकेतील राजकीय सामाजिक आर्थिक कलात्मक तसेच जीवनाच्या अनेक क्षेत्रातील घडामोडींचा जगावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो हे खरे.अमेरिकेला सर्दी झाली की जगाला शिंका येतात अशा म्हणी आपण सहज वापरत असतो.
अमेरिका हा आज जागतिक विकासाचा मध्यबिंदू आहे. जगातील इतर लोकांना अमेरिका म्हणजे एक अतिश्रीमंत देश, अमेरिकन माणूस म्हणजे गाद्या गिरद्यावर लोळणारा अनेक सुखोपभोग घेणारा अशी भावना होते. मात्र ते तितकेसे खरे नाही.
भारतीयांच्या स्थैर्यांच्या संकल्पनेपेक्षा अमेरिकनांच्या जीवन-पद्धती आणि अपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. परिस्थितीनुरूप कुठल्याही क्षणी, मांडलेला संसार मोडून/ किंवा उखडून देशाच्या दुसऱ्या कोपर्यात जाऊन परत उभा करण्याची तयारी सामान्य अमेरिकन माणसाकडे नक्कीच असते. स्वतःच्या पसंतीच्या-आवडीच्या गोष्टी करण्याकडे त्याचा जास्त कल असतो. उद्योग धंद्यांमध्ये प्रचंड मोठे धोके घेण्याचे धाडस तो दाखवतो, कारण तो जीवनाविषयी आशावादी आहे. “अमेरिकन ड्रीम” त्याच्या हाडीमाशी मुरलेले आहे.
अमेरिकन संस्कृतीबद्दल कितीही प्रचार, अपप्रचार असले तरी काही चांगल्या गोष्टीही येथील सामाजिक कौटुंबिक जीवनात दिसून येतात .
कुटुंबातील वृद्ध, लहान मुले, स्त्रियांच्या बाबतीत झालेली कुठलीही हेळसांड हा समाज सहन करू शकत नाही.
सामान्यतः अमेरिकन माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, विचार करण्याची पद्धत रचनात्मक(Constructive)आहे.,तसेच प्रत्येक गोष्टीचे; सार्वजनिक असो वा खाजगी; प्रमाणीकरण (Standardization) करण्यामागे कलही दिसून येतो. हीच गोष्ट त्यांच्या उद्योग-धंद्यांमध्येही डोकावते.
अमेरिकन माणूस तसा एकदेशीय नक्कीच नसतो, पोटापाण्याच्या नौकरी-व्यवसायाव्यतिरिक्त जीवनाच्या अनेक वेगळ्या क्षेत्रातील गोष्टींमध्ये सहभागी होण्याची त्याची वृत्ती असते.
नाविन्याची कास धरताना, इथे श्रम/ज्ञान-प्रतिष्ठा आहे. अमेरिकन समाज एकंदरीतच चोखंदळ आहे. सातत्याने नव-नवीन कल्पना आणि उपयुक्त उत्पादनांची निर्मिती करत राहणे हे आव्हानात्मक काम आहे. म्हणूनच जितक्या वेगात नवीन कंपन्या येतात, उभ्या राहतात, तितक्याच वेगाने त्या लयालाही जातात.
आपल्या कुटुंबाचे व देशाचे अहम स्थान राखण्यासाठी जे कष्ट पडतील ते केलेच पाहिजेत, कितीही संकटे आली तरी आपण त्यावर मात करू हा विश्वास त्यात आहे. आपण अमेरिकन नागरिक म्हणून जगातील इतर सर्व नागरिकांपेक्षा कुठेतरी वेगळे आहोत ही भावना आहे.
पण अमेरिकन, अमेरिकन म्हणजे तरी काय? अमेरिकन म्हणजे नक्की कोण? ह्या प्रश्नाला आजही; ‘इथे सगळेच बाहेरून आलेले आहेत’, हे उत्तर दिले जाते. मग सगळेच स्थलांतरीत असतील तर नवीन / मागाहून आलेल्यांवर निर्बंध का?
इथे प्रत्येकाला संघर्ष करूनच गोष्टी पदरात पाडून घ्याव्या लागतात. कुणीही दान पदरात टाकत नाही. तुमच्या संघर्षाला कालांतराने मान मिळतो, केलेले श्रम वाया जात नाहीत हे नक्की. हा आशावादच प्रत्येकाला त्याचे अमेरिकन स्वप्न साकार करायला मदत करतो..
आजच्या विभक्त अमेरिकन कुटुंब पद्धतीत निश्चितच काही फायदे आहेत आणि तोटेही आहेत.विभक्त कुटुंबामुळे मुलांना अधिक स्वातंत्र्य मिळते वैयक्तिक विकास साधता येतो. दुसऱ्या म्हणजे आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने देखील कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला वयात आल्यानंतर आपली आर्थिक जबाबदारी विशेषता शैक्षणिक जबाबदारी स्वतःच पेलावि लागते. त्यामुळे कुटुंबावर त्याचा भार नसतो. कौटुंबिक संबंध देखील चांगले राहतात. कारण प्रत्येक जण स्वतंत्रपणे आपली जबाबदारी व आर्थिक बाबी सांभाळत असल्याने कुटुंब अंतर्गत स्पर्धा होत नाही. नातेसंबंध चांगले राहतात.
काही तोटे देखील या पद्धतीत संभवतात आणि त्यातील मुख्य म्हणजे वडीलधाऱ्यांचे मुलांना मिळणारे मार्गदर्शन नसते. काही कुटुंबात वडील मुलांचा शिक्षणासाठी आर्थिक भार सहन करीत नाहीत. मुले काही सटरफटर कामे करतात अथवा कर्ज घेतात .पुढे अशा मुलांना काही भावनिक व सामाजिक समस्यांना समोर जावे लागते . आपल्या पालकांची कुटुंबाशी त्यांचे भावनिक नाते संपते.
माझ्या ओळखीच्या मराठी कुटुंबातील एका गृहस्थानी सांगितलेली अमेरिकन कुटुंबातील कथा. हा मुलगा अतिशय हुशार आणि मेहनती आहे. त्याला पुढचे शिक्षण घेण्याची आकांक्षा आहे.मात्र वडिलाकडून आर्थिक सहाय्य मिळत नाही, कारण वडिलांची म्हणणे “मी माझे शिक्षण माझ्या पायावर घेतले. तू तुझे शिक्षण स्वतःच्या कमाईवर कर”. हा मुलगा मॅकडोनाल्ड सारख्या रेस्टॉरंट मध्ये लहान लहान कामे करून आपले हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करत आहे. बाप व मुलाचे नेहमीच खटके उडत असतात. मुलाला आपल्या वडिलाविषयी जराही आदर नाही. कधी कधी झोपण्यासही हा घरी येत नाही .बाहेरच रात्र काढतो. या मुलाला कोणी वाईट संगत मिळाली तर? भविष्यात हा मुलगा आपल्या कुटुंबासाठी वृद्ध वडिलांसाठी काही मदत करेल का? विभक्त कुटुंब पद्धतीत अनेकदा अशी चित्रे दिसत आहेत.
विभक्त कुटुंबे सामाजिक दृष्ट्या ही वेगळी पडतात. इतर कुटुंबाशी व एकूण समाजाशी खूप कमी संबंध येतो. तसेच काही प्रसंगी आर्थिक समस्या निर्माण झाल्यास अशा कुटुंबाला कोणाचा आधार नसतो.त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
आजच्या अमेरिकन विभक्त कुटुंबांत फायदे व तोटे दोन्ही आहेत जे इतरही देशातील समाजात आपणास पहावयास मिळतात.
विभक्त कुटुंब पद्धतीत जोपर्यंत पती-पत्नी एकत्र आहेत तोपर्यंत दोघांचेही ठीक चाललेले असते. दुर्दैवाने त्यापैकी एक आधी गेल्यास मागे राहणाऱ्या पुरुष अथवा स्त्रीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कारण मुले दुरावलेली असतात. माझ्या एका अमेरिका -वारीत मी अशी अशा एकट्या राहिलेल्या व्यक्ती पाहिल्या.
अमेरिकेतील शिकागो शहरातील एका मोठ्या इस्पितळात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.मलाही वेळ घालवण्यासाठी काहीतरी उद्योग हवा होता. अमेरिकन सामाजिक जीवनही जवळून पहावयाचे होते. या इस्पितळात मी सकाळी दहा वाजता जाई व संध्याकाळी सहा वाजता परत येई.या वेळेत विविध कामे करावी लागत.कधी इस्पितळाच्या परिसरातील काही निराधार कुटुंबांना इस्पितळातर्फे मिळणारे अन्न नेऊन देणे ,कधी इस्पितळात दाखल असलेल्या काही वयोवृद्धांना वर्तमानपत्रे पुस्तके वाचून दाखविणे. कधी त्यांचे बरोबर पत्त्याचे ,रमीचे डाव बुद्धिबळ खेळणे, तर कधी या इस्पितळातील औषध दुकानात कॅशियर म्हणून काम करणे. खूप चांगला अनुभव मिळाला.
विशेषतः ज्यावेळी मी जेवणाची ताटे घेऊन परिसरातील वृद्धांकडे जाई, तेव्हा केविलवाणी दृश्ये दिसत.बेल दाबल्यावर खूप वेळाने एक व्यक्ती येई. सुमारे ऐशी वर्षे असलेली ती व्यक्ती एकटीच घरात राहत असे. जोडीदार काही वर्षांपूर्वी गेलेला असे. जेवणताटाची वाट पाहत असणार्या व्यक्तीला धड कपड्याची ही शुद्ध नसे. कालचे वाढलेले ताट देखील मलाच गोळा करून आणावे लागे. घरात कोंडून राहिलेल्या त्या व्यक्तीला बाहेर काय चालले आहे याची काही कल्पना नसे.
“आज बाहेर सूर्यप्रकाश आहे की वादळी आहे?” असा प्रश्न ऐकून मला गहिवरल्यासारखे होई. कोणताच आधार नसलेल्या, इस्पितळात राहणाऱ्या व्यक्तींची हालत थोडी बरी असे. कारण त्यांना एकमेकांशी बोलता तरी येई. आमच्यासारखे स्वयंसेवक त्यांची शारीरिक भुके बरोबर बौद्धिक भूक भागवत.
एक प्रसंग मोठा बोलका आहे.एका व्यक्तीच्या खोलीत मी पत्ते खेळत असताना संध्याकाळी एक तरूण जोडपे चौकशी करत आले .त्या व्यक्तीचा मुलगा व सून होती. दोघांनी पटापट खोलीत फुलांचे हार लावले केक ठेवला मेणबत्ती पेटवली व आपल्या बाबांना फुंकर घालून मेणबत्ती विझविण्यास सांगितले. “हॅपी बर्थडे ….”चे गाणे टेप रेकॉर्डर वर वाजले.. केक कापला.. बाबांना भरवला, आपण खाल्ला, मला दिला व एका तासाभरात बाबांना बाय बाय करून निघून गेले…. पुढच्या वर्षी केक कापण्यास येण्यासाठी… !! अजूनही हा प्रसंग डोळ्यासमोरून गेलेला नाही व त्या वृद्धाला काय वाटले असेल हे समजत नाही.
सर्वसाधारण अमेरिकन माणूस आपल्या व्यवसायातून धंद्याउद्योगातून निवृत्ती घेताना आपल्या उर्वरित आयुष्याचा हिशोब करतो. त्याप्रमाणे आपल्या कमाईतून काही रक्कम बाजूला काढून एखाद्या वृद्धाश्रमात ती जमा करून ठेवतो. जेणेकरून पुढील सेवानिवृत्तीचे जीवन येथे घालवीता यावे. उरलेले पैसे पूर्ण न करता छंद व आवडी पूर्ण करण्यात घालवतो. अमेरिकन माणसाला प्रवासाची खूप हौस आहे.जेवढे फिरता येईल तेवढे फिरून घेतो. अमेरिका व परदेशात मौज मजा करून घेतो. वृद्धाश्रमात आपले आयुष्य व्यतीत करतो. अथवा वर वर्णन केल्याप्रमाणे एखाद्या चॅरिटेबल इस्पितळात जिथे वृद्धांना राहण्याची व्यवस्था असते तेथे पैसे भरून ठेवतो. सरकारकडून देखील अशा वृद्धांना काही मानधन महिन्याला मिळत असते. अमेरिकेत काही वृद्धाश्रम ही पाहिले. प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी व्यवस्था मिळते. अतिशय दर्जेदार व उत्तम सेवा तेथे मिळते. एखाद्या रिसॉर्ट प्रमाणे काही आश्रम आहेत. काहीजण वृद्धाश्रमात न जाता स्वतंत्र लहान फ्लॅट-सदनिका घेऊन राहतात. थोडे भाग्यवान आपल्या मुला मुली सोबत राहतात.
ऑस्टीन मध्ये आमच्या घराशेजारी एका आजोबा आजीची कथा खूप बोलकी आहे. आजोबा 100 च्या घरात आजी नव्वदीच्या घरात. दोघे अजून व्यवस्थित.आजोबा अमेरिकन वायुदलातील दुसऱ्या महायुद्धात लढाऊ विमान चालविलेले पायलट. आजही त्या दिवसाच्या कथा गौरवाने सांगतात. सेवानिवृत्तीच्या वेळी जमलेल्या पैशात एक लहान घर ऑस्टिन शहरात घेतले. दोघांना घरात एकत्र राहावयाचे होते.बाकीचा पैसा फिरण्यात मौज मजा करण्यात घालवला. घरी सेवानिवृत्तीचे जीवन घालवीत असतानाच दुर्दैवाने त्यांच्या एकुलत्या मुलीचा घटस्फोट झाला. आपले घर सोडून मुली बरोबर दोघेही राहावयास आले. त्यामुळेच आमची त्यांच्याशी भेट होई. पुढे नवऱ्याने ही या मोठ्या घरावर आपला हक्क सांगितला .मुली व आजोबा ते घर सोडून पुन्हा आपल्या लहान घरात गेले. आजोबा आजीचे जीवन मुली बरोबर जाईल पण मुलीचे भवितव्य काय ही चिंता दोघांना या वयात?
लांबून दिसणारे अमेरिकन समाज जीवन व प्रत्यक्ष स्थिती यात खूपच फरक आहे . म्हणून कधी कधी आपल्या भारतातील गरिबी ठीक वाटते. त्यामुळेच माणसांना एकमेकांची मदत घ्यावीशी वाटते. एकत्र राहावे असे वाटते. आर्थिक स्थैर्यामुळे आपल्या भारतातही आता अमेरिकन पद्धती येत आहे असे वाटते? तुम्हालाही असे वाटते का?
दिगंबर राऊत
ऑस्टीन.
खूप छान वाटले. प्रत्यक्ष अमेरिकेत आहे असे काही वेळ वाटले.
तरी सुद्धा आपला भारत देश मला प्रिय आहे.🙏