गोविंद चुरी -एक अवलिया माणूस

मराठी भाषेचे शिवाजी, अर्थात, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी म्हटले आहे ‘‘इंग्रजी भाषा, म्हणजे वाघिणीचे दूध, जो पिणार तो गुरगुरणार‘‘ याचा साधा अर्थ असा असावा की, जो इंग्रजी मधून व्यवहार जाणणार, तो आयुष्यात, सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करणार.
विष्णुशास्त्रांचा काळ हा आजपासून सुमारे दीडशे वर्षापूर्वीचा; भारताच्या स्वातंत्रलढयाशी इंग्रजी शिक्षणाचा संबंध आहे. तत्कालीन राज्यकर्त्यांच्या जुलुमशाहीला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर द्यायचे असेल, तर एतदेषीयांनी इंग्रजी जवळ करणे हे अनिवार्य आहे, असेच त्यांना सांगावयाचे होते. अशा प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा हा संदेश, मराठमोळया मुलुखांतील, तत्कालीन, व त्यानंतर समाजसेवेचे व्रत घेवून काहीतरी भले करु इच्छिणा-या ‘मावळयांनी’ नक्कीच शिरोधार्य मानला, व आपल्या कुवतीनुसार, शहाणे करुन सोडाव सकलजन…. हा वसा घेतला.
बोर्डीसारख्या एका आडवळणाच्या गावांत जन्माला आलेला, अशिक्षित, गरीब, शेतकरी आई वडीलांचा वारसा लाभलेल्या, चंद्रमाळी घरात, आपल्या कुटुंबाचे कसेबसे गुजराण करणा-या, फायनल पर्यंत जेमतेम शिक्षण घेतलेल्या, एका तरुणाने शंभर वर्षांपूर्वी साहेबांची इंग्रजी भाषा ‘कामचालवू’ स्वरुपात आत्मसात केली व आपल्या समाजबांधवांसही तिची तोंड ओळख व्हावी म्हणून गावातच वर्ग सुरु केले.
कै. गोविंद गणेश चुरी, हा तो अवलिया! सन 1919 साली त्यांनी सुरु केलेल्या इंग्रजी भाषेच्या शिकवणी वर्गातूनच पुढे, कै. आत्मारामपंत सावे, कै. शंकरराव भिसे व कै. कृष्णराव चित्रे यांच्य़ा सहकार्यांने सुरु झालेली त्यावेळची शाळा, म्हणजेच आजचे- सुनाबाई पेस्तनजी हकिमजी हायस्कूल.
ज्ञानोबांच्या ‘‘इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी…. मोगरा फुलला ….‘‘

या पक्तीचा प्रत्यय आणून देणारा हा दृश्य अविश्कार!
सु.पे.ह. हायस्कूलचा इतिहास लिहीतांना भिसे-चित्रे-सावे हया त्रिमूर्तींसाठी सोनेरी ‘‘मानाचे पान मिळालेच पाहिजे. मात्र त्याच बरोबर कै. गोविंदराव चुरी हयांचे साठी, कुठे तरी एक चिरा, एक पणती…. असावी यासाठी हा लेख प्रपंच. आमच्या शाळेला आज शंभर वर्षे होत असतांना ही प्रकर्षाने झालेली जाणीव!
गेली अनेक वर्षे माझ्या मनातील ही खंत, माझे परममित्र व संस्थेचे, एक मानद सचिव श्री. प्रभाकर राऊत यांस मी बोलून दाखविली. त्यांना देखील ही गोष्ट खटकत होतीच. मात्र जाणीवपूर्वक किंवा कोणत्याही आकसाने, गोविंदरावांना सन्मान मिळाला नाही, असे नाही. गोविंदरावाचा मृत्यू तसा अकालीच झाला व त्यानंतर त्यांचे कुटुंब व मुली बोर्डी सोडून गेल्या; इतर नातेवाईकांनी देखील या बाबतीत कांही विषेश उत्साह दाखवून त्यांनी गोखले संस्थेकडे पाठपुरावा केला नाही, व कालौघात एका सच्च्या कार्यकर्त्याचे विस्मरण झाले ते आजतागायत! त्यांची कोणतीच माहिती आज उपलब्ध नाही. मित्रवर्ग, प्रभाकर राऊत सरांनी विनंती केल्यानेच मी हा प्रपंच करीत आहे.
दुदैवाने गोविंदरावांच्या बाबतीत कांही विषेश माहिती देणा-या व्यक्तिही हयात नाहीत व त्यांची नातवंडे (जी आज मथाणे, पालघर येथे राहतात) देखील या बाबतीत विषेश कांही सांगू शकत नाहीत.
माझी आई (जी आज वय वर्षे 98 आहे व स्मरणशक्तीही शाबूत आहे) ही या लेखासाठी उपयुक्त माहितीचा स्त्रोत आहे. तसेच गोविंदरावांचे नातू श्री. अरविंद कृष्णाजी पाटील, रा. मथाणे (ता. पालघर) यांनी देखील आजोबांची सांगितलेली आठवण व त्यांच्या वारसदारांची सद्याची वंशावळ, या लिखाणास उपयुक्त ठरली आहे. श्री. एन.के. पाटील सर, श्री. दिनकर राऊत सर यांच्याशी देखील मी बोललो. मात्र त्यांनी देखील कै. गोविंदरावांबद्दल काही विषेश माहिती नसल्याचे सांगितले.
शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेल्या गोविंदरावांचा शोध घेतांना माझ्या मनांत त्यांचे विषयी अतिव कुतुहल तर आहेच पण एक-दोन प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा ही हा प्रयत्न आहे. ते तसे अकालीच गेल्याने त्यांचे नातू (मुलीचे मुलगे) विस्तृत माहिती देवू शकले नाहीत. मात्र त्यांनी दोन आठवणी सांगितल्या त्या कांही ‘‘धाग्यावरुन’’ ‘‘ताग्याची’’ परीक्षा करण्यासारखा हा प्रयत्न आहे.
अल्पशिक्षित गोविंदला, 1919 साली इंग्रजीचेच वर्ग काढावेत असे का वाटले? त्यासाठी स्वतः इंग्रजीची तोंड ओळख त्याला कशी झाली असेल? स्वतःची कौटुबिक, आर्थिक स्थिती अत्यंत विपरीत असतांना, विद्यार्थ्य़ांना जमवून, प्रसंगी निःशुल्क शिकवण्या करण्याचे औदार्य का करावे लागले? पुढे आपल्या वर्गाचे रुपांतर, एका संस्थेत झाल्यावर, आपल्यालाही एक ‘मानाचे पान’ संस्थेने द्यावे, अशी भावना, त्यांना का झाली नसावी?
कै. गोविंदरावांच्या कौटुंबिक व वैयक्तिक जीनाबद्दल थोडी माहिती मिळाली ती अशी….
वडील गणेशपंत हे बोर्डीतील एक सामान्य शेतकरी होते. त्यांना गोविंद, लक्ष्मण व पांडुरंग हे तीन मुलगे व चार मुली. एक चिरंजीव लहानपणातच वारले. कै. गणेशपंत जरी खूप शिक्षित नव्हते तरी आपल्या मुलांनी कांहीतरी शिकावे ही त्यांची जबर इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या तीन्ही चिरंजीवांना जुजबी शालेय शिक्षण दिले होते. शिक्षणाची आवड ही या कुटुंबात पहिल्यापासूनच असली पाहीजे. लक्ष्मण (लख्या मामा) शाळेत गेले होते. मात्र ते खूप सुंदर ‘सुतारकी’ करीत व त्यांचे त्याकाळी उत्तम कारागीर म्हणून नाव होते. पांडुरंग देखील फायनल होवून, डहाणूच्या कोर्टांत कारकूनी करीत व गावांतील लोकांस, अर्ज, विनंत्या लिखाणासाठी मदत करीत. लक्ष्मण निःसंतान होते, मात्र पांडुरंगरावांची दोन्ही मुले (चिंतामण व बजू) छान शिकून आपल्या क्षेत्रात खूप चमकली. श्री. चिंतामण हे मॅट्रीक होवून, चित्रकलेकडे वळले व त्याकाळी सुप्रसिध्द अशा ‘फिल्मीस्थान स्टुडीयोचे’ मुख्य कला निर्देषक म्हणून मुंबईत स्थाईक होते. बजू बाईनी शिक्षकी पेशा स्विकारुन त्या क्षेत्रांत खूप मोठे नांव केले व विद्यार्थीनींसाठी वसतीगृह काढून सामाजिक सेवा देखील केली. त्यांचे यजमान कै. दामोदर पाटील सुध्दा उत्तम शिक्षक म्हणून ठाणे जिल्हयात प्रसिध्द होते.
कै. गोविंदरावांना एकूण पाच अपत्ये. पैकी मोठे दोन मुलगे अकालीच देवाघरी गेले. मोठी शांता ही त्यावेळी 10वी पर्यंत शिकलेली, मात्र त्या काळच्या रुढींप्रमाणे लग्न लवकर झाले व मथाणे (ता. पालघर) येथील सधन व प्रतिष्ठीत पाटील घराण्यांतील श्री. कृष्णाजी पाटील यांची अर्धांगिनी झाली. श्री. कृष्णाजी पाटील हे आजचे सुविख्यात, पर्यटन सम्राट श्री. केसरीभाऊ पाटील यांचे काका, या वरुन त्या कुटुंबाच्या त्यावेळच्या प्रतिष्ठेची कल्पना यावी.
खरे तर सुमारे नव्वद वर्शांपूर्वी 10वी पास असलेल्या शांताने आपली चुलत बहीण ‘बजूताई’ प्रमाणे कांहीतरी उद्योगक्षेत्र निवडावयास हवे होते, मात्र ते झाले नाही. कारण तीन मुलगे (शरद, अरविंद व अनील) आणि तीन मुली (विजू, कुंदा आणि शिला) यांच्या संगोपनात व इतर कौटुंबिक व्यापात ते शक्य झाले नसावे. शांताताई जरी आज नसली, तरी तिच्या हया मुला-मुलींचे संसार छान चालू आहेत. मात्र जेष्ट पुत्र शरद आज हयात नाहीत.
कै. गोविंदरावांच्या चार बहिणींपैकी सर्वांत मोठी जमनी ही माझाी आजी, त्यामुळे लहानपणी कधीतरी गोविंद मामांना मी आपल्या बहीणींकडे भेटावयास आले असतांना पाहिले आहे व कधी आजीचे बोट धरुन मामा-आजोबांच्या घरी देखील गेलेले आठवते. मामा गेले त्यावेळी मी तीनेक, वर्षांचा असेन, मात्र त्यांचे धोतर, कोट व काळया टोपींतील व्यक्तिमत्व व प्रेमळ स्वभाव आजही आठवतो.

मरी ही सर्वात लहान बहीण, अकाली वैधव्य आल्याने पांडुरंग मामा कडेच शेवटपर्यंत आश्रित राहिली, ‘हालू’ ही दोन नंबरची बहीण चिंचणीस होती व तिची नातवंडे आजही चिंचणीमध्ये नांदत आहेत. चौथ्या बहीणी विषयी कांही माहिती मिळाली नाही.
गोविंद मामांना शांता पाठी, काशी व वासंती (बेबी) हया दोन मुली. शांता थोडी मंद-बुध्दी असल्याने, ती व मामी (गोविंदमामांची धर्मपत्नी) शांताताईकडे मथाण्यास गेल्या व हया कुटुंबाचा बोर्डीशी संबंध सुटला, तो कायमचाच. बेबीचे लग्न होवून ती पालघरला होती, आज तिची मुले, नातवंडे पालघरला असतात, मात्र माझा संपर्क त्यांचेशी झाला नाही. आजघडीला मामांच्या तीनही मुली हयात नाहीत. मोठे दोन मुलगे, मागे सांगितल्याप्रमाणे बालपणीच मृत्यू पावले होते.
त्यावेळची (1950-52 साल असावे) आठवणारी एक गंमत शांताताईचे खुप सुबक अक्षरातील आपल्या आईला पाठविलेले पत्र वाचून दाखविण्यासाठी व त्याला उत्तर लिहीण्यासाठी मामी (गोविंदरावांची पत्नी), माझे वडील कै. आप्पा (वामन मास्तर ) यांना पाचारण करी, त्यावेळी मी देखील आप्पांचा सांगाती असे. एकदा माझी परीक्षा पाहण्यासाठी, आप्पांनी शांताताईंचे पत्र वाचून दाखविण्यास व मामी सांगेल तसे पोस्ट-कार्डावर लिहीण्याचे काम माझ्यावर दिले. पुढले पत्रात शांताताईने, वामन दादा, तुझे अक्षर एवढे खराब का झाले? अशी पृच्छा केली व ते पत्र देखील आप्पांनी मलाच वाचवयास दिले. कै. आप्पांचे मराठी मोडी हस्ताक्षर अतिशय सुंदर होते व आम्हा मुलांस देखील हे महत्व ते नेहमी अशा रितीने पटवून देत. अशा कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीमध्ये मोठा असलेल्या गोविंदच्या मनांत शिक्षणाची हाव निष्चितच असणार, मात्र परिस्थिती व सुविधा यांच्या अभावामुळे त्याची उच्च-शिक्षणाची स्वप्ने अधुरीच राहीली – असे असतांना, त्याची इंग्रजी भाषेशी तोंड ओळख कशी झाली व ‘आपणांसी ठावे ते इतरांसी द्यावे’’ हया संतवचना प्रमाणे गावांत इंग्रजी वर्ग काढण्याची ऊर्मी कशी निर्माण झाली असावी? माझ्या आईने, सांगितलेल्या एका आठवणीमध्ये याचे इंगीत असावे —
त्या काळी आमच्या बोर्डीमध्ये, थोडी ब्राह्मण कुटुंबे स्थायिक होती. (आजही आहेत) त्यांचे काही नातेवाईक, मुंबईत होते. मुंबईतील कोणा कुटुंबास एक चुणचुणीत मुलाची, आपल्या मुलांचा सांभाळ करणे व घरांतील काही लहान-सहान कामे करणे, हयासाठी गरज होती. बोर्डीतील गृहस्थांनी गणेशपंताकडे चौकशी करुन, गोविंदला या कामासाठी मुंबईस पाठविण्याचे ठरविले. शिक्षणाची तोंड ओळख असणा-या व विषेश कांही कामधाम न करणा-या गोविंदसाठी हे काम त्यांच्या पिताजींना ठीक वाटले असावे. धडपडया गोविंदला देखील ‘‘काहीतरी नवे पहावे व नवे शिकावे’’ या त्यांच्या उपजत वृत्तीनुसार, सुवर्ण संधी वाटली व तो मुंबईत गिरगावात दाखल झाला. त्यावेळी त्याचे वय 15 वर्षे आसपास असावे.
मुंबईकर गृहस्थानी देखील, हया मुलाची शिकण्याची आवड, तडफ व प्रामाणिकवृत्ती पाहून, त्याला रात्र-शाळेत दाखल केले, त्याला इंग्रजीची तोंड ओळख झाली. त्या घरांतील वातावरण व तेथे येणा-या पाहुण्यांशी होणा-या इंग्रजी भाषेचा वापर, इंग्रजीच्या प्रभुत्वामुळे एकंदर कुटुंबाला आलेली आर्थिक बरकत, हया सर्वांचा परिणाम, चाणाक्ष गोविंदच्या मनांवर कोठेतरी झालाच असणार. ‘जेवढे शिक्षणाचे धन’ जमविता येईल तेवढे जमऊया व बोर्डीला जाऊन आपल्या बांधवास देखील त्याचा उपयोग होईल असे काही तरी करुया जेणेकरुन आपली व आपल्या समाज-बांधवांची आजची दुर्दशा कोठेतरी दूर करण्यांत आपला सहभाग राहील, व हीच आपली आपल्या देशाप्रति व समाजाप्रति योगदान, अशी भावना गोविंदची झाली. त्याच्या आयुष्याला ही कलाटणी देणारी घटना होती.
साधारणतः दोन-तीन वर्षे गोविंद मुंबईत असावा. तत्कालीन मॅट्रिकची परिक्षा काही पूर्ण करु शकला नाही, मात्र ब-यापैकी ‘बोली’ व ‘लिखीत’ इंग्रजीचे ज्ञान झाले होते, व विषेश म्हणजे ‘जगणे व जगविणे’ या दोन शब्दांचा अर्थ कळला होता.
बोर्डीत आल्यावर, त्यावेळच्या रिती-रिवाजानुसार दोनाचे चार हात झाले, तेव्हा वय सुमारे वीस वर्षे असावे. उद्योग:- शिकविण्या- करणे व विषेशतः इंग्रजी शिकविणे हा होता. सुरुवातीस कमाईपेक्षा खर्चच जास्त होता, तरी जिद्दीने हे काम सुरु ठेवले. खाणारी तोंडे वाढत होती, जमा खर्चाचा मेळ बसत नव्हता. प्रसंगी घरातील कांही भांडीकुंडी विकून ही प्रपंच चालू होता. मात्र या सर्व आपत्तीमुळे अथवा संसार तापामुळे म्हणा, विरक्तीकडे व देवभक्तीकडे ओढा जास्त वाढू लागला. एकवेळ जेवण व संध्याकाळी मंदीरात देवदर्शझाल्यानंतरच रात्रीचे भोजन असा नेम सुरु झाला होता. त्याकाळी ‘पद्मनाभपंथा’ कडे ब-याच लोकांचा कल होता व टेबुंर्डे-पालघर येथील स्वामींच्या यात्रेमध्ये नियमित हजेरी लावणे, मोठा आनंद मेळाव्याचा उत्सव होता. गोविंद मामा देखील पद्मनाभपंथी झाले होते.
इंग्रजी वर्गाची धडपड, कौटुंबिक समस्या आणि अत्यंत नियमित देवभक्ति, या सर्व धावपळीत, उत्पन्नाची बाब यथातथा असतांना मामांनी हे कसे जमविले हे एक आष्चर्यच ! त्यातच पहिल्या दोन मुलांचा अकाली मृत्यू, त्यांना जीवनाचे ‘असार’ दर्शन नक्कीच देवून गेला असणार.
सन 1918-19 सालापर्यंत, जवळ जवळ 20,25 विद्यार्थी मामांच्या शिकवणी वर्गाला येत असावेत असा अंदाज आहे. मात्र यांतील थोडेच विद्यार्थी, मात्र नियमित फी देणारे, थोडे व इच्छा असूनही फी न देवू शकणारे, तरी मामांना हवे असणारे जास्तच. हीच ती ‘सुवेळ’ जेव्हा तरुण ध्येयवादी आत्मारामपंत, नुकतेच पदवीधर होवून आपल्या गांवी आले होते व गोविंदरावांच्या या समाजपयोगी कामात आपलाही सहभाग असावा या भावनेने त्यांचे बरोबर काम करु लागले. पुढे शंकरराव भिसे हया व्दयीला येवून मिळाले व असा हा ‘त्रिवेणी’ संगम बोर्डी गावाच्या उज्वल भविष्यासाठी, ज्ञानगंगेच्या रुपाने अवतरला. पुढचा इतिहास सर्वांना ज्ञात आहेच.
एका महान ज्ञानगंगेची गंगोत्री जन्माला आली होती. जिच्या पीयुष प्राशनाने भविष्यात अनेक ज्ञान-पिपासु, आपले पांथेय घेवून भावी भविष्याची वाटचाल करणार होते.
मला असा प्रश्न पडला, हे सर्व होत असतांना, ज्या गोविंद रावांनी आपल्या वर्गाचे रुपांतर, एका संस्थेच्या अधिपत्याखालील शाळेत करु दिले त्याना– ‘‘माझे यात काय?’’ असे कधी तरी वाटले नसेल काय? कबूल तो काळ, गांधी-टिळक-विवेकानंद यांच्या अनासक्ती योगाने भारलेल्या लोकांचा होता, तरी संसारी गोविंदरावांना भविष्यात, आपल्या स्वतःसाठी अथवा आपल्या कन्येसाठी कांही योग्य स्थान, शाळेच्या व्यवस्थापनेत मिळावे असे वाटलेच नसेल काय? मला वाटते असा ढोंगी, स्वार्थी विचार नक्कीच त्यांचे मनी आला नसावा. कारण असे असते कर तत्कालीन धुरीण, प्रा. कुलकर्णी, आचार्य भिसे, चित्रे, सावे यांनी मामांच्या आग्रहाखातर त्यांना किंवा त्यांच्या कोणा नातलगांना संस्थेने एखादे लहान का असेना, पण मानाचे स्थान असते. माझ्या माहितीप्रमाणे आचार्य भिसे गुरुजींनी मामांना शाळेत कांही छोटी जबाबदारी दिली होती, गोविंदमामा हयात असेपर्यंत त्यांनी शाळेत ते काम केले. मात्र स्वतःच्या कांही विक्षिप्त सवई आणि निर्लेप-वृत्ती, यामुळे ते देखील त्यांनी किती जबाबदानीने केले असेल याची शंका आहे.
मागे सांगितल्याप्रमाणे, मामा खूप देवभक्त होते. रोज राममंदिरात बसून देवाचे भजन-चिंतन व पद्मनाभपंथी असल्याने आपल्या गुरुंचे चरित्र-पारायण सतत चालू असे. असे म्हणतात की त्यावेळी मनाच्या एका उच्च समाधि अवस्थेत ते सतत–
‘‘त्याने सांगितलेले काम मी केले….. आता ते मला बोलवित आहे ….. मी निघतो…..’’ असे कांहीसे बोलत. याच अवस्थेत, 1950 चे दशकात, त्यांचे बोर्डी मुक्कामी निधन झाले.
गोविंदमामांच्या या जीवनपटाकडे, विक्षिप्तपणाकडे, भारतीय संस्कृति व तिचा संदेश पालन करणारी, तत्कालीन पिढी या संदर्भात पाहिले तर काही अनुमाने निघू शकतात ?
व्यक्ति म्हणजे काय हे सर्वांस माहित आहे. ‘वल्ली’ हे विषेशण, ‘‘नमुना’’ या अर्थाच्या जवळपास आहे. मात्र ‘नमुना’ म्हणताना एक सकारात्मक भावना आहे. या उलट अशी व्यक्ति समाजासाठी काहीतरी करु पहात असेल व त्यासाठी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ अजिबात नसेल तर अशी व्यक्ति, ‘वल्ली’ असते. थोडक्यात ‘वल्ली’ सकारात्मक नमुना.
मूल्यांसाठी जगणं, त्यासाठी वैयक्तिक जीवन या कश्रीत मानणं, हे त्याकाळी मोलाचं मानले जात होतं. समाज मानसात निरागस भाबडेपणा शिल्लक होता. अशा भाबडेपणांतून एखाद्या गोष्टिवरील टोकाच्या निष्ठेतून, अशा ‘‘वल्ली’’ त्याकाळी निर्माण झाल्या. आजच्या जमान्यात ही प्रजाती नामषेश होत आहे. काळ बदलत आहे. माणसे नको इतकी व्यवहारी आणि स्वयंकेद्रीत होत आहेत. ‘‘वल्लीपणा’’ला स्थान नाही अशा माणसांची गणना मूर्खांतच होते.

आमची भारतीय संस्कृती अव्दैताचा मंत्र देते. या मंत्रा इतका पवित्र मंत्र जगात कोणत्याच संस्कृतीत नाही. दुजाभाव म्हणजे दुःख व समभाव म्हणजे समाधान. एखादा गौतम बुध्द उपाशी वाघिणीला पाहून आपली मांडी तिच्या तोंडात देतो, एखादा नामदेव कोरडी पोळी घेवून पळणा-या कुत्र्यामागे तुपाची वाटी घेवून धावतो…. एखादा गोविंद आपल्या समाज बांधवांना ‘वाधिणीचे दूध’ पाजण्यासाठी इंग्रजी शिकून आपल्या गावांत एका छोटया शिकवणी वर्गाची ठिणगी पाडतो… मला मिळालेले सर्वाना मिळावे, नव्हे मला ही न मिळालेले सुविचार धन, सर्वांना मिळावे, हाच अव्दैताचा साधा अर्थ. हया संदर्भात गोविंदरावांचे नातू श्री. अरविंद पाटील यांनी सांगितलेली आठवण खूप काही सांगून जाते. पावसाचे दिवस होते व एक भिकारी मामांचे दारात, भर-पावसांत भिजत उभा राहून कांही भिक्षा मागत होता. मामांनी त्याला, चपाती-भाजी दिली व वर आपली नुकतीच खरेदी केलेली छत्री दान करुन सांगितले, ‘घरोघरी फिरतोस- भिजू नको- आजारी पडशील’’ गोविंदमामांचे बाबतीत हे नक्कीच खरे आहे.
गोविंदमामांनी भारतीय उपनिषदे, वेद, गीता यांचा किती अभ्यास केला होता माहीत नाही. मात्र त्यांचे एक छोटे जीवन म्हणजे भारतीय संस्कृतीच्या या महान संदेषाचा, चालता-बोलता आदर्श होता.
आज काळ बदलला आहे. भूतकाळांतील अशा वल्लीं बद्दल आज सर्वांना कुतुहल तर खूप आहे. कारण ही प्रजाति आज नामशेष झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कै. गोविंदराव चुरी यांचा मागोवा घेण्याचा हा अल्प प्रयत्न.
आज दिसणा-या सु.पे.ह. हायस्कूच्या महान वटवृक्षाचे बीज पेरण्यांत ज्यांचा महत्वाचा सहभाग होता, त्या गोविंदराव चुरी यांचे नावाचा एक चिरा कोठेतरी, या शताब्दी वर्षाचे शुभकालांत बसवावा, ही विनंति देखील याच साठी! शेवटी कै.बोटकरांचे शब्दांत –

यज्ञी ज्यांनी देऊ निजषीर
घडीले मानव तेचे मंदिर
परीजयाच्या दहन भूमिवर
नाहि चिरा नाही पणती