हिंदुस्थान भवन – माझगाव (भाग-३)
माझगांवहून पुन्हा हिंदुस्थान-भवनात मी आलो त्यावेळी श्री. किशन यांची बदली होऊन श्री. सरना हे आमचे डिपार्टमेंट हेड म्हणून ल्युब मार्केटिंगला आले होते. श्री. सरना हे मोठे कुशल अधिकारी होते ! पजांबी असल्याने टापटिपीचे राहणे, चांगले खाणे आणि युक्तीने सर्व कामे करुन घेणे ह्या त्यांच्या लकबी होत्या ! त्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले होते आणि एस्सो कंपनीने त्यांची भरती अमेरिकेतच केली होती. तेथे ‘एस्सो’ मध्ये काम करुन ते भारतात आले होते! खरेतर यांना ल्युब डिपार्टमेंट (Lube department) चा तसा काहीच अनुभव नव्हता. त्यांची सर्व कारकिर्द LPG – Gas & Engineering ह्या खात्यातच गेली होती. त्यामुळे आम्हा सारख्या ल्युब मधील जुन्या माणसांवरच त्यांना अवलंबून रहायचे होते! माझ्यावर त्याचा लोभ होता! माझगांवची मॅनेजमेंट करणे हेच डोके दुखीचे काम असते व प्रत्येक ‘हेड’ तेथेच थोडा दबून असतो. त्यामुळे माझगांववर हेड ऑफिस मधून देखरेख करण्याच्या कामात त्यांना माझी मदत होणार होती व म्हणून ही त्यांनी मला जवळ केले असेल. त्यावेळी माझगांवला श्री. मुल्ला हे टर्मिनल चीफ होते. तेथे मुल्ला देखील नवखे होते. त्यामुळे सरनांचे काम थोडे अवघड झाले होते! पण सरनांना तशी विशेष फिकीर नसे.
माझ्याकडे असलेल्या संशोधन व दर्जा तपासणी हीच मुख्य कामे होती व त्यासाठी माझ्या बरोबर श्री. मूर्ती हे माझे सहकारी होते. हेच मूर्ती एकेकाळी लॅबोरेटरीत माझे बरोबर सहकारी म्हणून होते व आता माझ्या हाताखाली काम करीत होते. श्री. सुब्रम्हण्यम हे दुसरे मॅनेजर माझ्या बरोबर संशोधन व इतर कामासाठी मदतनीस होते. आमचे काम व्यवस्थित सुरु होते.आम्हाला माझगांवची लॅब तसेच कलकत्ता, मद्रास व दिल्ली ही येथील गुणवत्ता तपासणीच्या प्रयोगशाळांचे काम बघावे लागे. तसेच सरकारी धोरणानुसार, देशांतील बंगलोर, हैद्राबाद, भोपाळ, अहमदाबाद, कोचीन, इ.मोठ्या शहरांतून, जेथे आमचे डिपो होते तेथे ही आम्हास प्रयोग शाळा उघडावयाच्या होत्या. मूर्तीकडे हे काम होते व त्याच्या मदतीने आम्ही हे काम उत्कृष्टपणे केले. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या याशहरातील नवीन प्रयोगशाळा आम्ही प्रथम सुरु केल्या, ज्या आजही व्यवस्थित सुरु आहेत.
श्री. सुब्बुकडे माझगांवमधील संशोधन शाळेतील कामाचे प्रशिक्षण करणे व तसेच आमच्याकडे पॅकेजींग मटेरीयल (कार्टन, बॉक्सेस, डब्बे इ.) ची तपासणी करणे व कंपनीने निवडलेल्या अश्या पुरवठा दाराची नमुने (sample) तपासून ते मान्य, अथवा अमान्य करणे ही मुख्य कामे होती. सुब्बु हुषार होता व कामात ही तरबेज होता, मात्र पैशाचा थोडा लोभी होता. मी माझ्या हाताखालील लोकांस पूर्ण स्वातंत्र देत असे. माझ्या एकूण कामाच्या धोरणाचाच तो एक भाग होता. व त्यानुसार मी येथे ही वागत असे. सुब्बुकडे जोखमीचे काम होते व हे ठेकेदाराचे नमुने तपासतांना कदाचित काही ‘देण्या घेण्याचा’ व्यवहार होण्याची शक्यता होती. त्याबाबतीत मी दक्ष असे. मात्र शेवटी सुब्बु ह्या पूर्वीच्या लोभापायीच एका ठिकाणी अडचणीत आला व शेवटी कंपनी बाहेर जावे लागले! आम्ही वाचविण्याच्या प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. कंपनीकडून मिळणाऱ्या प्रवास भत्ता व तिकिटांच्या पैशाचा हिशोब देताना या गृहस्थाने एकदा दुसऱ्या वर्गातून प्रवास करुण प्रथम वर्गाचे पैसे आपल्या बिल मध्ये लावले व ही गोष्ट कंपनीच्या ऑडीटरच्या लक्षांत आली. वास्तविक ही गोष्ट तशी फार मोठी नव्हती, परंतु त्यावेळचे आमचे चेअरमन एक अतिशय अहंभावी, गर्विष्ठ गृहस्थ होते व त्यांचे व सुब्बुचे कधी काळी काही भांडण झाले होते. त्यांनी ती गोष्ट ध्यानात ठेवली व त्याचा सूड योग्य वेळी उगवून त्यांनी सुब्बुला राजीनामा देण्यास भाग पाडले!
श्री. सरना ह्यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रथमच आमची दरवर्षी होणारी ‘सेल्स इजिनीयर कॉन्फरन्स’ ही पुण्याच्या निगडीत न घेता ती गोव्याला घेण्याचे ठरविले. त्या आधी ही कॉन्फरन्स फक्त पुण्यातच होत असे. गोव्याची ही तीन दिवसांची मिटींग खूप गाजली व सरनांनी देखील जाम मज्जा केली. दोन्ही दिवस संध्याकाळी आम्ही एक बोट भाड्याने घेतली होती व रात्री त्या बोटीतून झुआरी मध्ये (नदी) नौकानयन होई, त्यावेळी सर्व गोष्टींची भरपूर रेलचेल होती. कांही नर्तिका देखील नृत्य करण्यासाठी आणल्या होत्या. सर्व इंजिनियर अधिकारी त्यामुळे अगदी खूश होते. शेवटच्या दिवशीचा स्पेशल खाना “ला-कोकेरो” ह्या हॉटेलात सरनांनी खास ठेवला होता कारण त्या हॉटेलात त्यावेळी ‘चार्ल्स शोभराज’ मुळे खूप प्रसिध्दी आली होती . तिहार मधून पळालेला शोभराज ह्याच हॉटेलात मुंबई पोलिसांनी पकडला होता. रात्री १२-१ पर्यंत आमचा धिंगाणा तेथे चालू होता व सरनानी स्वतःही खाणे -पिणे झाल्यावर ‘भांगडा’ नृत्य सुरु केले होते! सरना तसे खूप साधे ही होते. लहान-मोठा अधिकारी हा भेद ऑफिस नंतर नसे. त्या नंतरची आमची बेंगलोर येथील कॉन्फरन्स ही खूप छान झाली. तेथे ही सरनांच्या सुचने प्रमाणे तेथील लोकांनी सर्व व्यवस्था चोख ठेवली होती व संध्याकाळी ‘पार्टीची’ सोय ही केली होती!
त्यावेळचा एक प्रसंग आठवतो: सरनांच्या खाण्या-पिण्याचा शौक त्यावरुन दिसून येतो. बेंगलोरमध्ये “मवाली रेस्टोरंट” नावाचे एक उत्कृष्ठ हॉटेल आहे, जेथे सकाळी फक्त नाश्ता मिळतो. त्यासाठी भली भली मंडळी देखील रांगेत तिष्ठत राहून प्रवेश मिळविण्यासाठी उभी असतात. सरनांना तेथे सकाळी नाश्ता करावयाचा होता. मला गुपचुप त्यांनी रात्री ही गोष्ट सांगून ठेवली होती व सकाळी ७ वाजता हॉटेलच्या लॉबीत येऊन राहा,आपण जाऊ, म्हणाले. दुसरे दिवशी सकाळी मी व ते बेंगलोरचे मॅनेजर श्री. मुरलीधरन सरांच्या गाडीतून ‘मवाली’ मध्ये गेलो, तर भली मोठी रांग लागलेली! सुटा-बूटातील ‘जनरल मॅनेजर’ सरना रांगेत कसे उभे राहणार? मुरलीने दुसऱ्या ठिकाणी जाऊया म्हणून सूचना केली. पण सरना ती कशी ऐकणार? त्यांना ‘मवाली’ च हवे होते! सरना रुबाबात रांगेतील लोकांना ओलांडून सरळ हॉटेल मॅनेजर च्या खोलीत व आपले जनरल मॅनेजरचे कार्ड दाखवून त्यांस तुमच्या LPG गॅसचे पुरवठेदार आम्ही आहोत, आम्हास नाश्ता करायचा आहे असे स्पष्ट सांगितले! हॉटेल मॅनेजर तर उडलाच, मोठया अदबीने आम्हा तिघांस त्याने त्याच्या स्पेशल रुम मध्ये नेले व तेथे चांदीच्या ताट वाटीतून आम्हास डोसे-उपमा खाऊ घालून, पैसे तर घेतले नाहीत वर काही छोटा उपहार (presents) दिले! सरनांची छापच तशी असे.
याच काळात आमचा HPC कंपनीनी एल्फ (ELF) या फ्रेंच कंपनीशी करार झाला. त्यांची काही उत्पादने (machine products) आम्ही माझगांवला तयार करावी व भारतात विकावी असे ठरले. त्या अनुसार चार अधिकाऱ्यांची एक टीम फ्रान्सला ट्रेनिंगसाठी पाठवा अशी विनंती ‘एल्फ’ कंपनीने आमच्या कंपनीस केली. त्या अनुसार माझी पॅरीसमध्ये दहा दिवसांच्या ट्रेनिंगसाठी निवड झाली. माझे बरोबर श्री. मूर्ती- क्वॉलिटी कंट्रोल (quality control), श्री. लहरी- सप्लाय डिस्ट्रीब्युशन (supply distribution), व श्री. भास्करन- प्रोडक्शन (production), हे तिघे विविध खात्यातील अधिकारी होते. माझा तरी तो पहिलाच परदेश प्रवास होता व मला परदेश बघण्याची खूपच इच्छा होती. याप्रवासाचे विस्तृत वर्णन मी त्यावेळी च्या (मला वाटते 1989 च्या) ‘गंधाली’ दिवाळी अकांत लिहले होते. खूपच रोमांचकारी व अनुभव समृध्द असा हा योग होता; व एल्फ कंपनीने आमची चांगलीच बडदास्त ठेवली होती. पॅरीस येथील कंपनीचे मुख्यालय, रुऑन येथील त्यांचे संशोधन केंद्र व बेल्जीयम मधील अँटवर्प येथील त्यांच्या उत्पादन कारखाना हे आम्हास पाहण्यास मिळाले. उच्च तंत्रज्ञान वापरुन वंगनांची निर्मिती, दर्जा तपासणी व संशोधन कसे चालते ह्याचे प्रात्यक्षिक या निमित्ताने पहावयास मिळाले!
आमच्या सर्वांनाच हा परदेश प्रवास प्रथमच असल्याने, खूप गमती झाल्या व शिकण्यास ही मिळाले! पॅरीसमध्ये राहण्यासाठी प्रसिध्द ‘आयफेल टॉवर’ जवळच असलेले ‘लाजाड्रीन’ हे पंचतारांकीत हॉटेल होते व त्या हॉटेलच्या माझ्या खिडकीतून रोशनाई केलेला आयफेल टॉवर स्पष्ट दिसत असे! हे वर्ष फ्रेंच राज्य क्रांतीची द्विशतकीय सन (200 वर्ष) होते. त्यामुळे उत्सव होता. एल्फच्या प्रतिनिधीने हॉटेलात रुम्स देतांना आम्हाला बजावले होते की येथे, बियर, वाईन, हवी तेवढी घ्या, मात्र ‘मिनरल वॉटर’ पिऊ नका, नळाचं पाणी प्या. कारण ‘मिनरल वॉटर’चे पैसे आम्ही भरणार नाही. येथे मिनरल वॉटर खूपच महाग आहे! कृष्णमुर्तीला त्यावेळी हे काही समजले नाही, हा पक्का कट्टर खानदानी ब्राम्हण बच्चा, बियर- वाईनला हात ही लावत नसल्यानं खुशाल फ्रिज मधील मिनरल वॉटर पीत राहिला! शेवटी बिल भरताना त्याच्या बिलातील ही रक्कम ‘तांबड्या रेंषांकीत’ (red line) झाली, ज्याचा अर्थ कॉम्प्युटरने ते नोंदले होते व बिचाऱ्या कृष्णमुर्तीला ही सर्व रक्कम स्वतःला भरावी लागली! रक्कम खूपच मोठी होती! त्याचा सर्व भत्ता ‘पाण्यात’ गेला.
कृष्णमुर्तीने बियरचा एवढा धसका घेण्याचे आणखी एक कारण तसेच होते: मुंबईहून विमानाने (एयर-इंडीया) येतांना आम्हाला कंपनीच्या कृपेने ‘बिझनेस क्लास’ हा वरचा वर्ग मिळाला होते व त्यावेळी ‘ड्रींक्स’ अगदी मुक्तपणे हवाई सुंदरी वाटत होती ! आम्ही सर्वजण हा आस्वाद घेत असतांना, कृष्णमुर्तीला ही थोडीशी चाखून पाहण्याची लहर आली व त्याने काही घुटके घेतले. मात्र पुढील आठ तासाच्या प्रवासात त्याने मजा वाटून आणखी काही ग्लास ही रिकामे केले. जेवणाच्या वेळी आम्ही त्याच्या जागेवर पाहतो तर तो दिसेना! ‘बार’ जवळ शोधले तर तेथे ही तो नव्हता! आम्ही काळजीत पडलो मात्र हवाई सुंदरी अनुभवी होती. तिने सीट खाली पाहून तेथे ‘निवांत विश्रांती’ घेणारा कृष्णमुर्ती आम्हास दाखविला! बिचाऱ्याची खूपच फजिती झाली होती, त्यामुळे त्याने पुढे ह्या गोष्टी घेण्याचे सोडून दिले! येताना आम्ही दुबईमार्गे एक दिवस तेथे विश्रांती घेऊन येणार होतो! शॉपिंग दुबईत करायचे होते ना! भास्करन साहेबांनी आमची भंबेरी उडविली. दुबई सरकारच्या नियमानुसार, त्यावेळी तुमच्या विजाचे कागदपत्र हे तुम्ही विमानावर पाऊल ठेवण्याआधीच फॅक्स ने त्यांच्याकडे यावे असा नियम होता. आम्ही तिघांनी मुंबईहून निघतांनाच हे काम केले होते. मात्र भास्करने त्याच्या दुबईत राहणाऱ्या मामाकडे ही कामगिरी सोपाविली होती व आमचे विमान तेथे येण्याआधी मामा हे काम करील असा त्याला पक्का विश्वास होता. भास्करनच्या व आमच्या ही दुर्देवाने त्याचा विजा अधिकाऱ्याकडे आला नाही. कारण त्याच्या मामाच्या गाडीस विमानतळावर येतांना कांही अपघात झाला! झाले! त्यांच्या कायद्यानुसार भास्करनची रवानगी त्वरित ‘तात्पुरत्या कारागृहात’ झाली व आम्ही बाहेर येऊनही सतत त्याच्या सुटकेच्या प्रयत्नास लागलो! कारण पुढील २-३ तासांच्या त्याचा विजा न आल्यास त्यांनी भास्करला पुन्हा ‘फ्रान्स’ला पाठविले असते व मोठाच अनर्थ झाला असता! सुदैवाने आमचे एक मित्र श्री. राज म्हलोत्रा त्यावेळी दुबई मध्ये कामास होते व त्यांची भारतीय हायकमीशन मध्ये ओळख होती. त्यांचे मार्फत भास्करला आम्ही सुमारे तीन तासात बाहेर काढले, व तेव्हां सर्वांचा जीव भांड्यात पडला! त्यानंतर त्याचे मामा साहेब दिलगिरी दर्शवीत, आमचे हॉटेल वर आले! भास्करची ‘शॉपिंग’ची हौस मात्र पुरी झाली.
एकंदरीत ‘भवन’ मधील हा तीन वर्षाचा कालखंड खूपच धामधूमीत गेला! खूपच शिकावयास मिळाले, परदेश प्रवास ही घडला! सरनांचे ‘रिपोर्ट’ चांगलेच असणार. त्यामुळे पुन्हा तीन वर्षात चीफ मॅनेजर (Chief Manager) माझगांव ही बढती मिळाली! आंनद झाला, कारण लवकर बढती होती, थोडे वाईट वाटले, कारण पुन्हा माझगांवला ‘हरीओम’ करायचे होते! मी हे आव्हान देखील स्वीकारायचे ठरवले.
माझगांवला नबंर १ ची जागा मिळणे तशे अपेक्षित होते, कारण येवढी वर्ष तेथे विविध खात्यामध्ये काम केल्यानंतर माझ्या एवढा अनुभवी माणूस मॅनेजमेंटमध्ये, माझगांवमध्ये नव्हता. मात्र या टर्मिनल मध्ये नं १ ची जागा मिळण्यासाठी एक अलिखित नियम पाळला जात असे आणि तो म्हणजे, इजिनिकरीगं डिग्री असलेल्या अधिकाऱ्यासच हे पद मिळत असे. कारण येथे बांधकामाची, मशीनरीची, बरीच काम निघत असत. त्यामुळे उत्पादने जरी केमिकल असली तरी, पार्ष्वभूमि इंजिनियरची लागत असे. मात्र हा अपवाद कंपनीने माझे साठी केला- कारण त्यावेळी आमचे मार्केटिंग डायरेक्टर श्री रामकृष्ण हे खूप समजूतदार गृहस्थ होते व येथे सरना जनरल मॅनेजर असल्याने दोघांची या नेमणूकीस संमती मिळाली.
येथे माझगांवच्या अधिकारी वर्गात खूशी पसरली की माझगांवचे काम माहित असलेला अधिकारी येत आहे. मात्र कामगार वर्गांत थोडी नाराजी अली, कारण माझेकडून त्यांना ‘अवास्तव सवलती’ मिळाल्या नसत्या- योग्य ते जरुर मिळणार होते, परंतु कामगारांची मानसिकता ही ‘जेवढे जास्त मिळेल तेवढे’ ही असते. त्यामुळे पुढारी मंडळी वरून जरी माझे स्वागत करीत होती, तरी आतून थोडी साशंकता होती.
त्यात मॅनेजमेंटने मी माझगांवचा चार्ज घेता घेताच आगीत तेल ओतले. श्री. सरना हे सरळ गृहस्थ होते. पर्सनल मॅनेजर श्री. रॉय म्हणून बंगाली गृहस्थ खूप महत्वाकांक्षी होते. राऊत तेथे इनचार्ज आहे, त्यास सर्व माहिती आहे, तर आता आपण ओ. टी. (over-time) बद्दल एक नोटीस काढून ती राऊतला बंद करावयास सांगूया. असे सरनाला त्यांनी पटवून त्या अर्थाचे एक पत्र दोघांनी सही करुन मला दिले. हा खरे तर चार्ज घेतांनाच, सुरवातीला मला धक्का होता. कारण एवढे वर्ष चालत आलेल्या काही प्रथा अशा एकदम, तोडून टाकणे कुणालाच शक्य नव्हते व कामगार ते कधीच मान्य करणार नव्हते! मॅनेजमेंटला ही ते ठाऊक होते, पण ‘मराठी राऊत व मराठी कामगार’ यांची जुंपत असेल तर होऊ दे! हे त्यांचे धोरण होते! मी श्री.सरना यांच्याशी या बाबतीत बोललो! ते म्हणाले. अरे त्याकडे जास्त लक्ष देऊ नको, रॉयची इच्छा होती म्हणून मी त्यावर सही केली आहे तसेच चालू दे! मात्र मी याला विरोध दर्शविला, म्हंटले दोन उच्च अधिकाऱ्यांनी सही केलेले पत्र मी कसे नाकारु? काहीतरी मला करावेच लागेल, तेव्हा तुम्हालाही डोकेदुखी होणार आहे, मात्र आपण दोघांमध्ये मतभेद होता कामा नये, तुमचे सहकार्य हवे – सरनांना ते पटले!
येथे कामगारांना, माझगांवमध्ये, त्या पत्राची बातमी कळली होती व ते देखील माझ्या ‘स्वागतासाठी’ तयार होते! अनपेक्षितपणे माझी गाडी टर्मिनलच्या गेट मधून आत शिरतांना ‘मॅनेजमेंट मुर्दाबाद’ अशा घोषणा सुरु झाल्या होत्या, त्यामुळे कामगारांनी आपल्या पुढील वाटचालीची दिशा दाखवून दिली होतीच!
त्यावेळी कॅलटेक्स – एस्सो (Caltex + Esso) एकत्रीकरण झाल्याने कॅलटेक्स टर्मिनलला (no.2) नंबर २ असे म्हणत असू व मुख्य एस्सोचे माझगांव हे न.१ होते. त्यामुळे माझ्याकडे शेजारी-शेजारी असलेली ह्या दोन्ही प्लांटचे काम पाहायचे होते. दोन्ही टर्मिनल मधील कामगारांची पद्धती (संस्कृती) जरी वेगवेगळी होती तरी ‘पाणी समपातळीत राहते’ त्या प्रमाणे माझगांवच्या लोकांनी त्यांचे बरेच परिवर्तन केले होते व एरवी मवाळ असलेली ही मंडळी देखील जहाल झाली होती. दोन्ही प्लांट मिळून सुमारे साडेपाचशे (550) कामगार काम करीत. त्या शिवाय काही हंगामी व काही कंत्राटी कामगार मिळून साडेसहाशे-सातशे (650-700) कामगारांना हाताळणे, हे तेवढे सोपे काम नव्हते. बहुतेक कामगार शिवसेना प्रणित ‘कर्मचारी संघटनेचे’ सदस्य होते! माझ्या आधीच्या श्री. वेंकट व मुल्ला यांनी हात सढळ सोडला होता व बऱ्याच गोष्टी कामगार यांस ‘प्रथा’ म्हणून मिळत होत्या. त्यांस कंपनीची कायदेशीर मान्यता नव्हती! व याच गोष्टी मी काढून घ्याव्यात, ही आता मॅनेजमेंटची अपेक्षा होती! पण हे काम सोपे नव्हते – कामगारांना माझ्या पुढील चालीची कल्पना आलीच असणार त्यामुळे माझा पहिलाच दिवस त्यांनी ‘मुर्दाबाद’ च्या गर्जनेने गाजविला!
मी, भास्कर, बाळ, व इतर सहकाऱ्यांनी विचार करुन कामगार नेत्यांशी ह्या पत्राबाबत खुली चर्चा करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे त्याचेशी स्पष्टपणे बोललो. पत्रा प्रमाणे काहीतरी कारवाई करावी लागेल, तेव्हां तुम्ही स्वतःहून किती ओ.टी. कमी करायला तयार आहात ते सांगा म्हणजे त्याप्रमाणे आम्ही मॅनेजमेंटशी बोलू व आपण पुढील काम सुरु करू असे सांगितले!
मात्र अशी सरळपणे मान्य करतील तर ते कामगार पुढारी कसले? आम्ही एक पैसाचाही तोटा करुन घेणार नाही- तुम्ही तसे कळवा, असे त्यांचे म्हणणे पडले. आता प्रश्न आला! उघड-उघड वाद सुरु झाले! आम्ही आमच्याकडून त्यास ज्या गोष्टी अयोग्य वाटत होत्या त्यांची यादी व या गोष्टीसाठी ओ.टी. मिळणार नाही असे त्यांस सांगून आमच्या अधिकाऱ्यांस तश्या सूचना दिल्या! दुसऱ्या दिवशीच माझगांव पेटून उठले. माझी गाडी सकाळी टर्मिनल गेट जवळ अडविली. आता ‘राऊत मुर्दाबाद’ घोषणा ही झाल्या ‘जो हमसे टकरायेगा—–’ नेहमीच नारे-बाजी व कामाची अडवणूक सुरु झाली. आमचे दुपारी येणारे बाहेरचे जेवणही येऊ दिले नाही व परत पाठवून दिले! काँट्रॅक्टरनी पुरविलेले माल आत येऊ दिला नाही. डिलीव्हरीचे काही ट्रक अडविले, वैगेरे प्रकार सुरु करुन, त्यांनी उघड वाद मांडला. आमच्या माझगांवच्या लोकांचे एक वैशिष्ठ्य आहे- ते संपूर्ण काम बंद करुन स्वतःकडे दोष घेत नाहीत, मात्र कामासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी बंद करुन व उत्पादन ५०% वर आणून ‘आम्ही काम कोठे बंद केले आहे?’ असे उत्तर आपल्यालाच विचारतात!
वाद पुरता पेटला आणि अनेक वाटाघाटी होऊन शेवटी मुख्यालयातील ‘औद्योगिक- संबंध’ या डिपार्टमेंटची (Industrial Relations- IR इंडस्ट्रियल रेलशन) माणसे येऊन ही चर्चा करुन गेली. पण कामगारांचे म्हणणे कायम होते- ‘आम्हाला सद्या जे फायदे आहेत त्यात घट मान्य नाही!’ सरना, रॉय यांना देखील आपली चुक कळली होती, पण आता उशीर झाला होता! आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी (officers) माझगांवमधील ओ.टी. बंद करुन टाकला होता. आणि आमचे ऑफीसर्स त्याप्रमाणे कृती करीत होते. त्यांना खात्यामध्ये काम करतांना खूप त्रास होई व हुर्यो देखील उडवित! मात्र सर्वजण ‘एकदा काय तो फैसला होऊन जाऊ दे!’ या स्तिथीत आले होते. कारण त्यांना हा रोजच त्रास असे. आणि या निमित्ताने तरी सर्व काही ते स्पष्ट होईल अशा सर्वांची अपेक्षा होती ! महिनाभर हे चालले! आमच्या अधिकाऱ्यांनी खरेच कौतुकास्पद रितीने सर्व परिस्थितीस धैर्याने तोंड दिले! महिन्याशेवटी कामगारांचे ओ.टी. (Overtime) चे कागद भरावयाचे असतात! त्यावेळी त्यांना कळून आले, की जवळ जवळ ७५% ओटी कमी झाला आहे. उत्पादन ही कमी झाले होते, पण आम्ही उत्पादनाची पर्वा करीत नव्हतो, कारण आम्हाला हे अपेक्षित होते. कामगारांची धांदल उडाली. पुढील महिन्यात तेवढे उत्पन्न घटणार होते व ते त्यांस परवडणारे नव्हते, महिन्याच्या काही ठरावीक खर्चाला ही मंडळी बांधील असतात व उत्पन्न कमी झाल्यास मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे शेवटी कामगारांस कळून चुकले की, आता काही तरी तडजोड निघून पुढील महिन्यांत एवढा तोटा सहन करणे शक्य नाही. हे बरे झाले कारण आता ‘नेते’ मंडळीवर दबाव येऊ लागला व ही मंडळी थोडी नरमाईने बोलू लागली. माझ्याशी बोलणे त्यांस कमीपणा वाटणे साहाजिक होते म्हणून श्री. सरना, रॉय यांचेकडे जाऊन ही मंडळी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करु लागले. अनौपचारीकपणे मला फोन करुन ‘साहेब, काही तरी लवकर तोडगा काढा’ असे म्हणू लागले, पाच-सहा नेते मंडळी त्या काळात पार्ल्याला माझ्या घरी देखील, ‘अनधिकृत’ पणे मला भेटुन विनंती करुन गेली. पण माझा ‘निर्णय पक्का होता, तुम्ही काहीतरी स्वतःहून ओ.टी. मध्ये कपात सुचवा!’ एक-दोन वेळा मला घरी कांही ‘तिसऱ्या’ माणसांनी धमकीचे फोन ही केले. तुम्हाला रात्री बेरात्री मुंबईत हिंडायचे आहे वगैरे! त्यावेळी का कुणास ठाऊक एक मनःस्थितीचीअशी झाली होती की या प्रश्नाचा एकदा कायमचा निकाल होऊ दे म्हणजे आम्ही व कामगार सुध्दा रोजची कटकट न होता काम करु शकू!
तिकडे मार्केटिंग विभागाकडून देखील सरना-रॉय यांचे वर दबाव होता. कारण भारतभर उत्पादनाची कमतरता झाली होती. कंपनीच्या विक्रीवर त्याचा जबरदस्त परिणाम झाला होता. डायरेक्टर मार्केटिंग श्री रामकृष्ण यांनी सरनाला धारेवर धरले होते. त्यामुळे आता त्यांचेसाठी काहीतरी तोडगा निघणे जरुरीचे होते!
शेवटी कामगार नेते व आमची आय.आर. (I.R) डिपार्टमेंटची मंडळी यांचे काही गुफ्तगू होऊन ‘चायना टाऊन’ या प्रसिध्द हॉटेलमध्ये आम्ही काही माझगांवची मंडळी, कामगार नेते व हेड ऑफिसचे लोक अशी सात-आठ माणसांची ‘अनधिकृत’ चर्चा झाली! त्याप्रमाणे नेते मंडळी काही ओ.टी. मध्ये कपात करण्याचे मान्य केले. मात्र त्यांनी सुचविले की, ज्यावेळी अधिकृत चर्चेमध्ये हा प्रस्ताव मॅनेजमेंट करुन चर्चेला येइल, त्यावेळी आम्ही त्याला विरोधच करणार; तुम्ही ते प्रपोजल आमचा विरोध न मानता पुढे न्या, व त्यानंतर कामगारांस समजाऊ. आम्ही सहकार्य दिले! नेहमी असेच असते व ‘मॅनेजमेंट’- ‘कामगार युनियन’ दोघांसही आपला ‘स्वाभिमान’ जागृत ठेऊन शेवटी काही तोडगा काढावा लागतो. मात्र तेथे माझगांवच्या आम्ही अधिकाऱ्यांनी खूप ताणून धरल्याने मॅनेजमेंट हे करु शकली, अन्यथा नेहमीच्या प्रथेप्रमाणे कामगारांच्या मागण्या मान्यकरुन , हार पत्ककरुनच मॅनेजमेंट आपला ‘स्वाभिमान’ दाखवत असे! पुढे रितसर सर्व बोलणी, वाटाघाटी वगैरे झाल्यावर आम्ही सुमारे ३५% ओ.टी. मध्ये घट कमी होईल, असा प्रकारचा प्रस्ताव होता, चर्चा ही झाली, व २५% पर्यंत आम्ही खाली येण्याचे मान्य करुन ही चर्चा संपविली. त्यामानाने खूपच मोठा पल्ला आम्ही गाठला. यात कामगारांचे अहित व्हावे, त्याचे पोटावर पाय द्यावा, अशी माझी वा कोणाही अधिकाऱ्याची कधीच अपेक्षा नव्हती. कंपनी चांगला फायदा कामगारांच्या सहकार्या मुळेच मिळवत असते, पण कामगारांनी सुध्दा काही ‘शिस्तीचे’ पालन करणे आवश्यक असते, जेणे करुन अवाजवी मागण्या मान्य करवून घेण्याचे त्यांनी प्रयत्न करु नये!
ह्या संपामुळे ह्या ‘करारा’ मुळे आम्हास निच्छितच पुढील काम करणे सुलभ झाले! कामगारांसाठी आमच्या ‘टीम’ बद्दल आदर वाटू लागला. आमचे अधिकारी ही मानाने काम करु शकले! तशी माजगांवची मंडळी खरच खिलाडू, काम सुरु झाल्यावर सर्व जण मागील कटूता विसरले व पुढील उत्पादन कामास जोमाने लागले! आमचा पुढील दोन-एक वर्षाचा कालखंड विशेष झगडे-तंटे न होता, अगदीच फलद्रुप झाला. त्या कालखंडातील कांही विशेष घटना बद्दल ही लिहले पाहिजे! मात्र या संप काळांत श्री चंदु दळवी, शेलार, महादेव, फराटे, राजन, दिलीप, मोकल, व इतर ही अनेक मित्रांनी दिलेले सहकार्य विसरता येत नाही!
आता ओ. टी. च्या मागण्या कमी झाल्या होत्या. मात्र कांही इतर विनंत्या पुढे येऊ लागल्या. माझगांवचे साजरे होणारे दोन महत्त्वाचे उत्सव म्हणजे शिवाजी जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती! त्याला माझगांवच्या सामाजिक पाश्वभूमिची कारणे होती. माझगांव १ मध्ये या दोन्ही महापुरुषांचे पुतळे होते तर नं २ टर्मिनलला बाबा साहेबांचा पुतळा नव्हता तो बसवावा अशी विनंती आली. आम्ही ती त्वरीत मान्य केली. तसेच नं २ टर्मिनलला व्यायाम शाळा हवी होती. तेथे एक खोली उपलब्ध करुन सुमारे पाच हजार रुपयांचे कांही व्यायामाचे साहित्य आणून दिले. नं 1 टर्मिनलला छान लायब्ररी (वाचनालय) सुरु केली, जेथे मराठीतील काही उत्तम पुस्तके, कामगारांच्या वाचण्यासाठी आणली, राज्याची वर्तमान पत्रे उपलब्ध केली. माझगांवचा भाग तसा थोडा रखरखीत होता. तेथे आम्ही झाडे, वेली, हिरवळ लावण्याचा उपक्रम हाती घेऊन, श्री. नाडकर्णी या आमच्या अधिकाऱ्यानी पुढाकार घेऊन विभागवार कामगारांना ही सामील करुन घेतले व प्रत्येक विभागाबाहेर छानशा छोट्या बागा तयार केल्या! कामगारही उत्साहाने सर्व उपक्रमांत सहभाग देऊ लागले. प्रत्येक शिवजयंती, आंबेडकर जयंतीला माझे भाषण त्यांस हवेच असे. हा उपक्रम मी सेवानिवृत्त झाल्यावर ही दोन वर्ष सुरु होता. माझी माहिती त्यांस खरेच आवडे व मी देखील अभ्यासपूर्ण काही माहिती जमवून ती त्यांना समजेल व त्याचा उपयोग त्याच्या नेहमीच्या कामांस होईल हे पाही. त्या शिवाय कांही प्रसिध्द मंडळींना ही आम्ही वेळोवेळी बोलावित असू. त्याकाळात वामनराव पै, रमेश मंत्री, रविंद्र पिंगे, रामकृष्ण योगाश्रमच्या प्रेमाबाई अशी त्या त्या क्षेत्रातील अधिकारी मंडळी आम्ही कामगारांस मार्गदर्शनासाठी बोलाविले. दुसरीही बरीच मंडळी आली, आता त्यांची नांवे आठवत नाहीत. कांही कामगारांस आम्ही योग्-शिक्षा घेण्यासाठी व इतर ट्रेनिंग साठी ही बाहेर पाठविले! माझगांव मध्ये ट्रेनिंग – सेन्टर नव्हते त्यामुळे प्रत्येक वेळी काही ट्रेनिंग ऑफीसर आल्यास व कामगारांस द्यावयाचे असल्यास, बाहेर जावे लागे. आम्ही एक जुने गोडावून (godown- गोदाम) सुसज्ज, करुन थोडे पैसे खर्च करुन, काही उपकरणे आणली आणि एक छान केंद्र, बागेसहीत तयार केले. त्याचा सर्वांस खूप फायदा झाला! अशा रितीने फक्त उत्पादन व फक्त कामाचे प्रश्न नव्हे, तर कामगार व त्यांचे कुटूंबीय यांस लाभकारक होतील असे अनेक उपक्रम आम्ही चालविले. त्यामुळे माझा तरी कामगारांच्या कुटूंबीयांशी देखील प्रत्यक्ष संपर्क येत असे. काही कुटूंबातील व्यसनाधिनता, निकृष्ठ राहणीमान व कांही कुटूंबातील बदलीची ही दर्शन झाले.
त्याकरता आम्ही डॉ. मर्चंट ह्यांची मदत घेऊन काही व्याख्याने कामगारसाठी आयोजित केली. आमच्या कामगारांचे दारु पिणे व गुटखा/तबांखू खाणे यांचे प्रमाण खूप होते व काही कामगार ह्याच्या आहारी गेले होते. दोन कामगार मला वाटते दिनकर व काळे अशी त्यांची नावे होती. ते तर ‘ऑडीक्ट’ (व्यसनी) झाले होते. डॉक्टरांच्या मदतीने व्यसन-मुक्ती केंद्रात नेऊन आम्ही त्यांची त्या पासून सुटका केली. त्यांच्या कुटुंबीयांनी धन्यवाद दिले!
सर्व-साधारण मॅनेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांनस सुमारे १०,००० रू. मिळत तर आमचे कांही कामगार महिन्यास १५,००० रू मिळवित. मात्र यांतील कांही कामगार बहुतेक पैसे व्यसनावर खर्च करीत व काही जणांनी तर राजरोस आपल्या लग्नाच्या पत्नी व्यतिरिक्त आणखी ही घरोबा केला होता! त्यामुळे घरी देखील नेहमी वाद होत असत. कधी कधी त्यांच्या ह्या बायका येऊन माझ्या कडे तक्रार करी व काही तरी निवाडा करा अशी विनंती करीत. पगाराची ठराविक रक्कम आम्हास मिळावी म्हणून सांगत! मोठे अवघड पेच माझ्या समोर असत. अशा वेळी सर्व संबंधितास एकत्र बसवून मी खुल्या चर्चने कामगारांच्या काही प्रतिनिधी ना घेऊन, आपापसांतच असे प्रश्न मिटविले आहेत! एकदा असे झाले की रात्र पाळीचा एक कामगार आपले कार्ड ‘पंच’ न करता गुपचुप कंपनी बाहेर काही ‘उद्योग’ करण्यासाठी गेला. थोड्या वेळात परत येऊन जातांना कार्ड ‘पंच’ करु असा त्याचा विचार होता. दुर्दैवाने त्याच्या अपघाती मृत्यु झाला व पोलिसांनी आम्हास त्या बाबत कळविले. त्याचे हजेरीचे कार्ड ‘पंच’ न झाल्यामुळे तो अधिकृत रित्या तर कामावर होता असे दिसत होते मात्र त्याची बॉडी (मृतदेह) तर भायखळ्यास मिळाली! हे मोठेच प्रकरण झाले. पोलिसांकडून ही ठपका आला व आमच्या मॅनेजमेंट कडून ही! मात्र त्यामुळे त्या कामगाराला मिळणारी असिडेंट भरपाईची रक्कम मिळू शकली नाही व इतर फायदे (पैशाच्या स्वरूपात मिळण्यास उशीर झाला). मध्यंतरीच्या काळांत त्याची “दोन्ही” कुटूंबे माझ्याकडे येऊन पैशाची रक्कम आम्हालाच मिळाली पाहिजे म्हणून दावा करु लागली! येथे ही कसोटी होती पण शेवटी सामोपचाराने मी हा प्रश्न कामगार व व्यवस्थापन यांच्या मदतीने सोडविला. प्रत्येक ठिकाणी नियम, कायदा पाहण्यापेक्षा व्यवहार व प्रत्यक्ष परिस्थितीचा आपल्याला अभ्यास करता आले तर असे प्रश्न खूप सामोपचाराने, सर्वांचे समाधान करुन, कोणतीही कटुता न राहता सोडवित येतात असा मला अनुभव आला! त्यामुळे कामगारांचे प्रेमही मिळाले व मला ही समाधान मिळाले. माझगांवमध्ये एवढी वर्ष काम केल्याचा असा फायदा मिळाला व एक यशस्वी मॅनेजर म्हणून एवढा दीर्घ काळ मी तेथे काम करु शकलो!
कामगारांस मिळणाऱ्या एकूण ‘पे-पॅकेज’ बद्दल मागे लिहले आहे. मात्र बाहेरच्या इंडस्ट्रीमधील लोकांस जेव्हा हे कळले तेव्हा त्यावेळी (इकॉनॉमिक्स टाइम्स) ह्या वृत्त पात्रांत या विषयावर आलेले बातमी पत्र आठवते. त्यात त्यांनी एकूणच पेट्रोलियम क्षेत्रांतील कामगारांस मिळणाऱ्या वेतन व इतर सुख सोयीचा आढावा घेतला होता व त्यांस असे ही आढळून आले होते की पेट्रोलियम कंपनीतील एका झाडू वाल्याचा पगार (मला वाटेते IOC कंपनी असावी) हा कंपनीच्या चेअरमनला मिळणाऱ्या वेतनापेक्षा जास्त होता, कारण झाडूवाल्याकडे ओ.टी.चा ‘मॅजीक झाडू’ होता! त्या शिवाय आमच्या कामगारांस स्वस्त नास्ता, जेवण, थंडीतील उबदार कपडे, युनिफॉर्मचे कपडे, बुट, गमबुटस, द्वि वार्षिक प्रवास भत्ता (कुटूंबासाठी), राहण्यासाठी बाहेर गावची गेस्ट हाऊसेस. वाहन विकत घेण्यासाठी कर्ज, घर घेण्यासाठी कर्ज, ह्या व इतर ही लहान-मोठ्या अनेक सवलती होत्या! एवढे असून ही आमचे काही कामगार कर्ज बाजारी असत! महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत पठाणांची गर्दी आमच्या गेट समोर होत असे -ती पैसे वसूली साठी! मात्र काही कामगारांनी या चांगल्या वेतनाचा, व सुख सोयीचा, छान उपयोग केला. विशेषतः आपल्या मुलांस उच्च शिक्षण दिले! दरवर्षीच्या वार्षिक टर्मिनल दिनाच्या दिवशी अशा मुलांस आम्ही काही पारितोषिक देत असू! आता मुख्य ऑफिसात (हिंदुस्तान भवन) मध्ये काही बदल झाले होते व श्री. सरना सेवानिवृत्त होऊन श्री. सुरींदर कपूर हे आमचे जनरल मॅनेजर, ल्युब मार्केटींग म्हणून आले होते. सरना यांनी तसा विशेष ल्युब खात्याचा अनुभव नसतांना व्यवस्थित आपले गाडे हाकले व सुरवातीच्या संपाचा डोकेदुखीचा काळ वगळता त्यांनी मजेत दिवस काढले. मला ही छान सहकार्य दिले व माझ्यावर त्यांनी ‘पुत्रवत’ असेच प्रेम केले. ते मला नेहमी “बेटा सून, मै क्या कहता हूँ…” अशा रितीनेच सांगत. सेवा-निवृत्तीनंतर ते दिल्लीला घरी राहण्यास गेले व तेथून ही आमचा संपर्क असे, मुंबईस काही कामासाठी आले की मला बोलवून घेत. मी दिल्लीस गेल्यावर त्यांच्या बरोबर ‘गोल्फ क्लब’ मधील संध्याकाळचे जेवण नक्की असे. एक-दोनदा आपल्या घरीही मला नेले होते व स्वतः ही आमच्या पार्ल्याच्या घरी येऊन गेले. गेले काही वर्ष मात्र माझा त्यांचा संपर्क नाही!
श्री. कपूर हे देखील पंजाबी गृहस्थ, मात्र खूप महत्वकांक्षी! एस्सो व एचपीसी मध्ये भरा-भरा वर चढत गेलेले अधिकारी होते! त्यांनाही आमच्या खात्याचे तसे जास्त ज्ञान वा कामाचा अनुभव नव्हता, मात्र शिकून घेण्याची त्यांची खूप तळमळ असे व त्यामुळे या खात्यात आल्यावर त्यांनी बऱ्याच नवीन गोष्टी शिकून घेतल्या एखादी समस्या त्यांस नीट उकलत नसली, तर सरळ कागद पेन घेऊन, क्रमवार सगळे विस्तृत लिहावयास बसत व समोरच्या माणसाला कंटाळा येई पर्यंत लहान-सहान प्रश्न विचारून, ती समस्या व्यवस्थित समजावून घेत! आमच्या सारख्यांस याचा खूप त्रास ही होई. पण “साहेबा समोर गीता वाचावीच लागे!” मात्र माझे व कपूर यांचे सूर ही छानच जुळले! कपूरचा स्वभावही तसा मनमिळावू होता. जनरल मॅनेजर व माझगांवचा नं.१ मॅनेजर यांचे सूर हे जुळावेच लागतात व त्यात बहुदा जनरल मॅनेजरलाच पुढाकार घ्यावा लागतो.
दुसराही एक मोठा बदल मुख्य कार्यालयात झाला होता व तो म्हणजे डायरेक्टर मार्केटिंग श्री. रामकृष्णन सेवानिवृत्त होऊन श्री. झुटशी हे आमचे डायरेक्टर मार्केटिंग म्हणून नियुक्त झाले. हा बदल खूप मोठा होता व माझ्या दृष्टीने तर तो माझ्या या कंपनीतील अखेरच्या कालखंडास खूपच कलाटणी देणारा ठरला! श्री. झुटशी हे खूपच गर्विष्ठ व सर्वांपासून अलिप्त राहणारे फक्त कायदे, नियम यावर बोट ठवून व्यवहाराशी संपूर्ण फारकत घेणारे असे गृहस्थ होते व पहिल्या पासूनच कंपनीतील त्यांची प्रतिमा अशीच होती. त्यांना कोणीच मित्र नव्हते. त्यावेळच्या काश्मिरच्या डायरेक्टर जनरल (पोलीस खाते) चा हा मुलगा! व हेच नोकरी मिळविण्यात एक क्वालिफिकेशन (qualification -पात्रता) उपयोगी पडले. इंजिनियर होते, पण भरा-भरा प्रमोशन घेतल्याने खूप घमेंड ही दाखवित असत! अधिकाऱ्याने ‘टाय’ मध्येच आले पाहिजे, असा त्यांच्या खात्यात त्यांचा कायदा असे. त्यामुळे झुटशी डायरेक्टर झाल्यावर, आता हिंदुस्थान-भवन मधले झाडू वाले ही टाय मध्ये येणार असा विनोद त्यावेळी कर्मचारी करीत! स्वतः नेहमी सूट बुटात असत. माझे व झुटशी यांचे तसे अधिकृत संबंध कामाच्या दृष्टीने आले नव्हते, मात्र आम्ही एकमेकांस चांगले ‘ओळखत’ होतो. झुटशी HR डिपार्टमेंट मध्ये असतांना, त्यांना माझी माहिती कळली होती! मात्र श्री. कपूर हे जनरल मॅनेजर आल्या बरोबर झुरशीनी एक फतवा काढून ‘मी माझगांवला भेट देऊ इच्छित आहे – दिवस नक्की करुन मला कळवा’ असे कपूर व मला कळविले! ही एक आश्चर्यकारक घटना होती कारण त्याआधी कोणीच डायरेक्टर दर्जाचा अधिकारी माझगांवला भेट देऊन गेला नव्हता! त्यामुळे झुटशी नक्की कशासाठी माझगांवला येत आहेत, हे कोणास समजेना!
खरे तर माझगांवची प्रतिमाच अशी होती की, आमचा जनरल मॅनेजर ही कारण परस्ते तेथे येऊ इच्छित नसे. कारण जेवढा मोठा अधिकारी माझगांवला भेट देणार, तेवढा जास्त चेव तेथील कामगारांस चढे व त्याचा जास्तीत-जास्त पाणउतारा करायचा प्रयत्न करीत. मागे प्रभाकरनच्या काळांत असाच एक संप चालू असतांना एक जनरल मॅनेजर आपले ‘कामगार संबंध’ किती चांगले आहेत, हे दाखविण्यासाठी व संप मिटविण्यासाठी बोलणी करण्यासाठी माझगांव मध्ये आले! कामगार त्यांची वाटच पाहत होते ते दरवाजात शिरतानाच, दाराशी घोळका करुन असणाऱ्या कामगारांतील कोणी तरी एक पचकन पान-तंबाखूची पिंक त्यांचे वर टाकली! त्या कामगारावर कारवाई करु नये ही पुन्हा कामगारांची मागणी, तर जनरल मॅनेजर वर थुंकणाऱ्याला शिक्षा न झाल्यास कंपनीची इज्जत! नावाचं प्रश्न निर्माण झाला! परंतु झुटशीना कोणी समजाऊ शकत नव्हते. ते आलेच! कपूरने खूप कळवळ्याने ‘राऊत मेरी नोकरी बचाना, देखिये कुछ गलत काम होना नही चाहिये’ वगैरे मला खूप समजावले. मी देखील त्यास निश्चित केले, येथे कामगारांची मी एक सभा घेतली व उत्कट रितीने त्यांस समजावून सांगितले. बघा, मी व कपूरनी मुद्दाम डायरेक्टर साहेबांस हे आमंत्रण दिले आहे, कारण अजून कोणीच डायरेक्टर येथे आलेला नाही व झुटशी साहेब स्वतः आपल्याकडे आल्याने आपले जे प्रलंबीत प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवून घेता येतील. प्रत्यक्ष परिस्थिति आपण त्यांना दाखवू- सर्वांनी शिस्तित वागा! ही मात्रा बरोबर लागू पडली व श्री. झुटशी आल्यावर तसे काही झाले नाही. माझगांव मध्ये झुटशी दोन्ही टर्मिनलच्या कानाकोपऱ्यांत गेले परंतु कोठेच त्यांना काही सापडेना – सर्व टापटीप स्वच्छ व कामेही व्यवस्थित चाललेली. लॉग बुक, इन्वेंटरी बुक, वगैरे सर्व पाहणी झाल्यावर, त्यांनी वर पाहिले (आकाशाकडे नव्हे, माळ्यावर) व म्हणले ‘वर जाऊया’! खरे तर वरील माळा हा आमच्या सर्व जंक, रद्दी सामानाचा माळा असे, तेथे काय पाहायचे? पण मला वाटते त्यांचे कानावर कोठून तरी अशी बातमी असावी की काही कामगार दारुच्या बाटल्या अशा माळ्यावर ठेवतात व कामाच्या वेळी पितात! पूर्वी तसे होई मात्र माझ्या आधीच्या कालखंडात, वेंकट असताना आम्ही ही प्रॅक्टीस मोडून काढली होती. व तश्या काही कामगारांस तंबी दिली होती! त्यामुळे सुदैवाने कचरा डब्बे, कार्टन या खेरीज त्यांना तेथे काही मिळाले नाही व शेवटी जातांना एवढेच म्हणाले – I am happy -मला बरे वाटले. झुटशीची साधे समाधान आम्हाला भरपूर मोठी पावती होती ! कपूराना ही खूप बरे वाटले – एवढे की ही भेट झाल्यानंतर कपूरनी एक पार्टी माझगांवच्या ऑफिससाठी दिली! अशा रितीने कपूर व झुटशी यांची माझगांवबद्दल साशंक असलेली मने साफ करण्यास ही भेट उपयोगी ठरली. व मलाही माझ्या पुढील कामासाठी हुरुप आला! पण नंतर श्री. झुटशीनी आठवडा भरातच दुसरे एक सूचना पत्रक काढले. त्यावरुन झुटशीची ‘खवखव’ अजून शांत झालेली नाही असेच दिसून आले. त्यांचे पत्रक असे होते :
“भारतातील सर्व प्रमुख टर्मिनलची रिव्यू मिटींग बोलवावी व त्यात माझगांवचा रिव्यू कधी ती तारीख, वेळ मला कळवावी!” भारतात- माझगांव, माहूल, शिवडी, लोणी, विशाखापट्टणम, दिल्ली, मद्रास, कलकत्ता, इ.ठिकाणी आमची टर्मिनल होती व फक्त माझगांव हे ल्यूब ऑइलचे (Lube Oil) टर्मिनल होते. बाकीची सर्व टर्मिनल इंधन साठा (पेट्रोल, डिझेल, केरोसीन) साठी होती. त्यामुळे पुन्हा एकदा झुटशीना माझे ‘सादरीकरण’ (presentation) पहावयाचे होते व खास त्याच करमणूकीच्या कार्यक्रमास त्यांस यायचे होते. जेजुरीचा खंडू राया, तुळजापुरची आई भवानी, पंढरीचा पांडुराया, सगळ्यांना जागराला बोलावले होते, मात्र माझगांवच्या ‘राऊत राया’ साठी हा खेळ मांडीला होता तर कपूरयांनी ही मला सांगितले “राऊत काय रे, आपल्यावरच ह्या झुटशीचे एवढे प्रेम कशासाठी?”
मी म्हंटले हे “पुतना मावशीचे प्रेम आहे, आपण तयारी नीट करुया !” मी माझे संपूर्ण सादरीकरणाचे पेपर्स (slides/data) तयार करुन श्री. कपूरयांस दाखवून त्यांची मंजूरी घेतली. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी उत्कृष्ठ सहकार्य देऊन माझगांवचे उत्पादन, विक्री, साठा, कामगारांचे प्रश्न, वाईट प्रथा, ओव्हर टाईम, उत्पादकता इ. सर्व अंगाचा विचार करुन एक तासाभराचे सादरीकरण (presentation) बनविले. मात्र माझी एक पारदर्शिका (slide), मी श्री. कपूरना दाखविली नाही व ती फक्त झुटशीनाच दाखवायचे ठरविले! ठरल्या दिवशी मला वाटते, बांद्रयास, एका हॉटेल मध्ये, दोन दिवसाचा हा प्रोग्राम (programme) होता. आम्ही सर्व जमलो. श्री कपूर आले होते व माझे सादरीकरण (presentation) पहिल्याच दिवशी पहिले असल्याने अर्थातच झुटशी देखील वेळेवर आले. मला धाकधूक तर होतीच कारण एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यासमोर व सर्व भारतातील मॅनेजर्ससमोर प्रथमच मी येत होतो! आणि माझगांवला एका ‘तासात’ पकडायचे म्हणजे नेमके सांगायला हवे होते! परमेश्वरी कृपेने सर्व छान झाले. प्रश्नोत्तरे ही व्यवस्थित झाली. झुटशीनी काही मामुली प्रश्न विचारले. आता शेवटी सर्वांना चकीत करायची पाळी आली होती. बसायला जायच्या आधी मी एक (slide) स्लाईड सर्वांस दाखविली ती अशी:
माझगांव एकूण विक्रीची किमंत | Year १९९१ | ३०० कोटी |
एकूण खर्च | कच्चा माल, तेल आदि किमंत | १५० कोटी |
वीज, पाणी, ओव्हर टाईम पगार इ | १० कोटी | |
इतर खर्च ( उत्पादन व विक्रीसाठी) | २० कोटी | |
एकूण निव्वळ कराराआधी नफा | (३०० – १८०) कोटी = | १२० कोटी |
माझगांव मशीनरी आजची किमंत | २० कोटी |
ह्याचा अर्थ असा होता. केवळ २० कोटी रुपयांची जुनी मशीनरी १२० कोटी रुपयांचा फायदा कंपनीस करुन देत होती व तो देखील एका वर्षात!
हे पाहिल्यावर तर झुटशीचे डोळेच फिरले! कपूर देखील माझ्याकडे कौतुकाने पाहू लागले, मला हे आधी दाखविले नव्हते! असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असावा. टाळ्यांचा कडकडाट झाला व झुटशी त्यानंतर निघून गेले. इतर कोणीच अधिकाऱ्याने ही माहिती आपल्या टर्मिनल विषयी दिली नव्हती. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, परंतु तो मास्टर स्ट्रोक (master stroke) ठरला! त्यानंतर मात्र कोणतेही सादरीकरण (presentation) अथवा भेटी साठी ते आले नाहीत! मात्र माझ्या लक्षांत एक गोष्ट एव्हाना अली होती, की माझ्या बाबतीत त्यांचे मनांत काही तरी अढी आहे व कोणते तरी कारण शोधून त्यांस मला अडकावयाचे आहे. वास्तविक सुमारे वीस वर्षापेक्षा जास्त काळ मी कंपनीत काम केले होते व अजून पर्यंत तरी माझे रेकॉर्ड स्वच्छ होते. परंतु झुटशी ‘हलक्या कानाचे’ होते व स्पष्ट पणे न विचारता असे ‘नथी तून तीर’ मारीत! एक संधी त्यांस त्वरीतच मिळाली.
श्री. रामकृष्णन यांचा निरोप समारंभ व श्री. झुटशी यांना वेलकम हा कार्यक्रम, ऑफिसर्स युनियनने (EMSA- Esso Manegment Staff Association) ठरविला होता. मी अगदी पहिल्या पासून या ऑफिसर्स युनियनशी निगडीत होतो व प्रथम कार्यकारीणीच्या १० सदस्यांपैकी एक होतो! त्यामुळे ही मंडळी माझा सल्ला घेत व अशा स्टाफ कार्यक्रमात मला बोलावित! वास्तविक तेथे जाणे काहीचं वावगे नव्हते कारण रामकृष्णांना निरोप समारंभ द्यायलाच हवा होता! मात्र झाले उलटेच. त्या कार्यक्रमांत चर्चेवरुन चर्चा होता होता दिशा भलतीकडेच गेली. झुटशीवर लोकांनी तोंड सुख घेतले व त्यांना असे वाटले की हे सर्व पूर्व नियोजित होते. राऊतला याची कल्पना असली पाहिजे व तो तेथे का आला? आमच्या सारख्यावरीष्ठ मॅनेजर्सनी स्टाफ युनियनशी संबंध ठेऊ नये असेच त्याचे मत होते. सभा गरमागर्मीत आटोपली व कोणी जेवण ही घेतले नाही. मला बाजूला घेऊन श्री. झुटशी म्हणाले, “तू कधी माझगांवच्या, मुंबईच्या बाहेर गेला आहेस काय?”
मी – “नाही, तशी कधी पाळी आली नाही!”
झुटशी – “बाहेर जायला तयार आहेस काय?”
मी – “आनंदाने, मी कधीच कोणत्या ट्रान्सफरला नाही म्हंटले नाही!”
ताबडतोब आठ दिवसांनी मला ‘Dy. General Manager, South Zone’ अशी नोटीस हातात पडली! प्रमोशन होते व मद्रासला जायचे होते! माझ्या डोक्यांत सर्व प्रकाश पडला व झुटशीची माझ्यामागे एवढी का तबर होती त्याचाही उलगडा झाला. वास्तविक ही मला चांगलीच संधी होती व मी अशी संधी पूर्वी देखील कधी नाकारली नव्हती. मी मद्रासला जाण्याची तयारी करु लागलो! आठ दिवसात श्री. कपूर यांनी बोलावून पुन्हा एक दुसरा कागद हातांत दिला व जुना कागद परत घेतला! आता मला हिदुस्थान भवन मधेच ‘डेप्यूटी जनरल मॅनेजर (Dy. general manager)’ म्हणून ठेवले होते! काय चमत्कार झाला? मात्र या घटने नंतर, मी विचार केल्यावर मला मद्रासला पाठविण्यांत झुटशीचा प्रामाणिक हेतु मला झोनल/ रिजनल ऑफिसचा अनुभव मिळावा व ‘मी मुंबईच्याबाहेर ही काम केले’ असा रेकॉर्ड तयार व्हावा, हा असू शकतो. काहीही असो, रामकृष्ण व झुटशी दोघांचे पटत नसे, हे खरे. व त्यामुळे कदाचित माझे मोठे नुकसान झाले!
कोणा कडून तरी कळले की, रामकृष्णन जरी निवृत्त होत होते, तरी त्यांनी झुटशीची कान उघडणी करुन त्यावेळी ही बदली रद्द करविली व ल्युब खात्यामध्येच राऊतला पुढच्या बदल्या द्या अशी तंबी दिली! मात्र त्यांनी केलेली ही हितकारक गोष्ट, नाहक मला त्रासदायक ठरली व रामकृष्णन गेल्यावर झुरशीनी ह्याचा राग माझेवर काढून, माझा पुढची प्रमोशने (जनरल मॅनेजर) अडकवून ठेवली! माझा दोष काय होता? दोन हत्ती मधील हे भांडण होते व त्यात ‘गवतांचा’ चुराडा झाला होता.
मात्र अजून माझगांव प्रकरण संपलेले नाही– झुटशीच्या रिव्हेंजनंतर कपूरचा माझ्यावरील विश्वास खूपच वाढला व माझी माझगांव बाबत सर्व निवेदने (projects/proposals), मंजूर होऊ लागली. खूपच नवी यंत्रे, उपकरणे आम्ही आणू शकलो. उत्पादन क्षमता वाढली!
श्री. कपूर बरोबर आमचे काम ठीक चालले होते. मात्र मधेच एक नवा पेच निर्माण झाला व आमच्या संबंधातही तढे निर्माण होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.
माझगांव मध्ये टँकर हे प्रकरण तसे जुनेच. आता टर्मिनलचा मुख्य म्हणून माझ्याकडे हे काम होते. खूपच काळजी पूर्वक हे काम आम्ही करीत असू! एक आयात केलेल्या तेलाचा टँकर येण्याची वेळ व ट्रान्सपोर्टर लोकांनी पुकारलेला संप, ह्या वेळा एकाच वेळी आल्या आणि हे तेल कसे उतरुन घ्यावयाचे याचा आमच्या समोर प्रश्न निर्माण झाला! साधारणतः आठ-एक दिवसा आधी टँकरची येण्याची तारीख कळते व ती पुढे-मागे ही होऊ शकते. आम्ही कपूरना विनंती केलेली याबाबतीत आपण टँकर थोडा उशिरा आणता येईल तर तसा प्रयत्न करु! कारण टँकर बंदरात लागल्या बरोबर, तेल उतरविण्याचे काम सुरू करावे लागते व ते तसे न झाल्यास तासाला ५०० डॉलर (दिवसाला सुमारे १५००० डॉलर) येवढी नुकसान भरपाई टँकर कंपनीस द्यावी लागते. ही रक्कम द्यावी लागल्यास कंपनी त्वरीत कारवाई सुरु करते व त्यावेळी टर्मिनलच्या माणसांनीच आधी माहित असून, हे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना का नाही केली असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु कपूर काही मानेनात ट्रान्सपोर्टर लोक आपल्या ‘नाही’ सांगूच शकत नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. काही अंशी ते ठीक ही होते, मात्र यात नुकसान भरपाईचा धोका होता व आम्हास तो नको होता. शेवटी बरोबर एका रविवारीच इंदिरा गोदीत टँकर आला व माझ्या घरी दोन फोन खणखणले एक शिपींग डिपार्टमेंटचा व दुसरा श्री. कपूर यांचे कडून. रविवारी घरी आराम करीत असताना ही आफत आली! श्री. कपूर यांनी मला त्वरित माझगांवमध्ये हजर होण्यास व संबंधीत अधिकारी व कामगारांस ही तेथे बोलविण्यासंबधी सांगितले. सुदैवाने आमची मंडळी वेळेत हजर झाली. कपूरनी ट्रान्सपोर्टर लोकांशी बोलण्याचे कबूल केले. १० वाजता (सकाळी) जहाज बंदरात लागणार होते. नऊ वाजेपर्यंत जेमतेम चार – पाच ट्रक येऊन उभे राहिले.
ते खूप अपूरे होते. कमीत कमी १५ तरी हवे होते. आलेल्यांपैकी सुद्धा त्यांचे ड्राइव्हरर्स सागंत होते इतर ट्रान्सपोर्टर लोकांचे लोक आम्हावर दगड फेक करतील मारहाण करतील, ते ही बरोबर होते. मी त्वरीत शिवडी पोलीस स्टेशनवर संपर्क साधून त्यांची मदत मागविली. तेथील इन्स्पेक्टर खूपच चांगले निघाले. स्वतः बरोबर पोलिसांची जीप घेऊन येऊन त्यांनी पोलीस संरक्षण देण्याचे कबूल केले. हे पाहताच सुदैवाने जहाज लागण्याआधी आमचे लोक व १५ ट्रक बंदरात हजर झाले. ऑपरेशन वेळेत सुरु झाले! डॉकचा परिसर हा गुडांसाठी प्रसिद्धच आहे. काही किरकोळ घटना वगळता आमच्या ट्रान्सपोर्टला विशेष त्रास झाला नाही. पोलिसांनी खूपच छान काम केले. तीस तासात आमचे काम झाले! एरव्ही ह्या कामास, ट्रॅफिक मुळे दुप्पट वेळ लागला असता पण रस्ता मोकळा मिळाल्याने पटापट काम झाले! टँकर रिकामी होऊन दुसऱ्या बंदरासाठी रवाना झाला, आमची मोहीम यशस्वी झाली. आम्ही श्रेय श्री. कपूर साहेबांस देऊन, त्या अर्थाचे, त्यांच्या मार्गदर्शनाचे आभार मानणारे पत्र मी त्यांस पाठविले! कपूर यांचा मोठेपणा असा की दुसरेच दिवशी त्यांनी स्वतःच्या सहीने एक पत्र पाठवून सर्व श्रेय आम्हा माझगांवकरांस दिले व डायरेक्टर झुटशी यांस ही त्यांनी एक पत्र पाठविले! ते सुंदर शिफारस पत्र आजही मी जपून ठेवले आहे! अशी कंपनीची जोरदार कामे सुरु होती. एकदा मला वाटते वर्ष अखेरीस ( फेब्रुवारी-मार्च) मार्केटिंग डिपार्टमेंटला नेहमी पेक्षा जवळ-जवळ दुप्पट मालाचा पुरवठा हवा होता. कारण त्यांस वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या महिन्यांत खूप उत्पादनाची जरुरी होती. कपूरनी आम्हास तशी विनंती केली. हे खूपच कठीण काम असते, कारण जरी आम्ही तेव्हढे उत्पादन काढू शकत असलो तरी कच्चा माल (raw material) योग्य प्रमाणात, एकाच महिन्यांत पुरवठा होणे कठीण असते. इतरही अडचणी असतात. मात्र आमच्या टीमने हे आव्हान स्विकारले. कंपनीच्या भारतांतील विक्री हिश्श्यात जर या वर्षी वाढ झाली तर आपणा सर्वासंच भूषणावह आहे असे सांगितले! आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही हे काम करुन दाखविले आणि मार्केटिंग खात्याने आपले लक्ष्य (target) पूर्ण केले! अर्थातच त्या बद्दल ही कपूर यांचे शिफारस पत्र मला स्वतःला, टर्मिनलला मिळाले! त्यानंतर एक छानशी पार्टी ही सर्वांस मिळाली हे सांगावयास नकोच! अशा रितीने त्या कालखंडात श्री. कपूर यांनी दिलेले प्रत्येक आव्हान आम्ही स्विकारले व यशस्वी करुन दाखविले. याचे श्रेय हे त्यावेळच्या आमच्या टीमलाच द्यावे लागले. उत्पादन खाते, फायनान्स, इंडस्ट्रिअल रिलेशन्स, वितरण, कच्चा माल मागविणारे खाते, इ. सर्वच खात्याचा ताळमेळ जमणे आवश्यक असते. ते होऊ शकले आणि त्यामुळेच ही कामे झाली, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे.
ह्या काळात श्री. कपूर यांनी sales eng. conference महाबळेश्वर येथे भरविली. सरनांनी बाहेर जाण्याची प्रथा सुरु केली होतीच. त्यामुळे आता निगडी मधेच ही कॉन्फरन्स घेण्याची गरज नव्हती ह्या मिटींगसाठी खरेतर माझगांवच्या उत्पादन खात्यातून कोणाला बोलाविणे जरुरी नव्हते, पण कपूरनी मला व भास्करनला त्यासाठी खास आमंत्रण दिले कॉन्फरन्स मध्ये आमचा गौरव केला. ती देखील तीन दिवसांची छान ‘ट्रिप’ होती. ह्याच काळात लुब्री झॉल, शेवरॉन, या सारख्या अंतराष्ट्रीय कंपन्या ही ‘लुब्रीकंट’च्या संबंधात काही सेमिनार भरवित. कोचीन, बेंगलोर, जयपूर, अशा ठिकाणी भरविलेल्या या सेमिनार साठी ही जाऊन आलो. चांगली माहिती मिळते, या क्षेत्रातील लोकांची ओळखही होते! हे सर्व करीत असतांना अधिकारी व कामगार यांच्या वैयक्तिक विकासासाठी देखील काही तसे कार्यक्रम राबविले. प्रशिक्षण, व्यसन-मुक्ती सेमिनार, आरोग्य चाचणी, व विशेष म्हणजे कामगारांनाच काम करीत असतांनाच उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन, सांगावयास खरोखर अभिमान वाटतो की त्या कालखंडात सात-आठ कामगारांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली व हळूहळू कामगार-ते-क्लार्क अशी बढती त्यांनी मिळवली. त्यातूनच काही अधिकारी झाले, तर काहींनी ती संधी नाकारली. मात्र ज्यांनी ती संधी घेतली त्या कामगारांपैकी श्री. अशोक नाईक ह्या आमच्या कामगाराचे नांव मी आवश्य घेईन. कारण ते आज ‘मॅनेजर’ झाले आहेत. माझ्या समोरच कामगार ते मॅनेजर हा प्रवास करणाऱ्या या कर्मचाऱ्याचे मला कौतुक आहे. श्री नाईक देखील ते ऋण अजून मानतात. अशी कितीतरी उदाहरणे क्लार्क ते मॅनेजर असा बढतीचा प्रवास करणाऱ्यांची देखील सांगता येतील.
या दरम्यान एक गंमतशीर प्रसंग देखील घडला, त्याचे ही थोडक्यांत वर्णन केले पाहिजे. दर तीन वर्षांनी कामगार – मॅनेजमेंट यांच्या मध्ये एक करार होतो (long term agreement -LTS). त्यानुसार पुढील तीनही वर्षे कोणताही वाद नकरता दोन्ही बाजूनी वागावयाचे असते. कामगार-मालक, तंटे कमी व्हावे हा उद्देश. त्यासाठी मॅनेजमेंटने जी टीम निवडली त्यात माझाही नंबर लागला व लोणावळा-कार्ला येथील विश्रामधामांत तीन दिवस हा ‘तमाशा’ झाला. कंपनीच्या टीम चे प्रमुख श्री. पी.सी. राय, हे आय.आर (I.R) चे जनरल मॅनेजर होते. आमचे काम त्यांना मदत करणे, टर्मिनलमधील प्रत्यक्ष परिस्थिती समजावणे असे होते. कामगारांकडून सुमारे ५ ते ६ कामगार सघटनांचे प्रतिनिधी भारतभरांतून आले होते. श्री. राजाभाऊ कुलकर्णी, तसेच दिल्ली, मद्रास, कलकत्त्यातील जहाल नेते मंडळी होती. सकाळी ९ ला चर्चा सुरवात होऊन रात्री १० पर्यंत ही कधी कधी चर्चा होई. खूप गरमागरम वातावरणांत एक दोनदा श्री. राय यांस चक्करही आली, एवढा ताण ही कामगार युनियनची मंडळी देई. कधी त्यांना फक्त राय यांसच काही माहिती द्यायची असे. तेव्हा आम्ही मॅनेजर्स बाहेर बसत असू. एकंदरीत मॅनेजमेंट टीमची खूपच अवहेलना होत असे.
शेवटच्या दिवशी चर्चा पूर्ण होऊन, सर्व मुद्द्यांवर सह्या होईपर्यंत रात्र सरुन पहाटे दोन वाजले असावेत. सकाळी ७ ला आपली गाडी पकडून मुंबई वा इतर ठिकाणी जायचे होते. सर्व मंडळी आपापल्या खोलीत परत गेली व पाहतात तो कामगारांच्या सर्व खोल्या, भामट्यांनी या दरम्यान ‘साफ’ करुन त्यांच्या बॅगा व महत्वाचे सामान, कपडे सर्व लपांस केले होते! तिकिटे देखील गेली होती! सर्व कामगारांच्या खोलीत हे कसे झाले? थोड्याच वेळा पूर्वी जहाल भासणारी ही मंडळी अगदीच ‘हवालदील’ झाली व घातलेल्या कपड्यानिशीच, मॅनेजमेंटकडून कांही पैसे पुन्हा उसने मागून सर्व मंडळी रवाना झाली! मला अजूनही त्यावेळचे काही चेहरे आठवले की हसू येते व शेवटी ‘मॅनेजमेंट’ कशी लास्ट लाफ (last laugh) एन्जॉय करते हे कळले!
ही एल.टी.एस (L.T.S.) माझ्या शेवटच्या वर्षाच्या काळात झाल्याने कामात ही थोडी सुकरता अली. कामगार दिवसा कायदे पाळतात की नाही हे पाहणे ठीक असते. मात्र प्रश्न रात्रीचा असतो व ह्या बाबतीत आमच्या माझगांवची ख्याति काही चांगली नव्हती. रात्री देखील आमचा वचक रहावा म्हणून आम्ही एक योजना ठरविली होती. व त्यानुसार कोणीतरी एक ऑफिसर रात्री बारा नंतर घरुन माझगांवला येत असे, व एकूण स्तिथीचे अवलोकन करुन तसा रिपोर्ट दुसरे दिवशी मला देत असे. त्यामुळे खूप फायदा झाला. कधीही रात्री कोणीतरी येईल ह्या कल्पनेने कामगार कोठे बाहेर जात नसत. कारण रात्री मी स्वतः देखील कधी रात्री भेट देत असे व स्वतः परिस्तिथी पाही. एकदा दीप्ती (आमची कन्या, ती तेव्हां पंधरा-सोळा वर्षांची असेल) हट्ट धरुन बसली, मलाही रात्री तुमच्या बरोबर माझगांवला घेऊन चला. कार मधून तिलाही ‘रात्रीचे माझगांव’ दाखविले! कामगारांस ही साहेबांची पोरगी पाहून आश्चर्य / नवल वाटले व तिचे कौतुक ही घडीभर केले. थोड्याच वेळात हे कौतुक सरुन कामगार माझ्या भोवती जमा झाले व प्रत्येक जण आपले गाऱ्हाणे पोटतिडकीने सांगू लागला. मला हे नवीन नव्हते, पण छोटी दीप्ती आता आपल्या बाबांकडे हवालदील पणे पाहू लागली! थोड्याच वेळांत ही चर्चा आटोपून आम्ही परत घरी निघालो देखील, मात्र त्यावेळी प्रत्येक कामगारांच्या तोडून निघणारे ‘कॉमन’ वाक्य ‘साहेब तुम्हीच आमचा फैसला करा’ हे खूप दिवस आठवून आम्ही हंसत होतो! दीप्ती म्हणे “बाबा आमचाही फैसला करा” (दादाकडे बघून).
माझगांव टर्मिनलचा ‘टर्मिनल डे’ व पिकनीक ह्या देखील अविस्मरणीय घटना आहेत. वार्षिक दिवस उत्सवाला कामगार त्यांच्या सहकुटुंब येत. खाणे, बजावणे असे कार्यक्रम होत (कारण ‘पिणे’ आधीच करुन येत!). कोणातरी अधिकाऱ्याचे, पाहुण्याचे भाषण होई व शेवटी ऑर्केस्ट्रा ठरलेला असे, अर्थातच सर्व खर्च मॅनेजमेंट करी हे सांगावयास नको!
अशाच एका टर्मिनलच्या उत्सवात, मला वाटते ‘क्षणमुखानंद हॉल’ मध्ये हा कार्यक्रम झाला होता. आमचे त्यावेळचे डायरेक्टर श्री. नाना परांजपे आले होते व हा सर्व ‘फेस्टिव्हीटी’ चा भपका त्यांना कोठेतरी असह्य होत होता. तसे ते अबोल व शिस्तप्रिय तसेच स्पष्ट-वक्ते होते. त्यांच्या भाषणास ही त्यामुळे उशीर झाला. त्यांना भाषणासाठी विनंती करतांना वक्त्याने सांगितले – ‘आता श्री. नानासाहेब परांजपे आपल्याला मार्गदर्शन करतील….’ नाना उठले व आभार प्रदर्शन करुन, एक दोन वाक्य बोलून एवढेच म्हणाले. “हे सर्व लवकारात लवकर बंद करा हेच माझे आजचे मार्गदर्शन” आमचे लोकही खेळाडू होते- टाळ्यांच्या गजरात ह्या वाक्याचेही स्वागत झाले!
माझगांव हे खरेच एक अजब मिश्रण आहे. ह्या टर्मिनलमध्ये कामकारण्यास मिळणे हे माझे तरी भाग्यच व माझे असे प्रामाणिक मत आहे, की HPC च्या प्रत्येक अधिकाऱ्याने येथे काम करण्याची महत्वाकांक्षा बाळगली पाहिजे. कारण येथे मिळणाऱ्या विविध प्रकारचा अनुभव कोठेच मिळणार नाही. हे एक विद्यापीठ आहे व ज्या माणसाला व्यस्थापन क्षेत्रांत काही करावयाचे आहे, शिकवायचे आहे, त्याने येथे जरुर थोडा काळ व्यतीत करावा कारण अशी जागा संपूर्ण पेट्रोलियम इंडस्ट्रीत नाही. येथील कर्मचारी जरुर आपल्या हक्कासाठी वा नसलेल्या हक्कासाठी कधी भांडतात, पण हेच कर्मचारी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करुन विश्वासात घेतल्यास, हवे ते तुम्हांस प्रदानही करुन देतात. मानले तर ते कामात वाघ आहेत! विविध प्रकारची मंडळी भेटली- गुन्हेगारीचे रेकॉर्ड असलेली, पोलीस चौकीत ज्यांची नावे ‘कुप्रसिध्द’ असलेले काही येथे भेटले. येथील ट्रान्स्पोर्टर हे एक दुसरे प्रकरण! प्रचंड उलाढाल असल्याने येथे सर्व वाहतूकदार आपले लक्ष केंद्रीत करत असतात! त्यामुळे हौशे-गौशे-नवशे असे प्रत्येक प्रकारची माणसे येथे भेटतात. माणसांशी मैत्री करणे, माणसे हाताळणे हा ज्याला छंद आहे, तो माणूस येथे कामाला घाबरत नाही. मात्र HPCL मध्ये सर्व-सामान्य अधिकारी येथे येण्यास धास्तावतो, तो या टर्मिनलच्या ख्यातिमुळे. प्रत्यक्षात येऊन काम केल्यावर कितीतरी अधिकाऱ्यांना येथे कामाचा आनंद मिळतो व तो अधिकारी माझगांव व तेथील कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडतो! माझे पण तसेच झाले व ‘कंपनीत माझगांवचा माणूस’ बिरुदावली मिरविण्यांत मी भूषण मानले. कामगारांनीही खूप प्रेम दिले व आजही त्यांचे ते अकृत्रिम प्रेम अबाधित आहे. माझगांव सोडून मी मुख्य कार्यालयात गेल्यावर कैक माझगांवकर तेथे भेटीस येत व सहज गप्पा मारत. सेवानिवृत्ती नंतर देखील कित्येक मंडळी ओळख ठेऊन आहेत व संपर्कात राहतात. माझगांवमध्ये भेटलेल्या अनेक व्यक्ती आणि वल्लींचे यथायोग्य वर्णन करण्यासाठी पु.ल.च हवेत. मात्र या वल्ली मध्ये एका वल्ली बद्दल थोडेसे सांगू व हे प्रकरण पुरे करतो!
भाऊसाहेब घेगडमल हे त्या व्यक्तीचे नाव! सर्वजण ‘घेगडमल’ म्हणून ओळखतात. तरी मी मात्र त्यांस ‘भाऊ’ म्हणे! एरव्ही हा भाऊ, इतर सर्व कामगाराप्रमाणेच एक असे आम्ही समजत असू. पण आमच्या वेंकट साहेबांनी ह्याला एकदा कामाचे वेळी माळ्यावर आरामशीर पणे झोपतांना पकडले. माझ्यावर ही ‘केस’ सोपविली व मला भाऊचा ‘चांगला’ परिचय झाला! भाऊशी बोलतांना कळले की अतिशय गरीबीतून, मागास-वर्गातून तो आलेला आहे व सुरुवातिची आयुष्याची बरीच वर्ष ही व्यसनाधीनता आणि काही नको ते उद्योग करुन, स्वारी पोलीस स्टेशनची भरपूर हवा पाणी चाखून आली आहे. त्याला त्याच्या चुकीबद्दल शिक्षा करणे फार मोठे काम नव्हते. त्याने त्याच्या बेफिकीर स्वभावानुसार ती स्विकारली असती. पण त्यामुळे त्यांत लपलेला एक ‘होतकरु कामगार’ नाहीसा झाला असता! वेंकट साहेबांस मी त्याविषयी शिफारस केली व आता त्याचे हातून अशी चूक होणार नाही, यावेळी आपण त्यास माफी करुया असे सांगितले व हे प्रकरण मिटवले. तेव्हापासून आमचे संबंध कामगार-मॅनेजर असे न राहता, दोन मित्रांप्रमाणे झाले व ते शेवट पर्यंत, अजून पर्यंत टिकून आहेत! एकदा भाऊला कळले की माझी पर्स गाडीत कोणीतरी ‘मारली’, भाऊ स्वतः माझ्याकडे येऊन त्याने जुजबी चौकशी केली मी सुध्दा ती माहिती दिली व पैसे गेल्याचे दुःख विसरलो! तिसऱ्याच दिवशी माझी पर्स माझ्या हातांत देत भाऊ म्हणाले “साहेब ही तुमची पर्स- फक्त ५८ रुपये मी त्यातले ‘बक्षिसी’ दिली, हरकत नाहीना?” मला तेव्हांच आश्चर्य वाटले व भाऊच्या ‘potential’ची जाणीव होऊन, हे त्याचे ‘कसब’ चांगल्या कामासाठी त्याने वापरल्यास तो आयुष्यांत खूप करुन दाखविल ही मला खात्री पटली. भाऊने देखील ते मनावर घेतले व दारू, सिगरेट संपूर्ण सोडून दिली. इतरही अनेक ‘नको ते उद्योग’ सोडले. माझगांवच्या वेतनातून मिळणार पुरेसा पैसा तो कोठे गुंतवू लागला, छोटे-छोटे उद्योग आपल्या भावंडास काढून दिला. माझ्या सांगण्याचा त्याच्यावर परिणाम होतो आहे हे पाहून मी देखील त्याला लहान-सहान सवलती देऊ लागलो. व थोड्याच दिवसांत भाऊचे ‘ऐअर-कंडिशन ऑफिस व सुसज्ज गॅरेज’ चेंबूर मध्ये तयार झाले! त्याच्या भावाला उद्योग मिळाला. भाऊने आज तर खूपच प्रगती केली आहे व सांगतांना आश्चर्य वाटते की भाऊ आता ‘आर्थिक सल्लागार’ होऊन त्यासाठी देखील एक स्वतंत्र कंपनी त्याने स्थापिली आहे! हा खरोखरच चमत्कार, ‘वाल्याचा वाल्मिकी’ होतो तो असा! माझ्या एकूणच माझगांवच्या वास्तव्यात अशी खूप उदाहरणे आहेत- हे एक!
भाऊची मला विशेष आठवण येते, ती त्याने मला माझ्या निरोप समारंभात दिलेल्या भेटी संबंधी! भाऊने एक टेलिफोन, घड्याळ सेट, मला भेट दिला आहे व त्याच्यात बाजूला पाण्यांत तरंगणाऱ्या माशांचा शोभेचा सेट आहे. आमची सोनु लहान असतांना ते पाण्यांत खालीवर फिरणारे रंगीत मासे पाहिले की रडणे थांबवी! दीप्ती त्यावेळी ‘घेगडमल भाऊंचे’ मनोमन आभार मनी!
अशा रितीने माझगांवचे हे सुमारे तीन साडेतीन वर्षाचे ‘चीफ मॅनेजर’ चे पर्व संपले! माझगांव मधूनच साधा ऑफिसर म्हणून सुरवात करुन तेथेच नं. १ ची जागा भूषवून मी समाधानाने बाहेर पडलो. जेथे आपण सुरुवात केली, त्या ठिकाणी अत्युच्च जागेवर काम करण्यास मिळाले ह्या सारखे ‘आत्म-समाधान’ नाही. व विषेशतः तो कालखंड सफल, यशस्वी असेल तर ‘सोने पे सुहागा!’ खूप सांगण्यासारखे आहे पण सर्वच सांगताही येत नाही. मात्र जे सांगितले आहे ते केवळ माझगांवचे खरे स्वरूप व मोठेपणा दाखविण्यासाठी. त्या जागेची खरी महत्ता दाखविण्यासाठी! कोणाचाही उपमर्व करण्याचा त्यात हेतू नाही! कपूरच्या चांगल्या सी. आर. CR मुळे मला ‘डेप्युटी जनरल मॅनेजर’ हे प्रमोशन मिळाले व मद्रासला जाण्याचा मिळालेला हुकूम रद्द होऊन हिंदुस्थान-भवन मध्येच सप्लाय-डिस्ट्रीब्युशन (supply distribution) खात्यात माझी नेमणूक झाली हे पूर्वी सांगितलेच आहे. एव्हाना माझगांवला सरनाच्या काळात मुख्य असलेले श्री. मुल्ला जनरल मॅनेजर झाले होते व त्यांचे हाताखाली आता काम करायचे होते! हिशोब केला तर १९८१ (डेप्युटी मॅनेजर) १९९३ ते त्या बारा वर्षांत मी पाच बढत्या मिळविल्या, त्यामुळे १९७३ ते १९८१ ह्या आठ वर्षांत वेणूगोपाळ महाशयांच्या ‘मेहरबानीने’ आठ वर्षाचा काळ एक ही बढती न मिळालेला किती महत्त्वाचा होता व त्यामुळे माझे कारकीर्दीचे किती नुकसान झाले! असा शेवटी ईश्वरेच्छा बलियसी! होते ते चांगल्या साठीच असेल.
तत्कालीन परिस्थिती चा लेखाजोखा सुंदर