पुन:श्च माझगांव! – २
“हिंदुस्थान भवन” (Ballard Estate, Fort, Mumbai) मध्ये खूपच वेगळ्या प्रकारचे काम होते. माझगांवमधून एवढ्या ‘लढाया लढल्यानंतर व कामगार संघर्षाच्या वणव्यातून निभावून गेल्यानंतर हे काम म्हणजे, लढाईनंतरचे ‘सेलिब्रेशन’ असावे तशा प्रकारचे वाटत होते! निवांतपणा होता मात्र काम तसे अगदी नवीन होते. आमच्या कंपनीचा माल ज्या ग्राहकांकडे भारतभर जाई, तेथे काही समस्या उद्भवल्यास त्यांचे कंपनीत जाऊन तेथे ती समस्या सोडविणे हे काम होते व त्यामुळे भारतभर भ्रमंती करावी लागे. तसेच आमची विविध ऑफिसेस जी भारतभर पसरलेली होती, तेथील आमच्या ‘तांत्रिक खात्यातील’ कर्मचाऱ्यांस ट्रेनिंग देणे, त्या साठी सभा, सेमिनार, वर्कशॉप भरविणे इ. प्रकारची कामे असत. त्यासाठी स्वतःला अभ्यास करून प्रथम माहिती जमवावी लागे व नंतर ती व्यवस्थित स्वरूपात एकत्रित करून आमच्या ग्राहाकांस, कर्मचाऱ्यांस पाठवावी लागे. त्यासाठी मुंबईतील, माझगांव प्लांट, प्रयोगशाळा व संशोधन केंद्रे या खात्याशी संपर्क ठेऊन या सर्वांशी समतोल ठेवावा लागे श्रीयुत शेषू हे जुने जाणते इंजिनीयर आमचे प्रमुख इंजिनीयर होते तर माझे जोडीदार श्री. नितीन सोनावणे व मी त्यांस मदत करीत असू. अर्धा भारत नितीनकडे तर अर्धा माझेकडे अशी आमच्या ऑफिस कामाची विभागणी केली होती!
मला या Technical Service मध्ये मॅनेजर म्हणून बढती मिळाली होती ती प्रोडक्शन खात्यातून, त्यामुळे येथेही Technical खात्यातील काही लोक आतून नाखूष होते. श्री. शेषू यांचा ही एक उमेदवार, त्याचे प्रमोशन न झाल्याने व मी बाहेरून येऊन ही जागा घेतल्याने थोडे नाराज असत, मात्र तसे बाहेरून अजिबात दाखवत नसत. श्री. लोटलीकर साहेबांची माझ्याकडे नेहमी नजर असल्याने त्यांना उघड नाराजी दाखविणे जमले नाही. मला मिळालेली जागा, माझ्या आधीपर्यंत, एका इंजिनीयरलाच मिळत असे. B.E. डिग्री आवश्यक असे. मी तसा पदवीप्रमाणे इंजिनियर गणला जात नव्हतो, त्यामुळे या इंजिनीयर पदवीधरांचा थोडा रोष झाला होता! मला या गोष्टी आता नवीन नव्हत्या, त्यामुळे मी त्याची मुळीच पर्वा करीत नसे व माझे काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करी. एखादे वंगण ग्राहकाला त्याच्या मशीनसाठी शिफारस करण्यासाठी त्या मशीनची संपूर्ण माहिती हवी असते व त्यासाठी इंगीनीयरिंग पदवी निश्चितच आवश्यक होती. मात्र त्या वंगणाचे कोणते गुणधर्म त्या इंजिनच्या धातूवर काय परिणाम करतील हे रसायन शास्त्र होते. व त्यासाठी माझ्या सारखा माणूस योग्य होता. श्री. लोटलीकर साहेबांनी ही गोष्ट ध्यानात घेऊनच, प्रथमतःच एका नॉन इंजिनियरला तेथे आणले होते व माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट अनुभव घेण्यासाठी होती!
सुरुवातीला खेड्यातून शहरात आलेल्या माणसासारखी माझी स्थिती झाली होती. पण वर्ष भरात मी हे ऍडजस्ट केले. मुख्य-कार्यालयात काम करताना डायरेक्टर, जनरल मॅनेजर, व इतर वरिष्ठ अधिकारी, तसेच इतर खात्यांतील मॅनेजर्स यांचा नेहमी संबंध येत असे व त्यामुळे तुम्हास पटकन उत्तर द्यावी लागतात. बघतो, उद्या सांगतो, अशा प्रकारची दिरंगाई ठीक नसते – त्यामुळे येथे काम करण्यांत एक चपळाई असते!
व्यवस्थित कामाशी जमवून घेत असतांना तेथे माझगांव टर्मिनलमध्ये एका मोठ्ठ्या घोटाळ्याची दखल मॅनेजमेंट ला घ्यावी लागली, त्यांत काही अधिकारी, क्लार्क, व कामगार बडतर्फ करण्याची वेळ आली. आणि माझगावची बदनामी पुन्हा जगजाहीर झाली! आधीच बदनाम असलेले माझगाव आणखीनच बदनाम झाले. पण त्यामुळे माझ्या येथील नेमणुकीला मला रामराम करावा लागला व पुन:श्च माझगांव मध्ये त्वरित हजार होण्याचे हुकूम मला मिळाले! खरे तर माझ्या प्रामाणिक कामाची ही पावती होती कारण माझ्या चौदा वर्षांच्या तेथील वास्तव्यात मी जेथे जेथे काम केले, त्या कोणत्याही खात्यात ऑडिटर लोकांनी काहीच वैगुण्य कधी दाखविले नव्हते व मी गेल्या गेल्या १ वर्षांचे आंत ही जबरदस्त भानगड होऊन मला पुन्हा माझगांवला बोलाविण्याची वेळ मॅनेजमेंटवर आली! त्यामुळे एका बाजूने जरी वाईट वाटत होते तरी दुसऱ्या बाजूने, मॅनेजमेंटच्या आपल्यावर विश्वास आहे आपल्या प्रामाणिक कामाची हे पावती आहे असे ही वाटत होते!
त्यावेळी श्री. वेंकट हे साहेब माझगावचे नं. १ होते. ते तरुण तसेच अतिशय शिस्तप्रिय व पद्धतशीर काम करणारे होते! कामगारांशी ही त्यांचा चांगला संपर्क होता व संघर्ष न करता समजुतीने जेवढे करता येईल तेवढे करावे असे त्यांचे धोरण असे. कामगारांच्या रास्त मागण्या ते स्वतः च मान्य करून टाकीत, त्यामुळे कामगारांच्या आदरास पात्र झाले होते!
मग हा “बॉम्ब” वेंकटच्या कारकिर्दीत का फुटला? वेंकटचे असिस्टंट, माझे पूर्वीचे ‘सेतुरामन फेम’ मित्र श्री. नाथन हे होते. सेतुरामन एव्हाना कंपनी सोडून दुसरीकडे गेला होता. नाथनच्या हाताखाली श्री. ईश्वरन (लॅब मधील माझे प्रतिस्पर्धी) व श्री. कुमार हे दोघे अधिकारी होते. ईश्वरन उत्पादन सांभाळी तर कुमार वितरण बघे. नाथन हा एक ज्यादा मनुष्य होता व स्वतः बद्दल खूप फाजील आत्मविश्वास होता. जुना असल्याने माझगांवच्या सर्व कामाची माहिती होती. वेंकटचा नाथनवर व नाथनचा ईश्वरन व कुमारवर जबरदस्त विश्वास होता. कदाचित सर्व गट ‘दाक्षिणात्य’ असल्याने हे झाले असावे! व तेथेच माशी शिंकली. ईश्वरन, कुमारने, नाथनला सपशेल धोबीपछाड घातला व आडवे केले, साहाजिकच इंचार्ज (in-charge) म्हणून वेंकटही आडवा झाला!
प्रकार झाला तो असा:
माझगांवच्या अनेक उत्पादनापैकी एक तेल ‘A’ समजा ५०/- रु. लिटर होते तर दुसरे ‘B’ २०रु. लिटर होते. नाथन-कुमार जोडगोळीने काही क्लार्क हाताशी पकडून एक साखळी तयार केली व ते वेअर हाऊस मध्ये ‘A’ तेलाच्या ड्रमवर ‘B’ तेलाचे नाव टाकले व असे शेकडो – सुमारे ८०० ड्रम (२००+ liters) एका महिन्यात एका डिलरला देऊन त्याचा भरपूर फायदा केला. दोन तेलाच्या भावात ३०/- रुपयांचा फरक होता, त्यामुळे ३० x ८०० x २०० = ४८,००,०००, असा सुमारे अट्ठेचाळीस+ लाख रुपयांचा फायदा केवळ एका प्रॉडक्टमधून डीलरला मिळाला असा अंदाज होता. हे प्रचंड नुकसान होते. व माल नेतांना प्रत्यक्ष कोणीच पकडले नाही, मात्र महिन्याचे शेवटी मोजमाप/ बुक तपासणी झाली तेव्हा हे वेंकटच्या लक्षात आले. त्यावेळी स्पेशल ऑडिट मुख्य कार्यालयांतून झाले तेव्हा खरी अंडी-पिल्ले बाहेर पडली:- रंगा, ईश्वरन, कुमार, व काही कामगार, क्लार्क, त्वरित बडतर्फ झाले व आम्हाला तेथे येण्याचे रेड कार्पेट आमंत्रण मिळाले. खरेच मी त्यावेळी विचार कला परमेश्वराची लीला ही किती अगाध आहे! माझ्या मागे हात धुवून पाठीशी पडलेली वेणुगोपाल, सेतुरामन, नाथन, ईश्वरन ही मंडळी, त्यांनी किती कुभांड माझ्या विरुद्ध केले- मी त्यांतून परमेश्वरी इच्छेनेच व माझ्या वाडवडिलांच्या पुण्याईनेच बचावलो – आता ही मंडळी कुठे आहेत?
वेणूगोपाळांची बदनामी होऊन कंपनीने रिटायर्ड केले, सेतुरामन कंपनी सोडून गेला, आणि हे दोघे स्वतःच्याच कर्माने बडतर्फ होऊन, आता चौकशीचे गुऱ्हाळ त्यांचे मागे लागले. मी त्यांचे विरुद्ध काहीच केले नाही, हे सर्व आपोआप घडले. देव कसा आपल्यावर लक्ष ठेऊन आहे, देवाची लीला अगाध आहे. जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे ।
ह्या सर्व घटनांमुळे वेंकटाचा कुठे हात नव्हता, तरी त्याचे नाव मात्र खराब झाले. म्हणून त्याने काही अधिकाऱ्यांची शिफारस करून, त्यांस माझगांव मध्ये बोलाविले त्यांतील मी एक होतो.
पुढे या मंडळींची एका उच्च अधिकाऱ्यामार्फत चौकशी झाली त्यात- दोषी आढळलेल्या डीलरला बडतर्फ केले, त्याच्या कडील मिळेल तेवढा माल परत घेतला, व नाथनला तंबीचे पत्र देऊन, विश्वनाथ-कुमार कंपनी बाहेर गेले. थोडे दिवसांनी नाथन ही कंपनी सोडून गेला, व ह्या चौकडीचा माझगांव पुरता तरी पूर्ण अस्त झाला.
मात्र यामुळे वेंकट साहेब खूप जागे झाले व त्यांनी अतिशय सावधगिरीने काम सुरु केले. खूप नवीन Method/ system चालू केल्या व मी जरी तसा इतर मॅनेजर्सच्या मानाने कनिष्ठ होतो, तरी त्यांच्या खालोखाल सर्व अधिकार माझे कडे दिले. मोठ्या विश्वासाने मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली. व तसे मला सांगून, तुझ्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत व तू मला खाली पडू देणार नाही! असे मोठ्या कळवळ्याने म्हणाले!
वेंकट साहेबांची कामाची पद्धत उत्तम होती. विश्वास ठेवल्यावर ते संपूर्ण अधिकार देत, मात्र एखाद्यावर संशय आल्यास, काम-चुकार अधिकाऱ्यास फैलावर घेत, त्याला कधीच बरे सांगत नसत, तोंडावर बोलत.
सकाळी सर्व प्लांटभर राउंड घेणे, दुपारी सर्व डिपार्टमेंट हेड ना चहासाठी त्यांच्या केबिनमध्ये एकत्र बोलावून त्यांचे प्रॉब्लेम व कामाची माहिती घेणे, संध्याकाळी सुटण्याच्या वेळी काही काम निघाल्यास थांबून त्या अधिकाऱ्याशी कामाची चर्चा करणे, असा साधारण दिवसाचा परिपाठ असे. दुपारच्या चर्चेच्या वेळी प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या डिपार्टमेंटची कामाची अद्यावत माहिती देऊन कामांत सुधारणा करण्यासाठी आपण काही नवीन पद्धती सुचवू इच्छित असलास त्याची माहिती द्यावी लागे. प्रत्येकास काही नवीन कल्पना सुचवावी लागे! बाळ राऊत हे माझ्यापेक्षा एकंदर कामाच्या पिरियड मध्ये (Senior) वरिष्ठ असून देखील, माझ्या हाताखाली काम करीत मात्र त्यांनी चांगले सहकार्य दिले! आमची टीम व्यवस्थित काम करीत होती!
श्री. आठवले नावाचे एक मराठी अधिकारी त्यावेळी माझगांवला आले होते. ते M.E. first-class व मॅनेजमेंटचा कोर्स केलेले, असे उच्चं शिक्षित होते. मात्र माझगांवला वेंकटच्या हाताखाली काम करणे त्यांना जमेना, त्यामुळे एवढ्या हुशार व्यक्तीला वेंकट सर्वांसमोर फैलावर घेई व हे एकदा त्यांचे हे खराब Impression कायम राहिले, आठवलेंना शेवटी माझगांवहून बदली मागावी लागली!
माझगांवमध्ये त्यांचे काळात कामगार संघर्षाचे विशेष प्रसंग वा संप इ. खूप काही झाले नाही. एकदा रिफायनरी कामगारांचा मोर्चा मुख्य कार्यालयात येणार होता व माझगांवचे कर्मचारी एकाच युनियनचे असल्याने त्यांस ही मोर्चात सामील व्हायचे होते. मात्र मुख्यालयाने परवानगी नाकारूनही वेंकटसाहेबांनी मला काही कामगाराना जाऊ देण्याची परवानगी दिली! मात्र पुढे हे प्रकरण मोठे झाले व कामगारांनी, आम्हाला राऊत साहेबांनी परवानगी दिली म्हणून आम्ही मोर्चात सहभागी होऊ शकलो असे छातीठोकपणे सांगितले! मात्र त्यामुळे मला मुख्य पर्सोनेल मॅनेजरने या बाबत विचारले, वेंकटनी ती जबाबदारी आपली आहे असे सांगून माझी सुटका केली व दोष आपल्यावर घेतला. एकदा घेतलेला निर्णय मागे न फिरवत आपल्या सहकाऱ्यांच्या योग्य निर्णयास नेहमी पाठिंबा देणे हे त्यांचे खूप चांगले अंग होते! मात्र कामगारांनी त्यामुळे काही गैरवाजवी फायदे मिळविले हे ही तितकेच सत्य आहे! वेंकटना त्यामुळं हेड-ऑफिसची मंडळी “Darling Of Mazagaon” माझगांवची प्रेयसी! असे म्हणत.
माझा एक खूप मोठा फायदा वेंकटनी केला तो म्हणजे हैद्राबादच्या प्रसिद्ध ASCI (Administrative Staff College of India) ह्या भारत सरकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांस प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत ट्रेनिंग साठी माझ्या नावाची शिफारस केली. मला वाटले दीड महिन्याचे हे ट्रेनिंग होते. कंपनीने प्रथमच वरिष्ठ मॅनेजर्सची २० जणांची एक टीम भारतांतून निवड करून पाठविली होती. मी ह्या सर्व मंडळीत कनिष्ठ होतो व हा मोठाच बहुमान होता. तेथील प्रशिक्षण खूपच उपयुक्त होते. त्यामुळे भारतांतील आम्ही सर्व HPCL ची मंडळी खूप जवळ आलो व या मॅनेजमेंट मधील मोठ्या व्यक्तींशी जवळून परिचय झाला. या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आम्हास एक प्रोजेक्ट करावयाचा होता. आमच्या चौघांचे प्रोजेक्ट, नं. २ चे प्रोजेक्ट झाले होते. ह्या शेवटच्या सत्रासाठी त्यावेळी आमचे मार्केटिंग डायरेक्टर असलेले श्री. नाना परांजपे हे आले होते. त्यांचेशी माझी ओळख होतीच, ती जास्त दाट झाली. श्री नाना हे Esso/ HPC मधून उच्चपदास गेलेले थोड्या मराठी मंडळींपैकी एक होते. त्यांची मदत देखील मला मी हिंदुस्थान भवनाच्या ऑफिसात काम करतांना झाली होती.
नाना परांजपे यांचे बद्दल ही येथे थोडे सांगितले पाहिजे. HPCL च्या नाना एस्सोचे एक वरिष्ठ अधिकारी होते व त्यांचे पेट्रोलियम क्षेत्राबद्दल ज्ञान एवढे प्रचंड असे कि, त्यावेळी सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या (HPC, BPC, IOC) अधिकाऱ्यांची बैठक दिल्लीत होई त्यात नाना जे भाष्य करीत ते मान्य होई. व त्यांचा शब्द सरकारी अधिकारी देखील शेवटचा मानीत. नाना हे UDCT चे केमिकल इंजिनीयर होते – त्यामुळे देखील त्यांचा माझ्याविषयी चांगला ग्रह होण्यास मदत झाली होती. घराची अत्यंत गरिबी असूनही, जेवणासाठी वार लावून, त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले होते. HPCL नंतर नाना मंगलोर रिफायनरीचे अध्यक्ष झाले. दुर्दैवाने त्यांचा अकाली अंत झाला.
माझगांवचा सुमारे ३ वर्षाचा हा काळ एकंदरीत खूप घटनांनी भरलेला व उपयुक्त असा गेला!कामेही छान झाली, उत्पादनाचे काही विक्रमही झाले व कामगार मंडळी ही सहकार्य करीत होती. अर्थातच वेंकटनी माझे रिपोर्टही चांगले दिल्याने माझे पुढील सिनियर मॅनेजर हे प्रमोशन झाले व मलाही काम केल्याचे समाधान झाले!
मी पुन्हा हिंदुस्थान भवन मध्ये जाणार होतो व आता माझ्याकडे वरिष्ठ मॅनेजर संशोधन, क्वालिटी कंट्रोल (Sr. Manager, R & D, QC) हा दर्जा होता. ही देखील नवीन जबाबदारी होती, आमचे संशोधन व गुणवत्ता मापन खात्यात मी काम केले होते व त्यामुळे तास कामाचा अनुभव होता. त्यामुळे एक नवीन आव्हान स्वीकारण्यास मी तयार झालो!
One thought on “पुन:श्च माझगांव! – २”