आप्पांची पत्रे भाग-११ (शेवटचा)

आप्पांच्या पत्रांचा हा अकरावा व शेवटचा भाग. 1978 ते जून 1981 अशी एकूण 21 पत्रे आहेत. पुढे ऑगस्ट 81 मध्ये आप्पांना मुंबईच्या टाटा इस्पितळात दाखल करण्यात आले व सर्व पत्रव्यवहार संपला. त्याच वर्षीच्या, 11 नोव्हेंबर रोजी, आप्पानी जगाचा निरोप घेतला. आता ही पत्रेच त्यांचे आशीर्वाद आणि स्मारक!


एक पत्र आप्पांचे नसूनही येथे मुद्दाम समाविष्ट केले आहे. आप्पांचे सहकारी शिक्षक श्री. पांडुरंग मा पाटील, गुरुजी, जे माझे ही इयत्ता सहावी व सातवी साठी मराठी शाळेत शिक्षक होते, त्यांचे हे पत्र आहे. त्या पत्रात आप्पांविषयी लिहिलेल्या दोन ओळी मनाचा ठाव घेतात. स्वातीने मेरिट लिस्ट मध्ये येऊन मोठे नाव केले, गुरुजींचा नातू, कु. प्रितम विजय पाटील, हा देखील मेरिटमध्ये आलेला होता. गुरुजींनी या योगायोगाचा खूप अभिमानाने उल्लेख केलेला आहे. ते पत्रही मुद्दाम वाचा. ओघा ने आले म्हणून सांगतो, प्रीतम इंजिनीयर होऊन, या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली. बंगलोर येथील जगप्रसिद्ध, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc)’, येथे संशोधक म्हणून काम करतो. मी  बंगलोरला, दीप्तिकडे असताना, त्याची ओळख झाली होती. खूप हुशार व नम्र व्यक्तिमत्त्व आहे.
मागील दहाव्या भागात लिहिल्याप्रमाणे, आप्पांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. साधारणतः 1980 पासून ती जास्तच बिघडत चालली आहे. अशक्तपणा ही जाणवत होता. त्यामुळे त्यांनी औषधेही बदलून घेतली. मात्र निश्‍चित निदान न झाल्यामुळे त्यांचा आजार पुढे बळावत गेलेला आहे. डॉक्टरांना, हे दम्यामुळे होत असावे असे वाटत होते, मात्र आजार दुसरा होता.


बहुतेक पत्रामध्ये स्वतःच्या प्रकृतीपेक्षा आम्हा सर्वांच्या प्रकृतीची काळजी जास्त आहे. जून 1981 मध्ये, हर्षु ,आशु, बापू ही कंपनी, नेहमीप्रमाणे सुट्टी साठी म्हणून  घोलवडला आलेली होती.” त्यांच्याशी गप्पा करण्यात, त्यांच्या गोष्टी ऐकण्यात व त्यांना गोष्टी सांगण्यात”, माझा कसा वेळ जातो हे वर्णन आहे.दीप्ती ला प्रेमाने,’ताया’ म्हणत असत. तिलाही प्रत्येक पत्रात,आशीर्वाद दिले आहेत, ‘दंगा करू नको’, अशी प्रेमळ सूचना आहे. विशेष म्हणजे याच दरम्यान 1980 च्या सुमारास पपी,डहाणू येथीलह पोंदा हायस्कूलमध्ये शिक्षकाचे नोकरीस लागल्यामुळे, आप्पांना झालेला आनंदही पत्रात व्यक्त केला आहे. नीलममार्गी लागली आहे. वसई ला एक महिन्याचे कोर्ससाठी तीसुद्धा त्यावर्षी आली होती. आता सर्व मुले आपापल्या आयुष्यात स्वतंत्रपणे वाटचाल करीत आहेत. त्याचे समाधान आप्पांना खूपआहे . “पपीही मार्गाला लागला, याच देही याच डोळा पाहिले, आता मला दुसरे काही मिळवायचे नाही.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
1981 च्या मे महिन्यात बापूचा मिडल स्कुल, चौथी इयत्ता स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल लागला. त्याला स्कॉलरशिप मिळाली नाही. त्यामुळे आप्पांना जरूर वाईट वाटले. मात्र त्यांनी दादाला तसे न लिहीता, केलेले सांत्वन, वाचण्यासारखे. शेवटी त्यांनी लिहिले,
“तुला स्कॉलरशिप मिळाली आहे, असेच आम्ही मानतो. पुढील अभ्यासाला लाग. पुढील अभ्यासासाठी तुला खूप आशीर्वाद!”
बापू ने पुढच्या सातवीच्या, ‘हायस्कूल स्कॉलरशिप’, मध्ये यश मिळवले. पुढे ही भावी आयुष्यात, देशा-परदेशात अनेक परीक्षांत सुयश मिळविले. दुर्दैवाने ते पाहण्यासाठी आप्पा या जगात राहिले नाहीत. आप्पांनी त्यांच्या सगळ्याच मुलां, नातवंडांना मनापासून खूप आशीर्वाद दिले. त्यांची सर्व मुले-नातवंडे आज आपापल्या आयुष्यात सुखाने वाटचाल करीत आहेत. हे कौतुक आप्पा स्वर्गातून नक्कीच पाहत असतील.
सुदैवाने, मी व अण्णा दादरला असे पासूनची ही सर्व पत्रे माझ्याकडे राहिली. त्याआधीची, सातारा व इस्माईल युसूफ मुक्कामातील पत्रे कोठेतरी हरवली गेली. ती देखील मिळाली असती तर अजून बरे वाटले असते. बघूया अजूनही कुठे सापडली तरी शोधू…  एवढा तरी ठेवा नीट जतन करून ठेवू या. कोण जाणे, कधीतरी, कोणी आपला भावी वंशज, या घराण्याचा इतिहास शोधील किंवा कोणीतरी एवढे कर्तुत्व गाजविल की, त्याचा इतिहास जगाला शोधावा लागेल, तेव्हा त्यांना ही पत्रे निश्चितच मार्गदर्शक ठरतील! एवढाच हेतू होता तो सफल झाला.  सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद .सर्वेत्रम् सुखिनाह संतू??