ज्ञानदेव व ज्ञानेश्वरी

एक तरी ओवी अनुभवावी

ज्ञानदेव व ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी मनावर रोजी सातशे वर्षे अधिराज्य करून राहिलेले चमत्कार आहेत. महाराष्ट्राची माऊली एकच – ‘ज्ञानेश्वर’ आणि त्यांनी लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी म्हणजे अलंकार-उपमांनी भरलेली, नवरसांनी शृंगारलेली एक आध्यात्मिक सृष्टीच आहे. ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेला हा ‘मौलिक रत्नाकार’ आज शेकडो वर्षे झाली तरी ज्ञानपिपासु लोकांना अवगाहन करण्यासाठी एक आव्हान आहे. प्रत्येकवेळी डुबकी घ्या आणि काहीतरी नवीन रत्न हाती लागते! या दोघांबद्दल मराठी भारतीय आणि परदेशी विद्वानांनी आजवर खुप लिहिले आहे, त्यामूळे माझ्यासारखा एक अल्पमती वाचक जास्त काय सांगणार? मात्र ज्ञानदेवांनीच म्हटल्याप्रमाणे:

राजहंसाचे चालणे । भुलती जालिया राहाणे ।।

म्हणून काय इतरे  कवणे । चालोचि नये ?

 [ श्रोते तुम्हीच जगदिशमुर्ती  । तुम्हांपुढे माझी व्युप्ती किती? परि अल्पमती  सलगी करतो ]

भूतलावरील सर्व मानवी जीवांना, जीवनाचे अंतिम ध्येय ‘मोक्ष’ साधण्याची लालसा असते हा भारतीय तत्वज्ञानाचा सिद्धान्त आहे.  श्रुती आणि स्मृतीनी त्यासाठी उपयुक्त साधनेचा व साधनांचा उहापोह केला आहे. मात्र श्रुती अध्ययन क्षूद्र आणि स्त्रियांना करण्याचा हक्क त्या काळी नव्हता. अशा जीवांची करूणा येवून श्रीमत् व्यासांनी, श्रीकृष्णामार्फत, आपली गीता ऐकवली व महाभारताचा जन्म झाला.

महाभारताचे वाचन,चिंतन, वा श्रवण सर्वांस खुले होते, मात्र येथे भाषेची अडचण होती. संस्कृत भाषेवर प्रभुत्व असल्याखेरीज महाभारत व पर्यायाने गीता समजणे कठीण होते. म्हणून भगवान विष्णूंनी ज्ञानेश्वरांचा अवतार धारण करून अनाथ, अज्ञान, व मुमुक्षु जीवांचा उद्धार करण्यासाठी श्री भावार्थदीपिका ( अर्थात ज्ञानेश्वरी) हा ग्रंथराज टीका स्वरूपात प्राकृतात निर्माण केला ही सामान्यांची भावना आहे.

भगवंताचे मनोगत समजूत घेण्यासाठी,सामान्यजनांस ज्ञानेश्वरी सारखा दुसरा ग्रंथ नाही व हा ग्रंथ लिहण्यास माझे शिवाय इतर कोणाची योग्यता नाही, असे आत्मविश्वासपूर्वक वचन त्यांचे आहे.

“तरी बहुबोलू काही| अजित अनाठाई।

माते वाचून नाही। ज्ञानदेव म्हणे ||”

(पुष्कळ बोलण्यांत काय अर्थ? ही योग्यता आज तरी माझे शिवाय अन्य कोणात नाही.)

“ माझा मराठीचा बोलू कौतुके|

परी अमृतानेही पैजा जिंके ।

ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।।”

–  माझ्या माय मराठी भाषेचे सामर्थ्य एवढे आहे कि प्रत्यक्ष अमृतमाधुरीची ती स्पर्धा करते; अशा रसाळ शब्दांची संपदा वापरून मी सामान्य जनांस देखील. संपन्न करीन , ही त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही ग्रंथरचना केली.

मराठी भाषेचे हे सामर्थ्य,आजतागायत कोणाही सारस्वताला दाखविता आलेले नाही, इतका हा ग्रंथ अजोड आहे.  शुद्धज्ञान, संतत्व आणि कवित्व हे तिन्ही अति दुर्लभ गुण येथे एकवटले आहेत.

ज्ञानदेवांचे व त्यांच्या भावंडांचे अधिकृत व सलग असे, चरित्र कोठेच उपलब्ध नाही. तत्कालीन संतांनी लिहलेल्या अभंग, गाण्यातून जी माहिती उपलब्ध होते, त्यावरून ज्ञानदेवांचा जीवनपट हा अनेक चमत्कृती व गूढ प्रसंगांनी भरलेला जणू चित्रपटच आहे.

वडील विठ्ठलपंत व आई रुक्मिणी बाई यांचा विवाह रुक्मिणीबाईंचे वडील सिधोपंत यांना विठ्ठलाने स्वप्नांत दिलेल्या आदेशानुसार झाला. आपेगाव हे विठ्ठलपंतांचे गाव, तर आळंदी हे सिधोपंतांचे. लग्नानंतर विठ्ठलपंतास सतत गृहत्यागाचे वेध लागले. सासऱ्यांनी आळंदीस आणून मनःपरिवर्तनाचा प्रयत्न करून ही त्यांचा विचार बदलेना.  एक दिवस ते आळंदी सोडून सरळ काशीस पोहोचले व गुरूच्या चरणी सेवाप्रदानाचे नवे जीवन सुरु झाले. मात्र गुरुस्वामींनी त्यांची प्रार्श्वभूमी समजताच, गृहस्थाश्रमाच्या स्वीकारासाठी पुन्हा आळंदीस जाण्याचा आदेश दिला. आळंदीगावा बाहेर एक खोपटी बांधून लोकनिंदेला तोंड देत संसार सुरु झाला. भिक्षा मागूनच चरितार्थ सुरु होता. या परिस्थितीत, उभयतांना दोन-दोन वर्ष्याच्या अंतरांत चार अपत्ये झाली. आता तर परिस्थिती आणखी  गंभीर झाली. “संन्याशाची पोरे” म्हणून समाजाने मुलांची देखील विटंबना सुरु केली. उपनयन विधी करण्याची वेळ आली तेव्हा आळंदीच्या धर्म मार्तंडाना अनेक विनवण्याकरूनही पाझर फुटला नाही. “तुम्ही सहा जणांनी शास्त्राचा घोर अपराध केला आहे तेव्हा आई वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही” असा निर्णय दिला.  साध्या माणुसकीला देखील हे कुटुंब पारखे झाले होते.

ज्या काळरात्री, रुक्मिणीबाईंनी पितृछत्र हरपलेल्या, एकमेकांस बिलगून झोपलेल्या त्या चार अश्राप कोवळ्या जीवांच्या पाठीवरून हात फिरवीत शेवटचा निरोप घेतला, त्या वेळी त्या माऊलीची काय अवस्था झाली असेल? हे कल्पनातीत आहे. मातृ-पितृ छत्र हरवले त्या वेळी निवृत्तीचे वय वर्षे १० होते व बाकीची तीन भावंडे क्रमाक्रमाने दोन वर्षांनी लहान होती. आता खरी कसोटी सुरु होणार होती.

त्यानंतर निवृत्ती म्हणजे आपल्या चिमुकल्या भावंडांचे माता-पिता आणि गुरु. ऊपनयन विधी साठी ज्ञानदेवांनी चिंता व्यक्त केली, तेव्हा निवृत्ती म्हणे – “जीवन मुक्ताना सोळा संस्काराची गरज काय?”

शेवटी आळंदीच्या द्विजांचे शिफारस पत्र घेऊन, ही भावंडे पैठणास पोहोचली. तेथे ही ब्रह्मवृदांने प्रथम अपमानच केला. मात्र ज्ञानदेवांच्या अद्वैतांची कुटाळकी करणाऱ्या एकाने समोरून येणाऱ्या रेड्याकडून वेद वदवून घेण्याची आज्ञा केली. रेड्याच्या मुखातून वेदातील ऋचा बाहेर पडू लागल्यावर ही मुले प्रत्यक्ष श्रीविष्णूचे अवतार आहेत, ह्याची सर्वाना खात्री पटली, शुद्धिपत्र मिळाले.

पैठणहून मंडळी नेवाशास आली. तेथील ‘मोहिनीराज’ अथवा म्हाळसा मंदिराचे, ज्ञानदेवांस खूप आकर्षण होते. एव्हाना ज्ञानदेवांनी सारे लोक आपल्या भजनी लावले होते; या त्यांना ‘गीताधर्म’ शिकवायचा होता. ज्ञानदेवांनी ह्या साठी गीता ग्रंथाचीच निवड केली कारण, त्या ग्रंथामध्ये असे विलक्षण सामर्थ्य आहे की, बदलत्या काळाला प्रेरक संजीवक अशा विचारांचा, तत्वज्ञानाचा शोध व बोध तेथून घेता येतो.

म्हाळसाच्या मंदिरात श्रोतृवर्ग जमू लागला व गुरु निवृत्तीनाथांना, इष्टदेवतांना वंदन करून ‘गीताधर्म निरूपणाला’ सुरुवात झाली. सच्चीदानंद बाबांनी हे भाष्य लिहून घेण्याचे मोठे काम केले. वारकऱ्यांचा हा ‘प्रमाण ग्रंथ’ म्हणून मान्यता पावला व भक्त या ग्रंथालाच ‘माऊली’ म्हणू लागले. व ज्ञानेश्वर देखील भक्तांच्या भावविश्वात ‘ज्ञानेश्वर माऊली’ म्हणून अजरामर झाले.

मराठी भाषेंतील हा एकमेव ग्रंथ आहे ज्या ग्रंथाच्या आश्रयास अठरापगड, सर्व जाती जमाती मधील लोक एकत्र आले — (यांच्याच पुण्याईने प्रत्येक जातीत एक तरी ‘संत’ निर्माण झाला.) ‘विसोबा खेचर, चोखा मल्हार, सावता माळी, गोरा कुंभार, सेना न्हावी ही काही उदाहरणे!

या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा विचार करतांना एक प्रमुख  विचार मांडला जातो की, सिद्धपुरुषांच्या प्रगल्भतेला वयाच्या परिमाणाची गरज नको. आत्मज्ञानाने परिपूर्ण अशी प्रज्ञा त्यांना लहानवयांतच प्राप्त झाली होती आणि म्हणूनच वाक् देवीचे असे नाना अलंकार त्यांच्या ग्रंथात पहावयाला मिळतात. वैद्यकशास्त्र, शरीरशास्त्र, स्थापत्यशास्त्र, योग, अध्यात्म, सौंदर्यशास्त्र अशा अनेकविध शाखांमधील उदाहरणे येथे वाचावयास मिळतात व विशेष म्हणजे आजच्या आधुनिक युगातही, हे दाखले चपलख बसतात!

काही नमुन्यादाखल उदाहरणे पाहू.

[१] माझी ज्ञानेश्वरी लोकांनी का वाचावी हे सांगतांना अनेक उदाहरणापैकी एक, भाषेचे सौंदर्य पहा.

सहज मलया निळू मंदू सुगंधू । तव अमृताचा होय स्वादु ।

आणि तेथूची जोडे नांदु । जरी देवगत्या ।

[मलयगिरीचा मादक सुगंध, मंद वाऱ्याबरोबर पसरावा त्यावर अमृताचा बारीक छिडकावा आणि त्यावेळी दैवयोगाने कोकिळेचा पंचमस्वर कानी पडावा — अशी अवस्था माझी ही कथा वाचून होईल.]

[२] योगाच्या ‘कर्मातील‘ अवस्थेचे वर्णन करतांना सूर्याच्या ‘सापेक्ष’ चलनाचे उदाहरण किती शास्त्रीय आहे!

जैसे न चालत सूर्याचे चालणे । तैसे नैष्कमित्व जाणे ।

[सूर्य उगवतो, मावळतो एवढ्या वरून त्याला गती आहे थोडेच?].

हे १२९० साली लिहिले आहे. हाच सिद्धांत १५४३ साली कोपर्निकसने मांडला आणि कालांतराने युरोपमध्ये स्विकारला गेला.

[३] शरीर व मन यांच्या परस्पर संबंधा बद्दल:

मग पांच भैतिक संचले । जेव्हा शरीर असे निदेले ।

तेथे मनाची रहाटे एकले । स्वप्नी जेवी ।

[पंचतत्वांनी बनलेले शरीर जेव्हा निद्रिस्त असते तेव्हां मन एकटेच व्यापार करीत असते] आजचे मानसशास्त्र हेच सांगते.

[४] कामक्रोध सामान्य माणसांस कसे घेरून ठेवतात, त्या बद्दल शरीर शास्त्रातील उदाहरण पाहा:

जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेणे व्याळी ।

नातरी ऊल्बाची खोळी । गर्भस्थासी ।

[साप जसा चंदनाला वेढून अथवा वारेच्या पिशवीचे गर्भास आच्छादन, तसे ज्ञानास कामक्रोधांचे वेढुन असणे आहे]

[५] ‘योगित्व‘ पदास पोहोचल्यावर योग्याची अवस्था वर्णन कारतांना दिलेला हा अर्थपूर्ण दृष्टांत पहा – योग्याचे शरीराचे वर्णन करतांना दिलेला हा दृष्टान्त शिल्पकलेशी संबंधित असून आजही धातूचा पुतळा करतांना धातुरस मुशीमध्ये ओतूनच करण्याची प्रक्रिया आहे.

परब्रम्हाचेही रसे । देहकृतीचीये नि मुसे ।

वोतीव जाह जैसे । दिसती अंगे ।

[योग्याचे शरीर परब्रह्मच्या रसाने देहाकृतीच्या मुशीत ओतल्या प्रमाणे सतेज होते]

[६] मनाचे परम औदार्य व जगांतील सर्व प्राणिमात्रांची कणव पसायदानातील खालील वचनाने कळून येते. जन्मापासूनच, ज्या समाजाने छळवाद मांडला, अपमानाचे आसुड ओढले, त्या समाजांतील दुर्जनांसाठी प्रार्थना बघा–

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।

भूत परस्परे जडो । मैत्र जीवांचे ।

(दुर्जनांचा विनाश नको, तर त्यांनाही सद्बुद्धी मिळो व विश्वातील सर्व जीवमात्रांची मैत्री होवो )

जगांतील सर्व भूतमात्रांविषयी एवढा कळवळा आणि त्या दैवी शक्तीला पूर्णपणे समर्पित झाल्याचा भाव म्हणूनच श्री ज्ञानेश्वरी ही केवळ मराठीतील नव्हे तर जगातील एका सर्वोत्कृष्ठ साहित्यकृती पैकी एक आहे. ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेचा एक अनुपम अलंकार आहे. देशांत अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था विरोधात चळवळी सुरु होण्याच्या कितीतरी अगोदर संत ज्ञानेश्वरांनी भक्तिसंप्रदायाच्या माध्यमातून, समानताधिष्ठित समाजाची निर्मिती केली होती.

श्री ज्ञानेश्वरानी चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ अशा आणिकही साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या या पायावर संत तुकोबांनी कळस चढविला.

ज्ञानदेवांच्या एकतरी ओवीचा कधीतरी अनुभव घेऊन कृतार्थता मिळवावी अशी प्रार्थना करतो!