“सेतू को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी”, ते मंतरलेले दिवस…

    आपण समाजाशी काहीतरी केले पाहिजे ही भावना, मी, माझे वडील आप्पा, यांचे कडून घेतली. आपला शिक्षकी पेशा सांभाळून, आपल्या प्रकृतीची साथ नसतानाही गरीब मुलांच्या शिकवण्या, प्रौढशिक्षणवर्ग, आदिवासी रात्रशाळा यात त्यांचे, विनामोबदला ‘विनावेतन’, योगदान कधीही चुकले नाही. “शिक्षण हे पवित्र ज्ञानदान आहे, त्याचा पैसे कमावून धंदा करणे हे पाप आहे”, ही त्यांची अगदी पहिल्यापासून धारणा होती. स्वतःची म्हातारी आई, पाच मुले ,स्वतः आणि आमची आई असा आठ जणांचा संसार केवळ आणि केवळ आपल्या अल्प वेतनातच सांभाळणेही आमच्या आईसाठी तारेवरची कसरत होती.. 

“आता तरी मुलांकडून शिकवणीचे पैसे मागा”, अशी आईची सतत भुुणभुण असताना आप्पांनी कोणाही मुलाकडून कधीही पैशाची मागणी केली नाही.

   1950 च्या त्या दशकात आपल्या प्रकृतीची साथ नसतानाही, आप्पा आदिवासी पाड्यावर जात व तेथे शिकवून झाल्यावर रात्री बारा वाजता येऊन मिळेल तेवढी झोप घेत.

 “लष्कराच्या भाकऱ्या भाजून काही उपयोग आहे का, त्यापेक्षा स्वतःच्या  तब्येतीची काळजी घ्या या तिच्या प्रश्नाला,

 ” मी गेल्या जन्मी यांचा देणेकरी लागत असलो पाहिजे ते ऋण मला फेडू दे, मला त्यात आनंद मिळतो.” असे त्यांचे उत्तर असे.

..”आपण आपल्या भोवतालच्या समाजाचे कोठेतरी देणे लागत असतो… प्रत्येकाने सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे!  जोपर्यंत तुमच्या कर्तुत्वाचा, संपत्तीचा उपयोग सर्वसामान्यांना ना,समाजासाठी तुम्ही शून्य आहात !” कोवळ्या वयातच हे कुठेतरी कोरले गेले.

    आज त्या गोष्टीची आठवण होण्याचे कारण ध्यानीमनी नसतानाही सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निर्माणात व विकासात माझा लहान हिस्सा! मग हे सर्व कसे घडत गेले त्या मंतरलेल्या दिवसांचा,थोडक्यात लेखाजोग,सेतूच्या हितैशी परिवारासाठी, आजच्या व उद्याच्या !!

         दादरच्या,कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरात, विद्यार्थी म्हणून रुजू झाल्यापासून, त्यावेळी तेथे तन-मन-धनाने समाजासाठी काम करणाऱ्या, भाऊसाहेब वर्तक चिंतामणराव वर्तक, मामासाहेब ठाकूर दादासाहेब ठाकूर भाई राऊत ,रामभाऊ चुरी ,शांतारामजी पाटील,बाबुराव सावे व इतरही मंडळींचे  काम, मी खूप जवळून पहात असल्याने, माझ्या  त्या जाणिवा अधिक समृद्ध झाल्या.

     कै अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचा व्यवस्थापक व कै पू. तात्यासाहेब विद्यार्थी वस्तीगृहाचा रेक्टर ,म्हणून काम करण्याची संधी देऊन तत्कालीन विश्वस्तांनी मला उपकृत केले. माझाही शिरकाव ,सामाजिक कार्यामध्ये  झाला. पुढे  विविध समित्यावर,विश्वस्त व कार्यकारी विश्वस्त म्हणून बारा वर्षे काम करून मी  ,थोडीफार समाज सेवा, यथाशक्ति केली. माझ्या कामाचे मोल समाज किती मानतो,त्यातून सर्वसामान्यांना काय फायदा झाला मी काहीच सांगू शकणार नाही? मात्र त्या सर्वांमुळे मला एक कृपया स्वतः सतत वाटत राहिली हेच माझे बक्षीस.

      सामाजिक काम करताना माझी काही मते होती.. त्यातील एक म्हणजे,आपले कार्यक्षेत्र ‘सोमवंशीय क्षत्रिय समाजापुरतेच मर्यादित असावे’,कारण, आपली नोकरी व्यवसाय सांभाळून, समाजकार्याचा परीघ विस्तारणे मला शक्यच नव्हते .तसेच,माझ्या समाजाने मला शिक्षण कालांत, आर्थिक मदत व वसतीगृहात  निवासस्थान दिल्यामुळे  समाजाचे निश्चितच मी देणे लागत होतो.  त्याअनुषंगाने आपल्या  सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या  विविध क्षेत्रामध्ये योगदान देऊन मी समाधानी होतो  

        आर्थिक क्षेत्रातही आपण काही काम करू, अथवा  अशा क्षेत्राशी कधी संबंधित होऊ  असे कधीच वाटले नाही. कारण  या विषयाचा माझा अभ्यास व अनुभव नव्हता.  माझ्या नोकरीपेशा मध्ये,  कामाच्या अनुषंगाने ज्या  काही आर्थिक  बाबी सांभाळाव्या लागल्या तेवढे अनुभवाने केले. माझा स्वतःचा आर्थिक ताळेबंद ही मला नीट लिहून ठेवणे जमले नाही !!

   सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या स्थापनेमध्ये मी का व कसा सहभागी झालो आणि सोसायटीचा पहिला अध्यक्ष म्हणून कसे व्यवस्थापन पाहिले तो मोठा मजेशीर इतिहास आहे . ,आजही या सोसायटीच्या सल्लागार मंडळावर, कार्यरत असून समाधानी आहे .  गतेतिहासाची जाणीव ठेवून भविष्यात वाटचाल करणार्या संस्था समाजात अग्रेसर राहतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे! 

       1984च्या साधारण मार्च-एप्रिल महिन्यात, श्री.गोपिनाथ वर्तक,या आमच्या मित्रांनी एके दिवशी आम्हा 11 सहकाऱ्यांना, श्री. जयवंत  म्हात्रे, यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी,काही   चर्चेसाठी  येण्याचे निमंत्रण दिले. गोपीनाथ रावांनी आपण कशासाठी जमत आहोत याचा थोडासा  अंदाज दिला होता .मात्र आम्ही प्रत्यक्षात, ज्या दिवशी दुपारी,जयवंतराव म्हात्रे यांच्या घरी जमलो, त्यादिवशी गोपीनाथ स्वतः , संपूर्ण तयारीनिशी आले होते.त्यांनी  एका ,को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या स्थापनेचा, संपूर्ण आराखडा  तयार करून आणला होता.त्या आराखड्यात,अगदी “सेतु “या क्रेडिट सोसायटीच्या नावापासून,  ,किती व कोणत्या सरकारी मान्यता  घ्याव्या लागतील, सोसायटीचे कार्यक्षेत्र ,पुढील सर्व कामाची एकूण रूपरेषा, निधी जमविण्याची संकल्पना कर्ज वाटप, देणग्या  व डिपॉझिट गोळा करण्याची मानके, सोसायटीची समाजाला सध्याची निकड  तसेच उपस्थित  प्रत्येक मित्रांने,  काय योगदान देणे अपेक्षित आहे,अशा सर्व बाबींवर खोल विचार करून हे सर्व टिपणबद्ध केले होते.  तो एक प्रोजेक्ट रिपोर्ट होता.. त्यासाठी त्यांनी स्वतः ,काही क्रेडिट सोसायट्यांच्या कार्यालयांना भेट देऊन व त्यांच्या निर्देशक ,अध्यक्ष ,आदी,  उच्चपदस्थांना प्रत्यक्षात भेटून, त्यांच्या सूचना,माहिती चा विचार करून ,हे टिपण तयार केले होते .खूपच अभ्यासपूर्ण व नियोजनबद्ध  काम पाहिल्यावर, आम्हाला त्यावर जास्त भाष्य करण्याची आवश्यकताच वाटली नाही. विशेष बाब म्हणजे,त्या  सुमारास म्हणजे साधारणतः ऐंशीच्या दशकापर्यंत, आमच्या समाजातील एक तरुण बँकर,श्री. हेम॔त चौधरी ,यांच्या पुढाकाराने  वसईमध्ये नुकतीच, “वसई विकास सहकारी बँक”, सहकार क्षेत्रात सुरु झाली होती. त्याच  उपक्रमाला पूरक म्हणून ,अशी एखादी क्रेडीट सोसायटी निर्माण झाल्यास,आमच्या समाजातील गरजूंना,विशेषतः तरुण विद्यार्थी, व उद्योजकांना तसेच इतरही आर्थिक गरजा भागविण्या संबंधात आमच्याच नव्हे तर सर्वच समाज बांधवांना त्याचा भविष्यात कसा फायदा होणार आहे ,याबद्दल हे विवेचन होते.आमच्या विद्यार्थी दशेतील आर्थिक अडचणी वरून आम्हाला या अशा संस्थेची गरज अधिकच जाणवली . त्या प्रस्तावाला विरोध करण्याचे कारणच नव्हते .सर्वांनी एकमताने अनुमोदन देऊन, या कामात झोकून देण्याचे ठरविले. गोपीनाथ भाईंना सर्वांनीच धन्यवाद दिले .एका चांगल्या कामाला सुरुवात होणार होती व आता आपण सर्वांनी या कामात झोकून देऊन ते यशस्वी कसे होईल एवढेच पाहायचे असे त्याच दिवशी ठरवले .

सेतु वार्षिक समारंभात भाषण करताना तत्कालीन अध्यक्ष श्री दिगंबर राऊत.

     वयाच्या पस्तीशी- चाळीशीत असणार्या आम्ही सर्वांनी आपला उद्योग व्यवसाय, नोकरी, कुटुंब हे सर्व सांभाळून या कामाला वाहून घेतले. म्हणूनच सेतु क्रेडिट सोसायटीची नुसती स्थापना झाली नाही, तर सेतुचा विस्तार दिवसेंदिवस अधिकच होत गेला,जो अजूनही होतो आहे.  सुट्टीच्या दिवशी, प्रत्येक रविवारी व कधी अगदी  रात्री अपरात्रीही , घरोघरी फिरून, चर्चासत्रे  आयोजित करून  समाज बांधवांशी हितगुज करीत, एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून,काम करीत राहिलो . 

  वास्तविक आमच्या स्वतःच्या व्यावसायिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या शिरावर असतानाच हे काम आम्ही करीत होतो . खऱ्या अर्थाने आयुष्याचा तो उत्तम कालखंड होता।.प्रसंगी कुटुंबाकडे, व्यवसायाकडेही दुर्लक्ष होत होते. तरी एक जाणीव मनाला सतत उभारी देत असे..

    “समाजातील एका ऐतिहासिक कामाला प्रारंभ होत आहे.., हे काम यशस्वी केले तर,भविष्यातील आमचा समाज, शैक्षणिक ,औद्योगिक, सामाजिक, व आर्थिक क्षेत्रात, एक  वेगळी  ओळख  इतरांपुढे ठेवणार आहे…आणि सर्वात  महत्त्वाची गोष्ट म्हणजे,  “न भुतो …”,अशा एका महान घटनेचे, आम्ही केवळ साक्षीदारच नव्हे, तर या त्यामागील घटनाकार असणार आहोत ..”,

   या सतत मानसिक समाधान देणाऱ्या जाणिवेमुळेच कित्येकदा टीका व मानहानीचे प्रसंग घडले असतानाही आमची उमेद कधीही कमी झाले नाही!  संसारिक ,कार्यालयीन,  व  सामाजिक विरोध अशा अडचणींचे अनेक डोंगर  पार करताना, आम्ही मागे वळून पाहिले नाही!

       1मे 1984 रोजी सेतु को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची रीतसर स्थापना करून सरकार दरबारी नोंद करण्यात आली…आणि” सेतु को.ऑ. क्रेडिट सोसायटी”.. नावाचे हे इवलेसे रोप ,आम्ही सोमवंशी क्षत्रिय समाज बांधवांच्या द्वारी लाविले ….

    सुरुवातीला आम्ही अकरा सदस्यांनी मिळून ,दहा रुपयाच्या एका शेअर प्रमाणे,उभ्या केलेल्या,फक्त  पंचवीस हजार रुपये भांडवलातून,आज 200कोटी रु.पेक्षा जास्त, उलाढाल करणारी सेतु को-ऑपरेटिव्ह सोसायटी ची भव्यता पाहिली की मन एका सात्विक समाधानाने भरून येते..”याच साठी केला होता अट्टाहास..” असे अंतरीचे बोल  मनामध्ये आपोआप उमटतात ..

   त्या सर्व सहकाऱ्यांची नावे व थोडक्यात ओळख मी पुढे करून देणारच आहे,

    सेतू च्या गेल्या चाळीस वर्षांतील नेत्रदीपक वाटचालीची थोडक्यात, झलक अशी.. 

सालसभासद     भाग भांडवल रु.ठेवी.रुनफा रू
1984/85 4221लाख25,0002500
2019/2010,2345.1cr 113cr 1,2 Cr
2023-24125515.52cr 132.8cr1.86cr

         गत आर्थिक वर्षात,’सेतू’चे खेळते भागभांडवल सुमारे 166 कोटी रुपयांच्या घरात असून, जवळ जवळ 95 करोड रुपयांचे कर्ज वाटप झालेले आहे., आणि एवढा भव्य कारभार असूनही ,सेतू क्रेडिट सोसायटीने, सुरुवातीपासून ते आजतागायत,”अ” हा लेखा परीक्षण वर्ग (Audit Remark  ),कायम राखलेला आहे. ही खरोखरच स्पृहणीय अशी गोष्ट असून ,सेतूच्या सर्व सभासदांना ,आजी-माजी निर्देशक ,व अध्यक्षांना ही भूषणावह अशी बाब आहे.   

         आर्थिक पाठबळ, ही, आयुष्यात किती महत्त्वाची गोष्ट आहे,  हे ज्यांनी,अत्यंत खडतर परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले ,त्यांना सांगावयास नको.आम्ही सर्व मित्रांनी अशा बिकट परिस्थितीचा  मुकाबला  एकेकाळी केला होता. ही प्रतिकुलता,आमच्या भावी पिढ्यांना सहन करावी लागू नये,हा ही एक प्रामाणिक हेतू, सेतु संस्थेची उभारणी करण्या मागे होता. आजच्या काळात,कोणत्याही शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक ,वा राजकीय  क्षेत्रात अग्रेसर असलेल्या, प्रगत समाजाकडे पाहिल्यानंतर,  त्यांच्यामागे , एखाद्या   आर्थिक  आस्थापना चे  भरपूर  पाठबळ  असते हे, प्रकर्षाने निदर्शनास येते. आमच्या  मागील  समाजधुरीणांनी  अनेक  चांगल्या समाजोपयोगी  उपक्रमांना  सुरुवात करून दिली  होती मात्र अशा प्रकारचे  एखादे आर्थिक आस्थापन ही  निर्माण केले गेले असते,तर  आपला समाजही औद्योगिक दृष्ट्या आज आहे त्याहून अधिक प्रगतीशील राहिला असता यात काही शंका नाही.  विशेषतः शेती व शेतीला पूरक ,अशा काही जोडधंद्याचे निर्माण, आमच्या शेतकरी समाज बांधवांना करणे सोपे गेले असते, असे नम्रपणे वाटते.आर्थिक क्षेत्रात विशेषतः सहकारी आर्थिक क्षेत्रात,आज-काल बोकाळलेला भ्रष्टाचार पाहिल्यानंतर, मन नाराज होते. परंतु आजपर्यंत सेतुची वाटचाल व विस्तार पाहिल्यानंतर, कोठेतरी आशेचा किरण ही  दिसतो.आपली ही आर्थिक पतपेढी ,महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये, एक आदर्श आर्थिक संस्था म्हणून नावाजली जावी ,अशी,आम्हा संस्थापकांची मनिषा, सफल होत आहे, हे पाहून खूप समाधान वाटते. आजच्या युगात ,सेवा, समर्पण ,त्याग, या शब्दांचे संदर्भ बदललेले असताना, ही मुल्ये जपणाऱ्या एका संस्थेची स्थापना आपण करू शकलो व आजचे नेतृत्वही त्याच मार्गाने संस्थेला पुढे नेत आहे हे पाहिल्यावर आम्हा संस्थापकांचा ऊर निश्चितच अभिमानाने भरून येतो. आज सेतु ,केवळ एक आर्थिक उलाढाल करणारी क्रेडिट सोसायटी नसून एक मोठे कुटुंब बनले आहे!.  विविध क्षेत्रांमधील गरजूंनी,सेतु मधून आर्थिक मदत घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.  संस्थेबद्दल अत्यंत कृतज्ञतेने ही मंडळी बोलत असतात. वर्षातून एकदा साजरा होणाऱ्या स्नेहसंमेलनाला एकत्र येऊन सर्वांचे कौतुक होते.विचारांची देवाण-घेवाण होते व अशा रीतीने एका निरोगी समाज रचनेलाही हातभार लागतो हे सुद्धा  सेतूचे सामाजिक क्षेत्रातील एक महान यश आहे ! अशा-संस्थेची समाजाला किती आवश्यकता होती हे सिद्ध होते.

           गोपीनाथ भाईंच्या नेतृत्वाखाली, आम्ही सहकाऱ्यांनी ही अंधारात घेतलेली उडी नव्हती तर वर आकाशाकडे पाहत पूर्ण विचारांती घेतलेली ती एक गरुड झेप होती.मी या सर्व सहकाऱ्यांचा मनःपूर्वक आभारी आहे कारण त्यांनी मला या आर्थिक क्षेत्राशी कोणताही  पूर्वानुभव नसताना त सामावून घेतले एवढेच नव्हे तर पहिली महत्त्वाची चार वर्षे नेतृत्व ही माझ्याकडे दिले.

     सन 1984ते 1988 अशी चार वर्षे मी  सेतुचा पहिला अध्यक्ष, म्हणून काम पाहिले.माझे सहकारी श्री. गोपीनाथ वर्तक  हे त्यावेळी,  सेतुचे  पहिले कार्यवाह,असल्याने,माझे काम खूपच सोपे झाले.संस्था अगदी बाल्यावस्थेतच असल्यामुळे आमचे  दैनंदिन काम विशेष दिसत नव्हते.रोजचे कार्यालयीन काम  जास्त नव्हते.सदस्य  नोंदणी करणे,सेतु साठी डिपॉझिट जमविणे,  त्याचप्रमाणे  सरकार दरबारी काही  नोंदी करणे, इत्यादी  प्रारंभिक महत्त्वाची अशी कामे भरपूर होती. संस्थेच्या एकूणच कारभाराला ,पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ,काही निश्चित मानदंड तयार व्हावेत, ही देखील आमची महत्त्वाची जबाबदारी होती.  व्यवस्थापन व एका मोठ्या सरकारी आस्थापनाचा अधिकारी म्हणून  प्रत्यक्ष अनुभव हेच माझे शक्तिस्थान व त्यामुळे सेतुचे प्रारंभीचे एकूण व्यवस्थापन चोख ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी माझा हातभार लावला. आर्थिक व्यवहार करताना कोणतीच तडजोड केली जाणार नाही हे देखील कटाक्षाने पाहिले. त्यासाठी खालील तीन पथ्ये  आम्ही  सर्वांनीच पाळली. 

      एक-,सेतुकडून  मिळणारी आर्थिक मदत  ही ,खरोखरीच गरजवंत  व होतकरू  सदस्याला मिळावी. विशेषेकरून  विद्यार्थ्यांना त्यात अधिक वाव असावा.

      दोन-  कर्जाचे वाटप करताना  एखाद्या  गरजवंताची  विनंती,  काही तांत्रिक बाबींची पूर्तता होऊ शकत नसल्याने, नाकारली जात असेल तर अशा सभासदांना ती तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मार्गदर्शन करावे ..

      तीन -सेतु ही ,केवळ कर्जे वाटणारी व डिपॉझिट गोळा करणारी  संस्था न राहता खऱ्या अर्थाने, आपल्या  नावाप्रमाणे,समाजबांधवांची मने जोडून एक आदर्श व सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारा  तो एक  दुवा व्हावा अशा प्रकारचे, इतरही काही उपक्रम राबविणे.

     सुदैवाने कार्यवाह, व माझे सर्व निर्देशक  सहकारी  यांचे  याबाबत एकमत झाल्यामुळे,आम्ही ही  धोरणे संपूर्णपणे व यशस्वी करू शकलो, हे नमूद करण्यात खूप आनंद वाटतो.सुरुवातीच्या सात-आठ वर्षा पासूनच सेतु सोसायटीने आपली आर्थिक उलाढाल वाढवित नेतांना चोख कारभार  व  उत्तम   दर्जा ,यामुळेच,  आपल्या कामाचा एक दबदबा निर्माण केला आहे. 

           विशेषतः गृह खरेदी  अथवा औद्योगिक  आस्थापने,यां साठी,कर्जे मंजूर करताना,आम्हाला दक्ष राहावे लागे.  त्याकाळी आणि आजही, आर्थिक संस्था डबघाईला येण्याचे एक मुख्य कारण म्हणजे दिलेली कर्ज वेळेत वसूल न होणे हेच असते . संस्थेचे पदाधिकारी आपल्याच मित्र नातेवाईकांना कर्ज देतात व वसुलीत ढीलाई करतात तेव्हा त्या संस्थेस निश्चितच उतरती कळा लागली आहे हे सांगण्यास कोणी भविष्यवेत्त्याची गरज नसते. मला नमूद करावयास खरोखर अभिमान वाटतो ,आमच्या सर्व सहकाऱ्यांनी याबाबतीत स्वतःच एक अलिखित नियम सदोदित पाळून कामाचा मानदंड निर्माण केला आहे, ज्याची आजही पालन होत असते . ज्या संस्थेत  अधिकारावर असलेल्या व्यक्ती  स्वतःवर मर्यादा व बंधने घालून कामाचे असे आदर्श निर्माण करतात व भविष्यकाळातही त्यांचे पालन होत राहते अशा सामाजिक आर्थिक व कोणत्याही क्षेत्रातील आस्थापनाला उज्वल भविष्यकाळ आहे . सेतू विद्या प्रवर्गातील एक आर्थिक संस्था आहे अशी माझी खात्री आहे. 

          सेतु ही ,समाजातील एक बहुआयामी संस्था म्हणून नावारूपास यावी,या करीता  सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत  सकारात्मक दृष्ट्या  विचार करून त्याप्रमाणे संपूर्ण सहकार्य दिलेले आहे. पहिल्या वर्षापासून सुरू केलेला सेतुच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम, आजही मोठ्या दिमाखात ,दरवर्षी होत असतो.त्यादिवशी एक सांस्कृतिक कार्यक्रम ,समाजातील उत्तम यश संपादन करणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार,  विशेष  कर्तृत्व दाखविणाऱ्या  समाजबांधवांचा सन्मान ,एखाद्या मान्यवरांकडून  प्रबोधन   अशा प्रकारचा तो कार्यक्रम असतो. या दरवर्षीच्या प्रथेमुळे,श्री.  माधव गडकरी,त्यावेळी लोकसत्तेचे संपादक, श्री. सुधीर फडके प्रसिद्ध गायक संगीत दिग्दर्शक, श्री. पेंढारकर-विको वज्रदंती चे उत्पादक उद्योजक ,कवी शंकर वैद्य ,श्री .गजानन खातू व श्री .शिरीष देशपांडे, हे ग्राहक सहकारी  चळवळीचे अध्वर्यु, डॉ. जाधव रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर -’माझा बाप आन मी’, या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक,कै..सतीश नाना वर्तक , सहकारी बँकिंग मधील अधिकारी व्यक्तिमत्व, अशी मला सहज आठवत असलेली  काही  विद्वान व कर्तृत्ववान मंडळी आमच्या या संमेलनात सहभाग देऊन गेली. घरी अनेक विद्वाना ंचा सहभाग होत असतो .त्यामुळे एक सुंदर स्नेहसंमेलन तर होई,व नाटकाच्या तिकिट विक्रीमुळे , आर्थिक हातभार लागे .

     सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून माझ्या  प्रास्ताविक भाषणात , मी इतर प्रगती चा आढावा घेतानाच मुदत ठेवी करिता, जमलेल्या समाज बंधू भगिनींना आवाहन करीत असे. प्रसिद्ध उद्योगपती व सहल सम्राट के राजाभाऊ पाटील प्रथमतः माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एक मोठी रक्कम  सेतूसाठी ठेव म्हणून जाहीर करीत. त्यांच्या दोन मिनिटांच्या रोखठोक स्फूर्तीदायक भाषणाने सभागृहात चैतन्यनिर्माण होई. त्यापासून स्फूर्ती घेऊन हजर असलेल्यांतील दानशूर समाजबांधव  आपल्या देणग्या व,ठेवी  जाहीर करीत. हे सर्व ठरवून केलेले असे. प्रत्येक कार्यक्रमाआधी राजाभाऊंच्या दादर शिवाजी पार्क येथील प्रशस्त व सुंदर कार्यालयात आमच्या बैठका होत. विचार विनिमय होई. नियोजन केले जाई. राजाभाऊ कार्यक्रमाच्या आखणी व प्रस्तुतीकरणात बहुमोल सूचना करीत. कार्यक्रमाचे दिवशी प्रत्यक्ष जातीने हजर रहात.राजाभाऊंची मला प्रेमाची सक्त ताकीद असे 

” दिगंबर तुझे प्रास्तविक भाषण जोरदार झालेच पाहिजे. उपस्थितांची,एक सकारात्मक मानसिकता तयार होणे आपल्या ठेवी संकलनाच्या ऊद्देशाला आवश्यक आहे”. 

   सेतूच्या मुख्य कार्यालयातील, संचालक व अध्यक्ष यांना चर्चेसाठी अद्ययावत बोर्डरुम

    आजचा सेतुचा व्याप  व सुयश पाहून राजाभाऊंना निश्चितच खूप आनंद झाला असता. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. मात्र आजच्या सेतुच्या  वाटचालीत, सुरुवातीच्या त्या अवघड कालखंडातील आवाहनांशी सामना करीत असतांना राजाभाऊंचे खूप मोठे सहकार्य आम्हाला मिळत असे, हे मान्य करावे लागेल. त्या दिवसात सेतूला स्वतःचे ऑफिस नव्हते.  आपले भव्य सुबक ऑफिस  कधीही गरज असल्यास  वापरू देण्याचे सौजन्य दाखवून राजाभाऊंनी आम्हाला उपकृत केले आहे. 

    कै. डाॅ.बळवंतराव पाटील, आमच्या सोमवंशी क्षत्रिय  समाजोन्नती संघाचे माजी अध्यक्ष, त्यांनीही आम्हाला सेतुच्या सुरवातीचे काळांत खूप प्रोत्साहन दिले आहे. अनेक प्रसंगी, त्यांच्या पार्ले स्टेशन(पूर्व), जवळील दवाखान्यात, आमच्या बैठका, सभा झालेल्या आहेत. डॉ. पाटील एक द्रष्टे नेते होते . त्यांचा देखील ,सहकार व  आर्थिक संस्थांमध्ये खूप अनुभव व अभ्यास होता. तेही आमच्या वार्षिक कार्यक्रमात जातीने हजर असत, आर्थिक मदत देत, अनेक उपयुक्त सूचना करीत व इतरही सामाजिक सभासमारंभात आमचे कौतुक,समाजाच्या व्यासपीठावरून करीत असत. त्यांच्या स्मृतीला ही या निमित्ताने मी अभिवादन करतो.

 संघाचे माजी अध्यक्ष व केसरी टूर्स चे सर्वेसर्वा सन्माननीय केसरीभाऊ पाटील यांचेही आमच्या सेतु सोसायटीच्या  वाटचालीत मोठे योगदान आहे.आज केसरीभाऊ , प्रकृती अस्वास्थ्यामुळे,प्रत्यक्ष सहभाग देऊ शकत नसले, तरी गेली कित्येक वर्षे त्यांचे मौलिक मार्गदर्शन व मदत कोणत्या ना कोणत्या रूपाने सेतू संस्था व सेतू परिवारास सदैव होत असते. त्यांचाही  येथे मी आदरपूर्वक नामोल्लेख करतो.

   माजी शासकीय अधिकारी कै रामभाऊ वर्तक ,यांच्या शासकीय अनुभवाचाही सेतूला त्या काळात खूप उपयोग झाला आहे विशेषतः सरकारी परवानगी व दाखले मिळवण्यासाठी त्यांनी आम्हाला नुसते मार्गदर्शनच नव्हे तर प्रत्यक्ष आमच्याबरोबर  स्वतः  सरकार दरबारी उपस्थित राहीले, त्यामुळे  कामे सुलभ झाली.

      आमच्या समाजातील मालाड येथे राहणारे, उद्योगपती कै. वासुदेव राऊत यांनीही ,सेतुच्या प्रारंभीच्या काळात, संस्थेला आर्थिक पाठबळ मिळविण्याच्या दृष्टीने, मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांचीआठवण संस्था निश्चित ठेवील.

      कै. माननीय डॉ.जयंतराव पाटील यांचाही या संदर्भात उल्लेख करणे मला आवश्यक वाटते . आमच्या सेतू संस्थेबद्दल त्यांना नेहमीच आपुलकी व आस्था होती . ज्या ज्या वेळी आम्ही त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असून,त्यांनी आम्हाला कधीही नाराज केलेले नाही . सेतूचे रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळी दादांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य दिले. दादा स्वतः दिल्ली व महाराष्ट्र सरकार शी आपल्या कामामुळे संबंधित होते व त्यांच्या परिचयाचा लाभ त्यांनी सर्वांना  दिला आहे .जयंत दादांच्या स्मृतीलाही अभिवादन!

  अशा एक ना दोन अनेक समाज व समाजाबाहेरीलही बांधवांनी त्या सुरुवातीच्या काळात दिलेल्या आर्थिक व नैतिक पाठिंब्याचे जोरावरच सेतू संस्था  तग धरून राहिली व आजची ही यशस्वी वाटचाल करू शकली .त्या सर्वांचे स्मरण होत असले तरी प्रत्येकाचा नामोल्लेख करणे शक्य नाही. त्यांच्या  सदभावनेला व सहकार्याला वंदन करून  संस्था त्यांचे ऋणात सदैव असेल याची मला खात्री आहे.

  माझी अध्यक्षीय कारकीर्द संपल्यानंतर मी सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या दैनंदिन कामापासून सर्वच धोरणात्मक निर्णय प्रक्रियेपासून दूर झालो. त्यानंतर आजपावेतो कोणतेच अधिकाराचे पद स्वीकारले नाही.

 गेली काही वर्षे संचालकांच्या विनंतीवरून त्यांनी निर्माण केलेल्या ‘सल्लागार समितीचा’ एक सदस्य म्हणून मी संस्थेशी निगडित आहे . कोणाही सामाजिक सार्वजनिक शैक्षणिक संस्थेच्या संस्थापकानी, वा अधिकार्यांनी निश्चित कालमर्यादेनंतर आपल्या मूळ संस्थेपासून दूर राहणे हे त्यांचेसाठी व संस्थेसाठी  नेहमीच हितकारक असते. दुर्दैवाने आज  खूप व्यक्ती व आस्थापने अशा चांगल्या परंपरा जोपासित नाहीत .कार्पोरेट जगतातील सन्माननीय रतन टाटा, नारायण मूर्ती ,अशा व्यक्ति मला यासाठीच नेहमीच आदर्श वाटतात. नाहीतर सर्वत्र  जुनी धेंडे आपल्या खुर्चीला चिकटून राहून अखेर पर्यंत अधिकार पदाची आव सोडू इच्छित नाहीत. 

  सन्मान. रतन टाटांचा एक विचार याबाबतीत सर्वांनी लक्षात ठेवण्याजोगा आहे..

    “The business needs to go beyond the interest of the individuals and institutions to the community they serve!”

एका वाक्यात रतन टाटांनी ऊतम ा व्यवसायाचे मर्म सांगितले आहे.

               माझ्या शिवाय ,ज्या दहा  संस्थापक सदस्यांनी, एकत्र येऊन, मे 1984 साली, सेतु क्रेडिट सोसायटीची स्थापना केली ,त्या माझ्या  प्रत्येक सहकारी मित्राबद्दल थोडक्यात माहिती देणे, मी उचित समजतो.

श्री गोपीनाथ जगन्नाथ वर्तक. चटाळे(बोरीवली), सेतूचे प्रवर्तक व आद्य संस्थापक.

   श्री गोपीनाथ जगन्नाथ वर्तक: मूळ गाव चटाळे ,बोरीवली. सेतु क्रेडिट सोसायटीचे प्रवर्तक,व ज्यांच्या विचारमंथनातून सेतुच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली, ते, सेतुचे चे संस्थापक सदस्य. महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातून व्यवस्थापक ,या पदावरून निवृत्त झाले.आपल्या या परिसरांतील व परिसराबाहेरही, समाज बांधवांबद्दल असलेल्या तळमळीतून ,त्यांनी सेतु च्या स्थापनेचा पहिला आराखडा तयार केला. इतर 10 सहकाऱ्यांची निवड करून सेतुच्या निर्मिती कार्याला सुरुवात केली. 1984 पासून ते मधली काही वर्षे सोडता, आजतागायत ते संस्थेत  कार्यवाह, अध्यक्ष सल्लागार, अशा कोणत्या ना कोणत्या ,रीतीने सतत संबंधित आहेत. काही कालापूर्वी आमच्या सोक्षसंग फंड ट्रस्टचे मुख्य विश्वस्त म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत अजूनही आपल्या चटाळे गावच्या  अनेक सामाजिक संस्थांचा कारभार पाहत असतात.  सध्या त्यांचा मुक्काम आपल्या चटाळे गावीच आहे. श्री गोपीनाथ वर्तक म्हणजे एक सर्वस्वी समर्पित प्रामाणिक आणि स्पष्टवक्ता नेता त्यांच्या एकंदर सर्व क्षेत्रातील महान योगदानाला अभिवादन.

    श्री  सदानंद म्हात्रे: मूळ गाव केळवे,वास्तव्य गोरेगाव.महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास  महामंडळातून, उपव्यवस्थापक पदावरून निवृत्त. सेतुचे संस्थापक सदस्य व संस्थेच्या अगदी सुरुवातीपासूच्या जडणघडणीत ,सहभागी. संचालक 1984 ते 88,उपाध्यक्ष 1988 ते 91,अध्यक्ष 1991 ते 96.  सेतुच्या सुरुवातीपासून ते आजतागायत, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना भाग भांडवल व ठेवी गोळा करणे यात त्यांचे सदैव महत्त्वाचे योगदान .सेतुला जागा खरेदीसाठी बिनव्याजी आर्थिक मदत,व जाहिराती मिळवणे, यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सेतुच्या  सुरुवातीच्या, अत्यंत बिकट अशा कालखंडात,आम्ही जमा केलेल्या सर्व आर्थिक शक्तीमध्ये,  सदानंद भाईंचा  एकट्याचा,  पन्नास टक्क्याहून अधिक हिस्सा होता, हे सांगितल्यावर त्यांनी  त्या वेळी केलेल्या  कामाचा  आवाका लक्षांत येईल. विशेष म्हणजे ,शारीरिक  साथ नसतानाही, केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ,त्यांनी हे काम केलेले आहे. ते समाजोन्नती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष होते व तेथेही आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचेच अध्यक्षीय  कालांत, बोरिवली पश्चिम येथील  51 व्या रस्त्याला,  “लोकनेते अण्णासाहेब वर्तक मार्ग”, असे नामाभिधान   करविण्यांत ,सदानंद भाईंचा सिंहाचा वाटा आहे ,हेही येथे मुद्दाम नमूद करतो. ते माझे एक चांगले मित्र व सहकारी. राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात अनेक सदस्यांच्या ओळखी असलेले सदानंद भाई म्हणजे एक स्वतःला झोकून देऊन काम करणारे व्यक्तिमत्व आहे .

      श्री जयवंत भाऊराव म्हात्रे, केळवे: भारतीय रिझर्व बँके मधून ,मुख्य महाप्रबंधक(CGM), पदावरून सेवानिवृत्त.सेतू चे संस्थापक सदस्य. सहकार्यवाह 1984 ते 1986, 2006 ते 2011अध्यक्ष.’समाजाचे आपण देणे लागतो’ या भावनेने ,निरपेक्षपणे काम करणारी एक व्यक्ती. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष. समाजोन्नती शिक्षण संस्था. उपाध्यक्ष. केळवा रोड विभागीय विकास समिती उपाध्यक्ष.सेतुच्या रौप्यमहोत्सवी समारंभात अध्यक्ष म्हणून मोठे योगदान.आजही सेतुची वाटचाल लोकशाही तंत्राने व्हावी, यासाठी सदोदीत प्रयत्नशील असतात. आपल्या बँकेतील पदाचा त्यांनी सेतूच्या वाढीसाठी सुयोग्य उपयोग केला एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत राहूनही कोणताही अभिमान न बाळगता कार्यकर्त्यामध्ये समरस होऊन काम केले.

    श्री बाबुराव शंकर राऊत, मूळ गाव एडवण: वास्तव्य वसई.भारतीय रिझर्व बँकेतून असिस्टंट मॅनेजर या पदावरून निवृत्त. सेतुचे संस्थापक सदस्य. संयुक्त कोषाध्यक्ष 1984 ते 88,कोषाध्यक्ष 1989 ते 96, उपाध्यक्ष 1996 ते 2001 .विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलून अध्यक्षपदावरून जून 2002मध्ये निवृत्त झाले. सल्लागार समिती सदस्य व सेतुच्या सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन महत्त्वाच्या विषयावर चर्चा व सल्लामसलत याद्वारे क्रियाशील . मितभाषी व समर्पका बोलवणारे श्री बाबुराव हे आमच्या सेतूचे एक आधारस्तंभ व पट्टीचे कार्यकर्ते आहेत.

   दिवंगत आद्यसंस्थापक, कै. दत्ताभाऊ सावे,केळवे.

     कै.दत्तात्रय सखाराम सावे: मूळ गाव केळवे.  वास्तव्य बोरिवली. माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट,मधून ते सेवानिवृत्त झाले. सेतुच्या जडणघडणीत मार्गदर्शक ,आधारस्तंभ म्हणून सदैव भूमिका निभावली. कोषाध्यक्ष 1984 ते 89 ,कार्यकारी सदस्य 1989 ते 91उपाध्यक्ष 1991ते 96 व अंतर्गत लेखापरीक्षक 96 ते 2002. अशी अठरा वर्षे विविध पदावरून,सेतुची आर्थिक घडी सांभाळण्याचे महत्त्वाचे योगदान.सल्लागार समितीचे सदस्य. सेतुचे कार्यालय होईपर्यंत, बहुतेक कार्र्मीक व्यवहारही त्यांच्या घरातूनच होत असत.पद असो वा नसो, सेतुचे हिशोब संकलन व तपासणी, याची जबाबदारी त्यांनी घेतली व तनमनधनाने ‘सेतुमय’  झालेले असे आमचे दत्ताभाऊ! आम्हा सर्वांना वडीलधारी असणारे दत्ताभाऊ नुकतेच कालवश्य झाले मात्र आम्हा सगळ्यांना सांभाळून घेऊन सगळ्यांची उत्तम संतुलन ठेवणारे दत्ताभाऊ सेतू शेवटपर्यंत सेतुचे हित पाहण्यासाठी दक्ष होते.

      श्री पंढरीनाथ का. सावे: मूळ गाव तारापूर. वास्तव्य बोरिवली. सेतुचे संस्थापक सदस्य व संचालक .1984 ते 1987 .स्वतःचा उद्योग’ मुंबई स्क्रीन प्रिंटिंग इन्स्टिट्यूट’, यशस्वीपणे चालविला.ऑल इंडिया स्क्रीन प्रिंटिंग असोसिएशनचे सदस्य. सेतुच्या सुरुवातीच्या वाटचालीत सक्रीय योगदान व सदैव सक्रिय पाठिंबा. मी तवाशी असले तरी प्रसंगी स्पष्ट बोलून आपले विचार पटवून देणारे पंढरीनाथ आप्पा अजूनही सेतूच्या कामासाठी बोलावणे आल्यास तत्पर असतात

       डॉ.देवराव हिराजी पाटील: मूळ गाव चिंचणी . सध्या वास्तव्य बोरिवली. सेतुचे संस्थापक सदस्य. ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री’ विषयात डॉक्टरेट. पार्ले कॉलेजमधून, रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून निवृत्त , काही काल पार्ले कॉलेजचे प्रिन्सिपाल म्हणून ही काम पाहिले.मुंबई युनिव्हर्सिटीचे माजी सिनेट सदस्य. पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे यशस्वी आयोजक.चिंचणी समाज ट्रस्टचे अध्यक्ष. समाजोन्नती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष .प्रिन्सिपल बी एम सावे शिक्षण संस्था व राऊत आयटीआय चिंचणी या संस्थांचे आद्य संस्थापक .अतिपूर्व भारताच्या विविध राज्यांतून मुलांना शैक्षणिक मदत करण्याचा वसा घेऊन ,कार्यरत आहेत. तीनशेहून अधिक नागा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता त्यांनी साधली. सेतुचे उपाध्यक्ष 1984 88,अध्यक्ष 1988 ते 1991,  असे बहुआयामी व्यक्तिमत्व. अत्यंत मनमिळावू वृत्तीमुळे  संस्थेचा लौकिक त्यांनी इतर समाजातही वाढविला.

     डॉ.अशोक नारायण वर्तक: मूळ गाव माहीम, वास्तव्य विरार. सेतुचे संस्थापक सदस्य.भाभा अणुकेंद्र मुंबई ,येथून सेवानिवृत्त. सेतुमच्या पायाभरणी च्या काळात, संचालकाच्या भूमिकेतून, 84 ते 87 कालखंडात, भागभांडवल व ठेवी संकलनात सेतुच्या सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग दिला.

      श्री.महादेव जीवन वर्तक: मूळ गाव एडवण. वास्तव्य बोरिवली ,मुंबई.महानगरपालिकेतून उपमुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. समाजकार्याची मनापासून खूप आवड,त्यामुळे आपल्या गावातील व पंचक्रोशीतील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे.सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे बारा वर्षे चिटणीस म्हणून काम केले. क्षात्र्यैक्य परिषदेचे, माजीअध्यक्ष .निधी संकलनासाठी त्यांची खूप मदत झाली.स्वभाव ,अत्यंत वक्तशीर आणि काटेकोरपणा, ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. सेतुच्या संचालक पदावरून 1984 ते 87 या काळात, ठेवी संकलन, सभासद नोंदणी, इमारत निधी संकलन इत्यादी सर्व उपक्रमातून त्यांनी सेतूची सेवा केली आहे. उत्कृष्ट वक्ता असणारे महादेवजी लोकसंग्रह भरपूर आहे.

सेतुचे एक  दिवंगत आद्य संस्थापक  कै. रविंद्रनाथ भास्कर ठाकूर ,शिरगाव.

        कै.रवींद्र भास्करराव ठाकूर: ,मूळ गाव शिरगाव. वास्तव्य विरारला असे.माझे अतिशय चांगले मित्र आणि तात्यासाहेब चुरी वसतिगृहात माझे सहाध्यायी. मी तेथे रेक्टर असताना, मला दिलेली साथ व मोलाचा सल्ला,कायम स्मरणात आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित,मधून व्यवस्थापक या वरीष्ठ पदावरून  सेवानिवृत्त झाले.सेतुच्या स्थापनेच्या  विचार प्रक्रियेत,  ते सहभागी होते.संचालक या नात्याने 84 ते 87 सर्व बाबतीत मोलाचे सक्रीय सहकार्य. सेतुचे माजी उपाध्यक्ष, शिरगाव शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य, सेतुच्या वाटचालीत,  आमरण ,त्यांनी तत्परतेने सहभाग दिला. एक स्पष्टवक्ता, रोखठोक विचार मांडणारा, कार्यकर्ता  म्हणून कै. रवींद्र ठाकूर यांची नेहमी आठवण येत राहील. आपला स्पष्टवक्तेपणा  व समतोल वागणे यामुळे रवींद्रनाथ हे आम्हा सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा दुवा होते!

   या सुरुवातीच्या संस्थापक सदस्या व्यतिरिक्त पुढील कालखंडात अध्यक्ष या नात्याने सेतुची उत्तम प्रकारे सेवा करणाऱ्या माजी/आजी अध्यक्षांचा थोडक्यात परिचय करून दिला पाहिजे,

         श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील: बोर्डी,-बोरीवली.बी.कॉम. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर, प्रमोद भाईंनी बँकिंग क्षेत्राची निवड केली. या क्षेत्रातील एक जाणकार म्हणून समाजात त्यांचे नाव आहे.सेतु सोसायटीच्या  पहिल्या कार्यकारी मंडळात, अंतर्गत लेखा परीक्षक म्हणून अतिशय उत्तमपणे प्रमोद भाईंनी काम केलेले आहे . सन 2001 ते 2006 ,सेतुचे अध्यक्ष होते. आजही ते सेतुच्या संचालक मंडळात असून अगदी स्थापनेपासून सेतुसाठी त्यांचे योगदान वादातीत व अतिशय मोलाचे असे आहे. त्यांच्याच अध्यक्षीय कालांत ,बोर्डी चिंचणी या महत्त्वाच्या शाखा उघडण्यात आल्या व यशस्वीपणे कार्यरत झाल्या. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड,M S E B., बिलांचा भरणा करण्याचे काम ,सेतुच्या विविध शाखांतून, त्यांनीच सुरू केले.त्यामुळे सोसायटीला एक नवीन उत्पन्नाची बाब निर्माण झाली व काही समाज युवक-युवतींना नोकऱ्याही मिळू शकल्या. अत्यंत मीतभाषी, मात्र गरज पडल्यास अगदी स्पष्ट व सडेतोडपणे आपले विचार मांडणारे. अध्यक्ष कोणीही असो त्याना मनापासून साथ देणारे संचालक म्हणजे श्री प्रमोद भाई !  आमच्या कै.तात्यासाहेब चुरी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व सो क्ष स संघाच्या खजिनदार पदाची जबाबदारी तितक्याच तोलामोलाने सांभाळत आहेत.

    श्री. जगन्नाथ म्हात्रे, केळवे: सध्या वास्तव्य बोरिवली. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मधून सेवानिवृत्त. सेतु क्रेडिट सोसायटीशी प्रारंभापासून निगडित असून, प्रकारे काम केले आहे.2011_2016, या कालखंडात सेतुचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केली. जयवंत म्हात्रे व जगन्नाथ म्हात्रे या बंधुद्वयानी, सेतु सोसायटीचे इतिहासात अजोड अध्यक्षीय कामगिरी करून, विक्रम केला आहे.

    श्री पुरुषोत्तम विठोबा वर्तक: केळवे-माहीम ,बोरिवली. मुंबई महापालिकेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त.  ‘महानगरपालिका शिक्षण विभाग बँकेत’ पदाधिकारी, म्हणून अनेक वर्षे कामाचा अनुभव.सेतुशी त्यांचा पहिल्यापासून संबंध असून अनेक प्रकारे त्यांनी सेतुची सेवा केली . ‘सेतु क्रे.सोसायटीचे उपाध्यक्ष,असतांना तत्कालीन  अध्यक्षांच्या अकाली राजीनाम्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आपल्या सहकाऱ्यां कडून उत्तम प्रकारे सहकार्य मिळवून,, हंगामी अध्यक्ष म्हणून सेतुची धुरा खांद्यावर घेतली  पुढे अध्यक्ष म्हणून ही अतिशय चांगल्या प्रकारे काम केले. विशेषतः कोरोना महामारीमुळे अनुभवलेल्या परिस्थितीत शेती कोणतेही नुकसान न होऊ देता उत्पन्नात वाढ करून दाखविली. गतवर्षी झालेल्या सेतु संचालक निवडणुकीत मोलाची कामगिरी करून एक उत्तम पायंडा संस्थेसाठी घालून दिला.उत्तम वक्ते व सर्व समावेशक स्वभाव यामुळे एक हवासा  चांगला कार्यकर्ता आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिका, “आदर्श शिक्षक, महापौर पुरस्कार”, तसेच’ महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक’,राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

  वाचक हो सेतूच्या आजवरच्या 40 वर्षाच्या यशस्वी वाटचालीमध्ये एकूण आठ संचालक मंडळे कार्यरत होती आज श्री प्रकाश काशिनाथ वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली सेतूचे नवे संचालक मंडळ कार्यरत आहे यापूर्वी आपण सेतू परिवार सर्वसंमतीने सर्व समावेशक व्यक्तींचा सहभाग असलेली संचालक मंडळ बिनविरोध निवडून देत होतो या वेळेला सेतू ने स्थापन केलेल्या माननीय समन्वयीस समितीच्या आणि मान्यवरांच्या प्रयत्नानंतरही दोन उमेदवारांनी उमेदवारी मागे न घेतल्यामुळे आपल्याला निवडणुकीला सामोरे जावे लागले सेतूला आर्थिक भुर्दंड सोसावा लागला मात्र समन्वयक समितीने नेमलेल्या सहकार पॅनलचे सर्व उमेदवार भर्गोस मताधिक्याने निवडून आले ही निवडणूक प्रक्रिया दिनांक सात एक 2024 रोजी माननीय सौ अंजली वाघमारे यांच्या अधिकार कक्षेत पार पडली नव्या मंडळांनी दिनांक 12 2 24 पासून पदभार स्वीकारलेला आहे सेतूचे विद्यमान अध्यक्ष श्री प्रकाश काशिनाथ वर्तक हे बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर असून त्यांना बँकिंग क्षेत्राचा प्रचंड अनुभव आहे त्याचा फायदा आज सेतू पतसंस्थेला होत आहे

     विद्यमान संचालक मंडळा मंडळात आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा समावेश आहे वेगवेगळे आस्थापनामध्ये जबाबदार पदावर कार्य केलेले दीर्घा अनुभवी संचालक लाभले आहेत श्री चिंतामणभाऊ ठाकूर एक ज्येष्ठ अनुभवी कार्यकर्ते उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत या सर्व बाबींचे अवलोकन केले असता सेतूचे भवितव्य उज्वल आहे याची खात्री पटते आज सेतू आर्थिक दृष्ट्या यशस्वी वाटचाल करीत आहे आज रोजी सेतूची संपत्ती स्थिती खालील प्रमाणे आहे कोणत्याही आर्थिक संस्थेचे यशस्वीतेचे जे जे घटक आहेत तेथे सेतू ने उत्तम प्रकारे पार पाडले आहेत.

     या सर्व 40 वर्षातील सेतूचा वाढता व्याप व विस्तार लक्षात घेता सेतूचा भविष्यकाळ उज्वल असल्याची खात्री पटते म्हणूनच चाळीस वर्षांपूर्वी भविष्य काळाचा वेध घेऊन ज्या कार्यकर्त्यांनी सेतूचे रोपटे लावले त्यांच्या श्रमाचे चीज झाले आहे असे मनापासून वाटते.

   सेतुच्या आज पावे तो सर्व कार्यकारी मंडळातील प्रत्येक संचालक, विविध समित्या वरील सभासद ,कर्मचारी वर्ग यांचा सेतूच्या वाटचालीत निश्चितच मोठा सहभाग आहे. कोणत्याच प्रकारचे अधिकारी पद,सेवक पद नसतानाही आमच्या संस्थेबद्दल जिव्हाळा प्रेम आणि आत्मीयता  बाळगणाऱ्या अनेक समाज बांधवांचाही या संस्थेच्या विकासात मोठा वाटा आहे. सर्वांचा उल्लेख चल आता आला नाही तरी त्यांच्या कार्याचे मोल कधीच कमी होणार नाही.. सर्वांच्या मदतीशिवाय सेतूला आजचे भव्य स्वरूप प्राप्त होऊ शकले नसते. सेतू परिवारातील ज्ञात अज्ञात सर्व कार्यकर्त्यांना अभिवादन करणे माझे कर्तव्य ठरते

   वर.. सेतू सोसायटीच्या बोरीवली येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी,
 डावीकडून कै. सतीश नाना वर्तक ,श्री सदानंद म्हात्रे,,श्री श्रीकांत राऊत.
   खाली.. व्यासपीठावरील मान्यवर मंडळी.

        वरील सर्व संस्थापक सदस्यांची त्रोटक माहिती वाचल्यानंतर, ज्या  समाजबांधवांचा त्यांच्याशी कधीतरी संबंध आला असेल ,ते निश्चितपणे जाणतील की, ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रात अग्रेसर,, अनुभवी, ज्ञानी तर होतीच पण विशेष म्हणजे, प्रामाणिक आणि समाजाविषयी कळवळा असलेली होती .त्यामुळेच, मला सुरुवातीलाच अध्यक्षपद पेलताना खूप मदत झाली . प्रारंभिक काळात संस्थेला एक नैतिक अधिष्ठान  देण्यात,माझ्या या सर्व सहकार्‍यांनी मोलाचे काम केले. त्यामुळे उत्तरोत्तर सेतु ची प्रगती होतच राहिली.पुढे आलेल्या सर्व अध्यक्ष व संस्था संचालकांनी त्या चांगल्या परंपरा चालू ठेवल्या विकास गती वाढविली

   . दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी सेतुच्या एका शाखेत, काही आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण झाली.  काही सभासदांना विशेष बाब म्हणून त्यांना मदत करण्यासाठी कर्ज वाटप झाले.त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झाले.मला अजुनही असे वाटते की तो एक अपघात होता. संबंधितांनी मुद्दाम नियोजन करून संस्थेचे आर्थिक नुकसान करण्याचा हेतू नसूनही तो प्रकार घडला . काही गरजू सभासदांना अडचणीत आर्थिक मदत दिली गेली नियमांचे काटेकोर पालन झाले नाही ,मात्र त्या  उपकारांची जाणीव न ठेवता मदत घेणारांनी  मदत करणारांनाच अडचणीत आणले . “हिंदीमध्ये ,“होम करते हात जला”, अशा प्रकारची एक म्हण आहे. काहीतरी कोणासाठी चांगले करावयास जावे पण ते आपल्याच अंगलट यावे असाच  प्रकार झाला. सुदैवाने आज  सर्व आर्थिक नुकसान भरून निघाले असून शाखेचा कारभार व्यवस्थित सुरू आहे .यापुढे अशा घटनेचा धडा घेऊन पुढील कालांत असे होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. संस्था उभारण्यास अनेकांचे कित्येक वर्षांचे श्रम असतात.  मात्र संस्था नेस्तनाबूत करण्यास जास्त वेळ लागत नाही!

          सुरुवातीच्या काळात विशेषतः 1984 ते 88मध्ये, जेव्हा माझ्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती, माझ्या व्यवसायातही मला वरिष्ठ प्रबंधक म्हणून जबाबदारी होती. ,भारत सरकारच्या,’ जागतीक ,फाॅरच्यून 500’, तेल शुद्धीकरण, आस्थापनांमध्ये, काम करतानाच खूप दमछाक होई. मुंबईतील ऑफिस सुटल्यावर सेतुच्या बोरिवली कार्यालयात येऊन इतर संचालक मित्रां बरोबर कामाची आखणी करणे, सभासद नोंदणी मुदत ठेवी साठी फिरणे जड जात असे. शिवाय शनिवार रविवारी देखील भ्रमंती होई ती वेगळीच .कौटुंबिक जबाबदाऱ्याही त्या काळात वाढलेल्याच होत्या. पण आपण करीत असलेल्या कामाचे महत्त्व कळत होते व ते एक ऐतिहासिक काम आहे याची जाणीव होती. त्यामुळे सर्वजण  आपापल्या व्यवसाया तील कामांना व कौटुंबिक जबाबदाऱ्यांनाही प्रसंगी बाजूस ठेवून हे काम करीत असू!. आजचा सेतुचा व्याप व समाजाप्रती सेतू संस्थेचे योगदान पाहताना त्या दिवसांत केलेल्या कष्टांचे ,समाधान वाटते.

 सेतूच्या पहिल्या वार्षिक समारंभात प्रमुख पाहुणे, लोकसत्तेचे तत्कालीन संपादक, श्री माधव गडकरी ,यांचे समावेश सेतूचे निर्देशक मंडळ अध्यक्ष व हितचिंतका..1985.

         सल्लागार म्हणून आजही  योगदान देत आहे. यावर्षी 2024-29 साठी  पुढील पाच वर्षासाठी झालेल्या  सेतू च्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी प्रथमच नेहमीचा ‘सिलेक्शन’ हा क्रायटेरिया न वापरता ‘इलेक्शन’ घ्यावी लागली.संस्थेच्या इतिहासात हे प्रथमच घडत होते. सल्लागार संचालक  कर्मचारी  सर्व सेतू हितेशी मंडळींनी हे आव्हान स्वीकारून ते यशस्वीपणे पार पाडले . तत्कालीन अध्यक्ष श्री पुरुषोत्तम वर्तक यांच्या नेतृत्वाखाली हे काम  यशस्वीपणे पार पडले.आमचे एक कर्मचारी श्री मनीष वर्तकयांनीही खूप मेहनत घेतली. सर्वांनाच एक छान अनुभव आला .

    .बघता बघता ,’सेतु को-ऑपरेटिव्ह क्रेडिट  सोसायटीचे’ , लावलेले इवलेसे  रोपटे आज 40 वर्षानंतर खूपच फोफावले आहे. सुरुवातीच्या त्या कालखंडात सेतु आमचे सर्वांचेच एक तीर्थक्षेत्र बनले होते, व आजही आमच्या  भावना त्याच आहेत.  तीन तपांहून अधिक काळ परिश्रमांचा हा मूर्त,मनोहारी, अविष्कार पाहतांना, कुठेतरी, सार्थकतेची भावना सुखावते.समाजाची, एक मोठी निकड,अल्पांषाने का असेना, पूर्ण करण्यात आपला हातभार लागला ही आयुष्यातील  निश्चितच कृतार्थतेची भावना आहे याची धन्यता वाटते.

     सुरुवातीची ही खडतर भ्रमंती चालू असताना अनेक समाजबांधवांच्या ओळखी नव्याने झाल्या .काही होत्या त्या अधिक घट्ट झाल्या. स्वार्थी तसेच निरपेक्ष वृत्तीच्या अनेक लोकांचे दर्शनही झाले. समाजजीवनाची जवळून ओळख झाली. एका गृहस्थांचे घरी आम्ही  वर्गणी व सभासद नोंदणीच्या निमित्ताने गेलो होतो. गृहस्थ सुखवस्तू होते. सेवानिवृत्तीनंतर आरामाचे जीवन जगत होते. मुले बाळही चांगल्या उच्चपदी होती. मात्र त्यांनी,सेतुचे सभासद होण्यासच नकार दिला .ठेव देणे तर बाजूलाच!  आम्हाला स्पष्ट शब्दांत समज मिळाली ..” मी आपणास ओळखतच नाही, तर माझे पैसे तुमच्याकडे कसे ठेवू??”.. खरोखरच त्या भल्या माणसाने,   आम्हाला रिकाम्या हाताने , जड अंतःकरणाने परत पाठविले!! मात्र त्यांनी आम्हाला एक सुंदर धडा शिकविला,

   “तुम्ही भले  समाजोपयोगी काम करतो असे समजत असाल, म्हणून प्रत्येकानेच तुम्हाला मदत करावी हे गृहीत धरू नका…अपमानास्पद वागणूक ही संयमाने घ्यायला शिका मात्र  वाटचाल चालू ठेवा!”

   याउलट दुसरा एक माणुसकीचा गहिवर अनुभवलेला प्रसंग. एका निवृत्त गिरणी कामगाराच्या घरी आम्ही गेलो होतो.  गृहस्थ नुकतेच  सेवानिवृत्त होऊन, प्राॅ.फंडाचे व ग्रॅच्युएटिचे  सर्व पैसे त्यांना मिळाले होते .या सद्गृहस्थांनी ,काही लाखाचे ते सर्व पैसे ,दीर्घ मुदतीची  ठेव म्हणून आमच्याकडून  सुपूर्द केली.  एकच विनंती केली

   , “ महिन्याला, माझ्या घरखर्चासाठी म्हणून,व्याजाचे जेवढे  पैसे होतील तेवढे देत जा!”.. 

  समाज बांधिलकीच्या गोष्टी आपण सर्वजण करीत असतो,मात्र अशाप्रकारे कोणताच बडेजाव न करता,आपण,खूप मोठी सामाजिक बांधिलकी दाखवत आहोत याचा जराही अविर्भाव न आणता, एका निवृत्त कामगाराने  त्या काळात आम्हाला दिलेली मदत ही अमोल आहे . त्यांचे नाव श्री. बाबुराव पाटील.  अशा लोकांमुळेच कुठेतरी कोणासाठी कष्ट करण्यात खस्ता खाण्यात आनंद  मिळतो. श्री. पाटील यांचा आम्ही एका कार्यक्रमात आवर्जून सत्कार केला होता .

    सेतुवर असेच  प्रेम करणाऱ्या कै. दत्ताभाऊ राऊत बोर्डी, गोरेगाव यांचे देखील उदाहरण लक्षात ठेवण्या सारखे आहे. दत्ताभाऊंना ज्या दिवशी मुंबईच्या महापौरांकडून, “आदर्श शिक्षक “म्हणून पारितोषिक मिळाले, ते  हजार रुपये, लिफाफाही न उघडता, त्यांनी सेतु कार्यालयात आणून,देणगी म्हणून सुपूर्द  केले. ते केवळ एक हजार रुपये नव्हते तर त्याला बिलगलेले दत्ताभाऊंचे सेतू संस्थेवरील प्रेम हे शंभर नंबरी सोने होते. अशा लोकांच्या निस्सीम प्रेमामुळेच हेतू अजूनही पुढे जात आहे व अशीच पुढेही वाटचाल करीत राहील!

मागील संचालक मंडळाला निरोप .नवीन संचालकांचे स्वागत कर्मचाऱ्यांचा सत्कार. जानेवारी 2024।

सेतुच्या  पायाभरणीत व उभारणीत ,आजच्या  वाढत्या वैभवात माझे योगदान किती  ते मला  माहित नाही  ,मात्र ते जरी  नगण्य असले  तरी त्यामुळे मला एक सात्विक  समाधान निश्चित मिळाले .माझा समाज मला जवळून पाहता आला .अनेक मित्रांशी कायमची नाती जडली. या अनुभवाचा उपयोग पुढे, सो.क्ष संघ फंड ट्रस्टचा, कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करण्यात मला खूप उपयोगी पडला . बोर्डीमधील सहकारी पतपेढीचे, सेतुमध्ये विलीनीकरण घडवून आणण्यात, माझाही थोडा हातभार त्या काळांत लागला, हीदेखील खूप आनंददायी घटना.आम्ही भरपूर भटकंती केली,फिरलो, सभा मिटिंगज्, घेतल्या. मात्र त्या पहिल्या आठ दहा वर्षाच्या कालखंडात, आम्ही सर्व सहकाऱ्यांनी , एकही  पैशाचा विनियोग, चहापाणी ,प्रवासभत्ता वा इतर कोणत्याही वैयक्तिक लाभासाठी खर्च केला नाही.  यावरूनच जाणकारांनी काय ते जाणावे….परमेश्वराची पूजा म्हणजे तरी काय असते? आपल्या स्वकर्म कुसुमांची पूजाच,देवाला अधिक  भावते. तीच कर्मपुष्पे, ईश्वरचरणी रुजू होतात,आणि त्यामुळेच भवतालाला चैतन्य प्राप्त होत असते.,  …या ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दातच या लेखाचा समारोप करतो.

                  तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, 

                  पूजा केली होय अपारा, तशा लागी.!

 आमच्या सेतू को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा भविष्य काल ही असाच दिवसेंदिवस उज्वल होतं जावो हीच त्या सर्वात्मकाकडे विनम्र प्रार्थना!!

 दिगंबर राऊत, माजीअध्यक्ष, 

सेतु. को-ऑ.क्रे.सो.लि.