जगावेगळ्या मॅडेलिन बाई..
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ,शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू.
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका.
तुका म्हणे पहा शब्दची हा देव,शब्दे गौरव पूजा करू.
महाराजांनी शब्दांचे महत्त्व थोड्या शब्दात किती प्रभावीपणे सांगितले आहे ते इथे कळते शब्द हीच आमची रत्न शब्द हीच आमची शास्त्र आणि शब्दा शिवाय जीवन फुकट आहे शब्द हा देव मानला आणि म्हणून, विठ्ठलाची पूजा अभंगातून बांधली. तुकाराम महाराजांचा हा प्रसिद्ध अभंग आठवायचं कारण काही दिवसापूर्वी न्यूयार्क शहरामध्ये मेडेलीन क्रिप्के या शब्द कोविद बाईंचा, covid-19 मुळे झालेला मृत्यू.
साधारणपणे 1960 च्या दशकात आमच्या विद्यार्थिदशेत आम्ही नवीनच इंग्रजी हा विषय शिकत होतो ,आणि त्यावेळी मराठी इंग्रजी शब्दकोश जवळ बाळगणं ही एक गरज होती . बहुतेक विद्यार्थी एक तरी असा शब्दकोश किंवा डिक्शनरी आपल्याजवळ ठेवीत असत. त्याच वेळी अमेरिकेमध्ये मेडलीन क्रीप्के, या नावाची एकोणीस, वीस वर्षाची एक तरुणी मिळेल तो शब्दकोश जमविण्याच्या वेळाने पछाडली होती. तिचे हे वेड आयुष्यभर कायम राहिले ,अगदी परवापर्यंत,दुखःद मृत्यू होईपर्यंत, अखेरच्या क्षणापर्यंत.
मेडलीन गेल्या तेव्हा त्यांच्या चारखोपी((fout bedroom flat), घरांमध्ये वीस हजार पुस्तके जमविलेली होती. यापैकी बहुतेक सारे शब्दकोश होते. यात अर्थातच भरपूर वैविध्य पण होते ,जुने आणि नवे, या प्रकाशनाचे आणि त्या प्रकाशनाचे, पण आणखीही एक अनवटपणा त्या संग्रहात होता. एक मोठ्या भिंतीवर पसरलेल्या विशाल शेल्फ मध्ये, फक्त,विविध बोली भाषेमधील वापरल्या जाणाऱ्या शब्दांचेच, शब्दकोश भरलेले होते.गळ्यात पदकाचा सारखे घालता येईल अशा, डबीच्या आकाराचा, एक शब्दकोष होता,ज्यामध्ये वरचे झाकण म्हणजे भिंग आणि आत,अतिसूक्ष्म म्हणावी तशी डिक्शनरी.
वरील भिंग वापरून, आतली डिक्शनरी कधीही वाचावी.
आता प्रश्न पडतो या मेडलीन बाई कोण? त्यांच्या मृत्यूनंतर आता अनेकविध माहिती मृत्युलेख व आदरांजली लेखात, त्यांना वाहिली जात आहे.या बाई अमेरिकेच्या कनेक्टिकट या संस्थानात सन 1943 मध्ये जन्मलेल्या. बालपणापासूनच त्यांना वाचनाची आणि पुस्तकांची खूप आवड. त्यांचा भाऊ सोली, याला देखील वाचनाची खूप आवड. दोघेही भाऊ बहीण लहानपणीचे खेळ म्हणून वाचन करून,एकमेकांशी चर्चा करीत. बाईंना हा शब्दकोश जमविण्याचा छंद कसा लागला? त्यांच्या एका मित्राने त्यांच्या अनेक मुलाखती घेऊन, त्यांच्या या आगळ्या छंदाविषयी जगाला माहिती दिली आहे. त्यात या छंदाविषयी बाई म्हणाल्या, मी इयत्ता पाचवी मध्ये होते, तेव्हा माझ्या हातात वेबस्टर डिक्शनरी मला भेट म्हणून मिळाली आणि आणि ती वाचत असताना मला काही तरी महत्वाचे, जगावेगळ्या वस्तूचा लाभ झाला असे वाटले. अशा प्रकारच्या, अनेक भाषेतील डिक्शनरी मिळाल्या,तर किती बहार होईल असे वाटले आणि मी ,अशा प्रकारच्या शब्दकोशांचा शोध घेऊ लागले. शब्दांचा, शब्दाच्या ऊच्चारांचा, शब्दामागील आशयाचा नेमकेपणा काय ,हे समजून घेण्याची आवड मला निर्माण झाली. त्यासाठी वेगवेगळ्या शब्दकोशांची ची गरज भासली आणि मी ते जमऊ लागले. त्यात माझ्या चरितार्थाचे ही साधन सापडले. बाई जरी कंनेक्टिकट मध्ये जन्मले असल्या तरी त्यांनी पुढे न्यूयार्क हीच आपली कर्मभूमी मी केली तेथे येऊन इंग्रजी साहित्य या विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.विविध भाषांमधल्या शब्द वैभवाच्या प्रेमापोटी,विशेषतः ईंग्रजी भाषेच्या प्रेमाखातर बाईंनी काही काल प्राध्यापकी केली, पुस्तक विक्रीचा ही धंदा केला,शिक्षण क्षेत्रात लहान-मोठ्या नोकर् या केल्या पण हे सर्व आपल्या छंद जपण्याच्या आवडीपोटी.
आपला हा जगावेगळा छंद जोपासताना मेडलीन बाई,साहित्यात नाही( Literatures ) पण शब्दकोश शास्त्रांमध्ये ( लेक्सीकोग्राफी) कोविद नक्की झाल्या. या शास्त्रांमधील त्यांचे आदर्शवत म्हणजे वेबस्टर डिक्शनरी चे निर्माते नोहा वेबस्टर(1758-1843), यांच्यावर मेडलीन यांची भक्ती जडली होती. त्या भक्ती मधून नोहा यांच्या हिशोब वहीची काही पाने मिळवून त्यांनी जपून ठेवली होती एवढेच काय नोहा वेबस्टर यांनी फुंकलेल्या सिगरेटची पेटी त्यांनी मिळवून ती दागिन्याप्रमाणे जपून ठेवली होती. अशा वस्तू, भक्तिभावाने अनेक वर्ष जपून ठेवणारी व्यक्ती जगात विरळाच असेल!!याच बरोबर1694 साली प्रसिद्ध झालेली “लेडीज डिक्शनरी “तसेच 17 85 साली छापलेली “द क्लासिकल डिक्शनरी ऑफ द वल्गर टंग”, 1740 सालचे “द लार्कस ऑफ लंडन” हे लंडनच्या गुंडांचे चित्रमय, शब्दवैभव उलगडणारे पुस्तक त्यांच्या संग्रही होते. अशा प्रकारे, नाना शब्दकोशांचे ऐश्वर्य मेडलीन यांच्या संग्रही होते. उतारवयात पैशाची कमतरता भासू लागली तेव्हा यातीलच काही वस्तू लोकांना विकून त्यांनी आपली गरज भागवली होती.
या शब्दमीरेचा,एकतारी प्रवास अखेर तुटला …एक शब्द कोविद जीव , covid-19 या शब्दकोशात नसणाऱ्या रोग विषाणू ने घेतला. एरवी ही एक सामान्य बातमी असती, अमेरिकेत हजारो लोक मृत्यूमुखी पडले,त्यातील हा एक जीव.. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर छापून आलेल्या,त्यांच्या आगळ्यावेगळ्या जीवनातील अनेक गोष्टी लोकांना कळल्या, आणि त्यातून जगाला, इंग्रजी भाषेतील शब्द वैभव आणि त्या पेक्षा त्या भाषेच्या शब्दातील समज आणि शब्दांच्या वापरण्याची गंमत, लोकांना कळली, त्यासाठी मेडलीन बाईंनी घेतलेले कष्ट जगासमोर आले. म्हणून बाईंच्या निधनामुळे केवळ दुःख होत नाही तर, एक आगळीवेगळी ,शब्दांचीच रत्ने आयुष्यभर जपणारी , समाजाला काहीतरी वेगळे देऊ पाहणारी व्यक्ती निघून गेली म्हणून खूप हळहळ वाटते .त्या साठी ही शब्दांची पूजा…. मेडलीन बाईंना विनम्र प्रणाम.