एक सच्चा, सचोटीचा कार्यकर्ता, चिंतामणराव वर्तक उर्फ अण्णा
पत्र, पुष्प, छाया, फल, मूळ धनंजया.
वाटेचा न चुके आलिया, वृक्षु जैसा |
तैसे मौनी, धनधान्यवरी, विद्यमाने आल्या अवसरी,
श्रांताचिये मनोहारी, ऊपयोगा जाणे || ज्ञानेश्वरी १६- ८६,८७
“अर्जुना, ज्याप्रमाणे वृक्ष, वाटेने येणार्यास पाने, फुले, मुळे, असेल ते देण्यास चुकत नाही, त्याप्रमाणे मनापासून धनापर्यंत, जे काही आपल्यापाशी प्राप्त असेल ते देऊन, त्या योगाने, प्रसंगानुसार, श्रमलेल्यांचे मनास आनंद होईल, अशा प्रकारे उपयोगास येणे हे समाजाप्रती ऊत्तम दान आहे. त्यानेही जीवनाचे सार्थक करता येते.”
“समाजातील गरजू साठी काहीतरी करावयाची इच्छा असल्यास केवळ लाखो, करोडो रुपयाचे दान देणे ही निश्चितच मोठी गोष्ट. पण हे सर्वांना शक्य होत नाही. आपल्या कुवतीनुसार, आपल्याजवळ जे काही आहे, अति मौल्यवान असलेला काल जरी समाजासाठी दान करू शकलो, तरी तीदेखील एक उच्च प्रतीची समाजसेवाच आहे. त्याने ही जन्माचे सार्थक झाले असे समजावे”, हेच ज्ञानदेवांनी वरील ओवीमध्ये उद्धृत केले आहे.
आपल्या व आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी कोणतीच ददात नसतांना, स्वतःला, शिक्षणामुळे नोकरी वा व्यवसायात पैसा मिळवण्याची उत्तम संधी असूनही, अंधश्रद्धा व अज्ञानाने घेरलेल्या समाज बांधवासाठी आपण काहीतरी केले पाहिजे,नव्हे ते आपले कर्तव्य आहे असे मानून पिताश्रींनी दिलेला समाजसेवेचा वारसा पुढे चालविणे हे आपले जीवनातील ध्येय ठरवून, त्याप्रमाणे, आयुष्यभर वाटचाल करतांना, प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले, व्यवसायात नुकसान झाले, कामाचे श्रेय नाही मिळाले, तरीसुद्धा आपल्या ध्येय पथावरून विचलित न होता, हाती घेतलेले समाजसेवा व्रत न सोडता, 91 वर्षाचे दीर्घायुष्य सार्थकी लावणाऱ्या माननीय कैलासवासी चिंतामणराव वर्तक उर्फ अण्णा यांच्याविषयी मी आज लिहणार आहे!
कै.अण्णांची आपल्या तत्त्वावरील,आपल्या पित्यावरील व आपल्या नेत्यांवरील निष्ठा एवढी जाज्वल्य होती की आयुष्यात शेवटपर्यंत त्यांना याबाबतीत कधीच तडजोड केली नाही. एकदा स्वीकारलेल्या ध्येयपथावरून ते तसुभरही ढळले नाहीत. कसोटीचे प्रसंग येऊन गेले, प्रलोभने दाखविली गेली पण अण्णांच्या निष्ठा कायम राहिल्या. आयुष्याच्या अखेरपर्यंत स्विकारलेल्या मार्गावरूनच ते पुढे जात राहिले.
शारीरिक, आर्थिक, बौद्धिक कुवतीनुसार, आपल्याजवळ देण्यासारखे जे होते ते समाजासाठी अण्णा देत राहिले. अण्णां प्रमाणेच त्या काळातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी निरलसपणे, निरपेक्षपणे हे काम केले. भले त्यांची ही सेवा जरी आज दुर्लक्षित असली, तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही. कारण ते शंभर नंबरी खणखणीत नाणे होते.
आयुष्यातील बहुमोल काल ,समाजासाठी निरपेक्ष वृत्तीने दान करणारा समाजसेवक निश्चितच खूप मोठे काम करून गेलेला असतो. “समयदाना”, सारखे दुसरे दान नाही . केवळ दुसऱ्यासाठी, आयुष्यातील किमती वेळ देणारा कार्यकर्ता एरवी कितीही छोटा भासला तरी त्याची किंमत रुपयाच्या हिशोबात, करता येत नाही. आणि विशेषतः हे कार्य आपल्या ऐन उमेदीच्या काळात आपल्या कामधंद्याकडे व कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असून ही केले असेल तर त्या कामाला दुसरी उपमा नाही. एरवी सेवानिवृत्तीनंतर, वेळ जात नाही म्हणून समाज सेवेत उतरलेली खूप मंडळी असते. अण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांचे, काम तसे नव्हते. आपल्या उमेदीच्या बहरात असताना त्यांनी हे समयदान करून समाजाप्रती आपली सेवा दिलेली आहे. त्या कामाला तुलना नाही.
तो कालखंड देशप्रेमाने भारलेल्या व प्रसंगी पारतंत्र्यात जखडलेल्या समाजाला स्वातंत्र्यप्राप्ती करण्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या देशभक्त व निरलस सेवकांचा होता. आमच्या समाजात त्या वेळी कै. अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी, बळवंतराव वर्तक, भाईजी राऊत, मुकुंदराव सावे, डॉ. दीनानाथ चुरी, यासारखे दिग्गज कार्यकर्ते समाजाच्या सेवेचे व्रत घेऊन झपाटल्यागत काम करत होते. त्यांचे बरोबर स्वयंसेवक म्हणून ,समाजसेवकांची दुसरी फळी तयार झाली होती त्यात भाऊसाहेब वर्तक ,अण्णा, मामा ठाकूर, दादासाहेब ठाकूर, भाई राऊत, रामभाऊ राऊत, अशी त्यावेळी तरुण मंडळी आपल्या सीमित कुटुंब परिघाबाहेर येऊन काहीतरी करू इच्छित होती. अण्णा देखील, समाजसेवा, देशसेवेने भारलेल्या तरुणांपैकी एक…
गणितात प्रकांड गती असलेल्या बळवंतराव टिळकांना मंडालेत जाऊन बसण्याची गरज नव्हती, बॅरिस्टर होऊन खोऱ्याने पैसा ओढण्याची संधी असताना सावरकरांना अंदमानामध्ये काळ्यापाण्यावर जाण्याची गरज नव्हती, आफ्रिकेत चांगली वकिली चालू असताना मोहनदास गांधीना भारतात येऊन ब्रिटिशांना “क्विट इंडिया” सांगत, अनवाणी फिरण्याची गरज नव्हती. आमच्या चिंतामणराव वर्तकांना, वडील बळवंतरावांची शेतीभाती, सुबत्ता तसेच सुशिक्षित, सुविद्य सहधर्मचारिणी बरोबर ऐषारामात संसार करण्याचे सोडून सोमवंशी क्षत्रिय समाज संघाच्या दादर ऑफिसमध्ये माहीमहून फेऱ्या मारण्याची गरज तरी काय होती?…होय गरज होती…त्यांच्या अंतर्मनाने दिलेला तो कौल होता…त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीने जाणीवपूर्वक घेतलेले ते एक व्रत होते. असे अनेक उल्लेख केलेले समाजसेवक आमच्या समाजात व इतरही समाजात त्या वेळी कार्यरत होते. कालौघात त्यांचे विस्मरण होऊ नये, त्यांची नोंद कोठेतरी व्हावी, या आंतरिक भावनेने केलेला हा अल्पसा प्रयत्न. समाजासाठी आपले योगदान देऊनही , विस्मृतीत जात चाललेल्या अण्णा सारख्या अनेक सेवकांबद्दल खेदाने असेच म्हणता येईल.. कवी बोरकरांच्या शब्दात…
” गाळुनिया भाळीचे मोती,
हरिकृपेचे मळे उगवती,
जलदांपरी येउनिया जाती,
जग ज्यांची न करी गणती…..
…नाहि चिरा नाही पणती…”
समाजासाठी भरपूर योगदान देऊनही ज्यांना आपल्या कामाचे श्रेय मिळाले नाही. येणाऱ्या पिढीला ज्यांची ओळखही नाही, अशा चिंतामणराव वर्तक उर्फ अण्णा यांच्या स्मृतीसाठी एक पणती लावण्याचा हा माझा अल्प प्रयत्न.
सन 1965 साली मी पू. तात्यासाहेब चुरी वसतिगृहात विद्यार्थी म्हणून दाखल झालो. त्यावेळी डॉ. मधुकरराव ठाकूर हे आमचे व्यवस्थापक आणि मान. चिंतामणराव वर्तक सो क्ष संघ फंड ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त म्हणून पू. कै. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरात कार्यरत होते. आठवड्यातून दोन दिवस माहीमहून दादरला येऊन पैशाचे हिशोब व वसतिगृहाच्या कामकाजाची माहिती घेत असत. अण्णांच्या कामाची व पद्धतीची पहिली झलक तेथे समजली.
पुढे 1967 साली मी पू.तात्यासाहेब चुरी वसतिगृहाचा व्यवस्थापक व पू. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचा व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागलो. माझा पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यासक्रम युडीसिटी (U D CT),मध्ये चालू होता. त्यावेळी अण्णा हे माझे ‘बॉस’ होते. त्याच्या निष्ठेची,अत्यंत अचूक व चोख हिशोब लिहिण्याची, विशेषतः पैशाच्या बाबतीत अत्यंत काटेकोरपणा व शिस्तप्रिय व्यवस्थापनाची मला खूप जवळून प्रचिती मिळाली. त्यातील काही आठवणीं तसेच अण्णांच्या कन्या सौ. आशाताई पाटील यांनी वडीलांबद्दल सांगितलेल्या आठवणींचा मी येथे अंतर्भाव करणार आहे.
मी मागे सांगितल्याप्रमाणे अण्णांनी आपल्या समाजसेवेची दिक्षा आपले वडील बळवंतराव जगन्नाथ वर्तक यांच्यापासून घेतली. बळवंतराव हेदेखील त्या काळी आमच्या सो क्ष समाजातील एक अत्यंत प्रगतीशील शेतकरी व समाज सेवेचे भान असलेले, दूरदर्शी असे व्यक्तिमत्त्व होते. आमच्या सोक्षसमाज संघाच्या, 1920 साली झालेल्या स्थापनेत तत्कालीन दिग्गजांबरोबर बळवंतरावांचाही खूपच मोठा हिस्सा होता. ते संघाचे चिटणीस ,उपाध्यक्ष व कालांतराने सोमवंशी क्षत्रिय समाज संघ फंड ट्रस्टचे पहिले विश्वस्त झाले. समाजात ज्या थोड्या, “पिता-पुत्र”, जोड्यांनी समाजाचे विश्वस्त म्हणून आपली नावे नोंदविली आहेत त्यात कै.बळवंतराव वर्तक व चिंतामणराव बळवंत वर्तक या पिता पुत्रांची जोडी निश्चित अग्रभागी आहे. चिंतामणरावअण्णाबद्दल लिहितांना त्यांचे पिताश्री बळवंतराव वर्तक यांना समजून घेणे जरुरी आहे. त्यांचाच वारसा अण्णांनी पुढे चालविला. कै.बळवंतरावांची नात, सौ.आशाताईं रविंद्र पाटील यांनी दिलेली माहिती, त्यांच्याच शब्दात…
” माझे आजोबा स्वर्गीय बळवंत जगन्नाथ वर्तक यांचा जन्म दिनांक 10 जुलै 1878 साली एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण माहीम येथील शाळेत झाले. डोक्यावर पुणेरी पगडी, धोतर कोट व खांद्यावर उपरणे असा पेहराव असणारे माझे आजोबा खूप आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती आमच्या माहीम-केळवे परिसरात एक चांगले समाजिक कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. 1920 साली आमच्या सो क्ष समाजोन्नती संघ स्थापनेपासून ते संघ कार्यात अग्रेसर होते. संघ स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. आपल्या सहका-याबरोबर गावोगावी फिरून, संघाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. काही काळ संघाचे उपाध्यक्ष व नंतर संघ फंड ट्रस्टचे विश्वस्तही होते. 1950 साली माहीम येथे झालेल्या संघ परिषदेचे ते स्वागताध्यक्ष होते. “समाजाची भावी पिढी असलेली, आमची मुले शिकली तरच समाज पुढे जाईल..” यावर त्यांची श्रद्धा होती.आणि म्हणून समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी ते झटले. प्रसंगी आजूबाजूच्या गरजू मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ही त्यांनी केली. तंत्र मंत्र जादूटोणा दांभिकपणा इत्यादी अंधश्रद्धेची त्यांना खूप चीड होती. ही प्रवृत्ती समाजातून संपूर्ण नष्ट झाली पाहिजे यासाठीच सोक्ष संघाच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला.”
एक उत्तम व प्रगतीशील शेतकरी म्हणून आपल्या आजोबाविषयी सांगताना त्या म्हणतात..
” एक दूरदृष्टीचे शेतकरी म्हणून, नारळ या कल्पवृक्षाचे महत्त्व जाणून त्यांनी त्याकाळी, नारळीची झाडे आपल्या बागेत मोठ्या प्रमाणात लावली. त्यांची योग्य मशागत करून आपले आर्थिक उत्पन्नही वाढविले. दर्जेदार राजेळी केळ्यांची लागवड, उत्तम प्रतीची पानवेली व इतरही भाज्यांची लागवड त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली. त्यांच्या या दर्जेदार उत्पादनाला ठाणे जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर, महाराष्ट्राबाहेरही बाजारपेठ मिळाली. पुणे, अहमदाबादमध्येही त्यांचा माल जात असे. जिल्हा पातळीवरील शेतकी प्रदर्शनात अनेक पारितोषिके त्या मालाला मिळत असत. बळवंतरावांना अन्यायाची चीड होती. कणखर व करारी स्वभाव असूनही गोरगरिबांसाठी ते तितकेच कनवाळू होते. गरजूंना प्रसंगी आपल्या घरी आश्रयही देत. दारी आलेला याचक कधीही विन्मुख होऊन परत जात नसे. आपल्या वृद्धावस्थेत त्यांनी केवळ अध्यात्मिक मार्ग स्वीकारला. धार्मिक ग्रंथांचे वाचन व नामस्मरण करीत, रोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचे आपल्या खड्या आवाजात पारायण होत असे. वयाच्या 82 व्या वर्षी पाच फेब्रुवारी 1966 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
सो.क्ष समाजोन्नती संघाचा एक संस्थापक ,समाजांतील दिशादर्शक, आदर्श शेतकरी म्हणून त्यांचे स्थान खूप मोठे आहे .”
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ! शेतीमध्ये बियाणे ही मुलभूत बाब असून तो शेतीचा आत्मा आहे. बळवंतराव वर्तक सारख्या आदर्श शेतकरी व दूरदृष्टीच्या समाजसेवकाचे रक्त अंगात असलेल्या चिंतामणराव बळवंत वर्तक यांचे अंगी पित्याची ही वैशिष्ट्ये ,जन्मजात अंगात नसती तरच आश्चर्य!
1920 सालच्या संघ स्थापने आधीपासून, त्यांच्या पिताश्रींनी ज्या धुरंधर दिग्गजांना साथ दिली, त्या अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी, यासारख्या समाज धुरणांचे सान्निध्य त्यांना बालपणी मिळाले. पुढील कालात, समाजाचे दुसरे धुरीण व तत्कालीन महाराष्ट्राच्या राजकारणातील, मोठे व्यक्तिमत्व श्री. भाऊसाहेब वर्तक यांचे नेतृत्व त्यांना मिळाले. या सर्वांचा परिपाक अण्णांनीदेखील आपल्या आयुष्यात आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे ध्येय निश्चित ठरविले. अण्णांचा मार्ग खूप खडतर होता. स्थापित समाजसंघ सुस्थापित करावयाचा होता. केंद्रबिंदू दादर येथील वर्तक स्मारक मंदिरात होते. तेथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू झाले होते. उत्पन्नाचे साधन म्हणून तेथील हाॅल मध्ये, लग्न ,समारंभ, सभा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजनातून चांगले उत्पन्न मिळू लागले होते. आमच्या समाजाच्याही अनेक चळवळींचे केंद्र अण्णासाहेब स्मारक मंदिर झाले होते. सो क्ष संघ फंड ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त म्हणून अण्णांना दादरला येणे जरुरीचे होते . मुख्य विश्वस्त जरी भाऊसाहेब वर्तक असले तरी भाऊसाहेबांच्या राजकीय कार्यबाहुल्यामुळे, कामाचा मोठा भार कार्यकारी विश्वस्त अण्णांवर असे. सुदैवाने त्यावेळी त्यांचे सहकारी विश्वस्त दादासाहेब ठाकूर, मामासाहेब ठाकूर, भाई राऊत यांच्यामुळे अण्णांचे काम थोडे हलके होई. त्या दिवसात अण्णा आठवड्यातून एकदातरी केळवे माहीमहून दादरला येत. ही मंडळीदेखील दादरला हजर असे. मामासाहेब तर अण्णांचे अनुपस्थितीत देखील आमचे वसतिगृहावर अधून मधून फेरी मारून चौकशी करीत. काही अडचणी असल्यास त्यांचे निराकरण करीत. अण्णांचा भार तेवढाच हलका होई. मात्र मुख्य काम हे ट्रस्टचे आर्थिक व्यवहार सांभाळणे, व्यवस्थित लिखाण टिपण ठेवणे व वर्षाअखेर, आर्थिक जमा- खर्च व्यवहाराचा ताळेबंद मांडून तो हिशोब तपासनीसाकडून तपासून घेऊन, संघाचे वार्षिक सभेत मांडून, मंजूर करून घेणे व शेवटी धर्मदाय आयुक्त यांचे कार्यालयात सादर करणे, हे असे. त्या कामासाठी, अण्णांशिवाय इतर कोणीताही पर्याय त्यावेळी नव्हता. अण्णांनी हे काम किती चोखपणे केले त्याचा एक साक्षिदार मी आहे. सामाजिक वा सार्वजनिक कामाचे आर्थिक व्यवहार नुसते ताळेबंद आणि जमाखर्च मांडून ,ऑडिटर कडून मंजूर करून घ्यावयाचे नसतात. ते व्यवहार अत्यंत चोख आणि सचोटीचे आहेत हे आपल्या स्वतःच्या व सहकाऱ्यांच्या निःस्पृह वागण्याने सिद्ध करावयाचे असते. अण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या काळी असे काम केले. लोकांना समाजबांधवांना ते आवडले, भावले.. याचा मी एक लहान साक्षीदार आहे. अण्णांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनातील सचोटी व सच्चाई चे प्रशस्तीपत्रक त्यातच आहे. त्याच्या एक दोन आठवणी पुढे सांगेन.
अण्णा, मामा, दादा, भाई या माझ्या पाहण्यात आलेल्या तत्कालीन समाज नेत्यांचे वागणे किती आदर्श होते ह्याची अनेक उदाहरण मी देईन. पण अगदी साध्या गोष्टीत देखील ही मंडळी किती काटेकोर असत याचे ही एक उदाहरण देतो. त्यावेळी नुकताच आमच्या वस्तीगृहात लँडलाईन फोन आला होता. विद्यार्थ्यासाठी प्रत्येक कॉल मागे एक रुपया दर आम्ही ठेवला होता. ही मंडळी ज्यावेळी स्मारक मंदिरात येत व कोणत्याही कारणासाठी फोन केला, अगदी आमच्या संघकामासाठी सुद्धा, तरी रजिस्टर पुस्तकात नोंद करून न चुकता एक रुपया कॅशबॉक्समध्ये टाकत असत. गोष्ट साधी आहे पण आमच्या नेत्यांच्या नियती बाबत खूप खूप काही सांगून जाते !
सन 1967 साली आमचे पहिले रेक्टर व स्मारक मंदिराचे व्यवस्थापक श्री. मधुकर ठाकूर (आत्ता डॉ.मधुकर ठाकूर ,अमेरिका),यांना परदेशी जाण्याचा योग आल्याने त्यांनी ते काम सोडले. त्यांच्या जागी माझी नेमणूक विश्वस्त मंडळाने केली. डॉ. ठाकूर यांनी सुरुवातीची दोन-तीन वर्षे अत्यंत चोखपणे ,अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम करून, काही सुंदर प्रथा व नियमावली निर्माण केल्याने माझे काम खूप सोपे झाले होते. तरी दिवसेंदिवस आर्थिक उत्पन्न व बरोबर कामाचा व्याप ही वाढत होता., वसतिगृहातील मुलांची संख्या व व्यवस्थेचा ताण वाढत होता. त्या दिवसात वसतीगृह रेक्टरला, स्मारक मंदिराचा व्यवस्थापक म्हणूनही मला काम करावे लागले .माझ्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात , ‘स्मारकमंदिर व्यवस्थापक’, हे पद निर्माण केले गेले. श्री पांडुरंग भाऊराव पाटील हे स्मारक मंदिराचे पहिले व्यवस्थापक.. आजतागायत हीच परंपरा सुरू आहे. श्री दिलीप पाटील हे आजघडीला, स्मारकमंदिर व संघ फंड ट्रस्टचे व्यवस्थापक म्हणून उत्तम प्रकारे काम पाहतात.
माझ्या ‘वसतिगृह रेक्टर’,कालखंडात ,अण्णा कार्यकारी विश्वस्त असतानाच, स्मारक मंदिर भोजनालयाची व्यवस्था सुरू झाली. सकाळचा नाश्ता, सकाळ संध्याकाळचे जेवण ,या सोयीमुळे विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी मोकळा वेळ मिळू लागला. मोठी सोय झाली. सकाळी उठून, या सर्व कामाची आखणी करून भोजनालय व त्या दिवशीच्या हॉलच्या कामाची सूचना संबंधितांना देऊन सकाळी 9 वाजता मी U D C T मध्ये माझ्या अभ्यासासाठी निघून जाई. येथून सुमारे सहा वाजता वसतिगृहावर परत येऊन झालेल्या कामाचा आढावा घेऊन हिशोबाचे कच्चे लिखाण टिपण करून, रात्री दहा वाजता वसतिगृहातील प्रत्येक खोलीत माझी भेट होत असे. विद्यार्थ्यांच्या काही अडचणींचा आढावा व वसतिगृह शिस्तीच्या पालनाची खात्री करूनच मी माझ्या खोलीवर परत येत असे. त्यानंतर रात्री 11 ते 12 आमच्या स्मारक मंदिरात समोरील नाईट स्कूल मध्ये एक तास शास्त्र व गणित शिकवण्याचे काम करी. माझ्या आर्थिक नियोजनासाठी हे काम करावे लागे. झोपण्यास रात्री बारा ,साडेबारा वाजत. ते दिवसच असे मंतरलेले होते. थकवा जाणवणे ऐवजी एक प्रकारची मस्ती अंगात असे. आयुष्याचा एक मजा मी घेत असे. अण्णांचे मार्गदर्शन, पूर्ण सहाय्य व उत्तेजन अभ्यास सांभाळून, कामाचे ओझे मी सहन करु शकलो.
स्मारक मंदिरातील हॉलचे दैनंदिन बुकिंग, पैशांचा बँकेत भरणा, अनामत रकमेचा परतावा, वसतीगृह विद्यार्थ्यांची फी, भोजनालयाचे आर्थिक व्यवहार, स्मारक मंदिर व वसतिगृहातील कर्मचारी वर्गाचे पगार, अशा आर्थिक व तत्सम व्यवस्थापकीय बाजूंची जबाबदारी मी घेत असे. रोजच्या जमाखर्चाचा कच्चा आराखडा मी लिहून ठेवीत असे. मात्र या सर्व व्यवहाराचा, ‘अकाउंटिंग’,च्या दृष्टिकोनातून लेखाजोगा ठेवणे मला शक्य नव्हते. जमले ही नसते. अण्णा आठवड्यातील आपल्या फेरीत हे तंत्रशुद्ध काम करीत असत. त्यावेळी मात्र मला कॉलेजांतून संध्याकाळी सहा वाजता आल्यावर काही वेळ त्यांचेबरोबर बसावे लागे. त्यांचे समाधान करावे लागे. सर्व जमाखर्चाचा ताळेबंद व्यवस्थित मांडून, हिशोब पुस्तकांतील जमा व कॅश बॉक्स मधील प्रत्यक्ष जमा यांचा संपूर्ण ताळेबंद झाल्याशिवाय अण्णा कधीही स्मारक मंदिरातील कार्यालय सोडीत नसत. त्यासाठी कधी कधी जेवणाची वेळही टळून गेलेली असे. नऊ वाजल्यानंतर त्यावेळी दादरमधील उपहारगृहे बंद होत व अण्णा दादरला कामासाठी आल्यास कोणाकडेही जेवणास जात नसत. मला वाटते ते त्या दिवशी उपाशी राहत असावेत. साधारणतः नऊ वाजता आम्ही दोघे दादर मधील रानडे रोड वरील, “छाया रेस्टॉरंटमध्ये”, राईस प्लेट खात असू. तेथेही अण्णांचा नियम स्पष्ट होता. दोघांनीही आपापले पैसे काऊंटरवर देणे ठरलेले असे. मला कधीही अण्णांनी त्यांचे बिल भरू दिले नाही. ट्रस्ट कडून जेवणभत्ता घेणे तर खूपच दूर. त्यानंतर ते डॉ. गजाननराव पाटील यांचे दादर येथीलच निवासस्थानी वस्तीसाठी जात. अण्णा काम जास्त असेल तरच मुंबईत मुक्काम करीत, बहुधा रात्रीच्या काठीयावाड एक्सप्रेसने ते पालघरला रवाना होत.
सकाळपासून हिशोब तपासणी व इतर व्यवस्थापकीय कामे कार्यालयात चालू असताना अण्णांना दोन गोष्टींची गरज भासे. एक म्हणजे त्यांचे ठराविक विडापान (खायची पानपट्टी) व अधून-मधून गरम चहाचा कप. आमचा पदम बहादुर गुरखा या दोन गोष्टींच्या बाबतीत अतिशय तत्परतेने सेवा पुरवी. अण्णांच्या खास पानपट्टीचा फार्म्यूला व चहातील साखरेचा अंदाज बरोबर होता. कोणत्या वेळी काय द्यावे हेही त्याला अवगत होते. त्यामुळे तो अगदी लक्षपूर्वक ही रसद अण्णांना दिवसभर पुरवीत असे. अण्णांवर त्याचा जीव व आदरयुक्त भक्ती. अण्णाही त्याला नाखूष करीत नसत. जाताना गुपचूप काहीतरी हातात एखादी नोट सरकवून जात. डॉ. ठाकूर व मी त्याचे निर्व्याज्य प्रेम खूप अनुभवले. वसतिगृहातील मुलांना व स्मारक मंदिरात कोणास भोजन करण्याची परवानगी नव्हती. मात्र हा आमचा पदम बहादुर त्याला अपवाद होता. स्मारक मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात, उजव्या बाजूकडील जिन्याच्या पायऱ्याखाली, (आजही तो एक मोकळा बोळ आहे), सपत्नीक राहून, आपले शाकाहारी, मांसाहारी जेवण शिजवीत असे. त्याचा दरवळ, संबंध परिसरात, अगदी वरच्या मजल्यापर्यंत जात असे. जोपर्यंत आमच्या वसतीगृहात भोजनाची सोय नव्हती, आमच्याही जिव्हा चाळवल्या जात. कधीकधी हा भाबडा गुरखा, त्याने बनवलेल्या, ‘गोरखाली मटणडीश’मधील एक वाटी प्रेमाने मलाआणून देत असे. मी देखिल संकोचून, गुपचूप ऑफिसमध्येच फस्त करीत असे. त्या नेपाळी भोजनाची चव आधीही जिभेवर आहे.. त्यात पदम बहादुरचे प्रेमही मिसळलेले होते..
पदम बहादुरचे नाव आले आहे तर,त्याचे बद्दल ही दोन ओळी.
हा नेपाळी गोरखा नावाप्रमाणेच बहाद्दूर होता. भारतीय लष्करात स्वातंत्र्यपूर्व काळात काम केल्याने लष्करी बाणा व लष्करी शिस्त त्याच्या रक्तात पुरेपूर उतरली होती. भारताच्या फाळणी कालातील ,हिंदूवरील अनन्वित अत्याचाराच्या अनेक हृदयस्पर्शी कहाण्या तो सांगे. त्या दिवसात, वर्तक स्मारक मंदिरात शेजारील वस्तीत काही समाजकंटकांचे प्राबल्य होते. असेच एकदा काही गुंड वस्तीगृहाच्या कंपाउंडमध्ये येऊन बाथरूम टॉयलेट वापरण्यासंबंधी दादागिरी करू लागले . पदम बहादुरने, दोन गुंडांच्या कॉलरला पकडून गेट बाहेर घालवले. आपली कुकरी( धारदार हत्यार),दाखवून त्यांना एवढेच बजावले,” पुढच्या वेळी आपण असे,आमच्या कंपाउंडमध्ये याला, तर ही माझी कुकरी तुमच्याशी बोलेल. तिला बोलते केले तर रक्ताचा नैवेद्य मला द्यावा लागतो” गुंडांना ही भाषा कळली. पुढे कोणीही अनधिकृत व्यक्ती आमच्या स्मारक मंदिराचे परिसरात येऊ धजावली नाही. अण्णांच्या आठवणी लिहितांना, पदम बहादुर अनिवार्य आहे. दोघांचेही एकमेकांवर निरतिशय प्रेम. तेथे अधिकार, सामाजिक स्थान, याला महत्व नव्हते. होते ते केवळ निर्व्याज्य प्रेम..
मी वस्तीगृह रेक्टर म्हणून काम सोडल्यानंतर वर्षभरातच पदम बहाद्दूरही नेपाळला निघून गेला. माझ्या व्यावसायिक कामासाठी नेपाळमध्ये, काठमांडू, ललितपूर, चितवन, पोखरा येथे फिरत असताना,माझे भाबडे मन उगाच, कोठेतरी पदम बहाद्दूरला शोधत होते…पण तो तेथे भेटला नाही व यापुढेही तो कधी भेटेल असे वाटत नाही. मात्र त्याच्या आठवणी, आम्ही तत्कालीन सर्व वसतिगृहवासीय अंतकरणात साठवून आहोत. आमच्या तत्कालीन, “वसतिगृह ग्रुप फोटो”,मध्ये पदम बहादूर आहे. त्यातीलच त्याची छबी मी या लेखात मुद्दाम दिली आहे.
त्याच्या सचोटीची आम्ही अनुभवलेली एक गोष्ट पुढे प्रसंगानुरूप दिली आहे. अण्णांना त्यांच्या स्मारक मंदिरातील या प्रदीर्घ व किचकट कामात बहादुरची साथ मोलाची होती. अण्णा ऑफिसमध्ये ज्या दिवशी येत, त्या दिवशी पदम बहादुर खास आपल्या मिलिटरी वेशात, रुबाबात वावरत असे. व अण्णांसाठी काय करू काय नको असे त्याला होई. अण्णांच्या कौटुंबिक व वैयक्तिक जीवनाबद्दल मला जास्त माहिती नव्हती. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी आम्ही सहसा बोलत नसू. कन्या आशाताईंनी आपल्या पिताजी बद्दल जे सांगितले ते असे..
” आमच्या अण्णांचा जन्म 21 जुलै 1916 रोजी, एडवण, तालुका पालघर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. प्राथमिक शिक्षण माहीम गावी झाल्यानंतर, त्यावेळेचे किंग जॉर्ज हायस्कूल ,आत्ताचे राजा शिवाजी विद्यालय ,दादर हिंदू कॉलनी येथे माध्यमिक शिक्षण झाले. पिताश्री स्व. बळवंतराव वर्तक हे स्वतः एक निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते व उत्तम शेतकरी असल्याने शिक्षणाची आवड प्रथमपासूनच होती. वडिलांपासून मिळालेल्या सामाजीक व शैक्षणिक वारशामुळेच, सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या स्थापनेनंतर, समाजकार्यात ते अग्रभागी होते. वडिलांपासून मिळालेले समाजसेवेचे बाळकडू व अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी, अशा समाज धुरणांच्या, आमच्या घरी होणाऱ्या विचारविनिमय व चर्चा कानावर येत. त्यामुळे समाजसेवेचा त्यांनी लहानपणीच ध्यास घेतला होता.
भाऊसाहेब वर्तक हे त्यांचे नेते, तर मामासाहेब ठाकूर भालचंद्र राऊत, दादासाहेब ठाकूर शांतारामजी पाटील , ही आपल्या समाजातील मान्यवर मंडळी त्यांचे साथीदार होती. त्याकाळी दळणवळणाची पुरेशी साधने नसतानाही माहीम येथून सकाळच्या फ्लाईंग राणीने निघून दादरला जात असत. रात्री शेवटची काठीयावाड एक्सप्रेस पकडून घरी परतत असत. घेतलेले काम पूर्ण करण्याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असे. हिशोबातील अल्पशी चूकदेखील त्यांना स्वस्थ बसू देत नसे. संघाचे सर्व व्यवहार चोख असत. कधी घरीदेखील हिशोबाची कामे करीत बसत. संघाचे चिटणीस, उपाध्यक्ष, अध्यक्ष, विश्वस्त, कार्यकारी विश्वस्त, मुख्य विश्वस्त, अशा अनेक पदावर, अनेक वर्षे त्यांनी सातत्याने कामे केली आहेत. संघाच्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाचे वेळी अण्णा ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त होते . पुढे हीरक महोत्सवी अधिवेशनाचे कालांत त्यांनी संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहावर ही त्यांची विश्वस्त म्हणून देखरेख असे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत. लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम उभारणीमध्येही ते अग्रभागी होते .सो क्ष स संघाच्या वाटचालीमध्ये एकुणच अण्णांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.”
अण्णांच्या आपल्या माहीम गावातील कार्याबद्दल सांगताना आशाताई म्हणतात, “आमच्या माहीम गावाच्या विकासातही अण्णा मागे राहिले नाहीत. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी अण्णांनी माहीम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्रे हाती घेतली. माहीम मल्टीपर्पज सोसायटीकडे असलेली भाजीपाला मार्केटची मालकी ग्रामपंचायतीकडे आणली. हे कार्य दिशादर्शक व पुरोगामी विचारसरणीचे ठरले. 1952 साली, अण्णा ठाणे जिल्हा लोकल बोर्डावर निवडून आले. तेथे स्थायी समिती सारख्या महत्त्वाच्या समितीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या काळात, हरणवाळी,या मागासभागासाठी रस्ता बांधण्याचे महत्त्वाचे काम अण्णांनी पूर्ण केले.1955 साली, चालू असलेल्या मुंबई संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अण्णांचा सहभाग होता. पालघर तालुका काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, जिल्हा काँग्रेसचे चिटणीस, इत्यादी महत्त्वाची पदे त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळली. 1958 नंतर माहीम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर संचालक सभापती, इत्यादी पदावर काम करीत असताना, त्यांचे कारकिर्दीत भात गिरणी सुरू करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. स्थानिक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर झाली. त्यांच्या कारकिर्दीत या संस्थेची मोठी भरभराट झाली. हे कार्य दैदिप्यमान, व समाजोपयोगी ठरले. जिल्ह्यातर्फे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांचे शैक्षणिक कार्यही बहुमोल होते.19 44 साली स्थापन झालेल्या, ‘माहीम शिक्षण संस्थेत’, ही अण्णा अग्रभागी होते. त्या संस्थेत अनेक वर्षे मानद सचिव, उपाध्यक्ष, अध्यक्ष ,विश्वस्त अखेरपर्यंत मुख्य विश्वस्त पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तंत्र विद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, आई टी आय उभारणी त्यांच्या कार्यकाळातच झाली. अण्णांच्या या भरीव योगदानाला मानवंदना म्हणून ,सोसायटीने आपल्या शिक्षण संकुलास ,”कै.चिंतामणराव ब.वर्तक शिक्षण संकुल” असे नाव दिले आहे.सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाचे ते एक संस्थापक चिटणीस होते. संस्थेचे कार्यवाहक पद अनेक वर्षे सांभाळले. व्यंकटेश मंदिर ट्रस्ट, महिकावती पान विक्रेता कंपनी, ज्ञान मंदिर ट्रस्ट, अशा अनेक लोकोपयोगी संस्थांच्या उभारणीत त्यांनी योगदान दिले होते. श्री महालक्ष्मी आदिवासी सहकारी मिठागर सुरू करण्यामध्ये, स्वर्गीय जनार्दन पांडुरंग राऊत यांना मोलाचे सहकार्य अण्णांनी दिले. सो क्ष संघाचे काम करीत असतानाच अण्णांनी आपले गाव, आपला तालुका, जिल्हा व सर्वच परिसराकडे एक कुटुंब म्हणून पाहिले. व त्यांच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. अण्णांचे आपल्या गावक-या वरील प्रेम व गावकर्यांचे अण्णा वरील प्रेम केवळ अजोड! गावातील कोणत्याही कौटुंबिक कलहाचे निराकरण करण्यासाठी अण्णांना बोलाविले जाई व त्यांचा निर्णय मान्य होई. हीच त्यांच्यावरील गावकऱ्यांच्या प्रेमाची पावती !
” खादीचे शुभ्र धोतर, झब्बा ,टोपी असा साधा नीटनेटका पेहराव असणारे आमचे अण्णा विविध विषयांचे गाढे अभ्यासक होते. व्यवहार व कर्तव्य यांची योग्य सांगड घालणारे ते एक कुशल प्रशासक आदर्श कुटुंब प्रमुख, समाजसेवक, कुशल राजकारणी, अभ्यासू शेतकरी व सर्वांसाठी एक आदरणीय असे व्यक्तिमत्त्व होते!”
अण्णांच्या कन्येने, आपल्या पिताजीबद्दल केलेले हे समर्पक व मोजक्या शब्दातील वर्णन वाचल्यानंतर, कोणालाही अचंबा वाटल्याशिवाय राहणार नाही. जीवनाच्या इतक्या विविध क्षेत्रात ,एकाच वेळी, समरसतेने काम करून, प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे व एवढ्या उलाढाली करीत असताना सचोटी व निस्पृहता न सोडता, विशिष्ट आर्थिक व्यवहारात जराही शंकेला वाव न देता, अखेरपर्यंत कार्यरत राहणाऱ्या अण्णांच्या विविधांगी कार्याचा आलेख पाहिल्यानंतर, कोणाचाही, त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणीत झाल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः त्यांचे, आमचा संघ व ट्रस्ट उभारणीतील कार्य, अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्याविषयी वाटणारा आदर आज वृद्धिंगत झाला आहे . समाजसेवा, राजकारण, शिक्षण क्षेत्र, सहकार,आरोग्य क्षेत्र आपला पिढीजात शेतीचा धंदा , अण्णांनी सर्व क्षेत्रात लिलया वावर केला. आपल्या कामाचा ठसा उमटविला .खरोखर हे अफाट आहे !!
कन्येने सांगितलेल्या अण्णांच्या “घेतलेले काम पूर्ण तडीस नेणे व त्यात जराही चूक न होऊ देणे”, या स्वभाववैशिष्ट्याचा, मला आलेला प्रत्यय मी येथे मुद्दाम सांगत आहे…
मराठी संत साहित्यात, श्रद्धा व एकाग्रता याचं मूर्तीमंत प्रतीक म्हणून संत एकनाथ गणले जातात. गुरुजींनी दिलेले हिशोब तपासणीचे काम रात्री करीत बसले असताना एक पैशाची चूक सापडली नाही म्हणून रात्रभर जागरण करणारे व ती चूक सापडल्यावर आनंदाने टाळ्या वाजून नाचणारे संत एकनाथ आम्ही कधी पाहिले नाही..मात्र ही कथा अजरामर झाली आहे. चिंतामणराव वर्तक या आमच्या कार्यकारी देशवासीयांना, माझे हिशोब तपासत असताना, जमाखर्चातील शिलकेपेक्षा, प्रत्यक्षात, पन्नास रुपये अधिक मिळाले. खरेतर पैसे जास्त असल्यावर त्याची जुळवणी करणे एवढे कठीण नव्हते. मात्र ते चिंतामणअण्णा होते. प्रत्येक काम चोख व अचूक असले पाहिजे हा त्यांचा खाक्या. त्या हिशोबाचा ताळेबंद अण्णा रात्री बारा वाजेपर्यंत तपासत बसले. हॉटेलमध्ये जेवण्याची वेळ निघून गेली. शेवटी चुकीचा छडा लागला. आम्ही दोघेही हसत हसत उपाशी झोपी गेलो. झाले असे होते, आमचा पदम बहादुर गुरखा, लग्नसमारंभातील आमच्याकडून दिल्या जाणाऱ्या खुर्च्या, डेकोरेशन सामान, वीज कनेक्शन, इत्यादी सुविधांवर देखरेख करीत असे. बहुदा त्याला व-हाडी मंडळी, छान पैकी जेवण देत. मात्र एके दिवशी प्रथमच एका पार्टीने त्याला पन्नास रुपयाची भेट दिली. अशा गोष्टींना पदम बहादुर सरावलेला नव्हता. ते पैसे आपल्या खिशात ठेवण्याऐवजी, आमच्या कॅश बॉक्स मध्ये ठेवून दिले. संध्याकाळी मला हिशोब देताना हे सांगावयास विसरला. मीदेखील रक्कम जमा केली. परंतु या जमा रकमेचा तपशील लिहण्यास विसरलो. बहुतेक काम परस्परांवरील विश्वासावर चाले. आम्ही उशिरापर्यंत खर्डेघाशी करीत बसलेले, जेवणाची वेळ टळून गेलेली, आमच्या पदम बहादुरने पाहिले. तो कार्यालयात आला. जास्त पन्नास रुपयाचा हिशोब लागत नाही असे मी सांगितल्यावर,सहज हसत हसत ,”अरे शाब ,वो दिन मेरे को एक पार्टी ने पचाश रूपीया बक्षीश दिया था,वो पैशा मैने बक्क्षेमे ही रख्खा, आपको बोलना भूल गया..”
त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे की अनवधानाचा राग मानावा हे मला व अणांना त्यावेळी कळले नाही…चूक सापडली याचा अण्णाना आनंद, अण्णा खुश झाले म्हणून मला आनंद, आपण किती प्रामाणिकपणे काम केले , याचा पदम बहादुरला आनंद ..असा त्या रात्री आनंदी आनंद होता! अण्णांच्या सचोटी, चोख व्यवहाराची ती झलक मी आज पावेतो विसरलो नाही, कधी विसरणार नाही ! मी पाहिलेला तो “हिशोबी एकनाथ”, माझ्या कायमचा स्मरणात आहे. त्याचे दर्शन सर्वांना व्हावे म्हणून ही मुद्दाम आठवण!
त्यावेळी सर्व कारभार असा विश्वासावर चालत होता. समाज कार्यकर्ते तर सोडा पण समाजाच्या सेवेतील एक सामान्य सुरक्षारक्षक देखील एवढी सचोटी दाखवत होता. म्हणून तर अशा संस्था उभ्या राहतात, मोठ्या होतात, मान्यता पावतात !!
मी स्मारक मंदिरात, पू. तात्यासाहेब चुरी वसतिगृहात विद्यार्थी व नंतर व्यवस्थापक म्हणून आल्यानंतर अण्णांची माझी प्रत्यक्ष ओळख व त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.त्या आधीही मी बोर्डीत असताना देखील अण्णांबद्दल ऐकले होते. शाळेत असताना त्यांच्या घरीही जाऊन आलो होतो. अण्णांना भेटल्याचे आठवत नाही. त्यांचे माहिमचे घरी लहानपणी जाण्याचे कारण म्हणजे आमची मालती मामी, म्हणजे भाई मामांची धर्मपत्नी. ही अण्णांची सख्खी बहीण. तिचे माहेरचे नाव रंगुताई. व त्यामुळे ,लग्नकार्य वगैरे निमित्ताने माझी आजी नानी( मालतीमामीची सासू), बरोबर तेथे गेलो होतो. अण्णांचे धाकटे बंधू गणपतराव यांचेशी, बोर्डीत असल्यापासूनच परिचय होता. त्यांची सासुरवाडी बोर्डीची. पत्नी सौ. प्रतिभा ही आमच्या जयदेव मामाचीच मोठी बहीण. ते कुटुंब ही त्या वेळी आमच्या भाईमामांच्या शेजारी, ‘मोठ्या घरात’, रहात असे. गणपतराव आपल्या सासुरवाडीस आले की मोठ्या घरात त्यांच्याशी संवाद होई. अण्णांचा चिरंजीव धनंजय उर्फ राजू हा माझा समवयस्क ,बालमित्र. तो लहानपणी दिवाळीत फटाक्यामुळे भाजला होता. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी माझ्या आजीबरोबर मी मुंबईस इस्पितळात गेल्याचे अजूनही आठवते. माझे व राजूचे ही वय त्यावेळेस सुमारे दहा वर्षाचे असावे. स्वच्छ शुभ्र सफेद कपड्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत शरीर गुंडाळलेल्या अवस्थेत, मुंबईतील एक इस्पितळात त्याचे वर वैद्यकीय उपचार चालू होते. लहानपणी पाहिलेले ते दृश्य जसेच्या तसे डोळ्यासमोर येते. तो राजूचा पुनर्जन्मच होता. पुढेही, दादरच्या वस्तीगृहात तो त्याच्या मित्रमंडळीस भेटावयास येत असे, तेव्हा मी भेटत असू बोलत असू.
अण्णांच्या कौटुंबिक परिवाराबद्दल आशाताईंनी दिलेली माहिती अशी,
” अण्णांचे परिवारात त्यांचे आई-वडील,सावत्र आई, काकी,आत्या दोन भावंडे, भाऊ गणपत नाना, बहीण रंगुताई असा मोठा परिवार होता. वडील श्री बळवंतराव यांचे मुलांच्या शिक्षणाबद्दल व संस्काराबद्दल असलेला कटाक्ष याबद्दल मी पूर्वी सांगितलेच आहे.त्यामुळे आपल्या मुलावर शिक्षणाचे योग्य संस्कार व्हावेत चांगले शिक्षण मिळावे म्हणून आपल्या तिन्ही मुलांना,त्यांनी दादर येथे श्री. मोरेश्वर नानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवले होते. त्या काळात दादरच्या हायस्कुलात, श्री मोरो नाना यांचे अचूक मार्गदर्शनाखाली शिक्षण मिळणे मोठा दुर्मिळ योगायोग होता. गणपत नाना व बंधू चिंतामणराव यांचे संबंध अतिशय सलोख्याचे होते. एकत्र कुटुंब असल्याने त्यांच्या मुलांमध्येही कधी दुजाभाव नव्हता. प्रत्येकाच्या इच्छेनुसार आवडीनुसार सर्वांना पदवी व उच्च शिक्षणही मिळाले. समाज कार्याबरोबर शेती बागायतीकडेही अण्णांचे लक्ष असे. अण्णा वयाचे 91 व्या वर्षापर्यंत सुखासमाधानाचे व आरोग्यसंपन्न जीवन जगले.”
“अण्णांच्या सुविद्य पत्नी सुशीलाबाई म्हणजे पूर्वाश्रमीची शांता पाटील, शिरगावचे संस्कृत पंडित व आदर्श शिक्षक मोरेश्वर नानाजी पाटील यांची सुकन्या. डॉ. गजानन राव पाटील यांच्या भगिनी. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज हायस्कूल मध्ये इंग्रजी माध्यमातून झाले होते. त्या काळात ही त्यांना मिडलस्कूल व हायस्कूल स्कॉलरशिप मिळाली होती. भरतकाम, विणकाम ,स्विमिंग, वक्तृत्व इत्यादी अनेक कला त्यांना अवगत होत्या. 1942 च्या चले जाव चळवळीतही आमच्या आईचा सहभाग होता. माहीम गावासाठी त्यांचे सामाजिक कार्य चालू होते. 1950 साली, माहीम गावातील महिलांना एकत्र करून महिला मंडळाची स्थापना त्यांनी केली. बालवाडी, आरोग्य केंद्र, सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. फॅमिली प्लॅनिंगचा प्रसारही त्याकाळी आईने केला आहे. आदिवासी महिलांमध्ये आरोग्य व स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली. आमच्या वाडीत कामावर येणार-या महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी आग्रह धरून, प्रसंगी शैक्षणिक साहित्य देऊन स्वतःही शिकविले. आमच्या गावातील मंडळींना आईविषयी खूप आदर होता. घरी प्रथमोपचाराचे साहित्य नेहमी परिपूर्ण असे .प्रसंगी गंभीर दुखापती वर सराईतपणे प्रथम उपचार करी. स्वच्छता, नीटनेटकेपणा हा आईचा स्थायीभाव होता. मुलांचा अभ्यास, शुद्धलेखन, हस्ताक्षर ,शाळा कॉलेज एडमिशन, इत्यादी बाबीकडे आईलाच लक्ष द्यावे लागे. त्या स्वतःसाठी स्त्री मासिक व मुलांसाठी चांदोबा,किशोर इत्यादी मासिके मागवित. शेतीवाडी कडेही त्यांचे लक्ष असे .पानवेलीची वेढणी, शेतावरच्या माणसांसाठी शेतावर राहून त्यांच्या शिदोरीकडे लक्ष देणे, पानाफुलांची लागवड, यात त्यांना खूप रस होता. विशेष म्हणजे आई स्वतःची दैनंदिनी रोज लिहीत असे. गुडघेदुखी व्यतिरिक्त त्यांना दुसरा कोणताही आजार नव्हता. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी आरोग्यसंपन्न जीवन पूर्ण केले.”
अण्णांचे धाकटे बंधू व काका श्री. गणपतराव उर्फ नाना यांच्याविषयी आशाताई म्हणतात,
“आमचे काका, त्यांना आम्ही नाना म्हणत असू, खूप कुशाग्र बुद्धिमत्तेचे, चिकित्सक व अभ्यासू होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण माहीम येथे झाले.माध्यमिक शिक्षण दादर येथील पिंटो व्हीला हायस्कूल मध्ये झाले .ते शेती बागायतीमध्ये पारंगत तर होतेच शिवाय इंजिनिअरिंगचा अभ्यास ही दांडगा होता. ‘उद्यम’ मासिक नेहमी मागवत असत. त्यातील माहिती अभ्यासपूर्वक वाचीत. केळवा माहीम गावातील कोणाच्याही वाडीतील मोटर पंप किंवा मोटर सायकल नादुरुस्त झाल्यास नानांना बोलावणे जाई. ते स्वतः मशीन खोलून दुरुस्त करीत. त्यांनी स्वतः छोटा ट्रांजिस्टर ,हेडफोन त्या काळी बनवला होता. आमचे आजोबा तो हेडफोन कानाला लावून रोज आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकत असत. पन्नास वर्षापूर्वी नानांनी,त्यांच्या संपूर्ण घराच्या कौलावरून पडणारे पावसाचे पाणी, जोडणी करून, डायरेक्ट घराच्या मागील विहिरीत सोडले होते. त्यामुळे आमच्या विहिरीच्या मचूळ पाण्याची चव खूप सुधारली व उन्हाळ्यात ही आम्हाला पाण्याची चणचण भासत नसे. ‘पाणी जिरवा,पाणी वाचवा’, या तत्त्वाचे पालन नानांनी त्या काळात करून दाखवले होते. ते वयाच्या 95 व्या वर्षापर्यंत आरोग्यसंपन्न जीवन जगले.”
“नानांची धर्मपत्नी, श्रीमती प्रतिभा ही बोर्डीची माहेरवाशीण. श्री गोविंद पाटील यांची सुकन्या. त्या लग्नापूर्वी शिक्षिका होत्या. संगीत व वाचनाची आवड होती. वर्तक कुटुंबामध्ये सर्व लहान थोर मंडळी,नातेवाईक यांची नेहमी वर्दळ असे. या सर्वांचा योग्य आदर सन्मान करून त्या घरात वातावरण आनंदी ठेवीत.सर्वांची योग्य काळजी घेत असत.”
“अण्णांची बहीण रंगुताई अतिशय शांत, सोज्वळ व प्रेमळ. त्यांचे प्राथमिक शिक्षण माहीम येथे झाले .माध्यमिक शिक्षण दादरला मुलींच्या छबिलदास हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा विवाह बोर्डाचे भालचंद्र लक्ष्मण चुरी यांच्याशी झाला. पती भालचंद्र ऊर्फ भाई बॉम्बे म्युनिसिपल कारपोरेशन मध्ये नोकरीस होते. त्यांचा स्वभावही प्रेमळ, खेळकर होता. मित्र परिवारही मोठा होता.बोर्डीचे डॉ.दीनानाथ चुरी, यांचे थोरले बंधू लक्ष्मणराव चुरी यांच्या त्या स्नुषा. रंगु ताईंनी,त्यांच्या सासरचे नाव मालती, स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने सासरच्या नातेवाईकांना आपलेसे केले होते. स्वच्छता,निटनेटकेपणा,काटकसर हा त्यांचा स्वभावच होता.त्यांची पुतणी शारदाताई, हिरु माहीमला घरी येत असत. भाची चारुला त्यांनी आपली मुलगी मानले होते. त्यांची मुले मंदा, किरण, अरुण हे सुखी, समाधानी,आनंदी जीवन जगत आहेत. शिक्षण पूर्ण करून आपापल्या क्षेत्रांमध्ये चांगले नाव करीत आहेत. नातवंड मार्गी लागली आहेत .वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.”
एवढ्या या व्यापक परिवाराचा, समर्पक शब्दात परिचय आशाताईंनी दिला. एवढा पसारा असूनही सर्व जण एकत्र कुटुंबात रहात असून भावा भावांतील, सख्या-चुलत भावंडातील सामंजस्य कधीही कमी झाले नाही. अण्णांच्या पत्नी सुशीला बाई यांचे मला विशेष कौतुक वाटते. त्याकाळी मुंबईत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेली, शालेय जीवनात मेरिट स्कॉलरशिपस् मिळवून अभ्यासाव्यतिरिक्त,अनेक कलांमध्ये प्रावीण्य मिळविणारी, शहरात वाढलेली ही मुलगी, माहीमसारख्या खेडे गावातील एका शेतकरी कुटुंबात येऊन सर्व परिवाराला आपलेसे करते, गावाला नेतृत्व देते, भोवताली असलेल्या अज्ञानी, अशिक्षित समाजासाठीही योगदान देते, ही गोष्ट खूप मोठी वाटते! सुशीलाताईंना उच्च शिक्षणाची संधी मिळती, तर निश्चितपणे त्यांनी शिक्षणक्षेत्रातही चमक दाखविली असती.
“प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक कर्तुत्ववान स्त्री असते” या सर्वपरिचित वचनाची प्रचिती, अण्णा -सुशीलाताई या उभयतांच्या संसारी जीवनातून येते. ताईंचे कर्तुत्व तेथेही अधोरेखित होते. त्यांच्या माहेरातच उच्चशिक्षण व बुद्धिमत्तेचा मोठा वारसा होता. त्यांचे सर्व बंधू व भगिनी त्याकाळी आमच्या समाजात अत्यंत उच्च शिक्षित व कर्तृत्ववान म्हणून वाखाणले गेले आहेत.
अण्णांच्या स्वतःच्या परिवारात, पांच मुली, जावई व दोन मुलगे- सुना. आज अण्णांचे पश्चात हा संसार वृक्ष अधिकच बहरून आला आहे. अण्णा नंतरची दुसरी, तिसरी पिढी आज देशात-परदेशात गगन भरारी घेत आहे. सर्वांविषयी थोडक्यात माहिती करून घेणे मला आवश्यक वाटले. विस्तार भय लक्षात घेऊनही, ते जरुरी आहे. त्या बाबतीत आशाताईंनी मला मदत केली.
अण्णांचे दोन चिरंजीव धनंजय उर्फ राजू प्रदीप उर्फ छोटू . पाच कन्या सौ. उषाताई अरविंद चौधरी ,सौ. आशाताई रवींद्र पाटील ,डॉक्टर शकुंतला रघुनंदन चुरी, सौ. शशिकला चंद्रकांत ठाकूर व सर्वात लहान हेमलता विजय सावे.
धनंजय हा शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर होता. उद्योग धंदा व शेती यात त्याने आपले करियर केले. छोटू शिक्षणाने बीएससी ऍग्री. प्रयोगशील शेतकरी. राजूचा मुलगा, वैभव मेकॅनिकल इंजिनियर. शेतीबरोबरच स्वतःचा व्यवसाय करतो. समाज कार्य करतो. पत्नी जाई, M Com. आहे .त्याच्या दोन कन्या दीपा (अमेरिका) व रूपाली उच्चशिक्षित आहेत.
प्रदीपच्या दोन कन्या जानवी व अश्विनी एमएस्सी असून जानवी नोकरी व्यवसाय करते अश्विनी आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून आहे.
दुर्दैवाने आज अण्णांचे दोन्ही चिरंजीव हयात नाहीत. ईश्वरेच्छा बलीयसी, दुसरे काय?
ज्येष्ठ कन्या उषाताई या माहीम हायस्कूल मधून मॅट्रिक व बी ए पदवी घेतलेल्या, प्रथम पदवीधर. त्यांचे खूप कौतुक झाले. यजमान अरविंद चौधरी हे देखील उच्चशिक्षित व प्रसिद्ध सॅन्डोज कंपनीत मॅनेजर पदावर काम करीत होते. अरविंदराव आपल्या व्यवसायाबरोबरच, अनेक सेवाभावी संस्थांशी निगडित होते. त्यांची तिन्ही मुले उच्चशिक्षित असून आपला स्वतःचा व्यवसाय करीत असतात. तीनही सुना उच्च शिक्षण घेऊन, आपल्या गृहसंसारा बरोबरच नोकरी व्यवसायात असतात. त्यांचा नातू अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. नात उत्तम आर्किटेक्ट आहे.
सौ. आशाताई, बीएस्सी बीएड नंतर पंचवीस वर्ष एका विद्यालयात मुख्याध्यापिका म्हणून काम केले त्यांच्या उत्तम योगदानामुळे त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार मिळाला यजमान रवींद्र पाटील एम एस सी, पी.एचडी असून बीए आर सी मध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कामासंबंधी, अनेक शोध निबंध लिहले असून देशपरदेशातील नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. जर्मनीमधील, ‘हान माईटनेर इन्स्टिट्यूट’ मध्ये ते दोन वर्षे विजिटिंग प्रोफेसर म्हणून निमंत्रित होते. समाजसेवेचीआवड असून अनेक सेवाभावी संस्थांशी संलग्न होते. कन्या डॉक्टर शुभदा एम एस सी,पी एचडी असून,”बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन”,ह्यूस्टन, अमेरीका,येथे, संशोधन विभागात काम करतात. त्यांना आपल्या संशोधन कार्याबद्दल अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत .त्यांचे यजमान डाॅ. सुजीत ,M S, Ph D ,ह्यूस्टन युनिव्हर्सिटी,अमेरीका, फार्मसी विभागाचे प्रमुख आहेत. आशा ताई ,रविंद्र यांचे चिरंजीव केदार हे M M S,M S,M I S ,असून अमेरिकास्थित आहेत., Data Scientist,म्हणून काम करतात. सुनबाई अंजली प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि डिझायनर म्हणून काम करीत आहेत.
डाॅ. शकुंतला रघुनंदन चुरी, वैद्यकीय पदवीधर (MBBS,D Ch) असून,एक उत्तम वैद्यक म्हणून बदलापूर व परिसरांत ख्यात आहेत. अण्णा,आईचा समाजसेवेचा वारसा, डॉ. शकुंतला मोठ्या अभिमानाने पुढे नेत आहेत, बदलापूर म्युनिसीपल कार्पोरेशन,अनेक शिक्षण संस्था ,रोटरी क्लब यात त्या हिरिरीने भाग घेत असतात. त्यांच्या सेवेबद्दल अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत. संगीत ,नाट्य या क्षेत्रातही त्यांना रस आहे. पती, रघुनंदन चुरी यांनी यु डी सि टी मधूनच बी एस सी टेक.( परीक्षेत सर्व विभागांतून,विद्यापीठात दुसरा क्रमांक,मुंबई विश्वविद्यालयाची लेन्टिन स्कॉलरशिप ), एम एस सी टेक्, या दोन पदव्या घेतल्या.पुढे लीड्स् या इंग्लंडमधील प्रख्यात युनिव्हर्सिटीत, एम फील ( M Phil)या पदवीचा अभ्यास करून ते भारतात आले.टेक्सटाईल व रसायन तांत्रिकी क्षेत्रात, उच्च पदी कामे करून , कन्सल्टन्सीचा व्यवसाय सुरू केला. अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. विद्यापीठाच्या पदवी ,पदव्युत्तर व डॉक्टरेट परीक्षांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. स्विमिंग पूल डिझायनिंग व वॉटर ट्रीटमेंट या क्षेत्रात त्यांचे विशेष काम आहे. जेष्ठपुत्र नीरज यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग नंतर, अमेरिकेत एम एस केले. इंजीनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,बॅकींग,फायनान्स अशा अनेक क्षेत्रात, जगातील नामवंत कंपन्यांत,उच्च पदावर कामे केल्यानंतर, आपल्या कामाचा ठसा उमटवून, सध्या ते लंडन स्थित, आपला स्वतःचा व्यवसाय करीत असतात. दुसरे चिरंजीव डाॅ. निखिल दंतवैद्यक (डेंटल सर्जन), असून सुरुवातीला काही विख्यात इस्पितळात अनुभव घेतल्यानंतर, सध्या मलाड, मुंबई येथे आपला स्वतःचा व्यवसाय करीत असतात. त्यांनाही नाट्य व कला क्षेत्रात आवड असून, काही टीव्ही सिरीयलस् व फिल्ममध्ये कामे केली आहेत. पारितोषिकेही पटकाविली आहेत. डॉ. निखील यांच्या पत्नी सौ रुपाली, या सुरुवातीला, ‘टाइम्स ऑफ इंडिया’समूहात व्यवस्थापकीय पदावर काम करीत होत्या. सध्या गृहिणी म्हणून कार्यरत आहेत व डॉ. निखील यांना यांच्या दंतवैद्यकीय व्यवसायात मदत करीत असतात.….
सौ. शशिकला चंद्रकांत ठाकूर या जी.डी.आर्ट असून एक उत्तम कला शिक्षिका म्हणून त्यांनी नाव केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळाली. पती श्री.चंद्रकांत ठाकूर हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्यांनी अनेक वर्षे, L&T, ABB, अशा नामांकित परदेशी कंपन्यांत कामे केली. पुढे एक उत्तम सल्लागार म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यांचे चिरंजीव मंदार अमेरिकेतील, ‘वॉलमार्ट’,या जगप्रसिद्ध कंपनीचे H R Manager म्हणून काम पाहतात. मुलगी मानसी, M.Pharm. असून एका परदेशी कंपनीत मॅनेजर आहे.
कनिष्ठ कन्या सौ हेमलता विजय सावे ,या बीएससी असून त्यांनी ॲक्युप्रेशर, ॲक्युपंचर, योगा, शिवणकाम, इत्यादी विविध कला आत्मसात केल्या आहेत. त्याचा लाभ गरजूंना देतात. यजमान विजय सावे हे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांची स्वतःची,” कॉलिटी इंजिनियर्स”, ही कंपनी आहे. आपल्या क्षेत्रात एक कन्सल्टंट म्हणून ही ते निष्णात आहेत. त्यांचे चिरंजीव हिमांशू , IIT चे, इंजिनिअर असून अमेरिकेत, एरोस्पेस इंजिनीअरिंग विषयात त्यांनी Ph D केली. सध्या अमेरिकेतील नासा (NASA),या जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन केंद्रामध्ये ते कार्यरत आहेत. उपग्रहांना लागणारी उपकरणे डिझाईन करणे, उपग्रहांना दैनंदिन सूचना देणे, मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे, इत्यादी संवेदनाशील कामे करतात. त्यांची “सायन्स ऑपरेशन मॅनेजर व ग्रेस फो (GRACE FO)”, या विशेष कार्यासाठी निवड झाली होती. 2018 मध्ये अंतराळ संशोधन केंद्रातर्फे नासातर्फे त्यांना NASA Exceptional Public Service Medal पारितोषिक देऊन सन्मानित केले गेले होते. मुलगी आरती एअरहोस्टेस म्हणून काम करीत होती, सध्या गृहिणी आहे.
अण्णा व सुशीला ताईंचा हा ‘संसारवेलु’ अक्षरशः आज गगनावरी गेला आहे. तिसरी पिढी तर आकाशातील ग्रह ता-यांचा वेध घेऊ लागली आहे. आज अण्णा आणि सुशीलाताई असत्या तर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नसता. मला सर्वांचे खूप खूप कौतुक आहे. विशेष कौतुक हिमांशुचे! आमचा एक ज्ञाती बांधव, वाडवळ, नासाच्या उपग्रहांना आपल्या सूचनेनुसार अंतराळात फिरवितो, हे ऐकून ऊर भरून येतो!!
पुढे 1970 शाली मी वसतिगृह व स्मारक मंदिरही सोडले. विवाहानंतर मला ते सोडणे भागच होते. मात्र सभा समारंभाच्या निमित्ताने माझे दादरला जाणे होत असे. अण्णांची भेट होई. संघाच्या पारितोषिक समिती, वसतिगृह समिती, अशा काही समित्यांमध्ये मी काम करी व संघकार्याशी जोडलेला राही. त्याच वेळी सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ची स्थापना, कै. तात्यासाहेब चुरी,वसतिगृह माजी विद्यार्थी संघ, माझा स्वतःचा व्यवसाय इ. मुळे, संघ कार्यातील सहभाग थोडा कमीच झाला होता. अण्णांशी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चित संपर्क असे.
जेव्हा कधी अण्णा ,मामा,दादा भेटत प्रत्येक वेळी मला समाज कार्यात ही लक्ष असू दे, संपर्क सोडू नकोस,,अशी सूचना नेहमी करीत. त्याच्यामुळे मी निश्चितच थोडेफार योगदान संघ कार्यात देत राहिलो.
2002 साली, सो क्ष संघ फंड ट्रस्ट च्या ,तत्कालीन विश्वस्त मंडळातील, दोन जागा रिकामी झाल्यामुळे ,मी व सौ विजया ताई वर्तक, आम्हा दोघांची निवड, संघ व्यवस्थापक मंडळाने केली. पुढील तीन वर्षे म्हणजे 2005 साला पर्यंत मी ट्रस्टचा विश्वस्त म्हणून काम पाहिले. मुख्य विश्वस्त दामोदर हरी सावे सर व कार्यकारी विश्वस्त डॉ. बळवंतराव पाटील हे होते . ज्या विश्वस्तांच्या खुर्चीवर एकेकाळी माझे मार्गदर्शक व शुभचिंतक, चिंतामणराव वर्तक स्थानापन्न झाले होते, त्या खुर्चीवर बसण्याचा योग आला. मोठी संधी मला मिळाली. निश्चितपणे त्या सन्मानाचे मोठे श्रेय,अण्णांकडे जाते. त्यानंतर मी त्यांना जेव्हा प्रथम भेटलो ,अण्णानी माझे मनापासून कौतुक केले, “तू चांगलेच काम करशील”, असा आशीर्वाद दिला. अण्णा स्वतः 1996 चाली संघ व ट्रस्टच्या कामातून निवृत्त झाले होते. सुखासमाधानाने, गावी ऊर्वरित जीवन व्यतीत करीत होते.
अण्णांनी आपल्या सो क्ष संघ अध्यक्षीय व विश्वस्त म्हणून कार्यकालात अनेक गोष्टी प्रथमतः केल्या. तात्यासाहेब चुरी वस्तीगृहातील भोजनगृह,अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरावर, तात्यासाहेब चुरी वसतिगृहासाठी वाढीव मजला, केळवे येथील लोकनेते अण्णासाहेब वर्तक स्मारक आरोग्यधाम सुरुवात, शेतकरी व समाज बांधवासाठी, भारत दर्शन यात्रा, अशा आहे गोष्टींचा उल्लेख करता येईल.
आरोग्घाम उभारणी व व्यवस्थापनात ,डाॅ. बळवंतराव पाटील, डॉ. सदानंद कवळी, श्री प्रमोद चुरी यांचे योगदान व मौलिक वाटा विसरता येणार नाही . भारत दर्शन यात्रेदरम्यान राजधानी दिल्लीतील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचीही भेट अण्णांसोबत, आमच्या समाज बांधवांनी घेतली. त्यांची क्षणचित्रे या लेखात देण्यात आली आहेत.
2005 पाच ते 2014 असे नवे विश्वस्त मंडळ, श्री प्रमोद चुरी यांचे नेतृत्वाखाली तयार झाले श्री प्रमोद चुरी मुख्य विश्वस्त व मी कार्यकारी विश्वस्त म्हणून नऊ वर्षे काम पाहिले आमचे सोबत कै, सतीश नाना वर्तक,कै. भालचंद्र पाटील, श्री विलास बंधू चोरघे, कै. शांताराम अण्णा पाटील ही सहकारी मंडळी देखील होती. त्यावेळी मात्र मी मुद्दाम हून अण्णांना माहिमचे घरी भेटावयास गेलो. त्यांनी शाबासकी दिली खूप कौतुक केले. “ज्या अप्रेंटिस उमेदवाराला बोट धरून समाज सेवेत आणले, त्याला आपल्या हयातीत, स्वतः भूषविलेल्या, कार्यकारी विश्वस्त पदाचे खुर्चीत बसलेला पाहण्याचे भाग्य मिळाले..” याचा तो आनंद होता. अण्णांचे मागील अंगणात एक झोपाळा होता. तेथे बसून, झोके खात आम्ही खूप गप्पा केल्या. त्या दिवशी अण्णांनी सांगितलेली दोन वाक्ये अजून लक्षात आहेत,
अण्णा म्हणाले होते, “तू कार्यकारी विश्वस्त झालास, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. गेली बत्तीस वर्षे मी तुझे संघांमधील काम पाहत आहे. पदापेक्षा, समाज सेवेची संधी म्हणून याकडे पहा. मोठी आर्थिक जबाबदारीही आहे. पैशाचे व्यवहार चोख व पारदर्शक ठेव…”
ज्या विश्वस्ताला, हिशोबातील पन्नास रुपयाची अधिक शिल्लक शोधण्यासाठी, रात्रीच्या भोजनाची ही आठवण राहिली नाही त्यांचेकडून मला हेच अपेक्षित होते. मी त्यांचा प्रेमळ सल्ला कधीच विसरलो नाही. त्या खुर्चीवर बसलेल्या प्रत्येक विश्वस्ताने,अण्णांचा हाच वारसा पुढे चालविला पाहिजे. तीच अण्णांना श्रद्धांजली असेल .
पुढे अण्णांच्या भेटी अगदीच क्वचित होऊ लागल्या. मात्र मी काही कारणाने त्यांची गावी ते माहीम येथे गेल्यास आवर्जून अण्णांना भेटण्यासाठी जाई. त्यांची चौकशी करीत असे यांची मृत्यूचे थोडेच आधी, त्याची धाकटी बहीण व माझी मामी, रंगू ताई उर्फ मालती हीचे निधन झाले .तिच्या अंत्यदर्शनासाठी विरार येथे हजर असलेले ,अशक्त तरी उत्साही व समाधानी वाटणारे अण्णा मला शेवटचे भेटले. थकले होते, आपल्या एकुलत्या, धाकट्या बहिणीच्या वियोगाने कष्टी झाले होते. तरी माझ्याशी संघ व ट्रस्ट कामाच्या गप्पा केल्या. समाज व सेवा हाच त्यांचा श्वास होता. त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात ही जाणीव भरली होती. अण्णांची व माझी ती अखेरची भेट. त्यानंतर 2006 साली मी के.माहीमला गेलो, ते त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी.
अण्णा गेले. समाजाचा एक द्रष्टा, सचोटीचा व सच्चा समाजसेवक हरपला. आज जगात तंत्रज्ञान, शोध आणि माहिती यावर आधारित एक नवीन व्यवस्था निर्माण होत आहे. हा कानोसा, शंभर वर्षापूर्वीच घेऊन , समाजातील तरुणांना भावी जीवन स्पर्धेत टिकून रहावयाचे असेल व यशस्वी व्हायचे असेल तर त्यांना आधुनिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, करिता, मुंबईतील दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी, कै. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व पूज्य तात्यासाहेब चुरीविद्यार्थी वस्तीगृह निर्माण करून, ज्या समाजधुरीणांनी काळाचा अचूक मागोवा घेत, येणाऱ्या भावी पिढीसाठी एक उत्तम व्यवस्था निर्माण केली, त्यातील एक महत्त्वाचा दुवा कै.चिंतामणराव बळवंत वर्तक उर्फ आमचे अण्णा! समाजावर त्यांनी अगणीत उपकार करून ठेवले. मी जे काही अल्पस्वल्प योगदान सो क्ष संघासाठी देऊ शकलो, त्याला कै.अण्णांचे बहुमोल मार्गदर्शन निश्चित कारणीभूत आहे, हे मान्य करण्यास मला जराही संकोच वाटत नाही. त्यांचेच बोट धरून मी समाजाच्या कार्य प्रांगणात प्रवेश केला. ते माझे पहिले मार्गदर्शक.त्यांनी मला वसतिगृहाचा रेक्टर म्हणून समाजसेवेची पहिली संधी दिली. माझ्या अज्ञानामुळे झालेल्या चुकांचा बाऊ केला नाही. ज्या दिवशी मी त्यांच्याच खुर्चीवर विराजमान झालो, मला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मला आशीर्वाद दिले. ते सर्व क्षण माझ्यासाठी चिरस्मरणीय आहेत. अण्णांचे स्मरण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. भावी पिढ्यांना त्यांच्या पथदर्शी कामाची जाणीव व्हावी, कामाचे महत्त्व कळावे,म्हणून हा प्रयत्न आहे.
अण्णांबरोबर खूप क्षण घालविले, मात्र कधीही समाज कार्य व्यतिरिक्त ते काही बोलत नसत. एकदाच, ज्यावेळी ते पालघर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक हरले, व मी ,”अण्णा तुमच्यासारख्या समाज सेवकाचा हा पराभव का?”, असे विचारले तेव्हा, कुठेतरी जखमेवरची एक खपली निघाली आणि अण्णा मोजकेच पण खूप अर्थगर्भ असे बोलून गेले. “दिगंबर सर्वांनाच,सगळ्याच गोष्टी मिळत नसतात. तो निसर्गाचा नियम आहे. माझ्या आयुष्यातही मला काही गोष्टी भर भरून मिळाल्या व काही दुःखही वाट्याला आली. त्यातील हे एक. आपल्या वाट्याला कोणती दुःखे यावीत हे ठरवण्याचा अधिकार आपला थोडाच असतो? मी माझ्या दुःखांचे भांडवल केले नाही. आल्या प्रसंगाची, सकारात्मकरित्या दोन हात कसे करता येतील ते पाहतो. माझ्या अंगीकृत कामात कोणताही व्यत्यय येणार नाही हेही पाहतो….”
मला त्यांचे ते शब्द मनाला स्पर्शून गेले, म्हणून ते आजही विसरलेलो नाही. त्यांना नक्की काय म्हणावयाचे होते हे मला आजही पूर्णपणे कळलेले नाही. वरून शांत दिसणाऱ्या त्यांच्या अंतरंगात किती विचार मंथन चालू असेल याची मात्र जाणीव झाली. अण्णांच्या जीवनाची बैठक अफाट वाचन व अभ्यासातून निर्माण झालेल्या चिंतनावर आधारित होती एवढे मात्र कळले.
अण्णा व त्यांचे समकालीन समाज नेते यांचा तो वेगळाच काळ होता. “परिस्थितीने सुस्थितीत असलेल्या ,धडधाकट माणसांची समाजाला गरज आहे. अनेक गरीब व गरजू लोकांना थोडातरी आपला आधार व्हावा, वंचितांसाठी आपण काही देणे लागतो”. ही त्यांची आपल्या कार्यामागील प्रेरणा होती.. आज अण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षित असलेला भावी समाज निर्माण झाला की नाही माहित नाही. पण आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ अंगीभूत कामासाठी बहाल करून, प्रामाणिकपणे,समाज उत्थापनासाठी धडपडणार्या त्या कार्यकर्त्यांतील एक दुवा म्हणजे चिंतामणराव अण्णा होती हे निश्चित . ते समाजसेवक आता कोठे गेले ?
कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शारीरिक शक्तीबरोबर मानसिक शक्ती तेवढीच आवश्यक असते. किंबहुना ही शक्ती म्हणजे कृष्णाने गीतेत सांगितलेली तितिक्षा व ज्ञानेश्वरांनी उल्लेखलेली, “सहजसिद्धी” होय. याच बळावर अण्णांसारखे, सचोटीचे ,निरलस कार्यकर्ते, अनेक अडचणींना सामोरे जात, आपले काम सतत निष्ठेने, प्रामाणिकपणे करीत असतात !
एकनाथांच्या जीवनातील सचोटी व अचूकतेचा प्रभाव अण्णांवर होता. एकनाथांनी, सांगितल्याप्रमाणे, “जीवनात प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय असावा. आचाराची, वाणीची शुद्धता राखून, कर्मठपणाचे ढोंग न करता अंधश्रद्धांना ही वाव देऊ नये, समाज सेवेची प्रतिष्ठा वाढवून, पढीकतेचे स्तोम करू नये, प्रेमळपणा, सौजन्य शिस्त आणि शांती या अंगभूत सहज गुणांनी लोकांच्या मनी आदर निर्माण करावा.” या जिद्दीने ही मंडळी काम करीत असतात.
अण्णांनी, कदाचित्, एकनाथ न वाचताही या मूल्यांचे पालन आयुष्यभर केले.
ते विचार घेऊन अण्णा जगले, त्यांना एकनाथ महाराजांच्या शब्दातच ही आदरांजली वाहतो, पूर्णविराम देतो.
गृहस्थाश्रमु न सांडता, कर्म रेखा नोलांडीता
निज व्यापारी वर्तता, बोधु सर्वथा न मेळे।
अण्णांच्या स्मृतीला मनःपुर्वक आदरांजली वाहतो.???
या लेखासाठी सौ आशाताई ,श्री रघुनंदन चुरी यांनी दिलेल्या माहितीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो.
दिगंबर वा राऊत,
माजी कार्यकारी विश्वस्त, सो क्ष संघ फंड ट्रस्ट.
Real person who has devoted his life for needy persons.
He has given good lesson to others as how to share your life for poor & really needy person when they require your help ) assistance.
Hats off to his Samajseva done so far during his career
कै.अण्णा आणि त्यांच्या परिवाराविषयी सविस्तर,सखोल आणि अतिशय उत्तम माहिती दिली आहे. असे नेते आजकाल होणे नाही. आपण मेहनत घेऊन अतिशय सुंदर लिखाण केले आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!आपल्या समाजाच्या पुढील पिढ्यांना ही माहिती नक्कीच मार्ग दर्शक ठरेल यांत शंकाच नाही. ??
एखाद्या कसलेल्या नामवंत लेखकाने लिहिलेल्या तोडीचा लेख आहे. अफाट वाचन आणि उत्तम स्मरणशक्ती ही परमेश्वरी देणगी आहे. शिवाय digital media मधील कौशल्य दिसून येते. अभिनंदन आणि शुभेच्छा.
कै अण्णा परिवारातर्फे धन्यवाद. अनेक माहिती नसलेल्या बाबींचा परिचय झाला.
Digambar sir, though connected with the Annasaheb, even I was not aware of so many aspects of this great personality! Thanks for writing such detailed biography which will certainly inspire coming generations!
: कै चितामण राव वर्तक व कै . गणपतराव वर्त क या _ दोन्ही व्याली महान असून त्यांनी दुसऱ्यांचे चांगले कसे होऊ शकेल याचाच आयुष्यभर विचार केला यांत शंका नाही कै . चिंतामणराव माझे मावश्याजी होते
आमची शांती मावशी असताना आम्ही ‘ लहानपणी त्यांच्या घरी राहायका जात होतो हे विसरन चालणार नाही
अण्णा माझ्या आईचे मोठे मामा.. म्हणजे माझे अण्णा आजोबा. मला नेहमीच अभिमान वाटायचा की माझ्या दोन्ही आजी म्हणजे बाबांची आई आणि आईची आई कित्ती सुसंस्कृत, सुशिक्षित आणि नवविचारांच्या आहेत… त्याचं गमक त्यांच्या माहेरच्या मुळात दडलं आहे. एकदा बाबांचे मामा भाऊ , एम. एम. राऊत मला म्हणाले, “मला सांग गौतमी, आई-बाबा दोघांकडे ही सभाधारिष्ट्य नाही, स्वतःचे विचार दृढपणे मंचावर मांडायचं कौशल्य नाही, मग ते तुझ्यातं आलं कुठून ? तुझे भाषण ऐकायला मला खूप आवडतं.” त्यांना तेव्हा मी म्हटलं होत, “ काही नाही भाऊ , हा गुण माझ्यातं थोडा आईच्या मामांकडून आणि थोडा बाबांच्या मामांकडून आला.”
खरंच माणसामध्ये अनेक कुटूंबियांची गुणसूत्रे एकत्रित होत असतात.
अण्णांचे समाजकार्य सर्वश्रुतच आहे. इतके तत्वनिष्ठ व कणखर व्यक्तिमत्व मिळणे दुर्मिळच. पण अण्णांच्या हृदयाचा हळवा कोपरा मी अनुभवला आहे, माझी आजी , त्यांची धाकटी लाडकी बहिण गेली तेव्हा इतका उत्तुंग महामेरू ढसाढसा रडताना पाहिला… आज हे लिहीताना ही मला ते दृश्य आठवून डोळे पाणावले. नाना आजोबा , त्यांचे धाकटे बंधू त्यांची सावली तर मोठी मामी आजी, त्यांची शक्ती होती. अण्णा आजोबांचा प्रेमळ स्वभाव , समाजाविषयी असलेली कणव, कर्तव्यतत्परता , बुद्धिमत्ता , संवेदनशीलता आज वारसा हक्काने जिजी मावशी ( डॅा. शकुंतला चुरी) हिच्यात प्रकर्षांने जाणवतो. आई नेहमी म्हणते , “ जिजी अण्णांचे प्रतिबिंब आहे.”
मागची पिढी आज भौतिक रूपात आमच्यात नाही . पण आजी – आजोबांची छाया आजोबांची छाया असतेच नां! आत्ता आमचे आई – बाबा आजी- आजोबा झाले, उद्या त्या स्थानी आम्ही असू ! कालाय तस्मै नमः , पण मग अण्णा आजोबा , नाना आजोबा , मालू आजी – भाई यांनी आमच्यासाठी कायं मागे ठेवले ? तर नक्कीच अनुभव , संस्कार आणि आठवणींची शिदोरी … संपूर्ण जीवनात कधी ही कमी पडणारं नाही अशी ! गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार करण्याची क्षमता त्या पिढीत होती, म्हणूनच तर आमच्या परीने त्यांची नैतिक मूल्ये आमच्या पुढच्या पिढीला देऊन ती अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू .
सौ. गौतमी अनुप पाटील
( गौतमी अशोक सावे.)
अण्णा एक सचोटीचे कार्यकर्ते, नेते होते यात शंका नाही. आणि असे अनेक कार्यकर्ते सो क्ष समाजातून आले या संघाची निर्मिती वृद्धी झाली. संघामध्ये अनेक कार्यकर्ते चिंचणी, तारापूर, बोर्डी या भागातून आले आणि त्यांनी महत्वाचे योगदान दिले. त्यांच्याबद्दल तुम्ही अवश्य लिहावे.
बंधू खूप सखोल माहिती समजली . आपण खूप छान लिहिले आहे.धन्यवाद ?
दिगुबंधू… नमस्कार .
मी आजच सकाळी अण्णामामां बद्दल तुझा आदरांजलीचा लेख वाचला .
फारच सुंदर … अप्रतिम !!
अण्णा मामाना जाऊन आज पंधरा वर्ष झाली तरी तू न विसरता अण्णा ना आदरांजली वाहिलीस .. फार बरे वाटले .
धन्यवाद !! बंधू .
प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाचन पुरे करण्यास वेळ लागला पण ते पूर्ण झाल्यावर वर्तक कुटुंबीयांचे सामाजिक योगदान किती मोठे आणि निस्वार्थी आहे याची जाणीव झाली.लेखात प्रत्येक व्यक्ती चे योगदान आणि कार्यपद्धती विस्ताराने नमूद केल्याने प्रत्येकाची नव्याने ओळख झाली..शेअर केल्याबद्दल धन्यवाद… ????. शामकांत शिंदाडकर.
कै. चिंतामणराव बळवंत वर्तक
एक सचोटी चे शिस्तप्रिय समाजसेवक,
त्यांच्या साठी स्मृति दीपक आपण लावलात
सद्यस्थितीत अशाच समाजसेवकांची सर्व क्षेत्रात गरज आहे
?
: कै. चिंतामणराव बळवंत वर्तक उर्फ अण्णा तसेच समाजातील इतर निष्ठावंत समाजसेवक आणि समाजाप्रती त्यांनी दिलेले निस्वार्थी योगदान ह्या बदल खूपच अभ्यासपूवर्क लिहलेला लेख आहे.दिगमबर हा तुझा लेख म्हणजे त्यांच्या कार्याला आणि विचारधारेला वाहिलेली आदरांजली ठरेल. सर्वांची थोडीफार माहिती होती परंतु तू विस्ताराने लिहलेल्या लेखामुळे नव्याने पूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढील लेखा करीता शुभेच्छा..
दादरच्या अण्णासाहेब स्मारक मंदिर आणि वसतिगृहा साठी तू दिलेला वेळ आणि योगदान सुध्या खुप मोलाचे आहे.
अभ्यासपूर्वक अनुभवसंपन्न लेखन !
आमचे आजोबा स्व .बळवंत ज. वर्तक यांचा संघस्थापनेत असलेला सहभाग , सो . क्ष . स. संघ ट्रस्टचे ‘ ट्रस्ट खत ‘ सह महत्त्वपूर्ण सचित्र माहिती उल्लेखनीय वाटली .
आपण आत्मीयतेने स्व .अण्णांच्या निरलस , कर्तव्यनिष्ठ , आदर्श कार्याविषयी लिहिले आहे . आपल्या भावपूर्ण आदरांजलीबद्दल वर्तक परिवारातर्फे मन:पूर्वक
धन्यवाद !
केवळ पैशाचे दान न करता आपल्यापाशी असणाऱ्या बुद्धीचा, ताकदीचा उपयोग समाजासाठी कसा करता येतो ,समाजाची सेवा किती वेगळ्या भूमिकेतून करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिंतामण बळवंत वर्तक होय.
पैशाचा हिशोब असो, वस्तीगृहाची देखभाल असो ,बंधूनी ज्या आठवणी त्यांच्या बद्दल लिहिलेल्या आहेत त्या वाचून चिंतामण काकांच्या कार्याची कार्याबद्दल निष्ठा दिसून येते .त्यांच्या सानिध्यात राहून बंधूना जी सामाजिक कार्याचे दीक्षा मिळाली व पुढे बंधूंनी सुद्धा एक समाजसेवक म्हणून आपले योगदान दिले. बंधूंच्या या लेखामुळे चिंतामण काका बद्दलचा आदर द्विगुणित झाला. बंधूंना त्या बद्दल धन्यवाद.
असे निरलस पणे सेवा करणारे कार्यकर्ते आपल्या समाजात जर निर्माण झाले तर ती खरी श्रद्धांजली चिंतामण काकांना ठरेल असे मला वाटते.
भाई अतिशय छान आणि माहितीपूर्ण लेख आपण सादर केलात. संघाकडे अण्णांविषयी खूपच अल्प माहिती उपलब्ध आहे. आपण त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने त्याचप्रमाणे आपल्याला अण्णांचा लाभलेला सहवास यामुळेच खुप छान माहिती आज आमच्यापुढे ( नविन पिढी ) उपलब्ध केलेली आहे तसेच त्यांच्या कुटुंबीयांची माहिती, शिवाय आपण स्वतः वसतिगृहाचे रेक्टर व स्मारक मंदिराचे व्यवस्थापक म्हणून पार पडलेली कामगिरी, वसतिगृहातील दिनचर्या, आठवणीतील गोरखा आदि वैविध्यपूर्ण माहिती व सोबतच काही माहितीपूर्ण अमूल्य क्षणचित्रासह सादर केलेला लेख आणि आपली भाषाशैली खूपच आवडली. हा ठेवा आपण जपला पाहिजे. आपण मधल्या पिढीचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आपले अनुभव व संघाविषयी तसेच संघ नेत्यांविषयी आपणाकडून सातत्यपूर्ण लेखन होईल अशी खात्री आहे.
आपला,
प्रफुल्ल म्हात्रे,
आगाशी