कवीवर्य ग. ह. पाटील व बोर्डीचे ट्रेनिंग कॉलेज
“फ्रॉम हॉर्सेस माऊथ” (from horse’s mouth)… अशा प्रकारचा वाक्प्रचार इंग्रजीत आहे. याचा अर्थ, त्या बाबीतील तज्ञ, जाणकार व्यक्तीकडून, त्यांच्या मुखातून ती हकीकत ऐकायला मिळणे. आमच्याही बालपणीच्या शालेय दिवसांत असे रोमांचकारी, भाग्यशाली अनुभव आले. प्रत्यक्ष कवीवर्यांच्या मुखांतून, त्यांच्याच म॔जूळ आवाजांत, त्यांनीच लिहिलेल्या कवितांचे काव्य गायन ऐकता आले. त्याची आगळी वेगळी मजा अनुभवता आली. त्यावेळी आपण किती मोठा, चिरस्मरणीय आनंदाचा ठेवा जमा करीत आहोत याची कल्पना आली नाही. कारण त्या कवीचे मोठेपण त्या वेळी कळले नव्हते. आम्ही अगदी निरागस बालवयात होतो. हे भाग्य आम्हाला बोर्डीच्या प्राथमिक शाळेत, तिसऱ्या चौथ्या इयत्तेत असतानाच प्राप्त झाले. त्यावेळी बोर्डी मध्ये असलेल्या विशेष संस्थांपैकी बी .टी. कॉलेज एक होते. त्याबद्दल मी अन्यत्र देखील काही लिहिले आहे.
या बी. टी .कॉलेजचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच सुरू केलेले अशा प्रकारचे ते कॉलेज होते. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे बाळासाहेब खेर यांना महाराष्ट्रात एक नवीन शैक्षणिक प्रयोग करावयाचा होता. प्राथमिक शाळेपासूनच मुलांना सूतकताई, बागकाम ई. मूलोद्योग शिकविले जात. मुलांच्या अंगी उपजत असलेल्या शेती, चित्रकला, गायन, हस्तकला अशा विविध कलापैकी, त्याचा नैसर्गिक कल असलेल्या, कलेची जोपासना करून, भावी आयुष्यात ह्या आवडीच्या कलेतूनच, त्याच्या निर्वाहाचे साधन व उद्योग निर्माण व्हावा ही मूळ कल्पना होती. त्यावेळेच्या महाराष्ट्र सरकारने शिक्षण क्षेत्रातील एक मूलभूत प्रयोग म्हणून या कॉलेजची स्थापना केली. याचे कारण त्यावेळी बोर्डी मध्ये असलेली असामान्य व्यक्तिमत्वे – आचार्य भिसे, गुरुवर्य चित्रे, पद्मभूषण ताराबाई मोडक, पद्मश्री अनुताई वाघ ई. महान शिक्षण तज्ज्ञांच्या सल्लामसलतीनंतरच, त्यांचेच देखरेखीखाली हे कॉलेज निर्माण करण्याचे सरकारने ठरवले होते. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्यात, पदवीधर असलेल्या व उच्च पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या विचारमंथनातून निघालेल्या, नवीन शिक्षणप्रणालीचे शिक्षण मिळावे व त्यांना ग्रामीण भागांतील, मूलोद्योगाचे शिक्षण देणाऱ्या, प्राथमिक शाळेतून अध्यापनाचा अनुभवही मिळावा म्हणून या कॉलेजची योजना केली होती. हा प्रयोग महाराष्ट्रात तरी प्रथमच होत होता व त्यामुळेच अगदी मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचेच लक्ष येथे लागले होते. हे पदवीधर अधिकारी या प्रशिक्षणानंतर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात मूलोद्योग शिक्षणाचा प्रसार व प्रचार करतील ही अपेक्षा होती. त्यावेळेच्या एक महान शिक्षण तज्ञ डॉक्टर सुलभा पाणंदीकर या प्रिन्सिपाॅल म्हणून काम बघत होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिक्षण महर्षी येथे विद्यादान करीत होते. प्राध्यापक ग .ह .पाटील (जे पुढे प्रिन्सिपाॅल ही झाले), प्राध्यापक शेख, प्राध्यापक महाजन, प्रा. रा. ना. झोळ इत्यादी नावे मला आज आठवतात. त्यावेळी विद्यार्थी म्हणून आलेले लोक पुढे खूपच प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ म्हणून उदयाला आले. कवियत्री इंदिरा संत, कवी द .गो. दसनूरकर, राम मोहन संस्थेचे संस्थापक चंदावरकर अशी ही त्यातली काही नावे. यापैकी कवी ग. ह.पाटील व दसनूरकर यांनी गायलेल्या व प्रसंगी, आमचे कडून गाऊन घेतलेल्या त्यांच्या कवितांचे ‘मधुघट’ आम्हाला चाखावयास मिळाले. त्याची गोडी व त्यातील मजा कळत होती, मात्र महत्त्व आता कळते आहे. आज त्याचे खूपच अप्रूप आहे आणि म्हणून या दिग्गजांच्या काही आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न करीत आहे.
बोर्डीच्या जुन्या बी टी कॉलेज आजचा हा परिसर ‘अय्यंगार बंगला’ म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या अगदी रिकामी. या इमारतीच्या परिसरांत कॉलेज शिक्षणार्थिंचे निवासस्थान, भोजनालय व मागे करमणुकीसाठी सुंदर अंगण, समुद्रकिनारी.
कविवर्य ग.ह. पाटीलांसारख्या महान बालशिक्षणतज्ञाविषयी, आठवणी सांगण्याआधी मी त्यांच्या कुटुंबातील कोणा व्यक्तीशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नांत होतो. माझे सुदैव की त्यांच्या कन्या डॉ. मंदा खांडगे यांचा संपर्क फोन मला योगायोगानेच मिळाला आणि मी त्यांच्याशी घाबरत घाबरतच फोनवर बोललो. मात्र बोलता बोलताच माझा संकोच कधी दूर झाला व त्यांच्याशी सुमारे अर्धा तास मी अगदी मोकळेपणे कसे बोलू शकलो ते मला कळलेच नाही. त्यांनी सांगितलेल्या काही बोर्डीच्या आठवणी आणि पाठविलेली आपल्या पिताजींची छायाचित्रे यामुळे माझ्या लेखाला नक्कीच उठाव मिळाला आहे. त्यांचेमुळेच मला त्यांचे ज्येष्ठ बंधू श्रीयुत शाम पाटील, यांचाही संपर्क करता आला व त्यांच्याशी देखील मी फोनवरूनच बोललो. त्यांनीही मला या लेखात उल्लेख केलेल्या काही आठवणींचा संदर्भ दिला. मंदाताई सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत व एक प्रख्यात लेखिका म्हणून महाराष्ट्रात ख्यातकीर्त आहेत त्यांचे थोरले बंधू शामराव हे आज 81 वर्षांचे असून ते पेशाने आर्किटेक्ट आहेत. कवीवर्यांना एकूण सहा अपत्ये तीन मुलगे व तीन मुली पैकी दोन मुली व दोन मुलगे आज हयात नाहीत. श्री. शामराव पाटील व डाॅ. मंदाताई यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय व सहकार्याविना मी हे काम पूर्ण करू शकलो नसतो.
कै. ग. ह. पाटील यांच्या कन्या डाॅ. सौ.मंदाताई खांडगे यांचे विषयी थोडे सांगितल्याशिवाय माझे हे लिखाण अपुर्णच राहील. मंदाताई म्हणजे साहित्य निर्मिती करणारे वाङमय संशोधन आणि संपादन यातील एक प्रयोगशील व्यक्तिमत्त्व. त्यांची सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. स्त्री साहित्याचा मागोवा घेणाऱ्या चार खंडांच्या त्या मुख्य संपादक आणि ,’भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा’, या दोन खंडांच्या प्रकल्प प्रमुख मंदाताई आज पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत. मी त्यांना अजून पाहिलेही नाही. त्यांच्याशी बोलताना, मंदाताई म्हणजे एक प्रतिभावान विलोभनीय व्यक्तिमत्व आहे याची मनोमन खात्री पटली. जिद्द, परिश्रम आणि चिकाटी शिवाय असे मोठे प्रकल्प मार्गी लावता येत नाहीत. आर्थिक, बौद्धिक, वैचारिक, समृद्धी असलेल्या निकोप वातावरणात लेखनाचे त्यांच्यावर संस्कार झाले. आपल्या वडिलांशिवाय, साहित्यिक जडणघडणीत, प्रा.गं. बा. सरदार व डॉ. हे. वि. इनामदार सरांचे मार्गदर्शन लाभले, याचा त्या आवर्जून उल्लेख करतात. त्यांच्या वाड्ग्मयीन सेवेबद्दल, पुणे नगरपालिका, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, बडोदे वांङमय परिषद अशा अनेक साहित्य संस्थांचे 35 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘वैभव,पेशवेकालीन वाड्यांचे’, ही त्यांची वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेली लेखमाला, अतिशय गाजली होती. म्हणून साहित्यिक वर्तुळांत त्या ‘श्रीमंत वाडेकर’,या टोपण नावाने ही ओळखल्या जातात.आपल्या ठाणे जिल्ह्याच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी “वारली लोकगीते व वारली बोली” हा प्राध्यापक रानडे, यांचा जुना ग्रंथ संस्करण करून, पुन्हा संपादित केला आहे. वारली बोलीच्या अभ्यासासाठी हा एक महत्त्वाचा संदर्भ ठरला आहे. वारली बहुल असलेल्या आमच्या पालघर जिल्ह्यासाठी त्यांचे हे काम मोलाचे आहे. एक कृतिशील लेखिका म्हणून डॉक्टर मंदा खांडगे यांचे नाव मराठी साहित्यात नोंदले गेले आहे. नुकतीच ‘विवेक साहित्य मंच’ या संस्थेतर्फे त्यांची एक दीर्घ मुलाखत घेण्यात आली. मंदा ताईंनी आपल्या बालपणीच्या आठवणी, साहित्यिक महणून आज वरची संपर्कात आलेली अनेक महान व्यक्तिमत्वे,याचा छान परामर्श घेतला आहे.
कविवर्य यांचे ज्येष्ठ चिरंजीव,व मंदा ताईंचे ब॔धू ,श्री. श्याम गणेश पाटील हे आज ऐंशी वर्षाचे असून पेशाने आर्किटेक्ट आहेत. आजही औरंगाबाद मध्ये राहून आपला व्यवसाय व्यवस्थितपणे सांभाळीत आहेत. त्यांचेशीही माझे बोलणे झाले. त्यांनीही मला काही आठवणी, विशेषतः बोर्डीच्या निवासांतील आठवणी सांगितल्या. त्याचाही उल्लेख पुढे येणार आहे.
कवी ग. ह. पाटील हे प्राध्यापक होते तर कवी दसनूरकर हे विद्यार्थी म्हणून ट्रेनिंग घेत होते. ही विद्यार्थी मंडळी साधारणपणे त्यावेळी तीस-पस्तीस वर्षे वयापर्यंत होती. पदवी घेतल्यानंतर, चार-पाच वर्षे सरकारी शिक्षण खात्यात नोकरी झालेल्या अधिकाऱ्यांनाच या विशेष प्रशिक्षणासाठी पाठविले जात होते. गंमत कशी ही पहा: ही पदवीधर अधिकारी मंडळी जेव्हा आम्हाला वर्गात शिकविण्यासाठी येत त्या वेळी आमचे फायनल पास गुरुजी या पाठाचे परिक्षण करीत. त्याचबरोबर त्यांचे प्राध्यापक ही त्याचे अवलोकन करीत. क्वचित प्रसंगी प्राचार्या डाॅ.सुलभा पाणंदीकर स्वतः जातीने आमच्या मराठी शाळेच्या वर्गात येऊन बसत आणि पाठ देत असलेल्या या मंडळींना सूचना करीत. हे वर्ग फक्त शाळेतच न होता विषयाच्या अनुषंगाने कधीकधी शाळेबाहेरही होत असत. कधी कोणाच्या वाडीमध्ये, कधी समुद्रावर, तर कधी तलावाच्या काठी! एक छान आठवण म्हणजे त्यादिवशीचा आमच्या गावाबाहेर असलेल्या, बाबळे तलावाकाठी, निसर्गरम्य परिसरांत झालेला तो पाठ! प्राचार्य पाणंदीकर बाईंनाही त्यादिवशी त्या गावाबाहेरील तलावाकाठी पाठाचे निरीक्षण करण्यासाठी यावेसे वाटले. प्रशिक्षणार्थी शिक्षक मला वाटते भा .रा. तांबे यांची ,”पिवळे तांबूस ऊन कोवळे…”, ही सूर्यास्ताची शोभा वर्णन करणारी प्रसिद्ध कविता, शिकविणार होते. संध्याकाळची वेळ, गावाबाहेरील सुंदर तलाव, आकाशात पसरलेले विविध रंग, कमलपुष्पावर उडणारी विविध रंगी फुलपाखरे, बाजूला हिरवीगार झाडी, शेते, बागा आणि झाडांच्या माथ्यावर पडणारे सोनेरी ऊन! अर्थातच ही कविता शिकविण्यासाठी हा अत्यंत मनोहारी असा नैसर्गिक परिसर होता. आमच्या सरांनी कविवर्य भा. रा. तांबे यांचेविषयी काही थोडे प्रास्तविक केले. मॅडम ना काय वाटले कोणास ठाऊक? त्यांनी तात्काळ गुरुजींना विनंती केली, “आज मी मुलांचा पाठ घेते”.. व स्वतः शिकवण्यासाठी सरसावल्या. त्या तळ्याकाठी एका कोपऱ्यात ऊभे असलेले एक उंबराचे (औदुंबर)झाड त्यांच्या नजरेत आले होते. आदिवासींची चार-सहा लहान खोपटी अलीकडील टेकडीवर विसावली होती ती आणि त्याच्याच पुढे भातशेती, छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यातून गवार, भेंडीच्या रोपांची लागवड होती. तळ्याच्या पाण्यावर काठावरील झाडांचा कचरा पडून एक धूसर काळिमा ही तयार झाल्यामुळे बालकवींच्या कवितेतील सर्व पात्रे जणू तिकडे हजर होती आणि त्याच निसर्ग चित्रापासून स्फूर्ती घेऊन बाईंनी त्यादिवशी बालकवींची ती अजरामर कविता ‘औदुंबर’ आमच्यासाठी चिरस्मरणीय केली! बाई बालकवींच्या चाहत्या असल्या पाहिजे. त्याचप्रमाणे दत्तगुरूंच्या ऊपासक असाव्यात. त्यादिवशी बाईंनी या कवितेतून कवीला कोणते भाष्य कोणता संदेश घ्यावयाचा आहे याचे आम्हा मुलांना समजेल अशा सोप्या पद्धतीने विवेचन केले. हे आजही लक्षात आहे. बाई म्हणाल्या होत्या, त्यातील आठवणीत राहिलेले थोडे असे आहे.. ,” या कवितेत,केवळ निसर्गाचे एक सुरम्य चित्र रंगवण्याचा कविचा हेतू नाही. जीवनात आनंदी व खेळकर वृत्ती जोपाण्यासाठी कवी आवाहन करीत आहे. जगातील सुखदुःखाकडे विरक्त वृत्तीने पाहणाऱ्या स्थितप्रज्ञासारखा हा औदुंबर आहे. विरक्त वृत्तीच्या दत्तगुरूंचा निवास या औदुंबराखालीच असतो. श्रीदत्त चरित्रही जीवनात विरक्ती ठेऊन, समाधानी राहण्याचा संदेश देतात. या वृक्षाची कवीने केलेली निवड औचित्यपूर्ण वाटते. प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी निराशेचा पडदा जीवन मलीन करण्याचा प्रयत्न करील. त्यावेळी या स्थितप्रज्ञ औदुंबराची आठवण येऊ द्या. सुख, दुःख सर्व समत्व बुद्धिने घेता आले पाहिजे. त्या ओढ्यासारखे जीवनांत पुढे पुढे जात राहिले पाहिजे. त्या बालवयात जास्त काही समजण्याची कुवत नव्हती पण औदुंबर आणि तो ओढा या दोन रुपकामधून बाईंनी केलेले हे विवेचन कुठेतरी मनाला स्पर्श करून गेले. म्हणून ते सगळे आजही आठवते.आमच्या बाभळ तलावांत तेव्हां उभा असलेला, तो औदुंबर ही डोळ्यापुढून हलत नाही… आम्ही मुले किती भाग्यवान! एवढी महान विदुषी आपली महत्त्वाची कामे बाजूस सारून त्यादिवशी गावाबाहेरील त्या तलावाकाठी आमचे बरोबर केवळ आल्याच नाही, तर एक छान कविता अचानक आम्हाला शिकवून, आठवणींचा मोठा ठेवा कायम साठी देऊन गेल्या .
अशाच एका अध्यापन वर्गासाठी कवी दसनूरकर आमच्या वर्गात आले. त्यावेळी ते फार प्रसिद्धीस आले नव्हते. आम्हाला ही त्यांची काही माहिती नव्हती. वर्ग घेण्यासाठी ते आम्हाला भाटआळीमधील श्री मुकुंदराव सावे यांच्या फुलबागेंत घेऊन गेले. मुकुंदराव यांची आधी परवानगी घेऊन त्यांच्या वाडीतील एका छोट्या घरात एक टेबल फक्त होते. भिंतीवर लिहिण्यासाठी टेबलावर एक-दोन खडू ठेवले होते.आम्ही सर्व मुले, जमिनीवर बसल्यानंतर त्यांनी सूचना केली, प्रत्येकाने परिसरातील फक्त एक फुल, वेगळ्या प्रकारचे अथवा वेगळ्या रंगाचे, घेऊन यावे. वीस एक मिनिटांत आम्ही मुलांनी सुमारे दहा-बारा प्रकारची व विविध रंग असलेली फुले आणून ठेवली. त्यानी त्यांची टेबलावर रांगेत मांडणी केली. आम्हाला काय चालले आहे याची अजिबात कल्पना सरांनी दिलेली नव्हती. ओळीने मांडलेल्या त्या फुलांमधून एकेक फूल उचलत व आमच्याकडून त्याचे नाव विचारीत त्यांनी फुलांच्या नावाची यादी फळ्यावर लिहली. सर आम्हाला म्हणाले “चला, आता या प्रत्येक फुलाला आपण नावाने हाक मारू आणि आपल्या या,आजच्या वर्गात येण्यासाठी आमंत्रण देऊ…”. अशारितीने त्यांनी पहिला गुलाब उचलला म्हटले “गुलाबा येई रे”. मोगरा उचलला, म्हणाले, “मोगऱ्या येईरे”… आणि अशा रीतीने तेथे असलेल्या प्रत्येक फुलाला, त्याच्या नावाने बोलवावयास सुरुवात केली आणि खालील प्रमाणे काही ओळी तयार झाल्या. त्यातील काही ओळी आठवतात त्या अशा..
गुलाबा येई रे, मोगऱ्या येई..शेवंती ये बाई ये,जाई जुई .
चाफेकळी येई ,जास्वंदी बाई..
अशा रीतीने हे तेथे असलेल्या प्रत्येक फुलाचा त्या काव्यपंक्तीमध्ये उल्लेख करीत स्वतःचे एक छान काव्य त्यांनी तयार केले आणि आम्ही कोरस मध्ये म्हटले. त्या सुरुवातीच्या काही ओळी आणि अखेरची ओळ मात्र पक्की आठवते…
“एकत्र येउनी गुंफू या हार, देवाजीच्या चरणी अर्पूया सारं…”
निसर्गाच्या साखळीतील विविध रंगी, नाना सुगंधीत असलेल्या या फुलांनी एकत्र येऊन,एका हाराच्या रूपात ती देवाजीच्या चरणी विलीन झाली. आपण माणसंदेखील या निसर्गाच्या चक्रातील महत्त्वाचा दुवा आहोत. आपणही अशीच आपल्या सत्कर्म कुसुमांची माला देवाजीला अर्पण करायला नको का! असा एक साधा पण खूप मोलाचा असा संदेश त्या कवितेतून दसनूरकर सरांनी आम्हाला दिला. तो संदेश तर महत्त्वाचा आहेच पण त्यापेक्षा ज्या एकंदरीत प्रक्रियेतून आम्ही गेलो आणि त्या दिवसाची ती संध्याकाळ अनुभवली त्याला तोड नाही. तो दिवस, ती कविता, ते सर आजही लक्षात राहिले आहेत. एका महान कवीने आम्हाला त्या दिवशी स्वतःची कविता अशा अकृत्रिम रीतीने सहजगत्या निर्माण करून हसत खेळत एक मोठा आनंद तर दिलाच, पण आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणींचा ठेवा दिला.
कविवर्य ग. ह. पाटील हे तर शालेय जीवनातील आमचे “बालकवी”! त्यांनी त्यांच्या कवितांनी, नादमधुर, सुस्वर काव्य गायनाने आमच्यावर गारूड केले होते. ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो ‘, हे गीत किंवा’ देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो’, ‘फुलपाखरू छान किती दिसते’, ‘शर आला तो धावुनी आला काळ विव्हळला श्रावण बाळ’ ही गाणी आम्ही कवींच्या तोंडून त्यांच्या सहवासात मजा लुटीत ऐकलेली आहेत. मराठी भाषेतून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या, त्या काळापासून अगदी आजच्या आधुनिक काळापर्यंत, ह्या कविता ,ज्यांनी प्राथमिक शाळेत ऐकल्या नाहीत, असा मराठी माणूस सापडणे कठीण आहे. बालपणी ऐकलेल्या या कवितांचे आज आयुष्याच्या उतारवयातही गारुड कमी झालेले नाही! मराठी आजोबा,आजी, आपल्या नातवाची करमणूक करताना सहजच ही गाणी गुणगुणतात. नातवाबरोबर स्वतःचे हरवलेले बालपण पुन्हा त्या कवितांत शोधतात. आमच्यासारख्या अगदी खऱ्या भाग्यवानांचे नशीबी बालपणीच्या म्हणजे त्या काळात प्रत्यक्ष कवींच्या तोंडून त्यांची ही अजरामर गाणी ऐकण्याचा सुवर्ण कांचन योग आला, म्हणून ह्याचे अप्रूप!! म्हणूनच कवींची आठवण आजही तितकीच सुस्पष्ट आहे, जितकी ७० वर्षांपूर्वी होती. आठवणींना उजाळा देऊन कवींच्या प्रेमळ स्मृतीला वंदन करण्याचा माझा अल्पसा प्रयत्न!
मराठी भाषा जाणणाऱ्या अनेक बालकांना शालेय जीवनात, ह्या कविता आपल्या गुरुजी अथवा बाईंकडून शिकतांना आनंदाचा ठेवा मिळाल्याचे समाधान झाले असेल. उत्कट बालगीतकार म्हणून आजही बालकांच्या मनावर मोहिनी घालणारे कविवर्य ग. ह. पाटील, शब्दांच्या गोडव्याने, गीताला मधाळ करणारे कवी! सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जिभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गीते आजच्या काळातील पालकही आवडीने ऐकतात गातात. मग त्यावेळेच्या आम्हा बालकांना त्यांनी किती आनंद दिला असेल? अतिशय साधे राहणीमान असलेले, बाल गोपालांत रमणारे, आपल्या निर्मितीचा आनंद प्रथम बालकांशी वाटून घेणारे, कवी ग.ह.पाटील एक वेगळे व्यक्तिमत्व होते. आपल्या गीतात ,त्यांच्या मनातील निसर्गाचे, भावनेचे हुबेहूब प्रतिबिंब उभे करीत. कोणत्याही बालकाच्या बाल मनांत, निसर्गाप्रती असणाऱ्या भावनांची, कवीच्या भावना ही समरूप झालेल्या असत. त्यामुळे ऐकणाऱ्या बालकांनाही आपल्याच कल्पनेतील आनंद प्रत्यक्ष गीतातून मिळाल्याचे समाधान होई. म्हणूनच या गीतांना कालातीत आठवणीत राहण्याचे भाग्य मिळाले. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कवी मध्ये त्यांचे स्थान खूप वरचे आहे. त्यांच्या इतकी सुंदर बालगीते मराठीत फारच थोड्या कवींनी लिहिली आहेत. या पैकी कांहीं कविता, कवी पाटीलसरानी आपल्या बोर्डीच्या वास्तव्यातच लिहिल्या, आणि त्या लिहून झाल्यावर आम्ही शालेय मुले त्यांचे श्रोते होतो. खरेतर कवींना आमच्या वर्गावर येण्याचे काहीच कारण नव्हते कारण त्यांचे शिष्य आम्हाला शिकवीत आणि आमचे गुरुजी त्यांचे निरीक्षण करून त्याप्रमाणे सूचना करीत. परंतु पाटील सर, हाडाचे कवी व जातिवंत शिक्षक होते. आपली एखादी नवी वा जुनी कविता, कधीकधी मुद्दामहून, एखाद्या वर्गावर जाऊन, पाठ घेणाऱ्या शिक्षकाकडून थोडा वेळ मागून घेऊन, त्यांची नवीन कविता आम्हाला मोठ्या प्रेमाने म्हणून दाखवत असत. कवी कसा ही असू दे, जेव्हा तो आपली नवी निर्मिती आत्मीयतेने अजाण, निरागस मुलांसमोर गाऊन दाखवतो, तो आनंद काही वेगळाच! त्या फक्त तालासुरात गायिलेल्या कवितेच्या ओळी नसतात, त्याला प्रेमाचा, जिव्हाळ्याचा ओलावाही मिळालेला असतो. ते गाणे ऐकणा-यासाठी तो एक जीवनानंद असतो. अशा कवितेचे श्रोते जर कोवळी, अजाण बालके असतील, तर त्यांच्यासाठी तो एक अमृतानुभव असतो!! कवीवर्य कधी आपली कविता गायल्यावर, आमच्याकडून समूहाने गाऊन घेत, अगदी तालासुरावर हे गायन होई, आणि कधी कधी तर त्या काव्यावर एखादे छोटेसे बालनाट्य बसवून आम्ही ती कविता नाट्य स्वरूपात,वर्गात सादर करीत असू. जसे की
डराव डराव का ओरडता उगाच राव पत्ता तुमचा नव्हता काल,.. हे नाट्य आम्ही शाळेतही केले व शाळेच्या कार्यक्रमात ही केले.
हे, गीत साभिनय सादर करताना काही जण बेडूक होत, काहीजण प्रश्न विचारणारी मुले होत ,तर काहीजण पालक होत. सर्वजण काव्याचा आनंद घेत असू. ते खूपच छान दिवस होते. महाराष्ट्राचा एक महान कवी आपल्याला हे सर्व ऐकवतो व तसे करवून घेतो याचे त्यावेळी विशेष अप्रूप वाटले नाही. आनंद घेतला. पण आज त्या सुंदर दिवसांची , चीरकालीन स्मृतींची महत्ता वाटते आहे .
“आहे उतरत संध्या सावकाश,माझाही प्रवास चालू आहे.
पावलांच्या साठ पाहून या खुणा,मनी खिन्नपणा दाटत आहे.
थोडीच पाऊले आता टाकायाची,परी खूण त्यांची राहो नीट.
उलटत आहे आज माझी साठी, परी बुद्धी नाठी नच होवो.
आणि माझ्या मस्त शैशवाचा ठेवा, नको घेऊ, देवा हिरावुनी…“
कवींचे ज्येष्ठ चिरंजीव श्री श्याम पाटील म्हणाले, “अनेक कविता त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना केल्या आहेत.त्यापैकीच ‘फुलपाखरू छान किती दिसते’ ही लोकप्रिय झालेली कविता आहे. कांही कविता वयाच्या १९, २० व्या वर्षी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना केल्या. त्यावेळी पुण्यात अजून तेवढे शहरीकरण झालेले नव्हते. त्यांच्या निवासस्थानाच्या आसपास खूपच फुलबागा व गर्द राया होत्या. त्यामुळे विविधरंगी फुलपाखरे झाडावर, फुलावर विहार करताना दिसायची. सुंदर निळे आकाश दिवसा तर नक्षत्रांनी भरलेले रात्रीचे आकाश पाहून कवींना फुलपांखरू कविता सुचली असावी.” शामराव, वडिलांचे शालेय जीवन व त्यावेळेच्या मित्रमंडळीबद्दल बोलताना म्हणाले, “त्यावेळी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सर्वश्री, एस .एम. जोशी, गोपीनाथ तळवलकर, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, न्या. व्ही एम तारकुंडे, वा भा पाठक (खबरदार जर टाच मारुनी या कवितेचे लेखक), भय्यासाहेब ऊमराणी (सुमीत्रा भावेंचे वडील) अशी भारताच्या विविध क्षेत्रांत नामांकित झालेली मंडळी, कवींचे सहाध्यायी होते. अगदी आठवी ते अकरावी पर्यंत! गोपीनाथ तळवळकरांनी ‘फुलपाखरू’ कविता ऐकल्यानंतर, त्यांनाही अशी कविता फुलपाखरांवर करण्याची इच्छा झाली. त्यांचीही, ‘फुलपाखरा’ वर एक कविता आहे.” मात्र, कवी ग. ह. पाटलांचे ‘फुलपाखरू’ बालगोपाळांत अजरामर झाले आहे. फर्ग्युसन कॉलेजांत ,मराठी मंडळात, त्यांच्या कवितांचे वाचन होत असे. फुलपाखरू कवितेबाबत दुसरीही एक छान आठवण श्यामरावांनी सांगितली. “एके दिवशी,महाराष्ट्राचे महान कवी मंगेश पाडगावकर यांचे पत्र कवींना मिळाले. पाडगांवकर त्यावेळी कवी म्हणून उदयास येत होते. त्या पत्रांत त्यांनी ,’फुलपाखरू’कवितेचे मनापासून कौतुक केले होते. आपल्या कवितेमुळे मला माझ्या शालेय जीवनाची आठवण झाली, खूप आनंद मिळाला,ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हे पत्र पाठवीत आहे,असे त्यांनी म्हटले होते.पाटील सरांच्या पुण्यातील पत्ता माहित नसल्याने प्रकाशकामार्फत ते पत्र आले होते. एका उदयोन्मुख महाकवीने त्यांच्या काळातील दुसऱ्या एका महान कवीला दिलेली ती मानवंदना होती ! म्हणतात ना, ..गुणी गुणम् व्यक्ती, नवेत्तिर्गुणो!
बोर्डीला असतांना शामराव मराठी शाळेत जाणारे विद्यार्थी होते. त्यांनी सांगितले “‘संध्याकाळी शाळा सुटल्यावर आम्ही सर्व मुले समुद्रावर खेळत असू. आमचा आवडता खेळ म्हणजे वाळूचे किल्ले करणे. आमचे वडील त्यावेळी समुद्रावर फेऱ्या मारत मारत, आमच्यावर लक्ष ठेवीत. काही नवीन कवितांचं फिरता फिरता चिंतनही होई. बोर्डी मुक्कामी कविवर्यानी कांही कविता केल्या. अरविंद (मामा), हा आमचा त्या बालपणीचा सवंगडी. त्याचे बरोबर वसंत, प्रताप, रामा हे देखील मित्र असत..” किती सुंदर आठवणी त्यांनी सांगितल्या. मलाही त्या ऐकून बालपणीच्या गमतीची आठवण आली. ह्या सर्व मित्रमंडळी बरोबर, मीसुद्धा खेळलो आहे. श्याम रावांना आपल्या च्या बोर्डीच्या बालपणातील मित्रांची नावासकट आठवण आहे. या पैकी आज फक्त वसंत जगात आहे. बाकीचे देवाघरी निघून गेले. हे ऐकून शामराव यांनाही खूप वाईट वाटले.
“देवा तुझे किती सुंदर आकाश” ही प्रार्थना कविता कवींनी सुमारे वयाच्या ४० व्या वर्षी लिहिली आहे आणि ती ‘अभंग’ वृत्तात आहे. ही कविता केवळही कविता केवळ आमच्या शाळेतच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्राथमिक शाळांमध्ये,आजही, प्रार्थनागीत म्हणून, शाळा सुरू होण्याआधी गायले जाते. रेडिओवरही अनेकदा प्रातःकाळी ऐकायला मिळते. या कवितेत केलेले निसर्ग अवलोकन व ते बालकांपुढे प्रस्तुत करण्यासाठी, योजलेले अगदी साधे, सोपे शब्द. त्या शब्दांचे सामर्थ्य एवढे जबरे आहे की आजही, या वयात, चांदणे फुले, आकाश, तारका, झुळझुळु वाहणारी नदी हे सर्व पाहताना, ही कविता आठवतेच आणि आठवतात ते कविवर्य ग .ह. पाटील!! या कवितेच्या काही ओळी मुद्दाम सांगतो आहे.
देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो.
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे.
सुंदर ही झाडे सुंदर पाखरे किती गोड बरे गाणी गाती.
इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर देवा असशील?
१९ ऑगस्ट १९०६ रोजी जन्मलेले ग. ह. पाटील हे बाल साहित्यिक होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी बाल शारदा या ग्रंथाचे संपादन केले होते. बोर्डीला ते आले तेव्हा ते साधारण चाळीशीचे असावेत. डाॅ.पाणंदीकर बाई नंतर तेच ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल झाले. बोर्डी सोडल्यावर पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य म्हणून ते येथे रुजू झाले. त्या कॉलेजमध्ये अध्यापन करतांना प्रयत्नशील आणि प्रयोगशील प्राध्यापक अशी ख्याती त्यांनी मिळविली. लेखकांनी बालकांना सकस आणि परिपूर्ण साहित्य द्यावे, यासाठी प्राचार्य पाटील यांनी पुण्याला महिनाभराचे शिबीर 1960 मध्ये आयोजित केले होते. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून होतकरू लेखक निवडून बोलाविले होते. शिबिराचा लाभ घेतलेले हे होतकरू लेखक पुढे साहित्याच्या क्षेत्रात नावारूपाला आले. त्यांना आम्ही त्या दिवसांत बोर्डी मध्ये पाहिले त्यांच्या कविता त्यांच्या तोंडून ऐकल्या आणि आजही त्या रोमहर्षक दिवसांचे विस्मरण होत नाही, हे आमचे केवढे भाग्य!” कळीचे फूल झालेले पाहणे, व लहान मुलांच्या मनाचा विकास झालेला पाहणे, यासारखे सुंदर व मनोहर दृश्य नाही! “असं ते म्हणत असत.
कवींनी,मुलांचं भावविश्व समजून, उमजून कविता रचल्या. ‘छान किती दिसते फुलपाखरू…; ‘पाखरांची शाळा भरे पिंपळावरती...’ आणि ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो…’ यांसारख्या त्यांच्या सुंदर कविता आजही कित्येकांचे ओठांवर आहेत.
वर उल्लेखिलेल्या कविता या आनंद पर्यावसानी, त्या बालवयात मनाला भावणाऱ्या, सतत म्हणत रहाव्या, अशा ढंगाच्या. मात्र श्रावणबाळ कवितेचा ढाचा अगदीच वेगळा. कवींनी या कवितेच्या …” शर आला तो धावुनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ..” या ओळी सुरू केल्या की आम्हा मुलांच्या डोळे ओले होऊ लागत. कवींचा कंठ दाटून येई. त्यांच्या कोटाच्या खिशातून डोळ्याला लावण्यासाठी रुमाल निघे. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावड खांद्यावर घेऊन काशी यात्रेला जाताना, वाटेत त्यांना एका जंगलात तहान लागते, म्हणून पाणी आणायला जातो. तिथं शिकारीसाठी आलेल्या राजा दशरथाचा त्याला बाण लागून तो पडतो. आता आपल्या मातापित्यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकणार नाही या विचाराने श्रावण दुःखी होतो.नकळत का होईना आपल्या हातून महापाप घडलं ,म्हणून व्यथित झालेला तो राजा दशरथ ,पुत्र वियोगाने आकांत करणारे श्रावणाचे आई-वडील, आई वडिलांना पाणी कोण देणार या चिंतेने,शेवटचे क्षण मोजीत असूनही,राजाला विनंती करणारा जखमी श्रावणबाळ …या सगळ्यांचे वर्णन कवीने अगदी साध्या, सोप्या शब्दात पण किती परिणामकारक रीतीने केले आहे. एकदा ही कविता वाचल्यानंतर ,ते काव्यचित्र कायमचेच मनात ठसते.आज एवढ्या वर्षांनी ही कविता मला पूर्ण स्मरणात आहे. वानगीदाखल मला काही ओळी येथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही… आपण आपल्या आईवडिलांची पाणी पिण्याची शेवटची इच्छा पूर्ण करू शकत नाही, माझ्या नाशाला हा राजा कारणीभूत आहे, तरीदेखील राजाला दोष देत न बसता, श्रावण राजाला कसे तरी, सांगतो
“मी एकुलता पुत्र कसा हा घाला ,मजवरती अवचित आला.
या वृद्धपणी मीच एक आधार ,सेवेस आता मुकणार.
जा बघतील ते वाट पाखरावाणी, द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडू नका ही,
ही विनंती तुमच्या पायी, मज माघारी करा तुम्ही सांभाळ
होउनिया श्रावण बाळ.”..
आई वडिलांनाच परमेश्वर रूप मानणाऱ्या श्रावण बाळाची मनोव्यथा (माझ्या पश्चात माझ्या आई-वडिलांचे काय होणार ),
स्वतः शेवटची घटका मोजणारा हा श्रावण आपल्या अंध आई-वडिलांचे, आपल्या पश्चात कसे होणार ,याचीचचिंता वाहतो आहे.किती थोड्या शब्दात पण अर्थगर्भ रीतीने कवीने त्याची व्यथा व्यक्त केली आहे.शेवटच्या दोन ओळीत तर ,एक महान तत्वज्ञान सरळ सुंदर रितीने कवी सांगून.जातो.सर्व रामायणाचे सार त्या दोन ओळींत आहे. तुम्ही कोणीही असा,कितीही मोठे असा,लहान असा,मोठे असा, प्रत्यक्ष परमेश्वर रामाचे तुम्ही बाप असा.. आयुष्यात केलेल्या पापाला क्षमा नाही..
“दशरथ राजा रडला धाई धाई,अडखळला ठायी ठायी.
मराठी सारस्वतातील, ही एक असामान्य, अपूर्व कविता आहे. कवी ग .ह. पाटील यांनी त्या बालवयात, हे काव्य आम्हाला केवळ शिकवले नाही,ते आमच्या मनःपटलावर कायमचे कोरले .म्हणून या गीता बरोबर कवी ग. ह. पाटीलही आठवतात, आवडतात .
“माझ्या मामाची रंगीत गाडी हो” ही कविता जणू कवींनी आम्हा खेडेगावात राहणाऱ्या बालकांसाठीच केली होती. मंदाताई म्हणाल्या, “या कवितेला ग्रामीण संदर्भ आहे. कवींचे आजोळ कळंब नावाचे, मंचर जवळील खेडे. त्यांच्या गावात अश्विनी नदी आणि एक ओढा. ओढ्याच्या काठी मामाचा मळा. त्यात छान भाज्या आणि फुलांचा बगीचा. मामांची बैलांची टुमदार गाडी होती. त्यामुळे बालपणी कवींना मामाच्या गाडीने आजोळी जायचे प्रसंग येत. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या त्या छोट्या खेडेगावातील ते निसर्ग रमणीय वातावरण, बाजरीची हिरवीगार शेते, वसंत ऋतुमध्ये आंब्याच्या मादक गंधाने भारून टाकणारी आंबेराई. अशा सुंदर वातावरणात, बालपणी झालेला तो बैलगाडीचा आन॔दी प्रवास व त्या गोड आठवणी,कविवर्यांनी या कवितेत मूर्त केल्या. त्याकाळी या बैलगाडीचा डौल काय वर्णावा? आज चार चाकी गाड्यांनाही नाही एवढा रूबाब या बैलगाडीला होता. आमच्याकडे बैलगाडी नव्हती. आमचे शेजारी राहणारे मामाआजोबा, यांचेकडे एक सुंदर बैलगाडी होती. त्यामुळे आपल्या गाडीतून मामाच्या गावी जाण्याऐवजी, मामांच्या गाडीतून आम्ही कोठे कोठे जात असू . विशेष म्हणजे वर्षांतून एकदा,डहाणूची महालक्ष्मी आणि ऊंबरगाव येथील गंगादेवी या यात्रांसाठी जायला मिळे. काय नवलाई होती त्या प्रवासाची! सकाळच्या अगदी उषःकाली प्रवासाला सुरुवात करून ,रात्रीच्या अंधारात आम्ही घरी परतत असू. आपल्या घुंगरांच्या तालावर अख्ख्या जगाला ताल धरायला लावणाऱ्या,’ छुन्नक छुन्नक’, अशा बोलावर,नादमय संगीत देणाऱ्या आमच्या त्या बैलगाड्या! त्या प्रवासाची मोठी गंमत होती .मामांचे पांढऱ्या रंगाचे उंच उंच बैल पाठीवरील उंच वशिंड, मानेखाली लोंबणारी लांब चामडी, त्यांच्या गळ्यात अडकवलेले ते घुंगरू सार॔ कसं मजेशीर. त्यांना गावच्या ओढ्यावर नेऊन पाणी पाजण्याचे काम आम्ही मुले हौसेने करीत असू.
शीळ घालून मंजूळ वाणी हो ,पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
.याओळी किती सार्थ वाटतात. विशेषतः रात्रीच्यावेळी प्रवास करताना, शांत वातावरण, रातकिड्यांचा किर्र असा घुमणारा आवाज,आणि त्यात बैलांच्या घुंगरांचा,आसमंतात गुंजणारा मंजुळ आवाज ,यामुळे ते सारं वातावरण किती प्रसन्न होत असे. प्रवासात मनात विचार येईल जीवनात आनंद सुख म्हणतात ते आणखी दुसरे काय? ते चित्र आज जरी डोळ्यापुढे आले तरी केवढी गंमत आणि मजा वाटते ! कवितेतील एकूणच शब्दरचना व वर्णन कवींच्या इतर कविता प्रमाणेच , कवीच्या मनांतील चित्र आपल्याही मनःचक्षू पुढे ऊभे करणारे..
बाजरीच्या शेतात, करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो ..
माझ्या मामाची रंगीत गाडी हो,
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो..
अगदी 80 वर्षापूर्वी,भाताच्या शेतांतून केलेला तो बैलगाडीचा प्रवास, फुलावर आलेल्या भात रोपाचा दरवळणारा सुगंध, व बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा तो “छुन्नक “अजूनही ऐकू येतो. ही कविता स्मरते आणि, मजेत येऊन, हातवारे करीत, गाणारे कवी ही डोळ्यासमोर येतात. शीळ घालून मंजूळ वाणी…सांगतांना, कवींनी आम्हाला शीळ कशी घालतात याचे दाखविलेले प्रात्यक्षिक आठवते!!
बालशारदा, रानजाई, पाखरांची शाळा, लिंबोळ्या, एका कर्मवीराची कहाणी, आधुनिक शिक्षणशाळा, गस्तवाल्याची गीते ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. “पाखरांची शाळा”, या कवितासंग्रहाला केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने,बालसाहित्यासाठी ग .ह .पाटील यांच्या नावाचा पुरस्कार, कवींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू केला आहे. पांच हजार रुपयांचा पहिला पुरस्कार, कविवर्य मंगेश पाडगावकर यांनाच मिळाला हा छान योगायोग!
“लिंबोळ्या”, या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे. त्या संग्रहातील लिंबोळ्या ही कविता कवींनी बोर्डी मुक्कामी लिहिली आहे. एका सुट्टीच्या कालखंडात कवींचे सर्व कुटुंबीय पुण्याला गावी गेले होते. त्यांच्याबरोबर गावी न जाता ते एकटेच बोर्डी मुक्कामी राहिले होते .एका पावसाळी दिवशी, लिंब वृक्षाखाली बसून, पडणाऱ्या पिकल्या लिंबोळ्या पाहून कवींना आपले बालपण आठवले. लिंबोळ्यांना हापूस आंबे समजून बालसवंगड्या बरोबर केलेला खेळ आठवला. त्या मनाच्या विमनस्क स्थितीमध्ये कवी आपल्या सोनूल्यांना गावाहून लवकर घरी येण्याचे प्रेमळ आवाहन करीत आहेत. त्यामुळे आपल्या चित्तवृत्ती पुन्हा आनंदित होतील अशी कवीला आशा वाटते आहे. खालील कांहीं ओळी मधून या कवितेचे सौंदर्य प्रतीत होते.
एकटा एकटा अगदी एकटा,अज्ञात बेटात,अज्ञातवासात.
आहे मी दुर्भागी अगदी अभागी…..
…एका सायंकाळी लिंबतरू खाली….
….आणि माझे मन ,पंख पसरून,
भूत काळामध्ये ,बालपणा मध्ये ,
गेले ते उडून मजला घेऊन …..
….भाऊ नी बहिणी मित्र नी मैत्रिणी,
मिळुनी सगळे वेचल्या लिंबोळ्या
होते ते ‘हापूस’किंवा ‘राजहंस’…
…. पुन्हा परतून आले माझे मन,..
आणि लिंबाखाली नव्हते ते आंबे….
…… मग मी बाळांना, माझ्या सोनूल्यांना.
मनच्या मनात घातलीसे साद ,
‘यारे इंदू,सिंधू शाम आणि नंदू ,
ये ग बाळ मंदा सानुल्या आनंदा.’
माझ्या भोवती नाचा थयथय
मोठ्याने मोठ्याने आरडा-ओरडा…
आचार्य अत्रे यांनी देखील या कवितेचे कौतुक केले होते व शालेय पाठ्यपुस्तकांतही अंतर्भाव करण्यात आला होता.
मंदा ताईनीच मला वडिलांचे छायाचित्र स्वतःचे छायाचित्र व इतर थोडी माहितीही दिली आहे. ज्यावेळी कवी ग. ह. पाटील बोर्डी ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून बोर्डीत रहात होते त्या वेळच्या खूप रम्य आठवणी त्यांचेकडे आहेत. डॉक्टर चुरी यांच्या घरामागील बंगल्यात या कुटुंबाचे निवासस्थान होते. ही सहा भावंडे तेथे होती. ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांच्या बालवाडीत जाण्याचे भाग्य मंदा ताईंना बालपणी मिळाले. ज्येष्ठ बंधू श्याम यांनी सांगितल्याप्रमाणे, समोरील समुद्रावर वाळूचे किल्ले करून शंख-शिंपले गोळा करणे हा त्यांचा रोज संध्याकाळी खेळ असे. आपल्या बोर्डीच्या आठवणी त्यांनी एका लेखात नमूद केल्या असून त्यांचेच शब्दात त्या खाली देतो.
“तासनतास रेतीमध्ये बसावं, सागर किनाऱ्यावर बसून लाटांचं नर्तन पहावं, क्षितिज कडेला भिडलेल्या सागराची विविध रूपे मनात साठवावी, सागराची अथांगता,रौद्रता,विशालपणा ह्याचं आकर्षण मला बालपणापासूनच. माझं बालपण समुद्रकिनाऱ्याच्या रेतीत खेळण्यात गेलं, त्यामुळेच हे समुद्राचं आकर्षण मला असावं. बोर्डीला वडील ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले आणि त्यांनी बोर्डीला बिर्हाड केलं. त्यावेळी मी अगदी लहान होते. ताराबाई आणि अनुताईंच्या बालवाडीत शिकण्याचं भाग्य मला लाभलं. घराच्या समोरच समुद्र. रस्ता ओलांडला की पुढ्यात लांबलचक समुद्रकिनारा. त्या विशाल जलाशयाची विविध रूपे मी पाहिली. मनात साठवली आणि ती मनात कायमची ठसली. या किनाऱ्यावर सुरूचं दाट बन होत. त्यात आम्ही मुलं लपाछपीचा खेळ खेळत असू. एरवी त्या सागर किनाऱ्यावर मऊशार रेतीत पाय रोवून छान, सुबक घरं बनवायची, हा नित्याचा उद्योग! दुसर्या दिवशी पहावं तर वाळूत बनवलेलं घर असायचं कुठे? शोधून सापडायचे नाही. कसं बरं सापडणार? भरतीच्या लाटेबरोबर आम्ही बालचमूनी बनवलेली घरं वाहून जायची. पण तरीसुद्धा परत परत नव्याने घर बांधण्याची हौस मात्र असायची. अशाश्वताला शाश्वत करण्याचा जणू तो खटाटोप असायचा. प्रत्येकाचं घर वेगळं दिसावं म्हणून त्यावर पान, पीस खोवायची. कधी केशरी लाल चुटुक करवंद. कोळणी भल्या सकाळीच बकुळीचे वळेसर आणि करवंदीच्या वेण्या दारावर घेऊन येत. करवंदीची वेणी खरंतर जड वाटायची केसाला, पण ती डोक्यात घालण्याची कोण हौस ! मग त्या वेणीतली करवंद काढून त्या रेतीच्या घरात खोवायची. पहिलीत जायचं झालं आणि बोर्डी वरून माझी रवानगी पुण्याला झाली. कारण बोर्डीत जी शाळा होती त्यात सूतकताई वगैरे होती. तसली शाळा मला मुळीच आवडली नाही. बोर्डी सोडली आणि मी समुद्राला मुकले.!.”
मंदा ताईंच्या बोर्डीविषयी भावना एवढ्या तीव्र आहेत की त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी काही वर्षा पूर्वी त्या बोर्डीला येऊन गेल्या त्याविषयी सांगताना त्या म्हणतात:
“काही वर्षापूर्वी अनुताईंच्या आग्रहाखातर मी कोसबाडला माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. कोसबाडला जायच्या आधी, बोर्डीला जाऊन सागराचं दर्शन घेतलं. संपूर्ण संध्याकाळ तिथे घालविली. लहान-मोठे शंख शिंपले गोळा केले. लहानपणी असे किती तरी शंख शिंपले गोळा केले होते. परकराच्या ओच्यातून घरी नेले होते. ते स्वच्छ करून, बालवाडीत बाईंना नेऊन द्यायचे, हा एक उद्योगच असायचा. बालवाडी घरापासून थोडी दूर होती. बैलगाडीत बसून बालवाडीला जायचं. सकाळी सकाळीच समुद्रावर कोवळं ऊन पसरलेलं असायचं आणि पाणी चमकत असायचं. शाळेतून परतीच्या वेळी भरतीच्या लाटा घुसळत असायच्या. ताराबाईंनी ही बालवाडी नंतर कोसबाडला हलविली. त्या बालवाडीत ही जाण्याचे भाग्य मला लाभले. ताराबाई मोडक, अनुताई वाघ, हरिश्चंद्र पाटील, जयंतराव पाटील ही त्यावेळची बोर्डीतील उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांना जवळून पाहायला मिळालं. कितीदा तरी आमच्या घराच्या अंगणात ही सारी मंडळी जमून, संध्याकाळी गप्पा मारत. ते दृश्य मला जसंच्या तसं आठवतं. पुढे योगायोगाने अनुताईंची परत भेट झाली. दहा-बारा वर्ष अनुताईंचा अधूनमधून सहवासही लाभला. त्या प्रत्येक भेटीत बोर्डीतल्या आठवणी उजळल्या जात. त्या सुंदर समुद्रकिनार्यावरील रम्य आठवणी बालवाडीतील गमती जमती सार्यांना उजाळा मिळे. आता ही सारी मंडळी काळाच्या पडद्याआड गेली. कधीकाळी बालपणातल्या त्या रम्य आठवणी मनाच्या तळातून उसळून येतात. तेव्हा पहिल्यांदा तो बोर्डीचा अथांग सागर डोळ्यासमोर येतो आणि माझी बालवाडी. छान शेणाने सारवलेली जमीन, कुडाच्या भिंती, ती छोटी छोटी जाती, दाणे कुटायलाला छोटे खलबत्ते, पोस्टाची पेटी, पक्ष्यांची पिसं, शंख शिंपले कागदावर चिकटून केलेल्या आकृती आणि शंखांच्यां माळा! बागेत पाणी घालायला लहान लहान झा-या. किती सुंदर बालवाडी होती! मादाम मॉंटेसरीच्या तत्वावर चालवलेली बालवाडी. पुढे अशीच बालवाडी मला पुण्यात सापडली, प्रमिलाताई बेडेकरांची, रास्ता पेठेत.‘
त्यांच्याशी फोनवरून बोलताना देखील या आठवणी सांगताना त्या रंगून गेल्या होत्या.सुमारे 30 ते 40 मिनिटे सतत आम्ही बोलत होतो. वरील लेखांत त्यांनी केलेले ते बोर्डीच्या सागरी किनाऱ्याचे व बालवाडीचे वर्णन वाचून, आपल्या मनःचक्षु समोर तो काळ उभा राहतो. ”पद्मभूषण ताराबाई मोडक’,या लेखातही मी, त्यांच्या गावाबाहेरील या पहिल्या, बालवाडीबद्दल लिहिले आहे. माझ्याही सुदैवाने,बालपणी मी तेथे काही दिवस गेलो आहे. काय माहीत मंदा ताईंची आणि माझी कदाचित तेथे भेटही झाली असेल? एक योगायोग म्हणजे, माझा शालेय सोबती प्रभाकर झोळ हा मंदा ताईंचा आते भाऊच. प्रभाकरची व संपूर्ण झोळ कुटुंबीयांची खुपच माहिती त्यांचेकडून मिळाली. हे सर्व कुटुंबीय आमच्या कुटुंबाशी परिचित होते. हुशार, कर्तबगार व सालस प्रभाकर चा झालेला दुःखद अंत मनाला खूपच चटका लावून गेला. ती माहिती, ‘माझे शालेय सोबती’, लेखात येईलच. कविवर्य ग. ह .पाटील आणि त्यांचे कुटुंब कधीकाळी बोर्डीचे वैभव होते. हे आज आठवले म्हणजे आम्हाला आजही खूप धन्यता वाटते. दैवयोगाने डाॅ. मंदाताईंशी संपर्क साधू शकलो आणि त्यांचे कडून माहिती व विशेषतः कवींच्या हस्ताक्षरातील एक छोटी कविता मिळाली. हेही माझे सदभाग्य! वयाच्या साठाव्या वर्षी कवींनी लिहिलेल्या त्या कवितेत मला कुठेतरी त्यांच्या मनाच्या कातर तेची जाणीव झाली. संध्याछाया दिसू लागल्यावर, कवी ‘मनी खिन्नपणा दाटत आहे..’, असे म्हणत असला तरी, ‘नको घेऊ देवा शैशवाचा मस्त ठेवा’.. असेही परमेश्वराला विनवीत आहे. यातच त्यांच्या ‘बालपण आणि बालमन’ जीवापाड जपणाऱ्या वृत्तीची खात्री पटते! ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा कविचा असे,’ असे केशवसुत म्हणून गेले. ते खरे तर आपणा सर्वांसाठीच लागू आहे. बालके अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा अतीव आनंद मिळवितात. प्रौढपणी जीवनानंद तेव्हाच सापडतो, जेव्हा आपल्यातलं ‘मूल’ जिवंत असतं. तृप्त, समाधानी, आपले शैशव जपणारा कवीच अशा आनंदी कविता देऊ शकतो. असे बालकांवर व बाल्यावर, जिवापाड प्रेम करणारे, आपल्याशी विश्वाचा ठेवा लावून घेऊ नको असे देवाला विनवीणारे कवी ग ह पाटील, ‘फुलपाखरू’, ‘मामाची रंगीत गाडी’ ,’पाखरांची शाळा’, ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ अशा एकाहून एक सरस व अजरामर कविता लिहू शकले.
जाता जाता मला कवीवर्यांचे बाबतीत पडलेला एक प्रश्न, व त्याचे मला सुचलेलं उत्तर सांगायचा प्रयत्न करतो. कवींनी आपल्या अनुपम कविता वाचून दाखविण्यासाठी आम्हा तिसरी चौथीतल्या अगदी कोवळ्या मुलांचाच गट का निवडला? आपल्या कवितां ऐकविण्यासाठी, त्यांचे पदवीधर विद्यार्थी, शाळेतले शिक्षक, आमच्या शाळेतील सहावी सातवीची मुले यांना न निवडता, आम्हा त्यावेळच्या अजाण मुलांचा गट त्यांनी निवडला. मला वाटते यामागे त्यांचे मुलांविषयी चिंतन व बाल मानसशास्त्राचा अभ्यासही असावा. काव्याची चांगली जाण व समज असणारा श्रोतृवृंद सोडून कवींनी आम्हा अजाण, निरागस मुलांना निवडले. मी विचार करता, ज्ञानराजा ची सुरुवातीची, प्रसिद्ध ओवी आठवली.. आपल्या या काव्याचे श्रवण व ग्रहण कसे करावे, याबाबत सुरुवातीलाच ज्ञानदेवांनी विनविले आहे,
शारदीयेचे चंद्रकळे, माजी अमृतकण कोवळे.
ते वेचती मने मवाळे, चकोर तलगे.
तिये परि श्रोता अनुभवावी हे कथा,
अति हळुवारपण चित्ता, आणोनीया.
ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणांतील, अमृताचे कोमल कण, चकोराची पिल्ले, मृदू मनाने वेचत असतात, त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून, मग, माझी ही कथा अनुभवीली पाहिजे. केवळ काव्य महत्त्वाचे नाही तर त्याचे ग्रहण करणारे मन ही तितकेच सरल व तरल हवे, हेच माउलींनी सांगितले. मुळांत ‘चकोराचे चंद्रकिरणांतील अमृतकण वेचणे’ हीच किती सुंदर कवी कल्पना. पण माऊलींनी त्यांच्या पिल्लांचे, ‘तलगे’ असे रुपक वापरुन, त्यात आणखीन कोमलता, हळुवारता व तरलता आणली आहे. कवींनी आमच्या बालगोपाळांचा गट त्यांचे श्रोते म्हणून निवडतांना हीच तरलता अभिप्रेत असावी.
मंदाताईंकडून कळले कॉलेजांत कविवर्य मानसशास्त्र हा विषय देखील शिकवीत असत. विशेषतः बाल मानसशास्त्र हा त्यांचा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळेच आपली कविता आपण मुलांना समजावून सांगताना, मुलांची आकलनशक्ती आणि मुलांची प्रतिक्रिया समजून घेऊन त्याचा बालशिक्षणात कसा उपयोग करता येईल हादेखील उदात्त हेतू त्यामागे असावा.कवी ग .ह .पाटील कवी म्हणून तर मोठे होतेच पण माणूस म्हणूनही खूप मोठे होते, हेच यातून प्रतीत होते !
महाराष्ट्राचा एवढे महान कवी आमच्या बोर्डीत आले, इतकेच नव्हे तर त्यांच्या मंजुळ आवाजात, त्यांच्या अजरामर कविता आम्ही शालेय वयात ऐकल्या, भरपूर आनंद तेव्हा उपभोगला व त्या दिवसांची आठवण झाल्यावर आजही खूप गंमत वाटते. कवींनी दिलेला हा अक्षय समाधानाचा ठेवाच नाही काय, त्या आनंदाचा ठेवा आजही संपलेला नाही.
कविवर्य गणेश पाटील आज या नश्वर जगात नसले तरी आपल्या अजरामर बाल गीतांच्या रुपाने, लाखो मराठी माणसांच्या मनात कायमचे आहेत. स्वर्गस्थ कवींना मी शेवटी एवढेच सांगून श्रद्धांजली वाहतो
असं समजू नका, आम्ही तुम्हाला नाही आठवत .
सारं शिकवुनही तुम्ही आहात रिक्त.
तुमच्या ऋणातून होऊ का कधी आम्ही मुक्त?
म्हणूनच हे कवी ऋण झालंय व्यक्त!!
कविवर्य गणेश ह. पाटील यांच्या पवित्र स्मृतीला विनम्रभावे प्रणाम!???
सर्व ठीक, तुमच्या लेखाच्या निमित्ताने माझ्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.
-डॉ. मंदा खांडगे
ग.ह. पाटिल , प्रतिभावान कवी . आत्ताच त्यांचं गजरा या स्फुटकवितेचं रसग्रहण ऐकलं . कविता सुंदरचं आहे . आपला मोबाईल नंबर मिळेल का ?
फार सुंदर माझे आधिचे शिश्कण मराठी तून झाले हया कविता त्यांचा इतिहास व त्या वेलचे बोर्डि गाव आपण वेलेचा चांगला सदुपयोग केलात??
हे लेखन करताना लहानपणीच्या कवितांच्या आठवणी तर सुंदर होत्याच पण डाॅक्टर मंदा खांडके यांनी खूप सहकार्य केले.त्यांच्या वडीलांच्या आठवणी जाग्या झाल्या. कोणती कविता केव्हा, कशी लिहीली हेही सांगितले. त्यांच्या सहकार्याने सर्व घटनाक्रमही नीट लावता आला .
माझ्या शाळेत शिकलेल्या कवितांची पार्श्वभूमी वाचताना मजा आलीच पण अजूनही त्या तोंडपाठ आहेत.
धन्यवाद बंधू. आम्ही पण मुलोद्योग शाळेत शिकलो हे आमचे महद् भाग्य. प्रत्यक्ष कविंकडून कविता शिकवली जात असता तेथे ऊपस्थित रहायला मिळणं फार मोठी गोष्ट आहे. तुमच्या लेखांतनं कळतं कि आपल्या बोर्डीत खुप महान व्यक्तींंच वास्तव्य होतं. त्यानींच बोर्डीला पावन केलं आहे.
पूनश्च धन्यवाद.
बंधू खूपच छान माहिती मिळाली. हे सर्व कुठे ही वाचायला मिळाले नाही , आणि मी तर खूप लहान मला हे अजिबात माहीत नाही त्यामुळे खूप आवडले. या सर्व कविता मी शिकले व शिक्षिका असल्यामुळे मुलांना शिकविल्या त्यामुळे अजूनही तोंडपाठ आहेत. . बंधू आपले लिखाण खूपच सुंदर व वाचत रहावे असे असते.धन्यवाद ।
खुप छान लेख .
अप्रतिम लेखन! एका तरल मनाच्या कवीचे तितकेच तरल व्यक्ती चित्रण!
बंधू खूपच छान माहिती मिळाली .हे सर्व कुठे ही वाचायला नाही . आणि मी तर खूप लहान मला हे अजिबात माहीत नाही . त्यामुळे खूप आवडले .या सर्व कविता मी शिकले व मुलांना शिकविल्या.त्यामुळे अजूनही तोंडपाठ आहेत.
ज्योत्स्ना
बंधू, खूप छान लेख आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
रमेश चुरी
खुप छान वाटलं, सुंदर बेार्डीच्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यात , अनेक दि:ग्गजांनी दिलेल्या शिक्षणांच्या समृद्धीतुनच आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनांतही, पाय रेाऊन जीवन आनंदांने जगतां येते ,
आपल्या ह्या अचाट प्रयत्नांच्या फलशृतीला मनापासून मानाचा मुजरा नी ह्या सुंदर वैचारीकतेच मनापासून कैातुक .
मनापासून धन्यवाद , शब्द अपुरे आहेत, ???
बंधु…
लेख नेहमी प्रमाणे दर्जेदार आणि अप्रतिम आहे. आजच्या
पिढीला आपल्या लिखाणातून बोर्डीला किती महान व्यक्तींचा सहवास लाभला होता ह्याची जाणीव करून दिली जात आहे ह्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन!कुणी तरी हे काम करायला हवंच होतं आणि ते आपण यशस्वी रीत्या पार पाडत आहात ह्याचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. लेखात काही गोष्टींची पुनरावृत्ती झाली आहे पण ती प्रसंगानुसार अनिवार्य होती असे मी धरून चालतो आहे. आपल्या पुढील लेखाची वाट पहात आहे.???
या कविता लहानपणापासून मनात रूंजी घालत आहेत. त्यांचा कर्ता आपल्या गावात राहून गेले याचा खूप आन्ंद झाला..
बाभळ्या तलावावरिल काव्यगायनाचा प्रसंग फार तरलतेने वर्णन केला आहे. मनचक्षूःंसमोर सारा परीसर व भारलेलै वातावारण उभे राहिले.
I always felt blessed for borne and brought up in Boardi, such heartfelt write ups emrich me further
मनःपूर्वक आभार.
कविवर्य ग ह पाटील यांचे वरील हा लेख म्हणजे त्यांच्या चरित्र जीवनावर आढावा घेणारा अप्रतिम लेख आहे..
मी मी मराठी तिसरी चौथीत शिकत असताना त्यांना पाहिल्याचे स्मरते .काळी टोपी काळा कोट व स्वच्छ पांढरे धोतर असा त्यांचा साधा वेश असे .डॉक्टर दीनानाथ चुरी यांचे बंगल्याचे मागिल ,बाजूस, असलेले घर हे त्यांचे बोर्डी मधील निवासस्थान होते .वसंत बंधू हयात असतांना त्या घरात जाण्याचा योग आला. त्यांच्या अनेक कविता पैकी बऱ्याच कवितांचा जन्म तेथे झाला आहे फुलपाखरू ही कविता त्यांनी आधी केली होती मात्र नंतर पुन्हा त्यात काही बदल केले .एकदा ते घराबाहेर अंगणात असलेल्या बगिच्यात फिरत होते. श्रावण मास असेल .अनेक रंगीबेरंगी फुलपाखरे उडत होती ते त्यात रमले आणि त्यातून ही सुंदर कविता रचली गेली असे मी ऐकले.
तशा त्यांच्या सगळ्याच कविता फार सुंदर मात्र श्रावण बाळ ही कविता मला जास्त भावली कारण चपखल शब्दालंकार व शब्द रचनेची योग्य सांगड. विशेष म्हणजे हृदयाला पाझर फोडणारी म्हणून दीर्घ काळ मनात घर करुन राहणारी ही कविता साध्या सरळ रचनेमुळे मला आठवते. त्यावेळी गुरुजींनी आम्हाला शिकविलेली कविता आज देखील तोंडपाठ राहीली, कारण ती गोष्ट रूप कविता होती
कवितेची सुरुवातच ,
शर आला तो धावुनी आला काळ विव्हळला श्रावण बाळ
परी झाकुनी हे सत्य कसे राहील विधी लेख न होईफोल.
काळीज त्यांचे फाटूनी शोकावेगे ,ते येतील माझ्यामागे ..
पुढे तर ही कविता आणखीन हृदयाला पाझर फोडते…
घ्या झारी मी जातो त्याचा बोल,लागला जावया खोल..
सोडीला श्वास शेवटला ,तो जीव विहंग फडफडला,
तनु पंजर सोडूनी गेला, दशरथ राजा रडला धायी धायी अडखळला ठाईठाई
खरोखरच समर्पक अशी ही शब्दरचना .
धन्य तो कवी आणि धन्य त्यांची शब्दरचना.ग ह पाटील कवींना अनेक प्रणाम.
कवीवर्य ग.ह.पाटील यांच्या वरील लेख आजच्या तणावपूर्ण वातावरणात मनाला दिलासा देणारा लेख आहे.निसर्गाच्या वर्णनात झाडे झुडपे पक्षी ,प़ाणी पाखरेयासारख्या सजिवांच्या लयबध्द हालचालीच्या,त्यांच्यंतील विविध रंगांच्या छटांचे सौंदर्य आपल्या मनावर अलवार उमटवणारी सोपी कविता वाचली की अगदी ताजेतवाने वाटू लागते.
कवीवर्य पाटील यांनी लिहिलेल्या कविता म्हणजे न संपणारा आनंदाचा ठेवा आहे.
्प़त्येकाने आपल्या बुद्धीने त्याचा आनंद लुटावा.
धन्यवाद दिगुभाऊ.
अप्रतिम, छान, अतिव सुंदर वर्णन करताना शब्द ही सापडत नाहीत, वावा ,धन्यवाद ,आपल्या बंधू चा ,मंदाताई चा मो.न. पाठवा ,त्या नाही ही धन्यवाद देतो .धन नमस्कार?️?☝️?
कवीवर्य ग. ह. पाटील या नावासरशी उसळलेला आठवणींचा सागर….
खूप सुंदर ?
जन येती थोरथोरू
हे बोर्डी चे भाग्य
आणि अशा बोर्डीत तुम्ही होता हे तुमचे परम भाग्य
?
सर,
अतिशय सुंदर लेख
बाल साहित्यिक व कवी प्राचार्य ग.ह.पाटील यांच्या स्म्रुतीस शतशः प्रणाम.
लेख वाचतांना आपल्या साहित्य क्रुती मधुन निसर्ग सौंदर्याच्या अव्दितीय अनुभूतीचा आस्वाद व अलैकिक आनंद मिळतो .
१)डराव डराव का ओरडता उगाच राव
२)छान किती दिसते फुलपाखऱू
३)पाखरांची शाळा भरे पिंपळावरती
४)माझ्या मामाची रंगीत गाडी हो
या कवितांच्या ओळी वाचताना बालपणीच्या सुखद आठवणीचा आभास होतो .
खरं सांगू, मी हा लेख तीन वेळा वाचला. त्याला कारणही तसेच होते. एक म्हणजे फुलपाखरू, मामाची रंगीत गाडी, श्रावणबाळ ह्यासारख्या लहानपणी शिकलेल्या पण अजूनही तोंडात रेंगाळणाऱ्या कवितांचा जन्मदाता श्री ग ह पाटील सरांची तुम्ही करून दिलेली ओळख. मागे म्हटल्याप्रमाणे मला बोर्डीची असुया वाटते कारण इतक्या महान व्यक्तींचे तिथले वास्तव्य आणि तुम्हा लोकांना योग्य वयात त्यांचा मिळालेला सहवास. तुम्ही त्याचे सोने केले हे सांगणे न लगे.
तुमच्या ह्या लेखाने मला माझ्या गावी नेले. घुंगरू असलेली गाडी, समुद्र किनारा, वाळूची घरे, शंख शिंपले, शेती, फुलझाडे आणि निस्वार्थी, प्रेमळ निसर्ग ह्याचा परत अनुभव घेता आला. धन्य ती बोर्डी, ते शिक्षकगण आणि त्यांचे विद्यार्थी.
खूपच छान आणि माहितीपूर्ण लेख आहे, शाळेत असताना कवीवर्य ग. ह. पाटील यांच्या कविता/गाणी वाचलेली आणि ऐकलेली असायची, त्या महान कवींना आदरांजली!
कवीवर्यांची माहिती जमा करीत असताना मी आपल्या वेबसाईटला भेट दिली.
त्यांनी लिहिलेल्या कविता/गाण्यांवर १९६५ साली बालभारतीने चक्क ध्वनिमुद्रिका बनविल्या होत्या, हे कित्येकांना माहीतच नसेल, त्या ध्वनिमुद्रिकेची छायाचित्रे आणि ती गाणी माझ्या ब्लॉगवर दोन दिवसात पाहावयास/ऐकावयास मिळतील, कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या.
माझ्या ब्लॉगची लिंक: https://charudattasawant.com/
ऋण झुण पाखरा हुं!!हुं!!
जा माझ्या माहेरा हुं!!हुं!!स
नमस्कार, माझे आजोबा, पद्माकर जोशी, वय वर्ष ७९, हे खूप वर्षांनी पुण्यात आले आहेत. त्यांच्या ही काही पाटील सरांबरोबरच्या आठवणी आहेत. पाटील सरांचे सुपुत्र नंदकुमार यांचे आजोबा मित्र आहेत. आजोबांना त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे. आजोबांना शाम सर ही ओळखायचे असं ते सांगतात. मला त्यांचा पत्ता किंवा फोन नंबर मिळेल का? त्यांच्या बालपणीच्या भरपूर आठवणी ते सांगतात…please शक्य झाल्यास reply करावा ???
धन्यवाद काश्मीरा मॅडम ,
पाटील सरांचे ज्येष्ठ चिरंजीव,मान. शामराव यांचा फोन नंबर तुमच्या gmail अकाउंटवर पाठवतो
आपल्या आजोबांना निश्चितच आनंद होईल. भेट झाल्यास जरूर कळवा.
दिगंबर राऊत.