आप्पांची पत्रे भाग-१

मी 1959 साली बोर्डी सोडून पुढील शिक्षणासाठी साताऱ्याला प्रस्थान ठेवले. तेव्हापासून आजतागायत माझा बोर्डीचा रहिवासी म्हणून संबंध संपला.  मी माझ्या जन्मगावापासून दुरावलो तो कायमचा!

आप्पांनी आम्हा भावंडांना विशेषतः मी व अण्णा, आमच्या शिक्षण कालखंडात पाठविलेली ही काही पत्रे. आम्हाला, कष्ट करण्यासाठी, व मनाला  उभारी देण्यासाठी खूप उपयोगी ठरली आणि आज तो आमच्यासाठी, व आमच्या भावी पिढीसाठी एक अनमोल ठेवा झाला आहे. आप्पांच्या हस्ताक्षरातील ही पत्रे सुमारे 1959 सालापासून आहेत, मात्र आज 1961 कालांतील काही पत्रे उपलब्ध आहेत, त्यांतील चार पत्रांचा येथे उल्लेख करीत आहे.

हा 1961 साला नंतरचा कालखंड आप्पांना आर्थिक नियोजनासाठी खूपच कठीण होता. कारण मी, आणि अण्णा आम्ही दोघेही जोगेश्वरीच्या इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये वस्तीगृहात राहून उच्च शिक्षण घेणार होतो. अण्णा प्रथम वर्षाला होता तर मी, बी एस सी (B.Sc.) या पदवी परीक्षा अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणार होतो. त्यामुळे आप्पांच्या तुटपुंज्या पगारात आम्हा दोघांचा वसतिगृह, राहणे, जेवणे, कॉलेज व इतर खर्च भागवणे खूपच कठीण होते. त्यामुळे आप्पा, नेहमी शिष्यवृत्त्या व अनेक संस्थांकडून मिळणारी आर्थिक मदत यांची सतत चौकशी करीत राहात व त्याप्रमाणे आम्हाला कळवून, आमच्याकडून त्यासाठी अर्ज पाठविले की नाही याची चौकशी करीत. आप्पांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वतःला जास्त फिरता येत नसे त्यामुळे आमच्या सबंध कॉलेज जीवनात त्यांनी कधीही, कॉलेज अथवा वसतिगृहात भेट दिली नाही. मात्र खंडू मामा आणि त्यांचे काही शिक्षक सहकारी यांच्या कडून व पेपरात वाचून ते, विविध शिष्यवृत्या व मानद संस्थाकडून मिळणारी आर्थिक मदत यांचा शोध घेत राहत व त्याप्रमाणे आम्हाला सतत कळवून, आम्ही ही त्यासाठी  प्रयत्न करावे याचा पाठपुरावा करीत.  याबाबतीत खंडू मामा हा त्यांचा मोठाच आधार होता आणि तो मात्र आम्हाला आमच्या वसतीगृहात येऊन सर्व  मदत व माहिती देत असे. या पत्रात उल्लेखलेला भारत म्हणजे गोंडू मावशीचा दीर आणि कै. नारायण अण्णांचा सर्वात लहान भाऊ. तो देखील त्यावेळी आमच्याच इस्माईल युसुफ कॉलेज जोगेश्वरी येथे हे शिक्षण घेत होता. आप्पांची ही पत्रे वाचल्यानंतर त्यांनी सतत आमच्या शिक्षणासाठी वाहिलेली काळजी व त्यासाठी प्रकृती अस्वस्थ्य असूनही केलेले अथक प्रयत्न यांची कल्पना येते. म्हणून त्यातील काही पत्रांचा, जी सुदैवाने आमच्या संग्रही आहेत मुद्दाम प्रकाशित करीत आहे. एका सामान्य, साध्या शिक्षकाने, कोणते ही विशेष आर्थिक पाठबळ नसताना, आपल्या या तुटपुंज्या पगारातून, आपल्या दोन्ही मुलांना वसतिगृहात दाखल करून, त्यावेळी आपला चरितार्थ कसा चालविला असेल  याची कल्पना यावी त्याकरिता हा प्रयत्न  करीत आहोत. आप्पांचा प्राथमिक शिक्षक म्हणून मासिक पगार,   त्यावेळी केवळ एकशे दहा (₹110) रुपये होता. तरीदेखील त्यांनी, आम्हाला शिक्षण कालात, बाहेर गावी वास्तव्य असताना कोणत्याही नातेवाईकाचे घरी न ठेवता, वा कोणाही कडून फुकट मदतीची याचना न करता हा सर्व प्रपंच केलेला आहे, म्हणून  याचे महत्त्व! धन्यवाद.