आप्पांची पत्रे भाग-९
आप्पांच्या पत्राचा 9 वा भाग आज प्रसिद्ध होत आहे. जानेवारी 1975, ते ऑगस्ट 1976 या दरम्यानची, ही पत्रे आहेत. 19 75 जानेवारी मध्ये आप्पांना आजारपणामुळे नानावटी हॉस्पिटल विलेपार्ले येथे एडमिट केले होते. प्रकृती सुधारल्यावर त्यांना अंधेरीच्या घरी विश्रांतीसाठी थोडे दिवस राहावे लागले. याच सुमारास घोलवडला विहिरीचे कामही घेण्याचे ठरत होते. त्यामुळे, मी व अण्णा, आमची धावपळ चालू होती. त्याची काळजी आप्पांना वाटत असल्याचा, पत्रात उल्लेख आहे. एप्रिल 1975 रोजी गुरुवार होता व त्यांच्या ‘गुरूनिष्ठे’नुसार, हे शुभकार्य त्या दिवशी सुरू झाले व पुढे विहिरीला पाणी लागून ते यशस्वीही झाले.
ते मार्च 1975, मध्ये घोलवडला घरी आले व त्यांना डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे इंजेक्शनचा, कोर्स चालू केला. औषधांची रिॲक्शन येऊन त्यांचा अशक्तपणा वाढला होता. डॉक्टर आपटे यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असल्यामुळे तशी कोणतीच काळजी त्यांनी व्यक्त केली नाही. काही दिवसांनी पुन्हा सर्व ठीक झाले. प्रत्येक वेळी, भाऊ व नादर शेठ (पारशी गृहस्थ), यांनी केलेल्या मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.
बापू त्यावेळी 5 वर्षाचा झाला होता व त्याच्या फेऱ्या मुंबई -घोलवड अधून मधून होत असत. त्याचा आप्पांना मोठा आनंद होत असे. त्याने असेच येथे यावे, ही त्यांची इच्छा होती. एका फेरीत त्याने आप्पांना, “मला विमान घेऊन द्या, मग मी येथे पुष्कळ वेळा येईन”, असे काहीतरी सांगितले असावे. व त्याचाही गमतीशीर उल्लेख एका पत्रात आप्पांनी केला आहे. “तुला जरूर विमान पाठवून देतो” असे आश्वासन आहे.
नीलम त्यावेळी नोकरीस लागली होती, परंतु तिला एस एन डी टी युनिव्हर्सिटीची परीक्षा द्यावयाची होती. तिला मार्गदर्शनाची आवश्यकता व्यक्त केली आहे.
सौ. अरुणा व भाई यांच्या विरार येथील वास्तव्याची, नातवंडांची विचारपुस केली आहे.
पपीचे ही वास्तव्य मुंबईस, असून त्याचे महाविद्यालयीन शिक्षण चालू आहे. त्याची प्रकृती व अभ्यासाची काळजीही आप्पांना आहे.
1976 सालापासून आप्पांच्या प्रकृतीला खूपच अशक्तपणा जाणवू लागला, प्रकृती ढासळू लागल्याचे दिसून येते.
मधल्या काळात, जुलै 75 मध्ये अण्णी (सौ.अरूणा) ची प्रकृती ही थोडीशी बिघडलेली होती, याची काळजी आप्पांच्या पत्रात आहे. व ‘प्रकृतीला जप’, असा सल्ला आहे. त्यावेळेचे आप्पांचे डॉक्टर आपटे यांचे विषयी ही त्यांनी दिलेल्या उपचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली…. त्यानंतरचा भाग पुढील पत्रात येईलच.