कै.पूज्य तात्यासाहेब चुरी वसतिगृह माजी विद्यार्थी संघ

  कै. पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर, प्रवेश द्वार. 
मागे कै. तात्यासाहेब चुरी स्मारक,विद्यार्थि वस्तीगृह.दादर.

 ‘कर्मे इशू भजावा’ असे ज्ञानदेव आपल्या भक्ती कल्पने विषयी सांगताना म्हणतात. त्यांची भक्ती दैवी गुणसंपन्नतेचा पुरस्कार करते. आचरण शुद्ध ते वर भर देते. नराचा नारायण कसा होईल  हे  सांगणारी आहे. सर्वसमावेशक, समन्वयशील आहे. साऱ्या समाजाचे सर्व क्षेत्रांतील उत्थ्थापन कोणत्या भूमिकेमुळे होईल याची दिशा ती दाखवते. मंदिर, पूजाअर्चा, कर्मकांड यांचेशी निगडीत न होता, विश्वात्मक देवाची उपासना सांगते. स्वकर्म कुसुमांजली ने, या सर्वात्मक विश्वेश्वराची पूजा बांधावी, असा संदेश देते. समाजाची विवेक शक्ती जागृत करते. आमचे मराठी संत केवळ टाळकुटे नव्हते. समाजात राहून, संसार सांभाळून, परमेश्वराची पूजा करता येते. आपले व आपल्या बरोबर समाजाचे ही भले करता येते. प्रबोधन करता येते. हा आमच्या सर्व संतांच्या शिकवणीचा सारांश आहे. समाजाकडे पाठ फिरवून, ‘आपण तरलो म्हणजे झाले’ असा विचार करणारी आत्मकेंद्रित मंडळी आज खूप दिसतात. अशा स्थितीत, “आपल्या मागून  येणाऱ्या  मित्रांसाठी देखील  काहीतरी असे करूया, जेणेकरून त्यांचे कष्ट थोडे कमी होतील”.. असा विचार कोणी केला  तर, ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’..  या उक्तीनुसार प्रत्यक्ष प्रचिती चा अनुभव  आल्या शिवाय राहणार नाही.

    ही एवढी प्रस्तावना करण्याचे कारण, 1998साली, आमच्या कै.पूज्य तात्यासाहेब चुरी स्मारक वस्तीगृहाच्या, काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, ‘माजी विद्यार्थी संघ ‘ स्थापन करण्याचा केलेला उदात्त विचार.

   सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी समाजातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईत वास्तव्याकरिता हे वसतिगृह, भवानी शंकर रोड, दादर पूर्व, येथे 1960- 61 साली सुरू करण्यात आल. या वसतिगृहात राहून, समाजातील अनेक तरुण, उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकले. शिक्षणानंतर, अनेकाविध क्षेत्रात शिरकाव करून, या युवकांनी आपल्या कार्याचा उल्लेखनीय  ठसा आपल्या क्षेत्रात उमटविला.या वसतिगृहाचे अनेक माजी विद्यार्थी आज, अनेक छोट्या मोठ्या उद्योगांचे मालक झालेले आहेत अथवा विविध क्षेत्रांत मोठमोठ्या पदावर काम करीत आहेत. अनेकांनी उद्योग व्यवसायांत धवल यश मिळविले आहे. या सर्वांना एकत्र आणून त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवांचा फायदा समाजांतील तरुण पिढीला करून द्यावा व त्याच बरोबर सामाजिक ऋणाचे उत्तर दायित्व मान्य करून ,त्या ऋणातून अंशतः का होईना मुक्त होण्यासाठी,पुढील पिढीला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन करावे ,यासारख्या अनेक ध्येय धोरणासाठी माजी विद्यार्थी संघाची स्थापना झाली. त्या ध्येयधोरणांचा एक भाग म्हणून  शिष्यवृत्ती योजना अमलांत आल्या. परदेशी शिष्यवृत्ती चा कार्यक्रम ही हाती घेण्यात आला. विद्यार्थी दत्तक योजना ही एक अभिनव कल्पनाही राबविण्यात आली.  तरुण पिढीला व्यवसाय मार्गदर्शन मिळणेही आवश्यक होते. केवळ नोकरीलाच  प्राधान्य न देता स्वतंत्र उद्योग व्यवसायाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, म्हणून योग्य मार्गदर्शन ही करावयाचे होते. समाजांतील व समाजा बाहेरील उद्योजक यांची मदत घेऊन हे काम करणे आवश्यक होते . तरुणांना मार्गदर्शन ,प्रोत्साहन द्यावे हा हेतू ठेवला होता.  काही काळ वसतिगृहात एकत्र सहजीवन घालविलेल्या सगळ्या मित्रांनी, भविष्यातही एकमेकाशी मैत्री युक्त परिचय दृढ करावा व त्यांच्या विचारांचे अधूनमधून आदानप्रदान व्हावे असेही वाटत होते. 

याच बरोबर ,आणि एक महत्त्वाचा विचार आम्हा मंडळी पुढे होता, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात ही आमची बरीचशी मंडळी विखुरली आहेत. त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र आणून ,आपल्या समाजासाठी त्यांचेही योगदान मिळावे ही भावना त्यात होती.  थोडक्यात, अगदी शालेय शिक्षण घेणाऱ्या समाजांतील गरीब परंतु होतकरू विद्यार्थ्यांपासून ,ते अगदी परदेशी शिक्षणाची महत्त्वाकांक्षा व गुणवत्ता दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना जमेल तेवढे मार्गदर्शन ,आर्थिक मदत, व प्रोत्साहन मिळावे ही प्रामाणिक इच्छा, माजी विद्यार्थी संघ स्थापने मागे होती. 

  तात्यासाहेब चुरी स्मारक वस्तीगृहाच्या , सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली  संघटना स्थापन करण्या मागील पार्श्वभूमी, संघ स्थापनेत आलेल्या काही अडचणी, हा संघ स्थापित व्हावा, कार्यान्वित व्हावा ,म्हणून समाज बांधवांनी दिलेले भरघोस आर्थिक मदत,संघाची पहिल्या तीन-चार वर्षांतील वाटचाल,व आज 22, 23 वर्षानंतर माजी विद्यार्थी संघाने केलेली नेत्रदीपक प्रगती ,या सर्वाचा थोडक्यात आढावा घेऊन आठवणीरुपी इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

माजी विद्यार्थी संघाला ,अगदी स्थापनेच्या वेळी, 2 लाख 50 हजार रुपयाची उदार देणगी देणारे कै. खासदार मोरेश्वर सावे, औरंगाबाद.

   मी या माजी विद्यार्थी संघाच्या स्थापने आधीपासून, एक सक्रीय कार्यकर्ता, पुढे पहिला अध्यक्ष व सध्या एक सल्लागार म्हणून अजूनही संघटनेशी संलग्न आहे. काही आठवणी जागवत आहे. हा इतिहास नाही. मात्र या टिप्पणीला आठवणीरुपी इतिहास, असे फारतर म्हणू शकतो. या आठवणी इतिहास जमा होण्याआधी, कुठेतरी नोंदवून ठेवाव्यात,एवढ्या प्रामाणिक भावनेने हे लिखाण करतो आहे .वाचकांनी व मित्रांनी हा दृष्टीकोन लक्षात घेऊन, माझ्या हातून काही घटना वा व्यक्तींचा उल्लेख, अनवधानाने राहून गेला असल्यास त्याबद्दल मी प्रथमच दिलगिरी व्यक्त करीत आहे. जाणकार मित्रांना विनंती आहे, या लेखात ऊणे असलेली माहिती कृपा करून, प्रतिक्रिया म्हणून ,लेखा खालीच दिलेल्या प्रतिक्रिया स्तंभात सविस्तर लिहिल्यास, सर्वांनाच मदत रूप होईल.

 माजी विद्यार्थी संघाचे सुरुवातीचे देणगीदार श्रीयुत पुरूषोत्तम भाई कवळी, आगाशी, देणगी रुपये एक लाख           

        1970 ,साली  सो.क्ष समाजोन्नती संघाला 50 वर्षे झाली. त्यानिमित्त बोर्डी येथे एक सुवर्णमहोत्सवी सोहळा संपन्न झाला.मी त्यावेळी तात्यासाहेब चुरी स्मारक वसतिगृहाचा रेक्टर म्हणून काम पाहत होतो. वसतिगृह स्थापन होऊन सुमारे आठ वर्षाचा कालावधी झाला होता. या कालखंडात आमच्या समाजातील अनेक तरुणांनी महाविद्यालयीन व तत्सम उच्च शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहात राहून आपला शिक्षणक्रम पूर्ण केला होता.त्यामुळे समाजातील अनेक सुशिक्षित ,उच्चविद्याविभूषित मित्रांच्या सहजीवनातून परस्पर परिचय होत होता . समाज जीवनांत, प्रथमच अशी विचारांची देवाणघेवाण होत होती.  प्रत्येक पुढच्या पिढीत,मागच्या पिढीच्या विचारांशी थोडा असमतोल निर्माण होतोच.त्याप्रमाणे आमच्याही समाजांतील, मागची पिढी व आमची पिढी यात थोडा वैचारिक संघर्ष सुरू झाले होते.  ते साहजिकही होते. हे केवळ मतभेद होते मनभेद कधीच नव्हते .आपल्या समाजासाठी काहीतरी करावे, ही ईर्षा प्रत्येक समाज कार्यकर्त्याचा निश्चितच असते फरक फक्त आपल्या कार्याची दिशा व आपले इप्सित मिळवण्यासाठी माध्यमनिवड,यातच असतो . आम्हा समविचारी तरुणांना,’आपण समाजासाठी काहीतरी करावे’, असे जरी वाटत असले, तरी ते कसे करावे याचा उलगडा होत नव्हता. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या समाजाच्या माध्यमाद्वारे आपले काम करावे ,अथवा आपले एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून ,आपल्या परीने योगदान द्यावे,असे दोन विचारप्रवाह मित्रांमध्ये  होते. बहुतांश माजी विद्यार्थ्यांना, ‘आपणास अस्तित्वात असलेल्या सामाजिक चौकटीतून काम करणे कठीण ‘,जाईल अशी भावना असल्याने,’आपले एक स्वतंत्र व्यासपीठ असावे’, असे वाटत होते.

 माजी विद्यार्थी संघाला, दीड लाख रुपयांची देणगी, सुरुवातीला देणारे, माजी विद्यार्थी व प्रख्यात उद्योजक श्री नरेश भाई राऊत, बोर्डी.

    बोर्डी येथील सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात, आम्ही विद्यार्थी मित्रांनी,आमच्या समाज नेतृत्वाला,’अधिवेशनाच्या एकूण कार्यक्रमात ,एक तासभर तरी युवा परिसंवादासाठी ठेवावा’, अशी विनंती केली. ती मान्य झाली. ते युवा संमेलन खूप गाजले. त्याचा लेखाजोगा माझ्या पूर्वीच्या लेखात आलेलाच आहे. विशेषतः परिसंवादातील माझ्या भाषणां नंतर तत्कालीन समाज धुरिणांत थोडा असंतोष निर्माण झाला. मलाही ते जाणवले. कारण त्यावेळी मी वसतिगृहाचा रेक्टर होतो. त्यामुळेच ‘समाजाच्या चौकटीत राहूनच आपल्याला सामाजिक कार्य करणे थोडे कठीण जाईल’, हा आमचा विचार पक्का झाला. माजी विद्यार्थी संघाची स्थापना झाल्यास बरे असे वाटले. जरी हा माजी विद्यार्थी संघ स्वतंत्र असला तरी त्याचे काम व सामाजिक उद्दिष्टे, ही  समाजहितैषी व सो क्ष संघाच्या उद्दिष्टांना मदतरूप ठरणारी असावीत असे आम्ही ठरविले.  यावेळी माझ्या सोबत असणारे आमचे वसतिगृहातील सहाध्यायी श्रीयुत रवींद्रनाथ ठाकूर(आता कै) ,डॉक्टर गजानन वर्तक(आताकै), डॉक्टर भार्गवराम ठाकूर श्रीयुत सदानंद राऊत श्री प्रमोद वर्तक श्रीयुत मधुकर के वर्तक(आता,डाॅ), श्रीयुत रमेश सावे,श्री.प्रभाकर ठाकूर श्री.श्रीनिवास सुरी(आता कै),श्री.संदीप भालचंद्र वर्तक, श्री.नरोत्तम कृष्णाजी चुरी,प्रो. प्रकाश हरी राऊत  हरिहर आत्माराम ठाकुर(आता कै),श्री.नरेंद्र डी वर्तक,श्री.मनोहर कृ चौधरी, श्री.श्रीकांत राऊत, श्री.दिनकर बा वर्तक ,.ई.,मंडळीची नावे आठवतात. त्यावेळी आमचे सहाध्यायी नसले तरी काही वर्षानंतर वस्तीगृहात आलेले व पुढे रेक्टर झालेले, आज आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाज अमरावती संघाचे विश्वस्त असलेले, डॉ. सदानंद कवळी, यांनी ही ,विद्यार्थी संघ स्थापनेच्या काळात मोठा हातभार लावलेला आहे. दुसरेही अनेक मित्र होते. सर्वांचा नामोल्लेख करायला पाहिजे, मात्र ते शक्य होत नाही.सर्व मित्रांनी हा संघ स्थापनेचा विचार मात्र पक्का केला. पुढे 1971 साली, मी वसतिगृह कारभार सोडला व स्वतंत्रपणे माझ्या व्यावसायिक व सांसारिक जीवनाला सुरुवात झाली. माझे सर्व सहकारी व मित्र देखील आपापल्या संसारात रममाण झाले. गृहस्थाश्रमाचा व व्यावसायिक जीवनाच्या सुरुवातीचा ,अत्यंत कष्टमय असा तो कालखंड होता. सहाजिकच 19 70 साली पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी, अजून 28 वर्षे जावी लागली. येथे विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आमच्या सो क्ष संघाच्या तत्कालीन अध्यक्षा, माननीय तारामाई वर्तक यांनी, स्वतंत्ररित्या माजी विद्यार्थी संघ स्थापनेला पाठिंबाच दिला होता. आर्थिक निधीची गुंतवणूक करताना सो क्ष संघ व मा वि संघ यांना संलग्न रित्या काही योजना राबविता येतील का याचाही त्यांनी विचार करण्यास सांगितले होते. माईंचे याबाबतीत विचार अगदी दूरगामी  होते मात्र त्याबाबतीत सर्वांची एकवाक्‍यता न झाल्याने, शेवटी एक स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचे ठरविले. माईंनी आमच्या कामाची घेतलेली दखल व केलेले मार्गदर्शन आमच्या नेहमीच स्मरणात राहील.

अर्थातच एवढ्या दीर्घ कालखंडात ,मी माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने, जरी भारत व जगभर फिरत असलो, तरी समाजाप्रती असलेले माझे योगदान इतर प्रकारे देतच होतो. ‘सेतू को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या’ स्थापनेचे ही काम,त्या कालखंडात सुरू होते. 1984 साली सोसायटी स्थापन होऊन ते पूर्ण झाले.मात्र माजी विद्यार्थी संघाची स्थापना होण्यास 1998 साल उजाडावे लागले हे खरे. या प्राथमिक अवस्थेतील संघाच्या निर्मितीच्या कल्पने मागे, ज्या तीन पाठीराख्यांनी सदैव प्रोत्साहन दिले त्या, सौ. सुशीला (दीदी) हरिहर राऊत, बोर्डी श्री रमेश चौधरी, मुंबई  व डॉक्टर देवराव पाटील, चिंचणी, बोरीवली या तिघांचा उल्लेख मुद्दाम करतो.स्वतः माजी विद्यार्थी नसताना, संघाची स्थापना व्हावी ,या कल्पनेचा पाठपुरावा त्यांनी केला व आम्हाला प्रत्यक्ष सहयोग दिला आहे.

माजी विद्यार्थी संघाला पहिल्याच वर्षी रुपये दीड लाख देणगी देणारे आमचे माजी विद्यार्थी, एक प्रख्यात उद्योजक, श्री. अशोक पाटील. त्यांनी पुढे आमच्या संघास, विविध उपक्रमास, देणग्या दिल्या आहेत.

 मधल्या पंचवीस वर्षाच्या काळात,  निधी उभारणीसाठी ‘वाजे पाउल आपले’, या एका विश्राम बेडेकर लिखित नाटकाचा प्रयोग आम्ही हौशी तरुण मंडळींनी एकत्र येऊन ,कै राघवेंद्र पाटील यांच्या नेपथ्या खाली, परळ मधील दामोदर हॉलमध्ये सादर केला होता. त्यालाही खूप यश मिळाले. थोडे पैसेही जमा झाले. ‘क्षात्रसेतू’ या समाजाच्या धुरिणांनी सुरू केलेल्या मासिकाचे  पुनरुज्जीवन करून, आम्ही ते पुन्हा सुरू केले.अशा रीतीने, एकत्र येण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, मिळणारी प्रत्येक संधी घेऊन ,काहीतरी लहान सहान काम चालू ठेवले होते.  मुख्य प्रश्न हा निधी संकलन हा होता. प्रत्येक सभासदा कडून वर्गणी, देणगी ,घेऊन काही फंड उभा झाला होता. मात्र माजी विद्यार्थी संघातर्फे शिक्षण शिष्यवृत्त्या व विशेषतः पुच्छ व परदेश शिक्षणासाठी मदत देण्यासाठी ,अजूनही काहीमोठ्या देणग्या जमविणे जरुरी होते. सोमवंशी क्षत्रिय संघाकडून मिळणारी शैक्षणिक मदत,त्या वेळेस विद्यार्थ्यांना अपुरी पडत होती.सुमारे शंभर रुपये वार्षिक एवढी मदत प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय शिक्षणक्रमात व तीनशे ते चारशे रुपये महाविद्यालयीन शिक्षण क्रमात मिळत असत. आणि म्हणूनच एक मोठा निधी उभारून, शक्यतोवर जास्त मदत, गरजू विद्यार्थ्यांना मिळावी ,हा हेतू होता. माजी विद्यार्थी संघाची मुख्य व ठळक उद्दिष्टे खालीलप्रमाणे ठरविण्यांत आली.

  • वसतिगृहाच्या माजी व आजी विद्यार्थ्यांमध्ये स्नेह वृद्धिंगत  करणे
  • आजी व माजी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासाठी देशांतर्गत, वा परदेशी जाणार्‍या हुशार परंतु गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने काही मदत योजना राबविणे
  • व्यवसाय व शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा चालविणे
  • वाचनालय पुस्तकालय ग्रंथालय संगणक मार्गदर्शन अभ्यास केंद्र सांस्कृतिक केंद्र इत्यादी मार्फत समाजातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे जाणीव करून देणे

    वर सांगितल्याप्रमाणे या विविध व व्यापक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आर्थिक निधीची संघाला गरज होती त्यामुळे समाजहितैषी बंधू-भगिनींना आम्ही आवाहन तर केले पण प्रत्येक माजी विद्यार्थ्याने सभासद होऊन संस्थेचा आर्थिक व सामाजिक पाया विस्तृत करावा ही विज्ञापना केली. आजीव सभासदत्व एका हप्त्यात एक हजार रुपये किंवा दोन हप्त्यात प्रत्येकी पाचशे रुपये देऊन करता येईल ही अट ठेवली. त्याचप्रमाणे  जरी काही मित्र वसतिगृहाचे माजी विद्यार्थी नसले,तरी त्यांनाही रुपये 1500 भरून  ‘हितचिंतक’, म्हणून संघाचे सभासद होता येईल असे ठरविले व आर्थिक निधी गोळा करण्याचे काम सुरू केले. या ठिकाणी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ,प्रत्येक संस्थापक सदस्याने हजार रुपये आजीव सदस्य वर्गणी व चार हजार रुपये देणगी अशा रीतीने,प्रत्येकी पाच हजार रुपयाचे योगदान ,सुरुवातीला दिलेले आहे. त्यामुळे आमचा निधी वाढण्यास सुरुवातीला खूप मदत झाली.

   माजी विद्यार्थी संघाचा मुख्य  कार्यक्रम विद्यार्थ्यांना भरीव शैक्षणिक मदत असा होता. त्यात तीन टप्प्यांनी ही मदत व्हावी असे ठरविले होते.पहिला टप्पा इयत्ता पाचवी ते दहावी, तर अकरावी,बारावी  हा दुसरा टप्पा .हे भाग शालेय विद्यार्थ्यां साठी होते. त्यांना देण्यात येणारी मदत परत फेडीची नव्हती. तिसऱ्या टप्प्यात बारावीनंतरच्या व्यावसायिक, पदवी शिक्षणाकरिता हुशार मुला-मुलींना शिष्यवृत्त्या व शैक्षणिक मदत देण्याचे ठरविले होते .शिष्यवृत्ती चे स्वरूप परतफेडीचे असेल हे ठरविले. प्रत्येक शिष्यवृत्ती अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत या कालावधीसाठी दर वर्षी दिली जाईल शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक रुपये 10,000, इतकी असेल,हे ठरले. परदेशी उच्च शिक्षणासाठी ही रक्कम विद्यार्थ्याला एकदाच,रुपये 25,000 इतकी देण्याचे ठरविले. शिष्यवृत्ती देताना माजी विद्यार्थी संघ सभासद व हितचिंतक यांच्या पाल्यांना प्राधान्य दिले जाईल,हे धोरणात्मक ठरविले.अशा काही अटी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती घेऊन, आपला अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत,पाळावयाच्या होत्या. त्यानंतर अभ्यासक्रम झाल्या वर ,आपल्या शिष्यवृत्तीची रक्कम ,एकदम अथवा हप्त्याहप्त्याने परत करावी असे ही निश्चित केले होते.

    माजी विद्यार्थी संघातीलच कांही तरुण मित्रांनी ‘वाडवळ ई ग्रुप’ नावाचा एक दुसरा ग्रुप स्वतंत्रपणे स्थापन केला. विशेषतः जे तरुण देशात व परदेशात शिक्षणासाठी बाहेर आहेत त्यांच्या उच्च शिक्षणाचा व अनुभवाचा लाभ गरजू विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी या तरुण वर्गाला एकत्र आणून एकमेकांच्या विचारांची, ज्ञानाची, अनुभवांची, देवाणघेवाण व्हावी व त्यातूनच ,सामाजिक ऋणाची जाणीव ठेवून ,गरीब होतकरू हुशार मुला-मुलींना काही आर्थिक मदत ही करता यावी, या जाणिवेतून त्यांनी, ‘विद्यार्थी दत्तक योजना’, सुरू केली. हे खुपच स्तुत्य असे काम होते व या माध्यमातून समाजांतील तरुण व मुंबईबाहेर कार्यरत असलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांशी संपर्क होणार होता.या शालेय विद्यार्थी दत्तक योजनेमार्फत इयत्ता पहिली ते बारावी या शैक्षणिक कालावधीतील निवडलेल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना दरवर्षी उत्तीर्ण झाल्यास पुस्तकांची युनिफॉर्मची व शाळेची फी असा खर्च योजनेमार्फत केला जाणार होता. माजी विद्यार्थी संघाची संलग्न राहूनच हे काम त्यांनी चालू केले होते. या ‘वाडवळ ई ग्रुप’  संकल्पनेमध्ये व स्थापनेमध्ये ,अगदी प्राथमिक अवस्थेत, मूळ संकल्पना व त्याबाबत इतर मित्रांशी, विचार विनिमय करण्याचे श्रेय श्री. अमित सावे व कु. नीलांबरी रमेश सावे या दोघांना द्यावे लागेल. विशेष म्हणजे, अमित त्यावेळी लंडनमध्ये व्यवसायानिमित्त होते तर नीलांबरी ही न्यूयॉर्कमध्ये शिक्षणासाठी गेली होती. तेथून सर्वांशी संपर्क साधून या दोघांनी,एका सुंदर कामाचा शुभारंभ केलेला आहे .त्यानंतर या ग्रुप मध्ये सामील झालेले इतर मुख्य सदस्य म्हणजे श्री. अमित सावे, कुमारी स्वप्नाली राऊत, श्री.विवेक राऊत व श्री. सुहास राऊत, यांनीही पुढाकार घेतला. आमच्या माजी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते श्रीनिवास चुरी व रमेश सावे यांचे मार्गदर्शन त्यांना सतत मिळत होते. त्यांचे हे काम अजूनही व्यवस्थित चालू असून सध्या आय टी आय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील दत्तक योजनेची मदत मिळत असते.

माजी विद्यार्थी संघाला, अगदी पहिल्या वर्षी ,एक लाख रुपयांची देणगी व त्यानंतर काही उपक्रम व कार्यालयीन जागेच्या खरेदीसाठी मदत म्हणून ,एकूण साडेतीन लाख रुपयांची भरघोस देणगी देणारे, आगाशी चे श्री पुरुषोत्तम भाई अनंत कवळी.

     सैन्य ज्याप्रमाणे पोटावर चालते त्याप्रमाणे सामाजिक संस्था देखील, कार्यकर्ते आणि आर्थिक बळ या दोन चाकावर पुढे जातात. मा वि संघ स्थापन झाला, कार्यक्रम ठरला, आणि ‘विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत’, या गोष्टीवर भर देऊन,त्याप्रमाणे निधी संकलनाचे कामही सुरू झाले. सुदैवाने हे निधी संकलनाचे कामही,आमच्या काही, दानशूर माजी विद्यार्थी व समाज बांधवांनी ,भरघोस देणग्या देऊन खूप सुकर केले. मला सांगायला खरंच खूप आनंद वाटतो, की आमच्या समाजांतील खालील दानशूरांनी आम्हाला त्या अगदी सुरुवातीच्या कालांत ,संघटनेचे कोणतेच काम सुरूही झालेले नसतांना ,केवळ आम्हा विद्यार्थ्यावर भरोसा ठेवून, मोठ्या देणग्या दिल्या.

  •     श्रीयुत मोरेश्वर मोरे दीनानाथ सावे औरंगाबाद रु.2,50000.
  •     श्री अशोक भालचंद्र पाटील बोर्डी पुणे रू.1,50,000
  •     श्री नरेश जनार्धन राऊत बोर्डी रू.1 50,000 .
  •     श्री दयानंद दामोदर पाटील विरार रू.10,0000
  •     श्री परशुराम अनंत कवळी आगाशी रू.10,0000 

पुढील कालखंडात, वरील पैकी,खालील दात्यानी विविध उपक्रमाकरीता, आणखीही भरघोस मदत केली.आज घडीला त्यांनी दिलेली एकूण मदत ही खालीलप्रमाणे आहे.

  •   श्री नरेश भाई राऊत, एकूण रुपये पाच लाख .
  •     श्री अशोक पाटील, एकूण रुपये साडेचार लाख .
  •     श्री पुरुषोत्तम भाई कवळी, एकूण रुपये साडेतीन लाख .

  इतरही अनेक दानशूर देणगीदारांची नामावली पुढे दिलेली आहे.

  या दानशूर व समाजहितैषी तसेच भावी पिढीच्या कर्तुत्वावर  विश्वास ठेवणाऱ्या ,समाज बंधूंच्याऊदार  देणग्यांतून,आमच्या कार्याचा शुभारंभ, अतिशय चांगला झाला. निश्चितपणे माजी विद्यार्थी संघ त्यांचा सदैव ऋणी राहील. त्यांच्या त्या काळातील देणग्यांचे मोल आज करता येणार नाही.

    श्री.कै. मोरेश्वर अण्णा हे आमच्या सो क्ष समाजातील पहिले खासदार.समाजातील काही तरुण विद्यार्थी एक चांगला उपक्रम राबवीत आहेत, त्यात आपला आर्थिक सहभाग घेऊन या मंडळींना प्रोत्साहन द्यावे, या केवळ एका हेतूने त्यांनी ही मदत केली. आमचे एक संस्थापक सदस्य, माजी विद्यार्थी श्री. सदानंद राऊत,चिंचणी(मुंबई),यांच्या प्रयत्नांमुळे, एवढी भरघोस मदत अण्णांकडून मिळाली हेही येथे नमूद केले पाहिजे. भविष्य काळातही श्री. मोरेश्वर सावे यांनी आम्हाला खूप मौल्यवान मार्गदर्शन व सहकार्य दिले आहे. अण्णा आज हयात नाहीत पण त्यांनी देणगी व मौलिक मार्गदर्शन रूपाने,माजी विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन ,आम्ही निश्चितच कायम स्मरणात ठेऊ.

    श्रीयुत अशोक भाई व नरेश भाई हे आमच्या तात्यासाहेब  चुरी वसतिगृहाचे माजी विद्यार्थीच. दोघांचेही व्यवसायाचे क्षेत्र जरी वेगळे असले तरी समाजाच्या कोणत्याही चांगल्या उपक्रमासाठी त्यांचा सदैव भरघोस आर्थिक पाठींबा असतो. जेव्हा त्यांना आम्ही या उपक्रमाची कल्पना दिली, त्यांना मनापासून आनंद झाला व त्वरित,या कामासाठी त्यांनी प्रत्येकी दीड लाख रुपयाची भरघोस देणगी दिली. या दोन्हीही मित्रांचा आम्हा माजी विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर सबंध समाजाला सार्थ अभिमान आहे.आमच्या तसेच ईतर अनेक सामाजिक संस्था साठी त्यांनी भरीव देणग्या दिलेल्या आहेत. मा वि संघाला, अगदी बाल्यावस्थेत, त्यांनी दिलेल्या या प्रोत्साहनामुळे आमचा हुरूप वाढला व कामाला गती आली.

    श्रीयुत दयानंद पाटील, हे विरार वसई परिसरातील एक नामवंत व्यावसायिक. विशेषतः घररबांधणी व्यवसायात एक मशहूर नाव आमचे पहिले खजिनदार व नंतर अध्यक्ष झालेले श्री.प्रभाकर ठाकूर यांचे ,दयानंद नाना,जवळचे मित्र.  प्रभाकर यांच्याच विनंतीवरून,त्यांनी एक लाख रुपयाची  देणगी, त्यावेळी दिली. दयानंद नानांनी वसई-विरार परिसरात  अनेक मोठ्या देणग्या देऊन आपले दातृत्व सिद्ध केले आहे.त्यांचा स्नेह व मार्गदर्शन आजही माजी विद्यार्थी संघाला मिळत असते.

        श्रीयुत दयानंद पाटील, हे अगदी प्रथम  देणगीदार. त्यांनी दिलेली रुपये एक लाखाची देणगी,त्यावेळी आम्हाला खूपच प्रोत्साहन देऊन गेली. नाना. दयानंद नाना, हे बांधकाम क्षेत्रातील एक प्रख्यात नाव आहे 

     श्रीयुत परशुराम भाई कवळी,हे आमचे माजी विद्यार्थी डॉ.सदानंद कवळी ,यांचे बंधू. डाॅ. कवळी यांचाही आमच्या संघ बांधणीत महत्वाचा सहभाग.त्यांच्याच प्रयत्नाने परशुराम भाई कवळी यांनी आम्हाला  एक लाख रुपयांची देणगी त्यावेळी दिली. परशुराम भाई हे एक नामवंत बांधकाम व्यावसायिक असून वसई विरार आगाशी परिसरांत त्यांचे खूप मोठे नाव आहे. कोणताच गवगवा न करता, अगदी साधे व प्रसिद्धी प्रमुख असे जीवन जगणारे परशुराम भाई हे समाजासाठी एक आदर्श असेच व्यक्तिमत्त्व आहे अनेक होतकरू संस्थांना त्यांनी भरघोस आर्थिक मदत केलेली आहे.

   या नंतर ही वरील सर्व सद्गृहस्थांनी व इतरही अनेकांनी आमच्या संस्थेला खूपच भरघोस आर्थिक मदत केलेली आहे. त्याचाही उल्लेख पुढे येईलच. मात्र संघ स्थापनेच्या अगदी प्रथमावस्थेत व कामाला सुरुवात ही झालेली नसताना,केवळ आस्था आणि कार्यकर्त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, या पाच समाज बांधवांनी, जे आर्थिक सहाय्य दिले,त्यामुळे त्यांचा  विशेष उल्लेख करणे मी माझे कर्तव्य समजतो.मा वि  संघाच्या इतिहासात ,ही ,केवळ अभूतपूर्व अशीच घटना मानली जाईल. अशा सद्गृहस्थांचे,आशीर्वाद व प्रेरणेमुळेच माजी विद्यार्थी संघाची घोडदौड, बावीस वर्षांपूर्वी सुरू झाली ती आजतागायत तशीच चालू आहे. 

  “सत्य संकल्पाचा दाता नारायण, सकळ मनोरथ करी सफळ संपूर्ण”

   या संत वचनाची प्रचिती आम्हाला अगदी सुरुवातीलाच आली व पुढेही ती येत राहिली.

            निधी संकलन हे खूप जरुरीचे व प्राधान्य असणारे काम होते त्यामुळे आम्ही सर्वांनीच त्यावर जोर दिलेला होता त्याकरिता दिनांक 24 सप्टेंबर 2000 रोजी, ‘जाऊबाई जोरात’, या त्यावेळी खूप गाजत असलेल्या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सादर करण्यात आला त्याच वेळी एकच स्मरणिका प्रसिद्ध करून जाहिरातीच्या रुपाने ही काही फंड जमा केला या दोन्ही उपक्रमातून माजी विद्यार्थी संघाला भरघोस अर्थसहाय्य प्राप्त झाले व आमच्या संस्थेला ही स्थैर्य प्राप्त झाले, हे नमूद करताना आनंद होतो आहे. मिळालेल्या देणग्यांतून निर्माण केलेल्या ठेवीवरील व्याज, हेच आमचे सर्व उपक्रम राबविण्यासाठींचे भांडवल होते.  सुरुवातीलाच जमा झालेली ही सुमारे दहा लाखापर्यंत ची रक्कम कायमस्वरूपी ठेव म्हणून बँकेत जमा केली,त्यावर मिळणाऱ्या व्याजावर शिष्यवृत्या व इतर काही कार्यक्रमांचे आयोजन त्वरीत दुसऱ्याच वर्षापासूनच सुरू करण्यात आले.

    संघटनेसाठी देणग्या मागताना देणगीदारांना, देणगीच्या  रकमेत,आयकर खात्याकडून करात सूट मिळावी ही अपेक्षा असते.माजी विद्यार्थी संघाला आयकर खात्याकडून करमुक्त सवलतीचा दाखला मिळवण्याचाही त्वरीत प्रयत्न करुन तो मिळविला. सुरुवातीला तो पाच वर्षासाठी म्हणजे 2004 पर्यंत लागू होता पुढे ही प्रत्येक वेळी तो वाढवीत गेलो. आमचे त्यावेळी असलेले खजिनदार, श्री प्रभाकर ठाकूर, यांनी या कामात खूप मेहनत केलेली आहे.

      अगदी पहिल्या दोन वर्षातच, माजी विद्यार्थी संघाने, आपल्या उद्दिष्टानुसार, अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.त्यामध्ये शैक्षणिक शिबीरांचा  उल्लेख  करावाच लागेल.बोर्डी,देहेरी , बोरीगाव व घोलवड या चार गावांतील विद्यार्थी व पालक यांचे करिता, शैक्षणिक शिबिर व संगणक मार्गदर्शन कार्यशाळा, बोर्डी येथे आम्ही आयोजित केली होती. दुसरे शिबिर-कार्यशाळा, केळवे-माहीम व शिरगाव या तीन गावांतील विद्यार्थी व पालकांसाठी भरविण्यात आले. दोन्ही शिबिरांना उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यावरून विद्यार्थ्यांना व पालकांना अशा मार्गदर्शनाची किती उपयुक्तता आहे हे जाणवले.अशी शिबिरे इतरही अनेक गावांत व्हावीत अशी विद्यार्थ्यांनी तर मागणी केलीस, पण आम्हा कार्यकर्त्यांनाही शिबिरांचे महत्त्व पटले. हे दोन्ही कार्यक्रम त्या त्या गावांतील,सर्व ज्ञातीतील विद्यार्थ्यांना,खुले ठेवण्यात आले होते.शैक्षणिक क्षेत्रातील एक नामवंत तज्ञ श्री बाळ सडवेलकर यांनी त्यावेळी आपला बहुमोल वेळ वरील कार्यक्रमांना देऊन आम्हाला सर्व सहकार्य केले. त्यांनी घेतलेल्या बुद्धिमापन चाचणीतून (IQ TEST) ,विद्यार्थ्यांना खूपच लाभ झाला. त्यांचीही आठवण आज येते. या सुरुवातीच्या काळातील अशी शैक्षणिक शिबिरे आयोजित करणे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे बाबतीत दोन नावे मुद्दाम उद्धृत करावी वाटतात. एक श्री. भालचंद्र पाटील माजी डे.कमिशनर मुंबई महानगरपालिका व श्री.सदानंद राऊत, संघाचे संस्थापक सदस्य व त्यानंतर माजी अध्यक्ष ,या दोघांनी,अनेक तज्ञांना आमच्या शैक्षणिक शिबिरांत आणून,त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना करून दिलेला आहे.

    आज शैक्षणिक शिबिरे, संगणक मार्गदर्शन, त्याचप्रमाणे पब्लिक सर्विस कमीशन च्या राज्य स्तरावरील व केंद्रीय स्तरावरील परीक्षा,या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी , माजी विद्यार्थी संघ प्रयत्नशील असून हे उपक्रम चालू आहेत. डॉ. देवराव पाटील व डाॅ. सौ. नीला दे.पाटील या उभयतांनी या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी व्याख्यात्यांना निमंत्रित करण्यासाठी खूपच कष्ट घेतले आहेत. त्यांचे आभार मानायलाच हवेत

     शैक्षणिक सामाजिक उद्योग व्यवसायासंबंधी मार्गदर्शन अशी उद्दिष्टे ठेवून माजी विद्यार्थी संघाने आता कामाला सुरुवात तर केली.त्यासाठी वर्षातून एकदा तरी, सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र जमावे असा बहुतेकांचा आग्रह होता.वार्षिक मेळाव्याचे आयोजन त्यासाठीच होते. अशा मेळाव्यामुळे सभासदांना व त्यांच्या परीवाराला एकत्र आणून,एकमेकांचा परिचय दृढ होईल आपल्या शिक्षणाचा,अनुभवाचा लाभ समाज बांधवांना देता येईल,त्याच बरोबर,ज्या गावात,शाखेत मेळावा घेतला जाईल, तेथील ग्रामस्थ,समाजबांधव व विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव करता येईल, अनुभवाचा लाभ होईल,असे उद्दिष्ट होते.या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थी संघाच्या एकूण कामालाच बळकटी येईल हे अपेक्षित होते आणि पुढे तसेच झाले. 

   कै. डॉक्टर जयंतराव पाटील,नामवंत शेतीतज्ञ, भारतीय नियोजन मंडळाचे माजी सदस्य,सो.क्षत्रिय स.स॔घाचे माजी अध्यक्ष,  माजी विश्वस्त,तसेच आमच्या माजी विद्यार्थी संघाचे  मार्गदर्शक व हितचिंतक. डॉ. जयंतराव दादांनी माजी विद्यार्थी संघाच्या बोर्डी येथील प्रथम मेळाव्यास  अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून, सुंदर,मार्गदर्शन पर विवेचन करून आम्हाला उपकृत केले आहे. ते नेहमीच आमच्या माजी विद्यार्थी संघाच्या कामाची चौकशी करून उत्तेजन देत असत

पहिला मेळावा दिनांक 17 जानेवारी 1999 रोजी बोर्डी या शाखेत घेण्यात आला. पहिलाच मेळावा असल्यामुळे खूप अडचणी होत्या. तरीदेखील बोर्डी च्या माजी विद्यार्थ्यांनी दाखविलेली जिद्द आणि परिश्रम, हा मेळावा यशस्वी करण्यात कारणीभूत ठरले.आमचे अनेक माजी विद्यार्थी मित्र व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती लक्षणीय होती.या मेळाव्यामुळे विद्यार्थी संघाला,भविष्यकाळातील कार्याची एक निश्चित दिशा ठरविण्यात  उपयोग झाला.डॉ.जयंतराव पाटील, त्यावेळी भारताच्या नियोजन मंडळावर कार्यरत होते व त्यांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आमच्या समारंभास उद् घाटक म्हणून येण्याचे मान्य केले हे आमचे महत्त्व भाग्य.त्यांच्या हस्तेच, आमच्या भविष्यातील कामाची मुहूर्तमेढ, बोर्डी गावात रोवली गेली.  डॉ.जयंतरावांनी आपल्या मार्गदर्शनात खूप मौलिक विचार मांडले.विद्यार्थी संघाने कोणत्या दिशेने वाटचाल करावी, भारतापुढील व आपल्या शेतकरी बहुल समाजापुढील सामाजिक प्रश्न व विशेषतः भविष्यात येणाऱ्या अडचणी ओळखून मा वि  संघाने कसे मदतनीस व्हावे, याचे सुंदर विवेचन जयंत दादांनी केले. डॉ.नीला पाटील ,कै. सौ सुशीला दीदी राऊत श्री.विजयानंद दामोदर पाटील, श्री रघुनाथ का सावे,कर्नल प्रताप सावे, या मान्यवरांनी देखील आपल्या भाषणांतून आपले विचार मांडताना, मा वि संघ कडून  भविष्यातील अपेक्षांचा ऊहापोह करून, संघाला संपूर्णतया साथ देण्याचे आश्‍वासनही दिले.आपले शिक्षणक्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अनुभव आम्हापुढे ठेवले अनेक माजी विद्यार्थ्यांनी,स्वकष्टाने,आपल्या स्वतःच्या मोठ्या औद्योगिक संस्था निर्माण करून यशस्वी केलेल्या आहेत. औद्योगिक,शैक्षणिक ,शेतकी वैद्यकीय, वास्तुशास्त्र,अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्याचे प्रातिनिधिक दर्शन ,सर्वश्री नरेश राऊत, मनोहर कृष्णाजी चौधरी, रामचंद्र सावे, प्रभाकर सावे, डॉ. हर्षवर्धन दाजी पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने झाले. अतिशय हृद्य आणि रोमांचकारी असा हा कार्यक्रम झाला.

   सुमारे बावीस वर्षापूर्वी झालेल्या, या मेळाव्याच्या मंडपाचे दृश्य अजूनही डोळ्यासमोर येते.सुमारे दोनशे-अडीचशे माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. पहिल्याच रांगेत आमच्या गावाचे,त्यावेळचे अध्वर्यू मदनअण्णा ऊर्फ, मदनराव सावे, कृष्णराव राऊत उर्फ बापू, व सुशीला (दीदी) राऊत ही मंडळी ,मोठ्या आस्थेने बसून ,सर्व कार्यक्रम डोळे भरुन पहात होती .सुशीलदीदींची प्रकृती त्यावेळी ठीक नव्हती, तरीही त्यांना विनंती करून मुद्दाम आणून आम्ही बसविले होते. मदन अण्णा तर आदल्या दिवशीच आमच्याकडे संमेलनाच्या सर्व व्यवस्थेविषयी चौकशी करून गेले होते. ‘काही मदत लागल्यास जरूर सांगा’, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. बापूंनी  आम्हाला भोजन व्यवस्थेसाठी बरीच मदत करून  स्वतःही भोजन मंडपात उपस्थित होते. ही मंडळीची त्या वेळेस ,वयाची साठी ऊलटली होती. तरीही आपले वय, आपली प्रतिष्ठा विसरून केवळ आम्हा विद्यार्थ्यांच्या प्रेमाखातर व बोर्डीच्या परंपरेनुसार, धडपडणाऱ्या तरुणांना आशीर्वाद व मदत देण्यासाठी त्यादिवशी उपस्थित राहिली, हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यांचे आशीर्वाद हे आम्हा विद्यार्थ्यांच्या मागे त्यादिवशी ही होते व आजही आहेत, याची आम्हास कल्पना आहे. दुर्दैवाने या मेळाव्यानंतर अगदी थोड्याच वर्षात ही तिन्ही व्यक्तीमत्वे आम्हाला कायमची अंतरली.

  पहिल्या मेळाव्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आमचेच एक माजी विद्यार्थी व आमच्या वसतिगृहाचे पहिले रेक्टर डॉ.मधुकर ठाकूर ,यांनी अमेरिकेहून पाठविलेला खास संदेश. आपल्या संदेशात,त्यांनी  मा वि संघासाठी खूप शुभेच्छा तर दिल्या होत्याच पण भविष्यात कोणतीही मदत हवी असल्यास सांगा ,मी आनंदाने ती करीन, असे आश्वासनही दिले व पूर्ण केले.डॉ.मधुकर ठाकूर ,आज जगातील ‘न्यूक्लिअर मेडिसीन’, या विषयातील मोठे नाव आहे .त्यांचे मार्गदर्शन माजी विद्यार्थी संघास  नेहमी मिळत असते .

  कै. सतीश नाना वर्तक, वसई. हितचिंतक, वसई विकास बँकेचे माजी अध्यक्ष, सो क्ष संघ फंड ट्रस्ट चे माजी विश्वस्त.
      कै.कमळाकर म्हात्रे ,वसई .आमचे  प्रथम हितचिंतक व पुरस्कर्ते.

या लेखात दोन व्यक्तींचा लेख ते आमच्या तात्यासाहेब बच्चू डी वसतिगृहाचे माजी विद्यार्थी नसतानाही करावासा वाटतो ती दोन नावे म्हणजे काही सतीश नाना वर्तक कमलाकर म्हात्रे, या दोघांनीही , माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेपासून, माजी विद्यार्थी नसल्यामुळे सभासद जरी होता आले नाही, तरी हे दोघेही आमच्या माजी विद्यार्थी संघाचे पहिले हितचिंतक होते.  सुरुवातीच्या आमच्या  सभांना अगदी आस्थेने हजर राहून, मार्गदर्शन करीत असत. सतिश नाना वर्तक व कमलाकर मात्रे दोघांचाही वसई विकास महामंडळ व वसई विकास सहकारी बँकेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा वाटा. सतीश नाना, माझ्याबरोबर, सोमवंशी क्षत्रिय समाज उन्नती संघ फंड ट्रस्ट मध्ये, विश्वस्त म्हणून  माझे सहकारी होते . दुर्दैवाने दोघेही तसे अकालीच गेले. दोघांच्या स्मृतींला मी वंदना करतो.

   या मेळाव्या पासून सुरू झालेली एक चांगली प्रथा, माजी विद्यार्थी संघाने आजही सुरू ठेवली आहे. ती म्हणजे , वार्षिक मेळाव्यासाठी भोजन  व इतर खर्च त्या शाखेतील माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी करावा.  ही खरोखर अभिमानाची  आनंदाची व आदर्श अशी गोष्ट आहे.आजपावेतो सर्व ज्ञाती बांधवांनी आपापल्या शाखेमध्ये हा मेळावा भरवताना, मेळाव्याच्या संपूर्ण व्यवस्थेचा खर्च, सार्वजनीक वर्गणी द्वारा, माजी विद्यार्थी संघाला काहीही तोशिस न लावता केलेला आहे. माजी विद्यार्थी संघाच्या सुरुवातीच्या काळापासून ते अगदी आजतागायत ज्या कार्यकारिणी व पदाधिकारी यांच्या सभा घेण्यात येतात त्या सभांचा ही संपूर्ण चहापानाचा  खर्च हा त्या सभासदाने करावयाचा असतो, हा अलिखित नियम आहे .

        23 एप्रिल 2000 साली झालेला माजी विद्यार्थी संघाचा दुसरा मेळावा,चिंचणी या गावी झाला.संघाचे संस्थापक सदस्य श्रीयुत सदानंद राऊत यांच्या प्रयत्नाने चिंचणी तील विद्यार्थी मित्र व पालक गावकरी यांच्या सहकार्या मुळे, हा मेळावा देखील  कामाला गती देणारा ठरला. मेळाव्याचे उद् घाटक म्हणून,ॲड. महादेव मो राऊत यांना सन्मानपूर्वक, निमंत्रित केले होते.त्यांचे बरोबर, सेवानिवृत्त कर्नल सदाशिव वर्तक ,यांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. ॲड. महादेव राऊत यांनी आपल्या चिंतनपर , मार्गदर्शक भाषणात ,आपल्या समाजाची शेतीवरील भिस्त व शेतीसाठी आधुनिक विज्ञानाची कशी मदत घेता येईल, यावर सुंदर विवेचन केले.आधुनिक भारताला आधुनिक शेतकऱ्याची गरज आहे व आधुनिक शेतकरी होण्यासाठी विज्ञानाची कास धरणे कसे आवश्यक आहे हे त्यांनी विस्तृतपणे सांगितले.  कर्नल सदाशिव वर्तक हे आमच्या समाजातील सैनिकी पेशातील एक धैर्यशील व्यक्तिमत्व. भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेले एक लष्कराधिकारी. त्यांनी,आपल्या समाजाने शेतीबरोबरच, लष्करी सेवेमध्ये ही ,का व कशा रीतीने भाग घेतला पाहिजे ,याचे समर्पक विवेचन केले.त्यांचे त्या मेळाव्यातील एक वाक्य अजूनही लक्षात आहे, ते म्हणाले होते “मृत्यूच्या भयाने, आव्हाने स्विकारण्यापासून लांब राहणे, हे नामर्दपणाचे लक्षण आहे, आणि आपण तर क्षत्रिय आहोत तेव्हा भविष्यातील आव्हाने पेलण्यास सज्ज व्हा!” कर्नल साहेबांचे त्यावेळेचे उदगार किती सार्थ होते !

   या मेळाव्यात देखील प्रतिथयश माजी विद्यार्थी व यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. सौ मंदा भास्कर सावे,  कु गौतम मधुकर सावे ,कुमारी प्रीती श्रीकांत राऊत, कुमारी गंधाली मधुकर वर्तक ,कु.महेश  राजेंद्र वर्तक, व श्री.भरत पद्मन राऊत या सर्वाचा त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी सत्कार करण्यात आला.

   तीसरा  मेळावा,पालघर,के  माहीम शाखे तर्फे घेण्यात आला.

हा मेळावा एप्रिल 2001 मध्ये संपन्न झाला माहिमचे सुप्रतिष्ठित व्यक्तिमत्व, श्री  चिंतामणराव वर्तक, जे ,त्या वेळी आमच्या सो क्ष संघ फंड ट्रस्ट चे कार्यकारी विश्वस्त होते,यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन,कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. माहीम मधील दुसरे एक प्रसिद्ध समाज सेवक, श्री नारायण का राऊत यांना आम्ही विशेष अतिथी म्हणून बोलाविले होते. दोघांनीही खूप छान मार्गदर्शनपर भाषणे करून आमच्या कार्याला आशीर्वाद व सुयश ईच्छिले . त्याचप्रमाणे, नेहमीच्या प्रथेनुसार, माहीम-केळवे परिसरांतील त्या वर्षीचे यशस्वी विद्यार्थी व काही वयोवृद्ध नागरिकांचा सत्कारही करण्यात आला.हा कार्यक्रम देखील खूप उत्तम रीतीने माहीम शाखेने आयोजित केला.

 अशा रीतीने प्रत्येक वर्षी ,आजतागायत गेली बावीस वर्षे, हा वार्षिक मेळावा आमच्या वेगवेगळ्या शाखेंत भरविला जातो. साधारणतः सकाळच्या प्रथम सत्रांत, मुख्य पाहुणे व सन्माननीय व्यक्ती यांचे कडून प्रबोधन ,संघाच्या वाटचालीचा आढावा, अध्यक्षांचे मनोगत ,असा कार्यक्रम असतो .दुपारचे सत्रांत भोजनानंतर ,सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यां साठी खुली चर्चा, कार्यकर्त्यांचे विचार, त्याप्रमाणे स्थानिक शाखेतील विद्यार्थ्यांच्या  विशिष्ट समस्या बाबत विचार विनिमय होऊन त्या दृष्टीने ,तेथे   काही उपक्रम घेता येतील का, याचाही विचार विनिमय होतो. सर्व आजी-माजी विद्यार्थी मित्र सहकुटुंब एकत्र येऊन आपल्या गत सहजीवनाची उजळणी करतात ,आनंद घेतात व पुन्हा पुढील वर्षी एकत्र येण्यासाठी घरी जातात.  हा वार्षिक मेळावा, सोमवंशीय क्षत्रिय समाजामध्ये एक खास आकर्षण ठरला आहे.  मागे सांगितल्याप्रमाणे,भोजनाचा व इतरही खर्च स्थानिक शाखेतील आमचे मित्र व गावकरी मंडळी निभावून नेतात,त्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या तिजोरीला विशेष  तोशिस लागत नाही.

   याशिवाय दुसरा एक महत्त्वाचा शैक्षणिक उपक्रम म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित ,सायन्स व इंग्रजी या विषयांचे, खास तज्ञांकडून मिळणारे मार्गदर्शन. गणित व इंग्रजी हे दोन विषय , खेड्यांतील, माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना,खूपच कठीण जातात. पूर्वी जेव्हा हे विषय एस एस सी ला ऐच्छिक होते (Optional), तेव्हां या दोन  विषयांशिवाय ,एसएससी परीक्षा पास होता येत असे. त्या वेळी बहुतेक मुले ,हे दोन्ही विषय सोडून, एसएससी परीक्षा देत . सद्य परिस्थितीत ,या दोन विषयांचे महत्त्व खूप असून  त्यांत मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे .ही गरज लक्षात घेऊन माजी विद्यार्थी संघा तर्फे,दरवर्षी, दोन दिवसांचे शैक्षणिक शिबिर,इंग्रजी व गणित विषयांतील तज्ञामार्फत, काही शाखांत  भरविले जाते.   जरुरीप्रमाणे  एकाहून अधिक शिबिरे देखील घेतली जातात. सुमारे तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना विविध शाखांमधून हे मार्गदर्शन देत प्रत्येक वर्षी मिळत असते. विशेषतः सफाळा स्टेशनच्या पूर्वेकडील आमच्या शाखांमध्ये ,विद्यार्थी वर्गाला, याची गरज अधिक भासते.माजी विद्यार्थी संघ याबाबतीत पुढाकार घेत असतो .खरोखरच सांगावयास आनंद वाटतो की, या दोन विषयांतील तज्ञांच्या मार्गदर्शनानंतर , विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवलेले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वार्षिक मेळाव्यात काही विद्यार्थी याबाबतीत आपले मनोगत व्यक्त करताना आपले अनुभव सांगून कृतज्ञता व्यक्त करतात.

माजी विद्यार्थी संघाकडून शैक्षणिक मदत घेऊन, अथवा तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून ,आपला अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या काही विद्यार्थिनी, विद्यार्थी,दरवर्षी पारितोषिक वितरण समारंभात, आपले मनोगत व्यक्त करतात. 

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दुसरी महत्वाची गरज म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन .(Vocational Guidance). खेड्यातील विद्यार्थी देखील विद्यार्थी हुशार असतो. परंतु त्याच्या बुद्धीचा कल नेमका कोणत्या विषयांत आहे व भविष्यात तो कोणत्या क्षेत्रात चमक दाखवू शकेल, या साठी, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक चाचण्या वापरून, त्याला व त्याच्या पालकांना योग्य ते समुपदेशन करणे ,आज काळाची गरज झालेली आहे .त्या अनुषंगाने माजी विद्यार्थी संघा मार्फत, IQ व EQ, अशा दोन महत्त्वाच्या चाचण्या तज्ञां कडून, घेतल्या जातात.त्यातील निकषाप्रमाणे विद्यार्थी व त्याचे पालक यांना समुपदेशन दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचा विषय उच्चशिक्षणासाठी निवडणे,  व्यवसाय करणे जीवनात सोपे जाते. अजून पर्यंत सुमारेआठशे विद्यार्थ्यांनी हा लाभ, संघामार्फत घेतलेला असून त्यांनी आपल्या भावी जीवनातील वाटचाल सुकर करून घेतली आहे .मागे म्हटल्याप्रमाणे, अगदी सुरुवातीला श्री. बाळ सडवेलकर या, त्या कालांतील ख्यातनाम तज्ञांनी हा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना ,अगदी माफक खर्चात मिळवून दिला.आजही त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच!

     स्थापनेपासून ते सुरूवातीची सुमारे वीस वर्षे,  माजी विद्यार्थी संघाचे ऑफिस  म्हणजे,आमच्या  कोणा तरी पदाधिकाऱ्यांचे निवासस्थान हेच असे. अडचणीच्या,सुरुवातीच्या कालखंडात, माजी विद्यार्थी संघाचे एक संस्थापक सदस्य श्री.रमेश सावे, यांनी दिलेले सहकार्य खूपच उल्लेखनीय.  त्या वेळी माजी विद्यार्थी संघाच्या पत्रव्यवहाराचा पत्ता, रमेश भाईंच्या निवासस्थानाचा होता. रमेश सावे यांच्या अंधेरी येथील निवासस्थानाचा पत्ताच, कार्यालयीन पत्ता म्हणून दिलेला होता. पुढेही,आमच्या अनेक सहकाऱ्यांनी, आपापल्या निवासस्थानी या दप्तराचा सांभाळ करून सहकार्य दिले आहे.  कै.श्रीनिवास चुरी यांच्या नावाचाही तज्ञता पूर्वक उल्लेख येथे करावा लागेल त्यांच्याही निवासस्थानी भरात सकाल आमचे दप्तर होते .एक दिवस, जरूर आपल्या संघटनेचे कार्यालय  व्हावे ही सर्वांची इच्छा होती.या बाबतीत सूघाचे माजी अध्यक्ष ,श्री प्रभाकर ठाकूर यांनी  पुढाकार घेऊन, त्यांच्याच कारकिर्दीत हे स्वप्न पुरे झाले.(सन2018). माजी विद्यार्थी संघ निश्चितच त्यांचा खूप आभारी राहील.अर्थातच प्रत्येक सदस्याने त्यात  आर्थिक व ईतर  प्रकारेही  हातभार लावलेला आहे. आज विरार ,पूर्व ,येथे सुमारे 25 लाख रुपयांचे  बदल्यात,  माजी विद्यार्थी संघाचे एक सुसज्ज ऑफिस तयार झालेले आहे. कोणतेही मोठे काम सर्वांच्या प्रयत्न व आर्थिक हातभार असल्याशिवाय होत नसते. प्रत्येक सदस्याला ही याबाबतीत धन्यवाद दिलेच पाहिजेत. 

      कार्यालयीन जागेत खालील प्रमाणे उपक्रम सुरु करावेत असा माजी विद्यार्थी संघाचा मानस आहे.

  1. व्यक्तिमत्व विकास या विषयावर नियमित वर्ग सुरू करून गरजूंना त्याचा लाभ देणे
  2. बँका सरकारी उपक्रम केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग इत्यादी स्पर्धात्मक परीक्षा बाबत माहिती व मार्गदर्शन वर्ग सुरू करणे
  3. संगणक विषयक प्राथमिक व उच्चस्तरीय तंत्रज्ञान शिकवण्या बद्दल वर्ग सुरू करणे त्याबाबत समाजांतील तज्ञ उद्योजक व तंत्रज्ञ यांच्या गुणवत्तेचा लाभ गरजूंना करून देणे.

   परदेशांत शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त, अथवा स्थायिक झालेल्या ,आमच्या काही माजी विद्यार्थी व त्यांच्या पाल्यांकडून  आम्हाला अतिशय मौलिक सूचना येत असतात. “सुट्टी मध्ये जेव्हा आम्ही भारतामध्ये असू, त्या वेळी आमच्याशी संपर्क झाल्यास, येथील विद्यार्थ्यासाठी, संगणक विषयक आधुनिक तंत्रज्ञानाचे, शिकवणी वर्ग घेऊ शकतो,त्याबाबत त्यांना थोडे मार्गदर्शन ही करू शकतो ,”..असे आश्वासन दिलेले आहे.. परदेशस्थ माजी विद्यार्थ्यांना, संघास काही आर्थिक मदत करावयाची असेल, तर त्यासाठी माजी विद्यार्थी संघाने, इन्कम टॅक्स चे, ’80G’ हे मान्यता पत्र मिळविले. हे सांगण्यास आनंद वाटतो, माजी अध्यक्ष श्री प्रभाकर ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबतीत मोठे योगदान दिले आहे.

      माजी विद्यार्थी मित्रांनी, विशेषतः परदेशस्थ मंडळींनी संघाला आर्थिक बळकटी येण्यासाठी जरूर हातभार लावण्याचा प्रयत्न करावा अशी विनंतीही मी करतो आहे .

    बोर्डी ते देहेरी पासून मुंबई पर्यंत पसरलेल्या, सागरी मुख्यतः सागरी किनाऱ्यावर वास्तव्य असलेल्या ,आमच्या ज्ञाती मधील अनेक गरजू हुषार,विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी , कै. पूज्य तात्यासाहेब चुरी स्मारक, विद्यार्थी वसतिगृहाचा, उपयोग झाला. अशा विद्यार्थ्यांनी, ” हे वसतिगृह दादर मध्ये नसते, तर आज मी जो आहे, तो होऊ शकलो असतो काय”, हा प्रश्न आपल्या मनाशी प्रामाणिकपणे विचारला पाहिजे? मला तरी वाटते त्या प्रश्नाचे उत्तर,”नाही”, असेच येईल. आणि म्हणून या वसतिगृहाचे आम्हा माजी,आजी,विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्थान हे अनन्यसाधारण असेच आहे. आज हजारो माजी विद्यार्थी ,गेल्या साठ वर्षांत या वसतिगृहातून आपला शिक्षणक्रम पूर्ण करून, आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल, विविध क्षेत्रांत करीत आहेत.  ही खरोखर अतिशय समाधान देणारी गोष्ट आहे.

     आजतागायत माजी विद्यार्थी संघाने सुमारे 75 लाख रुपयांचे वाटप शिष्यवृत्त्या म्हणून विद्यार्थ्यांना केलले आहे .यांतील काही  विशेष नावे मी मुद्दाम नमूद करतो.

   सुरुवातीच्या शिक्षण काळांत ,डॉ. मानस सावे, तारापूर यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी  माजी विद्यार्थी संघाने आर्थिक सहाय्य दिले. आज डॉक्टर मानस हे एक प्रख्यात मधुमेह तज्ञ म्हणून व्यवसाय करीत आहेत. विद्यार्थिदशेत खूप हुशार, मेहनती  होतकरू, मानस सावे यांच्या, एक तज्ञ डॉक्टर म्हणून जडणघडणीत, माजी विद्यार्थी संघाने आपला हातभार लावला, ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे .त्यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहाय्य आज समाजाला मिळते आहे. 

    अगदी अलीकडे डॉ.युग्मा  म्हात्रे या वसईच्या विद्यार्थिनीला माजी विद्यार्थी संघाने केलेल्या मदतीमुळे, आपला,’ एम.डी.’,हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करता आला .त्या सुद्धा, एक प्रसिध्द, सेवाभावी डॉक्टर म्हणून काम करीत आहेत. 

    अशो अनेक उदाहरणे आहेत. आजही आमच्या, तरुण  विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपले शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक आर्थिक मदतीची गरज भासते आहे .माजी विद्यार्थी संघाचे हात तोकडे पडत आहेत. परंतु हे आव्हान सुध्दा आमच्या संघाला निश्चितपणे पेलवेल व या होतकरू विद्यार्थ्यांना शक्य तेवढी मदत आम्ही करीत राहू, याची मला खात्री आहे..

      परदेशी शिक्षणासाठी आता दोन शिष्यवृत्या दिल्या जातात. मदत शिष्यवृत्ती , परतफेड तत्त्वावर दिली जात आहे. अशी शिष्यवृत्ती आपण सुरू करावी व त्यासाठीही  निधी जमा करावा, ही कल्पना ,आमचे एक संस्थापक सदस्य व सध्याचे, संघ फंड ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर सदानंद कवळी, माजी अध्यक्ष दिनकरराव वर्तक व आमचे काही संस्थापक सदस्य यांची. या साठी एक आवाहनात्मक पत्रक आम्ही काढले होते, याचा येथे निर्देश करतो.

      अशी पहिली शिष्यवृत्ती डॉ. सलिल वसंत राऊत बोर्डी-मुम्बई यांना मिळाली होती. मला नमूद करावयास आनंद वाटतो की डॉ.सलील यांनी अमेरिकेत जाऊन, एम एस व पी.एच.डी, या दोन्ही पदव्या सन्मानपूर्वक मिळविल्या. सद्ध्या, भारतात ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत, मोठ्या हुद्द्यावर काम करीत आहेत. डॉक्टर सलील यांनी आपले संपूर्ण शिष्यवृत्तीची रक्कम परत देऊन संघाला काही आर्थिक मदत देखील केली आहे. डाॅ. सलिल हा माझा पुतण्या असून मी त्याचे खास अभिनंदन करतो.

डॉ. सलील वसंत राऊत, परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे अगदी प्रथम मानकरी. मनोगत: “I would like to take this opportunity to thank the Maaji Vidyarthi Sangh for bestowing an award on me, for students going to foreign shores to pursue their education. It was an honor and I can never thank the Sangh enough. As one of the first awardees, it gives me great pleasure to say that it was a source of encouragement to pursue my education in a foreign land filled with many unknowns. It has been about 25 long years and I have since returned to India to pursue a professional career in Medical affairs after completing a Ph.D. in Neurobiology and a mini-MBA Biopharma management. I wish them the very best in their future endeavors and hope that they continue to encourage many more students to fulfill their potential.”

    

डॉक्टर सलील यांनी व्यक्त केलेले आपले मनोगत व माजी विद्यार्थी संघाबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता, आम्हाला खूप काही देऊन जाते..” याच साठी केला होता अट्टाहास..” असे वाटू लागते. त्यांच्याप्रमाणेच अनेक इतर  विद्यार्थी, संघाच्या, अल्पशा का होईना,आर्थिक मदतीने आज परदेशात आपले उच्च शिक्षण पूर्ण करून परत भारतात आले व काही आज शिक्षण घेत आहेत. सर्वांना, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो.

    अशा रीतीने समाजातील सर्वांनाच नाही पण अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीत जेवढी आर्थिक मदत करता येईल ही करण्याचा प्रयत्न आमच्या या माजी विद्यार्थी संघाने केलेला आहे आणि पुढेही हे काम चालूच राहणार आहे.

        माजी विद्यार्थी संघाने स्थापनेपासून अगदी आजतागायत,दरवर्षी, केलेले विशेष उल्लेखनीय काम म्हणजे, आमच्या समाजातील एक तरी गतधवा भगिनीला आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, काहीतरी व्यवसाय घरी करता यावा, या दृष्टीने ,प्रथम काही वर्षे एक शिवण यंत्र  व तद्नंतर गेली सात-आठ वर्षे  एक घरघंटी(दळण्याचे यंत्र),मदत म्हणून दिली जाते. गेल्या 22 वर्षात तेवढीच शिवण यंत्रे वा घरघ॔ट्या, गरजू, निराधार भगिनींना, रोजगार मिळविण्यासाठी, उपयुक्त ठरली आहेत.हे खूप मोठे काम, आमचे एक संस्थापक सदस्य व साठे विद्यालयाचे माजी प्राध्यापक श्री.प्रकाश हरी राऊत व त्यांच्या सौभाग्यवती सुजाता ताई, यांच्या सौजन्याने,माजी विद्यार्थी संघा कडून वितरण केलेजाते. खरोखर या उभयतांना, माजी विद्यार्थी संघाने धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आज घडीला,कमीत कमी वीस, बावीस  भगिनींची कुटुंबे, या मदतीमुळे आपल्या पायावर उभी राहू शकली.

         माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेपासून आजतागायत दरवर्षी गरजू व गतधवा समाज भगिनींना शिवण यंत्र व घरघंटी वाटप पकडणारे दांपत्य, श्रीयुत प्रकाश राऊत व सौ सुजाता प्रकाश राऊत.

    माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेपासून ते गेल्या तीन चार वर्षापर्यंत ज्या संस्थापक सदस्यांनी अतिशय तळमळीने आस्थेने संघाच्या वृद्धीसाठी प्रयत्न केले परंतु आज जे हयात नाहीत अशा काही मित्रांची मला तीव्रतेने आठवण येते. त्यांचा नामनिर्देश करून त्यांना श्रद्धांजली देणे, हे माझे कर्तव्य समजतो.

       रवींद्रनाथ भास्कर ठाकूर विरार, शिरगाव हे आमचे प्रमुख सहकारी.रवींद्रनाथ हे महाराष्ट्र सरकारच्या एका उपक्रमात, वरीष्ठ व्यवस्थापक पदावर होते.त्यांनी संघ स्थापना पूर्वीच्या काळात,नोकरी करत असूनही,बहुमोल वेळेचे योगदान दिले. इंग्रजीवर प्रभुत्व ,रोख ठोक विचार, व मोजक्या शब्दात आपले म्हणणे समर्पक रित्या सांगण्याचे कौशल्य यामुळे रवींद्रनाथ, ज्यांना आम्ही आपुलकीने ‘बाळू’ म्हणत असू, संस्थेचे एक “थिंकटँक” (ThinkTank),होते. त्यांच्या ज्येष्ठते मुळे व उमद्या स्वभावामुळे, त्यांचा शब्द आम्हाला नेहमी मान्य असे ,आमच्या मित्रांमध्ये कधीही काही तात्विक मतभेद झाले, वादविवाद निर्माण झाले, तर अशावेळी सामोपचार घडवून आणणे,हे काम बाळूच करी! स्पष्टवक्ता निर्मळ मनाचा व जीवनात  काही  मूल्ये निश्चितपणे जपणारा हा आमचा मित्र, काही वर्षांपूर्वी, तसा अकालीच गेला. अगदी शेवटपर्यंत त्यांनी आमच्या संघाला हरप्रकारे  मदत केलेली आहे. आमच्या संघाला त्यांची उणीव निश्चित जाणवेल. सेतू सहकारी सोसायटीच्या स्थापनेच्या काळात देखील बाळूचे काम मोलाचे . ‘सेतू सहकारी सोसायटी’ वरील  लेखात देखील मी त्याचा उल्लेख केलेला आहे.

         माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेतील एक प्रमुख संस्थापक व आधारस्तंभ  कै.रवींद्रनाथ ठाकूर. संघाला आज त्यांची ऊणीव,  सतत भासत असते.

          श्रीनिवास का चुरी  हे आमचे एक मुख्य आधारस्तंभ. विद्यार्थी दशेत अत्यंत बुद्धिवान व स्कॉलर असलेले श्रीनिवास. S P COLLEGE OF ENGINEERING, या मुंबईतील  प्रख्यात महाविद्यालयांतून इंजीनियरिंग ची परीक्षा उत्तम रित्या पास झाल्यावर एल एन टी, सारख्या जगविख्यात कंपन्यांत काही काळ काम करून, पुढे स्वतःचा उद्योग व कन्सल्टंट म्हणून ही काम केले श्रीनिवास चुरी म्हणजे आमच्या माजी विद्यार्थी संघाच्या चालता-बोलता शब्दकोश होता. संघाच्या स्थापनेपासून ची सर्व इत्यंभूत माहिती त्यांच्या डोक्यात असे. कधीही त्याचा संदर्भ विचारल्यास ते अचूकपणे सांगत असत. त्यांनी आमच्या संघासाठी  केलेले मोठे काम म्हणजे, अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्ट कडून मिळविलेली सहा लाख रुपयांची भरघोस देणगी. दोन वर्षापूर्वीच श्रीनिवास यांचे दुःखद निधन झाले. तो माजी विद्यार्थी संघा साठी मोठा धक्काच होता.

        आमच्या प्रमुख संस्थापक सदस्यांपैकी एक,कै. श्रीनिवास का चुरी. माजी विद्यार्थी संघात कोणतेही पद न भूषविता, अत्यंत निरलसपणे काम करणारे,अभ्यासू व्यक्तिमत्व. ‘वाडवळ ई ग्रुपच्या’, प्राथमिक अवस्थेत श्रनिवास यांचे  मार्गदर्शन बहुमोल होते. अनिकेत मेमोरियल ट्रस्टची, भरघोस देणगी त्यांच्या प्रयत्नाने मिळाली.

डॉक्टर गजानन वर्तक माहीम हे देखील संस्थापक सदस्य, मित्र. त्यांनी होमिओपथी शाखेमधील वैद्यकीय झाल्यावर, अंधेरी (पूर्व),येथे या आपले क्लिनिक सुरू केले. अत्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा  दिली. मी अंधेरीत ,पार्ल्यात वास्तव्यास असल्याने त्यांच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला आहे. एक निष्णात होमिऑपाथ म्हणूनच त्यांचे नाव परिसरात होते. माजी विद्यार्थी संघासाठी त्यांचे योगदान खूप मोठे. मा वि स॔घाची घटना तयार करून,रजिस्ट्रार कार्यालया कडून, स्वीकृति मिळविण्याचे, मोठे काम त्यांच्या मदतीने झाले. आमचे सभासद मित्र,श्री. प्रकाश हिराजी सावे, यांचीही त्यांना या बाबतीत खूप मदत झाली यांचाही उल्लेख मी मुद्दाम करतो. प्रकाश व डॉक्टर गजानन या दोघांनी घटना निर्मिती व सरकार दरबारची स्विकृती अशी सर्व जबाबदारी, खर्चासह, त्यावेळी घेतली होती. दुर्दैवाने डाॅ.वर्तक काही वर्षांपूर्वी गेले. 

    डॉक्टर गजानन वा वर्तक. अगदी सुरुवातीपासून माजी विद्यार्थी संघाला,  मार्गदर्शन व सर्व प्रकारचे योगदान करणारे, आमचे मित्र.डॉ. वर्तक

कै. हरिहर आत्माराम ठाकुर बोरिवली, दातिवरे, हे माजी विद्यार्थी संघाचे,पहिल्यापासूनच सक्रिय कार्यकर्ते. कोणतेही पद न भूषवता त्यांनीही, संघासाठी फार मोठे योगदान दिले. एक शिक्षणतज्ञ म्हणून, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक शिबिरे व मार्गदर्शन या उपक्रमात त्यांचा मोठा वाटा होता. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी ‘प्रथम वर्ग,’ कधीच सोडला नाही. शेवटच्या एम ई  इंजिनिअरिंग, या पदव्युत्तर परीक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन यांनी वि जे टी आय(V.J.T.I.) या प्रख्यात तांत्रिक विद्यालयात,एक उत्तम प्राध्यापक म्हणून नाव कमावले. कै.हरिहर ठाकूर,काही काळ विद्यार्थी वसतिगृहाचे रेक्टरही होते. दुर्दैवाने  अगदी अकाली निवर्तले व संघाचा मोठा आधार व शैक्षणिक मार्गदर्शक हरपला.

          कोणतेही पद, माजी विद्यार्थी संघात न घेता, खूप मोठे योगदान देणारे, संस्थापक सदस्य. कै. प्राध्यापक हरीहर आत्माराम ठाकूर. शालेय जीवनापासून ते पदव्युत्तर इंजिनिअरिंग परीक्षेपर्यंत ,कधीही प्रथम वर्ग न सोडणारे, एक अभ्यासू व बुद्धिमान विद्यार्थी. पुढे निष्णात प्राध्यापक आमच्या वसतिगृहाचे रेक्टर म्हणूनही काही काळ काम पाहिले.

          कै. नरोत्तम वर्तक ,के.माहीम, अंधेरी हे आमच्या वस्तीगृहातील ,अगदी सुरुवातीच्या कालांतील विद्यार्थी. मुंबई महानगरपालिकेत जबाबदारीच्या  हुद्द्यावर काम केले.  त्यांच्या सरकार दरबारी असलेल्या संपर्कामुळे,आमची अनेक महत्त्वाची कामे विनासायास होत असत.नरोत्तम हे आमच्या सोमवंशीय क्षत्रिय समाजोन्नती संघाचे काही काळचिटणीस होते .तेथेही त्यांनी एक उत्तम कार्यवाह म्हणून आपले कौशल्य दाखविले. आम्हाला सुरवातीच्या कालखंडात ऑफिस नसल्याने, ज्या मित्रांनी आपले घर सभेसाठी दिले त्यांतील एक नरोत्तम वर्तक.  अंधेरी मधील त्यांच्या सुसज्ज निवासस्थानी, त्यांच्या अर्धांगी व कुटुंबीयांनी मोठ्या जिव्हाळ्याने आमचे आदरातिथ्य केलेले आहे. ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही.  दुर्दैवाने त्यांचाही अकस्मात, दुर्दैवी मृत्यु झाला. आमचा एक संघटना कुशल संघटक,मित्र काळाने अकाली नेला. दुर्दैवाने मला त्यांचे छायाचित्र मिळू शकले नाही.

        सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे आमच्या दानशूर समाज बंधू-भगिनींनी अगदी प्रथमावस्थेत मदत केलीच पण त्यानंतर ही वेळोवेळी अनेक उपक्रमासाठी ,आम्हाला भरघोस मदत देऊन उपकृत केले आहे त्यातील काही ठळक नावांचा उल्लेख करणे माझे कर्तव्य समजतो.        

रू.लाख.:

  •    अनिकेत लोखंडे मेमोरियल ट्रस्ट,वान्द्रे ……………………….5.5
  • .  श्री. अशोक पाटील पुणे………………………..3.5
  •    श्री.प्रभाकर ठाकूर ,बोरीवली ……………………….3.05
  •    श्री. नरेश भाई राऊत, बोर्डी……………………….3.01
  •    श्री. पुरूषोत्तम भाई पाटील,आगाशी ……………………….2.45
  •    श्री.प्रकाश पाटील.. ,बोरीवली……………………….2.15
  •    श्री अविनाश म्हात्रे बोरीवली ……………………….1.91
  •    श्री दिलीप भाई करेलीया, मुंबई ……………………….1.85
  •    डॉ. मधुकर राऊत. विरार……………………….1.6
  •    श्री मनोहर चौधरी बोरीवली……………………….1.5

   विरार येथील कार्यालया करिता झालेल्या खर्चासाठी, प्रमुख  देणगीदार ही याप्रमाणे.  रू लाख:

  • श्री पुरुषोत्तम कवळी, आगाश………………………..2.51 यांचे नाव मागे आले आहे
  • श्री प्रभाकर ठाकूर.बोरीवली……………………….1.02
  • श्री अजय ठाकूर. के. माहीम……………………….1.0
  • श्री मनोहर चौधरी. बोरीवली……………………….0.71
  • श्री प्रकाश आ.पाटील. बोरीवली……………………….0.61
  • श्री नरेश भाई राऊत.  बोर्डी……………………….0.51
  • श्री अविनाश म्हात्रे. बोरीवली……………………….0.51
  • श्री प्रफुल्ल का.म्हात्रे,रामबाग……………………….0.51
  • श्री विकास वर्तक, विरार……………………….0.50

   या सर्व समाज बांधवांनी दिलेल्या अमूल्य मदतीमुळेच माजी विद्यार्थी संघाची ही घोडदौड आज पर्यं वेगाने चालू आहे. माजी विद्यार्थी संघ,आज आपल्या स्वतःच्या शानदार अशा,विरार मधील ऑफिसात स्थानापन्न झालेला आहे. 

समाज बांधवांकडून देणग्या गोळा करीत असतानाच व गरजू हुशार विद्यार्थ्यांना त्यांचे वाटप करण्याबरोबर, माजी विद्यार्थी संघाने आपले दैवत, पूज्य तात्यासाहेब चुरी स्मारक ,विद्यार्थी वसतिगृहाला ही अल्पशी मदत केली आहे .2005 ते2014 या कालखंडात, जेव्हा मी सो क्ष संघ फंड ट्रस्ट चा कार्यकारी विश्वस्त होतो,त्यावेळी आमच्या विश्वस्त मंडळाने, विद्यार्थी वसतिगृहाचे संपूर्ण नूतनीकरण केले.त्या वेळी माजी विद्यार्थी संघाने, संघ फंड ट्रस्टला रू.17000 ची देणगी दिली आहे, हे नमूद करावयास आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या शिवाय प्रत्येक वर्षी वसतिगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना, त्यांच्या वसतिगृह फी साठी, प्रत्येक वर्षी मा वि संघ मदत करतो, ती वेगळी.

  गतवर्षी झालेल्या पारितोषिक व शिष्यवृत्ती वाटप समारंभ, विरार येथील हे दृश्य. भाषण करताना श्री दिगंबर राऊत. डावीकडून बसलेले, श्री नरेंद्र वर्तक ,श्री रंजन पाटील, प्रमुख पाहुणे श्री परशुराम राऊत, व अध्यक्ष श्री प्रमोद भाई पाटील.

    माजी विद्यार्थी संघ उभारणी व पुढील व्यवस्थापनात आजतागायत, अनेक मित्रांनी खूप मोठे योगदान निश्चितपणे दिलेले आहे.आर्थिक बळ आवश्यक असतेच पण त्याचबरोबर दैनंदिन कामात,आस्थापन व्यवस्थापनात वअनेकविध उपक्रमातील आयोजनात, सहभाग महत्त्वाचा असतो. येथे सर्व मित्रांचा नामोल्लेख करणे शक्य नाही तरी आजतागायत ज्या मित्रांनी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, कार्यवाह ही पदे भूषविली त्यांचा नामोल्लेख करणे जरूर वाटते ..

सन नाव   पद
1998-2003दिगंबर वा राऊत अध्यक्ष 
रवींद्रनाथ भा ठाकूर ऊपाध्यक्ष
प्रभाकर बा ठाकूरकोषाध्यक्ष
मधुकर के वर्तककार्यवाह  
2003-2006.  सदानंद ज राऊत    अध्यक्ष 
प्रमोद अ वर्तकऊपाध्यक्ष
मनोहर कृ चौधरीकोषाध्यक्ष
मधुकर के वर्तककार्यवाह  
2006-2009प्रमोद अ वर्तकअध्यक्ष 
मधुकर के वर्तकऊपाध्यक्ष
मनोहर कृ चौधरीकोषाध्यक्ष
प्रमोद खं राऊत कार्यवाह  
2009-2012मधुकर के वर्तक *अध्यक्ष 
प्रकाश ह राऊतऊपाध्यक्ष
प्रमोद खं राऊतकार्यवाह  
प्रमोद ज पाटीलकोषाध्यक्ष
2012-2015प्रभाकर बा ठाकुर **अध्यक्ष 
धनेश भा वर्तकऊपाध्यक्ष
प्रमोद ज पाटील  कोषाध्यक्ष
नरोत्तम कृ चुरीकार्यवाह  
2015-2018         प्रभाकर बा ठाकुर  अध्यक्ष 
प्रमोद ज पाटीलऊपाध्यक्ष
नरोत्तम कृ चुरीकोषाध्यक्ष
रंजन ज पाटील कार्यवाह  
2018,पासूनप्रमोद ज पाटील अध्यक्ष 
रंजन ज पाटीलऊपाध्यक्ष
अशोक ह राऊतकोषाध्यक्ष
नरेंद्र दा वर्तककार्यवाह  

* 2009-2010, 1वर्ष
**2010 पासून

    एका वार्षिक मेळाव्याप्रसंगी, प्रमुख पाहुणे व उद् घाटकां समवेत, अध्यक्ष प्रमोदभाई पाटील, व उपाध्यक्ष, रंजन पाटील.

    सध्या माजी विद्यार्थी संघाला नेतृत्व देणारे अध्यक्ष श्री प्रमोद पाटील हे एक अत्यंत प्रसन्न, सौम्य परंतु खंबीर असे व्यक्तिमत्व आहे. स्वतः बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ असल्यामुळे प्रत्येक आर्थिक व्यवहार चोख ठेवण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो.  गेली सुमारे पंधरा वर्षे प्रमोद भाई या संस्थेशी सतत जोडले गेले आहेत. त्यामुळेच अध्यक्षपदाचा बहुमान तीन वर्षापूर्वी त्यांना मिळाला. सगळ्यांना एकत्र बांधून, संघशक्ती मधून एक नवी ऊर्जा निर्माण करण्याची हातोटी, आणि भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी, यांचा संगम असलेले हे नेतृत्व आहे. भविष्यातही त्यांच्या या अनुभवाचा, ज्ञानाचा, फायदा संस्थेला होत राहील. प्रमोद भाई च्या सध्याच्या टीममधील रंजन पाटील, अशोक राऊत, नरेंद्र वर्तक ही मंडळी आपापल्या क्षेत्रातील अनुभवी व जाणकार असून इतर सामाजिक क्षेत्रातही त्यांचा वावरत असल्याने, त्या अनुभवाचा फायदा ही माजी विद्यार्थी संघाला मिळतो. कार्यकर्ता किती तज्ञ आहे यापेक्षा तो किती सचोटीचा आहे या,कसोटीवर ही सर्वच मंडळी खूप ऊंचीवर आहेत,आणि तिच आमच्या माजी विद्यार्थी संघाची खरी शक्ती आहे.

सुरुवातीला 1999 साली, केवळ 160 सदस्य ,8 हितचिंतक आणि लाखभर रू. फंड स्कॉलरशिप साठी उपलब्ध करणारा  मा वि  संघ आज सुमारे 300 मेंबर्स, 152 ,हितचिंतक आणि 600,000 रुपयापर्यंत, दर वर्षी स्कॉलरशिप साठी फंड उपलब्ध  करतो.पहिल्या वर्षी आम्ही केवळ सहा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊ शकलो. आज घडीला,सुमारे वीस विद्यार्थ्यांना, विविध गटात, स्कॉलरशिप दिल्या जातात .यातील काही परतफेडीच्या तत्त्वावर तर काही संपूर्णपणे विना परतफेड अशा स्वरूपाच्या आहेत.एकूण वाटप रक्कम सुमारे पाच लाखापर्यंत वर्षाला होते.सुरुवातीला जेमतेम,दहा लाखाचा, आमचा राखीव निधी आज रू.75लाख,(पाऊणकोटी),पर्यंत गेलेला आहे .मला वाटते यातच माजी विद्यार्थी संघाने,स्थापनेपासून आजतागायत केलेल्या यशस्वी वाटचालीचे  रहस्य असावे.

     सर्व माजी  कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मनःपूर्वक धन्यवाद तर आजी व भविष्यातीलकार्यकर्त्यांना खूप शुभेच्छा.???

   ऋणनिर्देश करताना, आमच्या काही तत्कालीन धुरीणांचे, वसतीगृहातील काही कर्मचाऱ्यांचे नामनिर्देशन करणे मला जरूर आहे. संघाचे तत्कालीन मुख्य विश्वस्त,माननीय चिंतामणराव वर्तक,विश्वस्त मा. दादा ठाकूर,मामा ठाकूर  यांनी आम्हाला नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला. माजी उपाध्यक्ष, चित्रकार हरीश राऊत यांनी ही आमच्या सुरुवातीच्या अनेक उपक्रमात योगदान दिले आहे .वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ‘योगा शिक्षण’ , देण्यासाठी, डॉ.कै .गजाननराव पाटील, यांनी नियमित योगवर्ग वसतिगृहात त्या काळी सुरू केले होते. डॉ.मोहन कृष्णा राऊत,सांताक्रुज ,यांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून, आमच्या विद्यार्थ्यांना तंदुरुस्ती राखण्यास मदत केली आहे. .स्मारक मंदिराचे तत्कालीन व्यवस्थापक पांडुरंग भाऊराव पाटील,उर्फ अण्णा यांनी ही प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य दिलेले आहे . आमच्या वसतिगृहाच्या भोजनालयात अगदी प्रथम पासूनचे कर्मचारी श्री सखाराम पाटील,श्री रामचंद्र पाटील व कमलाकर या त्रिकुटाने,त्याकाळी सर्व विद्यार्थ्यांना सकस व सुंदर भोजन देऊन आमच्या प्रकृतीची काळजी घेतली आहे.  आमचे तत्कालीन सहजीवन सुसह्य, समृद्ध व सुसंस्कृत  करण्यासाठी ज्या समाज बांधवांनी हातभार लावला,त्यात, भोजनालयात थंड पाण्यासाठी कुलर व दूरदर्शन संच भेट देणारे कै.राजा पाटील, सातत्याने कित्येक वर्षे चालना मासिकाचे अंक विनामूल्य पाठविणारे,कै. अरविंद राऊत, ‘अणुविज्ञानाची’ सोप्या शब्दांत माहीती देऊन,मुलांबरोबर वार्तालाप करून गेलेले,कै.डाॅ.देवराव वर्तक अशा सर्व धुरीण,हितचिंतक व सुहृदांचे  अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्मरण करून, आज जे या जगांत  नाहीत, त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र प्रणाम करीत आहे.???

      सर्वसामान्यांची प्रबळ इच्छाशक्ती, ध्येयवादी नेतृत्व, व उत्तम संघटन या त्रिवेणी संगमावर निर्माण झालेली एक आदर्श  सामाजिक संस्था म्हणजे,”पूज्य तात्यासाहेब चुरी वसतिगृह माजी विद्यार्थी संघ”, ही होय. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात, दुष्टांचा दुष्टपणा जावो, त्यांच्यात सत्कर्माची आवड निर्माण होवो, म्हणून

 “भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे!”

अशी देवाला  विनवणी केली. मनुष्यातील याच मित्रभावनेचा, किंबहुना संघशक्ती चा उत्कर्ष होतो,तेव्हाच अशा सामाजिक संस्था निर्माण होतात.एकाच वेळी विभिन्न पातळीवरून सामाजिक जीवनाचा वेध घेण्याचे सामर्थ्य अशा संस्थांमध्ये असते. आमच्या या माजी विद्यार्थी संघाने, आज पावेतो सामाजिक, सांस्कृतिक, आणि शैक्षणिक, अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुढे आणले. मदत केली. त्यांचा यथाशक्ती सत्कारही केला. सर्व शून्यवत असताना,केवळ स्वकर्तृत्व, तळमळ आणि समर्पणाच्या भावनेमुळेच विद्यार्थी मित्रांनी ही आदर्श संस्था निर्माण केली. संस्थेचे स्वतःचे कार्यालय ही उभारले.आपले स्वतःचे सर्व प्रकारचे योगदान देत, परिश्रमाची पराकाष्ठा करीत, केवळ समर्पित भावनेने काम केल्यानंतरच अशी शिल्पे उभी राहतात. त्यासाठी मन ही खूप मोठे लागते. ज्या ठिकाणी खोली आणि उंची असलेली माणसे पदाधिकारी म्हणून काम करतात, त्या संस्थेला निश्चितच उज्ज्वल भवितव्य आहे.

  जाता जाता एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो. माजी विद्यार्थ्यांचा संघाच्या स्थापनेच्या वेळी, आमच्या काही समाज बांधवांनी व धुरिणांनी ” सो क्ष संघ असतांना, माजी विद्यार्थी संघाची आवश्यकता काय?” असे प्रश्न निर्माण केले होते. आज 25 वर्षानंतर ,माजी विद्यार्थी संघाच्या कामाने त्या शंकेला मूठमाती दिली आहे. समाजाच्या हितासाठी जेवढ्या सामाजिक संस्था निर्माण होतील तेवढे चांगलेच आहे.मात्र, समाजहितैषी संस्थांनी आपली उद्दिष्टे एकमेकाशी संलग्न असावीत हे पहावयास हवे. माजी विद्यार्थी संघाने आजपर्यंतच्या वाटचालीत, समाजांतील इतरही समाजोन्नती संस्थांशी व उपक्रमांची आपले संबंध नेहमी सलोख्याचे व संघर्ष रहीत  ठेवले आहेत. भविष्यात ही ते तसेच राहतील.

     एक विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे गेल्या सुमारे वीस-पंचवीस वर्षांत आमच्या सो समाजोन्नती संघात, अनेक पदे भूषवणारे कार्यकर्ते हे माजी विद्यार्थी संघाने दिलेले आहेत .त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, खजिनदार, विश्वस्त अशा सारख्या जबाबदारीच्या पदावर आमच्या मित्रांनी यशस्वी योगदान दिलेले आहे. माजी विद्यार्थी संघ हा सो क्ष संघासाठी, उत्तम कार्यकर्ते देणारी एक प्रशिक्षण संस्था झाली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये .

होय अजूनही आमच्या माजी विद्यार्थ्यांना खूप मोठी मजल मारावयाची आहे. समाजाला,आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी पैकी, एक सुसज्ज वाचनालय, सुंदर अभ्यासिका, वधू वर सूचक मंडळ, संगणक व विज्ञान कक्ष, अशा एक ना अनेक गोष्टी अजून विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. त्यासाठी भविष्यकाळात, निश्चितच आमची संघटना कार्यरत राहील, याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या श्रमाचा, पैशाचा, व वेळेचा मोबदला देऊन ही संस्था ऊभी केली त्या सर्व ज्ञात व अज्ञात मित्रांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो.आज जे या  जगात नाहीत, त्यांच्याही पुण्यस्मृतीला अभिवादन करतो. सध्या संस्थेसाठी योगदान देत असलेल्या  सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यां  मित्रांनाही  खूप खूप शुभेच्छा देतो. 

शेवटी माझ्या सर्व समाज बांधवांना ,ज्ञानदेवांच्या शब्दातच नम्र विनंती करतो, ‘मा वि संघाच्या,अगदी प्राथमिक अवस्थेतील रोपट्याला, समाज बांधवांनी जे प्रेम, जिव्हाळा दिला, तेच प्रेम, तीच आस्था, भविष्यात ही त्यांनी दाखवावी, ही विनंती..

      “हे सारस्वताचे गोड ,

      तुम्ही ची लाविले जी झाड.

      तरी आता अवधानामृते वाड,

       सिंपोनी कीजे.”

धन्यवाद.

दिगंबर वा राऊत,

माजी अध्यक्ष,पूज्यतात्यासाहेब चुरी, वि वसतिगृह, मा वि संघ.

या लेखाचे संकलन करताना श्री प्रमोद पाटील अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ, डॉ.सदानंद कवळी, विश्वस्त सोमवंशी क्षत्रिय समाज उन्नती संघ फंड ट्रस्ट, श्री रमेश सावे व श्री श्रीकांत राऊत, दोघेही संस्थापक सदस्य माजी विद्यार्थी संघ, यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ,त्यांचे
आभार मानणे मी उचित समजतो.