“निश्चयाचा महामेरू| सकल जनांसी आधारू”, नरेश भाई 

 ” हे जग सुंदर व्हावे, मानवी जीवन अव्यंग असावे, सुखा समाधानाने जगण्याचा हक्क प्रत्येक जीवमात्राला लाभावा” ही कविवर्य रवींद्रनाथ टागोरांची इच्छा होती. 

   ज्ञानदेवांनी देखील आपल्या पसायदानात, 

  “दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो”

असाच उदात्त भाव व्यक्त केला .

   अविवेकाची काजळी झडून, विवेकाची दिवाळी उजळत राहो. दुर्जनांची दुष्टता लोप पाऊन, सज्जनांची सुजनता वाढीस लागो, या भूलोकावर वैकुंठ अवतरो, अशीच प्रेषितांची प्रार्थना होती. मात्र  या संतांच्या प्रार्थनेतून प्रेरणा घेऊन, गुरुजनांचा सेवाभाव समोर ठेवून, स्वतः मधील देवत्व जागे करणारी व समाजाला आधारभूत ठरणारी किती माणसे आज पहावयास मिळतील? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी!

   आपल्याला मिळालेले सौभाग्य व धनसंपत्तीतील काही हिस्सा, बहुतालच्या परिसराला सुखा समाधानाने जगता यावे, यासाठी  खर्च व्हावा, अशी प्रेरणा घेऊन तसे प्रत्यक्षात आचरण करणाऱ्या माणसांना जग नेहमीच वंदन करते. अशाच एका वंदनीय व्यक्तीला अभिवादन करण्यासाठी हा लेख प्रपंच!! ती व्यक्ती जर तुमच, “आपल माणूस” असेल तर मग त्या नमनाला एक प्रेमाची ही झालंर असते!! लेखन प्रपंच केवळ शब्दांच्या बुडबुड्यांचा खेळ राहत नाही – ते होते अंतरीचे अभिवादन, एक मर्मबंधातली ठेव!!

      संत गाडगेबाबांचे काही वचने मला आठवतात. बाबांनी अखिल समाजाला सावरण्यासाठी काही वर्तनसूत्रे सांगितली आहेत.. त्यांना बायबल मधल्या दहा आज्ञा(TEN COMMANDMENTS) प्रमाणे आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे .

   जे सुखी आणि सुस्तीत आहेत त्यांनी इतरांसाठी काय करावे? बाबा म्हणतात, 

   “भुकेलेल्यांना जेवण द्यावे, तहानलेल्यांना पाणी द्यावे, उघड्या नागड्यांना वस्त्र द्यावे, गरीब मुला-मुलींना शिक्षण द्यावे, बेकारांना रोजगार द्यावा, बेघरांना आसरा द्यावा, अंध पंगु रोगी यांना उपचार द्यावे, पशुपक्षी आणि मुकेजीव यांनाहीअभय द्यावे, या जगातील प्रत्येक जीवाला जगण्याची हिंमत द्यावी!!”

 या जगातील सर्व धर्मांचे सार तरी काय आहे? 

  हे जग सुखी होण्यासाठी तुमच्या सुखातला एक हिस्सा वंचितांना द्या..’ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’. बस्स!

  हे सर्व आठवण्याचे कारण परवा माझ्या पाहण्यात आलेला, “श्री नरेश राऊत फाउंडेशन”चा एक छोटा व्हिडिओ … श्री नरेश जनार्दन राऊत उर्फ आमचे नरेश भाई.. हीच ती व्यक्ती …आमच्या मर्मबंधातली ठेव!

       परवा श्री नरेश राऊत फाउंडेशन (SNRFoundation) यांचा” गर्वगाथा” हा एक छोटा लघुपट व्हिडिओ पाहिला आणि नरेश भाईंचे हे आगळे वेगळे कर्तृत्व कर्तृत्व समाजासमोर आलेच पाहिजे या अंतरीक भावनेने केलेला हा लिखाणाचा प्रपंच!!

      भाईंचे बोर्डी परिसरातील समाजकार्य, सो क्ष स संघ, समाजोन्नती शिक्षणा संस्था, सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, पू. तात्यासाहेब चुरी माजी विद्यार्थी संघ तसेच मुंबई भागातील त्यांची कारखानदारी, नेतृत्व व समाजसेवा याची जाणीव मला आहे. कारण मी ते प्रत्यक्ष अनुभवले आहे. मात्र केलवड व जळगाव मधील, एस एन आर फाउंडेशन चे काम मी ऐकून होतो. परवा त्याची व्हिडिओ तून माहिती झाली आणि भाईच्या कर्तृत्वाची उंची किती आहे याची जाणीव झाली!

      महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील, डहाणू तालुक्यातील,बोर्डी या महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील एका छोट्या खेड्यात ,मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात, 19 सप्टेंबर 1947 रोजी जन्म घेतलेल्या एका अल्पशिक्षित मुलाने, त्याच्या आर्थिक ,बौद्धीक क्षमतेनुसार, एस एस सी पास होऊन, आय टी आय हा अभ्यासक्रम साताऱ्यात जाऊन पुर्ण केला. त्या शैक्षणिक पात्रतेच्या जोरावर, आपल्या केवळ गुणवत्तेने लार्सन अँड टुब्रो सारख्या एका मल्टिनॅशनल कंपनीत मशीन ऑपरेटर ची नोकरी मिळविली, अनुभव घेतला. तेथून अशाच एक -दोन मामुली नोकऱ्या केल्यानंतर 1984 साली,” हम भी कुछ कम नही”, आपणही काहीतरी करू शकतो, या जिद्दीच्या जोरावर कोणतेही आर्थिक पाठबळ व कारखानदारीची पार्श्वभूमी नसताना, मुंबईतील जोगेश्वरी उपनगरात एक छोटासा औद्योगिक गाळा आणि भाडेतत्त्वावर मशीन घेऊन, आपले कसब व चार कामगारांच्या साह्याने मोल्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालू केला. आपली महत्त्वाकांक्षा, गुणग्रहकता, कार्यक्षमता, जिज्ञासू वृत्ती नम्रता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची आकाशात भरारी असली तरी आपले पाय मात्र सदैव जमिनीवर ठेवण्याची दक्षता घेत, त्या लहान उद्योगाचे, पुढील केवळ पंधरा-सोळा वर्षात एक मोठ्या औद्योगिक साम्राज्यांत रूपांतर केले. आज, “अभिजीत डाईज अँड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड” या मूळ कंपनीचे नावाखाली सबंध भारतात सहा ऊप कंपन्या स्थापित करून, शेकडो लोकांना रोजगार मिळवून देत करोडो रुपयाची मालमत्ता निर्माण होत असताना, “इदम न मम”,म्हणत” आपल्या स्व कष्टार्जित संपत्ती मधील योग्य तो हिस्सा “माझ्या अवतीभवती असलेल्या वंचितांना, गरिबांना, भुकेलेल्यांना, मिळालाच पाहिजे, नव्हे तो देणे माझे कर्तव्य आहे” या भावनेने ती संपत्ती समाजाच्या कल्याणा साठी वेचतांना, आमच्या भारतीय संस्कृतीच्या उज्वल परंपरांचे, आपल्या परीने प्रत्यक्ष कृतीने पालन करणाऱ्या, नरेश भाईंचे सर्वच जीवन अनेक योगायोगानीं व नियतीच्या मंगलमय आशीर्वादानी परिपूर्ण असे आहे.त्यांच्या या अफाट कार्याला, दानशूरतेला व समाजसेवेला केलेला हा सलाम आहे. 

    आज अभिजीत डाईज अँड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड हा मुख्य कारखाना नायगाव, वसई येथे स्थितूअसून त्याच्या उपशाखा दादरा-नगर हवेली,अंबड -नाशिक, तळेगाव- पुणे,  चेन्नई आणि सानद -अहमदाबाद गुजरात येथे आहेत. विस्तारीकरणाबरोबरच काही वेगळ्या वाटा शोधण्याचे निमित्ताने कंपनीने उद्योगाचे विविधीकरण (Diversification), ही केले आहे. कंपनीची उलाढाल आज काही शेकडो कोटीत असून हजारो लोकांना त्यात रोजगार मिळतो आहे. नरेश भाईंचे दोन्ही चिरंजीव,  निखिल -अभिजीत व स्नुषा सौ. मौसमी-सौ. पल्लवी तसेच पत्नी सौ.मीनाताई सर्वांचा सहभाग या कामात असतो.. त्याचा उल्लेख पुढेही येईल.

     गेल्या 30,35 वर्षात कंपनीने मोठा पल्ला गाठला. प्रोडक्शन करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या साच्यापासून(Moulds) सुरुवात करून आज सुमारे 2500 टन क्षमतेपर्यंत विविध साचे बनविणारी व औद्योगिक क्षेत्रातील, विशेषत: ऑटो इंडस्ट्रीमध्ये छोट्या ‘होज असेंबली’, पासून ते मोठमोठ्या मोटर गाड्यांची, डॅशबोर्ड्स, फिल्टर्स, बंपर्स अशा नाना प्रकारच्या वस्तूंचे,अतिशय गुंतागुंतीचे साचे तयार करण्याचे काम ही कंपनी करते. इंजेक्शन व ब्लो मोल्डिंग अशा आधुनिक तंत्रज्ञानासाठी, महेंद्रा, होंडा, टाटा, गोदरेज ,सुझुकी,यामाहा अशा अनेक भारतीय व परदेशी मान्यवर कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत.

    एवढी उत्तुंग यश मिळवून समाजकार्यातही तेवढेच अग्रेसर असणारे नरेश भाई आपल्या कामाविषयी स्वतः जास्त बोलतच नाहीत. साधी राहणी व स्वतःच्याच मनोविश्वात दंग असलेले भाईंचे मोठेपण, प्रथमदर्शनी कोणालाच लक्षात येणार नाही.  त्यांच्या साध्या बोलण्यावरून,व पोषाखा वरून लक्षात येणारे भाईंचे काम हे केवळ,’ हिमनगाचे वरचे टोक’ आहे, हे नवख्या माणसास कालांतराने कळते. मी मागे सांगितल्याप्रमाणे, ‘श्री नरेश राऊत फाउंडेशन’ची माहिती देताना व्हीडीयोमध्ये ज्या साध्या शर्ट -पॅन्ट च्या पोषाखात भाई आपले मनोगत सांगतात, ते पाहून कोणालाही नवल वाटेल!  दहा-पंधरा कोटीची कंपनीची ऊलाढाल होत नाही, तेवढ्यात, ‘सूट बूट व टाय’ मध्ये, आपण हजारो कोटीच्या औद्योगिक साम्राज्याचे जणू धनी असल्याचा आव आणित, आपला डंका पिटणाऱ्या मंडळींच्या आजच्या जगात, नरेश भाईंचा हा साधेपणा उठून दिसतो! 

   उत्तम व्यवहारे जोडोनिया धन, उदास विचारे वेच करी ||

या संत वचनांचे मूर्तीमंत उदाहरण असलेले नरेश भाई हे आमचे व्यक्तिशः मित्र आहेत त्यामुळे मला स्वतःला ही खूप धन्यता वाटते!!

     भारतीय  संस्कृतीचा उदात्त विचार अवलंबून, समाजापुढे एक आदर्श ठेवणारे नरेश भाई हे जगासाठी वा समाजासाठी एक यशस्वी उद्योजक व समाजसेवक जरूर आहेत मात्र आम्हा  मित्रासाठी एक जिवलग आहेत. त्यांच्याशी असलेले जीवाभावाचे सख्य, आमचा एक मौलिक ठेवा आहे. .

   भाईंच्या सामाजिक योगदानाची यादी खूप मोठी आहे. त्यातील,’श्री. नरेश राऊत फाउंडेशन'(NTSF),मार्फत केळवड व जळगाव या महाराष्ट्रातील दोन अविकसित गावासाठी भाईंनी दाखविलेले ममत्त्व व दातृत्व केवळ अचंबित करणारे! 

   श्री नरेश राऊत फाउंडेशन तर्फे, केलवड, जळगाव येथे चालणाऱ्या कार्या ची काही क्षणचित्रे.

   परिसरातील शिक्षणोत्सुक  मुले व मुलीच्या शिक्षणासाठी शाळा.तज्ञामार्फत  शैक्षणिक मार्गदर्शन,खेडवळ मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाची जाणीव व्हावी म्हणून त्यांना खास संगणकीय प्रशिक्षण, गरीब व परंतु महत्त्वाकांक्षी मुलांना आपली बुद्धिमत्तेची चमक दाखविण्यासाठी,त्यांना ‘नॅशनल टॅलेंट सर्च’, सारख्या परीक्षांना बसण्यासाठी विशेष प्रशिक्षण.,दूर राहणाऱ्या मुला-मुलींसाठी मोफत वसतिगृहे ,अशी कामे विद्यार्थ्यांसाठी तेथे चालू आहेत .

     गावकऱ्यांसाठी, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणीपुरवठा. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन. शेती बागायती साठी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्धा करण्यासाठी जलसंधारण योजना, वृक्षारोपण. जंगल परिसरातील आदिवासी साठी आरोग्यसेवा.आदिवासी मानव संसाधन विकास प्रकल्प . प्रशिक्षण केंद्रे ई योजना सुरू आहेत.

     प्रौढ,अशिक्षित महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी शिवणकाम, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यात येते.

    परिसरातील सर्व धर्मीयांच्या प्रार्थना स्थळा साठी उदारहस्ते मदत. केली जाते. 

  मानवी संस्कृतीचा इतिहास घडला तो माणसाच्या दोन हातामुळे. माणसा सारखे हात एकाही प्राण्याला नाहीत .त्यामुळे प्रयत्नाने आपला भाग्योदय साधणे केवळ माणसाला शक्य होते.पाषाणाची मूर्ती व धरतीची शेती करता येते ती त्यामुळेच माणसाचे हे हात जेव्हा सद्बुद्धीच्या ज्ञाने चालतात, तेव्हा ते प्रतिसृष्टीची निर्मिती करू शकतात. 

    “हात उभारण्यासाठी असावेत, उगारण्यासाठी नसावेत” असे बाबा आमटे यांनी म्हटले ते उगीच नव्हे. बाबांनी रानावनात निर्माण केलेले नंदनवन, अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीचा केलेला कायापालट आणि आमच्या नरेश भाईंनी केलवड,जळगाव परिसरात, आपल्या स्वस्ते केलेले परिवर्तन व तेथील हजारो हाताना दिलेले बळ, हे केवळ भाईंच्या सद्बुद्धीने, हाताला दिलेल्या निश्चयाचे बळ आहे !!

    श्री नरेश राऊत फाउंडेशन तर्फे, केलवड, जळगाव येथे चालणाऱ्या कार्या ची काही क्षणचित्रे.

 हे सर्व सामाजिक कार्य म्हणजे, भाईंची अंतरिक दयाबुद्धी व “भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे”, या  तळमळीचा परिपाक आहे असे वाटते .

      SNR फाउंडेशन शिवाय इतरही अनेक  सामाजिक संस्थांमध्ये  भाईंनी खूप मोठे योगदान दिले आहे व अजूनही देत आहेत. नमुन्या दाखल काही,…

  • समाजोन्नती शिक्षण संस्था’, बोरिवली यांचे सल्लागार
  • आचार्य भिसे शिक्षण संस्था बोरीगाव,बोर्डी, येथे आई सौ.ईंदुमती जनार्दन राऊत व  स्वतःच्या नावे दोन प्रशस्त हॉलची बांधणी. 
  • लाखानी विद्यालय बोरीगाव या संस्थेत विश्वस्त.
  • पू. तात्यासाहेब चुरी वस्तीगृह, माजी विद्यार्थी संघ सल्लागार
  • आदिवासी वनवासी कल्याण केंद्र तलासरी ,विश्वस्त. 
  •  लायन्स क्लब ऑफ बोर्डी, सभासद.
  • महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,पेट्रन मेंबर, गव्हर्नींग कौन्सिल सदस्य 
  • फाउंडर मेंबर अँड वाइस प्रेसिडेंट ऑफ नोर्थ कोंकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चर. ..ई.
   गतवर्षी नरेश भाईंनी सो क्ष स  संघाची, अध्यक्षपदीय सूत्रे हाती घेतली. तेव्हा आपल्या सर्व सहकार्यासमवेत शपथ ग्रहण करताना नरेश भाई.

सध्या नरेश भाई आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजवादी संघाचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करीत असून, कै. पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराच्या पुनर्निर्माण कामांत हिरीरीने भाग घेत आहेत. या समाज मंदिराच्या नवनिर्माणाचा ध्यास त्यांनी घेतला आहे. या वास्तूतील कै. तात्यासाहेब चुरी वस्तीगृहात राहून भाईंनी आपले शिक्षण केले.  त्या सामाजिक ॠणांची जाणीव ठेवून आपल्या  अध्यक्षीय कालखंडात हे कार्य त्यांना पूर्णत्वास न्यावयाचे आहे. या स्मारक मंदिरातील पू.तात्यासाहेब चुरी स्मारक वस्तीगृहात राहहन गेलेल्या एका माजी विद्यार्थ्यांचे हातून, या वास्तूचा नवनिर्माण प्रकल्प साकार व्हावा ही नियतीची इच्छा दिसते. भाईंना या समाजकामात यश मिळो, हीच प्रार्थना आम्ही सर्व समाज बांधव करीत आहोत.स्वतः, तीन कोटी रुपयांची वैयक्तिक, घसघशीत  मोठी देणगी देत, त्यांनी समाज बांधवांपुढे,” बोले तैसा चाले..” या वचनाचा आदर्श ही घालून दिला आहे. भाई थँक्यू अँड ऑल द बेस्ट!!

    खजिनदार श्री प्रमोद पाटील, कार्यकारी विश्वस्त श्री दिगंबर राऊत व श्री विलास बंधू चोरघे समवेत,अध्यक्ष श्री नरेश भाई राऊत, दादर.

     नरेश भाईंच्या,” अभिजीत टूल्स अँड डाइज प्रायव्हेट लिमिटेड” व इतर उप कंपन्याच्या विविध कारखान्यात तयार होणारा माल, विशेषतः ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री साठी वापरला जातो. या कारखान्यात उत्पादित होणारे उत्पादन हे भारताबाहेरही अनेक जगद्विख्यात ऑटोमोबाईल कंपन्यांत निर्यात होत  असल्याने, अर्थातच त्यांची ‘अभिजीत डाईज अँड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड’ ,कंपनी ISO BVQI ISO 9001:2015 मानांकित असून असे मानांकन प्राप्त होणे हे या क्षेत्रातील कोणत्याही कंपनीस निश्चितच भूषणावह असे आहे. कोरिया, तैवान, स्पेन, जर्मनी या देशांत त्यांचे ग्राहक असणे, यावरूनही उत्पादित मालाची गुणवत्ता सिद्ध होते.

   अभिजीत डाईज अँड टूल्स प्रा लिमिटेड कंपनीला, सतत गुणवत्ता दर्जा राखणे(Consistency in Quality) व नियमित पुरवठा करणे(Consistency in Supplies),या प्रशंसनीय कामाबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत त्यातील काही..

  • BEST N OUTSTANDING PERFORMANCE AWARD (5 Times), Mahindra n Mahindra.
  • UDYOG RATNA AWARD, Institute of Economic Studies.
  • INDIAN ACHIEVERS AWARD..Indian  Organisation for commerce and Industry.
  • अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद ,अधिवेशनातुन मिळालेले मानपत्र.
  • “भास्कर अवाॅर्ड”, महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन, मुंबई व गोवा.
  • उद्योग भारती पुरस्कार ,ऑल इंडिया बिझनेस अँड कम्युनिटी फाउंडेशन.
  • द सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे “गौरव मूर्ती अवॉर्ड”
  • सोमवंशी क्षत्रिय उद्योग अवार्ड

ही त्यापैकी काही आहेत.

     मिळालेली विविध पारितोषिके, सन्मान व  गौरवा बद्दल भाईंचे विचार स्पष्ट आहेत.

  ” मी माझे काम करीत जातो, पारितोषिके  मला शोधत येतात”.

  ” अवाॅर्ड मिळविण्यासाठी साठी  मी कधीच काम केले नाही.”

  भाईंच्या उद्योगातील नैतिकतेचे व Business Philosophy चे दर्शन यातून व्हावे.

     हे सर्व ठीक आहे  मला याबद्दल जास्त सांगावयाचे नाही. कारण हे कर्तुत्व सर्व समाज आज कौतुकाने पाहतो आहे. अनेकांनी नियतकालिकात, मासिकांत, पुस्तकांत भाईंचे कौतुक अनेकदा केले आहे. एका यशस्वी, उदार ,कल्पक समाजाभिमुख, नेतृत्वाच्या यशाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न अजून कोणी केला असेल मला वाटत नाही. त्यासाठी थोडा भूतकाळाचा मागोवा घ्यावा लागेल… स्मृतीची पाने चाळवावी लागतील… या छोट्या लेखात मी तोच प्रयत्न माझ्या कुवती प्रमाणे करणार आहे.

      प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे कोणत्याही एका शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपत्तीत साठविलेले नसून ते इतरही अनेक घटकांवर अवलंबून आहे. बालपण, त्यावेळची परिस्थिती, कुटुंब, शेजार, मित्र, शाळा, शिक्षक, समाज व संस्कार यांचा व्यक्तिमत्वाच्या विकासावर परिणाम होतो. विशेषतः कुटुंबातील जिव्हाळा, प्रेम, मित्रांची संगत, शालेय वातावरण, शिक्षकांचा सहवास या गोष्टी ही महत्वाच्या होत. या गोष्टी व्यक्तीच्या बालमनावर जे चांगल्या वाईट विचारांचे आघात करतात व संस्कार करतात त्याचा  प्रौढपणीचे व्यक्तिमत्त्वाशी निगडित संबंध असतो.

   आज भासणारे भाईंचे व्यक्तिमत्व वर सांगितलेल्या  बालपणीच्या अनेक गोष्टीशी जोडले गेलेले आहे. आयुष्यात खूप काही मिळवून, तरीही आपले पाय जमिनीवर असू देणाऱ्या या माणसाचे व्यक्तिमत्व ही असेच कालानुसार विकसित होत गेले आहे. मी त्या भूतकालीन इतिहासाचा साक्षीदार आहे. म्हणून त्याविषयी थोडी मीमांसा करू शकतो.

     आमच्या त्या बालपणीच्या दिवसांत, आम्हा सर्वांची कौटुंबिक परिस्थिती ओढग्रस्तीचीच होती. गरिबी होतो पण लाचारी अजिबात नव्हती. अर्धी भाकरी मिळत होती पण दुसऱ्याच्या पानावरील लाडवाचा द्वेष मत्सर नव्हता. ती अर्धी भाकरी सर्वांनी वाटून खाण्याची संस्कृती होती. प्रामाणिकपणे कष्ट करा, शिका, स्वाभिमानी रहा… “चलते रहो, ये भी नही रहेगा, एक दिवस तुमचाही येईल”, असा आत्मविश्वास आमच्या त्या गरीब आई-वडिलांनी आमच्या मनात अप्रत्यक्षपणे रुजविला होता.

    भाईच्या कुटुंबाचे घर म्हणजे गुरांच्या गोठ्याचा अर्धा भाग. अगदी शेजारील आमचे घर म्हणजे एक चंद्रमौळी कुडाची झोपडी! भाईंच्या घरामागे निदान थोडी मोकळी शेत जमीन तरी होती, मात्र आम्हाला तर ना परसदार ना अंगण. त्यामुळे संध्याकाळी खेळण्यासाठी, गप्पा करण्यासाठी, आमचा मुक्काम त्यांचे घरीच असे.  तेथे भाईंचे वडील जनु भाऊ आणि आई इंदुताई यांचाही सहवास अनायासा मिळे. काय वर्णावा त्या दिवसातील तो आनंद! आमचे जनु भाऊ म्हणजे एक रांगडा शेतकरी गडी. व्यायामाने व कष्टाने कमावलेले त्यांचे कसदार शरीर भरदार व पिळदार होते. आम्हा सर्वासकट, बोर्डी गावातली अनेक मुले जनू भाऊंच्या निगराणीने, त्यांच्याच विहिरीत त्यावेळी पोहावयास शिकली. ते आम्हाला दोन्ही काखेत धरून सरळ पाण्यात फेकून देत. पहिल्याच उडी नंतर, नाका तोंडात पाणी गेल्यावर, जीवाच्या आकांताने होणाऱ्या हाताच्या झटापटी नंतर दुसरे दिवशीच आम्ही पोहावयास शिकलो!!

              पिताजी कै.जनार्दन वासुदेव राऊत व माता कै.इंदुमती जनार्दन राऊत

    आई इंदुताई च्या कष्टाला सीमा नव्हती. खाणारी एवढी तोंडे आणि कमाई  म्हणजे, शेतीमधील मिळणारे अत्यल्प ऊत्पन्न; त्याचीही शाश्वती नाही. पण ईंदूताई स्वाभिमानी होती. धीराची बाई होती. आशावादी होती. आपली गरिबी  तिने सुखाची मानली, मला वाटते आपल्या मुलांचा उज्वल भविष्यकाळ तिला डोळ्यासमोर दिसत असावा .तिचे  त्या दिवसांतील  एक वाक्य मला अजूनही आठवते. ती कधीतरी बोलताना आमच्या वाडवळी भाषेत सग्या सोयऱ्यांना म्हणे, “वाडतील बाळ त फेडतील काळ!” .. एक ना एक दिवस माझी मुले ही मोठी होतील ,आणि माझे पांग फेडतील!!

    भाई सकट, तिच्या सर्व मुलांनी,मुलींनी, तिच्या जिवंतपणीच तिला  वैभवाचे दिवस दाखविले!! नरेश भाईंनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ बोरीगाव येथील, आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये, कै. इंदुमती जनार्दन राऊत सभागृह बांधून आपल्या आईचे चिरंतन स्मारक केले,अंशतः मातृ ऋण फेडले.

   कृष शारीरिक बांध्याची इंदुताई खूप कमी बोले. मात्र बोलण्यातून तिच्या करारी बाण्याचे व स्वाभिमानी वृत्तीचे दर्शन होई.प्रसंग उद्धवल्यास, समोरच्या नाठाळ माणसाला,’ शाल जोडीतला’, एकच ठेवून देई आणि तो गप्प होई.

    माझी मथीकाकू  ही इंदुताईंची सखी आत्या. त्यामुळे आमच्या घरी कधीतरी शिळोप्याच्या गप्पा साठी ती येई. ती संभाषणे कधीतरी खेळता खेळताना कानावर पडत. बालपणीच्या ज्या,थोड्या व्यक्ती, प्रेमळ स्वभाव व करारी बाणा यामुळे माझ्या माझ्या लक्षात आहेत ,त्यातील इंदुताई एक आहेत, हे मी मोठ्या अभिमानाने सांगतो.

   आईचे संस्कार आयुष्यात खूप महत्त्वाचे हे मी सांगावयास नको .जगात आईच्या संस्काराचे कुठलेही पुस्तक नाही. कारण आईचे संस्कार हे पुस्तकाच्या पलीकडचे असतात. तिचे विचार, वागणे, बोलणे काळजातून आलेले असते. त्यामुळे मनावर संस्काराचे प्रतिबिंब उमटते. आई संस्कार कशी करते हे कधीच कळत नाही.तिची सहज प्रतिक्रिया असते. मुलांचे भवितव्यातचा  विचार सतत तिच्या मनात असतो. इंदुताईंचे दुसरे एक वचन माझ्या मनावर ठसले आहे ती आपल्या लेकरांना नेहमी सांगे,

  ” उद्योगधंद्यात एकत्र रहा, पण स्वतःची घरे मात्र स्वतंत्र असू देत!”

  मला वाटते या अल्पशिक्षित बाईच्या  धोरणात किती मोठे तत्त्वज्ञान दडले आहे, हे मी विस्ताराने सांगावयास नको!!

  हा संस्कारांचा विषय आला म्हणून सहज सांगतो. भाईंचे आजोबा कै.वासुदेवराव राऊत हे एक अत्यंत सुसंस्कृत व करारी व्यक्तिमत्व होते. आपल्या सकाळ संध्याकाळच्या, परमेश्वर प्रार्थनेत अस्खलितपणे, संस्कृत रामरक्षेचे पठण करणारा, माझ्या पाहण्यात आलेला हा पहिला वाडवळ! या वरून, या कुटुंबात  संस्कारांची पार्श्वभूमी काय होती  एवढे कळावे ! 

  इंदुताईं व ती मागची पिढी, विषयी मी थोडे विस्ताराने लिहिले, ते याचसाठी. अजूनही सांगण्यासारख्या खूप आठवणी आहेत. भाई व त्यांच्या सर्व भावंडांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत, वाडवडिलांचे  व विशेषतः त्यांच्या मातेचा मोठा प्रभाव  आहे असे मला वाटते.

   त्या कठीण कसोटीच्या दिवसात, बिकटप्रसंगांत त्या माऊलीने, परिस्थितीला, स्वतःवर व स्वतःच्या मुलाबाळावर कधीही मात करू दिली नाही. प्रत्येक कठीण प्रसंगाचा  निर्धाराने सामना केला. आणि आपली मुले,मुली, एक ना एक दिवस वैभवाच्या शिखरावर असतील अशी स्वप्ने पाहिली. भाईच्या व्यक्तिमत्त्वात आज प्रकर्षाने आढळणाऱ्या त्यांच्या, यशस्वी वाटचालीला कारणीभूत, दुर्मिळ गुणांचा उगम कोठे आहे  याचा  बोध त्यांच्या या कौटुंबिक पार्श्वभूमीवरून व्हावा असे मला वाटते. भाई व त्यांची सर्व भावंडे माझ्याशी याबाबतीत सहमत होतील असेही वाटते.

   भाईंचे कनिष्ठ बंधू व माझे  मित्र महेश भाई, ऊर्फ दादा सध्या कॅनडामध्ये आहेत. माझ्या संपर्कात असतात. महेश दादा देखील  चांगले कर्तृत्ववान, उद्योजक आहेत. आपल्या उद्योगात व जीवनाच्या वाटचालीत नरेश भाईंचे उपकार,आई वडिलांचे ॠण  मानतात. नरेश भाई विषयीची एक सुंदर आठवण दादाने सांगीतली. त्यावरूनही,” बाळाचे पाय पाळण्यात दिसतात”,या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय यावा.

 महेश भाईच्या शब्दात ही आठवण…

  ” आमच्या लहानपणी परिस्थिती तशी ओढग्रस्तीची. कोणत्याच प्रकारची चैन आम्ही केली नाही. तरीही आम्ही सर्व सात भावंडे खूप आनंदात व खेळीमेळीने राहिलो .त्यात माझे जेष्ठ बंधू नाना व भाई यांचे प्रेम व मार्गदर्शन आम्हा सर्वांना मोलाचे ठरले.  पैसे मोजून, दुकानातून, बाहेरून, काही गोडधोड, मिठाईचे खाद्यपदार्थ आणणे शक्यच नव्हते. मात्र आमच्या नरेश भाईच्या कल्पकतेने, चातुर्याने आम्ही ज्या मौज ,मजा,गमती, केल्या त्याला तोड नाही.”

    ” आई- वडील दुपारी झोपल्यानंतर, बारा ते  दोन या वेळेत आमचे लघुउद्योग सुरू होत. घरातून निघून, वाडीत जाऊन गुळपापडी बनविण्याचा आमचा उद्योग असे. त्यासाठी लागणारा गुळ ,रवा ,डालडा तूप वगैरेचे व्यवस्थापन भाईच करत असे. प्रत्येकाला काम वाटून द्यायचा आणि कोणी  कोणता पदार्थ व वस्तू घरातून गुपचूप घेऊन यायचे,त्याच्या सूचना तो आम्हास देई. अगदी स्टोव्ह, भांडी पराती,व काही इतर सामान हे सर्व, अजिबात आवाज न करता आणावे लागे. अगदी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी चे लिंबू टिंबू ,दीपक, किरणला, ‘सुरक्षा रक्षका’ची जबाबदारी भाई देई. जेणेकरून आई-बाबांना मध्येच जाग आल्यास, तो संदेश पटकन वाडीत आम्हा कारागीरा पर्यंत यावा व सामानाची लपवाछपवी करण्यास अवधी मिळावा.आई बाबा झोपून उठण्यापूर्वी गुळपापडी तयार होऊन, घरातून आणलेल्या वस्तू जागच्या जागी नेऊन ठेवणे, याला खूप नियोजन लागे. भाई ते सर्व काळजीपूर्वक करी. गुळपापडी देखील सर्वांना सारखी वाटली जाई. आमच्या बालपणीच्या त्या गुळपापडीला पुढे कोणत्याही पक्वान्नाची सर आली नाही. बालपणीचीअशी मजा आम्ही सर्व भावंडांनी, भाईच्या कल्पक व्यवस्थापनामुळे व उमद्या स्वभावामुळे अनुभवली. ‘जे काही असेल ते सर्वांनी, सारखे वाटून खाण्याचे’ धडे त्याच दिवसात गिरवले” 

    पुढे भाई आय टीआय च्या कोर्स करिता बाहेर गावी गेला. आणि कोर्स पूर्ण करून मुंबईला नोकरीस लागला. आमच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती खूप बेताची असल्यामुळे आम्हा भावंडांना इच्छा व कुवत असूनही कॉलेज शिक्षण करता येणे कठीण होते . तरीपण भाईला मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून तो आमच्या शिक्षणा करिता, थोडाफार खर्च करीत असे. त्यामुळेच मी तरी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो.

  भाईच्या अंगी असलेले हे व्यवस्थापनाचे व समत्व बुद्धीचे उपजत गुण पुढे त्याला एक यशस्वी उद्योजक होण्यात नक्कीच उपयोगी पडले असतील. असा हा आमचा भाई आणि असे त्याचे आम्हा सर्वांवर निर्मळ प्रेम !भाईला दीर्घायु मिळो त्याचे प्रेम आम्हाला असेच मिळत राहो ही प्रार्थना!!”..

   बंधू महेश दादा यांनी सांगितलेल्या या बालपणीच्या मजेदार आठवणी नंतर, मी काही जास्त भाष्य करावे याची गरज नाही.

“प्रत्येक गोष्टीचे काटेकोर नियोजन व सर्वाप्रती समत्व बुद्धी ही यशस्वी उद्योजकाची लक्षणे भाई त्या दिवसापासूनच जाणत होता! ..धन्यवाद दादा.”

     भाईंच्या यशाचे व कर्तृत्वाचे यशोगीत आज समाज गातो आहे. भविष्यातही ते होत राहील. या यशोमंदिराच्या पायाचे दगड झालेले, मायबाप व आप्तस्वकीय  यांचा भाईंना जरूर आठव आहे आणि राहील, पुढची पिढही तो वसा पुढे चालवील, याची मला खात्री वाटते.

सौ. मीना वहिनी, केळवडच्या एका कार्यक्रमात.

    प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे कोणत्यातरी स्त्रीचा हात असतोच . भाईच्या जीवनातील,लग्न पूर्वी आई व विवाहा नंतर पत्नी सौ. मीनाताई यांची सक्षम साथ या  मोठ्या प्रेरणा आहेत. सौ मीनाताई या चिंचणीच्या कै.भास्करराव सावे उर्फ भास्कर गुरुजी यांच्या कन्या. त्यांचे वडील  अतिशय शिस्तप्रिय व शिक्षण प्रेमी असे शिक्षक होते. “त्यांचे संस्कार आणि शिस्तीमुळे आपण जीवनाचा मार्ग यशस्वीपणे चालू शकलो”, असे आजही त्यांचे कित्येक विद्यार्थी प्रांजळपणे कबूल करतात. विशेष म्हणजे माझे वडील व भास्कर गुरुजी सह-व्यवसायीक, म्हणजे प्राथमिक शिक्षक. दोघेही चिंचणीतच शिक्षण दानाचे काम करीत असल्याने  भास्कर गुरुजींचे आमच्या चिंचणी चे घरी वारंवार येणे जाणे असे. त्यांनाही मी खूप जवळून पाहिले व आहे व प्रभावित झालो आहे. सौ मीनाताईना आपल्या आई वडिलांकडून मोठा सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा मिळाला आहे. आपला नवरा मोठा यशस्वी उद्योजक असून कोणतीच वानवा नसतानाही मीनाताईंनी आपल्या वडिलांचा शिक्षकी पेशा मोठ्या गौरवाने व अभिमानाने, यशस्वीपणे पुढे चालविला.त्यांच्या स्वभावातील माणसे जोडण्याची वृत्ती आणि चेहऱ्यावरील आनंदी भाव भाईंच्या यशस्वी उद्यमशीलतेला  उपकृत झाले.

नरेश भाईंचे दोन्ही चिरंजीव आणि दोन्ही स्नुषा ,श्री.निखील-सौ मोसमी, व श्री अभिजीत -सौ पल्लवी ,कंपनीच्या व्यवस्थापनात पूर्ण योगदान देत असतात. भाईंच्या कुटुंबाला एक यशस्वी कुटुंब म्हणून सुख समाधान व सौख्याचे परिमाण देतात. 

    निखिल बरोबर काही महिन्यापूर्वी दादर वर्तक हॉल ते अंधेरी पर्यंत कारमधून एकत्र येण्याचा योग आला. त्यावेळी या लक्ष्मीपुत्राकडे असलेली व्यवसायाची समजदारी, आपल्या कर्तुत्ववान पित्या विषयी आदर व भविष्याचा वेध घेऊन त्याप्रमाणे आपल्या भविष्यातील उद्योगाची करावयाची आखणी, याबद्दल त्याचे विचार ऐकून मी आश्चर्यचकित झालो. आपला वारसा  तेवढ्याच समर्थपणे  पुढे चालविणारी भावी पिढी मिळणे हे पित्याचे मोठे समाधान. नरेश भाई त्या बाबतीतही खूप भाग्यवान !!

     भाईंच्या जीवनाच्या  वाटचालीत, मोठे बंधू श्री प्रभाकर राऊत(नाना), श्री महेश राऊत,(दादा)किरण ,दीपक व भगिनी कै प्रतिभा पाटील( ज्यांचे आत्ताच काही महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले आहे), सौ. मीना चंद्रकांत सावे तसेच या सर्वांचे कुटुंबीय यांच्या सहकाराचा व समन्वयाचाही मोठा वाटा आहे. या बंधू भगिनींचे आपापसातील प्रेम व सर्वांना एकामेका बद्दल वाटणारी आत्मीयता ही इतरत्र खूप दुर्मिळ आहे. सर्वांना भाईच्या कर्तुत्वाचा आदर आहे. भाईच्या सर्व भावंडात भाईंपेक्षाही प्रभाकर नानांशी माझी जास्त जवळीक आहे. आजही आम्ही गावातील सामाजिक कार्यात एकत्र असतो. भाई हा चांदणे शिंपीत जाणारा शीतल चंद्रमा तर आमचा  नाना म्हणजे मध्यांनी तळपणारा सूर्य! दोघांचेही स्वभावगुणधर्म वेगळे असले तरी कर्तुत्व सारखेच आहे. सोमवंशी क्षत्रिय संघाच्या शतकमहोत्सवी क्रीडा सामन्यांचे बोर्डी शाखेतील अत्यंत यशस्वी आयोजन सर्वांच्या कौतुकाचा विषय झाले होते. त्यामागे प्रेरणा होती ती मित्रवर्य प्रभाकर नाना यांची! या एका गोष्टीवरून त्यांच्याही व्यवस्थापन कौशल्याची ही कल्पना यावी. प्रभाकर नाना हा लेखनाचा एक स्वतंत्र विषय आहे. माझ्यासाठी या सर्वच भावंडांचे मिळणारे प्रेम व आदर, हा माझ्या आयुष्यातील खूप मौल्यवान असा ठेवा आहे. मी तो नेहमीच जतन करित आलो!

   एखाद्या पैलू पाडलेल्या हिऱ्याला, कोवळ्या सूर्यप्रकाशात पाहताना, वेगवेगळ्या कोनांतून फाकणाऱ्या रंगीबेरंगी प्रकाश छटा न्याहाळतांना, पाहणारा हरखून जातो. कोणत्या अंगाने ते सौंदर्य किती उपभोगावे असा संभ्रम पडतो? नरेश भाईंच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतानाही असाच गोंधळ उडतो.  त्यांचे कर्तुत्व, दातृत्व,नेतृत्व,मित्रत्व, ममत्व अनुभवतांना त्यांचं नेमकं श्रेष्ठत्व कशात आहे सांगता येणार नाही.एका विचारवंतांचे एक वाक्य याप्रसंगी मला आठवते तो म्हणतो,

   “गंगोत्री ते गंगासागर हा प्रवास  एखादा लाकडाचा ओंडका ही करू शकतो. मात्र गंगासागर ते गंगोत्री असा प्रवास फक्त आणि फक्त जातीवंत, नीतीवंत ,कर्तुत्ववंत आणि भाग्यवंतच करू शकतो!!”

    नरेश भाई हा असा वेगळाच नरपुंगव आहे! आम्हा सर्व समाज बांधवांना, बंधू-भगिनींना,स्नेहीजनांना त्याचा अभिमान आहे. विशेष करून, माझ्यासारख्या त्याच्या समकालीन बालमित्रांना, ते थोडे अधिकच असणे साहजिक आहे!!

     भाईचे  गुणगान करताना, परमेश्वराजवळ  एकच विनंती..

  “माझ्या मित्राची कीर्ती अशीच दिवसेंदिवस, वृद्धिंगत होऊ दे, समाजाच्या भल्यासाठी त्याला निरामय दीर्घायुष्य  मिळू दे.अहंकाराचा वारा त्याला कधी कधीच न लागो.”

   ही मागणी. करीत, संत शिरोमणी नामदेवरायांची ती प्रसिद्ध ओवी उद्धृत करतो,,,,

      आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।

      माझिया सकला हरिच्या दासा।

      कल्पनेची बाधा न हो कोणे काळी।

      ही संत मंडळी सुखी असो।

     अहंकाराचा वारा न लागो राजसा,

      माझ्या विष्णू दासा भाविकांसी।।

???