पहिली परदेश वारी (१९८९) – फ्रांस, बेल्जियम, लंडन, दुबई

पहिला परदेश प्रवास, तो देखील सुमारे तीस वर्षापूर्वी आणि सरकारी कंपनीच्या खर्चाने, एका परदेशी कंपनीचा पाहुणा म्हणून….. खूपच अप्रुप होते! त्या काळात परदेश प्रवासाचे, आजच्यासारखे ,पेव फुटले नव्हते, परदेशी चलनाचा तुटवडा व त्यामुळे आलेली बंधने, यामुळे कंपनी तर्फेच काय पण वैयक्तिक रित्या, श्रीमंताना सुद्धा परदेशी जाणे खूप दुर्मिळ गोष्ट होती. मला तर लहानपणापासून ‘परदेश-वारी’ची खूप उत्सुकता व त्यासाठी पाहिलेली स्वप्ने, रचलेली मनो राज्ये. १९७० साली अमेरीकेला शिक्षणासाठी जाण्याचा योग हुकला होता व त्यानंतर १९७३ साली आफ्रीकेत नोकरीसाठी जाणे ही रद्द केले होते. कै. आप्पांनी मला त्यावेळी ‘सबुरीचा’ सल्ला दिला व तो मला शिरोधार्य होता.

आमची अमेरीकन Esso ‘एस्सो स्टॅंडर्ड’ कंपनी १९७४ साली HPCL (हिंदुस्थान पेट्रोलियम कॉरपोरेषन लिमिटेड) झाली व त्यामुळे या सरकारी कंपनीला पुढील वाटचाली साठी, नवीन संशोधन व अनेक विविध उत्पादने निर्माण करण्यासाठी, काही परदेशी कंपन्यांबरोबर ‘हात मिळवणी’ करून आपल्या विक्रीचे क्षेत्र विस्तारीत करून, या क्षेत्रातील आपल्या  प्रतिस्पर्धी कंपन्यांशी दोन हात करणे जरुरी होते. त्यासाठी HPCL ने सन १९८८ मध्ये फ्रान्सच्या ‘एल्फ ल्यूब’ (ELF LUBE) या जगप्रसिद्ध पेट्रोलियम कंपनी बरोबर एक समझोता (MOU) करून, त्यांची उत्पादने भारतातील आपल्या माझगांव येथील सर्वात मोठया कारखान्यात तयार करण्याचे ठरविले. त्यासाठी ‘एल्फ’ कंपनीच्या फ्रान्स मधील विविध शाखांना भेट देऊन तशा सुविधा माझगांव कारखान्यात निर्माण करावयाच्या होत्या, जेणेकरून ‘एल्फ’ ची आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘मरीन वंगणे’ (marine lubricants), त्यांच्याच ब्रँड खाली निर्माण होणार होती. त्यासाठी चार सदस्याचे एक पथक माझ्या नेतृत्वाखाली, एल्फचे पॅरीस मधील ऑफीस, बेल्जीयम येथील उत्पादन केंद्र व लिओन येथील गुणवत्ता व संशोधन केंद्र (QC / R&D) आम्हास पहावयाचे होते व एक अहवाल कंपनीस द्यावयाचा होता.

मी (माझगांव फॅक्टरी प्रमुख,), श्री. लेहरी (वितरण विभाग), श्री. भास्करन (माझगांवच्या ल्यूब विभागाचे प्रमुख), व श्री. कृष्णमूर्ती (Quality Control Incharge), असे आमचे पथक होते. 

त्यावेळी आमचे मार्केटिंग विभागाचे प्रमुख व माझे वरीष्ठ श्री. किशन हे खरोखर मोठ्या मनाचे व एक उत्तम प्रशासक होते. पॅरीसला जात आहात तर तेथून लंडन शहराची एक दिवसाची सफर करा, तसेच परतीच्या प्रवासात दुबईला दोन दिवस थांबून ‘दुबई दर्शन’ करा असा ‘बोनस’ देखील या भल्या गृहस्थाने आम्हा चौघांस दिला होता. एका देशाबरोबर दुसरे-तीन देश, हे ‘सोनेपे सुहागा’ होते. आम्ही सगळेच खूप उत्साहित झालो होतो.

त्या वर्षी आमचे सगळेच ग्रह, ‘परदेश प्रवास’ या घटनेसाठी खूप ऊच्चीचे झाले असावेत. आमच्या ‘एव्हीएशन’ खात्याचे (जो विभाग विमानांना इंधन पुरवठा करतो), प्रमुख, जे किशन साहेबांचे जवळचे मित्र होते, त्यांनी आमची एअर इंडिया या विमान कंपनीची आमची ‘इकॉनॉमी क्लास’ तिकिटे  ‘बिझनेस क्लास’ मध्ये रुपांतरीत करून दिली कारण ‘एअर इंडिया’ या सरकारी विमान कंपनीस आमची एच.पी. सी. कंपनी इंधन देत असे. एकाच वेळी प्रथमच चार देशांचा प्रवास तो देखील ‘उच्च वर्गाने’ आणि एल्फ ,ल्युब्रीझॉल, बामरलॉरी या सारख्या विशाल आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे खास पाहुणे म्हणून — मग आमच्या आनंद पारावर नसला तर नवल कसले?

प्रवासाचा दिवस उजाडला ! त्याच काळांत एअर इंडियाने ‘जंबो ७४७’ ही ‘डबल डेकर’ विमाने प्रवासासाठी खरेदी केली होती व ते देखील एक आकर्षण होते. श्री. कृष्ण मूर्ती (आमचे सह प्रवासी), यांचे मेहुणे एअर इंडियात कॅप्टन — पायलट म्हणून कार्यरत होते व त्यांनी, आम्हाला निरोप देण्यासाठी जातीने हजर राहून ‘महेंद्र वर्मन’ या आमच्या डबल डेकर विमानाच्या सर्व क्रू मेंबर्सना भेटून “योग्य त्या” सूचना दिल्या, मग आमच्या आदरातिथ्यात काय कसूर राहणार? सर्व मज्जाच मज्जा होती. विशेष म्हणजे ही फ्लाईट मुंबई ते दिल्ली व दिल्ली पॅरीस अशी थेट जाणार होती. सुमारे दहा तासाचा प्रवास होता.

त्यावेळी विमान प्रवासातील प्रथेनुसार, विमानांतील प्रवाश्यासाठी सर्व प्रकारची पेय (drinks) उपलब्ध होती, मात्र ती दिल्ली हून उड्डाणानंतर, मात्र आम्ही स्पेशल क्लास मधील प्रवासी व ते देखील एअर इंडियाच्या एका कमांडर पायलटचे पाहुणे, मग काय विचारता? विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतल्या बरोबर आमच्या समोर ‘मेनु’ कार्ड आले! त्यात सर्व प्रकारची विदेशी मद्यांची यादी होती व खाण्यासाठी (चकणा), काजु, बदाम पासून सर्व फराळ हाजीर होता. आम्ही सर्वांनी आपापल्या पसंतीप्रमाणे ड्रिंक्स मागविली. विशेष म्हणजे आमचे मित्र कृष्णमूर्ती हे पक्के मद्रासी ब्राम्हण व त्यांनी कधी द्राक्षासवाला देखील स्पर्ष केला नव्हता, मात्र त्या प्रवासाचे ते माहोल पाहून, त्यांना ही स्फुरण चढले व त्यांनी ही ‘जर्मन बिअर’ चा आस्वाद घेणे सुरु केले. दिल्लीच्या पुढे तर, सर्वांनीच ‘तिर्थ प्राशनाचा’ कार्यक्रम  सुरु केला… विमान हवेत तरंगत होते तर आम्ही विमानात तरंगत होतो…. ‘जीवाची  पॅरीस’ ट्रिप चालू होती ना! 

मी (window seat) विंडो-सीटवर असल्याने, खाली पाहून माझ्या ‘प्रिय भारत देशाची सीमा, पहिल्यांदा कधी ओलांडतोय याची नोंद घेऊ इच्छित होतो आणि तेवढ्यात विमानातून पायलटने उद्घोषणा केली …’’प्रवाशी मित्रांनो… आपले विमान आता पाकिस्तानच्या सीमेवरून पुढे जात आहे आपल्या देशाची सीमा आपण ओलांडत आहोत’’ माझे डोळे पटकन पाणावले बिअरची धुंदी खाडकन उतरली…. पंधरा वर्षांपूर्वी परदेश वारीचे स्वप्न भंग पावले होते. कै. आप्पांची तशी इच्छा होती… मात्र त्या वेळी त्यांनी आशीर्वाद दिला होता. “बेटा निराश होऊ नकोस,भविष्यात तुला परदेश प्रवासाच्या अनेक संधी येतील, खूप प्रवास करशील, आता मात्र परदेशी जाऊ नकोस!’’ 

एका संत पुरुषांचा आशीर्वाद खरा ठरत होता, मी भारताची हद्द ओलांडली होती आणि भविष्यात ही अनेक वेळा ओलांडणार होतो. स्वा. सावरकरांचा ‘ने मजसी ने….’’ या काव्यातील तगमग तीव्रतेने जाणवली, खाली पाहून, परदेशाची भूमी कशी दिसते म्हणून प्रयत्न केला, तो पर्यंत इराकच्या तेल खाणीचे पाईप व उजाड ,रेताड वाळू दिसू लागली होती!

माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. लख्ख दिवस व छान उजेड यामुळे विंडो सीटचा पुरेपूर फायदा घेत, मी ‘परदेश भूमी’ दिसते कशी ते पहात होतो व वरून दिसणारे खालचे दृष्य पाहून, नवल करत होतो. आशियाचा भुप्रदेश असे पर्यंत डोंगर, दऱ्या आणि असेच दिसत होती मात्र युरोपची भूमी सुरु झाली आणि खालचे दृष्य जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे बदलले,हिमाच्छादीत शिखरे, सुंदर टुमदार घरे, हिरवे बगीचे आणि रजतगिरी वरून परावर्तीत होणारे सूर्यकिरण … सारेच अचंबीत करत होते… आयुष्यात आपण प्रथमच काहीतरी ‘वेगळे’ पाहत आहोत ही जाणीव होत होती.  शेवटी शेवटी जर्मनी स्वित्झर्लंड हे देश आल्यावर मी माझी जागा सोडून विमानाच्या शेपटीकडील भागात थोड्या मोठ्या खिडक्या असतात, तेथून हे सृष्टीचे नवल न्याहळू लागलो! हे काहीतरी वेगळं,नवलाई, घडत होत.

मध्ये एक गंमत झाली जेवणाच्या वेळी, आलेला मेनू मध्ये बिरयाणी, तंदुर पदार्थांची रेलचेल होती. हवाई सुंदरी जेवणाची ताटे घेऊन आली आणि तिला आम्हा चार प्रवाशापैकी एक प्रवासी सीटवर बसलेला दिसेना….. टॉयलेटला गेले असतील म्हणून थोडा वेळ वाट पाहिली, मात्र तेथे ही कोणी नव्हते म्हणून आम्हाला काळजी वाटू लागली. ह्या ‘सुंदऱ्या’ प्रशिक्षित व खूप अनुभवी असतात, त्यामुळे काय झाले असावे हे तिच्या चाणाक्ष बुद्धीने जाणले व तिने पटकन, रिकामी खुर्ची खालून, कॉलर पकडून आमच्या एका मित्राची ‘सुद-बुद’ हरपलेली, ब्रम्हानंदी टाळी लागलेली मूर्ती बाहेर खेचली. थोडे थंड पाणी व ‘काळी कॉफी’ पाजून गृहस्थांनी डोळे उघडले, नशीब त्या वर्गात प्रवाशी मोजकेच होते, त्यामुळे थोडे शरमल्या ॉसारखे त्यांना नक्कीच झाले. आम्ही देखील जाऊ दे रे, पहिला परदेशी प्रवास आहे आणि बिअर खूप स्ट्रॉंग आहे, तुझा काय दोष‘’  असे सांगून त्यांना जेवण भरविले .मात्र पुढील सर्व प्रवासात, परतीच्या विमानात बसे पर्यंत ह्या गृहस्थांनी ग्लासला ‘हात’ लावला नाही!! त्याच मित्राची आणखी एक गंमत पुढे!

बघता बघता पॅरीस विमानतळावर उतरण्याची उद्घोषणा झाली. उत्सुकता शिगेस पोहोचली होती. आयुष्यात पहिल्यांदाच ‘परदेशी भूमीवर पाय टेकायला मिळणार होते, आणि ते देखील जगातील सुंदर समजल्या  जाणाऱ्या, एका स्वप्ननगरी मध्ये! वरून पॅरीस शहराचे विहंगम  दृष्य पाहत ,नीट नेटकी, खूप उंच नसलेली घरे, गुळगुळीत चकाकणारे रस्ते व मध्ये सुंदर हिरवे गालिचे अंथरल्यासारखी ऊपवने!

विमानतळावर ‘एल्फ’ या कंपनीने त्यांचे एक वरीष्ठ मॅनेजर, जे भारतात येऊन आम्हाला भेटून गेले होते. त्यांचे नाव आठवते — श्री. बिगो, आम्हाला उतरवून घेण्यासाठी व पुढील तजबीज करण्यासाठी आले होते.

Visit to France

हॉटेलवर जाण्याआधी, आम्हाला काही खाऊ घालावे असे त्यांनी ठरवले होते, कारण त्यांची जेवणाची वेळ (संध्याकाळ) झालेलीच होती. म्हणून आम्हाला तेथील एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये घेऊन गेले, बघतो तर तेथे पाण्या ऐवजी प्रथम, welcome drinks म्हणून, वाईनच्या बाटल्या ठेवल्या होत्या, मात्र विमानात भरपूर पेय पान झाले होते म्हणून आम्ही सरळ खाण्यासाठी ,काही मागवा अशी विनंती श्री. बिगो यांना केली. तेथेही गंमत झाली. युरोपियन विशेषता फ्रेंच लोकांना जेवणात विविध प्रकारची ‘सलाड’ हे उच्चभ्रू लोकांचे लक्षण वाटते. त्यामुळे आमच्या समोर अत्यंत कोवळ्या पानांची, विविध रंगाच्या पालेभाज्याची बिस्किटे व त्या बरोबर निरनिराळे मसाले (sauces) आले. आम्ही एकमेकांकडे पाहतच राहिलो. बिचाऱ्या फ्रेंच गृहस्थांना कळेना, आम्ही असे हतबल का झालो आहोत. शेवटी मी त्यांना आमची अडचण व आवड सांगितली, तेव्हा काही वाफाळलेले मासे, व काही उकडलेल्या मटण, चिकनच्या डिशेस आल्या, त्यात सुद्धा नेमके कोणते मसाले वापरावेत हे माहित नसल्याने आम्ही …. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाह: स्मरण करीत भक्षण केल्या.

त्वरीत हॉटेल मध्ये गेलो. आम्हाला खोलीत प्रवेश देण्याआधी काही सूचना विशद  करून देण्यात आल्या.  एक म्हणजे येथे कपडे लॉंड्रीत द्यायचे नाहीत, हॉटेलच्या लॉंड्रीत स्वतःला कपडे धुवायचे, खोलीत असलेल्या फ्रीज मध्ये विविध पेय ठेवली आहेत, त्यात वाईनची बाटली ही complimentry असते, बाकीच्या पेयांना पैसे पडतील, तसेच TV वरील कार्यक्रम पाहतांना काही channels हे निषिध्द आहेत, त्यासाठी तुम्ही पैसे भरायचे! याचा अर्थ आमच्या नक्कीच लक्ष्यात आला होता.

मात्र पिण्याच्या पाण्यासाठी विशिष्ठ कोणतीच सूचना नव्हती, त्यामुळे आमच्या ‘विमान पेय फेम’ मित्राने वाईनला हात ही न लावता फ्रीज मधील मिनरल वॉटरच्या बाटल्या ‘मी आता त्यातला नाही’ या सदभावनेन फस्त केल्या व बिचाऱ्याचा त्या दिवसाचा मिळणारा डॉलर मधील भत्ता, संपूर्ण कापण्यात आला, कारण पॅरीस मध्ये नळाला येणारे पाणी उत्कृष्ठ दर्जाचे असते व  “मिनरल वॉटर” स्कॉच व्हीस्की पेक्षा महाग होती?

तो युरोप मधील थंडीचा काळ होता व दिवस खूप मोठे होते त्यामुळे साधारणतः ९- ९३० ला रात्री सूर्यास्त होत असे. म्हणून आम्ही थोडी विश्रांती घेऊन श्री. बिगो बरोबर पॅरीस दर्शनास निघालो. अर्थातच पहिली भेट जगप्रसिद्ध ‘एफिल टॉवर’ लाच होती. आमचे हॉटेल, टॉवरच्या परिसरात होते व आमच्या खोल्यांतून ही आम्ही दुरून टॉवर पाहिला होता. मात्र प्रत्यक्षात, त्या गगनाला भिडणाऱ्या व जगातील वास्तु कलेचा उत्कृष्ठ नमुना मानल्या गेलेल्या, आश्चर्यासमोर उभे राहिल्यावर ज्या भावना उचंबळून आल्या, त्याचे वर्णन करवत नाही. पहिली परदेश वारी, आणि आल्या आल्या जगातील एका महद आश्चर्याचे दर्शन झाल्यावर, कृतकृत्य झाल्या सारखे वाटले. तेथून सिन नदीवर (Seine River) फेर फटका व येतांना “आर्क्र द ट्रायम्फर”( Arch the Triumph) ही विजय कमान पाहून घेतली. जेवण झालेच होते. त्यामुळे आता शांत पडावे व हॉटेल रूम गाठावी, असेच सर्वांना वाटत होते. बिगो साहेबांनी आम्हाला हॉटेलवर सोडले व दुसरे दिवशी सकाळी, ‘एल्फ’ कंपनीच्या पॅरीस मधील मुख्यालयात जाण्याकरता, तयार राहायचे सांगून आमचा निरोप घेतला.

मंडळी आपल्या खोल्यांत निघून गेली. मी देखील माझ्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत आलो. छान पैकी गरम पाण्याने, ‘टब’ मध्ये आंघोळ केली व माझ्या शिरस्त्या प्रमाणे ‘सायं प्रार्थना’ करून अंथरुणात पडलो. माझ्या खिडकीतून’ ,खास रोषणाई करून सजवलेला ‘एफिल टॉवर’ पाहिला आणि मनांत एकदम उचंबळून आलेल्या भावनांच्या कल्लोळात झोप कोठून येणार? ‘एफिल टॉवर’ सजावटीचे कारण ते वर्ष १९८९ होते आणि फ्रेंच राज्यक्रांती (१७८९) ला दोनशे वर्ष झाली होती, त्या द्वि-शताब्दी वर्षाची आठवण म्हणून हा सोहळा चालू होता. माझ्या ही मनान फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास व आमच्या एन. के. पाटील सरांनी सांगितलेले- Liberty, Equality & Fraternity” म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचे सूत्र आठवले, घरातली  मंडळी आठवली, आप्पांची आठवण आली व त्यांनी आज हवे असायला होते असे तीव्रतेने वाटले. त्यांनी दिलेल्या आशीर्वादानेच हा स्वप्नपूर्तीचा असा क्षण आला होता, मग झोप कशी येणार? काही वेळाने झोपेच्या आधीन झालो. हॉटेलचा थाटमाट तर औरच होता – हवी ती वस्तु तुमच्या खोलीत होतीच, मात्र बेल दाबल्याबरोबर सेवक खोलीत येऊन तुमच्या आज्ञेची पूर्तता करीत होता. सकाळची न्याहारी मात्र मनाजोगी झाली. अर्थात सर्व continental होते!

श्री. बिगो बरोबर त्यांच्या कंपनीच्या मुख्य कार्यालयात निघालो. त्यांचा मुख्य अधिकारी (CEO) तसेच परदेशी कंपन्यांचा व्यापार (International marketing) विभाग इ. ठराविक खाती भेट द्यायची होती. आम्ही Elf Lube ऑफिसच्या गेट समोर पोहोचत होतो तेवढ्यात ‘सेक्युरीटी’ सुरक्षा रक्षकांनी स्वतःच पुढे येऊन आमची जुजबी तपासणी करीत आम्हाला, प्रवेशपत्रे दिली. आत,गेट जवळ कंपनीचे एक उच्च अधिकारी आम्हाला receive करण्यासाठी आधीच आले होते. श्री. बिगो बरोबर त्यांचे फ्रेंच भाषेत काही बोलणे झाले व आम्हाला ते lift कडे घेऊन जाऊ लागले. मी सहज कुतुहलाने श्री बिगो यांना विचारले आपण गेट पाशी येऊन पोहोचत नाही, तेवढ्यात security ने सर्व पासेस वगेरे तयारी करून, आपला क्षणाचाही विलंब न होऊ देता, असे सर्व पटकन कसे घडले? बिगो व ते दुसरे अधिकारी आमच्या कडे हसून पाहू लागले म्हणाले,आमची Surveillance (सुरक्षा यंत्रणा) ही अत्याधुनीक आहे व या इमारतीच्या basement मध्ये बसविलेले शक्तिशाली CCTV या इमारती पासून सुमारे २ km अंतरा पर्यंतची संपूर्ण दृष्ये टिपू शकते. बिगोच्या गाडीचा नंबर आम्हाला ठाऊक होता, त्यामुळे आम्ही तुमच्या गाडीवर लक्ष्य ठेऊन होतो व संपूर्ण पूर्व तयारी केली होती. त्यांनी प्रथमच इमारतीच्या तळघरात आम्हाला नेऊन तेथील सर्व सुसज्ज सुरक्षा यंत्रणा दाखविली. त्या काळांत, 35 वर्षापूर्वी  एवढी पुढारलेली सुरक्षा यंत्रणा या कंपनी कडे होती. आज ही आमच्या कडील Indian Fortune .5०० कंपन्यांकडे येवढी जबरदस्त व्यवस्था नसेल! असे अनेक धक्के पुढे बसायाचे होते.

With Mr. Lehri, Mr. Bhaskaran, in France.

नंतर कळले की या एवठ्या प्रचंड ऑफिसात अगदी नावाला सुद्धा peon (सेवक,सेविका) म्हणून कोणी ही कर्मचारी नाही. अगदी मुख्य साहेबाला फक्त एक सेक्रेटरी आहे व बाकीची चहा, कॉफी आणणे, आपली कागद पत्रे दुसऱ्याकडे पाठविणे ही कामे स्वतः मेनेजरनी करायची असतात. त्यासाठी अशी चहा, कॉफी, कॉल्डड्रींक मशीन्स प्रवेश मजल्यावर होती हा एक दुसरा साक्षात्कार झाला! ह्या CEO साहेबांना कंपनीने खास जेट विमान, पायलटसह त्यांच्या दिमतीस, त्यावेळी दिले होते. ज्या योगे जगांत कोठेही ते वेळेचा अपव्यय न करता जाऊ शकत होते. मात्र ऑफिस मध्ये प्यून दिला नव्हता– ‘प्रोफेशनल’ कंपनी म्हणतात ती अशी!

ELF, France

तेथून पुठे कंपनीच्या मार्केटिंग विभाग प्रमुखांना भेटलो. तेथे ही काही जुजबी चर्चा झाली. ही भेट केवळ आम्हाला कंपनीचे मुख्यालय व मार्केटिंग या दोन विभाग प्रमुखांची ओळख करून देणे येवढाच होता.

दुपारी बाहेर जेवण घेऊन नंतर ‘पॅरीस’ दर्शनाचा कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी लांबुनच  ‘एफिल टॉवर, सीन नदी, आर्क्र ट्रायम्फ होता. आज  टॉवरच्यावर जाऊन संपूर्ण ‘पॅरीस’ शहराचे दर्शन घेतले. हा एक आगळा वेगळा अनुभव होता. लिफ्टने जाऊन डेकवर गेलो. त्यानंतर सीन नदी तून फेरफटक्याचा कार्यक्रम होता. बिगो यांनी आम्हाला त्यांच्या दुसऱ्या सहकाऱ्याचे स्वाधीन केले. ‘एफिल टॉवर, पासून ही ट्रिप सुरु होती.  (९ -९||) नऊ- साडेनऊ तास आपण नदीतून अनेक महत्वाच्या वास्तु पाहू शकतो, जुना इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. विशेष लक्षात राहिली ती नदीच्या पाण्याची स्वच्छता व लोकांची पर्यावरण सुरक्षेची हमी! शॅम्पेनचा घुटका घेत घेत या सफरीची मजा अधिकच वाढते!

संध्याकाळी ६ चे सुमारास आम्ही परत हॉटेल वर आलो, अजून दिवस खूपच वर होता. स्वच्छ उजेड होता. गंमत म्हणजे आम्ही हॉटेलच्या बाल्कनीत वाईनचा आस्वाद घेत बसलो असतांना बाहेरील मुख्य रस्ता अगदीच निरमनुष्य दिसला. फ्रान्सच्या राजधानीत एका मुख्य रस्त्या वरील सर्व ऑफिसेस सुटल्यावर दिसणारी निर्मनुष्याता पाहून खूपच आश्चर्य वाटले व वाईट अशासाठी वाटले की, या वेळी मुंबईत चर्चगेटच्या स्टेशन समोर काय गर्दी उसळली असणार! युरोप मधील आजकाल वाढत्या नव्हे तर कमी होणाऱ्या लोकसंखेच प्रश्न शासनाला सतावित आहे! कोणाचे काय तर कोणाचे काय!

झोपण्याचे आधी हॉटेलच्या फोन वरून घरी फोन केला. त्यावेळी Internet / whatsapp ही माध्यमे नव्हती, त्यामुळे ISD सुविधा वापरुनच हे करावे लागे व ते खर्चिक ही होते!

दुसरे दिवशी आम्हाला ‘पॅरीस’ सोडायचे होते. आता फ्रान्स देश देखील सोडून बेल्जीयमला एंटवर्प (Antwerp, Belgium) शहरात जायचे. तेथे या कंपनीचा वंगणे बनवण्याचा एक कारखाना आम्हाला पहायचा होता. कारण त्याच धर्तीवर आमचा माझगाव कारखान्यात आम्हाला काही दुरुस्त्याकरून, त्यांची मानके (Standards) वापरून आम्हाला हे प्रोडक्स बनवायचे होते व त्यांचे packing करावयाचे होते. आमचा प्रवास होणार होता श्री बिगो यांचे गाडीने, सृष्टी सौंदर्य व युरोपीय क्षेत्रांची शोभा बघायला मिळणार होती! सकाळी हॉटेल मधून ब्रेकफास्ट करून आम्ही श्री. बिगो यांचे प्रशस्त कार मधून अँटवर्प, बेल्जीयम शहराकडे प्रथम प्रस्थान ठेवले. अर्थातच पासपोर्ट/विजा जवळ ठेवणे आवश्यक होते, इतर सामान हॉटेल मधेच ठेवले होते. सकाळची सुंदर उन्हे पडली होती व रस्त्याचे दोन्ही बाजूस फ्रान्सच्या राजधानीतील एक-दोन मजली, टुमदार घरे, भोवती सुंदर बागा, क्वचीतच आढळणारी बाजारहाटासाठी निघणारी ग्रामस्थ मंडळी असे विविध प्रकारची दृष्ये दिसत होती. प्रत्येक गावात एक छान जुने चर्च ही दिसे, एक दोन ठिकाणी आम्ही मुद्दाम थाबून त्या १२-१३ व्या शतकातील प्रार्थना मंदिराची शोभा, रंगीत (tinted) काचांनी मढविलेली त्यांच्या उंच दिमाखदार, खिडक्यांची तावदाने व गाभाऱ्यातील येशूच्या मूर्तीसमोर शांत हळू आवाजात चालेली प्रार्थना…. अजुन कानात गुणगुणते.

काही वेळाने श्री. बिगो यांनी आम्हाला गाडीतून एक कब्रस्तान दाखविले, पहिल्या-दुसऱ्या महायुद्धात बलिदान दिलेल्या मित्र-राष्ट्रांच्या सैन्याबरोबर लढलेल्या सैनिकाच्या कबरी तेथे होत्या. आम्ही श्री. बिगो यांना विनंती करून त्या स्थानाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. वाटत होते आमचे भारतीय सैनिक सुद्धा इंग्लंडसाठी या लढाया लढले होते. तेव्हा जरूर काही तरी महत्व येईल — आणि खरेच तेथील काही समाधी स्थानावर नावे वाचत असतांना शिंदे, पवार, भोसले, अशी आडनावे कोरलेल्या काही कबरी तेथे होत्या, सैनिकांचे नावे कधी हुतात्मा व देशाचे नावही कोरले होते, भारतीय सैनिकांची ही स्मृतीस्थाने पाहून मन भरून आले. कोठे भारत देश – कोठे फ्रान्स, कोठे फ्रान्स मधील हे एक आडवळणी खेडेगांव व तेथे आम्ही मंडळी अचानक येऊन हे सर्व अनुभवत होतो! विशेष म्हणजे श्री बिगो म्हणाले, सैनिकांच्या स्मृतिदिनी गावांतील लोक, तेथे येऊन, ती कबर पाण्याने साफ करून, एक दोन फुले तेथे वाहतात! कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक साधा प्रकार- कोण हा सैनिक व आमच्या स्वातंत्र्यासाठी हजारो मैलावरून येऊन आमच्यासाठी, आमच्या शत्रूशी लढता लढता शहीद झाला — त्याला ही वंदना. आम्ही देखील मनोमन वंदन करून तेथून बाहेर निघालो ते संमिश्र भावना घेऊन. आमच्या शूर शहीदांना वंदन करता आले म्हणून आनंद, तर या परक्या मुलाखत चिर विश्रांती घेत आहेत म्हणून दु:ख. 

एकूण सुमारे ४ -४|| तास प्रवास झाला होता. अजून तासभर प्रवास करून, बेल्जीयम देशाची हद्द लागली. तेथे सर्व कागद-पत्रे तपासून ‘सर्व ठीक’ चा इशारा झाल्यावर आमचा बेल्जीयमच्या खेड्यातून प्रवास सुरु झाला. जेवणाची वेळ देखील होत आली होती. त्यामुळे, बिगोने दोन पर्याय सुचविले होते: एखाद्या घरगुती खानावळीत अथवा गावांतील कोणत्या हॉटेल मध्ये? 
आम्हा सर्वाना घरगुती जेवण खाण्याची खूप इच्छा होती. कारण अशा प्रकारे युरोप मधील खेड्यात एखाद्या कुशल गृहिणी-च्या ‘हाताची चव’ चाखायची संधी कुठे मिळणार?

आणि आमचा निर्णय अगदी योग्य ठरला. एका छोट्याश्या घरांत, कुटुंबाने चालू केलेल्या घरगुती खानावळीत ‘बेल्जीयम स्पेशल’ जेवण व्हेज, नॉन व्हेज दोन्ही प्रकार खूप सुंदर होते. बेल्जीयमचे काही खास अन्न पदार्थ (Belgium cuisine) युरोपातही प्रसिद्ध आहेत. मासे, मटन, तेच पण विशिष्ठ मसाल्यात (sauces) ते बुडविले कि त्याची टेस्ट काही औरच – आणि घरगुती वाईन ने तर त्याची खुमारी खूपच वाढते. आम्ही भारतीय आहोत आणि कामासाठी त्यांचे गावातून जात आहोत या माहितीने तर त्या नवरा-बायकोला खूपच कौतुक वाटले. तो त्यांचा धंदा तर होताच, पण त्यात भाऊकता ही खूप होती! एक वेगळा अनुभव होता!

दुपारी ३ च्या सुमारास आम्ही ELF च्या lube plant मध्ये पोहोचलो. तेथील मुख्य अधिकारी (chief maneger) व एक-दोन इतर अधिकारी यांचेशी बोलणी झाली. त्यांनी आम्हाला कारखान्याच्या एकूण कामकाजाबद्दल माहिती दिली. बहुतेक कारखाना हा automated (स्वयंचलित) असाच होता. आमच्या HPCL च्या सर्वांत मोठया माझगांव प्लांट मध्ये महिन्याला ११०० टन उत्पादन त्यावेळी (१९८९) होत होते व त्यासाठी एकूण साडे-पाचशे (५५०) ऑफिसर्स व कामगार मिळून काम करीत होते. तेथे तेवढेच उत्पादन काढण्यासाठी ऐशी (८०) लोक फक्त होते. यावरुन तेथील एकूण व्यवस्था व automation ची कल्पना यावी. आम्ही त्यांचा कारखाना दुसरे दिवशी पाहणार होतो. त्यामुळे फक्त एक चक्कर मारून व इतर काही आम्हाला हवी असलेली माहीती आम्ही घेतली. एक गंमतीचा विशेष भाग म्हणजे, आपल्या प्रमाणेच त्यांचे कडे देखील कारखान्याच्या पुढील वाटचालींसाठी ‘वर्षाचे अंदाज-पत्र’ बनवायचे असते, ज्यावेळी तुम्हाला खरेदी करावयाची नवी यंत्रे, घ्यावयाची नवीन माणसे (recruitment) इ. चा अंदाज करावयाचा असतो. या cheif maneger ने आम्हाला पुढील वर्षाचे अंदाज-पत्र एका वाक्यात सांगितले “पुढील वर्षी मला ८० माणसा पैकी फक्त ७५ माणसे कशी ठेवायची व उत्पादन तेवढेच कसे काढायचे हे ठरवायचे आहे! तीस वर्षापूर्वी एका युरोपियन ऑईल कंपनीची ही गोष्ट आहे, आज काय स्तिथी आहे माहिती नाही?

तेथून निघून संध्याकाळी आम्ही अँटवर्पच्या बंदरातून फेरफटका मारला, युरोप मधील हे एक दोन नंबरचे बंदर व खूपच विकसीत आहे– आम्ही इंदिरा-डॉक (मुंबई) देखील अनेक वेळा भेट देत असतो, त्यामुळे तेथील वैशिष्ट ही खूप जाणवले, प्रसन्न वाटले.

हॉटेलच्या मार्गावर आम्हाला तेथील ‘हिरे-मोत्यां’साठी प्रसिध्द असलेले diamond cutting workshop  ची फॅक्टरी दिसली. त्यांनी आम्हाला विशेष आढेवेढे न घेता प्रवेश ही दिला. अनेक प्रकारचे हिरे विशिष्ठ पध्दतीने घासून, त्यांना चकाकी देणे, व बाजार मूल्य वाढविणे असे काम चालू होते. आम्हाला काही विशेष कळत नव्हते मात्र जगांतील अत्यंत मौल्यवान वस्तु येथे तयार होत आहेत, त्या आपण येथे प्रत्यक्ष असून खरेदी करू शकत नाही, एवढे जरूर कळले!

दुसरे दिवशी प्रत्यक्ष कारखाना पाहणे, हा अनुभव तर ‘महान चमत्कार पाहणे’ असाच होता! कोणत्या प्रकारचे मोठे टॅंकस्, पाईप लाईन्स, ब्लेंडिंग केटलस् (Storage Tanks, Pipelines, Blending kettles), असा काहीच सरंजाम नव्हता. आमच्या मुंबई प्लांट मध्ये आम्ही ‘बॅच पध्दतीने’ वंगणे करतो, त्यामुळे टनावारी तेल,  इतर रसायने एका मोठया ब्लेंडिंग केटल (भांडे) मध्ये घेऊन, एक दोन तास ते घुसळत ठेवावे लागते, व त्यासाठी हजारो टनांची क्षमता असणारे (स्टोरेज टँक) आम्हाला निर्माण करावे लागतात. मात्र या लोकांची पद्धत ही continuous – online अशी होती. त्यामुळे कोणत्याच प्रकारचे तेल साठविणारे मोठे टॅंक व मोठया केटल्स नव्हत्या. लहान-लहान टाक्या पंपाने एका ५’ ft लांब ६” inch. व्यासाच्या नळकांड्याला जोडून, त्यात वंगण (lube oil) तयार होत होते व सरळ ड्रम मध्ये भरले जाऊन ते पॅक होत होते! किती सोपे काम! पण त्यासाठी लागणारी विशिष्ठ  प्रणाली ( software) व  संगणकज्ञान त्या लोकांनी त्या काळी मिळविले होते, म्हणून अगदी कमी खर्चात, कमी जागेत व कमीतकमी मनुष्य बळ वापरून, जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादने ते घेत होते. आम्ही अचंबीत झालो. त्यांचे लहान डबे (Small Container) भरण्याचा विभाग तर अगदी अफलातून होता! ह्या SMALLS FILLINNG विभागात विविध औद्योगिक व मोटर गाड्यांच्या इंजिनसाठी (Industrial and  automotive) लागणारी वंगण तेल, ५ लिटर, १ लिटर, १/२ लिटर अशा विविध प्रकारामध्ये भरली जातात. आमच्या मुंबई प्लांट मध्ये १ लिटरचे सुमारे १०,००० डबे त्यावेळी, ८ तासाच्या एका पाळी (Batch) मध्ये 15 माणसे (15 persons/shift ) भरत असत. झाले तर कधी कमी डब्बे होत, मात्र एकही जास्त डबा भरला जाणार नाही, याची दक्षता घेतली जाई, तशी सूचना UNION कडून कामगारांना असे. या ELF प्लांटमध्ये ८ तासाच्या एका शिफ्ट मध्ये, १ लिटरचे सुमारे २५,००० हजार डब्बे भरले जात होते व त्यासाठी मिळून केवळ तीन  माणसे हे काम सांभाळत होती यावरून तेथील उत्पादन क्षमतेचा (productvity) अंदाज यावा. हे कसे होत असेल?

या तीन ऑपरेटर्सपैकी पहिला सुरवातीच्या ‘बॉक्स मेकींग मशीन’ मध्ये गोदामात ठेवलेले, पुठ्ठ्याचे गठ्ठेमोकळे करत, ते कन्व्हेयर बेल्ट (conveyor belt) वर सोडत होता, जेणे करून शेवटी, तेल भरून निघणारा डब्बा त्या बॉक्समध्ये पाडवा. पुठ्ठ्यापासून यांत्रिक पद्धतीने योग्य त्या मापाचे बॉक्स आपोआप तयार होत होते व भरलेला डब्बा त्यात पडून त्यावर योग्य ते प्रिंटींग होऊन व सील बंद करून तो लाकडी फळ्यावर रचला जात होता व ती कार्टन रचलेली फळी  योग्य त्या ठिकाणी गोदाम मध्ये यांत्रीक रितीने नेली जात होती. हा माणूस फक्त एक पातळ बनियन अंगावर घेऊन, भिजल्या अंगाने (त्या थंडीत देखील) सतत काम करीत होता. त्याला जराही विश्रांती मिळत नव्हती. 

दुसरा गृहस्थ, संपूर्ण conveyor line- जेथे डब्बे योग्य त्या आकारमाना एवढे भरले जाऊन, सील होऊन, प्रिंट होऊन, पुढे वजन तपासणी साठी पाठविले जात होते. आठ तासांच्या ड्युटी मध्ये फक्त अर्धा तास ब्रेक होता, त्यामुळे मिनिटाला सुमारे ४५-५० डबे भरून बॉक्स मध्ये पडत होते. conveyor line वर जणू उंदराची पिल्ले भराभर धावत आहेत असेच दृष्य लांबून दिसत होते. या गृहस्थाचे काम कोठेही खट्ट झाले वा, काही red signal आला तर पळत जाऊन, सतत देखरेख करणे होते. हा गृहस्थ देखील सारखा या टोका पासून त्या टोका पर्यंत पळत होता.

तिसऱ्या गृहस्थाचे काम होते- बाहेर पडणारा, तेलाने भरलेला डब्बा इलेक्ट्रॉनिक तराजू वर वजन करून, तेलाचे योग्य प्रमाणात भरण झाले आहेत की नाही व दिलेल्या मोजमापाच्या परिमाणात ते आहे की नाही (with in given specification) हे पाहणे. व एकदा डब्बा दिलेल्या परिमाणापेक्षा कमी वा अधिक भरला असेल तर तो बाहेर काढणे एवढे होते. आम्हाला तरी कोणता डब्बा बाहेर निघालेला दिसत नव्हता, याचा अर्थ भरला जाणारा (२५,०००) पैकी एक ही डब्बा “off-spec” नव्हता! हा गृहस्थ अंगावर छान पैकी कोट व टाय बांधून ‘एकाग्र चित्ते’ काम करत होता. त्यामुळे सहाजिकच आम्ही या गृहस्थाशी बोलूया म्हणून त्याच्या टेबलाशेजारी उभे राहुन त्याला थोडे बोलते करण्याचा प्रयत्न केला. भला माणूस आपली नजर, electronic balance वरून जरा ही न ढळवता आम्हाला थोडक्यात उत्तरे देत होता. बोलता बोलता आम्ही सहज एक वाक्य बोलून गेलो —

तुझे काम खरेच सोपे आहे, या तिघांत तू नशिबवान बाबा! या वाक्यावर त्याने दिलेली प्रतिक्रीया तितकीच शांत व नजर बाजूला न करता, अगदी मनापासून होती, आज ही एवढया वर्षांनी माझ्या मनावर ती कोरली आहे या योग्य संदर्भात माझ्या अनेक सहकाऱ्यांना व भारतीय मेनेजर्सना सांगितली आहे. 

तो म्हणाला- ”सर्वांत जोखमीचे काम माझे आहे. माझ्यामुळे भरलेला डब्बा जरी काही ग्रॅम वजनात कमी भरला व आमच्या गिऱ्हाईकांच्या ते लक्ष्यात आले, तर तो माझ्या कंपनीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे मी तसे कदापि होऊ देणार नाही!” एक साध्या कामगाराने, आपल्या कंपनीबाबत दाखविलेली ही उत्स्फूर्त प्रतिक्रीया, किती तरी गोष्टी त्या समाजाबद्दल व त्या राष्ट्राबद्दल सांगून जाते! काही राष्ट्रे जगज्जेती होतात तर काही गुलाम गिरीत खितपत पडतात, ते या मानसिकतेतील फरकामुळे!

दुपारी आम्ही जेवण बाहेर घेतले व पुन्हा श्री. बिगो यांच्या गाडीने पॅरीससाठी प्रस्थान केले. प्रवास छान झाला मात्र आज फारसे बघायचे नव्हते व थकवा ही होताच. रात्री आमच्या हॉटेलवर परत आलो.

आता उद्या प्रवास होता, फ्रान्सच्या सर्वांत जलद-गती TGV रेल्वेचा, त्यावेळी १९८९ साली, सुमारे ३०० mph या वेगाने जात होती व जगात एक आश्चर्य मानले जात होते. या रेल्वेचा प्रवास त्यावेळी करावयास मिळतो हा एक वेगळा अनुभव व भाग्याची गोष्ट होती. आम्ही पॅरीसहून लिऑन (Lyon) या फ्रान्सच्या या दोन नंबरच्या शहरात Elf कंपनीची R&D Labs (Research & Development) पहायला जात होतो व आमच्या येथील भेटी मध्ये हा खूप महत्वाचा व उपयुक्त असा टप्पा होता कारण ज्या marine lubricant चे उत्पादन आम्हाला भारतात मुंबईतील कारखान्यातून करायचे होते, त्या marine lubricant चे संपूर्ण संशोधन तसेच वंगणे बोटींच्या मशीन्स मध्ये घालून, त्याचा वापर होत असतांना ज्या काही तक्रारी निर्माण होतील त्यांचे त्वरीत (technical service) निस्तारण करण्याचे व लवकरात लवकर बोटी वरील तंत्रज्ञान विभागाला योग्य त्या सूचना wireless तंत्रज्ञानाने पाठविण्याचे महत्वाचे काम येथे होत होते.

मशीन लूबस बनविणे सोपे, मात्र त्यामुळे आगबोटीवर काही समस्या निर्माण झाली तर, किनाऱ्यापासून हजारो किमी दूर असणाऱ्या त्या यांत्रिक वस्तुवरून त्याचे sample गोळा करणे, त्याचे पुर्थकरण करणे व योग्य तो सल्ला, तक्रार निवारण्यासाठी पाठविणे हे खूप जिकीरीचे व जोखमीचे काम असते, हे आपण समजू शकतो.

फ्रान्स मध्ये ही TGV नुकतीच सुरवात झाली होती पॅरीस ते लिऑन असा रेल्वे मार्ग उपलब्ध होता. खरोखर आज सुद्धा फ्रान्सची TGV जरी ३७५ mph (575 kms per hour) जात असली व त्यातून प्रवास करणे म्हणजे आयुष्यातील एक स्मरणीय अनुभव मानला जातो, तर 30 वर्षापूर्वी हा अनुभव घेण्यात केवढा थरार होता हे अनुमान करु शकता! 

आमची तिकीट पहिल्या वर्गाची असल्याने, आरामशीर प्रवासाबरोबर, उत्तम फ्रेंच वाईनचा आस्वाद, म्हणजे सोने पे सुहागा होते. इतक्या जोरात ट्रेन जात असून देखील बाहेरील, रुळाच्या घर्षणाचा अथवा हवेचा प्रवाहाचा कोणताही आवाज नव्हता, आमचे हळू आवाजातील बोलणे व्यवस्थित एकू जात होते. अगदी विरुद्ध बाजूची TVG दोनदा, लगतच्या रेल्वे रुळांवरून गेली ते देखील फक्त प्रकाशाच्या उघड-झापीमुळे कळले, जराही कर्णकर्कशता नव्हती. जेवणाच्या सुमारास आल्प्स पर्वताचा फ्रान्स कडील पायथ्याचा प्रदेश लागला. किती सुंदर द्राक्षमळे व पिकांची शेती, आल्प्सची रजत हिम शिखरे… वर्णन करणे अशक्य आहे. आयुष्यातील हा एक प्रचंड रोमांचित करणारा, चिरस्मरणीय अनुभव!

लिऑन स्टेशन देखील खूप प्रशस्त व सुंदर वाटले. लिऑन गाव हे मागे सांगितल्याप्रमाणे फ्रान्सचे एक गजबजलेल शहर, आतून आल्प्स पर्वताच्या पर्वतरांगांनी त्याला एक अनुपम नैसर्गिक सौंदर्य बहाल केले आहे.

ELF कंपनीची ही संशोधन संस्था एकाच प्रशस्त इमारती मध्ये नसून, अनेक छोट्या इमारतींचा समुह होती. त्या विस्तीर्ण परिसरात प्रयोग शाळा, यंत्र शाळा, (engine testing) शास्त्रज्ञांना राहण्यासाठी वसाहत (Living quarters), शाळा, छोटे इस्पितळ, छोटे छोटे बगीचे, अशा अनेक गोष्टींनी समृद्ध होते. काम करणाऱ्या संशोधकांना, आपल्या कामा व्यतिरिक्त, कशाची देखील चिंता पडू नये हा मुख्य उद्देश! आम्ही मुख्यत्वे करून तेथील “MARINE ENGINE LUBRICANT” हा विभाग पाहिला. कारण ही उत्पादने आम्हास भारतात तयार करावयाची होती. मात्र इतर संशोधन विभाग जसे की, ASPHALT (डांबर) संशोधन, Car engine oil, Speciality Oil, हे विभाग केवळ फिरत-फिरत पाहिले!

एकंदरीत उपलब्धता आणि त्यावेळी जगातील वंगण उत्पादनाला भेडसावणाऱ्या अडचणी यावर जोरदार संशोधन चालू होते. आम्हाला दोन-एक तासांचे presentation व त्यानंतर चर्चा असा कार्यक्रम झाला. खूपसे साहित्य (literature) देखील दिले. ही मंडळी तशी दिलदार असतात, ज्ञानाचे आदान प्रदान करतांना कोणत्याही प्रकारचे ‘हातचे राखून’ बोलणे दिसले नाही!

जेवणा करता आम्ही त्यांच्याच भोजनालयात गेलो. हा तर अगदी एकमेवाव्दितीय असा अनुभव. जगातील किती औद्योगिक-प्रयोगशाळा आशा प्रकारची जेवण, खाण्या-पिण्याची सुविधा, कंपनीच्या आवासात, कामाचे वेळात देत असतील? माहीत नाही… 
भोजनालयाचा परिसर देखील प्रशस्त व प्रत्येक विभागात Self-service होती. विशेष म्हणजे सुरुवातीलाच सर्व प्रकारच्या वाईनस (wines), बिअर (beer) आणि इतर मद्याची (व्हिस्की, रम इ.) भरलेली मद्यालायाचा विभाग (Bar) होता. कंपनीचे भोजनगृह व त्यात सर्व ‘सुख सोईंनी’ युक्त बार म्हणजे आपण कोणत्या स्वप्नात तर नाही ना? अशी स्तिथी झाली. कर्मचारी (ऑफिसर्स, मॅनेजर, कामगार असा भेदभाव नव्हता) तेथे येऊन आपल्याला हवे ते मद्य घेत, बसून शांतपणे आस्वाद घेत होती व पुढील विभागात जात होती. कोठेही हावरटपणा,अतिरेक वा बाष्फळ चर्चा चालू नव्हती. आम्ही देखील आता फुकटची मिळतेच आहे… तर फ्रेन्च वाईनचा आस्वाद घेतला. पुढे सूप्स, सलाड्स, फिश, चिकन, मटन, इ. प्रत्येक प्रकारच्या भोजनासाठी विभाग होते व ज्याला जे हवे ते त्याने स्वतः काढून घेऊन, जेवणाची सोय होती. आम्ही देखील थोडी वाईन चाखून सूप्स, सलाड्स, खात, फिशच्या विभागात जाऊन, सुंदर फ्रेंच मासळीचा, मसाले (sauces) लाऊन आस्वाद घेतला.

तेथील R & D -Director देखील आमच्याच बरोबर रांगेत उभे राहून भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आले होते. हा एक आगळा अनुभव होता. जेवणानंतर आम्ही पुन्हा प्रयोग शाळेत जाऊन presentation, चर्चा, निरिक्षणे, टिपणे घेतली व संध्याकाळी परत निघालो.

दुसरी विशेष गोष्ट म्हणजे येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘हजेरी बुक’ (muster) नव्हते. प्रत्येकांच्या बसण्याचे  जागी, खुर्ची मागे एका भिंतीत असलेल्या कुलुपात किल्ली अडकविली होती व कर्मचाऱ्याने आल्या वर त्या किल्लीने कुलुप उघडे करावयाचे म्हणजे त्याच्या कामाच्या तासांची सुरुवात होई व बाहेर जावयाचे असल्यास कुलुपाची किल्ली उलटी फिरवून ते ‘बंद’ करावायचे. दिवसांतून त्याला कधी जमेल तसे ८ तास पूर्ण करावे व आठवड्यातून ३६ तास करण्याची मुभा होती – अगदी एखाद्याने रात्री येऊन देखील आपल्या हजेरीची नोंद सुरु केली तरी ते मान्य. शास्त्रज्ञांना कोणतीच तोशीस पडू नये. त्यांनी किती काम केले या पेक्षा त्या कामाची quality किती हाच निष्कर्ष होता.

आमच्या कारखान्यात सुरु करावयाच्या Marine Lubes ची संपूर्ण माहिती व फोर्म्युलेशन, दर्जा परिक्षण (Q.C), उत्पादन (manufacturing), साठवण (storage), व पाठवण (disribution) इ. अनेकविध उपविभागांची माहीती आम्ही मिळविली. सर्वांत महत्वाची गोष्ट पहावयास मिळाली ती म्हणजे या कंपनीकडे असलेली ‘DIGOMAR’ ही परीक्षण पध्दती. त्या काळांत ELF ने हे software निर्माण केले होते, जेणेकरून जगातील कोणत्याही महासागर, उपसागरांत असलेल्या बोटीकडून तेलाचा नमुना पृत्थकरणासाठी आल्यास, केवळ दोन तासाचे आत, या प्रयोगशाळेतून पृत्थकरण होवुन, त्याप्रमाणे निघालेल्या निकषाचे आधारे, त्या बोटीच्या कॅप्टनला wireless च्या मदतीने, ‘सल्ला’ (advice) पाठविला जात असे. त्यामुळे बोटीवरील तंत्र विभाग, वापरात असलेल्या वंगणाचे बाबतीत (Engine Oil) योग्य तो बदल घडवून, बोटीच्या मार्गक्रमणात कोणताही धोका राहणार नाही ही दक्षता घेत असे. आज देखील आमच्या देशातील marine lubricant (used) तपासणाऱ्या लॅबस इतक्या सफाईने निर्णय घेत असतील काय ही मला शंका आहे!

त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही TGV ने पॅरीस मुक्कामाला परत आलो. आता अधिकृत कामे संपली होती. परत मुंबईस जाण्याआधी उद्या एक दिवस, ‘लंडन दर्शन’ करण्याचा जो बोनस आमच्या किशन साहेबांनी दिला होता, त्यानुसार संध्याकाळी, इंग्लीश खाडी (english channel), पार करून, बोटीतून लंडन गाठावायाचे होते.  

दुसऱ्या दिवशी श्री बिगो यांचे बरोबर ‘नोत्रे दाम’ हे प्रसिध्द जुने चर्च व असेच काही तरी पाहत फिरलो. थोडे खिशाला परवडेल असे shopping केले.  पॅरीसची प्रसिध्द अत्तरे, (perfumes), कांच साहित्य (cutting glass), प्रसिध्द आहेत, पण आमच्या खिशाला परवडतील असेच काही घेतले. सर्वांनी मिळून श्री. किशन साहेबांना प्रेमाने देण्यासाठी एक वाईन बॉटल मात्र अगत्याने घेतली.

संध्याकाळी मेट्रो ट्रेनने पॅरीस ते कॅले (फ्रान्सचे बंदर) असा प्रवास व तेथून फेरी बोटीने सुमारे १ -२ तासाचा प्रवास करीत इंग्लंडच्या बाजूचे डोव्हेरा बंदर येथे पहाटे पहाटे उतरलो. तेथून बसने लंडनचा तासा भराचा प्रवास, वाटेन दिसणारे इंग्लिश खेड्यांची मनोहारी दृष्य, हिरवेगार मैदाने, मेंढपाळ, अशी दृष्ये आठवतात.

लंडन शहराचे प्रथम दर्शन झाल्यावर प्रथम मनात विचार आला तो आमच्या स्वातंत्र्यवीरांचा, सावरकरांचा! यात शहरात राहणाऱ्या राज घराण्याने आमच्या देशावर सुमारे दीडशे वर्षे राज्य केले, व आमची अनेक मुल्यवान रत्ने, जड जवाहीरे, येथील खजिन्यामध्ये दडपून ठेवली होती. आमची ‘भवानी तलवार’ ती देखील येथेच कुठेतरी लपविली आहे. असे सर्व दडपलेल मनातील भाव लंडनच्या भूमीवर प्रथम पाय ठेवताना उफाळून आले. मला तरी येथे मुंबई व लंडन यांत एक मोठे साम्य दिसले ते म्हणजे एकाच रंगाच्या बेस्ट बसेस व लंडन म्युनसिपल बसेस (त्यावेळी) अनेक बस गाड्यांमध्ये आम्हाला सरदारजी ड्रायव्हर कंडक्टर देखील भेटले! सकाळ असल्याने भूकही लागली होती, एक धाबे टाईप सरदारजीच्या हॉटेलात आम्लेट -पावची चौकशी केली, 6 पौंड सांगितलेली किमंत व त्यावेळचा पौंडचा चलनाचा रुबाब (1 पौंड = ६० रु) कळला ३६०/- रुपयांना लंडनला खाल्लेले आम्लेट त्यावेळी नीट ‘हजम’ झाले नाही.

बकिंगहॅम राजवाडा गाठावयाचा होता तेथील change of guards हा रक्षक बदली कार्यक्रम बद्दल ऐकले होते. सुदैवाने आम्ही तेथे पोहोचताच तो सुरु झाला! खरेच एक प्रेक्षणिय दृष्य होते. या तीन उभ्या रक्षकांकडून नवीन तिघे कार्यभार हाती घेतात त्यावेळी त्यांची एकाग्रता व अचूकता, केवळ पाहण्याजोगी. खूप गर्दी होती व अनेक परदेशी पर्यटक होते. राजवाड्याची भव्यता, समोर सोनेरी कलशाची सजावट —- सारच भव्य व सुंदर. 

दिवसभर मॅडम तुसाद, मेणाचे संग्रहालय, थेमस नदीवर फेरफटका, लंडन ब्रीज, म्युझियम असे काही बाकी फिरत चालतच पाहिले. ब्रेकफास्टचा ‘झटका’ लागल्याने,जेवणाचा बेत टाळला व तसेच काही बाही आटपून संध्याकाळी पुन्हा डोव्हेर – कॅले ते बोटीचा प्रवास झाला. पहाटे आम्ही पुन्हा पॅरीसला आलो. ते थंडीचे दिवस होते व बोटीवर तर खूपच थंडी वाटत होती, आमच्याकडे विशेष उबदार कपडे ही नव्हते, त्यामुळे असेच कोठेतरी उबदार कोपऱ्यात बसून थंडगार वाऱ्यापासून बचाव करीत प्रवास केला. बोटीवर अनेक युरोपीय कॉलेजीयान मंडळी नाच गाणी, खाणे पिणे करीत मजेत प्रवास करीत होती, त्यामुळे प्रवासांत कंटाळा नव्हता! आता पॅरीसची रजा घ्यायची. उद्या सकाळी  पॅरीस – दुबई प्रवास करायचा होता, कारण श्री. किशन साहेबांनी परतीचा प्रवास करतांना विमान कंपनीच्या सैजन्याचा फायदा घेत, एक दिवस मुक्काम दुबईला दिला होता – जेथे ‘बामर लॉरी’ या दुसऱ्या एका मोठ्या कंपनीचे आम्ही ‘पाहुणे’ होतो.

भारतातून निघतांनाच श्री भास्करन सोडून आम्ही तिघांनी दुबईचा वीजा देखील घेतला होता. श्री भास्करन यांचे मेहुणे दुबईत कामाला होते व त्या देशात ‘on arrive’ वीजा पध्दत तेव्हा होती, त्यामुळे भास्करने दुबई वीजा भारतात घेतला नव्हता. दुर्दैवाने आम्ही सकाळी १० वाजता (दुबई रार्हम) दुबई विमानतळावर उतरलो व भास्करनने मेहुण्याच्या घरी फोन करून चौकशी केली, तेव्हा ते दोन तासांपूर्वी घरून निघाल्याचे कळले. विमानतळ घरापासून ४०-४५ किमी. अंतरावर असल्याने एव्हाना ते पोहचायला हवे होते, त्यामुळे आम्हाला सर्वांना काळजी वाटू लागली. आम्ही तिघांनी त्यांच्या immigration Dept. ला कागदपत्रे दाखवून आत प्रवेश मिळवला. तेथील अधिकाऱ्यांनी भास्करनकडे विचारणा केल्यावर त्याचेकडे वीजा नसल्याने त्याला अडकवले. त्याने ‘माझे मेहुणे वीजा’ घेऊन येत आहेत, असे सांगितल्याने त्या लोकांनी थोडावेळ (तास भर) वाट पाहिली व कोणीच visa चे ‘हमीदार’ (guaranteer) न आल्याने त्याला सरळ, विमानतळावरील पोलीस कस्टडीत टाकले. त्या देशाचे immigration नियम अंत्यत काटेकोर असल्याने, त्यांनी आम्हाला बोलावून, पुढील एका तासात या गृहस्थांच्या visa ची सोय करा अथवा ज्या देशातून तुम्ही आलात त्या देशात जाणाऱ्या विमानात बसवून आम्ही यांना पाठवून देऊ असे सांगितले. मोठा कठीण प्रसंग होता. मेहुण्यांच्या गाडीला accident झाला होता व त्यांना पोलिसांनी इस्पितळात भरती केले होते- त्यामुळे आता त्यांचे येणे अशक्य होते. ‘Balmer Lawrie कंपनीचे अधिकारी जे आमच्या  स्वागतासाठी आले होते, ते देखील चिंतीत झाले. सकाळपासून सुमारे चार तास आम्ही विमानतळावर बसून फोनाफोनी करीत होतो. त्यावेळी मोबाईल/ WhatsApp नव्हते, landline फोन ने international call वर आम्ही आमच्या मुंबईतील कार्यालय व दुबईतील काही सबंधीतांशी बोलत होतो. सुदैवाने त्यावेळी श्री. राज मल्होत्रा हे आमचे ESSO कंपनी मधील जुने अधिकारी निवृत्तीनंतर, दुबई मध्ये, सरकारी कंपनीत (पेट्रोलियम कंपनीत) मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांना आम्ही ही हकीकत सांगितल्यावर ते त्वरीत स्वतः विमानतळावर आले व आपल्या खात्याच्या ओळखीच्या दुबईतील उच्च पदस्त लोकांशी फोना-फोनी करून त्यांनी, त्यावेळी विमानतळावर Immigration च्या लोकांस समजावले व शेवटी भास्करनची ‘कोठडी’तून सुटका झाली! आमचा जीव भांड्यात पडला! खरेतर आम्ही भास्करला, निघतांनाच खूप समजाविले होते, आमच्या बरोबर त्याने दुबई visa घ्यावा, पण काय कोणास ठाऊक, त्याने हट्टाने तसे न करता आपल्या ‘मेहुण्यावर विश्वास’ ठेवला व हा खूप दुर्दैवी प्रसंग आम्हा सर्वांवर आला. मात्र त्यामुळे भास्करन खजील झाला व एक चांगला धडा त्याला पुढील आयुष्यासाठी मिळाला हे खरे!

 वास्तविक ‘दुबईत’ आम्हाला संपूर्ण एक दिवस मिळणार होता. मात्र या ‘वीजा’ प्रकरणाने, आमचा अर्धा दिवस तर निघून गेला होता. विशिष्ट अधिकृत असे काही काम नव्हते, काही पाहता येईल ते पाहावे व विशेषतः त्यावेळी ‘सोन्याची दुबई’ म्हणून प्रसिध्द असलेल्या या देशात सोन्याचे भाव भारतापेक्षा खूप कमी असल्याने, जमल्यास काही ‘सोन्याची’ खरेदी करता आल्यास पहावे हाच आमचा ही उद्देश होता. 

जेवण वगेरे सोय हॉटेलात जाऊन झाली व थोडी विश्रांती घेऊन आम्ही दुबईतील, जुमेरा बीच, बुर्ज व शॉपिंग मॉल पाहिले, नी काही लहान सहान खेळणी (त्यावेळी मुले ही लहान होती) घेतली. या देशाचे नाव आम्ही HPC मध्ये दाखल झाल्यापासून ऐकत होतो. कारण आमच्या कंपनीचे बरेच कच्चेतेल (oil) या भागातून येत होते व आमच्या माझगावला ‘मुंबईची दुबई’ असेच नामनिधान झाले होते, कारण तेलाचे साठे भरपूर व कामगारांची मजाही भरपूर! येथील, सोने खरेदीसाठी संध्याकाळचे वेळेस आम्ही गेलो. मी एक १० तोळ्याचा सोन्याचा हार घेतला. कोणीतरी सूचना केल्याप्रमाणे सामानात न ठेवता, गळ्यात घालुनच प्रवास, हे मी ठरविले होते व तसेच केले. छान वस्तु व शुद्धतेची खात्री असल्याने, बहुतेक मित्रांनी थोडे फार सोने खरेदी केले. त्यावेळी विमानतळावर विशेषतः दुबईहून येणाऱ्या विमान प्रवाशांची खूप कसून तपासणी होई म्हणून कोणी हातात, कोणी गळ्यात असे ‘नटून थटून’ मुंबई विमानतळावर उतरलो होतो व काही त्रास झाला नाही!

दुबई हे ‘Gold मार्केट’ आज ही प्रसिध्द आहे. मात्र त्यावेळचे त्याचे स्वरूप इरिने एका पाठोपाठ असलेली छोटी छोटी दुकाने, काही तर हातगाडीवर देखील सोने विकत होते! आम्ही सोने खरेदी करून हॉटेल कडे परत येत होतो, संध्याकाळची वेळ होती व तेवढयात ‘नमाजाची’ बांग झाली. एखाद्या गल्लीत आग लागल्याचा भोंगा व्हावा व तेथील लोकांनी त्वरीत आपली घरे सोडून पटापट दुसऱ्या भागात धावाधाव करावी, अक्षरशः तसे दृष्य दिसू लागले. सर्व दुकानदार – मालक, सोन्याच्या लहान सहान वस्तुंनी भरलेली आपली दुकाने सोडून, पटांगणात नमाजासाठी पळत जाऊ लागले! आम्ही तर आश्चर्य चकीत होऊन पाहू लागलो. अरे या दुकानांत कोणी डल्लातर मारणार नाही ना ? पण हे रोजचे होते शक्यता काही security वाठवली असेल पण त्यावेळी पाहिलेले ते ‘सोनेरी’ दृष्य आजही डोळ्यापुढून जात नाही, कारण आपल्या येथे अशी कल्पनाही करवत नाही!   

दुबई- मुंबई प्रवास व्यवस्थित झाला. पाहतटेसच आम्ही मुंबई विमानतळावर उतरलो. सर्व सामान – सुमान अगदी ‘सुवर्णा सहीत’ व्यवस्थित घरी आले, त्यामुळे घरची मंडळी ही खूष! 

आम्ही जमविलेल्या माहिती अनुसार, पुढे HPCL ने आमच्या माझगांव कारखान्यात, ELF MARINE LUBRICANTS बनविली व भारतातील तसेच परदेशातील ग्राहकांना (विशेषतः आगबोटी) ती विकली. खूप समस्या देखील सुरवातीला आल्या. मात्र ELF कंपनीचे तज्ञ आम्हास पॅरीसहून वा प्रत्यक्ष भारतात येऊन त्या बाबतीत संपूर्ण सहकार्य देत. कराराची मुदत संपल्यानंतर (सुमारे १० वर्षा नंतर) आज घडीला HPCL, स्वतः आपली marine lubaricant बनविते आहे! त्यावेळी घेतलेले कष्ट व धोके कंपनीला कामी आले कारण, तंत्रज्ञानाच्या एका नवीन दालनांत कंपनी आपली स्वतःची उत्पादने करू लागली.

माझ्यासाठी देखील हा पहिला परदेश प्रवास खूपच आनंददायी व मार्गदर्शक ठरला. ज्या पेट्रोलियम क्षेत्रात मी बत्तीस वर्ष काम केले त्या क्षेत्राचे जगातील स्वरूप काय आहे व आपल्या कंपनीला असेच आमच्या देशाला या बाबतीत कोठे मजल मारावयाची आहे, याची कल्पना आल्याने माझ्या पुढील वाटचालीत मी हा अनुभव ‘मार्गदर्शक’ म्हणून वापरला!

या सफरीनंतर दोन वर्षांपूर्वी (२०१८) पुन्हा पॅरीस – लंडन ला जाण्यचा योग आला. मात्र हि सफर आमची कौटुुंंबीक होती व कुटुंबातील सर्व सदस्यांबरोबर या मनोहारी व प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे हा दुसरा आगळा अनुभव! याची हकीकत पुढे येईलच.