प्रेम स्वरूप ‘आ’ई
अखेरीस परवा आ गेली 29 एप्रिल 2022 रोजी अगदी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर तिने जगाचा निरोप घेतला. शेवटचे काही दिवस मृत्युशय्येवर पडलेली आ मृत्युला आवाहन करीत होती …
“मृत्यो आता ये, मी तुझ्या स्वागतासाठी तयार आहे. माझी सर्व सांसारिक, नियोजित कर्मे मी यथाशक्ती, यथामती केली आहेत. पतीच्या वैयक्तिक, व्यावसायिक, स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आयुष्यभर त्याला साथ दिली आहे. त्यांची स्वप्ने साकार झालेली पाहीली, मी रूढार्थाने अशिक्षित पण नेहमीच माझी बुद्धि, सद्बुध्दी ने, सद्सदविवेकाने वापरली आहे. लाडक्या लेकरांना तेच संस्कार दिले. त्यांना सुखा-समाधानाने, अभिमानाने आयुष्याची वाटचाल करताना पाहते आहे. भोवतालच्या समाजासाठी,दीन दुबळ्यांसाठी, जे काही देता आले ते दिले. मी चराचरावर मनापासून प्रेम केले. माझी माणसेच काय, माझी गाई गुरे, वासरे, पशू-पक्षी, झाडे, पाने, लता वेली, सर्व माझी सोयरी झाली. आता काही ईच्छानाही, देण्यासारखे राहीले नाही. आजवर कोणाकडून काही ‘घेणे’ हेच मला कधी पसंत नव्हते. अखेरच्या दिवसात ही कोणाकडून सेवा करऊन घेणे मला नको होते. आता देण्यासाठी अर्पण करण्यासाठी उरला आहे हा थकला, शिणला देह. जो गेली 94 वर्षे मी जोपासला, कष्ट करून झीजवला, त्याचे सार्थक झाले. आता तो तुलाच अर्पण. मी तृप्त आहे, समाधानी आहे, आता वेळ नको, चला निघूया सर्वांना आता हा माझा अखेरचा दंडवत…..”
असे विचार ती खूप आधीपासून बोलून दाखवी.
आ गेली, अनेक सुंदर,प्रसन्न आठवणींचा ठेवा आणि अक्षय आशीर्वादांचे देणे आम्हा सर्वांसाठी ठेवून ती गेली… तिच्याच या आठवणी..
तिची कन्या व माझी पत्नी सौ. मंदा,तिच्या दोन नाती, दिप्ती आणि सई,आम्ही सर्वानी आमच्या परीने, शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे..
आयुष्यात काही आठवणी अशा असतात की आपण कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्या विसरणे कधीच शक्य होत नाही. कोणतातरी विचार करीत असतानासुद्धा, जर एखादा गंध ,एखाद्या खाद्यपदार्थाची विशिष्ट चव, एखादे दृश्य, सुंदर सुरांची लकेर ,एकादी विशिष्ट जागा, दिसली तर आयुष्यात कधी काळी घडलेला तो प्रसंग, आठवणीच्या रुपाने तसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. त्यावेळी मनी दाटलेले भाव,आनंद, दुःख त्याच भावना जाणवतात .. सगळा मनाचा खेळ, आपल्याला आवडो न आवडो, आवर्तने होतच असतात.
चिंचणी तारापूरला जोडणाऱ्या त्या छोट्या खाडी पुलावरून मी कित्येकदा, अनेक प्रकारच्या वाहनांनी व कधी तर चालत सुद्धा गेलो आहे. आजही जात असतो .मात्र प्रत्येक वेळी त्या विशिष्ठ जागी आल्यानंतर, तोपर्यंत कोणत्यातरी भलत्याच विचारांत गुंतलेल्या मनात ,झटकन 1970 च्या जानेवारी महिन्यातील ती संध्याकाळ माझ्या डोळ्यासमोर उभी राहते….
माझे लग्न जमले होते. मात्र मुलगी पाहण्याचा कार्यक्रम मुंबईतील तिच्या भावाचे घरी पार पडला होता .भावी सासुबाई व घरातील इतर मंडळी,त्याच दिवशी, तेथे नसल्याने त्यांनाही भावी जावईबापू बघण्याची आतुरता होती. आमच्या कुटुंबाचा मुक्काम चिंचणीस होता. मी सुट्टी घेऊन चार दिवसासाठी घरी आलो होतो. एका सायकलवर स्वार होऊन त्या संध्याकाळी मी,’मला दाखवण्यासाठी’, सासुरवाडीकडे निघालो होतो. या छोट्या खाडी पुलावर थांबून जरा कपडे केस नीटनेटके करून पुन्हा सायकलवर सवार झालो होतो. थोड्याच अंतरावर ‘काशी बाग’ हे भावी सासुरवाडीचे घर होते.व तेथे पोहोचण्यापूर्वी स्वतः ला नीट, presentable असावे,अशा धाकधुकीत मी निघालो होतो. काशिबागे चे फाटक ओलांडले आणि ….आजूबाजूला काम करणाऱ्या अनेक नजरा, हातातील काम सोडून माझ्यावर रोखल्या गेल्या! मी येत असल्याची बातमी त्यांना आधी कळली असावी. ओटीवर जाऊन उभा राहिलो .घरात कोणीच नव्हते. मात्र थोड्याच वेळात एक परकरी मुलगी धावत धावत माझ्या जवळ आली.लाजत मुरकत, माझ्याकडे न पाहता, एक अक्षरही न उच्चारता, तिने मला एक खुर्ची आणून दिली आणि मी बसलो की नाही हेही न पाहता,आली तशीच भरकन ,परत धावत धावत पळून गेली. नवीन जावयाचे स्वागत करण्याचा हा काय प्रकार आहे मला काहीच कळत नव्हते . ज्या माणसांनी मला मुंबईस पाहिले होते ते भाऊ, बंधू ,वहिनी,तारापूरच्या घरी नव्हते.भावी पत्नीही मुंबईत होती. त्यामुळे मी तेथे संपूर्ण नवखा होतो.ना मला कोणी ओळखत होते ना मी कोणाला ओळखत होतो. अशा संभ्रमावस्थेत बसलेलो असताना,एका चाळीशीच्या, हसतमुख बाईंनी दारातून घरात प्रवेश प्रवेश केला.मगाशी भरकन येऊन गायब झालेली ती मुलगी आईच्या पदरा मागून मला न्याहाळत होती.मला कळले ह्या माझ्या भावी सासुबाई आहेत आणि ती मुलगी मेहुणी अरुणा आहे…पुढे यथोचित आदर सत्कार झाला शर्ट, पॅन्ट चे कापड वगैरे देणे झाले, आणि कांदे पोहे खाऊन माझी साग्रसंगीत रवानगी झाली..माझी व ‘आ’ची ती पहिली भेट.. पुढे अनेक भेटी झाल्या,मात्र आ चे ते प्रथम दर्शनी अनुभवलेल हास्य, ती मायाळू नजर ,तो आशीर्वादा साठी केलेला नमस्कार.. यांचे गारुड मनावर ठसले ते आजतागायत.. एक अभूतपूर्व अशी ती संध्याकाळ माझ्या जीवनात आली..…एका दुर्मिळ व्यक्तीमत्वाचा माझ्या जीवनात प्रवेश झाला.. जीवनाला वेगळी कलाटणी दिली.. अविस्मरणीय अशी ती संध्याकाळ.. आणि म्हणून त्या तारापूर खाडी पुलावरून आजही मी कधी गेलो, तर मला ती संध्याकाळ, तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो….
खूप चांगली माणसे आपल्या आयुष्यात,कधी कधी अगदी सहज येतात, कल्पना ध्यानी मनी ही नसताना.. .आपल्याला कायमचे उपकृत करण्यासाठी. त्यांचे अस्तित्व आपल्या आयुष्यात किती मोलाचे होते हे त्या वेळी कळत नसले तरी कालांतराने निश्चित जाणवते.जीवनातील योगायोग म्हणतात ते हेच!
आम्ही सगळेच जन्मदात्री साठी ,”आई”, अशी हाक मारतो. बाल्यावस्थेत अगदी सहज पहिला शब्द उच्चारला जातो तो. “आ”. अज्ञान बालक, सहज आपल्या मातेला,’ आ ‘ हेच संबोधन वापरते कारण पुढचा ‘ई’,ऊच्चारावयास शिकेपर्यंत त्याला धीर धरवत नाही.. उत्कट प्रेम व्यक्त करण्यासाठी विलंब नाही सहन होत…आ च्या नातवंडांनी तिला संबोधताना म्हणूनच विनाविलंब उच्चारता येणारे “आ” हेच संबोधन वापरले…म्हणून आमचीही ती,आ झाली.
कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई ,विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई. ती जन्मदात्रीच्या रुपातच मिळते असे नाही. काही भाग्यवंतांना,क्वचितच, इतरही कोणत्यातरी रुपात मिळते. अशी दुसरी आई ज्यांचे भाग्यात असते, अशांचा हेवा करावा वाटेल ना? आ मुळे मला ही असे भाग्य लाभले. ही केवळ दैवाची कृपा! आयुष्यातील एक दुर्मिळ योगायोग. माझ्या पत्नीला व तिच्या सर्व भावंडांना आ चे प्रेम मिळावे हा निसर्ग नियम . कारण ती त्यांची जन्मदात्री !मला, माझ्या मुलांना,नातवंडांना, तसेच आ च्या सर्वच गोतावळ्याला, तिचे ,अकृत्रिम, अफाट, निर्व्याज ,निरागस प्रेम मिळत राहावे ,हा ऋणानुबंध,पूर्वसंचिताचा खेळ,…याशिवाय त्याला दुसरे काय म्हणू?
एका संख्येत दुसरी संख्या मिळविली की बेरीज होऊन मूळ संख्या मोठी होते. आयुष्यात ही अशी निर्व्याज्य प्रेम करणारी माणसे जेव्हा सामावली जातात, तेव्हां आयुष्यालाही अर्थ प्राप्त होतो, वैभव प्राप्त होते,ख-या अर्थाने जीवन व्यापक होते.
आ आम्हा सर्वांच्या जीवनाचा एक अंश बनली आणि आम्हा सर्व गोतावळ्यातील प्रत्येकाचे जीवन व्यापक झाले ,विशाल झाले, श्रीमंत झाले. स्वतःसाठी जगणे म्हणजे काय व दुसऱ्यासाठी जगणे म्हणजे काय याचा अर्थ तिच्या जगण्यातून आम्हाला कळला.
आपल्या सर्व पिल्लांसाठी आयुष्यभर कष्ट सोसून ,अनेक आघाड्यांवर लढाया देऊन आपले प्रत्येक लेकरू आयुष्याच्या खडतर वाटेवर नीट, योग्य मार्गाने वाटचाल करीत आहे हे अजमावून, ही माऊली आज अनंताच्या प्रवासाला निघून गेली आहे.गात्रे थकली होती,चेतना मंदावल्या होत्या, मात्र नजरेतील ती आश्वासकता, चमक आणि हास्यातील निरागसता शेवटपर्यंत तशीच होती , शेवटच्या क्षणापर्यंत..जशी ,मी प्रथम दर्शनी अनुभवली होती….
आ च्या व्यक्तिमत्त्वात जशी कोमलता, तशीच वज्रकठोरताही होती. ‘मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे।’ ही तुकारामांची उक्ती तिच्या बाबतीत अर्थपूर्ण ठरावी. या तिच्या गुणविशेषाचे दर्शन वेळोवेळी घडले राहिले. आ चे व्यक्तिमत्त्व संघर्षाच्या मुशीतून घडलेले होते. खडतर परिस्थितीवर मात करून, भाऊसारख्या शीघ्र कोपी ,कर्तुत्ववान पुरुषाशी संसार करताना तिला अनेक व्यवधाने सांभाळावी लागली. पतीच्या कर्तृत्वाला सहाय्यभूत होण्यासाठी प्रसंगी त्याच्या मागे फरफटत ही जावे लागले. मुलांचे लेंढार सांभाळताना, प्रचंड कारभाराची देखरेख करण्यासाठी राबणाऱ्या गडीमाणसांनाही जोडून ठेवण्याचे कसब मिळविले.. पैशाचे प्रलोभन न बाळगता योग्य तिथे दुसऱ्यांसाठी हात सैल सोडावा लागला. शेत बागायती केवळ व्यवसाय न मानता जीवनाचा वसा मानला. आजन्म काळ्या आईची सेवाही उपासना केली. तन्मयता, समर्पण हा तिचा मनोधर्म होता. तिच्या हाताला ‘गुण’ होता .जसा एखाद्या यशस्वी डॉक्टरच्या हाताला असतो. तिने रुजविलेले,लावलेले कोणतेही मरतुकडे रोपटे वृक्षात रूपांतरीत झालेच पाहिजे असा तो अमरत्व देणारा हात होता. झाडा पानांसही तो हात जादूई होता,मग नातवंडांसाठी तो आधारवड ठरला तर त्यात नवल कसले?
माझी पत्नी मंदा हीने,अतिशय हृद्य आणि खास आठवणीतून आ च्या अंतरंगाचे दर्शन घडविलेआहे.तिच्याच शब्दात..
“माझी आई हे जग सोडून गेली. 94 वर्षे आमच्या डोक्यावर मायेचे छत्र धरून असलेली माझी आई कायमची गेली, याचे दुःख झाले, पण वृद्धापकाळाने थकलेली माझी आई ,मायेच्या पाशापासून मुक्त झालेली, जीर्ण शरीर सोडून, जाताना दिव्याची ज्योत शांतपणे निमावी,तशी गेली. दुःख झाले पण शोक करीत रहावे असे कारण राहिले नाही. मनात आठवणींचो गर्दी झाली आहे. लेकरांसाठी खूप कष्ट करून, सुसंस्कारांचे देणे देऊन ,स्वतःचा संसार ,गृहकृत्ये योग्य प्रकारे सांभाळून संपर्कात आलेल्या माणसांना,पशुपक्ष्यांना,प्राण्यांना, झाडावेलींना प्रेम देऊन परिपूर्ण जीवन जगून गेली.”
“मला माहित आहे, माझी आई जगावेगळे व्यक्तिमत्व नव्हते. अगदी सर्वसामान्य गृहिणी होती ती. पण तिच्याकडे असलेले काही अंगभूत गुण व अनुभव यामुळे तिचे व्यक्तिमत्व आजूबाजूच्या सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा निश्चितच वेगळे होते. तिची संवेदनशीलता हा तिचा एक मोठा गुण. आपल्याला आयुष्यात काही करून दाखवावयाचे आहे अशी जिद्द तिने कधीच मनात धरली नाही. मात्र जीवनातील सर्व टप्पे यथाशक्ती पार करत गेली. खडतर आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, भाऊंच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणारी अशीच आमची आई आम्हाला आठवते. भाऊंसारख्या झंझावाताला, योग्य मार्गावरून नेत, सारी अवधाने सांभाळत वाटचाल करत राहीली. भाऊंची मोठी झेप तिलाच समजली .त्यांच्यामागे उभी राहताना योग्य अयोग्य काय याचा विचार करण्यास उसंत मिळाली नाही. पण नुसते कष्टच पडले असे नाही तर सावरूनही घ्यावे लागले. तेव्हढा शहाणपणा आणि सोशिकता तिच्यात होती. म्हणूनच भाऊ कर्तृत्ववान ठरले.
दिवस पालटले सुबत्ता आली परिस्थितीप्रमाणे आई पण बदलली. गोतावळा भरपूर. सर्वांचे आदरातिथ्य करणे, प्रेमळ बोलणे ,सर्वांचा मान राखणे, या तिच्यातील अंगीभूत गोष्टी. पण पाय मात्र जमिनीवरच होते.नातेवाईक येत, गावातील कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे ,भाऊ घरी घेऊन येत. हसतमुखाने त्यांचे स्वागत, उठबस करणे तिलाच करावे लागे. भाऊंचा लोकसंग्रह तिला आवडे .तिने कधीच कुरकुर केली नाही.घरी आलेल्या थोरामोठ्याबरोबर जे अगत्याने वागणे असे तेच अशिक्षीतांशी. मला आठवते, दारावर वाडीतला माल घेण्यासाठी,चिकू आंबे नारळ केळी भाजीपाला घेण्यासाठी, आमचेकडे भैय्या लोक येत. पूर्वी परिसरात हॉटेले नव्हती. भाऊ ओटीवरूनच हाताची विशिष्ठ खूण करून, “जरासं वाढ”,अशी सूचना करीत. माझ्या आईची जेवण बनवण्याची भांडी कधीच संपूर्ण रिकामी नसत. पटकन एका ताटात वरण,भात,भाजी आणि पाण्याचा तांब्याभांडे घेऊन,आई आगंतुक पाहुण्या पुढे ठेवी. उपाशी असलेला तो तृप्त होई. अगदी त्याकाळी जंगलांतून चालत आलेले आदिवासीदेखील असेच अवेळी येत आणि कधीही उपाशी जात नसत. म्हणूनच भाऊ तिला प्रेमाने लक्ष्मी किंवा अन्नपूर्णा म्हणत .
“कामाच्या व्यापातही आम्हा मुलांच्यावर तिची करडी नजर होती. खाण्यापिण्याची चंगळ नसली तरी कमतरताही नव्हती. आम्हाला जवळ घेऊन न्हाऊ माखू घालणे,वा प्रेमाने कुरवाळणे तिला जमलेच नाही. तिच्या वागण्या-बोलण्यातूनच तिने आमच्यावर संस्कार केले. ती नोकर चाकरांना ओरडून कधीही काम करून घेत नसे. प्रत्येकाला प्रेमाने दादा, बाबा, पोरा,” जरा हे कर ना ..”,अशीच तिची भाषा असे. कामगार बायांना सुद्धा बाय म्हणूनच संबोधित असे .त्या सर्वांची ती आई ,बाई ,ताई होती. अगदी आम्हाला देखील सर्वांशी बोलतांना, काका ,मामा, तात्या भाऊ, अशी संबोधने लावूनच बोलायला लावी.आम्ही जरी ‘शेठ’ची मुले असलो तरी कामगारांचा उल्लेख कधीही एकेरी करीत नसू.आमच्या आईची शिकवण तशी होती. कामास येणारी कोणी बाई बाळंत झाली तर तिच्याकडे शिधा, सामग्री, दूध पोहोचते होई. कुणी आजारी झाले तर भाऊ त्यांना डॉक्टरांकडे न्यायची सोय करत. आई त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत असे.आपल्या कामगार वर्गाची काळजी दोघांनी घेतली.”
” भाऊंच्या धंदा उद्योगात पूर्ण लक्ष ठेवून, संसाराचे रहाटगाडगे ओढताना आपले स्वतःचे छंदही तिने जोपासले. काही नवीन पदार्थ करून पाहणे, आपली फूलबाग फुलविणे, असे सतत काही करीत असे. अनेकांनी उल्लेख केलेला,” मिनी झू “,हे तिचेच काम. सर्व प्राणी ,पशु ,पक्षी गाई-म्हशी ,कुत्रा मांजर, साऱ्यांना तिची लाडाने ठेवलेली नावे असत.त्या सर्वांची जातीने देखभाल करीत तिचा दिवस कधीच संपत नसे. सतत येणारे पाहुणे ,दुखणी, खुपणी काढणारी आमची आई, एवढी शक्ती कुठून आणत असावी? एखादे मरतुकडे रोपटे देखील तिचा हात लागला की तरारून जाई. झाडा पानावर अपार माया केली. झाडाला लागलेल्या कळ्या, फुले ,फळे यांचे निरीक्षण सतत चालू असे. जणू हेच तिचे जगण्याचे टॉनिक होते! तिचा तो” मिनी झू”,पाहण्यासाठी कितीतरी लोक आपल्या मुलां नातवंडाना घेऊन येत. परवा,आमच्या सांत्वनासाठी आलेले सारे हे आवर्जुन सांगत होते .काहींनी तिने दिलेल्या झाडे, रोपे,बीया यांच्याही आठवणी सांगितल्या.”
” काळ पूढे जाते होता.आम्ही सारी मुले एक-एक करीत घराबाहेर पडलो. ताई सासरी गेली .घर मोकळे होत गेले .आता सुबत्ता होती पण मुले लांब गेली होती. लहानपणांत मुलांचे लाड करायला मिळाले नाहीत, ही तिला खंत होती .ती सतत बोलून दाखवी. ही उणीव भरून काढावी असे तिला तीव्रतेने वाटे. तिच्याकडे कधी गेलो की तिला काय करू आणि काय नको असे होई. आवडीचे पदार्थ खायला घालण्यासाठी कोण धडपड . पुढे नातवंडांचे लाड करून त्याची भरपाई करू पाहत होती. त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेई आणि ते पुरविण्याचा प्रयत्न करी. प्रत्येक नातवंडाला तिने आपले आवडीचे नाव ठेवले होते. प्रत्येकाची वेगळी आवड तिला माहित.ती पुरवणे तिला फार आवडे.आमच्या लहानपणी अशा बारीकसारीक गोष्टी करण्यास तिला वेळ मिळाला नव्हता त्यासाठी ही धडपड होती.”
“तिच्या मृत्यू आधी एक-दीड महिना, तिने आपला आहार कमी कमी केला. अगदी हळू हळू खाणे .बोलणे कमी करत गेली. शरीर कृश झाले. संवेदनाही क्षीण झाल्या. पण एक गोष्ट तशीच राहिली .असे म्हटले जाते , मृत्यु समयी देवाचे नाव तोंडात यावे असे वाटत असेल तर तरूणपणीच नामस्मरणास सुरुवात केली पाहीजे . तसे नामस्मरण नाही तर आईचे व्रत म्हणजे तिचे निरागस हसू आणि शालीनता. शेवटी ती गलीतगात्र झाली तरी या गोष्टी कृतीत येत होत्या . कोणी भेटायला आले, तिला स्पर्श करून सांगितले,की प्रयत्नपूर्वक डोळे उघडून पाही तेव्हा तेच निखळ हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरे आणि दोन्ही हात जोडून ती नमस्कार करी. तिचे सर्व दात वयाच्या 94 व्या वर्षी ही शाबूत होते. हृदय कमकुवत झाले होते, हालचाली मंदावल्या होत्या, ऐकणे केव्हाच बंद झाले होते ,पण ते हास्य आणि ते हात जोडून शालीनता दाखवणे बदलले नाही . तिची ही कृती खूप खूप हृद्य होती !”
“आम्ही लहानपणी तिच्या तोंडून तिच्या बालपणीच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. शेवटी शेवटी ती त्याच गोष्टीत त्याच काळात जास्त रमत होती. कधी कधी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा तिच्या तोंडून आम्ही ऐकली आहे. त्या वेळचे तिचे माहेरचे एकत्र कुटुंब तिला आठवे. सारे चुलत चुलत कुटुंब व त्यातील साऱ्यांसाठी मनात ओतप्रोत प्रेम भरलेले. सर्वांचा जिव्हाळा जो तिने अनुभवला तो सांगत असे . कधी सासरी आल्यावर मिळालेले नातेवाईक यांच्याविषयीही सांगे . प्रेमळ प्रसंग, कठीण परिस्थितीत कुणी कसे धावून आले तेच ती सांगत असे . ते प्रसंग सांगताना कोणाविषयी कधीच कटुता दाखविली नाही. आता मी विचार करते तेव्हा कळते, तिने सर्वांकडून मिळालेल्या प्रेमाचीच बेरीज करून ठेवली होती. तिच्या गोड वागण्याचं, प्रेमळ बोलण्याचं आणि निर्मळ हास्याचं तेच रहस्य होतं! सासरची माहेरची माणसे अशी विभागणी नव्हतीच. सारी तिला हवीहवीशी!गेलेल्या खडतर आयुष्याची खंत नव्हती आणि वैभव आले तरी डोक्यात हवा गेली नव्हती. सोनं नाण्याचा हव्यास नव्हता मात्र नीटनेटके रहावे असा अट्टाहास जरूर होता. ती स्वतः तशी राहावयाची. आम्हा मुलांना तिच्यासमोर जाताना तो प्रेमळ नियम लागू होता. ती अगदी अत्यवस्थ झाली तरी हसतमुखाने तिच्याकडे जावे लागे. पूर्वी थोडा दुर्मुखलेला चेहरा दिसला तर तिची नजर पडताच डोळ्यात डोळे घालून काय झाले विचारत असे ते आठवून आम्ही कधीही तिच्यासमोर दुःखी चेहऱ्याने गेलो
“आईच्या बालपणीच्या आठवणीत दोन गोष्टी आम्ही अनेक वेळा ऐकल्या आहेत. परवा मामाकडे गेलो असतांना त्यांनी, त्यांच्या आईकडून ऐकलेल्या याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्या आठवणी मुद्दाम सांगते.
‘ माझी आई दोन अडीच वर्षाची झाली. ती खूप नाजूक प्रकृतीची होती. एका संध्याकाळी तिची हालचाल एकदम बंद झाली. सारे कुटुंबीय जमा झाले. शोक करू लागले. उशीरा रात्री, अंत्यविधी न करता, सकाळी करू म्हणून फडक्यात गुंडाळून ते बालक तसेच ठेवले. रात्री ओटीवर सारे दुःखी कुटुंबीय जमले होते. त्यावेळी रस्त्यावरून एक साधू बैरागी जात होता. त्याने हे दृश्य पाहिले. तो स्वतःहून अंगणात येऊन उभा राहिला. काय झाले म्हणून विचारले.त्याने सारे ऐकले आणि “बालक आणा”, म्हणून सांगितले.त्याकाळी लोक अशा साधूवर विश्वास ठेवत असत. दुपट्यात गुंडाळलेले, मृत समजलेले बालक त्याने हात लावून पाहिले.घरातून कापूस मागविला ,थोडा तिच्या नाकावर ठेवला. बांबूची मोठी टोपली मागविली आणि बालकाच्या देहावर उपडी ठेवली. सकाळपर्यंत राखण करण्यास सांगून तो निघून गेला. सारे रात्रभर जागत बसले, पहाट झाली आणि टोपली खालून रडण्याचा क्षीण आवाज आला. टोपली काढली आणि बारीक आवाजात रडणे आणि थोडी हालचाल दिसली. आई वाचली .ती म्हणे हा माझा ‘ ‘पुनर्जन्म’ झाला होता…’
“तात्या म्हणजे तिचे वडील .त्यांची ती फारच लाडकी होती. ते नेहमी तिला कुशीत घेऊन बसत. तीन चार वर्षांची असताना आजारी पडली.खूप अशक्त झाली आणि पडूनच राहू लागली. तात्या तिला कडेवर घेऊन शेतात गेले आणि कुशीत घेऊन बसले होते . अचानक तिने शब्द उच्चारले,” तात्या,तात्या मी देव बाप्पा कडे गेली होती.तो मला म्हणाला,’ तू जा, तू तुझ्या तात्यांचीच आहेस’..
हे कसे घडले असेल माहीत नाही.पण लहानपणीच दोनदा ‘पुनर्जन्म’ घेऊन माझी आई 94 वर्षांचे दीर्घ आयुष्य जगली ! बहिणाबाईच्या भाषेत,”असं जगनं मोलाचं, उच्चगगनासारखं,धरित्रीच्या रे मोलाचं” !
अस आयुष्य माझी आई जगली !”
“माझी आई सर्वसामान्य स्त्रीच होती. तिलाही त्याची पूर्ण जाणीव होती. शिक्षण झाले नाही याची खंत होती. लहानपणच्या आजारपणामुळे शाळा झालीच नाही. लग्न झाले आणि संसारात वेळच मिळाला नाही. पण तिची संवेदनशीलता ,सुसंस्कृतपणा आणि स्मरणशक्ती यामुळे अंशतः तिने शिक्षणाची कसर भरून काढली. बालपणी ऐकलेल्या अनेक कविता, गोष्टी तिला पाठ होत्या. नातवंडाना ती नेहमी बोलून दाखवी. रेडियो, टीव्ही वर काही आरोग्या विषयी कार्यक्रम असल्यास आवर्जुन ऐकून ,पाहून ते अंमलात आणायचा प्रयत्न करी .काढे, तेले बनवून पाही.
गावात आलेल्या अनेक मान्यवरांना भाऊ घरी घेऊन येत . आई त्यांचे स्वागत करी. आपल्यापरीने सन्मान करी.असे नेहमीचेच असे. सहज सांगत… एकदा डॉ. नीला देवराव पाटील आणि एक मोठ्या लेखिका (मला त्यांचे नाव आठवत नाही), आमच्या घरी आल्या होत्या. आईने जातांना त्यांना हळदी-कुंकू दिले आणि स्वतः बनविलेले मोगऱ्याचे गजरे दिले. त्यांनी ते माळले, त्याचे तिला कोण अप्रूप वाटले! नंतर मी गेले असताना तिने हा प्रसंग वर्णन केला,”एवढ्या थोर, शिकलेल्या बाया, पण मी दिलेला गजरा केसात माळला आणि माझ्या पाया की ग पडल्या. मी अशिक्षित अडाणी बाई, किती संकोचून गेले होत्ये!..”., अशी तिची समजूत ! अशा अनेक गोष्टी करतांना दुस-या व्यक्तिविषयी आदर मनापासून असे.
“आपण आयुष्यात कुठे कमी पडलो याची तिला पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच स्वतःविषयी फार अभिमान नव्हता. पण सन्मानाने वागण्याचे मोल तिला कळे. कुणा कडून तिला काहीच नको असे. मात्र कोणी अपमान केल्यास ती कधीच चालवून घेत नसे. त्यावेळी ती रास्त असेल, तर रणरागिणीचे रूप धारण करून समोरच्याला सडेतोड उत्तर देई. मोजक्या शब्दात बोले . गंमत म्हणजे जशास तसे उत्तर देऊन, तेथेच सारे मिटवून टाकी. कटुता ठेवत नसे.आजूबाजूच्या सर्वांचे स्वभाव ओळखून असे.पण कुणालाही हीन लेखत नसे. विनोदी बोलणे असे ,मात्र त्यात कोणाचा अपमान करीत नसे.अपमानाचे प्रसंग आलेच असतील पण मनात कटुता ठेवली नाही, हे तिचे वेगळेपण!”
“तिच्या अखेरच्या दिवसात तिच्या निर्मळ अंतकरणातचे दर्शन झाले. आपले आयुष्य लांबत चालले आहे. आपल्या मुलांना आपले खूप करावे लागते, याचे तिला वैष्यम वाटे.कुणी भेटायला आले तर खूप प्रेमाने बोले. पण तिला अशा निरर्थक जीवनाचा कंटाळा आला होता.” मला अजून कशाला जगवतोस?”,म्हणून ती भाईला जाब विचारी. भाई तिला समजेल अशा भाषेत तिची समजूत घाली. “देवाने दिले असेल तेव्हढे आयुष्य जगावेच लागते .तुझी काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे, ते मी करतो. तू आमची काळजी करू नकोस. ज्या दिवशी देवाचे बोलावणे येईल, तेव्हा तू ही मोहमाया सोडून जा,अगदी शांतपणे जा हं. आता त्याचा विचार नको करूस !” ती नेहमीचे निर्मळ हसून गप्प बसे. आणि खरोखरीच ती तशीच शांत होत गेली.
तिचा आपल्या मुलांवर पूर्ण विश्वास होता.तिचा सर्व मुलांवर जीव होता .त्यातूनही मोठा मुलगा बंधु आणि तिचे नाते अलौकिक होते. शेवटच्या काळात भाईकडेच राहीली .ती भाईला सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत असे. कोविडची तिन्ही व्हॅक्सिनही , हे काय, कशासाठी असे काही न विचारता घेतली.
अखेरच्या दिवसांत भाई ,सरोजवहिनी ,आदित्य, अनिल, रश्मी यांनी तिची मनापासून खूप सेवा केली. आणि घरातील नातवंडानी खूप माया दिली, सेवा केली .अत्यंत निगराणीत तिचे वार्धक्याचे दिवस गेले. भरपूर प्रेम मिळाले.
दोन वर्षापूर्वी पर्यंत, कधीतरी तारापूरच्या घरी जाई. शिरीष ,सविता काळजी घेत .तिचे करण्यात धन्यता मानीत.भाऊ गेल्यानंतर तारापूरच्या घरी ती एकटी पडली, त्या दीर्घ कालखंडात श्रध्दाने दिलेली साथ खूप मोलाची होती . सिद्धार्थ, गौरव या लाडक्या नातवंडाची सेवा ती कधीच विसरली नाही.”
“चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येत असं नाही, पण जे वाट्याला येत त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात. यालाच आयुष्य म्हणायचं.. माझी आई आणि भाऊंच्या आयुष्यातही वाकडी तिकडी वळणे खूप आली, परस्पर विश्वासाची कसोटी लागली, परंतु दोघेही त्या कसोटीस उतरले, पास झाले .आपल्या माणसाला आहे तसं स्विकारणं आणि दोन्ही हातांनी,आपल्या सर्वस्वाने त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं ..हीच जीवनाची परिपूर्ण सार्थकता आहे …आई ,भाऊंनी तेच केल॔. म्हणून दोघांच्या आयुष्याचं सार्थक झालं.. ..आमच्यासाठी आशीर्वादाच मोठं संचित ठेऊन गेली .. “..
मंदाने सांगितलेल्या आपल्या आईच्या बालपणीच्या आठवणी वाचून मन गलबलते एका साध्या व्यक्तीमत्वात दडलेले मोठे मन जाणवते.. भाग्यवान ही तिची मुले,ज्यांना अशी आई मिळाली.
आ ची समर्पित वृत्ती व संपूर्ण साथ यामुळेच, भाऊ, ‘एक मोठा शेतकरी होण्याचे’, आपले स्वप्न साकार करू शकले.भाऊंना यशोशिखरावर स्थानापन्न झालेले पाहतांना तिला आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता वाटली. तिच्या अस्तित्वाचा हेतूच,आपल्या पतीला,त्याच्या ध्येयपूर्ती कडे पुढे जात असलेले पाहणे, असा होता. भाऊ गेले आणि त्याच दिवसापासून तिची जीवनासक्ती कमी होत गेली…
. “मानव परिस्थितीचा गुलाम आहे”, ही निराशाजनक विचारधारा भारतीय संस्कृतीला मान्य नाही. कितीही बिकट व विपरीत परिस्थिती प्राप्त झाली तरी,जर व्यक्ति स्वतःचे ध्येय उच्च आणि दृष्टी उन्नत ठेवील तर ती यशोशिखराकडेच वाटचाल करणार व एक दिवस आपले इप्सित प्राप्त करणार, ही आमच्या संस्कृतीची धारणा. संपन्न घरातून येऊनही, ,लंकेची पार्वती बनून, कष्टाने, जिद्दीने आणि नेकीने संसार करीत, एक दिवस, सावे कुटुंबीयांच्या जीवनात एक नवी पहाट फुलविली. भाऊंच्या व स्वतःच्या जीवनाचे सार्थक केले.
आ चे वडील,श्री. मोरेश्वर राऊत ऊर्फ तात्या हे त्यावेळी चिंचणी गावाचे सरपंच होते.आजही त्यांचे नाव त्या कालांतील एक आदर्श सरपंच व समाजसेवक म्हणून परिसरात घेतले जाते .आपल्या गावातील कोणताही वादविवाद ,विकोपाला जाऊ नये व कोर्टकचेऱ्या होऊ नयेत, हा त्यांचा कटाक्ष असे. त्त्यांच्या ओटीवर अधून मधून ही गावकी च्या सभा भरत असत. गावांतील सारे जाती धर्माच्या लोकांचा राबता होता. तात्या उपस्थित गावकऱ्यांशी त्यांच्या त्यांच्या बोली भाषेतून संवाद साधीत . तात्यांच्या या लेकी, बहिणी हे सर्व गमतीने पहात असत व ऐकत.आणि गंमत म्हणजे या सर्वजणी अनेक बोली भाषा बोलण्यात तरबेज झाल्या.आ आपल्या वाडवळी भाषेबरोबरच वारली, मांगेली ,डावरी गुजराती ,हिंदी अशा अनेक स्थानिक बोली भाषा अस्खलितपणे बोलू शकत असे ते त्यामुळेच. , ऐकणारा चकित होई आणि तिची खरी मातृभाषा कोणती म्हणून अचंबित होई…
तिच्या प्रेमळ व आश्वासक स्पर्शामुळे तिने लावलेले प्रत्येक बीज तरारून फुलून येणारच. मला आठवते,भारतात कामानिमित्त भ्रमंती करताना काही दुर्मिळ फुलांच्या बिया मी मुद्दाम मागून आणित असे.आ कडे त्यांची रवानगी झाल्यावर त्या बियांपासून, दुर्मिळ फळाफुलांची पैदास आम्ही तारापूरच्या बागेत पाहिली आहे.आ चा हात म्हणजे,’अमृत हात’,! तिने जे लावले ते रुजले ..तिने ज्यांचे संगोपन केले ते वाढले..मोठे झाले.. मग ती मुले असोत फुले असोत, प्राण्यांची छोटी पिल्ले असोत..सर्व मुला,नातवंडांची लहानपणी उत्तम जतन करून त्यांच्या इ टुकल्या पायावर लडखडत ऊभे करून, प्रथम दुडुदुडु धावताना तिनेच पाहिले…
आपल्या लेकराबाळांसाठी खस्ता खाणे कोणीही करतो. मात्र आपल्या शेतीवर, वाडीत खपणा-या कामगार,मजुरांच्या अडीअडचणीला धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे,असे समजणारी आ सारखी मालकीण विरळा! आजारी पुरुष अथवा मजूर बाईची वास्तपुस्त करणे, शिधा सामुग्री पोहोचवणं, निकड असेल तर थोडे पैसे ही देणे व शेवटी गावातील सरकारी दवाखाना अथवा डॉक्टर यांच्यामार्फत आजारावर काही इलाज होत नसल्यास मुंबईस श्याम भाऊंचे (कै. शामराव चुरी,बोर्डी) मार्फत के ई एम,इस्पितळात त्यांच्यावर इलाज करविणे, हे सर्व स्वाभाविक रित्या होत असे. त्यात आपण काही विशेष जगावेगळे करीत आहोत, असा अविर्भाव जराही नसे. अशी अनेक आदिवासी,मजूर कुटुंबे तिने अडचणीतून बाहेर काढली. एखाद्या लेकुरवाळ्या बाईला दोन मुले झाल्यानंतर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी मार्गदर्शन करून ती करवून घेणे,यावर तिचा कटाक्ष असे. आपल्या साठी कष्टणाऱ्या, प्रेम देणाऱ्या वंचितांच्या जीवनातही नेहमी सुख व सौख्य नांदावे, यासाठी आपल्याला जे करता येईल ते तिने निरलसपणे केले. ही खूप मोठी गोष्ट आहे
दुसऱ्याच्या आनंदात सुखाचे नंदादीप उजळण्यासाठी धडपडणाऱ्या आ ला स्वतःसाठी काही होसमौज करता आली नाही. संसाराच्या सुरुवातीच्या काळात परिस्थिती खडतर होती. आर्थिक ऊत्पन्न बेतास बात. मोठा भाऊ म्हणून सर्व कुटुंबाची जबाबदारी भाऊंच्या शिरावर. अशा ओढग्रस्ती मध्ये तिला स्वतःसाठी एकादा दागीना घडविता आला नाही. पर्यटनासाठी फिरून येण्याचा विचार करणे दूरच. भाऊंनी देखील व्यवसाय एके व्यवसाय हीच एक हौस राबविली. साठी ओलांडल्यानंतर,मुलांच्या आग्रहाखातर भाऊंनी,’केसरी टूर’,सोबत केलेली, काश्मीर दर्शन सफर हे त्यांच्या आयुष्यातील पहिले व अखेरचे मोठे पर्यटन. आ त्यात शामिल होती.त्यानंतर ज्येष्ठ चिरंजीव रवी याने आपल्या कोल्हापूर येथील सासुरवाडीसह करविलेले, ‘पन्हाळादर्शन’, दुसरे पर्यटन! भाऊ, आ च्या, मुलांनी व नातवंडानी परदेशी वास्तव्य केले . या दोघांचे चरणस्पर्श आपल्या निवासस्थानास लागावे ही सर्वांचीच अतीव इच्छा. त्यांच्यासाठी तो अतीव आनंदाचा ठेवा होता. पण ते होऊ शकले नाही. दात होते तेंव्हा चणे मिळाले नाहीत,आणि चणे आले तेव्हा दात खिळखिळे झाले. बहुदा अनेकांच्या जीवनात हा दैवदुर्विलास पहावयास मिळतो. त्याची खंत दोघांना कधीच वाटली नाही, कधीही आपली नाराजी व्यक्त केली नाही .
आपल्या स्वभावधर्मानुसार भाऊ जरी कधी रागवून बोलू लागले तरी ती शांतपणे ऐकून घेई व शेवटी एका वाक्यात त्या विवादाचा समारोप करी. सांसारीक वावादविवाद झाले, लहान सहान प्रासंगिक खटके उडाले, मात्र भाऊ विषयी मनी वसत असलेला आदरभाव, प्रेमा व आपुलकी कधीच कमी झाली नाही. भाऊंच्या शेवटच्या आजारात,आपली स्वतःची शारीरिक स्थिती बाजूला ठेवून ,तिने भाऊंची मनोभावे सेवा केली. कधीही ,काहीही कुरकुर केली नाही… सर्वसमर्पण वृत्ती दाखविली.
भाऊंच्या कौटुंबिक, संसारीक व व्यवसायिक जीवनातील पेच उभा राहिला तर भाऊंचा शेवटचा सल्लागार आ असे .कारण चतुरस्त्रता, शांत मनोवृत्ती व व्यावहारिक शहाणपण ,या मुळे ती योग्य न्याय देई. लौकिक शिक्षण नसेल पण व्यावहारिक शहाणपणा, नैसर्गिक बुद्धिमत्तेची देणगी, आणि सारासार विचार करण्याची क्षमता तिच्यात नक्कीच होती.
भाऊ 2001 साली स्वर्गवासी झाले . टोकाचा मधुमेह आणि शरीरअस्वास्थ्य यामुळे त्यांना आपला शेवट जवळ येत आहे असे कळले होते. मृत्यूच्या काही काळ आधी त्यांनी आ कडे एक इच्छा प्रदर्शित केली होती ,
“आज पर्यंत तुझ्या साथीने ,आपण दोघांनी, तारापूरचा हा मळा फुलविला. आता माझे काही खरे नाही. माझ्या पश्चात तुला एकटीला हे काम करावे लागेल. ही बाग अशीच फुलती राहू दे.”
भाऊंचा हा,’अंतीम इच्छा’ रूपी आदेश, त्यांचे पश्चात पंधरा वर्षे तिने शिरोधार्य मानून, पूर्णत्वास नेला. शेवटची काही वर्षे शरीराची साथ अजिबात नाही व ,”शेवटचे घरटे” भाईच्या’ ‘तारपा”मध्ये हलवल्यावर, पुढे नाईलाजच झाला.तारापूरची काशीबाग दृष्टीआड झाली . तिनेच तो निर्णय घेऊन तारापूरच्या घराचा निरोप घेतला. मायापाश तोडून. जोपर्यंत शक्य होते, तोपर्यंत राहिली. अखेरच्या दिवसांत , कधीतरी संभ्रमावस्थेत,” मला तारापूरला जावयाचेआहे, न्याल का दोन दिवस तिथे”, असे शब्द ओठातून येत! घोलवडला, शरीर रूपाने राहिली मात्र मनाने तारापूर वाडीतच होती. तिची सर्वतोपरी काळजी घेणारे भाई व सरोज हतबल होते, तिची ती इच्छा पूर्ण करू शकत नव्हते..
राहते घर बदलणे म्हणजे नुसती वास्तु बदलणे नव्हे .त्यावेळी होणारी आंतरिक घालमेल व मनाची व्याकूळता माणसाला किती अस्वस्थ करते? माझी लेक दीप्तीने सांगितलेल्या आ च्या आठवणीत, खूप नेमक्या शब्दात त्याचे वर्णन केले आहे.तीने स्वतः आपल्या पतीच्या व्यवसाया निमित्ताने, भारतभर भ्रमंती करताना व वेगवेगळ्या शहरात वास्तव्य करतांना तेरा घरे बदलली. त्यामुळे,आ ने जेव्हा आपले तारापूर घर सोडले तेव्हा तिची अवस्था काय आली असेल याचे कल्पना चित्र उभे केले आहे,ते अतिशय सुंदर, हृदयस्पर्शी वर्णन तिच्या शब्दात..
त्यादिवशी आ च्या देहाला पाहून अनेक विचार माझ्या मनात रुंजी घालू लागले. एक कष्ट पूर्ण पण यशस्वी असे निरामय आयुष्य संपवून ती जणू शांत पहुडली होती. आयुष्यातील आसक्ती तिने फार पूर्वीच टाकली होती. तेव्हा तिची प्रकृती ठीक होती. सर्व मायेची माणसे आजूबाजूला होती. तिच्यावर जीवापाड प्रेम करणारी तिची मुले, तिला प्रेमाने, आदराने आणि तिचे मनापासून करणाऱ्या सुना ,तिच्या मायेचा आदर आणि मोल जाणारी नातवंडे,आणि तिच्या उबदार मिठी साठी आसुसलेली पतवंडे असे सारे गणगोत भोवताली असतानाही ती मात्र “त्या”च्या बोलण्याकडे डोळे लावून बसली होती. आयुष्य जगून झाले आता ..आता बोलावंणे यावे …अशी अनासक्ती, अलिप्तता दाखवू शकणारी रूढार्थाने अशिक्षित असणारी स्त्री सामान्य कशी असू शकेल?
पाच वर्षांपूर्वी तिचे तारापूर घर सोडले आणि ती घोलवडला भाई मामाकडे कायमची राहायला गेली.ज्या घरात पूर्ण आयुष्य गेले, जे घर अपरिमित कष्टाने ऊभे केले, ते सर्व आयुष्याच्या अखेरच्या वळणावर सोडताना तिला काय वाटले असेल? घर आणि ते कायमचे सोडताना होणारा भावनिक कल्लोळ ही माझी एक दुखरी नस आहे. माझ्या 20 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मी तेरा घरे बदलली. त्यामुळे प्रत्येक घराचा निरोप घेताना होणाऱ्या यातना सहन केल्यामुळे, माझ्यासाठी घर हा एक हळवा कोपरा आहे.
. आम्ही कामानिमित्त अनेक जागी स्थलांतरीत झालो .आणि प्रत्येक वेळी ही बदलीची प्रक्रिया घर शोधण्यापासून सुरू व्हायची आणि ते घर बंद करून सामान आवरून दुसऱ्या गावी नवा डाव मांडायला निघालो, की संपायची . त्या अनोळखी गावांत आमचा ऋणानुबंध जुळताना आमची स्वतःची जागा म्हणजे आमचे घर. मालकीचे नसले तरी त्या काळासाठी ते आमचे घर असायचे, जिथे आम्हाला अगदी घरा सारखे वाटायचे. ती आमची हक्काची विशेष जागा. या छोट्या काळांत बऱ्या-वाईट आठवणींची साक्षीदार ती वास्तू असायची. ते घर आमच्या मालकीचे नाही आणि कधीतरी सोडावयाची आहे, हे आम्हाला सुरुवातीपासूनच ठाऊक असायचे, आणि खरे तर अधिक उत्तम संधी साधून पुढील पल्ला गाठण्यासाठी आम्ही आतुर असायचो, पण तरीही जेव्हा अखेरचा दंडवत घालून मी त्या वास्तूतून पाऊल बाहेर टाकायचे .माझ्यातले काही तरी तिथेच त्या घरात राहून जायचे. घरांतून बाहेर निघणारी मी वेगळे असायची.कायमची बदललेली. थोडी ‘मी’ त्या घरात ठेवून आणि थोडे ‘ते घर’ माझ्यात घेऊन..त्यामुळे जेव्हा आणि तिचे उभे आयुष्य घालवलेले घर सोडले तेव्हा माझ्या काळजात काहीतरी खोलवर हलले.. “
“माझे आजोबा भाऊ आणि आजी आ ,त्यांच्या तरुणपणी एक महत्वाकांक्षी व धडपडणारे जोडपे होते.आपल्या घामाने त्यांनी माळरानावर नंदनवन फुलविले. झोपडीतून एका वाडेवजा घरात राहू लागले. दोघांनी ही गडीमाणसाबरोबर स्वतःही कष्टाची कामे केली.भाऊ एक नामांकित शेतकरी आणि गावातील प्रतिष्ठित असामी बनले . बालपणीचे त्या घरात घालवलेले दिवस आठवतात.आम्हा नातवंडांच्या सुट्टीचे, तारापूर मधील दिवस आठवले की आजही आनंदाच्या लहरी अंगातून निघू लागतात.आपल्या कामानिमित्त भाऊ टांग्यातून गावात फेरी मारायला निघत आणि आम्ही नातवंडे धावत पळत जाऊन टांग्यात गर्दी करत असू. रोज भाऊ बरोबर टांग्यातून फेरी ही असायचीच. आ,भाऊंचे त्या दिवसांतील ते घर, सदैव गजबजलेले असे. एकंदरीतच घरातील माणसे व गडी माणसे मिळून 25 एक तरी माणसे दुपारच्या जेवणासाठी असायची. ओसरीवर कडेने बसलेल्या माणसांच्या लांब लांब रांगा अजूनही मला आठवतात. कामगार ही कुटुंबाचे सदस्य म्हणून गणले जात असत.आम्ही गडी माणसांना मामा आणि मावशी अशीच हाक मारायचो. नातेवाईक मित्रपरिवार यांचीही कमी नव्हती.सर्व जाती-धर्माचे लोक भाऊंकडे येत असत.या सर्वाबरोबर आ चे वागणे मायेचे,आपुलकीचे आणि सौहार्दाचे असे. भाऊ संध्याकाळी शेतमाल बाजारात पाठविण्याच्या गडबडीत असत. प्रतवारी करून माल वेगळा करणे व गोण्या,करंड्या भरून,वजन करून शाईने नावे टाकून, गाडीत वा ट्रकमध्ये भरून पाठविणे हा मोठा कार्यक्रम चालू असे. पाहूण्यासाठी फक्त चहा पाणीच नाही तर काहीतरी खायला दिल्याशिवाय आ त्यांनी कधीच परत पाठवीत नसे. दूर जंगलातून पायपीट करत आलेल्या आदिवासी गरिबांना ही या दोघांनी कधीही जेवल्याशिवाय परत पाठविले नाही. नुसते जेवणच नव्हे तर प्रत्येकाला आपल्या वाडीतील फळे, भाज्या, फुले बांधून ही देणार.भाज्यांचे ढीगच्या ढीग ओटीवर पडलेले दिसत. मिरची, काकडी, तोंडली, टोमॅटो फ्लॉवर,कोबी ..साधारणपणे रोज एक ट्रक भर तरी वेगवेगळ्या भाज्या, भाऊ मुंबई,सुरत बाजारात पाठवीत असत. आ साठी तिचा स्वतःचा एक खास बगीचा होता. आणि त्यातील भाज्या, फुले विक्रीतून तिचा ‘बारोजा’ होत असे. हा पैसा, स्वतःच्या हौस मौजे पेक्षा, नातवंडांच्या कोड कौतुकासाठी वापरला जाई. तसे करताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान काही औरच असे! ती खुपच स्वाभिमानी होती, आणि म्हणूनच तिला स्वतःसाठी काही विशेष करावे असे वाटले नाही मात्र आपण इतरांसाठी काहीतरी करत राहावे हा तिचा अट्टाहास सतत राहिला”.
“फक्त माणसांनीच हे घर फुलले होते असे नाही. गाई गुरांनी भरलेला मोठा गोठा, पाळलेल्या मांजरी, कुत्रे, घोडे, राजहंस, बदके, खारुताई, पक्षी, मोरांची जोडी,माकड हरीणं सुद्धा तिथे होती, एक “मिनी झू” !विशेष म्हणजे बहुतेक प्राणी जंगलात अनाथ झालेले अथवा वणव्यात होरपळलेले असत. जंगलातून येणारे आदिवासी त्यांना आ कडे घेऊन येत. त्याच्या मोबदल्यात त्यांनाही काही तरी मिळे. प्राण्यांचेही प्रेमाने संगोपन होई . प्रत्येक प्राणी तिच्या लाडा कोडाचा आणि त्यांच्याही आवडीनिवडी ती पूर्ण करीत असे त्यांना खास नावे देऊन..”
“काही वर्षांपूर्वी त्यांच्या गोधनाने भरलेल्या गोठ्यावर अचानक वीज कोसळली आणि क्षणांत सारे होत्याचे नव्हते झाले. फक्त एक नंदी नावाचा बैल जखमी अवस्थेत वाचला. आ ला मोठा धक्का होता पण ,अधू झालेल्या नंदीची मात्र तिने शेवटपर्यंत प्रेमाने सेवा केली.
हळू हळू कालौघात दिवस बदलले, भाऊ गेले, आजूबाजूच्या औद्योगिक वसाहतीमुळे घातक विषारी रसायने पाण्यात मिसळली गेली, पाणी खराब झाले,जमिनीचा कस कमी होऊ लागला आणि शेती करणे कठीण होऊ लागले . कामाला माणसेही मिळेनात.पण उपलब्ध पाणी साधने आणि एकदोन माणसे यांच्या आधारे आ ची शेती चालूच होती. तिचा एकांडा शिलेदार महादू मामा, त्याच्या साथीने आपला मळा फुलता ठेवला.”
” माझी आई, तिची लेक. कधी त्या दिवसात तिला भेटावयास गेले की माझ्या साठी माझ्या आवडीची खूप सारी फुले, जांबू ,आर्यन साठी पपनस, क्रिशा साठी कम्रख, बाबांसाठी वालाच्या शेंगा ,आणि प्रशांत साठी गावठी कोंबडी असा प्रत्येकाचा आवडीचा खुराक पाठवीत असे. आपली सात मुले, त्यांचे जावई ,सुना, नातवंडे , नातजावई, नात सुना आणि पतवंडे या प्रत्येकाच्या आवडीनिवडी तिला कशा आठवणीत राहात आणि त्या पूर्ण करण्यासाठी ती काय काय करत राहिली, हे आज जाणवले की मी नतमस्तक होते!! मात्र हळू हळू हे तिला सर्व सांभाळणे कठीण होत होते, शरीराची साथ मिळत नव्हती, पण जेवढे करता येईल तेवढे ती जिद्दीने करत राहिली . आणि..आणि एक दिवस अचानक जेवत असताना ती कोसळली, बेशुद्ध पडली .मामा घोलवडहून धावत आला, तिला तातडीने इस्पितळात भरती केले. शुद्धीवर आल्यावर तिने प्रथम काय करावे? मुलांना म्हणाली,”मला म्हातारीला जगवण्यासाठी कशाला इतकी यातायात करीत आहात? ही धावपळ करताना तुम्हाला काही झाले तर? जणू ती सांगत होती,
“गुंतुनी गुंत्यात साऱ्या,पाय माझा मोकळा।
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा।।”
त्या विस्तीर्ण घरात तिने एकटे राहणे पसंत केले.” जेव्हा, मी सांगेन तेव्हाच इथून मला घोलवडला न्या !”,हे तिने निक्षून सांगितले.त्या घरात तिचा एकटीचाच वावर सुरू होता. शांतपणे बागेत ही एकटीच बसलेली असे. ते दृश्य पाहतांना आम्हाला खूप वाईट वाटे. ज्या बागेत रोज टनाने भाज्या पिकविलेल्या, ती बाग हळूहळू उजाड होऊ लागली. परिस्थितीत जमीन-अस्मानाचा बदल झाला. पण तिने हसत हसत, हळहळ व्यक्त न करता तो बदल स्विकारला .ती सतत प्रसन्न असायची. महादू मामा व घरकामासाठीची, मुलगी यांच्या मदतीने शांतपणे रोजचे व्यवहार सुरू होते. जमेल तेवढी लागवड चालू होती. महादू मामाच्या मृत्यूनंतर मात्र तेथे एकटीने राहणे तिला अशक्य होऊ लागले. तरीही काही दिवस,अगदी एकटीने त्या घरात काढले. रात्री झोपण्याची वेळी श्रद्धाची सोबत तिला मिळाली ,त्यामुळे एकटेपणा थोडा सुसह्य झाला असेल . त्या दिवशी,ती चक्कर येऊन पडल्या नंतर मात्र घर बंद करण्याचा निर्णय तिलाही घ्यावाच लागला. तिच्या व आम्हा सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे पर्व त्या दिवशी संपले..”
“एक दोन वर्षाच्या वास्तव्यात मी जर एखाद्या वास्तूत इतकी गुंतत असेन तर या वास्तूत तिची मूळे किती खोलवर गुंतली असतील? या भिंतीच्या प्रत्येक विटेत तिची एखादी आठवण दडलेली असेल. तिच्या तारुण्यातील, तिच्या मुलांच्या बालपणाच्या, आम्हा नातवंडांच्या लहानपणीच्या आणि पतवंडांच्या लडिवाळ बागडण्याचे कितीतरी क्षण तिथे गोठले असतील.ह्याच ठिकाणी तिने आणि तिच्या जीवन साथीदाराने एक भव्य स्वप्न बघितले,स्वकर्तृत्वाने ते सत्यात आणले. धन-दौलत यांच्या शिखरावर पोहोचले. आणि वयोमानापरत्वे आलेले एकटेपण ही अनुभवले.प्रत्येक टप्प्यावर तिने तिची नम्रता, सहृदयता,आणि स्व प्रतिष्ठा जपली. आब राखली. त्या घरांतील शेवटच्या रात्री तिला झोप लागली असेल का बरे? तिने त्या नीरव शांततेत त्या भिंतीशी काय हितगूज केले असेल? उंबरठा ओलांडून बाहेर पाय टाकताना तिने मनाची घालमेल कशी शांत केली असेल? गाडीने वेग घेतांना तिने तिच्या उध्वस्त साम्राज्य कडे मागे वळून नजर टाकली असेल का ?मला असं वाटतं की ,माझ घर सोडतांना,माझा एक छोटा अंश त्या घरात मागे राहतो… मला वाटते ती एक छोटा अंश घेऊन निघाली, बाकी ती त्या घरातच राहिली… कि ,ती त्या घरापासून केव्हाच अलिप्त झाली होती, आणि अखेरच्या निवासाच्या निमंत्रणाकडे डोळे लावून होती? नेहमीच्याच निरामयतेने !नावाप्रमाणे अलिप्त…” कमळ “,,
माझ्या परमप्रिय ‘आ’जी ला येथूनच त्रिवार वंदन”.. ?
आ बरोबर प्रत्येक भेटीत, प्रत्येकालाच मुग्ध निखळ हास्य आणि नजरेतून ओथंबणारी संजीवनी प्राप्त होई. मला भेटीनंतर निरोप घेताना,, गेल्या काही वर्षापासून ,एक देणगी मिळे. एरव्ही दोन हात जोडून नमस्कार करणारी आ, माझ्या हातांची ओंजळ स्वतःच्या हातात घेऊन माझ्या करतलांचे एक हलके चुंबन घेई. मला भरून येत असे, डोळे ओले होत असत.हे कशासाठी? तिला नक्की काय सांगावयाचे आहे, कळले नाही .आज ती नसताना, विचार करतांना मला थोडासा उलगडा झाला आहे असे वाटते…
‘करतल ‘ म्हणजे हाताच्या तळव्यावरील शरीराचा लहान भाग.
करतल म्हणजे ओंजळभर !
खूप तहान लागली आणि ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते.
ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.
आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते, वात्सल्याचा सुगंध आणि शुभाशीर्वादांची प्राप्ती..
संकटकाली कोणाला धीर देतांना,नुसते त्याचे दोन्ही करतल आपल्या दोन्ही करतलांनी घट्ट धरले तर समोरच्याला किती मोठा दिलासा मिळतो हे आपण आयुष्यात अनुभवतो, ते शब्दांत सांगणे कठीण..
दोन्ही करतल एकत्र केले की होतो नमस्कार.समोरच्याचे मन जिंकायला दोन करतल पुरेसे आहेत..माणूस, शेवटी देवाकडे पसाभर सुख आणि कृपादृष्टीची मागणी करतो ना?
बाप रे… केवढे महत्व आहे ह्या ‘ओंजळस्पर्शाचे’.. त्यावर हलके चुंबन म्हणजे, ‘सोने पे सुहागा’!प्रिय व्यक्तीकडून जर हे दान सहज प्राप्त होत असेल तर, त्याहून भाग्याची गोष्ट कोणती? अगदी काल पर्यंत असां शुभाशिष वर्षाव आम्हावर आ ने केला.,, ज्ञानेश्वर माऊलीने सबंध विश्वासाठी,’पसा’यदान मागितले आणि आम्हाला हे दान आ ने प्रत्यक्षात दिले …मी तिचा नेहमीच उपकृत राहीन,आजन्म!
वर्षा (सई),आ ची ज्येष्ठ कन्या शकुन ताई ची मुलगी.. तिचे बालपण आ भाऊंच्या सान्निध्यात गेले . ती तारापूरलाच राहिली. तोच कालखंड आ,भाऊंच्या ऐन कर्तृत्वाचा व बहराचा होता. त्यामुळे सई त्या काळाची अगदी जवळची साक्षीदार आहे.मी आठवणी लिहितो कळल्यावर तिनेही मला काही आठवणी पाठविल्या,त्या तिच्याच शब्दात…
“आज पर्यंत सर्वांना भाऊंच्या कर्तृत्वाची जाण आहे, मात्र त्यामागील शक्ती आई आहे, हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. त्या स्त्रीशक्तीचे वर्णन मी कसे करू? आयुष्यात जी जी भूमिका तिने वठविली, पत्नी, आई, आजी, काकी, मामी, आत्या मावशी, वहिनी, सासू इत्यादी अगदी उत्कृष्टरित्या पार पाडली. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिची धावपळ मी पाहिली. आजही ते दिवस आठवून अंगावर शहारे येतात. भाऊंना डायबिटीस होता .उजाडल्यापासून ते झोपेपर्यंत त्यांना द्यावयाच्या औषधांची जंत्री आईकडे असे व वेळेनुसार ते भाऊंना देत रहाणे हे तिचे काम असे. बिन साखरेचा चहा, मिक्स पिठाची भाकरी, विशिष्ट लोणचे, ठराविक प्रकारचा आहार भाऊंसाठी असायचा. काही काढे स्वतः बनवी. आईचे संपूर्ण नियंत्रण भाऊंच्या पथ्य पाण्याकडे असे .
भाऊंच्या गाव फेरीमध्ये, गावातील राजकारण आणि समस्या, यामुळे ताण-तणाव होत असत. घरी आल्यावर सर्व राग आईवर निघे. त्यात काही आईचे नातेवाईक ही जबाबदार असत. मग ते सर्व आईला ऐकावे लागे. भाऊंना बरोबर साडेबाराला जेवण लागत असे ,बारा वाजता वाडीतील सर्व मजुरांना जेवणासाठी हाक मारावी लागे, ही सर्व तयारी आई करीत असे. भाऊंच्या सर्व आवडीनिवडी नुसार जेवण बनवून ठेवणे, आयत्यावेळी भाऊंनी आणलेले मासे, मटण,चिकन ,इत्यादी तयार करणे,ती अगदी बिनबोभाट करीत असे. विशेष म्हणजे तेव्हा ती स्वतः शाकाहारी असूनही भाऊंच्या सर्व बिन शाकाहारी फर्माईश आवडीने करीत असे.
एवढ्या कामात तिला दोन वाजेपर्यंत निवांतपणा नसे. दोन वाजता मजुरांना पुन्हा कामावर लावायची गडबड असायची. भाऊही दुपारची झोप घेऊन उठायचे.भाऊंना चहा लागायचा, मजुरांचा चहा असायचा,म्हणजे तिला आराम असा नव्हताच. आई वाडीत फेरफटका मारीत असे. मात्र भाऊंच्या लागवडीत ती जास्त लक्ष द्यायची नाही. तिची आपली स्वतःची ,केळी व काही भाजीपाला लागवड असे. शेवग्याच्या शेंगा, नारळ, फुलझाडे असा तिचा आपला छंद होता. यातील उत्पन्न तिची स्वतःची कमाई होती. भाऊंनी तिला यात कधी विचारले नाही. याच पैशातून तिने आपले छंद आवडी निवडी जोपासल्या, हौस मौज भागविली.”
तिला वेगवेगळी पक्वान्ने देखील करायची आवड होती. लाडू, श्रीखंड, सत्व, नारळी वड्या, पुरणपोळी, गोड वडे गुळपापडी, कढी, केळीच्या पानातलीची भाकरी, इत्यादी सर्व गोष्टी ती अतिशय सुंदर रीतीने आणि मन लावून करीत असे. घरचेच दूध दुभते असल्याने तूप अगदी भरपूर असे. तूप बनविल्या नंतर जो खाली चोथा उरतो तो साखर टाकून आम्हाला खायला द्यायची. ते खाण्यासाठी माझी आणि शिरीष मामाची भांडणेही व्हायची. तिचं घर नेहमी दूध,दही, लोणी ,श्रीखंड इत्यादींनी भरलेले असायचे.आपण लावलेले दही कधी घट्टहोत नाही पण तिचा हातच एकदम परफेक्ट, आणि तेवढेच दही श्रीखंड देखील परफेक्ट होत असे .लोणची तर किती प्रकारची येत असत? आज देखील मला विविध रंगांच्या फडक्यांनी बांधून ठेवलेल्या लोणच्या च्या बरण्या आठवतात. आंबा, लिंबू , भोकर, कारली, कोलंबी कोलीम… अनेक प्रकार !”
महत्वाचे काम म्हणजे कारली, पडवळ, गलका, दुधी,भोपळा, शिराळे, काकडी अशा अनेक प्रकारच्या बिया पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी धूवून, सुकवून बाटलीत व्यवस्थित भरून ठेवलेल्या असायच्या. एवढे करून पाळीव प्राण्यावरही तिचा खूप जीव. त्यांचे साठी ही वेळ देत असे. गाई, म्हशी, कोंबड्या यावर तिचे प्रेम! सांबर, बदक, मोर, ससे, पोपट, हंस असे प्राणी तिने पाळले. तिचा हा संग्रह पाहून कुणी तरी जंगलातील वणव्यात सापडलेले एक हरिणाचे पिल्लू, एक माकडाचे पिल्लू तिला आणून दिले होते. बाटलीने दूध पाजून त्यांना वाढविले होते. हे मुके प्राणीही तिला प्रेम देत हे आम्ही पाहीले आहे.
ती खूप देवभक्त पण होती. भाऊं नास्तिक होते मात्र तिची देवपूजा चालवून घेत. तिचे देवघर केवळ तिचे होते. देवाच्या खोलीत तिचं अस्तित्व! रोज हार फुले वाहून पूजा चाले.. रात्री टीव्ही पाहताना हे हार बनवित असे.”
” तिच्या हातून खाल्लेल्या काही भाज्यांची चव जिभेवर आहे. विशेषतः सोडा व सुरण भाजी अप्रतिम होत असे. शतावरीच्या कोवळ्या देठांचे सूप तर तिच्या हातचेच प्यावे! दुधी हलवा, गाजर हलवा, डांगर नारळ वडे, तरफळाचे वडे, रताळ्याचा शिरा, साबुदाणा खीर, नाचणी सत्व, इत्यादी पक्वान्नं ज्यांनी तिच्या हातून खाल्ले आहे ते त्याची चव कधीच विसरणार नाहीत. ती जातीवंत सुगरण होती. दुसऱ्यांच्या आवडीनिवडी जास्त जपायची. कोणाला काय आवडते त्याकडे तिचे बारीक लक्ष असायचे. ज्या दिवशी तिचे जावई येणार असतील त्या दिवशीची तिची लगबग बघण्यासारखी असायची. त्यांच्या आवडी निवडी प्रमाणे जेवण बनविण्याची तिची धडपड असे. त्या साठी सर्वांना कामाला लावीत असे. आदरातिथ्य करणे तिला आवडे.”
“सोशिकता परकोटीची. तिच्या सहनशिलतेची एक घटना मुद्दाम सांगते. एकदा दुपारी काही झाडे लावत असताना, तिच्या पायाच्या बोटात पहार घुसली आणि नस तुटली. रक्ताची चिळकांडी उडाली. तसेच हाताने बोटे घट्ट दाबून ठेवून बराच वेळ ,तोंडातून एक शब्दही न काढता बसून राहिली.गिरजा काकूने ते पाहिले. काही झाडांचा पाला वगैरे आणून रस टाकून रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला, पण रक्त थांबेना. रक्ताच्या गुठळ्या बाहेर पडत होत्या. मी पाहत होते पण काहीच करू शकत नव्हते. आजही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर शहारे येतात. शेवटी रक्त थांबेना तेव्हा तिला डॉक्टर कडे नेले आणि इंजेक्शन देऊन रक्त थांबवले. खूप मोठा कठीण प्रसंग होता तो …”
” आईच्या आठवणी मी किती सांगू? मी नशीबवान माझे बालपण तिच्या छत्रछायेखाली गेले. एक चांगली सुगरण ,कर्तबगार, सहनशील प्रेमळ, कर्तृत्ववान अशी ही आजी. त्या दिवसात मी तिच्या वात्सल्याचा, मायेचा, प्रेमाचा अनुभव घेतला.. त्या आठवणींनी आजही डोळ्यात पाणी येत. तिच्या या आठवणी माझा आनंदाचाठेवा आहे. माझ्या आजीच्या स्मृतींना प्रणाम करते. मला दिलेल्या अमाप प्रेमाबद्दल,तिची कायमची ऋणी राहते”
सईच्या या आठवणींना खूप महत्त्व आहे, कारण आई भाऊ यांच्या ऐन कर्तृत्वाच्या कालखंडात ती त्यांचे जवळ होती, त्या दिवसांची साक्षीदार होती.
अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मुलभूत गरजा आहेत. तशाच प्रेम, वात्सल्य, स्नेह, आपुलकी याही मूलभूत भावनिक गरजा आहेत. या गरजांच्या पूर्ततेच्या प्रयत्नातून भावभावनांचे, नात्यागोत्यांचे, गुंतागुंतीचे अनेक भावबंध जोडले जातात. ऋणानुबंधांच्या गाठी पडतात. ऋण म्हणजे कर्ज. त्याची व्याजासहित परतफेड करणे आलेच. पैशापेक्षा वेगळ्या स्वरूपात हे ऋण जमेल तसे, जमेल तेव्हा परत करायचे असते. खरंतर ऋणात राहण्यातही आनंद असतो. आम्ही सगळे आ च्या सदैव ॠणात रहाण्यातच आनंद मानू. असे ऋणानुबंध हवे हवेसे वाटतात.
आ बरोबरचे, माझे नाते अशा ऋणानुबंधाचे होते.ज्यांच्याशी आपले असे ऋणानुबंध असतात, ती व्यक्ति जेव्हा आपल्याला कधीभेटते, तेंव्हा तो आपल्यासाठी सर्वोच्च भाग्याचा क्षण असतो. आठवणींची ठेव मर्मबंधाच्या कुपीत अलवारपणे निश्चित जतन होते., किंबहुना ऋणानुबंधाच्या ह्या भेटी आपल्याला आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत जीवनातील संकटाच्या हरेक घडीत, जगणं सुसह्य करतात. आ बरोबर व्यतीत केलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण,आमचे भावी आयुष्य, आज ती या नश्वर जगात नसली तरी, सुखी-समाधानी करील, याची मला खात्री आहे.
सर्वस्व समर्पण हे आ, भाऊंच्या जीवनाचे सूत्र होते. ते सतत जपण्यासाठी,संपूर्ण आयुष्यात त्यांनी अविचल निष्ठा बाळगली. त्यांचे हात सदैव शुभंकर आणि सर्जनशील राहिले. एक पाय संसारात आणि दुसरा पाय काळ्यामातीत, असताना निर्मितिशीलता भंगू दिली नाही. कोणत्याही प्रकारचा कडवटपणा त्यांच्या अंतरंगाला स्पर्श करू शकला नाही. ‘पद्मपत्रमिव अम्भसा’ ,पाण्याने पद्म पत्र ओले होत नाही, असेच आ च्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करावे लागेल. या ‘कमळा’ची प्रत्येक पाकळी टवटवीत आणि मृदू स्पर्शाची होती. मात्र आता ” हा हंत हंत नलिनी ..”असे झाले. कालपुरुषाच्या करणीने ..आता ते ‘कमल’,कायमचे निमाले आहे.. कालाय तस्मै नमः ‘कमला’य तस्मै नमः..
ते कमलपुष्प .. पुन्हा कधीच उमलणार नाही,.. मात्र त्याच्या स्मृतीचा मंद सुगंध आम्हा भोवती सतत दरवळत राहो, ही देवाकडे प्रार्थना. आ च्या पवित्र स्मृतींला नम्र प्रणाम
आ आम्ही तुझे सदैव ऋणी राहू. ।।
========***========
माझी ‘मोर आजी’ …. बाबांची मावशी , पण माझ्या जन्माच्या ११ महिने आधी माझी आजी ‘बाय’ वारली, ती गेली, आणि काही दिवसातच आईच्या पोटात माझी चाहूल लागली, बायच्या वर्ष श्राद्धाच्या दूसऱ्या दिवशी माझा जन्म झाला … आणि बाबांच्या सर्व मावशी मला अगदी प्रेमाने “रमा ताई” हाक मारू लागल्या…. ते प्रेम , ती माया, तो ओलावा मला सर्व मावशी आजींकडून कायमच लाभला. तारापूरला ताई आत्याच्या घरी जाताना पहिला स्टॅाप मोर आजीचा …. आणि ती कित्ती प्रेमाने खाऊ द्यायची … कोण तो आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडायचा ! माझे कॅालेज मधले साडी डेज , नाटकांच्या तालिमी असल्या की नऊवारी साडी फक्त फक्त मोर आजीचीच, आणि भाऊ त्यानंतर आठवणीने फोटो काढायला सांगायचे, शिवाय तो त्यांना दाखवायला गेले की पोटभरून कौतुकाची थाप मिळायची… ही पिढी जिने आम्हांला भरभरून माया दिली, ती हळू हळू काळाच्या पडद्या आड जाऊ लागली, कालाय तस्मै नमः …. ती प्रेमाची शिदोरी आयुष्यभर पूरेल हे नक्की
“आ” च्या स्मृतींना सादर प्रणाम ???
“ आ” आम्हाला पण आजी सारखीच . तारापूर ला गेलो की एकदम मायेने चौकशी करायची. खूप प्रेमळ .
आजी म्हणजे मनातील हळवा कोपरा… दिप्ती आणि सई च्या आठवणीं मधुन त्यांचे तिच्यावरील प्रेम जाणवते.
“आ” चे अस्तित्व सर्वांच्या मनांत असेच तेवत राहो. ???
आ ” वर लिहिलेला एक भावनापूर्ण व हृदयस्पर्शी उत्कृष्ट लेख .
त्या जाण्याच्या दोनच दिवस आधी आम्ही उभयता त्यांना भेटण्यास गेलो होतो . बोलता येत नव्हते . संपूर्ण अनासक्त व समाधानी मुद्रेने स्मितहास्य करून दोन्ही हात जोडून त्यांनी केलेला नमस्कार आज आठवला की त्यावेळी आम्हांना पुसत देखील कल्पना आली नाही की ह्या दोनच दिवसांच्या सोबती आहेत . त्या समाधानी जीवन स्थितप्रन्ह्या प्रमाणेच जगल्या व जगता जगता दुसऱ्यांच्या सुखदुःखांत समरस झाल्या .गडी माणसे , पशुपक्षावर प्रेम करू शकल्या .मला वाटते बा . भ . बोरकरांच्या एका कवितेत म्हटल्या प्रमाणे ” जीवन त्यांना कळले हो , मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहज पणाने गळले हो “.
संस्कार हे आईबापांकडून येतात , शिक्षणाने सुसंस्कृतपणा येतो .पण त्यांच्या बाबतीत शिक्षण नसतांना सुद्धा दोन्ही गोष्टींचा झालेला सुंदर मिलाफ हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल आणि हे तेंव्हाच शक्य असते जेव्हा ज्यांचा स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास असतो .
श्रीदत्त (नातू ) च्या जन्माच्या वेळी घडलेली गोष्ट .आप्पांचा (माझे वडील ) मुक्काम चिंचणीला होता .मंदाला बाळंतपणासाठी सुतिका गृहात दाखल केल्याचा वासूभाऊंचा आप्पाना निरोप आला म्हणून मी व आप्पा तेथे पोहचलो व बाहेर असलेल्या बाकावर बसलो .भाऊ तेथे आमची वाट पहात अस्वस्थपणाने सारखे आंतबाहेर येरझरा घालीत होते .एकदम बाहेरयेत ते आनंदाने म्हणाले “आप्पा , नातू झाला .ते आनंद साजरा करतायेत तेवढ्यांत थोड्यावेळाने “आ ” बाहेरयेत म्हणाल्या , “डॉक्टर म्हणतात अद्याप वेळ लागेल , मंदा लेबर रूम मध्येच आहे . भाऊ खजील होत म्हणाले , “मी तर नातू झाल्याचे आप्पाना सांगून टाकले “.आप्पा त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले ,”गुरुदेव दत्त !नातूच होणार !काळजी करू नका “.आ आनंदाने म्हणाली ,” अप्पांचे म्हणणे च खरे होणार असे माझे मन मला सांगते “.व तिने भाऊनां पेढे आणण्यासाठी पिटाळले .त्याचे असे झाले होते की सूतिकागृहातल्या मंदा नांवाच्या दुसऱ्या बाईला मुलगा झाला असे नर्स ने त्यांना सांगितले पण पुढचे म्हणणे न ऐकून घेताच घाईघाईने बाहेर येऊन त्यांनी हा गौप्य स्फोट केला .भाऊ पेढे घेऊन आल्यानंतर बऱ्याच वेळाने आ बाहेर येऊन तिने मंदाला नुकताच मुलगा झाल्याची खबर दिली व भाऊंनी नि:स्वास सोडला .
आ च्या बाबतीत शेवटी एकच म्हणावेसे वाटते .
“असा जन्म लाभावा !
देह चंदन व्हावा !
गंध संपला तरी !
सुगंध दरवळत राहावा !
शिक्षण आणि कर्तृत्व ह्याचा अर्थोअर्थी संबंध नाही हे ‘आ ‘ च्या वर्णनाने सिद्ध होते. अतिशय सुंदर, समर्पक असे स्वभावाचे पैलु उघडून दाखवत एखादी व्यक्ती घर कसे बांधून ठेवते आणि योग्य वेळ येताच त्यातून स्वेच्छेने निवृत्ती घेणे हे माणसाची प्रगल्भता दाखवते. धन्य ते पतिपत्नी आणि त्यांचा प्रेमाने वाढवलेला गोतावळा. एका तृप्त जीवनाची सुंदर ओळख म्हणजे हा लेख.
आपल्या जन्मदात्या आई प्रमाणेच भाई आपण सासू बाईंना मोठया मनाने आई मानता. तिचे भरभरून कौतुक करता.खरंच आपली सासूबाई म्हणजे भाऊंच्या घरातील एक साक्षात लक्षमीच्या रूपात अदृश्य स्त्री शक्ती होती. म्हणूनच भाऊंनी हे सारे वैभव निर्माण केले. भाई हे लिखाण करून आई समान सासूबाईना आपण आदरांजली वाहिली आहे. असे फार कमी जावई असतात. राहवत नाही म्हणून भावनाविवश होऊन आपण हे लिखाण केले असावे. आपल्या प्रेमपूर्वक भावनेला सलाम!!???
खूपच सुरेख
खूप उच्च शिक्षित ,उच्च पदापर्यंत जाउन सुद्या आपल्या कुटुंबाला कसे प्रेमाने बांधून ठेवायचे हे तूझ्या कडून तू दाखवून दिले आहे .त्या करीता खुप खुप धन्यवाद ..मला पण माझ्या लग्नाची पहिल्या भेटीची आठवण झाली?
बंधू,ज्यांना तुम्ही सगळे आ म्हणत होता त्यांना मी लहान असल्या पासून ओळखत होते. कारण ती ( एकेरी नावाने उल्लेख करते क्षमा असावी).माझ्या आईची बालमैत्रिण. माझे आजोळ तारापूरला. आईबरोबर मामाकडे चालत जाताना त्यांचे घर आले की आई थांबायची मग ती आईशी गप्पा मारायची, आणि निघायच्या वेळेस ती म्हणजे मावशी मला बिस्किट किंवा 5 पैसे द्यायची चणे खायला. मग घरी परत जातांना त्याचे चणे घेऊन घर येईपर्यंत ते संपायचे.
ती मावशी इतकी महान आणि कर्तृत्ववान स्त्री होती ते मात्र आजचा लेख वाचून कळले.
झाडा पानापासून ते अगदी आजारी व्यक्तीपर्यंत लक्ष ठेऊन त्यांची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणारी मावशी आजच्या जगात मिळणे अशक्य.
त्यांना ज्या पद्धतीने पुनर्जन्म मिळाला तो प्रसंग अतिशय अद्भुत आणि काधीही न ऐकलेला.
मला वाटते त्याच प्रसंगातून त्यांना एक दैवी शक्ती प्राप्त झाली असावी. आणि त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व इतके बहुगुणी आणि सुसंपन्न झाले असावे.
त्यांच्यातले ते वेगळेपण लहान असताना देखील मला जाणवले होते. म्हणून मी आईला म्हणायचे तू पण ह्या मावशी सारखी असायला पाहिजे होतीस. आज हा लेख वाचून आपण आपल्या आईची तुलना दुसर्या एका महान आईशी केली होती ते चुकीचे नव्हते हे मनोमन पटले.
लहानपणी मामींबरोबर तारापूर ला गेले होते, नंतर काही निमित्ताने ज्या भेटी झाल्या तेव्हा त्यांचे प्रेमळ हास्य, आस्थेने केलेली चौकशी, आवर्जून काही सांगणे अजूनही आठवते.
त्यांचा गोतावळा, सर्वांची च ‘ आ ‘ असणे, काळ्या मातीची सेवा, मुलाफुलांचे संगोपन, सगळ्यांना जमेल तशी मदत करणे खरोखर एक आगळे व्यक्तीमत्व होते ते.
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ही च त्याची जीवनशैली होती. सुफळ संपूर्ण जीवन त्या जगल्या. बंधुमामा, मामी, दीप्ती व सई यांच्या मुळे अनेक हृद्य आठवणींना उजाळा मिळाला.
आजींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन
???
मंदा ताई ,
वाचून डोळे भरून आले . अणि माझ्या आईची खूप आठवण आली. असो.
मोर मावशी कडे अनेक गुण होते.
प्रचंड सावधता , वैचारिकता , उत्तम निर्णय शक्ती , सामाजिक आकलन , स्वावलंबन , आत्मविश्वास ,असे अनेक.
आनंदी राहण्याचा अर्थ असा नाही की सर्व काही चांगले आहे
याचा अर्थ असा आहे की , तुम्ही तुमच्या दुःखा पेक्षा. उंच होऊन जगणं शिकलात .
हे मोरमाशी कडून शिकावं .
सुख वाटणारया लोकांकडे समाधान. स्वताहून चालत येत . असे अनेक गुण आहेत. खूप आठवण आली ..
ठीक आहे आवरतं घेते .
???
लेख बहु सुंदर
मावशीच्या या स्वभावाचे सगळे पैलू मी जवळून अनुभवले आहेत
म्हणूनच मला मनोमन पटले
कायमस्वरूपी आठवणीत राहणारी व्यक्तिमत्व त्यातील एक विजू ताई
मावशीला माझा सादर प्रणाम??
आत्यांजी, तुमचा ‘आ’ वरचा लेख अतिशय हृदयस्पर्शी आहे.. तुम्ही सगळ्यांनीच आ च्या आठवणी, अनुभव खूप छान सांगितले आहेत. माझे वडिल (मनोहरभाई) त्यांच्या ह्या प्रेमळ, कर्तुत्ववान मावशीबद्दल बद्दल नेहमी सांगायचे.. ह्या लेख वाचून आ च्या थोर व्यक्तीमत्त्वाबद्दल सविस्तरपणे माहिती मिळाली. आ चा प्रेमळ, पवित्र स्मृतीस माझे त्रिवार वंदन.
राऊत साहेब/वहिनी
सप्रेम नमस्कार,
तुमच्या ‘आ'(सासूबाई/आई) स्वर्गवासी झाल्या, वाचून दुःख झाले. परमेश्वर आत्म्यास शांती देवो. तुमच्या लिखाणातून त्यांच्या बद्धल आपुलकी, माया, प्रेम सर्व भावना व्यक्त झाल्या आहेत. कोणी संतांनी भगवंता साठी म्हंटले आहे की ‘ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ‘हे अगदी खरे आहे असे तुमचा लेख वाचून वाटले.
मी तर म्हणतो देव/ परमेश्वर ही तर संकल्पना आहे. त्याला मीच नव्हे तर कोणीही पहिला नाही.
आणि जर तो खरोखर असलाच तर त्याची प्रतिमा आई पेक्षा वेगळी असूच शकत नाही.
वहिनीचे सांत्वन करायला शब्द नाहीत. तुम्ही माझ्यासाठी कुटुंबीय आहात. तुमची अमूल्य उणीव भरून काढण्यासाठी देव तुम्हाला शक्ति देवो ही प्रार्थना.
ओम शांती ??ओम शांती ???
हया आपल्या पूर्वजांनि कूठे घेतल्या होत्या मोठया पदव्या …?
परंतु त्यांच्याकडे असलेले
सामाजिक भान- कौटुंबिक जबाबदारीची जाणिव मला वाटत हे सर्व त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा भाग असावा.
आपण हया पूर्वजाबद्दल अभ्यासपूर्ण करित असलेले लेखन नक्किच स्वागतार्ह आहे.
आपल्या ‘आ’ च्या दोन्ही पुनर्जन्माच्या घटना हया ज़बरदस्त इछ्याशक्तिचे उदाहरण आहे.