कै. भायजी जगू राऊत – कर्तृत्व, दात्तृत्व व नेतृत्व

     ज्ञान-कर्मसमुच्चय आणि आध्यात्मिक-अधिभौतिक जीवनाचे परस्परपूरकत्व ही दोन अतिशय महत्त्वपूर्ण तत्त्वे ईशोपनिषदात विशद करून सांगितली आहेत. अनासक्त राहून केलेले संसारिक कर्म हे बंधनकारक न ठरता उलट ईश्वर प्राप्तीचे माध्यम ठरते, असेच म्हटले आहे . निष्काम कर्मयोगाच्या मूलतत्त्वाचा प्रथमपुरस्कार ईशोपनिषदामध्ये दिसतो.

               ईशा वास्यमिदं सर्वम्। यत्किंच जगत्यां जगत्॥

               तेन त्यक्तेन भुञ्जीथा। मा गृधः कस्यस्विद्धनम्॥ ईशावास्य उपनिषद

    हे सर्व जग ईश्वरमय असून त्याचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. हा त्याग हा जीवनाचा नसून तो अहंकाराचा व स्वार्थाचा आहे. वरवर विरोधाभासी, गूढ, परंतु नेमक्या शब्दांमधील वर्णन हेदेखील या सुक्ताचे  वैशिष्ट्य आहे.

   व्यवहार आणि तत्त्वज्ञानाचा अतिशय सुंदर मिलाप ईशोपनिषदात दिसतो. केवळ कर्म (अविद्या) किंवा केवळ ज्ञान (विद्या) यांच्याद्वारे सर्वोच्च श्रेयस प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी दोन्हीचा समुच्चय असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपनिषदांनी केलेले दिसते. जो साधक अशाप्रकारे, दोन्ही एकाच वेळी जाणतो, तो साधे सामान्य संसारिक जीवन जगत असून देखील महत्पदी पोहोचतो, अगदी अमरत्व पावतो, असेच आपली उपनिषदे म्हणतात…

  ज्या आमच्या भारत देशात हे उपनिषद निर्माण झाले तो, अशा अनेक उपासकांची खाण आहे. महाराष्ट्रातही अशा नररत्नांची वाण नाही. आमच्या  सोमवंशी क्षत्रीय समाजात ही अनेक सेवाभावी नरपुंगव  निर्माण झाले. सो. क्षत्रीय संघाचे एक आद्य संस्थापक, समाजसेवक, दानशूर उद्योगपती कै.भायजी जगु राऊत हे त्यापैकी एक होत!  सुमारे दीडशे वर्षापूर्वी, वसईत जन्मलेल्या भायजींचा  जीवन प्रवास असाच अद्भुत व थक्क करणारा …’ ईशा वात्स्यम..’  हे उपनिषदातील तत्वज्ञान, प्रत्यक्षात जगणाऱ्या माणसाचा प्रत्यय आणून देणारा… म्हणून आज त्यांच्याविषयी कांही!

     भायजींनी स्वकर्तृत्वाने अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय  संस्थांसाठी आपले योगदान दिले. प्रसंगी  घवघवीत आर्थिक साहाय्य केले. तत्कालीन इंग्रज सरकार तर्फे तालुका व जिल्हा लोकल बोर्डावर प्रतिनिधित्व करून, प्रसंगी शेतकरी बांधवांना  न्याय मिळवून देण्यासाठी  सरकारलाही  दोन शब्द सुनावून, आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी  निदर्शनेही केली. आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची स्थापना 1920 साली करण्यात सिंहाचा वाटा उचलला. पहिली पंधरा वर्षे अध्यक्ष म्हणून धुरा वाहिली. आपणास प्राप्त झालेले सर्व प्रकारचे वैभव,” इदम् न मम”, या भावनेने, तमाम जनतेच्या भल्यासाठी उधळीत गेले. केवळ 68 वर्षाचे आयुष्य सर्वार्थाने, सुखासमाधानाने ऊपभोगून,समाजाला उपकृत करीत, ते अजरामर झाले. मात्र या चराचराला उपकृत करून  गेलेल्या भायजींच्या मनी एक शल्य राहून गेले .. आवडत्या पाळीव जनावरांचा होरपळून झालेल्या मृत्यूचे  शल्य भायजी विसरू शकले नाहीत ती खंत ऊराशी घेऊनच भाईजींनी अखेरचा श्वास घेतला … भायजींचे स्मरण ठेवणे प्रत्येक समाज बांधवाचे कर्तव्य आहे. म्हणून आज त्यांना हे वंदन.

  9 फेब्रुवारी 1868 रोजी जन्माला आलेले भायजी, “चांदीचा चमचा तोंडात” घेऊन येणाऱ्या मुलाप्रमाणे , श्रीमंत घराण्यात जन्माला आले होते .कै. शिवा राऊत यांच्या वैभवशाली घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. सुमारे 140 वर्षांचा जुना असलेला ‘राऊत वाडा’ त्याकाळच्या राऊत कुटुंबीयांच्या वैभवाची साक्ष आजही देत आहे. वसईच्या होळी, भागातील हा ‘राऊतवाडा’, अजूनही ‘नांदता’असून वर्षातून एक दिवस तरी  विखुरलेले सर्व राऊत कुटुंबीय या वाड्यात एकत्र आहे येत असतात.  हे घर म्हणजेच शिवा राऊत व भायजी राऊत यांचे स्मारकच आहे. आधुनिक जगातही ही वास्तू  सर्वांचे लक्ष वेधून घेते. हा वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना असून, वास्तु शास्त्रज्ञांनी अभ्यास करण्याजोगी घराची रचना आहे. सन 1883 मध्ये या वास्तूच्या बांधणीला 18,000रुपये इतका घसघशीत खर्च आला, यावरून या वाड्याच्या वैभवाची व शिवा  राऊतांच्या ऐश्वर्याची कल्पना यावी. भायजींचे पूर्वज शिवा राऊत यांच्या दूरदृष्टी मुळेच हे अवाढव्य घर (88फूट×88फूट) त्यावेळी त्यांनी बांधले . “दीडशेक वर्षानंतरही हे घर वास्तव्यास योग्य असावे आणि तेव्हा वाढलेली घराण्याची प्रजा, याच वाड्यात एकत्र नांदावी”, हीच शिवा राऊतांची मनीषा होती आणि त्याच दूरदृष्टीने या वाड्याचे बांधकाम त्यांनी केले.  हे राऊत कुटुंबीय, मुळातच शेतीवाडीकरणारे, आणि त्या अनुषंगाने,विहिरी, तलाव, लागवडीलायक जमिनी तयार करण्याची त्यांना कुटुंबजात आवड होती. घराच्या वास्तुशांतीचा सोहळाही डोळ्याचे पारणे फेडणारा होता.

  केवळ सहा महिन्यात ही भव्य वास्तू बांधून तयार झाली. नव्या वास्तूत प्रवेश करण्यापूर्वी अक्षरशः शेकडो रुपये खर्च करून घराण्यातील पुत्र, पौत्र, प्रपौत्र, नातवंडे, पणतवंडे आणि इतर कुटुंबियांच्या पिढ्या सुखाने नांदण्यासाठी अनेक त-हेची  धार्मिक कार्ये आस्थेने आणि भक्तीभावाने केली गेली. या धार्मिक कार्यात ब्राह्मणांना भरभक्कम दक्षिणा दिली गेल्याची नोंद आहे.

    दगडाविटांच्या बांधकामाला, व भिंतीच्या गिलाव्यासाठी वापरलेल्या मध आणि हिरड्यामुळे आजही दीडशे वर्षानंतर घराच्या भिंतींना कुठे साधे खरचटलेले नाही. हे मोठे घर पाहण्यासाठी अनेक लोक मुद्दाम वसई आणि वसईबाहेरून येऊ लागले. त्याकाळी इतके मोठे व विस्तृत घर अन्यत्र कुठेही नव्हते, अर्थात आजही नाही. या घराण्यातील कै. भास्करराव रघुनाथ राऊत यांनी या वाड्याचा तसेच कुटुंबाचा इतिहास लिहिला असून त्यावरून पुरावे उपलब्ध आहेत.

    जुन्या बांधकामपद्धती व इतिहासाची साक्ष देत वाडा आपल्या जागेवर उभा आहे. या वाड्याने स्वातंत्र्यपूर्व आणि आतापर्यंतचा काळ पहिला आहे. राऊत कुटुंबियांचा आधीपासूनच सामाजिक पिंड आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांचे पाय या वाड्याला लागले आहेत. या वाड्यात येणारा प्रत्येक जण आजही वाड्याच्या प्रेमात पडतो.

राऊत कुटुंब आज मितीस, जवळपास 160 जणांचे आहे. सोमवंक्षी क्षत्रिय समजोन्नती संघाचे पहिले अधिवेशन याच वाड्यात झाले होते. अध्यक्षपदी अर्थातच भाईजी जगु होते. भाईजीच्या , पिढीजात उपलब्ध ऐश्वर्याची थोडी कल्पना यावी व एवढे ऐश्वर्य लाभूनही भायजींचे  पाय आयुष्यभर जमिनीवरच का राहिले, याची कल्पना येण्यासाठी ,भायजी राऊत कुटुंबाच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या ‘राऊतवाड्या’बद्दल थोडे विस्तृत लिहिले गेले. भायजींच्या बालपणी ,त्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेला  हा भक्कम वाडा नीट जपल्यास तो आपल्या आणखी काही पिढ्यांचा साक्षीदारही होऊ शकतो. त्यामुळे अशा जुन्या वास्तुंचे जतन लक्ष देऊन करण्याची गरज आहे.

  इंग्रजी राजवटीत अनेकदा काही इंग्रजी अधिकारी कामानिमित्त राऊत कुटुंबियांच्या या घरी येत असत. एकदा रेल्वेचा एक इंग्रज अधिकारी या वाड्या मध्ये आला होता. इतके प्रचंड घर पाहून त्या अधिकार्‍याचे बोट तोंडात गेले आणि तो उद्गारला'” केवडा  मोटा  घर हा!”..अनेक भव्य वास्तु युरोपात पाहिलेल्या एका इंग्लिश माणसाची ही कथा, तर एतद्देशीयांची अवस्था काय होत असेल? असाच दुसरा एक अधिकारी भाईजींना भेटण्यासाठी आला असता, भालजींनी त्याची ‘विकेट’ कशी घेतली याची गमतीदार कथाही पुढे सांगणार आहे.

   खरे तर अशा लक्ष्मीपुत्राने आपले आयुष्य ऐषारामात, ऐहिक सुखांचा उपभोग घेत व मौज मस्तीत जीवन व्यतीत केले असते तरी त्यांना कुणी दोष दिला नसता. मात्र, “आपल्याला मिळालेल्या वैभवातील काही हिस्सा समाजाच्या कारणी लावणे हे आपले कर्तव्य आहे”, अशी धारणा ठेऊन भायजींनी  संपूर्ण जीवन व्यतीत केले. स्वार्थ साधतांना, परमार्थही केला. केवळ  आपल्या पूर्वजांच्या किर्तीवर न राहता, स्वतः काहीतरी मिळवून दाखवायचे होते. ते मिळवताना व मिळविल्यावर भोवतालच्या समाजाचे ही आपण देणेकरी आहोत , त्यासाठी त्याग करताना उपकाराची भावना न ठेवता कर्तव्याची भावना त्यांनी ठेवलेली दिसते . भायजींचे सर्व दातृत्व ,कर्तव्याच्या जाणिवेतून केलेले आहे. तेथे अहम् पणांचा दर्प कुठेही येत नाही. भायजींचे वेगळेपण  येथे आहे. त्यांना या जगात मिळवावयाचे होते, व द्यावयाचेही होते. किंबहुना काहीतरी देण्यासाठीच मिळवावयाचे  होते. सुरुवातीस मी ज्ञान व कर्म यांच्या समुच्चयाबद्दल जे बोललो ते भायजींच्या संदर्भात..  ईषोपनिषदाचे  तत्त्वज्ञान भायजी स्वतःच्या आयुष्यात जगले!

      ज्या सोमवंशी क्षत्रिय समाजात भायजी जन्मले, त्या समाजासाठीच नव्हे तर समस्त वसईपरिसर व एकूण तत्कालीन सामाजिक व राजकीय जीवनाच्या संदर्भात भायजींचे जीवनकार्य लोकोत्तर होते. त्यांच्या कार्याची महती आज काहीशी विस्मृतीत गेली असली तरी आजच्या वसई व परिसराच्या वैभवशाली जीवनाचे अधिष्ठान भाईजी राऊतांच्या त्यावेळच्या कार्यातून सिद्ध झाले होते हे मानावे लागेल.

        सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची सन 1920 साली, स्थापना होण्याआधीच वसईच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रामध्ये एक अनुकूल वातावरण तयार झाले होते. गोविंदराव धर्माजी वर्तक या नावाचा तरुण, तडफदार, सुशिक्षित तरुण तारा राजकीय व सामाजिक क्षितिजावर नुकताच उगवला होता. विविध समाजांतील लोकनेते व स्वयंसेवक अनेक सेवा क्षेत्रात कार्यरत होते. संघाचे एक आद्य संस्थापक तसेच मांडलई शाखेतील पहिल्या परिषदेचे अध्यक्ष या पार्श्वभूमीवर भायजी जगू राऊत हे नाव समाजात प्रकर्षाने चर्चिले जात होते. मात्र  आपल्या लोकाभिमुख कार्याला भायजींनी त्या आधीपासूनच सुरुवात केली होती.  

     औदार्य आणि सार्वजनिक निधीच्या विनियोगाची कल्पकता यामुळे त्यांच्या सार्वजनिक कार्याचा आढावा घेतला तर स्तिमित व्हायला होते…

शक्ती व युक्ती यांचा मिलाफ झाल्याशिवाय माणसाच्या जीवनाला पूर्णता येत नाही. विशेषतः पारतंत्र्यात खितपत पडलेल्या समाजाने, शरीर सौष्ठव कमावलेच पाहिजे, हे जाणून भायजिंनी समाजातील तरुणांना व्यायामाची गोडी लावण्यासाठी,वसई मध्ये एक ‘लाठी संघ’,1924 साली सुरू केला होता. त्यातील दंडाधारी तरुणांचे हे दुर्मिळ छायाचित्र.

        भायजी  राऊत त्यावेळी लोकल बोर्डाचे एक सरकार नियुक्त सभासद होते. वसईतील, केशव रामचंद्र गाळवणकर म्हणजेच बाळा शेठ त्यावेळी तालुका बोर्डाचे अध्यक्ष होते. भायजींनी आपल्या सभासदपदाचे अगदी योग्य प्रतिनिधित्व करून देवतलाव ते बाभोळा हा मुळचा ”गराडी’चा म्हणजे अगदी कच्चा रस्ता पक्का बांधून घेऊन तो तालुका लोकल बोर्डाला सुपूर्द केला. हा रस्ता आज वसईतील औद्योगिक व आर्थिक उलाढालीतील एक महत्त्वाचा दुवा ठरला आहे.वसईतील वाहतुकीत या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता  भायजींनी त्यावेळी किती दूरदृष्टी दाखविली याचे प्रत्यंतर येते.

   या रस्त्यासाठी त्यावेळी म्हणजे 1916 ते 18 साली भाईजींनी रुपये 4000 (जेव्हा १ ग्राम सोने २ रुपयांहुन कमी भावात मिळत होते) पान व्यापार्-यांच्या धर्मदाय फंडातून देणगी म्हणून दिले होते. रस्त्याच्या बांधकामावर देखरेखीचे काम त्यावेळचे लोकल बोर्डाचे एक कारकून बगाराम शिंदे यांनी केले. भायजींच्या सूचनेप्रमाणे बगाराम काम करीत. पैशाचा सर्व व्यवहार भायजींनी हाताळला त्यामुळे रस्त्याचे बांधकाम अतिशय उत्तम प्रकारे झाले.

  आपल्या परिसरातील तरुणांना उत्तम शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून ते वसई येथील हायस्कूलच्या व्यवस्थापनातही लक्ष ठेवून होते. वसई हायस्कूलला देणगीही दिली आहे. 1918 साली देशात भीषण दुष्काळ पडला असताना त्यांनी, ‘दुष्काळ फंड’ गोळा करण्यात सिंहाचा वाटा उचलला. जमलेल्या पैशाचा, पै न् पै चा हिशोब व्यवस्थित ठेवून थेट रंगून, ब्रह्मदेश येथून तांदूळ आयात केला व तो मुद्दल भावात. कोणत्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता गोरगरिबांना वाटला. ‘वसई परिसरात दुष्काळाचा एकही भूकबळी गेला नाही’, अशी नोंद इतिहासात झाली, याला भायजींचे  कर्तृत्व कारणीभूत होते.

    1921सालच्या महाराष्ट्र काँग्रेसच्या पहिल्या प्रांतिक परिषदेच्या आयोजनासाठी भायजींनी कष्ट घेऊन ,त्यासाठी भरघोस आर्थिक सहाय्यही केले.

   स्वातंत्र्य चळवळ आणि गांधीजींच्या स्वराज्य स्वदेशी विचारधारेत योगदान करण्यात वसई देखील मागे नव्हती. महात्माजींच्या आवाहनानुसार,’ टिळक स्वराज्य फंडाला’ त्यांनी मोठी देणगी उदारहस्ते दिली होती .

   देशबंधू चित्तरंजन दास एकदा वसईला आले होते. यांच्याही ”मदत निधीला”, वसई नगर परिषदेतर्फे दिलेल्या रकमेत, भायजींचा सिंहाचा वाटा होता.

      सन1924 साली’वसई तालुका शेतीसभा’ स्थापन करण्यात आली होती. भायजी त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1936 पर्यंत, शेतीसभेचे अध्यक्ष होते. होळी येथील श्री शंकराच्या मंदिर परिसरांतील विखरेवाडीतील बंगल्यात शेती सभेच्या बैठका होत असत. परिसरांतील गरजू व गरीब शेतकऱ्यांना हर तऱ्हेची मदत करता यावी हा या शेती सभेचा हेतू होता.

       1928 साली, तेव्हाच्या इंग्रज सरकारने, आसुरी धारावाढ केली होती. त्या धारावाढीविरोधातील चळवळीचा एक भाग म्हणून, वसईत, ‘लँड लीगची’ शाखा उघडण्यात आली होती. भायजींचाच  त्यात पुढाकार होता. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या महान नेत्याने, या चळवळीची दखल घेऊन, वसईकरांना मार्गदर्शन केले होते. या गोष्टीवरून ही भायजींच्या तत्कालीन राजकीय व सामाजिक नेतृत्वाची उंची लक्षात येते.

      सन 1930 32 च्या सुमारास वसईच्या किनारपट्टीतील गावे केळी, सुकेळी व पानवेलीसाठी (खायची पाने),खूप प्रसिद्ध होती. वसईची पाने तर उत्तर भारतातील अनेक राज्यांत आणि तेव्हा भारताचा भाग असलेल्या आजच्या सिंध,लाहोर, कराची या भागात पाठविली जात होती. या काळात भायजी राऊतांचा देखील पानांचा मोठा व्यवसाय होता. खरेतर ,पानाचा असा व्यापार सुरु करणारे भायजी हे पहिलेच व्यापारी होते. त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन अनेक व्यावसायिकांनी पानवेलीचा लागवड व निर्यात सुरू केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  सरकारी कामाची माहिती आणि संपर्क यामुळे वसईत पान व्यापाराचे नेतृत्व आपसुकच भायजींकडे आले. वसईतील बागायतदारांच्या अनेक समस्यांची सोडवणूक त्यांनी केली होती. त्यावेळी बी सी सी आय रेल्वेने ,पंजाब मेल वसई स्थानकावर थांबवण्याचे अचानक बंद केले होते. त्यामुळे पाने उत्तरेकडे जाईनाशी झाली. तेव्हां भायजींनी पापडीतील, मनमोहन दास प्रताप या आपल्या प्रख्यात वकील मित्रास बरोबर घेऊन , शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा चर्चगेटच्या बीसीसीआई रेल्वेच्या कार्यालयावर नेला. यामधूनच वसईत, ‘पान केळा मर्चंट असोसिएशनची’, स्थापना झाली आणि हा प्रश्न सुटला.

       वसई मुक्ती संग्रामाच्या स्मृती जागृत ठेवणाऱ्या,’वसई विजयदिन उत्सव समिती’चे भाईजी खजिनदार होते व त्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी ही जबाबदारी मोठ्या निष्ठेने सांभाळली.

    म्हणजेच या वसई भागातील सामाजिक चळवळीचे त्या कालखंडातील आद्य प्रणेते, नेते, भाईजी जगू राऊत हेच होत!

     भायजी राऊतांच्या सामाजिक-राजकीय योगदानाबरोबरच,  त्यांच्या दातृत्व गुणांचीही प्रामुख्याने दखल घ्यावी लागेल. हजारो रुपयांच्या देणग्या, सामाजिक कार्यासाठी दिल्या आणि आपली दूरदृष्टी व समाजाभिमुखता यांचे दर्शन घडविले.” आधी केले, मग सांगितले”, अशी त्यांची धारणा होती. दौलत,आर्थिक सुबत्ता असली म्हणजेच अंगी दातृत्व येते हे खरे नाही. त्यासाठी आयुष्याची बैठक ही अध्यात्मावर आधारित हवी. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे,” धन्याचा हा माल, मी तो हमाल,भारवाही”, अशी वृत्ती असली तरच पदरी असलेल्या संपत्तीचा उपयोग दुसऱ्यांच्या भल्यासाठी करण्याची बुद्धी होते. आणि विशेष म्हणजे हे दातृत्व दाखवत असताना, माझा ,माझ्या कुटुंबीयांचा गौरव व्हावा वा आपल्या नावाच्या पाट्या सार्वजनिक ठिकाणी झळकाव्यात, अथवा आपल्या राजकीय-सामाजिक महत्त्वाकांक्षा हस्तगत करतांना आपल्या नावाभोवती एक वलय प्राप्त व्हावे असा विचार दुरान्वयेही मनात येत नाही.

 ” जयांना कोणी ना जगती,जगी जे अंतरी रडती”,”

  अशा दुःखितांचे दोन अश्रू पुसता यावेत याच पवित्र व उदात्त भावनेने भायजींनी दानत दाखविली,दातृत्व जोपासले. 1918 सालच्या भीषण दुष्काळखंडात ,दुष्काळ फंड जमा करून, त्यात आपलाही मोठा हिस्सा देऊन, थेट रंगून- ब्रह्मदेश मधून तांदूळ मागवून तो मुद्दल भावात गोरगरिबांना वाटणे, यामागे भायजींची दुसरी कोणती भावना असू शकते?  म्हणून मला वाटते भायजींचे दान व दातृत्व उच्च कोटीचे आहे!!

ही परिषद भायजींच्या ,राऊत वाड्या समोरील पटांगणात झाली होती.अत्यंत दुर्मिळ फोटो.

  भायजींच्या केलेल्या दातृत्वाची ही थोडी झलक पहा…

  • 1913 साली वसई हायस्कूल आर्थिक  अडचणीत असतांना दिलेल्या 2250 रुपयाच्या कर्जाचे रूपांतर पुढे देणगीत केले. 
  • त्याच साली, श्रीक्षेत्र निर्मळ येथील सुळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथेही 1000 रुपये स्वतः खर्च केले. 
  • निर्मळच्या यात्रेत अन्नछत्र घालण्यासाठी जमीन खरेदी करून दिली, त्याचा काही हजार रुपये खर्च भायजीनी केला.
  • भुईगांव येथील, ‘नारायण स्वामी आश्रमाला’ तीन एकर जमीन रोज खर्चासाठी दान केली होती
  • देवतलाव येथील देवळाच्या जिर्णोद्धाराचा 500 रुपयांचा खर्च त्यांनी उचलला.
  • 1926 साली, तरखड येथील शाळेत, विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून बांधलेल्या विहिरीसाठी 500 रुपयाची देणगी दिली. 
  • भायजींच्या दातृत्वाचा डंका नाशिकपर्यंत  पोहोचला होता. 1930 साली गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अधिपत्याखालील नाशिकच्या ‘हंसराज प्रागजी ठाकरसी’, कॉलेजच्या उभारणीला पाचशे रुपयाची देणगी  त्यांनी दिली होती.
  • होळी येथील भाजी मंडई भायजीं नी स्वतः संपूर्णपणे उभी करून वसई नगरपालिकेला सुपूर्त केली होती. आजही ही मंडई  म्हणजे वसईच्या सामाजिक जीवनाचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे.

   ज्यावेळी एका रुपयाची किंमत काही शेकडो रुपये होती, त्या सुबत्तेच्या काळात भायजीनी  या हजारोंच्या देणग्या दिल्या आहेत हे लक्षात घेतले म्हणजे त्यांची किंमत कळून येते. ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’, हीच प्रांजल भावना या सर्व दानधर्मात दिसून येते!!

    आमचा भावी तरूण जगाच्या स्पर्धेत सबल व कार्यक्षम व्हावा, सुशिक्षित, सुसंस्कारित व अंधश्रद्धामुक्त व्हावा या तळमळीने झपाटलेल्या भायजींनी, अस्तित्वात असलेल्या संस्था कशा जोपासल्या जातील व नवीन संस्था कशा रुजविल्या जातील या जाणीवेपोटी देणग्या  दिल्या. भायजींच्या दूरदृष्टीला सलामच केला पाहिजे.

 1945, साली झालेल्या सो क्ष संघाच्या रौप्यमहोत्सवी परिषदेत ,अण्णासाहेब वर्तक, सहकारी व सभासदा समवेत. ही सभा भायजी जगू  राऊत यांच्या वसईतील, त्याच प्रसिद्ध राऊतवाड्याचे प्रांगणात झाली होती.

    सन 1919 मध्येच सोमवंशी क्षत्रिय समाज उन्नती संघाच्या स्थापनेचे जोरदार वारे वाहू लागले होते. गावोगावी ‘स्वयंसेवक मंडळे’ सुरु करण्यांत आली होती. संघाच्या शाखाही गावोगावी निघत होत्या. संघाचे एक आद्य संस्थापक कै. अण्णासाहेब वर्तक यांनी वसईत प्रथमतः मांडलई शाखा सुरू केली होती. त्यासाठी होळी येथील राऊत वाडी मधील भायजी जगू राऊत यांच्या वाड्याच्या ओटीवर, डिसेंबर 1920 मध्ये प्रथमतःच सभा घेण्यात आली. या सभेस अण्णासाहेब वर्तक स्वतः हजर होते. ते यावेळी मुंबई विद्यापीठातून नुकतेच बी ए पास झाले होते आणि एल एल बी चा अभ्यासक्रम करीत होते. अण्णासाहेब त्यावेळी गोविंदराव वर्तक याच नावाने परिचित होते. राऊतांच्या ओटीवर गोविंदराव वर्तकांनी दणकेबाज भाषण केल्याची नोंद भास्करराव राऊत यांनी आपल्या पुस्तकात करून ठेवली आहे. याच सभेत मांडलई शाखेचे अध्यक्ष म्हणून भाईजी जगू राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आणि सेक्रेटरी झाले लक्ष्मण केशव राऊत! लगेचच मे 1921 मध्ये राऊतांच्या घराच्या उत्तरेस, मोठ्या मंडपात, सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची पहिली ऐतिहासिक परिषद भरविण्यात आली.या परिषदेच्या अध्यक्षपदाचा मानाचा तुरा, भायजी जगू राऊतांच्या शिरपेचात खोवला गेला.  परिषदेचे स्वागताध्यक्ष होते परशुराम धर्माजी उर्फ तात्यासाहेब चुरी.  सबंध समाजातील गावोगावी, दूरवरचे 450 ते 500 सदस्य उपस्थित होते.गोविंदराव वर्तक यांच्यासह मुकुंदराव सावे, माधवराव राऊत, डॉ.हरिभाऊ सावे, मोरो नानाजी पाटील अशा समाजातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांची भाषणे होऊन संघाची ध्येयधोरणे आणि पुढील कार्यप्रणालीवर विचारमंथन झाले.

या पहिल्या परिषदेचा ऐतिहासिक सोहळा खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा होता.

उपाध्यक्ष बदलत गेले, अध्यक्ष मात्र एकच होते…श्री भायजी राऊत ! त्यांचे हे कार्य समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.

       संघाचे प्रथम अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर भायजींनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या कामाचा उरक व व्यक्तिमत्वाचा दबदबा एवढा होता कोणालाही त्या पदावर बसण्याची आसक्ती तर झाली नाहीच, पण भायजीनीच ते पद दीर्घकाळ  भूषवावे अशी त्यांच्या समाजबांधवांची प्रामाणिक इच्छा होती. सतत पंधरा वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी संघाचे नेतृत्व  केले. त्या कामाचे महत्त्व किती असेल याची आज, संघाने शंभराव्या वर्धापनदिनी प्रवेश करतेवेळी, कल्पना करणेही कठीण आहे. त्यांच्या अध्यक्षपदाचे काळात संघाच्या दहा परिषदा ,आणि दोन खानेसुमारी झाल्या. प्रारंभीच्या काळात संघाची घडी बसवणे आणि संघाला योग्य दिशा देणे, याकामी त्यांनी दिलेले योगदान केवळ अमूल्य असे आहे. त्या दिवसात त्यांचे घर हे सामाजिक चळवळीचे केंद्रच बनले होते.भायजींच्या कार्यकर्तृत्वाचा हा लेखाजोगा मांडतांना, ज्या अण्णासाहेब वर्तकांनी हा तेजस्वी हिरा पारखून, त्यांच्या हाती संघाची सूत्रे प्रथमतः सोपविली त्या अण्णासाहेबांच्या दूरदृष्टी व गुणग्राहकतेला ही दाद दिली पाहिजे!

      एखाद्या  संस्थेची पायाभरणी, मग ती संस्था आर्थिक, सामाजिक,औद्योगिक ,शैक्षणिक वा इतर कोणत्याही क्षेत्राशी निगडित असो,  सक्षमपावन हात, भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी व जनहिताची आंतरिक तळमळ असणारे संवेदनाशील मन, या त्रिसूत्रीवर आधारित असते, ती संस्था निश्चितच चिरकाल टिकते, हा जगाच्या इतिहासातील दाखला आहे. आमच्या सो क्ष  संघाची स्थापना 101, वर्षांपूर्वी झाली व आज देखील संघ तितक्याच जोमाने व जोशाने प्रगतीपथावर जात आहे. ज्या दिवशी अण्णासाहेब वर्तक व भायजी जगू राऊत दोन लक्ष्मीपुत्रांचा समसमा संयोग झाला व अनेक तळमळीचे कार्यकर्ते गावागावातून त्यांना पहिल्या दिवसापासूनच साथ देते झाले, त्यादिवशीच या संस्थेचे उज्ज्वल भवितव्य अधोरेखित झाले. आजच्यासंघ स्थापनेच्या  शतकोत्तर कालखंडात आम्ही भाग्यवान समाज बांधव याचा प्रत्यय घेत आहोत.

    एकदा संघ अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर, संघ उभारणीसाठी लागणारा निधी व विशेषतः शिक्षण प्रसारासाठी करावयाची व्यवस्था तसेच होतकरू विद्यार्थ्यांना द्यावयाची आर्थिक व शैक्षणिक मदत यासाठी भायजी झपाट्याने कामाला लागले. सो.क्ष  समाजोन्नती संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या  कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात घेतलेला हा लेखाजोगा भायजींच्या कामाचा झपाटा व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची पद्धती या बद्दल बरेच काही सांगतो…

     2 व 3 मे 1921 रोजी झालेल्या वसई परिषदेनंतर 3 जुलै 1921 रोजी बोर्डी येथे पहिली तिमाही सभा झाली, आणि खऱ्या रीतीने संघाच्या कार्याचा श्रीगणेशा झाला. त्या सभेत माकुणसार या आडवळणाच्या व तौलनीक  दृष्ट्या मागास असलेल्या गावात,  तेथील गरजा लक्षात घेऊन, प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर केवळ दीड महिन्यांत म्हणजे 19 ऑगस्ट 1921 रोजी माकुणसार येथे शाळा सुरू करण्यात आली. आजच नव्हे तर अगदी शंभर वर्षापूर्वीसुध्दा, घेतलेला एक महत्वाचा निर्णय इतक्या झटपट अमलात आणणे, केवळ अचंबित करणारे कृत्य होते. अध्यक्ष भायजी व त्यावेळेचे संघाचे चिटणीस मा.आत्माराम पंत सावे यांच्या कार्यकर्तृत्वाला त्रिवार वंदन! संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या शिक्षण प्रसाराच्या पूर्ततेसाठी त्या काळी इतक्या कमी अवधीत यशस्वी वाटचाल करून दाखविणाऱ्या आमच्या सर्व  समाजधुरीणांना मानाचा मुजरा!!

   पुढे एप्रिल 1922 मध्ये केळवे येथील  सभेत, 3 विद्यार्थ्यांचे मदतीसाठी आलेले अर्ज मंजूर करून संघाने शिक्षणप्रसाराचे दुसरे महत्त्वाचे पाऊल टाकले. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना संघाची आर्थिक मदत सुरू झाली. पुढील वर्षी चटाळे येथील ग्रामस्थांनी सुरू केलेल्या प्राथमिक शाळेला संघाने आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. तेथील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून प्राथमिक शालांत परीक्षा, म्हणजे सातवी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याची योजना सुरू केली. आजच्या या प्रगत समाजाच्या सफलतेची बीजे ,त्यावेळी भायजींच्या नेतृत्वाखालील आमच्या धुरीणांनी टाकलेल्या  या दमदार शुभारंभातच सापडतात.

    समाज संघटनेचे काम सुरु झाले मात्र या कामासाठी आर्थिक निधी संकलन करणेही तितकेच महत्त्वाचे होते. वार्षिक आणि आजीव सभासद बनविणे तसेच मंगलकार्य निमित्त आणि पुण्यस्मरणार्थ देणग्या देण्यास समाज बांधवांना प्रवृत्त करणे हे मोठे जिकिरीचे काम होते. प्रचारदौरे काढून, लोकांमध्ये जागृती करून, समाजबांधवांना संघकार्याकडे आकृष्ट करून सर्व शाखांत कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी भायजींनी जीवाचे रान केले. कामाला गती दिली . दळणवळणाची कोणतीही साधने सुविधा नसताना, आडवळणाच्या प्रत्येक गावात प्रत्यक्ष जाऊन, समाज बांधवांशी संपर्क साधणे किती जिकिरीचे काम होते ,याची कल्पना आपणाला आज येणार नाही.

    समाज बांधणीच्या प्रारंभ कालांत, पू. कै. अण्णासाहेब वर्तक, कै. तात्यासाहेब चुरी अशासारख्या दिग्गजांबरोबर प्रत्येक शाखांतून अनेक सहकार्यांची  साथ त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक कै. डाॅ. दीनानाथ बा. चुरी हे माझे आजोबा. ते मला कधीतरी,त्या काळातील त्यांनी केलेल्या भ्रमंतीच्या अनेक आठवणी सांगत असत. “सेवाभावी डॉ. दिनानाथ चुरी”, या त्यांचेवरील माझ्या लेखात मी  दिलेली माहिती येथे अंशतः उद्धृत करीत आहे. त्यावरून भाईजी व त्यांच्या सहकाऱ्यांना या कामासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागले याची थोडीतरी जाणीव होईल. 

भायजी राऊतांच्या पुढच्या पिढीतील कुटुंबीयांचे एक दुर्मिळ छायाचित्र. त्यांच्या पेहरावावरून ,या कुटुंबाचे राहणीमानाची कल्पना येईल.

             “त्या काळी आमच्या समाजातील बहुतांशी मंडळी अशिक्षित व व्यसनाधीन असल्यामुळे, स्थिती हलाखीची होती. विशेषतः सफाळा स्टेशनचे पूर्वेकडील परिसरांतील आमचे बांधव पाण्याचेही दुर्भिक्ष असल्याने, खूपच कष्टाचे व समाजापासून अलिप्त, असे जीवन जगत होते. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे मोठे आव्हान होते. भाऊ सांगत, ते व त्यांचे सहकारी, सुट्टीच्या दिवशी, आपल्या बरोबर, पुस्तके, वह्या, कपडे यांचे गठ्ठे सोबत घेऊन,  विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी  घेऊन जात. प्रसंगी, त्यांना स्वतःलाच ही ओझी उचलावी लागत. रस्तेच नव्हते तर वाहने कोठून मिळणार? त्यावेळी कधीतरी, “मॅजिक लॅन्टर्न”  नावाचे, पडद्यावर प्रतिमा  उमटविणारे उपकरण ते घेऊन जात. ‘करमणूकीतून लोकांचे प्रबोधन’, करणे असा उद्देश असे. सुरुवातीला त्याचा  विपरीत परिणाम  होऊ लागला. ही मंडळी, जादू-टोणा करणारी आहेत, आपल्याला व मुलांना, यांचेपासून धोका तर नाही ना? अशी भावना लोकांची  होऊ लागली  मात्र काही  दिवसांनी त्यांना, या मंडळीच्या कामातील  प्रामाणिपणा व उपयुक्तता पटली. प्रतिसाद उत्तम मिळू लागला. लष्कराच्या भाकऱ्या भाजताना अशा अनेक मजेशीर अडचणींतून त्यांना जावे लागले. पण त्यांनी आपले काम थांबविले नाही. पुढे संघाची स्थापना झाल्यावर गरजू लोकांना शिक्षणासाठी पैशाच्या रूपात ही मदत मिळू लागली. जसजसा शिक्षण प्रसार होऊ लागला, अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता ही कमी झाली. आज आमचा सो.क्ष .समाज शिक्षणाचे बाबतीत खूपच प्रगत आहे मात्र हा तत्कालीन मागास परिसर, शिक्षणाचे बाबतीत सर्व समाजात अग्रेसर असून, या परिसरातील अनेक तरुण, सुशिक्षित मंडळी, देशात व परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेली आहेत. भाऊ सारख्या अनेक समाजसेवकांनी, अण्णासाहेब, भायजी, तात्यासाहेब यांसारख्या मान्यवरांचे मार्गदर्शनाखाली,  केलेल्या अथक परिश्रमाचे चीज झाले आहे, त्यांना ही मानवंदनाच आहे!”

     भायजींनी अध्यक्षपदाची धुरा घेतली त्या साली म्हणजे 1921,साली वार्षिक सभासद फी केवळ एक रुपया होती. पहिल्याच वर्षी त्यांनी 880 सभासद बनविले. हे मोठे यश होते. पुढील एक वर्षात भायजींनी तीस तहहयात सभासद मिळवून दिले व स्वतः आश्रयदाता झाले. तहहयात फी शंभर रुपये व आश्रयदाता पाचशे रुपये एवढी फी होती. त्यात त्या काळात निश्चितच ही मोठी रक्कम होती. परंतु,’ आधी केले मग सांगितले’, या तत्त्वानुसार भाईजींनी स्वतः आर्थिक बोजा सोसून एक उत्तम उदाहरण समाजबांधासमोर  ठेवले. भाईजी हे आमच्या समाजाचे पहिले आश्रयदाता सभासद ठरले.

        फेब्रुवारी 1923 मध्ये झालेल्या एका तिमाही सभेत, तत्कालीन समाज बंधू-भगिनींना भेडसावणार्‍या काही अडचणींची नोंद खालील प्रमाणे केली गेली आहे.

  “समाजात वावरत असलेले अज्ञान, शिक्षणाविषयी अनास्था, व्यसनांच्या ठाई तत्परता, कित्येक निंद्य चालीरीतींचे अस्तित्व, शेती व्यवसायास उद्योगधंद्यांची जोड न मिळाल्यामुळे प्राप्त झालेली पराधीनता, बहुपत्नीत्व आणि बालविवाह यांनी समाजाच्या मुखावर आलेली ग्लानी, व्यक्तीद्वेषामुळे कोणत्याही सार्वजनिक सत्कार्यांत देखील उत्पन्न होणारा निरुत्साह, कार्यक्षम व निस्वार्थी माणसांची कमतरता, इत्यादी गोष्टींची समाजावर असलेली पकड पाहता समाजाच्या पुढारी मंडळीवर फार महत्त्वाची जबाबदारी पडते….” 

   मला वाटते ही नोंद तत्कालीन समाजस्थितीचे एक बोलके दर्शन घडवणारे चित्र असून नेतृत्वापुढील आव्हानांची आपणास थोडी कल्पना येते. मित्रवर्य प्रमोद पाटील,जे सध्या संघाचे खजिनदार आहेत, त्यांनी मला 1923 आलेल्या एका तिमाही सभेतील नोंदीच्या कागदाची प्रत उपलब्ध करून दिली. या लेखात ती दिली आहे.

     संघ स्थापनेची अनेक विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व कामाला गती देण्यासाठी तिमाही सभा, प्रचार सभा, व दरवर्षी परिषदा घेण्याचा सपाटा अध्यक्ष भायजीनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला होता. त्याचा खूप उपयोग होत होता. पहिल्या पंधरा वर्षांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अध्यक्ष भायजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जे उपक्रम राबविले, धोरणात्मक निर्णय घेतले, त्याची यादी जरी पाहिली तरी स्तिमित व्हायला होते.. 

  •  1923 सालच्या केळवे परिषदेत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करणारा बक्षीस समारंभ साजरा करण्याचा उपक्रम कार्यान्वित.
  •  1924 बोर्डी परिषदेत महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी महिलांच्या समस्यावर चर्चा. महिलांनी तयार केलेल्या, कृषी आणि कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन. त्याच वर्षी तात्यासाहेब चुरी यांनी,” छात्र सेवक”, नावाचे त्रैमासिक सुरू केले. अनिष्ट चालीरीती मोडून काढून आधुनिक विचार समाजात रुजवण्यासाठी दृष्ट्या तात्यासाहेबांनी  संपादक म्हणून जबाबदारी पेलली होती.      
  • 1925 साली, तारापूर परिषदेत गरजू व आजारी समाज बांधवांना काही उपयुक्त औषधे मोफत देण्याची योजना राबविली गेली.
  • 1925-26 पर्यंत समाजाच्या 22 गावातून संघाच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. संघाचा निधि 10,000 रुपयापर्यंत जमला होता.
  •  1928 खुन्तोडी परिषदेत शिक्षण प्रसाराला गती देण्यासाठी निधी व निधी  संकलन वाढविण्याच्या दृष्टीने, ‘सहाय्यक सभासद’ही नवी श्रेणी निर्माण करण्यात आली. त्यानुसार तीन नवे सहाय्यक आणि एकोणीस तहहयात सभासद मिळविले. त्याच वर्षी अण्णासाहेब वर्तक यांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींना परकर-पोलक्यांसाठी कपड्याच्या रुपाने बक्षिसे देण्यासाठी, एक हजार रुपयांची देणगी आजोबा कै. हिरा गोविंद वर्तक यांच्या नावाने दिली. स्त्रीशिक्षणास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, ‘शिक्षण प्रसारक मंडळ’,  स्थापन करण्यात आले.
  • 1931 विरार परिषदेत स्त्री शिक्षणावर विशेष भर देण्याबाबत चर्चा झाली. याच परिषदेत स्त्रियांनाही संघाचे सभासद होता यावे म्हणून घटना बदलण्यात आली. काही स्त्रियांनी सक्रिय भाग घेऊन परिषदेत पहिल्यांदाच भाषणेही केली.
  • 1933 मध्ये संघटनेत बदल करून वार्षिक सभासद फी एक रुपया वरून आणि अर्धा रुपया केली गेली.  जागतिक आर्थिक मंदीमुळे समाजाची आर्थिक स्थिती नाजूक बनली होती, त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जोड धंद्यासाठी मदत देण्याचाही ठराव करण्यात आला.
  • 1935 मध्ये चिंचणी येथील भरलेल्या परिषदेत, सोमवंशी क्षत्रिय समाज वाचनालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्या काळात समाजाचे एक स्वतंत्र वाचनालय असणे ही खूप मोठी गोष्ट होती.

    संघ स्थापनेनंतर पहिल्या दहा वर्षांत समाजाच्या जीवनात झालेले बदल निश्चितच भूषणावह नोंद घेण्याजोगे होते त्याचा चांगला परिणाम समाजाच्या आर्थिक स्थितीवर ही होत होता .त्यामुळे समाज बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्था तालुका आणि जिल्हास्तरावर काम करण्याच्या संधीही उपलब्ध झाल्या होत्या. पहिली संधी समाज नेते अण्णासाहेब वर्तक यांचे वडील कै. धर्माजी वर्तक यांना आणि त्यानंतर भाईजी जगू राऊत यांना प्राप्त झाली हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यानंतर मात्र अनेक समाज बांधवांना ग्रामपंचायत ,तालुका बोर्ड,  जिल्हा बोर्डावर कामे करण्याची संधी उपलब्ध झाली.

  सो क्ष संघाने सुरु केलेली सामाजिक संघटनेची चळवळ जातीविषयक असली तरी जातिनिष्ठ नव्हती.या संघाने व नेतृत्वाने नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिल्यामुळे इतर जाती विषयक चळवळीपासून आपला समाज नेहमीच दूर राहिला. त्यामुळेच ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात या समाजाला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आणि पुढारलेल्या समाजाची आपल्याकडे काहीशा उपेक्षेच्या भावनेने पाहण्याची दृष्टी होती तिच्यात बदल घडवून आणला. समाजाच्या आर्थिक-सामाजिक शैक्षणिक परिवर्तनाचे नियमित मूल्यमापन होत राहावे म्हणून भायजींनी, 1921 मध्ये प्रथम खानेसुमारी करविली. आणि पुढे दर दहा वर्षांनी खानेसुमारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

      1935 साली संघाच्या मदतीने, बोर्डी येथे, आत्माराम विठ्ठल सावे, मदनराव लक्ष्मण राऊत,दीनानाथ बाळकृष्ण चुरी, शामराव रामचंद्र पाटील, हरिश्‍चंद्र गोपाळराव पाटील, यासारख्या दृष्ट्या समाज धुरिणांनी मुलांच्या वसतीगृहाची स्थापना केली. मासिक फक्त सहा रुपये शुल्क भरून, विद्यार्थ्यांना या वसतीगृहात राहता येई. त्यामुळे समाजातील अनेक गरीब हुशार व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व राहण्याची सोय अत्यंत माफक खर्चात होऊ लागली . शिक्षण प्रसाराला खूप गती मिळाली.

    पुढे 1962 साली, दादर येथील पू .अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व पू.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृह, सुरू होण्यापूर्वी, अशा वसतिगृहाची गरज ओळखणाऱ्या, काळाच्या पुढे असलेल्या आमच्या बोर्डीतील धुरीणांच्या दूर दृष्टीला सलाम !!

  समाजावरील आत्यंतिक प्रेम, देशाभिमान आणि शिक्षणप्रसार, याची जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे हा संघ भविष्यात उंची गाठणार हे अधोरेखित झाले.

    अशा रीतीने उद्दिष्टपूर्तींच्या दृष्टीने, संघ स्थापनेपासून पहिल्या तपाचा काळ खूप उल्लेखनीय होता. अनेक दूरगामी व भविष्यवेधी उपक्रम सुरू करण्यात आले. या सर्व उपक्रमात अध्यक्ष या नात्याने भायजींचे योगदान निश्चितच मोठे होते. मात्र शिक्षणप्रसार हे मुख्य उद्दिष्ट समाजाच्या नेतृत्वापुढे सदैव राहिले. त्यादृष्टीने, 83 होतकरू विद्यार्थ्यांना सुमारे पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली. संघाचा निधी देखील केवळ तीन हजार रुपयांवरून 22 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आला. समाजबांधवांच्या शैक्षणिक प्रगतीचा वेग वाढला. स्त्री  शिक्षणासाठी प्रयत्न सुरू झाले. मद्यपानाच्या व्यसनाला आळा बसू लागला. नैतिक सुधारणांना वाव मिळाला, बालविवाह कमी होऊन रीतिरिवाजामध्ये सुधारणा झाल्या, स्त्रियांच्या पेहरावात अपेक्षित बदल होऊ लागले, ऐक्य वृद्धीच्या दृष्टीने शाखा स्थापन करणे आणि परिषदा भरविणे याचा समाजाला खूप मोठा फायदा झाला. एकंदरीत आपला देश पारतंत्र्यात असताना जागतिक आर्थिक मंदी आलेली असतानाही या समाजाने विविध क्षेत्रात टाकलेली पावले, समाजाचे पुरोगामित्व दर्शविणारी होती हे निश्चित व ठामपणे म्हणता येईल.अध्यक्ष भाईजी राऊत यांचे योगदान  खूपच मोठे आहे…

       …आणि  अचानक 1936 मध्ये ती मोठी दुःखद घटना घडली…संघ स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून, पहिली कसोटीची पंधरा वर्षे अध्यक्षपदावरून समाजाला मार्गदर्शन करणारे थोर नेते, भायजी जगू राऊत यांचा मृत्यू झाला.

       “जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत…”,या न्यायाने संपूर्ण जीवन व्यतीत केलेल्या भायजींना, मृत्यूच्या काही दिवस आधी, एका मोठ्या आघातातून जावे लागले.. नव्हे तो आघात प्राणघातक ठरला… भाईजीच्या सहनशक्ती पलीकडील तो आघात होता.भाईजी त्यातून सावरू शकले नाहीत…

श्रीमती पद्मिनी उद्धव घरत. नुकतेच निवर्तलेले वसईचे स्वातंत्रसेनानी,समाजसेवक व ‘वसई विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे’, संस्थापक सदस्य व माजी विश्वस्त उद्धवजी घरत यांच्या धर्मपत्नी. कै. भायजी राऊत यांच्या घराण्यातील व त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या,आज हयात अगदी मोजक्या व्यक्ती पैकी एक.

        आत्याआजीकडून( श्रीमती पद्मिनी घरत)  ऐकलेली, भायजींच्या अखेरच्या दिवसातील ही आठवण ,त्यांच्या शब्दात:

  “अधून मधून भाईजी वजरेश्वरी येथील आपल्या शेतीवर हवापालटासाठी विश्रांतीसाठी जात असत. 1936 सालातील तो जानेवारी महिना असावा. भाईजी वज्रेश्वरीला विश्रांतीसाठी गेले होते.. आणि अचानक एके दिवशी रात्री सर्वत्र निजानीज झालेली असताना गोठ्यात बांधलेली लाडकी जनावरे जोरजोराने हंबरडा फोडून ओरडू लागली.. त्यां गोठ्याला आग लागली होती… त्या दुर्धर प्रसंगी भाई व त्यांच्या गडी माणसांनी प्रयत्नांची शिकस्त करून, प्रसंगी आपले जीव धोक्यात घालून, जळत्या गोठ्यात प्रवेश केला. शक्य तेवढी जनावरे बंधमुक्त केली. बरीच गुरे वाचली . काही गंभीररीत्या भाजली तर दुर्दैवाने काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुमारे 40 जनावरे मृत्युमुखी पडली असावीत असा अंदाज आहे. त्यात भायजींची लाडकी कपिला गाय देखील  होती. भायजींसाठी हा एक जबरदस्त आघात होता…जीवघेणा आघात! भायजीनी आपली सुट्टी आटोपती घेतली.तापाने फणफणलेल्या अवस्थेत ते वसईला आपल्या घरी आले. खूप उपचार झाले. मात्र तापाला उतार पडेना. वैद्य डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्या आजारातून भायजी उठू शकले नाहीत. फेब्रुवारीच्या 8 तारखेला भाईजी गेले.”

      श्रीमती पद्मिनी उद्धव घरत या भायजींना प्रत्यक्ष पाहिलेल्या व आज हयात अगदी थोड्या व्यक्तीपैकी एक आहेत. भायजींचे निधन झाले तेव्हा त्या केवळ आठेक  वर्षांच्या होत्या. वसईचे एक प्रसिद्ध समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी व वसई विद्यावर्धिनी  शिक्षण संस्थेचे, एक संस्थापक सदस्य,माजी विश्वस्त कै. उद्धवजी घरत यांच्या  पत्नी. उद्धवजींचे, हल्लीच काही महिन्यांपूर्वी दुःखद निधन झाले.

   वरील आठवण एकूण मीदेखील खूप कष्टी झालो. वाटले, कदाचित वज्रेश्वरी च्या गोठ्यात ही आग तेव्हा लागली नसती तर… तर भायजींना निश्चितच अजून थोडे आयुष्य मिळाले असते… ज्या मुक्या प्राण्यांनी  त्यांच्या शेती धंद्याची उभारणी होत असतांना, मोलाची मदत केली, ते मुके जीव असे आगीत होरपळून,तडफडत मरतांना पाहून भायजींच्या अंतःकरणाला किती जीवघेण्या  वेदना झाल्या असाव्यात..? कल्पनाच करवत नाही..  ‘मृदुनी कुसुमादपी’  भायजींचे हृदय या घटनेने विदीर्ण न होते तरच नवल!… त्याच  मनक्षोभाने  शरीराला ही ताप झाला असावा आणि तोच ज्वर शेवटी त्यांना घेऊन गेला.भायजींच्या मनीचे अखेरचे शल्य कोणालाच कळले नाही, पुढेही कळणार नाही. आज हे सारे केवळ तर्क आहेत…

  ‘हे विश्वची माझे घर’ अशी ज्यांची वृत्ती व जगातील कोणत्याही आजारासाठी, उत्तमात उत्तम वैद्य हकीम आणून उपचार घेऊ शकण्याएवढी ज्यांची सांपत्तिक परिस्थिती, त्या भायजींना केवळ 68 व्या वर्षीच साध्या तापाने मृत्यू यावा यापेक्षा अधिक दैवदुर्विलास कोणता ?

      भायजींच्या जीवनाचा आलेख मांडताना, भायजी एक व्यक्ती व एक माणूस म्हणून कसे होते  तसेच कोणत्या घटनांमुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली, हेही जाणून घेण्याचा माझा प्रयत्न होता. जन्मताच लक्ष्मीपुत्र असतानाही व आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने वयाच्या पंचविशीतच अमाप संपत्ती जोडून,  पायाशी वैभव लोळण घेत असताना, भायजींना समाजसेवेच्या,’ लष्कराच्या  भाकऱ्या भाजण्याचे’ डोहाळे का लागावेत? याचा उलगडा, ज्याप्रकारे भायजींनी तत्कालीन उपलब्ध संधींचा उपयोग करून,  एक मोठा ‘ जमीनदार व व्यापारी’,,अशी  कीर्ती मिळवली, त्यातून होतो. हे वैभव मिळविताना व मिळविल्यानंतर भोवतालच्या समाजाचे  उघडे-नागडे वास्तव त्यांना जाणवले असावे .’जमीनदार’ व ‘जमीनदारी’, या संज्ञांना प्राप्त झालेले दूषण त्यांना सलू लागले असावे. आपण जमीनदारी तर करायची मात्र ‘एक वेगळा जमीनदार’ म्हणून आपले नाव झाले पाहिजे, असे त्यांना वाटले असावे, आणि त्यातूनच एका सहृदय संवेदनाशील,सक्षम,दानशूर,अशा भायजींचा जन्म झाला असावा असे मला वाटते.

      नवश्रीमंत, जमीनदार वर्गाने पुढे जी दांडगाई व शोषण सुरू केले. त्यामुळे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची, कुळांची मात्र दैन्यावस्था झाली.  धनिक जमीनदार वर्ग एका वेगळ्याच, मस्तीत  वावरू लागला. अफाट जमिनींचे हक्क त्यांचेकडे  आले. शेतकरी कर्जबाजारी झाला व त्यातून अनेक अनन्वित अत्याचारही होऊ लागले. सारा वाढविणे, बेदखली करणे, नजराणे मागणे, असे प्रकार वाढले. भाईजी जरी या वर्गाचे प्रतिनिधी  होते तरी, असंवेदनाशील, असहिष्णू वृत्तीचा स्पर्श त्यांच्या मनाला कधीच झाला नव्हता. किंबहुना इतर व्यवसाय बंधूचे वर्तन त्यांना निश्चितच कुठेतरी अस्वस्थ करीत असले पाहिजे. आपण ही व्यवस्था नाही सुधारू शकलो तरी स्वतःकडून तरी  काही अनुचित घडू नये, कोणावर अन्याय होऊ नये असेच त्यांना मनोमन वाटत होते.. कारण भायजींचे जीवनविषयक तत्त्वज्ञान वेगळे होते. काहीतरी मिळविताना थोडे तरी दिले पाहिजे हीच त्यांची आंतरिक इच्छा होती. भाईजींचा पिंड अध्यात्मिक होता. वाडवडिलांचे संस्कार व ज्ञानोबा, तुकोबांच्या ‘वेचूनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी’, या शिकवणीचा ध्यास मनी सतत वसत होता. म्हणूनच, भायजी जरी एक मोठे जमीनदार होते, तरी,जमीनदारकी मुळे चिकटणारी,तत्कालीन दूषणे, त्यांना स्पर्श करू शकली नाहीत. त्यांच्या आयुष्यातील काही घटना याबाबतीत यांच्या स्वभाववैशिष्ट्यांची  जाणीव करून देतात. 

  आजची राऊतांची पिढी ही भायजी नंतर चौथी व पाचवी पिढी आहे. त्यांतील काही मित्रांशीव  सुहृदांशी बोलून मला भायजी संबंधीत, ज्या काही आठवणी समजल्या त्यावरून भाईजी एक माणूस म्हणून किती श्रेष्ठ होते, त्यांच्याकडे किती दूरदृष्टी होती याची आपल्याला कल्पना येईल.

   त्याकाळी सरकार जमिनीचे लिलाव करीत असे.आणि भायजी सहभागी होऊन अशा जमिनी लिलावात विकत घेत असत. सरकारी उत्पन्न वाढावे, जमिनी लागवडी खाली आल्यामुळे शेतसारा ही वाढावा, व सरकार विषयी जिव्हाळा बाळगणारा एक जमीनदार वर्गही त्यातून निर्माण व्हावा, अशी सरकारची धारणा होती. या जमिनी खूपच अल्प किमतीत मिळत असत व त्या लागवडीखाली आणण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचे ही संपूर्ण साहाय्य प्राप्त होई. 

   भायजींनी त्यावेळी अनेक सरकारी जमिनींचे लिलाव, वसई ,वज्रेश्वरी, भिवंडी,,रिवाळी, या पट्ट्यामध्ये घेतले. सुमारे सातशे ते आठशे एकर जमीन त्यावेळी भायजींच्या अधिपत्याखाली आली. फक्त वसई भागात त्यांचे मालकीच्या, 18 वाड्या त्या वेळी होत्या. यावरून त्यांनी उभारलेले साम्राज्य किती विशाल होते याची थोडीशी कल्पना येईल. त्यात काही संपूर्ण गावे देखील त्यांच्या ताब्यात होती. त्यामुळेच त्यांना शेती व्यवसाय, पानवेली व केळीचा व्यवसाय मोठ्या  प्रमाणात करता आला. त्यांनी स्वतःची पेढी ऊभी केली. मी मागे म्हटल्याप्रमाणे पानवेली उत्पादन व निर्यात या व्यापाराचे भायजी एक सुरुवातीचे उद्योजक होते. या व्यापारात त्यांचे मोठे नाव झाले. पानांचा दर्जाही उत्कृष्ट असल्यामुळे त्यांच्या मालाला उत्तरे कडून खूप मोठी मागणीही आली. आज पाकिस्तानात असलेल्या, पेशावर, कराची पर्यंत ही खायची पाने जात. भायजींना व्यापाराचे निमित्ताने तेथे जावे लागे. मालाचा दर्जा व मेहनत यामुळे त्यांना या व्यापारात खूपच लाभ झाला, धनसंपत्ती जोडता आली. मोठे नाव झाले .

   एवढी सधनता घरात असूनही भाईजी स्वतः मात्र अगदी साधे रहात असत. आपल्या घराचे अंगण व गोठा स्वच्छ करण्याचे काम हातात झाडू घेऊन ते स्वतः करीत असत”. भायजींची साधी राहणी व मिश्कील स्वभाव बद्दलची एक आठवण. भायजींच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे, तत्कालीन अनेक ब्रिटिश अधिकारी वसईतील  त्यांचे घरी येत असत. असाच एक बडा  अधिकारी,  एके दिवशी सकाळी,्यांचे घरी आला. त्यावेळी भाईजी साध्या कपड्यात, हातात झाडू घेऊन आपले अंगण झाडत होते. अधिकाऱ्याने भायजींना विचारले ,”मला भायजी राऊत यांना भेटायचे आहे,ते घरीआहेत काय?”  चेहऱ्यावर नम्रभाव ठेवून, जराही चलबिचल न होऊ देता भायजींनी अधिकार्‍यास ओटी वर, खुर्चीवर बसण्यास सांगितले. ‘मी भायजींना  बोलावितो’,, असे सांगून स्वतः घरात गेले. कपडे बदलून,व व्यवस्थित होऊन पुन्हा ओटीवर आले. अधिकार्याला म्हणाले, ‘सर, मी भायजी, बोला काय काम आहे ?’  मघाशी अंगण झाडणारी व्यक्तीच भायजी राऊत होती, हे उमजून अधिकारीही मनातून थोडा खजील झाला. मात्र भाईजीविषयी असलेला त्याचा आदर ही नम्रता पाहून, द्विगुणीत  झाला असणार यात शंका नाही.

   एवढा मोठेपणा, संपत्ती, प्रसिद्धी मिळवूनही,भायजीचे पाय कसे जमिनीवर होते हे दर्शवणारी ही एक साधी गोष्ट आहे.

   भायजींचे घरातील माणसांशी व कुटुंबीयांशी वागणेही तितकेच आदर्श व नम्र असे.सर्व कुटूंबीय त्यांना अतिशय सन्मान देत. विशेषतः घरातील स्त्री वर्ग, भायजी अंगणांत अथवा ओटीवर असल्यास, कधीही समोरील दरवाजाने घरात प्रवेश करीत नसत. अशावेळी बाई माणसे मागील अंगणातून घरात प्रवेश करीत. भायजीविषयी त्यांना असलेल्या आदराचे हे प्रतीक होते!

    भायजींचे काळी, वाहतुकीचे साधन मात्र बैलगाडी अथवा घोडा हेच असे. कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावर बसून भाईजी प्रवास करीत. तर्खडला भायजींची  मोठी पेढी होती. व तेथूनच केळी व पानवेली निर्यात होत असे.

  ,भायजीनी आपल्या हयातीतच आपल्या अनेक वाड्यांची वाटणी मुलांमध्ये केली होती. काही मेहनती कुळांना, ते कसत असलेल्या वाड्या बक्षिसही देऊन टाकल्या. राऊत कुटुंबाच्या अनेक जमिनी पुढे आलेल्या, “कुळकायद्यामुळे” कुळांच्या मालकीच्या झाल्या.

       अशाच अनेक आठवणीमधून भायजींचा साधेपणा, समाजाकडे पाहण्याची निरपेक्ष वृत्ती व एकूणच जीवनाकडे पाहण्याची तटस्थता दिसून येते.  मात्र भायजींचा साधेपणा म्हणजे त्यांची कमजोरी नव्हती.  शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, ज्या ब्रिटिश सरकारने त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून लोकल बोर्डावर नियुक्त केले होते, त्याच ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा उभा करून, फ्रंटीयर मेलला वसई स्टेशनात थांबा मिळवून देण्यासाठी सत्याग्रह करावा लागला.शेतकरी बंधूंना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कणखर नेतृत्वाचा व रोख ठोक स्वभावाचा हा मासला होय. 

       सोमवंशी क्षत्रिय संघाचे नेतृत्व करताना, या संघाची स्थापना करणे का आवश्यक आहे व भविष्यकालात समाजाची वाटचाल निश्चित कोणत्या दिशेने व कोणत्या उद्दिष्टांसाठी झाली पाहिजे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळे अनेक प्रसंगी कटू व कठोर निर्णय  त्यांना घ्यावे लागले.तरीही,जेव्हा कोणा विद्यार्थ्यांना अथवा समाज बांधवांना,नियमात बसत नसतांनाही मदत करावयाचे प्रसंग येत, तेव्हा भाईजींचा निर्णय, अडल्या नडलेल्याला हितकारक ठरेल असाच असे.

  संघाच्या एका सभेचा,विद्यार्थ्यांना द्यावयाच्या शैक्षणिक मदतीबद्दल चर्चेचा वृत्तान्त, संघाचे तत्कालीन  चिटणीस कै.मदनराव राऊत यांनी स्वहस्ते लिहिला आहे. ऑगस्ट, 1925 मधील त्या  तिमाही सभेच्या वृत्तांताचा कागद,  मित्र श्री प्रमोद पाटील यांच्याकडून  मिळाला. त्याची छायाचित्रे मी या लेखात दिली आहेत. .

    तीन ऑगस्ट 1925 ,तिमाही सभेचा मदन मामा लिखित वृत्तांत. विद्यार्थ्यांना दिलेल्या आर्थिक मदतीच्या परतफेडी बद्दल शंका घेतली असता अध्यक्ष  भायजींचे उद्गार होते “आमचा विद्यार्थी नैतिकदृष्ट्या,मदत फेडीसाठी, संघाशी बांधला गेला आहे, त्यांचेकडून हमीपत्र घेण्याची आवश्यकता नाही…”

    विद्यार्थ्यांना द्यावयाच्या शैक्षणिक मदतीचे संदर्भात चर्चा सुरू असताना, एका सदस्यांनी “ही मदत अनाठाई आहे व म्हणून बंद करावी”, असे मत मांडले. त्यावर भायजींनी  दिलेला खुलासा व दाखविलेला निग्रह, त्यांच्या संवेदनाशील व कोमल अंतकरणाची जाणीव करून देणारा आहे.. मदन मामा लिहितात, “श्री.×××× म्हणाले, ,’या मदतीचा चांगला उपयोग होत आहे असे मला वाटत नाही. संघाकडून घेतलेली मदत परत करण्याबद्दल विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यात येते की नाही किंवा तसे त्यांचे कडून लिहून घेण्यात येते काय?’ या विधानास उत्तर देताना अध्यक्षस्थानी असलेल्या श्री भायजी जगु राऊत म्हणाले, ‘विद्यार्थी हा नैतिकदृष्ट्या संघाकडून घेतलेली मदत परत करण्यास बांधला गेला आहे, त्याचेकडून तसे लिहून घेणे शक्य नाही. शिवाय आपण विद्यादानी करीत असलेली मदत अनाठाई नाही’.

  . श्री गोविंदराव वर्तक म्हणाले ,’शिक्षण प्रसार हेच संघाचे मुख्य ध्येय असल्यामुळे आलेल्या अर्जाचा विचार करणे आपणास भाग आहे. तरी मंडळींनी आलेले अर्ज मंजूर करावे .’ यानंतर हरकत मागे घेण्यात आली व मदत अर्ज मंजूर करण्यात आले.” विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी, पैशापेक्षा, नैतिकता ही महत्त्वाची व त्यायोगे पुढील पिढीला समाजाशी बांधून ठेवणे आज गरजेचे आहे, हा विचार शंभर वर्षापूर्वी रुजविणार-या  कै.भायची जगू राऊत व कै.गोविंदराव धर्माजी वर्तक, यांच्या दूरदृष्टीला व  संवेदनाशीलतेला  सलाम!

  लक्ष्मीपुत्र ,जमीनदार भायजी एक उत्तम समाजसेवक, नेता व संघटनाकुशल व्यक्तिमत्व होऊ शकले याचे कारण त्यांच्या चरित्रात आढळणारे हे असे परस्पर विरोधाभासात्मक प्रसंग आहेत असे मला वाटते.

 31 ऑगस्ट 1925 सालच्या त्या तिमाही सभेच्या वृत्तांताचे हे शेवटचे पान,चिटणीस मदनराव राऊत ,अध्यक्ष भायजी राऊत यांच्या सह्या असलेले. भायजींची सही मोडी लिपीत आहे.

       स्वतःकडे चांगले विचार, शाश्वत अशी तत्त्वे असली व ही तत्त्वे आचरणात आणण्यात सातत्य असले की स्वतःच्या जगण्याचा आशय कळतो. इतरांच्या जगण्याला आकार देण्याची बुद्धी प्राप्त होते. आपले मन नेहमी स्वच्छ आनंदी राहते. बोलण्यात, वागण्यात, विचारात पारदर्शकता येते. वैभव व श्रीमंतीमुळे येणारे नको ते भाकड विचार डोक्यात घोळत नाहीत.  चांगलेच विचार येतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, संपन्न अनुभवाची शिदोरी पदरात पडते. आणि आयुष्याला समर्पक दिशा  मिळते. नव्याने काही तरी आत्मसात करीत राहण्याची ऊर्मी येते. आणि  जगण्याला परिपूर्णता देण्याचा प्रयत्न केला जातो. मला वाटते भायजींच्या 68 वर्षाच्या जीवनाचरणात याच विचारांचे सातत्य दिसते . त्यामुळेच त्यांच्या सुवर्णांकित जीवनाला सेवेचा सुगंध प्राप्त झाला..  म्हणूनच भायजी एक दुर्मिळ व्यक्तिमत्व ठरले.

       भाईजी यांच्या मृत्यूनंतर मार्च 1936 ‘क्षात्रसेवक’, या संघाच्या मुखपत्रात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.भायजींचे नेतृत्व तत्कालीन परिस्थितीत किती अत्यावश्यक होते , याबद्दल सविस्तर लिहिले आहे. सदरहू अंकातील, लेखाच्या दोन पानांचो प्रत येथे जोडली आहे. ती वाचनीय आहेत. त्यात म्हटले आहे ,

  “संघाच्या स्थापनेसंबंधी चर्चा चालली असतांना त्या वेळची समाजाची स्थिती लक्षात घेऊन व आम्हा पेक्षा जगाचा जास्त अनुभव असल्यामुळे, त्यांना त्यावेळी दिसत असणाऱ्या अडचणी त्यांनी आम्हापुढे मांडण्यास कमी केले नाही. तथापि त्यांच्या सारखा कर्तबगार माणूस निराशावादी असणे शक्यच नाही अशी आमची खात्री असल्याने, भायजी शेठ ची मदत संघाला योग्य वेळी, पूर्णपणे लाभणार अशी खूणगाठ आम्ही आमच्या मनाशी बांधून ठेवली होती. त्याप्रमाणेच घडून आले. स्वयंसेवक मंडळाच्या प्रयत्नांना व्यवस्थित स्वरूप येत जाऊन श्री गोविंदराव संघाच्या प्रमुखपदी आहेत असे पाहिल्यावर, त्यांना संघाच्या यशा संबंधाने शंकित राहण्याचे कारण राहिले नाही .चांगल्या समाज कार्यात मदत करण्याची भावना ही प्रत्येक कर्तबगार माणसाच्या ठिकाणी आढळून येते ती त्यांच्या ठिकाणी जागृत होती. ते संघाच्या आग्रहावरून धुरीण बनले ते त्यांच्या अखेरपर्यंत होते.”

 यावरून भायजींना त्या परिस्थितीत पर्याय नव्हता. त्यांनीही गोविंदराव वर्तक यांच्या आग्रहावरून नेतृत्व स्वीकारले,  यशस्वी करून दाखविले

  कै.भायची जगू राऊत यांच्या फेब्रुवारी 1936 साली झालेल्या निधनानंतर ,संघाचे मुखपत्र ,”क्षात्रसेवक”,मार्च 1936 च्या अंकात त्यांना श्रद्धांजली वाहण्यारा हा लेख.या वरून तत्कालीन परिस्थितीतील भायजींचे नेतृत्व व कर्तृत्व अपरिहार्य  होते याची कल्पना येईल सौजन्य विनय राऊत.

         माझ्या या लेखातील अनेक संदर्भ कै. भास्करराव रघुनाथ राऊत यांनी लिहिलेल्या “राऊत घराण्याचा इतिहास”, पुस्तकातून मिळाले. ते मिळवून देण्यासाठी मित्रवर्य विनय राऊत, वसई, संघाचे माजी चिटणीस व सहकारी, श्री.भार्गव चौधरी वसई; सध्याचे संघ चिटणीस श्री प्रफुल्ल म्हात्रे,आगाशी; मित्रवर्य श्री जगदीश राऊत,वसई यांनी खूपच मदत केली आहे. लेखांतील  छायाचित्रे विनय यांनी खूप आस्थापूर्वक, तत्परतेने उपलब्ध करून दिली. संघाच्या मागील सभांचे वृत्तांताची प्रत मित्रवर्य व सध्याचे संघ खजिनदार श्री प्रमोद पाटील यांचेकडून मिळाली. या माझ्या सर्व मित्रांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देणे माझे कर्तव्य समजतो. विशेष नमूद करण्यास आनंद वाटतो की श्री जगदीश राऊत व श्री विनय राऊत हे  कै. भायजी जगू राऊत यांच्या पुढील पिढीचे सध्याचे वारसदार असून वसई निवासी आहेत.

      कै.भायजींपासून स्फूर्ती घेऊन, कुटुंबातील समाजसेवेचा वारसा पुढे चालविणाऱ्या, आमच्या सो संघात चिटणीस व विश्वस्त म्हणून महत्त्वाचे योगदान देणाऱ्या, कै. भास्करराव राऊत यांच्याविषयी दोन शब्द लिहिणे येथे अप्रस्तुत करू नये.

राऊत घराण्याचा इतिहास चार खंडात लिहिणारे,सो क्ष संघाचे माजी विश्वस्त, कै. भास्करराव राऊत.

     कै.भायजी जगू राऊत, यांचेच राऊत घराण्यातील पुढच्या पिढीत, भास्कररावांचा जन्म 27जुलै 1906 रोजी झाला. हे प्रथमपासूनच अत्यंत हुशार व तल्लख बुद्धीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे यांनी बी ए ,एल एल बी,उच्च शिक्षण पूर्ण करून एक ख्यातनाम वकील म्हणून  परिसरात ते कार्यरत होते. संघाचे तत्कालीन नेतृत्व कै. अण्णासाहेब वर्तक, कै. भास्करराव पाटील यांनी केलेल्या आवाहनामुळे भास्करराव संघाच्या कार्यात रस घेऊ लागले. अण्णासाहेब व तात्यासाहेब चुरी,आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाने ते संघाच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले. सुमारे चाळीस वर्षे सोमवंशी क्षत्रिय संघात प्रमुख कार्यकर्ता म्हणून त्यांनी कार्य केले. संघाचे चिटणीस आणि संघाचे ट्रस्टी म्हणून ते कार्यरत होते. सन मे 1965 मध्ये झालेल्या तारापूर येथील वार्षिक परिषदेचे भास्करराव अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्थापनेपूर्वी व संघाच्या स्थापनेनंतर समाजाचा कसा विकास होत गेला हे अत्यंत सुंदररित्या  विदीत केले. जुन्या व नव्या जीवनमानाचा आढावा घेऊन समाजात ऐक्य, वृद्धि, शिक्षण प्रसार व सौख्य निर्माण झाल्या कारणाने, पंचवीस वर्षात समाजाची झपाट्याने सर्वांगीण उन्नती कशी होऊ शकली व समाज एका श्रेष्ठ दर्जा प्रत कसा पोहोचला याचा त्यांनी अभ्यासपूर्ण आढावा घेतला.

   संघकार्याव्यतिरिक्तही भास्करावांनी, सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात आपले मौलिक योगदान देऊन तेथेही आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. जिल्हा स्कूल बोर्डाचे पाच वर्षे ते सरकार नियुक्त सभासद होते.

   विशेष म्हणजे भायजींच्या आग्रहामुळेच भास्करराव पुण्याला जाऊन कायद्याचा अभ्यास करू शकले. त्याच वेळी कै.अण्णासाहेबा वर्तकांचे  चिरंजीव  हरिभाऊ उर्फ भाऊसाहेब वर्तक हे त्यांचे लाॅ कॉलेजमधील सहाध्यायी होते. हा देखील एक विलक्षण योगायोगच! भास्कररावांचे जीवन कार्य इतके विस्तृत व सखोल आहे की त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. त्यांच्याही स्मृतीला मी आदरांजली वाहतो.

      आपल्या उद्योगधंद्यातून धनसंचय करून, त्याग व उपभोग दोहोंचाही समन्वय आपल्या आयुष्यात साधला. भाईजींनी स्वतः ऊभी केलेली ही वास्तू, त्यांच्या स्मृतीची आजही आठवण करून देते.

    सुरुवातीला मी विशद केल्या प्रमाणे, आमच्या उपनिषद, गीतेचे तत्वज्ञान, ‘सर्व जग ईश्वरमय आहे, त्याचा त्यागपूर्वक उपभोग घ्यावा, अपहार करू नये,’ असे सांगते.  उपभोग घेण्यासाठी, धनसंपत्ती जोडून वैभवसंपन्न होण्यास ही विरोध नाही. फक्त त्यात गुंतू नका; त्यागाचीही भावना मनात असलीच पाहिजे असेही सांगते.

  हाच एकात्मतेचा साक्षात्कार आहे. सामान्य संसारी  माणूस देखील जीवन व्यवहार करीत असताना, संवेदना बुद्धी ,आत्मीयता ,ॠजुता,व ‘आपल्या सौख्यभरल्या रांजणातून, ओंजळभर सुख दुसऱ्याला देण्याची दानत’,  दाखवत असेल, तर तोसुद्धा   ज्ञातेपणाची आत्मप्रचीती घेऊ शकतो! भायजींनी गीता, उपनिषदे वाचली होती किंवा कसे मला माहीत नाही. त्यांच्या चरित्रात तसा कुठे उल्लेख दिसला नाही. मात्र भायजींचे संपूर्ण जीवन म्हणजे गीतेचे तत्वज्ञान  प्रत्यक्षात जगलेल्या एका जीवनाचा वस्तुपाठ आहे, याची जाणीव होते.

   जो ज्ञान व कर्म हे दोन्ही एकत्र जाणतो, तो कर्माने मृत्यू टाळतो व ज्ञानाने अमर होतो

भायजी आपल्या, ‘प्राप्तव्य ज्ञानाने, अमर झाले असे मला वाटते.  भायजी वा त्या काळांतील समाजांतील अनेक सेवाभावी समर्पित समाजसेवकाएवढे नाही, तरी  स्वतःच्या कुवती,आवडीनुसार ,आम्हा प्रापंचिक माणसांनाही, आयुष्य जगताना, मनापासून ,समाजासाठी काहीतरी करता येऊ शकते. जबाबदारीच्या जाणिवेतून प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करावे.अगदी जेवढे, जसे जमेल तेवढे !

सध्याच्या काळात बिल गेट्स, वॉरन बफे आदींनी आधी संपत्ती केली आणि नंतर आता त्याचा समाजासाठी उपयोग करीत आहेत.. अनेकांना प्रेरणादेखील देत आहेत.. 

वास्तवीक (गेट्स-बफे सारखे) असे काम आपल्याकडे देखील पुर्वी चालावयाचे. पण नंतर “राजा कालस्य कारणम” झाले का “पैसा कालस्य कारणम” झाला माहीत नाही, स्वार्थ, अनास्था, व्यवस्थेवरील अविश्वास,… कारणे काही असोत पण असे वाटते की एक अब्जांच्या आमच्या देशात, तुलनेने तेव्हढी समाजसेवेची वृत्ती वाढली नाही.. उलट लुप्त होत चालली आहे,असे दिसते!

     भायजी  नेहमी म्हणत,”मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये”.

  भायजी आणि त्यांच्या तत्कालीन सर्व साथींनी तशी संधी, शंभर वर्षांपूर्वी घेऊन,आमचे आजचे जीवन सुंदर करण्यांत हातभार लावला आहे. म्हणून आम्ही त्या सर्व धुरीणांचे आज कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे अत्यावश्यक आहे. भाईजी जगू राऊत व त्यांच्या सर्व तत्कालीन सहकाऱ्यांना आदरपूर्वक त्रिवार वंदन.प???

     संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात ,भाईजींच्या जीवनाचे सार सामावलेले आहे,असे मला वाटते.म्हणून शेवटी, तुकोबांच्या एवढ्या ओळी उद्धृत करून लिखाण संपवितो व भायजींना विनम्र श्रद्धांजली वाह

जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ! उदास विचारें वेच करी !!1!!

उत्तम चि गती तो एक पावेल ! उत्तम भोगील जीव खाणी !!२!!

भूतदया गाईपशूचे पालन ! तान्हेल्या जीवन वनामाजी !!3!!

शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट ! वाढवी महत्त्व वडिलांचे !!4!!

तुका म्हणे हे चि आश्रमाचे फळ ! परमपद बळ वैराग्याचे

   प्रसिद्ध राऊत वाड्यात भायजींचे विराजमान तैलचित्र. बोर्डीचे सिद्धहस्त चित्रकार, कै. जगन्नाथ दामोदर पाटील यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेले..

 लेखक: दिगंबर वा.राऊत.

माजी कार्यकारी विश्वस्त, सो.क्ष.संघ फंड ट्रस्ट, 

“वामनाई”, घोलवड. 

.