मातृहृदयी, समर्पित समाजसेवक, कै. शांताराम दाजी पाटील, अण्णा

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांची पसायदान म्हणजे प्रसाददान किंवा कृपेचे दान मागितले आहे. ज्ञानेश्वरी हा एक वाग्यज्ञहोता. ह्या वाग्यज्ञाने विश्वात्मक देव संतुष्ट व्हावा आणि त्याने मला पसायदान द्यावे, अशी प्रार्थना ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. ह्या पसायदानात विश्वात्मक देव, श्री विश्वेश्वराव ह्या शब्दांनी ज्ञानेश्वरांनी त्यांचे गुरू निवृत्तिनाथ ह्यांचा निर्देश केला आहे, असे दिसते. ह्या पसायदानात ज्ञानेश्वरांनी व्यक्तिशः स्वतःसाठी म्हणून काहीच मागितलेले नाही. त्यांची प्रार्थना सर्व प्राणिजातांसाठी आहे.
सर्वांमध्ये जीवाभावाची मैत्री निर्माण व्हावी, जो जे वांछिल ते त्यालामिळावे जे चंद्रासारखे आहेत, पण ज्यांच्यावर चंद्रावर असतो तसा कलंक नाही, जे सूर्य आहेत, पण ज्यांचा ताप जगाला होत नाही, त्यांच्याशी सर्वांचे नाते जडावे, अशी विनवणी त्यांनी केली आहे. विश्वकल्याणासाठी केलेली ही प्रार्थना विश्वेश्वरावाने मान्य केल्याचे म्हटल्यामुळे ‘ज्ञानदेवो सुखिया झाला’ असे त्यांनी म्हटले आहे.
शंभर वर्षापूर्वी गावाच्या परिसरात शिक्षणाची कोणतीच सोय नसताना शिक्षणप्रसार हे आपले जीवनाचे ध्येय ठरवून, मॅट्रिक झाल्यावर उत्तम नोकरी मिळत असतानाही, एका लहान इंग्रजी क्लासच्या रूपाने शिक्षण दानासाठी, एक मिणमिणती पणती लावून, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात, स्वतः झिजून, इतरांना सुगंध देणाऱ्या चंदन वृक्षाप्रमाणे व्रतस्थ जीवन जगलेल्या, शांताराम दाजी पाटील ,ऊर्फ अण्णा यांचे जीवन म्हणजे आपला समाज व परिसर यांचेसाठी सतत काहीतरी करीत राहून, सद्विचार व मार्गदर्शन यांच्या रूपाने, काहीतरी देत राहणार-या एका स्थितप्रज्ञाचा यज्ञ होता. सर्वांचे भले व्हावे, कल्याण व्हावे, ज्याच्यासाठी जे काही करता येईल ते करावे, असा त्यांचा सतत प्रयत्न होता. “सर्वे सुखिनः सन्तु”, हेच पसायदान त्यांनीही जगन्नियंत्याकडे मागितले व त्यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले. यांच्याविषयी आज काही सांगावयाचे आहे.
कै. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील, तात्यासाहेब चुरी स्मारक विद्यार्थी वसतिगृहात एक विद्यार्थी व तद्नंतर वसतिगृह रेक्टर म्हणून, एकूण सहा वर्षे वास्तव्यात, ज्या महान समाजसेवकांची जवळून ओळख झाली, प्रेमळ सहवास मिळाला, ज्यांनी मोठ्या मायेने माझ्या पाठीवर हात फिरवून, उद्बोधन केले, त्यातील एक शांताराम अण्णा! विशेषतः मी पू. तात्यासाहेब चुरी वसतिगृहाचा रेक्टर असताना त्यांना खूप जवळून पाहता आले. त्यावेळी ते सो क्ष संघाचे उपाध्यक्ष होते. कधी संघाचे कामानिमित्त दादरला आल्यास व मुक्कामास राहावे लागल्यास, माझ्याच खोलीत आम्ही पथारी टाकून झोपत असू. त्यावेळी ज्या गप्पा होत, त्यातूनच त्यांच्या बुद्धिमत्ता, अफाट वाचन, निगर्वि स्वभाव, संघाचे आद्यसंस्थापक व एकूण समाज बांधव यांचेप्रति असलेली निष्ठा, याचे मला खूप जवळून दर्शन झाले. आज पन्नास वर्षानंतर जे काही आठवते आहे, ते देखील अद्भुतवाटते.. अण्णांचे चिरंजीव व माझे मित्र,श्री. कृष्णदत्त यांनी दिलेली बहुमोल माहितीसुद्धा मला उपयोगी पडली आहे. अण्णांच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक अशा विविधांगी पैलू बद्दल अनेकांना माहिती आहे. मात्र त्यांच्या कौटुंबिक व वैयक्तिक आयुष्यातील अनेक सुखदुःखाचे प्रसंगां विषयी मलाही जाण नव्हती. कृष्णदत्तांनी ही माहिती देऊन अण्णांच्या सर्व चहात्यांवर उपकारच केले आहेत. माझा स्वतःचा,अण्णांविषयी असलेला आदर्श त्यामुळे शतगुणित झाला.
समाजाला योगदान तर खूप समाजसेववक देतात. मात्र स्वतः दुसःह परिस्थितीचे चटके सोसून, इतरांनी सुखी व्हावे म्हणून जे जगतात त्यांना मानाचा मुजरा केलाच पाहिजे! आणि अण्णांचा तो निश्चितच हक्क आहे.
माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सन्माननीयांबद्दल लिहितांना, त्यांचे जीवन कार्य, समाजसेवा, विद्वत्ता ,यांबरोबरच, एक व्यक्ती एक कुटुंब घटक, एक माणूस म्हणून कशी होती, माझ्या व्यक्तिगत संबंधामुळे मला कशी वाटली, कुटुंबातील पुढच्या पिढीला काय वाटते इत्यादि जाणून घेण्याचा व लिहावयाचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. अण्णांचे बाबतीतही मी तसेच केले. त्यांचे चिरंजीव व माझे मित्र श्री. कृष्णदत्त यांनी जी बहुमोल माहिती व सहकार्य केले यामुळेच हे शक्य झाले.
कृष्णदत्तानी अण्णांच्या एकूण कौटुंबिक पार्श्वभूमीची, मला व अनेकांना बरीच अज्ञात असलेली माहिती दिली.
“अण्णांचे वडील – कै. दाजी रघुनाथ पाटील, शेतकरी व त्या काळी vernacular फायनल पर्यंत शिक्षण, चांगले लेखक व कीर्तनकार.
आई- कै. सखु दाजी पाटील गृहिणी. अण्णांचा जन्म 21 फेब्रुवारी 1910.
पत्नी- कै. शालिनी शांताराम पाटील. केळवे येथील कै. नाना घरत यांच्या कुटुंबातील विठ्ठल घरत यांची जेष्ठ कन्या. अण्णा, घरत कुटुंबियांचे मोठे जावई होते. आईचे शिक्षण ४थी पर्यंत. १९९६ साली निधन.
अपत्ये- मुलगे- नंदकुमार व रवींद्र. मुलगी – जयश्री यांचे अकाली देहावसान.
मुलगी, सुमती-लग्न होऊन विरार येथे राहते. पती निवर्तले. दोन मुलगे त्यांची लग्न झाली आहेत. नातवंडे आहेत.
मुलगी, कु. जयप्रभा-अविवाहित, शेती करते.
पुत्र ,श्री. कृष्णदत्त-३८ वर्षे मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी करून ऑक्टोबर २०१८ मध्ये सेवानिवृत्त. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला क्रीडा आदी सर्व क्षेत्रांमध्ये सहभाग.
स्नुषा. कांचन. माहीमच्या शाळेत शिक्षिका आहे.
नात सलोनी -B.Pharm आहे.
कन्या सौ. उल्का लग्न होऊन बोर्डी येथे राहते.”

    अण्णांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त , जावई श्री. गजानन राऊत व सर्व कुटुंबीयांसमवेत त्यांचे छायाचित्र.  मागे उभे असलेले उजवीकडून दुसरे, कृष्णदत्त .

“अण्णांनी कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर, कै.बाबुराव वामन पाटील, कै. जनार्दन नथू पाटील व कै. भास्कर वर्तक यांना सोबत घेऊन पान वेलीच्या खायच्या पानाचा व्यापार सुरू केला. समाज कार्यासोबत, व्यापाराच्या निमित्ताने ते थेट काबुलपर्यंत अनेक वेळा गेले होते व मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांमध्ये उलाढाल होत गेली . त्यातूनच शेती व बागायतीसाठी जमिनी खरेदी केल्या. त्यामुळे आम्हा एकत्र कुटुंबाची व्यवस्थित गुजराण होऊ शकली. त्या व्यापाराचा फायदा अण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहीम हायस्कूल शाळा व विविध कार्यकारी सोसायटीस मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन करून दिला, हे नमूद करणे गरजेचे वाटते. अण्णा स्वतः शेतकरी होते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा शेतकरी हितासाठी जास्त वापर केला. स्वतः संपूर्ण भारतभर भ्रमंती केल्यानंतर शेतकऱ्यांना विशेष सवलत मिळवून त्यांनी “भारत दर्शन किसान स्पेशल” ह्या नावाने सहली काढल्या आणि अत्यंत कमी खर्चात व अनुदान घेऊन शेकडो शेतकरी कुटुंबांना भारत दर्शनाचा लाभ मिळवून दिला. ह्या प्रत्येक सहलीत राष्ट्रपती भवन व पंतप्रधान निवासस्थान यांना भेटी असत आणि राष्ट्रपती व पंतप्रधानांसमवेत फोटोही. पंडित जवाहरलाल नेहरूं सोबत हस्तांदोलन करणारी कदाचित आपल्या समाजातील ते एकमेव व्यक्ती असतील.”
“स्वातंत्र्योत्तर काळात पानाचा व्यापार फाळणीमुळे बंद करावा लागला आणि त्याकाळी लाखो रुपये पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये बुडाले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण लक्ष आपला सो.क्ष. संघ, माहिमची शाळा व सोसायटी मध्ये घातले . सर्व ठिकाणी आणि मोठी पदे पण भूषवली.”

कृष्णदत्त पुढे म्हणतात,
“वर उल्लेखिलेल्या प्रमाणे तीन मुलांचा अकाली मृत्यू आणि १९७० च्या दरम्यान एकत्र कुटुंब विभक्त झाले. आम्ही भावंडे लहान होतो व शिकत होतो.. आणि थोड्याशा वाडीवर सहा जणांच्या कुटुंबाचा भार त्यांना सोसावा लागला. ह्याच दरम्यान संघाच्या सुवर्णमहोत्सवाआधी त्यांच्याकडून मुख्य चिटणीस पदाचा भार काढून घेतला. नाईलाजाने त्यांनी राजीनामा देऊन एक सामान्य प्रेक्षक म्हणून बोर्डीतल्या कार्यक्रमास ते उपस्थित राहिले .१९७२ ते १९८२ हे दशक सर्वार्थाने त्यांचे वाईट गेले. अवहेलना, अपमान, प्रचंड आर्थिक ओढाताण ह्या सर्व गोष्टींमध्ये समाजाचे दुसरे रूप त्यांनी अनुभवले. परंतु पांडुरंग, व श्रीरामावर अढळ श्रद्धा, ज्ञानेश्वरी, भागवत व इतर धार्मिक ग्रंथांची पारायणे आणि संकल्पित दशावताराचे लिखाण यांनी त्यांना तारून नेले. मुलगा कृष्णदत्त बीपीटी मध्ये नोकरीला लागल्यानंतर आर्थिक ददात संपली. त्यातच १९८३ साली मोठ्या बहिणीचे लग्न झाले. त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस ही कुटुंबाने व समाजाने साजरा केला. ह्याचे त्यांना मनस्वी समाधान वाटले. चिटणीस पदाचा संघाचा राजीनामा दिल्यानंतर भाऊसाहेब वर्तक यांनी त्यांना अक्षरश: गळ घालून उपाध्यक्ष केले . त्यांचे लिखाण प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. लोकसत्ताचे संपादक कै. माधव गडकरी यांनी दोन-तीन प्रकाशकांकडे त्यांच्या लिखाणाची शिफारस केली होती. तत्कालीन साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष कै. विद्याधर गोखले यांच्याकडे प्रयत्न केले व अनुदानासाठी काही मार्ग निघेल यावर विचार विनिमय केला होता. पण त्यांच्या अकाली निधनाने तोही मार्ग बंद झाला. नंतर मी नवीन घर बांधले तेव्हा वास्तुशांती निमित्त अण्णांच्या भगवद्गीतेच्या मराठी ओवीबद्ध अनुवादाचे पुस्तक तयार करून कै. लक्ष्मीकांत मंत्री सर, प्राचार्य सोनोपंत दांडेकर कॉलेज पालघर;मा. नवनीत भाई शहा, माजी आमदार, मा.श्री. केसरीभाऊ पाटील संघाचे अध्यक्ष, कै. चिंतामणराव वर्तक व कै. दामोदर सावे सर ह्या दिग्गजांच्या उपस्थितीत प्रकाशन केले. त्यावेळी ह्या कार्यक्रमाला माहीम गाव व समाजातील अण्णांचे अनेक चाहते आवर्जून उपस्थित होते.”

“समाजातील सर्व थरांमध्ये त्यांची उठबस असे. आपल्या समाजाव्यतिरिक्त क्षात्रैक्य समाजासाठी त्यांचे भरीव योगदान होते. व त्याच्या घटनेचे ते प्रमुख शिल्पकारही होते. आपल्या समाजाच्या व्यतिरिक्त इतर सर्व समाजाच्या कार्यक्रमात त्यांना कायम आमंत्रण असे.

माजी आमदार कै. मारोतीराव मेहेर त्यांना गुरुस्थानी मानत. आपल्या संपूर्ण हयातीत कै. मुकुंदराव सावे व त्यांचे कुटुंबीय यांचे ऋण ते आयुष्यभर मानीत राहिले आणि हिंडते फिरते असेपर्यंत कै. श्याम नानांच्या घरी भाटावर(बोर्डी) येथे त्यांचे येणे जाणे असे आणि त्या कुटुंबानेसुद्धा अण्णांच्या पश्चातही हे संबंध कायम ठेवले आहेत. समाजाबाहेरील अनेक मोठ्या नेत्यांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बोर्डी ते वसई येथील प्रत्येक घर त्यांनी संघाच्या कामानिमित्त पालथी घातली होती. त्याचा प्रत्यय मला अण्णा गेल्यानंतर कित्येक वर्षे येत राहिला. विस्तार भयास्तव जास्त उदाहरणे देता येत नाही”.
कृष्णदत्त यांनी पुढे सांगितलेली एक आठवण थक्क करणारी आहे !
“दातिवरे येथील एका मुलाची अण्णांनी शिक्षणाची सोय केली होती व तो पुढे मोठ्या हुद्द्यावर गेला. एका अंत्ययात्रेसाठी तो गृहस्थ आणि मी एकाच रिक्षातून येताना सहज गप्पा मारताना ओळख झाली. आणि त्या निवृत्त माणसा जेव्हा कळले मी अण्णांचा सुपुत्र आहे त्याने माझे सर्वादेखत अक्षरशः पाय धरले. आणि सांगितले की,” तुझ्या वडिलांमुळे माझे जीवन घडले. ” कृष्णदत्तांचे अंतकरण भरून न येते तरच नवल!

“कै.अण्णा १४ फेब्रुवारी १९९० रोजी देह सोडून पांडुरंग चरणी विलीन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला व शोकसभेला ही प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता! त्यांच्या अफाट कर्तुत्वाला ही दाद होती.”
कृष्णदत्तांनी सांगितलेल्या या आठवणी ऐकल्यावर मंगेश पाडगावकरांच्या या ओळी सहज ओठावर आल्या..
अण्णांच्या जीवनाचे तत्वज्ञान त्यातून आपल्याला मिळावे…
“व्यथा असो आनंद असू दे,
प्रकाश किंवा तिमिर असू दे,
वाट दिसो अथवा न दिसुदे,
गात पुढे मज जाणे ,माझे जीवनगाणे…..”
मला वाटते अण्णांचे जीवितकार्य व जीवनसार त्यात सामावलेले आहे.
1927 साली, बोर्डी हायस्कूलमधून ते मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तम प्रकारे पास झाले. माहीम गावातील पहिले मॅट्रिक. कै. पूज्य आचार्य भिसे, पूज्य चित्रे गुरुजी, व पूज्य आत्माराम पंत सावे गुरुजी यांच्या सहवासात व त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे, त्यांच्या भावी आयुष्यातील त्यागमय जीवनाची मुहूर्तमेढ तेथे रोवली गेली. त्याग हेच जीवनाचे ध्येय शिक्षण काळातच ठरविले!
अण्णांना सरकारी व इतर नोकऱ्याही सहज मिळू शकत होत्या. पण नोकरी करायची नाही, सरकारी नोकरी तर अजिबात नाही, अशी शपथ घेतल्याने त्यांनी गावात इंग्रजी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून, एक इंग्रजी क्लास काढला. स्वतः नाममात्र मानधन घेऊन शिक्षकाचे काम केले. थोड्याच दिवसात प्लेग व अपुरी विद्यार्थीसंख्या यामुळे क्लास बंद पडला. उत्पन्न बंद झाले. त्याही परिस्थितीत संसार गाडा चालविला.

                      सौ. व श्री.भुवनेश महाराज किर्तने.

त्यांचे क्लासमधील एक विद्यार्थी श्री. भुवनेश किर्तने यांनी मित्रांच्या सहकार्याने गावात इंग्रजी शाळा सुरू केली. अण्णांनी त्या संस्थेत पदाधिकारी म्हणून काम केले. स्वतः पदरमोड करून, कठीण परिस्थितीतही शाळा चालू ठेवली. काही वर्गही बंद पडले. सरकारी अनुदान अपुरे पडू लागले. शाळा चालवणे कठीण झाले. अशा वेळी थोडे बिनव्याजी कर्ज संस्थेस देऊन, गावातून वर्गणी जमा करून अण्णांनी संस्था टिकविण्यास मोठा हातभार लावला. या संस्थेच्या स्थापनेत व वृद्धिंगत होण्यात अण्णांचा सिंहाचा वाटा होता. पुढे गावातील शाळा सुस्थितीत आल्यावर, परिसरांतील दातिवरे, उमरोळी भागात अनेक शाळा सुरू केल्या. संस्थेच्या घटना तयार करून दिल्या, विनामूल्य रजिस्ट्रेशन मिळवून दिले. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अण्णांनी सतत शिक्षणाकरता प्रोत्साहन दिले. ज्ञाती बांधवांना संघाकडून आर्थिक मदत ही मिळवून दिली.” मी शिकलो,आता पुरे” ही भावना न ठेवता, “आपण शिका व त्यासाठी मी तुम्हाला हवे ते साहाय्य करण्यास तयार आहे”, ही वृत्ती त्याकाळीच नव्हे, आजही किती लोकांत असेल? अण्णांचा मोठेपणा तिथेच जाणवतो.

शैक्षणिक काम करीत असताना सामाजिक योगदान देण्यात ही अण्णा मागे राहिले नाहीत. 1928 साली, सो क्ष संघाच्या माहीम शाखेचे चिटणीस झाल्यापासून ते आपल्या अखेरच्या दिवसापर्यंत अण्णा संघाशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संबंधित राहिले. सुमारे 28 वर्षे संघाचे चिटणीस, मुख्य चिटणीस व उपाध्यक्ष या पदावर त्यांनी खूप मोलाचे योगदान दिले. 1981 मध्ये माहीम येथे झालेल्या संघाच्या हिरक महोत्सवाचे ते स्वागताध्यक्ष होते. क्षात्रैक्य परिषदेच्या पहिल्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, व त्यानंतरही परिषदेच्या अनेक उपक्रमात अण्णांनी महत्त्वाचा वाटा उचलला. आपल्या अनुभवाने, मोलाचे सल्ले दिले. कामासाठी खूप भ्रमंतीही केली.

 अण्णांनी आयोजित केलेल्या, ‘किसान स्पेशल’, यात्रेदरम्यान दिल्ली येथे पंतप्रधान इंदिरा गांधी व इतर सहकाऱ्यांसमवेत

आपल्या माहीम गावातील सहकारी संस्थेचे सहा वर्षे चेअरमन व खरेदी विक्री संघाचे सहा वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम करताना, गावाकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले नाही. क्रेडिट सोसायटीला अखेरपर्यंत बहुमोल सल्लाही देत राहिले.

के.माहीम सहकारी सोसायटीतील अण्णांचे योगदान अगदी प्रथमपासून. वरील छायाचित्रांत त्यांचे सहकारी दिसत आहेत. शेजारीकै. नानाजी राऊत व कै. चिंतामणराव वर्तक.

बोर्डीमध्ये आचार्य भिसे, चित्रे गुरुजीं कडून शिक्षणाची दीक्षा घेतलेल्या अण्णांना स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहणे शक्यच नव्हते. अगदी 1928 पासून स्वयंसेवक म्हणून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी गावोगावी प्रभात फेऱ्या काढणे, सभा बोलावणे, त्यांची व्यवस्था ठेवणे अशी कामे केली. माहीम गावात,’ न्यायदान, पंच मंडळ’, स्थापन केले. मंडळातर्फे गावातील तंटे, भांडणे, स्थावर व जंगम मिळकतीचे वाद व तक्रारी मिटविल्या. ‘गावातील वाद गावच्या वेशीबाहेर जाता कामा नये’, यावर त्यांचा कटाक्ष असे. गावात ‘मद्यपान प्रतिबंधक मंडळ’, स्थापन करून त्यांनी गावकरी विशेषतः, तरुण मंडळी , यांना मद्यपानापासून दूर राहण्याचा मनोमन सल्ला दिला. अगदी 1928 पासूनच अण्णा पालघर तालुका काँग्रेसचे मुख्य चिटणीस म्हणून काम करू लागले होते. 1946 ते 48 पर्यंत ते माहीम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी होते. त्या कालावधीत जी अनेक उल्लेखनीय कामे त्यांच्या हातून झाली, त्याची आजही लोक साक्ष देतात! योगायोग म्हणजे15ऑगस्ट 1947साली ,भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी, भारतीय तिरंगा, सरपंच म्हणून बहुमानाने फडकविण्याचे भाग्य अण्णांना मिळाले.

आपल्या राजकीय कारकिर्दीत, अण्णांनी काँग्रेस पक्षातर्फे, जिल्हा परिषद ठाणे करिता, केळवा माहीम विभागातून निवडणूक लढविली. अंतर्गत वाद, मतभेद व काही मतलबी लोकांनी केलेला असहकार, यामुळे या निवडणुकीत ते पराभूत झाले. तरीही ही हार मोठ्या मनाने स्वीकारून आपल्या समाजोउपयोगी कार्यात त्यांनी पुढेही कसूर केली नाही.
सुशिक्षित, सुसंस्कृत अण्णांकडून सांस्कृतिक क्षेत्र दूर राहणे अशक्य होते. त्या काळांतील, पालघर तालुक्यातील, सर्व धर्मीय सर्व पक्षीय व सर्व जातीय, अशा 60 वर्षावरील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ अण्णांनी घडवून आणला. यासाठी तत्कालीन विधानसभा सभापती बाळासाहेब भारदे व पूज्य आचार्य भिसे ही मंडळी खास विनंती करून आमंत्रित केली. त्यासर्व व्यक्तींचा परिचय करून देणारे “संध्याछाया”, हे पुस्तक अण्णांनी लिहिले. परिसरातील शेतकऱ्यांना भारत दर्शन घडवण्यासाठी काही किसान स्पेशल यात्रा, शासकीय अनुदानासह आयोजित केल्या. कै.बाबासाहेब दांडेकर सत्कार समितीचे चिटणीस म्हणून त्यांनी,’ पालघर तालुका चित्रमय दर्शन’, या पुस्तकाच्या प्रकाशनात बहुमोल सहकार्य केले आहे.

पालघर तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार त्या काळी अण्णांनी घडवून आणला. विधानसभेचे सभापती बाळासाहेब भारदे याप्रसंगी मुख्य पाहुणे म्हणून बोलाविले.त्या प्रसंगीचे हे दुर्मिळ छायाचित्र

शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, राजकीय अशा अनेक क्षेत्रात मुशाफिरी केलेले अण्णा मनाने मात्र एक सृजनशील लेखक व कवी होते. त्यामुळे शारदेची उपासना करण्यापासून ते कसे दूर रहातील? ‘भगवान श्री. विष्णू दशावतार कथा’, (पद्य)हा 96 अध्यायांचा व 17040 ओव्यांचा ग्रंथ मराठी भाषेत पहिल्यांदाच अण्णांनी सिद्ध केला आहे. त्याचा गद्य अनुवाद, ‘भगवंताचे विविध अवतार’, या नावाने केला आहे. भगवद्गीतेवरील ओवीबद्ध अनुवादही केला आहे. तो अंशतः प्रसिद्ध झाला आहे, असे मला समजले .
अण्णांचे मराठी, इंग्रजी भाषेवर एवढे प्रभुत्व होते की तालुक्यातील व परिसरातील अनेक मान्यवर नेत्यांची मानपत्रे अण्णांकडूनच लिहून घेण्यात आली होती. संस्कृत व हिंदी भाषेची ही त्यांना चांगली जाण होती . एवढेच काय, गुजराती भाषा ही त्यांना अवगत होती. आपल्या अविरत सामाजिक, राजकीय, सहकारी क्षेत्रातील कामातून जेव्हा जेव्हा फुरसत मिळे, अण्णांचे वाचन व लिखाण हे नेहमी सुरूच असे.
आपल्या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात, सतत, दुसऱ्यासाठी काहीतरी करत राहणाऱ्या एका कार्यकर्त्याचा हा संक्षिप्त जीवनपट आहे. एका आयुष्यात एक मध्यमवर्गीय, संसारी माणूस,एवढी प्रचंड कामे, विविध क्षेत्रात, करू शकतो, त्यातही काहीतरी नव्याने करण्याचा ध्यास घेतो व प्रत्येक कार्यात आपल्या कामाचा अमीट ठसाही उमटवतो, हे केवळ अद्भुत वाटते! हा,शांताराम दाजी पाटील नावाचा एक सामान्यातला ,असामान्य माणूस मी खूप जवळून पाहिला, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या कधीतरी मिळालेल्या अल्प सान्निध्याने मलाही खूप काही शिकता आले.. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माझ्या परीने केलेला हा प्रयत्न!

शांतारामजी ज्याकाळी जन्मले व मोठे झाले तो काळच टिळक, गांधीच्या, स्वातंत्र्यप्रेमाने भारलेल्या तरुणांचा होता. घराघरात स्वातंत्र्यसैनिक तयार झाले होते. आपल्या ध्येयासाठी, कर्तव्यासाठी, मातृभूमी व समाजासाठी आपल्या पद्धतीने कोणताही त्याग करण्यास ही मंडळी तयार झाली होती. अगदी आपल्या स्वहितावर तुळशीपत्र ठेऊन! प्रत्येकाची रीत वेगळी असेल पण निष्ठा एकच होती. या मंडळींची आपल्या समाजाप्रती निष्ठा एवढी जबरदस्त होती की जीवंतपणी तर देह समाजासाठी झिजावाच, पण मेल्यानंतरही भस्मीभूत अवस्थेत, त्याला आपल्या प्रिय ,समाज बंधूभगिनींचा चरणस्पर्श होत रहावा,अशी मृत्यूपश्चात ही त्यांची अभिलाषा !

कै. शांताराम अण्णांचे सामाजिक क्षेत्रातील गुरु, पू.कै. तात्यासाहेब चुरी व पू. कै.अण्णासाहेब वर्तक.

मी मागे म्हटल्याप्रमाणे, शांतारामअण्णा कधीकधी स्मारक मंदिरात वस्तीस रहात. अर्थातच त्यांचा मुक्काम वस्तीगृहातील माझ्या खोली मध्येच असे. त्यावेळी त्यांच्याकडून मला अनेक गोष्टीबाबत प्रबोधन होई. विशेषत: आमच्या संघाचा इतिहास, संघातील त्यांचे पूर्वसुरी दिग्गज ,संघ स्थापनेतील त्यांचे योगदान, गुरुजन आचार्य चित्रे -भिसे यांच्या कथा. अशा विषयांबरोबरच अण्णांच्या अफाट वाचनांतील काही किस्से, ज्ञानेश्वरीतील आवडलेल्या ओव्यावरील भाष्य, भारतातील, त्यांच्या आवडत्या शिक्षणक्षेत्रातील, तत्कालीन महान व्यक्तिमत्वे, असे नानाविध विषय असत. कधीतरी त्यांच्या स्वतःच्या लेखनप्रपंचातील काही लेखनाविषयी ते बोलत. त्या रात्रीचे ते क्षण माझ्यासाठी एक बौद्धिक मेजवानीच असे, खरेतर मी, माझ्या स्मारक मंदिरातील व्यवस्थापन कार्य व महाविद्यालयीन अभ्यास व तत्संबंधी वाचन प्रपंचात जास्त मग्न असे. तरी अण्णा मुक्कामास असले की ते सारे बाजूस सारून त्यांच्याकडून,”घेशील किती दो कराने..”, अशी स्थिती होई. कारण त्या तासाभरात ऐकलेले ते बौद्धिक, दहा महान ग्रंथ वाचूनही मिळणारे नव्हते! एवढी प्रचंड व अल्पावधीत मिळणारी ती ज्ञानसंपदा होती!!

असेच एके दिवशी गप्पांमध्ये, अण्णा खूप भावुक झाले होते. त्यांचे समाजकारणांतील गुरू कै.अण्णासाहेब ,कै.तात्यासाहेब यांच्या आठवणींनी ते भाराऊन गेले होते. त्यांच्या माहिम गावातीलच, संघ स्थापनेतील एक धुरीण कै. बळवंतराव वर्तक, अशा सर्वांविषयी भरभरून बोलत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाने, प्रोत्साहाने त्यांनी समाजकार्यात प्रवेश केला होता. चिटणीस म्हणून सेवा दिली होती. सन 1969 सालातील त्या दिवशी, मला वाटते तेंव्हा ते संघाचे उपाध्यक्ष असावेत, अश्रूभरल्या नयनांनी ते पटकन मला म्हणाले, “दिगंबर, तू या समाज कार्याशी तरुण वयातच जोडला गेलास, हे खूप बरे झाले. तुला त्याचा फायदा होईल. तू कधी या समाजाचा पदाधिकारी झालास तर एक माझी इच्छा लक्षात ठेव. ..”माझ्या देहाची थोडी राख ,या समाज मंदिराच्या पायरीशी पुरली गेली, तर तो माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असेल..!!” मी तर ते ऐकून हबकून गेलो. “अण्णा तुम्ही आजच असे बोलू नका, अजून तुम्हास खूप आयुष्य आहे, तुमच्या कार्यामुळे तुमचे स्थान आमच्या हृदयात असेल…”, असे काहीतरी बोलून मी वेळ मारून नेली. मात्र ती रात्र,अण्णांचा त्यावेळचा तो चेहरा, आणि अश्रुंनी भिजलेले, मनापासून सांगितलेले, एका सच्च्या समाज सेवकाचे शब्द मला आजही अस्वस्थ करतात!. तो प्रसंग मी कधीच विसरू शकलेलो नाही. अण्णांची ती इच्छा जरी पूर्ण झाली नसली, तरी दुसरी एक गोष्ट, त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ, समाज बांधवांनी केली. अण्णांच्या मृत्यूनंतर, उशिरा का असेना, अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील मुख्य सभागारात, त्यांचे तैलचित्र मोठ्या दिमाखात, लावले गेले. तत्कालीन अध्यक्ष श्री. अजयभाई ठाकूर व विश्वस्त श्री. विलास बंधू चोरगे, यांचे पुढाकारामुळे, हे शक्य झाले. मीदेखील त्यावेळी ट्रस्टचा कार्यकारी विश्वस्त होतो. त्यावेळी केलेल्या भाषणात मी ही आठवण उपस्थितांस आवर्जून सांगितली होती. सर्वांची मने हेलावून गेली होती. मात्र मला अण्णांनी मला, ‘तसे’ का सांगितले असावे ,याचा शोध मी अजून घेतोच आहे? संतांच्या चरणधूळीचा लाभ व्हावा म्हणून, ‘नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । वरी संत हिरे पाय देती।।’ असे म्हणत संत नामदेवांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली . शांताराम अण्णांचे मनी हीच भावना आपल्या गुरु व समाज बांधव विषयी मनात सतत वसत होती. आपल्या बांधवावर, गुरुवर, एकूणच सर्व विश्वाप्रति प्रेम करणारा, सदैव सर्वांचे कल्याण इच्छिणारा, संत किंवा संत प्रवृत्तीचा मातृहृदयी माणूसच अशी इच्छा व्यक्त करू शकतो. अण्णा असेच एक मातेचे काळीज असलेले सच्चे निरलस समाजसेवक होते. माता आपल्या अपत्यांसाठी काहीही करू शकते.सर्वस्व देऊ शकते. आपल्या पश्चातही आपल्या मुलांनी सुखात राहावे अशी इच्छा बाळगणारी केवळ आईच! अण्णांचे काळीज आईचे होते!

सन 2017 साली,अण्णांचे तैलचित्र संघाचे अध्यक्ष अजय भाई ठाकूर व विश्वस्त विलास बंधू चोरगे, यांच्या प्रयत्नामुळे कै. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरात विराजमान झाले .त्याप्रसंगी विलास बंधू व कृष्णदत्त.

मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे, आमच्या पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात,अण्णांचे तैलचित्र आज लावलेले आहे. त्याप्रसंगी, आपल्या आठवणी सांगताना कृष्णदत्त म्हणाले होते,
” 14 फेब्रुवारी 1990 रोजी अण्णा देहरूपाने आपल्यातून निघून गेले .आज 27 वर्षांनंतर त्यांच्या प्रतिमेचे अनावरण येथे होत आहे. आम्ही आपले आभारी आहोत. ऐन उमेदीच्या काळात आपले आयुष्य ,आपला संसार आणि कुटुंबासाठी व्यक्त करण्याऐवजी त्यांनी देश, समाज आपला संघ आणि माहिमची शाळा यासाठी उपयोगात आणले. तेसुद्धा योग्य शैक्षणिक पात्रता बुद्धिमत्ता अंगी असून! अशावेळी मला एका म्हणीची आठवण येते, “शिवाजी जन्मावा, पण शेजारच्या घरात!” त्यांच्या उतारवयात आम्हा कुटुंबीयांवर खूप कठीण प्रसंग आले. पण त्यांची पुण्याई आणि परमेश्वराची पाठराखण , यामुळे आम्ही त्यातून निभावून गेलो. चांगले दिवस आमच्या नशिबी अखेरीस आले.”
संपूर्ण आयुष्यभर एक अध्यात्मिक अधिष्ठान बाळगून, संपूर्ण जीवन व्यतीत केलेल्या माणसाची उपेक्षा आणि अवहेलना झाली असेच आम्हास वाटते. संघाचे मुख्य चिटणीस म्हणून काम करताना ते एक हाती अहवाल लेखन करीत.दारोदार वर्गणी मागण्याचे काम त्यांनी केले . त्यामुळे संघाची मुख्य कचेरी जी आज दादरला आहे ती अनेक वर्षे, सुरुवातीला माहीमला होती, ही गोष्ट कित्येकांना ठाऊक नसेल. त्यांच्या दृष्टीने सो क्ष संघ कार्यालय, माहिमची शाळा ही मंदिरे होती. अर्थातच त्यामुळे त्यांचे घराकडे, संसाराकडे लक्ष नसावायचे.”
“दुर्दैवाने माझे दोन भाऊ आणि एक सख्खी बहीण अकाली गेली. समाजसेवा शाळा यांच्या जोडीला खूप धार्मिक-अध्यात्मिक वाचन व लिखाण यामध्ये त्यांनी स्वतःला सामावून घेतले , दुःख विसरले.आधीच्या पिढीची चूक माझ्या पिढीने आज दुरुस्त केली आहे, याचे समाधान वाटते. सर्व कुटुंबियांच्या वतीने ती. अण्णांची प्रतिमा वर्तक स्मारक मंदिरात लावल्याबद्दल ,अध्यक्ष, विश्वस्त व व्यवस्थापक मंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आम्ही कुटुंबीयांनी आयुष्यभर उरात बाळगलेले अपेक्षित , थोडे तरी समाधान आज झाल्यासारखे वाटते आहे”.
” अण्णांचे चित्र तयार करणारे कलाकार श्री. प्रकाश राऊत श्री. अमोल वर्तक यांचेही मी मनापासून आभार मानतो. एका व्यक्तीचा उल्लेख न केल्यास त्या व्यक्तीवर तो मोठा अन्याय होईल. ही व्यक्ती म्हणजे श्री अजय ठाकूर! अध्यक्ष झाल्यानंतर अभिनंदनाच्या फोनवरच अजयचे भरतवाक्य होते,” मंगेश, अण्णांचा फोटो जेव्हा वर्तक हॉलवर लागेल, तेव्हाच मी स्वस्थ बसेन!” त्याने आज आपला शब्द पूर्ण केला आहे . अजय ,अण्णांशी वेदनेचे नातं जोडणारा तू, त्यांच्यासाठी उभा राहिलास! हे तुझे भाग्य आणि नियतीचा न्यायही! मित्रा तुझे शतशः आभार”
सतत परोपकाराचाच ध्यास घेतलेल्या, अण्णासारख्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाचे व परिवारातील सर्वांचेच नुकसान होणार हे ठरलेले असते. इतिहासातही असे अनेक दाखले आहेत. अशी माणसे आयुष्यभर, दुसऱ्यासाठी खस्ता खात असताना, स्वतःकडे व कुटुंबाकडे, एवढेही दुर्लक्ष कसे करू शकतात, हाही एक संशोधनाचा विषय! अण्णांच्या निकटवर्तीयांना त्यांच्या व्यापक समाजकार्याची निश्चितच झळ सोसावी लागली. त्यांच्यावर अन्याय झाला. अण्णांचेबाबतीत, त्यांची सहधर्मचारिणी सौ शालिनीताई, खूप धीराच्या व खंबीर असल्या पाहिजेत. या माऊलीने, ओढग्रस्त परिस्थितीतील, आपले विशाल संसारगाडे कसे पुढे रेटत नेले असेल ,आज कल्पना करवत नाही. आपल्या मुलांना मार्गी लावण्यात त्यांचा वाटा मोठा!

अण्णांची धर्मपत्नी कै.शालिनी शांताराम पाटील.
आयुष्याला दुसऱ्यासाठी उधळीत जाणाऱ्या, पतीचा संसारगाडा हाकणारी एक खंबीर माता..

मित्र कृष्णदत्त यांनी जी खंत आपल्या भाषणात व्यक्त केली ती खूपच बोलकी आहे. खूपच संयमित शब्दात त्यांनी ती मांडली आहे .अण्णांना ज्यांनी जवळून पाहिले, त्यांना त्यातील यथार्थता निश्चितच पटेल. आपल्या तीन अपत्त्यांचे मृत्यू,अगदी तरुण वयात झालेले पाहणे कोणत्या माता-पित्यांना सहन होईल? खरेतर अण्णा कालाच्या निर्घृण प्रकारांनी उन्मळूनच जायचे पण त्यांची समत्व बुद्धी, वाचन-लेखन आणि समाजसेवेचा पिंड यामुळे ते सावरले गेले, त्यातून बाहेर निघाले. असे कसोटीच्या निर्वाणीच्या प्रसंगातून बाहेर येणे सगळ्यांनाच शक्य होत नाही . त्याला आयुष्यात सर्वांभूती समभाव पाहण्याची साधना असावी लागते.’ जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत’ अशी वृत्ती झाली तरच माणूस हे सहन करू शकतो. गीतेत यालाच समभाव असे म्हटले आहे.
सर्व भूतांचे ठायी साम्य दिसू लागणे, हाच ईश्वरदर्शनाचा अर्थ गीतेत सांगितला आहे.
“ईहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्माणि ते स्थितःl”
ज्याचे मन साम्यात स्थिर झाले आहे तो ब्रह्मात स्थिर आहे. कारण असे निर्दोष साम्य हेच ब्रह्माचे स्वरूप आहे. ही स्थिती प्राप्त होणे आयुष्यभराच्या साधने शिवाय शक्य नाही. अण्णांचे सर्व जीवन म्हणजे अशी सर्वाभूती समभाव पाहण्यात केलेली साधनाच होती. मनी आपपरभाव नव्हता. समाजाकडेच ते आपले कुटुंब म्हणून पाहत होते. म्हणून आयुष्यांतील अशा महाभयंकर प्रसंगांतून ते बाहेर येऊ शकले. एवढ्या प्रचंड कौटुंबिक आघातातून सावरून, अण्णांनी आपले सामाजिक, सहकार, राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातील कार्य पुढे तसेच चालू ठेवले. हा खरा तर एक चमत्कारच आहे .त्यामुळे त्यांच्या जीवनाविषयी थोडा जास्त विचार मी करू लागलो.. आणि मला अण्णांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील ऊच्चस्थानाची जाणीव झाली.
विनोबांनी वरील गीता श्लोकाचे विश्लेषण करताना, गीतेत वर्णन केलेला भक्त कसा असतो हे सांगितले आहे. ‘तो कोणाचा द्वेष करत नाही, मी माझे या भावनांना तो थारा देत नाही, वाट्याला येणारी सर्व सुखे, दुखे तो क्षमाशीलतेच्या जोरावर सहन करतो, तो सदा संतुष्ट आणि योगी असतो, त्याने आपली बुद्धी आणि मन भगवंताला, अर्पण केलेले असते. तो लोकांना कंटाळत नाही. लोकही त्याला कंटाळत नाहीत. हर्ष ,शोक, भय ,क्रोध या भावना पासून तो मुक्त असतो. दुःख आणि व्यथा या गोष्टी त्याच्या गावीही नसतात.’
विनोबांचे हे विश्लेषण व अण्णांची मानसिकता पाहीली की मग,अण्णा आयुष्यातील निर्णायक प्रसंगी तसे का वागले याचा बोध होतो. शांताराम अण्णा भगवद्गीतेचे नुसते वाचक, वा अनुवादक नव्हते तर प्रत्यक्ष जीवनात गीतेचे तंतोतंत आचरण करणारे असे सद्भक्त होते. गुरुवर्य आचार्य भिसे, आचार्य चित्रे यांचेच आदर्श याबाबतीत त्यांचे समोर असले पाहिजे! अध्यात्माच्या किती उंच पातळीवर ते पोचले होते याचीही कल्पना येते.अण्णांच्या ,आई-वडील व बालपणीचे गुरु यांचे विषयी मला काहीच माहित नाही. सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची त्यांची जीवनश्रद्धाृ, ही कदाचित् लहानपणी मिळालेल्या बोधामृतातून ही आली असावी.
आचार्य विनोबा भावे हेसुद्धा अण्णांचे एक श्रद्धेय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या बोलण्यातून विनोबांच्या वचनांचा, गीता अभ्यासाचा उल्लेख वारंवार होई. अण्णा म्हणत,”विनोबा विचार दर्शनाने मला गीता आचणारा महात्मा पहावयास मिळाला.
अण्णांनी मला आचार्य विनोबांच्या मातृप्रेमाबद्दल, त्यांच्या गीतेवरील अविचल निष्ठे बद्दल अनेक कथा सांगितल्या होत्या. रुक्मिणीबाई एक सामान्य गृहिणी होत्या. विनोबाजी आपल्या आईला प्रथम गुरू मानीत असत.
” एका अल्पशिक्षित आईने साम्य आणि साधना यांचे अनेक धडे, केवढ्या सहजतेने आपल्या मुलाला दिले. कोण जाणे अण्णांनाही बालपणीच असे धडे घरातच मिळाले का? काहीही असो त्यांच्या आचरणातील वेगळेपणा सहजासहजी आलेला नव्हता, त्यामागे आयुष्यातील अनुभव, वाचन व चिंतन याची जोड होती.

बोर्डी हायस्कूलच्या वास्तव्यात अण्णांचे गुरुवर्य

अण्णांच्या उतारवयात, सर्व भावंडांवर व कुटुंबावर खूप कठीण प्रसंग आले. ज्या माणसांना अण्णांनी संघटकाली मदत केली,अगदी आपल्या तोंडचा घास ही काढून दिला, ती माणसे अण्णांच्या कठीण प्रसंगात,समोर आली की मान वळवून पुढे जात.1976 ते 82 हा काळ या कुटुंबासाठी सत्वपरीक्षेचा होता .पण अण्णांची पुण्याई आणि परमेश्वराची पाठराखण ,यामुळे ते कठीण प्रसंग सरले आणि चांगले दिवसही त्यांच्या नशिबी आले . गीताईचे आचरण करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात हे नवीन नाही.तो योगायोग ही नव्हे .कारण भगवंताने ,त्याच्या भक्ताचे आयुष्यांत पराकोटीची संकटे येणारच आहेत, हे ओळखून आश्वासन नव्हे, ग्वाही दिली आहे.. घाबरू नकोस,” मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आणि तुला प्रिय असणाऱ्या स्वकीयांचे योगक्षेमं ही माझीच जबाबदारी!”.
अनन्या श्चिंतयन्नो मां ये जराः पर्युपासतेः।
तेषां नित्याभियुक्तानां,योगक्षेमं वहाम्यहम्!
“जे माझे प्रेमी भक्त मला निरंजन भजतात, निष्काम भावाने जीवन जगतात, त्या माझ्या चिंतनात असणाऱ्या माणसांचे योगक्षेम मी स्वतः यांना प्राप्त करून देतो.”
माझ्या विनंतीवरून कृष्ण दत्तांनी, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, पिताजींनी दिलेला भव्य वैचारिक व सांस्कृतिक वारसा तसेच आपले वडील एक पिता म्हणून आम्हा सर्वांना कसे वाटले त्याबद्दल खूप आपुलकीने, परखडपणे,तरीही संयमित लिहिले आहे. ते म्हणतात..
“Charity Begins At Home आणि It ls better to be a Kingmaker rather than to be a King ,ही कै. अण्णांची शिकवण मी कायम पाळली. त्यामुळे व्यवस्थित ३८ वर्षे नोकरी करून कोणतीही निवडणूक न लढवता समाज कार्य करू शकलो. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र आणि मराठी भाषा ह्याबद्दल त्यांनी जे संस्कार दिले त्याचा उपयोग संपूर्ण आयुष्यात झाला. त्यामुळे स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला व कार्य केले. ह्याबद्दल कधीच आम्हा दोघात मतभेद झाले नाहीत. माझी चप्पल तुझ्या पायात यायला लागली म्हणजे आपण मित्र झालो असे ते स्पष्ट सांगत व शेवटची काही वर्षे त्यांनी कोणत्याही सांसारिक घटनांमध्ये हस्तक्षेप केला नाही व विचारले तरच मार्गदर्शन केले हे मी नमूद करताना मला वडिलांबद्दल अभिमान वाटतो. सामाजिक, सहकार चळवळीत माझ्या सहभागाबद्दल त्यांना आनंद वाटे. मी करीत असलेले लिखाण, वेगवेगळा पत्रव्यवहार, अहवाल लेखन ह्यावर प्रदीर्घ चर्चा करीत व सूचना देत.
अण्णांची प्रतिकूलतेची वर्षे मला समज आल्यानंतर होती. त्यामुळे काही प्रमाणात समाजाप्रती राग ह्यातून निर्माण झाला आणि त्यांच्यापेक्षा माझा भिन्न स्वभाव झाला असावा. त्यामुळेच बहुतेक समाजकार्य, राजकारण सोडून गावाबाहेर झाले. फक्त शिक्षण संस्थेवर काही वर्षे काम केले हा अपवाद!
मला ते सांगत ,”आयुष्यात कोणतेही ऋण बाकी ठेवू नकोस. मग ते पैशाचे असो वा समाजाप्रती असलेली बांधिलकी असो. ते येथेच फेडून जायचे. “
त्यांना चांगला वादविवाद जमत नसेल पण लेखी बाजू मात्र नामवंत वकीलापेक्षाही ते सरस लिहीत. त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टींपैकी Charity Begins बद्दल एवढंच म्हणू शकेन की ज्या माणसांचा संसार कधी तरी अण्णांनी उभा केला, ती माणसे, ‘अण्णा समोर आली तर उसने पैसे परत मागतील’, म्हणून अण्णांना टाळीत. असे कितीतरी लोक मला माहित आहेत. ते उद्वेगाने सांगत “खिशात पैसे नसतील तर साधा सामान्य माणूस पण तुम्हाला किंमत देत नाही मग विद्वत्तेचा उपयोग तो काय?”
ही गोष्ट मी कायम स्मरणात ठेवली.
माझ्या सुदैवाने त्यांची पुण्याई आणि दत्तगुरूंची कृपा ह्यामुळे आयुष्य बऱ्यापैकी सुरळीत गेले व चालले आहे. जेव्हा अण्णां बद्दल कोणी कृतज्ञतापूर्वक बोलू लागतो तेव्हा उर अभिमानाने भरून येतो. त्यांचेच शब्द आहेत आयुष्यात कुणाबद्दल ही कटुता, द्वेष बाळगू नकोस त्याने आपलेच नुकसान होते. हे पण तितकेच सत्य आहे. अर्थात त्यांच्या एवढी स्थितप्रज्ञता आपल्यात नाही हे पण तितकेच खरे आहे. त्यांनी लावलेल्या वाचनाच्या आवडीमुळे उभ्या आयुष्यात मराठी-इंग्रजीमध्ये भरपूर वाचन करता आले आणि त्यांनी जमवलेल्या पुस्तक संग्रहात मोठ्या प्रमाणावर भर घालताना खूप आनंदही झाला. सकाळ-संध्याकाळ प्रार्थना, इयत्ता सातवी पासून संकष्टी चतुर्थीचा उपवास ह्या गोष्टी आजही करतो. फक्त उपवास वर्षभरापासून प्रकृतीसाठी बंद केले.”

“खरंतर दिगंबर भाऊं मुळे आज ह्या सर्व गोष्टींना उजाळा देता आला. ‘सार्वजनिक अण्णां’बरोबर,’ सांसारिक अण्णा’, सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्या पैलूंवर प्रकाश टाकावा असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे सुपरिचित अण्णांपेक्षा हे लिखाण वेगळे असेल असे मला वाटते. माझ्या लिखाणाचा शेवट मी वेगळ्या गोष्टीने करतो.

प.पू. मोरे बाबा नावाचे एक अध्यात्मिक गुरु होते . माझे त्यांच्याकडे जाणे-येणे असे. अनेक राजकीय पुढारी ,मंत्री इत्यादींची त्यांच्याकडे उठबस असे. एकदा मी त्यांच्याकडे गेलो असता मा.श्री. प्रमोद नवलकर तेथे बसले होते. थोड्यावेळ गप्पा झाल्यानंतर मोरे बाबा अचानक स्तब्ध झाले आणि आम्हास म्हणाले फार मोठा माणूस आज माझ्या मंदिरात येत आहे. आम्ही वाट पाहत राहिलो आणि १०-१५ मिनिटांनी ती. अण्णा नेहमीच्या पेहरावात छत्री सह अवतीर्ण झाले. मला धक्का बसला. तोवर मोरे बाबा उठले व त्यांनी ती. अण्णांना सर्वांसमक्ष साष्टांग लोटांगण घालून नमस्कार केला. त्यावेळी प.पू. मोरे बाबांचे शब्द होते . ज्यांच्यासमोर आदराने नतमस्तक होऊन त्यांच्या पायावर डोके ठेवावे असे पुण्यवान व्यक्तिमत्व आज माझ्या ग्रँट रोडच्या मंदिरात आले हे माझे भाग्य!
असो मा.श्री. दिगंबर राऊत यांचे माझ्या कुटुंबीयांतर्फे मनःपूर्वक आभार मानतो.”
मित्रवर्य कृष्ण दत्त यांनी आपल्या पूज्य वडीला विषयी दिलेली ही माहिती खूप थोड्या लोकांना माहिती असेल, म्हणून ती मौलिक आहे. माझे कसले आभार मानता कृष्णदत्तजी, मीच आपला आभारी आहे. ही माहिती समाजापुढे येणे खूप गरजेचे होते.

अण्णांचे,के.माहीम येथील वडिलोपार्जित जुने घर.

कृष्णदत्ताशी गप्पा करताना त्यांनी आपल्या पिताजींच्या अनेक हृद्य आठवणी सांगितल्या. सर्वच इथे लिहिता येत नाहीत मात्र त्यातून एक गोष्ट निश्चित जाणवली,ती म्हणजे, एक आदर्श पिता आपल्या मुलांचा ऊत्तम गुरूही असतो, आणि चांगले संस्कार सहजपणे करून जातो. कृष्णदत्त यांचा पिंड अण्णांप्रमाणे सौम्य, शांत, सहनशील नसून ते एक आक्रमक, कणखर व रोखठोक व्यक्तिमत्त्व आहे. मात्र ज्यावेळी पिता-पुत्रांच्या भिन्न वैचारिक, सामाजिक वा राजकीय जाणीवां मुळे निर्माण झालेले प्रश्न सामंजस्याने मिटले . त्यातून कौटुंबिक संघर्ष कधीच निर्माण झाला नाही. कोणतीही, जटील, कौटूंबिक वा अन्य समस्या हाताळण्याचे अण्णांचे कौशल्य हेच त्याला कारणीभूत ,असे ते मानतात.

कृष्णदत्त यांनी ऊभी केलेली नवीन वास्तू,” दत्तराज”.

शैक्षणिक पात्रता, क्षमता असूनही अण्णांनी कधीही सरकारदरबारी व कुठेही नोकरी केली नाही .त्यामुळेच त्यांच्या समवेत कुटुंबालाही खूप मोठ्या दिव्यातून जावे लागले .परंतु समाज कार्याला वाहून घेतलेल्या अण्णांनी आपल्या कामाचा कधीही बागुलबुवा केला नाही. ते प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर राहिले. साधी राहणी व उच्च विचारसरणी या आपल्या गुरुजनापासून मिळालेल्या संस्कारांचे आयुष्यभर आचरण केले.
याच संस्कार धारणेमुळे व विचारसरणीमुळे अण्णांना तत्कालीन व त्यांच्या आधीच्या पिढीतील, निरलस, बुद्धिमान, ज्ञानी, निस्पृह व तत्वनिष्ठ व्यक्तिमत्त्वांबद्दल नेहमीच आदर वाटे. अशा अनेक व्यक्तींची चरित्रे त्यांनी वाचली होती. त्यांच्या अफाट वाचनातील, महान लोकांच्या जीवनातील काही कथाही ते मला ऐकवीत. मलाही ही मोठी मेजवानी मिळे. अशा अनेक गोष्टींचा संग्रह माझ्या जवळ आहे. मी नेहमी माझ्या बोलण्यात, लिहिण्यात त्यांचा वापरही करतो, हे सांगण्यास मला काहीच संकोच वाटत नाही. त्यातील एक उद्बोधक आठवण सांगण्याचा मोह होतो आहे.
आद्य समाजसेवक, इतिहासकार, शिक्षण तज्ञ, पत्रकार, विद्या मुकूटमणी व मराठीतील पहिल्या वर्तमानपत्राचे संपादक “दर्पण”कार बाळशास्त्री जांभेकर यांची अण्णांनी सांगितलेली आठवण मला आजही स्मरते आहे . मी ती विसरू शकत नाही. मूल्याधिष्ठित जीवन जगणाऱ्या, काही उत्तुंग व्यक्तिमत्वांची माणसे अण्णांना सदैव आदर्शवत वाटली. त्यांच्या कथा नेहमीच्या संभाषणात असत. मी अनेकदा आमच्या सायंगप्पांमध्ये त्यांच्याकडून अशा कथा ऐकल्या आहेत त्यातील ही गोष्ट देण्याचा मला मोह होतो आहे.
“बाळशास्त्रींनी अतिशय गरीब परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. गरीब असूनही त्यांचे अंगी निस्पृहता व तत्त्वनिष्ठा अजोड होती. त्यांची तल्लख बुद्धिमत्ता पाहूनच त्या काही केवळ चौदाव्या वर्षी त्यांना गणिताचे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. पुढे एलफिन्स्टन महाविद्यालयाचे पहिले मराठी प्राध्यापक म्हणूनही नेमणूक झाली. शिक्षण शास्त्रातील अफाट गती पाहून तत्कालीन इंग्रज शासनाने त्यांना मुंबई विभागाचे पहिले शाळा इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक केली. एका महिन्यात त्यांना आपल्या पगारात एक रुपया जास्त दिला गेल्याचे आढळले. बाळशास्त्रींनी त्वरित शासनास पत्र लिहून, पुढील पगारात एक रुपया कमी करण्याची विनंती केली. चार महिने असेच चालले. शेवटी बाळशास्त्रींनी, “मी माझे काम चालू ठेवीन, मात्र यापुढे आपला पगार घेणार नाही !”असे खरमरीत पत्र लिहिले व त्यानंतर प्रश्न मिटला. ही आठवण सांगताना अण्णांचे डोळे पाणावलेले मी पाहिले आहेत. अवघ्या वयाच्या 33 व्या वर्षी निधन पावलेल्या बाळ शास्त्रीविषयी त्यांना अतिशय आदर होता.” जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही” असे ते म्हणत. बाळशास्त्रींच्या विविधांगी कार्याची दखल देशाने व समाजाने घेतली नाही, याबद्दलही अण्णांना खूप विषाद वाटे. कदाचित आपल्या स्वतःच्या जीवनातील,, बुद्धिमत्ता, कर्तृत्व, कार्य असूनही, झालेल्या अवहेलनेबद्दल, असलेली खंत त्यांच्याही मनात असावी! मात्र ही गोष्ट कळल्यानंतर मी बाळशास्त्रींचे चरित्र वाचले व मलाही धन्यता वाटली.
अण्णांच्या विविधांगी समाजसेवेचा विसर कित्येकाना पडला. त्यांचे कडून योगदान लाभलेल्या संस्थाही त्यांना विसरल्या. मात्र त्यांच्या कामाची आठवण ठेवून त्याबद्दल कृतज्ञ असणा-या व्यक्ती व संस्थांही आहेत. माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्थेने सन 1985 झाली त्यांच्या वयाला 75 वर्षे झाल्याचे निमित्ताने त्यांनी केलेल्या सेवेबद्दल संस्थेस वाटत असलेल्या प्रेम व आदर यांचे प्रतीक म्हणून एक मानपत्र कृतज्ञतापूर्वक अर्पण केले. ते सोबत जोडले आहे. त्या मानपत्रात संस्थेचे पदाधिकारी म्हणतात ,
“आपल्या संस्थेचे कार्य जून 1940 पासून पाच सहा वर्षे बंद पडल्यामुळे ती लिक्विडेशन मध्ये काढण्याचे सरकारने ठरविले असता, आपण पुढाकार घेऊन मित्रांच्या सहकार्याने,भाग भांडवल वाढवून, ती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला. स्वतः मागे राहून नवीन होतकरू व तडफदार तरुणांना पुढे आणून मार्गदर्शन केले. या आपल्या उदार धोरण यामुळेच अनेक कार्यकर्ते विविध क्षेत्रात पुढे आले, येत आहेत.
अण्णांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्या चा गौरव करताना म्हटले आहे ,
” शिक्षण प्रसार हेच आपण जीवनाचे ध्येय ठरवून 1927 साली मॅट्रिक होताच नोकरी मिळणे सुलभ असतानादेखील,1928साली गावात इंग्रजी क्लास सुरू केला.प्लेग व आर्थिक मंदीमुळे तो क्लास बंद पडला.तरी त्यांच्या क्लासमधील एक विद्यार्थी कै.भुवनेश किर्तने यांनी 15 जून 44 रोजी स्थापन केलेल्या विद्यालयाची सेक्रेटरी म्हणून आर्थिक व इतर बाजूंची जबाबदारी यशस्वीरीत्या हाताळून त्या पडत्या काळात शाळा टिकवून धरली. म्हणूनच माहीम एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापक मंडळाने सन 1968 साली ,’श्री शांताराम पाटील यांनी सेक्रेटरी म्हणून शाळेच्या पडत्या काळात शाळा टिकवून धरली, म्हणूनच शाळेस आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे ,संस्था त्यांची आभारी आहे’, अशा गौरवपूर्ण शब्दांत आपल्या सेवेचा ठराव रूपाने उल्लेख केला आहे. त्याशिवाय सतत दोन वर्षे विनामूल्य, इंग्रजी क्लास चालऊन आपल्या शाळेतील एसएससीच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केले आहे, हे नमूद करताना आम्हाला आनंद वाटतो”
शेवटी अण्णां बद्दल आदर व्यक्त करताना संस्थेने म्हटले आहे,
“संपत्तीने सर्व काही मिळत असले तरी जनतेच्या हृदयात प्रेमाचे व आदराचे स्थान फक्त सेवा व त्यागानेच मिळू शकते, आणि म्हणून आपल्या या वृद्धापकाळी,आर्थिक परिस्थितीची अनुकुलता नसतांना, माहीम गावास आपला विसर पडलेला नाही,याचे प्रत्यंतर आज दिसत आहे.माहीम चे पहिले मेट्रिक, स्वतंत्र भारताचा झेंडा गावात सर्वप्रथम फडकवणारे पहिले सरपंच, माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कडून मानपत्र मिळविणारे पहिले समाजसेवक,आणि स्वर्गीय पूज्य पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी हस्तांदोलन करणारी माहीमची पहिली व एकमेव व्यक्ती म्हणून,आम्ही आपले अभिनंदन करतो व कृतज्ञतापूर्वक आपणास ये मानपत्र अर्पण करतो”

किसान स्पेशल यात्रेदरम्यान, दिल्ली मुक्कामी, पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू सोबत हस्तांदोलन करतांना, अण्णा!

मला वाटते संस्थेने व्यक्त केलेल्या अण्णां विषयी आदरभावा वर आणि काही लिहीण्याची गरज नाही.
ज्या माहीम एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत अण्णांचा महत्त्वाचा वाटा व तिच्या पडत्या काळात अण्णांनी पदरमोड करून विनामूल्य शिकवणी देऊन संस्था टिकविण्यात मोठा हातभार लावला ती माहीम एज्युकेशन सोसायटी देखील संस्थेला अण्णांना विसरली नाही यांच्या त्यागाचे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ठरावात संस्थेने म्हटले आहे
“स्वातंत्र्यपूर्व काळात पालघर तालुक्याचा बहुतांशी भागात शिक्षणाच्या संधी उपलब्ध नसल्याने शैक्षणिक प्रगती वाचून वंचित होता. ही उणीव भुवनेश्वर महाराज व त्यांचे काही निष्ठावंत सहकारी यांना तीव्रतेने जाणवत होती. यातूनच 7 जून 1944 साली माहीम शिक्षण संस्था तत्कालीन इंग्रजी शाळा, म्हणजे आजची भुवनेश किर्तने विद्यालया ची मुहूर्तमेढ रोवली गेली. अत्यंत बिकट परिस्थितीतून माहीम व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, आद्य संस्थापक व माजी मुख्याध्यापक भुवनेश्वर कीर्तने महाराज आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांची निष्ठापूर्वक सेवा व थोरामोठ्यांचे लाभलेले मार्गदर्शन यामुळेच संस्थेची वाटचाल सुकर करून वर्धिष्णू राहिली आहे. भुवनेश किर्तने महाराज व कै. शांताराम दाजी पाटील या सामाजिक व शैक्षणिक जाण असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिक्षण संस्थे समोर येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करून ही शाळा सुरू केली व या भागाच्या विकासाचा पाया रचला. संस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यात शांताराम दाजी पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांचा मिळालेला आधार खूप मोलाचा होता.”

केळवे-माहीम एज्युकेशन संस्थेच्या भूवनेश किर्तने विद्यालयाची आजची प्रशस्त इमारत." वेलू गेला गगनावरी"

स्वतः आर्थिक विपन्नावस्था असूनही अण्णांनी विद्यार्थ्यांना, नडलेल्या ग्रामस्थांना, शिक्षण संस्थाना, पदरमोड करून, आर्थिक मदत दिली. हे खरेच अनाकलनीय आहे. ज्या वसतिगृह वास्तव्य कालांत, अण्णांशी गप्पा होत, अण्णांचा, माझा विशेष परिचय नव्हता, त्यांची कौटुंबिक स्थिती, व उद्योग धंदा,या विषयीची काहीच माहिती नव्हती. त्यांचे सामाजिक कार्य, बुद्धिमत्ता,, वाचनाचा दांडगा व्यासंग, संस्कृत, मराठी, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व त्यामुळेच एक उत्तम वक्तृत्व ह्याबद्दल मला प्रत्यय आला होता. केळवे, माहिम मधील माझे काही सहाध्यायी मित्र त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची कल्पना देत असत. त्यांच्या परोपकारी वृत्ती बद्दल भरभरून बोलत. असेच एकदा गप्पांमध्ये मी त्यांना सहज विचारले होते, “अण्णा आपण स्वतः आर्थिक विवंचनेत असतांना,ईतरांना आर्थिक मदत करते वेळी, मुलाबाळांच्या भविष्यासाठी तरी आपण काही बचत करावी, असे आपणास वाटले नाही काय ?”
त्या दिवशी अण्णांनी उद्धृत केलेला एक छोटासा दोहा मला आजही आठवतो.
” पूत सपूत तो क्यूं धनसंचय,?
पूत कपूत तो क्यू धनसंचय?”
पुत्र जर सुपुत्र असेल तर तो स्वतःच्या कतृत्वा वर वैभव कमावेल. आणि तो जर दुर्दैवाने कुपुत्र निघाला, तर कितीही पैसे साठवून ठेवले असले, तरी ते संपवण्यास त्याला किती वेळ लागेल? म्हणजेच माणसाने पुढील पिढ्यांसाठी पैसे साठवून ठेवण्याची गरज नाही. आज पिढ्यानपिढ्या साठी धनसंचय करून ठेवण्याची स्पर्धा लागली असताना हे वाक्य निरर्थक वाटेल पण ते एक चिरंतन सत्य आहे हे खरे. अण्णांकडून ,अनेकांनी हे सुभाषित,कित्येक प्रसंगी ऐकले असेल. ते त्यांचे खूप आवडते वाक्य होते, कारण त्यांच्या स्वतःच्या जीवन प्रणालीशी त्याचे साधर्म्य होते!
भोज राजाच्या दरबारी घडलेला हा प्रसंग असे अण्णांनी मला सांगितल्याचे आठवते.मात्र त्याचा कर्ता कोण हे मला आज आठवत नाही.अण्णां जवळ अशा अनेक सुभाषित मौक्तिकांची खजिना होता. मात्र आज माझ्या लक्षात काही थोडीच आहेत त्यापैकी हे एक… आपल्या सुपुत्रा विषयी अण्णांना निश्चितच खात्री होती. त्यांच्या सुपुत्राने आपल्या पिताजीचा विश्वास सार्थ केला,त्यांचे कर्तुत्व पाहण्यास अण्णा नाहीत हीच खेदाची बाब आहे. कृष्णदत्त यांनी आपल्या स्वकष्टार्जित मेहनतीतून निर्माण केलेल्या,” दत्तराज”, या इमारतीचे छायाचित्र वर दिले आहे. या वास्तूत त्यांनी आपल्या प्रिय पिताजींचे साकारलेले भव्य तैलचित्र खूप देखणे असून ,त्याचेही छायाचित्र खाली दिले आहे.
अण्णा म्हणत,”ज्या मराठी घरामध्ये ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा ह्यसारखे ग्रंथ नसतील, तर ते घर कितीही वैभवसंपन्न असले तरी ते कर्मदरिद्रीच असे म्हणावे लागेल. ज्यांच्या जीवनामध्ये हे ग्रंथ आले ते सुख, समाधान, शांती यांना कधीच वंचित होणार नाहीत.” अशी जीवनधारणा असलेला गृहस्थ लौकिक संपत्तीच्या मागे कसा असेल?कृष्णदत्त यांनी अण्णांच्या आठवणी सांगताना म्हटले,” आमच्या घरी खूप ग्रंथसंपदा होती. मलाअसलेल्या वाचनाच्या प्रचंड आवडी मागे अण्णांचे आशीर्वाद आहेत.”

   कै.अण्णांच्या,”ओवीबद्ध श्रीमद्भगवद्गीते”च्या भाषांतरित पुस्तकाचे मुखपृष्ठ

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत जीवनमूल्यांची घसरण होत आहे. जागतिकीकरण आणि खाजगीकरण झपाटय़ाने होत आहे. दहशतवाद, अस्थिर राजकीय परिस्थिती, अनामिक भीती यांनी आपले जीवन वेढले गेले आहे आणि म्हणूनच ह्या परिस्थीतीत संत सहवासाची, संस्कारित साहित्याची सर्वाना आवश्यकता आहे. विविध प्रांतांतील भारतीय संतांनी, विविध भाषांना आपल्या संतवाणीने समृद्ध केले आहे. विविध काव्यप्रकारांतून जनजागृती आणि पारलौकिक जीवनमूल्यांचे अधिष्ठान दिले. करुणा, सौजन्य, सहिष्णुता, बंधुभाव, सामाजिक, वैचारिक तत्त्वज्ञानाचा प्रसार आपल्या अभंग, ओवी, पदे, दोहे अशा सोप्या बोलीभाषेमधून केला. आपल्याला संत नाही होत आले तरी अण्णां सारखी,” संत प्रवृत्ती”जरीजोपासली, तरी आपले जीवन सार्थ होईल व दुसऱ्यांसाठी काहीतरी केल्याचे आंतरिक समाधान मिळेल. त्यासाठी, “मातेचे काळीज” हवे,हे खरेआहे! शांताराम अण्णांनी आपल्या कृतीतून ,वाणीतून, आणि लेखनातून हीच सहिष्णुता व बंधुभाव आयुष्यभर जपला म्हणूनच आजही त्यांचे विचार व कार्य आम्हाला स्फूरणदाई व आदर्श वाटते.
जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात,ती आपोआप गुंफली जातात. कधीतरी कोणीतरी व्यक्ती भेटते. खुप प्रेम, आस्था,विचारधन देवून जाते आणि मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात एक जागा करून ठेवते. यालाच तर ॠणानुबंध म्हणतात! शांताराम अण्णा असेच कोणत्यातरी गतजन्मीच्या ऋणानुबंधानेच, माझ्या आयुष्यात कधी तरी आले.प्रेम, आशीर्वाद ,सुविचार देऊन गेले. .म्हणून आजही त्यांची आठवण येते. मनाच्या संदुकीतील, एका कोपऱ्यात जपलेल्या आठवणी कधीतरी जाग्या होतात आणि तोच आनंद पुन्हा देतात. त्यांच्या स्मृतीला वंदन करावे, याच हेतूने हे माझ्या कुवतीप्रमाणे लिहिले. अण्णांसारख्या, अफाट बुद्धिमत्ता, समर्पण वृत्ती ,मातृहृदयी वात्सल्य जपणाऱ्या समाजसेवकाला वंदन करताना, मी किती न्याय दिला आहे, माहित नाही? माझ्या वाचकांनीच ते मला सांगावे…
अण्णा गेले. अनंतात विलीन झाले. आमच्या पू. अण्णा साहेब वर्तक स्मारक मंदिराचे पायरीखाली,त्यांच्या देहाची चिमूटभर राख नाही ठेवताआली, तरी, स्मारक मंदिराच्या गाभाऱ्यातील त्यांचे तैलचित्र ,त्यांच्या समर्पित वृत्तीची साक्ष आम्हाला सदैव देत राहील .अण्णा आज कुठेही असले तरी ,त्यांच्या आवडत्या संत नामदेवा प्रमाणेच, आपले समाज बांधव व आप्त स्वकियां साठी, आजही ते हेच पसायदान मागत असतील…

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा

माझिया सकळा हरिच्या दासा ।

कल्पनेची बाधा न हो कोणे काळी।

ही संत मंडळी सुखी असो…||


कै.शांताराम दाजी पाटील, अण्णा यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन

दिगंबर वामन राऊत,
माजी कार्यकारी विश्वस्त, सो क्ष संघ फंड ट्रस्ट, दादर.