आप्पांची पत्रे भाग-८

आप्पांच्या पत्रांचा भाग आठवा प्रसिद्ध करण्यास आनंद होत आहे. बहुतेक पत्रे 74 मे ते 74 डिसेंबर, या काळांतील आहेत. एक पत्र 1976 मधील आहे. हा कालखंड खूपच महत्त्वाचा व अनेक घडामोडींनी भरलेला. आमचे चौकोनी कुटुंब (बापू, दीपीचा जन्म),अण्णा, अण्णी व स्वाती हे त्रिकोणी कुटुंब, पप्पी काका कॉलेज शिक्षणानिमित्त आमचे बरोबर, मुंबईस,असा सुंदर संच त्यावेळी होता. दिवस आनंदात जात होते… अधून मधून मोठी आई, नीलम, आमचेकडे येत होत्या. अण्णी नोकरी करून संसार सांभाळत असल्याने, मधून मधून प्रकृतीची तक्रार होती. त्याची आप्पांना वाटत असलेली काळजी प्रत्येक पत्रातून व्यक्त झालेली आहे. मंदा, अरुणा दोघी आनंदाने, बहिणींप्रमाणे राहतात हे आप्पांनी आपल्या एका फेरीत पाहिले व झालेले समाधान त्यांनी पत्रांतून व्यक्त केले आहे. “दोघींनी असेच खेळीमेळीन,आनंदात रहा, संसार सुखाचा होईल”, असे आप्पांचे त्यांना आशीर्वाद आहेत. बापू आता चार- वर्षाचा झाल्यामुळे, अण्णा बरोबर अथवा काकाबरोबर, तो बोर्डीस फेरी मारीत असे. पहिल्यांदा त्याला तिथे राहणे आवडत नव्हते. मात्र पुढे तो तेथे रमू लागला. याचाही आप्पांना खूप आनंद होत असे. बापूने तेथे येऊन त्यांचे सोबत काही दिवस रहावे ही त्यांची तळमळ पत्रातून दिसून येते. अरुणा, भाई त्यावेळी विरार मुक्कामी असल्याने आम्ही तेथे जात असू . “त्यांचेकडे नेहमी लक्ष ठेवावे” असेही आप्पांनी सुचविलेले आहे. नीलम मुंबईस आली असताना मोठी आईने काढलेले वाडवळी भाषेतील उद्गार मजेशीर आहेत! प्रत्यक्षातच वाचायला हवे !! अक्का देखील  खंडू मामाकडे बोरिवलीला आली आहे व तिला आपल्या भरल्याचे घरी घेऊन या अशीही सूचना आप्पांनी केली आहे. त्याप्रमाणे पुढे अक्का देखील आपल्या घरी राहून गेली, ती गंमत पुढील पत्रात. हा दुर्मिळ ठेवा अजून आपल्या जवळ आहे त्याचे जतन करूया!