संस्मरणे
सुपेह हायस्कूल, बोर्डी – २
नाना मळेकर व त्यांचा ‘गंगाराम ‘म्हणजे आम्हा मुलांसाठी एक दुःस्वप्नच होते कधी, कोणावर नानांची मर्जी कृपा होईल आणि त्याला ‘गंगाराम’ कडून ‘शेकहॅंड’ मिळेल ते सांगवत नसे. मी तरी टोपी मुळे, वर्गाबाहेर फिरतांना सदोदित धास्तावून टोपी खिशात घालुनच फिरत असे व ही गोष्ट आप्पांनाही प्रामाणिक पणे सांगितली होती. कारण कोणाकडून अपरोक्षपणे त्यांना ही गोष्ट कळल्यास, घरी माझी कानउघाडणी होणे शक्य होते! (कारण ‘टोपी घालणे हा अप्पांचा नियम, व टोपी न घालणे हा नानांचा नियम!)
नाना प्रत्येकाला वैयक्तिक शिक्षा तर करीतच मात्र एकदा आमच्या ८(ड) च्या वर्गाला ‘ सार्वजनीक’ शिक्षाही देण्यात आली, तो गंमतीदार प्रसंग असा – दुपारच्या सुट्टीनंतर आम्हाला पी.टी.चा तास व्यायाम मंदिरात होता. आधीच्या शिक्षकांनी आपला तास ५ मिनिटे जास्त वाढवला, त्यामुळे आमच्या सर्व वर्गालाच,व्यायाम मंदिरा पर्यंत चालत जाण्यास दहा मिनिटे उशीर झाला. आम्ही अक्षरशः धावत पळतच, प्रवेश दाराशी येतो, तो नाना गंगाराम बगलेत मारुन आमच्या स्वागताला आधीच हजर होते!
“ठहरो, कोई भी अंदर नही जायेगा, कतार मे खडे हो जावं” नाना आपल्या वैशिष्ठ्य पूर्ण हिंदीतूनच नेहमी सूचना देत! मुलींची रांग पहिली आत घेतांना नानांनी, स्री दाक्षिण्य म्हणून असेल प्रत्येकी एक फटका हातावर दिला, हातचोळीत बिचाऱ्या आत जाऊन रांगेत उभ्या राहिल्या.
मुलांची रांग देखील, कमी उंची पासून जास्त उंची पर्यन्त अशी लावली, व सोडताना मुलांना मात्र दोन दोन फटके दिले डावा हात पुढे करावा लागे म्हणून ठीक नाहीतर दुसऱ्या दिवशी पेन हातात धरणे कठीण झाले असते! आम्हाला वाटले, चला सुटलो एकदाचे, आता तास सुरु होईल (म्हणजे व्यायाम प्रकार)! पण कसले काय? रांगेत उभ्या असलेल्या आम्हा मुलांकडे बघून नानांनी त्यांच्या हिंदीतून पुन्हा गर्जना केली “उँट कें माफीक क्यू खडे हो?“ आम्ही बावचळलो व थोडी ढिलाई घालवून एकदम ताठ उभे राहिलो – पुन्हा गर्जना “मै क्या आपकू घोडे की माफीक खडे रहना कहा?” आता आम्ही सर्व पुरतेच गोंधळलो, व समोर असलेली मान फिरवून आदमी के माफीक कैसे खडे राहायचे हे इकडे तिकडे करुन पाहू लागलो. त्वरीत नानांची तिसरी घोषणा “ क्या सब लोग बंदर बन गये क्या? सावधान!” त्या दिवशी गंगारामचा प्रसाद तर मिळालाच पण उंट घोडा व माकड ह्या तिन्ही अवतारांतून आम्ही पुनर्जन्म घेतला व म्हणूनच ही आठवण कायम राहिली आहे.
नानांच्या घरी, जेव्हां ते श्री खंडेराव सावे यांचे घरात (राममंदिरा समोर) रहात, गणपती उत्सव असे देवळा समोरील लालाजी चौकात’ पूर्वी नाना तेथे व्यायाम शाळा ही चालवीत व त्या प्रशिक्षण वर्गास “लालाजी व्यायाम शाळा” म्हणत, आप्पा त्याच व्यायाम शाळेचे विद्यार्थी होते),करमणूकीचे कार्यक्रम होत असत.
आमच्या माहिती प्रमाणे, नाना निरनिराळे व्यायाम, आसने,मर्दानी खेळ इ. ची प्रात्यक्षिके आपल्या शिष्यामार्फत दाखवीत. हीच परंपरा पुढे दसरा सम्मेलनाचे निमित्ताने ‘सोने’ लुटण्याच्या कार्यक्रम जेव्हा हायस्कूल मध्ये होई, तेव्हां चालू राहिली. नानांनी त्यावेळेस पन्नाशी ओलांडली होती, तरी गरगर फिरणाऱ्या लाठ्यांचा चक्रव्युहात घुसुन पुन्हा बाहेर पडणे व तेही लाठीचा एकही फटका न बसता हे नानांचे कसब आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. माझ्या साठी यांत विशेष गोष्ट म्हणजे त्यावेळी, मी मराठी शाळेत होतो व ओळीतील माझ्या सारखी पाच मुले निवडून नानांनी आमचे ‘एक अंकी’ नाटक (त्याचे नावही मला आठवते “चौकोनी खुंट्या”) त्यांच्या गणेशोत्सवासाठी बसविले होते व मी त्यात मुख्य भाग घेतला होता. आयुष्यात केलेले हे पहिले नाटक म्हणून ही नानांची आठवण.
नानांच्या खूपच आठवणी सागंण्या सारख्या आहेत, कारण माझे तर गुरुजी होतेच पण आप्पांच्या तरुण पणी त्यांना ही नानांनी ‘विद्या’ दिली होती व आप्पांच्या कडून देखील नाना विषयी, त्या काळच्या खूपच रम्यं आठवणी माहीती झाल्या. सेवानिवृत्तीनंतर नाना बोर्डी सोडून, त्यांचे चिरंजीव रविन्द्र यांच्याकडे बोरविली – मुंबईस राहण्यास गेले. मात्र त्यांचे शेवटच्या आजारांत, आप्पा खास बोर्डीहून पार्ल्यास माझे घरी आले व आम्ही नानांना भेटण्यास, गोविंदनगर बोरीवली येथे गेलो. नानांना इस्पितळात दाखल केले होते. हातात हात घेऊन, मूकपणे अशृ गाळणारी ती गुरुशिष्याची जोडी, माझे डोळ्यासमोरुन आजही सरत नाही !
हायस्कूल मध्ये विशेष लक्षांत राहिलेले माझे दुसरे एक गुरुजी म्हणजे अमृते (ग.रा.) सर! ते हिंदीचे प्रकांड पंडीत होते व त्यावेळी जोमात असणाऱ्या ‘राष्ट्रभाषा समिती – पुणे’ या प्रसिध्द संस्थेचे एक मुख्य आधारस्तंभ होते. बोर्डी मध्ये हिंदी भाषेच्या ‘प्रथमापासून ते पंडीत’ पर्यंतच्या, परीक्षा केंद्र सुरु करण्यात त्यांचाच वाटा होता. खूप माहीतीपूर्ण तसेच खेळकर पणे त्यांचे वर्ग असत व हिंदीतून त्यांना ऐकणे ही पर्वणी असे. त्यांचा मुलगा विद्याधर आम्हाला एक वर्ष पुढे होता, तो ‘भूगोल’ या विषयाचा एक तज्ञ म्हणून आजही विख्यात आहे. दूसरे चिरंजीव प्रकाश हे घोलवडलाच वास्तव्यास असल्याने नेहमीच संपर्कात आहोत! अमृते सर खूप दीर्घायुषी ठरले व अखेर पर्यंत, घोलवडला त्यांची भेट झाल्यावर आस्थेवाईक पणे चौकशी करीत. त्यांची कन्या व जावई हे दोघेही वैद्यकीय व्यवसायाद्वारे घोलवड व पंचक्रोशीची सेवा करीत आहेत. एन.के.पाटील सर देखील त्याच वेळी (मी शाळेत प्रवेश घेतला) नव्याने हायस्कूल मध्ये रुजु झाले होते. पदवीधर एन.के.सर इतिहासाचा तास घेत असत व पांढरा शुभ्र वेष, सडसडीत उंच बांधा आणि स्वछ व स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ते संपूर्ण वर्गाचा कब्जा घेऊन अतिशय मार्मिक पणे आपला विषय शिकवित असत! आम्हाला त्यांचा सहवास जास्त मिळाला नाही हे दुर्देव ! त्यांनी शिकविलेली “फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे” व त्यावेळी त्यांनी केलेली “लिबर्टी, इक्वॉलिटी, अँड फ्रॅर्टेनीटी (liberty, equality, & fraternity)” ची मीमांसा आजही कानात गुणगुणते!
श्री. एस. आर. सावे हे त्यावेळेचे बोर्डी हायस्कूलचे, सर्वात विद्यार्थीप्रिय शिक्षक. सतत हसणारा चेहरा व थट्टामस्करी करून विद्यार्थ्यांना, बरोबर ‘डोस’ पाजण्याचे कसब त्यांच्या कडे होते. सर, वसतिगृहाच्या व्यवस्थापनात, चित्र गुरुजींना मदत करीत व शाळेत व्यायाम, खेळ, भूगोल इ. विषय शिकवीत. आम्हा वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, क्रिकेट, volleyball, चे सामान मिळवायचे एकमेव आधारस्तंभ म्हणजे एस. आर. सावे सर! मी माझगांव फॅक्टरीचा Chief Manager, (चीफ मॅनेजर) झाल्याचे, राजा दमनकरने त्यांना सांगितले, तेव्हा एक सुंदर शाबासकीचे पत्र त्यांनी, मला प्रेमाने पाठवले, ते आजही संग्रही आहे.
श्री. जे.ए.सावे, देशपांडे, ड्रॉइंगचे दातार सर, केतकर बाई, हे थोड्या कालखंडासाठी शाळेंत आम्हाला गुरुवर्य म्हणून मिळाले. श्री. बी.बी.आरकेर सर हे आठवी व नववी पर्यंत बीजगणित शिकवित व कडक शिस्तीसाठी प्रसिध्द होते!
गुजराथी विभागाचे इंदुलाला शहा, बी.डी.शहा, मेहता व पटेल ही मंडळी देखील प्रत्यक्ष शिकवणीस नव्हती तरी, त्यांचे कर्तृत्व आम्हास गुजराथी मित्र सांगत असत!
डॉ. दिनानाथ चुरी आम्हास फिजोलॉजि शिकवित. डॉक्टरकीचा पेशा सांभाळून, सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून ते हा तास घेत असत व विशेष म्हणजे गुजराथी व मराठी अशा दोन्ही विभागाचे विद्यार्थी त्यावेळी एकत्र बसत व डॉक्टर मराठी व गुजराथी अशा दोन्ही भाषांतून विषय समजाऊन देत!
शेतकीचे तज्ञ शिक्षक नाईक सर आम्हाला कधी प्रत्यक्ष शिकविण्यासाठी आले नाहीत, तरी त्यांच्या शेतीतील अफाट ज्ञानाबद्दल आमचे शेतकी विषय घेणारे मित्र सांगत असत! ते देखील गुजराथी भाषिक असून मराठी व गुजराथी अशा दोन्ही भाषिक विद्यार्थ्यांस शेती विषय शिकवीत. गंमत म्हणजे आजचे सहल सम्राट केसरी भाऊ पाटील देखील वर्ष भर आमच्या बोर्डी हायस्कूलांत शेती विभागात होते व कधी तरी, फ्रि पिरीयडमध्ये, आम्हाला देखील शिकवून गेले आहेत! केसरी भाऊ त्यावेळी बोर्डी मध्ये राष्ट्र सेवादलाचे ही एक कार्यकर्ते ही होते व संध्याकाळी आम्ही शाखेवर गेल्यानंतर आमचे बौद्धीक व प्रात्यक्षिके घेत असत. पुढे आमच्या सो.क्ष.संघाच्या (सोमवंशीय क्षत्रिय समाज) कार्यात देखील भाऊंशी प्रत्यक्ष काम करण्याचा योग आला व गंमतीने मी त्यांना इतरांप्रमाणे ‘भाऊ’ न संबोधता ‘सर’ म्हणून संबोधीत असे!
चुरमुरे बाई आम्हास एक वर्ष हिंदी विषय शिकविण्यासाठी होत्या, पुढे त्यांचा संपर्क तुटला. दुर्देवाने बाईंना दीर्घयुष्य मिळाले नाही, त्यामुळे सोडल्यानंतर त्यांचा जो संपर्क तुटला तो कायमचाच!
आठव्या इयत्ते पर्यंत स्पर्धा ही मी, प्रभाकर, मोहन बारी, अरुण सावे, सुनंदा चुरी अशा बोर्डी – घोलवड मधील विद्यार्थ्यांमध्येच व आम्ही स्वतःला खूप ‘हुषार’ समजत होतो! मात्र नवव्या इयत्तेत प्रभाकर झोळ, हा विद्यार्थी बोर्डी हायस्कूल मध्ये आला आणि परीक्षेची सर्व समीकरणे बदलली!
बोर्डीच्या प्रा.शिक्षक ट्रेनिंग कॉलेजचे, तत्कालीन प्रिन्सिपॉल श्री. रा. ना. झोळ यांचा हा मोठा मुलगा ऊंच, गोरा, देखणा. प्रभाकर बुध्दीने ही खूप कुशाग्र होता व नववी मधील प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर त्याने पटकाविला! एखाद्या विषयांत आम्ही कुठेतरी पहिले असू, मात्र संपूर्ण विषयांतील एकूण गुणसंख्येत प्रभाकर झोळ हा उत्तम ठरला! प्रभाकर व प्रमिला ह्या दोघा बहीण-भावंडांनी त्यावेळी आपापल्या तुकडीत प्रथम क्रमांक सोडला नाही. लग्नानंतर प्रमिला झोळ, प्रमिला काळे झाली व मराठी साहित्यात तिने कांही सुंदर प्रवासवर्णने लिहली!
दहावीत पुन्हा, स्पर्धा आणखी तीव्र झाली ‘श्रीकांत सांब्राणी’ हा विद्यार्थी बडोद्यातील चिमणाबाई हायस्कूलांतून, कांही वैयक्तिक कौटुंबिक कारणामुळे, आमच्या बोर्डीच्या हायस्कूल मध्ये आला. त्यानंतर आम्ही कोणीच पहिला नंबर १० वी ११ वीत पाहिला नाही ती मक्त्तेदारी श्रीकांतची झाली. ११ वी बोर्डाच्या परीक्षेत देखील श्रीकांत सांब्राणी ७९% गुण मिळवून शाळेत पहिला आला आणि काही थोडक्या गुणासाठी, त्यावेळी मिळणाऱ्या पहिल्या पंधरा गुणवान विद्यार्थ्यात त्याचा नंबर हुकला!
झोळ व सांब्राणी खरंच खूप कुशाग्र बुद्धीमत्तेची देणगी मिळालेले विद्यार्थी होते, झोळची अपार मेहनत व कष्टावर भर जास्त होती तर सांब्राणी ‘जातिवंत हुषार’ होता. तो वसतिगृहावर रहात असे व त्याचे मित्र सांगत असत “तो अभ्यासापेक्षा अवांतर वाचन जास्त करतो, खर्डेघाशी कधीच करत नाही!” किडकिडीत शरीरयष्टीचा, बुटकासा, तजेलदार नाक-डोळी, मात्र थोडे पसरट कान असलेला सांब्राणी अभ्यासाव्यतिरिक्त वक्तृत्व, लेखन, इ. स्पर्धेतही खूप रस घेई, मात्र खेळांकडे त्याचे दुर्लक्ष होते! शाळेच्या त्याच्याकडून बोर्डाच्या गुणवत्ता यादीत झळकण्याबाबत खूप अपेक्षा होत्या, मात्र बुद्धिमत्ता असून थोडा आळस केल्यामुळे असेल, पण ‘श्रीकांत सांब्राणी’ हे नाव एस.एस.सी बोर्डाच्या मे १९५९ च्या यादीत आले नाही एवढे खरे!
आमच्या खेडे गावातील शाळेचा देखील तो खूप मोठा बहुमान ठरला असता! ११ वी नंतर मी साताऱ्यास महाविद्यालयात शिक्षणासाठी गेलो व हे दोघे मित्र पुण्यास गेले. झोळ पुढे पुण्याच्याच इंजिनियरीगं महाविध्यालयांतून पदवीधर झाल्याचे कळले, तर सांब्राणी ने मुंबईत ११ वी नंतर इंजिनियरींगचे शिक्षण घेतल्याचे कळले. दुर्देवाने आमच्या प्रभाकर झोळचे पुण्यात, एका दुर्दैवी अपघातात अकाली निधन झाल्याचे कळले व खूपच दुःख झाले. एक तेजस्वी उगवता तंत्रज्ञ असा अचानक काळाच्या पडद्याआड गेला!
सांब्राणी बद्दल पुढे काहीच माहिती कळली नाही ! २००९ मध्ये आम्ही सर्व मित्रांनी (१९५९, एस. एस. सी. बॅच ला ५० वर्ष पूर्ण झाली होती म्हणून ), एक शानदार, ‘पुनर्मिलन’ कार्यक्रम बोर्डीत केला, त्यावेळी खूप प्रयत्न करुन ही श्रीकांत सांब्राणीचा शोध कोणाला घेता आला नाही! हा माझा मित्र, कोठेही जगाच्या पाठीवर असुदे, मजेत असुदे ही परमेश्वराकडे प्रार्थना! त्या वेळच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांपैकी हसमुख शहा व सुरेश भाटलेकर या मित्राशी माझी विशेष ओळख झाली. दुर्देवाने हसमुख शहा अकालीच गेला मात्र सुरेश हा वेटर्नरी डॉक्टर झाला व पोल्ट्रीचा मोठा उद्योग आज चालू आहे. आमच्या भेटी ही कधीतरी होत असतात. बोर्डी-घोलवड मधील प्रभाकर राऊत, मोहन बारी, जयप्रकाश राऊत, अरविंद राऊत, हरिश्चन्द्र राऊत, बाबुभाई ठाकूर, शारदा पाटील (चुरी, सुनील गारेक्ष, शितूत, सुरेश पाटील) ही मंडळी आजही भेटत असतात व जुन्या आठवणी निघतात. प्रभाकर दुर्देवाने १९५९ च्या मार्च एस.एस.सी. परीक्षेस आजार मुळे बसू शकला नाही, मात्र ऑक्टोबर १९५९ च्या परीक्षेत त्याने सबंध बोर्डात पहिला नंबर काढून स्वतःचे व शाळेचे नांव उज्वल केले आहे.
शिक्षकी पेशातून त्याने गोखले एज्यु.सोसायटीच्या नाशिक येथील हायस्कूल मध्ये मोलाचे योगदान दिले व त्याच्या कर्तृत्वामुळे बोर्डी हायस्कूलात देखील प्रिन्सिपॉल म्हणून त्याची नेमणूक झाली. आज ही बोर्डीच्या शिक्षण संकुलाचे विस्तृत स्वरूप, निर्माण करण्यात प्रभाकर राऊत सरांचा सिहांचा वाटा आहे व हे कर्तृत्व ओळखून गोखले संस्थेने त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत, आजही बोर्डी व परिसरांतील सर्व संस्थांचा कार्यभार, सचिव म्हणून पाहतात. माझा शाळकरी सोबती म्हणून तर मला त्याचे विषयी आत्मीयता आहेच, पण माझा ‘ खास मित्र’ म्हणून एवढे वर्षांत ही आमची ओळख टिकून आहे. मेहता कॉलेजच्या व्यस्थापनांत, प्रभाकर मुळेच मला संधी मिळाली, हे नमूद करण्यातं मला संकोच वाटत नाही.
मोहन बारी हा माझा मित्र, अतिशय गरीब व सामान्य परिस्थितून मार्ग काढीत, ‘शेती तज्ञ’ म्हणून महाराष्ट्रतून नव्हे तर भारतात नावा रूपास आला. पुण्याच्या शेती कॉलेजात पदवी शिक्षण झाल्यावर मनीला – फिलीपाईन्स (Manila, Phillipines) येथील राईस रिसर्च टेस्ट मध्ये त्याने संशोधन केले व पुन्हा भारतात येऊन, गोखले सोसायटीच्या कोसबाड येथील प्रसिध्द शेती केंद्रात मोठे योगदान दिले. घोलवड-टुकेपाडा येथेच त्याचे वास्तव्य असल्याने, मी घोलवडला असल्यास नेहमीचं त्याच्या घरी गप्पा मारण्यास जात असे. दोन वर्षापुर्वीच दुर्देवाने त्यांचे निधन झाले.
त्यावेळच्या आमच्या वर्ग मैत्रिणी पैकी आज फक्त शारदा चुरी ( पाटील) हिच्याशी मी संपर्कात असतो. शारदाने आमच्या सो. क्ष. समाज संस्थेत मोठे योगदान देऊन – उपाध्यक्ष पद ही भूषविले व स्वतः केलेल्या चिकू वरील संशोधनातून आपला ‘अमृत माधुरी’ हा चिकू फळापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थाचा व्यवसाय तिने नावा रूपास आणला आहे. सुखी-समाधानी असे तिचे कौटुंबिक जीवन आहे!
वसंत राऊत हा माझ्या मित्रांमध्ये, खूप कठीण आर्थिक परिस्थितीतून जे.जे. स्कूलचा डिप्लोमा घेतला व भारतातील तसेच परदेशातील कापड उद्योगात एक निष्णात ‘डिझाईन आर्टिस्ट’ म्हणून नाव कमाविले, आजही त्याचे ते काम सुरु आहे. कधीतरी बोर्डीत भेटतो, कारण त्याचे वास्तव्य बोर्डी बाहेरच जास्त असते.
हरीहर पाटील हा माझा आणि एक खास मित्र भारतीय ‘एयर फोर्स ‘मध्ये त्याने योगदान दिले व स्वेच्छा निवृत्ती घेतली मात्र कांही वर्षा पूर्वी तो अचानक निवर्तला!
सुरेश पाटील देखील, भारतीय हवाई दलात होता , मात्र आज तो शेती करतो, कधी तरी भेट होते! जयप्रकाश राऊत, अरविंद राऊत, हरिश्चंद्र राऊत, बाबू भाई ठाकूर हे सर्व बोर्डी घोलवडला गेले की हमखास भेटतात. सुनील गोरक्ष, शितूत, ही मंडळी घोलवडलाच स्थायिक असल्याने, भेट गाठ नेहमीच होते! डी.एन.सावे व शामराव राऊत हे बोर्डीचे मित्र नुकतेच निर्वतले. डी.एन. हा उत्कृष्ठ खेळाडू होता, बोर्डीच्या हायस्कूल मध्येच त्याने आपली सेवा दिली. शामू मुबंईस कंपनीत कामाला होता – मागे सांगितल्याप्रमाणे दहावीत आम्ही बॅक बेंचर होतो ! अरुण सावे बद्दल पुढे साताऱ्याच्या कालखंडाबद्दल उल्लेख येईलच मात्र आठवी ते अकरावी व पुढे कॉलेज मध्ये देखील मला अरुणची साथ होती. एक खूप हुषार विद्यार्थी, पदवीधर होऊन बोर्डी शाळेतच त्याने खूप छान जम बसविला होता – मात्र अगदी कारकिर्दीच्या ऐन बहारांत असतांना, त्याचा अकाली अंत झाला. त्याची आठवण मी कधीच विसरु शकणार नाही. दादरच्या वंर्तक स्मारक मंदिराला देखील मी तेथे रेक्टर असतांना अरुण बी.एड.च्या कोर्स साठी वर्षभर होता व आम्ही खूप आनंदात ते दिवस काढले !
खूप आठवणी, खूप मित्रांचे, चेहरे डोळ्या समोर येतात, मात्र सर्वांची नांवे आठवत नाही! प्रसंग असे आहेत, पण सर्व लिहिणे येथे शक्य होणार नाही ! मात्र बोर्डीच्या हायस्कूलांतील चार वर्षाचा तो कालखंड आयुष्यातील अतिशय सुखा समाधानाचा व अनेक सुखद आठवणींचा संचय करणारा आहे.
भिसे, चित्रे, साने, आपटे अशा महान विभूतांचे आशिर्वाद मिळाले आणि ही शिदोरीच पुढे वाटचाली मध्ये खूप खूप कामाला आली!बोर्डी १९५९ च्या एस.एस.सी.च्या नंतर सोडले आणि साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजात प्रवेश घेण्याचे ठरले साताराच का? आणि तेथे कसा पोहोचलो, ही हकीकत देखील मोठी मजेशीर आहे.
खूप छान आठवणी ??
खूप लिहा ??