भारण्या

कला: श्री भास्कर दमनकर

जगात काही लोक जन्माला येतात ते केवळ दारिद्र्य आणि “दारिद्र्याचे दशावतार” भोगण्यासाठी! या पराकोटीच्या दैन्याव्यस्थेमुळे आणि  त्यामुळे  आलेल्या  लाचारी मुळे समाजाकडून सतत होणारी अवहेलना, तिरस्कार आणि तुच्छता यांचे चटके आयुष्यभर सहन करीत, एक दिवस जगाचा निरोप घेणारी ही मंडळी पाहीली की मला त्या दयाघन परमेश्वराला प्रश्न विचारावा वाटतो .. “यांच्या नशिबी जन्मभर हीच जिंदगी का?”.. देवाकडेही काही उत्तर नसावे, म्हणून जग म्हणते.”ते त्यांचे पूर्वसंचित!!!”

     आमच्या लहानपणी बोर्डी मध्ये गरबा, तारपा,घोर, मैदानी खेळांचे सामने, रामलीला अशाप्रकारचे अनेक उत्सव सणावारा अनुसार, वर्षभर होत रहात, त्यामुळे या अनेक उपक्रमात भेटलेली अनेक माणसे लक्षात राहिली आहेत. घोर म्हणजे एक सांगीतिक कार्यक्रम ,बारी जमातीची मंडळी, एक विशिष्ट गणवेश घालून व एका मोठ्या हंड्यामध्ये एक छोटा पोकळ बांबू ठेऊन ,जोडलेल्या दोरी च्या घर्षणाने संगीत निर्माण करून, त्यावर नाच करीत असत. घोर खेळताना होणारा बेभान जगन बारी,रामलीलेमध्ये आपल्या प्रसंगोचित विनोदाने हसवणारा विदूषक बाबल्या ,तारप्याच्या सप्त सुरांमधून, स्वर्गीय संगीत निर्माण करणारा दादू आणि त्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचणारी आदिवासी बाया बापळे मुले, तसेच दिवाळीतील संघिक आणि वैयक्तिक स्पर्धांच्या सामन्यांमध्ये आपल्या अफाट कौशल्याने क्रीडांगणावरील हजारो प्रेक्षकांची करमणूक करणारे शेट्टे बंधू, सायकल पटू इंदुलकर मामा,ही सर्व मंडळी त्या वेळी आमचे हिरो होती. मात्र आजही मनात ठसलेल्या या काही अनेक व्यक्तीमत्वा पैकी एक व्यक्तिमत्व, अगदी वेगळ्या कारणासाठी, मनात कायमचे ठसले आहे आणि त्याच्याविषयी कुतुहूल अजूनही पूर्ण झाले नाही, मनातील  अनुभवलेले प्रश्न  आजही अनुत्तरित राहिले आहेत  म्हणून त्या व्यक्तिमत्त्वाविषयी  म्हणजे भरण्याविषयी  हे थोडे..

आमच्या ,स्थानिक  गावठी भाषेत, भारण  म्हणजे  घराबाहेर फेकून दिलेल्या कचऱ्याचा ढीग !! तू कधी शाळेतच गेला नव्हता त्यामुळे आई-बाबांनी लहानपणी काय नाव ठेवले होते हे कळायला काही मार्ग नाही मात्र गावाने तरी उपरोधिक असे टोपणनाव देताना तिथेही त्याला ओवाळून टाकले! त्याकाळी शेक्सपियर नव्हता नाहीतर त्याने “वाट इस देअर इन द नेम …” ,नावात काय आहे? हा आपला, जगप्रसिद्ध वाक्प्रचार मागे घेतला असता ,कारण नावातही काहीतरी असतेच, हे भारण्याच्या नावावरून त्याला कळले असते. गावाने नावाचेच ” भारण” केल्यामुळे, ओवाळून टाकलेला हा बापडा जीव,अगदी गावाबाहेर एका टोकाला कुठेतरी राहात असे. जगातील सर्व दैन्य लाचारी गुलामी एकत्रित करून त्याची सजीव मूर्ती बनविली असती तर त्या अभाग्याला, भागण्या हेच नाव योग्य होते !! यावरून त्याच्या  व्यक्तिमत्वाची,हलाखी जीवनाची  यथार्थ कल्पना यावी. अब्रू झाकण्या पूर्ती मळकी लंगोटी आणि  आणि  कोणीतरी भारणातच फेकून दिलेला जीर्ण शर्ट, या शिवाय दुसरी वस्त्रेही नव्हती. कधी काळी दसरा दिवाळीला  लोकांनीच  दान केलेली एखादी, तोकडी ठिगळे लावलेली पॅन्ट म्हणजे त्याचा सणासुदीचा पोशाख!! लोकांची फाटकी पादत्राणे हा दुरुस्त करून देई, व त्यातूनच एखादी दहा वेळा रफू केलेली पायतान याला बक्षीस मिळे. चपला, जोडे दुरूस्तीतून मिळणारे, त्यावेळी दिवसाचे रुपया दीड रुपया उत्पन्न ही त्याची कमाई!  पण स्वतःसाठी एक चांगली चप्पल ही  तो कधी घेऊ शकला नाही.त्यावेळी गावात पादत्राणे वापरणे व ती, कातडीची ,म्हणजे एक चैन होती, बहुतेक  मंडळी अनवाणीच  फिरत असत. स्लीपर अजून आल्या नव्हत्या. मी स्वतः एस एस सी परीक्षा होऊन गावाबाहेर पडेपर्यंतचांगले चप्पल वापरले नव्हते. साताऱ्याला महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गेलो तेव्हाच अप्पांनी एक चप्पल जोड घेऊन दिला होता. चपला तयार करणाऱ्या कारागिराला मोची म्हणत. आमचे गावात डाह्या मोची हा एकमेव चप्पल बनविणारा आणि जुन्या चपला दुरुस्त करणारा कारागीर!बूट तर गावात आलेच नव्हते शारदाश्रमातील काही मंडळी ,बाहेरून येत, त्यांचे पायात बूट पहावयास मिळत. त्यामुळे कोणाची फाटकी चप्पल घरी येऊन दुरुस्त करून देणे, हादेखील उदरनिर्वाहाचा एक व्यवसाय होता आणि भांरण्या  तेच काम करीत असे.

   गावाबाहेर वास्तव्य असणारा भारण्या, सकाळी मळकट लंगोटी वर गावभर फिरे,आणि   खांद्याला अडकलेल्या कापडी पिशवीत रफू कामाची  एक-दोन अवजारे असंत,  त्याच पिशवीत  कोणाकडून मिळालेला  भाकर तुकडा ही पडत असे. कधी  डोक्यावर मळकट खाकी टोपी..हा सगळा वस्त्रालंकार  परिधान केल्यावर भारण्याचे ध्यान ही मोठे गमतीशीर दिसे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू भारण्याला सारखेच असत. त्याच्या या पेहरावात आणि त्याच्या दिनक्रमात कधीच फरक पडला नाही. गावात काम शोधीत फिरत असताना तो कधीही एकटा दिसलाच नाही. 1,2 टपोरी उनाड पोरे त्याचे पुढेमागे, थट्टा मस्करी करीत, तर कधी त्याला मागून-पुढून लहान दगड मारत, त्याला घाबरवण्याचा च्या मजेचा आनंद घेताना दिसत असत. त्यांना ओरडणे वा हाकून देणे भारण्याला कधीच जमले नाही, तो त्याचा पिंड नव्हता. अगदी बारीक व किरकिर्या आवाजात ओरडणार तरी किती? त्याची नजर ही समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तीकडे नसेच एकटाच काही तरी बडबड करीत असे. लाचारी, दैन्य,आत्मविश्वासाचा अभाव, मानसिक गोंधळ या सर्वांचे बेमालूम एकमेवाद्वितीय, चालते-बोलते सजीव रूप म्हणजे हा भारण्या  होता! रोज बोर्डी बाहेरील,हरीजन वाड्यातील,आपल्या घरून निघून, गावभर फिरून, घरासमोर उभे राहून, तेथील यजमानाला त्याच्या नावाने हाक मारीत असे आणि “काय सप्पल बिप्पल दुरुस्त करव्या ही हाय का” अशी हाळी देत असे. वाडवळी व गुजराती भाषा त्याला अस्खलित येई. त्यामुळे गिऱ्हाईकाची संवाद बहुदा याच भाषांतून होत असे. कोणी जुनी फाटकी चप्पल, वादी लावायला अथवा  दुरुस्ती करिता दिली तर गिऱ्हाईकं ढबू पैसा हातावर ठेवी, तोच मेहतांना त्याला खूप होई. त्याबाबत कधीही तक्रार नसे. कधी कधी तर एखाद्या तुटक्या,चहाच्या कपा मधून दिलेला अर्धा कप चहा देखील त्याला पुरेसा असे

  आमच्या होळीवर म्हणजे, बोर्डी गावातील राहण्याच्या आमच्या  परिसरात, पाच एक घरे होती. आमची 2,बत्तू काका, गांडिया काका,अर्जुन मिस्त्री, आणि  बरीचशी भटकी कुत्री.. तीदेखील आमच्या होळी वरील वस्तीची कायम निवासी होती. त्यांचा जोरदार “गाण्याचा” आवाज आला म्हणजे समजावे, भारण्याचे आगमन होळीवर झाले आहे!! कुत्र्यांचे भुंकणे ही भारण्याच्या आगमनाची वर्दी होती,कुत्र्यांना रस्त्यातून उचलून दगड मारणे तर सोडा पण हाड..हाड करणेदेखील त्याला जमत नसे. आपली “लंगोटी ” सावरत, तोच कुठे तरी लपवायचा प्रयत्न करी. त्याचा हा स्वभाव व  ही करूण अवस्था पाहून मला नेहमी प्रश्न पडत असे,हा माणसा सारखा माणूस,एवढा गरीब, भित्रा का? माझ्या जीवाची घालमेल होई त्यावेळी खूप करूणा वाटे. मी कधीतरी मला मिळालेले व खास त्याच्यासाठी ठेवून ठेवलेले एखादे चॉकलेट, गोळी, बिस्किट, भारण्याच्या हातावर ठेवली  तर एखादा मौल्यवान हिरा मिळाल्यावर एखादा रत्नपारखी हातात घेऊन त्याला जसे न्याहाळील,त्या प्रकारे भारण्या ती वस्तू हातावर ठेवून, पुन्हा पुन्हा आपल्या तिरक्या नजरेने त्या कडे पाहत राहि, आणि मग पिशवीत ठेवून देई. हे ही एक माझ्यासाठी आश्चर्यच होते कारण, कोणतीही दिलेली वस्तू स्वतः न खाता तो आपल्या पिशवीत टाकून घरी येऊन जाई,  मला नवल वाटे. कोणीही दिलेली  कुठलीही खाण्याची वस्तू  हा आपल्या  पडक्या मूळच्या  पिशवीत टाकीत असे म्हणून मला वाटते  ह्याला  कोणतीच वस्तू कधी खावीशी का वाटत नाही?  याच्या घरी  मुले असतील काय?ते शक्य वाटत नव्हते .याला  बायको तरी कोण देणार?  असा बुळ्या माणूस कुटुंब सांभाळू शकतो?संसारी आहे तर या अशा कमाईत किती पोटे भरणार? असे अनेक  विचार येत, व याचा एकदा छडा लावावा,भारण्याचे कुटुंब म्हणजे काय,त्याचे घरी कोण कोण आहेत हे एकदा प्रत्यक्ष पहावे असे मला वाटू लागले.

    सुट्टीच्या एके दिवशी, मी भारण्याचा घरापर्यंत  पाठलाग करण्याचे ठरविले. तो आपली गावातील फेरी झाल्यावर कुठे जातो, याचा प्रत्यक्ष छडा लावायचे ठरवले.मला त्यावेळी बोर्डी गावाचीही व्यवस्थित माहिती नव्हती तरीसुद्धा ते धाडस मला करावेसे वाटू लागले, कारण माझे कुतूहल मला स्वस्थ बसू देईना.

    त्यादिवशी जेवणे झाल्यावर मी गावात, भारण्याच्या मागावरच  राहिलो. मला तो धर्मशाळेजवळ दिसला.कुणीतरी दिलेले उष्टे जेवण खात असावा.. त्यादिवशी  एक तर खूप भूक लागली असावी  अथवा  फाटक्या पिशवीतून  जेवण नेणे शक्य नसावे. त्याचे मागे मागेच राहिलो.त्याच्या घराची वाट समुद्र किनाऱ्यावरून, जेथे जुनी बालवाडी होती, त्या भागात होते. तो हरिजन वाड्याचा भाग होता. भारण्याची झोपडी आली.झोपडी तरी कसली?खजुरी ची झापे, व जुन्या फाटक्या बारदानाचे काही तुकडे लपेटून बनविलेला “निवास”होता.वाळूमध्ये घरासमोर दोन शेंबडी मुले खेळत होती.त्याला बघून ती धावत धावत देऊन त्याच्या पायाला बिलगली. पिशवीतील जमवलेल्या गोळ्या ,शिळ्या भाकरीचे तुकडे काढून भारण्याने त्यांना दिले तेवढ्यात त्याची धर्मपत्नी देखील घरातून बाहेर आली तिने भारण्याच्या खांद्यावरील पिशवी झटक्यात काढून घेतली,व उरलेले  भाकरी तुकडे जमिनीवर उपडे करून मुठीत खायला घेतले  व  पिशवीतून बाहेर पडलेली,दोन-चार ढबू पैशाची नाणी आपल्या कनवटीला लावली. आज काहीच विशेष ,रोजी वा खाऊ मिळाला नाही, याचा संताप तिच्या चेहऱ्यावर होता. मात्र, एवढे कष्ट करून आलेल्या या नवऱ्याला, पाणी देण्याचेही सौजन्य तिच्याजवळ दिसले नाही. जगाने तर भारण्याला उपेक्षिले होतेच, पण प्रत्यक्ष घरात ही तेच त्याच्या नशिबी होते. हे दृश्य मला  खूप काही  सांगून गेले. एवढ्या दिवसांचे  माझे कुतूहल  जमले होते  हे खरे.  मात्र त्या दृष्याचा  परिणाम  त्यावेळी  एवढा झाला , आजही की,आज ही ते दृश्य तसेच्या तसे डोळ्यासमोर येते!!  ती नागडी उघडी, अगदी आतुरतेने वाट पाहत राहीलेली,दोन मुले  आणि हातातून पिशवी हिसकावून घेऊन  मिळालेले चार पैसे व  भाकर तुकडा  घेऊन जाणारी  आपल्या  थकून-भागून आलेल्या नवर् या ची  एका शब्दाने ही चौकशी न करणारीती, भारण्याची अर्धांगिनी.. सर्वच अस्वस्थ करणारे..  मी मागे फिरलो. हो ,भारण्याला कुटुंब होते, बायको होती व दोन लहान मुले देखील होती. एवढीच एक  गोष्ट मला दिलासाही देऊन गेली शेवटी या अशा विपन्नावस्थेतील  जीवनात देखील कोणी जोडीदार आहे, त्याचाही संसार आहे.. आणि विशेष म्हणजे त्याची वाट पाहणारे, कोणीतरी घरी आहे …..त्यानंतरही ही अनेकदा तो गावात भेटला शक्य होईल तेव्हा, आता मी त्याला मुद्दामहून, काही गोळी चॉकलेट तरी देत असेच पण मिळालेले एखादे ढबु पैशाचे नाणे देखील त्याच्या हातावर ठेवत असे. काही वर्षांनी मी बोर्डी सोडली. कधीतरी गावी आलो तर भारण्याची चौकशी करीत असे. पुढच्या एका फेरीत,भारण्या दिसला नाही. चौकशी केल्यावर तो गेल्याचे कळले. मात्र पुन्हा त्याच्या त्या समुद्रावरील निवासस्थानाजवळ जाण्याचे धैर्य मला झाले नाही. नंतर पुन्हा कधीच तेथे गेलो नाही त्याची स्मृती मात्र आजही मनात ताजी आहे .

    लहानपणी भारण्याला बघून मनात एक कुतूहल निर्माण झाले आणि मी माझ्या बालसुलभ वृत्तीने,माझ्या परीने त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. आज, जगाचे अनेक बरे वाईट अनुभव घेतल्यावर, विविध रंगी, ढंगी माणसे पाहिल्यावर, त्यादिवशी  भारण्याच्या घरी पाहिलेल्या, दृश्याच्या  पार्श्वभूमीवर एक विचार माझ्या डोक्यात येतो आहे. सर्व सामान्य पणे जगात प्रत्येकाच्याच वाट्याला सुखदुःख, हाल-अपेष्टा,परिस्थिती मधील चढ-उतार श्रीमंती, गरीबी येत असते आणि माणसाने त्याला सकारात्मक दृष्टीने तोंड द्यावयाचे असते असे  सांगितले जाते .म्हणूनच कविवर्य केशवसुत यांनी हतभागी जीवांना  दिलासा देण्यासाठी म्हटले आहे 

       अमुचा प्याला दुःखाचा ,डोळे मिटुनी घ्यायचा.

  असे दुःखाचे प्याले, प्रत्येकाला,अपरिहार्यपणे कधी ना कधी घ्यावेच लागतात. आणि त्यावेळी मनात, एक आशा ही बाळगावी लागते..कधी ना कधी असाच सुखाचा प्यालाही ओठाला लागेल! गीतेने हि म्हटले आहे ..

         सुख-दुःखे समाज कृत्वा…

  या वृत्तीने माणसाने सुखदुःख कडे पाहिले पाहिजे. सुखाने हुरळून जाऊ नये दुःखाने उन्मळून पडू नये. ही वृत्ती जीवन जगताना उपयोगी पडते. त्यासाठी मोठी  अध्यात्म धारणा असलीच पाहिजे असे नाही. दृष्टिकोण मात्र वास्तव असला पाहिजे. सुखदुःख ,दोन्ही ,मानवी जीवनातल्या अपरिहार्य अशा गोष्टी आहेत.मग माझ्या मनात असा विचार येतो, भारण्याला देवाने सुखाचा तर नाहीच, पण दुःखाचा प्याला सुद्धा हातात दिला नाही…हातात  प्यालाच दिला नाही .. प्राक्तनातील, दुःखाचे जहर देखील त्याला आपल्या दुबळ्या ओंजळीतूनच  प्यावे  लागले! अशी ही दुर्दैवी,हतभागी माणसे, भारण्याच्या काळीही होती व आजही जगात असतील. दुःखाचा का असेना, पण आपला फुटका तुटका प्याला हातात असला  तर, ‘आपल्या  वाटेचे, कधीतरी, सुखाचे चार थेंब,आपल्या  प्याल्यात  पडतील ही अपेक्षा तरी त्यांनी कशी ठेवायची? मला वाटते, गीतेचे आणि या जगातले, जीवन विषयी सर्व तत्वज्ञान भारण्या सारख्या माणसांनी, खऱ्या अर्थाने पचविले आणि तसे जगून दाखविले. याही परिस्थितीत भारण्याने आपला संसार केला, मुले, बायको यांच्याबरोबर विपन्नावस्थेत का असेना, ते दिवस काढले आणि पळपुटेपणा न दाखवता आत्महत्येचाही विचार न करता, देवाने दिलेले  संपूर्ण जीवन  जगून, एके दिवशी, देवाजीचे निमंत्रण आल्यावरच, देवाघरी निघून गेला. एक गोष्ट निश्चितपणे वाटते,  देवाघरी मात्र, मागील जन्मातील झालेली आपली चूक भरून काढण्यासाठी, आणि भारण्याच्या खात्यावर पापा ची बाजू शून्य असल्याने, चित्रगुप्ताने भारण्याला, स्वर्गवासच दिला असेल. भारण्याला आणि त्याच्या सारखे जीवन जगणाऱ्या अनेकांना विनम्र अभिवादन.