आप्पांची पत्रे भाग-६

आप्पांच्या पत्रांचा सहावा भाग आज प्रसिद्ध करीत आहोत 1965-66 काळातील ही पत्रे आहेत. या काल खंडा मध्येच माझे एम. एस .सी. टेक् चे पदव्युत्तर शिक्षण चालू होते. अण्णाही वसतीगृहात माझ्या बरोबर होते, त्यांचेही इंजीनियरिंग शिक्षण चालु होते. त्याच बरोबर अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराची व तात्यासाहेब चुरी वसतिगृहाची संपूर्ण व्यवस्था मला पहावी लागत होती. याची जाणीव असल्यामुळे त्याबाबत व्यवस्थित सूचना व मार्गदर्शन आप्पांनी केलेले आहे .त्यांना लागणारी काही औषधे त्यावेळी शाळेत असणाऱ्या नीलम साठी रेनकोट पपी साठी वह्या ,एका सहकारी गुजराथी शिक्षकांसाठी मदत म्हणून औषधे ,वगैरे बाबींचा उल्लेख आहे. अरुणा व भाईंचा नुकताच विवाह झालेलाहोता. त्यांच्या ,चिंचणी ,बोर्डी भेटीची हकिकत आहे. नेहमीप्रमाणे आप्पा विविध ट्रस्ट व धर्मादाय संस्थांची जंत्री ठेवीत असत.त्याप्रमाणे ‘वनमाळी ट्रस्ट’ संस्थेने देऊ केलेल्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची व इतर माहिती आम्हाला कळविली आहे.
एक विशेष गोष्ट म्हणजे, त्यावेळी मला टांझानिया येथील बिर्ला क॔पनीच्या कारखान्यात, मॅनेजर म्हणून बोलाविले होते त्याचा एका पत्रात विस्तृत उल्लेख केलेला आहे.ह्या नोकरीचे नेमणूक पत्र घेऊन मी जेव्हा आप्पांना दाखविले. मला असलेल्या अपेक्षे पेक्षा वेगळीच प्रतिक्रिया मला आप्पांकडून मिळाली. आप्पांचा चेहरा गंभीर झाला, डोळे भरून आले. त्यांनी मला शक्यतोवर तेथे न गेलास तर मला बरे असे सांगितले, जास्त बोलले नाहीत. मात्र पुढे पाठविलेल्या यापत्रात म्हणतात बेटा, “मी तुला जाऊ नको म्हटले होते, परंतु आता मला वाटते तुझा निर्णय तूच घे व तुला जाण्यामध्ये आनंद असेल तर तू जावे अशी माझी इच्छा आहे.” त्या पत्रांतील एक वाक्य अतिशय हृदयद्रावक असे आहे मला वाटते ते प्रत्येकाने शब्दशः वाचावे. त्यांच्या मनीची व्यथा येथे व्यक्त केली आहे…”मुलांनो तुमचे लाड, कौतुक आवडीनिवडी, मी लहानपणी पूर्ण…… ही माझी गरीबीची व्यथा आहे, माझ्या भावना दाबून तुला परवानगी देत आहे…..” असे पत्र वाचल्यानंतर कोणत्या मुलाला , आपला प्रेमळ पिता सोडून परदेशी जाण्याची इच्छा होईल? मी तो माझा बेत रद्द केला. मला वाटते, मी त्यावेळी आप्पांचे ऐकले, त्याने माझे भविष्यात हितच झालेले आहे.

त्या ओळी अवश्य वाचाव्यात.