गुरुवर्य नानाजी गुरुजी

कै. नानाजी गुरुजी

गुरुवर्य नानाजी, म्हणजे आमच्या बोर्डीचे विद्यार्थीप्रिय माझ्या वडिलांचे गुरु कैलासवासी नाना मास्तर. त्याकाळी शिक्षक लोकांना वामन मास्तर, पंढरी मास्तर या नावाने गावात ओळखले जाई. आम्ही विद्यार्थी,आमच्या शिक्षकांना गुरुजी म्हणून संबोधित असू. असो, खरेतर नानाजी हे माझ्या वडिलांचे म्हणजे आप्पांचे गुरुजी. माझ्या लहानपणी मी हे नाव आप्पांच्या तोंडून अनेकदा ऐकले होते .माझे वडील देखील बोर्डी शाळेत शिक्षक होते आणि त्यावेळी बोर्डीच्या प्राथमिक शिक्षक ट्रेनिंग कॉलेजमधील ‘शिक्षक विद्यार्थी’, मंडळी त्यांच्या पाठा संबंधी चर्चा करण्यासाठी आप्पांचे कडे मार्गदर्शनासाठी येत असे, तेव्हा,आप्पा त्यांना सांगत,”आज मी जो काही, शिक्षक म्हणून आपल्याला मार्गदर्शन करू शकतो,त्याचे खूप मोठे श्रेय, माझे गुरुजी नानाजी राऊत यांना जाते.” मोठ्या अभिमानाने आणि कृतज्ञतेने, आप्पा ,त्या शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत असत. त्यामुळे या नावाविषयी मला खूप कुतूहल देखील होते आणि त्या संबंधात मी आप्पांना विचारलेही होते.आप्पांनी मला त्यांच्या लहानपणीच्या शाळेतल्या काही आठवणी सांगितल्या आणि त्यात त्यांचे गुरुजी नाना मास्तर यांची ही सांगितलेली एक आठवण ही माझ्या लक्षात आहे .आप्पा एक चांगले व्यायाम पटू होते. विद्यार्थीदशेत त्यांनी व्यायाम, विशेषतः योगासने करून पिळदार शरीर कमावले होते व त्यासाठी बोर्डीच्या लालाजी व्यायाम शाळेत ते नियमितपणे जात असत. तेथे त्यांचे गुरू म्हणजे व्यायाम शिक्षक श्रीयुत नाना मळेकर हे त्यांना सर्व प्रकारचे व्यायाम शिकवीत असत. नाना मळेकर हे आमच्या हायस्कुलात व्यायाम शिक्षक म्हणून होते आणि मलाही सुदैवाने यांच्या या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थी म्हणून झालेला आहे.
तो काळ साधारणतः 1925, 30 सालचा असावा आणि आप्पांचे वय सुमारे 12ते 14 वर्षाचे असावे .त्या काळी गणपती उत्सव मोठ्या धूमधडाक्याने साजरा होई. लोकमान्य टिळकांचे नुकतेच निधन झालेले असल्यामुळे त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अनेक प्रकारची व्याख्याने व इतर काही व्यायाम प्रकार याचे प्रदर्शन असे कार्यक्रम होत. या कार्यक्रमांना तेव्हा मेळा असे म्हणत आणि गणपतीच्या दिवसात सार्वजनिक गणपती समोर हे मेळे भरत व करमणुकीचे कार्यक्रम लोकांसमोर,जन जागृती करीता होत. नाना मळेकर आपल्या या तालमी मधील ही तरुण विद्यार्थी मंडळी त्या मेळ्यामध्ये घेऊन गावोगावी जात व व्यायामाचे अनेक कार्यक्रम करून दाखवीत. त्यासाठी पंचक्रोशी च्या गावांत या मंडळीचे खूप स्वागत होई, नानांचा कार्यक्रम हे त्या मेळ्याच्या कार्यक्रमात मोठे आकर्षण होते आणि त्यामुळे आप्पा देखील त्या दिवसात शाळा बुडवून या अशा कामाला नानांच्या बरोबर जात असत. सात आठ दिवस तरी आप्पांची रजा गैरहजेरी शाळेमध्ये होत असे ही गोष्ट त्यावेळी त्यांचे गुरुजी नानाजी राऊत यांच्या लक्षात आली. त्यांनी एकदा बोलावून त्याबद्दल जबाब विचारला. “तू हुशार मुलगा असून व परिस्थिती गरिबीची असून, शाळेकडे असे दुर्लक्ष करतो, तुला शिक्षण घेणे आवश्यक आहे,असे गैरहजर राहू नये “… आप्पांनी सत्य परिस्थिती कथन करून,मी नानां मळेकरांच्या बरोबर मेळ्या मधून जातो .आम्ही व्यायामाचे प्रकार लोकांना करून दाखवितो व व्यायामाचे महत्त्व आम्ही लोकांना पटवून देतो. असे सांगितले. नानांजींचा विश्वास बसला परंतु तरीही पुढच्या वर्षी ते नानांच्या बरोबर मुद्दाम एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले व त्यांनी आप्पांचा योगासनाचा कार्यक्रम व त्यात त्यांनी मिळवलेली निपुणता पाहून आनंद व्यक्त केला .एवढेच नव्हे तर त्यानंतर एकदा बोर्डीच्या शाळेत ही सर्व मुलांच्या समोर आप्पांचा हा योगासनाचा कार्यक्रम मुद्दाम घडवून आणला आणि आप्पांना शाबासकी दिली .तेव्हापासून वामन हा त्यांचा एक आवडता विद्यार्थी झाला आणि त्यांचे निर्व्याज प्रेम आप्पांना मिळाले. आप्पांची आई मोलमजुरी करून या मुलाला शिकवत होती आणि सर्व परिस्थिती नानाजी गुरुजींना माहीत असल्यामुळे, त्यांनी वरील प्रमाणे चौकशी केली होती व पुढे सर्व प्रकारचे सहाय्य देखील आप्पांना केले होते आणि म्हणूनच आप्पांच्या मनात सदैव आपल्या या नानाजी गुरुजींच्या बद्दल आत्मियता, आदर, प्रेम आणि अभिमान वसत असे. हीच गोष्ट आप्पांनी मला त्यावेळी सांगितली होती.
पुढे बोर्डीच्या शाळेतून बदली होऊन नाना मास्तर बोर्डी बाहेर गेले आणि त्यांनी विरारला आपला मुक्काम हलविला. कर्मधर्मसंयोगाने विरारला ज्या वर्तक विहार मध्ये नानाजी गुरुजी राहत होते त्याच वर्तक विहारमध्ये माझी मावशी, कै. नारायण राव राऊत यांची पत्नी,राहात होती. नाना गुरुजींची खोली आमच्या मावशीच्या खोलीपासून तिसऱ्या नंबरावर होती. त्यामुळे आप्पा मला त्यांच्या भेटीसाठी घेऊन गेले. आम्हा दोघांना पाहून नानांना खूपच आनंद झालेला दिसला. ही त्यांची व माझी प्रत्यक्ष पहिली भेट. आप्पाना पाहून नानांनी त्यांना मिठीच मारली. मी त्यांना पदस्पर्श केला व मला देखील त्यांनी खूप छान शाबासकी दिली आणि तू चांगलं शिक्षण का घेतलं पाहिजे याबद्दल दोन उपदेशाचे शब्द सांगितले. माझ्यासमोर देखील”वामन माझा खूप लाडका आवडता विद्यार्थी का होता” इत्यादी आठवणी सांगितल्या. त्या दिवसातली ती आठवण ही सांगितली ,जी आप्पांनी मला सांगितली होती. पुढे ज्या ज्या वेळेस मी विरारला मावशीकडे म्हणून जाई, त्या वेळी नानाजींना मुद्दाम भेट देण्यासाठी जाई. त्यांचे चिरंजीव म्हणजे माझे मित्र, बाळ(हेमंत)देखील, माझा लहानपणीच मित्र झाला होता आणि विरारला गेल्यावर त्याच्याबरोबर आमचे खेळ व जिवदानी डोंगरावर जाणे असे कार्यक्रम होत असत. आज हेमंत ने केलेल्या विनंतीवरुनच हे लहानसे लिखाण मी नाना गुरुजींच्या स्मृतीप्रित्यर्थ लिहित आहे. कारण हेमंत त्यांच्या आठवणीची काही स्मृती पुष्पे जमवून त्यांचा संग्रह आपल्या कुटुंबीयांसाठी प्रसिद्ध करण्याचा मानस करीत आहे.
आज या नानांजींच्या गोड स्मृतींचा सुगंध घेताना, मला त्यांनी सांगितलेली एक आठवण ही नमूद करावीशी वाटते. हेमंत हे त्यांचे सर्वात लहान व तिसरे अपत्य. दोन मोठ्या बहिणी त्याला आहेत. मात्र लहानपणी आजारामुळे हा लाडका बाळ्या खूप आजारी झाला अनेक औषधोपचारांनी ही काही गुण पडेना अगदी डॉक्टरांनी देखील त्याच्या जगण्याची आशा सोडून दिली होती व त्यांनी सांगितले की आता आमचे उपाय थकले, देवाची दया असेल तरच हा मुलगा वाचेल. ही आठवण सांगताना मला अजूनही नानाजींचा,साश्रु नयन, चेहरा डोळ्यासमोर दिसत आहे. नानांजीनी डोळे पुसत मला सांगितले की दिगंबर, मी त्यावेळेला फक्त आणि फक्त जीवदानी मातेला साकडे घातले आणि हा माझा मुलगा माझ्या पदरात घाल मी तुझे उपकार कधी विसरणार नाही असा एक नवस केला. जीवदानी माता त्यांच्यावर प्रसन्न होतीच तिने हा त्यांच्या लहानग्या बाळा वर आपल्या कृपेचे छत्र धरले,दुसऱ्या दिवशी पासून त्याच्या प्रकृतीला उतार पडला. हेमंत देखील ह्या दिवसाच्या आठवणी सांगत असतो. योगायोग म्हणजे नानांची जेवढी भक्ती जीवदानी माते वर एवढीच भक्ती हेमंत देखील मातेवर ठेवतो आणि मला तर समजले की जीवदानी देवी हेमंतला प्रसंगी दृष्टांतही देते, हा केवळ योगायोग नाही तर नानांनी जी सत्कर्म रूपी पुष्पे,जीवदानी मातेच्या चरणी अर्पण केली, त्याचा, देवीचा प्रसाद म्हणजेच त्यांच्या मुलांवर असलेली दैवी कृपा,व मुलांची मातेवरील दृढ, असीम निष्ठा !!त्यामुळेच हेमंतलाही आज ,देवी प्रसंगवशात दृष्टांत देऊन मार्गदर्शन करते ही खरी हकीकत आहे!
नानाजींची विरार येथील शेजारी असलेली माझी मावशी आज 95 वर्षांची असून तिची स्मरणशक्ती व्यवस्थित आहे.ती सध्या पुण्याला आपले उर्वरित आयुष्य व्यतीत करीत आहे. मी मुद्दाम तिच्याशी फोन वरून नानाजींची आठवण विचारली. त्यांचे नाव काढल्यावर तिने पटकन पहिले वाक्य सांगीतले ते म्हणजे”.. अरे ते तर माझे गुरुजी, खूप शिस्तप्रिय, खूप प्रेमळ, मला आज पण त्यांची आठवण येते, एक शिस्तप्रिय आणि मुलांना प्रिय असलेले गुरुजी म्हणूनच”. पंच्याण्णव वर्षाच्या या विद्यार्थ्यिनीने एका वाक्यातच आपल्या गुरुजींची ओळख दिली. त्यांची दुसरी आठवण सांगितली असती तर नानाजींच्या आपल्या शिक्षकी पेशाची ते किती इमानदार होते हे सांगणारी मावशी म्हणाली, “उत्तरायुष्यात, सेवानिवृत्तीच्या जीवनात, विरारला राहत असताना नानाजी रिकामी नव्हते,तेथेही आजूबाजूच्या परिसरातील ,शाळेतील मुलांना वेळ प्रसंगी एकत्र करून,त्यांना चॉकलेट, चणे फुटाणे खाऊ देऊन ते त्यांना काही उपयोगी गोष्टी सांगत असत व प्रबोधन करीत असता. मुलांनाही त्यांचा लळा होता. फक्त हाडाचा शिक्षकच असे आपल्या अखेरच्या पर्वात विद्यादानाचे व विद्यार्थ्यांची निगडीत राहण्याचे काम करू शकतो.
त्यावेळची ही शिक्षक मंडळी गावांतील लहान शाळांमधून आपल्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी विद्या देत नसत तर संबंध गावाच्या सामाजिक जीवनाचा एक हिस्सा बनवत. त्यामुळे शिक्षकाला गावाकडून ही खूप बहुमान मिळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची सबंध गाव अपेक्षा करी. विशेषतः आमच्या बोर्डी गावामध्ये, जे नानाजींचे मुळगाव,अनेक उत्तमोत्तम शिक्षक या काळात होते आणि आणि आज देखील त्यांची परंपरा गुरुजन चालवीत आहेत. मात्र आमच्या, भिसे- चित्रे गुरुजी, आत्मारामपंत, गोविंदराव अशा दिग्गज गुरुजनांचा तो काळ म्हणजे आमच्या बोर्डी गावातील, शैक्षणिक स्थित्यंतराचा सुवर्णकाळ होता आणि नानाजी देखील गुरुजी म्हणून त्या सुवर्ण काळाचे एक साक्षीदार होते, एक वारस होते. नानांनी देखील त्यावेळी सुरू असलेल्या राजकीय स्थित्यंतरा मध्ये भाग घेतला होता आणि आपल्या शिक्षकी पेशाला एक वेगळी शान प्राप्त करून दिली होती. नानाजींचे वागणे-बोलणे एकंदरीत चेहरेपट्टी देखील साध्या भोळ्या भाबड्या अशा माणसाची होती आणि हे खरे आहे,की अशी भाबडी,भोळी,माणसे, उत्तम शिक्षक व विद्यार्थ्यांचे विषयी अतिशय कणव बाळगणारी अशी असतात.म्हणूनच माझ्या मते नानजी हे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम शिक्षक असले पाहिजेत. नानांचा सामाजिक वारसा त्यांचे चिरंजीव हेमंत ही आज पुढे चांगल्या प्रकारे चालवित आहेत. हेमंत सुद्धा विरार व पंचक्रोशीतील अनेक सामाजिक संस्थांची निगडीत असून त्यांचे खूप मोठे नाव या सामाजिक क्षेत्रामध्ये आहे .आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाज उन्नती संघाच्या केळवे रोड येथील आरोग्यधामाच्या कार्यकारी मंडळावर देखील हेमंतनी खूप मोठे योगदान दिलेले आहे.
नानाजी गुरुजींच्या बद्दल दोन शब्द लिहिताना आजची एकूणच सामाजिक स्थिती ,शिक्षण पद्धती ,शिक्षकांचे समाजातील योगदान व त्यांना मिळणारे स्थान इत्यादी बद्दल थोडे विचार मनात आले व थोडेसे वाईटही वाटले. कशासाठी की ज्या काळात नानाजी व त्यांचे सहकारी शिक्षक होते त्यावेळी शिक्षक होणे म्हणजे ,आपण समाजाचे उतराई होत आहोत अशी त्यांची प्रामाणिक भावना होती. त्यां लोकांना इतरही चांगल्या नोकऱ्या,तेव्हा,मिळू शकत होत्या, परंतु मुद्दाम ध्येय म्हणून शिक्षकी पेशाची निवड या लोकांनी केली. आज सर्वसाधारणपणे शिक्षकी पेशाकडे वळणारा तरुण ध्येयवाद, यापेक्षा इतर दुसऱ्या कारणांनी या पेशात येतो ही वस्तुस्थिती आहे. आता गुरुजी या शब्दाऐवजी सर हा शब्द आलेला आहे आणि म्हणून कोणीतरी म्हटले आहे की “गुरुजी गेले वाहून सर आले धावून…” खूप बोलके वाक्य आहे. कारण त्या वेळेचा गुरुजी म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या जीवनाची जडणघडण करीत असे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तो गुरू म्हणून समाजात त्याला सन्मान ही मिळत असे. आचार्य रजनीश यांनी म्हटल्याप्रमाणे
“आज शिक्षक आणि विद्यार्थी यातील एकेकाळी असलेले, कोसाचे अंतर,फक्त एका तासाचे झालेआहे.”
मला वाटते यात सर्व काही आले आहे. शिक्षक म्हणजे अशी छोटी मेणबत्ती आहे ती स्वतः जळते पण आपल्या विद्यार्थ्यांना अंधारात प्रकाश देते .त्या महान पिढीतील एक महागुरु, माझ्या गुरूंचे गुरू, तीर्थरूप, नानाजी गुरुजी अथवा लोकांचे नाना मास्तर यांच्या पावन स्मृतीला प्रणाम करून मी या माझ्या आठवणी संपवितो. ??