‘सुदाम्याचे पोहे’ – एका मित्राच्या नजरेतून  प्राचार्य पी ए राऊत 

प्रि. श्री प्रभाकर राऊत

स्वामी विवेकानंदांनी, ‘मैत्रीतील साहचर्य’, यावर एक सुंदर भाष्य केले आहे. ते म्हणतात, “पावसाचा थेंब आकाशातून पडतो, जर तो हातावर घेतला तर ते पाणी पिण्यासाठी शुद्ध असते. पण जर तो थेंब गटारीत पडला तर तो पाय धुण्यासाठी ही उपयोगी नसतो! जर तो थेंब कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्याप्रमाणे चमकतो! व तो जर शिंपल्यात पडला तर तो मोतीच बनतो! थेंब एकच पण त्याचे मूल्य ठरते ते तो थेंब  कुणा बरोबर आहे, यावर! म्हणून चांगल्या माणसांची संगती धरावी, “सुसंगती सदा घडो….” असे सगळेच सांगतात.

     हे सांगण्यास ठीक आहे मात्र अशी चांगल्या माणसाची मैत्री आयुष्यात मिळणे काही साधारण गोष्ट नाही. ते एक परमेश्वरी वरदान आहे असे मला वाटते. जगाच्या या विशाल रंगपटावर आपापल्या भूमिका बजावणारी अनेक पात्रे प्रत्येकाच्या  जीवनपटावर येतात. कोणी आई-वडील, कोणी बहिण भावंडे, कोणी सगे सोयरे, कोणी अपत्ये, कोणी जीवनसाथी, कोणी गुरुजन, मित्र मैत्रिणी म्हणून येतात. आयुष्यात खूप थोड्या नात्यांची निवड करण्यास मुभा असते. बहुतेक नाती स्विकारावीच लागतात.  मैत्रीच्या नात्यात मात्र निवडीला जरूर वाव आहे. दिलदार, सहृदयी, समविचारी, निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मित्राची गाठ पडणे, त्यातून ॠणानुबंधाच्या गाठी निर्माण होणे,ती मैत्री आपल्या आयुष्यातील एक मर्मबंधातली ठेव होणे… हे एक परमेश्वरी वरदान…  ते ज्याला लाभते तो  खचितच भाग्यवान माणूस !!

           मी स्वतःला असाच एक भाग्यवान समजतो. मला आयुष्यात थोडे मित्र मिळाले, त्यांनी माझ्या आयुष्याचा खडतर प्रवास सुखकर केला. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे मित्रवर्य श्री प्रभाकर आत्माराम राऊत, आपणा सर्वांचे माननीय प्राचार्य राऊत सर!

      इयत्ता पहिलीपासून झालेली, ‘शाळूसोबती’ ही ओळख पुढे हायस्कूलात वृद्धिंगत झाली. सुदैवाने मुंबईत एकाच महाविद्यालयात पदवी शिक्षण घेताना, त्याच महाविद्यालयाच्या वस्तीगृहात एकत्र राहिल्याने, ही मैत्री बहरली.पुढे आपापल्या व्यवसायानिमित्त दूर गेलो, तरी कोणताही दुरावा न येता, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसल्या व आज आयुष्याचे  सायंकाळीही जुन्या मैत्रीला फुटणारे नवे घुमारे, आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान मिळवून देतात.. मित्राकडून यापेक्षा अधिक, कोणती अपेक्षा करायची ? 

    प्रभाकर राऊत सरांच्या, ‘ सहस्त्र चंद्र दर्शना’, च्या निमित्ताने गोखले एज्युकेशन संस्था, बोर्डी सेंटर  , त्यांना सन्मानित करण्याकरिता स्मरणिका काढण्याचे योजित आहे. या कार्यक्रमाला मी प्रत्यक्ष हजर नसलो तरी दुरून का असेना, एक छोटे मनोगत प्रकट करून,  हा कार्यक्रम, हजारो मैलावरून, मनःचक्षुंनी पहात, सहभागी झाल्याचे समाधान मिळवित आहे.

   आज या कार्यक्रमात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असलेले सरांचे अनेक चाहते, विद्यार्थी सहकारी, कनिष्ठ  वरिष्ठ अशा अनेक नात्यांनी  त्यांचा गौरव करतील. प्रभाकर सरांचा एक शाळकरी मित्र म्हणून हे मनोगत लिहिण्याचे भाग्य येथे खूप थोड्या लोकांना असेल. मी त्यातील एक!!

      आमची बालमैत्री एवढी वर्ष का टिकली ? मी विचार करतो तेव्हा याचे अधिक श्रेय माझ्या मित्राला  देतो. सच्च्या मैत्रीमध्ये एका मित्राला दुसऱ्याकडून काही घेण्यापेक्षा, काहीतरी देण्यात  रस असला तरच ती मैत्री चिरकाल टिकते समाधान देते. मला प्रांजलपणे हे कबूल केले पाहिजे की, या मित्राने माझ्याकडून काही घेण्यापेक्षा, मलाच जास्त दिले आहे . त्यामुळे ह्या दिलदार मित्राची संगती सतत राहावी, ही माझी जरुरी होती.  

      जन्मजात बुद्धिमत्ता,कष्टाळू वृत्ती, मित्राबद्दल आपुलकी,कोणत्याही मदतीसाठी तत्परता, आपल्या मित्राचा एवढासा गुण, इतरांना खूप मोठा करून सांगण्यात स्वतःला होणारा आनंद , सडेतोड वृत्ती, आणि वैयक्तिक, सामाजिक , व्यावसायिक व आर्थिक व्यवहारातील  पारदर्शकता ,अशा गुणसमुच्चयामुळे ,आम्हा दोघांची मने जुळली. “प्रभाकर राऊत सर माझे मित्र आहेत”, हे सांगण्यात मला नेहमीच अभिमान वाटला .आजही वाटतो आहे!! .

      पु ल देशपांडे यांची मैत्रीची एक सोपी व्याख्या मला खूप भावते.

   “रोज आठवण यावी असं काही नाही,

   रोज भेट व्हावी असंही नाही,

   एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं,

   असंही काहीच नाही,

पण मी तुला विसरणार नाही,

ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री!”

    माणसातलं माणूसपण जाणून ते सदैव जपणाऱ्या माझ्या या मित्राची मैत्री याकरिताच मला खूप मोलाची वाटली, टिकवून ठेवावीशी वाटली, आणि मी ती तशी ठेवू शकलो हा  माझ्या आयुष्यातील, नियतीचा एक शुभसंकेत  आहे!

         शाळेत असताना मला घरी अभ्यास करण्यासाठी चांगला परिसर नव्हता. म्हणून मी प्रभाकरच्या घरीच अभ्यासासाठी जाई. त्यांचे  पूर्वीचे ते जुने घर प्रशस्त होते. आजूबाजूलाही भरपूर जागा होती. चिकू, नारळ आंबे अशा झाडांची गर्दी होती.  परिसर अभ्यासासाठी खूपच अनुकूल असा होता. तेथे जाण्यात  माझा स्वार्थ होता. माझा गणित विषय कच्चा होता. प्रभाकर त्या विषयात तरबेज होता. मला त्याचेकडून फुकट ‘शिकवणी’, मिळे.   एस एस सी चे परिक्षेसाठी, आमच्या शाळेत, अंकगणित विषय शिकविण्यास कोणी शिक्षक नव्हते. कै.आपटे सर, फावल्या वेळात आम्हास थोडेफार मार्गदर्शन करीत. हा विषय मी प्रभाकर कडून चांगलाच आत्मसात केला. आत्मविश्वास आला. आणि शेवटच्या एस एस सी परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले. प्रभाकर त्यावर्षी दुर्दैवाने,प्रकृती अस्वास्थ्यामुळे, परीक्षेस बसू शकले नाहीत. मात्र  त्यांच्या या ‘शिष्याने’, शिकवणीची ‘गुरुदक्षिणा’ अशाप्रकारे यशस्वी होऊन दिली! 

  जे द्यायचे ते  हात राखून न देता, ते आनंदाने ,भरभरून द्यावे, या त्यांच्या मनोवृत्तीचे प्रत्यंतर मला आयुष्यात अनेक वेळा आले आहे.

       माझे वडील ,कै. वामन देवजी राऊत हे प्राथमिक शाळेत, प्रभाकरांचे ही गुरुजी होते. त्यामुळेही असेल, या गुरुजी विषयी  त्यांना खूप आदर आहे. आम्ही वडिलांच्या  25 व्या पुण्यतिथी निमित्त आठवणींची  स्मरण पत्रिका प्रसिद्ध केली. डॉ. जयंतराव पाटील, मुंबईच्या तत्कालीन महापौर डॉ.शुभा राऊळ,सहल सम्राट केसरीभाऊ पाटील, आमदार कपिल पाटील, अशी दिग्गज मंडळी कार्यक्रमाला येणार होती. बोर्डी परिसरातील व बाहेर गावचे गुरुजींचे विद्यार्थी कार्यक्रमाला आले होते. साहजिकच आमच्या मनावर खूप ताण होता. त्याप्रसंगी शाळेचे ‘कै. वसंतराव सावे सभागृह देण्यापासून,आवश्यक ते मनुष्यबळ पुरवून, स्वतः जातीने कार्यक्रमास हजर राहून,त्यांनी सर्व व्यवस्था जातीने पाहिली. हा कार्यक्रम जणू स्वतःच्या घरचा आहे, अशा तळमळीने त्यांनी तो यशस्वी करण्यात मोठा हातभार लावला व आम्हा राऊत कुटुंबियास कायमचे उपकृत केले आहे.

       लहानपणापासूनच मी त्यांच्या घरी जात असल्याने संपूर्ण कुटुंबाशी माझा चांगला परिचय होता, आजही आहे. पिताजी कै. आत्मारामपंत राऊत हे एक सुशिक्षित  व सुसंस्कारित व्यक्तिमत्व होते. शेतीचा व्यवसाय उत्तमरित्या करीत . कुटुंबात चार बंधू  व एक बहीण अशी पाच भावंडे.दुर्दैवाने या लेकरांच्या मातोश्रींचे निधन त्यांच्या अगदी बालवयात झाले. मातृछत्राविना, बाल्याची कल्पनाच आपणास येऊ शकणार नाही. परमेश्वरी संकेतही अगम्य असतात. आजीला(वडिलांची आई), दीर्घायुष्य लाभले. तीच सर्वांची आई झाली! आत्यानेही संसाराचे पाश दूर करून आपल्या आईला साथ दिली. वडिलांची करडी शिस्त व आजी-आत्याचे प्रेमळ संस्कार यामुळे मातृप्रेमाची उणीव तेवढी जाणवली नाही.  सर्व भावंडे कर्तृत्ववान निघाली.आपापल्या क्षेत्रात प्रत्येकाने मोठे नाव केले 

     ज्येष्ठ बंधू कै.मदनराव यांनी शेतीचा व्यवसाय करून एक उत्तम ,प्रगतिशील,कल्पक शेतकरी म्हणून नाव मिळविले. दुसरे बंधू कै. खंडेराव यांनी  लोणावळ्याच्या,’ गुरुकुल शिक्षण संस्थेत’, संपूर्ण योगदान देऊन. शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशा “राष्ट्रपती पदका”,चे ते मानकरी ठरले. अत्यंत हुशार, कमी बोलणारे खूप काम करणारे विद्यार्थी प्रिय, असे हे खंडेराव राऊत सर. ते थोड्या अकालीच गेले. प्राचार्य प्रभाकर सरांचे कर्तृत्व तर आपण सगळेच पाहत आहात. आचार्य भिसे- चित्रे यांच्या बोर्डीला, “शिक्षण पंढरी”, हा बहुमान मिळविण्यात ज्या महाभागांनी योगदान दिले, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे  प्रभाकर राऊत सर, बस एवढेच मी म्हणेन! सर्वांत धाकटेबंधू  श्री.निरंजन हे देखील महाराष्ट्र सरकारच्या प्रसिद्धी खात्यात खूप वरच्या उद्द्यावरून निवृत्त होऊन आजही त्यांच्या अनुभवाचा उपयोग समाजास देत आहेत. एकुलती बहिण, विवाहानंतर एक उत्तम गृहिणी म्हणून आपल्या संसारात रममाण होती .

    सरांच्या सहचारिणी सौ. रेखाताईंचे योगदानही उभयतांच्या कर्तृत्वशाली आयुष्यात मोठे आहे .एवढी अवधाने सांभाळणाऱ्या आपल्या पतीला संपूर्ण सहकार्य देताना, मुलांच्या संस्कारीत भविष्याकडे त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यामुळेच सरांचे दोन्हीही चिरंजीव आशुतोष व डॉ. इंद्रनील आपापल्या व्यवसायात नामांकित झालेले आहेत. आशुतोष यांनी एक उत्तम व्यवस्थापक म्हणून कार्पोरेट क्षेत्रामध्ये नाव कमावले आहे तर डॉ. इंद्रनील हे मुंबईतील एक ख्यातकीर्त वैद्यक असून ते, जसलोक इस्पितळासारख्या एका प्रख्यात इस्पितळात  वरिष्ठ पातळीवर काम करीत आहेत. त्यांचा मोठेपणा केवळ त्यांच्या ज्ञानात व हुद्यात नसून ते अहोरात्र देत असलेल्या मानवतावादी सेवेतही आहे. परिसरातील कोणत्याही गरजवंताला, वैद्यकीय उपचारासाठी त्यांची मदत व मार्गदर्शन मिळत असते. सरांच्या दोन्हीही स्नुषा ऊच्च विद्याविभूषित असून आपल्या यजमानांच्या व्यवसायात त्यांना उत्तम प्रकारे साथ देत असतानाच स्वतःचे करियर ही सांभाळले आहे. नात वैद्यकीय शिक्षण घेत आहे व नातू बारावीच्या तयार्त गुंतलेला आहे. प्रभाकर राऊत सर व सौ.रेखा ताई यांची ही कुटुंबवेली अशी फुला-फळांनी बहरलेली आहे. बहरते आहे.  कुटुंबाचा हा कीर्तिमान असाच दिवसेंदिवस उन्नत होत जावो,अशी  प्रार्थना करतो.”चांगले करा, ऊत्तम मिळवा”, हा नियतीचाच साधा,सरळ व सोपा नियम आहे.

 ‘आरती ड्रग्ज’ या सुप्रसिद्ध औषध कंपनीचे कार्मिक निर्देशक श्री.निलेश पाटील (उजवीकडील)यांचे सोबत.

      मी मागे म्हटलेच आहे आमच्या मैत्रीत ,मी दिले कमी, मिळविले जास्त. काही वर्षांपूर्वी सेवा निवृत्त झालो. माझा मुक्काम मुंबई ऐवजी घोलवड मध्ये जास्त असू लागला. आणि सरांनी मला बोलावून कामास लावले. ” तुझ्या औद्योगिक अनुभवाचा फायदा आमच्या मुलांना मिळाला पाहिजे. आमच्या ‘कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीत काम करशील का?” सरांनी मला तेथे सामावून घेतले .” मी येथे काय योगदान देणार?”, अशी मला भ्रांत होती. पण पुढे, ‘येथे काम करण्यास मला वाव आहे’,  हे पटले. काही औद्यागिक आस्थापनांचे सहकार्याने, विद्यार्थ्यास उपयुक्त असे उपक्रम सुरू करण्याची तयारी करीत होतो. मात्र मधल्या कोविड प्रादुर्भाव कालखंडात हवी तशी चालना मिळू शकली नाही.  ते पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे .

     प्रिन्सिपॉल डॉ.सौ.अंजली पटवर्धन-कुलकर्णी मॅडम व त्यांचे सर्व उच्च विद्या विभूषित सहकारी यांचे ज्ञान व अनुभवापासून मला खूप शिकावयास मिळाले. डॉ.सौ.अंजली मॅडम या तर, महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात, भारतातील एक अधिकारी व्यक्ती आहेत. या सर्वांच्या संपर्काने, कामात हुरूप येई. केवळ प्रभाकर राऊत सरांमुळेच मी संस्थेशी जोडला गेलो.

    खरे तर या  सन्मित्रासंबंधात बरेच काही लिहिता येईल, मात्र शब्दांचे बंधन असल्याने, जास्त लिहिता येणार नाही. केव्हा तरी ते नक्कीच लिहिन. 

  हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.चे मुख्य प्रबंधक श्री दिलीप गायकवाड यांच्यासह,शिष्यवृत्ती वाटप.

आधुनिक महाकवी ग दि माडगुळकर यांच्या काव्याच्या ओळी मला पटतात. “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा ….”

   या दैवाधीन जगात ,केवढेतरी सुहृद आले,गेले.अनेकांचा आज काहीच थांगपत्ता नाही. काही कायमचे दुरावले. त्यामुळे हा बालमित्र आजही संगतीस आहे, ही दैवाची केवढी मोठी देणगी!

हेच जीवन आहे. आपल्याला गरज पडते ,तेव्हां कोणी तरी आपल्याला सावरायला, हात द्यायला सज्ज आहे ही कल्पनाच किती सुखद आहे..

   असे हे माझे परम मित्र आणि आपणा सर्वांचे आवडते, प्राचार्य प्रभाकर राऊत, यांचे सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त अभिष्टचिंतनकरून,  परमेश्वराने त्यांना  निरामय दीर्घायुष्य द्यावे,त्यांच्या सुसंगतीचा लाभ असाच मला मिळावा आणि निरपेक्ष मार्गदर्शनाचा लाभ,गोखले शिक्षणसंस्थेस लाभावा, ही परमेश्वराकडे विनम्र प्रार्थना करतो..

     दिगंबर वा राऊत.

     माजी विद्यार्थी सु पे ह हायस्कूल,बोर्डी.