आप्पा माझे गुरु, माझे कल्पतरू!!
आचार्य विनोबा भावे यांनी भगवतगीतेचा मराठीत अनुवाद ‘गीताई’ म्हणून केला त्यावेळी प्रस्तावनेतील त्यांच्या दोन ओळींनी माझ्या मनात कायमचे घर केले आहे – गीतेतील शिकवणीसारखेच! विनोबांनी लिहले आहे,
“आई तू जे जिवंतपणी मला दिलेस ते त्यावेळी मला कोणीच देऊ शकले नाही. पण आई तू आज तुझ्या मृत्यूनंतर देखील जे मला काही देत आहेस ते, आई तू मला जिवंतपणी देऊ शकली नाहीस!”
विनोबांच्या भावनांचा पूर्ण आदर करीत माझ्या जीवनातील जे चांगले आहे त्याचे श्रेय माझ्या वडिलांना देताना मी म्हणेन …
“आप्पा तुम्ही जे जिवंतपणे मला दिलेत ते त्यावेळी मला कोणीच देऊ शकले नाही. पण आप्पा, तुम्ही आज तुमच्या मृत्यूनंतर देखील जे काही देत आहात ते तुम्ही जिवंतपणे देखील आम्हाला देऊ शकला नाहीत!!”
तीर्थरूप आप्पांना जाऊन आज ४५ वर्षे झाली .आजही क्वचित एखादा दिवस गेला असेल त्यांची आठवण झाली नाही. रोज सायंकाळी त्यांनीच शिकविलेल्या प्रार्थना देवासमोर म्हणताना देवघरात विराजमान त्यांची मूर्ती दिसते.
आमचे जन्मदाते म्हणून ते आमचे वडील. एखाद्या जन्मदात्याने आपल्या आचरणातून, संस्कारातून आणि विचारांतून मुलांना क्रमिक पुस्तकातील शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक व अध्यात्मिक मार्गदर्शन करणे हे क्वचितच पहावयास मिळेल. अशा मार्गदर्शकालाच आचार्य म्हटले जाते. आम्ही नशीबवान आहोत. आमचे आप्पा हे आमचे पिताश्री होते व आचार्य होते!
आपल्या शास्त्रात अपूर्ण इच्छा ओळखण्यासाठी व त्या पूर्ण करण्यासाठी ‘कल्पतरू’ नावाच्या वृक्षाचा उल्लेख आहे. त्याच्या छायेत बसल्यानंतर व्यक्तीने मनात आणलेली इच्छा तो वृक्ष लगेच पूर्ण करतो.. कल्पतरूला ‘चिंतामणी’ असंही म्हटलं गेलं आहे. यामुळेचं चिंतामणी म्हणजेच कल्पतरू, आपल्या समस्यांचे समाधान घेऊन येतो. मनातल्या इच्छा पूर्ण करतो. आप्पांनी आम्हा लेकरांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या म्हणून ते आम्हासाठी “कल्पतरू होते,चिंतामणी” होते!!.
आप्पा आम्हा मुलांना व पुढे नातवंडांना वाणीतून सतत आशीर्वाद देत आले. त्यांचे आशीर्वाद आमच्या जीवनात फुलदृप झाले. हे आम्ही अनुभवले आहे. 1968 साली मी एम एस सी टेक् परिक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो.परदेशी जाण्यासाठी अमेरिकेतील काही विद्यापीठात अर्ज केले. सुदैवाने तेथील प्रसिद्ध ओहायो विद्यापीठातून मला प्रवेशाचे व त्याचबरोबर शिष्यवृत्ती देऊ केल्याचे पत्र आले. ही बातमी आप्पांना सांगण्यासाठी बोर्डीस आलो. मला वाटले ते माझे अभिनंदन करतील. ते थंडपणे म्हणाले
“ बेटा तू कशाला परदेशात जातोस? आपल्या देशातही तुला खूप चांगल्या संधी मिळतील. येथे राहूनही तू परदेशात खूप फिरशील… !”
त्या प्रतिक्रियेतून, माझ्या लहान भावंडांची जबाबदारी माझ्यावर आहे, याचे सुतोवाच त्यांनी केले होते. त्या काळात शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊन तेथेच स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांची अनेक उदाहरणे त्यांच्या डोळ्यासमोर होती. आपल्या मुलाने तसे करू नये अशी त्यांची प्रामाणिक भावना होती. त्याच दिवशी मी परदेशात शिक्षण घेण्याचा विषय मनातून कायमचा काढून टाकला. भारतातच एका परदेशी कंपनीत नोकरी मिळाली. त्या कंपनीतर्फे मी जगातील सुमारे वीस देशात भ्रमंती केली. प्रत्येक वेळी परदेशी निघताना मला आप्पांचे ते शब्द आठवत..
“ बेटा तू परदेशातही खूप फिरशील….”
आप्पांच्या नाती स्वाती-प्रीती यांनी शालांत परीक्षेत उज्वल यश मिळविले. दोघींही गुणवत्ता यादीत आल्या. आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. आमचे मामा वसंत बंधू यांनी त्यावेळी काढलेले उद्गार माझ्या लक्षात आहेत..
“ स्वाती प्रीतीच्या बुद्धिमत्तेचे मनःपूर्वक कौतुक. तुझ्या आप्पांनी कधीतरी, कुठेतरी सर्वांसाठी पेरलेल्या ज्ञान -बिजाला व पुण्याईला आलेली ही सुंदर फळे आहेत !”
आज आप्पा जाऊन ४५ वर्षे झाली असली तरी त्यांच्या सत्कर्मांचा महिमा एवढा की आज त्यांची सर्व नातवंडे श्रीदत्त-दिप्ती, स्वाती-प्रीती, हर्षला-आशुतोष, क्षितीजा-प्राजक्ता ,अवधूत-अदिती आपापल्या क्षेत्रात आत्मविश्वासाने मोठी वाटचाल करीत आहेत. आप्पा आजोबांचे विस्मरण त्यांना झालेले नाही. भविष्यातही ते आम्हा सर्वांच्या पाठीशी असणार आहेत ही सर्वांची प्रामाणिक भावना आहे!
आप्पा पेशाने शिक्षक, पण खरे हाडाचे-शिक्षक. केवळ पुस्तकी ज्ञान त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले नाही. मानवी मूल्यांचे धडे त्यांनी आचरणाने शिकविले. विद्यार्थी,नातेवाईक, सहकारी शिक्षक, अथवा संपर्कात आलेली कोणतीही व्यक्ती असो, त्यांचे कोणतेही काम असो आपुलकीने प्रेमाने चौकशी केल्याशिवाय ते राहत नसत. अतिशय किरकोळ शरीर यष्टी, खादीची कफनी, धोतर, टोपी व सदैव अनवाणी फिरणारे आप्पा अत्यंत मृदुभाषी, मितभाषी. मात्र कोणावर अन्याय झालेला दिसल्यास जातिवंत दहा आकडी नागाप्रमाणे फणा उभारून त्याला डंख करण्यास मागेपुढे पाहत नसत!!
शिक्षकाची परिक्षा त्याच्या पेहराव अथवा शाळेतील शिकवण्यावरून केली जात नाही. ती होते शिक्षकाचे स्फूर्तीदायी विचार व तसे स्वतःचे आचरण ..
एका शिक्षणतज्ञाने म्हटल्याप्रमाणे ,
“A poor teacher tells,
An ordinary teacher explains,
A good teacher demonstrates and
A great teacher inspires!!”
आप्पांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आधार देण्याचा प्रयत्न करून, आपल्या परीने त्यांची अडचण दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
उमरोळी बोर्डी व चिंचणी शाळेत आप्पांच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी व सहकारी शिक्षक मला कधीही भेटले तरी आप्पांनी त्यावेळी त्यांना दिलेला धीर, प्रेम व पाठीवर दिलेली थाप आयुष्याला कलाटणी देणारी होती हे मोठ्या कृतज्ञतेने सांगत असत. ते हयात असताना कृतज्ञतेने भेटीस येणारे त्यांचे काही कवी विद्यार्थी व सहकारी शिक्षक आम्ही घोलवडला असताना पाहिले आहेत .
श्रीमंतांच्या, उच्च पदस्थांच्या मुलांना जवळ करून त्यांचे कोड कौतुक कोणीही करील पण आदिवासी, हरिजन अशा दलित समाजातील मुलांना जी शिक्षणात मागे असत त्यांना प्रेमाने जवळ करून त्यांची फुकट शिकवणी, प्रसंगी फीचे पैसे देणे, कधी पुस्तकांची मदत करणे तर कधी घरी बोलवून जेवण घालणे अशा गोष्टी आप्पांनी बिनभोभाट केल्या.
जे जे भेटे भूत, त्यास मानी जे भगवंत ||ज्ञा. १०.११८
हाच संदेश गीतेने दिला आहे ना?
आप्पांनंतर आजही गेली सुमारे वीस वर्षे आमच्या घोलवडच्या घरी चार-पाच विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी विद्यार्थीनिवासात विनामूल्य राहतात. आपला शिक्षण क्रम पूर्ण करतात. आमच्या, ‘वामनाई शैक्षणिक धर्मदाय ट्रस्ट’ तर्फे त्यांना पैशाची मदतही मिळत होती.
आप्पांचा मानवतावाद, भूतदया एवढी जबरी होती की आमच्या घरातील मांजरी, कुत्रे, कोंबड्यांना नावे असत. त्यांना अंगाखांद्यावर खेळवून ते त्यांचे लाड करीत. टिपू कुत्र्याचा आप्पांवर एवढा जीव की आप्पा गुरुवारी उपवास करीत, त्यांचे अंतर्मन ओळखून हा श्वान मित्रदेखील त्या दिवशी वाढलेल्या अन्नाला स्पर्श करीत नसे. एवढे जीवा-शिवाचे मैत्र्य आप्पांनी सर्वच भूतमात्रांशी जोडले होते.
परसातील झाडे झुडपे वेलीवरदेखील आप्पांचे असेच प्रेम. मरतुकड्या केळीच्या झाडाचे कोवळे पान हातात घेऊन ते म्हणत, “बाबा लवकर बरा हो. खूप उंच वाढ. आज तुला पाणी देतो हं…!” आमच्या परसांतील बागेची सर्वच फुलझाडे वेली फळझाडे अगदी तरारून उगवलेली असत.
हे ममत्त्व,परोपकार बुद्धी, जीवसृष्टीशी अद्वैत साधण्याची कला आप्पांच्यात कुठून आली असेल? गरीबीचे दाहक चटके, बालपणी हरवलेले पितृछत्र, सग्यासगेसोयऱ्यांनी दाखविलेली अनास्था यांचा त्यात मुख्य वाटा! एका पायाने अपंगत्व असूनही दुसऱ्या पायावर चक्रासारखे गरगर फिरणारे त्यांचे वडील देवजी बाबा, एक असामान्य अध्यात्मिक व्यक्तिमत्व होते. पावागडच्या काली मातेचे ते निस्सीम भक्त होते. लोक म्हणत,
“ काली त्यांच्या अंगात येते. त्यानंतर ते चिंतनात्मक भावावस्थेत गेले की यांच्या तोंडून येणारी वाक्ये ही भविष्यदर्शक असतात”
प्रत्येक शनिवारी लोक मार्गदर्शनासाठी त्यांचे घरी येत व समाधानाने परत जात. त्यामुळे त्यांच्या शेतीवाडी रोजगारावर परिणाम झाला. शेवटी त्यांना आपला सर्व जमीन-जुमला व राहते घर विकावे लागले. ते बोर्डीस येऊन एका झोपडीत राहिले. जवळच्या नातेवाईकांनी त्यांना फसविले. ती आपल्या वडिलांची शोकांतिका आप्पा आम्हाला कधीतरी सांगत. आप्पांचे वडील देवजी बाबा त्यांच्या आठव्या वर्षीच गेले.
संतांची, साधकांची या मर्त्य जगातील खूण काय?
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी..” ,म्हणणारी ही मंडळी लाभाविण करिती प्रीती! पित्याचा हा गुण आप्पांमध्ये उतरला होता.
महात्मा गांधींच्या विचारांचा आप्पांच्या जीवनावर जबरदस्त पगडा होता .आमच्या गावातील तत्कालीन नेतृत्व आचार्य भिसे, चित्रे गुरुजी त्यांना वंदनीय होते. ज्या दिवशी महात्मा गांधींनी अनवाणी पायांनी दांडीमार्च केले त्या दिवसापासून आप्पांनी पायात पादत्राण घालणे सोडून दिले ते अगदी अखेरपर्यंत. खादी बापूजींची आवडती म्हणून आप्पा स्वतः चरख्यावर सुत काढीत व बोर्डीच्या शेती शाळेतील हातमागावर त्या सुताचा ताणाबाणा करून खादी कापड विणीत. त्याच खादीचे कपडे परिधान करीत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची विज्ञाननिष्ठ बैठक त्यांना आवडे. त्यामुळे त्यांनी कधीही कोणा बाबा-गुरुचे प्रवचनास वा दर्शनास जाऊन त्यांच्या कृपा कटाक्षाची अपेक्षा केली नाही. आम्हा मुलांना कधी आजार झाल्यास डॉक्टरांच्या औषधाशिवाय कोणी वैदू भगत ज्योतिषी अशा कोणत्याच गोष्टींना थारा दिला नाही. तरी शेजारील बाया बापड्यांच्या आग्रहास्तव आपल्या हिंदु धार्मिक ग्रंथांचे वाचन ते श्रावण मासात नित्यनेमाने करीत.
आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले. आजारपणे आली. मुलांच्या शिक्षणा निमित्ताने प्रापंचिक खर्च वाढले. पण झोपडीत राहून दिवस काढताना त्यांनी आपला स्वाभिमान कधीच गहाण ठेवला नाही. कोणत्याही नातेवाईकाकडे, मित्राकडे मदतीसाठी हात पसरले नाहीत. उलट आमच्या घरी शिकवणीसाठी येणाऱ्या मुलांना पदरचे घासलेटचे कंदील जाळून त्या उजेडात त्यांना फुकट शिकविले. अशा विद्यार्थ्यांना करता येईल ती मदत केली.
आचार्य भिसे व चित्रे गुरुजी ही तर त्यांची दैवते होती. त्यांनी आप्पांवरील प्रेमापोटी मलाही वैयक्तिकरित्या खूप मदत केली आहे. यांच्या निर्व्याज प्रेमाच्या अनेक आठवणींचाही याच पुस्तकातील या दोन आचार्यांवरील लेखांत मी त्यांचे विषयी विस्तृत लिहिले आहे. कै.भाई मळेकर व त्यांचे बंधू कै. नाना मळेकर यांनी देखील आप्पांना त्यांच्या बालपणात शिक्षणासाठी खूप मदत केली होती. नानांच्या ‘लालजी व्यायाम शाळे’तच आप्पांनी व्यायाम केला व योगासने शिकले. गणपतीच्या मेळ्यात नाना आपल्या या वामन शिष्याला बरोबर घेऊन गावोगावी फिरत व योगासनांची प्रात्यक्षिके करून शाबासकी मिळवीत. योगायोग म्हणजे आज आमचे घोलवड येथील घर हे कै. भाईंच्या त्यावेळचे ‘मिस्त्री निवास’, घरासमोरच आहे.त्या घराच्या एका भिंतीवर लिहिलेले
“ ये भी नही रहेगा..”,
या वाक्याची मला नेहमी आठवण येते. चांगले वा वाईट दिवस तसेच राहणार नाहीत. ते नक्की बदलतील. या वाक्याने त्यावेळी मला त्यावेळी प्रोत्साहित केले व आजही करते.
कै. पूज्य साने गुरुजी आपल्या बंधूंकडे बोर्डीत नेहमी राहावयास येत. आप्पांची व त्यांची भेट झाली होती की नाही मला कल्पना नाही. मात्र साने गुरुजींची सर्व पुस्तके आप्पांनी आम्हाला विकत आणून वाचावयास लावली होती. एवढेच नव्हे तर आमच्या प्राथमिक शाळेत ‘साने गुरुजी वाचनालय’, सुरू करून मराठीतील सर्व नामवंत साहित्यिकांची पुस्तके मिळवून विद्यार्थ्यांना हा ज्ञानमेवा उपलब्ध करून दिला होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी या वाचनालयात वा शेतकी शाळेतील बागेत जाऊन ते पुस्तकांची देखभाल व रोपांचे शिंपण करीत. मदतनीस म्हणून मीही त्यांच्याबरोबर उपस्थित असे.
सुरुवातीच्या बोर्डीतील बोर्डी शाळेतील अध्यापनानंतर त्यांची बदली पालघर जवळील उमरोळी या खेडेगावात झाली. एक तपाचा काळ त्या शाळेत त्यांनी घालविला. मी व धाकटा भाऊ श्रीकांत, आमचा जन्म ऊमरोळीतील वास्तव्यातच झाला आहे. ऊमरोळीतील ते घर व शाळा आजही माझ्या डोळ्यासमोर येते. खूपच आनंदात घालविलेले माझ्या बालपणीचे ते दिवस आठवतात. घर मालक गोविंदराव पाटील सर्व उमरोळीवासियांनी आप्पांना खूप प्रेम दिले. सन्मान केला. अखेरपर्यंत ही मंडळी आप्पांच्या संपर्कात होती. अप्पांनी येथील शाळेत खूप सुधारणा केल्या. पाण्यासाठी गावकऱ्यांच्या सहाय्याने शाळेत विहीर बांधली. त्यांचा तेथील काळ खूपच आनंदात समाधानात गेला. त्यानंतर त्यांची बदली पुन्हा बोर्डीत झाली.
आमच्या सुदैवाने त्यावेळी बालपणी बोर्डीत, प्रशिक्षणार्थी प्राथमिक शिक्षकांसाठी ट्रेनिंग कॉलेज, पदवीधर शिक्षकांसाठी मूलोउद्योग शिक्षण केंद्र व बालशिक्षणासाठी मॉन्टेसरी पद्धतीवर बालवाडी ही सुरू झाली होती. त्यामुळे त्या कालखंडात बोर्डी गावात महाराष्ट्रातील अनेक शिक्षण तज्ञ एकवटले होते. त्यांची मांदियाळी आमच्या गावाला शोभायमान करीत होती. काही नावे.. प्रिन्सिपल जोशी, प्रि. सोहनी, प्रि.वाणी, प्रि. झोळ हे ट्रेनिंग कॉलेजात तर डॉ.प्राचार्य सुलभाताई पाणंदीकर, कवीवर्य प्रा. ग. ह. पाटील, प्रा. महाजन, कवियत्री इंदिरा संत, कवी बा. भ, बोरकर ही मंडळी बी टी कॉलेजात होती. बालवाडीत पद्मभूषण ताराबाई मोडक, पद्मश्री अनुताई वाघ अशी मंडळी बालकांवर संस्कार करीत होती.आप्पांसारख्या जातिवंत शिक्षकाने या संधीचा पुरेपूर उपयोग आपले व आपल्या विद्यार्थ्यांची जीवने सुसंस्कारित करण्यासाठी कडून घेतला नसता तरच नवल?आम्हा बालविद्यार्थ्यांना त्या दिवसात मिळालेली ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरली.
बोर्डीत शिक्षक असतानाच सन १९४८ च्या जून महिन्यात आप्पांना धुळे येथे ट्रेनिंगसाठी जावे लागले. त्याच वेळी मला इयत्ता पहिलीत शाळेत दाखल करावयाचे होते. ती जबाबदारी आप्पांनी माझे मामा हिराजी गुरुजी यांचे वर सोपविली होती. तो शाळेतील पहिला दिवस व मी त्या दिवशी केलेला तमाशा मला आजही व्यवस्थित आठवतो. मी चक्क घरातून पळून गेलो होतो. मामांनी मला आपल्या मुलांमार्फत पकडून रेड्याच्या गाडीत बसवून शाळेत नेले होते. मात्र त्यानंतर मी शाळेत जाण्यास कधीच टाळाटाळ केली नाही. हिराजी मामांनी मला शाळेत दाखल करण्यासाठी केलेली मेहनत व काढलेली समजूत माझ्या आजही लक्षात आहे. मामांच्या सात्विक व मृदू व्यक्तिमत्त्वाचा माझ्या मनावर उमटलेला ठसा कधीच जाणार नाही. हिराजी मामा माझ्या आयुष्यातील पहिले शिक्षक .म्हणून माझ्या प्रथम गुरुवर्यांना खूप मोलाचे स्थान आहे.
सातारा येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जावे लागले ती जबाबदारी आप्पांनी आमचा खंडू मामा याचेवर सोपविली होती. त्यानेही आयुष्यात अनेकांसाठी खूप खस्ता खाल्ल्या होत्या. तो देव माणूस होता.
पुढे आप्पांची बदली चिंचणी जवळील देदाळे शाळेत झाल्यावर चिंचणीच्या श्री. जगन्नाथ मंगळ्या चुरी उर्फ दादा यांचे घर आम्हाला राहण्यासाठी मिळाले. दादांनी कधीही आमच्याकडून घर भाडे घेतले नाही. चिंचणीच्या मुक्कामात देदाळ्याचे सुविद्य व सधना शेतकरी अनंतराव उर्फ भाऊसाहेब चुरी व एक पारशी बागायतदार होमीभाई यांनी आप्पांना खूप सहकार्य व मार्गदर्शन केले. आप्पांचे शाळेतील सहकारी शिक्षक बाबरे गुरुजी, पाटील गुरुजी, प्रभाकर सावे, या सहकाऱ्यांची नावेही मला आज आठवतात. या सर्वांनी मिळून देदाळे शाळेचा कायापालट केला. पूर्वी देदाळ्याची मुले चिंचणीच्या शाळेत जात. आप्पांनी तो पायंडा मोडून देदाळ्याची मुले आपल्याच शाळेत येतील असे काम केले. शाळेभोवती छानशी बाग फुलवली. सर्वच परिसर सुंदर केला. पाण्याच्या सोयीसाठी छोटी विहीर तयार झाली. त्याच शाळेत मुख्याध्यापक असताना आप्पांना ठाणे जिल्ह्यातील ‘ऊत्कृष्ट प्राथमिक शिक्षक’’ हा किताब मिळाला.
आप्पांच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली होती. असे अधिकारी आप्पांना कधीतरी गोत्यात आणण्याच्या प्रयत्नात असत.
चिंचणीच्या देदाळे शाळेत हेडमास्तर असताना दुपारी जेवणानंतरच्या सुट्टीत आप्पा त्यांच्या ऑफिसात बसले असताना एक अधिकारी वाणगाव स्टेशनहून सरळ शाळेत आले. कोणतीच पूर्व सूचना दिली नव्हती. मुलांकडे चौकशी करून आप्पा ऑफिसमध्ये बसले आहेत हे समजून देखील ते एका उपशिक्षकांच्या वर्गात गेले. ते शिक्षक भांबावले. मात्र त्यांनी आपले शिकवणे चालू ठेवले. ‘डेप्युटी साहेब’शाळेत एका वर्गात गेले आहेत हे आप्पांना कळले. आप्पा तात्काळ आपल्या ऑफिसमधून त्या वर्गात गेले. नम्रपणे त्या अधिकाऱ्यांना म्हणाले,
“ साहेब आपण प्रथम माझ्या ऑफिसात या. शाळेचा हेडमास्तर म्हणून माझी परवानगी घ्या. नंतर आपणाला कोणत्या वर्गात चाचण्या घ्यावयाच्या त्या घ्या..”
अधिकाऱ्यांना हा प्रश्न खूपच अनपेक्षित होता. ते गोंधळले तरीही म्हणाले ,
“गुरुजी मी तुमचा वरिष्ठ आहे. तुमची परवानगी घ्यायची मला जरुरी नाही..”
आप्पा त्यांना म्हणाले,
“जरूर आपण माझे वरिष्ठ आहात. नियमानुसार मला कळवून आपण यायला हवे होते. निदान या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून तरी मला सांगावयास हवे होते. “
‘वा. दे .राऊत’, गुरुजी काय प्रकार आहे हे त्या वरिष्ठांना माहित होते. हा माणूस नियमाचाही इतका पक्का असेल हे त्यांना माहीत नव्हते. मुकाट्याने आप्पांबरोबर चहा घेऊन ते निघून गेले. आप्पांच्या वाट्याला पुन्हा गेले नाहीत.
वाणगाव स्टेशनवरून चिंचणीस जाताना उजवीकडे देदाळ्याची ती शाळा दिसली की आजही माझे हात जोडले जातात!
चिंचणीचे वास्तव्य आप्पांना खूपच लाभदायी ठरले. निवृत्तीनंतर ते सहकुटुंब आमच्या बोर्डाच्या घरी राहावयास आले. प्रकृतीही चांगली राहिली. मुलांची शिक्षणे झाली. मुले मार्गी लागली. होती. रोज चरख्यावर थोडे सुत कातणे, लिखाण करणे, जुन्या मित्राबरोबर गप्पा करणे, कधीतरी संध्याकाळी समुद्रावर फेरी मारणे असा त्यांचा दिनक्रम होता. काही पालकांच्या विनंतीवरून ते फुकट शिकवणीही करीत.
बोर्डीचे हे घर लहान होते. आमचे कुटुंब आता विस्तारत होते. आम्ही बोर्डीचे घर सोडून घोलवडमधील प्रशस्त घरात राहावयास आलो. घोलवडचे कै. भालचंद्र चुरी व माझे श्वशुर कै. वासुदेव सावे यांच्या प्रयत्नांनी आम्हाला या घराचा शोध लागला व आम्ही ते विकत घेतले. घराभोवती सुमारे पाऊण एकर जागाही उपलब्ध होती. आप्पांचा शेतीचा छंद जोपासण्यास संधी उपलब्ध झाली.
आयुष्याची अखेरची वर्षे या वास्तूमध्ये घालविली. खूप आनंदाचे दिवस होते ते. भरपूर जागा, शुद्ध हवा, चांगला शेजार व मनाप्रमाणे शेती बागायत फुलवण्याची सोय.. आप्पांनी आपल्या देखरेखी खाली येथे एक विहीरही खणून घेतली. छान गोड पाणी उपलब्ध झाले. मोटर पंप बसविला. केळी पपई काकड्या भोपळे चिकू आंबे, नारळ अशी विविध प्रकारची झाडे आप्पांनी या जागेत लावली. आजही त्यांची फळे खाताना आप्पांची आठवण हमखास होते. आम्ही मुले, नातवंडे घोलवडला आलो की या सर्व परिसराचा खूप आनंद उपभोगीत असू. आप्पांचे जुने सहकारी पा. मा. पाटील गुरुजी, बारी गुरुजी, निमकर गुरुजी यासारखे मित्र व त्यांचे अनेक जुने विद्यार्थी, विशेषतः उमरोळीकडील मंडळी आठवण ठेवून त्यांना भेटावयास येत आप्पानाही खूप समाधान होई.!
हर्षला सावे, आप्पांची नात. सौ. अरुणा व भालचंद्र भाईंची जेष्ठ कन्या. सुट्टीत आमच्या घोलवडच्या घरी येऊन राही व आप्पांची सगळ्यात मोठी नात असल्याने त्यांचे जास्तीत जास्त सानिध्य तिला मिळाले. त्या दिवसांतील जुन्या आठवणी काढताना ती म्हणते,
“माझ्या आईचे वडील कै. वामन देवजी राऊत म्हणजेच आम्हा सगळ्यांचे आप्पा. मला समजू लागल्यापासून माझ्यासाठी आजोबा गुरु झाले.आप्पा पेशाने शिक्षक असल्याने आदरणीय होते.त्याबरोबर निर्व्यसनी प्रामाणिक सत्वशील वर्तनामुळे आर्थिक दृष्ट्या मजबूत नसले तरी सर्वांना त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना होती.
आप्पांचे जीवन पहिल्यापासून सुखाचे आरामदायी असे नव्हतेच. आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले.ते तत्वनिष्ठ होते. शिस्तप्रिय होते.आपल्या तत्त्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. गांधीवादाशी त्यांची नाळ जुळली होती. ते स्वतः चरख्यावर सूत काढत. शुभ्र सुती कापडाचा सदरा, धोतर, पांढरी टोपी हाच त्यांचा आयुष्यभराचा पोशाख होता.” साधी राहणी असावी उच्च विचारसरणी ठेवावी” या मतावर ते ठाम होते.
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ – संत तुकाराम
या उक्तीनुसार त्यांच्या आचरणाने आपसूकच त्यांचा प्रभाव इतरे जनावर पडत असे.
आप्पांचे हस्ताक्षर अप्रतिम होते.आम्हा नातवंडांना गोष्टी सांगून, पुस्तके वाचून दाखवून वाचते व्हा, हा विचार त्यांनी दिला. वाचनाची गोडी लावली. दिवाळीच्या सुट्टीत घोलवडला सुट्टीचा अभ्यास संपविल्यावर हस्ताक्षर व शुद्धलेखनाचे परिक्षण ते करीत. वर्षभरात ते पत्रव्यवहार करत तेव्हाही खुशालीबरोबरच सुविचार,वचने व नवीन काही सांगणे असायचे. त्यांनी स्वहस्ताक्षरात बोरूने लिहिलेली अनेक वचने सुविचारानी घोलवडच्या घराच्या भिंती सुशोभित केल्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी, “आपले मरण पाहिले म्या डोळा..” हे वचन त्यांनी भिंतीवर लिहिले होते.आपल्या मुलांशी त्यांनी जो पत्र व्यवहार केला तो “आप्पांची पत्रे”, म्हणून माझे मामा श्री. दिगंबर राऊत यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. तो वाचल्यानंतर आप्पा जगातील व्यवहाराबाबत किती जागरूक होते, मुलांना संस्कार देण्यासाठी किती धडपडत होते हे लक्षात येते.दुसऱ्यांना सहाय्य करणे किंवा दुसऱ्याकडून काही सहाय्य घेणे असो, त्यांची निर्णय क्षमता वादातीत होती.आप्पांची ही पत्रे आमच्यासाठी स्मृती-चित्रे ठरली आहेत.
प्रतिकूलता असतांनाही आपले कर्म करत राहून, पुढे वाटचाल करायची,असे कर्मयोग्याचे जीवन ते जगले. श्रीमत भगवद् गीतेत सांगितलेली दैवी संपत्ती लाभलेले असे ते व्यक्तिमत्व होते हे नक्की.
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत।।भगवतगीता १६.३।।
म्हणजे तेज, क्षमा, धैर्य, शारीरिक, शुद्धी, शत्रुभावनेचा अभाव व मानसन्मानाची इच्छा न ठेवणे हे, भरतवंशी अर्जुना, सर्व दैवी प्रभाव प्राप्त झालेल्या लोकांची लक्षणे आहेत. आप्पांच्या बाबतीत हे होते.
त्यांच्या उतार वयात हवे तसे बागकामात रमायचे. शांत आयुष्य जगत आले. मुले ही कर्तृत्ववान निघाली. नातवंड मुलांत त्यांना रमता आले. त्यामुळे ते कृतार्थ झाले. शारीरिक कुरबुरी होत्या पण नियतीने त्यांची आणखी परिक्षा घेतली. कर्करोगाशी ही त्यांनी झुंज दिली…
घोलवडच्या घरी मुक्या प्राण्यांनाही त्यांनी प्रेम दिले. त्यांनीही आप्पांवर निर्व्याज प्रेम केले. त्यांच्या शेवटच्या आजारात, आम्ही दिवाळीची सुट्टी पूर्ण करून निघालो असताना पाळलेले कुत्रे टिपू-काळू आमच्याबरोबर शेवटपर्यंत घोलवड स्टेशनवर आले होते. ते रडत होते. गाडी सुटली तरी डब्याबरोबर धावत होते. जणू ते आम्हाला सांगत होते.. “आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हीही बरोबर येतो..”
आम्ही डहाणूला जाऊन आप्पांना भेटून पुढे जाणार होतो. पण त्यांची प्रकृती अत्त्यवस्थ झाल्याचे कळले. आम्ही परत घोलवडला आलो. आणि तोच त्यांच्या आयुष्यातील अंतिम दिवस ठरला. त्यांच्या आठवणींचा अमूल्य ठेवा आमच्याबरोबर कायम आहे. त्यांच्या स्मृतीला वंदन!”
हर्षू आप्पांची लाडकी नात.प्रत्येक सुट्टीत घोलवडच्या घरी येई. आप्पा तिला प्रेमाने हसीया म्हणत. ती खूप हसरी होती. आजही तशीच आहे. हर्षूने सांगितलेल्या आपल्या आजोबांच्या आठवणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर खूप प्रकाश टाकतात.
दिवाळी मे महिन्याचे सुटीत तर सर्वच कुटुंबीय एकत्र येत व घोलवडला मुक्काम ठोकीत. सर्वत्र हलकल्लोळ होई. सकाळचे सावकाश उठणे, समुद्रकिनाऱ्यावरील फेरफटका, नाश्त्यासाठी भाकरी उसळीची सोय, जेवणानंतर पुन्हा वामकुक्षी, बागेला पाणी- श्रमदान, पुस्तकांचे वाचन, मुलांचे विविध खेळ, झाईच्या किनाऱ्यावर जाऊन मासे खरेदी, कधी कोणाचे जाळे घेऊन समुद्रात मासेमारी करण्याचे प्रयोगही आम्ही या दिवसांत केले आहेत .रात्री उभरत्या कलाकारांचे कर्मणुकीचे कार्यक्रम होत! लेखक दिग्दर्शक निर्माती हर्षुताई असे. ‘नाटकात नाटके’ ही खूप होत. सर्वांची करमणूक होई. विशेष म्हणजे या सर्व कलाकारांना बक्षीस वाटप करताना आप्पा प्रत्येकाला पहिला नंबर देत. तसे झाले नसते तर बक्षीस समारंभानंतर फ्री स्टाईल कुस्तीचे सामने पहावयास मिळाले असते, याची कल्पना आप्पांना असे !!
दिवस आनंदात मजेत चालले होते. दम्याचा त्रासही खूपच कमी झाला होता. शुद्ध मोकळी हवा व मनस्वास्थ्य समाधान यामुळे त्यांना खूप बरे वाटत होते. मात्र त्या आनंदाला ग्रहण लागले. १९८१ च्या मे महिन्यात त्यांना गळ्याजवळ आलेल्या एका लहान गाठीमुळे गिळण्यास त्रास होऊ लागला.डॉ.शहानी तपासण्या करून आम्हाला मुंबईच्या टाटा इस्पितळात सर्व तपासण्या करून घेण्यास सांगितले.
आम्ही त्यांना परेल मुंबईला घेऊन गेलो. दादर स्टेशनवर उतरलो. मे महिना होता.कडाक्याचे ऊन. चपला असूनही आमच्या पायाला चटके बसत होते. आप्पा मात्र अनवाणी होते. टॅक्सी पकडण्यासाठी आम्ही स्टेशन पासून चालू लागलो. आप्पा अनवाणी होते व डांबरी रस्त्यावर चटके बसत होते. मी पिशवीत साध्या स्लीपर ठेवल्या होत्या. त्या काढून त्यांचे समोर ठेवल्या.डांबरी रस्त्यावरून चालताना एवढ्या घाला अशी विनंती केली.
काय सांगावे त्यांनी ?
“बेटा आयुष्यभर जे व्रत पाळले, आता थोड्या दिवसासाठी कशाला मोडू? मी व्यवस्थित चालेन, काळजी करू नकोस ,”
परेलच्या टाटा हॉस्पिटलमथील डॉ. मेहता यांनी ऑपरेशन केले. स्वरयंत्र काढावे लागले .आप्पांचा तो प्रेमळ, गुरूदेवदत्त नामाचा जप करणारा, रोज सकाळी सायंकाळी ईश्वरीय प्रार्थना करणारा धीरगंभीर आवाज कायमचा हरवला… इस्पितळात आमच्या भालचंद्र भाईंनी आम्हा भावांना खूप साथ दिली व आप्पांची सेवा केली.
मनातील विचार ते पाटीवर लिहून दाखवीत . गळ्याजवळ छोटे भोक होते. त्यातून फुफ्फुसातील चिकट द्राव यंत्राद्वारे काढावा लागे. खूप त्रास होई. पण सर्व सहन करीत …
पुढे इस्पितळातून सोडल्यानंतर त्यांना आम्ही अरुण भाऊजी व सौ. ममा (नीलम), यांचे घरी डहाणूस आणले. त्यांची तशी इच्छा होती. ममा त्यांची खूप लाडकी लेक. पण शेवटी जे विधीलिखित होते तसेच झाले.. १ नोव्हेंबर १९८१ रोजी आप्पांनी मोठ्या समाधानाने या जगाचा निरोप घेतला. त्यांनी आधीच लिहून ठेवले होते,…
“माझ्या लाडक्या मुलांनो, माझे अंतिम संस्कार करताना कपाटात ठेवलेले खादीचे कपडे मला परिधान करा . कोणतेही धार्मिक विधी अथवा दानधर्म माझ्या नावे करू नका .त्या ऐवजी शाळेतील गरीब आदिवासी मुलांना घरी बोलावून एक भोजन व गोष्टीची पुस्तके त्यांना वाटा….”
आम्हा सर्व भावंडांची, नातवंडांची, व त्यांच्या काही विद्यार्थ्यांची नावे लिहून सर्वांना त्यांनी मनापासून अखेरचे आशीर्वाद दिले होते .
पुढे आम्ही सर्व भावंडांनी आमच्या स्वतःच्या देणग्यांतून आप्पांच्या नावे “वामनाई शैक्षणिक धर्मदाय ट्रस्ट स्थापन केला व त्याद्वारे आमच्या भागातील आदिवासी व गरीब मुलांना शिक्षणासाठी पैसे व पुस्तकाची मदत केली आहे. गेली सुमारे वीस वर्षे आमच्या घोलवड घरी व कोसबाड येथील वाडीत काही विद्यार्थी वा विद्यार्थिनींची राहण्याची फुकट व्यवस्था केली जाते. काही विद्यार्थ्यांना थोडीफार आर्थिक मदतही देतो.
आम्ही अंत्यसंस्कार व इतर विधी त्यांच्या इच्छेप्रमाणेच केले. काही लोकांनी खूप टीका केली. भीती घातली. पण आम्ही त्याची फिकीर केली नाही.
आप्पा गेले. आजही त्यांची आठवण झाली की त्यांचे भव्य कपाळ, त्यावरील ललाट रेषा, लांब धारदार नाक, प्रेमळ डोळे,( आयुष्यात कधीच चष्मा लागला नाही), अखेर पर्यंत शाबूत असलेली सर्व दंतपंक्ती ( आयुष्यभर फक्त बाबळीचे दांतवण केले) पांढरा झालेला डोक्यावरचा केशसंभार, कधीही अभद्र न बोलणारी पवित्र वाणी आठवते ! विशेष म्हणजे लहानपणी ते आम्हाला आपली जीभ नाकाला लावून व हात गुडघ्याला टेकवून दाखवत, आणि आम्हाला करावयास सांगत. तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही. आज वाटते, आजानुबाहू-दीर्घ रसनाधारी आप्पा संतपुरुष होते का?
वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारी आशीर्वादपर पत्रे आम्हाला पाठविली आहेत. त्यांचा सर्व संग्रह केला असून ती माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केली आहेत.
आप्पांनी आम्हा भावंडांना शिक्षण देण्यासाठी सोसलेले अपार कष्ट, कोणत्याही प्रसंगात स्वाभिमान निष्ठा व जीवन मूल्यांशी तडजोड न करता दाखविलेले धैर्य. महात्मा गांधीजी व स्वातंत्र्यवीर सावरकर अशा दोन ध्रुवावरील दोन व्यक्तिमत्त्वांचे आदर्श त्यांनी पाळले…इष्ट असेल तेच बोलेन व शक्य असेल तेवढे निश्चित करेन, या आगरकरी वृत्तीचे सदैव पालन केले. .. ‘शिक्षण म्हणजे गरिबांच्या हातातील ॲटम बॉम्ब आहे, ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे’, म्हणून शिकवण्या करूनही कोणाचा पैसाही न स्वीकारता दाखविलेला निस्पृहपणा… शेवटी या जगाचा अंतिम निरोप घेतानाही ,”मी विणून ठेवलेल्या खादीची प्रावरणे माझ्या देहावर चढवावीत,माझ्या पश्चात कोणतेही धार्मिक विधी वा अनुष्ठाने न करता तो पैसा आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी दान करावा ..”एवढीच अंतिम इच्छा लिहून गेलेले माझे वडील म्हणजे आमचे आप्पा त्याकरिताच आमचे गुरु, कल्पतरू!
सन २००७ साली आप्पांच्या निधनास पंचवीस वर्षे झाली. त्यानिमित्ताने “औदुंबराची छाया”, या स्मृतिअंकाचे प्रकाशन आम्ही केले. आप्पांचे जुने सहकारी, विद्यार्थी,नातेवाईक, मुले-नातवंडे यांनी आपल्या आठवणी त्यात ग्रंथीत केल्या आहेत. आमच्या सुदैवाने आमदार श्री.कपिल पाटील, सहल सम्राट कै केसरीभाऊ पाटील मुंबईच्या तत्कालीन महापौर सौ. डॉ. शुभा राऊळ यांनी कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लावून आप्पांच्या आठवणी जागविल्या होत्या.
प्रत्येकाला या जगात आई होणे शक्य नाही. परंतु प्रत्येक जण आईचे हृदय घेऊन जगू शकतो. आप्पा आमचे वडील असले तरी त्यांचे हृदय एका आईचे होते. म्हणूनच ते रोजच्या आयुष्यात सर्वांप्रति अगदी मनुष्येतर जीवसृष्टी बरोबर देखील आत्मियता प्रेम व ममतामय व्यवहार करीत असत.. आपल्या भोवतीचे जग प्रेममय करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचे श्रद्धास्थान साने गुरुजींच्या शिकवणीप्रमाणे
“ खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे।”
या मानव धर्माचे आजीवन पालन त्यांनी केले।
आप्पांच्या पावन स्मृतीला प्रणाम।
दिगंबर वा राऊत