माझे गुरू आणि महागुरू – भाग दुसरा
माझ्या प्रबंधाचे काम पूर्ण झाल्यामुळे मी क्वचितच कॉलेजवर जात असे व वसतिगृहावर राहूनच पुढील लिखाणाचे, टायपिंगचे व इतर संबंधित काम करीत असे. केवळ दीड वर्षात हे काम मी संपविले होते. त्याच सुमारास गोदरेज कंपनीच्या डॉ. गोदरेज यांच्या, ‘बोर्डी कनेक्शन’ मुळे व आचार्य भिसे गुरुजी यांच्या शिफारसीमुळे मला पदवी मिळण्याआधीच गोदरेज कंपनीकडून नोकरीचा प्रस्ताव आला. मी कामास लागलो. नोकरी सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी मला माझी M.Sc. Tech ही पदवी मिळाली. काणेसरांना भेटावयास गेलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. UDCT च्या, त्यावेळच्या परंपरेप्रमाणे, कोणत्याही पदवीप्राप्त विद्यार्थ्याला नोकरीसाठी, त्याचे विभागप्रमुख अथवा त्या विभागातील प्राध्यापक, नोकरी देणाऱ्या कंपनीला, द्यावयाच्या वेतनाची रक्कमेची, शिफारस करीत व कंपन्यांना ते मान्य करावे लागे. आपल्या विद्यार्थ्याला एका ठराविक रकमेपेक्षा कमी वेतन मिळणे हा आपला अपमान आहे असे प्राध्यापक मानीत. आमचे प्रोफेसर काणे याबाबतीत थोडा कंजूषपणा दाखवून इतर सहकारी प्राध्यापकापेक्षा कमी वेतननाची शिफारस करीत. ज्या साधेपणाने आणि स्वदेशीच्या भावनेने त्यांनी आपले सर्व आयुष्य घालविले, तीच भावना आपल्या विद्यार्थ्यांनी ठेवावी अशी सहाजिकच त्यांची अपेक्षा होती. ते आम्हाला नेहमी म्हणत “पैशाचा विचार नोकरीत करू नका, तुमच्या कामाचा दर्जा उच्च असू द्या, पैसा तुमच्याकडे न मागता येईल!” ते सत्य होते. त्यांच्या आशीर्वादाची प्रचिती, भविष्यकाळात अनेक विद्यार्थ्यांना आली आहे. डॉक्टरांच्या या शिकवणुकीचा अनुभव मला स्वतःलाही पुढे आला ती कथा पुढे येईलच.
डॉ. काणेसरांची छत्रछाया संपली. मी औद्योगिक वातावरणातील स्पर्धा व अंतर्गत गटबाजीच्या कडकडीत उन्हात आलो. आयुष्याला एक नवे वळण मिळाले. चार वर्षात UDCT, वागळे सर, प्रो.काणे व इतरही अनेक गुरुजनांनी दिलेले शिक्षणाचे संस्कार व मार्गदर्शन भविष्यकाळात अडचणीच्या प्रसंगी खूप खूप कामाला आले .
माझ्या चार वर्षाच्या UDCT मधील वास्तव्यात, मार्गदर्शन घेतांना मला डॉक्टरांचे खूप जवळून दर्शन झाले. त्यावेळी त्याचे नीट आकलनही झाले नाही. तेव्हा शांतपणे विचार करून, अर्थ जाणण्याची कुवत नव्हती, वेळ नव्हता. आज त्या कालाचा, घटनांचा विचार करता माझ्या ह्या महान गुरूंची महानता जाणवते. त्यांच्या सान्निध्याचा उपयोग आपण अजून करून घ्यावयास हवा होता ही जाणीव होते. मात्र मिळाले तेवढेही माझ्यासाठी खूप होते. जेवढी माझी योग्यता तेवढे मला मिळाले. आयुष्यात अनेक प्रोफेसर, अध्यापक मी पाहिले मात्र असा कर्मयोगी, ज्ञानयोगी व स्थितप्रज्ञ गुरु क्वचितच पहावयास मिळेल.
डॉ. काणे यांच्या अनेक शिष्योत्तमापैकी एक श्री. नरेंद्र वागळे, यांचा उल्लेख मी आधी केला आहे. महागुरूबद्दल मी काही सांगण्यापेक्षा माझे गुरु, वागळे सरांनी महागुरूंना वाहिलेली श्रद्धांजली, येथे देणे जास्त उचीत होईल. आपल्या या महागुरूंबद्दल वागळे सर म्हणतात,(इंग्रजी टीपणाचा मराठी तर्जुमा)
“प्रोफेसर जगन्नाथ गोविंद काणे ,M Sc., Ph D, A M I I Chem E,A I I S C यांना 1954, साली भेटलो.तेव्हा ते UDCT मध्ये ,ऑईल्स् फॅट्स वॅक्स्सेस, या विभागाचे प्रमुख होते. मी, बी एस सी (टेक्) या,बी एस्सी नंतरच्या पदवी अभ्यासक्रमासाठी आलो होतो. त्यावेळी हा अभ्यासक्रम ,दोन वर्षाचा होता. नंतर माझ्या M Sc,Tech. संशोधन प्रकल्पासाठी प्रोफेसर काणे हेच माझे गाईड झाले. मी,’ शुगर केन आणि लिग्नाइट वॅक्सेस’ (SUGARCANE AND LIGNITE WAXES), यासंबंधी संशोधन करून माझा प्रबंध सादर केला होता. भारतात पहिल्यांदाच या विषयावर संशोधन होत होते. डॉ. काणे यांच्या,’ कचऱ्यातून सोने’, या धोरणानुसार व स्वदेश प्रेमातून, असे हे संशोधन होत होते. शुगर केन वॅक्स हे साखर कारखान्यातील मिळणाऱ्या गाळापासून, तर लिग्नाइट वॅक्स ,नेव्हेली कोळसा खाणीतून मिळणाऱ्या कचऱ्यातून शोधावयाचे होते. हे वॅक्स त्यावेळी भारतात आयात होणाऱ्या,”मोन्टानवॅक्स”,या जर्मन वॅक्सला पर्यायी म्हणून ठरणार होते. मोन्टानवॅक्सची मोठ्या प्रमाणावर आयात होत होती. ते खूप महागही होते व परदेशी चलन खर्च होत होते ..” वागळे सर पुढे म्हणतात..
“सुमारे पाच वर्षे मी डॉक्टरांचा विद्यार्थी म्हणून तेथे होतो. असोसिएट लेक्चरर् म्हणून नोकरीही केली. डॉ. काणे यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जवळून ओळख झाली. अतिशय साधे, निस्वार्थी, देशप्रेमी व स्वदेशीच्या ध्यासाने भारलेले असे पारंपारिक गुरु म्हणजे डॉक्टर काणे! आम्ही त्यांना आदराने जगद्गुरु म्हणत असू. (JG).माझ्या आयुष्य घडणीच्या काळात एक मार्गदर्शक आणि तत्वज्ञ, म्हणून मला त्यांचा लाभ झाला हे माझे भाग्य. त्यावेळी आमचे हे महागुरू, अमेरिकेला, शिक्षणासाठी, बोटीने गेले होते. ” युद्धकाळात बोटीच्या प्रवाशांना जर्मन पाणसुरुंगाचे, सतत कसे भय वाटत होते, आपण परत भारतात येऊ की नाही, ही भावना कशी सतावत होती,”, याचे मोठे रंगतदार वर्णन ते करीत असत. अमेरिकेत विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी उच्च अभ्यास केला. आणि डॉक्टरेटची पदवी घेऊन ते परत भारतात आले .येथे आल्यावर त्यांनी BUDCT, मध्ये पहिल्यांदा, Reader In Oil Technology, (1943-54) प्रोफेसर ईन टेक्नॉलॉजी (1954-69),व शेवटी निवृत्त होताना Director, BUDCT, (1969 -71) असे योगदान दिले.”
“आपला भारत देश खाद्यतेलाबाबतीत आत्मनिर्भर कसा होईल आणि देशाच्या वाढत्या लोकसंख्येला खाद्यतेले पुरेशा प्रमाणात कशी मिळतील या ध्येयाने डॉ, काणे पछाडलेले होते. या क्षेत्रात त्यांनी खूप तन्मयतेने ,सतत आपले योगदान दिले आहे. अखाद्यतेले, खाद्यतेलाऐवजी वापरून, जसे निम तेलाचा उपयोग भुईमुगतेलाऐवजी करून,बऱ्यापैकी खाद्य तेलाची बचत करून, आयात कमी करण्याचे मोठे श्रेय डॉ. काणे यांच्याकडे जाते. आपल्या देशात पेट्रोलियम क्रूड ऑईलच्या खालोखाल खाद्यतेलाची आयात ही मोठी खर्चिक बाब आहे हे लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात येईल.”
भारतातील अनेक लघु ,मोठ्या, उद्योगधंद्यांसाठी जसे की खादी आणि व्हिलेज इंडस्ट्री कमिशन सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या आई सी ओ सी( Indian Central Oill Seeds Committee ) बरोबर, डॉक्टर निगडित होते व त्यासाठी त्यांनी SOAPS, THEIR CHEMISTRY AND TECHNOLOGY हे पुस्तक लिहिले . या प्रकारचे भारतातील हे पहिले क्रमिक पुस्तक होते .माझ्यासाठी एक शिक्षक, मार्गदर्शक, म्हणून मला ते नेहमीच वंदनीय आहेत. त्यांच्या साधेपणामुळे व निस्वार्थी वृत्तीमुळे त्यांचे अनेक सहकारी त्यांची कधी कधी थट्टा करीत. त्यांच्या ,’फुकट सल्ला मसलतीची’ टर उडवीत. डॉ. काणे यांचे म्हणणे असे “Science is Knowing, while Technology is Applying what science knows!”.
” भारतातील अनेक तांत्रिक संस्था व संघटनांशी , डॉ.काणे यांचा संबंध होता. त्यापैकी, AGMARK, ISI, ICAR, CSIR, या काही होत.” डॉ. काणे यांचा स्वतःबद्दल आत्मविश्वास व आत्मनियंत्रण किती होते त्याबद्दल वागळे सर म्हणतात,
” काणे सर, गीतेत वर्णिलेल्या,” स्थितप्रज्ञ”, या संज्ञेचे चालते बोलते उदाहरण होते. शांत,संयमी वृत्ती, मनावर पूर्ण ताबा, निःस्पृहता आणि सदैव, संपूर्ण समाधान. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगी जराही विचलित न होता,आपले काम हेच आपले सर्वस्व समजून पुढे जात राहणारे असे ते व्यक्तिमत्त्व होते. एकदा एका पंचतारांकित हॉटेलातील सेमिनारमध्ये ,त्यांचे मुख्य भाषण चालू असताना त्यांच्या हातात एक कागद देण्यात आला. डॉक्टरांनी तो वाचून खिशात ठेवला. आपले भाषण पूर्ण करून सभा सोडली. नंतर सर्वांना कळले की त्यांच्या मोठ्या बहिणीचे निधन झाल्याची ती बातमी होती. त्यानंतर मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हाही त्यांनी तितक्याच शांतपणे त्या प्रसंगाचे वर्णन केले .कुटुंबातही एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सुयोग्य वर्तन केले . कामाच्या एवढ्या व्यापात आपल्या वृद्ध मातापित्यांच्या सेवेत कधी खंड पडू दिला नाही. माझ्या महागुरूंच्या पवित्र स्मृतीला मी वंदन करितो.”
आपल्या महागुरूंच्या खेळकर व संयमी वृत्ती बद्दल बोलताना वागळे सर म्हणतात. “दुसऱ्या एका प्रसंगी मी स्वतः तेथे हजर असताना प्रोफेसरांनी चुकून एका प्रयोगादरम्यान अमोनिया वायूची वाफ घेतली. काही काळापुरते त्यांना अंधत्व आले. या वायूच्या वाफा खूप विषारी असतात. आपल्या नेहमीच्या शांत स्वभावानुसार यांनी आम्हाला सांगितले, “वा वा फार छान अनुभव होता…” हीच तर स्थितप्रज्ञाची लक्षणे. “माझ्या आयुष्यात, योग्य वळणावर, मला भेटलेल्या या माझ्या, मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक (Friend Philosopher And Guide) नी, माझ्या आयुष्याला विधायक वळण दिले. माझ्या जीवनात मी एक यशस्वी तंत्रज्ञ, संशोधक आणि सल्लागार म्हणून, माझ्या मूल्यांशी तडजोड न करता काम केले, त्यात माझ्या महागुरूंचा खूप मोठा वाटा आहे. मी त्यांना मनापासून श्रद्धांजली वाहतो.“
मला वाटते वागळे सरांच्या या टिपणीवर जास्त भाष्य करण्याची जरुरी नाही. महागुरूंच्या, शास्त्रज्ञ व आचार्य म्हणून, उत्तुंग व्यक्तिमत्वाचे हे अत्यंत समर्पक शब्दचित्र!
डॉ. काणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रथम पीएचडी पदवी मिळवणारे त्यांचे अगदी सुरूवातीचे विद्यार्थी, डॉ. एस. जी. भट्ट यांचेशीही मला सुदैवाने संपर्क करता आला. माझे मित्र डॉ.राजीव चुरी, (ज्यांचा परिचय पूर्वी आला आहे), यांचे सहकार्याने डॉ. भटां बरोबर संपर्क करता आला.
डॉ. भट आज 95 वर्षांचे असून त्यांचा उत्साह, स्मरणशक्ती व कोणालाही मदत करण्याची त्यांची तळमळ आहे. त्यांच्याशी फोनवरून बोलतांना, मला हे जाणवले. ते 1947 साली मंगलोरमधून मुंबईत उच्च शिक्षणासाठी आले. बीएससी पदवी उत्तमरित्या प्राप्त केल्यानंतर, BSc Tech साठी 1951 साली UDCT त दाखल झाले.फक्त 82 विद्यार्थ्यांना, सर्व शाखांमिळून प्रवेश मिळे. आणि डॉ. व्यंकटरामन सारखे डायरेक्टर , डॉ. जे. जी. काणे, डॉ.जी. पी. काणे, डॉ.आर. डी. देसाई, प्रोफेसर एन. आर. कामत असे दिग्गज प्राध्यापक शिकविण्यासाठी होते. बीएससी टेक् नंतर डॉ. काणे यांचेच मार्गदर्शनाखाली त्यांनी MSc Tech हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. ‘Studies on In-edible Oils’ हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. खूप काम करावे लागे. कारण आजच्या प्रमाणे केमिकल्स व उपकरणांची उपलब्धता खूप कमी होती. “आता काम थांबवा”, असे गाईड सांगेपर्यंत काम करावे लागे. पदवीचा कालावधी खूप मोठा असे. संगणकाची सुविधा नसल्याने टायपिंगचे सर्व काम टाईपराईटरवर बसून, खूप काळजीपूर्वक करावे लागे. M Sc Tech पदवी घेऊनही नोकरीची शक्यता कमी होती, कारण उद्योगधंदे जास्त विकसित झाले नव्हते. भट सरांनी डॉक्टर काणे यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे Ph D चा अभ्यासक्रम सुरू केला. चिंचेच्या बियापासून टेक्स्टाईल इंडस्ट्रीला लागणारा स्टार्च तयार करणे (Studies on Tamarind Seeds), असा विषय होता. 250 रुपये महिना स्टायपेंड मिळत असल्याने आर्थिक नियोजन ही होऊ शकले. हा अभ्यासक्रम चालू असतानाच एका महिन्यातच डॉक्टरांनी Associate Professor हे शिकवण्याचे काम दिले. त्यामुळे आर्थिक प्रश्न सुटले. 1957 साली ते पी एच डी झाले.
डॉ.भट यांनी चीफ केमिस्ट, कॅल्टेक्स इंडिया, प्रॉडक्शन मॅनेजर लॅक्मे लिमिटेड, R&D Executive टाटा ऑईल मिल अशा अनेक प्रतिष्ठित कंपन्यांत काम करण्याचा अनुभव घेतला. पुढे त्यांनी स्वतंत्रपणे कन्सल्टंट म्हणून अनेक वर्षे काम केले. मोठे सामाजिक योगदानही दिले. विशेषतः अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्ये (CGSI) , ग्राहकांच्या तक्रार निवारण विभागांत, त्यांचे काम मोठे. आजही अशीच सामाजिक कामे चालू आहेत. आपल्या समाजाची व मातृभूमीची सेवा गुरूंनी दिलेल्या ज्ञान व संस्कारामुळे करू शकलो याचा त्यांना सार्थ अभिमान आहे! डॉ. भट व आमचे गुरु वागळे सर हे दोघेही एकेकाळी CGSI या केंद्रीय संस्थेत सहकारी म्हणून काम करीत होते हा देखील मोठा योगायोगच!
डॉ. काणे यांचा विद्यार्थी म्हणून,त्यांच्या हाताखाली काम करताना काय वाटले हे सांगताना डाॅ. भट साहेब म्हणतात, ते त्यांच्याच शब्दात सांगतो,
“I am proud to speak to you today about my dear Guru Prof.J.G.Kane, who was my teacher, guide, friend, and philosopher, during my studies at the UDCT for nearly 10 years, from 1949. He was a simple gentleman and never spoke about his achievements but was an authority in the field of vegetable oils and fats, their chemistry, and technology. He was represented as a technical expert on many committees of the Council of Scientific and Industrial Research, Bureau of Indian Standards, Vanaspati Manufacturers Association, Solvent Extractors Association, Oil Technologist’s Association of India, etc
Dr.Kane had rapport with many Industrialists from Tatas, Hindustan Levers, Godrej Soaps, Swastik Oil Mills, Bombay Oil Industries etc.
Dr.Kane is a pioneer in the Oils & Fats Technology and Bombay University has recognised Dr.Kane as a Research Guide, both in Chemistry & Chemical Technology at the UDCT. Many students completed their Master’s Degree in Science & Technology. I was lucky and grateful to Dr.Kane as the First Ph.D.Tech under his guidance in 1957. He gave me the freedom to think and apply knowledge to research projects & encouraged me whatever I was doing is good. Dr. Kane had cordial relations with the Heads of other sections, which enabled me to diversify my research in allied topics.”
डाॅ. प्रो. काणे, यांचे मार्गदर्शनाखाली पहिली पी.एचडी पदवी मिळवणारे डॉ.एस.जी.भट. सध्या वय वर्षे ९५.
डॉक्टरांच्या महत्तेचे वर्णन त्यांच्या पहिल्या विद्यार्थ्याने दिले आहे ते खूप बोलके आहे. त्यांचा प्रत्येक विद्यार्थी शेवटी हेच म्हणतो, काणे सर आमचे नुसते प्राध्यापक, शिक्षक नव्हते तर त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, वैयक्तिक आयुष्यातील हितचिंतक व भावी जीवना करीता संस्काराची मोठी शिदोरी देणारे असे एक तत्त्वज्ञ व मार्गदर्शक गुरु देखील होते. पुढे भट सरांना असोसिएट प्राध्यापक म्हणून डॉक्टर काणे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आपले गुरू एक सहकारी म्हणून त्यांना कसे वाटले तेही त्यांच्या शब्दात,
“I was appointed in 1955 as a faculty member in Oils and Fats Section and as a colleague, I had a close association with him and recollected some memorable events.
1. During the vacation period one staff member has to be on duty. One day suddenly Dr.Kane was in his Cabin and I told him that I have to go one hour early. He smilingly told me that I have to,” tell myself ” and go early and there is no need to inform him.
2 .Dr. Kane & Mr.N.C.Patel won the First Prize for their Research Paper published during that year for which Dr. Kane received two medals, one in Gold and the second one in Silver. He gave the Gold one to Mr.Patel and retained the Silver for him. A nice gesture.
3. One day when practicals were going on and a heavy cement roof fell down without hurting anyone. Dr. Kane saw the incident and called for a Coconut and asked to break. He was God Fearing and used to follow ancient practices.
4. Every year on Makar Sankranti Day he will carry & give TIL GUL to those who meet him and say,” Til gul ghya, god god bola..”
5. During the Annual Gathering of UDCT in 1953, myself and Dr.Kane were called on the stage for the Fish Pond item, it was announced that Mr. S.G.Bhat is doing research to grow hair on his guide’s head 🙂
6. I recall one incident when Dr.Kane visited his research laboratory, he saw the floor surrounding the Ice Box with water, he just used the gunny bag to clean the floor & washed his hands. He was not upset, and met the student, and went away. Everyone was surprised by his cool temperament.
Many of us are not aware that Dr.Kane after securing his Master’s degree from the Bombay University, worked with the prestigious Indian Institute of Science, Bengaluru, and then joined UDCT in 1935, as a staff member in the Chemical Engineering Section, then located in the premises of Royal Institute of Science, Fort, Bombay. Later he went to the USA for his Doctorate degree and on return to India as Head of the Oils & Fats Section and retired as Director.”
आपल्या संशोधनपर लेखाला मिळालेल्या सुवर्ण व रजत पदकातून,शिष्याला सुवर्ण पदक व स्वतः रजत पदक स्वीकारणारा हा महागुरू, नुसता शास्त्रज्ञ म्हणून मोठा होताच पण एक माणूस म्हणून त्या पेक्षा मोठा होता!
हे झाले त्यांच्या दोन शिष्योत्तमांचे मनोगत. त्यांचा प्रत्येक शिष्य आपल्या या महागुरू बद्दल हेच सांगेल !
वैयक्तिक व कौटुंबिक जीवन:
आमचे, महागुरू एक कुटुंब प्रमुख म्हणून,त्यांच्या परिवाराला, कसे वाटले हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. सुदैवाने यांचे सुपुत्र श्री. त्रिविक्रम काणे यांच्याशीही मी संपर्क करू शकलो. डॉ. भट साहेबांनी मला संपर्क नंबर दिला. एक मोठा शास्त्रज्ञ, संशोधक, एक चांगला माणूस देखील असावा लागतो. सहसा वटवृक्षाखाली असलेले छोटे वृक्ष मोठे होऊ शकत नाहीत. ते खुरटेच राहतात. हा जगाचा अनुभव आहे. पण आमच्या महागुरूनी कुटुंबाप्रती असलेले आपले ऋणही तितक्याच तत्परतेने निभावले. सुपुत्र श्री. त्रिविक्रम यांनी आपल्या पिताजीबद्दल दिलेली प्रतिक्रिया हेच सांगते.
” डाॅ. जे. जी. काणे यांचा जन्म दिनांक 17 सप्टेंबर ,1906 रोजी पुण्याजवळील भोर या गावी झाला. त्यांना एक बंधू व चार भगिनी होत्या.त्यांचा विवाह सन 1929 साली झाला.आमच्या आईचे नाव रमाबाई. मी व माझ्या चार बहिणी अशी आम्ही त्यांची एकूण पाच अपत्ये. जरी आमची आई अल्पशिक्षित होती, तरीही वडिलांनी तिला नेहमी सन्मान आणि प्रेमानेच वागविले. त्यांच्या सुखी संसारात तिच्या अल्प शिक्षणाचा अडथळा कधीच आला नाही, हे वडिलांच्या मनाचे मोठेपण ! असे हे शिक्षणाने विजोड, मात्र समाधान व सौहार्दपूर्ण, समाधानी जोडपे होते “
” माझे वडील हे आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक मार्गदर्शक ,सहाय्यक व आधारस्तंभ होते. कनवाळू मनाचे होते. आमच्या भल्यासाठी जे करावयाचे,त्यासाठी ते नेहमी अग्रेसर असत. आम्हा सर्वांसाठी, त्यांचा सदैव,’ देता हात’, होता.
“आम्ही लहानपणापासून त्यांना पहात आलो तेव्हापासून त्यांच्या अखेरपर्यंत, साध्या राहणीत व उच्च विचारसरणीत कधीही फरक पडला नाही. गांधीतत्त्वांचा त्यांच्या आयुष्यावर कायमचा पगडा होता. त्यांना आमच्या आईच्या हातचे साधे जेवण सर्वात प्रिय असे. कामानिमित्त खूप फिरावे लागे, तरी शक्यतो जेवणासाठी ते घरीच येत. मराठी पद्धतीचे वरण-भात, पोळीचे जेवण त्यांना सर्वात जास्त आवडे. सकाळी नियमित व्यायाम करीत.”
“कॉलेजात जरी ते संपूर्ण विलायती पोषाखात असत, तरी इतरत्र मात्र साधे धोतर, शर्ट, कोट, टोपी असा त्यांचा पेहराव असे. आपली स्वतःची बहुतेक कामे ते स्वतःचे हाताने करीत. सगळ्यांशी त्यांची वागणूक आत्मीयतेची आणि सामंजस्याची असे. बोलणे, मोजके, आणि सौम्य आवाजात असे. त्यांना मोठ्याने ओरडून अथवा कोणावर संतापून बोलताना आम्ही कधीच पाहिलेले नाही. कधी घरात कोणावर राग आलाच तर एकदोन दिवस कोणाशीही अजिबात बोलतच नसत. मौनव्रत असे. त्यांची विनोदबुद्धीही खूप तल्लख होती. घरात एखादा गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यास, वातावरणात अस्वस्थता आल्यास, एखादा गमतीशीर विनोद करून, घरांतील वातावरण नेहमी चैतन्यमय व हसते, खेळते ठेवत. बाहेर कितीही मोठी कामे व प्रवास, दौरे असले तरी आपल्या कुटुंबासाठी जो वेळ द्यावयाचा तो अवश्य दिला जाई. ‘Work is Worship’, हेच त्यांचे जीवन ध्येय होते. आम्हा सर्व भावंडांना त्यांच्याकडून आमच्या शालेय अभ्यासक्रमात उत्तेजन मिळे. आमच्या संपूर्ण शैक्षणिक आयुष्यात व पुढील व्यावसायिक जीवनात त्यांनी सदैव मार्गदर्शन दिले आहे. आम्ही सर्व भावंडे आज जे काही आहोत ते आमच्या वडिलांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शन आणि उत्तेजन यामुळेच आहोत. बाबांनी आम्हाला ज्यावेळी जे हवे ते अवश्य दिले. पण कधीही ‘आपलेच म्हणणे खरे व्हावे’, असा हेका धरला नाही. संध्याकाळची जेवणाची वेळ, सर्व कुटुंबीयांसाठी एक मोठा आनंदाचा ठेवा होता. त्यावेळी आम्हा सर्व भावंडांची व्यवस्थित चौकशी होई. ज्या काही सूचना द्यावयाच्या त्याही खूप प्रेमाने अगदी सहजपणे दिल्या जात. खरेच खूप आनंदाचे, समाधानाचे दिवस होते ते!“
“माझ्या वडिलांना मराठी व संस्कृत वांग्ङमयाची खूप आवड होती. त्यांनी खूप वाचन केले होते. कधी फुरसत मिळाल्यास, संस्कृत नाटके अवश्य पहावयास जात. त्यांची आई अगदी बालवयातच निवर्तल्यामुळे, वडिलांनीच(आमच्या आजोबांनी), या भावंडांचा लहानपणी सांभाळ केला. आपल्या पिताश्रीबद्दल त्यांना खूप आदर होता. अगदी अखेरपर्यंत त्यांनी वडिलांना मायेने सेवा दिली आहे.”
श्री त्रिविक्रम काणे (उजवीकडे), व डॉ.सौ. ज्योती(डावीकडे), यांचे समवेत पुत्र श्री ऋषिकेश काणे व स्नुषा सौ पूजा. सौजन्य, श्री. त्रिविक्रम काणे. महागुरूंचे सुपुत्र श्री त्रिविक्रम काणे व सौ.डाॅ. काणे .
शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवन:
श्री त्रिविक्रम काणे लिहितात “डॉक्टरांचे प्राथमिक शिक्षण पुणे व नाशिक येथे झाले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते पदवीधर झाले. त्यानंतर पदव्युत्तर, एम एससी अभ्यासक्रमासाठी ते मुंबईस आले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी M.Sc. ही पदवी घेतली. पुढे Indian Institute Of Science, Bangluru या संस्थेत त्यांना काही काल संशोधन करण्याची संधी मिळाली. येथे भुईमूग व एरंडेल या तेलबियापासून शुद्ध तेल मिळवण्यासाठी व त्याचा औद्योगिक विनियोग करण्यासाठी,त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने काही छोट्या यंत्रांचे आराखडे ,जुळणी व त्यापासून प्रत्यक्षात तेल उत्पादन करून, औद्योगिक वापरासाठी ती कशी उपयोगात आणता येतील यावर खूप महत्त्वपूर्ण संशोधन केले.
1935 साली त्यांनी UDCT मध्ये काम सुरू केले. त्या अनुभवाचे जोरावर 1941 मध्ये त्यांना परदेशी शिक्षणाची संधी मिळाली. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत प्रयाण केले. ‘युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन’, मॅडिसन,अमेरीका या प्रतिष्ठित विद्यापीठातून दोन वर्षात त्यांनी ,”पीएचडी”(Ph D) ही पदवी मिळविली. परदेशातून परत आल्यावर, पुन्हा त्यांनी UDCT मध्ये उपप्राध्यापक म्हणून, Oils, Fats and Waxes (OFW), विभागात काम सुरू केले. थोड्याच अवधीत त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. पुढे याच संस्थेचे डायरेक्टर म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
Oil Technologist Association Of India (OTA) या भारतांतील तंत्रज्ञानाच्या संघटनेचे ते अध्यक्षही होते. आपल्या 45 वर्षाच्या UDCT मधील सेवा कारकिर्दीत त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प राबविले. सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांचे काम चालू होते.अगदी अखेरपर्यंत त्यांच्या आवडत्या UDCT त Emeritus Scientist म्हणून ते कार्यरत राहिले. 1977 साली, आमचे प्रिय बाबा, सर्वांचे जगद्गुरु, आम्हाला सोडून स्वर्गस्थ झाले”.
“डॉ. काणे, ‘भारतातील खाद्यतेल उद्योगाचे भीष्माचार्य’, म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या दीर्घ सेवा कालखंडात, आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या कामाखेरीज, अनेक पदव्युत्तर व डॉक्टरेटच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्ररीत्या विचार करावा, केवळ पैशाच्या मागे न लागता देशाला आवश्यक असेच संशोधन प्रकल्प हाती घेऊन, आपला देश, खाद्य तेलेच नव्हे, इतरही बाबतीत आत्मनिर्भर कसा होईल हा विचार सतत मनात ठेवावा, हीच त्यांची आपल्या विद्यार्थ्यांना तळमळीची शिकवण होती. त्यांचे अनेक विद्यार्थी पुढे भारतात व परदेशात, अनेक उद्योग-धंद्यात उच्चपदस्थ झाले. जवळजवळ 100 पेक्षा जास्त शास्त्रीय लेख त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध केले. “Soaps” हे त्यांनी लिहीलेले पुस्तक, भारतातील या विषयावरील पहिले पुस्तक आहे. साबण या विषयाचे रसायनशास्त्र, तंत्रज्ञान विषयाची सर्व सखोल शास्त्रीय माहिती यात दिलेली आहे. आजही हे पुस्तक एक संदर्भग्रंथ म्हणून वापरले जाते. इंग्रजी व मराठी विषयांतील अनेक तांत्रिक विषयातील ज्ञानकोशाकरिता त्यांनी खूपच माहिती संकलित केली आहे”.
थोडक्यात माझे वडील डॉ.काणे म्हणजे एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांचे अफाट कार्यकर्तृत्व, एक सहृदय पिता, विद्यार्थीप्रिय शिक्षक व सर्वात महत्वाचे म्हणजे, एक चांगला माणूस म्हणून शब्दबद्ध करणे मला शक्य नाही. माझ्या परीने हा मी प्रयत्न केला आहे. आम्हा भावंडांना अशा कर्तृत्ववान पित्याचे छत्र मिळाले हे आमचे सौभाग्य! “
श्री. त्रिविक्रम काणे यानी दिलेली माहिती व फोटो, माझ्यासाठी खूपच अलभ्य व दुर्मिळ आहेत. अजूनपर्यंत कोणाला माहित नसलेली डॉक्टरांची खास माहिती व क्षणचित्रे मला मिळाली. तीच मी लेखात जोडली आहेत. डाॅक्टर एक पुत्र, पिता, भाऊ, पती, कुटुंब घटक, म्हणूनही किती आदर्श होते व म्हणूनच ” एकमाणूस”, म्हणूनही किती महान होते याचे दर्शन मला झाले. हा लेख वाचून माझ्यासारख्या त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनाही ते कळेल. . श्री.त्रिविक्रम यांचेशी मी अजून केवळ फोनवर बोललो आहे. त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता, जणू खूप वर्षांची ओळख आहे एवढ्या सहजतेने माझ्याशी संभाषण केले. मला ही माहिती दिली. ते डॉक्टर काणे यांचे सुपुत्र शोभतात. पिताश्रींची, ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ ही परंपरा ते पुढे चालवित आहेत हे निश्चित!!
1971 साली ICT चे डायरेक्टर म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर,महागुरू स्वस्थ नव्हते. भारत सरकार व अनेक संशोधन संस्थांना,त्यानंतरही मार्गदर्शन चालूच होते. मोठे उद्योजकही त्यांचे सल्ले घेण्यास येत. डॉक्टरांना कुणाकडून पैशाची काही अपेक्षा नसे. त्यांना या सल्ला-मदतीसाठी लाखो रुपये मिळविणे सहज शक्य होते. मात्र हे त्यांचे कधीच ध्येय नव्हते. मागे श्री. वागळेसरांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांचे ICT मधील काही सहकारी, याबाबतीत त्यांना हसत असत. डॉक्टर काणे यांनी अशी कामे विनामूल्य, अथवा अल्पमूल्य घेऊन करू नये, ही त्यांची भावना असावी. डॉक्टरांना इतरांशी काही देणे घेणे नव्हते. आपली तत्वे , मूल्ये व राष्ट्राप्रती कर्तव्य, या बुद्धीने भारलेल्या ,त्यांची वाटचाल “एकला चलो रे”..अशीच होती !
असा हा महान शास्त्रज्ञ आमच्यासाठी महागुरु, 1977 साली, एका संध्याकाळी, आपल्या वांद्रे येथील सहनिवासातील घरी, टीव्ही बघत असताना, अचानक हृदयक्रिया बंद पडून, जगाचा निरोप घेता झाला. जगणे जसे अलौकिक तसे निर्वाण ही सहज. जगभरातील अनेक विद्यार्थी, संस्था औद्योगिक आस्थापने, सरकारी प्रतिनिधी उद्योजक यांनी मनापासून त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. त्यांच्या स्मरणार्थ “डॉक्टर काणे मेमोरियल ट्रस्ट”, नावाची एक संस्था स्थापन केली गेली . देशातील संशोधकांना, तंत्रज्ञांना संशोधनकामासाठी त्यांतून आर्थिक मदत केली जाते.
डॉक्टर काणे गेले. सर्व विद्यार्थ्यासाठी केवळ ज्ञानदान नव्हे तर आपल्या स्वआचरणाने महान संस्कारांचे आदर्श सर्वांपुढे ठेवून, आपल्या युडीसीटीला,भारत देशाला, उपकृत करून गेले. संशोधनकामात आपल्या विद्यार्थ्याला आर्थिक विवंचना असता कामा नये, म्हणून जे शक्य होईल ते करणारे, प्रयोग शाळेतील फरशी बर्फाच्या पाण्याने भिजली तर स्वतःच्या हाताने पुसून, त्याचा काहीही अभिनिवेश न बाळगणारे ,लाख मोलाचे सल्ले गरजू उद्योजकांना देऊन त्याबद्दल कवडी मोलाचीही अपेक्षा न करणारे ,सेमिनार सभेत भाषण चालू असतांना, आपल्या ज्येष्ठ भगिनीच्या निधनाची वार्ता समजूनही, भाषण पूर्ण संपवूनच सभा सोडणारे, कॉलेजात येताना संपूर्ण पाश्चिमात्य पोशाख, मात्र कॉलेजच्या फाटकाबाहेर पडल्यानंतर, पारंपारिक भारतीय पोशाखात वावरतांना जराही संकोच न बाळगणारे. .. एक ना दोन ‘एक वेगळा माणूस’, म्हणून किती गोष्टी सांगाव्यात? त्यांचे दोन शिष्योत्तम व सुपुत्र, यांनी सांगितल्याप्रमाणे, महागुरु ‘स्थितप्रज्ञ’ होते. अशी स्थितप्रज्ञता केवळ योगी जनांनाच प्राप्त होते. मी त्याचे वर्णन काय करू? विनोबाजींच्या समर्पक शब्दातच ते सांगता येईल ….
“सर्वत्र जो अनासक्त, बरे-वाईट लाभता.
न उल्हासे न संतापे,त्याची प्रज्ञा स्थिरावली.
नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे .
नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी.”
काणे सर, शांत, संयमी, निर्विकार भासत असले तरी त्यांच्या अंतरंगात ,’एक खोडकर लहान मुल’, दडलेले आहे असे कधी कधी वाटत असे. त्यांचे चिरंजीव, त्रिविक्रम यांनीही याचा उल्लेख वर केला आहे. वर्गात शिकवताना, कधी एखादा नर्मविनोद करून, ते या आपल्या निरागस बालवृत्तीची प्रचिती आणून देत. त्यांनी असेच एकदा माझी ‘टोपी उडवून’ गंमत केली. आजही त्या प्रसंगाची मला चांगली आठवण आहे.
ESSO या अमेरिकन कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर(1970 साल), मला झालेला आनंद, UDCT मधील मित्रांशी वाटून घेण्यासाठी मी माझे नेमणूकपत्र (Appointment Letter), घेऊन त्यांना भेटण्यासाठी कॉलेजांत आलो. त्यावेळी माझ्या सहकाऱ्यांना, अगदी खूप चांगल्या कंपनीत सुमारे सातशे ते आठशे रुपये, एवढाच महिनापगार मिळत असे. माझा चार आकडी पगार पाहून, मंडळी अचंबित झाली व मला सरळ, डाॅ.काणे यांच्या केबिनमध्ये घेऊन गेली. त्यावेळी ते डायरेक्टर होते. सरांनी माझे नेमणूक पत्र वाचून, माझ्याकडे एक मिश्किल नजर टाकली. डॉक्टरांनी माझे कौतुक करावे या अपेक्षेपेक्षा, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या पगाराची शिफारस करताना, हात थोडा सैल ठेवावा ही अपेक्षा होती.. झाले उलटेच! डॉक्टरांनी माझ्याकडे बघून मला सांगितले,”अरे एवढा पगार द्यायला एस्सो मॅनेजमेंटला वेड लागले की काय? तुझ्या एस्सो कंपनीचा जनरल मॅनेजर, डॉ.जमशेट कामा माझाच विद्यार्थी आहे. मी त्याला फोन करून, पगार थोडा कमी करावयास सांगतो…,” नेहमीचे स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवीत, पत्र माझ्या हाती देऊन, डॉक्टरांनी आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या. मित्रांचीही बोलती बंद झाली. माझी तर पाचांवर धारण बसली. आता काय होणार कळत नव्हते??.
त्यानंतर थोड्याच दिवसात मला जनरल मॅनेजर कामा साहेबांच्या ऑफिसमधून बोलावणे आले. मला दरदरून घाम सुटला. बहुतेक नोकरीच जाणार असेच वाटले. त्यावेळी एस्सोच्या जनरल मॅनेजरना, भेटणे तर सोडा, ऑफिसच्या व्हरांड्यात त्यांचे दर्शन घेणे केवळ अशक्य असे.” जनरल मॅनेजर कडून बोलावणे म्हणजे हाती, नोकरी संपल्याचे, “सन्मानपत्र”, देऊन बाय-बाय करणे हाच त्याचा अर्थ असे! “याची नोकरी आता गेली”. ,असाच माझ्या इतर सहकाऱ्यांचाही योग्य समज झाला. मी घाबरतच कामा साहेबांचे, भव्य-दिव्य केबिन मध्ये जाऊन उभा राहिलो. साहेबांनी मला बसण्यास सांगितले. संभाषण इंग्रजीतून झाले. त्यांनी माझी काही प्राथमिक, जुजबी चौकशी केली. कंपनीत कोणत्या विभागात काम करतो हे जाणून घेतले. डॉ. काणे यांचा आपल्याला फोन आला होता हे सांगितले. माझी धडधड आणखीन वाढली…कामा सरांचा प्रत्येक शब्द मी कानात प्राण आणून ऐकत होतो. पुढे शांत धीरगंभीर होत म्हणाले, “तुला येथे खूप मेहनत घ्यावी लागेल. आम्ही निवडलेल्या प्रत्येक माणसाला चांगला पगार देतो, कारण त्याचे सर्व लक्ष आपल्या कामाकडे असावे. व्यवस्थित काम कर. डॉक्टरांनी मला फोन करून तुझी प्रशंसा केली आहे. तुझ्या कामावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. काही अडचण आल्यास सरळ माझ्या केबिनमध्ये येऊ शकतोस, All the best to you”
मी केबिन बाहेर आलो. ..डोळ्यात आनंदाश्रू आले… “आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन..”,अशीच अवस्था त्यावेळी झाली.”राऊतपासून जपून राहा तो, जनरल मॅनेजरचा माणूस..”, अशी माझी विनाकारण ”दुष्किर्ती” कंपनीत झाली. मात्र एस्सो कंपनीत माझे पुढील काम खूप सुकर झाले. मला डॉ.कामांना परत भेटण्याची पाळी कधीही आली नाही. आज त्या प्रसंगाची आठवण झाली म्हणजे, डाॅ.कामांचा तेजस्वी, गोल व गौर चेहरा डोळ्यासमोर येतो. माझ्या डोळ्यातील अश्रूच सर्व काही बोलतात. डॉ. काणे यांच्यावर असलेली माझी भक्ती दृढ झाली… अगदी आजपर्यंत ती तशीच आहे..
ESSO मध्ये कामं मिळण्याआधी मी विक्रोळी येथील गोदरेज केमिकल्स व युडीसिटी समोरील प्रसिद्ध,V J T I कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून ही प्रत्येकी दोन दोन वर्षे अनुभव घेतला. काही वर्गमित्रांनी प्रोत्साहन दिल्यामुळे अमेरिकेतील कांही विद्यापीठात प्रवेश मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळी GRE,GMAT,SAT,TOEFL अशा परीक्षा देण्याची गरज नव्हती तुमच्या मार्गदर्शक गाईड अथवा प्रोफेसरांनी दिलेले शिफारस पत्र महत्त्वाचे असे.त्यावेळी सुद्धा डॉ.काणे सरांनी दिलेल्या शिफारस पत्रामुळे अमेरिकेतील 1,2 विद्यापीठात प्रवेशही मिळाला. मोठ्या आनंदाने ,जेव्हा ही बातमी मी आप्पांना सांगण्यास गेलो, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यातील भाव व डोळ्यातील अश्रू मला सर्व काही सांगून गेले. पुढील सर्व प्रक्रिया तेथेच थांबली. वास्तविक त्या काळात मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठविणे वडिलांना खूपच अभिमानाची व आनंदाची बाब असायला हवी होती. पण आर्थिक, शारीरिक कौटुंबिक परिस्थिती मुळे आप्पा धर्मसंकटात होते. मी त्यांची परीक्षा पाहिली नाही. त्यानंतर ही मी कधीच, शिक्षणासाठी वा नोकरीसाठी, परदेशी जाण्याची संधी आली असून सुद्धा त्याचा विचार केला नाही. त्यावेळी असा निर्णय घेणे मला खूप नाउमेद करून गेले.मात्र आज आयुष्याच्या या वळणावर मी जेव्हा त्या घटनेचा विचार करतो माझा निर्णय योग्य होता असेच सुदैवाने वाटते .!! अशी महान संधी, माझ्या आयुष्यात आली त्याला ही माझे महागुरु कारणीभूत होते ,म्हणून हि आठवण.
डॉ. काणे, आमचे महागुरू, यांच्या जीवनावरील ही माझी टिप्पणी संपली. असे अफाट, महान, कर्तृत्ववान ,व्यक्तिमत्व शब्दात पकडणे कठीण. त्यातून माझ्यासारख्याकडून ते शब्दरूप करणे तर महाकठीण. माझ्या दृष्टीतून, मी पाहिलेले, अनुभवलेले, माझे महागुरू, यावर मी काही आठवणी सांगितल्या. वागळे सर, डॉक्टर भट या त्यांच्या दोन शिष्योत्तमांनी, सरांचे संशोधनातील कर्तृत्व एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे योगदान, आपला देश आत्मनिर्भर व्हावा म्हणून त्यांना लागलेला ध्यास, याचे समर्पक टिपण करून दिले. सुपुत्र श्री. त्रिविक्रम यांनी आपल्या पिताजीबद्दल काही घरगुती, वैयक्तिक ,आठवणी सांगून , माझ्या प्रयत्नाला कौटुंबिक स्नेहाची झालर लावली. मला वाटते माझ्या प्रयत्नाचे सार्थक झाले. ‘माझ्या देशाची आत्मनिर्भरता’, या एका जिद्दीने आपले सर्व संशोधन व अखंड प्रयत्न करीत, ज्यांनी आयुष्य सार्थकी लावले, त्या आमच्या महागुरू डाॅ.काणे यांना, त्यांच्याच तोलामोलाच्या डॉ. वर्गीस कुरियन यांनी वाहिलेली, या लेखाचे सुरुवातीस दिलेली, श्रद्धांजली किती समर्पक व उचित आहे,हे माझ्या या लेखातून कळले तरी माझा प्रयत्न अंशतः तरी सफल झाला असे मी समजेन. डॉ. काणे यांच्यासारखी उत्तुंग व्यक्तिमत्वे शब्दात पकडण्याचा प्रयत्न म्हणजे, “शब्द बापुडे केवळ वारा…”.अशी स्थिती होते.
… तरीही हे लिहिण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच, की, आज राष्ट्रभक्ती नावाची चीज दुर्मीळ होत असताना, देशाच्या ज्या सुपुत्रांनी सद्यकाळात आपल्या हयातीत,राष्ट्रप्रेमाचे ज्वलंत उदाहरण स्वकर्माने इतरांवर समोर ठेवले, त्यांचे विस्मरण आम्हाला होऊ नये.
खरे तर राष्ट्रभक्ती ही आम्हा भारतवासीयांमध्ये ऊपजतच आहे! मग तो सामान्य नागरिक असो, या देशाचा सर्वोच उद्योगपती रतन टाटा असो , हरीश साळवे सरांसारखा मोठ्ठा आतंरराष्ट्रीय वकील असो, आचार्य भिसे चित्रे यासारखे गुरुवर्य असोत, डॉ. कुरियन ,डॉ.जगन्नाथ गो. काणे यांचे सारखे शास्त्रज्ञ असोत, जेव्हा जेव्हा राष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा विषय येतो तेव्हा तेव्हा, पैसा, मान, इज्जत, कुटुंब, व्यवसाय याहीपेक्षा “राष्ट्र प्रथम”, ही भावना उचंबळून आलेली दिसेल. कारण, ते या भूमीचे, पिढ्यांपिढयांचे संस्कार आहेत. हे संस्कार सर्वांना, ‘राष्ट्रासाठी जगा’,असा संदेश देतात. आणि म्हणूनच, हा देश आजही इतक्या वर्षांनंतरसुदधा संपूर्ण जगात पाय भक्कम रोवून उभा आहे. मानाचा मुजरा त्या सर्वांना! त्यांच्या कार्याची नोंद आपल्या परीने घेऊन ठेवणे हे आपले कर्तव्य. तेच मी येथे केले. किती यशस्वी झाले आहे, वाचकांनी ठरवावे. .
गुरु वागळे सर व ‘महागुरु काणे’ सरांसारखी व्यक्तिमत्वे जोपर्यंत या भारतात आहेत, ज्यांनी आपल्या व्यवसायाचा बाजार मांडलेला नाही, तोपर्यंत हा देश अखंड अबाधित राहील…ठरवूनसुदधा, आमच्या भारताचे कुणी वाईट करू शकणार नाही !
मी स्वतःला खूप कर्त्वृवान, हुषार कधीच समजलो नाही. माझी कुवत मला नेहमीच माहीत होती, आहे.मात्र मी स्वतःला खूप खूप भाग्यवान जरुर समजत आलो. शाळेत आचार्य भिसे, चित्रे पुढे सातारा महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील, प्रा.एस ए पाटील, इस्माईल युसुफ कॉलेजात डॉक्टर पोद्दार, कविवर्य पु. शी. रेगे, विनोदी लेखक व आमचे होस्टेलचे प्राध्यापक वि. मा. दी. पटवर्धन, युडीसीटीत डॉ. काणे, वागळेसर, गुप्ते सर,पुढे उद्योग व्यवसायात भेटलेले डॉ. बी. पी. गोदरेज, डाॅ कामा, लोटलीकर साहेब, अशा माणसांनी मला आशीर्वाद दिले व ‘आपला’ म्हटले’, म्हणूनच ही वाटचाल आजपर्यंत तरी सुखनैव व आनंदाने चालू आहे.
ज्ञानोबांची एक ओवी मला सतत स्मरणात असते.
“कल्पतरूच्या फांद्यां लाऊन केलेल्या मांडवात राहणाऱ्या,कामधेनुच्या वासराचे, मनोरथ सिद्धीस जाणारच, यांत नवल ते काय?”
किरीटी कामधेनुचा पाडा,
वरी कल्पतरूचा आहे मांदोडा,
म्हणुनी मनोरथ सिद्धीचीया चाडा ,
तो नवल नोहे.
??? माझे महागुरु, गुरू व सर्व वरदवंतांना मनापासून त्रिवार वंदन???
हा लेख प्रसिद्ध होत असताना, या लेखासाठी मला आवर्जून, स्वतःची व महागुरु डॉ. काणे यांची माहिती त्वरित पाठविणाऱ्या डॉ.भट यांचे निधनाचे वृत्त आले आहे – Dec 11, 2021. दुःख झाले. हे लिखाण त्यांनी वाचावे व शाबासकीची थाप पाठीवर ठेवावी अशी अपेक्षा होती. ते आता होणे नाही. डॉक्टर भट यांना हा लेख कधीच वाचता आला नाही, हे शल्य मनात सतत राहील. डॉक्टर भट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
प्रस्तुत लेखात अनेक व्यक्तींचे उल्लेख व त्यांच्या असीम कार्याचा थोडक्यात लेखाजोगा आल्याने, विस्मरणाचे ओघात काही चुकीची वा अपूर्ण माहिती संभवू शकते, त्याबद्दल क्षमस्व.
D W Raut, B.Sc(Hon),B,Sc.(Tech),M.Sc.(Tech)
Ex. Dy.General Manager (International Marketing), Hindustan Petroleum Corporation Ltd.
माननीय बंधू आपले लिखाण खूपच सखोल व अभ्यासपूर्वक आहे.आपण प्रत्येक गोष्ट त्या स्थळांना भेटी देऊन केलेले आहे. आपला आम्हाला खूप अभिमान वाटतो. आपले खूप सुंदर पुस्तक व्हावे असे मनापासून वाटते. . धन्यवाद.
उत्तुंग व्यक्तिमत्व! त्या महान व्यक्ती च्या व्यक्तिमत्वाचा सर्वंकष वेध घेऊन विविध कांगोरे प्रभावी मांडले आहेत.
अशा अनेक अलौकिक परंतु अनाम व्यक्तीबद्दल मेहनतीने माहिती मिळवून ती संकलित करून आपल्या ओघावत्या शैलीत जगा समोर आणल्या बद्दल धन्यवाद.
Good afternoon sir, the part II is equally engrossing like I.
Thanks for such detailed and beautifully written article/ life story . Let’s plan a edited English version. I will get preface from Pro Vice Chancellor who is incidentally Oil Technologist and close friend of mine. Also we will get remarks from current VC of ICT.
निव्वळ अप्रतिम शब्दालंकार वापरता आपण.. आपली शब्दसंपदा पाहता आपण एक तरी कथा अथवा गद्य तालिका प्रकाशित व्हायला हवी.. हिच मन:पूर्वक सदिच्छा ?
आपले लेख नेहमीच वाचनीय असतात. वाचताना सर्व घटना डोळ्यासमोर उभ्या रहातात. अतिशय सुरेख लेख आहे. आपल्या सर्व लेखांचे संकलन करून त्याचे पुस्तक प्रकाशित केल्यास फार आनंद होईल
.
Khupach chhan. Greatly appreciate your dedication, deep research and the writing style like a seasoned author. Keep it up and all the best ??
डॉ काणे, डॉ वागळे, या रत्नांचा बंधू नी घेतलेला वेध मनाला आनंद देतो.या उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख करून देणे ही अवघड बाब बंधूंनी कसदार लेखन करून दाखवली आहे.त्या व्यक्तींनी जपलेली देशप्रेमाची भावना, आयात होणाऱ्या खाद्य तेलाची बचत करण्यासाठी केलेले संशोधन, परदेशी उच्च पदवी घेवूनही पुन्हा मायदेशी स्वदेश सेवा करण्यासाठी येणे, हे वाचून मन भरून येते, डोळे पाणावतात. फक्त बंधू नव्हे तर इतर सहकारी सुद्धा डॉ काणे विषयी बोलताना तीच भावना जपतात हे वाचून आश्चर्य, आनंद वाटतो.
बंधूंनी कसदार लेखन करून त्यांना आदरांजली वाहिली आहे, म्हणूनच त्यांची नावे, ओळख आपल्याला झाली आहे, बंधूंना त्या बद्दल धन्यवाद द्यायला हवेत.
महान व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी उत्कृष्ट तपशीलांसह खूप छान लेख!
सर, इतके उत्तमोत्तम लेख लिहिल्यानंतर तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनकला, सुसंबद्ध, मुद्देसूद, अभ्यासपूर्ण वैचारिक लेखाबद्दल बोलायची आवश्यकता नाही आणि तशी माझी योग्यताही नाही.
” महागुरू / गुरु ” ह्या दोनही लेखानंतर मला जे उमजले ते म्हणजे ह्यांचे कार्य हे “खऱ्या ” स्वातंत्र्यसैनिकांपेक्षा कमी नाही. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील जडण घडणीचे हे दुर्लक्षित अंग आहे. कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीपासून दूर रहात, आपली संस्कृती टिकवीत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना सर्वांच्या सर्वोत्तम प्रगतीचे ध्येय हे नक्कीच अभिमानाचे आहे. तसेच हे करताना आयात खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट वाखाणण्यासारखे आहे. आताच्या काळात असे निस्वार्थी गुरू होणे हे दुर्मिळ. असे गुरु होणे आणि तुमच्या सारखे ध्येयवादी विद्यार्थी मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. अशा गुरुशिष्याना त्रिवार वंदन.
काका, ह्या सर्व महान व्यक्तींच्या महान कार्याची माहिती तुमच्या उत्कृष्ट लिखाणातून आम्हाला मिळते आहे. त्याकरिता तुमचे शतशः आभार ?
श्री दिगंबर राऊत यांनी आपले गुरू माननीय डॉक्टर काणे यांच्यावर लिहिलेला लेख वाचला. वाचून पूर्ण झाल्यावर मी स्तब्ध झालो. श्री राऊत यांनी आपल्या महा गुरूंचे चरित्र वर्णन ज्या प्रकारे लिहिले आहे ते वाचून असे म्हणावेसे वाटते की किती थोर ज्ञानी युगपुरुष होते श्री काणे सर. ते गुरू म्हणून श्रेष्ठ होतेच पण एक माणूस म्हणून त्यापेक्षाही श्रेष्ठ होते. असे गुरू मिळायला खरंच फार मोठे नशीब लागते जे श्री दिगंबर राऊत यांना प्राप्त झाले.
महा गुरू डॉक्टर काणे यांनी आपल्या विध्यार्थी प्रति घेतलेले परिश्रम, त्यांची शिकवण्याची पद्धत खरोखरच अतुलनीय. जमिनीवर पसरलेले बर्फाचे पाणी स्वतः पुसून साफ करणे म्हणा किंवा श्री राऊत यांनी esso कंपनीचे आपले नेमणूक पत्र त्यांना दाखविल्यावर त्यांनी केलेला विनोद म्हणा, वाचकाला त्यांच्या वेगवेगळ्या गुणांचे आणि स्वभाव वैशिष्ठयाचे दर्शन घडते.
श्री राऊत यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या गुरूंचे वर्णन करताना योग्य ठिकाणी योग्य सुभाषिते ती सुद्धा काही ठिकाणी संस्कृत मध्ये देऊन आपल्या लेखनाची उंची गुरूंना शोभेल एवढी वाढवली आहे.
डॉक्टर काणे सरांनी आपला भारत देश खाद्य तेल निर्मिती मध्ये आत्म निर्भर होण्यासाठी घेतलेले परिश्रम, वेगवेगळ्या विषयात केलेले संशोधन, आपल्या मार्गदर्शनाखाली घडवलेले Ph.D विद्यार्थी ज्यांनी त्यांच्यानंतर देशासाठी खूप मोठे योगदान दिले हे वाचल्यावर डॉक्टर काणे सर केवढे मोठे देशभक्त होते याचे वाचकाला दर्शन होते. त्यांचे आपल्या कुटुंबीयां प्रति असलेले प्रेम, कॉलेज व्यतिरिक्त एकदम साधा पोशाख आणि राहणीमान त्यांची कुटुंब वस्तलता आणि साधेपणा दर्शविते. श्री राऊत यांनी सरांच्या मुलाचे आणि त्यांच्या काही विद्यार्थ्यांचे दिलेले मनोगत लेखनाची उंची आणखी वाढवतात.
लेख पूर्ण वाचल्यानंतर मी बराच वेळ स्तब्ध झालो. डॉक्टर काणे सर महागुरू होते या बद्धल दुमतच नाही. पण त्यांचे शिष्य श्री दिगंबर राऊत हे सुद्धा त्यांच्या तोडीस तोड महाशिष्य आहेत हे निश्चितच.
राऊत साहेब तुम्ही एका अतिशय महान देशभक्तिय महागुरूंचे दर्शन माझ्या सारख्या वाचकाला करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पून्हा एकदां अभिनंदन.??????
बंधू ,तुम्ही म्हटल्याप्रमाणेच फुलाच्या संगतीत राहून मातीला देखील सुगंध येतो. लहान पणापासून सुसंस्कारांचे खतपाणी मिळाल्यामुळे सकस झालेल्या जमिनीला डॉ.माशेलकरांसारखे शास्त्रज्ञ झालेले वर्गमित्र, डॉ. काणेंसारखे गुरुजन आणि अनेक नामवंत सहकाऱ्यांसोबत बरीच वर्षे घालवल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आमुलाग्र बदल घडणे साहजिकच आहे, आणि त्याचा प्रत्यय आम्हाला वेळोवेळी येतोच.
Namaskaar Dr. Raut.
Nice to hear from you.
My cousin in Matunga, Usha Tai (Dr. Kane’s eldest daughter) had forwarded both your articles (part 1 and 2) to me a few weeks ago. I really enjoyed reading them – both about my Mama and also your memories of UDCT days.
I did MSc with Professor Tamhane in Foods & Fermentation Technology department from 1977- 1979.
So I too have a personal connection with UDCT.
काही अपरिहार्य कारणांमुळे वेळे वर प्रतिसाद देता आला नाही. क्षमस्व. खरं म्हणजे UDCT वरील तुमचा लेख हा माझा देखील जिव्हाळ्याचा विषय. मी जून 1969 मध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होवून B.Sc.( टेक) Textile प्रवेश घेतला होता.
माझ्या अमृत महोत्सवी वर्षांत माझ्या मित्राने वृत्त पत्रात/दिवाळी अंकात लिहिलेला लेख आपण वाचला असेलच. त्या मध्ये नमूद केलेल्या एका प्रसंगात माझा, वडिलांच्या कापड गिरणीतिल साहेबांनी केलेल्या अपमान मला गिरणीत
Weaving Master होण्याचे
स्वप्नं देवून गेले होते.
दुर्दैवाने काही अपरिहार्य कारणांमुळे वडिलांना नोकरी सोडून घरी बसावे लागले. मी घरात जेष्ठ, लहान भाऊ- बहीण शाळेत. समोर सर्व कुटुंबाची जबाबदारी आणि कर्तव्य, नोकरी करण्या शिवाय पर्याय नव्हता.आमचा UDCT चा सहवास फक्त सहा महिन्याचा. जानेवारी 1970 मध्ये Asian Paints मध्ये Jr.Chemist म्हणुन नोकरीवर रुजू झालो.
तुमचा वरील ‘ गुरू आणि महागुरु ‘ हा लेख वाचून माझी मनस्थिती काय झाली असेल याची तुम्हाला कल्पना आली असणार. Post Graduation करता न आल्यामुळे झालेल्या जखमेवरची खपली उघडी पडली. इतकी वर्ष मनातले शल्य प्रकर्षाने जाणवले. डॉ. जगन्नाथ काणे यांची शिकवण आणि सहवास आम्हाला देखील लाभला. परंतु तुमच्या मानाने अत्यल्प. तुम्हाला UDCT मधील अनेक गुरू महागुरु प्राध्यापक यांच्या सहवासाने तुमचे जिवन प्रकाशमय आणि परिपूर्ण झाले. तुमच्या बद्धल आदर द्विगुणित झाला. ????