संस्मरणे

बालपण उमरोळीत!

उमरोळीचा आप्पांचा कालखंड देखील मजेत गेला – सुमारे, दहा वर्षे ते तेथील मराठी शाळेत शिक्षक होते.  त्यावेळचे त्यांचे काही शिक्षक सहकारी म्हणजे खरे हेडमास्तर, शृंगारपुरे, घागरे, नाईक ई., त्या सर्वांचा एक ग्रुप फोटो अनेक वर्षे आमच्या बोर्डीच्या जुन्या, कारवीच्या  घरात होता. पुढे दुरुस्तीच्या कामात तो कोठे हरवला. 

तेथील श्री. नाना पाटील यांचे प्रशस्त घर  त्यांनी आम्हास राहावयास दिले होते – खाली प्रशस्त जागा व वरती माळा  ज्याचा सामान वैगरे ठेवण्यासाठी वापर होई. माझ्या जन्मापासून सहावर्षे मी व चार वर्षे अण्णा याच घरात उमरोळी गावात वाढलो. ‘मास्तर ची  मूले’ म्हणून त्या गावात सर्वांकडून खूप कौतुक मिळाले विशेषतः घर मालक आजोबा (ते त्यावेळी साठी उलटून गेले होते) त्यांचे व त्यांच्या सौभाग्यवती तसेच त्यांची मुले, मुली ई., खूप मोठा गोतावळा होता. सर्वानी खूप लाड केलेले आठवतात. 

सर्वात जुनी आठवण म्हणजे साधारणपणे ३-४ वर्षे वय असतानाची आहे. नाईक गुरुजी व घागरे घरी येत व मला  खिडकीच्या गजामधून (गजामधील फटी थोड्या मोठ्या होत्या) अलीकडे- पलीकडे देऊन झेलत असत. त्यांच्या हातात असलेला मी असे झोके मिळत असताना खूप आनंदीत असे, म्हणूनच ही आठवण कदाचित स्मरणात राहून गेली. 

अधून मधून बोर्डीला ही जात असू कारण ‘अपवाद‘ म्हणजे माझी आज्जी -आप्पाची आई, बोर्डीच्या घरी राहत असे व तिला भेटावयास आप्पा नेहमीच बोर्डीस येत. असेच एकदा मी २-३ वर्षांचा असताना आले होते व मी तापाच्या साथीत सापडून आजारी झालो. ताप निघेना – डॉ.पाठक यांचे उपचार होते. परंतु त्यावेळी anti-biotics  तेवढी उपलब्ध नसल्याने साधा ताप ही जीवघेणा ठरत असे. खूप दिवसांनी ताप निघेना, अन्न एकदम कमी त्यामुळे खूपच अशक्तपणा आला होता. डॉक्टर पाठकानी एके रात्री, कोणते तरी ‘रामबाण’ इंजेकशन, शेवटचा उपाय म्हणून दिले व आई आप्पांना “उद्या सकाळ पर्यंत ताप निघाला तर मुलगा तुमचा –”असे निर्वाणीचे सांगितले, सुदैवाने तो ज्वर दुसरे दिवशी निघाला. मला ‘जीवदान’ मिळाले, म्हणूनच तर हे लिहण्यासाठी बसू शकलो. पुढील ‘गंगाजी’ जत्रेत आईने  नवस फेडला. ही आठवण तिच्या कडूनच ऐकली आहे. 

पाटलांचे घर  तर ‘वाडा ‘ होता. स्वतः आजोबा त्यांची सौ., मोठे चिरंजीव नाना (तेच सर्वकारभार व शेती बघत) त्यांची पत्नी, मुले- दिनू,कमल, सुधाकर, हरू, फणींद्र तसेच भाऊ आत्माराम व त्याची पत्नी दुर्गा आणि विधवा मुलगी भागू, असा मोठा परिवार होता. सर्वच नावे आता आठवत नाहीत. परंतु एवढे नक्की आठवते कि आमच्या घरा पेक्षा या वाड्यातच आम्ही जास्त हुंदडत असू कारण त्यांचे सुधाकर-हरु मुले आमची समवयस्क होती. 

सुधा -हरु बरोबरच समोरच्या घरातील किसना व त्या पलीकडील झोपडीच्या घरातील ठकू ही बालमैत्रीण असा सगळा संच असे. एकमेकांचे शर्ट मागून पकडून “गाडी गाडी” खेळत धावणे, शेतातल्या बिळात काड्या खुपसून खेकडे, गांडूळ शोधणे असे काही बेरकी खेळ ही असत.

साधारणतः, मी चार वर्षे, अण्णा दोन वर्षे असताना अप्पानी आम्हाला पहिले खेळणे आणून दिले, तो दिवस आजही आठवणीत कोरला आहे. त्या दोन छोट्या मोटारी (खेळण्यातील) होत्या. हातानेच ढकलून पळवता येणाऱ्या . एक जांभळ्या- निळ्या रंगाची तर दुसरी  हिरव्या रंगाची आजही डोळ्यासमोर त्या येतात. मला जांभळी गाडी हवी होती पण ती अण्णाने घेतली व मला “हिरवी गाडी” दिली. आईकडे हट्ट केला पण काही उपयोग झाला नाही. अण्णा झोपलेला असताना मी ती गाडी घेई व हळुवारपणे तिच्याकडे पाहत राही. बालसुलभ अशा हेव्या दाव्याचे ते दिवस! माञ  माझी जांभळ्या रंगाच्या गाडीची हौस एवढी खदखदत होती कि १९८१ साली मी घेतलेल्या जुन्या ‘एंबेसडर’’ गाडीला जांभळा रंग लावून ती जुनी आकांशा पूर्ण केली. 

उमरोळीला  त्यावेळी असणारी या आम्हावर प्रेम करणारी आणखी काही माणसे होती. एक सोमाकाका व दुसरे भैया डॉक्टर. सोमाकाका आप्पाची शाळेतील विद्यार्थी, मात्र वयाने अप्पांपेक्षा ५-६ वर्षांनी लहान असावा. त्याचे आमचे ऋणानुबंध अजूनही आहेत. आम्ही बोर्डीस गेल्यावर नियमित आप्पांना भेटावयास येणारा व येताना ताडगोळे आंबे घेऊन येणारा सोमाकाका आमच्या घरच्या प्रतेक  कार्यात त्यांनी व कुटुंबीयांनी भाग घेताना. गेल्या वर्षीच वयाच्या शंभरीत सोमाकाका हे जग सोडून गेला !

भैया डॉक्टर हे आमचे उमरोळीचे फॅमिली डॉक्टर. उत्तरप्रदेश मधील हा भैया, थोडेसे आयुर्वेदाचे जुजबी ज्ञान असलेले व पालघर-उमरोळीत त्यावेळी स्वस्तात मिळणारी जमीन घेऊन शेती करणारा जिंदादिल माणूस! त्यांच्या मोठ्या ‘गलमिश्या  व उंच, गोरा बांधा डोळ्यासमोर आहे. उमरोळीतील एका विधवेशी त्यांनी पुढे लग्न केले व तिची मुले त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळली. विशेषतः आंब्याच्या दिवसात, पालघर स्टेशनजवळ असलेल्या त्याच्या आमराईत जाऊन ताटात धुवून ठेवलेले आंबे चोखून खाल्याच्या काही आठवणी आहेत. त्यांची मुलगी लीलाताई (आज ऐशी च्या घरात ) काही वर्षांपूर्वी ओळख काढत घोलवडला  येऊन गेली. 

दोनवर्षापूर्वी उमरोळीस आम्ही सर्वेजण ‘वामनताई ट्रस्ट” च्या शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमासाठी  प्रार्थमिक शाळा व हाय स्कुलात गेलो होतो. त्यावेळी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. फणींद्र व हरू हे बालमित्र ही आता आजोबा झाले आहेत. माञ फणींद्र हा आता तेथील राजकीय कार्यकर्ता आहे व सर्व सहकार्य त्यानेच दिले. कार्यक्रमानंतर चहा-पाणी त्याच्या बंगल्यावर झाले. आमचे दुसरे बालमिञ, किसना-ठकू तर कधीच हे जग सोडून गेल्याचे कळले. सुधा ही नाही. आजोबा तर आम्ही उमरोली सोडल्यावार लगेच देवाघरी गेलेले ,नाना काही वर्षांपूर्वी वारले .कमुताई  (फणींद्रची सर्वात मोठी बहीण) भेटली. माञ काल परत्वे आता वैराग्य आले आहे., त्यामुळे तेवढे अगत्य दिसले नाही. 

आमचे जुने घरही, आता पाडले, वाडा  गेला व तेथे ‘कॉलनी’ कल्चर आले. शेती, निसर्ग ही हरवला आहे व गावा शेतातून वाहणारा सुंदर ओढा आता आटत चालला आहे. जसे माणसांचे एकमेकांतील सौहार्द व आपुलकी घटत चालली आहे. तसे! ‘ती ‘ उमरोळी देखील गेली.