संस्मरणे

एक होती बोर्डी

आप्पा उमरोळीहुन बदली होऊन १९४८ साली बोर्डीच्या  प्राथमिक शाळेत आले. उमरोळी सोडली ती कायमची. त्याचवेळी माझे ६ वर्षे पूर्ण होऊन शाळेत जाण्याचे वय झाले. कर्म धर्म सुयोगानें त्या आधी (जूनच्या) काही महिने आप्पांना धुळे येथील ट्रेनिंग  संस्थे मध्ये, प्रशिक्षणासाठी बदलीची ऑर्डर आली. आमची आजी ‘आपाबा’ ,-आप्पाची आई- वृधत्वामुळे अंथरुणास खिळली होती या तिचे काही खरे नव्हते. अनेक कौटुंबिक समस्या देखील होत्या. खरे तर आप्पांनी त्या वेळेस त्याच्या वरिष्ठाकडे  विनंती केली असती तर त्यांचे प्रशिक्षणार्थ धुळ्यास जाणे थोडे लांबणीवर टाकणे अथवा रद्द होऊ शकले असते. माञ आप्पांनाच असे कोणाकडे ‘तोंड वेंगाडने नको होते व शिक्षण खात्याने या ट्रेनिंग कोर्स साठी ठाणे जिल्यातून केवळ आप्पाची निवड केली होती. बोर्डीची प्राथमिक शाळा  ही ठाणे जिल्ह्यातून ‘ मुलोद्योग ‘ शाळा म्हणून निवडली गेली होती. व सुतकताई ते विणाई , बागकाम शेती व्यवसाय ई. उद्योगांचे शिक्षण मुलांना प्राथमिक शाळेतच मिळाले पाहिजे . अशी योजना त्यावेळेचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळाने 

केली होती. हा शाळेचा व आप्पाचा देखील बहुमान होता, म्हणून ही असेल, आप्पांनी या प्रशिक्षणासाठी  (मला वाटते ते वर्ष भर असेल). घरातील अनेक समस्या दुर्लक्षित करून तेथे जायचे ठरविले. 

आमच्या आईच्या विशेष विरोध नसावा माञ, आप्पाच्या  इतर कुटुंबियांकडून अप्पांवर टीकेचा वर्षाव झाला. विशेषतः मृत्युपंथास लागलेल्या वृद्ध आईला सोडून हा निर्णय घेतलाच कसा? मला आप्पांनी धुळ्यास जाण्यासाठी निघताना आपल्या वृद्ध आईचा घेतलेला आखेरचा निरोप अजून डोळ्यासमोर आहे. आजीला  जमीनीवर अंथरुणावर झोपवली होती (त्यावेळी शेवटच्या घटका मोजत असलेल्या वृद्धास खाटेवर ना निजविता जमिनीवर बिछाना टाकून निजवीत, त्या व्यक्तीला लवकर व सुसह्य मृत्यू यावा अशी प्रार्थना त्या मागे असे. हा एक विधी होता, त्याचे नाव आठवत नाही. 

  आप्पा आपल्या आईच्या पायावर माथा टेकवून अश्रुपात  करीत होते व आईची क्षमायाचना करीत होते. आपाबाला हे सर्व समजत होते, तिच्या ही डोळ्यात पाणी होते, आपला थरथरता हात जेवढा उंचावता येईल तेवढा उंचावून, ती आपल्या लाडक्या ‘वामनु‘ला अखेरचा निरोप देत होती. नातेवाईक, आम्ही लहान मुले हे सर्व पाणावल्या डोळ्यांनी पाहत होते. आम्हाला त्यातील गांभीर्य काहीच कळत नव्हते, माञ  हे काहीतरी दुःखद आहे हे कळत होते. 

 आप्पा धुळ्यास रुजू झाल्यावर काही महिन्यातच आपाबा देवाघरी गेली व आप्पा -आपाबाची ती अखेरचीच भेट ठरली. ती गेल्यावर पत्राद्वारे नातेवाइकांनी आप्पाना हे कळविले किआपण श्राद्ध कर्मासाठी या, माञ त्यास देखील आप्पांनी नकार कळविला व श्राद्धकर्मासाठी  बोर्डीस आले नाहीत. ह्यामुळे तर काही लोकांनी व जवळच्या नातेवाइकांनीच आप्पांवर टीकेची झाडे उठवली. आमच्या आत्याने -आप्पांची सख्खी मोठी बहीण, तर तेव्हा पासून अप्पांशी बोलणे  देखील टाकले होते. नंतर कालांतराने ती बोलत असे.

मी धुळ्यास जाण्यास निघालो, त्याच दिशी माझ्या ‘बा‘ चा अखेरचा निरोप घेतला, तिच्या निर्जीव डोळ्यांनी व थरथरणाऱ्या हाताने तिने ही मला (अखेरचे) आशीर्वाद दिले. मी परत येऊन मला माझी ‘बा’ आता थोडीच मिळणार?” अशा प्रकारचे  काही आप्पांनी लिहिल्याचे आठवते. 

‘आप्पा व आपाबा ‘ हे एक स्वतंत्र लिहण्याचे प्रकरण आहे. तीन भावंडात आप्पा सर्वात लहान. दादा (काका-वसंत भाऊंचे वडील, आत्या आंगु -मोरू, अण्णांची आई) पहिली दोन भावंडे. आपाबा  खूप कर्तृत्वान होती. देहरी या सध्या गुजरात मध्ये असलेल्या छोट्या गावात आजोबांची वडिलोपार्जित जमीन होती, वाडी होती व छान प्रशस्थ बंगलेवजा घर होते. ते आजही मौजूद आहे. शेती हा व्यवसाय बा च सांभाळीत असे, आमचे आजोबा देवजी बाबा हे एका पायाने थोडे अधू असून देव धर्म जास्त करीत, असे आम्हाला सांगितले गेले. मी तरी त्यांना पाहिलेले नाही. १९४१ साली त्यांचे देहरी गावात अचानक निधन झाले, त्यावेळी सगळी मुले तशी लहानच होती. धड कोणाचे शिक्षण नव्हते वा घरची शेती वाडी संभाळाण्याची तेवढी कुवत नव्हती. आप्पांचे मामा, हे सुशिक्षित होते व डहाणू कोर्टात लोकांसाठी लेखण्या-टिपण्याचे काम करून देत. त्यामुळे अशा बिकट प्रसंगी बा ने त्यांचाच सल्ला घेतला असावा व त्यांनी तिला साळसूदपणे “सर्व शेतीवाडी घर विकून टाक व देहरीहुन बोर्डीस राहण्यास ये मग पुढचे काय ते मी बघतो“. असाच सल्ला दिला असावा. गरीब निराश्रीत, विधवा बाय ने आपल्या लहान लेकरांकडे  बघून तसेच केले व सर्व प्रॉपर्टी विकून आलेला पैसा आपल्या ‘सुशिक्षित ‘ मोठ्या भावाचे आधीन केला असावा, व बोर्डीस आली. त्यावेळी लिखाण-टिपण केले नाही कारण सर्व व्यवहार विश्वासावर चाले. पांड्या मामा व लख्या मामा हे तिचे दोघे भाऊ शेजारीच राहत. आज जेथे आमचे बोर्डीचे जुने घर आहे, त्याच्या शेजारीच त्यांचा वाद आज पडीक स्तिथीत आहे. 

माञ त्या वेळे पासून बा व तिच्या लेकरांचे दिवस फिरले. भावाने दिलेला अर्धा गुंठा जागेवर झोपडी बांधून व आपल्या मोठ्या मुलाला व स्वतः मजुरीवर खपवून, तिने उदरनिर्वाह केला. “पैसे, मुले मोठी झाल्यावर त्यांना देईन“ असे माघेम आश्वासन भावाने दिले असेल, त्यावर विसंबून भविष्याकडे डोळे लावून, एकेकाळी आपल्या स्वतःच्या वाडीत खपणारी ही विधवा आता, भावाने फेकलेल्या तुकड्यावर निवारा घेऊन लोकांच्या शेतात खपायला लागली. आप्पांना शिक्षणाची ओढ होती. त्यामुळे प्रसंगी अर्धी कच्ची भाकरी खाऊन, त्यांना फायनल (७वी परीक्षा) केले व “मास्तर“च्या नोकरीस लावले. तेव्हा कुठे या कुटुंबाच्या दोनवेळयेच्या पोटापाण्याची थोडी फार सोय झाली. 

कालौघात, ‘बा’चे वाडी विकून आलेले पैसे परत करण्याची आठवण झाली नाही वा जमले नाही, माञ ‘बा’ला दिलेली  जमीन दिलेली ही त्यांचीच राहिली. पुढे तर ‘उलटा चोर कोतवाल को डाटे‘ अशी स्तिथी निर्माण झाली व ‘बा‘चे  पैसे परत मिळण्याची गोष्ट सोडा, मामांची पुढची पिढी, आमच्या दोन्ही कुटुंबास दमबाजी करून, आमच्या जमिनीवर घर बांधून आम्हालाच पैशाबद्दल विचारू नका अशी भाषा करू लागले. आजही ह्या वादाचे संपूर्ण निराकरण झाले असे वाटत  नाही, कारण काळाच्या ओघात , त्या वेळेचा खरा इतिहास ठाऊक असलेली जाणती मंडळी  कायमची गेली. व पुढे आलेल्या मामाच्या कुटुंबियांना मागचा इतिहास जरी माहित असला तरी,  तो विसरणे सोईचे असल्याने आम्हाला भरपूर मानसिक-भावनिक त्रास दिला. तो इतिहास म्हणजे एक दुःस्वप्न असून, त्याने आम्हा सर्व लहान भावंडांचा बालपणातील खूप मोठा आनंद हिरावून घेतलेला आहे. आता मामांचा वाडा पडक्यास्तिथीत असून तेथे कोणतेच वास्तव्य नाही. मामा कुटुंबीयांनी तो विकून ते गाव सोडून गेले आहेत, माञ  आमच्या झोपडी ऐवजी, तेथे टुमदार घर झाले असून आजही तेथे वास्तव्य आहे! ते १९४८ साल असेल, मला सहावर्षे पूर्ण झाल्याने, प्रा. शाळेत नाव दाखल करावयाचे होते. आणि आप्पा तर धुळ्याला ट्रेनिंग कोर्स साठी गेले होते. आम्हाला उमरोळीहून बोर्डीला येऊन वर्ष भर झाले होते. एव्हाना अरुणाचा जन्म झाला होता व ती वर्ष भराची असेल. अण्णा देखील ४ वर्षाचा, त्यामुळे आमच्यावर वचक आईचाच होता. त्या काळी, बालवाडी, शिशुवर्ग असा प्रकार नसल्याने, आम्ही मोकाट सुटलेली मुले होतो. दिवसभर गावात, शेतात, समुद्रकिनारी नाहीतर राम मंदिरात हुंदडणे हाच एकमेव उद्योग होता. गावात बालवाडी सुरु झाली होती. कै. ताराबाई मोडकांनी, आचार्य भिसे, चित्रे यांच्या मदतीने गावा बाहेरचे एक घर घेऊन समुद्रकिनारी वर्ग भरवायला सुरवात झाली होती. काही स्वयं सेवक, सेविका, गावात फिरून आमच्या सारख्या ‘उनाड ‘ मुलांना पकडून प्रसंगी काही प्रलोभने दाखवून तेथे थोडा वेळ बसवित असत. माञ  नियमित तेथे जाऊन काही शिस्त अंगी बाणवणे, हा प्रकार होत नव्हता. मी देखील आधी मधी तेथे गेल्याचे आठवते. खुद्द ताराबाई, अनुताई यांचे मार्गदर्शन व गाणी गोष्ठी तेथे शिकावयास मिळाल्याचे आठवते. खंडूभाई देसाई व श्रीमती खेर नावाच्या बाई त्यावेळी तेथे सेवा देणे असत, त्यांचे चेहरे देखील स्पष्ट दिसतात. 

माञ  शाळेत जाणे म्हणजे आता हे ‘हडल-हॅप्पीचे’ जीवन मनमुसद  हिंडणे संपणार व रोज त्या “कैदखान्यात ‘जाऊन बसावे लागणार अशी भावना , का कोण जाणे, माझ्या मनात तयार झाली होती. व त्यामुळंच आईने ज्या दिवशी, ”उद्यापासुन तुला पहिलीत नाव घालण्यासाठी, शाळेत जावयाचे आहे व त्यासाठी, हिराजी मामा येतील”. हे सांगितल्यावर रात्री झोप आली नाही. ही ‘बला‘ कशी टाळायची, याचा विचार करीतच त्या रात्री झोपलो. सकाळी उठल्यावर आई दप्तर-पाटी  भारत होती त्याकडे लक्ष्य नव्हते व कमाताई (चुलत बहीण) मला धीर देत होती ते देखील पटत नव्हते. 

१० वाजण्याच्या सुमारास, हिराजी मामा घरात येऊन  उभे राहिले… आणि मी एकदम सूं बाल्या केला, तो बारशेतात हिराजी मामा हे देखील बोर्डी शाळेत, त्यावेळी शिक्षक होते. आप्पांचे खूप जवळचे मित्र होते. अतिशय साधे, मृदू स्वभावाचे या मिश्किल  असे व्यक्तिमत्व होती. ते पायाने थोडे अधू असल्याने लंगडत चालत . त्यामुळे त्यांना पकडता येणे शक्य होणार नाही, अशा बेताने मी अचानक घरातून पळून जाण्याचा पवित्र घेतला होता. 

पण माझ्या प्लॅन मामा, आई व माझ्या मोठ्या चुलत भावंडानी हाणून पाडला . मामांनी त्वरित त्यांच्या दोन मोठ्या  विद्यार्थ्यांस बोलावून घेऊन माझ्या पाठलागावर सोडले. व मला ‘जेरबंद‘ करून आई समोर आणून उभे केले! आईने माझे काय केले असेल (सत्तर वर्षां पूर्वीची मोठी आई!) ती नुसती कल्पना करा. दोन मुलांनी मला दोन्ही बाजूनी धरले आहे, मामा मागे आहेत व आजु बाजूला, टाळ्या वाजवत, माझी हुर्यो करत माझी तथाकथित ‘मित्रमंडळी ‘हसत खिदळत  चालली आहेत. अशी ही ‘प्रभात फेरी ‘ बोर्डीच्या होळी पासून , अग्यारी शाळेपर्यंत (विजय स्तंभाजवळ) चालली होती. शाळेमध्ये अंबू बाई म्हात्रे त्यावेळी पहिलीच्या शिक्षिका होत्या, त्यांचे हवाली करून मामा त्यांच्या वर्गावर निघून गेले. अंबू बाईंना असं ‘रडत राउत‘ विद्यार्थी नवीन नसतीलच पण त्यावेळी बाईंनी माझ्या पाठी वरून डोक्यावरून फिरवलेला वत्सल हात व मला दिलेले धैर्य, आजही लक्षांत आहे. बाईंनी मला मुलांमध्ये नबसवता त्यांचा मुलगा विजय जो पहिलीत दाखल झाला होता; त्याच्याबरोबर बाईंच्या टेबलाजवळ मुलांकडे तोंड करून बसवले. मुले काहीतरी ‘ग म भ न‘ काढीत होती. आम्ही दोघे मी व विजय टिवल्या-बावल्या करीत होतो. त्या दिवशी भीती निघून गेली ती कायमची. बाई, विजय व शाळा आवडू लागली. त्यानंतर कोणी सणासुदीनिम्मित जरी घरी राहा म्हंटले तरी मला शाळा चुकवून घरी राहणे आवडलेच नाही. शिक्षणाचा श्री गणेशा असा सुरु झाला व शिक्षणाची गोडी लागली ती कायमची प्राथमिक शाळेतील  ७ वर्ष माध्यमिक शाळा हायस्कूलची ४ वर्ष व पुढे कॉलेजच्या पदवी पर्यंत ४ वर्ष पदव्युत्तर ४ वर्ष, अशी एकूण एकोणीस वर्ष मी नियमित शिक्षण क्रम पूर्ण करण्यात घालवली,मात्र अंबु बाईंच्या वर्गातील तो पहिला दिवस, हिराजी मामाचा चिंतातुर चेहरा, व विजयची मैत्री कायमची लक्ष्यात राहील ती आजतागायत!          

 दुर्देवाने माझ्या शालेय जीवनातील ‘पहिला मित्र’ विजयची अत्यंत आकस्मिक व दुःखद निधन त्याच वर्षी  झाले.जुलैच्या एका वादळी रात्री,घरा शेजारील विहिरीत पडून तो हे जग सोडून कायमचा गेला.बाई व म्हात्रे गुरुजींना हा आयुष्यभर खूप मोठा धक्का होता.हिराजी मामा तसे लवकरच निर्वतले, मात्र अंबु बाईंना दीर्घायूष्य मिळाले. म्हात्रे कुटूबीयांशी आमचा खूपच निकटचा संबंध आला. म्हात्रे गुरुजींनी त्यावेळी त्यांचा नवीन बंगला, ‘विजय विहार’ आप्पांना व आम्हाला काही दिवस राहण्यासाठी दिला हे त्यांचे ’मित्र प्रेम’अफाट होते. त्यामुळेआप्पांना त्यावेळी होणारा अस्थमा खूप कमी होण्यास मदत झाली!  

‘श्रीगणेशा’ तर झाला, मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे की त्या काही संपूर्ण शालेय जीवनाच्या सात वर्षात (प्राथमिक शाळा) कधीही अभ्यासाचा ताण जाणवलाच नाही. शाळेतला अभ्यास शाळेंतच, घरी येऊन गृहपाठासाठी बसणे व त्यासाठी कोणाचा ’ओरड’ऐकणे हे कधीच नव्हते. ’पहिला नंबर’ काढला पाहिजे मार्क्स चांगले आले पाहिजेत वगैरे आजच्या शालेय विद्यार्थ्यांस जी भिती व कटकट आहे, ती काहीच नव्हती शाळा सुटली कि दुसऱ्या दिवशी शाळेत जाई पर्यन्त पुन्हा हुंदडा, खेळा फिरा व मौज मस्ती करा! खूपच स्वानंदी व सुखी जीवन होते ते.आजच्या विद्यार्थ्यांस  तसे जीवन कधीच मिळणार नाही याची खंत वाटते -परीक्षा केव्हा व कधी व्हायची, पुढच्या वर्गात कधी जायचो अशा रितीने ७ वी ची फायनल परीक्षा कधी पास झालो ते कळले देखील नाही. आम्हाला व आमच्या पालकांना ही ! त्यावेळी आमच्या बोर्डीच्या प्राथमिक शाळेला स्वतंत्र, सलग अशी इमारत नव्हती आमची शाळा, माधवराव राऊत यांचा बंगला व गावातील घराचा मजला, वसंत लाल शेठ यांचा बंगला अय्यंगार बंगला व शेतकी शाळा, येवढ्या वास्तु मध्ये प्रत्येक वर्षी बदल होत होता .प्रत्येक वर्गाचे एक एक वैशिष्ट होते! दुसऱ्या इयतेत मी गेलो, तेंव्हा आप्पा पुन्हा बोर्डीचे  प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले होते. दुसरीसाठी राम भाऊ राऊत गुरुजी, (राऊत बंगला), तिसरी साठी लक्ष्मण राऊत (लखू मास्तर- माधवराव राऊत/ बंगला शाळा) चौथी साठी रा.भा.सावेगुरुजी (शहा बंगला / अयंगार बंगला).  

पाचवी साठी आप्पाच गुरुजी होते, व वसंतलाल शहांचा बंगला, ही  शाळा- जो आमच्या घरा शेजारीच होता.

सहावी साठी पुन्हा अग्यारी शाळेचा वरचा मजला व पा.मा.पाटील गुरुजी होते.सातवीला देखील पा.मा. पाटील गुरुजी व शेतकी शाळा असे काहीसे अजून पुसट पणे आठवते! 

त्यावेळी साळी, माळी, भंगाळे, हित्रयी देखील शाळेत होती. श्री बच्चू बारी गुरुजी, निमकर गुरुजी, ना.पा.राऊत  गुरुजी, भिमाजी गुरुजी, ही मंडळी देखील दुसऱ्या तुकड्यावर होती, मात्र प्रत्यक्ष त्यांच्या हाताखाली, एखाद्या तुकडीत शिक्षण घेण्याचा योग आला नाही. त्यावेळी आमची शिक्षक मंडळी खूप शिकलेली वगैरे नव्हती व्ह.फा.परीक्षा- सातवी पास झाली व ट्रेनिंग प्राथमिक शिक्षक कोर्स झाले की सातवी पर्यंत शिकविण्याचा परवाना मिळत असे. मात्र शिक्षकी पेशा हा त्यांनी जीवनाचे ध्येय म्हणून स्विकारला होता व काही थोडे अपवाद वगळता, ही मंडळी निर्व्यसनी व ध्येय वादी होती.आपल्या विद्यार्थ्यांवरील प्रेम व आस्था यामुळे शिक्षण कमी असले, तरी त्यांना विद्यार्थ्यांकडून सन्मान मिळे व विद्यार्थी-शिक्षक असे एक अतूट नाते कायमचे तयार होई.

पाचवी इयतेत आप्पा स्वतःच माझे वर्ग-शिक्षक असल्याने खूप गोची होऊ लागली. आप्पांनी कधीही मला ते शिक्षक नसताना ही अभ्यासाच्या चौकशी वा घरी अभ्यास घेणे, असा प्रकार केला नाही. अभ्यास वर्गातच संपून जायचा व वार्षिक परीक्षा देखील इतर अनेक दिवसा पैकी एक अशीच होऊन जायची. मात्र आप्पा मला शिक्षक असतांना माझी खूप गोची होऊ लागली, एकतर ’मास्तरचा पोर’ म्हणून इतर शिक्षकांचे व विद्यार्थ्याचे लक्ष्य असावयाचे आता बाबाच शिक्षक असल्याने, काही ’हित शत्रु’ विद्यार्थी व शिक्षक माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीचे (extra-curricular activity) रसभरीत वर्णन त्यांच्या कडे करु लागल्याने, कधी कधी भर वर्गातच आप्पांचा ओरडा खावा लागत असे. आप्पांनी कधी हात ऊगारल्याचे आठवत नाही. मात्र एकदा साप्ताहिक वक्तृत्व सभेचे वेळी कोणाचे भाषण सुरु असतांना, एका समोर बसलेल्या विद्यार्थ्याच्या टोपीला शेंडी लावण्याचे माझे उद्योग पाहून मला भर सभेतून उठवून, दहा उठा बश्या काढण्यास सांगितल्या, तेव्हां पासून माझे विमान जमिनीवर आले.

रामभाऊ गुरुजींचा मी खूप आवडता विद्यार्थी, त्यांचे सतत प्रोत्साहन मिळे. गुरुजी निवृत्ती नंतर घोलवड मध्येच स्थायिक झाले व अखेर पर्यंत आस्थेने चौकशी करत. लक्ष्मण राऊत (लखू मास्तर) गुरुजींनी मला वर्गाचे मॉनिटर केले होते व वर्गातील मोठ्या आडदांड मुलांना मी धाकात न ठेऊ शकल्याने झापले ही होते.             

रा.भा.सावेगुरुजींचा,का कोण जाणे माझ्यावर एक राग होता. कदाचित आई त्यांना माझ्या खोडकरपणाबद्दल, आपला मावस भाऊ म्हणून, काही सांगत असावी. त्यांनी भर वर्गात एकदा, ”मी आईशी भांडणारा मुलगा आहे” अशी माझी निर्भत्सना केली होती! गुरुजींना तसे अल्प आयुष्य मिळाले मात्र मी पुढील शिक्षणास गेल्यावर,माझी खूप आस्तेवाईक चौकशी करीत असत!भिमाजी गुरुजी, ना.पा.राऊत गुरुजी,बच्चूबारी गुरुजी, निमकर गुरुजी इ.गुरुजन जरी प्रत्यक्ष शिकवावयास नव्हते, तरी शाळेची सकाळची प्रार्थना व इतर सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व वर्गांचे एकत्र होत असत त्यामुळे त्यांचाही सबंध येई.

 निमकर गुरुजींच्या गोड गळ्यातील प्रार्थना, भिमाजी गुरुजींच्या आवाजातील जरब व शिस्त आणि ना.पा.राऊत  गुरुजींच्या शिट्टीतील मुलांना एकत्र आणणारी जादू, अजून आठवणीत आहे! बारी गुरुजी तसे तब्येतीन नाजूक व त्यांचा आवाजही मृदु, मात्र प्रसंगोपात सर्व मुलांना एखाद्या  महनीय व्यक्तीच्या जन्मदिनास अथवा पुण्यतिथीस त्यांचे सुंदर, माहिती पूर्व भाषण ऐकावयास मिळत असे. दा.म.पाटील गुरुजी काही काळ, चौथी इयतेत शिकवावयास होते, त्यानंतर त्यांची दुसऱ्या इयत्तेवर बदली झाली व नतंर रा.भा.सावे गुरुजी आम्हास शिकविण्यास आले. दामू मास्तरांची शिस्त देखील कडक होती व शिकविणे अस्खलित खड्या आवाजात असे. गुरुजींना सार्वजनीक कामाची खूप आवड होती. शाळे व्यतिरिक्त ते बोर्डीच्या सहकारी सोसायटीच्या रेशनींग दुकानांचा हिशोब तपासनीचे देखील काम करत. डॉ. चुरी, सोसायटीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याच, रेशनींग समोरील बंगल्यातील, एका  खोलीत दफ्तर होते. आम्ही देखील कांही काळ डॉक्टरांच्या बंगल्यातील पहिल्या मजल्यावर राहात असल्याने, त्यांची रोज मुलाखात होई. दा.म.पाटील गुरुजी, पुढे सो.क्ष.स संघाचे देखील चिटणीस झाले व खूप छान काम त्यांनी समाजासाठी केले. मी त्याचवेळी कै. आण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील, तात्या साहेब चुरी वसतिगृहाचा रेक्टर असल्याने व समाजाच्या कामातही योगदान देत असल्याने, माझाही जवळून संबंध आला.

सहावी व सातवी या दोन्ही इयत्तेसाठी ,पा.मा.गुरुजी हे माझे गुरुजी, त्यामुळे त्यांच्याशी विद्यार्थी-गुरु हे नाते जास्त घट्ट झाले. गुरुजी आप्पांचे ही खास स्नेही असल्याने माझ्या विषयी खूप आस्था दाखवीत व माझ्या प्रगति बद्दल नेहमीच मला प्रोत्साहन देत. गुरुजींचे वाचन भरपूर होते. रोजच्या वर्तमानपत्रातील  बातम्यांची त्यांना संपूर्ण ज्ञान असे व शिकविण्याची एक विशिष्ठ हातोटी होती. नाम व विशेषण यातील फरक शिकवतांना गुरुजींनी आमच्या गावातील भगा टांगे वाल्याचे उदाहरण दिले-आजही माझ्या लक्ष्यात राहिले आहे, त्याचा घोडा सर्व गावात एका कारणासाठी प्रसिध्द होता. “भगाचा घोडा तिरपा चालतो!” यांतील ‘घोडा’ हे नाम आहे व ’तिरका’ हें त्याचे विशेषण हे सांगितल्यावर वर्गात, हास्य लकेर तर उमटलीच पण विषय देखील पक्का लक्षात आला.

त्या वेळी सातवीचे विद्यार्थ्यांसाठी ”माध्यमिक शाळा, शिष्यवृत्ती परीक्षा ‘जिल्हा शिक्षण बोर्ड’ तर्फे होत असे व सर्व ठाणे जिल्ह्यातील शाळातून फक्त पंधरा विद्यार्त्यास पुढील शिक्षणासाठी( ८ वी ते ११ वी)  महिना रु. पाच (5 रुपये) शिष्यवृत्ती मिळत असे.आज ही रक्कम एकदम नगण्य वाटेल, मात्र १९५५ साली ५ रुपयांस देखील खूप मोठी किंमत होती व हायस्कूल ची फी भरून देखील विद्यार्थ्यांस कांही पैसे शिल्लक राहत असत- शिवाय ’स्कॉलर’ म्हणून हायस्कूल पदार्पणात एक बहुमान होई ते वेगळे! पा.मा.पाटील गुरुजींनी आम्हा काही विद्यार्थ्याचे परीक्षा फॉर्म भरले. 

ही परीक्षा सकाळी फक्त ठाणे येथील परीक्षा केंद्रातच द्यावी लागे व परीक्षा विद्यार्थ्याना ठाण्यात दोन दिवस मुक्काम करावा लागे. परीक्षेच्या तयारी साठी कांही विशेष अभ्यास घेतला जात नसे व नेहमीचाच अभ्यासक्रम, गुरुजी आमच्या कडून व्यवस्थित लक्ष पूर्वक करवून घेत होते इतर कोणतीच पुस्तके (वा गाईड्स तर नावही ऐकले नव्हते). उपलब्ध नव्हती.घरुन देखील कोणी विशेष परिश्रम घेत नव्हते, ”गाजराची पुंगी वाजली तर” असा दृष्टीकोनातूनच, बसत आहेत तर बसू द्या या भावनेने मंडळी बघत होती. गुरुजी स्वतः आम्हाला या परीक्षेसाठी त्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात कधी तरी ठाण्यास घेऊन गेले.आम्ही तर तो पर्यंत डहाणूच्या पलीकडे ही गेलो नव्हतो,मात्र बरोबर संधान बांधून, ठाण्याच्या प्रार्थमिक आमची दोन दिवस राहण्याची व्यवस्था केली होती व जेवण बाहेर खानावळीत घेत असू. परीक्षेचे दडपण तर होतेच शिवाय, मुंबई, ठाणे ही शहरे देखील प्रथमच पहात होतो सबंध जिल्ह्यातील हुषार विद्यार्थी व त्यांचे शिक्षक एकत्र पाहताना दडपण येत होते. सर्वांनी जसे जमेल तसे पेपर्स दिले व सुटलो एकदाचा अशा भावनेनेच बोर्डीस आलो. बोर्डी शाळेतील ही त्यावेळी पहिलीच तुकडी असावी? निकाल जून मध्ये लागला व मला अजून आठवते त्या प्रमाणे ”सन्मित्र” नावाच्या ठाण्याहुन प्रसिध्द होणाऱ्या एका साप्ताहिकात निकाल आला. माझा पंधरा मध्ये दहावा नंबर आला होता व सातवी मध्ये आमच्या शाळेतून व तालुक्यातून मी एकटाच ह्या स्कॉलरशीप साठी निवडला गेलो होतो!

आप्पांना तर आनंद झालाच होता मात्र गुरुजींच्या चेहऱ्यावरील ओसंडून जाणारे कौतुक आज ही डोळ्यासमोर येते त्यांनी खूप प्रेमाने मला जवळ घेऊन, अशीच प्रगती करीत राहा असा शुभ आशिर्वाद दिला! पुढे फ़ायनल च्या परीक्षेत (जी परिक्षा तालुक्यांतून फक्त बोर्डी सेन्टरला त्या वेळी होत असे) देखील मी सेंटर मधून पहिला आलो व गुरुजींना एक आगळे समाधान मिळवून दिले. त्यामुळे बोर्डी हाय-स्कुल मध्ये प्रवेश घेतांना मी एक वेगळ्या आत्म विश्वासाने नवीन दालनात प्रवेश केला व त्याचा खूप फायदा देखील त्या शैक्षणिक कालखंडात झाला, हे निश्चित! 

बोर्डी हायस्कूलांतील माध्यमिक शिक्षण आटोपून मी साताऱ्यास कॉलेजात गेलो ( बोर्डी हायस्कूलांतील आठवणी पुढे येतीलच) व सुट्टीत घरी आल्यावर गुरुजींची अधून मधून भेट होई. आप्पा व गुरुजी एक वर्षाचे फरकाने निवृत्त झाले. गुरुजी सेवानिवृत्ती नंतर चिंचणी गावी स्थायिक झाले व त्यांनी ही ‘क्षात्रीय परिषदेचे कार्यवाह’ म्हणून बरेच काम केले. तारापूरला सासुरवाडीस मी गेलो असतांना दोन-एक वेळा गुरुजींना भेटण्यासाठी (बरोबर) जाऊन आम्ही दोघांनी (मी व मंदा) त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. शेवटच्या भेटीत गुरुजी खूप थकलेले वाटले व त्यांची दृष्टी देखील अधू झाली होती. गुरुजींचा मोठा मुलगा विजय हा देखील माझा वर्ग मित्र होता. तो देखील एका नामवंत शाळेचा प्राचार्य म्हणून निवृत्त होऊन आज समाधानाचे जीवन जगत आहे. 

माझ्या आयुष्यातील ज्या गुरुवर्यांनी मला आपल्या ज्ञानाने, स्नेहाने, व आशिर्वादाने पुनीत केले त्या माझ्या पूजनीय गुरूजनांच्या यादीत पां. मा. पाटील गुरुजी एक आहेत हे निश्चित! 

आमच्या बोर्डीच्या प्राथमिक शाळेत महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याने, प्राथमिक शाळेपासूनच काही तरी धंदे शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून, एक नवा प्रयोग सुरु केला होता. सूतकाम, विणकाम, शेती, बागायंत अशा विविध उद्योग-शिक्षणातून मुलांना सुरुवातीपासूनच काही शिक्षण देऊन, पुढील आयुष्यात त्यांना काही तरी स्वतंत्र उद्योग करता यावा व आपल्या उपजिविकेचे एक साधन देखील उपलब्ध व्हावे असा सरकारचा हेतू असावा. त्या दृष्टीनेच प्राथमिक शिक्षकांना देखील कांही स्पेशल कोर्सेस देऊन तयार करावे असे सरकारी धोरण होते व त्या अनुसारच आप्पांना धुळे येथे, ’मुलोद्योग’ प्रशिक्षणासाठी पाठविले होते. ठाणे जिल्ह्यातील इतर शाळेत, हे प्रशिक्षण नंतर आले, मात्र बोर्डीला हा मान पहिला मिळाला. त्याला कारण ही तसेच होते- आचार्य भिसे, चित्रे गुरुजी यांचे बोर्डी हायस्कूलातील वास्तव्य, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, या सारख्या पूर्व-प्राथमिक शिक्षणांतील सन्माननीय व्यक्तिचे बालवाडीतील कार्य, यामुळे बोर्डी शाळा निवडली गेली असावी. त्यावेळचे मुख्यमंत्री- बाळासाहेब खेर हे जातीने बोर्डीस येऊन, ह्या सर्व तज्ञ मंडळीस भेटून पाहणी करुन गेले होते. त्यामुळे आमच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्यावेळी, पदवीधर प्राध्यापक असत, जे बोर्डीच्या प्राथमिक ट्रेनिंग कॉलेज’ मध्ये प्राध्यापक ही असत.

प्राचार्य जोशी, पेंडसे, सोहनी, हे आमच्या शाळेचे त्या काळातील काही मुख्याध्यापक होत. ही मंडळी उच्च विद्याविभूषित तर होतीच, पण आपल्या उच्च शिक्षणाचा गर्व न बाळगता, खेड्यातील एका शाळेत शिक्षण-दानाचे काम करतांना, सरकारच्या एका नव्या शिक्षण प्रयोगास आपला हातभार लागतो आहे, याचा अभिमान बाळगून काम करीत होती. ह्या मूलोद्योग शिक्षणक्रमास उपकारक ठरले, असा दुसराही एक छान उपक्रम त्यावेळी बोर्डी मध्ये सुरु होता. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्यांतील पदवीधर अधिकाऱ्यांतून, काही जणांस बोर्डीला बी.टी.(बॅचलर ऑफ टिचिंग ) प्रशिक्षणासाठी (एक किंवा दोन वर्ष असतील) पाठविले जाई. अग्यारी शाळेसमोरील अय्यंगार बंगल्यात हे बी. टी.कॉलेज तेव्हां होते. ह्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉल म्हणून डॉ.सुलभा पाणंदीकर या विदूषी होत्या. ह्या बाईंनी पुढे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्यात व एकूणच भारतीय शिक्षण व्यवस्थेत खूप मोठ्या, व अधिकाराच्या जागेवर काम केले. त्यांचे जोडीने, कवी ग. ह. पाटील, प्रा. महाजन, प्रा. शेख अशी त्या वेळची माननीय  मंडळी शिक्षक म्हणून कॉलेजात होती. कवी दसनूरकर, इंदिरासंत (कवयत्री), बा.भ. बोरकर (कवी), अशी सरस मंडळी शिक्षक म्हणून या कॉलेजांत प्रशिक्षणासाठी येऊन गेल्याचे मी आप्पांकडून ऐकले. कवी ग. ह. पाटील यांचे स्वतःचे मुखातून “माझ्या मामांची रंगीत गाडी हो आणि फुलपाखरू छान किती दिसते …” या त्यांच्या स्वतःच्या कवीता ऐकतांना किती धन्य वाटलेअसेल याचीआजकल्पना करवत नाही. 

ह्या बी.टी.च्या प्रशिक्षणासाठी आलेल्या अधिकारी मंडळीस बोर्डी शाळेतील प्राथमिक शिक्षकाशी ही चर्चा- मसलत होतअसे व ही मंडळी आपल्या शिक्षण क्रमाचा एक भाग म्हणून आमच्या वर्गात येऊन एक ”आदर्शपाठ” शिकवीत असत. त्या वेळेस आमचे नेहमीचे गुरुजी आमच्या बरोबर बसून त्याचे अवलोकन करीत. त्याच वेळी ह्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुलभा ताई, ग.ह.पाटील, महाजन ही मंडळी देखील त्या पाठाचे मूल्यांकन करुन, त्यांना मार्गदर्शन करीत. खूप वेगळा आला अनुभव आम्हा होता. 

कधी तरी एकदा “आदर्श पाठ” रविंद्रनाथ टागोरांचा ‘शांतिनिकेतनच्या’ धर्तीवर शाळेच्या वर्गाबाहेर होई. झाईच्या खाडीवर, बाभूळ तलावावर, कै मुकुंदराव सावे, यांचे वाडीत असे काहीं पाठ अजून आठवतात. त्या वेळची एक वेगळीच गंमत आठवते. मुकुंदरावाचे  वाडीत असलेल्या विविध फुल – झाडा वरून एक-एक प्रकारचे फुल, प्रत्येकाने गोळा करुन दसतूरकर गुरुजींकडे दिले. कवी गुरुजींनी त्या सर्व फुलांची वर्गवारी करुन आम्हा मुलांना प्रत्येक फूलाचे नांव व त्याचे वैशिष्ट्य सांगण्यास सांगितले व त्यानंतर तिथेच त्यांनी आम्हाला एक सुंदर कवीता बनवून शिकविली.

“गुलाबा येई रे, मोगऱ्या येई रे, शेवंती ये बाई, ये जाई जुई“ 

दसनूरकरांच्या काव्य संग्रहातील ही कवीता, मुकुंदराव सावे, यांची वाडीतील त्या फुलांना पाहून तयार झाली आहे! खूपच चांगला असा हा उपक्रम आमच्या प्रा.शाळेत सुरु झाला होता व आमच्या सारखे अनेक विद्यार्थी, ज्यांना एरव्ही अशा उच्च विद्या-विभूषित शिक्षकांच्या विद्वत्तेचा, लाभ कधी झाला नसता. त्यांना खूप कांही शिकावयास व पहावयास मिळाले. पुढे बाळासाहेबांचे मुंबई इलाख्याचे (महाराष्ट्र+गुजराथ चे एकत्र राज्य) मंत्री मंडळ गेले व काही तरी हा प्रयोग ही बंद पडला. मात्र त्या दरम्यान माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना बालपणीच्या त्या काळात या विद्ववजनांकडून   मिळालेली शिदोरी पुढील शिक्षणासाठी खूप उपयोगास आली. 

त्या काळात कधी तरी सुलभ पाणंदीकर बाईंना बोर्डीसारख्या एका खेडेगावात, महाराष्ट्रातील अनेक शिक्षण तज्ञांना एकत्र आणून एक मोठा परिसंवाद ही भरवलेला आठवतो. एका खेडेगावात हे खूपच अप्रुप होते, मात्र त्याचे महत्व त्या वेळी आमच्या सारख्या  शालेय विद्यार्थ्यांस समजण्याजोगे आमचे वय नव्हते. विशेष म्हणजे, तेथे आलेल्या या शिक्षण क्षेत्रातील तज्ञ लोकांनी दोन-तीन गट करुन आम्हा शालेय विद्यार्थ्यांची एक चाचणी परीक्षा घेतल्याचे आठवते. ही काय भानगड आहे? कशासाठी? आम्हाला अर्धा – पाऊण तास बसवून निरनिराळ्या प्रश्नांचा मारा सुरु आहे, हे कळत नव्हते. मला तर एका गटाने, प्रश्न उत्तरांची खैरात झाल्यावर “खास केस” म्हणून इतरही दोन गटांकडे (सॅम्पल) म्हणून पाठवल्याचे आठवते. मी तर रडकुंडीस आलो होतो पण आमच्या पा. मा. गुरुजींना खूप आनंद झाल्याचे चेहऱ्यावर दिसत होते व त्यांनीच मला धीर देऊन, सुमारे तासभर या एक वेगळ्या परीक्षेच्या चक्रव्युहातून फिरण्यास धीर दिला, म्हणून मी तेथे थांबलो, अथवा माझा विचार तर पलायन करण्याचा होता. दुसरे दिवशी गुरुजींनी दिलेली शाबासकी व त्यामुळे “आपण किती  तरी वेगळे आहोत!” हा आत्मविश्वास पुढे खूप उपयोगास आला. (आता लक्षात येते कि ती IQ (intelligent quotient) – बुद्धिमत्ता चाचणी असावी. )

त्या काळी ( १९४८-५३),सातवीची परीक्षा म्हणजे “फ़ायनल” व्हर्नाक्युलर प्रा.शाळा अंतीम परीक्षा म्हणत असत.व ह्या परीक्षेला खूप महत्व आहे.त्या पात्रतेवर ही त्याकाळी प्रा.शिक्षकांची वा तत्सम नौकरी मिळत असे.ठाणे जिल्ह्यांत मला वाटते बोर्डी हेच केंद्र होते (दुसरे ठाणे शहर). त्यामुळे जिल्ह्यातील मुले परीक्षा देण्यासाठी बोर्डीस येत. सु. पे. ह. हायस्कूलांत परीक्षार्थींना  बसण्याची सोय होती. त्याच प्रमाणे मराठी शाळेतील शिक्षक मंडळी येणारे विद्यार्थि व त्यांच्या सोबत आलेले शिक्षक यांची राहण्याची व जेवण्याची सोय मराठी शाळेच्या वर्गांतून करीत. जेवण्याची व्यवस्था शेतकी शाळेत असे व हा एक मोठा सोहळाच होत असे.आठवडाभर नुसती धाम-धूम असायची. त्यावेळचे जेवण व्यवस्था व धामधूम आजही नजरे समोर येते व त्यावरुन सातवी इयत्तेची परिक्षा किती महत्वाची मानली जाई याची ही कल्पना येते! 

परीक्षेचा रिजल्ट कधी तरी “मे” अखेर ( १९५५ मे ) लागला व पा. मा. पाटील गुरुजींनी घरी येऊन माझे अभिनंदन केले. मी गावात कुठेतरी उंडारत होतो ते मला घरी बोलाविले व “पहिला आलो आहे” ही बातमी गुरुजींनी दिली. मी बोर्डी केंद्रातून सातवीला प्रथम आलो याचा आनंद पा.मा.पाटील गुरुजींना झाला होता व त्याचे कांहीच ‘विशेष’ माझ्या गावी नव्हते. तो काळच तसा असावा की परिक्षेआधी कोणी फारसे मनावर घेत नसे व परीक्षेचा निकाल लागल्यावर ‘पास’ अथवा ‘नापास’ येवढाच शिक्का लक्षात घेतला जाई – पहिला-दुसरा,नंबर चलता है!

मात्र त्या नंतर दोनचार दिवसांनी घडलेला एक प्रसंग अजून स्मरणात आहे. आप्पांनी दिलेल्या सूचनेनुसार मी त्यांच्या चरख्यावर कधीतरी ‘सूत कताईस’ बसत असे. डॉ.चुरींच्या बंगल्यात वरच्या मजल्यावर आम्ही रहात होतो. मी सूत काढीत बसलो होतो व १० ते ११ च्या सुमारास आप्पा बाहेरुन आले. त्यांनी माझ्या हातात एक पुडी  दिली व पाठीवर शाबासकी देऊन म्हणाले “बेटा, तू फायनल परीक्षेत चांगले यश मिळविलेस – हायस्कूल स्कॉलरशीप देखील मिळविली, त्या बद्दल तुला हे बक्षिस! मी पुडी उघडून पाहिली, त्यात लेमनच्या दोन गोळ्या होत्या. मला खूप आनंद झाला एक खिशात टाकून व एक तोंडात टाकून मी त्यांचा आस्वाद घेतला. कारण दुसऱ्या भावंडांस याची बातमी समजू नये ही काळजी घ्यावयाची होती ना! आज त्या प्रसंगाचा विचार करतांना खूप गंमत वाटते. 

बाप व लेक यांचे त्या काळातील नात्याचे, उत्तेजन देण्याच्या पध्दतीचे व यशाबदल मिळणाऱ्या बक्षिसाच्या अपेक्षेचे स्वप्न किती ‘गोड’ होते? आजचे त्या वयातील मूल, अशा शाबासकीनें समाधानी होईल काय? अशा दोन चॉकलेट देऊन शाबासकी देणाऱ्या बापाला ते काय म्हणेल? पण तो काळ एवढ्या लहान गोष्टींत ही खूप आनंद मानण्याचा होता हे खरे!

तर अशा रितीने प्राथमिक शिक्षणाची ‘सातवी’ झाली.आता पुढे आठवी साठी हायस्कूलात जायचे होते, त्या वेळी काही पैसेवाली मुले तीसरी इयत्ता पास झाल्यावर ‘चौथी ते सातवी’ हायस्कूलात करीत. त्यांना सरळ आठवीला प्रवेश मिळे. मात्र एवढी हायस्कूलची फी भरुन चार वर्ष हायस्कूल करणे, आमच्या सारख्या गरीब विद्यार्त्यास शक्य नव्हते, म्हणून बहुतेक विद्यार्थी व्ह.फा. (Vernacular Final) परिक्षा जिल्हा बोर्डच्या, फुकट शिक्षण देणाऱ्याशाळेत काढून आठवी साठी शाळेत जात. त्यात एक मोठा तोटा होत असे. आणि तो म्हणजे आम्हास सरळ आठवीत जाणाऱ्या मुलांना इंग्रजीचे ज्ञान तोकडे राहत असे. चौथीपासून हायस्कूलला गेलेली मुले जरा ‘येस-फेस’ करायला आधीच शिकलेली असत! सुरु होणार होते  माध्यमिक शिक्षण, व सुनाबाई पेस्तनजी हाकीमजी हायस्कूल, बोर्डी!