संस्मरणे

बोर्डीची सु.पे.ह. हायस्कूल

बोर्डीच्या, मूलोद्योग प्रा.शाळेतून, फायनल (सातवीची) परिक्षा उत्तमरितीने पास झाल्यानंतर, आता पुढील शिक्षण म्हणजे एस.एस.सी. (SSC) साठी आठवीत प्रवेश.आमच्या सुदैवानी आम्हाला, सुनबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल च्या नावाने एक सुंदर शाळा गावातच उपलब्ध होती. त्याकाळी खूपच कमी माध्यमिक शाळा होत्या, त्यामुळे आजुबाजुच्या इतर गावातून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी बोर्डीस येत. परंतु मुंबई वा तत्सम शहरी भागातून देखील कांही विद्यार्थी बोर्डी शाळेत प्रवेश घेण्यासाठी येत. बोर्डीच्या ‘शारदाश्रमाची’ ख्याति महाराष्ट्रच काय भारतभर होती, म्हटले तरी अतिशयोक्ती होऊ नये. कारण या शाळेत आचार्य भिसे व आचार्य चित्रे गुरुजी यांचे रुपाने दोन महान गुरुवर्य शिक्षणदानासाठी वास्तव्यास होते. आचार्य भिसे गुरुजींची ख्याति तर त्यांच्या ‘आदिवासी सेवा’ कार्यामुळे दिल्ली पर्यन्त पोहोचली होती. त्यामुळे ह्या आचार्य द्वयीच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मुलाने भावी जीवनाची शिदोरी जमवावी, या उद्देशाने मुंबई-पुण्यासारख्या शहरांतूनच नव्हे तर, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा कांही प्रदेशातून मराठी-गुजराथी भाषीक, श्रीमंत पालक मुलांना ‘शारदाश्रमात’ शिक्षणासाठी पाठवित. त्यामुळे आपल्या जुन्या गुरुकुल पद्धतीचे पालन होई. भिसे-चित्रेंच्या शिस्तप्रिय मार्गदर्शनाखाली, त्यांची मुले हायस्कूलात ज्ञानार्जन करुन, आपल्या पुढील जीवनातील वाटचालीसाठी तयार होण्यास मदत होई. बोर्डीचे शारदाश्रम हें सर्व महाराष्ट्रात व महाराष्ट्रा- बाहेरील मराठी व गुजराती भाषिक पालकांत प्रसिध्द होते व तेथे प्रवेश मिळविण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत असे.. 

मी ज्या वर्षी आठव्या इयत्तेत हायस्कूलात आलो, त्यावेळी माझ्या दुर्दैवाने हे दोघे ही आचार्य( भिसे-चित्रे ) सेवानिवृत्त झाले होते मात्र भिसे गुरुजीचे वास्तव्य शारदाश्रमांत होते व आपले आदिवासी समाज सेवेचे काम ते तेथे राहून करीत. त्यामुळे प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्षरित्या, त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ शाळेस मिळत असे. चित्रे गुरुजी जरी नुकतेच निवृत्त झाले असले तरी, त्यांच्याकडे शारदाश्रमाचे व्यवस्थापन होते व कधी जरुरी पडली, तर मुलांना इंग्रजी, संस्कृतचे पाठ देत असत.  

आमचे हायस्कूल हे, नाशिक येथील, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आधिपत्याखाली होते. हायस्कूल व्यतिरिक्त, कोसबाड  येथील शेतकी संशोधन व प्रशिक्षण संस्था, गोखले सोसायटी मधे होती. हायस्कूलचे प्रिन्सिपॉल, त्यावेळी, श्री.पु.स.साने सर होते. तर कोसबाडला, पुढे ‘जपानी’ भातशेतीचे भारतातील तज्ञ्’’ म्हणून ओळखले गेलेली श्री. हरिचंद्र पाटील हे प्रमुख होते. आमचे साने सर हे सानेगुरुजींचे लहान बंधू व त्यामुळे साने गुरुजींचे वास्तव्य अनेक वेळा बोर्डीस झाले आहे. 

बोर्डी शाळेत ४ थी  इयत्तेपासून अकरावीपर्यंतचे वर्ग होते व मराठी, गुजराथी या दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांस विविध विषयांचे शिक्षण दिले जाई.

आठवी इयत्तेत प्रवेश घेतांनाच एस.एस.सी.साठी ‘शेती’ मुख्य विषय घेणार की ‘बिगर शेती’ ह्याचा निर्णय घ्यावा लगे व त्या प्रमाणे पुढील  ९ वी ते ११ चा अभ्यासक्रम ठरविला जाई. मला वाटले त्या काळी जिल्ह्यामध्ये ‘शेती’ मुख्य विषय घेऊन एस.एस.सी.परिक्षा देण्याची सुविधा फक्त आमच्याच हायस्कूलाला होती व त्या साठी शाळेकडे मुबलक शेत जमिन व प्रशिक्षित शेती शिक्षक शाळेने ठेवले होते. मी आठवीत प्रवेश घेतांना एस.एस.सी.साठी ‘बिगर शेती’ अभ्यासक्रम निवडला होता, त्यामुळे आम्हाला, संस्कृत, गणित, इ. विषयांच्या अभ्यासक्रमांत समावेश होता व शेती वर्ग नव्हते. 

शाळेचा व्याप त्यावेळी वाढत असल्याने, विद्यार्थ्यांना वर्ग कमी पडू लागले होते, त्यामुळे आम्हाला आठवीच्या अ, ब, क, या तुकड्यात प्रवेश न देता ‘ड’ हा नवीन वर्ग निर्माण केला होता. त्या आठवी (ड) तुकडीत प्रवेश मिळाला. आधीच आमचे तिसरी सोडून चौथीत हायस्कूलात आलेले वर्ग मित्र, आठवीत थोडे इंग्रजीचे ज्ञान प्राप्त झाल्याने आम्हाला ‘कमीच’ लेखत व आमच्याशी बोलतांना ‘हँ’ हें कधी इंग्रजी बोलणार अशा प्रकारची तुसडेपणाची भाषा वापरीत, त्यात ते आठवी (अ) मध्ये व आम्ही ८ वी (ड) मध्ये असल्याने, आमच्या अपरोक्ष ८ वी (ढ) चे हें लोक आमच्याशी काय स्पर्धा करणार, असे मागून बोलतपण त्यांची मस्ती थोड्याच दिवसांत उतरणार आहे, हे त्यांना कोठे माहीत होते.

आमच्या वर्गात, त्यावेळी प्रभाकर राऊत (सध्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे, बोर्डी व कोसबाड संस्थेचे ‘सचीव’), अरुण सावे, सुनंदा चरी, कला मुसळे अशी स्थानिक विद्यार्थी मंडळी व कानविंदे, भाटलेकर, राजाराम जोशी अशी शारदाश्रमांतील हुषार विद्यार्थ्यांची पंगतच होती. पहिल्या सहामाही परिक्षेत आमच्या (ड) इयतेतील मी व तीन चार विद्यार्थ्यांनी‘प्रिन्सिपॉल प्राइज’ मिळविले इतर इयतेत ते कोणालाच मिळाले नाही तेव्हां ही आठवी (ढ) नाही तर आठवी (द) आहे (The 8th) असे सर्वजण म्हणू लागले!

‘प्रिन्सिपॉल प्राईज’ हे सर्व विषयांत प्राविण्य गुण (७० आणि जास्त) मिळविल्यास विद्यार्त्यास दिले जात असे.सहामाही व वार्षिक परिक्षेतील गुणवत्ता नुसार हें पारितोषिक मिळत असे. मी माझ्या हायस्कूल विद्यार्थी दशेत आठवी ते अकरावी पर्यंत सर्व परिक्षांत हे पारितोषिक मिळविले. (एक परिक्षेचा अपवाद) त्या वेळी एक गंमत म्हणजे,आठवी (ड) मध्ये असतांना वार्षिक परिक्षेत माझे सर्व विषयांत प्राविण्य गुण होते, मात्र ‘मराठी’ या एका विषयांत मला वाटते   ४ – ५ गुण कमी पडले. प्रभाकरला त्या वर्षी च्या वार्षिक परिक्षेत हे पारितोषिक मिळाले व तोच त्या वर्षी सर्व तुकड्यांतून पहिला आला. आमच्या वर्ग शिक्षिका व मराठी विषयाच्या शिक्षिका मालती चुरी बाई होत्या. मालती बाईंनी त्याच वर्षी आमच्या तुकडी साठी (८ वी ड) एक सुंदर प्रथा सुरु केली होती. वर्गातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक हस्तलिखीत वार्षिक, त्यावेळी आम्ही मुलांनी, विविध विषयावर कवीता, लेख, चित्रे, असे कांहीसे लिहून तयार केले. आमचा एक वर्ग मित्र अशोक दांडेकर याने, त्यासाठी मुखपृष्ठावर सिहांच्या जबड्यात हात घालणाऱ्या बाल-भरताचे सुंदर चित्र रेखाटले होते कारण वार्षिकाचे नाव “मृगेंद्र” असे होते. पहिल्याच पानावर मालती बाईंनी वर्गातील प्रत्येक मुलाचे नाव व पुढे दोन शब्दांत त्याचे वैशिष्ट्य समर्पक पणे लिहले होते. मुलांची नावे परिक्षेतील गुणानुक्रमे होती. पहिले नाव अर्थातच प्रभाकर राऊत व पुढे हुषार समंजस विद्यार्थी, माझे नाव दुसरे व पुढे ‘हुषार व असमाधानी’ असे कांहीसे लिहले होते. मला त्यावेळी वाईट वाटले व एके दिवशी विश्रांतीचे वेळी बाईंकडे त्या बद्दल तक्रार घेऊन गेलो. बाईंच्या चेहऱ्यावर हसू आले, व हसत हसत त्या म्हणाल्या, “बघ प्रभाकर त्याच्या शेऱ्याबद्दल कांहीच सांगावयास आला नाही. तू त्वरीत माझ्याकडे तक्रार घेऊन आलास, हा असमाधानीपणा का?” -मी निरुत्तर होतो, कारण बाईंनी अगदी “पुराव्या सहीत” मला माझी चूक दाखऊन दिली होती.

मागे सांगितल्या प्रमाणे मी आठवीत आलो तेव्हा मला पाच रुपये महिना अशी ठाणे जिल्हा बोर्डा कडून शिष्यवृत्ती मिळत होती, ती ‘मेरीट’ स्क्वॉलरशिप होती. त्यावेळी शाळेकडून देखील मेरिट कम मिन्स (परिस्थिती व हुषारी) ‘अशी गरीब हुषार विद्यार्थ्यासाठी एक शिष्यवृत्ती मिळत असे. आप्पांनी त्यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाकडे अर्ज केला होता. एक शिष्यवृत्ती असतांना दुसरी शिष्यवृत्ती सुध्दा, एकाच विद्यार्त्यास मिळू नये या मताचे शाळेचे व्यवस्थापन होते. मात्र चित्रे गुरुजी जरी सेवानिवृत्त झाले होते, तरी अशा निर्णयामध्ये त्यांनाही सहभागी करुन घेत असत. त्यांनी त्यावेळी माझ्या नावाचा शिष्यवृत्ती साठी, एकट्याने, जोरदार प्रतिवाद केल्याचे कळले व मला दोन्ही शिष्यवृत्या, त्या कालखंडात मिळाल्या. त्यामुळे माझ्या शालेय शिक्षणात व इतर खर्चाचा, बराच भार कमी झाला. जेव्हां आप्पांना ही हकीकत नंतर कळली, तेव्हां त्यांनी मला बरोबर  घेऊन चित्रे सरांची, त्याच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या विषयी खूप कृतज्ञता व्यक्त केली. मला त्यांचे चरणस्पर्श करण्याचे भाग्य लाभले. त्यावेळे पासून चित्रे गुरुजी, जरी प्रत्यक्ष दैनंदिन कारभारात लक्ष देत नसले तरी, त्यांची बारीक नजर माझ्यावर असे व सतत मला ते माझ्या परिक्षेतील अभ्यासातील प्रगती बद्दल मधून मधून विचारीत.

माझ्या शैक्षणिकच नव्हे तर एकूण जीवन कालांत ज्या थोड्या शिक्षकांनी मला उपकृत केले आहे व ज्यांचे  पुण्य-स्मरण मला आजही स्फूर्ति दायी वाटते, त्या थोड्या व्यक्ती मध्ये आचार्य चित्रे गुरुजी हे एक आहेत. एवढे सांगितले म्हणजे मला त्यांच्या विषयी काय वाटते हे समजावे. 

दोन आठवणी- मागे सांगितल्याप्रमाणे मला सर्व विषयांत चांगले गुण मिळत व प्रगति छान होती. गुरुजी प्रत्येक परिक्षेनंतर माझ्या गुणांची माहीती घेत. मला ही माहीत होते व त्यांच्या ही लक्ष्यात आले होते की इतर सर्व विषयांत ८०-९० टक्के मिळविणारा मी, इंग्रजीत खूपच मागे होतो. भविष्यात जर कॉलेज शिक्षण घ्यावयाचे असेल तर इंग्रजीत केवळ ‘प्राविण्य गुण’ मिळवून चालणार नाही तर एकूणच इंग्रजी ह्या विषयाचे आकलन मला झाले पाहिजे व त्यासाठी इंग्रजी लिखाण, उच्चार हे देखील तितकेच महत्वाचे आहेत हे गुरुजींनी ओळखले. दहावीच्या परिक्षेनंतर एक दिवस त्यांनी मला त्यांच्या निवास स्थानी (त्यावेळी ते हॉस्टेलच्या स्वयपांकगृहाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत) बोलाविले प्रसिद्ध ‘रेन अँड मार्टीन’ (Highschool English Grammar by Wren & Martin) च्या पुस्तकाची प्रत मला देऊन त्यांतील अनेक निबंध, पत्रे, व इंग्रजी व्याकरणाचे धडे माझ्या कडून करवून घेतले. शाळेतील इंग्रजी विषयी पुस्तकांचा व अभ्यासाचा याच्याशी कांही संबंध नव्हता. त्यांनी दिलेला गृहपाठ एक स्वतंत्र वहीत लिहून संध्याकाळी शाळा सुटल्यावर त्यांच्याकडे जाऊन ते तपासून घेई. केलेल्या अभ्यासांत एक जरी चूक निघाली, तर तो पाठ पुन्हा लिहुन द्यावा लगे अशा रितीने ‘शून्य’ चूक होई पर्यन्त, परत परत तोच गृहपाठ मला करावा लागे. सुरवातीस स्पेलिंगच्या खूप चूका होत, पण पुढे खूपच सुधारणा झाली. माझा इंग्रजी विषय एवढा छान तयार झाला मी अकरावी च्या एस.एस.सी. परिक्षेत १०० पेकी ७५ मार्क मला इंग्रजीत मिळाले, ही खूपच मोठी पायरी होती. कारण इंग्रजीत बोर्डात पहिला येणारा विद्यार्थी इंग्रजीत ८० मार्कांपर्यंतच असे! ह्या अभ्यासाचा मला केवळ एस.एस.सी. परिक्षेपुरताच नाही, तर माझ्या महाविद्यालयीन व भावी आयुष्यात खूप उपयोत झाला, इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास आला व पुढे नोकरी, धंद्यात इंग्रजीतून व्यवहार करताना मला inferiority complex आले नाही. 

दिव्यत्वाची जेथ प्रचिती…

ज्यावेळी शाळेचा निरोप घेऊन मी पुढील शिक्षणासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयांत जायचे ठरविले, त्या दिवसांत गुरुजींना  भेटण्यासाठी गेलो होतो. अर्थातच साताऱ्याचा निर्णय देखील आप्पांनी गुरुजींच्या समंतीनेच घेतला होता. त्यावेळची गुरुजींची स्निग्ध नजर व पाठीवरील आश्वासक थाप माझ्या पुढील वाटचालीसाठी माझी शिदोरी होती. गुरुजी निघताना म्हणाले “प्रयत्नाची पराकाष्ठा कर. खूप कष्टमय प्रवास होणार आहे आणि, कधी ही पैशाच्या विवंचनेमुळे अभ्यासांतील चित्त ढळू देऊ नको. कधी पैशाची जरी गरज वाटलीच, तर तसे मला कळव मी मदत करीन”, ही आधारकता माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. कारण ‘पैशाचीही मदत करीन’ असे सांगणारे त्यावेळी माझ्यासाठी कोणी नव्हते, सुदैवाने मला तशी कधी वेळ आली नाही, मात्र कधी संकट आलेच, तर गुरुजी आपल्या पाठीशी आहेंत. परिक्षा पूर्ण करण्यात आपण यशस्वी होणारच.. अशी पक्की धारणा झाली, खूप मोठा धीर मला मिळाला! मला नंतर कळले गुरुजींनी त्यांच्या अनेक विध्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी अशी मदत कांही ही  वाच्चता न करता केली आहे! म्हणूनच चित्रे गुरुजींना ‘आचार्य‘ ही उपाधी देखील मला थिटी वाटते. हायस्कूल मधील आणखी एक गुरुजी ज्यांनी मला खूप प्रेम दिले व भावी जीवनासाठी काही तरी अमोलीक ठेवा दिला, ते माझे आदरणीय भाई मळेकर सर! लौकिकार्थानी भाईंचे शिक्षण फार झाले नव्हते, त्यावेळचे आमचे थोडे गुरुजन पदवीधर, जुने शिक्षक हे केवळ एस.एस.सी. अथवा ‘मॅट्रीक’ होऊन शिक्षकाचे काम करीत होते. भाई देखील त्यावेळी मॅट्रिक पास असावेत व भिसे गुरुजींच्या सान्निध्यामुळे त्यांना हायस्कूल मध्ये मराठीचे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली असावी. त्यांच्या बोलण्यातून भिसे-चित्रे गुरुजी बद्दल आदर पदोपदी दिसून येई. भाईंनी आम्हाला नववी ते दहावी या इयत्तेत मराठी शिकविले. भाईंचे वाचन अफाट होते, वक्तृत्व शैलीची देणगी होती. खूप भावनाशील होऊन बोलत व कधी कधी शिकवितांना अचानक अश्रुपात सुरु होई- सर्व वर्ग निस्तब्ध होऊन हे सारे ऐकत असे व पहात असे, मात्र कधीही कोणा विद्यार्थ्याने त्या बद्दल त्यांची टवाळी केली नाही. ते वर्गात आल्याबरोबर नेहमीची पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम बाजूला रहात असे व ज्या लेखक, लेखिका अथवा कवी, कवियत्रीचा धडा शिकवावयाचा असे त्या व्यक्तिच्या वाङमयीन वाटचाली बद्दल, शैली बद्दल, काही वैशिष्ठ्यपूर्ण प्रसंगावर व एकंदरीतच लेखक लेखिकेच्या वाङमयीन साहीत्य कृतीचे अवलोकन त्या निमित्ताने होई. एक ५-६ पानी धड्यातून लेखकाचे व्यक्तिमत्व कसे पाहणार? पण भाईंच्या वर्गात त्यावेळी त्या लेखकाची संपूर्ण कारकीर्द उभी राही व आम्ही मुले अगदी भूल दिल्या प्रमाणे एकाग्र चित्ताने ते ऐकत असू. भाईच्यां तासासाठी मी एक वेगळीच वही करुन ठेवली होती व त्यावेळी भाई जी विविध सुभाषिते, काव्याच्या ओळी, गोष्टी प्रसंग वर्णन करीत, त्याचे टिपण करुन ठेवी. कोणत्याही निबंध लेखनासाठी, वक्तृत्व स्पर्धेसाठी, अशी माहीती म्हणजे मोठा अमोल ठेवाच होता! जरी नेमलेल्या पाठ्यपुस्तकातील अभ्यास, वर्ष अखेर कधी पूर्ण होत नसला तरी परीक्षेत मराठीचा विषय, पेपर सोडवितांना कधी अडचण आली नाही. दररोज  प्रार्थनेच्या वेळी सर्व विद्यार्थी ‘गुरुदक्षिणा मंदीरात’ एकत्र येत. त्यावेळी काही विशिष्ट दिवशी (कोणाची जयंती/ पुण्यतिथी) भाईंचे भाषण, प्रार्थनेनंतर ऐकणे म्हणजे मेजवानी असे! भाईंचे माझ्या वर विशेष प्रेम असल्याचे कारण म्हणजे मला असलेली वक्तृत्वाची आवड. आमच्या शाळेतील प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेऊन बक्षिसे पटकवित असे. त्यामुळे शाळे तर्फे आंतरशालेय स्पर्धेसाठी माझी दरवर्षी निवड झाली व प्रत्येक वर्षी शाळेला मी प्रथम क्रमांक मिळवून दिला. याचे सर्व श्रेय आप्पा व भाईंकडे जाते. आप्पा मला विषयानुसार भाषणाचा ‘तर्जुमा’करुन देत तर भाई शाळेमध्ये सुट्टीच्या तासांत (मध्यंतर) एका वर्गात, माझी प्रत्यक्ष तयारी करवून कांही सूचना करीत. त्यावेळी शिक्षकांना मधल्या सुट्टींत काही अल्पोपहार वसतीगृहाच्या कँटीन मध्ये मिळे. भाई आपली ‘वाटी’ (अल्पोपहाराचे त्या वेळचे संबोधन), आपल्या बंडीच्या खिशात ठेऊन माझ्यासाठी घेऊन येत व वक्तृत्वाची तालीम झाली कि मला ‘वाटीची’ बक्षिशी मिळे. एका वर्षी आंतर-शालेय वक्तृत्व स्पर्धा ऊबंरगाव येथील हायस्कूलात झाली (त्यावेळी ऊबंरगाव देखील ठाणे जिल्ह्यात होते.) भाई मला व गुजराथी विभागातील माझ्या मित्राला घेऊन ऊबंरगावला आले होते. ही स्पर्धा विशेष लक्षांत राहण्याचे कारण, मला मिळालेला प्रथम क्रमांक नव्हे तर त्यावेळी भाई आम्हाला सकाळीच, त्यांचे जुने सहकारी व बोर्डी हायस्कूलचे निवृत्त ड्रॉईंग शिक्षक मोहीते सर (बी.एस. मोहिते) यांचे, समुद्रकिनाऱ्यावरील टुमदार बंगल्यात प्रथम घेऊन गेले. स्पर्धा दुपारी होती व आम्ही मोहीते सराकडे फराळ, भोजनकरून स्पर्धेसाठी गेलो. मोहीते सर यावेळी ‘संन्याशाश्रमात’ होते वाढलेली दाढी व भगवी वस्त्रे, शांत मृदु व्यक्तिमत्व असे दर्शन त्यावेळी झाले. त्यांची कांही ऊत्तम चित्रे मी बोर्डी-घोलवडच्या काही घरांत व शाळेत ही पहिली होती – त्यावेळी या असामान्य चित्रकाराचे दर्शन घेण्याचा मोह झाला होता, तो असा अचानक योग आला. मोहीते सरांनी आम्हाला आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या, तेच त्यांचे मला झालेले प्रथम व अखेरचे दर्शन!

एकदा आप्पा मला भाई माळेकरांचे घरी (घोलवडला) घेऊन गेले होते. त्यांच्या घराच्या भिंतीवर “ये भी नही रहेगा” असे हिन्दी भाषेतील वाक्य ठळक पणे लिहले होते. आप्पांनी भाईंना त्या बद्दल विचारले तेव्हां ते म्हणाले “गुरुजी, आयुष्यातील आजचा दिवस उद्या सारखा असणार नाही; आज सुखात असाल तर उद्याही सुखाची पहाट असेल ही शाश्वती नाही; तसेच आज दुःखाची रात्र आहे तरी उद्याची पहाट सुखाची असू शकेल!” काल-महिमा किती लहान वाक्यांत संपूर्ण पणे सांगितला होता? आप्पांनी देखील ते वाक्य आमच्या बोर्डीच्या झोपडीतील कारवीच्या भिंतीवर व पुढे घोलवडच्या विशाल घरांतील विटांच्या भिंतीवर हेच वाक्य लिहून ठेवले होते. माझ्या कायमच्या स्मरणात राहिलेला तो प्रसंग व ते वाक्य! 

भाई मळेकर सरांनी मला काय दिले? भाईंनी मला ‘तू उत्तम पणे, आपले विचार मांडू शकतोस!’ हा जबरदस्त आत्मविश्वास दिला. आप्पांमुळे, मराठी शाळेपासून अवगत झालेल्या या कलेला भाईंनी खतपाणी घालून, या रोपट्यांचे  सुदंर जतन केले. प्रत्येक माणसाला जीवनाच्या अनेक क्षेत्रांत वक्तृत्वाची गरज भासतेच, व त्यावेळी तुमची पडणारी छाप, तुमचे ते काम यशस्वी, अथवा अयशस्वी होण्यास कारणीभूत होते. मला माझ्या भावी जीवनांतील, सामाजिक, शैक्षणिक व धंदेवाईक क्षेत्रात जे थोडे फार यश मिळाले, त्यांचे खूप मोठे योगदान भाईंच्या आशीर्वादाचे आहे. मोठेपणा म्हणून नव्हे, तर या बोलण्याच्या कलागुणांमुळे, माझ्या व्यावसायिक यशात मोठा हातभार आहे. भारतातील एका अग्रगण्य कंपनीत उच्च पदावर काम करीत असतांना, परदेशांत जाऊन तेथे कंपनीच्या माल विक्रीसाठी कांही प्रतिनिधी (डिलर, डिस्ट्रिब्युटर distributors) नेमणे हे एक काम असे यासाठी मी जवळ जवळ पंधरा-सोळा देशात जाऊन तेथे कंपनीच्या विक्री (Sales) संबंधात जाळे उभे केले आहे. त्या आधी आम्हाला त्या देशातील भारताच्या दूतावासामध्ये (embassy), तेथील भारतीय कमिशनर व वाणिज्य विभागाचे मुख्य यांच्या समोर फक्त दहा मिनिटांत एक माहीतीपूर्ण व्याख्यान (presentation) द्यावे लागे व त्या नंतर त्यांच्या सर्व प्रश्नांचे समाधान करावे लगे. तसे झाले तरच तेथे भारतीय कंपनीला (सरकारी) आपली शाखा उघडता येई. माझ्या कामाचा एक भाग म्हणून प्रत्येक वेळी हा प्रयोग मला करावा लागला व मी तेथे यशस्वी झालो, याचे फार मोठे श्रेय भाई मळेकर गुरुजी व त्यांनी दिलेले मार्गदर्शन व आत्मविश्वास याला जाते!   

 बोर्डी हायस्कूल मधील त्या काळातील आणि एक प्रभावी शिक्षक म्हणजे न.दि.दुगल सर! त्यांच्या प्रसन्न वक्तिमत्वातूनच प्रथम दर्शनी, त्यांच्या विद्वतेची छाप  विद्यार्थ्यावर पडत असे. गोरेपान, उंचीने कमी असणारे दुगल सर, आपल्या मराठी, इंग्रजी व संस्कृतच्या व्यासंगाने शिकवतांना विध्यार्थ्यांवर जबरदस्त छाप पाडीत. नेहमी हसऱ्या चेहऱ्याने व हावभाव करीत वर्गात फेऱ्या घालीत, विषयाचे विश्लेषन करीत. खरेतर ते कोठेतरी महाविद्यालयात  प्राध्यापक व्हावयाचे, मात्र भिसे-चित्रेंच्या व्यक्तिमत्वाला भारुन ते बोर्डी हायस्कूलात शिक्षक म्हणून रुजू झाले असावेत. माझ्याबद्दल त्यांना आपुलकी वाटण्याचे कारण शाळेचा बहुतेक सांस्कृतीक स्पर्धांमध्ये (वक्तृत्व, वाचन, निबंध लेखन इ.) मी भाग घेत असे व त्यांची कन्या जयप्रभा सुध्दा, या सर्व स्पर्धा मध्ये एक स्पर्धक असे. दुगल सरांबद्दल एक आठवण अगदी पक्की मनांत ठसलेली आहे व अनेकदा माझ्या भाषणात, योग्य अशा संदर्भात, मी ती सांगत असतो. खरा’ हाडाचा शिक्षक’ म्हणजे काय, याचे प्रत्यंतर देणारी ही गोष्ट आहे.-

सरांची प्रकृती बरेचं वेळा ठीक नसे व अधी-मधी त्यांस शाळेत जाणे शक्य नसे, कधी आठवडाभर देखील ते रजेवर असत. अशाच एका त्यांच्या गैरहजेरीत, इंग्रजीचे तास घेण्यासाठी काही दिवस चित्रे गुरुजी आमच्या नववीच्या वर्गावर आले. वर्डस्वर्थ (Wordsworth) कवीची ‘द सॉलिटरी रिपर’ – The solitary reaper ही प्रसिध्द कवीता त्यांनी आम्हाला शिकविली. काही दिवसानंतर दुगल गुरुजी वर्गावर आल्यानंतर त्यांनी चित्रे सरांनी घेतलेल्या अभ्यासाची चौकशी केली. आम्ही मुलांनी ‘सॉलिटरी रिपर’  कविता शिकवून झाल्याचे सांगितल्यावर सर थोडे नाराज झाल्याचे दिसले, मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रीया दिली नाही. दुसरे दिवशी सर अगदी आनंदात वर्गात शिरले व त्यांनी आम्हाला तीच कविता आपण शिकवणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी चित्रे गुरुजींची परवानगी ही मागितली होती. त्यादिवशी आमच्या नववी (ड) च्या वर्गात प्रत्यक्ष वर्डस्वर्थ अवतरला होता व जणू त्यांच्या मुखांतून स्कॉटलंडमधील एक भरलेल्या शेतांत, कापणी करणारी ती युवती आमच्या समोर प्रत्यक्ष अवतरली होती. सर्व वर्ग, मंतरला होता, तास कसा गेला ते ही समजले नाही मात्र तास संपल्यानंतर सरांच्या डोळ्यांतून अवतरलेले दोन अश्रू ते आमच्या पासून लपवू शकले नाही. त्याकवितेने माझ्यावर एवढे गारुड केले की ती कविता तर आपोआप लक्षात राहीलीच, पण दोन वेळा मी इंग्लंड -स्काटलंडला गेलो त्यावेळी तेथील शेतात ती भात कापणारी युवती कोठे दिसते काय, असा भास गाडीमधून प्रवास करतांना झाला. दुगल गुरुजींची एवढ्या वर्षानंतरही प्रकर्षाने आठवण झाली. ह्या प्रसंगातून माझ्या या दोन गुरुजनांबद्दल मला असलेला आदर ही अनंत पटीने वाढला कारण एकदा शिकवलेली कविता पुन्हा शिकविण्यासाठी धडपडणारे दुगल सर व आपण शिकवलेला अभ्यास पुन्हा दुसऱ्या शिक्षकांनी शिकविण्यासाठी मोठ्या मनाने परवानगी देणारे चित्रे सर दोघे ही किती महान! गोखले सोसायटी बरोबर काही वैचारीक मतभेद झाल्याने दुगल सरांनी बोर्डी सोडली  व ते केळवा-माहीम येथील हायस्कूलात मुख्यध्यापक म्हणून गेले.

शास्त्र आणि गणित विषयासाठी १०-११ वी साठी स.वा.आपटे सर होते. आठवी नववी श्री बी.वी. आरेकर व काही काळ श्री जयराम सावे सर गणित, शास्त्र शिकवीत. मात्र या दोन मुख्य विषयांचा खऱ्या अर्थाने परिचय करुन दिला तो आपटे सरांनी. अतिशय मृदु भाषी, प्रसन्न मुद्रेचे, सफेद लेहेंगा व हाफ शर्ट ,चप्पल हा पेहराव वर्षभर घालवणारे आपटे सर मला वाटते फक्त रात्री जेवणासाठी घरी जात असावेत. कारण दर दिवशी व कधी शनिवारी-रविवारी सुध्दा त्यांचे ज्यादा वर्ग चालू असत, त्यामुळे बहुतेक वेळ शाळेंतच जाई. आपटे सरांचा तास नसतांना ते पहिल्या मजल्या वरील ‘सायन्स हॉल’ मध्येच असत व कधीतरी तेथे ते धुम्रपान ही करीत.  मात्र आपल्या कामाला संपूर्ण वाहून घेतलेली अशी काही मंडळी लक्षात राहीली, त्यांतील एक म्हणजे आपटे गुरुजी ! आपटे सरांनी मला खूपच आपुलकी दिली, विशेषतः अकरावीच्या वर्षांत आम्ही तीन-चार विद्यार्थीच १०० मार्काचा अंकगणित हा विषय घेतला होता व एवढया कमी विद्यार्थ्यांसाठी, शाळेने स्वतंत्र शिक्षक नेमला नव्हता. आपटे सर आम्हाला, त्यांच्या फावल्या वेळात सायन्स हॉल मध्ये बोलावून गणिताचे जुने पेपर्स सोडवून घेत व आम्हाला मार्गदर्शन करीत. सरांचे मार्गदर्शन एवढे अचूक होते की शाळेत हा विषय न शिकताही मला एस.एस.सी.च्या बोर्डाच्या परीक्षेत, १०० पैकी १०० गुण मिळाले. माझ्या श्रमापेक्षा सरांचे मार्गदर्शन हीच या यशाची गुरुकिल्ली होती. मी साताऱ्याच्या कॉलेज मध्ये असतांना मुंबई-पुणे प्रवासात एकदा एकाच डब्यांत त्यांचे बरोबर गप्पा मारण्याचा योग आला. खूप गप्पा केल्या व माझ्या साताऱ्याच्या जीवनातील खडतर प्रसंग ऐकून गुरुजींनी खूप सहानभुती देखील दाखवली. पुढे मी नोकरीत गेल्यानंतर ही गुरुजींनी मला एक सविस्तर, शाबासकीचे पत्र पाठविले होते. मात्र बोर्डी शाळेतून ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर घोलवडला रहात होते, पण त्यांच्याशी संपर्क तुटला. आपटे सरांचे बहुमोल मार्गदर्शन विशेषतः अंकगणितातील वैयक्तिक शिकवणी मी कधीच विसरणार नाही. इयत्ता दहावी साठी आम्हाला वर्ग शिक्षक ’श्री र.म.आरकेर सर’ होते. बोर्डी शाळेचे माझी विद्यार्थी व मांगेला समाजातुन ज्या थोड्या कुटूंबांनी उच्चशिक्षण घेतले, त्यापैकी आरकेर सरांचे एक कुटूंब होय! ते मराठी व इंग्रजी विषय शिकवीत.त्यांच्या जीवनाची व शिकविण्याची देखील एक वेगळीच घाटणी होती. अत्यंत कमी बोलणे, विद्यार्थ्यांनाही ‘आहो जाहो’ करणे व शिकवितांना अभ्यासा व्यतिरीक्त इतर काहीच बाबीवर भाष्य न करणे असा त्यांचा खाक्या होता, त्यामुळे कधी कधी त्यांच्या तासाला रुक्षपणा ही येत असे, मात्र अतिशय अभ्यासू व शिस्त प्रिय असे त्यांचे वागणे असे. डी. एन.सावे, शामू राऊत हे माझे मित्र व मी, आम्ही तिघे मागच्या बाकावर एकत्र बसत असू. आरकेर सरांच्या मराठी तासाला कधी कंटाळा आला तर शामू व डी.एन.वाडवळी भाषेत काही प्रतिक्रिया देऊ लागत, त्यामुळे मला हसू दाबून ठेवणे कठीण जाई. सरांच्या एकदा हे लक्षांत आल्याने, त्यांनी मला वर्गांत उभे केले होते मात्र थोडी तंबी देऊन पुन्हा बसविले, आमच्या मित्रांनीही त्यानंतर आपली ‘मल्लीनथी’ थांबविली आज माझे हे दोघेही जीवलग मित्र या जगांत नाहीत हे खूपच दुःखदायक आहे. आरकेर सर अजूनही वसईत राहतात व नुकतेच निवर्तले असे समजले. मुंबईस माझ्या घरी देखील एकदा कांही कामानिमित्त माझ्याकडे येऊन खूप गप्पा करुन गेले, बराच बदल झालेला दिसला. 

अल्पावधीसाठी बोर्डी हायस्कूलात शिक्षक म्हणून येऊन, विद्यार्थीप्रीय झालेल्या शिक्षिका म्हणजे आमच्या नववी (ड) वर्गाच्या वर्ग शिक्षिका सौ जोशीबाई. जोशीबाई व जोशी सर हे दांपत्य केवळ एक वर्षा साठी आमच्या शाळेत होते ते सांगली मिरजकडील राहणारे व नोकरी निमित्त दोघे बोर्डीस वास्तव्यास होते. बाई संस्कृत व मराठी शिकवीत. वर्गात प्रवेश केल्यावर एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होत असे कारण त्यांचे व्यक्तिमत्व तसे होते. त्या देखील नुकत्याच विवाह करुन जोशी सरांबरोबर शिक्षकी पेशास सुरवात करीत होत्या. सकाळची हजेरी घेतांना हजर विद्यार्थ्यांची चौकशी तर करीतच. पण विशेषतः गैरहजर विद्यार्थ्याबाबतही खूप आस्था दाखवून, का गैरहजर आहे इ. चौकशी करीत. त्यांना स्वतःला गायनाची आवड  असल्याने कधी फुरसतीच्या वेळेत एखादे मराठी भावगीत वैगेरे गाऊन दाखवत व वर्गांतील सुरील गळ्याच्या विद्यार्थी / विद्यार्थिनीला गायला सांगत. आमच्या वर्गात जयंत बलजेकर हा विद्यार्थी अतिशय गोड गळ्यात काही भावगीते त्यावेळी गाऊन दाखवी. बलजेकरचे “जा सांग लक्ष्मणा” हे भावगीत व गायतोंडेचे “रघुपति राघव गजरी गजरी” ह्या गाण्याचे सूर आजही माझ्या कानांत गुणगुणत असतात.

संस्कृतचे व्याकरण शिकवितांना बाईंनी शिकविलेले रामरसेतील “रामो राज मणी सदा विजयते” हा श्लोक त्या दिवसा पासून पाठ झाला आहे.

सहामाही परीक्षेत आमच्या वर्गांत संस्कृतमध्ये कोणीच नापास झाले नाही, शाबासकी प्रित्यर्थ बाईंनी सर्व वर्गासाठी लेमोनेड गोळ्या आणल्या, वाटतांना कळले की त्या गोळ्या बांधून आणलेले पेपरचे वेष्टनास, तंबाखुचा वास येत आहे. बाईंनी सर्व गोळ्या पुन्हा गोळा करुन, फेकून दिल्या व दुसरे दिवशी पुन्हा नवीन गोळ्या वाटल्या! एक गोळीची किमंत ती काय? पण त्या बाईंनी ती गोळी आपल्या प्रेमाच्या ओलाव्यात बुडवून दिली होती! म्हणून ती आजही गोड मधुर चव जिभेवर रेंगाळत असते. बाई शाळा सोडून मिरजला गेल्यावर त्यांनी वर्गातील प्रत्येक मुला-मुलीला उद्देशून (फक्त नववी ड) एक छान पत्र पाठविले होते ते आम्हाला चुरमुरे बाईंनी वाचून दाखविले होते. प्रत्येकास त्यांनी काहीतरी दोन शब्द उत्तेजनार्थ लिहले होते – मला म्हटले होते “दिगंबर असाच छान अभ्यास चालू ठेव,” मात्र जयंत बलजेकरला लिहलेले वाक्य मी कधीच विसरले नाही. “माझ्या लाडक्या जयंता, तुझ्या आवाजाची मोहिनी माझ्या मनावर सदैव राहील”

आज बाई कोठे असतील, आमचा जयंताही  कोठे आहे, काहीच माहिती नाही, कोठेही असुदे माझे नम्र अभिवादन!